॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय चौतिसावा ॥

श्रीकृष्णाची अग्रपूजा -


श्रीगणेशाय नमः ॥
बाप धर्माचा पाठिराखा । कमलोवद्‌भाचा जनक देखा ।
प्रेमळांचा निजसखा । सारथि पार्थाचा निर्धारें ॥ १ ॥
द्रौपदीचा पूर्ण कैवारी । नंदाचे घरींचा खिल्लारी ।
दुर्जनांचा संहार करी सहाकारी साधूंचा ।२ ॥
जो क्षीराब्धितनयेचा प्रियकर । आनकदुंदुभीचा कुमर ।
जो यादवकुळभास्कर । मन्मथशत्रु ध्याय जया ॥ ३ ॥
जो काळासही शासनकर्ता । जो हरिहरब्रह्मादिकांसी निर्मिता ।
जो महामायेचा निजभर्ता । कर्ता हर्ता पाळिता जो ॥ ४ ॥
जो क्षीरसिंधूचा जामात । जेणे धर्माचे घरीं केलें अद्‌भुत ।
तेणें स्वसंकल्पें उठविलें प्रेत । गतकथार्थ इतुका जाहला ॥ ५ ॥
गजरें होत राजसूययज्ञ । नित्य उत्तम अन्नसंतर्पण ।
जेविती ऋत्विज ब्राह्मण । नामस्मरणें गर्जती ॥ ६ ॥
जेथें पुरविता भगवान । तें मी काय वर्णूं दिव्य अन्न ।
त्या अन्नाच्या सुवासेंकरून । सुरगण लाळ घोंटिती ॥ ७ ॥
त्या अन्नसुवासा वेधोन । वसंत करी भोंवतीं प्रदक्षिण ।
नित्य जेविती ऋषिगण । परी वीट न ये सर्वथा ॥ ८ ॥
जैसा सोमकांताचा अचळ । तैसा भात शुभ्र निर्मळ ।
जैसा सुवर्णभाग पीत निखिळ । तैसें वरान्न पडियेलें ॥ ९ ॥
अमृतास आणिती उणें । ऐसीं पंचभक्ष्यें परमान्नें ।
विप्र जेविति नामस्मरणें । वारंवार गर्जती ॥ १० ॥
दधि-मधु-दुग्ध-घृत-सरोवर । शाका सुवासें भरिती अंबर ।
जेथे पुरविता इंदिरावर । तेथींची गोडी काय वर्णूं ॥ ११ ॥
तेथें वाढीत याज्ञसेनी । जे कृष्णाची प्रिय भगिनी ।
जैसी झळके सौदामिनी । तैसी वाढी चपळत्वें ॥ १२ ॥
अन्नें वाढितां निवाडें । उभय हस्तीचे झळकती चुडे ।
जेविती तयांवरी उजेड पडे । दिव्य रूपडें द्रौपदीचें ॥ १३ ॥
जे सुंदर घनश्यामवर्णा । म्हणोनि द्रौपदीतें म्हणती कृष्णा ।
जे सुभद्रेहुनि आवडे जगज्जीवना । ते पूर्ण अन्नपूर्णा अवतरली ॥ १४ ॥
विशाळभाळी पद्मनेत्री । सुहास्यवदना चारुगात्री ।
जे द्रुपदराजनिजपुत्री । ख्याती तिची त्रिभुवनीं ॥ १५ ॥
कोसकोसपर्यंत । जिचे अंगींचा सुवास धांवत ।
बोलता हिर्‍यांऐसे द्विज झळकत । किंवा विखरत रत्‍नखाणी ॥ १६ ॥
ऐसी ते केवळ अन्नपुर्णा । सदा अन्न वाढीत ब्राह्मणां ।
जिच्या करपात्रींचिया अन्ना । तुटी नाहीं कल्पांती ॥ १७ ॥
द्रौपदी कैसी चपळत्वें वाढीत । तें धर्म श्रीकृष्ण विलोकित ।
कृष्णरंगे रंगली सत्य । श्रम कल्पांतीं न बाधी ॥ १८ ॥
लक्षानुलक्ष जेविती ब्राह्मण । कृष्णा एकली वाढी आपण ।
घडी घडी श्रीकृष्णवदन । विलोकी परतोन सप्रेमें ॥ १९ ॥
न्याहाळूनि पाहे हरिरूप सुरेख । तो स्वेदे डवडविलासे मुखमृगांक ।
मृगमदतिलक सुवासिक । घर्मेंकरूनि भिजलासे ॥ २० ॥
सुरंग विराजे पीतांबर । गळा डोल देती मुक्तहार ।
कौस्तुभतेजें अंबर । परिपूर्ण कोंदलें ॥ २१ ॥
जो गोपीमानसराजहंस । जो स्वानंद-क्षीरसागरविलास ।
जो जगद्वंद्य पुराणपुरुष । तो याज्ञसेनी विलोकी ॥ २२ ॥
जे वैकुंठपीठींचे निधान । जे जलजोद्‌भवाचें देवतार्चन ।
जे सनकादिकांचे हृदयरत्‍न । प्रिय ठेवणें स्मरारीचें ॥ २३ ॥
जो भक्तपालक दीनबंधु । त्याचा विलोकूनि वदनइंदु ।
पुढे वाढीत ब्रह्मानंदु । हृदयी आनंदु न समाये ॥ २४ ॥
ब्राह्मण जेवूनि उठति । सवेंचि नृपांचा बैसल्या पंक्ती ।
दुर्योधनादि कौरव दुर्मती । तेही बैसले भोजना ॥ २५ ॥
पांडव आणि जगत्पती । तितुकेचि मागें राहती ।
वरकड बैसले एकपंक्ती । जेवावयाकारणे ॥ २६ ॥
वाढावयालागीं पुढती । सरसावली द्रौपदी सती ।
जैसा मेघ वर्षोनि मागुती । वर्षाव करी अद्‌भुत ॥ २७ ॥
किंवा अमृतक्षीरसागरी । येती लहरींवर लहरी ।
तैसी द्रौपदी राजकुमरी । उठाव करी दुसरेनें ॥ २८ ॥
जैसे शब्दीं नाद निघत । त्यांचा न कळे जैसा अंत ।
तैसी द्रौपदी सती वाढीत । परी अन्न न सरे पात्रींचे ॥ २९ ॥
जैशा जलदांचिया धारा । वर्षती न कळे अपारा ।
तैसी ते कृष्णा सुंदरा । वाढी पात्रें असंख्य ॥ ३० ॥
परी क्षणक्षणां परतोन । विलोकी जगज्जीवनाचें वदन ।
तो आंगींची उटी घर्मेंकरून । ठायीं ठायीं पुसलीसे ॥ ३१ ॥
भक्तांचे जे कष्ट सर्व । आपण आंगें सोशी माधव ।
उणें नेदी केशव । जो दयार्णव जगदात्मा ॥ ३२ ॥
सुखरूप वाढी द्रौपदी । श्रम आंगी कदा न बाधी ।
आंगे सोशी कृपानिधी । कष्ट सर्वही भक्तांचे ॥ ३३ ॥
असो द्रौपदी पाहे मागुती । तो अनुपम्य दिसे कृष्णमूर्ती ।
जिची त्रिभुवनीं अगाध कीर्ती । वर्णितां नेति म्हणे वेद ॥ ३४ ॥
ब्रह्मींचे तेज गोळा होऊन । हें कृष्णरूप ओतिलें सगुण ।
तो सच्चिदानंदतनु पूर्ण । भक्तजनप्रतिपाळक ॥ ३५ ॥
ऐसे वाढितां द्रौपदीस । काय बोले जगन्निवास ।
बाई आजि बहु भागलीस । प्राणसखये द्रौपदी ॥ ३६ ॥
तिचे पृष्ठीवरूनि हात । उतरी कमलोद्‌भवाचा तात ।
तों द्रौपदीस आनंद बहुत । मनामाजी न सांठवे ॥ ३७ ॥
परतोनि पाहे हरीचें वदन । किरीटकुंडलें मंडित पूर्ण ।
सरळ नासिक आकर्ण नयन । अत्यंत वदन सुरेख ॥ ३८ ॥
मुकुटाभोंवता दाटला घर्म । देखतां जाहली सप्रेम ।
म्हणे मजलागीं परब्रह्म । बहुत श्रम पावतसे ॥ ३९ ॥
मी काय होऊं उतराई । माझे सांवळे कृष्णाबाई ।
ऐसें बोलतां ते समयीं । सद्गद जाहली याज्ञसेनी ॥ ४० ॥
प्रेमें आंग फुगत । दोन्ही उरी तटतटित ।
बिरडें तुटलें अकस्मात । कौरवपंक्तींत वाढितां ॥ ४१ ॥
पल्लव जाहला विगलित । वक्षःस्थळ उघडे पडत ।
आकर्षोनियां कृष्णा होत । घाबरी पाहत चहूंकडे ॥ ४२ ॥
शकुनि सुयोधन कर्ण । एकाकडे एक दाविती खूण ।
नाना विनोद दुर्जन । करिते जाहले तेधवां ॥ ४३ ॥
लगबग करिती अवघे । एकासारिखें एक न मागे ।
म्हणती येथे उभी कां गे । अन्न आणीं सत्वर ॥ ४४ ॥
एक म्हणती उठा रे सकळ । आजि असे अन्नाचा दुकाळ ।
परम लज्जित वेल्हाळ । मुखकमळ कोमाइलें ॥ ४५ ॥
नेत्री वाहतीं अश्रुधारा । भोवतीं वाट पाहे सुंदरा ।
म्हणे श्रीरंगा यादवेंद्रा । तुज हें कां न कळेचि ॥ ४६ ॥
हांक फोडिती अवघेजण । अन्य पदार्थ मागती भिन्न भिन्न ।
जैसे सहस्र व्याघ्र करितां गर्जन । हरिणीचा प्राण जाऊं पाहे ॥ ४७ ॥
कीं आरडतां तान्हें बालक । त्यासी ताडिती सहस्र वृश्चिक ।
कीं क्षत देखोनि बहुत काक । उकरावया धांवती ॥ ४८ ॥
कीं चोहटां पडिलें अन्न । तेथें एकदांचि धांवती श्वान ।
तैसे कौरव चैद्य दुर्जन । नसतेंचि जाण मागती ॥ ४९ ॥
एक म्हणे भात आणीं । एक म्हणे आजि हरिदिनी ।
एक म्हणती ऐका हो वहिनी । तुम्हांसी दोन्ही कष्ट पडती ॥ ५० ॥
एक वृक्षावरी धडका हाणितां । डाहळिया डळमळती समस्ता ।
एक कर्दळीसी पांच गज भिडतां । मग तिची अवस्था नुरेचि ॥ ५१ ॥
तैसें रजनीमाजी तत्त्वतां । पाचांशी सुरतयुद्ध करितां ।
गात्रें ढिलीं पडतां । शक्ति नाहीं वाढावया ॥ ५२ ॥
ऐसें संकट देखोन । परतोनि विलोकी हरीचें वदन ।
म्हणे कृष्णा लपावयासी सदन । तुजवांचून नाहीं कोठें ॥ ५३ ॥
तेचि दुरात्मे पापमती । जे भक्तांचें उणें पाहती ।
द्रौपदीचा सहाकारी जगत्पती । म्हणे नाभी नाभी याज्ञसेनी ॥ ५४ ॥
तों यादवेंद्र मनमोहन । द्रौपदीच्या अंतरीं प्रवेशोन ।
भुजावरी भुजा निर्माण । करिता जाहला तये वेळीं ॥ ५५ ॥
बिरडें घालूनि सत्वर । सवेंचि सरसाविला पदर ।
टवटविला मुखचंद्र । द्रौपदीचा तेधवां ॥ ५६ ॥
बाप भक्त वत्सल कृपानिधी । चतुर्भुज केली द्रौपदी ।
दुर्जन जे कां मंदबुद्धी । अधोवदनें पाहती हो ॥ ५७ ॥
द्रौपदी आणि कृष्ण । पात्रीं पात्रीं भिन्न भिन्न ।
जें जयांसी पाहिजे अन्न । तें तें तयांसी ओपीत ॥ ५८ ॥
उगवता जैसा दिनकर । लाजोनि पळे अंधकार ।
की विष्णुसहस्रनामें दोषसंहार । होय जैसा एकाएकीं ॥ ५९ ॥
की मस्तकीं उर्वी धरितां । सर्षपप्राय भोगिनाथा ।
कीं वातात्मजे द्रोणाद्रि आणितां । श्रम सहसा न वाटे ॥ ६० ॥
तैसें द्रौपदीसी वाटे जाण । म्हणे किती मागतील दुर्जन ।
हेम् त्रिभुवन संपूर्ण । जेवूम् घालीन एकदांचि ॥ ६१ ॥
की शुंभ-निशुंभ मारूनी । यशस्वी जाहली भवानी ।
तैसी विजयी याज्ञसेनी । कौरवगर्व निवटूनि ।६२ ॥
कीं जान्हवीचा होतां स्पर्श । एकदांचि विरती सर्व दोष ।
हरिनाम ऐकता भूत-प्रेतांस । उपजे त्रास पळ घेती ॥ ६३ ॥
जो जो कोणी मागेल पदार्थ । त्यापुढें टाकी अन्नाचा पर्वत ।
भीमासी क्रोध दाटला अद्‌भुत । काय बोलत दुर्जनांप्रती ॥ ६४ ॥
म्हणे अन्न सांडितां निश्चिती । शिखा उपटोनि देईन हातीं ।
सकळ दुरात्मे खाली पाहती । प्रत्युत्तर न देती कोणीही ॥ ६५ ॥
अंतरमलिन ते दुराभिमान । त्यांत बुडाले अवघे दुर्जन ।
भीमाचा क्रोध देखोन । कोणासी वचन न काढवे ॥ ६६ ॥
कीं चोरट्यांसी मारमारूनी । शुष्क काष्ठें झोडिती रानीं ।
तैसे कौरवे दिसती तेचि क्षणीं । तेजहीन दुरात्मे ॥ ६७ ॥
कीं दिव्य देतां खोटा होय । कीं समरीं पावे पराजय ।
तैसे दुरात्मे यादवरायें । अपमानिले तेधवां ॥ ६८ ॥
भक्त बोलती वेळीं । धन्य हे कृष्णा वेल्हाळी ।
कृष्णें आपणाऐसीच केली । चतुर्भुज प्रत्यक्ष ॥ ६९ ॥
हे मंगलदायक भवानी । ईस वर मागा प्रार्थूनी ।
हे कोपलिया निर्वाणीं । कुळक्षय करील तुमचा ॥ ७० ॥
इचे ठायी कल्पितां विपरीत । तरी भस्म व्हाल समस्त ।
परी ते नायकती उन्मत्त । महापापिष्ठ विषयांध ॥ ७१ ॥
असो द्रौपदी गेली घरांत । तिजमागें गेला वैकुंठनाथ ।
पायी मिठी तेव्हां घालीत । प्रेमें स्फुंदत द्रौपदी ॥ ७२ ॥
कुंती पांडव ते वेळे । सदनामाजी प्रवेशले ।
म्हणती श्रीरंगे माउले । थोर वारिले संकट आजी ॥ ७३ ॥
धर्म म्हणे जगन्नाथा । कोणते उपकार आठवूं आता ।
माता पिता भयत्राता । तुजपरता दिसेना ॥ ७४ ॥
भीम आणि अर्जुन । स्फुंदस्फुंदोनि करिती रुदन ।
त्यांसी हृदयी धरूनि मधुसूदन । करी समाधान तयांचे ॥ ७५ ॥
द्रौपदीसी गहिंवर न सांवरे । नेत्रीम् वाहती जीवनझरे ।
म्हणे श्रीकृष्णा भुवनसुंदरे । उपकार न विसरेम् जन्मवरी ॥ ७६ ॥
श्रीकृष्णाचे निजकंठी । कुंती येउनि घाली मिठी ।
म्हणे कृपाळुवा जगजेठी । द्रौपदीसी समजावीं ॥ ७७ ॥
मग द्रौपदीसी म्हणे चक्रपाणी । वाढितां कष्टलीस गे मायबहिणी ।
तू सद्‌गुणरत्नांची खाणी । प्राणाहूनी आवडसी ॥ ७८ ॥
द्रौपदी बोले वचन । मी कोटिकोटी जन्म घेईन ।
परी तूंचि बंधु होईं पूर्ण । पाठिराखा कैवारी ॥ ७९ ॥
ऐसा एक संवत्सर । राजसूययज्ञ होत थोर ।
नित्य जेविती किती विप्र । लेखा नाहीं तयांते ॥ ८० ॥
सकळांसी भोजनें झालियावरी । पांडवांसहित पूतनारी ।
कुंती द्रौपदी सुंदरी । पंक्तीसी बैसती आठजण ॥ ८१ ॥
कृष्णपंक्तीसी भोजन । ब्रह्मादिकां न घडे पूर्ण ।
धन्य धन्य पंडुनंदन । जगज्जीवन वश ज्यांतें ॥ ८२ ॥
नित्य ब्राह्मणांच्या होती पंक्ती । स्वयेम् उच्छिष्ट काढी श्रीपती ।
ज्यासी वेदशास्त्रे वाखाणिती । अगाध कीर्ती अनुपम्य ॥ ८३ ॥
ठेवोनियां थोरपणाची प्रौढी । द्वारकाधीश पात्रें काढी ।
लाहेंलाहें तांतडी । पुढती पंक्ती बैसावया ॥ ८४ ॥
विद्युल्लताप्राय पीतवसन । सोगा त्याचा वरता खोंवून ।
कौस्तुभवनमाळा मागें टाकून । उच्छिष्ट काढी तांतडीने ॥ ८५ ॥
उच्छिष्टें काढितां जगन्मोहन । ठायीं ठायीं लेपिले अन्न ।
अन्नब्रह्मरूप मी पूर्ण । ऐक्यरूप दावीतसे ॥ ८६ ॥
एके पंक्तीसी लक्ष ब्राह्मण । ऐशा अमित पंक्ती पूर्ण ।
कोटिसंख्या होता जाण । स्वर्गघंटा वाजे एकदां ॥ ८७ ॥
त्यावरूनि केले गणित । मग धर्मराजा संतोषित ।
म्हणे श्रीकृष्णा हो तुजप्रीत्यर्थ । विश्वंभरा विश्वेशा ॥ ८८ ॥
तो महोत्साह पाहावया जाण । तेथे आला वेदव्यासनंदन ।
जो योगियांमाजी मुकुटरत्‍न । चंडकिरण दूसरा ॥ ८९ ॥
कामक्रोध जेणे जिंकिले । रंभेने नानापरी छळिलें ।
परी अणुमात्र नाहीं चळलें । मन जिंकिले जयानें ॥ ९० ॥
जो चिदंबरींचा निशाकर । कीं अपरोक्षज्ञानाचा समुद्र ।
की शांतीचे पूर्ण आगर । सुखें सुखरूप कोंदला ॥ ९१ ॥
असो मंडपद्वारीं क्षण एक । उभा राहिला श्रीशुक ।
तो मंडपघसणी होतसे देख । मार्ग न दिसे जावया ॥ ९२ ॥
शुक विचारी मनांत । धर्म केवळ कृष्णभक्त ।
येथींचा प्रसाद होईल मज प्राप्त । तरीच सार्थक जन्माचें ॥ ९३ ॥
कृष्णजी जेथें उच्छिष्टे काढीत । पडिले पत्रावळींचे पर्वत ।
शुकयोगींद्र बैसोनि तेथ । उच्छिष्ट शितें वेंचीतसे ॥ ९४ ॥
मुखी घालितां एक ग्रास । स्वर्गी घणघणी घंटाघोष ।
कदा न राहे आसमास । गजर विशेष जाहला ॥ ९५ ॥
श्रीकृष्णासी धर्मराज बोलत । हें काय जी वर्तलें अद्‌भुत ।
घंटा घणघणी कोण अर्थ । ते सांगा स्वामी यादवेंद्रा ॥ ९६ ॥
कोटि ब्राह्मण पंक्तीसी जेवितां । एक नाद होय तत्त्वतां ।
आतां न राहे वाजतां । जगन्नाथा नवल हें ॥ ९७ ॥
हरि म्हणे येथें तत्त्वतां । जेविला असेल ब्रह्मवेत्ता ।
ब्रह्मवेत्त्यासी वंदिती माथां । ब्रह्मादिक सहस्राक्ष ॥ ९८ ॥
ब्राह्मण जे कां यातिमात्र । ते एकशतभरी साचार ।
त्यांतुल्य एक वेदज्ञ विप्र । ग्रंथत्रयीं ज्ञान ज्याचें ॥ ९९ ॥
वेदज्ञाहूनि शतगुणें बहुत । जो वेदार्थ करणार पंडित ।
त्याहूनि अनुष्ठानी क्रियावंत । शतगुणे आगळा ॥ १०० ॥
अनुष्ठानियाहूनि शतगुणें आगळा । एक इंद्रियजित बोलिला ।
त्याही शतगुणे विष्णुभक्त सत्वाथिला । जो भेदरहित निर्मत्सर ॥ १ ॥
त्याहूनि शतगुणे विशेष शुद्ध । एक जाण पां ब्रह्मविद ।
ज्याचे दृष्टीस भेदाभेद । जाणपण दिसेना ॥ २ ॥
ऐसा ज्ञानी तुझे घरीम् । तृप्त झाला आजि निर्धारीम् ।
ऐक चौघेजण जाण या पृथ्वीवरी । ब्रह्मज्ञानी अद्‌भुत ॥ ३ ॥
कपिल याज्ञवल्क्य शुक । श्रीदत्तात्रेय चौथा देख ।
जो परिपूर्ण ज्ञानार्क । अत्रितनय अवतरला ॥ ४ ॥
धर्म हरिचरण दृढ धरीत । जो येथे जाहला तृप्त ।
तो मज दाखवावा निश्चित । म्हणवूनि आळ घेतली ॥ ५ ॥
मग धर्माचा धरूनि हस्त । वेगे दोघे बाहेर येत ।
तों रूप पालटूनि व्याससुत । वेगें वेंचीत उच्छिष्ट शितें ॥ ६ ॥
श्रीहरि म्हणे धर्मा देख । व्यासपुत्र हा महाराज शुक ।
ऐकता धावूनि निःशंक । चरण धरिले तयाचे ॥ ७ ॥
शुक मागें पाहे परतोन । तो उभा देखिला जगन्मोहन ।
दोघांसी पडिले आलिंगन । प्रेमेंकरून सद्गद ॥ ८ ॥
सवेंचि धर्मासी भेटला । धर्में शुकाचा हस्त धरिला ।
मंडपासी आणूनि पूजिला । बैसविला व्यासापाशीं ॥ ९ ॥
शुक देखतांचि दृष्टीं । आनंदल्या ऋषींच्या कोटी ।
मग धर्माहातीं जगजेठी । पूजन करी शुकाचें ॥ ११० ॥
असो एक संवत्सर लोटला । राजसूययज्ञ संपूर्ण जाहला ।
तेथींचा वर्णावया सोहळा । शेषही शक्त नव्हेचि ॥ ११ ॥
भीष्म निरोपी धर्मातें । अहेर अर्पिजे समस्तांते ।
सकळ बैसवूनि मयसभेतें । तेथींची कौतुकें दाखवीं ॥ १२ ॥
मयासुर पांडवांचा मित्र । जो दैत्यांमाजी विधीचा अवतार ।
तेणे ती सभा रचिली सुंदर । जे अनुपम्य त्रिभुवनीं ॥ १३ ॥
तेथें सभा वर्णिली अद्‍भुत । म्हणोनि सभापर्व म्हणती पंडित ।
जनमेजयासी वैशंपायन सांगत । श्रीभारतग्रंथामाजी ॥ १४ ॥
सभा रचिली ते वेळीं । आठही आय साधिले तळीं ।
अष्ट दिक्पाळ महाबळी । पायाचे मूळीं स्थापिले ॥ १५ ॥
विद्रुमशिळा आरक्तवर्ण । तेणें पाया आणिला भरून ।
स्फटिकशिळा शुभ्रवर्ण । त्याची पोवळीं लखलखित ॥ १६ ॥
सप्तरंगी पाषाण । चक्रे झळकती आंतून ।
अंतर्बाह्य देदीप्यमान । पाहता जन विस्मित ॥ १७ ॥
शेषफणांची आकृती । हिरेजडित झळकती ।
जेवीं उगवले गभस्ती । बैसले पंक्ती एकदां ॥ १८ ॥
इंद्रनीळाचे वारण । हिर्‍यांचे द्विज सतेज पूर्ण ।
ते खालते जडून । त्यावरी मंडप रचियेला ॥ १९ ॥
तळी पद्मरागांचे तोळंबे सबळ । वरी हिर्‍यांचे खांब विशाळ ।
निळ्यांची उथाळी सुढाळ । दिसती कल्लोळ तेजाचे ॥ १२० ॥
सुवर्णाचे तुळवट अखंड । माणिकांचे दांडे प्रचंड ।
गरुडपाचूंच्या किलच्या दृढ । अभेदपणे जडियेल्या ॥ २१ ॥
पेरोज्यांचे उंबरे तळवटी । पुष्कराजांच्या चौकटी ।
गजास्य जडिले मध्यपाटीं । आरक्तवर्ण माणिकांचे ॥ २२ ॥
घोंटीव जे मर्गजपाषाण । तेणें साधिलें मंडपांगण ।
वरी कनकवर्ण वृक्ष रेखून । तटस्थ नयन पाहतां ॥ २३ ॥
हिर्‍यांच्या मदलसा विशाळ । त्यांवरी मोतियांचे मराळ ।
वदनीं विद्रुमलतेचे किरळ । अतिचपळ दीसती ॥ २४ ॥
नीळरत्‍नांचे शिखी साजिरे । गरुडपाचूंचे कीर बरे ।
रत्‍नमणियांची सुंदरें । जांबुळें मुखीं आकर्षिलीं ॥ २५ ॥
धन्य मयासुराची करणी । शुक पाचूंचे बोलती क्षणक्षणीं ।
मयूर नाचती आनंदोनी । पुतळ्या खणोखणीं नाचती ॥ २६ ॥
प्रत्यक्ष रत्‍नपुतळे बोलती । सभेसी आलिया बैसा म्हणती ।
एक पुतळे आनंदे गाती । पुरे म्हणतां होती तटस्थ ॥ २७ ॥
नवल कर्त्याची करणी । पुढे सेवक वेत्रपाणी ।
धांवा म्हणती सभाजनी । चपळ चरणीं धावतीं ॥ २८ ॥
मेष कुंजर जटिल एकलहरी । आज्ञा होतां घेती झुंझारी ।
टाळ मृदंग वाजतां कुसरी । रागोद्धार करिती पैं ॥ २९ ॥
घटिकेनें घटिका भरतां दिवस । एक पुतळे पिटिती ताप्त ।
देवांगनांची रूपें विशेष । नृत्य करिती संगीत ॥ १३० ॥
हिर्‍यांच्या स्तंभांतरी । नृसिंहमूर्ती गर्जती हुंकारीं ।
कौस्तुभमणी झळकती एकसरीं । स्तंभांप्रति जडियेले ॥ ३१ ॥
कोठें जडियेले स्यमंतकमणी । कीं एकदांचि उगवले तरणी ।
दिवस किंवा यामिनी । ते स्थानीं नसे कोणा ॥ ३२ ॥
एकावरी एक शत खण । मंगळतुरें अनुदिन ।
लेपें वाजविती नवलविंदान । कर्तयानें दाविलें ॥ ३३ ॥
चपळा तळपती एकसरी । तैशा पताका झळकती अंबरीं ।
कलशजडित नानापरी । हिराविती गगनातें ॥ ३४ ॥
गरुडपाचूंचीं जोतीं । चित्रशाळा विशाळ दिसती ।
गोलांगुलें सारीं उडती । जीव नसतां चपळत्वें ॥ ३५ ॥
चतुर्दश भुवनें नृपांसहित । भिंतीवरी पुतळे रत्‍नजडित ।
त्यांची जैसी आकृति सत्य । प्रत्यक्ष तैसे काढिले ॥ ३६ ॥
नीळरत्‍नांचे वैकुंठ । हिर्‍यांचे कैलासपीठ ।
पुष्कराजांचें स्पष्ट । केलें वरिष्ठ ब्रह्मसदन ॥ ३७ ॥
इंद्र अग्नि यम निर्ऋती । वरुण समीर कुबेर मृडानीपती ।
त्यांच्या तनूची विशेष दीप्ती । प्रत्यक्ष मूर्ति दिक्पाळांच्या ॥ ३८ ॥
मित्र रोहिणीवर भूमिसुत । सोमसुत गुरु शुक्र शनीसहित ।
राहु केतु नवग्रह मूर्तिमंत । पाहतां तटस्थ जन होती ॥ ३९ ॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंहमूर्ति । वामन भार्गव राघवाकृती ।
कृष्ण बौद्ध कल्की अवतारस्थिती । चरित्रासमवेत प्रत्यक्ष पै ॥ १४० ॥
अतळ सुतळ वितळ । शेष वासुकी फणिपाळ ।
सप्त पाताळे निर्मळ । लोकासहित रेखिलीं ॥ ४१ ॥
सप्त द्विपें नव खंडें । छप्पन्न देश काननें प्रचंडें ।
सरिता सागर तीर्थें उदंडे । पापसंहारक रेखिली ॥ ४२ ॥
शिवचरित्रें विष्णुचरित्रें । शक्तिआख्यानें अतिविचित्रें ।
सोमकांतपाषाणी सरोवरें । सोपानें सुंदर बांधिलीं ॥ ४३ ॥
उष्णोदकाच्या पुष्करिणी । मंगळस्नान करितां जनीं ।
तनूवरी राजकळा ये ते क्षणी । नवल करणी त्याची ॥ ४४ ॥
स्फटिकभूमी देखोन । भुलती पाहावया नयन ।
भरलें तेथे जीवन । वस्त्रें सांवरोन चालती ॥ ४५ ॥
जेथें भरलें असे जळ । ते भूमी ऐसी दिसे केवळ ।
वस्त्रें सांवरिती अकुशळ । तो सभा सकळ हांसे वरी ॥ ४६ ॥
अंतर्बाह्य निर्मळ दिसती । सतेज काश्मीरांच्या भिंती ।
मार्ग म्हणवूनि बरळ धांवती । तों ते आदळती भिंतीसी ॥ ४७ ॥
केली हिर्‍यांचीं कवाडें कडोविकडी । झांकिलीं कीं न कळती उघडीं ।
प्रवेशतां संशय पाडी । मग हस्तेंकरूनि चांचपती ॥ ४८ ॥
सरोवरीं सुवर्णकमळीं सुवास । हे कळा दाविली विशेष ।
वरी नीळ्यांचे भ्रमर सावकाश । रुंजी घालिती आनंदें ॥ ४९ ॥
हिर्‍यांचे मीन तळपती । पाचूंचीं कांसवें आंग लपविती ।
काश्मीरांचे बक धांवती । मत्स्य धरावयाकारणे ॥ १५० ॥
त्रिभुवनसौंदर्य एकवटलें । तें मयसभेवरी ओतिलें ।
तें सभास्थल जेणें विलोकिलें । तेणें देखिलें ब्रह्मांड ॥ ५१ ॥
सभेसी जाता मार्गीं भले । चंदनाचे सडे घातले ।
पुष्पभार विखुरले । मृगमदें लेपिले भित्तिभाग ॥ ५२ ॥
सभासौंदर्य हाचि समुद्र । पाहातयांचे चक्षू पोहणार ।
ते न पावती पैलपार । अलीकडे बुचकळती ॥ ५३ ॥
कीं सभा सागराचें पैलतीर । मनविहंगम चपळ थोर ।
पाहावया नाहीं धीर । तेजावर्तीं पडे पैं ॥ ५४ ॥
ज्या ज्या पदार्थाकडे पाहे प्राणी । तिकडेचि चित्त जाय जडोनी ।
दिवस किंवा आहे रजनी । पाहातयांसी समजेना ॥ ५५ ॥
स्वर्ग मृत्यु पाताळ शोधितां । ऐसी सभा नाहीं तत्त्वतां ।
धन्य तो मयासुर निर्मिता । विरिंचिअंश सत्य पैं ॥ ५६ ॥
आरक्त पटांचे चांदवे दिसती । मुक्तघोंस भोंवते शोभती ।
दिव्य आस्तरणें पसरिलीं क्षितीं । गाद्या झळकती विचित्र ॥ ५७ ॥
पिकदानें ऊर्ध्वमुखें । तांबूलपत्रें अतिसुरेखें ।
परिमळद्रव्यें मृगमदांकें । पेट्या झळकती तयांच्या ॥ ५८ ॥
असो राजसूययज्ञासी जे जे आले । तितुकें मयसभेवरी चढविले ।
राजे ऋषी सर्व बैसले । ठायीं ठायीं सन्मानें ॥ ५९ ॥
धर्में अहेर सिद्ध केले । वस्त्रांबरांचे पर्वत पडिले ।
मुख्य सिंहासन मध्यें घातलें । अग्रपूजा करावया ॥ १६० ॥
भीष्म म्हणे धर्मराया । आचार्य-ऋत्विज-ऋषिवर्यां ।
यथायोग्य पाहोनियां । पूजा समग्र समर्पीं ॥ ६१ ॥
पुरुषांलागी सप्तभूषणें । तींही वस्त्रें कनकवर्णें ।
द्वादशांगीं अलंकारणें । स्त्रियांसी देणें तैसेंचि ॥ ६२ ॥
अंतर्वसन बाह्यवसन । कंचुकी वरूनि प्रावरण ।
पंचवसनें संपूर्ण । स्त्रियांलागीं देई कां ॥ ६३ ॥
तों धर्म म्हणे कुरुनायका । माझिया जनकाचिया जनका ।
अग्रपूजेचा अधिकार देखा । कोण मज निरोपीं ॥ ६४ ॥
भीष्म म्हणे पंडुसुता । या कृष्णाहूनि कोण परता ।
हें ब्रह्मांड शोधितां । श्रेष्ठ नाहीं आणिक ॥ ६५ ॥
हा जलजोद्‌भवाचा पिता । अपर्णापति वंदी माथां ।
शक्रासी शक्रपद हाता । येणें दिधलें कृपेनें ॥ ६६ ॥
जो जगदंकुरकंद । जो त्रिभुवनमंदिरस्तंभ अभेद ।
जो विश्वंभर ब्रह्मानंद । त्याहूनि थोर कोण असे ॥ ६७ ॥
ह्रदयवैकुंठपीठा आंत । विरिंचीचें आराध्यदैवत ।
अंतःकरणसांबळीमाजी वाहत । सनकादिक अत्यादरें ॥ ६८ ॥
हाचि मूळमायेचा भर्ता । हाचि अनंत ब्रह्मांडकर्ता ।
कैवल्य भांडारींचें ठेवणे तत्त्वतां । सगुण झाले भक्तांलागीं ॥ ६९ ॥
वेद पुराणें शास्त्र । अर्थ करिती विचित्र ।
तोचि जाणा राजीवनेत्र । कोमलगात्र श्रीरंग ॥ १७० ॥
त्वंपद तत्पद असिपद । त्याहूनि वेगळा सुबुद्ध ।
ऐसा वेदांत गाजे अगाध । तो हा गोविंद ओळखें ॥ ७१ ॥
मीमांसक स्थापिती कर्म । आचरावे ज्यालागी धर्म ।
तो हा जाण पुरुषोत्तम । उच्छिष्ट काढी तुमचे येथें ॥ ७२ ॥
नैयायिक म्हणती कर्ता ईश्वर । जीवासी न कळे स्वरूपपार ।
तोचि जाण श्रीकरधर । सारथी जाण पार्थाचा ॥ ७३ ॥
प्रकृतिपुरुषांचा ऐक्यार्थ । सांख्यशास्त्र असे गर्जत ।
तोचि हा क्षीराब्धिजामात । द्रौपदीचा कैवारी ॥ ७४ ॥
व्याकरणशास्त्रीं सप्त विभक्ती । नानासूत्रें नामें ध्याती ।
तोचि हा कंसांतक यदुपती । खिल्लारी म्हणती नंदाचा ॥ ७५ ॥
अष्टांगयोगादि साधन । पातंजल शास्त्राचेंही कथन ।
योग साधूनि पावावे चरण । याचेचि जाण पंडुसुता ॥ ७६ ॥
शैव यासी म्हणती सदाशिव । वैष्णव भाविती रमाधव ।
सौर म्हणती सविता स्वयमेव । तो हा माधव जाण पा ॥ ७७ ॥
गाणपत्य म्हणती गणेश । तो जाण द्वारकाधीश ।
शाक्त म्हणती शक्तिविशेष । हरि मायाविलासी हा ॥ ७८ ॥
संतांचे हृदयजीवन । जो समरधीर दुष्टभंजन ।
तुमचे दृष्टीसी सोयरा पूर्ण । जगद्‌भूषण दिसतो हा ॥ ७९ ॥
दुर्जन दुरात्मे पामर । ते यासी म्हणती कपटी दुराचार ।
हा जगद्‌गुरु यादवेंद्र । जो मुरहर मधुसूदन ॥ १८० ॥
त्या श्रीकृष्णासी टाकून । कोणाचें येथें करिसी पूजन ।
ऐसें बोलतां गंगानंदन । सहदेवे पूजा सिद्ध केली ॥ ८१ ॥
अग्रोदकाचा भरूनि कलश । षोडशोपचार जे जे विशेष ।
पूजावया परमपुरुष । धर्मराज सिद्ध जाहला ॥ ८२ ॥
सुगंधचंदनपात्र घेऊन । उठावला भीमसेन ।
सुवासपुष्पमाळा घेऊन । पार्थ उभा आवडीनें ॥ ८३ ॥
हिर्‍यांची चवकी अढळ । लाहेंलाहें घाली नकुळ ।
वरी क्षीरोदकवस्त्र निर्मळ । घडी घातली तयावरी ॥ ८४ ॥
धर्म म्हणे श्रीरंगा यदुकुळटिळका । या चौरंगीं बैसा मन्मथजनका ।
भक्तवत्सला वैकुंठपालका । कर्ममोचका मुरारे ॥ ८५ ॥
पुढील कार्य जाणोनि साचार । आग्रह न धरीच श्रीधर ।
पूजासनीं बैसला यादवेंद्र । जयजयकार जाहला ॥ ८६ ॥
प्रतिविंध्यादि द्रौपदीचे कुमर । वेगे धरिती छत्रचामर ।
वाळ्याचे विंझणे सुखकर । दोहींकडे वारिती ॥ ८७ ॥
सुभद्रेचा पुत्र अभिमन्य । उभा ठाकला पादुका घेऊन ।
भीष्म विदुर अवघे भक्तजन । उभे ठाकले आवडीने ॥ ८८ ॥
वैष्णव कीर्तनें करिती । हरिरंगें आनंदे नाचती ।
विष्णुचरित्रें अद्‌भुत गाती । टाळ्या वाजविती आनंदें ॥ ८९ ॥
विमानीं बैसोनि सुरवर । वर्षती सुमनांचे संभार ।
सनकादिकांचे नेत्र । प्रेमजळें पूर्ण भरले ॥ १९० ॥
नाना वाद्यांचे गजर होत । बंदीजन यदुवंश वर्णीत ।
षोडशोपचारें इंदिराकांत । धर्म पूजीत तये वेळीं ॥ ९१ ॥
हरिचरण धरूनि हातीं । प्रेमे क्षाळी धर्मनृपती ।
जे जान्हवीची उत्पत्ती । सप्तपाताळीं होती सिंधुकन्या ॥ ९२ ॥
सद्‌गुरूसी शरण जाऊन । ज्ञानें ओळखिजे निर्गुण पूर्ण ।
परी त्यापरीस गोड सगुण । भक्तांलागी अवतरलें ॥ ९३ ॥
जो पुराणपुरुष परात्पर । जो आनकदुंदुभीचा कुमर ।
हरिभजनीं वारंवार । हृदयीं ध्यास जयासी ॥ ९४ ॥
केवळ ब्रह्मानंद मुरोन । मुर्ति ओतिली सगुण ।
श्रुतींसीही न वर्णवे पूर्ण । बुडे मन सहितकरणें ॥ ९५ ॥
तों अलंकारमंडित पूर्ण । किरीटकुंडलें सुहास्यवदन ।
कृपाकटाक्षेंकरून । निजभक्तां न्याहाळी जो ॥ ९६ ॥
कपाळीं मृगमदाचा टिळक । आंगीं केशरी उटी सुरेख ।
वैजयंतीचे तेज अधिक । हृदयी पदक झळकतसे ॥ ९७ ॥
मनोहर पीतवसन । मुक्तलग पदर विराजमान ।
उत्तरीय वस्त्र झळके पूर्ण । जेवी चपळा निराळीं ॥ ९८ ॥
चरणी ब्रीदें तोडर रुळती । असुरांवरी गजर करिती ।
ऐसा तो यादवेंद्र जगत्पती । धर्मराय पूजी तया ॥ ९९ ॥
वेद-शास्त्रग्रंथ विलोकून । ज्यांचे शिणले सदा नयन ।
ते कृष्णमूर्ति सदा पाहोन । ब्रह्मानंदे डुल्लती ॥ २०० ॥
जै वैराग्यें जाहले तप्त । जे तीर्थें हिंडती विरक्त ।
तिंहीं देखतां द्वारकानाथ । श्रमरहित जाहले ॥ १ ॥
जप तप अनुष्ठान । कर्मकुशल करिती यज्ञदान ।
जे एकांतीं गुहा बैसले सेवून । तेही हरिरूप पाहूनि निवाले ॥ २ ॥
हेलावला सौंदर्यसमुद्र । की आनंदाचा लोटला पूर ।
श्रीकृष्ण देखुनि पूर्णचंद्र । भक्तचकोर वेधले ॥ ३ ॥
तो वैकुंठींचा नृपवर । ब्राह्मणदेव अतिउदार ।
जो ब्रह्मादि देवांचें माहेर । जो भ्रतार इंदिरेचा ॥ ४ ॥
कोट्यनुकोटी मीनकेतन । नखांवरूनि सांडावे ओंवाळून ।
त्याचें आपुले हातीं पूजन । पंडुनंदन करीतसे ॥ ५ ॥
वस्त्रें भूषणें अलंकार । अर्पी सोळाही उपचार ।
करणेंसहित मन सुकुमार । सुमनें चरणीं समर्पिलीं ॥ ६ ॥
डोळे भरूनि हरि पाहिला । तैसाचि मग हृदयी रेखिला ।
जैसा निवांतस्थानीं दीप ठेविला । तो कदापि न हाले ॥ ७ ॥
ऐसा पुजिला यादवेंद्र । परी दुर्जन क्षोभले समग्र ।
आता शिशुपाळाचें शिर । उडवील साचार श्रीकृष्ण ॥ ८ ॥
शत शिव्या देईल सभेंत । शेवटीं तयासी मोक्ष प्राप्त ।
ते सुरस कथा परिसोत पंडित । अत्यादरेंकरूनियां ॥ ९ ॥
श्रीधरवरद ब्रह्मानंद । जो अभंग अक्षय अगाध ।
तो हरिविजयामाजी जगदंकुरकंद । विराजे सदा स्वानंदें ॥ २१० ॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुस्त्रिंशतिमोऽध्याय गोड हा ॥ २११ ॥
अध्याय चौतिसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

राजसूय यज्ञाच्या वेळी धर्माच्या आतिथ्यशीलतेमुळे सहस्रावधी ब्राह्मण भोजन करून संतुष्ट होत होते. द्रौपदी पंक्तीत वाढता वाढता दमून जात होती. राजे व मुख्य मुख्य लोकाग्रणीही पंक्तीत जेवत होते. श्रीकृष्ण, द्रौपदी व भीमसेन या तिघांनी भोजनव्यवस्थेकडे नीट लक्ष दिले होते. द्रौपदी दमली तंरी कृष्णाच्या दर्शनाने जणू तिला नवीन चैतन्य येत होते, आणि तिच्याऐवजी कृष्ण घामाघूम होत होता. धर्म, अर्जुन वगैरेजण या गोष्टीचे नवल करीत होते आणि आणखी एका गोष्टीचे रहस्य कोणालाही कळत नव्हते - दौपदीने कितीही लोकांना थाळीतून अन्न वाढले तरी ते संपत नव्हते, थाळी आपोआप कायम भरलेली होती.

कृष्ण वारंवार तिला म्हणत होता- ' कृष्णे, किती दमलीस ?' त्यामुळे द्रौपदीचा उत्साह व आनंद वाढत होता. कृष्णाचे शरीर घामाने भिजलेले असून आपल्याला मात्र घाम येत नाही, थकवा वाटत नाही, असे लक्षात येताच द्रौपदीला भक्तवत्सल कृष्णाच्या दयाळूपणाबद्दल विलक्षण भक्ती वाटली. कृष्णा, तुझे उपकार मी आजन्म फेडू शकणार नाही." असे म्हणून आनंदाश्रू नेत्रात आणून ती पुढच्या पात्रात अन्न वाढण्यास वाकली. तेवढ्यात तिच्या काचोळीची पाठीवरची ग्रंथी सुटली ! तिच्यावर केवढा विचित्र प्रसंग आला होता !

भर पंक्तीत, पुरुषवर्ग जेवत असतां काचोळी सुटून तिचे स्तन अनावृत्त झाले ! ती कमालीची लाजली, घाबरली, ही पृथ्वी यावेळी आपल्याला पोटांत घेईल तर फार बरे होईल असे तिला वाटले. त्या पंक्तीत दुर्योधन शकुनी, कर्ण इत्यादि लोक बसले होते. त्यांनी एकमेकांना संकेत करून तिच्याजवळ एकाच वेळी विविध पदार्थ मागण्यास सुरुवात केली, तिची क्रूर थट्टा करू लागले. कोणी भात मागे, कोणी पुरण, कोणी लाडू कोणी काही कोणी काही मागे- "वहिनी ! लवकर वाढ, धर्माच्या यज्ञात अन्न कमी पडले की काय ? पाच पतींशी संसार केल्यामुळे इथे पंक्तीत वाढायला बळ राहिले नाही असे दिसते." वगैरे टोमणे ते मारू लागले.

द्रौपदीची दयनीय अवस्था पाहून कृष्णाने अलौकिक लीला दाखवली. द्रौपदीला आणखी दोन हात निर्माण झाले ! त्या हातांनी तिने काचोळी घट्ट बांधली, पदर सावरला आणि नाना प्रकारचे पदार्थ ती वाढू लागली. तो अद्‌भुत चमत्कार पाहून कौरव गप्प झाले. त्यांनी लज्जेने खाली माना घातल्या आणि ते मुकाट्याने जेवू लागले.

नेह भोजनानंतर पांडव सदनात बसले असतां द्रौपदीने कृष्णाच्या पाया पडून 'कृष्णा, माझी लाज तूंच राखलीस" असे वारंवार म्हणून 'बंधु असावा तर असा असावा' असे ती बोलू लागली. "जन्मोजन्मी तुलाच भाऊ मानीन" असे ती म्हणत होती आणि अर्जुन व भीम कृष्णाला कृतज्ञतेने मिठ्या मारीत होते.

राजसूय यज्ञात कृष्ण मी पांडवांबरोबरच जेवायला बसत असे, आणि उष्टी पात्रे तो स्वतः उचलीत असे !

एकदा काय झाले, ब्राह्मण भोजने चालली असता सर्वांना मथुर घंटेचा निनाद ऐकू येऊ लागला ! धर्माला या गोष्टीचे नवल वाटले.

कृष्ण म्हणाला- "जेथे एक कोटी ब्राह्मण भोजन करून जातात तेथेच हा घंटानाद होतो. पण खरा ब्रह्मज्ञानी ऋषी एकटा जेवला तरीही असाच घंटानाद ऐकू येतो. शुक, दत्त, याज्ञवल्क्य व कपिल यांपैकी कोणीतरी गुप्तपणे या क्षणीं येथे अन्नग्रहण करीत आहे ! आपण पाहूं या."

धर्म व कृष्ण पंक्तीतून फिरत निरीक्षण करू लागले पण तिथे चारापैकी कोणी नव्हता. मग कृष्ण मंडपाबाहेर गेला. जेथे उष्टी पात्रे कृष्णाने टाकली होती ते थेच शुकमुनी त्या पात्रातील अन्न घेऊन खात होते ! धर्माच्या यज्ञात ब्राह्मण जेवतात व त्यांची उच्छिष्टे कृष्णाच्या हातून बाहेर टाकली जातात- ते उष्टे अन्न त्रैलोक्याला पावन करणारे म्हणून शुकमुनीही आदराने खात होते ! धर्माने पुढे जाऊन त्यांना वंदन केले व मंडपांत मोठ्या आदराने नेऊन भोजनास बसविले, व्यासांच्या जवळ व्यासपुत्र शुक श्रीकृष्णासम्मुख बसून त्या ठिकाणी जेवला !

मयसभेत बसून धर्म राजेलोकांना आहेर देणार होता. पूर्वी खांडव वन अग्नीने जाळले होते. त्या वनांत रहाणार्‍या मयासुराला कृष्णार्जुनांनी जीवदान दिले होते. त्या मयासुराने विलक्षण चमत्कारिक, अद्‌भुत असे सभागृह पांडवाना बांधून दिले होते. त्या मयसभेत शिव, विष्णू, देवी यांच्या अवतारांची चित्रे कोरलेली होती. सर्व प्रकारची कला त्या ठिकाणी उपयोगात आणलेली होती. पाण्याच्या जागी जमीन आहे की काय, व जमिनीच्या जागी पाणी आहे की काय, असा भास होऊन मोठी फसगत होत असे. सर्वत्र सारखाच प्रकाश तेथे असल्यामुळे दिवसरात्र असा भेद वाटत नसे. फारच सुंदर, वैभवशाली, विशाल, नयनरम्य व जादूने भरलेले ते सभागृह पहाण्यातही मोठी करमणूक होऊन जाई. नाना प्रकारचे रत्‍नजडित खांब, तावदाने, पशुपक्ष्यांची चालती बोलती चित्रे यांनी त्या सभेचे स्वरूप मोठे दृदयंगम झालेले होते !

सर्व राजे त्या सभेत आसनस्थ झाला. भीष्म धर्माला म्हणाले- "आचार्य, ऋत्विज, व श्रेष्ठ ऋषी यांचा यथायोग्य मान ठेवून त्यांना तू आहेर दिलेस तर योग्य होईल. " तेव्हा धर्माने सर्वात प्रथम कोणाचे पूजन करून अहेर द्यावा अशी पृच्छा केली. तेव्हा श्रीकृष्णाचे गुणवर्णन करून अग्रपूजेचा मान कृष्णालाच देणे कसे योग्य आहे ते भीष्मांनी धर्माला सांगितले. श्रीकृष्ण हा विष्णूचा पूर्णावतार आहे व विष्णूच सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, कृष्ण हा सर्व ऋषींचा ध्येय, वेदांचा विषय, देवांचा पूजनीय, मानवांना मान्य व सृष्टीच्या हदयस्थानी आहे असे त्यांनी म्हटले.

धर्माने अग्रोदक भरलेला कलश हाती घेतला. सहदेवाने पूजा साहित्य आणलेच होते. भीमाने गंधपात्र व अर्जुनाने पुष्पमाळा घेतल्या. नकुलाने चौरंग आणला आणि त्यावर शुभ वस्त्र घातले. चौरंग उच्च स्थानी मांडण्यात आला.

त्या चौरंगावर धर्माच्या विनंतीवरून कृष्ण स्थानापन्न झाला. त्याच्या नांवाचा जयघोष झाला. द्रौपदीचे पुत्र विंझणवारे घालू लागले. सर्व सभाजन पाहूं लागले. धर्माच्या राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान लाभावा ही गोष्ट दुर्योधन, शकुनी, शिशुपाल इत्यादी राजांत मुळीच आवडली नाही ! धर्म कृष्णाचे चरण क्षालन करीत होता तोच त्याविरुद्ध आवाज सभेतून उठला !
अध्याय ३४ समाप्त. ॥ श्रीकृणार्पणमस्तु ॥


GO TOP