|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय अठरावा ॥
अक्रूर रामकृष्णांना मथुरेला घेऊन जातो !
श्रीगणेशाय नमः ॥
करितां श्रीहरिस्मरण । दारुण विघ्नें पळती उठोन । कोटिमुहूर्तांहूनि विशेष पूर्ण । कृष्णचिंतन जाणावें ॥१॥ उदंड मुहूर्त साधिले । परी कृष्णस्मरण नाहीं केलें । तरी तितुकेही कुमुहूर्त जाहले । विघ्नें सबळ धांवती ॥२॥ षष्ठी नवमी व्यतीपात । वैधृति कल्याणी कुयोग समस्त । इतुकियांसही मंगळ करीत । नाम हरीचें निर्धारें ॥३॥ सर्वदा लाभ आणि जय । धरिती स्मरणकर्त्याचे पाय । तो कधीं न पावे पराजय । जो हृदयीं ध्याय हरीतें ॥४॥ जो नाम न विसंबे अहोरात्रीं । नित्य उत्साह ज्याचें मंदिरीं । वैकुंठपति तो श्रीहरी । त्यासी क्षणभरी न विसंबे ॥५॥ तेंचि सुलग्न सुदिन । तारा-शशि-देवबळ पूर्ण । जे इंदिरापतीचे चरण । प्रेमेंकरूनि आठवती ॥६॥ राज्यभोग विपुल सर्वदा । पुत्र विद्या बळ धन संपदा । इतुकें इच्छी कामिक सदा । तरी तिंहीं गोविंदा स्मरावें ॥७॥ सहस्र यागांचें निजफळ । जरी इच्छिसी तूं नित्यकाळ । तरी चिंतीं घननीळ । तमालनीळ साजिरा ॥८॥ केलें असेल अभक्ष्यभक्षण । दुष्टप्रतिग्रह सुरापान । तरी हरीनें केलें पूतनाशोंषण । त्या श्रवणेंकरून दोष जाय ॥९॥ ज्यांसी न कळतां घडला जार । तिंहीं रासमंडळीं खेळला यादवेंद्र । तें श्रवण करितां चरित्र । पाप जाय झडोनि ॥१०॥ ब्रह्महत्यादि दोष घडले पूर्ण । तिंहीं करावें रासकथाश्रवण । श्रवणीं ऐकतां कालियामर्दन । सर्प जाण न बाधिती ॥११॥ ऐकतां गोवर्धनोद्धारणकथा । निरसे सकळ संकटव्यथा । अवघा हरिविजय ऐकतां । सर्व कामना पुरती हो ॥१२॥ हा हरिविजय ऐकतां पवित्र । त्याच्या वंशीं होय विजयी पुत्र । एक आवर्तनें संकटमात्र । निरसोन जाय सर्वथा ॥१३॥ ऐसा वर पंढरीनाथें । दिधला हरिविजयग्रंथातें । असत्य कदा नाहीं येथें । प्रचीत भावार्थें पहावी ॥१४॥ सतराव्या अध्यायीं जाण । पूर्ण जाहलें रासक्रीडाकथन । आतां अक्रूरागमन । सावधान परिसावें ॥१५॥ ऐकोनि हरिप्रताप उदंड । कंस चिंताक्रांत अखंड । म्हणे कृष्णें मारिले दैत्य प्रचंड । देव समस्त भिती जयां ॥१६॥ पंचाननाचा प्रताप ऐकोन । भयभीत जेवीं वारण । कीं यशवंत विनतानंदन । दंदशूक ऐकोन तटस्थ ॥१७॥ तैसा भयें व्याप्त कंस । गोड कांहीं न वाटे जीवास । नाठवे रात्र किंवा दिवस । परमपुरुष दृष्टीपुढें ॥१८॥ देखिला नसतां चक्रपाणी । दुरोनि प्रताप ऐकतां श्रवणीं । तैसीच मूर्ति ध्यानीं मनीं । ठसावोनि बैसली ॥१९॥ मेळवूनि प्रधान चतुर । विचारीं बैसला कंस नृपवर । म्हणे आम्हांसी आटोपे नंदकिशोर । ऐसा प्रकार योजावा ॥२०॥ प्रधान म्हणती धनुर्याग । आरंभावा आतां सवेग । बळिराम आणि श्रीरंग । आदरेंकरूनि आणावें ॥२१॥ नंदादि गौळियांसमवेत । मान देऊनि आणावें येथ । नम्र वचनें बोलोनि बहुत । शेवटीं घात करावा ॥२२॥ दिवाभीताचे गृहीं अग्न । कागें लाविला नम्रता धरून । तैसे गौळियांसमवेत राम-कृष्ण । येथें कोंडूनि वधावे ॥२३॥ विषवल्ली जों वाढों लागे । तों खुडूनि टाकावीं वेगें । तरीच आपणां सुख भोगें । चिरकाळ असिजे नृपवरा ॥२४॥ अनर्थ थोर बहुत दूर आहे । म्हणोनि सुखें निद्रा करूं नये । सत्वर करावा उपाये । तरीच कुशल आपुलें ॥२५॥ नयनीं हरळ खुपतां । सत्वर काढावा तत्त्वतां । कंटक पदीं भेदितां । आधीं काढिजे कोरूनि ॥२६॥ तैसे नाना उपाय करून । राम-कृष्णां येथें आणून । विश्वासोनि घ्यावा प्राण । तरी कार्य साधेल ॥२७॥ दावूनियां अंगपतन । पाषाण फोडी लोहघन । कीं कंटक चरणीं लागोन । जैसें जिव्हार भेदिती ॥२८॥ मस्तक करोनि खालतें । पारधी वधी जैसा मृगातें । कीं सराटे जेवीं महागजातें । किंकाळूनि उभें करिती ॥२९॥ कीं बचनाग मुखीं घालितां । जिव्हेसी गोड लागे खातां । मग सवेंचि मृत्युव्यथा । प्राप्त करी तत्काळ ॥३०॥ वरी आमिष लावूनि क्षणमात्र । गळ भेदी जैसें जिव्हार । कां चणे टाकोनि वानर । विश्वासोनि धरिती पैं ॥३१॥ कां वरिवरी बोले गोड मैंद । परि आपुल्या कार्यासी सावध । तैसे राम आणि गोविंद । विश्वसोनि वधावे ॥३२॥ ऐकोनि प्रधानाच्या युक्ती । कंसासी हर्ष न समाये चित्तीं । म्हणे तुमचे बुद्धीपुढें बृहस्पती । उणा मज वाटतसे ॥३३॥ तरी आतां पाठवावा कोण । नम्र बोलका विचक्षण । नाना युक्तींकरून । राम-कृष्णां आणी जो ॥३४॥ प्रधान म्हणती पाठवावा अक्रूर । स्थिरबुद्धि परमचतुर । त्याच्या बोलें ते क्षणमात्र । न लागतां येथें येती पैं ॥३५॥ मग बोलावूनि अक्रूर । कंसें दिधलीं वस्त्रें अलंकार । म्हणे तुम्ही जाऊनि सत्वर । रामकृष्णां आणां येथें ॥३६॥ धनुर्याग मांडिला येथें । सांगावें नंदादि गौळियांतें । महोत्साह पाहूनि मागुतें । गोकुळासी जाइंजे ॥३७॥ आमुचा दिव्य रथ जाईं घेऊनी । वरी बैसवीं राम-चक्रपाणी । उदयीक सत्वर दोघांसी घेऊनी । यावें उत्साह पहावया ॥३८॥ आज्ञा वंदूनि अक्रूरें । रथ घेऊनि निघाला त्वरें । म्हणे माझ्या सुकृततरुवरें । वाढी आजि घेतली ॥३९॥ मनांत चिंता वाटे थोर । म्हणे कंस चांडाळ दुराचार । राम आणि यदुवीर । दोघे सुकुमार कैसे आणूं ॥४०॥ मागुती श्रीकृष्णचरित्र । अद्भुत आठवी मनांत । संहारिलें दारुण दैत्य । केशी अघ बकादिक पैं ॥४१॥ श्रीकृष्णप्रतापापुढें देख । कंस काय बापुडें मशक । जगद्वंद्यासी आवश्यक । नेईल आतां निर्धारें ॥४२॥ आणि चिंती एक अंतरीं । मद्विश्वास हरि धरी कीं न धरी । हा कंससेवक म्हणोनि मजवरी । कोपेल काय जगदात्मा ॥४३॥ तो तरी सर्वात्मा सर्वसाक्षी । जो अनंत ब्रह्मांडचित्ता परीक्षी । भक्ताभक्तांचीं लक्षणें लक्षी । संकटीं रक्षी निजदासा ॥४४॥ म्हणे आजि धन्य माझे नयन । देखतील वैकुंठींचें निधान । पूर्णब्रह्म सनातन । मी पाहीन डोळेभरी ॥४५॥ जो दशशतमुखांगशयन । मी त्याचे पदीं भाल ठेवीन । जो नीलग्रीवाचें हृदयध्यान । चतुरानन बाळ ज्याचें ॥४६॥ जो क्षीराब्धिवासी पूर्ण । ज्याचें वेदशास्त्रां न कळे वर्म । त्या हरीसी आजि क्षेम । देईन प्रेमें आवडीं ॥४७॥ जो निर्गुण निर्विकार । जो देशकालरहित अपार । तो गोकुळीं यादवेंद्र । डोळेभरी पाहीन मी ॥४८॥ नाना शास्त्रपद्धती । आग्रहें जो जो अर्थ भाविती । तो हा एक जगत्पती । गोकुळामाजी अवतरला ॥४९॥ वेदांती परब्रह्म जें स्थापिती । तोचि हा क्षीराब्धिजापती । मीमांसक कर्में करिती । याचिलागीं पावावया ॥५०॥ नैयायिक म्हणती ईश कर्ता । तोचि हा चतुरास्याचा पिता । जो आदिमायेचा निजभर्ता । कर्ता हर्ता पाळिता जो ॥५१॥ कपिलमुनि सांख्यशास्त्रीं । प्रकृति-पुरुष विभाग करी । तोचि हा गोकुळीं पूतनारी । डोळे भरूनि पाहीन मी ॥५२॥ व्याकरणकार शब्द साधिती । योगसाधन पातंजल करिती । शैव ज्यासी शिव म्हणती । तोचि यदुपति अवतरला ॥५३॥ वैष्णव म्हणती चक्रपाणी । शक्ति गणेश वासरमणी । इच्छामात्रें हीं रूपें धरूनी । नंदभुवनीं अवतरला ॥५४॥ दुरूनि अक्रूर गोकुळ देखत । साष्टांग घातलें दंडवत । म्हणे धन्य हे व्रजवासी समस्त । मुख पाहती हरीचें ॥५५॥ तों गोखुरामाजी चांगली । हरीचीं पाउलें उमटलीं । अक्रूरें घेऊनि ते धूळी । लाविली भाळीं आपुल्या ॥५६॥ जोडोनियां दोन्ही हस्त । चरणचाली अक्रूर चालत । कंठ जाहला सद्गदित । अश्रूपात वाहती ॥५७॥ पदमुद्रा उमटल्या जेथें । मागुती प्रणिपात करी तेथें । तों वृक्ष देखिले निजभक्तें । काय त्यांतें बोलत ॥५८॥ म्हणे धन्य धन्य तुम्ही वृक्ष । तुमच्या छायेसी बैसे कमलपत्राक्ष । जो भूतांतरात्मा कर्माध्यक्ष । सहस्राक्ष शरण जया ॥५९॥ तों सायंकाळीं परतले गोभार । गोपाळांसहित यादवेंद्र । सवें ज्येष्ठ बंधु भोगींद्र । वाद्यगजर बहु होती ॥६०॥ गोरजधूळी दाटली बहुत । तेणें झांकिला अक्रूराचा रथ । नंदमंदिराजवळी अकस्मात । अक्रूर तेव्हां पातला ॥६१॥ अक्रूर नंदें देखोन । धांवोनि दिधलें क्षेमालिंगन । तों पातले दोघेजण । शेष-नारायण ते काळीं ॥६२॥ देखिला त्रिभुवननायक डोळां । नीलजीमूतवर्ण घनसांवळा । रुळती आपाद वनमाळा । गोरजें डवरला मुखचंद्र ॥६३॥ उदार श्रीमुख आकर्ण नयन । कुंडलांसी शोभविती कर्ण । हरितनूच्या आश्रयें पूर्ण । अलंकार घवघविती ॥६४॥ अक्रूर यादवां वडील बहुत । देखोनियां श्रीकृष्णनाथ । चरण वंदावया धांवत । तों अक्रूरें दंडवत घातलें ॥६५॥ नेत्रीं चालिल्या विमलांबुधारा । ऐसें देखोनि परात्परसोयरा । अक्रूराचे कर धरोनि त्वरा । उठवोनि क्षेम दीधलें ॥६६॥ अक्रूराच्या गळां मिठी । दृढ घाली जगजेठी । रतिवरशत्रु आणि परमेष्ठी । त्यांसीही भेटी नव्हेचि ॥६७॥ निजभक्त जाणती ते गोडी । तेथ समाधि कायसि बापुडी । तीर्थ-व्रतांचिया कोडी । वरूनियां ओवाळिजे ॥६८॥ क्षणक्षणां तो अक्रूर । कृष्णमुख न्याहाळी सुंदर । धरी हरीचे चरण वारंवार । तृप्ति नव्हेचि सर्वथा ॥६९॥ बळिरामासी नमून । अक्रूरें दिधलें आलिंगन । साक्षात् शेष-नारायण । अवतारपुरुष भेटले ॥७०॥ अक्रूराचे दोन्ही हस्त । बळिराम आणि अच्युत । धरूनि प्रवेशले मंदिरांत । नंदासहित तेधवां ॥७१॥ यशोदेसी नमस्कारूनि अक्रूर । आसनीं बैसला सादर । सांगे मथुरेचा समाचार । सविस्तर आद्यंत जो ॥७२॥ नंदासी म्हणे अक्रूर । कंसें तुम्हांसी बोलाविलें सत्वर । बळिराम आणि यादवेंद्र । याग पहावया चलावें ॥७३॥ धनुर्याग पाहूनि मागुती । सवेंचि यावें गोकुळाप्रती । उदयीक उगवतां गभस्ती । अतिसत्वर निघावें ॥७४॥ तों नंद-यशोदा बोलत । मथुरेसी नेतां कृष्णनाथ । तेच क्षणीं आमुचा प्राणांत । होईल जाण अक्रूरा ॥७५॥ श्रीकृष्णाचा करावया घात । कंस अहोरात्र जपत । अक्रूरा तूं आमुचा परम आप्त । पाहें बंरवें विचारूनि ॥७६॥ अक्रूर हांसोनि बोलत । तुमचे दृष्टीं हें बाळ दिसत । परी कृतांतासही शिक्षा निश्चित । कृष्णनाथ लावील पैं ॥७७॥ श्रीहरि बोले ते समयीं । अंतरीं भय धरूं नका कांहीं । चला मथुरेसी लवलाहीं । गौळी घेऊनि समागमें ॥७८॥ न लागतां एक क्षण । कंस तत्काळ मारीन । मुष्टिक-चाणूरांचें मरण । बहुत जवळी पातलें ॥७९॥ कृष्णें पूर्वीं पराक्रम केले । ते नंदयशोदेसी आठवले । थोर दैत्य संहारिले । अघ बक केशी प्रलंबादिक ॥८०॥ गोवर्धनपर्वत उचलिला । कालिया मर्दूनि अग्नि प्राशिला । आखंडल शरण आला । तोही देखिला सकळिकीं ॥८१॥ हा सर्वदा असे निर्भय । त्यासी कळिकाळाचें नाहीं भय । बुद्धीचा प्रवर्तक यादवराय । गोष्टी ते मानली समस्तां ॥८२॥ अक्रूर म्हणे प्रातःकाळीं । निघावे नंदादि सर्व गौळीं । गोकुळांत मात प्रकटली । कीं वनमाळी आतो उद्यां ॥८३॥ तों उगवला वासरमणी । स्नान संध्यादि भोजन सारूनी । राम आणि चक्रपाणी । सिद्ध जाहले तेधवां ॥८४॥ दिव्य रथ अक्रूरें सज्जिला । गौळियांचा मेळां निघाला । गोरसकावडी ते वेळां । भरोनि घेतल्या कंसभेटी ॥८५॥ यशोदा आणि रोहिणीतें । नमस्कारिलें रामें-रमानाथें । हात जोडूनि म्हणती माते । जाऊनि येतों पुढती पैं ॥८६॥ यशोदा म्हणे जगजेठी । आतां कैंची तुझी भेटी । स्नेहाचेअ उमाळे उठती पोटीं । स्तनीं पान्हा फुटलासे ॥८७॥ तूं जातोसी मनमोहना । मी आतां न ठेवीं आपुल्या प्राणा । माझ्या विसांवियां राजीवनयना । मनरंजना श्रीहरे ॥८८॥ माझे सांवळे कान्हाई । जगन्मोहने कृष्णाबाई । तुझे गुण आठवूं किती काई । मिती नाहीं तयांतें ॥८९॥ विश्वरूप दाविलें वदनीं । गोवर्धन उचलिला चक्रपाणी । द्वादश गांवें महाअग्नी । तुवां गिळूनि रक्षिलें ॥९०॥ नंदजी बुडाले यमुनाजळीं । तूं घेऊनि आलासी वनमाळी । सर्पें गिळिलें शक्तिस्थळीं । तेथें रक्षिलें पाडसा ॥९१॥ ब्रह्मांडनायका मी तुझी जननी । म्हणतां लाज वाटते मनीं । माता पिता बंधू भगिनी । तूंचि माझी श्रीरंगा ॥९२॥ ऐसे बोलोनि यशोदा । हृदयीं धरिलें परमानंदा । म्हणे मनमोहना गोविंदा । परतोनि येईं लवकरी ॥९३॥ मातेचिया चरणांवरी । मस्तक ठेवीत मुरारी । माया म्हणे पूतनारी । उपेक्षा केली माझी तुवां ॥९४॥ तों गोपिका आल्या धांवत । दोन्हीं करीं हृदय पिटीत । एक पडती मूर्च्छागत । थोर प्राणांत ओढवला ॥९५॥ धरणीवरी एक लोळती । एक दीर्घस्वरें हांका देती । एक अवनीं कपाळ आपटिती । प्राणांतगती ओढवलीं ॥९६॥ एक म्हणती गेला सांवळा । आतां अग्नि लावा गे गोकुळा । अगे गोकुळींचा प्राण चालिला । प्रेतकळा पातली ॥९७॥ अहा अक्रूरा चांडाळा परियेसीं । अकस्मात कोठूनि आलासी । अहा गोकुळींचा प्राण नेतोसी । निर्दय होसी तूं साच ॥९८॥ सकळ गोकुळींच्या हत्या । अक्रूरा पडती तुझ्या माथां । नेऊं नको कृष्णनाथा । इतुकें आतां आम्हांसी देइंजे ॥९९॥ तुझें नाम ठेविलें अक्रूर । तूं हिंसक निर्दय थोर । बहुत जाहलासी कां क्रूर । परम निष्ठुर तूं होसी ॥१००॥ तों राम-कृष्ण रथावरी । बैसोनि चालिले झडकरी । रथापुढें येवोनि व्रजनारी । आडव्या पडती धरणीये ॥१०१॥ एक अक्रूरापुढें पदर पसरून । म्हणती आम्ही अनाथें भिकारी दीन । करीं आजी कृष्णदान । कीर्ति त्रिभुवनीं भरूं दे ॥१०२॥ अक्रूरादेखतां घेऊनि माती । गोपीं आपुल्या मुखीं घालिती । म्हणती मनमोहना यदुपती । न भेटसी आतां तूं ॥१०३॥ ऐसें देखोनि त्या अवसरा । अष्टभाव नावरती अक्रूरा । नयनीं चालिल्या अश्रुधारा । प्रेम देखोनि गोपिकांचे ॥१०४॥ म्हणें धन्य धन्य यांचें प्रेम । यांही वश केला पुरुषोत्तम । जें निर्विकार परब्रह्म । नामरूपातीत जें ॥१०५॥ गोपींच्या शोकासी नाहीं पार । जैसा वनासी निघतां रघुवीर । पाठीं लागलें अयोध्यानगर । तैसेंचि येथें जाहलें ॥१०६॥ जीवनाविण मत्स्य जैसे । गोकुळीचे लोक तळमळती तैसे । यशोदेसी मूर्च्छा येतसे । धांवतसे रथापाठी ॥१०७॥
माझिया विसांविया जगज्जीवना । मुख पाहूं दे जगन्मोहना ।
आला मज प्रेमाचा पान्हा । पाजूं कोणा सांग पां ॥१०८॥ माझे सांवळे कान्हाई । उभी गे राजसे कृष्णाबाई । तुजवेगळ्या दिशा दाही । ओस मज वाटती ॥१०९॥ कृष्णा मज परी झाली कैशी । तान्हें बाळ टाकूनि परदेशीं । माता जाय सहगमनासी । गति तैसी मज झाली ॥११०॥ कीं कांटेवनांत आंधळे जातां । सांगाती टाकूनि जाती अवचितां । तैसें मज केलें कृष्णनाथा । पुन्हां मागुता न भेटसी ॥१११॥ ऐका पद्मपुराणींचे संमत । राधा तेथें आली धांवत । रथापुढें येऊनि त्वरित । ध्यान हरीचें विलोकिलें ॥११२॥ हरिस्वरूपीं लावूनि नेत्र । हृदयीं सांठविला यादवेंद्र । मग कृष्णचरणीं ठेविलें शिर । झालें थोर नवल पैं ॥११३॥ जैसें उदकीं मिळे लवण । तैसी राधा गेली अदृश्य होऊन । हरिरूपीं झाली लीन । दुसरेपण हरपलें ॥११४॥ थोर जाहला चमत्कार । राधा हरिरूप जाहली साचार । गोपी तटस्थ समग्र । वानिती भाग्य राधेचें ॥११५॥ नाना साधनें योगी साधिती । त्यांसीही ऐसी नव्हे गती । धन्य धन्य राधा पुण्यमूर्ती । हरिस्वरूप जाहली ॥११६॥ असो हरि म्हणे अक्रूरा । आतां रथ चालवीं सत्वरा । तरीच या गोपिका सुंदरा । मागें दूरी राहती ॥११७॥ रथ घडघडिला समीरगती । क्रमूनि मागें टाकिली जगती । तेव्हां मूर्च्छा येऊनि गोपिका पडती । हांका देती कृष्णामागें ॥११८॥ कपाळ पिटूनि फोडिती हांका । अहा कमलावरा वैकुंठनायका । आपुले हातें गोपिका । वधूनि जाई आतांचि ॥११९॥ आतां केव्हां देखों पुढती । एक हातें केश तोडिती । रथ क्रमीत जात क्षिती । दृष्टीं पाहती सुंदरा ॥१२०॥ म्हणती प्राणसखया वनमाळी । तुझा वियोगनल परम जाळी । एक म्हणती रथाजवळी । धांवूनि जाऊं चला गे ॥१२१॥ अक्रूरासी घालूनि कृष्णाची आण । रथ आणावा वेगें परतोन । नेदी तरी बळेंचि हिरोन । आणूं मनमोहन आतांचि ॥१२२॥ आम्ही आहों इतुक्या सुंदरी । अक्रूर एकला काय करी । तों रथ गेला बहुत दूरी । विकळ नारी पडियेल्या ॥१२३॥ म्हणती वेधका परमपुरुषा । तुजविण ओस दाही दिशा । क्षीरसागरहृदयविलासा । जातोसी कैसा टाकूनि ॥१२४॥ चारी ध्वज आणि कळस । रथ उतरतां सखल भूमीस । न दिसे कांहीं निराश । थोर गोपींस जाहलीसे ॥१२५॥ अवघ्या गोपी आकांत करीत । गोकुळा परतल्या स्फुंदत । एक म्हणती अग्नि त्वरित । लावा आतां गोकुळा ॥१२६॥ ऐशा शोक करीत सुंदरी । प्रवेशल्या यशोदेच्या मंदिरीं । तों यशोदा म्हणे ते अवसरीं । माझा श्रीहरी दावा गे ॥१२७॥ यशोदा मंदिरांत हिंडे रडत । म्हणे आतां मज कैंचा गे कृष्णनाथ । तो वैकुंठनाथ समर्थ । टाकूनि यथार्थ मज गेला ॥१२८॥ सकळ गोपी यशोदेचे कंठीं । घालिती तेव्हां दृढ मिठी । शोक केला तो न माये सृष्टीं । न वर्णवेचि कोणातें ॥१२९॥ शुकें वर्णितां हे कथा । सद्गद कंठ जाहला तत्त्वतां । शुकासी जाहली जे अवस्था । ते वर्णितां मज न ये ॥१३०॥ आणि सद्गद जाहला परीक्षिती । ढळढळां नयनीं अश्रु वाहती । म्हणे श्रीकृष्ण वेधकमूर्ती । त्याचीच कीर्ति सांगा पुढें ॥१३१॥ असो यशोदा सांगे गोष्टी । सख्यांनो घर लागतें गे पाठीं । आतां माझा जगजेठी । पुन्हां दृष्टीं पडेना ॥१३२॥ कृष्णाचीं जीं बाळलेणीं । टाकिलीं गोपींपुढें आणूनी । हरीचीं खेळावयाचीं खेळणीं । हृदयीं धरूनि माय रडे ॥१३३॥ वाघनखें पदकमळा । पाहूनि शोक करिती वेल्हाळा । आपाद गळ्याच्या वनमाळा । सदनीं ठेविल्या ठायीं ठायीं ॥१३४॥ हरीची घोंगडी चांगली । दशियांप्रति मोत्यें ओंविलीं । चिमणीच हरीची मुरली । ऐकतां हरिली चित्तवृत्ति ॥१३५॥ हरीचा चिमणा पीतांबर । शिदोरीचें जाळें सुंदर । शिरींचीं पिच्छें परिकर । करींचा वेत्र रत्नजडित ॥१३६॥ वनमाळांचे ठेविले जे भार । त्या सुवासें दाटलें मंदिर । माया म्हणे पूर्वकर्म घोर । आड आलें बळेंचि ॥१३७॥ पूतना शोषूनि अघ बक मारिला । कालिया मर्दूनि अग्नि प्राशिला । गोवर्धन नखाग्रीं धरिला । शक्रही आला शरण ज्यासी ॥१३८॥ गर्ग नारदादि मुनिजन । मज क्षणक्षणां सांगती येऊन । हें क्षीरसागरींचें निधान । तुझें पोटीं अवतरलें ॥१३९॥ ऐसें सांगती क्षणक्षणां । परी सत्य न वाटे माझिया मना । दशावतारींच्या दिव्य रचना । क्रीडतां दाविल्या हरीनें ॥१४०॥ पूर्णब्रह्म सांवळें । म्यां पायांवरी घेऊनि न्हाणिलें । आपुल्या पदरें अंग पुशिलें । वैकुंठपतीचें नेणतां ॥१४१॥ पूर्ण अवतार श्रीकृष्णनाथ । उखळीं बांधिला न कळत । जळोनि जावोत गे माझे हात । जाहल्यें भ्रांत मायेनें ॥१४२॥ ब्रह्मादिकांची आराध्य मूर्ती । त्यासी मी पाठवीं वनाप्रती । गुरें राखविलीं निश्चितीं । अपराधां मिती नाहींच ॥१४३॥ ज्यासी वर्णितां भागलीं दर्शनें । त्यासी ये रे जा रे म्हणें । ठकलें ठकविलें जगज्जीवनें । महिमा नेणें अद्भुत ॥१४४॥ हरीविण गृह दिसतें गे थोर । जीवनेंविण जैसें कासार । कीं प्राणेंविण शरीर । दीपाविण मंदिर जेवीं ॥१४५॥ ऐसा खेद करीत गौळणी । प्रवेशल्या आपुल्या सदनीं । संसारकृत्य करितां चक्रपाणी । गीत गाती सर्वदा ॥१४६॥ दळितां कांडितां मंथन करितां । गाई दुहितां पालख हालवितां । रांधितां जेवितां उदक पितां । गीत गाती हरीचें ॥१४७॥ करितां सडासंमार्जन । रंगमाळा घालितां जीवन । हिंडतां करितां गमनागमन । गीत गाती हरीचें ॥१४८॥ जागृतीं सुषुप्तीं आणि स्वप्नीं । ध्यानीं मनीं आसनीं शयनीं । सर्वदा वेधल्या हरिचरणीं । वृत्ति निमोनि गेलिया ॥१४९॥ एकी गौळणी यमुनाजीवना । घेऊनि येत आपुल्या सदना । तों अंतरीं आठवला यादवराणा । वेदपुराणां वंद्य जो ॥१५०॥ हरि रूपीं वृत्ति वेधली । गृहा जावें हें विसरली । कृष्णरूपीं वृत्ति मुराली । तेथेंचि जाहली समाधिस्थ ॥१५१॥ घरा आली ते नितंबिनी । परी मन गेलें कृष्णरूप होऊनी । जिकडे विलोकीत कामिनी । तिकडे चक्रपाणी दिसतसे ॥१५२॥ पंचप्राणांचेहि आधारें । यथान्याय शरीर वावरे । गोपी वेधली यादवेंद्रें । कांहीं दुसरें दिसेना ॥१५३॥ चराचर वरदळभाव । विसरोनियां गेलें सर्व । पूर्णब्रह्मानंद माधव । अद्वय एक संचरला ॥१५४॥ उसणें मागावया गौळणी । प्रवेशलीसे जिचे सदनीं । तों अंतरीं आठवला मोक्षदानी । पुराणपुरुष श्रीकृष्ण ॥१५५॥ मन वेधलें हरिपायीं । म्हणे सखे उसना कृष्ण देईं । आतांचि आणूनि लवलाहीं । देईन तुझा निर्धारीं ॥१५६॥ तंव ते बोले अबला । सखे कृष्ण मथुरेसी गेला । दोघीजणींचिया डोळां । पूर लोटती अश्रूंचे ॥१५७॥ लेंकुरें वासरें घर । अवघेंचि दिसे कृष्णाकार । तों एक म्हणे सुंदर । सये पुढें यदुवीर न ये कीं ॥१५८॥ प्राक्तनाची विचित्र गती । त्याहीवरी स्त्रीदेहाची बुंथी । कोठें जातां न ये निश्चितीं । पराधीन जिणें हें ॥१५९॥ पुन्हां न भेटे कमलानायक । सये क्षणिक नरदेह देख । अंतरीं आठवतें हरीचे मुख । निष्कलंक चंद्र जैसा ॥१६०॥ सये हरीविण विलासभोग । तोचि केवळ भवरोग । हरिकृपेविण योगा-योग । सर्व व्यंग दिसतसे ॥१६१॥ ऐसी गोपिकांची भक्ती । गणितां न गणवे शेषाप्रती । असो इकडे त्रिभुवनपती । मथुरापंथें जातसे ॥१६२॥ मागें गौळियांचे भार । रथ वेगें चालवी अक्रूर । तों तमारिकन्येचें तीर । पुढें देखिलें तेधवां ॥१६३॥ कृतांतभगिनीचें जीवन । उल्लंघूनि गेला जगज्जीवन । पैलतीरीं सर्व गौळीजन । करावया स्नान उतरले ॥१६४॥ रथ सोडूनि अक्रूर । स्नानासी चालिला सत्वर । रथीं शेष आणि यादवेंद्र । दोघे तैसेचि बैसले ॥१६५॥ परतोनि पाहे अक्रूर । तों दोन्ही मूर्ती दिसती सुंदर । एक घनश्याम एक गौर । शशि-मित्र ज्यापरी ॥१६६॥ कीं विष्णु आणि शंकर । कीं बृहस्पति आणि वज्रधर । कीं राम आणि सौमित्र । तैसे दोघे दीसती ॥१६७॥ अक्रूर मनीं करी विचार । म्हणे दोघेहि अत्यंत सुकुमार । धाकुटें वय दिसती किशोर । मी तों सत्वर यांसी नेतों ॥१६८॥ परम द्वेषी कंस सत्य । जपे दोघां करावया घात । तेथें जरी जाहलें विपरीत । तरी कैसें करावें ॥१६९॥ मज संकट मोठें पडिलें । शेवटीं काय होईल तें नकळे । ऐसा चिंताक्रांत ते वेळे । अक्रूर जळीं प्रवेशाला ॥१७०॥ सचिंत जाहला भक्तराणा । बुडी देऊनि करी अघमर्षणा । तों जीवनीं देखिलें जगज्जीवना । विश्वमोहना गोविंदा ॥१७१॥ चतुर्भुज चक्रपाणी । पहुडलासे शेषशयनीं । जो मायाचक्रचालक मोक्षदानी । विश्वंभर परमात्मा ॥१७२॥ नाभिकमळीं परमेष्ठी । घडीत ब्रह्मांडांच्या कोटी । नाना अवतरांच्या घिरटी । स्वयें घेत परमात्मा ॥१७३॥ मत्स्य-कूर्मादि अवतार । तेथींचीं चरित्रें दिसती फार । श्रीकृष्णरूपें कंसासुर । आकळूनियां मारिला ॥१७४॥ मुष्टिक-चाणूरादि दैत्य । मल्ल मारिले परमाद्भुत । शिशुपाल आणि वक्रदंत । जरासंध पाडिला ॥१७५॥ भौमासुर बाणासुर । निवटिले कौरवांचे भार । मागुती होऊनि तदाकार । स्वरूपीं स्वरूप संचरलें ॥१७६॥ अक्रूर पाहे आत्मदृष्टीं । तों कृष्णरूप दिसे सर्व सृष्टी । हरिनखीं दिसती ब्रह्मांडकोटी । अंत न कळे पाहतां ॥१७७॥ अद्भुत प्रताप देखोन । अक्रूर करितां जाहला स्तवन । म्हणे हे कृष्ण मधुसूदन । हे जगज्जीवन सुखार्णवा ॥१७८॥ हे कृष्णा सर्वव्यापका । हे कृष्णा त्रिभुवननायका । हे कृष्णा निजसुखदायका । निरूपाधिका निरंजना ॥१७९॥ हे कृष्णा अनंतचरणा । हे कमलदलाक्षा अनंतवदना । हे विरूपाक्षहृदया अनंतनयना । भक्तपालना श्रीहरे ॥१८०॥ अनंत शिरें अनंत उदरें । अनंत नामें अनंत चरित्रें । अनंत हस्त अनंत मुखांतरें । कर्ता भोक्ता तूंचि पैं ॥१८१॥ तुझे स्मरणीं जे सादर । तेचि पावले पैलपार । त्यांहीं जिंकला संसार । जे तत्पर भजनीं तुझ्या ॥१८२॥ जे हरि तुझें नाम गाती । त्यांचे पाय धरावे पुढती । तेचि पावले उत्तमगती । अभेदस्थिती जयांची ॥१८३॥ हरि तुझें दिव्य नाम । हेंचि साधन परम सुगम । तेचि शुचिष्मंत शुद्ध परम । सूर्य जैसा तेजस्वी ॥१८४॥ राम कृष्ण यादवपती । हीं नामें जें सदा घेती । जैसा अग्नि शुचिष्मंत अहोराती । तेसेचि निश्चिती भक्त तुझे ॥१८५॥ तुझी अनन्य भक्ति करितां । जरी कर्मलोप जाहला अवचिता । त्यालागीं प्राप्त होय अनंता । सनकादिकांचें ठेवणें ॥१८६॥ जें भक्तांचें सत्कर्म राहत । तें न्यून पूर्ण करीत । ऐसा कृपाळू भगवंत । उणें पडों न देसी ॥१८७॥ जो तुज अनन्य शरण । त्याचे कोटी अपराध क्षमा करून । पुढती हिरोनियां मन । आपुले पदीं ठेविसी ॥१८८॥ जे सर्वकर्मबहिर्भूत । परी तुझे नामीं आवडी बहुत । ते तुज अत्यंत आवडत । जैसें अपत्य एकुलतें ॥१८९॥ कर्म करितां विधिनिषेध बहुत । कर्म करितां व्याकुळ होत । परी तुझ्या एक्या नामें समस्त । होय कृतार्थ श्रीहरी ॥१९०॥ तिष्ठतां उठतां बैसतां । निद्रा करितां जातां येतां । तुझें नाम जगन्नाथा । जपतां हरती सर्व दोष ॥१९१॥ विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र । स्त्रिया अंत्यज समग्र । तुझें नाम जपतां निरंतर । पावन होती सर्वही ॥१९२॥ ऐसा हरि तुझा महिमा । त्या तुज शरण मी पुरुषोत्तमा । पुराणपुरुषा निरुपमा । नामाअनामातीत तूं ॥१९३॥ अक्रूराचा संशय फिटला । कृष्ण पूर्णब्रह्म समजला । मायापडळ ते वेळां । विरोनि गेलें समस्त ॥१९४॥ पूर्णब्रह्मानंद जगजेठी । इच्छामात्रें घडी मोडी सृष्टी । तो कंसा वधील हे गोष्टी । अपूर्व कांही नव्हेचि ॥१९५॥ अक्रूर घाली नमस्कार । सद्गद जाहलें अंतर । तैसाचि निघाला बाहेर । तों रथीं तोचि बैसला ॥१९६॥ प्रत्यक्ष शेष आणि रमेश । घवघवीत दिसती अवतारपुरुष । भक्तांलागीं लीलाविलास । दावावयास अवतरले ॥१९७॥ संध्यादि कर्म सारूनि सत्वर । रथाजवळी आला अक्रूर । तों गदगदां हांसे श्रीधर । म्हणे कां हो उशीर लागला ॥१९८॥ काय अपूर्व देखिलें जळीं । तें सांगावें आम्हांजवळी । ऐसें बोलतां वनमाळी । अक्रूर जाहला सद्गदित ॥१९९॥ धांवोनि धरिले कृष्णचरण । आसुवें क्षाळिले हरिपद पूर्ण । कृष्णें आलिंगिला उचलोन । निजकरें नयन पूसिले ॥२००॥ अक्रूर म्हणे पुराण पुरुषा । सच्चिदानंदा हरि सर्वेशा । तुझा महिमा वेदशेषां । न वर्णवेचि कदाही ॥२०१॥ तेथूनि रथ निघाला वेगेंसीं । सत्वर आले मथुराप्रदेशीं । उपवनीं राहिले ते दिवशीं । नंदगौळियांसमवेत ॥२०२॥ अक्रूर म्हणे यादवेंद्रा । रहावया चला माझिया मंदिरा । मी दासानुदास तुझा खरा । मज उद्धरीं श्रीरंगा ॥२०३॥ म्यां अनंतजन्मीं तप केलें । तें एकदांचि फळासी आलें । जन्माचें सार्थक जाहलें । परब्रह्म सांवळें पाहिलें म्यां ॥२०४॥ तरी स्वामी इंदिरावरा । चलावें माझिया मंदिरा । ऐसें ऐकतां परात्परसोयरा । काय बोले तेधवां ॥२०५॥ कंसासी मारिल्याविण जाणा । मी न यें तुझिया सदना । राज्यीं स्थापीन उग्रसेना । बंदिशाळा फोडोनियां ॥२०६॥ आजिचे रात्रीं ये स्थानीं । आम्ही राहतों उपवनीं । तरी तुम्हीं पुढें जाऊनी । कंसालागीं सांगिजे ॥२०७॥ आज्ञा वंदोनि अक्रूर । प्रवेशला तेव्हां मथुरापुर । जैसा प्रकाशे सहस्रकर । तैसी वार्ता गेली मथुरेंत ॥२०८॥ श्रीकृष्ण आला उपवना । ऐकतां आनंद भक्तजनां । परम भय वाटलें दुर्जनां । चिंता बहुत प्रवर्तली ॥२०९॥ मागें बोलावें अति न्यून । समोर देखतां पळती उठोन । हें ग्रामसिंहाचें लक्षण । तैसे दुर्जन मथुरेचे ॥२१०॥ हरिविजयग्रंथ कल्पद्रुम । जो निजभक्तांचे पुरवी काम । इच्छिलें फळ देत उत्तम । मनोरथ सर्वदा ॥२११॥ ऐसा हरिविजयग्रंथ कल्पवृक्ष । येथें राहिला कमलपत्राक्ष । जो ब्रह्मानंद सर्वसाक्ष । भीमातटनिवासी जो ॥२१२॥ ब्रह्मानंद कल्पद्रुम थोर । तेथें याचक अनन्य श्रीधर । मागे हेंचि निरंतर । सप्रेम भजन देईं तुझें ॥२१३॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । प्रेमळ भक्त सदा परिसोत । अष्टादशोऽध्याय गोड हा ॥२१४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
श्रीगणेशाय नमः। कृष्णाच्या सर्व पराक्रमांमुळे व त्याने केलेले आपल्या हस्तकांचे वध पाहून कंस फार चिंताग्रस्त झाला. त्याला भीतीही वाटू लागली. त्याच्या हस्तकांना देवही घाबरत असत. पण वयाने लहान असणार्या कृष्णाने त्यांना ठार मारले याचे आश्चर्यही त्याला वाटले. काही तरी युक्ती करावी, उपाय करावा, पण बलभद्र व कृष्ण यांना नष्ट करावे, आता या गोष्टीला उशीर लावणे धोक्याचे आहे, हे कंसाने पक्के ठरविले. कृष्णाचा तो द्वेषही करीत होता. त्याला त्याचे भयही वाटत होते. त्याची वृत्ती या प्रकाराने अगदी कृष्णमय झाली. मनातल्या मनात कृष्णाची त्याने एक प्रतिमा उभारली होती. लोकांनी कृष्णाचे वर्णन केले होते त्यातूनच त्याने कृष्णासंबंधी एक कल्पना केली होती; आणि सर्वत्र त्याचाच भास कंसाला होत होता.
त्याने आपल्या प्रधानाना बोलायले. "कृष्णाला कसे पकडता येईल ?" असा प्रश्न विचारला. मंत्री म्हणाले- "धनुष्ययाग करण्याचा बेत ठरवावा. त्यासाठी अनेक राजांना बोलवावे. यज्ञ पहायला. अनेकांना बोलवावे. नंदालाही बोलवावे. मथुरेत त्या निमित्ताने मोठी यात्रा भरवावी. देशोदेशींच्या मल्लांच्या कुस्त्या ठरवाव्या. बलराम य कृष्ण यांना खास दूताला पाठवून यज्ञसोहळा पहायला म्हणून बोलवावे. मल्लांनी त्यांना कुस्तीचे आव्हान द्यावे, मल्ल त्यांचा चुराडा करून टाकतील. गोड बोलून त्यांना बोलवावे, आणि मल्लांकडून मारावे. आपला कुवलयापीड हत्ती दांडगा आहे. त्या हत्तीला यज्ञाच्या प्रवेशद्वाराशी ठेवावे. कृष्णावर त्या हत्तीने हल्ला करावा. तो कृष्ण बहुधा त्या हत्तीकडूनच मारला जाईल. नाहीतर मुष्टियुद्धात चाणूर व मुष्टिक हे मल्ल आपले इष्ट ते कार्य करतील." मंत्र्यांनी कंसाला असा सल्ला दिला. गोकुळात ज्याला पाठवायचे तो मनुष्य कृष्णाच्या विश्वासातला हवा. अक्रूर वसुदेवादिकांच्या परिचयातील होता. नंदाच्या विश्वासातला होता. कंसाने त्याला सांगितले- "गोकुळात जाऊन नंदाला सांग की धनुष्ययाग पहाण्यासाठी कंसाने कृष्ण, बलभद्र यांना बोलाविले आहे. नंदादि गोपांनाही बोलाविले आहे. येथे यागाच्या निमित्ताने उत्सव करण्याचे ठरविले आहे. तो पाहूनच मग परत जावे." मी तुला एक उत्तम रथ देतो. तू स्वतः कृष्ण व बलराम यांना उद्या घेऊन ये." अक्रूर चतुर व शहाणा होता. वयाने मोठा होता. त्याने हे काम स्वीकारले. रथ जोडून घेऊन तो गोकुळात जाण्यास निघाला. जाताना त्याच्या मनात काय विचार चालले होते ? तो मनाशी म्हणत होता- "कंस दुष्ट आहे. ती मुले लहान आहेत. कंसाचा काहीतरी घातकी डाव असणार. पण कृष्णाला त्याचे भय नाही. त्याने तर कितीतरी भयंकर दैत्यांना आतापर्यंत मारले आहे. मी सांगेन त्यावर कृष्णाचा विश्वास बसला पाहिजे. माझ्या मनात त्याच्याबद्दल जो भक्तिभाव आहे तो त्याला कळेल ना ? होय, त्याला कळेलच, मलाच कंसाने पाठविले हे ठीक झाले ! मला कृष्णाचे दर्शन तरी घडेल; मी त्याच्या सन्निध बसेन, बोलेन. विष्णूचा तो अवतार आहे, सगुण साकार दर्शन घडेल मला ! वेदांना अनाकलनीय व शंकराचा प्रिय असा विष्णूच मला पहायला मिळेल. हे गोकुळातले लोक मोठे भाग्यवंत ! त्यांच्या जवळच हरी रहातो, खेळतो. तेथले वृक्षही धन्य ! त्यांच्या सावलीत कृष्ण विश्रांती घेतो ! अक्रूर गोकुळात आला. मग जरा वेळ रथातून खाली उतरला. सायंकाळ झाली होती. मार्गावरील धूळ अक्रूराने आपल्या भाळी लावली ! हो ! कृष्णाची पदचिन्हे तिथे उमटली होती. तो पुन्हा रथात बसून चालला होता, तोंच मागून रामकृष्ण सवंगड्यांबरोबर, गाईवासरांना घेऊन वनातून परत येत होते. अक्रूराला त्यांचे दर्शन झाले. मार्गावर धूळ उडत होती. गाई हंबरत होत्या. गुरेवासरे धावत होती. त्यांच्या मागोमाग गाणी गात गोपाळ-मेळा येत होता. त्यांच्याकडे पहाता पहातां अक्रूराचा रथ नंदाच्या घराजवळ आला. अक्रूर खाली उतरून नंदाच्या वाड्यात गेला. नंदाने त्याला नमस्कार केला. त्याचे स्वागत केले. त्याचा पाहुणचार केला. कृष्ण व बलराम आले. वृद्ध अक्रूराला पाहून त्यांनी त्याला प्रणाम केले. अक्रूराने पटकन् त्यांना उठवून पोटाशी धरले ! त्या भक्त-भगवंताच्या क्षेमालिंगनाला शब्दांची आवश्यकता नव्हती. धुळीने व्यापलेल्या सावळ्या देहाच्या कोमल स्पर्शाने अक्रूराला जो आनंद झाला तो काय वर्णावा ? शंकराला सुद्धा असे आलिंगन मिळत नाही. अक्रूर पटकन खाली वाकला आणि कृष्णाचे व बलरामाचे चरण आपल्या हातानी कुरवाळून चेपू लागला. पण त्या दोघांनी अक्रूराचे दोन्ही हात धरून त्याला घरांत नेले. यशोदेला पाहाताच अक्रूराने तिलाही वंदन केले. नंदाने त्याला पुन्हा बसायला सुखासन दिले. मग इतर गोष्टी झाल्यावर अक्रूराने कंसाचा निरोप नंदाला सांगितला आणि धनुर्यागासाठी रामकृष्णाना बोलावले आहे असे त्याने सांगितले. नंदादिकांनी मागून यावे, आपण मुलांना उद्याच सकाळी नेतो असे म्हटले. नंद म्हणाला- "अक्रूर महाराज कंसाने या मुलांचा घात करण्याचे कितीतरी प्रयत्न केले ! आणि त्यांना तुम्ही मथुरेत नेता ? तो तर तिथे त्यांना नक्कीच मारील; आणि आम्ही मग जगणारही नाही ! असा निष्ठूरपणा तू करू नकोस." अक्रूर म्हणाला- "नंदा ! ज्यांनी कितीतरी बलाढ्य दैत्यांना नष्ट केले त्यांना तू लहान मुलगे समजू नकोस. तू भिऊ नकोस." कृष्ण म्हणाला- 'बाबा, अक्रूर काका बोलवायला आले आहेत तर आम्ही जातो. त्या दुष्ट कंसाचा वध केल्याशिवाय साधूंना सुरक्षितपणा वाटणार नाही. तेथे मुष्टिक व चाणूर वगैरे मल्ल असतील. तेही लोकांना छळतात. त्यांनाही नष्ट केले पाहिजे." नंद व यशोदा यांचे अक्रूराने समाधान केले. दुसर्या दिवशी सकाळी मथुरेस जायचे; कृष्ण व बलराम यांना न्यायचे असे ठरले. रात्रीच अनेक गोपांना तसे कळवून, रामकृष्णांच्या बरोबर गोरसादि पदार्थ काय काय पाठवायचे ते सज्ज करण्यात आले. सकाळ झाली. अक्रूराने रथ जोडला. मुले तयार झाली. कंसाना भेट म्हणून देण्याच्या वस्तू रथात ठेवल्या. नंद डोळ्यात पाणी आणून "मुलांना जपून ने" असे सांगत होता. यशोदा व रोहिणी यांनी मुलांना पोटाशी धरले. अश्रूंनी त्यांना न्हाऊ घातले. प्रथमच रामकृष्ण दूर जात होते. दृष्टीआड होत होते. मुलांनी मातांच्या चरणांना वंदन केले. ते बाहेर पडणार तोच गोप व गोपी यांनी नंदाच्या घराशी गर्दी केली ! कृष्णाचा विरह त्यांना सहन होईना. त्या शोक करू लागल्या. कृष्ण आता परत येणार नाही हे गोपी मनोमन जाणून होत्या. त्यांनी वाटेत अक्रूराचा रथ अडविला. रथासमोर भूमीवर पडून त्या रडू लागल्या, गोप रथाची चाके धरून, "जाऊ नको" अशा विनवण्या करू लागले. "बलराम व कृष्ण यांना कां नेतोस ? तू निर्दय, क्रूर आहेस. तुझे नांव अक्रूर कुणी ठेवले ? आम्ही आतां जगत नाही ! तुझ्या माथी आमच्या हत्येचे पाप लागेल. दुष्टा, आमचा सावळा तू दूर नेतोस ! हाय हाय !' वगैरे म्हणत गोपींनी आक्रोशच केला. पण रामकृष्णांनी त्यांची समजूत काढली. गोपींच्या भक्तीने अक्रूरही रडू लागला. कंसाची आज्ञा पाळायलाच हवी, तो काही आवडीने हरीला मथुरेस नेत नव्हता. यशोदा व नंदही आता शोक करू लागले. आपले हृदयरत्न नजरेआड होऊ देणे त्याना फारच अवघड होत होते. असा सर्व प्रकार चालला असतां कृष्णविरह सहन न होऊन राधा धावत आली व रथापुढे लोळण घेऊन मूर्च्छित पडली. तिला उचलून शुद्धीवर आणावे म्हणून गोपी धावून गेल्या पण ती पहाता पाहता तिथेच दिसेनाशी झाली. इंद्राणी म्हणजेच राधा. कृष्णलीलेत भाग घेण्यासाठी तिने वरदान मागितले म्हणून ती आलेली- परत आल्या अंगाने स्वर्गात निघून गेली. त्यावेळी एकच गोंधळ झाला. सारे गोप व गोपी हाय हाय करू लागत्या. अक्रूराचा रथ रतीभरही पुढे जाईना. त्याने अनेक प्रकारे गवळ्यांचे सांत्वन केले. नंद व काही वृद्ध गोप यांनी गोपींचे सांत्वन करून त्यांना बाजूस केले आणि रामकृष्णांनी अक्रूराला युक्तीने रथ हळूहळू पुठे नेण्यास सांगितले. जरा मोकळा मार्ग मिळाला. रथाचा वेग एकदम वाढला. घोडे मथुरेच्या दिशेने दौडू लागले. धावत मागे येणारे गोप व गोपी मागे राहिल्या. त्यांना रथ दिसेनासा झाला. फक्त घोड्यांच्या टापांनी उडणारी धूळ त्यांच्या अश्रुपूर्ण नेत्रांना दिसत होती. जीविताचे सर्वस्व हरवल्यासारखे होऊन यशोदेसह गोपींनी शून्य अशा गोकुळात परत गमन केले. काही गोप यमुनेपर्यंत आले. शुक परीक्षिताजवळ या विरहाचे वर्णन करतांना भावावस्था प्राप्त होऊन बोलायचा थांबला. परीक्षितही सद्गदित झाला. यशोदेच्या विरहव्यथेचे वर्णन करताना शुकही अडखळू लागला. कृष्णाच्या खेळातल्या सर्व वस्तु आणि त्याच्या वापरातल्या सर्व आवडत्या वस्तु यशोदेने जागच्या जागी नीट ठेवल्या. त्या कुरवाळून ती रडू लागली. पुन्हा कान्हा आला तर तो मागेल म्हणून ती त्या वस्तूंना जपून ठेवीत होती. तिची वत्सलता आता करूणा झाली. गोपींचे कृष्णप्रेम आता विरहकातर झाले. कामधाम करता करता कृष्णाच्या आठवणी काढून त्या स्वतःच गाणी रचून गाऊं लागल्या. एक दुसरी जवळ उसनी वस्तु मागायला जाई आणि म्हणे, 'जरा तुमचा कृष्ण एक दिवस उसना देतां का ?' कृष्ण जसे खेळ करायचा तसे त्याही करू लागत्या आणि त्यातच समाधान मानू लागल्या; आणि आठवणी काढून रडू लागल्या. अक्रूराचा रथ यमुनेजवळ आला. गोप यमुनेत स्नान करण्यास उतरले. अक्रूरही स्नान व वंदन करण्यासाठी यमुनेच्या पात्राकडे निघाला. जातांना एकदा मागे वळून त्याने रथात बसलेल्या रामकृष्णांकडे पाहिले. त्याच्या मनात आले- 'कंसाच्या आज्ञेप्रमाणे मी यांना मथुरेत नेत आहे खरा, पण कंस यांचा घात करील. मग मी दोषी ठरेन. मीच त्यांच्या घाताला कारण होईन. ही मजवर धर्मापत्तीच आली आहे.' तो पाण्यात शिरला. एकीकडे त्याला ते दोघे बालक वाटत होते, एकीकडे तो त्यांना महा-बलशाली अवतार मानत होता. त्याचे मन शंकाकुल झाले. त्याने स्नान करण्यासाठी पाण्यात बुडी मारली. आणि यमुनेच्या पाण्यात त्याला एक आश्चर्य दिसले. तेथे अनंत शेष हा बलरामाच्या रूपांत व विष्णू हा कृष्णाच्या रूपात दिसला. त्या विष्णूचे सर्व अवतार तिथे त्याला मूर्तिमंत दिसले ! दैत्यांचा संहार करणारी त्यांची निरनिराळी रूपे दिसली. ते दृश्य अद्भुत होते. अक्रूर रोमांचित झाला. त्याने विष्णूची स्तुती केली. पाण्यांतच आपण इतका वेळ जिवंत राहिलो याचे भान होऊन तो पाहूं लागला, तोच ते दृश्य विलयास गेले ! खर्या अर्थाने अक्रूराला स्नान घडले. तो पवित्र व शुद्ध झाला. तो पाण्यातून बाहेर आला आणि अंग पुसत रथाकडे वळला. कृष्ण व बलराम याकडे तो विस्फारलेल्या नेत्रांनी पाहू लागला. त्या बालकांचे खरे स्वरूप त्याला आतां कळले होते. शंका फिटली होती. आश्चर्य व भक्तिभाव उत्पन्न झाले होते. कृष्णाने विचारले- " अक्रूरकाका ! नदीत काही विचित्र दृश्य पाहिले की काय ? असे वेगळ्याच दृष्टीने काय पहाता ?" असे म्हणून कृष्णाने मधुर हास्य केले. अक्रूराचे मन हरवले ! ते कृष्णमय झाले. तो धावला. कृष्णाचे पाय धरून आनंदाने रडू लागला. त्याचे डोळे कृष्णाने पुसले. 'काका, रडू नका ! भाव स्थिर ठेवा.' अक्रूर म्हणत होता- "पुरुषोत्तमा, तुझा महिमा मला कसा कळणार ? मी अज्ञ आहे. माझ्या मनातील शंका आता दूर झाली." अक्रूर आता आनंदाने रथ हाकू लागला. नंद गोपांना घेऊन तोपर्यंत तेथे आला व अक्रूराबरोबर पुढे निघाला. मथुरेत कृष्ण व बलराम अक्रूराच्या रथात बसून प्रविष्ट झाले. मागोमाग काही गाड्यांतून नंद व काही गोपही येत होते. मथुरेत सर्व मंडळी आल्यावर अक्रूर नंदाला म्हणाला- 'तुम्ही सर्वांनी माझ्या घरी राहिलात तर मला फार आनंद होईल.' पण नंदाने व कृष्णाने एका उपवनातच रहावे असे ठरविले. कृष्ण अक्रूराला गुप्तपणे म्हणाला- "अक्रूरकाका, मी आधी तुमच्या घरी येत नाही. कंसाचा वध करून कैदेतील लोकांना मुक्त करीन, उग्रसेनाला राज्यावर बसवीन. हे कार्य केल्यावर मला तुमच्याकडे येणे आवडेल. आम्ही सध्या नगराच्या एका बाजूस असलेल्या या उपवनातच रहातो." "तुम्ही कंस महाराजांकडे जाऊन आम्ही आलो आहोत असे सांगा." असे त्याने उघड सांगितले. आणि त्याला प्रेमाने निरोप दिला. कृष्ण व बलराम आले आहेत ही वार्ता जेव्हा मथुरेतील लोकांना कळली तेव्हा कंसाच्या पक्षाचे दैत्य भयभीत झाले आणि नागरिकांना कृष्णदर्शनाची उत्कंठा वाटू लागली. अध्याय १८ समाप्त. ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |