॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय सतरावा ॥

वृंदावनातील रासक्रीडा -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय गोवर्धनोद्धारणा । हे कंसारे पूतनाप्राणहरणा ।
मधुकैटभारे मुरमर्दना । गोपीरंजना गोपते ॥१॥
तुझ्या ठायीं चित्त जडे । तरी संसारदुःख समूळ झडे ।
चिन्मयपद हाता चढे । न पडे सांकडे कदाही ॥२॥
आपुलिया कार्यालागीं प्राणी । सादर सदा दिनयामिनीं ।
तैसी प्रीति धरील हरिभजनीं । तरी बंधन मग कैंचें ॥३॥
धन इच्छा अंतरीं धरूनी । भाग्यवंतांसी स्तविती जनीं ।
तैसी गोडी लागे हरिचरणीं । तरी बंधन मग कैंचें ॥४॥
राज्य भांडार कां वृत्ती । जातां प्राणी सायास करिती ।
तैसे हरिप्राप्तीसी झगटती । तरी बंधन मग कैंचें ॥५॥
वाढावया वंशसंतान । करिती लोक बहु अनुष्ठान ।
तैसें कृष्णपायीं जडे मन । तरी बंधन मग कैचें ॥६॥
खोळंबेल लग्नघडी । म्हणोनि संकटी घालिती उडी ।
तैसी कृष्णभजनीं धरितां गोडी । तरी बंधन मग कैंचें ॥७॥
एकुलत्या पुत्रासी होतां व्यथा । वैद्य शोधूं धांवती मातापिता ।
तैसा हरिपदीं कळवळा जडतां । तरी बंधन मग कैंचें ॥८॥
जैसा का तृषाक्रांत प्राणी । उष्णकाळीं उदक धुंडी वनीं ।
तैसा आवडे चक्रपाणी । तरी बंधन मग कैंचें ॥९॥
कीं अबला कन्या परदेशीं दूरी । परी तिचें मन सदा माहेरीं ।
तैसी व्रजभूषणीं आवडी धरी ॥ तरी बंधन मग कैंचें ॥१०॥
असो षोडशोध्यायीं कथा । ऋषिपत्‍न्यांनीं कृष्णनाथा ।
अन्न अर्पूनियां तत्त्वतां । आश्रमाप्रति पातल्या ॥११॥
याउपरी एके दिनीं । वृंदावनीं शारंगपाणी ।
शरत्कालींची यामिनी । निशामणि निर्मळ दिसे ॥१२॥
अंबर नीलवर्ण सोज्ज्वळ । अणुमात्र न दिसे जलदपटल ।
शोभायमान वन निर्मळ । मलयानिल झळकतसे ॥१३॥
चूत कदंब लवंग वृक्ष थोर । जाई जुई चंपक औदुंबर ।
डाळिंबी पोफळी परिकर । केळी नारळी डोलती ॥१४॥
फणस अंजीर रातांजन । बकुळ मोगरे जांभळी कांचन ।
सदा वृक्ष भेदीत गेले गगन । आंत सूर्यकिरण न दिसे ॥१५॥
रावे साळया हंस मयूर । चातकें बदकें जवादीमांजर ।
कस्तूरीमृग सारसें सुंदर । चक्रवाकें खेळती ॥१६॥
ऐसेया वनीं चांदणें यामिनीं । पाहोनियां शारङ्‍गपाणी ।
पांवा वाजवी कैवल्यदानी ॥ वृंदावनीं तेधवां ॥१७॥
श्रीकृष्ण परब्रह्म निर्मळ । सगुणरूप अतिवेल्हाळ ।
जो सजलजलदवर्ण तमालनीळ । परममंगलदायक जो ॥१८॥
सांवळे सुहास्यवदन । आकर्णविशाळ राजीवनयन ।
मुरली वाजवी छंदेकरून । आनंदघन श्रीकृष्ण ॥१९॥
कोटयनुकोटी मीनकेतन । ओंवाळिजे मुखचंद्रावरून ।
पूर्णकाम रमारमण । मोहिलें मन गोपिकांचें ॥२०॥
ऐकोनि मुरलीचा ध्वनी । वेधल्या गोकुळींच्या नितंबिनीं ।
देह गेह सकळ विसरोनी । निघती वनीं हरि पाहूं ॥२१॥
नाना शास्त्रांचें श्रवण । हें एक करिती गोदोहन ।
गोपी तें सकळ टाकून । निघती मनमोहन पहावया ॥२२॥
सारासारविचारणा । एकीनें आरंभिलें घुसळणा ।
तें सांडूनि जनार्दना । पहावया चालिली ॥२३॥
नाना इंद्रियांच्या वृत्ती । हींच बाळें घरीं टाकिती ।
हरिपद पहावया धांवती । प्रेम चित्तीं न सांवरे ॥२४॥
नाना तीर्थपर्यटन । एक सांडिती हें नाहण ।
सांडिलें प्रपंचवसन । शरीर नग्न नाठवे ॥२५॥
नाना व्रतें तपें चोखणी । एक बैसली शिरीं लावुनी ।
ऐकतांचि मुरलीध्वनी । जात कामिनी तैसीच ॥२६॥
वायुधारण अष्टांगसाधन । हेंचि करीत होती भोजन ।
तें तैसेंचि सांडून । खंजनाक्षी चालिली ॥२७॥
प्रवृत्तीचें अलंकार । एक लेऊं विसरली सुंदर ।
लज्जेची बुंथी परिकर । सांडूनि सत्वर चालिली ॥२८॥
एक पडली कर्मजाळीं । स्वयंपाक करितसे सोंवळी ।
मनीं आठवतां मूर्ति सांवळी । जाय वेल्हाळी सत्वर ॥२९॥
एक समाधिशेजे निजतां कामिनी। तों ऐकिला मुरलीचा ध्वनी ।
समाधीहूनी गोडी हरिचरणीं । जात कामिनी सांडोनियां ॥३०॥
नाना साधनें दळणधंदा । सांडोनि चालिली एक मुग्धा ।
एक सांडोनिया वादप्रतिवादा । ब्रह्मानंदा पाहों जाय ॥३१॥
ऐशा गोपी चालिल्या समस्त । कृष्णचरणीं जाहल्या आसक्त ।
वृंदावनीं पांवा वाजवीत । ऐकोनि निश्चिंत धांवती ॥३२॥
असंख्य गोपींची मंडळी । वेगें आली हरीजवळी ।
भोंवता वेष्टिला वनमाळी । गोपी सकळी मिळोनियां ॥३३॥
हरि म्हणे तयांतें । सांडोनियां गृहधर्मातें ।
टाकोनियां निजपतीतें । किमर्थ येथें पातलां ॥३४॥
आपुला पति तो ईश्वर । मानूनि भजावें निरंतर ।
ऐसें ऐकतां कानीं उत्तर । गोपी सद्गद जाहल्या ॥३५॥
अहा मंगळधामा श्रीकृष्णा । आम्ही सांडूनि संसारतृष्णा ।
शरण आलों तुझिया चरणां । तूं या वचना बोलसी ॥३६॥
अद्वयदृष्टीनें पाहिलें जरी । तूंचि अससी पतींचें अंतरीं ।
येथेंही तूंचि मुरारी । ऐकतां पूतनारि हांसतसे ॥३७॥
त्यांचा अंतरभाव जाणोनी । वश जाहला मोक्षदानी ।
रासमंडळ रचोनी । चक्रपाणी खेळतसे ॥३८॥
जैसी कां ओंविली माळ । सुवर्णमणि आणि इंद्रनीळ ।
एक गोपी एक घननीळ । हस्त धरिती परस्परें ॥३९॥
तप्तकांचनवर्ण गोपीबाळा । मध्यें इंद्रनीळ घनसांवळा ।
ह्या वेदश्रुती निर्मळा । हरिरूपीं जडल्या हो ॥४०॥
एक गोपी एक कृष्ण । परस्परें स्कंधीं हात ठेवून ।
नृत्य करिती तें पाहतां तल्लीन । अष्ट नायिका पैं होतीं ॥४१॥
गाती सुरस सुस्वर । ऐकतां तटस्थ होती किन्नर ।
जगद्वंद्य गात मधुर । प्राणी चराचर विस्मित ॥४२॥
दिव्य मोतियांचे हार पूर्ण । गोपींच्या गळां दिसती सुवर्णवर्ण ।
तींच मोत्यें इंद्रनीळासमान । हरीच्या गळां शोभती ॥४३॥
असंख्य रूपें धरूनि हरी । नाचत गोपिकांमाझारी ।
पाचूंचीं पदकें हृदयावरी । झळकताती सर्वांच्या ॥४४॥
षोडशकळी नक्षत्रनायक । दिसे अत्यंत आल्हादकारक ।
यमुनापुलिनभूमीवर देख । रास सुरेख मांडिला ॥४५॥
शरत्काळ परमसुंदर । कुमुदिनींवर रुणझुणती भ्रमर ।
येत सुगंध मलयसमीर । सकळ तरुवर फुलले हो ॥४६॥
जैसा विद्युल्लताभार गगनीं । तैशा तळपती दिव्य कामिनी ।
तेथींच्या दिव्य सुवासेंकरूनीं । दाही दिशा दाटल्या ॥४७॥
जे ते गोपीसी वाटत । कीं मजपाशीं असे भगवंत ।
परी त्याचें रूपासी नाहीं अंत । विश्वंभर जगदात्मा ॥४८॥
गौरवर्ण खंजरीटनयना । मध्यें घननीळ वैकुंठराणा ।
जे ते गोपीस वाटे जाणा । कीं मीच कृष्ण भोगितें ॥४९॥
कृष्ण जलदवर्ण साजिरा । माजी सौदामिनी त्या सुंदरा ।
कीं त्या सुवर्णलतिका परिकरा । सुकल्या कामानळेंचि ॥५०॥
त्यांचे पूर्ण काम पुरवीत । श्रीरंग नीरद वर्षत ।
कीं श्रीकृष्ण नक्षत्रनाथ । गोपी उडुगण शोभती ॥५१॥
कीं श्रीकृष्ण वासरमणी । भोंवतीं किरणें नितंबिनी ।
प्रतिभास मित्रकन्याजीवनीं । तैशाचि तेथें तळपती ॥५२॥
गोपींचीं कुंडलें आणि नयन । हेचि प्रतिबिंबीं तळपती मीन ।
गोपीकुच हेंचि तारक घेऊन । मीनकेतन पोहतसे ॥५३॥
कीं त्या वनामाजी सुंदर । अनंग हाचि नृपवर ।
केशकुसुम वर्तुळाकार । हेंचि छत्र तयाचें ॥५४॥
पाडळीपुष्पें परिकर । हाचि माजी बांधिला तूणीर ।
केतकीपुष्पांतील लघुपुत्र । तोचि कुंत निकरीं ॥५५॥
किं केतकीपत्रें थोर थोर । हाचि कर्वत परम तीव्र ।
मस्तकीं घालोनियां भार । कर्वती विषयपरांसी ॥५६॥
असो नाचतां रासमंडळीं । गोपीमुखां मुख लावी वनमाळी ।
तांबूल घाली मुखकमळीं । सुखी वेल्हाळी होती त्या ॥५७॥
जे जे कामिनीचें जैसें मन । तैसाचि होय जगन्मोहन ।
तिची अंतरकळा देखोन । करूनि स्तवन सुखी करी ॥५८॥
चंदनें चर्चित हस्त । गोपींच्या कुचयुगीं ठेवीत ।
क्षणक्षणां चुंबन देत । नाचत नाचत तयांतें ॥५९॥
ऐशा नाचतां भागल्या कामिनी । हरिकंठीं मिठी घालोनी ।
मग सुरत-युद्धालागोनी । सुखशयनीं प्रवर्तल्या ॥६०॥
पूर्णकाम रमानाथ । सर्वांचे पुरवी मनोरथ ।
जे ते भावी मनांत । सुख समस्त मीच भोगीं ॥६१॥
गोपीच्या वदनेंदूवरी । श्रमबिंदु देखतांचि हरी ।
पुसूनि आपुल्या पीतांबरीं । मन हरी तयांचें ॥६२॥
गोपींचे कुच कुंकुमें चर्चित । हरिअंगीं त्या मुद्रा उमटत ।
कस्तूरीमळवट पुसत । मुख चुंबितां परस्परें ॥६३॥
हृदयग्रंथीं कंचुकीच्या । हस्तें तुटल्या जगद्‌गुरुच्या ।
निर्‍या फेडिल्या नारींच्या । तारिल्या साच कामिनी ॥६४॥
सेवितां हरीचें अधरामृत । गोपींचा काम दुणावत ।
आंगींचा चंदन समस्त । ठायीं ठायीं पुसतसे ॥६५॥
गोपींच्या नेत्रींची अंजनें । हरुनी नेलीं निरंजनें ।
कुचग्रहणें जगज्जीवनें । अधररंग हरियेला ॥६६॥
ऐशा क्रीडा करितां वनमाळी । घर्म पातलिया वेल्हाळी ।
मग रिघोनि यमुनाजळीं । विचित्र खेळ खेळती ॥६७॥
तों एक बोलती कामिनी । चला मागुती क्रीडों वनीं ।
त्यांचें वचन मानी चक्रपाणी । पूर्णकाम म्हणोनियां ॥६८॥
आनंदें गोपींशीं क्रीडतां । श्रम न वाटेचि कृष्णनाथा ।
जो महाराज ऊर्ध्वरेता । ब्रह्मचारी निर्वाण ॥६९॥
अष्टवर्षांची मूर्ति । वीर्यासी नाहीं अधोगति ।
लीलाकौतुक यदुपति । भक्तांलागी दावीतसे ॥७०॥
जे कां विषयपर जन । न करिति लीलाश्रवण ।
त्यांसी शृंगाररस दावून । वेधी मन आपणाकडे ॥७१॥
षण्मासांची करूनि राती । उद्धरिल्या कामभोगें युवती ।
त्या कथा वाचितां जन उद्धरती । गोपी न तरती कैशा पां ॥७२॥
ज्यासी ज्या रसाची प्रीती । ते ते दावूनि उद्धरी श्रीपति ।
नवरसलीला नवविध भक्ति । दावी यदुपति तारावया ॥७३॥
गोपींशीं क्रीडला यादवेंद्र । आपण तैसेंचि करुं पाहती जे नर ।
ते केवळ अज्ञान पामर । नरक घोर भोगिती ॥७४॥
कृष्णें केलें विषपान । यांसी आणुमात्र न करवे सेवन ।
हरीनें उचलिला गोवर्धन यांसी । जड पाषाण उचलेना ॥७५॥
कृष्णें महाअग्नि केला प्राशन । यांवरी पडतां स्फुलिंग येऊन ।
दुरी पळती भिऊन । हरिसमान होऊं म्हणती ॥७६॥
हरि भोगूनि अनंत नारी । शेखीं ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी ।
त्याची करूं पाहती जे सरी । तेचि भवपूरीं बुडाले ॥७७॥
स्त्रीसमागमें इतर जन । होती तेजोहीन कुलक्षण ।
ऊर्ध्वरेता जगन्मोहन । सतेज पूर्ण सर्वदा ॥७८॥
कृष्णें केलें परद्वार । परशुरामें उडविलें मातेचें शिर ।
तैसेंचि करूं म्हणती जे नर । तेचि पामर अभाग्य ॥७९॥
यालागीं हरिपदीं मन ठेवून । करा रासक्रीडा श्रवण ।
तेणें तोषोनि जगज्जीवन । निर्विषय करी निजभक्तां ॥८०॥
असो आतां भगवान । पुढती रासमंडळ रचोन ।
जे जे गोपीचें जैसें मन । तैसा आपण होतसे ॥८१॥
एकीस कडेवरी घेऊनी । दूरी नेत एकांतस्थानीं ।
एकी कृष्णअंकीं शिर ठेवूनी । श्रमोनि कामिनी निजतसे ॥८२॥
एक रुसली हरीवरी । तीस समजावीत मुरारी ।
एकीचें वदन कुरवाळित करीं । म्हणे तुज पळभरी न विसंबे ॥८३॥
एकीच्या अंगावरी टाकोनि अंग । प्रीतीनें निजतसे श्रीरंग ।
असंख्य रूपें धरूनि कोमलांग । मनोभाव पुरवीतसे ॥८४॥
एकीच्या नयनीं अश्रु आले । ते हरीनें निजकरीं पुशिले ।
रमेहूनि भाग्य आगळें । गोपिकांचें वाटतसे ॥८५॥
एकीस स्कंधी घेऊनी । नेवोनि निजवी कीं शयनीं ।
एकीचे मुखीं तांबूल घालोनी । चक्रपाणी हरी मन ॥८६॥
असो ऐसा क्रीडतां जगज्जीवन । गोपींनीं धरिला अभिमान ।
म्हणती कृष्ण जाहला आम्हांआधीन । बोलें आमुच्या वर्ततसे ॥८७॥
जो ब्रह्मादिकां न पडे दृष्टी । आम्ही तो वश केला जगजेठी ।
ज्यासी हृदयीं ध्यात धूर्जटी । तो घाली मिठी आमुच्या गळां ॥८८॥
आम्ही सकळांमाजी थोर । आमुचें वचन ऐके श्रीधर ।
ऐसा अभिमान देखतां मुरहर । केलें विचित्र तेधवां ॥८९॥
असंख्य रूपांसहित भगवान । गुप्त जाहला न लागतां क्षण ।
अभिमानच्छेदक मनमोहन । त्यासी दुजेपण सोसेना ॥९०॥
गुप्त होतांचि भगवंत । गोपी चमकल्या समस्त ।
शोक करिती अद्‌भुत । अहा कृष्णनाथ दिसेना ॥९१॥
षोडशकलायुक्त अत्रिसुत । चांदणें पडिलें घवघवित ।
वनें उपवनें गोपी शोधीत । कृष्णप्राप्तीकारणें ॥९२॥
अघहारकें अतिउत्तमें । घेऊनियां कृष्णनामें ।
गोपी बाहती संभ्रमें । ज्या पूर्णकामें मोहिल्या ॥९३॥
यादवकुलदीपका हरी । आम्हांसी सांडूनि वनांतरीं ।
गेलासी कोठें पूतनारी । व्रजनारी टाकोनियां ॥९४॥
नाना वृक्ष लागले वनीं । त्यांलागीं पुसती गजगामिनी ।
तुम्ही देखिला चक्रपाणी । सांगा आम्हांसी सत्‍वर ॥९५॥
जाई जुई चंपक । वट जंबु पारिजातक ।
त्यांसी पुसती वैकुंठनायक । देखिला काय तुम्हीं सांगा ॥९६॥
अश्वत्थ बिल्व मांदार । फणस चूत कदंब अंजीर ।
तयांसी पुसती श्रीधर । देखिला काय सांगा पां ॥९७॥
केळी नारिकेली पोफळी । बकुळ रातांजनें रायआंवळी ।
त्यांसी पुसती वनमाळी । देखिला काय सांगा पां ॥९८॥
अगर तगर कांजन । पाडळी देवदार अर्जुन ।
तयांसी पुसती जगन्मोहन । देखिला काय सांगा पां ॥९९॥
खर्जुरी डाळिंबी महाळुंग । बदरी खिरणी मातुलिंग ।
तयांसी पुसती श्रीरंग । देखिला काय सांगा पां ॥१००॥
जपा शतपत्र मालती । मोगरे करवीर शेवंती ।
तयांसी पुसती जगत्पती । देखिला काय सांग पां ॥१०१॥
तुलसीस पुसती सुंदरी । तुजवरी प्रीति करी मुरारी ।
सखे तुवां देखिला पूतनारी । तरी सांग आम्हांतें ॥१०२॥
भ्रमरा तूं कृष्णवर्ण । देखिला काय मनमोहन ।
तो जगद्वंद्य आम्हांसी सांडून । कोठें गेला नेणवे ॥१०३॥
मयूरासी पुसती नारी । तुझीं पिच्छें खोविलीं शिरीं ।
कोकिळ तुवां कंसारी । देखिला काय सांग वो ॥१०४॥
वनीं क्रीडती राजहंस । तयांसी पुसती परमपुरुष ।
चातकें चक्रवाकें सारस । हृषीकेशासी पुसती पैं ॥१०५॥
बक बदक काक रावया । कस्तूरीमृग नकुळ साळया ।
देखिलें काय सांवळिया । विलासिया डोळसातें ॥१०६॥
ऐशा गोपी बहु शीणती । दाही दिशा विलोकिती ।
अनंतनामीं आळविती । परी श्रीपती दिसेना ॥१०७॥
तों पदमुद्रा देखिल्या नयनीं । कडेवरी घेऊनि गेला एक कामिनी ।
तिची आपुल्या हातें घातली वेणी । तींही चिन्हें दिसताती ॥१०८॥
तिणें तोडिलें पुष्पांतें । टांचा उमटल्या नाहीं तेथें ।
उंच होवोनि ऊर्ध्वहस्तें । अरळ कळिका तोडिल्या ॥१०९॥
त्यांची शेज रचोनी । वरी भोगिला चक्रपाणी ।
देखतां क्षोभल्या कामिनी । मत्सरें मनीं संतप्त ॥११०॥
तीस खांदीं घेवोनि । पुढें गेला मोक्षदानी ।
टांचा बळें रुतल्या धरणीं । चिन्हें तेव्हां ओळखिलीं ॥१११॥
तों तिणेंही गर्व केला । तीसही हरि टाकूनि गेला ।
तळमळीत बैसली बाला । म्हणती गोपी तियेतें ॥११२॥
एकांतीं भोगूनि हरी । शेखीं पडलीस वनांतरीं ।
ऐशा अभिमानें गोपनारी । हरिचरणा दुरावल्या ॥११३॥
अंतरीं असतां यादवेंद्र । व्यर्थ शोधिती गिरिकंदर ।
जवळी असे रत्‍न परिकर । जन्मांधासी नेणवे ॥११४॥
नाभीसी असोनि कस्तूरी । व्यर्थ मृग हिंडें वनांतरीं ।
किंवा दरिद्रियांचे द्वारीं । निधान असोनि न दिसे कीं ॥११५॥
कीं कोणी एक अबला । दिव्य मुक्त असे तिच्या गळां ।
व्यर्थ लोकांच्या गळां वेल्हाळा । पडे मुक्त गेलें म्हणोनि ॥११६॥
दोन तीन पांचां ठायीं । कृष्ण न दिसे तेथें कांहीं ।
शेखीं दहा अकरा पाहीं । शोधिल्याही न सांपडे ॥११७॥
शोधिलीं पांच सतरा पंचवीस । दृष्टीं न पडे रमाविलास ।
शोधूनि पाहिलीं छत्तीस । परमपुरुष न सांपडे ॥११८॥
श्रेष्ठ निवडिल्या चौघीजणी । म्हणती आम्ही शोधूं चक्रपाणी ।
तों त्या नेति नेति म्हणोनि । लाजोनि जाहल्या तटस्थ ॥११९॥
आणिक एक सहाजणी कैशा । धूंडूं म्हणती विश्वाधीशा ।
बहुत तार्किका डोळसा । लाजोनियां परतल्या ॥१२०॥
अठराजणी नवरसिका । धुंडूं म्हणती रमानायका ।
त्यांचाही सरला आवांका । लाजोनि उग्या राहिल्या ॥१२१॥
आणिक एक अठराजणी । निराळ्या फुटल्या चौघीजणी ।
शोधिती बारा सोळा कामिनी । गदापाणी न सांपडे ॥१२२॥
बारा सोळा चौदा नारी । चौसष्टी दाविती कळाकुसरी ।
त्यांहीवेगळा कंसारी । नाढळे संसारीं लोकांतें ॥१२३॥
एक म्हणती आम्ही धनवंता । वश्य करुं कृष्णनाथा ।
याचिपरी अभिमानें तत्त्वतां । नाडल्या बहुत कामिनी ॥१२४॥
एक बलवंत म्हणविती । एक विद्यामदें मुसमुसती ।
हातींचा गेला श्रीपती । तो निश्चितीं नेणवे ॥१२५॥
एक दाविती नाना कळा । कळा तितुक्या जाहल्या विकळा ।
नेणती ब्रह्मानंदा निर्मळा । कळा विकळा तितुक्याही ॥१२६॥
नाना तपें घोर वनें । एक करिती वातांबुपर्णाशनें ।
एक दाविती पंचाग्निसाधनें । परी जगज्जीवन दुरावला ॥१२७॥
विधिनिषेध कर्मजाळ घोर । एक चढती हाचि डोंगर ।
शोधिती नग्न मौनी जटाधर । परी श्रीधर दुरावला ॥१२८॥
एक अष्टांगसाधनें दाविती । षट्‌चक्रांचे कडे वेंधती ।
पवनवेगें एक धुंडिती । परी यदुपति दुरावला ॥१२९॥
जों जों करिती साधन । तों तों खवळे अभिमान ।
दुरावला नारायण । अबला खूण नेणती ॥१३०॥
मग सर्व गोपी होवोनि गोळा । आठवोनि श्रीकृष्णलीळा ।
दाविती नाना कौतुककळा । अंगें आपुल्या करोनियां ॥१३१॥
एकीं होय उखळ । दुजी होय कृष्ण वेल्हाळ ।
तिजी यशोदा होवोनि तात्काळ । दांवें बांधी कृष्णातें ॥१३२॥
दोघी यमलार्जुन होती वेगें । एक माजी उखळ होऊनि एक रांगे ।
एक कृष्ण होवोनि निघे । घरोघरीं चोरीस ॥१३३॥
एक यशोदा होवोनि बैसली । एक गार्‍हाणें ते तिजजवळी ।
आवरीं तुझा वनमाळी । करितों कळी बहुसाल ॥१३४॥
एकीने वस्त्रांचा गुंडाळा करून । नखीं धरिला म्हणे गोवर्धन ।
एक पूतना होऊन । करवी स्तनपान कृष्णातें ॥१३५॥
सवेंचि शोषी म्हणोनी । भूमीवरी करी शयन ।
एक वृंदावनीं वेणु घेऊन । वाजवीत उभी राहे ॥१३६॥
पेंधा सुदामा वडजा ज्या रीतीं । ऐशा गोपी वेष दाविती ।
गडियाचे कानीं लागे श्रीपती । गडे हो गोष्टी एक ऐका ॥१३७॥
चोरीस जाऊं एके सदनीं । निजल्या अवघ्या गौळणी ।
तुम्ही सरांटे घेऊनी । पसरा पायथां तयांच्या ॥१३८॥
जवळी असों द्या मृत्तिका । जरी जाग्या जाहल्या गोपिका ।
सरांटे पायीं लागती देखा । तों तुम्ही मृत्तिका टाका नयनीं ॥१३९॥
त्या चोळिती जंव नयन । तंव तुम्ही पळा रे तेथून ।
रात्रीं चोरीस गेलों जरी पूर्ण । तरी खडे घेऊन प्रवेशावें ॥१४०॥
मौनेंचि द्यावे खडे टाकून । शिंकीं खडखडती आपण ।
मग भाले काठिया टोंचून । छिद्र पाडून दूध पिऊं ॥१४१॥
ऐसे बाळपणींचे भाव । गोपी दाविती लीला सर्व ।
एक काला कैसा करी माधव । तोचि भाव दाविती ॥१४२॥
कमलाकार सवंगडे । मध्यें तमालनीळ रूपडें ।
सन्मुख कृष्ण दृष्टी पडे । चहूंकडे सकळांसी ॥१४३॥
हरि सन्मुख देखती दृष्टीं । कोणासी न दिसे कृष्णाची पाठी ।
भक्तांसन्मुख जगजेठी । समसमान सर्वदा ॥१४४॥
ऐशा नाना लीला गोपिका । अंगेंकरूनि दाविती देखा ।
कालियामदनाचा भाव निका । नाचोनि दाविती तैशाचि ॥१४५॥
अघ बक केशी हरीनें मारिला । त्या त्या आचरोनि दाविती लीला ।
नंद सर्पमुखींहूनि सोडविला । तैशीच रीती दाविती ॥१४६॥
ऐशा बाळलीला स्मरोनी । मागुती हरीस धुंडिती वनीं ।
अहा आत्मयारामा शारङ्‍गपाणी । आम्हांसी वनीं टाकिलें कां ॥१४७॥
तूं नंदगृहीं जन्मलासीं गोपाळा । म्हणोनि येथें राहिली कमळा ।
गोकुळीं सर्वांसी सुखसोहळा । तरी दुःख ये वेळे आम्हांसी कां ॥१४८॥
जगद्वंद्या ब्रह्मांडनायका । दावीं तुझिया वदनशशांका ।
कां तूं शिणविसी गोपिका । सुखदायका श्रीरंगा ॥१४९॥
तुज हुडकितां ये वनीं । बहु श्रमलों चक्रपाणी ।
तुझ्या बटकी आम्ही होवोनी । मोलाविण राबतों ॥१५०॥
आम्हांसी देऊनि भोगदान । गुप्त जाहलासी तूं मनमोहन ।
सकळांसी आडामध्यें घालून । दोर कापून गेलासी ॥१५१॥
कालियासी तुवां मर्दिलें । सकळ गोकुळ सुखीं राखिलें ।
गोपिकांसी कां लोटूनि दिधलें । संकटार्णवीं ये वेळे ॥१५२॥
गोकुळ गिळीन म्हणे सगळें । अघासुरें हें मनीं धरिलें ।
त्यासी उभें चिरोनि आम्हांसी रक्षिलें । आतां कां केलें कठिण मन ॥१५३॥
इंद्र वर्षला शिळाधारीं । तेथें उचलोनि तुवां गोवर्धनगिरी ।
आतां कठिण चित्त मुरारी । आम्हांवरी कां केलें ॥१५४॥
लोकव्यवहारें निश्चित । तूं म्हणविसी नंदसुत ।
सकाळांतरीं तूं साक्षीभूत । मायातीत अगम्य ॥१५५॥
तूं क्षीरसागरीं असतां नारायण । कमलोद्‌भव आणि पाकशासन ।
हे तुज आले पूर्वीं शरण । दैत्य माजले म्हणोनियां ॥१५६॥
यालागींच यदुवंशीं । जगदात्मया अवतरलासी ।
दुष्ट मारूनि भक्त पाळिसी । कां आम्हांसी उपेक्षिलें ॥१५७॥
प्रकट होईं तूं झडकरी । वरदहस्त तुझा कंसारी ।
ठेवूनियां आमुचे शिरीं । काम हरीं अंतरींचा ॥१५८॥
क्षीराब्धीमाजी प्रकटली कमळा । तिचा हस्त तू धरिसी गोपाळा ।
त्याच हस्तें घननीळा । आमुचा हस्त धरीं कां ॥१५९॥
हरि तूं हांसतां बोलसी वचन । आमुचें होय तेणें गर्वच्छेदन ।
प्रभूनें अन्याय पाहोन । दंड करावा तैसाचि ॥१६०॥
नख लागतां जे पडणार । त्यासी कासया पाहिजे कुठार ।
वातें कमळिणी कांपे थरथर । तीवरी वज्र कासया ॥१६१॥
भणगें बैसलीं पात्रांवरी । ती समर्थें घातली जरी बाहेरी ।
तरी त्या भणगांचें मुरारी । काय चाले सांग पां ॥१६२॥
सुखाची हे परम रजनी । ऐसें आम्हीं भाविलें मनीं ।
परी कर्माची दुर्धर करणी । सांडिले वनीं आम्हांते ॥१६३॥
सुरभीची काढितां धार । तों शेराचे चिकें भरलें पात्र ।
तूं दुरावतां नवपंकजनेत्र । कर्म विचित्र ओढवलें ॥१६४॥
सुरतरुजवळी मागावया । याचक आला धांवोनियां ।
तों तेणें शुष्क काष्ठ घेवोनियां । मग तया मारिलें ॥१६५॥
गंगेसी ठाव नेदी समुद्र । तरी पुढें काय त्याचा विचार ।
जळचरांवरी कोपलें नीर । तरी गति पुढें कायसी ॥१६६॥
दुग्ध-मधु-घृतकासारीं जाण । जळचरें सोडितां त्यागिता प्राण ।
त्यांसी गति नाहीं उदकाविण । आम्ही शरण तैशा तुज ॥१६७॥
माता बाळकासी पायें लोटी । परी तें चरणींच घाली मिठी ।
भुवनसुंदरा जगजेठी । आम्ही तैशा तुजलागीं ॥१६८॥
सुधारसाची आस धरितां । विष केवळ ये हाता ।
करुणासागरावरी तत्त्वतां । लहरी क्रूर कां आली ॥१६९॥
मातेनें तान्हया विष दिधलें । पित्यानें पुत्रासी विकिलें ।
तारकें कांसेनी लावोनि ओसंडिलें । तरी शरण जावें कवणापासीं ॥१७०॥
राजयानें सर्वस्व हरिलें । पाठिराख्यानें शिर छेदिलें ।
गुप्त होवोनि घननीळें । तैसें केलें आम्हासी ॥१७१॥
ब्रह्मांडपति यादवकुळदीपका । दावीं तुझ्या वदनशशांका ।
आम्ही अन्यायी दासी तुझ्या गोपिका । व्रजनायका पाव वेगीं ॥१७२॥
परम सुकुमार तुझे चरण । वनीं खुपती कीं कठिण पाषाण ।
यालागीं आमुचे प्राण । कासावीस होताती ॥१७३॥
ज्या चरणीं सिंधुकुमारी । लुब्ध होवोनि झाली भ्रमरी ।
तो चरण आमुचे हृदयावरी । श्रीमुरारी ठेवी कां ॥१७४॥
काम आमुच्या हृदयजीवनीं । हाचि कालिया मर्दीं चक्रपाणी ।
निष्काम करूनि तुझे चरणीं । ठेवीं आम्हांसी निरंतर ॥१७५॥
वियोगानळें तापलों तत्त्वतां । तुझें अधरामृत पाजी रमानाथा ।
मधुरवचनीं आम्हांसी आतां । बोलें त्वरित येवोनि ॥१७६॥
तुझा वियोग होतांचि जाण । तत्काळ जातो आमुचा प्राण ।
परी तुझें कथामृत आठवून । वांचलों जाण श्रीवरा ॥१७७॥
संसारतापें जे संतप्त । तुझ्या कथामृतें ते सर्व निवत ।
परी तुझी कथा आणि अमृत । समान कदा न होती ॥१७८॥
स्वर्गींचे राहणार देख । ते म्हणती अमृत क्षणिक ।
तुझ्या कथामृतीं आस्था सकळिक । धरिती देव स्वर्गींचे ॥१७९॥
जिव्हेवरी घालितां अमृत । पळभरीच गोड लागत ।
परी श्रवण-नयनांसी तृप्त । कदा न करी सर्वथा ॥१८०॥
तैसी नव्हे तुझी कथा । वाचेसी गोड लागे गीत गातां ।
श्रवणीं आवडे श्रवण करितां । गोडी त्याहोनि विशेष ॥१८१॥
नयनीं पाहतां तुझे ग्रंथ । विशेष गोडी वाढत ।
दाही करणांसमवेत । अंतर तृप्त होतें पैं ॥१८२॥
आपण तृप्त होऊनि अंतरीं । इतरांसही आपणाऐसें करी ।
ऐसी गोड कथा तुझी हरी । तारी जनां समस्तांही ॥१८३॥
जैसें लोहाचें कडियाळें । ताजवीं घालूनि रत्‍न जोखिले ।
तुळाभार समसमान आलें । परी मोला आगळें रत्‍न कीं ॥१८४॥
तैसीच कथा आणि अमृत । उगाचि द्यावा दृष्टांत ।
परी तुझी कथा अद्‌भुत । सुधारस तुच्छ तेथें ॥१८५॥
कांच आणि पाच निश्चित । अजा आणि ऐरावत ।
दीप आणि आदित्य । समान कैसी होती पां ॥१८६॥
भक्त आणि निंदक । श्रोत्रिय आणि हिंसक ।
तैसें अमृत आणि कथा सुरेख । समान नव्हे सर्वथा ॥१८७॥
त्याचि कथामृतेंकरूनी । आम्ही वांचलों गोपकामिनी ।
मनमोहना चक्रपाणी । भेटें येऊनि सत्वर ॥१८८॥
त्वरित येवोनि चक्रपाणी । चरण लावीं आमुचे स्तनीं ।
अधरीं वेणु वाजविसी धरूनि । तोचि अधर सदैव वाटतो ॥१८९॥
अखंड अधरामृत सेवी । अवघ्यांहुनि थोर त्याची पदवी ।
एकदां तुझे चरण दावीं । ज्यांसी महाकवि वर्णिती ॥१९०॥
हरि तुझे चरण न पडतां दृष्टी । युगासमान जाती त्रुटी ।
सुंदरा डोळसा जगजेठी । आम्ही हिंपुटी तुजलागीं ॥१९१॥
तुझें मुख पाहतां नयनीं । पापण्या लवती क्षणक्षणीं ।
त्या नावडती आम्हांलागुनी । विक्षेप ध्यानीं करिती ज्या ॥१९२॥
तुझें लक्षितां श्रीमुख । हरे सकळ संसारदुःख ।
तेथें पापण्या विक्षेपकारक । पापिणी निश्चिती त्या होती ॥१९३॥
पापण्या विघ्न परम ध्याना । मग आम्ही निंदितों चतुरानना ।
अहा रे विधातया शाहण्या । व्यर्थ पापण्या त्वां केल्या ॥१९४॥
टाकूनि-पति-सुत-बंधु-जनका । तुज पावलों कमलानायका ।
हरि तूं परम कपटी नाटक्या । जवळी असतां न दिससी ॥१९५॥
अहा श्रीरंग आत्मयारामा । निजभक्तकामकल्पद्रुमा ।
पुराणपुरुषा पूर्णब्रह्मा । भेटोनि कामना पुरवीं तूं ॥१९६॥
हरि तुझें देखतां वक्षःस्थळ । मनीं काम होय उतावेळ ।
तूं कोमलांग घननीळ । भेटतां सकळ काम पुरे ॥१९७॥
आमुचे स्तन परम कठिण । अति कोमळ तुझे चरण ।
तुझें करितां चरणसंवाहन । आमुचें मन भीतसे ॥१९८॥
ऐसें पद तुझें कोमल श्रीहरी । हिंडसीं कोणे वनांतरीं ।
म्हणोनि गोपिका सुस्वरीं । रडती हरीकारणें ॥१९९॥
गळाला सकळ अभिमान । अंतरीं दृढ ठसावलें ध्यान ।
ऐसें जाणोनि श्रीकृष्ण । एकाएकीं प्रगटला ॥२००॥
किरीट कुंडलें वनमाळा । आजानुबाहु कांसे पीतांबर कसिला ।
गोपींस वाटे प्राण आला । मग धांविन्नल्या न सांवरतां ॥२०१॥
एक लागती हरिचरणीं । एक गळां दृढ मिठी घालुनी ।
एक मुख लक्षिती नयनीं । एक कामेंकरूनि विव्हळ ॥२०२॥
मागुती रासमंडळ रचोनी । सकळांचा काम पुरवोनी ।
तों उगवला दिनमणी । गेल्या नितंबिनी गोकुळा ॥२०३॥
षण्मासांची करूनि राती । भोगिल्या गोकुळींच्या युवती ।
परी वीर्यासी नाहीं अधोगती । उर्ध्वरेता श्रीकृष्ण ॥२०४॥
ज्या ज्या गौळियांच्या सुंदरी । तितुक्याही होत्या निजमंदिरीं ।
कृष्णें भोगिल्या बहुरात्रीं । हेंच नवल पैं जाणा ॥२०५॥
तरी त्या वेदश्रुती सकळा । निर्गुणरूप वर्णितां शिणल्या ।
परी स्वरूपीं नाहीं ऐक्य जाहल्या । मग अवतरल्या गोकुळीं ॥२०६॥
प्रवेश नोहे निर्गुणीं । म्हणोनि ये वेळे जडल्या सगुणीं ।
येर्‍हवीं गोकुळींच्या कामिनी । पतिशयनीं होत्या त्या ॥२०७॥
इतुक्या गोपी भोगिल्या देखा । परी हरीवरी रुसली राधिका ।
तिचें समाधान करावया भक्तसखा । कुंजवनीं प्रवेशला ॥२०८॥
तें श्रीजयदेव पद्मावतीरमण । तेणें केलें समूळ कथन ।
राधा हे शचीचा अवतार पूर्ण । अष्टमाध्यायीं सांगितलें ॥२०९॥
तिचें सांगावें समूळ चरित्र । तरी विशेष वाढेल हा ग्रंथ ।
हें पद्मपुराणींचें संमत । कथिलें असे जयदेवें ॥२१०॥
दशम आणि हरिवंश । पद्मपुराणींच्या कथा विशेष ।
हरिविजयीं लिहिल्या निर्दोष । शब्द न ठेविजे ग्रंथातें ॥२११॥
मूळावेगळी सर्वथा । प्रसिद्ध नव्हेचि कदा कथा ।
आणि या ग्रंथाचा मी कर्ता । ऐसें म्हणतां दोष लागे ॥२१२॥
वरदायक रुक्मिणीकांत । तेणें लिहिला हरिविजय ग्रंथ ।
त्याचें तो जाणे समर्थ । मज कांहीं न कळे हें ॥२१३॥
येर्‍हवीं मी दीन पामर । तेणें माझें नाम ठेविलें श्रीधर ।
मूर्खाहातीं हा ग्रंथ थोर । कां करविला तो जाणे ॥२१४॥
गोकुळींचें बाळक्रीडाकथन । संपूर्ण जाहलें येथून ।
पुढें आतां अक्रूरागमन । बहु निरूपण रसाळ ॥२१५॥
श्रीकृष्ण मथुरेसी जाईल । प्रेमाचा सागर उचंबळेल ।
ते कथा ऐकतां हृदय उलेल । प्रेमळ सद्‌भाविकांचें ॥२१६॥
हरिविजयग्रंथ श्रेष्ठ । हें केवळ वैकुंठपीठ ।
इंदिरानाथ त्रिभुवनवरिष्ठ । तोचि प्रकट येथें दिसे ॥२१७॥
वैकुंठीं अवघे समसमान । चतुर्भुज घनश्यामवर्ण ।
येथें जे सद्‌भावें करिती श्रवण । हरिरूप पूर्ण ते होती ॥२१८॥
यालागीं जें वैकुंठीं सुख पाहतां । तें सुख हरिविजयश्रवणें येत हाता ।
अनुमान न धरावा श्रोतां । केवळ कविता हे नोहे ॥२१९॥
ब्रह्मानंदा श्रीधरवरा । श्रीमद्‌भीमातटविहारा ।
पुराणपुरुषा निर्विकारा । रुक्मिणीवरा श्रीविठ्ठला ॥२२०॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
परिसोत सद्‌भक्त पंडित । सप्तदशोऽध्याय गोड हा ॥२२१॥
अध्याय॥१७॥ओंव्या॥२२१॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः। हे गोवर्धनधारी ! मुलीचे मन जसे माहेरी ओढ घेते, तसे जर भक्ताचे मन तुजकडे लागले तर संसाराचे बंधन कुठून राहील ? संसाराची चिंता करतात तशी जर लोक हरी कसा प्राप्त होईल याची चिंता करतील तर संकट उरणार नाही ! तो उद्धार करीलच करील.

श्रोतेजनहो ! श्रीमद्‌भागवतात, हरिवंशात व पद्मपुराणात रासक्रीडेचे वर्णन व्यासांनी केलेले आहे. त्या भगवंताच्या लीलेचे रहस्य इंद्रादि देवांनाही कळले नाही तिथे मला पामराला काय कळणार ? मी व्यासांचीच वचने प्राकृतात पुन्हा सांगतो !

कात्यायनी व्रताच्या वेळी कृष्णाने गोपकुमारींना सांगितले होते- "शरदाच्या पौर्णिमेला मी तुमची इच्छा पूर्ण करीन." त्याप्रमाणे कृष्ण शरद ऋतूतील पौर्णिमेला पूर्वरात्रींच वृंदावनात मुरली वाजवू लागला. तो ध्वनी कानीं पडताच घरदाराचा विचारच सोडून, हातातीत उद्योग तसाच सोडून गोपी कुंजवनाकडे धावल्या. त्यावेळी शीतल मंद मंद पवन सर्वांगाला सुख देत होता. पूर्वदिग्भागी पूर्णचंद्र रजतकिरणांनी सृष्टीला न्हाऊ घालीत होता. पुष्पसुगंधाने आसमंत भारून गेला होता. भ्रमर रात्रीही पुष्पांवरून पुष्पांवर उडत होते. आकाशात एकही मेघ नव्हता. एकमेव मुरलीचा ध्वनि घुमत होता.

कृष्ण म्हणजे श्यामल सगुण ब्रह्मच ! त्या मुरलीच्या स्वरांनी चांदण्यावर आरूढ होऊन गांधर्व मोहित होऊन तिथे आले होते. मदनाचे रुप त्रैलोक्यात श्रेष्ठ, पण कृष्णापुढे ते फिकेच !

मुरलीचा रव श्रवणीं पडताच गोपींची धांदल कशी उडाली ? कोणी दूध काढीत होती, ती गाई खालून तशीच निघाली. ताक घुसळताना मुरलीचा ध्वनी आला, तेव्हा एक रवीच हातात घेऊन निघाली. एकीने तर तान्ह्या मुलालाच घरात सोडले, एक रात्री जेवत होती, ती अर्धा भात तसाच खात निघाली. एक दागिने घालीत होती ती एका कानात, एका हातात भूषणे घालूनच चालायला लागली, अणि वृंदावन जवळ येताच अशा कितीतरी गोपी धावतच कृष्णापाशीं आल्या. मुरलीने वेडे केले होते त्यांना, कृष्णाने त्यांना उन्मन केले होते.

त्या भोवती जमल्या, त्यावेळी कृष्णाने त्यांना म्हटले- "अहो गोपींनो ! तुम्ही या अशा रात्री, अवेळी इथे का आलेल्या आहात ? तुम्हाला घरदार नाही ? पती-संसार नाही ? हे वागणे चांगले नाही तुम्ही घरी परत जावे ?"

कृष्णाचे हे निष्ठुर वचन ऐकून प्रथम त्यांना मोठाच धक्का बसला. मग त्या एकदम रडू लागल्या; विनवण्या करून म्हणू लागल्या- "कान्हा, आम्ही घरसंसाराचा विचारच सोडला आहे. आता तूच आमचे सर्वस्व ! तूच आमचे घर, तूच आमचा संसार, तूच आमचा पती. तुझ्याविना आता गतीच नाही दुसरी. कृष्णा ! तू असे कठोर बोलून कां दुःख देतोस ?"

कृष्णाने त्यांची अनन्य भक्ती ओळखली. तो हसला. त्यांच्यासाठी त्याने अनेक रूपे धारण केली. जितक्या गोपी तितके कृष्ण ! कोणाला आपल्या बरोबर कृष्ण नाही असे वाटायला नको. नंतर त्यांनी खेळ खेळण्यास प्रारंभ केला. एकेका गोपीनंतर एकेक कृष्ण अशा रीतीने एक मालाच तयार केली. त्या मग फेर धरून नृत्य करू लागल्या. कृष्ण हाच नीलमणी, गोपी म्हणजेच सुवर्णाचे मणी ! किंवा इच्छा हाच मेघ व गोपी ह्याच सौदामिनी. गोपींनी जी जी इच्छा मनी धरली ती ती कृष्णाने पूर्ण केली. त्यांचे रासनृत्य पहाण्यासाठी देवता आकाशात येऊन थांबल्या. जो अनेक असुरांचा संहार करणारा सर्वशक्तिमान् कृष्ण, तोच आज भक्तीला वश होऊन अतिशय कोमल स्वभावाचा झाला ! चांदण्यांपेक्षा शीतल व सुखदायी अशी त्याची कृपादृष्टी होती. गोपी ह्याच तपस्वी ऋषी ! अनेक जन्म तप करून त्यांनी अठ्‍ठाविसाव्या युगांत कृष्णाबरोबर सगुणसाकार संग मागून घेतला होता. अद्वैत समूर्त झाले होते. गोपींना आता असे वाटू लागले की जन्मोजन्मीची तपस्या फळली, आतां कृष्णाची आपल्याला नित्य प्राप्ती आहे !

हाही अभिमानच ! श्रीहरीला भक्तांचा अभिमान खपत नाही. भक्त नम्र, निगर्वी, अहंशून्य व्हावा असेच त्याचे मत आहे. कृष्णाला गोपींच्या मनांतीत गर्वाचा उदय कळला. त्याने त्यांना धडा शिकविण्याचे ठरविले. तो आपली सर्व रूपे आवरून एकदम दिसेनासा झाला !

गोपींना सारे एकदम शून्य झाले. नटलेली सृष्टी कष्टी दिसू लागली. चांदणे जाळूं लागले, सुगंधाचा राग येऊ लागला. कृष्णाला हाका मारीत त्या इकडे तिकडे धावू लागल्या. झाडांना, वेलींना, भ्रमरांना विचारू लागल्या- "तुम्ही कृष्णाला पाहिलेत का ?" तुलसीच्या रोपट्याला विचारू लागल्या- 'कृष्णप्रिये, त्याचा ठावठिकाणा सांग ना !' मोराला म्हणाल्या- 'तुझ्या पिसांचा तो कान्हा मुकुट करतो, तुला तो दिसला का रे ! आम्हाला अचानक सोडून गेला ! कुठे गेला ? आमचे काय चुकले ? सख्यांनो, तुम्हीच कृष्ण व्हा, आम्ही तुमच्या संगे क्रीडा करतो !' नाना प्रकारे त्या कृष्णाच्याच आठवणी काढू लागल्या. रडू लागल्या. त्यांना एका जागी कृष्णाची व एका गोपीची पावले उमटलेली दिसली. त्या पाऊलखुणांचा माग काढीत त्या चालल्या. त्या गोपीने एका ठिकाणी उंचावरची फुले काढली असावीत, तिला या जागी कृष्णाने उचलून घेतले असावे, इथे दोघे बरोबर चालली असावीत असे तर्क करीत गोपी शोध घेत होत्या. एका ठिकाणी त्यांना फुलांचीच बनविलेली पण चुरगळलेली शेज दिसली ! त्या गोपीने काय मिळविले ते त्यांना कळलेच. मत्सर उत्पन्न झाला ! आधी गर्व, आता मत्सर ! पण जरा पुढे गेल्यावर त्यांना काय दिसले ? ती गोपी एका झाडाच्या बुंध्याशी रडत बसली होती. तिलाही कृष्ण सोडून गेला ? तिलाही अभिमान झाला होता - ’कृष्ण माझाच आहे, इतर गोपींपेक्षा त्याचे मजवरच प्रेम आहे ?' त्या अभिमानामुळे कृष्ण तिलाही दिसेनासा झाला ! सर्वांना विरहाने वेडे केले. दोन दोन, चार चार गोपी वृंदावनात कृष्णाला शोधायला निघाल्या. पुरुष-प्रकृती, त्रिगुण, पंचप्राण, अष्टधा प्रकृती, दशेंद्रिये, चतुर्दश विद्या, चार वेद, अठरा पुराणे यांच्याही पलीकडे असणारा तो भगवान् कृष्ण त्यांना सापडेना ! कसा सापडावा ! अभिमानाने दृष्टी अंध झाली ना !

आता कृष्णाची सोंगे आणून गोपी आपसात क्रीडा करू लागल्या ! पण त्यातही त्यांचे मन फार वेळ रमेना ! प्रत्यक्ष अनुभूतीचा आनंद जसा शब्दांनी देताघेतां येत नाही, तसे खोटे खेळ खेळून खरी हरिलीला चाखायला कशी मिळेल ?

मग त्या आक्रोश करू लागल्या. त्याच्याशिवाय कसलेच भान त्यांना होईना ! त्यांचा गर्व नाहीसा झाला ! त्या कृष्णाला अनेक स्तोत्रांनी आळवू लागल्या. त्याच्या अवतारकार्याची वर्णने करून प्रार्थना करू लागल्या. त्यांची विरहकातरता पराकोटीस पोहोचली. त्या प्राणत्याग करण्यात उद्‌युक्त झाल्या. तेव्हा सारी सृष्टीच शोक करू लागली !

गोपींची फार कठोर परीक्षा पाहिली, आता पुरे झाले, असे ठरवून एकदम कृष्ण त्यांच्यामध्ये प्रगट झाला. गोपींना पुन्हा धक्का बसला- तो धक्का असीम आनंदाचा होता.

त्यानंतर कृष्णाने त्या पौर्णिमेच्या रात्री गोपींबरोबर जीवशिवाच्या मीलनाप्रमाणे दिव्य रासलीला केली. ज्या देवांना त्याचे ते परम रहस्यमय दर्शन व ज्ञान झाले ते धन्य झाले ! गोपींचे सर्व भवपाश त्यावेळी दूर झाले. त्या रात्रीपासून गोपींना श्रीकृष्ण नित्य निकट आहे असेच झाले ! विरह ही गोष्टच उरली नाही ! श्रोतेहो ! आता कृष्णाचे पुढील महान् कार्य ऐका !
अध्याय १७ समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP