॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय पस्तिसावा ॥

शिशुपालाच वध -


श्रीगणेशाय नमः ॥
माझें हृदय दिव्य कमळ । जें तेजोमय परम निर्मळ ।
अष्टकर्णिका अतिकोमळ । मध्यें घननीळ विराजे ॥ १ ॥
हृत्पद्म मध्यें गंभीररेखा । श्रीरंग नांदे भक्तसखा ।
अष्टकर्णिकांवरी अष्टनायिका । त्याही स्थापूं निजध्यानीं ॥ २ ॥
रुक्मिणी जांबुवंती सत्यभामा । कालिंदी मित्रविंदा मनोरमा ।
याज्ञजिती लक्ष्मणा पूर्णकामा । मद्रावती आठवी ॥ ३ ॥
मध्यभागीं श्रीकरधर । कर्णिकांवरी नायिका सुकुमार ।
ऐसा हृदयकमळीं यादवेंद्र । सर्वदाही पूजावा ॥ ४ ॥
चौतिसावे अध्यायीं कथा जाणा । धर्में अग्रपूजा दिधली कृष्णा ।
तेणे क्षोभ आला दुर्जनां । शिशुपाळादिकांसी ॥ ५ ॥
चैद्य आणि कौरव । एके सभेसी बैसले सर्व ।
क्षुद्रदृष्टीं लक्षिती माधव । परम द्वेषी दुरात्मे ॥ ६ ॥
शिवलिंग देखतां दृष्टीं । शिवद्वेषी होती जेवीं कष्टी ।
कीं विष्णुप्रतिमा पाहतां पोटीं । दुःख कपाळी जंगमां ॥ ७ ॥
कीं देखता साधूंचें पूजन । परम क्षोभती जैसे कुजन ।
कीं पतिव्रतेची राहटी पाहोन । जारिणी जेवी निंदिती ॥ ८ ॥
कीं दृष्टीं देखतां राजहंस । कावळियांसी उपजे त्रास ।
कीं पंचानना देखूनि सावकाश । जंबुकासी आनंद वाटेना ॥ ९ ॥
कीं सभेत देखोनि पंडित । मूर्ख मतिमंद संतापत ।
कीं दृष्टी देखतां समीरसुत । वाटे अनर्थ रजनीचरां ॥ १० ॥
कीं ऐकतां हरिनामघोष । भूत-प्रेतांसी उपजे त्रास ।
तैसें पूजितां श्रीरंगास । दुर्जन परम संतापले ॥ ११ ॥
अंतरींच कष्टी कौरव संपूर्ण । परी चैद्यांमाजी दमघोषनंदन ।
परम दुखावला दुर्जन । काळसर्प ज्यापरी ॥ १२ ॥
भीष्मासी म्हणे कुंतीनंदन । आतां कोणाचें करूं पूजन ।
गंगात्मज बोले वचन । तों शिशुपाळ जल्पे भलतेंचि ॥ १३ ॥
म्हणे रे धर्मा ऐकें वचन । तुम्ही नीच मूर्ख अवघेजण ।
गोरक्षक आधीं पूजन । अपेश माथां घेतलें ॥ १४ ॥
योग्यायोग्य विचार । मूढा तुज न कळे साचार ।
अग्रपूजेसी अधिकारी जार । करितां पामर पांडव तुम्ही ॥ १५ ॥
दोघे जनक त्या गोरक्षातें । पंच तात तुम्हां पांडवांतें ।
यालागीं दोघांचीं चित्तें । एक जाहलीं परस्परें ॥ १६ ॥
परम मूर्ख युधिष्ठिर । बुद्धिभ्रष्ट जाहला गंगाकुमर ।
पूजेसी अधिकारी तस्कर । केला साचार यज्ञमंडपीं ॥ १७ ॥
ऋत्विज सांडूनि सत्यवतीकुमर । कपिल याज्ञवल्क्य वसिष्ठ ब्रह्मपुत्र ।
द्रोण कृपाचार्य गुरुवर । टाकूनि जार पूजिला ॥ १८ ॥
धृतराष्ट्र सांडूनि वृद्ध । सोयरा सांडूनि द्रुपद ।
कोण्या विचारें बुद्धिमंद । हा गोविंद पूजिला ॥ १९ ॥ ं
अश्वत्थामा गुरुनंदन । पूजावा होता सूर्यसुत कर्ण ।
पृथ्वीपति सुयोधन । सांडूनि कृष्ण पूजिला ॥ २० ॥
भीमक बाल्हीक वृद्ध थोर । शल्य एकलव्य भगदत्त वीर ।
जयद्रथ शकुनि महावीर । सांडूनि तस्कर पूजिला ॥ २१ ॥
पूज्य अपमानूनि थोर थोर । अपूज्यासी पूजिलें साचार ।
येणें तुमचें यश कीर्ति पुण्य समग्र । बुडोनि भ्रष्ट जाहले ॥ २२ ॥
येणें कोणतें केलें अनुष्ठान । कीं केलें जप तप व्रत साधन ।
किंवा येणें केलें वेदपठन । म्हणोनि आधीं पूजिला ॥ २३ ॥
यासी म्हणावें रायासमान । तरी नाहीं छत्र-सिंहासन ।
आचार्य नव्हे हा ब्राह्मण । भ्रष्टपूजन व्यर्थ केलें ॥ २४ ॥
आम्ही बैसलों असतां नृपवर । आधीं पूजिला गोपाळकुमर ।
आमुचें घ्राण छेदिलें समग्र । परम अपवित्र पांडव तुम्ही ॥ २५ ॥
पूजणें होतें जरी गोवळा । तुवां कुष्ठपुत्रा अमंगळा ।
आम्हांसी कां आणिलें खळा । यज्ञ गेला वृथा तुझा ॥ २६ ॥
म्या तुज दिधला करभार । कीं दुर्बळा हा कुष्ठपुत्र ।
धर्मकृत्यासी साह्य करावें साचार । विवेकी नर बोलती ॥ २७ ॥
तुवां अपमानिलें भूपाळां । येथें थोर केला गोवळा ।
इतुकेनि आम्हां नीचत्व सकळां । सर्वथाही नव्हेचि ॥ २८ ॥
यज्ञपुरोडाश अरण्यांत पडिला । तो एका जंबुकासी लाधला ।
तितुकेने काय तो श्रेष्ठ झाला । मृगेंद्राहूनि थोर पैं ॥ २९ ॥
जैसी राजकन्या परम सुंदर । षंढाप्रति दिधली साचार ।
हिंसकासी गोदान निर्धार । दिधलें तुवां पंडुपुत्रा ॥ ३० ॥
जन्मांधासी दर्पण दाविला । सूकर सिंहासनीं बैसविला ।
येणें जरासंध कपटें मारिला । कोणता केला पुरुषार्थ ॥ ३१ ॥
ऐसे बोलोनि पापमती । खड्‌ग गवसवूनि आपुले हातीं ।
म्हणे उठा रे आमुचे सांगाती । जे असाल तितुकेही ॥ ३२ ॥
ऐसें बोलतां शिशुपाळ । तात्काळ उठिले अवघे खळ ।
कृष्णद्वेषी परम चांडाळ । अति कोल्हाळ करिती ते ॥ ३३ ॥
धर्में धांवोनि तत्काळ । हृदयीं कवळिला शिशुपाळ ।
म्हणे तूं आमुचा बंधु केवळ । यज्ञ हा सकळ तुझा असे ॥ ३४ ॥
ऋषि तपस्वी वृद्ध राजेंद्र । कृष्ण पूजितां त्यांसी आनंद थोर।
तूंही कृष्णभजनीं सादर । अनन्य होईं शिशुपाळा ॥ ३५ ॥
परम जाणता गंगानंदन । वृद्ध वडील सर्वमान्य ।
त्यांचे आज्ञेनें म्यां केलें पूजन । तूं कां दूषण ठेविसी ॥ ३६ ॥
तुजहूनि जाणते पंडित । कृष्णपूजने ते आनंदत ।
तुझे हृदयीं हा अनर्थ । काय म्हणोनि प्रवेशला ॥ ३७ ॥
तंव भीष्म यथार्थ बोले वचन । परम नष्ट हा दमघोषनंदन ।
त्याचें कासया करिसी शांतवन । त्यासी मरण जवळी असे ॥ ३८ ॥
कां याचें करिसी समाधान । कदा न मानी तुझें वचन ।
जैसीं वस्त्रें भूषणे प्रेतासी पूर्ण । काय लेववून सार्थक ॥ ३९ ॥
मतिमंदापुढें ठेविलें शास्त्र । षंढाहातीं दिधलें शस्त्र ।
मसणीं मंडप विचित्र । व्यर्थ जैसे उभारिले ॥ ४० ॥
वायसासी अमृतफळें । कीं उष्ट्रासी समर्पिलें केळें ।
की रासभाच्या अंगासी लिंपिलें । मृगमदाचें उटणें हो ॥ ४१ ॥
द्राक्षफळें अर्पिलीं सूकरा । आदर्श दाविला जन्मांध नरा ।
कीं कृमियांसी समर्पिली शर्करा । तैसा या पामरा काय बोध ॥ ४२ ॥
भग्नपात्रीं जीवन । कां श्रमावें व्यर्थचि घालून ।
दुग्धामाजी हरळ रांधून । काय व्यर्थचि जाण पां ॥ ४३ ॥
उकिरडां ओतिलें सुधारसा । सुमनशेजेवरी निजविली म्हैसा ।
दुग्धें न्हाणिलें वायसा । शुभ्र नव्हे कदापि ॥ ४४ ॥
तैसा हा सुबुद्धि न धरी पामर । जैसा तस्कर विटे देखोनि निशाकर ।
हिंसकासी धर्मशास्त्र साचार । कदा नावडे जाण पां ॥ ४५ ॥
आम्हीं ज्याचें केलें पूजन । त्यासी हृदयीं ध्यान ईशान ।
जलजोद्‌भव सहस्रनयन । अनन्यशरण जयासी ॥ ४६ ॥
जो जगद्‌गुरु इंदिरावर । जो प्रतापमित्र समरधीर ।
ऐसा कोण असे पामर । जो पूजा इच्छी त्याआधीं ॥ ४७ ॥
जो भवगजविदारक पंचानन । सनकादिक ज्यासी शरण ।
त्यासी आधीं पूजितां पूर्ण । कां हा दुर्जन दुखावला ॥ ४८ ॥
जो अनंतब्रह्मांडनायक । भोगींद्र जाहला ज्याचा तल्पक ।
तो पुराणपुरुष निष्कलंक । जगद्वंद्या अनादि जो ॥ ४९ ॥
हा एवढी आगळीक बोलत । कोठें यानें केला पुरुषार्थ ।
महागज देखता भुंकत । श्वान जेवी अनिवार ॥ ५० ॥
ऐसें बोलतां शंतनुकुमर । तों सहदेवासी आवेश दाटला थोर ।
जैसा का गजांत मृगेंद्र । उभा राहोनि बोले ते वेळीं ॥ ५१ ॥
आम्ही सभास्थानीं निश्चित । यथार्थ पूजिला वैकुंठनाथ ।
असह्य मानी त्याचे पूर्वज समस्त । चरणातळीं माझिया ॥ ५२ ॥
जो कृष्णासी निंदी दुर्जन । त्याची जिव्हा घ्राण छेदीन ।
रासभावरी बैसवून । पिटीन जाण दिगंतरीं ॥ ५३ ॥
ऐसें सहदेव बोलतां आगळें । जयजयकारें देव गर्जले ।
पुष्पांजुळी वोपिते झाले । माद्रीपुत्रावरी तेधवां ॥ ५४ ॥
आकाशीं देववाणी गर्जत । धन्य धन्य सहदेव भक्त ।
नारद म्हणे ऐका समस्त । मोठा अनर्थ होईल आतां ॥ ५५ ॥
जेणें निंदिला द्वारकानाथ । त्याजवळी आला रे अनर्थ ।
तो प्रेतप्राय निश्चित । जननी व्यर्थ प्रसवली ॥ ५६ ॥
ऐसें ऐकोनि ते वेळां । शिशुपाळ अत्यंत क्षोभला ।
घेऊनि दुर्जनांचा मेळा । उभा ठाकला संग्रामा ॥ ५७ ॥
म्हणे या वेळे पांडव भीम । कृष्णासमवेत करीन भस्म ।
अवघे खळ निघोनि परम । कोल्हाळ करिती तेधवां ॥ ५८ ॥
जैसा दृष्टी देखता राजहंस । एकदांचि कोल्हाळ करिती वायस ।
युधिष्ठिर म्हणे भीष्मास । कैसें आतां करणें जी ॥ ५९ ॥
मग बोले गंगाकुमर । तू स्वस्थ राही न सांडीं धीर ।
कैसा तरेन मी सागर । कुंभोद्‌भवें विचार करावा कां ॥ ६० ॥
निद्रिस्थ श्रीकृष्णपंचानन । तंववरीच हे जंबुक करिती गर्जन ।
हा धडधडित कृशान । दुर्जनकानन जाळील पैं ॥ ६१ ॥
श्रीकृष्णवडवानळावरी एक वेळे । चैद्य उठले तृणाचे पुतळे ।
शिशुपाळ कर्पूर बळें । पुढें धांवतो विझवावया ॥ ६२ ॥
याचा परिवार जो सकळी । ही मेणाचीं जैसीं बाहुलीं ।
श्रीरंग हा ज्वाळामाळी । भस्म करील क्षणार्धें ॥ ६३ ॥
ऐसें ऐकतां शिशुपाळ । क्रोधें खवळला जैसा व्याळ ।
कुशब्द तेचि टाकी गरळ । भीष्मासी समोर लक्षूनियां ॥ ६४ ॥
म्हणे रे भीष्मा दुष्टा वृद्धा । परम हीना बुद्धिमंदा ।
कपटिया आमुची करतोसी निंदा । तुझी जिव्हा कां झडेना ॥ ६५ ॥
कोणता कृष्णें केला पुरुषार्थ । म्हणोनि जल्पसी सभेआंत ।
पूतना वृद्ध स्त्री मारिली सत्य । म्हणोनि वाढीव बोलसी ॥ ६६ ॥
केशी अश्व मारिला देख । काळिया अघासुर दंदशूक ।
बकासुर पक्षी एक । मारूनि पुरुषार्थी जाहला ॥ ६७ ॥
गोवर्धन तरी एक वल्मीक । कपटी म्हणोनि गिळिला पावक ।
कपटेंचि कंस काळयवनादिक । मारिले येणें गोवळें ॥ ६८ ॥
तस्करांमाजी अतिश्रेष्ठ । जारांमाजी परम वरिष्ठ ।
कपटी नाटकी परम नष्ट । स्वधर्मभ्रष्ट गोवळा ॥ ६९ ॥
अरे भीष्मा तूं परम दुर्जन । काशीपतीच्या कन्या नेल्या हिरून ।
त्यांत एके स्त्रीनें दिधला प्राण । तुजवरी नपुंसका ॥ ७० ॥
लोकांसी निरोपिसी धर्म । मूढा तूंचि करिसी अधर्म ।
ऐसी निंदा ऐकतां भीम । गदा सांवरोनि सरसावला ॥ ७१ ॥
जैसा केवळ खदिरांगार । तैसे आरक्त दिसती नेत्र ।
म्हणे हे दुर्जन अपवित्र । चूर्ण करीन गदाघायें ॥ ७२ ॥
भीष्में धरूनि भीमाचा हात । म्हणे क्षण एक राहें तूं स्वस्थ ।
याचें आयुष्य उरलें किंचित । जवळी अनर्थ पातला ॥ ७३ ॥
शिशुपाळ भीष्मासी म्हणे अवधारीं । सोडीं भीम येऊं दे मजवरी ।
जातवेद पतंगासी भस्म करी । तैसे करीन निर्धारें ॥ ७४ ॥
कृष्ण भीम अर्जुन । तिघे येऊ दे एकदांचि शस्त्र घेऊन ।
विलंब करिता षंढ पूर्ण । नाम तुझें निर्धारीं ॥ ७५ ॥
ऐसी दुष्टोत्तरें बोलत । तीं क्षमा करूनि गंगासुत ।
भीमासी म्हणे ऐक वृत्तान्त । पूर्वीचा तुज सांगतों ॥ ७६ ॥
दमघोषाची पत्‍नी सात्वती । ते वसुदेवाची भगिनी होय निश्चितीं ।
तिचे उदरीं हा पापमती । शिशुपाळ जन्मला ॥ ७७ ॥
उपजतांचि बाळ पाहे नयनीं । भुजांवरी भुजा दोन्ही ।
कपाळीं नेत्र अवगुणी । हा पापखाणी उपजला ॥ ७८ ॥
लोक म्हणती अवचिन्ह । माता म्हणे टाका बाहेरी नेऊन ।
तो आकाशीं बोले देववाणी वचन । न टाकीं बाळ सर्वथा ॥ ७९ ॥
हा होईल महाभूपती । शिशुपाळ नाम ठेवी याप्रती ।
माता विस्मित जाहली चित्तीं । काय पुढती बोलत ॥ ८० ॥
कोणाचे हातें याचा मृत्य । हें देवदूता वदें निश्चित ।
तों आणिक प्रतिध्वनि होत । माय ऐकत सादरें ॥ ८१ ॥
ज्या पुरुषाचे दृष्टिकरून । दोन भुजा आणि तिजा नयन ।
खालीम् पडेल गळोन । यासी मरण त्या हातीम् ॥ ८२ ॥
ऐसी बोलोनि आकाश वाणी । गुप्त राहिली तेचि क्षणीम् ।
मग बाळ घेती जाहली जननी । विरूप रूपे चतुर्बाहू ॥ ८३ ॥
देशोदेशींचे भूपती । बाळ पाहावयालागीं येती ।
प्रचीत विलोकावया सात्वती । शिशुपाळ देत त्यांपुढें ॥ ८४ ॥
बळिभद्र आणि घननीळ । तेही पाहावया आले बाळ ।
बंधुपुत्र देखतां तुंबळ । आनंद झाला सात्वतीतें ॥ ८५ ॥
शिशुपाळ आणि वक्रदंत । दोघे कृष्णापुढें आले रांगत ।
कृष्णदृष्टी पडतां अकस्मात । भुजा गळोनि पडियेल्या ॥ ८६ ॥
कपाळींचा तिजा नयन । तत्काळचि गेला जिरोन ।
मातेसी चिंता दारुण । प्राप्त जाहली तेधवां ॥ ८७ ॥
मग हरीपुढें पदर पसरून । पितृभगिनी मागे पुत्रदान ।
म्हणे यासी तू न मारी म्हणोन । भाष देईं मजलागीं ॥ ८८ ॥
श्रीकृष्ण बोले साच वचन । शत अपराध क्षमा करीन ।
अधिक जाहलिया बोळवीन । मोक्षसदना निर्धारें ॥ ८९ ॥
ऐसें बोलतां गोविंद । मातेसी जाहला आनंद ।
म्हणे कासया करील शत अपराध । मग राम-मुकुंद बोळविले ॥ ९० ॥
यालागीं ऐक भीमा निश्चित । त्या शत अपराधांचे होय गणित ।
यालागी श्रीकृष्ण निवान्त । वाट पहात समयाची ॥ ९१ ॥
हे शिशुपाळ वक्रदंत । पूर्वींचे दैत्य उन्मत्त ।
रावण कुंभकर्ण निश्चित । रामावतारीं वधिले जे ॥ ९२ ॥
येणें पूर्वीं येऊनि मिथिलेसी । धांवला वरावया सीतेसी ।
भार्गवचाप नुचले मानसीं । परम खेद पावला ॥ ९३ ॥
तोचि शिशुपाल पापखाणी । वरावया धांवला रुक्मिणी ।
तेणें पराजय पावला रणीं । जरासंधासमवेत ॥ ९४ ॥
तो द्वेष धरूनि मनांत । दुर्जन कृष्णनिंदा करीत ।
तरी शत अपराध आले भरत । जवळी अनर्थ यासी आला ॥ ९५ ॥
ऐकतां भीष्माचें वचन । क्रोधें भडकला दमघोषनंदन ।
जैसा स्नेहें शिंपिता कृशान । अधिक अधिक प्रज्वळे ॥ ९६ ॥
म्हणे रे बंदीजना नपुंसका । किती रे वाखाणिसी त्या गोरक्षका ।
जे जे येथें स्तवनासी योग्य देखा । न वाखाणिसी तयांसी ॥ ९७ ॥
चोर जार कपटी केवळ । बहुत माजला हा गोपाळ ।
गोकुळ चौंढाळिलें सकळ । कपटी अमंगळ नष्ट हा ॥ ९८ ॥
जालंधराची पत्‍नी वृंदा सती । येणें ते भगिनी मानिली होती ।
तिशींच रतला निश्चितीं । न भी चित्तीं पापातें ॥ ९९ ॥
परदारागमनी आणि कपटी । यासमान दुजा नाहीं सृष्टीं ।
ऐसियाची काय वाखाणिसी गोष्टी । वारंवार मूढा तूं ॥ १०० ॥
मग म्हणे उठा अवघेजण । आधी घेऊ या भीष्माचा प्राण ।
तिलप्राय कुटके करून । येथेंचि याचे टाकावे ॥ १ ॥
याज्ञिक मिळोनि भोंवते । यज्ञपशु वधिती मुष्टिघातें ।
तैसें वधावें या वृद्धातें । येणें आम्हांतें निंदिले ॥ २ ॥
तैल तप्त कढईत तावूनि उत्तम । हा जितचि आंत घालावा भीष्म ।
कीं शस्त्रें तावूनि परम । खंडें याचीं करावी ॥ ३ ॥
मग बोले गंगासुत । बोलिले जो न करी सत्य ।
त्याचे पूर्वज समस्त । महानरकीं पडतील ॥ ४ ॥
तुझिया माथ्याचा मुकुट । तो म्यां पदघातें केला पिष्ट ।
जरी बोलिलें वचन स्पष्ट । खरें करूनि दावीसना ॥ ५ ॥
भीष्मसिंहापुढें जंबुक समस्त । करितां युद्धाची तुम्ही मात ।
वज्रधारा धगधगित । तृणेंकरूनि खंडे केवीं ॥ ६ ॥
अजा जयाची जननी । तो सिंहाशीं भिडों पाहे रणीं ।
पिपीलिका म्हणे थडक हाणोनी । दिग्गज खालीं पाडीन ॥ ७ ॥
बळें उडोनि आळिका । विदारूनि मारीन म्हणे विनायका ।
मशक म्हणे हाणोनि धडका । मेरुमांदार डोलवीन ॥ ८ ॥
घुंगरुडाऐसें वदन । म्हणे पर्वत सगळा ग्रासीन ।
पतंग अग्नीसी म्हणे गिळीन । सूड घेईन खांडववनाचा ॥ ९ ॥
स्वतंतुसूत्रेंकरूनी । ऊर्णनाभि झांकीन म्हणे धरणी ।
वृश्चिक अभिमान वाहे मनीं । ताडूनि फोडीन वज्रातें ॥ ११० ॥
कीं रासभे ब्रीद बांधोन । नारदापुढे मांडिलें गायन ।
कीं मूषक टवकारून । वासुकी धरूं पातला ॥ ११ ॥
कीं सज्ञान पंडितापुढें । बोलावया आलीं मूढें ।
कीं जंबुक आपुले पवाडे । व्याघ्रापुढें दावीत ॥ १२ ॥
मजपुढें काय आदित्य । म्हणवूनि निंदा करी खद्योत ।
मरणकाळीं होय सन्निपात । तैसें तुज जाहलें रे ॥ १३ ॥
काळमृत्यूची छाया पडली । मृत्यूवेळ जवळी आली ।
ऐकोनि शिशुपाळ ते वेळीं । अधिकचि आवेशला ॥ १४ ॥
शस्त्र काढूनि वेगेंसीं । म्हणे कृष्णा ऊठ रे झुंज मजसीं ।
नपुंसका काय बैसलासी । लाज कैसी नुपजे तूंते ॥ १५ ॥
तुझें रुसणें समजणें दोन्ही । मी शिशुपाळ तृणप्राय मानीं ।
गोरक्षा तुज अझूनी । लज्जा कां रे न वाटे ॥ १६ ॥
उपजोनियां तुवां गोवळा । वृष्णिकुळासी डाग लाविला ।
तुवां चोरूनि नेली रुक्मिणी वेल्हाळा । ते नवरी माझी निर्धारें ॥ १७ ॥
रुक्मिणी आधीं अर्पिली मातें । म्यां मनींच भोगिलें तीतें ।
मग ते प्राप्त जाहली तूतें । माझें उच्छिष्ट गुराखिया ॥ १८ ॥
जैसें भोगिलें वस्त्र बहुत । ते भाटासी देती भाग्यवंत ।
तैसी रुक्मिणी म्या भोगिली निश्चित । तुज जे प्राप्त जाहली ॥ १९ ॥
पुष्पहार भोगूनि टाकिला । तो भणंगें जैसा उचलूनि नेला ।
कीं रावणें चोरूनि नेली जनकबाळा । तैसी रुक्मिणी तुवां नेली ॥ १२० ॥
शाल्व पवित्र तुजपरीस । कदा नातळे अंबेस ।
नवरी जे नेमिली आणिकास । ते सर्वथा न पर्णावी ॥ २१ ॥
ज्याचे नांवें जें पात्र वाढिलें । आणिकें नेतां तें उच्छिष्ट जाहलें ।
हे धर्माधर्म शास्त्रीं बोलिले । तुज न कळती कर्मभ्रष्टा ॥ २२ ॥
श्रीकृष्ण म्हणे रे दुर्जना । महानिंदका दुष्टा मलिना ।
तूं अग्रपूजा इच्छितोसी हीना । तरी आतांचि घेई निर्धारें ॥ २३ ॥
ऐसें बोलोनि क्षीराब्धिजारमण । केलें सुदर्शनाचें स्मरण ।
तंव अकस्मात येऊन । कृष्णहस्तकी संचरले ॥ २४ ॥
जैसा कल्पांतींचा आदित्य । तैसें सुदर्शन धगधगीत ।
शिशुपालावरी सोडिलें अकस्मात । वैकुंठनाथें तेधवां ॥ २५ ॥
तत्काळ शिशुपाळाचें छेदिलें शिर । निराळपंथें उडालें सत्वर ।
मुखें गर्जना करी थोर । म्यां यदुवीर जिंकिला ॥ २६ ॥
शिर मागुतें उतरलें । तें श्रीकृष्णचरणाजवळी पडिलें ।
अंतर्ज्योति निघाली ते वेळे । कृष्णरूपीं प्रवेशली ॥ २७ ॥
बाळसूर्यासारखें तेज अद्‌भुत । ज्योति श्रीकृष्णहृदयीं प्रवेशत ।
जैसें लवण जळीं विरत । कीं गगनांत नाद जैसा ॥ २८ ॥
सांडूनि जीवदशा संपूर्ण । शिशुपाळ जाहला कृष्ण ।
त्वंपद तत्पदीं जाय हारपोन । तैसा लीन जाहला ॥ २९ ॥
कीं पूर्ण जळीं जळबिंदु पडिला । तो माघारा नाहीं परतला ।
तैसा शिशुपाळ गोवळा जाहला । नाहीं उरलें वेगळेपण ॥ १३० ॥
हे वैकुंठींचे द्वारपाळ । जय विजय निर्मळ ।
सनकादिकीं शापितां तत्काळ । दैत्ययोनींत अवतरले ॥ ३१ ॥
हेचि हिरण्याक्ष हिरण्यकश्यप जाण । हेचि जाहले रावण कुंभकर्ण ।
तेचि हे शिशुपाळ वक्रदंत पूर्ण । कृष्णावतारी जन्मले ॥ ३२ ॥
परम भक्त शिशुपाळ । बळेंचि हरिरूप जाहला तत्काळ ।
हातींची वस्त आसडूनि नेत बाळ । तैसेंचि केलें यथार्थ ॥ ३३ ॥
तिसरें जन्मीं निश्चितीं । कृष्णें दिधली अक्षय मुक्ती ।
हृदयीं ठेविली अंतर्ज्योती । महाभक्त म्हणोनि ॥ ३४ ॥
असो जाहला जयजयकार । पुष्पवृष्टि वर्षती संभार ।
दुष्ट पळाले समग्र । वक्रदंतासहित पैं ॥ ३५ ॥
कौरव अंतरीं चिंताक्रांत । म्हणती आमुचें उणें पडिलें बहुत ।
एक आनंदे टाळिया वाजवीत । बरें जाहलें म्हणोनियां ॥ ३६ ॥
ऐसा शिशुपाळ पावला निजधाम । पार्थाप्रति निरोपी धर्म ।
म्हणे याचें प्रेत करा भस्म । जातवेदामाझारी ॥ ३७ ॥
मग शिशुपाळाचें राज्य होतें । तें दिधलें त्याच्या पुत्रातें ।
धर्मराजें समस्त रायांतें । वस्त्रें अलंकार समर्पिले ॥ ३८ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । अवघियांसी गौरवी युधिष्ठिर ।
पूजामान पावोनि समग्र । गेले नगरा आपुलाले ॥ ३९ ॥
अवभृथस्नान केलें । तेथें सकळ लोक सुस्नात जाहले ।
सहपरिवारेंसीं ते वेळे । श्रीकृष्ण निघाले द्वारकेसी ॥ १४० ॥
धर्मासी म्हणे कमलोद्‌भवपिता । आम्हांसी निरोप देईं आतां ।
धर्में चरणीं ठेविला माथा । कंठ जाहला सद्गदित ॥ ४१ ॥
धर्मराज प्रेमें स्फुंदत । जा ऐसें न म्हणेचि सत्य ।
पुढती लौकरी यावें म्हणत । धन्य भक्त धर्मराज ॥ ४२ ॥
भीम अर्जुन नकुळ सहदेव । तयांसी पुसत वासुदेव ।
कुंती द्रौपदी सुभद्रेप्रति माधव । स्नेहआज्ञा मागतसे ॥ ४३ ॥
तंव ते म्हणती श्रीपती । जेथें पद तुझे उमटती ।
तेथें आमुचें मस्तक असो निश्चितीं । ऐसेंचि करी रमावरा ॥ ४४ ॥
हृदयांतूनि आमुच्या श्रीपती । परता जाऊं नको निश्चितीं ।
ज्या ज्या भूताकृति भासती । तुझें स्वरूप भासो तें ॥ ४५ ॥
श्रीकृष्णासी बोळवूनी । पांडव आले परतोनि सदनीं ।
जागृति-सुषुप्ति-स्वप्नीं । श्रीकृष्णचिंतनीं सादर ॥ ४६ ॥
राजसूययज्ञ जाहला समाप्त । द्वारकेसी पावला वैकुंठनाथ ।
तों पौंड्रक आणि वक्रदंत । वेढा घालिती नगरातें ॥ ४७ ॥
शिवें दिधले वरविमान । त्यांत वक्रदंत सेनेसहित बैसून ।
द्वारकेवरी येऊन । युद्ध करिती शस्त्रास्त्रीं ॥ ४८ ॥
तो इतुकियांत पावला जगज्जीवन । तत्काळ सोडिलें सुदर्शन ।
वक्रदंताचें शिर छेदून । आकाशपंथें उडविलें ॥ ४९ ॥
पौंड्रक सेनेसमवेत । हरीनें संहारिला तेथ ।
ऐसा प्रताप करूनि अद्‌भुत । कृष्णें शस्त्रें ठेविलीं ॥ १५० ॥
मुख्य वधिले शिशुपाळ-वक्रदंत । इतुकानि आमुचें मनोगत ।
अवतारकृत्य जाहलें यथार्थ । या दोघांसी मारितां ॥ ५१ ॥
आम्हांसी शस्त्र धरणे नाहीं आतां । उरले ते दैत्य तत्त्वतां ।
ते सारथ्य करूनि पार्था । त्याहातीं पुढें वधावे ॥ ५२ ॥
जनमेजयासी सांगे वैशंपायन । धन्य धन्य अवतार श्रीकृष्ण ।
गोकुळीं अपार दैत्य मारून । कंस वधिला मथुरेसी ॥ ५३ ॥
जरासंध सतरा वेळा त्रासिला । द्वारका वसविली अवलीला ।
नरकासुर मारूनि सहस्र सोळा । गोपी आणिल्या घरासी ॥ ५४ ॥
आतां श्रोतीं व्हावें सावचित्त । पुढें छत्तिसावा अध्याय गोड बहुत ।
छत्तिसाव्यापासून हरिविजयग्रंथ । संपूर्ण यथार्थ जाहला ॥ ५५ ॥
जैसा मुकुटावरी मणी । तैसा छत्तिसाव ऐका श्रवणीं ।
हरिविजय हिरियांची खाणी । सज्जन जोहरी येथींचे ॥ ५६ ॥
श्रीधरवरदा जगन्निवासा । ब्रह्मानंदा पंढरीशा ।
भक्तमानसराजहंसा । पुराणपुरुषा जगद्वंद्या ॥ ५७ ॥
इति श्रीहरिविजय ग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
चतुर परिसोत प्रेमळ पंडित । पंचत्रिशत्तमाध्याय गोड हा ॥ १५८ ॥
॥ पस्तिसावाअध्याय समाप्त ॥ ॥ ओव्या ॥ १५८ ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळावा ही गोष्ट न आवडून चेदि देशाचा राजा शिशुपाल अचानक आपल्या स्थानावरून उठून पुढे आला. हातवारे करीत कृष्णासमोर येऊन तो चिडून व गर्जना करून म्हणाला- "धर्मा ! तुम्ही सारे नीच आहात, मूर्ख आहात. राजसभेत तुम्ही गवळ्याला अग्रपूजेचा मान कसा देतो ? तुला सारासार विचारच नाही, योग्य-अयोग्य काही कळतच नाही ! हा व्यभिचारी गवळी, हा चोर ! याला असा मान देण्यात या राजसूय यज्ञाचे केवढे तरी अपयश आहे. याला वसुदेव हा एक बाप व नंद हा दुसरा बाप. आणि धर्मा, तुम्हाला तर यम, इंद्र वगैरे पाच बाप आहेत. तुम्ही सारेच अवलक्षणी ! हा गंगासुत भीष्म काहीतरी बरळतोय ! अग्रपूजेचा मान देण्यासाठी त्याला दुसरा कोणी योग्य भेटलाच नाही का ? कृपाचार्य आहेत, शुक आहेत, याज्ञवल्क्य आहेत- गुरु द्रोण आहेत, एवढेच काय, पांचालाधिपती द्रुपद आहे ! शल्य, अश्वत्यामा, भीमक हे कोणी आठवलेच नाहीत काय ? भगदत्त केयढा पराक्रमी ! अरे धर्मा, या सर्वांना डावलून तू या गवळ्याला अग्रपूजेचा मान देतोस या तुझ्या मूर्खपणाला काय म्हणावे ? याने काही तपश्चर्याही केलेली नाही ! वेदपठण केले नाही ! कपट करून चारदोन पशुपक्षी मारले त्याचा काय एवढा बडिवार ? हा नाही कोणाचा गुरु, नाही कोणाचा राजा !

राजसूयांत राजालाच अग्रपूजा हवी. याला मान हा आमचा अपमान, आम्ही यज्ञासाठी दिलेल्या द्रव्याचा दुरुपयोग आहे ! अरे पंडुपुत्रा ! या चोराला तू डोक्यावर चढविलेस, जणू कोल्ह्याला मृगाथिपती म्हटलेस, डुकराला राजसिंहासन दिलेस ?"

असे अनेक दुष्ट शब्द बोलत बोलत शिशुपाल सर्व राजांना उद्देशून म्हणाला- 'राजांनो ! जे कोणी माझ्या बाजूचे असतील तेवढे उठा ?' त्याच्या बोलण्याचा प्रभाव पडून अनेक राजे खड्गे परजीत उभे राहिले आणि कृष्णाविरुद्ध ओरडू लागले.

धर्म कृष्णाजवळून उठला व शिशुपालाजवळ गेला. त्याचा हात हाती घरून म्हणाला- "शिशुपाला ! तू आमचा बंधू असून यज्ञही तुझाच आहे असे समज आणि उगाच राग करू नकोस. भीष्मादिक सर्व आपल्यापेक्षा वय, तप व ज्ञान यांनी वृद्ध आहेत. ते कृष्णाला अग्रपूजेचा मान दिला जात असतांना स्वतः काही बोलत नाहीत, समाधानाने माना डोलवीत आहेत. तूही या गोष्टीला मान्यता देणे तुझ्या कल्याणाचे आहे."

भीष्म म्हणाले- "युधिष्ठिरा, शिशुपालाची तू व्यर्थ विनवणी करू नकोस. हे जंबूक वल्गना करतात. अरे हे दुर्जन गवतासारखे व्यर्थ व मेणासारखे बोटचेपे आहेत ! कृष्णरूपी अग्नीपुढे हे जळून किंवा वितळून जातील !"

हे ऐकून शिशुपाल भीष्माला "थेरड्या" वगैरे अपमानास्पद शब्द बोलला आणि कृष्णाने केलेला प्रत्येक पराक्रम म्हणजे कसा पोरखेळ होता ते पटवून देऊ लागला.

"भीष्मांनीही काशी नरेशाच्या तीन कन्या स्वयंवरात जिंकत्या, पण त्याही दुसर्‍यासाठी," म्हणून त्याने भीष्मांना षंढ म्हटले, अधार्मिक म्हटले आणि कृष्णाला तो वारंवार अपशब्दांनी दुखवू लागला.

भीमाला ही निरर्गल बडबड सहन झाली नाही. त्याने गदा उगारून शिशुपालाकडे धाव घेतली, पण भीष्मांनी त्याला सांगितले- "भीमसेना, थांब. उगाच त्रास करून घेऊ नकोस. अरे, हा असाच आणखी बडबडेल तर तो निश्चित इथेच मरेल पहा. याची मरणाची वेळ अगदी जवळ आली आहे."

शिशुपाल रागाने बेफाम होऊन म्हणाला- "थेरड्या ! अरे थांबवतोस कशाला ? येऊ हे त्याला. कृष्णार्जुनही येऊ देत ! मी त्यांचे प्राण घेईन ?" रुक्मिणी स्वयंवराच्या वेळी शिशूपालाचा दारुण पराभव झाला होता. त्याने अशा वल्गना केल्या त्यामुळे कृष्णार्जुन मनातल्या मनात हसले. शिशुपाल तावातावाने बोलतच होता. तेवढ्यात भीष्म भीमाला एकीकडे शिशुपालाचे जन्ममृत्यू-रहस्य सांगू लागले.

"भीमसेना, शिशूपाल हा सात्वतीचा पुत्र- सात्वती ही वसुदेवाची बहीण. म्हणजेच कुंतीचे मुलगे म्हणून कृष्णाशी जे तुमचे नाते, तसेच शिशुपालाचे कृष्णाशी नाते आहे. शिशुपात तुमच्या मावशीचा मुलगा. दमघोष व सात्वती यांचे हे संतान जन्मतःच कुलक्षणी होते ! त्याला चार हात होते आणि त्याच्या भाळावर आणखी एक नेत्र होता. तो विद्रू पोर पाहून सात्वतीसह सर्वजण 'याला टाकून या' म्हणू लागले. पण त्यायेळी अशी आकाशवाणी झाली की, 'हा मुलगा टाकून देऊ नका, पुढे हा पराक्रमी राजा होईल. शिशुपाल असे याचे नांव ठेवा.' सात्वतीने धीर करून त्या आकाशवाणीलाच विचारले- 'तर मग याचे मरण कोणाच्या हातून आहे ते जर कळले तर बरे होईल.' आईची ती जिज्ञासा होती. आकाशवाणी पुन्हा प्रगट झाली. "याला जे दोन अधिक हात आहेत व एक जास्त नेत्र आहे, ते गळून पडतील- ज्याचे दर्शन होताच असे घडेल तोच याला मारील."

आकाशवाणी शांत झाली. मातेचे ममत्व जागृत झाले, तिने त्या विचित्र मुलाला न टाकतां वाढविले. ती ईश्वरी करणी पहायला, नवल म्हणून स्वतः पहायला अनेक लोक दमघोषाकडे येऊ लागले. सात्वती मुलाला प्रत्येकासमोर ठेवी. मनात असे होते की कोणाच्या तरी समोर मुलगा ठेवताच आकाशवाणीचे भाकित खरे ठरेल, आणि दोन हात व तिसरा डोळा नाहीसे होतील.

होता होता, तो मुलगा लहान असतांनाच बलराम व कृष्ण सात्वतीकडे आले. शिशुपाल तेव्हा रांगत रांगत कृष्णासमोर आला आणि कृष्णाकडे त्याने पाहिले व कृष्णाने त्याच्याकडे पाहिले. तो काय, शिशुपालाचे दोन जास्त हात देहापासून सुटले व गळून पडले ! तिसरा डोळा नाहीसा होऊन तिथे सपाट कपाळ दिसू लागले. सात्वतीने ते पाहिले. ती भयभीत झाली व थोडी आनंदितही झाली. मुलाचे कुलक्षण नष्ट झाले म्हणून आनंदी झाली आणि कृष्ण त्याला मारणार हे भविष्य कळून दुःखी झाली.

तिने कृष्णाला आकाशवाणीचा वृत्तांत सांगितला. कृष्णालाही नवल वाटले. सात्वती कृष्णाला विनवणी करून म्हणाली- "कृष्णा, तू ह्याला ठार मारू नकोस. तू मला तसे वचन दे म्हणजे मी निश्चित होईन."

कृष्ण म्हणाला- "आते, मी असे वचन देत नाही. नियतीच तशी आहे हे आकाशवाणीच बोलली आहे. पण मी एक मात्र सांगतो - तू या मुलाला माझा द्वेष करू देऊ नको. त्याचे माझ्या बाबतीत शंभर जरी अपराध झाले तरी मी ते सहन करीन. त्यानंतर मात्र माझा अपमान त्याने केला तर मी त्याचा प्राण घेण्यास मोकळा राहीन. आता तुझा मुलगा सन्मार्गी राहिला तर त्याचे प्राणसंकट टळेल. याचा उपाय तू कर."

भीष्म पुढे - म्हणाले- "कृष्ण शिशूपालाचे अपशब्द मोजतच असणार. शिशुपाल दुष्ट आहे व दुष्टसंहार हे कृष्णाचे अवतारकार्य आहे. या क्षणी प्रत्येक अपमानागणिक शिशूपालाचा मृत्यू जवळ येत आहे. तू नुसते पहा."

भीमसेन म्हणाला- "हा मूळचा कोण आहे ?"

भीष्म म्हणाले- 'जो हिरण्यकशिपु, जो रावण, तोच या जन्मी शिशुपाल. आणि जो हिरण्याक्ष, जो कुंभकर्ण, तोच वक्रदंत. रावणाची सीता-स्वयंवरात फजिती झाली होती. या जन्मीही रुक्मिणी त्याला न मिळता कृष्णाला मिळाली आहे, त्याची चीडच याला सर्व प्रेरणा देत आहे. याचे शत अपराध भरत आले आहेत."

भीष्मांकडून असा विलक्षण प्रकार ऐकून भीमाचा राग कमी झाला. तिकडे शिशुपाल चारपाच राजांना "उठा, या कृष्णाला चिरडून टाकू" असे म्हणत रागारागाने कृष्णाकडे येऊ लागला. भीष्मांनी त्यावेळी त्याला धिक्कारून जास्तच चिथावणी दिली. त्यामुळे स्वतःची सारी वृत्ती कृष्णद्वेषाने भरून गेलेला तो शिशुपाल अद्वातद्वा बोलत, ' रुक्मिणीला तर मी मनाने वरिली होती. तू उष्ट्या पत्रावळीसारखी तिला नेलीस ! तुझ्यापेक्षां तो शाल्व राजा श्रेष्ट ! भीष्माने जिंकलेली अंबा त्याच्याकडे आली पण तिचा त्याने स्वीकार केला नाही !" असे म्हणून खड्ग उगारून कृष्णाला चौरंगावरून ओढून मारण्यासाठी धावला !

तो रुक्मिणीचा उल्लेख परमावधीचा अपमानास्पद होता. शंभर अपराधानंतरचा हा अपमान ! कृष्ण एकदम उठून उभा राहिला. एकाच शब्दाने त्याने शिशुपालाला जागच्या जागी थांबविले. उग्र मुद्रा धारण करून तो गरजला- "शिशूपाला ! थांब ?" तत्काळ शिशूपालाचे पाऊल थबकले. वाचाच बसली. कृष्णाने सुदर्शन धारण केले ! तो शिशूपालाला म्हणाला- "अरे तुला अग्रपूजेचा मान हवा ना ? तुझ्या मातेला मी तुझे शत अपराध क्षम्य करीन असे वचन दिले होते त्याचे बंधन आता उरले नाही ! ही घे अग्रपूजा ! माझ्या सुदर्शनचक्रानेच आता तुझी पूजा करतो ?"

त्यावेळी कृष्णाच्या शरीराचे तेज विलक्षण वाढले. कोणासही त्याकडे पहावेना. सुदर्शनाच्या तेजाने मयसभा दैदीप्यमान झाली. निमिषार्धांत कृष्णाच्या हातातून चक्र गरगर फिरत निघाले ! शिशुपालाची मान चक्राने कापली जाऊन मस्तक सभागृहात दूरवर उडाले ! मानेतून रक्ताचे फवारे निघाले ! चिळकांड्या इतरांच्या अंगावर उडाल्या. शिशुपालाचे शरीर धाडकन जमिनीवर पडले ! सुदर्शन चक्र पुनश्च कृष्णाच्या हाती तळपूं लागले ! शिशुपालाच्या देहातून एक तेजाची शलाका निघाली, ती कृष्णाच्या शरीरात प्रविष्ट झाली.

सभा थक्क, भयचकित, स्तब्ध, मौन, रक्तलांछित कबंध व मस्तक भूमीवर थारोळ्यात पडलेले ! खड्ग उडून पडलेले ! वल्गना करणारी जीभ तोंडातून बाहेर आलेली ! डोळे विस्कारलेले असे शिशुपालाचे मस्तक ! मुकुट कुठच्याकुठे उडालेला ! केस अस्ताव्यस्त !

हाहाकार करीत अचानक कृष्णाचे वैरी राजे वक्रदंतासह भराभर त्या सभेतून पडून गेले ! कृष्णाकडे, मागे वळून पहाण्याचेही धैर्य त्यांना झाले नाही !

सभेतून तो देह व मस्तक हलविण्यात आले ! कृष्णाची अग्रपूजा एक दिवस लांबणीवर पडली. शिशुपालाच्या देहसंस्कारात तो दिवस गेला ! चेदि देशाचे राज्य शिशुपालाच्या पुत्राला देण्यात आले.

नंतर यज्ञाची यथाकाल समाप्ती झाली. अवभृथस्नान झाले. देशोदेशींचे राजे परत गेले. कृष्ण व बलराम द्वारकेस परत गेले. जरासंधाचा भीमाकडून आणि शिशूपालाचा कृष्णाकडून वध झाला आणि नंतरच राजसूय यज्ञ पार पडला होता.

तिकडे पौंड्रक राजाच्या मदतीने वक्रदंताने द्वारकेला वेढा दिला होता. बलराम व कृष्ण तेथे जातांच घनघोर युद्ध झाले. कृष्णाने वक्रदंताचाही वध केला आणि पूर्वजन्मींचा कुंभकर्णही पुन्हा नष्ट झाला ! पौंड्रकाचा वध करून कृष्णाने त्याची मोठी सेना नष्ट केली.

नंतर पांडव वनवासातून आल्यावर जेव्हा मोठे धर्मयुद्ध झाले- तेव्हा कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य करून, पांडवांच्या करवी कौरवांचा व त्यांच्या बाजूने लढणार्‍या अकरा अक्षौहिणी सेनेचा संहार घडवून आणला, तसेच पांडवांकडील सात अक्षौहिणी सेनेचाही संहार घडवून आणला. भूमीला भार झालेल्या आसुरी वृत्तीच्या दुष्टांचा नाश करण्याचे अवतार कार्य त्याने पार पाडले !
अध्याय ३५ समाप्त. ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP