॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय तेविसावा ॥

रुक्मिणी स्वयंवर


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय जगद्वंद्या वेदसारा । अखिल अद्वया विश्वंभरा ।
करुणासिंधो परमउदारा । यादवेंद्रा जगद्‌गुरो ॥१॥
कंदर्पदहनहृदयरत्‍ना । चतुरास्यजनका मनरंजना ।
अपारमायाश्रममोचना । निरंजना निर्विकारा ॥२॥
तूं दानवकाननवैश्वानर । कीं साधुहृदयारविंदभ्रमर ।
कीं अज्ञानतमनाशक मित्र । कीं आनंदक्षेत्र पिकलें जें ॥३॥
संसारगजदमन मृगेंद्र । भक्तमनचकोर सुधाकर ।
दुःखपर्वतभंजनवज्रधर । यादवकुळीं अवतरला ॥४॥
देवाधिदेव आत्माराम । अनंतब्रह्मांडफलांकित द्रुम ।
परात्पर अजित अनाम । मेघश्याम सगुण तूं ॥५॥
असो बाविसावे अध्यायीं कथन । भस्म करुनि काळयवन ।
जरासंधासी त्रासवून । आला जगज्जीवन द्वारकेसी ॥६॥
तों विदर्भदेशीं राजा भीमक । सुशील सभाग्य सात्विक ।
जैसा उडुगणांमाजी मृगांक । कीं शचीनायक सुरमंडळीं ॥७॥
कीं धनाढ्यांमाजी कुबेर । कीं अंडजांमाजी द्विजेंद्र ।
तैसा भीमक नृपवर । जगतीतळीं विख्यात पैं ॥८॥
कीं तो भजनगंगेचा लोट । कीं निश्चयरत्‍नांचा मुकुट ।
कीं सत्‍ववैरागरींचा सुभट । दिव्य हिरा प्रकटला ॥९॥
कीं विवेकभूमीचें निधान । कीं दयाकाशींचा केवळ घन ।
कीं आनंदनंदनवन । पक्व फळ तेथींचें ॥१०॥
ऐसा तो नृपनाथ । त्यासी रुक्मी नामें ज्येष्ठ सुत ।
त्याहूनि धाकुटा रुक्मरथ । रुक्मबाहु तिसरा पैं ॥११॥
रुक्मकेशी रुक्ममाळी । सहावी जहाली रुक्मिणीबाळी ।
स्वरुपसुंदर वेल्हाळी । ज्ञानकळा हरीची ते ॥१२॥
हे मूळपीठनिवासीनी माया । जियें निर्मिलें देवत्रया ।
इच्छामात्रें महत्कार्या । घडी मोडी ब्रह्मांडें ॥१३॥
अनंतशक्तींची स्वामिनी । जे आदिपुरुषाची मूळध्वनी ।
महामाया प्रणवरुपिणी । भीमकउदरीं अवतरली ॥१४॥
अनंत ब्रह्मांडांची माळ । घेऊनि जप करी वेल्हाळ ।
जगडंबर मांडूनि खेळ । सवेंचि लपवी क्षणार्धें ॥१५॥
विरिंचि मित्र चंद्र देवराणा । हीं अज्ञान बाळें तिचीं जाणा ।
पहुडवूनि प्रपंचपाळणां । विषयखेळणें वरी बांधीं ॥१६॥
डोळे उघडूनि स्वरुपाकडे । पाहों नेदी त्यांसी निवाडें ।
उत्पत्ति स्थिति प्रळयकोडें । कार्यें करवीं त्यांहातीं ॥१७॥
जीचिया स्वरूपावरूनी । करावी कोटिकंदर्पसांडणी ।
जे त्रैलोक्यलावण्यखाणी । अवनीतळीं अवतरली ॥१८॥
तप्तसुवर्ण जैसें सुरंग । तैसें रूक्मिणीचें दिव्यांग ।
आकर्णनेत्र सुरेख चांग । मुखमृगांक कोण वर्णी ॥१९॥
दंततेज जिकडे झळकत । पाषाण ते पद्मराग होत ।
सहज बोलतां मंदिरांत । प्रकाश होत दंततेजें ॥२०॥
जगन्माता बोले जे क्षणीं । वाटे विखुरते रत्‍नखाणी ।
जीचिया स्वरूपावरूनी । ब्रह्मांडचि ओंवाळिजे ॥२१॥
अंगींच्या सुवासेंकरूनी । गेल्या दश दिशा भरोनी ।
पाय ठेवी जेथें रूक्मिणी । वसंत भुलोनि तेथें लोळे ॥२२॥
महातेज गाळूनि देखें । ओतिलीं कर्णींचीं ताटंकें ।
नेत्रोत्पलें अतिसुरेखें । अंजन झळके सोगयाचें ॥२३॥
मुक्तघोंस तळपती कानीं । कोटि मृगांक उणे वदनीं ।
भगणें झळकती सुनीळ गगनीं । मुक्तजाळी शिरीं तेवीं ॥२४॥
सांडूनि तीव्रता सकळ । वाटे मित्र जाहला शीसफूल ।
शीतलत्व सांडूनि समूळ । मृगांक शिरीं विलसे पैं ॥२५॥
कस्तूरीमळवट विलसे भाळीं । नासिकीं दिव्य मौक्तिकें झळाळी ।
शुभ्र वस्त्र मुक्तलग कांचोळी । एकावळी डोलत ॥२६॥
बाहुभूषणें रत्‍नजडित । वज्रचूडेमंडित हस्त ।
दशांगुळीं मुद्रिका झळकत । अवतारस्वरूप हरीच्या ॥२७॥
चरणीं नूपुरें रूणझुणती । चालतां धन्य जाहलें म्हणे क्षिती ।
सहज विलोकी जिकडे चिच्छक्ती । ते तत्काळ होती सज्ञान ॥२८॥
जिच्या कृपाकटाक्षें देख । इंद्रपदीं बैसले रंक ।
पर्वत उचली मशक । अपांगपातें जियेच्या ॥२९॥
असो ऐसी ते रुक्मिणी । भीमकराजा अंकीं घेऊनी ।
बैसलासे सभास्थानीं । सकळ नृपांनीं वेष्टिला जो ॥३०॥
तों कीर्तिमुखनामा ब्राह्मण । जो चौसष्टकलाप्रवीण ।
तो करीत पृथ्वीपर्यटण । भीमकसभेसी पातला ॥३१॥
राये तो द्विज सन्मानूनी । बैसविला उत्तमासनीं ।
म्हणे द्विजा कोणीकडूनी । येणें जाहलें अकस्मात ॥३२॥
ब्राह्मण म्हणे धरणीपती । म्यां पृथ्वीचे पाहिले तृपती ।
सहज आलों द्वारावतीप्रती । तेथें श्रीपती देखिला ॥३३॥
ब्राह्मण वर्णीत श्रीकृष्णध्यान । नृपासहित ऐकती सकळ जन ।
परी भीमकी तेथें सावधान । करी श्रवण सप्रेम ॥३४॥
ज्याचिया चरणपंकजकेसरीं । क्षीराब्धितनया जाहली भ्रमरी ।
तेथूनि जन्मली जन्हुकुमारी । जे कां तारी सकळ जीवां ॥३५॥
अरूण संध्याराग बालार्क । यांचे काढिले रंग सकळिक ।
तळवे रेखिळे सुरेख । श्रीरंगाचे वाटती ॥३६॥
शरीर कर्वतून मृगांकें । चरणीं सुरवाडला निजसुखें ।
व्यापूनि पद अंगोळिका नखें । दशधा होवोनि राहिला ॥३७॥
पायीं हरीच्या दिसे ध्वज । तरी चरणलक्षण हेंचि जहाज ।
भक्त तारावया सहज । उदित असे सर्वदा ॥३८॥
शरण येती निजभक्त । त्यांचे फोडावया पापपर्वत ।
वज्र पायीं लखलखित । वैकुंठनाथें धरियेलें ॥३९॥
पायीं झळके जें पद्म । पद्मा तेथें वसे सप्रेम ।
आणिकां प्राप्त नाहीं परम । घोर तप आचरतां ॥४०॥
ऐश्वर्यमदें मस्त वारण । विद्यामदें गर्वित पूर्ण ।
त्यांसी आकर्षावयालागून । अंकुश पायीं झळकतसे ॥४१॥
साधकांसी ऊर्ध्वरेखा तत्त्वतां । ऊर्ध्वगच्छन्ति म्हणे सत्त्वस्थां ।
पाय देऊनि मुक्तीचिया माथां । ब्रह्मानंदीं ऐक्य व्हाल ॥४२॥
हरिपद हाचि दिव्य प्रयाग । तळवे आरक्त ब्रह्मकन्या सुरंग ।
मांड्या गरूडपाचूचे कोंभ चांग । तेथें मित्रकन्या सुरवाडली ॥४३॥
पदीं नेपुरें वाजती गजरीं । तेथें सुखावली जन्हुमारी ।
वांकीवरी रत्‍नें जडलीं कुसरीं । तपस्वी मराळ तेचि पैं ॥४४॥
घोटे शोभती वर्तुळ । जैसे यंत्रीं कांतिले इंद्रनीळ ।
पोटरिया सुनीळ सुढाळ । जेवीं निराळगर्भ काढिले ॥४५॥
सहस्र चपलांचा एकसार । पिळूनि रंगविला पीतांबर ।
दुजा पांघरावया सुंदर । मुक्तलग पदर त्याचे ॥४६॥
कटीं मेखळा विराजमान । वरी रत्‍नें जैसीं चंडकिरण ।
सकळ तीव्रता टाकून । हरिजघनीं सुखावले ॥४७॥
जैसा वेदांतींच्या श्रुति स्पष्टा । तैसा रुणझुणती क्षुद्रघंटा ।
हृदयी कौस्तुभ सतेज मोठा । मध्यान्हींचा सूर्य जेवीं ॥४८॥
त्रिवळी नाभि वर्तुळ । जेथें जन्मला चतुर्वक्‍त्रबाळ ।
विशाळ हरीचें वक्षःस्थळ । भक्त प्रेमळ राहती तेथें ॥४९॥
वैजयंती डोलत गळां । परी ते लागली चरणकमळा ।
हरिपदीं प्रताप आगळा । तेथींचा सोहळा भोगीत ।५०॥
कवि आणि गुरू दोघे येऊनी । कुंडलरूपें लागले हरिकर्णीं ।
कीं निशामणी आणि दिनमणी । पुसती कानीं विचार ॥५१॥
परम उदार वेल्हाळ मुख । कपाळीं मृगमदाचा टिळक ।
मधुमासींचा सतेज अर्क । तैसा मुकुट झळकतसे ॥५२॥
बिंबरंगाऐसे अधर । दंतपंक्ति सुरेख सुंदर ।
ओळीनें बैसलें रोहिणीवर । तैसें तेज झळकतसे ॥५३॥
तैसे श्रीहरीचे दंत । बोलतां ब्रह्मांड उजळत ।
वदनावरूनि कोटी रतिकांत । ओंवाळूनि टाकावे ॥५४॥
निराळवारणाचे शुंडादंड । तैसे चारी हस्त प्रचंड ।
हस्तकटकें अति सुघड । यंत्राकार मुद्रिका ॥५५॥
दंडीं कीर्तिवदनें झळकती । तेथें प्रतापकिरणें तळपती ।
शंखचक्रादि आयुधें विराजती । कोणा मूर्ति वर्णवे ते ॥५६॥
श्यामलांगीं उटी शुभ्र । वाटे भेटूं आला कर्पूरगौर ।
चंदनरूपें सत्वर । हरिअंगीं मिसळला ॥५७॥
कीं इंद्रनीळाचे मूर्तीवरी । आवरण घातलें काश्‍मीरी ।
कीं मित्रकन्येवरी जन्हुकुमारी । कीं निर्मळ अंबरीं शशिप्रभा ॥५८॥
घनश्याम कोमलांग । तैसा चंदन दिसे सुरंग ।
पूर्ण ब्रह्मानंद श्रीरंग । अक्षय अभंग मूर्ति जे ॥५९॥
कर्णीं भरला जवादिविशेष । अंगींचा जो दिव्य सुवास ।
सप्तावरण आसमास । भेदुनि जाय पैलीकडे ॥६०॥
ऐसें द्विजें वर्णितां हरिध्यान । हृदयीं ठसावला जगन्मोहन ।
भीमकी सद्‌गद होऊन । मूर्च्छा येऊन पडियेली ॥६१॥
नयनीं सुटल्या विमलांबुधारा । आंग कांपतसे थरथरां ।
उपमाता धांविन्नल्या सत्वरा । हृदयीं धरिली रूक्मिणी ॥६२॥
एक म्हणती बाधा जाहली । एक म्हणती भूतें घेरली ।
परी महद्‌भूतें व्यापिली । तें समजलें रायातें ॥६३॥
ऐकतां श्रीकृष्णध्यान । भीमकी पडली मूर्च्छा येऊन ।
आतां हे करावी कृष्णार्पण । मनीं निर्धार दृढ केला ॥६४॥
राजा सांगे शुद्धमतीतें । रूक्मिणी द्यावी श्रीपतीतें ।
येरी हर्षली परम चित्तें । म्हणे हेंचि मज आवडे ॥६५॥
तंव रूक्मिया परम कृष्णद्वेषी । वर्तमान हें कळलें त्यासी ।
ब्राह्मण बोलाविले गणक जोशी । एकांतासी रूक्मियानें ॥६६॥
म्हणे घटितार्थ कृष्णासी । घडत नाहीं सांगा रायासी ।
रूक्मिणी द्यावी शिशुपाळासी । ऐक्य उभयतांसी दृढ असे ॥६७॥
रायादेखतां सभेभीतरीं । रूक्मिया कृष्णाची निंदा करी ।
म्हणे पुरूषार्थी वीर पृथ्वीवरी । धुंडूनि बरा काढिला ॥६८॥
महाकपटी गोरसचोर । गोकुळ चौढाळिले समग्र ।
त्रिभुवनामाजी ऐसा जार । धुंडितांही न सांपडे ॥६९॥
चोरी केली गोकुळीं । म्हणोनि गौळणी बांधिती उखळीं ।
कालिया अघासुर किरडें मारिलीं । म्हणोनि पुरूषार्थीं मिरवत ॥७०॥
वारूळाऐसा गोवर्धन । उचलोनि बलिष्ठ जाहला कृष्ण ।
केशी तट्टू मारून । पुरुषार्थी म्हणवी आपणा ॥७१॥
अग्निस्तंभ जाणे कपटकळा । यालागीं वणवा मुखीं गिळिला ।
कपटेंचि कंस मारिला । परिवारासमवेत ॥७२॥
काळयवनभेणें थोर । तेणें घेतलें गिरिकंदर ।
मुचुकुंदावरी टाकूनि पीतांबर । आपण पुढें पळाला ॥७३॥
कपटें मारिला काळयवन । भेणें वसविलें द्वारकापट्टण ।
जरासंध कपटेंकरून । सत्रा वेळ जिंकिला ॥७४॥
नाहीं सिंहासन छत्र । भांडार नाहीं अणुमात्र ।
नाम रूप ना गोत्र । कैसेनि थोर कृष्ण हा ॥७५॥
हिंडे भक्तांच्या दारोदार । कीर्तनामाजी नाचे निर्भर ।
रूक्मिणीसी ऐसा होइजे वर । तरी जितचि आम्ही मेलों ॥७६॥
बाळपणीं पूतना शोषिली । आरंभींच स्त्रीहत्या केली ।
ऐसियासी वरील रूक्मिणी वेल्हाळी । तरी जितचि आम्ही मेलों ॥७७॥
भक्षूनि मातुळाचें अन्न । त्यासीच मारिलें कपटेंकरून ।
त्यासीं रूक्मिणीसीं घडेल लग्न । तरी जितचि आम्ही मेलों ॥७८॥
जरी रूक्मिणीचें कृष्णाशीं लागे लग्न । तरी माझी श्मश्रू टाकावी बोडून ।
हांक फोडी क्रोधेंकरून । लावीन लग्न शिशुपाळाशीं ॥७९॥
कृष्णद्वेषी परम चांडाळ । चालों नेदी रायाचें बळ ।
नगर शृंगारिलें सकळ । लग्न तत्काळ धरियेलें ॥८०॥
दमघोषाचिया नगरा । मूळ पाठवी रूक्मिया सत्वरा ।
ती वार्ता रूक्मिणीच्या कर्णद्वारा । दूतीमुखें प्रवेशली ॥८१॥
वार्ता ऐकतांचि सकळ । हृदयीं दचकली वेल्हाळ ।
नयनीं वाहे अश्रूजळ । मुखकमळ कोमाइलें ॥८२॥
हृदयीं धडकला चिंताग्न । नाठवे उदक शयन अन्न ।
म्हणे मायेसी सांगावें वर्तमान । तरी हरीप्राप्ती नव्हे तिचेनी ॥८३॥
कोण जाऊनियां आतां । सत्वर आणील वैकुंठनाथा ।
तों सुदेवनामा ब्राह्मण तत्त्वतां । मंदिरासी पातला ॥८४॥
परम सात्त्विक ब्राह्मण । रूक्मिणी धरी त्याचे चरण ।
म्हणे जरी कृष्ण येशील घेऊन । तरीं मी उत्तीर्ण नव्हें तूतें ॥८५॥
नयनीं वाहती अश्रूधारा । जे जगन्माया आदिइंदिरा ।
ते काकुळती येत द्विजवरा । जाईं त्वरा द्वारकेसी ॥८६॥
बाहेर कळो नेदीं मात । यामिनीमाजी क्रमिंजे पंथ ।
उदय न पावतां आदित्य । कृष्णनाथ आणिजे ॥८७॥
जो कां स्कंजतातहृदयींचें ध्यान । दशशतवदनतनुशयन ।
जो इंदुभगिनीप्राणजीवन । दितिजभंजन आदित्य जो ॥८८॥
जो पुष्करवर्ण चारूगात्र । जो चोविसावा शेवटील मंत्र ।
जो मित्रतनयातीरीं सरोजनेत्र । क्रीडला तो आणीं कां ॥८९॥
ज्याचें अंतःकरण पीतवसन । इंदिराबंधु ज्याचें मन ।
चतुरास्य ज्याची बुद्धि पूर्ण । तोचि घेऊनि येईं कां ॥९०॥
हिमनगजामात अहंकार । आखंडल दैवत ज्याचे कर ।
मित्र ज्याचे दिव्य नेत्र । तो सत्वर आणीं कां ॥९१॥
मग तो द्विज नाम सुदेव । म्हणे घेऊनि येतो वासुदेव ।
परी तुझे लिखितपत्रभाव । समागमें देईं कां ॥९२॥
जे शृंगारकासारमराळिका । जे क्षीराब्धिहृदयकनकलतिका ।
भीमकराजा हा वृक्ष निका । त्यावरी कृपेनें पसरली ॥९३॥
मग घेतलें हाटकरसपात्र । पुढें धरिलें शुद्धसत्वपत्र ।
लेखणी घेऊनि विचित्र । सप्त श्लोक लिहिले तेव्हां ॥९४॥
पत्र गुंडाळोनि झडकरी । द्विजाहातीं देऊनि चरण धरी ।
जरी घेऊनि येशील कंसारी । तरीच संसारीं सार्थक ॥९५॥
करूनि मनोवेगाचा रहंवर । त्यावरी बैसोनि धांवे द्विजवर ।
मित्र उगवतां द्वारकापुर । जवळी केलें वेगेंसीं ॥९६॥
द्वारकाबाह्यप्रदेशीं वन । वृक्ष भेदीत गेले गगन ।
वासरमणीचें किरण । माजी दिसती हिंडतां ॥९७॥
त्यामाजी कस्तूरीमृग चरती । कोकिळा पंचमस्वर आळविती ।
पक्षी कृष्णनामें गर्जती । हंस खेळती स्वानंदें ॥९८॥
रहाट पाट शीतळ उदक । चातक बदक चक्रवाक ।
शिखी कीर शब्द सुरेख । कृष्णनामें करिताती ॥९९॥
मलयानिल शीतळ । येत रम्य अतिमंजुळ ।
कृष्णागर मलयागर परिमळ । देवदार वृक्ष तेथें ॥१००॥
नारिकेळी खर्जूरी अशोक । पोफळी वट पारिजातक ।
अंजीर मातुलुंग सुरेख । वृक्ष चंपक विराजती ॥१॥
शेषवेली प्रवाळवेली सुरूप । स्थळीं स्थळीं द्राक्षमंडप ।
फणस दाळिंबी अमूप । सदा फळभारें डोलती ॥२॥
मुनि सदैव करिती तप । गंधर्वांचे सुरस आलाप ।
जेथें वसे परब्रह्म चित्स्वरूप । तें वन कोणासी वर्णवे ॥३॥
जें समुद्रसंभव नगर । उपमे न पुरे देवराजपुर ।
कमलोद्‌भवाचे कर । जेथें लागले नगर रचितां ॥४॥
आधि व्याधि मृत्यु दरिद्र । द्वारकेंत नाहीं अणुमात्र ।
पुराण कीर्तन विचित्र । अग्निहोत्रें द्विजांघरीं ॥५॥
न्याय मीमांसा सांख्यग्रंथ । पातंजल व्याकरण वेदान्त ।
वेदाध्ययनें अद्‌भुत । गृहीं गृहीं होताती ॥६॥
शतखणी दामोदरें बहुत । जातां अडखळे मित्ररथ ।
अवतारमूर्ति चरित्रांसहित । गोपुरावरी जडियेल्या ॥७॥
गरूडपाचूचे कीर । घरोघरीं बोलती सुकुमार ।
नीळरत्‍नांचे मयूर । बिदोबिदीं धांवती ॥८॥
निळ्याचे केले गज । मुखीं हिर्‍यांचे शोभती द्विज ।
सुवर्णकमल सुवास सतेज । रूंजती भ्रमर निळ्याचे ॥९॥
टाळ मृदंग विणे हातीं । लेपें आपण वाजविती ।
चित्रें गाती नाचती । विरिंचिहस्तें निर्मित पैं ॥११०॥
घरोघरीं रामायण भारत । चित्रमूर्ति रत्‍नजडित ।
शक्तिचरित्रें समस्त । असुरझुंजें रेखिलीं ॥११॥
आळोआळीं सुंदर घरें । गृहीं गृहीं विचित्र गोपुरें ।
असो ब्राह्मण पावला त्वरें । जेथें यादवेंद्र बैसला ॥१२॥
दृष्टीं देखतांचि ब्राह्मण । आसन सोडून पीतवसन ।
द्विजासी करूनि नमन । निजासनीं बैसविला ॥१३॥
षोडशोपचारें पूजा करून । संतोषविला ब्राह्मण ।
मग एकांतगृहीं दोघेजण । जाऊनियां बैसले ॥१४॥
हरि म्हणे विप्रोत्तमा । आजि कृतार्थ केलें आम्हां ।
कोणीकडूनि या ग्रामा । येणें जाहलें स्वामींचें ॥१५॥
देखोनियां मनमोहन । कार्याआठव विसरे ब्राह्मण ।
मग पद्माक्षीचें पत्र काढून । पद्मनाभाहातीं देत ॥१६॥
म्हणे विदर्भराजकन्यका । तिणें दिधली हे पत्रिका ।
तुम्हांवांचूनि यदुनायका । न वरी आणिका सर्वथाही ॥१७॥
या ब्रह्मांडमंडपामाझारी । ऐसी दुजी नाहीं सुंदरी ।
ते अनन्यशरण तुज मुरारी । वाचितां पत्रिका कळेल ॥१८॥
मग सुवर्णाक्षरपत्र चांगलें । कमलपत्राक्षें उकलिलें ।
अक्षर सुरेख मिरविलें । जेवीं भगणें पुष्करीं ॥१९॥
सप्तश्लोकीं लिहिलें पत्र । जें ऐकतां उद्धरती सप्तगोत्र ।
स्वयें वाची स्मरारिमित्र । तेंचि साचार ऐकिंजे ॥१२०॥
श्लोक ॥
श्रूत्वा गुणान् भुवनसुन्दर शृण्वतां ते
निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङगतापम् ॥
रूपं दृशां दृशिमतामखिलार्थलाभं
त्वय्यच्युताविशति चित्तमपत्रपं मे ॥१॥
टीका ॥
जय जय भुवनसुंदरा यादवेंद्रा । तुझ्या सौंदर्यतेजें चराचरा ।
विशेष दिसे लावण्यमुद्रा । सुरनरउरगां सर्वही ॥२१॥
तुझी गुणलीला विचित्र । ऐकतां धाती सर्वांचे श्रोत्र ।
त्रिविधतापच्छेदक पवित्र । गुण तुझे श्रीरंगा ॥२२॥
सांडोनियां लौकिकलाज । जगद्वंद्या मी शरण तुज ।
क्षयरहित तूं अच्युत क्षयी सहज । मी निर्लज्ज तुझें ठायीं ॥२३॥
श्लोक ॥
का त्वा मुकुन्द महती कुलशीलरूप-
विद्यावयोद्रविणधामभिरात्मतुल्यम् ॥
धीरा पतिं कुलवती न वृणीत कन्या
काले नृसिंह नरलोकमनोभिरामम् ॥२॥
टीका ॥
मोक्षदायक तूं यदुनायक । यालागीं मुकुंद नाम सुरेख ।
स्वरूपासी तुळितां देख । शफरीध्वज सरी न पवे ॥२४॥
जगन्मोहना श्रीकृष्णा । तुझी प्राप्ति व्हावया मधुसूदना ।
ज्या परमसधना सुकुलीना । तपें करिती तुजलागीं ॥२५॥
विद्यावंता वयसा चतुरा । सर्व गुणीं मंडित उदारा ।
तुजकारणें श्रीकरधरा । अगाध तपें करिताती ॥२६॥
ऐसियांसी नव्हे प्राप्ती । माझा पाड तेथें किती ।
पूर्ण ब्रह्म तूं वैकुंठपती । कीर्ति वर्णिती श्रूतिशास्त्रें ॥२७॥
तुज वरावया श्रीपती । सिद्ध असती बहुत युवती ।
परी मी दीन असें निश्चितीं । पाव यदुपती दयार्णवा ॥२८॥
सकळनरलोकमनोभिरामा । नरवीरांमाजी तूं यदूत्तमा ।
तुजवांचूनि मेघश्यामा । नव्हेंचि रामा आणिकाची ॥२९॥
श्लोक ॥
तन्मे भवान् खलु वृत्तः पतिरङ्‌ग जाया-
मात्मर्पितश्च भवतोऽत्र विभो विधेहि ॥
मा वीरभागमभिमर्शतु चैद्य आरा-
द्गोमायुवन्मृगपतेर्बलिमम्बुजाक्ष ॥३॥
टीका ॥
तूं परात्पर निर्विकारी । उपाधिरहित ब्रह्मचारी ।
परी मी कायावाचामनें कैटभारी । तूझी अंतुरी जाहलें ॥१३०॥
माझी दीनाची विनंती । जरी उपेक्षिसी जगत्पती ।
चतुर्दश लोकींचे नृपति हांसती । होईल अपकीर्ति यादवेंद्रा ॥३१॥
तूं अरिचक्रवारणपंचानन । तुझें अर्धांग माझें निकेतन ।
तेथें जंबुक दमघोषनंदन । घेऊनि पळों पाहातसे ॥३२॥
प्रतापदिनकरा अंबुजाक्षा । पुरणापुरूषा निर्विकल्पवृक्षा ।
सर्वांतरात्मा सर्वसाक्षा । तुझी जाया मी जाहलें ॥३३॥
श्लोक ॥
पूर्तेष्टदत्तनियमव्रतदेवविप्र-
गुर्वर्चनादि भिरलं भगवान् परेशः ॥
आराधितो यदि गदाग्रज एत्य पाणिं
गृह्णातु मे दमघोषसुतादयोऽन्ये ॥४॥
टीका ॥
पूर्वीचें असेल सुकर्म । याग दान व्रत धर्म ।
देवब्रह्मपूजा परम । जरी घडलीं असतील ॥३४॥
सद्‌गुरूपूजन निर्धारीं । जरी केलें असेल जन्मांतरीं ।
गो-भू-रत्‍न-दानें नानापरी । जरी घडलीं असतील ॥३५॥
तडाग कूप वापिका । आराम उद्यान पुष्पवाटिका ।
हरिदिनीआदि व्रतें देखा । जरी घडलीं असतील ॥३६॥
भववद्‌भजन हरिगुणकीर्तन । जरी गांठीं असेल महत्पुण्य ।
तरीच गदाग्रजा येऊन । हातीं धरशील मजलागीं ॥३७॥
श्लोक ॥
श्वोभाविनि त्वमजितोद्वहने विदर्भान्
गुप्तः समेत्य पृतनापतिभिः परीतः ॥
निर्मथ्य चैद्यमगधेन्द्रबलं प्रसह्य
मां राक्षसेन विधोनोद्वह वीर्यशुल्काम् ॥५॥
टीका -- कमलनाभा कमलापती । सत्वर येइंजे रातोराती ।
गभस्ति नुगवतां यदुपती । कौंडिण्यपुरा येइंजे ॥३८॥
घेऊनि परमार्थसंपत्ती । ज्ञानी प्रपंचदळ रगडिती ।
तैसे यादवभारेंसीं जगत्पती । चैद्य-मागध त्रासिजे ॥३९॥
गुप्तरूपें घेऊनि पृतना । सत्वर यावें जगन्मोहना ।
राक्षसविधीकरूनि जनार्दना मज घेऊनि जाइंजें ॥१४०॥
यथाविधि लग्न नव्हे तत्त्वतां । तरी राक्षसविधीं पर्णिजे अनंता ।
त्रिभुवननायका वैकुंठनाथा । धांवें आतां सत्वर ॥४१॥
श्लोक ॥
अन्तःपुरान्तरचरीमनिहत्य बन्धूं-
स्त्वामुद्वहे कथमिति प्रवदाम्युपायम् ॥
पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवियात्रा
यस्यां बहिर्नववधूर्गिरिजामुपेयात् ॥६॥
टीका ॥
तूं असशील निजमंदिरीं । मी कैसा येऊं तेथवरी ।
तुझे दुष्ट बंधु दळभारीं । सिद्ध होतील झुंजावया ॥४२॥
त्यांचा करितां संहार । तुज होईल दुःख थोर ।
तरी ऐकावा एक विचार । जगद्वंद्या यदुपति ॥४३॥
नगराबाहेर अंबिकापुरा । आपण यावें श्रीकरधरा ।
दळभारेंसीं यादवेंद्रा । सिद्ध तेथें असिंजे ॥४४॥
आमुचा कुळधर्म ऐसा पुरातन । लग्नाआधीं अंबिकापूजन ।
मज वेष्टूनि बंधुजन । येतील घेऊन देवालया ॥४५॥
होतांचि अंबिकापूजन । अरिवीरांतें पराक्रम दावून ।
मज सत्वर जावें घेऊन । कृपा करून यादवेंद्रा ॥४६॥
काम, क्रोध, मद, मत्सर । हेहि चौघे बंधू साचार ।
पापापासूनि सोडविता प्रतापशूर । तुजवांचूनि कोण असे ॥४७॥
भवपूरीं वाहतां साचार । तूं परतीरीं उभा पोहणार ।
उडीं घालोनि सत्वर । तारीं मज जगद्‌गुरो ॥४८॥
श्लोक ॥
यस्यांघ्रिपंकजरजः स्नपनं महान्तो
वाञ्छन्त्युमापतिरिवात्मतमोपहत्यै ॥
यर्ह्मम्बुजाक्ष न लभेय भवत्प्रसादं
जह्यामसून् व्रतकृशान् शतजन्मभिः स्यात् ॥७॥
टीका ॥
तुझिया अंघ्रिपंकजींचे रजःकण । प्राप्त होतां होइजे पावन ।
अपर्णापति तप दारूण । याचिलागीं आचरे ॥४९॥
पहावया तुझे चरण । नाभिकमळीं सरोजासन ।
सहस्र वर्षें पाहे उतरोन । मनीं निर्बुजोन वरी आला ॥१५०॥
ते वेळीं नाहीं देखिले चरण । मग गोकुळीं केलें वत्सहरण ।
तुवां तेथें सर्व रूपें धरोन । अद्‌भुत महिमा दाविला ॥५१॥
अभिमान टाकूनि ते वेळां । जगद्वंद्या तुज शरण आला ।
मग तुवां मस्तकीं हस्त ठेविला । तेणें निवाला विधाता ॥५२॥
तूं शिव-ब्रह्मादिकां न येसी आया । मी सिद्ध जाहलें तुज वरावया ।
परम धीटत्व करूनियां । पत्र लिहिलें नेणतपणें ॥५३॥
आतां श्रीरंगा हाचि पण । तुजचि एक माळ घालीन ।
नाहीं तरी हा देह त्यागीन । तप आचरेन शतजन्में ॥५४॥
अवघड तप आचरोन । करीन प्राणांचें शोषण ।
स्थूल लिंग आणि कारण । करीन जाळून भस्म यांचें ॥५५॥
अंतःकरणचतुष्टय जाळून । प्राणपंचक संहारून ।
दाही करणें विषयपंचक जाण । टाकीन शोषूनि तुजलागीं ॥५६॥
ऐसें शतजन्में तप साचार । आचरीन तुजलागी दुर्धर ।
परी न वरीं दुजा वर । तुजविण यादवेंद्रा ॥५७॥
वरकड नवर्‍या विषयपर । इच्छिती भ्रतार आणि संसार ।
मी आपुला करावया उद्धार । तुज शरण जगद्‌गुरो ॥५८॥
ऐसे सप्तश्लोकी पत्र सुरेख । वाची कमलोद्‌भवाचा जनक ।
सद्गद जाहला वैकुंठनायक । भाव देखोनि भीमकीचा ॥५९॥
सुदेव म्हणे यदुवीरा । आतां बहुत करावी त्वरा ।
उशीर होतां ते सुंदरा । प्राण देईल तत्काळ ॥१६०॥
परम चिंतारोग दारूण । तेणें रूक्मिणी गेली कृश होऊन ।
हरि तूं धन्वंतरी तेथें येऊन । कृपाहस्तें निववीं तीतें ॥६१॥
शिशुपाळ हाचि विखार । रूक्मिणीस डंखूं पाहे दुराचार ।
तूं गारूडी गरूडध्वज सत्वर । उडी घालीं ये वेळीं ॥६२॥
चैद्य मागध सर्व बळी । रूक्मिणी पडली भूतांचे मेळीं ।
तूं पंचाक्षरी जातां वनमाळी । भूतें तत्काळ पळतील ॥६३॥
श्रावणारितनय तूं पूर्वावतारीं । जाऊनि वैश्रवणबंधुपुरीं ।
प्रतापें सोडविली विदेहकुमरी । तैसेंचि करीं आतांही ॥६४॥
ऐसी ऐकोनियां करूणा । कळवळला वैकुंठराणा ।
सारथि दारूक तेचि क्षणां । बोलाविला एकांतीं ॥६५॥
म्हणे वेगीं सिद्ध करीं रथ । दुसर्‍याशी कळों नेदीं मात ।
येरें आज्ञा वंदूनि त्वरित । रथ वेगें आणिला ॥६६॥
वरकड न्यावा दळभार । तरी कासया करावा गजर ।
मी एकलाचि जाऊनि सत्वर । भीमकी आणीन ये क्षणीं ॥६७॥
मिळाले असंख्य दंदशूक । त्यांवरी एकला पडे खगपाळक ।
किंवा वारणचक्रावरी एक । मृगेंद्र जैसा चपेटे ॥६८॥
कीं शुष्कवनीं कृशान । एकलाचि टाकी भस्म करून ।
कीं एकला समीरात्मज जाऊन । अशोकवन विध्वंसी ॥६९॥
ऐसें विचारूनि यादवेंद्र । रथीं चढला प्रतापरूद्र ।
तुरंगीं बैसविला द्विजवर । चालिले सत्वर मनोवेगें ॥१७०॥
रातोरातीं तत्काळीं । आले कौंडिण्यपुराजवळी ।
श्रीकृष्ण नगर न्याहाळी । संतोषली चित्तवृत्ति ॥७१॥
अष्टवर्गाची सामग्री जाहली । रूक्मिणीसी हळद लाविली ।
मनीं सचिंत वेल्हाळी । म्हणे न ये वनमाळी काय करूं ॥७२॥
मनीं विचारी राजा भीमक । जरी ये समयीं येईल द्वारकानायक ।
तरी मजएवढा पुण्यश्लोक । दुजा मग असेना ॥७३॥
म्यां पाठविलें नाहीं पत्र । कैसा येईल वारिजनेत्र ।
तो घनश्याम कोमलगात्र । सर्वांचें अंतर जाणतसे ॥७४॥
ऐसा सचिंत राजेंद्र । तों दूत जाणविती समाचार ।
कीं लग्नासी आला दमघोष नृपवर । निजभार घेऊनियां ॥७५॥
शिशुपाळ वक्रदंत । जरासंध सवें उन्मत्त ।
मुख्य शिशुपाळ नोवरा मिरवत । आले नगराबाहेरी ॥७६॥
दृष्टीं देखतां विषयसुख । जैसे मनीं दचकती साधक ।
तैसा राजा भीमक । मनांत असुख मानीतसे ॥७७॥
रूक्मियासी हरिख नावरे । पितयासी म्हणे चला सामोरे ।
भीमक निजभारेंसीं त्वरें । नगराबाहेर निघाला ॥७८॥
सीमांतपूजा करूनि त्वरित । जानवसा दिधला नगरांत ।
इकडे काय जाहला वृत्तांत । तोचि ऐका सज्जन हो ॥७९॥
बळिभद्रादि उद्धव अक्‍रूर । त्यांसी कळला समाचार ।
कीं रूक्मिणीहरणासी यदुवीर । एकलाचि गुप्त गेला ॥१८०॥
जरासंध शिशुपाळ । तेथें येतील वीर सकळ ।
युद्ध होईल तुंबळ । जिंकील घननीळ तितुकेही ॥८१॥
परी युद्धसमयाकारण । जावें सकळ सेना घेऊन ।
चतुरंगदळ सिद्ध करून । लागवेगें धांविन्नले ॥८२॥
कौंडिण्यपुरा जों पावे यदुवीर । तों मागूनि आले दळभार ।
यादववीर प्रतापी थोर । काळासही जिंकिती समरांगणीं ॥८३॥
तों इकडे रूक्मिणी वेल्हाळी । चिंतासमुद्रीं पडियेली ।
म्हणे लिखित पाठविलें वनमाळी । नेणवे जाहली परी कैसी ॥८४॥
कृष्ण निर्विषय चैतन्यघन । त्यासी म्यां लिहिलें भार्या होईन ।
कीं हे बहु चक्रचालक म्हणोन । जगज्जीवन न येचि ॥८५॥
कीं शतजन्में तप करीन । म्यां हा लिहिला अभिमान ।
यालागीं कंसप्राणहरण । उदास झाला न येचि ॥८६॥
वर्णितां भागला सहस्रवदन । ब्रह्माधिकां दुर्लभ पूर्ण ।
त्यासी लिखित दिधलें पाठवून । हें अनुचित केलें म्यां ॥८७॥
कीं ब्राह्मण देखोनि जगन्मोहन । विसरला कार्याची आठवण ।
कीं वधूनें लिखित पाठविलें म्हणोन । मधुसूदन न येचि ॥८८॥
परात्परा उपरी भीमकी । चढूनि चहूंकडे अवलोकी ।
म्हणे लग्नसमय जवळी आला कीं । यदुनायक पावेना ॥८९॥
आसन शयन भोजन पान । अंजन चंदन तांबूल सुमन ।
क्रीडाकौतुक नृत्य गायन । नावडे पूर्ण सर्वथा ॥१९०॥
रूक्मिणी भूमीवरी टाकी अंग । म्हणे मज दावा गे श्रीरंग ।
मज नावडती विषयभोग । वीट येतो देखतां ॥९१॥
चंदन वाटे जैसा पावक । सुमनहार जेवीं दंदशूक ।
कृष्णप्राप्तीविण भूषणें सुरेख । काय व्यर्थ करूं मी ॥९२॥
नेत्रीं चालिल्या विमलांबुधारा । म्हणे अहा कृष्णा यादवेंद्रा ।
भक्तवत्सला गोवर्धनोद्धारा । माझी उपेक्षा कां केली ॥९३॥
तों होती उत्तम शकुन । लवों लागला वामनयन ।
दक्षिणबाहूचें स्फुरण । वेळोवेळां होतसे ॥९४॥
कृष्णप्राप्तीचें मुख्य चिन्ह । प्रकृतिभाग तो वामनयन ।
तो लवत चालिला संपूर्ण । तरी जगज्जीवन येईल ॥९५॥
दक्षिणबाहु तो केवळ ज्ञान । तेथें स्फूर्ति विशेष पूर्ण ।
हेंचि कृष्णप्राप्तीचें लक्षण । दिव्य शकुन साधकां ॥९६॥
सुदेवासी म्हणे वासुदेव । तुम्हीं आतां घ्यावी धांव ।
रूक्मिणीसी सांगा अंतर्भाव । चिंता कांहीं न करावी ॥९७॥
चिंतार्णवीं पडली वेल्हाळी । दुरोनि द्विज देखिला तये वेळीं ।
तों ब्राह्मणें बाही उभारिली । म्हणे वनमाळी आला वो ॥९८॥
जहाज बुडतां कडे लागलें । कीं प्राण जातां अमृत जोडलें ।
तैसें रूक्मिणीसी वाटलें । हर्षें फुगलें सर्वांग ॥९९॥
रूक्मिणी समोर धांवोन । धरिले सुदेवाचे चरण ।
म्हणे हे शरीर ओंवाळून । तुजवरून टाकावें ॥२००॥
तूं माझा सद्‌गुरू निश्चित । तुझेनि मज श्रीकृष्ण प्राप्त ।
तुज उत्तीर्ण व्हावया पदार्थ । कांहीं मज दिसेना ॥१॥
सुरतरू कामधेनु चिंतामणी । तुजवरूनि टाकीन ओंवाळूनी ।
पुढती मिठी घातली चरणीं । म्हणे धन्य त्रिभुवनीं तूं एक ॥२॥
सद्‌गद जाहला सुदेव । म्हणे धन्य भीमकी तुझा भाव ।
तुजकरितां मज वासुदेव । सखा झाला अभेद ॥३॥
उपरी चढोनि भीमकी पाहे । तों गरूडध्वज झळकत आहे ।
सूर्यप्रभा उणी होये । ऐसा रथ तळपतसे ॥४॥
भोंवतें यादवसैन्य अपार । दिसे जैसा क्षीरसमुद्र ।
मध्यें शेषशायी यदुवीर । रथासमवेत शोभतसे ॥५॥
भीमकासी कळला समाचार । कीं उत्साह पहावया आला यादवेंद्र ।
सवें बळराम बंधु समग्र । निजभारेंसीं पातले ॥६॥
ऐसें ऐकतां ते समयीं । ब्रह्मानंद दाटला हृदयीं ।
म्हणे मज एवढा सभाग्य नाहीं । होईल जांवई श्रीकृष्ण ॥७॥
राजा चालिला समोर । तंत-वितंत-घन सुस्वर ।
चतुर्विध वाद्यांचे गजर । नादें निराळ दुमदुमले ॥८॥
आला ऐकूनि वनमाळी । राणी शुद्धमती आनंदली ।
म्हणे धन्य भीमकी वेल्हाळी । निजभाग्यें समर्थं ॥९॥
आला ऐकोनि कृष्णनाथ । मागध चैद्य खळ समस्त ।
संतापले हृदयांत । म्हणती अनर्थ ओढवला ॥२१०॥
रूक्मिया विटला मनांत । जैसा सभेसी येतां महापंडित ।
मूर्ख होती भयभीत । शब्द न फुटे बोलावया ॥११॥
कीं देखोनियां राजहंस । चित्तीं संतापती वायस ।
कीं पंचानन येतां सावकाश । शृगालांसी सौख्य वाटेना ॥१२॥
देखोनि धार्मिकांची संपत्ती । दुर्जनांसी खेद वाटे चित्तीं ।
कीं देखोनि संतांच्या मूर्ती । निंदक विटती ज्यापरी ॥१३॥
कीं ऐकतां हरिनामघोष । भूतप्रेतांसी न वाटे सावकाश ।
तैसा आला ऐकोनि जगन्निवास । खेद खळांसी वाटला ॥१४॥
असो नगराबाहेर राव देखा । सामोरा गेला वैकुंठनायका ।
तों दृष्टीं देखिला निजसखा । प्रेमळांचा कैवारी ॥१५॥
अष्टभावें दाटोनि नृपवर । घातला साष्टांग नमस्कार ।
प्रीति जाणोनि राम-यदुवीर । आलिंगावया पुढें जाहले ॥१६॥
साक्षात् शेष-नारायण । अवतारपुरुष भेटले पूर्ण ।
केलें सीमांतपूजन । वस्त्रें भूषणें समर्पिलीं ॥१७॥
अंतरीं जाणोनि प्रीती । मूळाविण आला श्रीपती ।
तूं परात्पर सोयरा निश्चितीं । शब्दाहूनि वेगळा ॥१८॥
जानवसा देतां नगराभीतरी । तेथें न राहूं म्हणे कंसारी ।
मागध चैद्य आमुचे वैरी । दुष्टां दूरी असावें ॥१९॥
काम क्रोध मद मत्सर । साधक त्यांसी रक्षिती दूर ।
विवेकबळें त्यांचा संहार । करूनि विजयी मग होती ॥२२०॥
तरी कौंडिण्यपुराबाहेरी । जाऊनि राहूं म्हणे कैटभारी ।
अंबिकापुरीं ये अवसरीं । ठाव आम्हांसी देइंजे ॥२१॥
सांडोनि जागृति स्वप्न सुषुप्ती । तुर्याभूमीसी योगी राहती ।
तैसा अंबिकापुरीं श्रीपती । राहों म्हणे भीमकातें ॥२२॥
राजा म्हणे श्रीकरधरा । नगरांतूनि मार्ग अंबिकापुरा ।
अवश्य म्हणोनि त्या अवसरा । द्वारकानाथ ऊठिला ॥२३॥
रथीं बैसला जगन्नायक । आपणाजवळीं बैसविला भीमक ।
दळभारें मिरवीत देख । नगरांतूनि चालिला ॥२४॥
पाहावया श्रीकृष्णवर । नगरजन धांवती समग्र ।
देखोनि श्रीकृष्णाचा मुखचंद्र । जननेत्रचकोर लुब्धले ॥२५॥
एक श्रवणाच्या राजबिदीसी आले । तेथूनि हरिरूप निर्धारिलें ।
एक कीर्तनाच्या उमाठीं ठाकलें । प्रेमें हरिरूप विलोकिती ॥२६॥
एक स्मरणाच्या दारवंटा । उभे ठाकूनि लक्षिती वैकुंठा ।
एक चरणसेवेच्या चोहटा । यादवेंद्रा विलोकिती ॥२७॥
एक अर्चनाच्या ओसरीवरी । चढती वंदनाचे मंदिरीं ।
एक दास्यगवाक्षद्वारीं । तो कंसारी लक्षिती ॥२८॥
एक चढती सख्याचे शिडीवरी । एक आत्मनिवेदनाचे उपरी ।
एक अष्टांगयोगदामोदरीं । षट्‌चक्राम भेदूनि चढियेले ॥२९॥
शुद्धमती विलोकी कृष्णवदन । म्हणे कोटि काम सांडावे ओंवाळून ।
बोलती नगरींचे जन । रूक्मिणी जगज्जीवन जोडा असे ॥२३०॥
अंबिकापुरीं ते वेळां । निजभारेंसीं राहिला सांवळा ।
भीमकें पाहुणेर सोहळा । सर्व सामग्री पुरविली ॥३१॥
चैद्य मागध खळां समस्तां । रूक्मिया सांगे निजगुजवार्ता ।
कृष्णाकडे आमुचा जनिता । जाहली माता तिकडेचि ॥३२॥
समय दिसतो परम कठिण । कृष्ण कपटी घातकी पूर्ण ।
तुम्हीं दळभार सिद्ध करून । अतिसावधान असावें ॥३३॥
लग्न लागलियावरी । यादव निवटूं क्षणाभीतरी ।
ऐसें बोलोनि झडकरी । निजमंदिरा पातला ॥३४॥
रूक्मिया म्हणे ते वेळीं । लग्नघटिका जवळी आली ।
पूजासामग्री सिद्ध केली । वर आणावया कारणें ॥३५॥
तरी आतां सत्वर नृपवरा । चला आणूं शिशुपाल नवरा ।
तों शुद्धमती म्हणे अवधारा । कुळाचार विसरलेती ॥३६॥
आधीं भीमकीसी नेऊन । करवावें अंबिकापूजन ।
मग लागेल जी सुलग्न । विधि संपूर्ण ऐसा आहे ॥३७॥
रूक्मिया म्हणे लग्न लावूनियां । मग कन्या नेऊं अंबालया ।
राजा म्हणे कुळधर्म टाकोनियां । विधि केवीं करावा ॥३८॥
रूक्मिया म्हणे जगदंबापुरीं । परमकपटी यादवेंसीं हरी ।
हिरोनि नेईल सगुण कुमारी । मग काय करावें ॥३९॥
राजा म्हणे तूं षंढ । नव्हेसी पुरूषार्थी प्रचंड ।
नसतीच करिसी बडबड । शक्तिहीन अभागी तूं ॥२४०॥
ऐसा हिणविला भीमकें । रूक्मिया बोले अतितवकें ।
आतांचि पुरूषार्थ माझा देखें । रूक्मिणी नेतों अंबालया ॥४१॥
कृष्णासहित यादववीर । करीन अवघ्यांचा संहार ।
सिद्ध केले दळभार । उदितशस्त्रें अवघेही ॥४२॥
चैद्यमागधांचे दळभार । रूक्मिया आणवी समग्र ।
मायेसी पूजावया सत्वर । आदिमाया चालिली ॥४३॥
चरणचालीं निघाली रूक्मिणी । सवें सखिया जिवलग सांगातिणी ।
मन समर्पित यदुकुळभूषणीं । हंसगती जातसे ॥४४॥
लक्षानुलक्ष महावीर । शस्त्रें नग्न करूनि समग्र ।
व्यूह रचिला परिकर । भीमकीभोंवता तेधवां ॥४५॥
धनुर्धरांचे असंख्य भार । खिळिले भोंवते महाकुंजर ।
महारथी उद्‌भट वीर । त्याभोंवते रक्षिती ॥४६॥
उल्हाटयंत्रांचे भडिमार । त्यांभोंवते चालती दुर्धर ।
सैन्य दिसे यंत्राकार । मध्यपीठ रूक्मिणी ॥४७॥
ऐसी रक्षीत अंबिकेजवळी । आणिली तेव्हां भीमकबाळी ।
देउळामाजी प्रवेशली । सखियांसमवेत तेधवां ॥४८॥
मग षोडशोपचारेंकरूनी । देवीस पूजित रूक्मिणी ।
शेवटीं पुष्पांजळी वाहोनी । मग मौन विसर्जिलें ॥४९॥
उभी ठाकली रूक्मिणी बाळा । हस्तकमळ जोडी आदिकमळा ।
लक्षूनि देवीच्या वदनकमळा । स्तवन वेल्हाळी करीतसे ॥२५०॥
जय जय आदिकुमारिके । जय जय मूळपीठनायके ।
सकळकल्याणसौभाग्यदायिके । जगदंबिके मूळप्रकृति ॥५१॥
जय जय भार्गवप्रियभवानी । भयनाशके भक्तवरदायिनी ।
सुभद्रकारिके हिमनगनंदिनी । त्रिपुरसुंदरी महामायें ॥५२॥
जय आनंदकासारमरालिके । जय चातुर्यचंपककलिके ।
जय शुंभ-निशुंभदैत्यांतके । सर्वव्यापके मृडानी ॥५३॥
जय शिवमानसकनकलतिके । पद्मनयने दुरितवनपावके ।
जय त्रिविधतापभवमोचके । निजजनपालके अपर्णे ॥५४॥
तव मुखशोभा देखोनी । विधुबिंब गेलें विरोनी ।
ब्रह्मादि देव बाळें तीन्ही । स्वानंदसदनीं निजविलीं ॥५५॥
जीव शिव दोन्ही बाळकें । अंबे तुवां निर्मिली कौतुकें ।
जीव तुझें स्वरूप नोळखे । म्हणोनि पडिला आवर्तीं ॥५६॥
शिव तुझें स्मरणीं सावचित्त । म्हणोनि तो अंबे नित्यमुक्त ।
ब्रह्मांनंदपद हातां येत । कृपेनें तुझ्या जननीये ॥५७॥
मेळवूनि पंचभूतांचा मेळ । तुवां रचिला ब्रह्मांडगोळ ।
इच्छा परततां तत्काळ । क्षणें निर्मुळ करिसी हें ॥५८॥
अंबें हेंचि मागतें तुजप्रती । मज सत्वर वरू तो श्रीपती ।
नीलोत्पलमाला अवचितीं । अंबेनें हातीं दीधली ॥५९॥
हेचि नीलोत्पलमाला घेऊनी । नोलोत्पलदलवर्ण वरीं ये क्षणीं ।
वचनासरसी रूक्मिणी । माथा चरणीं ठेविला ॥२६०॥
निघोनि देवळाबाहेरी । सभोंवतीं तेव्हां प्रदक्षिणा करी ।
भोंवतें पाहें सुंदरी । तों सेना अपार रक्षीतसे ॥६१॥
हंसगती चाले धरणीं । नुपुरें रूणझुणती चरणीं ।
वस्त्रें नेसलीं कनकवर्णी । जैसी सौदामिनी अंबरी हो ॥६२॥
मुक्तलगसुबद्ध कांचोळी । कंठभूषणें रूळती एकावळी ।
अवतारमुद्रिका दशांगुळी । झळकताती दिव्यतेजें ॥६३॥
विशाळपद्मनयनी । जैसा उडुगणपति आणि दिनमणी ।
तैसीं ताटंकें दिव्य कर्णी । मुक्तघोंस डोलती ॥६४॥
चपळसुपाणी नासिकीं मुक्त । नेत्रीं दिव्यांजन ओप देत ।
शिरीं मुक्तजाळी मिरवत । चंद्रसूर्य झळकती वरी ॥६५॥
दिव्य कुंकुम विलसे भाळीं । असो ते कोणा वर्णवे वेल्हाळी ।
चैद्यमागधवीरीं सकळीं । देखिली बाळी भीमकाची ॥६६॥
स्वरूपें लावण्यसुंदरी । कामास्त्र घातलें सर्वांवरी ।
मूर्च्छा येऊनि पडती धरेवरी । पंचबाणें विव्हळ ॥६७॥
कामें गेले विव्हळ होऊनी । हातींचीं शस्त्रें पडलीं गळोनी ।
तों रथीं सिद्ध असे चक्रपाणी । यादवभारांसमवेत ॥६८॥
दुरोनि देखिली रूक्मिणी । दारूकें रथ लोटिला ते क्षणीं ।
निमिष न लागतां चक्रपाणी । भीमकीजवळी पातला ॥६९॥
सावध पाहे भीमकबाळी । घनश्यामें स्वहस्तें तत्काळीं ।
उचलोनि घेतली वेल्हाळी । रथावरी क्षणमात्रें ॥२७०॥
हर्षें घाबरी रूक्मिणी ते वेळां । करींची जे कां नीलोत्पलमाळा ।
घातलि घननीळाचे गळां । चरणीं ठेविलें निजमस्तक ॥७१॥
कृष्णें मस्तकीं ठेविला हस्त । दिनपति लग्नघटीं विलोकीत ।
देवगुरू मंगलाष्टकें म्हणत । पुष्पें वर्षत सुरपति ॥७२॥
ॐ पुण्याहं म्हणे कमळासन । असो हरि गेला रूक्मिणी घेऊन ।
यादवदळेंसीं जगज्जीवन । द्वारकेकडे मुरडला ॥७३॥
हर्षें नाचत नारदमुनी । कृष्णे बरी हरिली रूक्मिणी ।
आतां युद्ध होईल ये धरणीं । प्रेतें पडतील अपार ॥७४॥
हरिविजयग्रंथ थोर । मंगलदायक रूक्मिणी स्वयंवर ।
तो हा तेविसावा अध्याय सुंदर । सर्वशुभकारक ॥७५॥
श्रोतीं पुढें ऐकावें सावधान । यादवमागधां होईल युद्धकंदन ।
मूळमाधवीं रूक्मिणीचें लग्न । यथासांग होईल ॥७६॥
हें रूक्मिणीस्वयंवर ऐकतां । हरे सकळ संकटव्यथा ।
सकळमंगळकारक तत्त्वतां । त्रिकाळ पढतां बहु पुण्य ॥७७॥
ब्रह्मानंदा ज्ञानसमुद्रा । श्रीधरवरदा निर्विकारा ।
रूक्मिणीवल्लभा भीमातटविहारा। दिगंबरा आदिपुरूषा ॥७८॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
प्रेमळ परिसोत भाविक भक्त । त्रयोविंशतितमाध्याय गोड हा ॥२७९॥
॥ तेविसावा अध्याय समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

बलरामाचा विवाह रैवत राजाची कन्या रेवती हिच्याशी झाला, कृष्णाचा विवाह असा सरळ झाला नाही. त्याला त्यासाठी पराक्रम करून अनेक वीरांचा पराभव करावा लागला. त्यावेळी विदर्भ देशाचा राजा भीमक याचे राज्य मोठे होते. तो गुणी राजा प्रजेचा आवडता होता. रुक्मी हा त्याचा मुलगा. तो मात्र जरासंध, शिशुपाल इत्यादींचा मित्र होता आणि मनाने दुष्ट होता. भीमकाची मुलगी रुक्मिणी फार सुंदर होती. तिच्या सद्‌गुणांची व सौंदर्याची कीर्ती सर्वत्र पसरली होती. साक्षात् लक्ष्मीच मानवी रूप धारण करून वावरत आहे असे तिला पाहून वाटत असे. आणि लक्ष्मीच तिच्या रूपाने अवतार घेऊन आली होती, पण ही गुप्त गोष्ट फक्त नारदासारख्या काही ऋषींना माहीत होती. रुक्मीला आणखी चार भाऊ होते. रुक्मरथ, रुक्मबाहू रुक्मकेशी व रुक्ममाली अशी त्यांची नावे होती. रुक्मिणी उपवर झाली होती. रुक्मीच्या मनात असे होते की तिचा विवाह शिशूपालाशी लावून द्यावा. पण रुक्मिणीचे मन काही त्याच्यावर नव्हते. त्यातून एकदा द्वारकेतील कृष्णाची कीर्ती तिच्या कानावर आली.

भीमक एकदा सभेत सर्व मंत्र्यांसह व मांडलिक राजांसह बसला असतां, तेथे एक ब्राह्मण आला. कीर्तिमुख असे त्याचे नाव होते. तो सर्व देशात पर्यटन करीत आला होता. राजाने त्याचे स्वागत केले, सन्मान केला, देशोदेशींच्या वार्ता त्याने सांगितल्या. अनेक राजांची वर्णने केली. अद्‌भत अशा अनेक गोष्टी सांगितल्या. गोकुळ, वृंदावन, मथुरा, यांच्याही वार्ता त्याने सांगितल्या. जरासंधाचा सतरा वेळा पराभव करणार्‍या, कंसाचा वध करणार्‍या व अनेक दैत्यांचा संहार करणार्‍या श्रीकृष्णाचेही त्याने रसभरीत वर्णन केले. कृष्णाच्या सौंदर्याचे वर्णन ऐकू सर्वांना आश्चर्य वाटले. भीमकाला वाटले- कृष्ण हा सामान्य मनुष्य नक्कीच नव्हे ! रुक्मिणीही तेथे बसली होती. कृष्णाचे वर्णन ऐकता ऐकता तिची भावसमाधि लागली. अष्टसात्विक भाव जागृत झाले ! अश्रुपात होऊ लागला, अंग थरथर कापू लागले. तिला काय झाले याची चिंता वाटून दाया धावत आल्या व उपचार करू लागल्या. पण भीमकाने आपल्या मुलीला काय झाले आहे हे ओळखले. कृष्णाचे वर्णन ऐकताच तिच्या मनावर परिणाम झाला. तिचे मन त्याच्याकडे ओढ घेत असणार हे त्याला कळून चुकले. कीर्तिमुखाचे कथन तेवढ्यावरच थांबले.

रुक्मिणीला अंतःपुरात नेण्यात आले. त्या ब्राह्मणाचा राजाने चांगला मान केला व त्याची बोळवण केली.

भीमकाने मनाशी असे ठरविले की कृष्णाचा व रुक्मिणीचा विवाह झाला तर उत्तम होईल. राणीलाही हा विचार पसंत पडला. रुक्मिणीचा विचार घेतला. तिला तर फारच आनंद झाला. पण रुक्मी ? तो तर कृष्णाचा वैरी ! शिशुपालाचा मित्र. शिशुपालाला रुक्मिणी आवडत होती. त्याने रुक्मीजवळ तिच्यासाठी शब्दही टाकला होता. रुक्मीच्या मनातून तो संबंध जुळून यावा असे होते. भीमकाने ठरविलेला बेत त्याला मुळीच आवडला नाही. त्याने विरोध केला. ज्योतिषांना ’कृष्ण व रुक्मिणी यांचे ग्रह पटत नाहीत असे राजाला सांगा' असे दमदाटी देऊन बजावले. शिशुपालास सस्मिणी द्यावी असे राजाला पटवून द्या असेही सांगितले.

रुक्मी भीमक राजाला म्हणाला -'कृष्ण हा मुळीच योग्य वर नाही. त्याला तुम्ही रुक्मिणी देऊ नका. त्याऐवजी ती शिशुपालाला या. तो चेदि देशाचा राजा आहे. कृष्ण राजा नाही, त्याच्यापाशी धनकोष नाही, राजछत्र नाही, तो गवळ्याचा पोर ! लहानपणी त्याने केलेले पराकम म्हणजे जास्त फुगवून सांगितलेल्या भाकड कथाच ! एक केशी तट्‍टू मारले, बगळा मारला, पूतना नावाच्या बाईला मारले, पण हे काही क्षत्रियोचित पराक्रम नव्हेत. त्याला कालयवनापुढे पळता भुई थोडी झाली ! पळपुट्या, पोराला तुम्ही रुक्मिणी दिलीत तर तो मी माझा फार मोठा अपमान समजेन, माझ्या डोक्याचे मुंडण करुन घेईन ! "

रुक्मीची कडू वचने ऐकून रुक्मिणीला फार वाईट वाटते. आणि रुक्मिणीचा शिशुपालाशी विवाह करायची तयारीही रुक्मी करू लागला. मुलाच्या शिरजोरपणापुढे बापाचे काही चालेना, आईचे काही चालेना. आता आपला कोणीच त्राता नाही असे वाटून रुक्मिणी फारच उदास झाली ! कृष्णाला जर आपली स्थिती कळली तर तो धावत येऊन आपली या कारस्थानातून सुटका करील असा तिला विश्वास वाटत होता. पण कृष्णाला जाऊन सांगणार कोण ? घरचेच लोक शत्रू झाले. अंगणात पाय टाकावा तरी तो परप्रांत झाला ! पिता व माता यांचा कन्येला आधार वाटतो - पण त्यांचे, उद्दाम तरुण ज्येष्ठ पुत्रापुढे काही चालत नाही - आज ना उद्या - शिशुपालासारख्या उद्धट, उर्मट, कपटी, दुष्ट, साधूंचा शत्रू अशा राजाशी आपले लग्न होणार ! त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णा दर्शनही मग आपल्याला होणार नाही ! रुक्मिणी चिंता करू लागली. राजाच्या पदरीं असणार्‍या सर्व लोकांबद्दल ती मनोमन पारख करू लागली. द्वारकेपर्यंत जाऊन गुप्तपणे कृष्णाला बोलावणे करायचे काम कोण करील याचा ती अंदाज घेऊ लागली. तोच सुदेव नावाच्या प्रेमळ ब्राह्मणाची तिला आठवण झाली. तिने त्याला एका बाजूस बोलावले. "मी सांगेन ते काम आपण जर अत्यंत गुप्ततेने केलेत तर मोठे पारितोषिक देईन. पण गुप्तता पाळीन अशी शपथ घ्या." ती म्हणाली. त्याने शपथ घेतली. मग ती म्हणाली- यात्रेला जाण्याचे निमित्त करून तुम्ही हे नगर सोडून जायचे. माझे एक पत्र घेऊन द्वारकेत जायचे. वसुदेव पुत्र श्रीकृष्ण यांना ते पत्र द्यायचे आणि त्यांना तत्काळ येऊन मला सोडवण्याची प्रार्थना करायची. रातोरात प्रवास करायचा." ब्राह्मणाने ते सर्व मान्य केले. कृष्ण हा अवतारी पुरुष आहे असे त्याने ऐकले होते. या उत्तम कार्याच्या निमित्ताने भगवत्स्वरूप अशा त्या कृष्णाचे दर्शन होईल ही त्याला मोठी पर्वणीच वाटली.

ब्राह्मणाजवळ तिने एक गुप्त पत्र दिले. सात श्लोकांत तिने आपली स्थिती कळविली आणि "मी तुमच्या चरणांची दासी आहे, मला तत्काळ येऊन येथून सोडवा" असे लिहिले.

ब्राह्मण रात्रीच निघाला. भीमकाने गुप्तपणे त्याला वेगवान् अश्व जोडलेला रथ दिला. रुक्मीला यातले काही कळले नाही. एका रात्रीत तो ब्राह्मण द्वारकेत पोहोचला. "कृष्णाचीच भेट हवी आहे, मी भीमक राजाकडून संदेश घेऊन आलो आहे." असे त्याने सांगताच यादव पहारेकर्‍यांनी त्याला कृष्णाच्या मंदिरापर्यंत नेले. त्याचे स्वागत करून कृष्णाने कुशल विचारले. पण कृष्णदर्शनाने तो सत्त्वगुणी ब्राह्मण इतका भांबावून गेला की त्याला काही बोलायचेच सुचेना. मग भानावर येऊन म्हणाला- "भगवन् हे पत्र घ्या. यात सारा उलगडा होईल. काहीही करून आपण विदर्भ देशास लगेच यायला हवे, नाहीतर अनर्थ होईल एवढे मात्र सांगतो." कृष्णाने पत्र वाचले. पत्रातील सर्व अक्षरे व शब्द भीमकीच्या पवित्र प्रेमाची साक्ष देत होते.

रुक्मिणीने लिहिले होते- "हे भुवनसुंदरा, तुझ्या गुणांचे व सौंदर्याचे वर्णन ऐकले तरी सर्व प्राणिमात्र संतोष पावतात. माझ्या मनाची सहज लज्जा व संकोच कुठे गेला ? माझे मन तुझ्याच चरणाकडे लागले आहे. तुझ्या प्राप्तीसाठी मी कोणतेही तप केलेले नाही. कितीतरी तरूणी तप करीत असतील, पण मी अगदी हीनदीन आहे, एक मात्र मी ठरविले आहे - करीन तर तुझ्याशीच विवाह करीन. दुसर्‍या कोणासही मी वरणार नाही. मी शरण आले असता तू जर माझा उद्धार केला नाहीस तर तुझ्या नांवाला बट्टा लागेल. शिशुपालासारख्या जंबूकाने तुझ्यासारख्या सिंहाचा वाटा न्यावा काय ? धाव ! माझी या संकटातून सुटका कर ! मला स्वतःच्या अंकावर बसव. जन्मांतरीचे जर माझे काही पुण्य असेल तर तू येशील ! आणि मला घेऊन जाशील ! यादव सेना घेऊन उद्या सकाळच्या आत तू इथे ये. शिशूपालाच्या सेनेचा पराभव कर ! मगधसेनेला पळवून लाव. तू राक्षसविधीने मला पळवून ने. माझ्या बंधूंचा तुला विरोध आहे. त्यांच्याशी लढायचा प्रसंग टाळायची एक युक्ती सांगते - सकाळी कुलधर्माप्रमाणे विवाहापूर्वी नगराबाहेरच्या देवीच्या मंदिरात मी दर्शनासाठी जाणार आहे. मजबरोबर सख्या असतील. थोडेफार सैनिक पहार्‍याला असतील. तुला त्यावेळी माझे हरण करता येईल. ब्रह्मदेवाने वत्सहरण करून तुझी परीक्षा पाहिली पण त्यात त्याचाच पराभव झाला. तुझा महिमा देवांना सुद्धा कळत नाही. तुला ही साधी गोष्ट सहज शक्य आहे. मी पत्र पाठवतांना मोठे वेडे साहसच केले आहे ! इथे स्वकीयांच्याच कैदेत मी पडले आहे. तू माझा उद्धार केला नाहीस तर मी जीवभावच नष्ट करून तुझ्या परात्पर रूपांत विलीन होईन ! तुझ्याविना प्राण कंठाशी आले आहेत ! श्रीकृष्णा ! आता वाट पहायला लावू नकोस ?'

पत्र वाचून श्रीकृष्ण म्हणाला- "विप्रवर्य ! भीमकीच्या सौंदर्याचे व सद्‌गुणांचे वर्णन ऐकले आहे. माझेही मन तिजकडे ओढ घेत आहे. तिच्या या पत्राप्रमाणे मला गेलेच पाहिजे." ब्राह्मण म्हणाला- "ह्या वेळी उशीर करून मुळीच चालणार नाही. रुक्मिणी तिकडे चिंतेने झुरत आहे. ती प्राणत्यागही करील."

कृष्णाने विचार केला- यादव सेना न्यायची म्हटले तर फार विलंब होईल, जिकडेतिकडे आधीच कळेल. एकड्याने जावे हेच बरे. त्याने दारूकाला उठविले. तत्काळ रथाला अश्व जोडण्यास सांगितले. सुदेवाला घेऊन तो रातोरात विदर्भ देशाकडे निघाला. कुंडिनपुराच्या जवळ त्याचा रथ आला तेव्हा सकाळ व्हायला अवकाश होता ! त्याला दुरूनच नगरांत दीप प्रज्यलित दिसले. पहाटेपासून लोकांची गडबड सुरू झालेली दिसली.

कुंडिनपुरात काय चालले होते ? भीमकाला व रुक्मिणीला कृष्ण येईल अशी आशा वाटत होती. पण कृष्णाला विवाहाचे निमंत्रण सुद्धा दिलेले नाही, तो येण्याची आशा धरण्यात काय अर्थ ? असेही तो मनाशी म्हणत होता. सुदेव ब्राह्मणाला दाटेतच कुणी अडविले की काय ? तो अजून पोहोचला नसेल की काय ? पत्र वाचून कृष्ण येईल की नाही ? असे अनेक चिंतेचे विचार मनात घोळवीत रुक्मिणी रडत होती.

शिशुपाल दमघोषासह मोठ्या थाटात नगरात आला. मनाविरुद्ध का होईना, भीमकाने त्याचे स्वागत केले. त्याची व वरपक्षीयांची त्याने योग्य ठिकाणी रहाण्याची व्यवस्था केली.

द्वारकेत काय घडले ? दारूकासह एका ब्राह्मणाला बरोबर घेऊन कृष्ण एकटाच रात्री कुंडिनपुरास गेला असे बलराम, उग्रसेन, इत्यादिकांना लगेच कळले. तेव्हा बलरामाने यादवांचे सैन्य रातोरात जमविले आणि तोही कृष्णामागोमाग निघाला.

कृष्णाने सुदेव ब्राह्मणाला कुंडिनपुरात पाठविले. तो राजाकडील ब्राह्मण ! त्याला मुक्त प्रवेश होता. तो राजप्रासादात गेला. रुक्मिणीभोवती स्त्रिया व सख्या होत्या. सहज तिथे गेल्यासारखे करून सुदेवाने रुक्मिणीला खुणेनेच कळविले- "तुझा उद्धारकर्ता नगराच्या बाहेर आला आहे." ती खूण तिला कळताच तिचे डोळे आशेने चमकले. त्यानंतर तिचे रडणे थांबले. तिचे मन पालटले असे पाहून स्त्रियांना बरे वाटले. रुक्मिणी सौथातलावर गेली. शृंगारलेत्या नगरीचा देखावा पहाण्याचे निमित्त करून तिने नगरीच्या बाहेर दूरवर दृष्टी टाकली. तिला दूरवर कृष्णाचा रथ दिसला. त्याच्या रथावरील गरुडधज दिसला. मागे आणखी दूर एक मोठे सैन्य येत आहे असे दिसले. ती यादवसेनाच असावी असा तिने तर्क केला.

तोपर्यंत दिवस उगवला. राजाच्या दूतांनी राजाला येऊन सांगितले- "महाराज ! द्वारकेहून कृष्ण व बलराम रुक्मिणीचा विवाह आहे असे कळल्यावरुन समारंभ पहाण्यासाठी आले आहेत." आपण त्यांचे स्वागत केले पाहिजे असे वाटून भीमक त्याला सामोरा गेला. "श्रीकृष्णा ! बलरामा ! आपल्याला माझ्या रुक्मिणीच्या विवाहाचे निमंत्रण पाठविण्याचे राहून गेले पण आपण ती चूक सावरून घेऊन इथे येऊन मजवर उपकार केले ! आपण नगरांत चलावे ! आपले आतिथ्य करण्याचे सद्‌भाग्य मला मिळावे."

कृष्ण म्हणाला- " भीमकमहाराज ! आमच्या येण्यामुळे आपली नगरातील व्यवस्था-तिजवर ताण पडेल. सैन्यासह आम्ही अंबिकापुरांत-देवीच्या मंदिराजवळच राहतो. विवाहाला येथूनही उपस्थित रहातां येईल." असे सांगून व आपल्या मधुर वाणीने भीमकाचे मन जिंकून कृष्णाने त्याला द्वारकेतून बलरामाने आणलेल्या काही मौल्यवान वस्तुंची भेट दिली !

भीमक परत गेला. देवीच्या मंदिरापासून जवळच यादवांच्या सेनेचा तळ पडला. सैन्याला थोडक्या वेळात विश्राम घेऊन केव्हाही वेगाने परत जाण्याच्या तयारीत रहायची सूचना बलरामाने गुप्तपणे केली. सैनिक कसलेले लढवय्ये होते, पण बाह्यतः कोणीही युद्धाच्या तयारीत आहे असे कळू दिले नाही.

कृष्णाच्या आगमनाने शिशुपाल, जरासंध व इतर राजांना राग आला आणि लग्नात विघ्न येणार अशा शंकेने धास्तीही वाटली ! अंबिकापुराकडे जातांना कृष्ण व बलराम यांनी राजाचा मान राखून नगरांत येऊन नगराचे दर्शन मात्र घेतले होते. सर्वांना आपल्याला अनुकूल करून घेण्याची कृष्णाची ती युक्ती होती. नागरिकांना दोघा वीरांचे दर्शन होऊन फार आनंद झाला ! जरासंधाचा व शिशुपालाचा वारंवार पराभव करणारे यदुवीर पाहून त्यांना धन्य वाटले. त्यांना उत्साह आला. कृष्णाचे रूप पाहून कित्येकांच्या मनात आले- "रुक्मिणीचा विवाह कृष्णाशी झाला तर किती चांगले होईल ?" यादवांच्या सेनेचा समाचार घेण्याची सिद्धता ठेवा असे जरासंधाला शिशुपालाने सुचविले.

रुक्मीने प्रसंगातील तणाव ओळखला. आता विवाह करण्यात इतर फाटे फुटू नयेत म्हणून तो लगबग करू लागला. पण त्याची माता शुद्धमती हिने "रुक्मिणीला कुलाचाराप्रमाणे अंबादेवीच्या दर्शनास जाणे आवश्यक आहे. रीतसर, सर्व विधी शास्त्रानुसार झाले पाहिजेत, उतावळेपणा करू नको," असे सांगितले.

रुव्क्मी म्हणाला- "तो मथुरेतून पळून गेलेला कृष्ण त्याच्या बलिष्ठ भावाबरोबर आला आहे ! तो काही गडबड करील ! रुक्मिणीचे मन त्याच्यावर आहे, पण मी त्या कृष्णाच्या हाती ती लागू देणार नाही ?"

शुद्धमतीने त्याची समजूत काढली. देवीच्या दर्शनासाठी रुक्मिणीला पाठविले पाहिजे हे मात्र त्याने मान्य केले !

भीमकाने रूक्मीची कानउघाडणीच केली ! "तू कृष्णाला एवढा कां भितोस ? तू स्वतःला पराक्रमी समजतोस ना ! मग तू रुक्मिणीचे संरक्षण कर ना ?"

रुक्मीचा पराभव होऊन कृष्णाकडूनच त्याचा गर्व हरण व्हावा असे भीमकाला मनोमन वाटत होते. रुक्मीचे कृष्णापुढे काहीच चालणार नाही हेही त्याने जाणले होते. रक्मी चिडला. त्याने सैनिकांच्या पहार्‍यात रुक्मिणीला देवीच्या दर्शनाला नेण्याची तयारी केली !

रुक्मिणी सखींसह देवीच्या मंदिरात गेली. तिचे सौंदर्य पाहून लोक भुलून जात होते. तिने मौन धारण केले होते. पूजा केल्यावर मात्र तिने रडत रडत देवीची प्रार्थना केली- 'हे देवी जगदंबे, मला श्रीहरी पती लाभावा, अन्य कोणी नको, माझी एवढी इच्छा तू पूर्ण कर ?' तिने केलेली प्रार्थना देवीने ऐकली. देवी प्रगट झाली. नीलकमलांची एक दिव्य माला तिने रुक्मिणीच्या हाती दिली आणि 'ही माला श्रीकृष्णाच्या कंठात अर्पण कर' असे सांगून ’तुझी मनोकामना पूर्ण होईल' असा वर दिला. रुक्मिणीने देवीपुढे प्रणिपात केला. ती आनंदित झाली. हातात माळ घेऊन ती त्वरेने सखींसह बाहेर निघून रथापर्यंत चालू लागली.

आणि एक नवल घडले. तिच्या भोवती ज्या सशस्त्र सैनिकांचा पहारा होता त्यांची दृष्टी रुक्मिणीवर पडताच ते मोहित झाले. त्यांच्या हातातील शस्त्रे गळून पडली. आपले काम विसरून व देहभान नष्ट होऊन ते मूर्च्छा येऊन खाली पडले.

तीच नेमकी वेळ साधून कृष्ण रथातून तेथे आला. पटकन् पुढे वाकून कृष्णाने रुक्मिणीला हात दिला. ती त्याच्या रथात चढली आणि क्षणाचाही विलंब न लावता तिने ती माळ कृष्णाला अर्पण केली. तिने कृष्णाला वरिले. दारूकाने सरकन् रथ वळविला. रुक्मिणीला अत्यंत हर्ष झाला. तिने आपले मस्तक हरिचरणी लवविले. कृष्णाने तिच्या मस्तकावर आपला कमलसदृश हात ठेवला. "प्रिये ! आता भिक नकोस ! निश्चिंत रहा. तुझे रक्षण करणे माझे कर्तव्य आहे. " असे म्हणून तिला त्याने आश्वासन दिले. रथ द्वारकेच्या मार्गाला लागला. घोडे भरथाव चालले. यादवसेना जय्यत तयारच होती. रूक्मी, जरासंध व त्यांच्या पक्षाच्या इतर राजांच्या आणि वीरांच्या अंगाची क्रोधाने आगआग झाली ! मागधवीर त्यावेळी कृष्णाचा पाठलाग करू लागले. त्याचवेळी देवीच्या मंदिराभोवतालचे पहारेकरी बानावर आले ! रुक्मिणी कृष्णाने नेली असे कळताच त्यांनीही पाठलाग सुरू केला. अश्ववीर व रथीच यावेळी पाठलाग करू शकले !

नगरांत एकच गडबड उडाली !
अध्याय तेविसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP