|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय बत्तिसावा ॥
नारदांवर विचित्र प्रसंग, सांबविवाह, अर्जुनाकडून सुभद्राहरण -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय क्षीरसागरविहारा । मत्स्यरूपिया वेदोद्धारा । महाकपटिया शंखासुरा । वधूनि धर्म वाढविला ॥ १ ॥ मंदराचळ धरूनि पृष्ठीवरी । चौदा रत्नें काढिलीं सागरीं । कूर्मवेष मधुकैटभारी । भक्तकैवारी तूं साच ॥ २ ॥ रसातळा पृथ्वी जातां । सकळ देवीं धावां करितां । वराहवेषें रमानाथा । उर्वी दाढेवरी धरियेली ॥ ३ ॥ स्तंभ भेदूनि एकसरा । विदारूनि टाकिले महासुरा । प्रल्हादरक्षका सर्वेश्वरा । नरहरिवेषधारका ॥ ४ ॥ दानें तपें व्रतें बळी । त्यापाशीं याचक तू वनमाळी । त्रिभुवन दाटलें पायांतळी । वामनवेषा कमलेशा ॥ ५ ॥ नाही सेवक सदन पृतना कांही । तीन सप्तकें निर्वीर मही । करूनीया चिरंजीव विजयी । अद्यापि पाहीं विचरत ॥ ६ ॥ वैश्रवणबंधु दशास्य । तेणें बंदी घातले त्रिदश । मग तुवां धरूनियां श्रीरामवेष । अदितिपुत्र सोडविले ॥ ७ ॥ तोचि तू आनकदंदुभिसुत । द्वारकाधीश मन्मथतात । तांडव करूनि अद्भुत । पांडव रक्षिले निजबळें ॥ ८ ॥ कलियुगी लोक परम धनांध । जिंहीं जवळी रक्षिले कामक्रोध । तयासी तू बोलसी बोध । लीला अगाध दाविसी ॥ ९ ॥ पुढें म्लेंच्छ माजती दारुण । टाकिती सत्कर्में मोडून । मग तू कलंकीवेष भगवान । तुरंगवहनी धांवसी ॥ १० ॥ तोचि तू सर्वेशा भीमातीरीं । दोन्ही कर ठेवूनि कटांवरी । प्रत्यक्ष नांदसी पंढरी । ब्रह्मानंदा जगद्गुरो ॥ ११ ॥ एकतिसावे अध्यायीं कथन । सत्यभामा आणि प्रद्युम्न । सर्व यादव आणि सुपर्ण । गर्वहरण केले त्यांचे ॥ १२ ॥ यावरी एके दिवशीं नारदमुनी । स्नान करितां सुरनदीजीवनीं । तों मत्स्य आणि मत्स्यिणी । रमतां दृष्टीं देखिलीं ॥ १३ ॥ काय संसार स्त्रीविण । नाही देखिलें पुत्रवदन । आतां विवाह करावा येथून । तरी स्त्री कधीं वाढेल ॥ १४ ॥ तरी आता घेऊं कृष्णदर्शन । सोळा सहस्र रामा त्यालागून । एक घ्यावी आतां मागून । करूं संतानवृद्धि कांही ॥ १५ ॥ विसरला जप तप अनुष्ठान । जवळी घेतला कमंडलु जीवन । हाती ब्रह्मवीणा घेऊन । मुक्तिपुरीसी पावला ॥ १६ ॥ जे अनंतशक्तींची स्वामिनी । ते आदिमाया मन्मथजननी । तिचे मंदिरी शारंगपाणी । बैसला होता तेधवां ॥ १७ ॥ तेथेंचि आला नारदमुनी । तों दृष्टीं देखिला मोक्षदानी । हातीं चामर घेऊनी । नारी रुक्मिणी वारीतसे ॥ १८ ॥ नारद देखतां जगज्जीवनें । क्षेमलिंगन दिधले प्रीतीनें । जवळी बैसवूनि मधुसूदनें । पूजा केली यथाविधि ॥ १९ ॥ हरि म्हणे जलजोद्भवनंदना । कांही मज करावी आज्ञा । आजि स्वामींची वासना । परम चंचळ दिसतसे ॥ २० ॥ नारद म्हणे घननीळा । व्यर्थ आमुचा काळ गेला । गृहस्थाश्रम नाहीं केला । पुत्र कलत्र न देखों ॥ २१ ॥ तरी तुज बहुत स्त्रिया जगन्मोहना । मज एक देई अंगना । स्त्रीदान करी त्याचिया पुण्या । पार नाहीं सर्वथा ॥ २२ ॥ हास्यवदन जगन्नायक । म्हणे नारद मांडिलें कौतुक । ते समयी यादवकुळटिळक । काय बोलिला ऐका तें ॥ २३ ॥ म्हणे जे गृहीं नसें मी ब्रह्मनंदना । तेथूनि अवश्य न्यावी ललना । बरें म्हणोनि ते क्षणा । सांवरोनि वीणा ऊठिला ॥ २४ ॥ गेला दुसरिया गृहाप्रती । तों तेथें बैसलासे जगत्पती । उद्धव अक्रूर उभे असती । विंझणे हाती घेऊनियां ॥ २५ ॥ हरि म्हणे यावें नारदमुनी । आलिंगन दिधले प्रीतीकरून । म्हणे येणें जाहलें कोठूनी । काही आज्ञा करावी मज ॥ २६ ॥ नारद विचारी अंतरी । परम लाघवी कपटी मुरारी । आता होता रुक्मिणीचे घरी । आला लवकरी विवरद्वारें ॥ २७ ॥ तेथूनि उठे नारदमुनी । प्रवेशे दुसरे सदनीं । तो फांसे हातीं घेऊनी । सारीपट खेळतसे ॥ २८ ॥ हरि म्हणे यावें नारदमुनी । म्हणोनि उभा ठाके चक्रपाणी । पूर्ववत पूजा करूनि । क्षेमवार्ता पुसतसे ॥ २ं९ ॥ नारद म्हणे नाटकी पूर्ण । येथेंही बैसला त्वरे येऊन । मग प्रवेशे आणिक सदन । तों मनमोहन निजलासे ॥ ३० ॥ नारद प्रवेशला सदनांतरी । म्हणे कोण निजला मंचकावरी । येरी म्हणे स्वामी मुरारी । बैसा क्षणभरी नारदमुनि ॥ ३१ ॥ तों तेथें खेळती लेकुरें । दृष्टीं देखिली मुनिवरें । एक सदनी यादवेंद्रें । मंगळस्नान आरंभिलें ॥ ३२ ॥ एके घरी घेतलें अग्निहोत्र । स्वयें होम देत वारिजनेत्र । एके गृहीं वेदांतशास्त्र । काढूनि वाची जगदात्मा ॥ ३३ ॥ एके घरीं करीत कन्यादान । कोठें करीत पुत्राचें लग्न । कोठें सुना माहेरा पाठवून । लेंकी आणीत गोपाळ ॥ ३४ ॥ कोठें कन्या सासुरीं बोळवीत । सद्गद जाहलासे जगन्नाथ । कोठें शास्त्रांचे मतितार्थ । काढूनि सांगत भक्तांसी ॥ ३५ ॥ कोठें असे गात नाचत । कोठें प्रेमें श्रवण करीत । कोठें विद्याभ्यास दावीत । विद्या शिकवीत पुत्रांतें ॥ ३६ ॥ चतुर्दश विद्या चौसष्ट कळा । गृहीं गृहीं दावीत लीला । कोठें वेदघोष आगळा । करी सांवळा आदरें ॥ ३७ ॥ कोठें बैसला उगाचि शांत । कोठें उदास विरक्त । कोठें राजयोग दावीत । हठनिग्रह टाकूनियां ॥ ३८ ॥ कोठें यम नियम प्राणायाम । प्रत्याहार करी पुरुषोत्तम । कोठें कृपण कोठें उदारपण । पूर्णकाम जाहलासे ॥ ३९ ॥ कोठें आचरे कर्मकांड । कोठें उपासना दावी प्रचंड । कोठें ज्ञान कथी वितंड । परम मूढां जीवांसी ॥ ४० ॥ ऐसा जे गृहीं रिघे नारद । तिकडे व्यापलासे गोविंद । म्हणे विश्वव्यापक ब्रह्मानंद । रिता ठाव न दिसेचि ॥ ४१ ॥ मग लज्जित जाहला ब्रह्मनंदन । म्हणे विश्वव्यापक जगज्जीवन । मज कर्में नाडलें पूर्ण । अज्ञानआवरण पडियेलें ॥ ४२ ॥ मग तैसाचि वेगें निघाला । भागीरथीतीरासी आला । अनुतापें तप्त जाहला । स्नानासी चालिला ब्रह्मपुत्र ॥ ४३ ॥ जळीं करितां अघमर्षण । तो मायेनें दाविले विंदाण । स्त्रीस्वरूप आपण । नारद जाहला तेधवां ॥ ४४ ॥ रंभेऐसें रूप सुंदर । नारदी जाहला मुनीश्वर । तेथें एक पुरुष आला साचार । कामातुर होऊनियां ॥ ४५ ॥ तेणे संग देतांचि तत्काळ । गरोदर झाली वेल्हाळ । नव मास भरतां समूळ । प्रसूत जाहली तेधवां ॥ ४६ ॥ तत्काळ जाहले साठी पुत्र । प्रभवविभवादि संवत्सर । नारदमुनि करी विचार । म्हणे अनर्थ थोर जाहला ॥ ४७ ॥ मज लागलें स्त्रियेचें ध्यान । तेंचि मी जाहलो नलगतां क्षण । मग करीत हरिस्मरण । सोडवीं येथूनि दयाळुवा ॥ ४८ ॥ करितांचि कृष्णचिंतन । पूर्ववत जाहला ब्रह्मनंदन । बाहेर आला स्नान करून । मग तप दारुण आचरला ॥ ४९ ॥ यम नियम प्राणायाम करून । पावला स्वरूपीं समाधान । ज्ञानाग्नि धडधडीत पूर्ण । दोषतृण दग्ध जाहलें ॥ ५० ॥ जैसा पर्वत संदीप्त होय । मग मृग-पक्षी न धरिती आश्रय । तैसाचि ब्रह्मविद पाहें । निःसंदेह ब्रह्मपुत्र ॥ ५१ ॥ जैसे स्वप्नींचे दोष अपार । जागा होता होती संहार । तैसा तो नारद ज्ञानसागर । कैंचा विकार उरेल पैं ॥ ५२ ॥ कैंचा कलंक रविमंडळीं । पाप नुरेचि जान्हवीजळीं । सदा पवित्र ज्वाळामाळी । त्यासी ओवळें कोण म्हणेल ॥ ५३ ॥ धुळीनें कदा न मळे अंबर । कीं सर्वत्र फिरतां निर्मळ समीर । कीं ढेंकुळ पडतां सागर । न डहुळेचि कदापि ॥ ५४ ॥ नारद तोचि श्रीकृष्ण । दोघांसी नाहीं भेदभान । सावध करावया जन । कौतुक पूर्ण दाविलें ॥ ५५ ॥ आता ऐका सावधान । द्वारकेसी काय जाहलें वर्तमान । रुक्मिणीचा बंधु रुक्मिया जाण । भोजकटनगरी वसे पैं ॥ ५६ ॥ त्याची कन्या परम सुकुमार । लावण्यवल्ली नामें चतुर । ते प्रद्युम्नासी दिधली सुंदर । यथाविधीकरूनियां ॥ ५७ ॥ श्रीकृष्ण बळिराम रुक्मिणी । छप्पन्न कोटी यादवश्रेणी । रुक्मियानें नगरासी नेऊनी । सोहळा केला अपार ॥ ५८ ॥ भगिनीपुत्र प्रद्युम्न । त्याहीवरी तो साक्षात मदन । जामात सुंदर देखोन । अपार आंदणे दीधलीं ॥ ५९ ॥ वोहरें सांगती घेऊनी । द्वारकेसी आले चक्रपाणी । जो आदिपुरुषी कैवल्यदानी । वेदपुराणीं वंद्य जो ॥ ६० ॥ पुढे रुक्मियाचा पुत्र । रुक्मध्वज नामे शूर । त्याची कन्या पद्माक्षी चतुर । अनिरुद्धासी दीधली ॥ ६१ ॥ सकळ यादव आणि दळभार । श्रीकृष्ण प्रद्युम्न आणि रोहिणीकुमार । रुक्मिणी रेवती उखा समग्र । लग्नालागीं आणिल्या ॥ ६२ ॥ आणि देशोदेशींचे नृपवर भले । रुक्मियाने लग्नासी आणिले । यथाविधि लग्न लाविलें । द्रव्य वेंचिलें अपार ॥ ६३ ॥ वस्त्रें मंडप शोभिवंत । ठायीं ठायीं रजतस्तंभ विराजित । ते सभेसी राजे समस्त । कौतुकार्थ बैसले ॥ ६४ ॥ बळिराम आणि यादव बैसले । तों रुक्मिया तेव्हां काय बोले । या जी द्यूत खेळों वहिलें । अवश्य म्हणे कृणाग्रज ॥ ६५ ॥ रुक्मिया आणि बळिराम खेळती । भोंवते नृप पाहती । रुक्मिया म्हणे पण करा निश्चिती । तरीच रंग खेळाचा ॥ ६६ ॥ प्रथम केला सहस्राचा पण । अवश्य म्हणे संकर्षण । पहिला डाव भीमकनंदन । जिंकिला जाहला तेधवा ॥ ६७ ॥ सहस्र द्रव्य ते वेळां । बळिराम देता जाहला । मग लक्षाचा पण घातला । तो डाव जिंकिला बळिभद्रें ॥ ६८ ॥ तों रुक्मिया असत्य स्वार्थ बोले । म्हणे ये वेळें म्या जिंकिले । तों रेवतीवर म्हणे आगळें । असत्य न बोलें कपटिया ॥ ६९ ॥ रुक्मिया म्हणे तूंचि असत्य । म्यां डाव जिंकिला यथार्थ । परम क्षोभला रोहिणीसुत । मग पुसे समस्त रायांसी ॥ ७० ॥ तेही रुक्मिया ऐसें बोलत । असत्य साक्ष देती समस्त । म्हणती रुक्मियाने जिंकिलें यथार्थ । आम्ही भोंवते पाहतसों ॥ ७१ ॥ रुक्मिया म्हणे असत्य बोलतां । तुमचा जन्म गेला तत्त्वतां । तुम्ही गोकुळी गुरें राखितां । असत्य तेथें शिकलेती ॥ ७२ ॥ तुम्ही दोघे असत्याचें घरे । परम कपटी चोर जार । कपटेंचि घेतलें मथुरानगर । कंसासुर वधूनियां ॥ ७३ ॥ मग कालयवनभेणें देखा । समुद्रांत रचिली द्वारका । कपटेंकरूनि भीमककन्यका । चोरूनि नेली तस्कर हो ॥ ७४ ॥ तैसें तुम्ही पाहतां येथें । परी मी शिक्षा लावीन तुम्हांतें । द्वारका उचलूनि स्वहस्ते । समुद्रामाजी टाकीन ॥ ७५ ॥ म्यां जिंकिला आतां डाव । साक्ष देती अवघे राव । तों देववाणी अंबरीं अपूर्व । एकाएकीं गर्जली ॥ ७६ ॥ म्हणे बळिरामे जिंकिला यथार्थ । समस्त राजे पाहती चकित । तव क्रोधावला रेवतीकांत । परी आयुध जवळी दिसेना ॥ ७७ ॥ रुक्मिया घेऊनि खड्ग वोडण । उभा ठाकला सरसावून । बळिरामे मंडपाचा स्तंभ भवंडून । तत्काळ हाती सरसाविला ॥ ७८ ॥ बळें भवंडूनि ते वेळां । रुक्मियाचे मस्तकीं घातला । शतचूर्ण मस्तक जाहला । प्राणासी मुकला तत्काळ ॥ ७९ ॥ जाहला एकचि हाहाकार । राजे पळों पाहती सत्वर । बळिरामें त्यांचे मुखीं मुष्टिप्रहार । बळेंकरूनि दीधले ॥ ८० ॥ समस्तांचे पाडिले दांत । भडभडां अशुद्ध वाहत । तैसेचि नृप पळाले समस्त । महा अनर्थ देखोनियां ॥ ८१ ॥ निजमंडपी होता रुक्मिणीवर । जो त्रिभुवनचाळक सूत्रधार । तेथें धांवोनि आला सत्वर । तो रुक्मियाचें प्रेत देखिलें ॥ ८२ ॥ मग अग्नींत शरीर घातलें । त्याच्या पुत्रावरी छत्र धरिलें । वोहरें घेऊनि ते वेळें । द्वारकेसी आले राम-कृष्ण ॥ ८३ ॥ यावरी जांबुवंतीचा कुमर । सांब नामे परम विर । महायोद्धाअनिवार । तेणें विचित्र एक केलें ॥ ८४ ॥ दुर्योधन हस्तिनापुरीं । त्याची कन्या रूपवती सुंदरी । तिचे स्वयंवर होतें ते अवसरीं । राजे समस्त मिळाले ॥ ८५ ॥ दिव्य सभा परिकर । तेथें बैसले समस्त नृपवर । रथारूढ होऊनि कृष्णकुमर । सांब तेथें पातला ॥ ८६ ॥ तोही बैसला सभेभीतरीं । तंव शृंगारूनि आणिली नोवरी । दुर्योधन म्हणे कुमारी । पाहें राजे निर्धारीं हे ॥ ८७ ॥ यांमाजी आवडेल जो सुंदर । त्यासीच माळ घाली सत्वर । ती राजे विलोकीत समग्र । स्थिर स्थिर जातसे ॥ ८८ ॥ त्यातूनि सांब तत्काळ । म्हणे कोणासी न कळे घालील माळ । सत्वर धांवला तो चपळ । उतावीळ होऊनियां ॥ ८९ ॥ तत्काळ नोवरी उचलली । निमिषार्धें रथावरी घातली । द्वारकापंथे ते वेळीं । पवनवेगें जातसे ॥ ९० ॥ जंबुकांचे सभेमधून । भाग आपुला नेत पंचानन । कीं सुधारसघट घेऊन । जात सुवर्ण अकस्मात ॥ ९१ ॥ जाहला एकचि हाहाकार । आत्मदळेसीं धांवती नृपवर । शतबंधूंशी दुर्योधन सत्वर। पाठिलागा धाविन्नला ॥ ९२ ॥ कौरव म्हणती हा एवढा धीट । ऐसा वंश त्याचा तिखट । चोर जार परम नष्ट । असत्य कपट सर्ववेषें ॥ ९३ ॥ तो अवघे राजे धांवती । सांब आटोपिला समस्तीं । ऐसें जाणोनि त्वरितगतीं । रथ मुरडिला कृष्णसुतें ॥ ९४ ॥ क्षण नलगता धनुष्य चढविले । असंभाव्य बाण सोडिले । प्रेतांचे पर्वत पाडिले । नवल केले तेधवा ॥ ९५ ॥ धन्य धन्य राजे म्हणत । बहुतांशी एकला झुंजत । मग मुख्य मिळाले समस्त । अस्त्रें घालिती चहूंकडोनि ॥ ९६ ॥ अंगीं रुतले बहुत शर । तेव्हां विकळ जाहला कृष्णकुमर । मग पाश घालूनि सत्वर । दुर्योधनें धरियेला ॥ ९७ ॥ हस्तिनापुरासी आणूनी । बंदी घातला ते क्षणीं । आपुलिया स्वस्थळालागूनी । राजे गेले तेधवां ॥ ९८ ॥ कन्या तैसीच ठेवी घरीं । तो नारद गेला द्वारकापुरीं । हरिसी म्हणे ते अवसरीं । सांब पुत्र कोठें तुझा ॥ ९९ ॥ तो श्रीरंग म्हणे ते वेळे । कोठें गेला आहे तें न कळे । नारद म्हणे बंदिशाळे । दुर्योधनें रक्षिला ॥ १०० ॥ सांगितला समस्त समाचार । परम कोपला यादवेंद्र । वेगें सिद्ध केला दळभार । वाद्यांचे गजर लागले ॥ १ ॥ तों पुढें कर जोडूनि प्रद्युम्न । विनवी श्रीकृष्णालागून । काय मशक दुर्योधन । त्यावरी आपण नव जावें ॥ २ ॥ जंबुकावरी पंचानन । कीं अळिकेवरी सुपर्ण । खद्योतावरी चंडकिरण । युद्धा संपूर्ण निघाले ॥ ३ ॥ मी आतां जातो जी त्वरें । घेऊनि येईन दोघे वोहरें । समस्त कौरवांची शिरें । बंधूच्या कैवारें छेदीन ॥ ४ ॥ ऐसें बोलता मीनकेतन । तों जवळी आला संकर्षण । म्हणे कायसा पाठवितां प्रद्युम्न । मी जाऊन आणितों ॥ ५ ॥ कौरव-पांडव आप्तवर्ग । त्यांशी न करावा युद्धप्रसंग । मग काय बोले रमारंग । भोगींद्रासी तेधवां ॥ ६ ॥ जरी ते तुमचें न मानिती वचन । तरी आम्हीं यावें कीं धांवोन । हांसोनि बोले रेवतीरमण । ऐसें जाण नव्हेचि ॥ ७ ॥ माझें वचन न मानिती पामर । तरी पालथें घालीन हस्तिनापुर । मग रथारूढ झाला शेषावतार । उद्धव-अक्रूरांसहित पै ॥ ८ ॥ मग गजपुरासमीप येउनी । बळिराम राहिला उपवनी । दुर्योधनासी धाडिलें सांगोनी । आम्हांसी भेटोनि जाइंजे ॥ ९ ॥ मग समस्त बंधु घेऊन । बाहेर आला दुर्योधन । बळिराम भेटला उठोन । सन्मान देऊन बैसविला ॥ ११० ॥ म्हणे नेणतपणें आमुचा कुमर । पाहों आला येथे स्वयंवर । कन्या घेऊनि गेला सत्वर । परी तुम्हीं विचार नाही केला ॥ ११ ॥ समस्त मिळोनि बाळ धरिला । आकर्षोनि बंदीं घातला । हें ऐकोनि बहुत कोपला । रुक्मिणीवर तुम्हांवरी ॥ १२ ॥ दळभार सिद्ध करून । पाठवित होता तुम्हांवरी मदन । मग आम्ही तयातें वारून । दर्शना आलों तूमच्या ॥ १३ ॥ तंव दुर्योधन क्रोधावला बहुत । तुम्ही बहुत झालेत रे उन्मत्त । आमुच्या धर्में द्वारकेआंत । नांदतां सुखें तें नेणां ॥ १४ ॥ बळेंकरूनि न्यावी नोवरी । हा कुळधर्म तुमचे घरीं । आम्हांसी दाविता ते परी । द्वारकापुरी राहूं नेदूं ॥ १५ ॥ तुमचा कृष्ण आणि प्रद्युम्न । येऊं द्या युद्धालागून । एक्याचि बाणेंकरून । करीन कंदन समस्तांसी ॥ १६ ॥ ऐसें बोलोनि दुर्योधन । बंधूंसहित गेला उठोन । म्हणे दळभार सिद्ध करून । द्वारकापट्टण घेऊं आतां ॥ १७ ॥ येरीकडे शेषावतार । निजबळें फिरवी नांगर । हस्तिनापुरासी सत्वर । मध्यभागीं रोंविला ॥ १८ ॥ हालवितां निजबळें । सकळ नगर डळमळिलें । सदनें खचती ते वेळे । लोक पळती बाहेर ॥ १९ ॥ बाळें घेऊनि कडियेवरी । नगराबाहेर धांवती नारी । म्हणती रसातळा जाते धरित्री । कल्पांतकाळ ओढवला ॥ १२० ॥ मग भीष्म आणि द्रोण । दुर्योधन धरी त्यांचे चरण । म्हणे कोपला रेवतीरमण । तो आता शांत करा जी ॥ २१ ॥ गंगात्मज बोले उत्तर । व्यर्थ धरिला त्याचा कुमर । कैचा शांत होईल भोगींद्र । अनिवार क्रोध तयाचा ॥ २२ ॥ मग भीष्म द्रोण विदुर । दुर्योधनादिक कौरव समग्र । नगराबाहेर आले सत्वर । करिती नमस्कार रामातें ॥ २३ ॥ दुर्योधन लागे चरणीं । क्षमा करावी ये क्षणीं । राम म्हणे समुद्रीं नेऊनी । नगर पालथें घालीन ॥ २४ ॥ तों कौरव म्हणती तुमचा नंदन । तोही आंत पावेल मरण । मग बोले वसुदेवनंदन । रेवतीरमण तेधवां ॥ २५ ॥ आमुचा कुमर पावता मरण । तरी समुद्रचि देईल आणून । कृष्णें गुरुपुत्र देऊन । सांदीपन तोषविला ॥ २६ ॥ गोकुळीं असतां जगज्जीवन । नंद यमुनेसी करी स्नान । घेउनि गेला जळीं वरुण । कृष्णे माघारा आणिला ॥ २७ ॥ नंद शक्तिवनीं सर्पें गिळील । तो हरीने तत्काळ सोडविला । द्वादश गांवे अग्नि गिळिला । गौळी सकळ रक्षिले ॥ २८ ॥ अघासुर मुख पसरून । म्हणे गोकुळ अवघेचि गिळीन । तो कृष्णें उभा चिरोन । गोपाळ अवघे रक्षिले ॥ २९ ॥ कालियाविषोदककल्लोळें । नव लक्ष गोपाळ मृत्यु पावले । कृपाकटाक्षें हरीनें उठविले । मग दवडिलें कालियातें ॥ १३० ॥ सातवें वर्षीं गोवर्धन । आंगोळिये धरी सप्त दिन । त्यासी आणावया नंदन । उशीर काय लागेल पां ॥ ३१ ॥ निकर देखोनि बहुत । चरणीं लागे गंगासुत । म्हणे अन्याय जाहला तो समस्त । घालीं पोटांत ते वेळे ॥ ३२ ॥
मग संतोषोनि बळिभद्र । तत्काळ उपटिला नांगर ।
तंव बंदीचा सोडून कुमर । विवाह केला यथाविधि ॥ ३३ ॥ वोहरें घेऊनि सांगातें । बळिराम आला द्वारकेतें । वर्तमान सांगितलें हरीतें । उद्धव-अक्रूरें तेधवां ॥ ३४ ॥ यावरी धर्मराज इंद्रप्रस्थीं असतां । अपूर्व वर्तली एक कथा । द्रौपदीस पांच पति तत्त्वतां । पूर्वी निर्मिले श्रीव्यासें ॥ ३५ ॥ ते कथा सांगता समस्त । तरी वर्णावें लागेल भारत । पसरेल असंभाव्य ग्रंथ । यालागी ध्वनितार्थ बोलिलों ॥ ३६ ॥ असो दौपदी वरिली पांचां जणी । नारदें दिवस दिधले वाटूनी । दोन मास बारा दिन सदनीं । एकएकाच्या वर्तत ॥ ३७ ॥ एकाचे होतां पूर्ण दिन । मग अग्निमाजी करी स्नान । दिव्य शुचिर्भूत होऊन । मग जाय दुजियाकडे ॥ ३८ ॥ जे कां येती धर्माचे दिन । त्यांत चौघां मातेसमान । असो एकदा द्विज आला धांवोन । अर्जुनाजवळी सांगावया ॥ ३९ ॥ म्हणे माझ्या गाई वळूनी । आतां नेल्या दैत्यांनीं । कोण कोण सोडवील तुजवांचूनी । पंडुनंदना सांग पां ॥ १४० ॥ गो-ब्राह्मण-प्रतिपाळका । धांवे धांवे रणपंडिता । तों आवेश न धरवे कुंतीसुता । सेवकां शस्त्रें मागतसे ॥ ४१ ॥ सेवक म्हणती पार्थाप्रती । धर्मद्रौपदी आहेत एकांतीं । संकट पडलें निश्चिती । पार्थवीरास तेधवां ॥ ४२ ॥ मनामाजी विचारीत अर्जुन । दैत्य करितील गोहनन । आपण जाऊनि धनुष्यबाण । सदनांतून आणावे ॥ ४३ ॥ पार्थ प्रवेशला सदनीं । तीं गुंतलीं संभोग्यव्यसनीं । तों दचकली याज्ञसेनी । लज्जित मनीं जाहली ॥ ४४ ॥ शस्त्र घेऊनि गेला पार्थवीर । रथारूढ धांवे प्रतापशूर । दैत्य संहारूनि समग्र । गाई सोडविल्या द्विजाच्या ॥ ४५ ॥ परतोनि आला कुंतीसुत । पंडितांसी सांगे वृत्तांत । स्त्रीपुरुषांचा एकांत । देखता दोष काय असे ॥ ४६ ॥ तंव ते विचारूनि सांगती । बाळहत्या घडली त्याप्रती । त्यासी प्रायश्चित्त निश्चिती । तीर्थक्षिती हिंडावी ॥ ४७ ॥ घेऊनि धर्माची आज्ञा । पार्थ चालिला तीर्थाटणा । तापसी होऊनियां जाणा । पार्थवीर हिंडतसे ॥ ४८ ॥ वनें तपोवनें शैले सरिता । महानद्या जान्हवी आदि समस्ता । शिवविष्णुक्षेत्रें पाहतां । तन्मय होय अर्जुन ॥ ४९ ॥ केदार हरिद्वार बदरी । द्वादश ज्योतिर्लिंगें पृथ्वीवरी । तितुकी पार्थ अनुक्रमें करी । स्नानें दानें विधियुक्त ॥ १५० ॥ काम्यकवनी प्रवेशला पार्थ । तों शिवाचें अनुष्ठानस्थल तेथ । शिव नसता कुंतीसुत । जावोनि बैसे ते ठायीं ॥ ५१ ॥ अर्जुन बैसला ध्यानस्थ । तों उमाधव पातला तेथ । तापसिया देखोनि म्हणत । तूं कोण येथें बैसलासी ॥ ५२ ॥ मग बोले अर्जुन । तुज बोलावया काय कारण । शिव म्हणे माझें हें स्थान । तूं कोण येथें बैसावया ॥ ५३ ॥ अर्जुन म्हणे ते वेळां । काय ठाव तुझा आंखिला । ऐकता विषकंठ क्षोभला । म्हणे तुजलागीं मारीन ॥ ५४ ॥ अर्जुने गांडीव चढविलें । निर्वाण बाण वरी योजिले । शिवें पिनाक सांभाळिलें । युद्ध मांडिलें निर्वाण ॥ ५५ ॥ शिवे अग्निअस्त्र टाकिलें । पार्थें पर्जन्यास्त्र सोडिलें । शिवे शक्तिअस्त्र प्रेरिलें । पार्थ कार्तवीर्यास सोडी ॥ ५६ ॥ असो अस्त्रें होतीं बहुतें । तितुकीं घातलीं हिमनगजामातें । अवघीं निवारिलीं पार्थें । निजसामर्थ्यें करूनियां ॥ ५७ ॥ मग संतोषला अपर्णावर । म्हणे धन्य धन्य तू महावीर । प्रसन्न जाहलों मागें वर । नाम खूण सांग तुझें ॥ ५८ ॥ येरू म्हणे मी पंडुनंदन । श्रीकृष्णदास नाम अर्जुन । मग शिवें कवच किरीट कुंडलें जाण । प्रसाद दीधला अर्जुना ॥ ५९ ॥ मग शिवासी करूनि नमस्कार । पुढें तीर्थें पाहे पंडुकुमर । तव आला जेथें रामेश्वर । दक्षिणसमुद्रतीराकडे ॥ १६० ॥ करूनिया स्नान-दान । घेतलें रामेश्वराचें दर्शन । तों तेथें अंजनीनंदन । महावीर देखिला ॥ ६१ ॥ पुढे सेतु पाहिला अद्भुत । शत योजनें लंकेपर्यंत । हनुमंतासी पुसे पार्थ । कोणीं सेतु बांधिला ॥ ६२ ॥ मारुति सांगे पूर्ववर्तमान । या मार्गें गेला रघुनंदन । तो प्रतापी रविकुळभूषण । तेणें सेतु बांधिला ॥ ६३ ॥ हांसोनि बोले वीर पार्थ । अहो जी रामाचें एवढें सामर्थ्य । निजबाणें कां न बांधिला सेत । शिळा किंनिमित्त घातल्या ॥ ६४ ॥ हनुमंत म्हणे बाणांचा सेत । भंगेल हें जाणोनि रघुनाथ । एकएक वानर जैसा पर्वत । कैसा सेतु तगेल ॥ ६५ ॥ पार्थ म्हणे मजऐसा असता । तरी शरांचा सेतु बांधिता । तो क्रोध आला हनुमंता । बांधी तत्त्वतां सेतु आतां ॥ ६६ ॥ मी जरी एकला चढेन । तरी तुझ्या शरांचा सेतु मोडीन । पार्थ थोडासा सेतुबंधन । करिता जाहला तेधवां ॥ ६७ ॥ प्रचीत पाहावया पूर्ण । सेतु बांधिला एक योजन । म्हणे उडी घालीं बळेकरून । कैसा मोडोनि पडे पाहूं ॥ ६८ ॥ अर्जुन म्हणे हेचि शपथ । जरी मोडोनि पडेल सेत । तरी मी अग्निकाष्ठें भक्षीन सत्य । तूंही निश्चित बोल पां ॥ ६९ ॥ हनुमंत म्हणे मज तों नाहीं मरण । जरी सेतु न मोडे माझेन । तरी मी तुझे ध्वजीं बैसेन । तुजआधीन होऊनिया ॥ १७० ॥ मग पार्थें धनुष्य चढवूनि । बाण सोडिला अभिमंत्रूनि । अभंग सेतु केला ते क्षणीं । म्हणे मोडूनि टाकीं आतां ॥ ७१ ॥ हनुमंत उडोनि गगना गेला । सेतुवरी येऊनि पडियेला । सेतु मोडूनि चूर्ण केला । मारुति गर्जला भुभुःकारें ॥ ७२ ॥ मोडिला सेतु देखोनी । पार्थे धनुष्य ठेविलें धरणीं । बहुत काष्ठें मेळवूनी । ढीग केला असंभाव्य ॥ ७३ ॥ जातवेद चेतविला तत्काळ । आकाशपंथे जाती ज्वाळ । पार्थें स्नान करूनि सकळ । नेम आपुला सारिला ॥ ७४ ॥ करूनि अग्नीसी प्रदक्षिणा । हृदयीं आठविले कृष्णध्याना । किरीटकुंडलमंडितवदना । पीतवसना चतुर्भुजा ॥ ७५ ॥ म्हणे श्रीकृष्णा द्वारकाधीशा । हे मधुकैटभारे जगन्निवासा । हे माधवा क्षीराब्धिवासा । शेषशायी मुरहरा ॥ ७६ ॥ हे रुक्मिणीवल्लभा जनार्दना । हे कंसारे नरकमर्दना । हे मधुसूदना सुखवर्धना । मन्मथजनका श्रीरंगा ॥ ७७ ॥ हे भक्तवत्सला यादवेंद्रा । हे केशवा दुरितकाननवैश्वानरा । हे दानवारे समरधीरा । इंदिरावरा श्रीहरे ॥ ७८ ॥ हे माधवा नवपंकजपत्राक्षा । अनंगदहनहृदयसाक्षा । वेदवंद्या कर्माध्यक्षा । कोणा परीक्षा नव्हे तुझी ॥ ७९ ॥ तोम् द्वारकेसी जगन्नाथ । कळलें संकटीं पडिला पार्थ । भक्तकैवारी रमाकांत । आला धांवत सेतुबंधी ॥ १८० ॥ द्विजवेष धरिला सर्वेशें । हनुमंतालागी साक्षेपें पुसे । हा कोण अग्निप्रवेश करीतसे । वर्तमान कैसें सांगा हें ॥ ८१ ॥ हनुमंते सांगितलें वर्तमान । याउपरीं बोले ब्राह्मण । या गोष्टीसी साक्ष कोण । मजलागून सांगा तें ॥ ८२ ॥ मारुति म्हणे साक्ष नाहीं । द्विज म्हणे असत्य सर्वही । साक्ष नसतां व्यर्थ पाहीं । वेदवचन ऐसें बोले ॥ ८३ ॥ तरी मजदेखता रचा सेतु । वरी उडी घालीं अकस्मातु । मग पार्थाहातीं त्वरितु । मागुता सेतु रचविला ॥ ८४ ॥ गुप्तरूपें जगज्जीवन । खालीं घाली सुदर्शन । मग ऊर्ध्व उडे अंजनीनंदन । निराळपंथे तेधवां ॥ ८५ ॥ उडी घातली अकस्मात । परी तैसाचि अभंग असे सेत । वरी आदळोनि हनुमंत । एकीकडे पडियेला ॥ ८६ ॥ जैसा शिळेवरी गोटा पडे । तो उसळोनि जाय एकीकडे । पार्थ निरखूनि पाहे ब्राह्मणाकडे । तों द्वारकाधीश ओळखिला ॥ ८७ ॥ ब्राह्मण म्हणे वायुसुता । याचे ध्वजस्तंभीं बैसे आतां । तेव्हां आपुलें स्वरूप तत्त्वतां । प्रकट केलें गोविंदें ॥ ८८ ॥ अर्जुनासी धरूनि वनमाळी । मारुतीचे हातीं देत ते वेळीं । म्हणे यासी तू सांभाळी । कृपा करूनि सर्वदा ॥ ८९ ॥ जाहला पृथ्वीसी दैत्यभार । तुम्ही आम्ही पार्थवीर । करूं दुष्टांचा संहार । अकर्मकार सर्वही ॥ १९० ॥ रामावतारीं तुवां सेवा करून । मजवरी केला उपकार पूर्ण । आता सांभाळीं अर्जुन । ध्वजीं बैसोनि पाठी राखीं ॥ ९१ ॥ तुज जिंकी ऐसा कोणी । वीर नसे या त्रिभुवनीं । हनुमंत लागला हरिचरणीं । म्हणे आज्ञा प्रमाण तुझी हे ॥ ९२ ॥ गुप्त जाहला भगवान । आला द्वारकावतीलागून । हनुमंताची आज्ञा घेऊन । चालिला अर्जुन तेथोनिया ॥ ९३ ॥ तो सुभद्रा श्रीकृष्णाची भगिनी । देऊं केली होती अर्जुनालागुनी । पार्थ तीर्थें करावया मेदिनीं । बहुत दिवस गेला असे ॥ ९४ ॥ त्यावरी बळिभद्रे केली विचारणा । कीं सुभद्रा द्यावी दुर्योधना । परी तें न ये श्रीरंगाच्या मना । अंतरी वासना पार्थाकडे ॥ ९५ ॥ बळिभद्रें निश्चय केला सत्य । जों आला नाहीं वीर पार्थ । तों दुर्योधनासि द्यावी त्वरित । निश्चयार्थ पूर्ण केला ॥ ९६ ॥ इच्छित श्रीकृष्णाचें मन । ऐशा समयीं यावा अर्जुन । तो वैकुंठनाथ ब्रह्मसनातन । इच्छामात्रें सर्व करी ॥ ९७ ॥ तों तीर्थें करीत पार्थे । द्वारावतीसी आला अकस्मात । महातापसी वल्कलें वेष्टित । नोळखे निश्चित कोणीही ॥ ९८ ॥ श्रीकृष्णासी हेर सांगत । नगराबाहेरी एक महंत । महातपोधन प्रतापवंत । तीर्थें करीत पातला ॥ ९९ ॥ ऐसें ऐकतां जगज्जीवन । घेऊं महंताचे दर्शन । द्वारकेबाहेर येऊन । भेटता जाहला तापसियासी ॥ २०० ॥ अंतरी कळली खूण । आला प्राणसखा अर्जुन । बाहेर पुसे तुम्ही कोण । कोणे आश्रमीं राहतां ॥ १ ॥ पार्थ म्हणे आम्ही ब्रह्मचारी । स्वइच्छें क्रीडतों धरणीवरी । हरी म्हणे आमुचे नगरीं । चार मास क्रमिजें पैं ॥ २ ॥ तापसी राहिला चारी मास । श्रीकृष्ण आले मंदिरास । सांगे वसुदेव-देवकी-बळिरामांस । महातापसी आला असे ॥ ३ ॥ बळिराम आणि यादववीर । तापसिया भेटले समग्र । परी हा भगिनीचा पुत्र । न जाणे कोणीही ॥ ४ ॥ प्रार्थूनियां देवकीनाथें । गृहासी आणिले महंतातें । सर्वही भजती भावार्थें । नवल तेथें वर्तलें ॥ ५ ॥ रैवतकपर्वती महाशक्ती । तिचे यात्रे यादव जाती । संकर्षण आणि रमापती । निघती उग्रसेन वसुदेव ॥ ६ ॥ शृंगारिला चतुरंग दळभार । बळिये यादव संपत्तिसागर । वाद्ये वाजति अपार । सनया सुस्वर वाजती ॥ ७ ॥ देवकी मुख्य यादववनिता । चातुर्यराशी सौभाग्यसरिता । शृंगारनभींच्या विद्युल्लता । दिव्ययानारूढ जाती ॥ ८ ॥ त्यांमाजी श्रीरंगभगिनी । सुभद्रा देखिली लावण्यखाणी । देवांगना पद्मिनी नागिणी । स्वरूपावरूनि ओंवाळिजे ॥ ९ ॥ दमयंती सुलोचना पंचशरदारा । मयकन्या रूपवती तारा । जिच्या विलोकितां मुखचंद्रा । लाजोनि जाती तत्काळ ॥ २१० ॥ ब्रह्मांडमंडप शोधितां । सुंदर नाहीं कृष्णापरता । त्याची भगिनी वसुदेवदुहिता । तिचें स्वरूप अद्भुत ॥ ११ ॥ सघन नक्षत्रें नभमंडळी । तैसी मस्तकीं मुक्ताजाळी । बिजवरा मिरवे भाळीं । आकर्णनेत्री सुभद्रा ॥ १२ ॥ कवि-गुरुतेजांसी उणें आणी । तेवीं मुक्तें डोलती कर्णीं । उघडी आदित्यखाणी । तैशी दशनी प्रभा फांके ॥ १३ ॥ नेत्रीं सोगयाचे अंजन । नाचे शफरीध्वज देखोन । चपळेहूनि झळके वदन । पायीं पैंजण नेपुरें ॥ १४ ॥ असो ऐसा चालिला दळभार । यादवललना चालिल्या सुंदर । सुवर्णशिबिकेंत सुकुमार । आरूढ होऊनि जातसे ॥ १५ ॥ तो उभयतां पार्थ कृष्ण एके रथीं । चमूमाजी मिरवत जाती । जेवीं पुरंदर आणि वाचस्पती । एकासनीं बैसलें ॥ १६ ॥ सुवर्णयानीं सुभद्रारत्न । कपिध्वज लक्षीत दुरून । मजसिजेंचि व्यापिले मन । वेधले नयन तिकडेचि ॥ १७ ॥ देखोनियां हास्यवदन । मन्मथजनक बोले वचन । अजा तटस्थ काद्रवेय देखोन । तैसे पाहतां कोणीकडे ॥ १८ ॥ ब्रह्मचारी तुम्ही महंत । भलतेकडे गुंतलें चित्त । मग म्हणे वीर पार्थ । स्थिर होय ऐसें करीं ॥ १९ ॥ राजकोशींची रत्नें तत्त्वतां । तीं केवीं येती दुर्बळाच्या हाता । यावरी कमलोद्भवपिता । कर्णीं सांगे पार्थाच्या ॥ २२० ॥ यात्रेहूनि परततां जाण । माझिया दिव्य स्यंदनी बैसोन । हरूनियां सुभद्रारत्न । पवनाहून जाय त्वरें ॥ २१ ॥ किरीटी डोलवी मान । यावरी रैवताचळा जाऊन । शक्ती पूजोनि वनभोजन । लहानथोरीं संपादिलें ॥ २२ ॥ समय पाहोनि क्षीराब्धिजानाथ । धनंजयासी दावी भ्रूसंकेत । तों सुभद्रेचेंही चित्त । पार्थस्वरूपीं वेधलें ॥ २३ ॥ सुभद्रा भावी मनाम्त । पार्थाऐसा दिसतो महंत । अर्जुनें नोवरी अकस्मात । स्यंदनावरी घातली ॥ २४ ॥ त्रुटी न वाजतां अर्जुन । जात सुरेशप्रस्थमार्ग लक्षून । अश्व जाती मनोवेगेंकरून । शैब्य-सुग्रीवादि चारी ॥ २५ ॥ मागें हाक जाहली एकसरसी । सुभद्रा घेऊनि गेला तापसी । पुढें प्रळयजळराशी । तैसे यादव धांवले ॥ २६ ॥ प्रद्युम्न-सांबादिक कृष्णकुमर । म्हणती धरा धरा पळतो तस्कर । देखोनि यादवांचा भार । मुरडिला रहंवर अर्जुनें ॥ २७ ॥ पार्थें आपुलें स्वरूप प्रकटिलें । जें वस्त्रभरणीं मिरविलें । सीतासंतापहरण ते वेळे । ध्वजीं येऊनि बैसला ॥ २८ ॥ गांडीवचाप टणत्कारोन । सोडिले बाणापाठीं बाण । जैसा धारा वर्षे घन । गेले भुलोन यादवा ॥ २९ ॥ दारुण अर्जुनाचा मार । कोणी उभे न राहती समोर । रेवतीवल्लभासी समाचार । श्रुत जाहला सर्वही ॥ २३० ॥ तापसी नव्हे श्वेतवाहन । समोर नाटोपे कोणालागून । रणपंडित सुजाण । यादवसैन्य मोडिलें ॥ ३१ ॥ परम कोपला बळीभद्र । सांवरी मुसळ नांगर । मनांत हांसे श्रीधर । यासी तो वीर नाटोपे ॥ ३२ ॥ परम कोपला रेवतीरमण । म्हणे निष्पांडवी पृथ्वी करीन । शक्रप्रस्थासी उचलून । पालथें घालीन सागरीं ॥ ३३ ॥ वीर क्रोधावले समस्त । परी निवांतरूप पाहे अच्युत । मग हलधर बोलत । काय मनांत योजीतसां ॥ ३४ ॥ हरि म्हणे पूर्वीचा संकल्प होता । कीं सुभद्रा द्यावी वीर पार्था । संकर्षण म्हणे अच्युता । सर्वही करणें तुझेंचि हें ॥ ३५ ॥ हांसोनि बोले क्षीराब्धिजारमण । किरीटीहूनि वरिष्ठ कोण । सुभद्रेसारिखें रत्न । आणोनि द्यावें कोणासी ॥ ३६ ॥ निंदूनियां राजहंसा । मुक्ताफळें काय अर्पावी वायसा । उपेक्षूनि परीक्षक डोळसा । जन्मांधाहातीं रत्न द्यावे ॥ ३७ ॥ पंडित सत्पात्र दवडून । शतमूर्खा द्यावें अर्घ्यदान । कोंदणीं पाच शोभायमान । चिखलीं रोवून व्यर्थचि ॥ ३८ ॥ सांडूनि पार्थवीर नरेश । कोणता लक्षणयुक्त आहे पुरुष । शक्राहूनि विशेष । धैर्य वीर्य जयाचें ॥ ३९ ॥ भार्गव किंवा उमारमण । तेवीं धनुर्धरपंडित सुजाण । तेजस्वी जैसा चंडकिरण । खळदंडणीं कृतांत ॥ २४० ॥ सौंदर्य तारुण्य देखोन । खालीं पाहे मीनकेतन । सर्वविषयीं सुलक्षण । तृतीय तनय पंडूचा ॥ ४१ ॥ त्यावरी आनकदंदुभिभगिनीसुत । धीर उदार प्रतापवंत । ऐसा आप्त टाकूनि पार्थ । कोणासी देतां सुभद्रा ॥ ४२ ॥ हांसोनि बोले जनार्दन । जरी यासी भिडावें जाऊन । अनिवार तो पंडुनंदन । मजला कदा नाटोपे ॥ ४३ ॥ यादव मोडिले सकळ । मज तत्काळ धरूनि नेईल । मग तुम्हांसी संकट पडेल । सोडवावयाचें पुढतीं ॥ ४४ ॥ ऐसें ऐकतां वचन । उगा राहिला संकर्षण । वीरश्रीअनल गेला विझोन । हरिवचनमेघ वर्षतां ॥ ४५ ॥ तो वसुदेव देवकी येऊन । करिती बळिरामाचे समाधान । आम्हीं सुभद्रा दिधली पार्थालागून । यथाविधि लग्न करावें ॥ ४६ ॥ ऐसें समाधान केलें । किरीटीसी बोलावूं पाठविलें । राम वसुदेव पुढे गेलें । मिरवीत आणिलें पार्थासी ॥ ४७ ॥ यथासांग लग्न लाविलें । उग्रसेनें भांडार फोडिलें । चारी दिवस गोड जाहले । आंदण दिधलें अपार ॥ ४८ ॥ मग बोळविला श्वेतवाहन । निघे सवें सुभद्रा घेऊन । एक संवत्सर पूर्ण । पुष्करक्षेत्रीं क्रमियेला ॥ ४९ ॥ द्वादश वर्षें पूर्ण होतां । शक्रात्मज आला शक्रप्रस्था । धर्म-भीम-माद्रीसुता । ब्रह्मानंद उचंबळे ॥ २५० ॥ धर्मासी साष्टांग नमून । आदरें दिधलें आलिंगन । जैसे भरत आणि रघुनंदन । चतुर्दश वर्षीं भेटले ॥ ५१ ॥ मघवा आलिंगी अंगिरासुत । तेवीं भीमें धरिला पार्थ । कंठ जाहला सद्गदित । एकासी एक भेटती ॥ ५२ ॥ गजास्य आणि षडास्य । यांसी आलिंगी व्योमकेश । तैसा नकुळसहदेवांस । पार्थ भेटे प्रीतीनें ॥ ५३ ॥ कृष्णजनकभगिनीं । साष्टांगीं नमी पाकशासनी । सुभद्रा समस्तांचे चरणीं । मस्तक ठेवी आदरें ॥ ५४ ॥ वर्तमान सर्व सांगोन । सुभद्रेसी हातीं धरोन । पांचाळीकडे गेला अर्जुन । बोले हांसोनि तेधवा ॥ ५५ ॥ अंतरीं संतोष अद्भुत । वरी रुसोनि द्रौपदी बोलत । आतां इकडे यावयाचा कार्यार्थ । कांहीच नाही जाणिजे ॥ ५६ ॥ सद्यस्तप्त घृत सांडून । जुनयाचें काय कारण । नूतन केलें परिधान । राहिलें जीर्ण सहजचि ॥ ५७ ॥ तों कृष्णेचिये चरणीं । सुभद्रा लागे प्रेमेंकरूनी । पांचाळीनें हृदयी धरूनीं । आलिंगिली सप्रेम ॥ ५८ ॥ म्हणे माझ्या भाग्यासी नाही अंत । आम्ही कृष्णभगिनी दोघी विख्यात । आनंदला वीर पार्थ । हर्ष गगनीं न समाये ॥ ५९ ॥ ब्रह्मानंदमहाराज-दिनमणी । उदय पावला हृदयचिद्गगनी । श्रीधरसूर्यकांतवनीं । तो उन्मेषअग्नि प्रकटला ॥ २६० ॥ तेणेम् जाळिलेम् दुरितकानन । तो रुक्मिणीचित्तचालकघन । वर्षला स्वानंदजीवन । शीतळ केलेम् सर्वत्र ॥ ६१ ॥ पांडवपालका पांडुरंगा । ब्रह्मानंदा अभंगा । श्रीधरवरदायका निःसंगा । कथा रसिक चालवी पुढें ॥ ६२ ॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । चतुर परिसोत प्रेमळ पंडित । द्वात्रिंशत्तमाध्याय गोड हा ॥ २६३ ॥ ॥ बत्तिसावा अध्याय समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
नारदांच्या जीवनात, तीर्थयात्रा करीत असता एक विचित्र घटना घडली. ते गंगेत स्नान करीत होते. त्यांना पाण्यात मासा व त्याची मादी एकत्र आलेली दिसली. त्यांचे सुख पाहून त्यांच्या मनात संसाराचे विचार घोळूं लागले. पण आपल्याबरोबर संसार करण्यास कुठली स्त्री तयार होईल असा त्यांना प्रश्न पडला. मग त्यांना द्वारकेतील कृष्णाचे वैभव आठवले, त्याच्या हजारो स्त्रिया आठवया. त्यांना वाटले, कृष्णाजवळ एवढ्या स्त्रिया आहेत त्यातील एखादी जरी त्याने मला दिली तरी मी संसार करून सुखी होईन. भार्या आणि पुत्र यांशिवाय जीवन व्यर्थ !
नारदांना तोच एक ध्यास लागला. ते द्वारका नगरात आले. कृष्ण व रुक्मिणी यांनी त्यांचे स्वागत केले. नारदांच्या मनात चलबिचल होत होती. कृष्णाने विचारले- "मुनिश्रेष्ठा, आज तुमचे मन स्थिर कां नाही ?" नारद म्हणाले- "केशवा, विचार करता करता असे वाटू लागले आहे की स्त्री नसेल तर जीवनाला काहीही अर्थ नाही. तुझ्या एवढ्या स्त्रिया आहेत त्यातील एक जरी मला दिलीस तरी माझा जन्म सफल झाला असे मला वाटेल." कृष्ण म्हणाला- " असे होय ? बरे तर, काही प्रत्यवाय दिसत नाही. ज्या सदनात मी नसेन व माझी पत्नी एकटी असेल त्या सदनात जा आणि त्या पत्नीला तू स्वतःची पत्नी समजून ने." नारदांना ते मान्य झाले. ते तिथून उठून दुसर्या एका सदनात गेले तो काय ! तिथेही कृष्ण आगतस्वागत करायला सामोरा आलाच. मग ते अनेक घरांत गेले पण प्रत्येक घरात कृष्ण होता, तो काही ना काही काम करीत होता व नारद येतांच त्यांचे स्वागत करीत होता. नारदाला मोठे आश्चर्य वाटले. त्यांना भ्रम झाल्यासारखे झाले. स्त्रीचा ध्यास लागलेला ! अशा अवस्थेत ते पुन्हा गंगेवर स्नानाला गेले. गंगेत त्यानी एक बुडी मारली आणि वर आले ! तो त्यांना आपणच स्त्री झालो आहेत असे दिसून आले ! त्यांना अचंबा वाटला. फारच लज्जित होऊन ते इकडे तिकडे पाहू लागले. त्यावेळी आणखी एक चमत्कार पडला. एक सुंदर तरुण पुरुष तेथे आला आणि त्याने त्या स्त्रीरूपी नारदाशी संग केला ! नारदी त्यामुळे गरोदर झाली. पुढे नऊ महिने पूर्ण झाल्यावर नारदी प्रसूत झाली ! तिला एकंदर साठ पुत्र झाले ! पुढे त्यांच्याच नावांनी साठ संवत्सरांची गणना करण्यात येऊ लागली. नारदाना फार वाईट वाटले. स्त्रीच्या चिंतनामुळे आपण स्त्री झाली हे त्यांच्या लक्षात आले. ते पुन्हा ब्रह्मस्वरूपी चित्त एकाग्र करून बसले. दीर्घकाळ तपश्चर्या केली. मग श्रीकृष्णाच्या कृपेने ते मूळ स्थितीस प्राप्त झाले. क्षणभरच मोह पडला, चित्त तिकडेच लागले आणि मन विकारी होऊन आपण स्त्री झालो हे समजून येऊन नारदांचे चित्त तेथून पुढे नित्य नारायणरूपच होऊन राहिले. द्वारकेत आणखी एक घटना पुढे एकदा पडली. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी हा भोजकट नगरात वस्ती करून रहात होता. त्याला एक मुलगी होती. लावण्यवल्ली असे तिचे नांव होते. ती सुंदर कन्या उपवर झाली. पूर्वीची कृष्णाबरोबरची तेढ आता रुक्मीच्या मनात नव्हती. प्रद्युम्नाशी लावण्यवतीचा विवाह करण्यात आला. मोठ्या थाटाने लग्नसमारंभ झाला. रुक्मीचा पुत्र रुक्मध्वज नांवाचा होता. त्याला जी कन्या होती, तिचे नांव पदाक्षी. काही काळानंतर तिचाही विवाह प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याच्याशी करण्यात आला. अशा रीतीने रुक्मिणी, तिच्या भावाची मुलगी आणि त्याची नातही यादवकुळात लग्न होऊन आल्या. पद्माक्षीच्या विवाहानंतर रुक्मी यादवांसह सभेत बसला होता. रुक्मीने मौजेने द्यूत खेळण्याचा बेत केला. सर्वांना तो पसंत पडला. बलरामाला द्यूताची आवड होती. बलराम व रूक्मी द्यूत खेळू लागले. कित्येक वस्तु बलरामाने पणास लावल्या, पण त्या तो हरला. शेवटी त्याने एक लाख नाणी पणास लावली. प्रत्येक वेळी "मी जिंकली, मी जिंकलो" असे रुक्मी म्हणत होता, तसेच याहीवेळी तो म्हणाला, परंतु वस्तुतः बलरामाने पण जिंकला होता. बलराम संतापला. खोटे बोलण्याबद्दल तो रुक्मीला दोष देऊ लागला. पण रुक्मी तेच धरून बसला. त्याची बाजू घेऊन इतरही तसेच म्हणू लागले. बलरामाला रुक्मी हिणवून म्हणू लागला- "तुम्ही गवळी, चोरटे, गावठी लोक. तुम्ही कसले न्यायाने खेळणार ? अरे, रुक्मिणीला सुद्धा तुम्ही अशीच चोरून नेलीत ?" बलरामाची तो निंदा करू लागला. खेळाचे पर्यवसान वितुष्टात झाले. त्याचवेळी अशी आकाशवाणी झाली- "बलरामानेच पण जिंकला असून बलरामाविरुद्ध रुक्मी असत्य भाषण करीत आहे." आकाशवाणी होताच बलराम ताडकन उठला आणि रूक्मीवर धावला. रुक्मीनेही खड्ग उगारले. बलराम निःशस्त्र होता ! त्याने मंडपाचा एक खांबच बळाने उपटला. रुक्मीला खड्ग चालविता आले नाही. बलरामाने खांबानेच रुक्मीचा कपाळमोक्ष केला. त्याची बाजू घेणार्यांनाही त्याने खांबाने ठोकून काढले. मंडपात एकच गोंधळ माजला. रक्तपात पाहूनच काही बघ्ये लोक पळून गेले. तोच श्रीकृष्ण तिथे आला. रुक्मीचा वध असा झाला याचे त्याला फार वाईट वाटले. रुक्मिणीचे सांत्वन करणे कठीण होते ! कृष्णाने रुक्मीचे उत्तरकार्य यथाशास्त्र केले. बलरामाच्या क्रोधामुळे रुक्मीचे व्यर्थ प्राण गेले ! बलरामाच्या क्रोधाचा फटका आणखी एकदां बसला तो कौरवांना ! त्याचे असे झाले की जांबुवंतीचा पुत्र सांब हा मोठा बलवान व शूर होता. हस्तिनापुरात दुर्योधनाच्या कन्येचे स्वयंवर मांडले होते. सांब त्यावेळी तिकडे गेला होता. त्याने स्वयंवरातून त्या मुलीला पळविले पण दुर्योधन व इतर कौरव यांनी वेगाने त्याचा पाठलाग केला. सांबाला पकडले. हस्तिनापुरात परत आणले, आणि बंदीखान्यात टाकले. नारदांनी हा सर्व वृत्तांत द्वारकेत जाऊन कृष्णाला सांगितला. श्रीकृष्ण व प्रद्युम्न यांच्याशी चर्चा करून बलराम हस्तिनापुराकडे गेला. नगराबाहेर तळ देऊन त्याने दूताकडून दुर्योधनाला निरोप पाठविला- "मुकाट्याने सांबाची मुक्तता करा, नाहीतर माझ्याशी युद्ध करा." दुर्योधनाला त्याने भेटीसाठी बोलावले. तो आला पण बलरामाची व यादवांची निंदा करून 'सांबाला सोडणार नाही' असे म्हणून तरातरा परत गेला. बळाचा वापर केल्याशिवाय कौरव वठणीवर येणार नाहीत हे ओळखून बलरामाने आपल्या नांगराने सारे हस्तिनापुर महान् शक्तीने खेचले ! तो अद्भुत प्रकार पाहून देवही दचकले. हस्तिनापुरात मोठमोठे उत्पात होऊन घरे पडली, नागरिकांचे प्राण गेले. भीचष्म म्हणाले- "सुयोधना, तुझ्यामुळे हस्तिनापुरावर संकट आले ! तू सांबाला सोड. तुझ्या मुलींशी त्याचा विवाह होऊ दे. यादवांशी मैत्री करणेच हिताचे आहे. "भीष्मांचा सल्ला मानून दुर्योधनाने त्याप्रमाणे केले. सांब त्याचा जामात झाला. यादव व कौरव यांची सोयरीक झाली. पाचही पांडवांची द्रौपदी ही पत्नी होती. नारदांनी असा नियम घालून दिला होता की वर्षातून ठराविक दिवस द्रौपदीने एकेका पतीजवळ रहावे. त्यावेळी दुसर्या कोणाही पांडवाने तिच्या व त्याच्या एकांताचा भंग करू नये. केल्यास त्या पांडवाने बारा वर्षेपर्यंत तीर्थयात्रेला निघून जावे. एकदा मोठा भाऊ युधिष्ठिर याच्यासह द्रौपदी बोलत बसली असताना, अर्जुनाला तेथे जावे लागले. ब्राह्मणांच्या गाई दैत्य पळवून नेत होते त्या सोडवणे भाग होते. अर्जुनाची शस्त्रे ज्या ठिकाणी ठेवलेली होती तिथेच युधिष्ठिर व द्रौपदी बसली होती. अर्जुनाने शस्त्रे नेली, गाई सोडविल्या, पण नियमाप्रमाणे त्याला बारा वर्षे तीर्थयात्रेस जावे लागले. तो काम्यकवनात गेला असता प्रत्यक्ष शंकराशी त्याने युद्ध केले. त्याचे शौर्य पाहून शंकराने त्याला अस्त्रे दिली. कवच, मुकुट व कुंडले दिली आणि विजयाचा आशीर्वाद दिला. अनेक देश पहात पहात अर्जुन रामेश्वरास गेला. हनुमंताची व त्याची तेथे भेट झाली. "रामाने बाणांचा सेतू कां बांधला नाही ?" असे त्याने विचारले तेव्हा मारुती म्हणाला- "बाणांचा सेतू वानरांच्या भाराने बुडाला असता." अर्जुन म्हणाला- "मी बाणांचा सेतू बांधतो. तुम्ही त्यावर चालून दाखवा." मारुती म्हणाला- "सेतू मोडला तर काय देशील ?" अर्जुन म्हणाला- "मी स्वतःला जाळून घेईन. नाही मोडला तर ?" मारुती म्हणाला- "मी तुझ्या रथधजावर राहून तुझे कार्य करीन. " अटी मान्य झाल्या. अर्जुनाने बाणांचा पूल बांधला. मारुतीने त्यावर उडी मारली. तो ढासळला. अर्जुनाला आतां अग्निकाष्ठे भक्षण करणे भाग होते. त्याने चिता पेटविली. कृष्णाचे स्मरण केले- "प्रतिज्ञा विफल होऊ नये, माझे प्राण आता तुझ्या हाती सोपविले आहेत." कृष्णाला ते मनोमन कळले. त्याने एका ब्राह्मणाचे रूप घेतले. तो तिथे गेला. अर्जुन व मारुती यांनी विष्णू पहाताच त्याला नमस्कार केला. चिता पाहून व मोडलेला बाणांचा सेतू पाहून ब्राह्मणाने विचारले- "हे काय चालले आहे ?" तेव्हा अर्जुनाने सारे सांगितले. ब्राह्मण म्हणाला- "तुम्ही हे सर्व केले त्याला साक्षी कोण ? " अर्जुन म्हणाला- "येथे आम्ही दोघेच होतो. " ब्राह्मण म्हणाला- "या प्रतिज्ञेसाठी साक्षी असावा लागतो. आता माझ्या देखत जर पुन्हा सर्व केले तर मी मान्य करीन." मारुतीला आपण बाणसेतू मोडून टाकू अशी खात्री होती. तो कबूल झाला. अर्जुनाने पुन्हा बाणांचा सेतू बांधला. तेवढ्यात विष्णुरूप कृष्णाने आपले सुदर्शनचक्र त्या सेतूखाली आधाराला ठेवले. मारुतीने उंचावरून सेतूवर उडी मारली. पण सेतू काही मोडला नाही. मारूतीने पुन्हा भीमकाय होऊन उडी मारली, तरीही सेतू मोडला नाही. तेव्हा विष्णू म्हणाला- "पांडवा, तुला आता स्वतःला जाळून घेण्याची जरुरी नाही. मारूतिराय ! आपण मान्य केल्याप्रमाणे अर्जुनाच्या र यावर ध्वजस्तंभावर आपण विराजमान व्हावे." मग दोघांचे सख्य झाले. कृष्णाने आपले स्वरूप प्रकट केले. "हनुमंता, आमच्या दैत्यसंहाराच्या कामात तुझे सहकार्य तू दिले पाहिजे." हनुमंताने ते आनंदाने मान्य केले. पूर्वी द्वारकेत त्याला रामरूपात दर्शन देऊन कृष्णाने त्याचे समाधान केलेच होते. कृष्णाने गुप्तपणे सुदर्शन चक्र स्वस्थानी पाठविले. तो द्वारकेत परत गेला. अर्जुन त्रिदंडी संन्यास घेऊन तीर्थयात्रा करीत पुढे गेला. काही काळाने तो द्वारकेच्या प्रदेशात आला. त्यावेळी द्वारकेत कृष्णभगिनी सुभद्रा हिच्या लग्नाविषयी कृष्ण व बलराम यांचे बेत चालले होते. ती अर्जुनाला योग्य आहे असे कृष्ण म्हणत होता, तर ती दुर्योधनाला द्यावी असे बलरामाला फार वाटत होते. दुर्योधनाची मुलगी सांबपत्नी होऊन यादवांच्या कुळात आली होतीच. दुर्योधन हा गदायुद्धाच्या बाबतीत बलरामाला गुरू मानीत असे. त्यामुळे बलरामाचे मन दुर्योधनाला अनुकूल होते. त्यांचे बेत चालले असतां हेराने अशी वार्ता सांगितली की "द्वारकेजबळच एक मोठा तेजस्वी योगी आला असून लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी जात आहेत." कृष्ण द्वारकेच्या बाहेर गेला. जेथे अर्जुन संन्याशाच्या वेषात आलेला होता तेथे गेला. हा दुसरा कोणी नसून अर्जुनच आहे हे त्याने ओळखले. बाह्यतः तसे न दाखवतां त्याने त्याला मोठा मान देऊन द्वारकेत चार महिने रहायला बोलावले. त्याची रहाण्याची अगदी स्वतंत्र व्यवस्था कृष्णाने केली होती. त्याचा आदर करण्याची सूचना कृष्णाने सर्व यादवांना दिली होती, त्यामुळे सर्वजण त्याला पूज्य मानू लागले. पुढे एकदा रैवतक नांवाच्या डोंगरावर देवीची यात्रा भरली होती तेव्हा इतर मंडळींबरोबर सुमहाही यात्रेला गेली होती. अर्जुनही होता. सुभद्रेचे सौदर्य पाहून अर्जुनाचे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले. कृष्णाने सुभहेच्या मनाचीही तशीच अवस्था झालेली ओळखली. अर्जुनाला त्याने एकीकडे विचारले- ' काय हो महाराज ! आपले चित्त ईश्वराकडे आहे की एखाद्या देवीकडे ?" अर्जुन म्हणाला- ' द्वारकाधीशा ! तुम्हीच माझे चित्त एकाग्र होईल असे काहीतरी करू शकाल. राजकोषांतील मूल्यवान रत्नांची अभिलाषा आम्ही कां धरावी ?" कृष्ण म्हणाला- "तू अर्जुन आहेस ही गोष्ट मला व माझी भगिनी सुभद्रा हिला माहीत आहे. ती तुलाच द्यावी असा माझा बेत आहे पण बलराम दादांचे मत दुर्योधनाच्या बाजूला झुकते. ते हट्टी व संतापी आहेत. दुर्योधनासारख्या दुष्टाला माझी बहीण मी कशी देईन ? तू असे कर, यात्रेतून आता परत जाताना सुभद्रेला माझ्याच रथात घे व पळवून सरळ इंदप्रस्थास ने. तीर्थयात्रेचा द्वादश वर्षांचा अवधीही आता संपलाच आहे. माझ्या रथात मी धनुष्य व बाण आणि इतरही शस्त्रे ठेवलेली आहेत." अर्जुनाला आनंद झाला. यात्रेहून परत फिरताना जेव्हा कृष्णाचा रथ द्वारकेच्या महाद्वाराशी येऊ लागला तेव्हा सुभद्रा त्या रथाजवळच होती. अर्जुन झपाट्याने पुढे गेला. त्याने सुभद्रेला त्या रथात चढविले. स्वतः रथात चढला आणि त्याने बाहेरच्या बाहेर रथ भरधाव सोडला. कृष्ण त्यावेळी बलरामाबरोबर मुद्दाम राहिला होता. संन्याशाने सुभद्रेला पळवून नेले अशी एकच आरडाओरड झाली. यादववीर अर्जुनाचा पाठलाग करू लागले. पण अर्जुनापुढे कोणीच टिकले नाहीत. बलराम अर्जुनावर चालून गेला. त्याने नांगर व मुसळ आपल्या हातात घेऊन त्या गोसाव्यांचे मस्तक चूर्ण करण्याचा बेत केला होता. तोच कृष्णाने त्याला थांबविले. "दादा, हा तर आपला आतेभाऊ अर्जुन आहे. कोणी बैरागी नव्हे ! जे पळत आहे ते इष्टच आहे ! दादा, अर्जुनासारखा श्रेष्ठ धनुर्धर जगात दुसरा कोणी नाही ! तुम्ही क्रोध आवरा. आपण सुभद्रेचा अर्जुनाशी यथोचित विधिपूर्वक विवाह करून देऊ." बलराम विरमला. शेवटी कृष्णाच्या मृदु भाषणाने त्याचा राग निवळला. मग अर्जुन व सुभद्रा यांचा विवाह झाला. अर्जुन सुभद्रेला घेऊन यात्रा समाप्त करून इंद्रप्रस्थास गेला तेव्हा धर्माने त्याचे स्वागत केले. द्रौपदीने अर्जुनाची थोडीफार थट्टा केली, खोटा सवतपणा दाखविला, पण सुभद्रेला मिठी मारून ती म्हणाली- "सुभद्रे, आपण दोघी कृष्णभगिनीच - आता एकत्र राहून सुखाने आयुष्य घालवू या." अध्याय ३२ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |