॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय एकोणिसावा ॥

कृष्णाचे मथुरेतील पराक्रम, कंसाचा वध,
वसुदेव-देवकीला भेटून त्यांचे सांत्वन -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय श्रीकृष्ण आत्मयारामा । उपाधिरहिता पूर्णब्रह्मा ।
मंगलरूपा मंगलधामा । पूर्णकामा सर्वेशा ॥१॥
अमंगल हे माझी काया । मंगल नाम तुझें यदुराया ।
तें नाम माझें हृदयीं लिहूनियां । तूं स्वामियां पवित्र करीं ॥२॥
जैसा कागद खरकटा जाण । त्यासी न शिवती सोवळे ब्राह्मण ।
त्यावरी तुझें नाम करितां लेखन । मग पूजून हृदयीं धरिती हो ॥३॥
तैसे हें अमंगल शरीर । शुक्र-शोणितमिश्रित अपवित्र ।
अस्थि मांस मळ मूत्र । येणेंकरूनि भरलेंसे ॥४॥
अनंत जन्मींच्या पापें घोळिलें । काम-क्रोध-लोभें खरकटलें ।
श्लेष्मदुर्गंधीचें ओतिलें । कृमींचें भरलें सदन हें ॥५॥
केवल अस्थींची मोळी । शिरांनीं ठायीं ठायीं बांधिली ।
मांस-रक्तें वरीं लिंपिली । त्यावरी मढविली त्वचेनें ॥६॥
जो रजस्वलेचा विटाळ । सर्वांमाजी अमंगळ ।
त्या विटाळाचें फळ । वाढलें केवळ मळसूत्रें ॥७॥
ऐसें हें अमंगल पाहीं । जरी तुझें नाम लिहिलें हृदयीं ।
मग याएवढें पवित्र नाहीं । तुझें भजनीं लावितां ॥८॥
ज्यावरी मुद्रा करी राजेंद्र । तें पृथ्वीस वंद्य होय पवित्र ।
तैसा माझें हृदयीं तूं यादवेंद्र । राहोनि पावन करीं कां ॥९॥
कागद अत्यंत मोलें हीन । परी मुद्रा उमटतां वंदिती जन ।
तैसा मी अत्यंत दीन । करीं पावन यदुवीरा ॥१०॥
मुक्तमाळेसंगें तंतु । कंठीं घालिती भाग्यवंतु ।
कीं सुमनासंगें मोल चढतु । तैलासी जैंसें विशेष पैं ॥११॥
राजा बैसे सिंहसनीं । तो नमस्कारिजे थोर-लहानीं ।
माझी तनु चक्रपाणी । करीं पावन तैसीच ॥१२॥
ब्रह्मानंदा यदुकुलतिका । मी तुझ्या पायींच्या पादुका ।
परी त्या वंद्य सकळिकां । चरणप्रसादें तूझिया ॥१३॥
असो अठरावा अध्याय संपतां । मथूरेसमीप कमलोद्‌भवपिता ।
उपवनीं राहिला तत्त्वतां । नंद-गौळियांसमवेत ॥१४॥
यावरी अक्रूर चालिला तेथून । प्रवेशला हो राजभवन ।
कंसरायास करून नमन । सर्व वर्तमान सांगतसे ॥१५॥
म्हणे घेऊनि आलों जगज्जीवन । जो यादवकुळमुकुटरत्‍न ।
जो कां नरवीरपंचानन । विद्वज्जन वंदिती जया ॥१६॥
जो त्रिभुवनवंद्य सर्वांसी आर्य । जो अज अजित अद्‌भुतवीर्य ।
परमतेजस्वी प्रतापसूर्य । तो यदुवर्य आणिला ॥१७॥
तमारिकन्येच्या जेणें र्‍हदजळीं । कालिया रगडिला पायांतळीं ।
जेणें क्षणमात्रें पूतना शोषिली । तो वनमाळी आणिला ॥१८॥
तृणावर्त केशी अघ बक । प्रलंब धेनुक वधिले सवेग ।
जो निजभक्तहृदयारविंद्रभृंग । तो श्रीरंग आणिला ॥१९॥
जो कमळनाथ कमळपत्राक्ष । पद्मोद्‌भव आणि विरूपाक्ष ।
ज्यासी ध्याती तो सर्वसाक्ष । परमपुरुष आणिला ॥२०॥
आला ऐकोनि श्रीकृष्ण । दचकलें कंसाचें अंतःकरण ।
बुद्धि चित्त अहंकृति मन । कृष्णरूप जाहलें ॥२१॥
कंसासी लागलें हरिपिसें । पदार्थमात्र हरिरूप दिसे ।
आपुलें अंतरीं श्रीकृष्ण भासे । हांक आवेशें फोडिली ॥२२॥
कृष्णरूप आसन वसन । कृष्णरूप दिसे भूषण ।
भोंवते सेवक स्वजन । दिसती कृष्णरूप ते ॥२३॥
स्नान करावया कंस । पडदणी घेतां सर्वेश ।
उदकीं दिसें हृषीकेश । झालें मानस हरिरूप ॥२४॥
जेवावया बैसला अन्न । तों अन्नांत दिसे मनमोहन ।
कंसें हांक फोडिली दारुण । मुष्टि बळोन बोलतसे ॥२५॥
बहुत भोगिसी पुरुषार्थ । सोसीं एवढा मुष्टिघात ।
आवेशें भोजनपात्र फोडीत । अन्न विखुरत चहूंकडे ॥२६॥
रागें कंस फिरवी नयन । म्हणे पाककर्त्यासी जीवें मारीन ।
अन्नामाजी मेळवूनि कृष्ण । माझा प्राण घेऊं पाहे ॥२७॥
प्राशनास आणिलें उदक । तों उदकीं दिसे कमलानायक ।
कंसें पात्र भिरकाविलें देख । हांक फोडून तेधवां ॥२८॥
हडपी देत विडिया करूनी । कंस पाहे विडा उकलूनी ।
म्हणे आंत मेळविला चक्रपाणी । तुमचें मनीं मरावें म्यां ॥२९॥
पुढें दाविलें दर्पण । आंत बिंबला नारायण ।
आरसा दिधला भिरकावून । सेवकजन हांसती ॥३०॥
भोंवते दैत्यांचे भार । म्हणे हे अवघेच दावेदार ।
आणा वेगीं म्हणे शस्त्र । तों शस्त्र हरिरूप दिसे ॥३१॥
शस्त्र भिरकाविलें धाकें । म्हणे कोठें माझें पाठिराखे ।
मुष्टिक-चाणूरादिक सखे । कोठें गेले कळेना ॥३२॥
अंतःपुरामाजी प्रवेशला । तों हरिरूप स्त्रियांचा मेळा ।
हांक फोडूनि बाहेर आला । भयें घाबरला पळतसे ॥३३॥
भू-आप-अनळ-अनिळ-निराळ । अवघा व्यापिला घननीळ ।
पदार्थमात्र जे ते सकळ । दिसती गोपाळस्वरूप पैं ॥३४॥
ऐसें परम द्वेषेंकरून । लागलें कंसासी कृष्णध्यान ।
असो इकडे उपवनीं जगज्जीवन । काय करिता जाहला ॥३५॥
एक निद्रेंत क्रमिली रजनी । सवेंचि उगवला वासरमणी ।
नित्यनेम सारिला तेचि क्षणीं । नंदादिकीं तेधवां ॥३६॥
कृष्णें दृढ बांधिली वीरगुंठी । पदकमुक्ताहार रुळती कंठीं ।
दिव्य रत्‍नें झळकती मुकुटीं । बाहुवटीं भूषणें ॥३७॥
वीरकंकणें मणगटीं । दशांगुळी मुद्रिकांची दाटी ।
बळिरामाहित जगजेठी । रथावरी आरुढला ॥३८॥
मागें गौळियांचे भार । लागला वाद्यांचा गजर ।
मथुरेमाजी यादवेंद्र । निजबळें प्रवेशला ॥३९॥
तों रंजक वस्त्रें धुवोनी । राजगृहा जात घेऊनी ।
त्यास म्हणे मोक्षदानी । वस्त्रें देईं आम्हांतें ॥४०॥
तों त्याचा मृत्यु जवळी आला । तदनुसार तो बोलिला ।
म्हणे वस्त्रें कायसीं तुजला । गोरसचोरा गौळिया ॥४१॥
तूं वनामध्यें गौळियांसीं । बळकटपणें झोंबी घेसी ।
तें तेथें न चले मथुरेसी । जिवें जासी माझ्या हातें ॥४२॥
तुवां अन्याय बहुत केले । म्हणोनि कंसरायें आणविलें ।
ऐसें ऐकतां गोपाळें । नवल केलें तेथेंचि ॥४३॥
कव घालोनि निजबळें । रजकाचें शिर छेदिलें ।
जैसें अरविंद खुडलें । नखाग्रेंचि अवलीळा ॥४४॥
वस्त्रें घेऊनि समस्त । गौळियां वांटी कृष्णनाथ ।
तों वाटेंत शिंपी भेटत । तंतुवाय नाम तयाचें ॥४५॥
तेणें वस्त्रें आणूनि ते वेळां । भावें पूजिला घनसांवळा ।
म्हणे ब्रह्मानंदा दीनदयाळा । कृपा करीं मजवरी ॥४६॥
तों कुब्जा कंसदासी ते वेळां । दिव्य चंदन भरोनि कचोळां ।
वाटे जातां देखे घनसांवळा । केवळ पुतळा मदनाचा ॥४७॥
तों कुब्जा विद्रूप दिसे बापुडी । कुरूप सर्वांगीं वांकुडी ।
परी हरीरूपीं तिनें गोडी । निजभावें धरिलीसे ॥४८॥
हेचि रामावतारींची मंथरा । कैकयीची दासी द्वेषी रघुवीरा ।
रामे शापिली ते अवसरा । वक्र होईं सर्वांगीं ॥४९॥
मग ती लागली रामचरणीं । म्हणे वर देईं चापपाणी ।
राम म्हणे पुढें कंससदनीं । दासी होसी कुरूपे तूं ॥५०॥
मी कंसवधार्थ मथुरेसी येईन । तेव्हां तुज वाटेसी उद्धरीन ।
असो तीस म्हणे जगज्जीवन । देई चंदन आम्हांतें ॥५१॥
तो ती कुब्जा भावार्थें । चंदन लावी आत्महस्तें ।
अवलोकितां हरिमुखातें । सद्गद चित्तीं जाहली ॥५२॥
अंगीं चर्चूनियां चंदन । केलें हरीस साष्टांग नमन ।
कृष्णें तीस हातीं धरून । लाविला चरण शरीरा ॥५३॥
जैसा परीस झगडतां लोहातें । तत्काळ सुवर्ण होय तेथें ।
तैसी पावली दिव्य शरीरातें । अपांगपातें हरीच्या ॥५४॥
कीं उगवतां वासरमणी । अंधकार पळे मुळींहूनी ।
कीं कृष्णचंद्र उगवतां ते कुमुदिनी । विकसली निजतेजें ॥५५॥
जैशा रंभा उर्वशी विलासिनी । तैसीच कुब्जा दिव्य पद्मिनी ।
हरिमुख न्याहाळीत नयनीं । मंजुळवचनीं बोलत ॥५६॥
मीनकेतनमोहना मेघश्यामा । हिमनगजामातमनविश्रामा ।
चाल आतां माझिया धामा । पूर्णकामा सर्वेशा ॥५७॥
हरि म्हणे कंस वधून । मग मी पाहीन तुझें सदन ।
ऐसें बोलतां नंदनंदन । कुब्जा गेली निजसदना ॥५८॥
तों फुलारी आला ते वेळां । तेणें हरिकंठीं घातल्या माळा ।
आवडीं नमीत पदकमळा । मिलिंद जैसा प्रीतीनें ॥५९॥
हरि पुसे लोकांसी वाटे । धनुर्याग दावा कोठें ।
तो आधीं अवलोकूं मन नेटें । जाऊं कंस मर्दावया ॥६०॥
गांवांत प्रवेशला श्रीपती । गोपी मथुरेच्या श्रवणीं ऐकती ।
सद्गद होऊनि धांवती । यदुपति पहावया ॥६१॥
कित्येक जेवीत होत्या नारी । तैसाचि करींचा कवळ करीं ।
वेगें धांवती सुंदरी । पूतनारि पहावया ॥६२॥
एक होती नग्न नहात । केशरकस्तूरीमिश्रित ।
चोखणी शिरीं घांशीत । तैसीच धांवें ती गजगमना ॥६३॥
एक गोपी जंव कांडीत । ऊर्ध्व गेला मुसळासहित हस्त ।
कानीं ऐकतांची मात । धांवें त्वरित तैसीच ॥६४॥
एक दळीत होती सुंदर । कानीं ऐके आला यदुवीर ।
सांडूनि नाद घरघर । जाय श्रीवर पहावया ॥६५॥
भुलविल्या कृष्णवेधकें । पायीं घातलीं कर्णताटंकें ।
चरणींचीं भूषणें सुरेखें । कर्णीं एकी घालिती ॥६६॥
अनवट जोडवीं पोल्हारें । कानीं बांधिलीं एकसरें ।
कंठीं बांधिलीं नेपुरें । वाळे पैंजण समस्त ॥६७॥
शिसफूल चंद्र बिजवरा । गुडघां बांधिती सुंदरा ।
घोंसबाळ्या परिकरा । चरणांगुष्ठीं गोंविती ॥६८॥
मोतीयांची दिव्य जाळी । नेसत एक वेल्हाळी ।
नाकीचें मोतीं चरणकमळीं । घोटियाजवळी बांधिती ॥६९॥
एक काजळ मुखीं घालिती । कुंकुम डोळियांमाजी लेती ।
जावडें मुखासी माखिती । हरिद्रा लाविती पायांसी ॥७०॥
कर्पूरें सुपारी घोळिली । एकीनें कर्णामाजी घातली ।
वेणीस विडिया तत्काळीं । एकी खोंविती त्वरेनें ॥७१॥
एक अर्धांगी लेत कंचुकी । मुक्ताहार बांधी मस्तकीं ।
नेसतें वस्त्र हस्तकीं । धांवे एक घेऊनियां ॥७२॥
बाळकें ठेवूनि शिंक्यावरी । कडिये घेतली घागरी ।
एक षट्‌चक्राचे माडीवरी । तेथूनि हरि लक्षीत ॥७३॥
एक भक्तीच्या चौबारा । उभ्या राहिल्या सुंदरा ।
एक साधनाच्या मंदिरा- । वरी चढे वेल्हाळी ॥७४॥
एक ध्यानाचें गवाक्षद्वार । त्या वाटे लक्षिती यदुवीर ।
एक लयलक्षाचें जालंधर । त्यांतूनि पाहे जगदात्मा ॥७५॥
क्षणिक जाणूनि अडाघडी । वेगें लावी प्रेमाची शिडी ।
वरी चढतां तांतडी । पाहे आवडीं हरीतें ॥७६॥
ठायीं ठायीं गोपींचे भार । वर्षती सुमनांचे संभार ।
एक रत्‍नदीप घेऊनि सुंदर । ओंवाळिती पुराणपुरुषा ॥७७॥
मदनमनोहर मेघश्याम । देखतां गोपींस थोर संभ्रम ।
एक म्हणती कोटिकाम । ओंवाळावे यावरूनि ॥७८॥
एक म्हणती श्रीमुखावरून । सये जावें ओंवाळून ।
एक कामें विव्हळ पूर्ण । हरिवदन विलोकितां ॥७९॥
असो धनुर्यागमंडपासमीप । आला चतुरास्याचा बाप ।
जो मायानियंता चित्स्वरूप । कर्ममोचक मोक्षदाता ॥८०॥
तों कंसें कुटिलें केलें बंड । लोहधनुष्य ठेविलें प्रचंड ।
जैसें पूर्वीं त्र्यंबककोदंड । सीतावल्लभें भंगिलें ॥८१॥
तैसेंचि गजास्यतातमित्रें । आकर्ण ओढूनि पंकजनेत्रें ।
लोहधनुष्य मोडूनि क्षणमात्रें । दोन शकलें केलीं पैं ॥८२॥
तेथें होते दैत्य रक्षक । महाउन्मत्त मद्यप्राशक ।
परमदुर्मती पिशितभक्षक । सहस्र एक धांविन्नले ॥८३॥
राजाज्ञा न घेतां गोवळें । बळेंचि लोहचाप मोडिलें ।
म्हणोनि अवघेचि लोटले । राम-कृष्णांपरी पैं ॥८४॥
ऐसे देखोनि राम-वनमाळी । कोदंडखंडें हातीं घेतलीं ।
दोघे उठले प्रतापबळी । कोण आकळी तयांतें ॥८५॥
जैसे अजाचे उभे असतां भार । निःशंक उठती दोघे व्याघ्र ।
कीं देखोनि वारणचक्र । जैसे मृगेंद्र चपेटती ॥८६॥
पूर्वीं निरालोद्‌भवसुत मित्रकुमर । देखोनि पिशिताशनांचे भार ।
धांविन्नले जैसे प्रलयरुद्र । तैसेच दोघे उठावती ॥८७॥
रणभैरव दोघेजण । दोन्ही धनुष्यखंडें घेऊन ।
पाडिले दैत्यसमूह झोडून । गतप्राण सर्व जाहले ॥८८॥
समाचार कळला कंसातें । चाप मोडूनि झोडिलें दैत्यांतें ।
परतोनि गेले मागुते । उपवनीं रहावया ॥८९॥
कुंडमंडप विध्वंसिला । रक्षकांचा संहार केला ।
रजक गौळियें मारिला । कळिकाळा न भिती ते ॥९०॥
उपवनीं क्रमोनि रजनी । सवेंचि उदयाद्रीवरी येतां तरणी ।
नित्यनेम सारुनि ते क्षणीं । सिद्ध जाहले सर्वही ॥९१॥
भोगींद्र आणि यादवेंद्र । रथीं बैसले जैसे शशि-दिनकर ।
मागें गौळियांचा भार । कृष्णबळें सबळ दिसे ॥९२॥
जैसा वृत्रासुरावरी पुरुहूत । युद्धा निघे त्रिदशांसमवेत ।
कीं मित्रकुलभूषण बंधूसहित । निघे वैश्रवणबंधु वधावया ॥९३॥
कीं तारकासुरावरी कुमार । अंधकासुरावरी अपर्णावर ।
तैसाचि यदुकुलप्रतापदिनकर । कंस वधावया चालिला ॥९४॥
प्रतापरुद्र दोघेजण । चालिले राजबिदीवरून ।
कंसासी सांगती चार जाऊन । येत कृष्ण तुझे भेटी ॥९५॥
कंस म्हणे कुवलयद्विप पाठवावा । कृष्ण मार्गीं येतांचि कोंडावा ।
सांदीमाजी रगडावा । महानागें पायांतळीं ॥९६॥
ठायीं ठायीं दैत्यांचे थवे । बिदोबिदीं उभे करावे ।
आम्ही मुष्टिक चाणूरादिक आघवे । रंगमंडपीं बैसतों ॥९७॥
कुवलय महाहस्ती थोर । कृष्णासी पाठविला समोर ।
सांदींत कोंडिला यदुवीर । गौळीभारासमवेत ॥९८॥
कुवलयावरी बैसला जो दैत्य । तेणें गज लोटिला अकस्मात ।
गौळी जाहले भयभीत । म्हणती हस्ती हा नाटोपे ॥९९॥
कृष्ण म्हणे गजाकर्षकाते । मूर्खा गज काढीं आणिका पंथें ।
तो म्हणे तुज गजपदाखालतें । घालोनियां रगडीन ॥१००॥
गुराखियां कपटबळें । वनीं महादैत्य मारिले ।
तैसें कुवलयासी न चले । जवळी आलें मरण तुझें ॥१०१॥
तुवां पूतना शोषूनि मारिली । तृणावर्त मारिला अंतराळीं ।
गोवळ्या तुजलागूनि ये स्थळीं । बळिरामासहित मारीन ॥१०२॥
कालिया आणि अघासुर । किरडूं मारूनि जाहलासी थोर ।
परी तुझा मृत्यू साचार । जवळी आजी पातला ॥१०३॥
बकासुरपक्षी मारिला । केशिया तो अश्व वधिला ।
ऐसें ऐकतां सांवळा । क्षोभला जैसा प्रलयरुद्र ॥१०४॥
म्हणे मशका तूं आणि हा गज । मत्कुणप्राय दिससी मज ।
आतांचि क्षण न लागतां तुज । मृत्युपुरीसी धाडीन ॥१०५॥
अंडजप्रभूपुढें अळिका । तैसा दिससी तूं कीटका ।
कीं मृगेंद्रापुढें अजा देखा । प्रताप बोले आपुला ॥१०६॥
जातवेदासी म्हणे पतंग । तुज ग्रासीन मी समग्र ।
कीं श्रोत्रियापुढें मांग । आचार वर्णीं आपुला ॥१०७॥
विष्ठाभक्षक काक आपण । राजहंसा दावी शहाणपण ।
कीं निर्नासिक सौंदर्य पूर्ण । रतिवरासी दावीत ॥१०८॥
कीं महाउरगापुढें जाण । मूषक आला टंवकारून ।
कीं लवणपुतळा म्हणे संपूर्ण । सिंधु प्राशीन क्षणमात्रें ॥१०९॥
शुष्कतृणाचा पुतळा । कक्षे घालीन म्हणे वडवानळा ।
त्याचे साहित्यासी कर्पूर आला । तैल घृत घेऊनियां ॥११०॥
रासभें दटाविला व्याघ्र । वृश्चिकें ताडिला खदिरांगार ।
तैसा अल्पायुषी तूं पामर । बहुत आगळें बोलसी ॥१११॥
ऐसें बोलोनि सांवळा । गज शुंडादंडीं धरिला ।
दुजा हात कंठीं घातला । पिळोनि पाडिला उताणा ॥११२॥
सवेंचि गज उठोनि ते वेळीं । शुंडादंडें हरीसी आंवळी ।
चपळ उसळें वनमाळी । पुच्छीं धरिलें गजातें ॥११३॥
गरगरां भोंवंडूनि ते वेळे । कुवलयासी भिरकाविलें ।
वरीत दैत्य आपटूनि चूर केले । मृद्घटशकलें ज्यापरी ॥११४॥
मागुती गज सरसावूनियां । लक्षूनि आला यादवराया ।
दहा वेळां भिरकावूनियां । कृष्णनाथें दीधला ॥११५॥
मग शेवटीं धरिला चरणीं । निजबळें आफळिला मेदिनीं ।
निःशेष गेला चूर होऊनी । गतप्राण धरणीं पडियेला ॥११६॥
ऐसा मारिला कुवलयहस्त । दोन्ही मोडूनि घेतले दंत ।
लंबायमान सरळ दिसत । लोहार्गळा ज्यापरी ॥११७॥
बळिरामें आणि गोपाळें । दोन्ही दंत दोघीं घेतले ।
विमानीं दैव बैसोनि आले । कौतुक पहाती अंतरिक्षीं ॥११८॥
हस्तिदंत दोघे घेऊन । पुढें चपेटती शेष-नारायण ।
ठायीं ठायीं झोडून । दैत्यपाळें पाडिले ॥११९॥
परम ब्रीदायित मल्ल बळें । बळिरामें बहुत आफळिले ।
ठायीं ठायीं प्रेतपुंज पडिले । रक्तें वाहती बिदोबिदीं ॥१२०॥
धडकत वाद्यांचा कल्लोळ । बिदोबिदीं पळती कंसाचे मल्ल ।
महाद्वारासी राम-घननीळ । कंसाचिया पातले ॥१२१॥
तों द्वारपाळ घेऊनि येती शस्त्रें । समोर देखिले नवपंकजनेत्रें ।
हस्तिदंतघायें गात्रें । चूर्ण केलीं तयांचीं ॥१२२॥
हरिप्रताप पाहतां तये वेळां । सकळ मल्लां पळ सुटला ।
रंगमंडपासी पातला । यादवराणा निजबळें ॥१२३॥
कंस सभेसी बैसला आपण । तों अकस्मात देखिले दोघेजण ।
ते अद्‌भुत पंचानन । कंसवारण शोधूं आले ॥१२४॥
कीं ते कल्पांतसूर्य दोघेजण । पाहती सभा अवलोकून ।
कंसादिक खद्योत पूर्ण । गेले झांकून तेधवां ॥१२५॥
भोगींद्र सभा अवलोकी सकळिक । दिसती जेवीं बैसले मूषक ।
तों धांवले नगरलोक । कृष्णमुख पहावया ॥१२६॥
आकर्ण नेत्र तनु सुकुमार । नीलजीमूतवर्ण सुंदर ।
गरुडपांचूचे गर्भ परिकर । काढूनि मूर्ति ओतिली ॥१२७॥
जो पयोब्धिसुतेचा वर । भक्तकैवारी त्रैलोक्यसुंदर ।
नरवीर श्रेष्ठ श्रीवर । कंससभेंत विराजे ॥१२८॥
ब्रह्मानंद मुरोनि अवलीळा । तो हा ओतिला कृष्णपुतळा ।
दिव्य पदकें मुक्तमाळा । डोलती गळां हरीच्या ॥१२९॥
मुक्ताहार निर्मळ सुढाळ । दिसती जैसे इंद्रनीळ ।
सुहास्यवदन तमालनीळ । कुंडलें ढाळ देताती ॥१३०॥
हरिमुख अवलोकिती डोळां । परी हरि कोणासी कैसा भासला ।
निजभक्तांसी वाटला । कीं कैवारी आमुचा हा ॥१३१॥
कंसासी वाटलें केवळ । हा आपणासी न्यावया आला काळ ।
मल्लांसी वाटला प्रळयकाळ । हा तों आम्हांसी न सोडी ॥१३२॥
गोपींसी कैसा दिसे मनमोहन । कीं कोटिकंदर्प मुखावरून ।
सांडावे हरीच्या ओंवाळून । पाहतां मन न धाये ॥१३३॥
सजलजलदवर्ण तमालनीळ । नंदादि गौळियां वाटे हा बाळ ।
सवंगडे कृष्णाचे गोपाळ । त्यांसी वाटे प्राणसखा ॥१३४॥
संत जे केवळ ज्ञानार्क । त्यांसी वाटे वस्तु हे जगद्‌व्यापक ।
पूर्णब्रह्मानंद निष्कलंक । तोचि यदुकुळीं अवतरला ॥१३५॥
पृथ्वीचे जे नृप अभिमानी । त्यांसी शासनकर्ता वाटे चक्रपाणी ।
यादवांसी कुलभूषणमणी । जगद्वंद्य दिसतसे ॥१३६॥
ऐसा अग्रजासमवेत अच्युत । देखतां द्वेषी जाहले गर्वहत ।
जैसा सभेंत देखतां पंडित । मूर्ख समस्त दचकती ॥१३७॥
कां जंबुक मिळोनि बहुत । मागें पंचाननासी निंदीत ।
तो मृगेंद्र उभा ठाके अकस्मात । मग बोबडी वळत मुखीं त्यांच्या ॥१३८॥
तैसे कंस चाणूर मुष्टिक । भयभीत सभा सकळिक ।
म्हणती दाटूनि आणिला पावक । गृहा आपुल्या लावावया ॥१३९॥
मुष्टिक चाणूर धैर्य धरून । श्रीरंगासी बोलती वचन ।
तुम्ही बहु झोंबी घेतां म्हणोन । आम्हीं कर्णीं ऐकिलें ॥१४०॥
तरी ये सभे बैसले सबळ मल्ल । जो वाटेल तुम्हांसी समतोल ।
त्यासीं भिडा सभा सकळ । पाहील कौतुक तूमचें ॥१४१॥
ऐकोनि हांसिजे जगन्नायकें । तुम्ही अवघीं दिसतां मशकें ।
ऐसें बोलोनि वैकुंठपालकें । चाणूर धरोनि ओढिला ॥१४२॥
चाणूर बोले ते वेळीं । मजसीं भिडे हातोफळी ।
ऐसा मल्ल उर्वीमंडळीं । कोणी नाहीं देखिला ॥१४३॥
मल्लयुद्ध मांडिलें निष्टंक । भिडती चाणूर आणि कमलानायक ।
तों बळिरामें ओढिला मुष्टिक । महाक्रोधें तेधवां ॥१४४॥
भुजेसी भुजा आदळती । करचरणग्रीवा पिळिती ।
एक एका उलथोनि पाडिती । एकमेकांसी तेधवां ॥१४५॥
मुष्टिप्रहार प्रबळ वाजती । सप्तपाताळें दणाणती ।
वर्मठावो लक्षिती । प्राण घ्यावया परस्परें ॥१४६॥
मुष्टिकाचें हृदयीं ते वेळां । बळिरामें मुष्टिघात दिधला ।
सवेंचि उचलोनि अवलीला । बळें आपटिला धरणीये ॥१४७॥
जैसा पक्व फणस पडतां अवनीं । निःशेष जाय चूर होऊनी ।
तैसा मुष्टिक विदारोनी । गतप्राण तो केला ॥१४८॥
मुष्टिकाचा प्राण गेला । ऐसें देखोनि घनसांवळा ।
चाणूर धरणीवरी आपटिला । प्राणासी मुकला तेचि वेळे ॥१४९॥
उठोनि मल्ल अवघे पळती । नगरदुर्गावरूनि उडया घेती ।
एक ब्रीदें सोडूनि पळती । शस्त्रें सांडती हातींचीं ॥१५०॥
तों शल आणि दुजा तोशल । धांवले कंसाचे सबळ मल्ल ।
ते कंसांतकें तात्काळ । आपटूनियां मारिले ॥१५१॥
आणिक आठजण ते वेळां । धांवले जीत धरुं म्हणती सांवळा ।
तें देखोनि बळिभद्र कोपला । आडवा आला आठजणां ॥१५२॥
मिळाले आठ वारण । धरुं म्हणती रामपंचानन ।
तितुक्यांसीं एक संकर्षण । करी भांडण चपळत्वें ॥१५३॥
जैसीं तुंबिनीचीं ओलीं फळें । भूमीस आपटितां होती शकलें ।
तैसे आठही आपटूनि मारिले । शेषावतारें तेधवां ॥१५४॥
कंसासी भय वाटे दारुण । म्हणे म्यां हे दोघे बोलावून ।
बळें जवळी आणिलें मरण । दोघे प्रलययाग्न दिसती पै ॥१५५॥
दाटूनि दंदशूक खवळविले । निजले सिंह जागे केले ।
तैसे हे दोघे पाचारिले । आतां आटलें आयुष्यजळ ॥१५६॥
तों वाद्यांचें घनचक्र ते वेळीं । कर्कश वाजे रणधुमाळीं ।
त्या छंदें रामवनमाळी । नाचताती तेधवां ॥१५७॥
ते दोघे रणपंडित । जैसे काळ आणि कृतांत ।
कीं मेरु-मंदार निश्चित । सबळ तैसे दिसती ॥१५८॥
कीं समुद्र आणि अंबर । कीं विष्णु आणि पिनाकधर ।
कीं स्वामी आणि वीरभद्र । वरदपुत्र शिवाचे ॥१५९॥
किंवा अंगिरापुत्र आणि पुरुहूत । किंवा भार्गव आणि भार्गवजित ।
जरासंधाचा जामात । त्याप्रकारें लक्षी दोघां ॥१६०॥
ऐसा कंस भयभीत अंतरीं । सेवकांसी झडकरी आज्ञा करी ।
अरे या दोघांसी बाहेरी । नेऊनि घाला आतांचि ॥१६१॥
वसुदेव देवकी जिवें मारा । गौळियांसमवेत नंद संहारा ।
यादव तितुके आधीं धरा । वध करा उग्रसेनाचा ॥१६२॥
ऐसें ऐकतां जगज्जीवन । जैसा चंडभैरव येत उडोन ।
अकस्मात उचलीं वारण । तैसा श्रीकृष्ण धांविन्नला ॥१६३॥
उंचस्थळीं कंस बैसला । त्यावरी हरि जाऊनि कोसळला ।
हस्तचपेटें मुकुट पाडिला । भूतळवटीं कंसाचा ॥१६४॥
झोटी धरूनि ते क्षणीं । बळें आसडूनि पाडिला धरणीं ।
मुष्टिघात हृदयीं लक्षूनी । सबळबळें ओपिला ॥१६५॥
कंसें डोळे वटारूट । तेथेंचि तात्काळ सोडिला प्राण ।
अशुद्धाचे लोट पूर्ण । मुखावाटे चालिले ॥१६६॥
पूर्ण उदार पूर्ण आनंदकंद । कंसांसी दिधलें निजपद ।
भक्तां अभक्तां मुकुंद । एकच गति देतसे ॥१६७॥
परिस पूजोनि लोह लाविलें । तें तत्काळ सुवर्ण जाहलें ।
एकें परिसासी मारिलें । लोहघन घेऊनियां ॥१६८॥
तोहि तत्काळ केला सुवर्ण । तैसा भक्तां अभक्तां जगज्जीवन ।
कोण्या प्रकारें तरी ध्यान । हरीचें सदा लागावें ॥१६९॥
जैसी भृंगी कीटकी आणीत । ती ध्यानें तैसीच होत ।
तैसा कंस तरला निश्चित । हरिचिंतनेंकरूनियां ॥१७०॥
कामें तारिल्या गोपी समस्ता । भयें तारिलें मागधजामाता ।
वृंदावनींच्या पाषाण-लता । स्पर्शें उद्धरिल्या हरीनें ॥१७१॥
परम बाळहत्यारी पूतना । तीस तारिलें करूनी स्तनपाना ।
ऐसा हा वैकुंठीचा राणा । समसमान सर्वांसी ॥१७२॥
असो ऐसा मारिला कंस । अदितिकुमारां जाहला उल्हास ।
धडकले दुंदुभींचे घोष । नादें आकाश कोंदलें ॥१७३॥
दिव्य सुमनांचा वर्षाव । वारंवार करिती देव ।
मथुरेंतूनि दुष्ट सर्व । उठोनियां पळाले ॥१७४॥
जैसा हृदयीं ठसवतां बोध । सहपरिवारें पळती कामक्रोध ।
तैसा मथुरेसी येतां जगदंकुरकंद । दैत्य अवघेचि पळाले ॥१७५॥
सुटतां श्रीकृष्णप्रभंजन । दैत्यजलदजाळ गेलें विरोन ।
कीं हरि उगवतां चंडकिरण । द्वेषतम निरसलें ॥१७६॥
जैसे वेगळे निवडता हरळ । उरले शुद्ध तांदुळ ।
खोटें निवडतांचि सकळ । उरे केवळ खरें नाणें ॥१७७॥
तैसे मथुरेंतूनि गेले दुर्जन । उरलें ते निजभक्त सज्जन ।
प्रजालोक मिळोन । हरीसी शरण आले तेव्हां ॥१७८॥
कंसाचें कलेवर ते वेळे । उग्रसेनाचे प्रधानें आणिलें ।
त्यांहीं अग्नींत घातलें । संपादिलें उत्तरकर्म ॥१७९॥
तत्काळ फोडिल्या बंदिशाळा । सोडूनि गौरविलें सकळां ।
उग्रसेनराजा आणिला । तोडिली शृंखला तयाची ॥१८०॥
मातृजनक उग्रसेन । त्यासी कृष्णें करूनि नमन ।
सिंहासनीं बैसवून । छत्र धरिलें सुमुहूर्तीं ॥१८१॥
झाला परम जयजयकार । नगर आनंदलें समग्र ।
यादवांचें उजळ वक्‍त्र । केलें तेव्हां मुकुंदें ॥१८२॥
मग शेष आणि नारायण । सवें घेऊनि उग्रसेन ।
समस्त प्रजा ब्राह्मण । समागमें चालिले ॥१८३॥
घेतलीं वस्त्रें अलंकार । लागला वाद्यांचा गजर ।
जेथें वसुदेव-देवकी सुंदर । तेथें सत्वर पातले ॥१८४॥
शेष आणि यादवेंद्र । दोघीं साष्टांग घातला नमस्कार ।
वसुदेव-देवकींस गहिंवर । प्रेमपूर दाटला ॥१८५॥
देवकीचे दोन्ही चरण । दृढ धरिती शेष-जगज्जीवन।
कृष्णासी हृदयीं धरून । स्फुंदस्फुंदोन रडे माया ॥१८६॥
वनाहूनि आलिया सीतानाथ । प्रेमें कौसल्या वोसंडत ।
तैसीच देवकी हृदयीं धरीत । वैकुंठपीठनिवासिया ॥१८७॥
प्रेमपान्हा फुटला देवकीसी । क्षणक्षणां विलोकी हरिमुखासी ।
मागुती धरी हृदयासी । उकसाबुकशीं स्फुंदत ॥१८८॥
माता म्हणे नीलोत्पलदलवर्णा । तुवां केलें नाहीं माझिया स्तनपाना ।
तुज न्हाणिलें नाहीं जगज्जीवना । करेंकरूनि आपुल्या ॥१८९॥
तुज पाळणां नाहीं निजविलें । नाहीं दुग्धपान करविलें ।
जावळ नाहीं सरसाविलें । व्यर्थ आलें जन्मासी मी ॥१९०॥
असो आलिंगूनि घनश्यामा । माता भेटली बळिरामा ।
वर्णितां तेथींच्या संभ्रमा । शेष उपरमा पावेल हो ॥१९१॥
भोगींद्र आणि यादवेंद्र । करिती वसुदेवाशी नमस्कार ।
त्यासी न सांवरे गहिंवर । प्रेमपूर दाटला ॥१९२॥
अवलोकितां दोघां पुत्रां । धणी न पुरे वसुदेवाच्या नेत्रां ।
हृदयीं आलिंगिलें घनश्यामगात्रा । जो पंचवक्‍त्रा अगम्य ॥१९३॥
वस्त्रें भूषणें अलंकार नाना । कृष्णें लेवविले दोघांजणां ।
आली वसुदेवाची दुजी अंगना । गोकुळाहूनि रोहिणी ते ॥१९४॥
उग्रसेन भेटे जामाता । हृदयीं धरिली दृढ दुहिता ।
नंदादिका गौळियां समस्तां । वसुदेव-देवकी भेटती ॥१९५॥
गजरें मिरविती समस्त । देव पुष्पवर्षाव करीत ।
तो सोहळा वर्णितां समस्त । बहुत ग्रंथ वाढेल ॥१९६॥
तों गर्गमुनि आला अकस्मात । सवें घेतले ऋषि बहुत ।
वसुदेव-देवकींसी म्हणत । व्रतबंध आतां करावा ॥१९७॥
शेष आणि नारायण । दोघांचें आरंभिलें मौंजीबंधन ।
परम हर्षें उग्रसेन । फोडी भांडार तेधवां ॥१९८॥
वस्त्रें द्रव्य अलंकार । द्विजांसी वांटी नृपवर ।
जो वेदशास्त्रां अगोचर । त्यासी ब्रह्मसूत्र घातलें ॥१९९॥
यथासांग सोहळा । चारी दिवस पूर्ण जाहला ।
मग नंद निघाला गोकुळा । वसुदेवासी पुसोनियां ॥२००॥
हरीनें वंदिलें नंदातें । म्हणे आतां जावें गोकुळातें ।
इतुके दिवस पाळिलें मातें । तें मी कदा विसरेना ॥२०१॥
आतां माझें स्मरण असों द्यावें । सुख गोकुळीं नांदावें ।
नंद सद्गदित प्रेमभावें । काय बोले तेधवां ॥२०२॥
तुज टाकूनि घननीळा । कैसा मी जाऊं गोकुळा ।
तुवां गोकुळीं वैकुंठपाळा । बहुत लीला दाविल्या कीं ॥२०३॥
काय काय आठवूं गुण । कोणत्या उपकारा होऊं उत्तीर्ण ।
आतां मी गोकुळासी जाऊन । काय सांगूं लोकांतें ॥२०४॥
तुज टाकून जातां श्रीपती । लोक मज काळमुख म्हणती ।
काय सांगावें यशोदेप्रती । ती प्राण देईल तुजविण ॥२०५॥
तुजविण गोकुळ सर्व ओस । तुजविण घर भणभणीत उदास ।
म्यां देह-गेहाची सांडिली आस । काय ग्रामास जाऊं आतां ॥२०६॥
जैसा कीटककोसला जाय पोळून । तैसीं आम्ही होऊं दोघेंजण ।
हरि तुजकारणें प्राण । देऊं आम्ही जाण पां ॥२०७॥
हरि नंदासी म्हणे ते समयीं । हा खेद न करावया तुम्हीं कांहीं ।
मी असें तुमच्या हृदयीं । वियोग नाहीं सर्वथा ॥२०८॥
होऊनि नंदाचें समाधान । गौळियांसमवेत परतोन ।
गोकुळासी चालिले अवघे जन । वर्णिती गुण कृष्णाचे ॥२०९॥
नंद पावला गोकुळा । गोपिकां गौळियां सकळां ।
सांगे मथुरेचा सोळा । जो जो झाला वृत्तांत ॥२१०॥
समाचार समस्त ऐकूनी । तटस्थ झाल्या नितंबिनी ।
म्हणती परमपुरुष कैवल्यदानी । त्याची करणी कोणासी न कळे ॥२११॥
माता म्हणे सुकुमारा । मज टाकूनि गेलासी मथुरापुरा ।
तूं परात्पर आदिसोयरा । भक्तजनांचा पैं होसी ॥२१२॥
हरिचरणीं ठेवूनि मन । वर्तती गोकुळींचे जन ।
असो मथुरेंत जगज्जीवन । पाहतां जन सुखरूप ॥२१३॥
अक्रूरें आपुल्या मंदिरा । नेऊनि पूजिलें विश्वोद्धारा ।
सकळ मथुरेच्या सुंदरा । यादवेंद्रा न विसंबती ॥२१४॥
तयांचे मनोरथ परिपूर्ण । करीत वसुदेवनंदन ।
घरोघरीं हरीचें पूजन । करिती जन मथुरेचे ॥२१५॥
कुब्जेनेंही अतिप्रीतीं । मंदिरीं नेला जगत्पती ।
तिची देखोनि प्रेमभक्ती । भाळला श्रीपति तियेतें ॥२१६॥
भक्तांचे पूर्ण मनोरथ । कर्ता एक जगन्नाथ ।
ज्याची जैसी आवडी देखत । तैसाचि होत तयातें ॥२१७॥
कोणी पूजिती धरूनि कामना । कोणी अर्चिती जनार्दना ।
कोणी शरण येती चरणा । निजज्ञान मागावया ॥२१८॥
उद्धव आणि अक्रूर । हरीचे आवडते निरंतर ।
यांसी क्षणभरी श्रीधर । न विसंबेचि सर्वथा ॥२१९॥
एका पंक्तीसी भोजन । एकाचि मंदिरीं शयन ।
एके ठायीं करिती क्रीडन । दोघांविण कांहीं न करीच ॥२२०॥
संपलें ग्रंथाचें पूर्वार्ध । जें समुद्राहून अगाध ।
त्याहुन विशेष उत्तरार्थ । बहुत गोड अवधारा ॥२२१॥
संस्कृतइक्षुदंडरस अपार । त्याची प्राकृत हे वळिली साखर ।
सज्जनां गोड लागे निरंतर । निंदकरोगिष्ठां नावडेचि ।२२२॥
भागवत आणि हरिवंश । पद्मपुराणींचें इतिहास ।
मिळोनि ओतला सुरस । हरिविजयग्रंथ हा ॥२२३॥
हरिविजयग्रंथ पूर्ण । हेंचि आंब्यांचें सदा फळलें वन ।
पाडा आलें प्रेमेंकरून । भक्तजन सेविती हो ॥२२४॥
यासी शुकमुख लागलें । आवडीचे आढिये मुराले ।
संतजन सेवितां धांले । आनंदले परिपूर्ण ॥२२५॥
निंदक अभक्त जे वायस । मुखरोग आला त्यांचिया मुखास ।
जें परम दोषाविष्ट आसमास । सर्वदाही भक्षिती ॥२२६॥
ऐसे जे अभागी अभक्त । त्यांसी नावडे हरिविजयग्रंथ ।
तेथें अमृतफळें यथार्थ । नाना दृष्टांत जाणिजे ॥२२७॥
श्रीब्रह्मानंदकृपाकल्लोळें । हीं हातां आलीं अमृतफळें ।
श्रीधर म्हणे बहुत रसाळें । संतसज्जनीं सेविजे ॥२२८॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
परिसोत चतुर श्रोते पंडित । एकोणिसावा अध्याय गोड हा ॥२२९॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥
॥ श्रीहरिविजय पूर्वार्ध समाप्त ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः । अक्रूराने कृष्णाचा निरोप घेतला. मग रथात बसून तो राजप्रासादापर्यंत गेला. कंसाच्या सभेत गेला. "कृष्ण व बलराम, आणि काही गोप यांसह नंद धनुर्याग पहाण्यासाठी आला आहे. मी त्यांना आपल्या आज्ञेप्रमाणे आणले आहे." असे त्याने कंसाला निवेदन केले. कृष्णाने किती दैत्यांचा वध गोकुळात केला त्यांचे स्मरण कंसाला झाले. तो प्रथम एकदम दचकला. पण त्याने कसाबसा आपल्या मनावर ताबा मिळविला. त्याला आधीपासूनच कृष्णाचा धसका लागलेला होता. जेथे पहावे तेथे त्याला कृष्ण दिसत होता ! रात्रभर त्याला झोपच लागली नाही.

तिकडे उपवनात नंद, कृष्ण, बलराम व इतर गोप सकाळी उठले. स्नानादिक करून सर्वजण मथुरा नगर पहाण्यासाठी निघाले. नंद, बलराम व कृष्ण एका रथात बसले होते. काही गोप बरोबर व काही रथामागून चालले होते. काही बैलगाड्यात बसले होते. कंसासाठी आणलेल्या भेटीच्या वस्तु बरोबर घेऊन गोप वाद्ये वाजवीत चालले होते.

मार्गात एक चमत्कारिक प्रसंग घडला. एक परीट पुढे चालला होता. त्याच्याजवळ उंची वस्त्रे होती. ती कंसाची होती. कृष्णाने त्याला थांबवून म्हटले- "ही वस्त्रे तू मला व या गवळ्यांना दे." परीट त्या गवळ्यांच्या मलिन वेषाकडे पाहून उद्धटपणे म्हणाला- "अरे पोरा ! तुम्ही गुरं हाकावीत ! अरे चोरा ! तू गोकुळात मारामार्‍या व चोर्‍या करणारा तोच ना ? इथे तुझी दांडगाई नाही चालायची. तुझी पुंडाई मोडून काढण्यासाठीच कंस महाराजांनी तुला इकडे आणले आहे, समजलास ? जा जा ! तू सरळ चालता हो ! नाहीतर फुकट मरावे लागेल."

"वा वा ! भाषा वीराची नि काम धोब्याचे ! अरे परीटा, थांब, तुला धडा शिकवितो." असे म्हणत कृष्ण रथातून उतरला. त्याने हाताच्या बोटांची एक टिचकी मारली नि धोब्याला ठार केले. त्या प्रकाराने लोक भिऊन पळू लागले. कृष्णाने इतका झपाट्याने फटका मारला होता की कुणाला काय झाले ते कळायलाच थोडा वेळ लागला. पळापळ झाली, आणि कृष्णाकडे वेगळ्याच दृष्टीने नागरिक पाहूं लागले. धोब्याजवळ जी वस्त्रे होती ती कृष्णाने गवळ्याना वाटून दिली. रथ पुढे जाऊ लागले. तेवढ्यात एक शिंपी पुढे आला. कृष्णाला त्याने आपल्या जवळची आणखी वस्त्रे दिली. कृष्णाने त्याच्याकडे एकदा कृपादृष्टीने पाहिले. त्यावेळी शिंप्याला जो आनंद झाला त्याला काय उपमा द्यावी ? कंसासाठी उटी तयार करणारी एक कुब्जा दासी होती. तिला जेव्हा कळले की गोकुळातला कृष्ण मथुरेत आला आहे, तेव्हा तिला फार आनंद झाला. तिच्या मनात कृष्णाबद्दल फार भक्ती होती. कृष्ण ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावर ती हातांत उटीच्या वाट्या घेऊन उभी राहिली होती. कृष्णाची सेवा करावी, त्याला आपण उटी लावावी असे तिच्या मनात होते. कृष्णाचा रथ आला. ती पुढे झाली. कृष्णाने तिजकडे पाहिले. बलरामाला थांबायला सांगून तो खाली उतरला. नंदाला तो म्हणाला, "बाबा, ही पहा बिचारी कुब्जा आहे. तिच्या मनात आहे की मला उटी लावावी. मला तिची दया येते. मी जरा तिच्याकडे जातो. रथ थांबवाल का ?" नंद म्हणाला- "जा. लवकर ये."

कृष्ण तिच्याजवळ जाऊन म्हणाला- "काय इच्छा आहे तुझी ? " कुब्जा म्हणाली- "मी तुम्हाला उटी लावते." कृष्णाने तिच्या हाताने आपल्या अंगाला उटी लावून घेतली. तिला फार आनंद झाला. तिचे शरीर खुजे व वेडेवाकडे होते. कृष्णाने तिला सांगितले- "तुझे हे व्यंग मी नाहीसे करतो. तुला सुंदर करतो." त्याने एका पायाने तिचे पाय दाबले व आपल्या उजव्या हाताने तिच्या हनुवटीला धरून वर उचलली. तत्काळ तिचे कुबड नाहीसे झाले. ती अव्यंग व सुंदर दिसू लागली. कृष्ण म्हणाला- "कुब्जे, तू रामावतारांत मंथरा होतीस. त्या वेळच्या दुष्टपणामुळे तुला हे कुबड आले होते. रामावतारी मी तुला क्षमा केली, पण कर्माचे फळ भोगावे लागतेच. आता तू पापमुक्त आहेस. आता तुझी काय इच्छा आहे ?" ती म्हणाली- ' तुम्ही माझ्या घरी येऊन आतिथ्य स्वीकारावे व मला आपला संग घडावा." तेव्हा कृष्ण म्हणाला- "आता न येता, मी ज्या कार्याला मथुरेत आलो आहे, ते कार्य पूर्ण झाले की येईन." तिचे त्यावर समाधान झाले.

रथात बसून कृष्ण पुढे निघाला पुढे एका माळ्याला कृष्णाचे दर्शन होतांच त्याला भक्तीचे भरते आले ! तो पुढे आला. त्याने आपल्याजवळच्या फुलांनी कृष्ण व बलराम यांची पूजा केली, त्यांना उत्तम हार घातले. त्याला कृष्णाने वरदान दिले. माळी धन्य झाला. अशा तर्‍हेने गंधपुष्पांनी व वस्त्रप्रावरणांनी रामकृष्णांचे पूजनच मथुरेतील लोकांकडून घडले.

गोकुळात कृष्णाने पराक्रम करून कित्येक दैत्य मारले होते. त्यामुळे मथुरेतही नागरिकांचा तो आवडता होता. स्त्रिया व पुरुष मार्गावर, घराच्या ओसर्‍यांवर, दारांत व खिडक्यांत जमून त्याला पहाण्यासाठी वाट पहात होते. तो दिसताच त्याच्यावर फुले उडवीत जयजयकार करीत होते. शत्रूच्या राजधानीत अशा प्रकारे कृष्णाचे अपूर्व स्वागत होत होते.

धनुर्यागाचे स्थळ कोठे आहे ते विचारीत नंदासह सर्वजण पुढे गेले. जाता जाता ते त्या मंडपाजवळ पोचले. कंसाने एक मोठे लोखंडी धनुष्य त्या मंडपात ठेवले होते. ते अवजड होते. ते उचलून त्यावर बाण लावायचा हे आव्हान सर्व वीरांना होते. कृष्ण व बलराम त्या मंडपात शिरले. धनुष्याच्या रक्षणार्थ मंडपांत काही वीर दैत्य उभे होते. कृष्ण पुढे गेला. तो काय करतो हे लक्षात येण्यापूर्वीच त्याने धनुष्य उचलले आणि काडकन मोडून टाकले. एक तुकडा बलरामाने घेतला, एक कृष्णाने घेतला. हे पाहून दैन्य त्यांच्यावर खड्गे घेऊन धावून आले. पण त्या दोघांनी त्यांना धनुष्याच्या तुकड्यांनीच ठार केले !

लगेच बाहेर पडून, एकीकडे हलकल्लोळ होत असतानाच ते दोघे नंदासह रथात चढले. सर्व गवळी पुन्हा उपवनात जेथे उतरले होते तेथे रहायला गेले.

मथुरेत जिकडे तिकडे रामकृष्णांच्या कर्तृत्वाची वार्ता पसरली. कंसाने दुसर्‍या दिवशी मल्लयुद्धांची स्पर्धा ठेवली होती. देशोदेशींचे मल्ल त्यासाठी आलेले होते. मंडपाच्या पुढे कुवलयापीड नावाचा महाप्रचंड हत्ती स्वागतासाठी ठेवला होता. पण कंसाची माहुताला आज्ञा होती की कृष्ण मंडपात येऊ लागला की त्याच्यावर हत्तीने हल्ला करावा व त्याला पायाखाली तुडवावे !

दुसर्‍या दिवशी कृष्ण व बलराम मल्लयुद्धे पहायला निघाले. नंदादि गोप बरोबर होतेच. कंसाला देण्याचे भेटीचे पदार्थ व वस्तु आधीच नंदाने त्याच्याकडे सादर केल्या होत्या. मल्लांच्या अनेक जोड्या ठरविण्यात आल्या होत्या. मंडपाजवळ जेव्हा कृष्ण आला तेव्हा तो कुवलयापीड हत्ती एकदम सोंड उंच करून त्याच्यावर धावून आला. कृष्णाला त्याने सोंडेने पकडून आपटण्याचा प्रयत्‍न केला पण कृष्ण एकदम फार जड झाला. त्याने हत्तीची सोंडच पकडून त्याला पाडले. माहूत दूर भिरकावला गेला तो आपटून मेला. कृष्णाने हत्तीचे शेपूट पकडून त्याला गरगरा फिरविले. मग आपटले. त्याचा एक दात उपटून त्याच दाताने त्याचे गंडस्थळ फोडले ! हत्ती मेला ! अशी आरोळी उठली. हत्तीचे दोन्ही दात आपापल्या खांद्यावर घेऊन कृष्ण व बलराम मंडपात घुसले. त्यांनी हत्तीला कसे मारले ते पाहूनही काही दैत्य त्यांना अडविण्यासाठी आले. पण रामकृष्णांनी हत्तीच्या दातांनी त्यांची डोकीच फोडली !

ते दोघे, रक्ताने अंग माखलेले व हत्तीचे दात हातात घेतलेले असे रंगशाळेत शिरले. मुष्टिक व चाणूर यांनी अनेक मल्लांना पराभूत केले होते. कंस सभेत उंच अशा मंचावर बसला होता. कृष्णामागोमाग नंदासह गवळीही आत आले. सभेत अनेक मंत्री व प्रधान होते. रंगशालेत कुस्त्या चालल्या होत्या.

कंसाने दुरून कृष्ण व बलराम यांना पाहिले मात्र ! तो संतप्त झाला पण आतून फारच भयभीत झाला.

कृष्णाकडे कोणी आदराने, कोणी प्रेमाने तर कोणी भीतीने, कोणी कुतूहलाने, कोणी कौतुकाने, तर कोणी त्याला विष्णूचा अवतार समजून अनन्य भक्तीने पाहिले. मल्लांना तो शत्रू वाटला, कंसाला यम वाटला, नंदाला पुत्र वाटला, गोपांना मित्र, सज्जनांना भगवंत व स्त्रियांना मदन वाटला.

कृष्णाचे व बलरामाचे रंगशाळेत आगमन होतांच सारेजण त्यांच्याकडेच पाहू लागले ! मुष्टिक व चाणूर यांचे दुसर्‍या मल्लांशी मल्लयुद्ध चालू होते. त्यांना चीत करून मुष्टिक व चाणूर या दोघांनी रामकृष्णांना मल्लयुद्धाचे आव्हान केले. बलरामाने मुष्टिकाशी व कृष्णाने चाणूराशी युद्ध करण्यास संमती दिली. त्या मल्लांच्या मानाने रामकृष्ण अगदी लहान दिसत होते; त्यांचा मोठ्यांपुढे काय निभाव लागणार असे लोकांना वाटू लागले. पण हत्तीला मारण्याची शक्ती असणार्‍या कृष्णाबद्दल जाणत्या लोकांना पूर्ण विश्वास होता. कंस पहात होता. नंद काळजी करीत होता. कृष्णाने रंगशाळेत उडी घेतली व युद्धाचा पहिला पवित्रा घेऊन इतक्या तडाख्याने मुष्टिधात केले की चाणूराला स्वतःचा बचावही नीट करता आला नाही. मुष्टिकाची तीच अवस्था बलरामाने केली. विजेच्या वेगाने चपळ हालचाली करून युक्ती, शक्ती व गती यांच्या साहाय्याने काही वेळातच रामकृष्णांनी मुष्टिक व चाणूर यांना रक्त ओकायला लावले. रंगशालेतील माती रक्ताने लाल झाली. जबरदस्त फटक्यांपुढे त्या कसलेल्या मल्लांचे काहीही चालले नाही, त्यांचे मरण कंसाने तारवटलेल्या डोळ्यांनी पाहिले. रामकृष्ण या झुंजीने मुळीच दमले नव्हते. कंसाने एकदम आठ मल्लांना त्यांच्यावर हल्ला करण्याची खूण केली ! मोठ्या गर्जना करीत ते दोघांवर चारी बाजूंनी तुटून पडले पण गोल फिरत फिरत रामकृष्णानी त्यांना लाथा, ढोपरे, कोपरे, तळहात, दंड, मुठी, मस्तके यांच्या चौफेर धडका देऊन शेवटी हातपाय पिरगाळून ठार केले. आठही मल्लांना बुकलून मारले !

सभेत भयंकर आरडाओरडा झाला. बसलेले लोक उहून उभे राहिले. मंत्री उभे राहिले. कंस ओरडू लागला- 'या पोरांना बाहेर घालवा ! वसुदेव-देवकीला मारून टाका. नंदाला ठार करा. या ! या ! त्या गवळ्यांना पकडून मारा ?' असे तो उठून ओरडत होता तोच राम व कृष्ण यांनी वाघासारख्या उड्या मारून कंसाला गाठले. कृष्णाने वेगाने कंसावर उडी घेतली आणि त्याचा मुकुटच त्याने उडविला. त्याचे केस धरून त्याला आसनावरून ओढले आणि त्याच्या छातीवर जबरदस्त ठोसे मारून त्याला ठार मारले ! तो रक्त ओकतच मेला !

लगेच कंसाच्या अंगरक्षकांनाही बलरामाने कराघातांनीच मारले. वर्मी आघात होऊन ते प्रतिकार करू न शकताच मेले !

सर्व सभेत गोंधळ उडाला. कंसाच्या बाजूच्या लोकांची पळापळ झाली. रामकृष्णांनी नंदासमोर जाऊन त्याला नमस्कार केला. नंतर उग्रसेनाला राज्यावर बसविण्यात आले. रामकृष्ण मग वसुदेव व देवकी यांना भेटायला गेले. त्यांना साष्टांग प्रणिपात केले. देवकीने दोघांना जवळ घेतले. वात्सल्याने तिला पान्हा फुटला. वसुदेवाला आपले आतापर्यंत किती हाल झाले त्यांच्या स्मरणामुळे रडूं आले. रोहिणी, बलराम, कृष्ण, वसुदेव, देवकी, नंद व इतर गोप प्रेमाने कितीतरी वेळ गोष्टी बोलत बसले.

गर्ग मुनी गोकुळातून आले होते. कृष्ण व बलराम यांचे मौजीबंधन त्यांनी केले. मथुरेत त्यावेळी मोठा उत्सव करण्यात आला.

लाडक्या कृष्णाला सोडून गोकुळात परत जाणे नंदाला फारच अवघड गेले. वसुदेवाचा पुत्र आपला म्हणून बाळगला, त्याचा एवढा लळा लागला की संसार सोडून त्यासाठीच जगावे असे त्याला वाटले. कृष्ण म्हणाला- बाबा, तुम्हाला व गोकुळातल्या कोणालाही माझा विरह वाटणार नाही. मी नेहमी तुमच्या जवळच आहे असे तुम्हाला वाटेल.

नंद नाइलाजाने गोकुळात परत गेला. कृष्ण आता मथुरेतच राहणार आहे हे कळताच यशोदा रडू लागली. मूर्तिमंत माया ती ! सगुण साकार परमपुरुषाचा वत्सलतेने लाभलेला सहवास तोडणे तिला कसे सोसणार ? तिचे सांत्वन कोणीच करू शकला नाही. गोपगोपींनासुद्धा तेवढ्याच तीव्रतेने विरह जाणवत होता.

कृष्णाला विविध भक्त आपापल्या भावनेप्रमाणे पहात होते व त्यातच तो त्यांच्या समीप होता. अक्रूर व उद्धव हे कृष्णाचे दोघे ज्ञानी भक्त यापुढे त्याच्या सन्निध राहूं लागले. मथुरेत आता उग्रसेनाचे न्याय्य राज्य आले होते. प्रजाजनांना सुख झाले होते.

पुढे काय काय घटना घडल्या त्या आता श्रवण कराव्यात !
अध्याय १९ समाप्त.
हरिविजय पूर्वार्ध समाप्त
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP