|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय छत्तिसावा ॥
श्रीकृष्णाची अनेकविध कार्ये व पंढरपुरास आगमन -
श्रीगणेशाय नमः ॥
ॐ नमो सद्गुरु अवधूता । परब्रह्मा अपरिमिता । पुराणपुरुषा अव्यक्ता । मायातीता अगम्या ॥ १ ॥ आदिपुरुषा विश्वंभरा । अवयवरहिता दिगंबरा । सदानंदरुपा निर्विकारा । आत्मयारामा कृपानिधे ॥ २ ॥ अमलरूपा परमगंभीरा । ब्रह्मानंदा परात्परा । सहजानंदा अगोचरा । कल्याणवासा जगद्गुरो ॥ ३ ॥ पूर्णानंदा अपरिमिता । दत्तात्रेया षड्विकाररहिता । ब्रह्मानंदा ज्ञानभरिता । भीमातीरविलासिया ॥ ४ ॥ रुक्मिणीहृदयाब्जमधुकरा । दाक्षायणीवरप्रिया मनोहरा । पांडवकैवारिया दीनोद्धारा । शिशुपाळांतका श्रीपते ॥ ५ ॥ पंचत्रिंशति अध्यायीं कथा परिकर । छेदूनि शिशुपाळाचें शिर । विजयी जाहला श्रीकरधर । धर्मरक्षक परमात्मा ॥ ६ ॥ आतां छत्तिसावा बहु सुरस । हरिविजयाचा पूर्ण कळस । जो भोजनाच्या शेवटीं गोड ग्रास । तैसा विशेष छत्तिसावा ॥ ७ ॥ छत्तिसावे अध्यायीं ग्रंथ आघवा । परी मुकुटमणि छत्तिसावा । तो भक्तजनीं परिसावा । प्रेमादरेंकरूनियां ॥ ८ ॥ द्वारकेसी नांदतां रुक्मिणीरमण । तों पुढें आलें सूर्यग्रहण । कुरुक्षेत्रासी जावें म्हणोन । निश्चय केला श्रीवल्लभें ॥ ९ ॥ तों यापूर्वींच बळिभद्र । गोकुळासी पाठवी यादवेंद्र । जो महाबळिया भोगींद्र । धराधर अवतरला ॥ १० ॥ गोकुळासी जाऊनि रोहिणीसुत । यशोदा नंद गौळी समस्त । तयांसी भेटला रेवतीप्राणनाथ । सौख्य अदभुत समस्तां ॥ ११ ॥ चार मासपर्यंत । बळिभद्र राहिला स्वस्थ । श्रीकृष्णप्रताप अद्भुत । जाहला तो समस्त सांगितला ॥ १२ ॥ मथुरेहूनि गेला कृष्णनाथ । कोण कोण मारिले दैत्य । कैशा अष्टविनायका झाल्या प्राप्त । आणि सोळा सहस्र कामिनी ॥ १३ ॥ तें चरित्र मुळींहून । सांगे बळिभद्र आपण । कैसा जाहला राजसूययज्ञ । कैसा शिशुपाळ मारिला ॥ १४ ॥ तीं चरित्रें ऐकतां श्रवणीं । तटस्थ होती गौळी गौळणी । म्हणती ऐसा पुराणपुरुष चक्रपाणी । कैं आम्हांलागूनि भेटेल ॥ १५ ॥ बळिभद्र नित्य वनासी जाय । विलोकी हरीचे क्रीडाठाय । कुंजवनीं क्रीडा केली पाहें । गडियांसमवेत हलधरें ॥ १६ ॥ तों माध्यान्हासी आला चंडकिरण । जलक्रीडा करूं इच्छी संकर्षण । यमुना दूर होती तेथून । तीस रेवतीरमण बोलावी ॥ १७ ॥ म्हणे आलीकडे येईं सूर्यनंदिनी । तों ते वाहे निजछंदेंकरुनी । बळिराम क्षोभला ते क्षणीं । नांगर घालूनि ओढिली ॥ १८ ॥ ओघ मुरडोनि सगळा । आपणाकडे रामें आणिला । गगनीं देव पाहती डोळां । नवल गोपाळां वाटतसे ॥ १९ ॥ जलक्रीडा करुनि बळिभद्र । गोकुळासी आला सत्वर । चार मास झालिया हलधर । जाता जाहला द्वारकेसी ॥ २० ॥ संपूर्ण गोकुळींचें वर्तमान । कृष्णासी सांगे रेवतीरमण । तों पुढें ग्रहणयात्रेसी जगज्जीवन । निघता जाहला कुरुक्षेत्रासी ॥ २१ ॥ निघाले छप्पन्न कोटी यादव । उग्रसेन बळिभद्र वसुदेव । प्रद्युम्न अनिरुद्ध अक्रूर उद्धव । सांब भानुमंत निघाले ॥ २२ ॥ रुक्मिणीसहित अष्टनायिका । निघाल्या सोळा सहस्र गोपिका । चतुरंगदळ देखा । सिद्ध जाहलें ते काळीं ॥ २३ ॥ लागले वाद्यांचे गजर । असंभाव्य चालिला दळभार । कृष्णनायिका समग्र । सुखासनीं आरुढल्या ॥ २४ ॥ रेवती देवकी रोहिणी । सत्यभामा कालिंदी रुक्मिणी । ज्यांचिया वहनापुढें कनकवेत्रपाणी । लक्षावधि धांवती ॥ २५ ॥ ओळीनें चालिले पर्वत । तैसे गजभार येती डोलत । त्यांवरी यादव बैसले रणपंडित । कृतांतही भीत तयांतें ॥ २६ ॥ पुढें चालती पायदळभार । मागें तुरंग चालती सत्वर । त्यांचे पाठीमागें कुंजर । किंकाट करीत जाताती ॥ २७ ॥ श्रीकृष्णाचे भद्रजाती । शुंडादंड ऊर्ध्व करिती । वाटे आकाश कवळों पाहती । हिरे दांतीं जडियेले ॥ २८ ॥ त्यांचे पाठीमागें रथांचे भार । निजरथीं विराजे यादवेंद्र । जो कोटि अनंगांहूनि सुंदर । लावण्यसागर श्रीहरि ॥ २९ ॥ देशोदेशींचे नृपती । निजभारेंसीं सवें चालती । दाटी जाहली हरीभोंवतीं । वारी नसे दर्शना ॥ ३० ॥ राजयांचे मुकुट रत्नजडित । त्यांसहित कृष्णपदीं नमित । एक एका मुकुट आदळत । रत्नें विखुरत सभोंवतीं ॥ ३१ ॥ जैसा सौदामिनीचा एकमेळ । तैसे मुकुट दिसती तेजाळ । पहावयालागीं घननीळ । मंडपघसणी होतसे ॥ ३२ ॥ निजभारेंसीं कौरव पांडव । तेही येते जाहले सर्व । भीष्म द्रोण भक्तराव । विदुरही पातला ॥ ३३ ॥ तों इंद्रादि देव ते क्षणीं । पाहों इच्छिती चक्रपाणी । तों हरीभोंवतीं नृपांची दाटणी । वारी दर्शना नव्हेचि ॥ ३४ ॥ पहावया हरिवदनचंद्र । सर्वांचे नेत्र जाहले चकोर । योगी तापसी मुनीश्वर । तेही मुरहर पाहों येती ॥ ३५ ॥ आला इतुक्यांसमवेत मुरारी । येऊनि उतरला कुरुक्षेत्रीं । शिबिरें उभीं केलीं ते अवसरीं । सोळा सहस्र पृथक् पृथक् ॥ ३६ ॥ पुढें लक्षूनि जान्हवीतीर । निजभारें उतरले नृपवर । तों पूर्वींच श्रीकृष्णें दूत सत्वर । गोकुळवासी धाडिला होता ॥ ३७ ॥ यशोदा नंद गोपिका गौळी । यात्रेसी पातले तये वेळीं । बाळपणींचे सखे सकळी । येत जाहलें हरिदर्शना ॥ ३८ ॥ असंख्य गौळी आनंदेंकऒऒन । निघाले गोरसकावडी भऒऒन । पुढें गोपाळ पांवे घेऊन । आनंदेंकरुन नाचती ॥ ३९ ॥ मृदंग टाळ घुमरी घाई । मोहर्या घुमर्या वाजे सनई । हरीची बाळलीला गाती नवलाई । येती लवलाहीं गोपाळ ॥ ४० ॥ चित्रविचित्र घोंगडी । पांघुरले कृष्णाचे गडी । एक नाचती कडोविकडी । हांसती घडिघडि स्वानंदें ॥ ४१ ॥ श्रीकृष्णासी जाणविती दूत । कीं गोकुळवासी आले समस्त । श्रीनिवास झाला आनंदभरित । वेगें सांगत रुक्मिणीसी ॥ ४२ ॥ माझीं माता-पितरें दोन्ही । बाळमित्र आले गोकुळींहूनी । मज ते आवडती बहुत रुक्मिणी । बळिरामाहूनी अधिक पैं ॥ ४३ ॥ रुक्मिणीसहित कृष्णप्रिया समग्र । सिद्ध जाहल्या पहावया सर्व । गौळियांसी यादवेंद्र । कैसा भेटतो म्हणवूनि ॥ ४४ ॥ तों लक्षानुलक्ष गाडे । गौळियांचे धांवती वेगाढे । वरी गोपिका बैसल्या निवाडें । हरिलीला गात येती ॥ ४५ ॥ तों हरीचे सवंगडे समग्र । त्यांपुढें आले गोपिकांचे भार । त्यां संमुख जाहला यादवेंद्र । हरिनायिका समग्र पाहती ॥ ४६ ॥ घवघवीत देदीप्यमान । गोपांनीं देखिला जगज्जीवन । समस्तीं घातलें लोटांगण । प्रेमेंकरून स्फुंदती ॥ ४७ ॥ तितुक्यांसही कैवल्यदानी । भेटे तेव्हां प्रेमेंकरूनी । गोपाळ म्हणती चक्रपाणी । तुझी करणी कळली आम्हां ॥ ४८ ॥ तुझी बाळपणींहूनि प्रकृती । आम्हांसी ठावुकीच जगत्पती । आमुचीं मनें चोरूनि निश्चितीं । घेऊनि श्रीपती गेलासी पैं ॥ ४९ ॥ तूं परम नाटकी चित्तचोर । तुझा विश्वास नाहीं अणुमात्र । तुज भाग्य आलें थोर । बाळमित्र विसरलासी ॥ ५० ॥ आमुच्या संगतीनें जगज्जीवना । गाई राखिल्या तुवां मनमोहना । तूं यशोदेचा तान्हा । आम्ही कान्हा म्हणवूनि बाहूं ॥ ५१ ॥ गाई राखितां हृषीकेशी । तूं आम्हांसांगातें जेविसी । आमुच्या शिदोर्या ठकवूनि खासी । न लाजसी तोचि कीं तूं ॥ ५२ ॥ हुतुतू हमामा हुमली । आम्हांसीं घालिसी वनमाळी । तुज बुक्यांवरि सकळीं । डाई लागलिया मारूं गडया ॥ ५३ ॥ कृष्णा तूं मोठा चोर होसी । तुज मायेनें बांधिलें उखळीसी । तेव्हां उद्धरिलें यमलार्जुनां दोघांसी । आठवतें कीं हृषीकेशा ॥ ५४ ॥ कृष्णा तुज भाग्य आलें थोर । येर्हवीं तूं नंदाचा किशोर । तुझ्या गोकुळींच्या खोडी समग्र । न वर्णवती शेषांतें ॥ ५५ ॥ वासुरें चारितां गोविंदा । वळत्या न देसी तूं कदा । मग तुज मारुं आम्ही मुकुंदा । तें तुज आठवतें कीं ॥ ५६ ॥ आमुच्या शिदोर्या एकत्र करुनी । काला वांटिसी तूं चक्रपाणी । तैं तूं आंबिल ताक घटघटोनी । पीत होतासी गोपाळा ॥ ५७ ॥ आतां बहुत जाहलासी सुकुमार । तें विसरालासी तूं समग्र । अरे तूं परम होसी निष्ठुर । माया अणुमात्र नाहीं तूतें ॥ ५८ ॥ तैं तुझे अंगासी माखे शेण । आतां चर्चिला उत्तम चंदन । तेव्हां धांवसी घोंगडी पांघरुन । पीतवसन आतां झळके ॥ ५९ ॥ तैं मयूरपिच्छें शिरीं शोभत । आतां रत्नकिरीट विराजत । तैं गुंजांचे हार डोलत । आतां कौस्तुभपदकें झळकती ॥ ६० ॥ तें तूं विसरलासी गोपाळा । आतां भाग्य आलें घननीळा । ऐकतां कृष्णनायिका वेळोवेळां । हांसती रुक्मिणीसहित पैं ॥ ६१ ॥ एक गोपाळ म्हणे हृषीकेशी । जैं तुं कालियाच्या डोहीं बुडलासी । आम्हीं गोंगाट त्या समयासी । हरि केला तुजकारणें ॥ ६२ ॥ आमुचा गोंगाट ऐकतां भेणें । मग तुज सोडिलें कालियानें । आम्हीं तुज वांचविलें प्राणें । ऐकतां कृष्णें हास्य केलें ॥ ६३ ॥ शिळाधारीं इंद्र वर्षला । आम्हींच मग गोवर्धन उचलिला । तुवां एकटीच अंगोळी गोपाळा । लावूनि ठकविसी आम्हांतें ॥ ६४ ॥ ऐशा संवगडियांच्या गोष्टी । ऐकतां तोषला जगजेठी । तों आल्या गोकुळींच्या गोरटी । देखिल्या दृष्टीं कृष्णनाथें ॥ ६५ ॥ परम सुंदर लावण्यखाणी । किंवा उतरल्या सौदामिनी । किंवा आल्या स्वर्गाहूनी । देवांगना साक्षात ॥ ६६ ॥ तटस्थ पाहती कृष्णनायिका । म्हणती धन्य गोकुळींच्या गोपिका । परम सुकुमार लावण्यलतिका । वैकुंठनायका भाळल्या ॥ ६७ ॥ असो गोकुळींच्या युवती । कृष्णचरण दृढ धरिती । सप्रेम कृष्णासी भेटती । प्रेम चित्तीं न समाये ॥ ६८ ॥ म्हणती वेधका वनमाळी । आम्हांसी टाकूनि गोकुळीं । तुम्हीं द्वारका वसविली । नाहीं दिधली भेटी कदा ॥ ६९ ॥ असो गोपिकांचें करूनि समाधान । गौळियांसी भेटला श्रीकृष्ण । तों नंद-यशोदा देखतां दुरोन । धांवोनि चरण हरि धरी ॥ ७० ॥ तो पुराणपुरुष जगत्पालक । यशोदेचें पदीं ठेवी मस्तक । येरीनें हरीचे धरोन हस्तक । क्षेमालिंगन पैं दीधलें ॥ ७१ ॥ यशोदेचे पयोधर । तेथें पान्हा फुटला सत्वर । ज्यांतील अमृत क्षीराब्धिजावर । बाळपणीं प्याला असे ॥ ७२ ॥ यशोदा म्हणे राजीवनेत्रा । निराळवर्णा कोमलगात्रा । मज सांडूनि सुकुमारा । बहुत दिवस गेलासी ॥ ७३ ॥ कृष्णा तुजविण एक क्षण । झाला आम्हांसी पहा युगासमान । हरि तुझी बाळलीला आठवून । आम्हीं प्राण रक्षिले ॥ ७४ ॥ उखळीं बांधिलें तुज हृषीकेशी। म्हणोनि मजवरी रुसलासी । मज टाकूनि परदेशीं । तूं द्वारकेसी वसतोस पैं ॥ ७५ ॥ श्रीकृष्ण म्हणे जननीलागून । तुम्हांपासीं लागलें माझें मन । तों नंद आला जवळी धांवोन । कृष्णें चरण वंदिले ॥ ७६ ॥ कमलोद्भवाचा जनिता । तेणें आलिंगिला नंद पिता । म्हणे सखया श्रीकृष्णनाथा । दूर टाकिलें आम्हांतें ॥ ७७ ॥ असो हातीं धररूनि नंद-यशोदेसी । आणिलीं वसुदेव-देवकीपाशीं । क्षेमालिंगनें एकमेकाम्सी । प्रेमादरें देती तेव्हां ॥ ७८ ॥ तों अष्टनायिका आल्या धांवोनी । आणि सोळा सहस्र नितंबिनी । दृढ लागती यशोदेचे चरणीं । मस्तक ठेविती आदरें ॥ ७९ ॥ सोळा सहस्रांमाजी पट्टराणी । लावण्यखाणी मन्मथजननी । तिनें यशोदेचे चरणीं । मस्तक ठेविला आदरें ॥ ८० ॥ यशोदेनें रुक्मिणी हृदयीं धरिली । आनंद न माये दिग्मंडळीं । जैसी कौसल्येनें सीता आलिंगिली । तैसीच रीति झाली येथें ॥ ८१ ॥ असो यावरी ग्रहणीं करूनि स्नान । कृष्णें यात्रा केली सांग दान । आनकदुंदुभि उग्रसेन । भिन्न भिन्न दानें देती ॥ ८२ ॥ अमर्याद भांडार फोडून । सुखी केले याच्कजन । याचकांचें सदा तृप्त मन । हरिवदन पाहतां ॥ ८३ ॥ गोकुळींचे जन आले । तितुके श्रीकृष्णें गौरविले । दिव्य वस्त्राभरणीं ते वेळे । पूजिले गोवळे गोपाळें ॥ ८४ ॥ रुक्मिणी म्हणे यादवेंद्रा । बंधूंची बरवी पूजा करा । माझा हेत आजि पुरला खरा । संवगडे तुमचे पाहूनि ॥ ८५ ॥ दिव्य वस्त्रें अलंकार जे चांगले । गोकुळींच्या गोपिकांसी ते वेळे । स्वहस्तें दीधले घननीळें । देखतां हांसों आलें रुक्मिणीसी ॥ ८६ ॥ श्रीकृष्णासी म्हणे ते वेळां । बरव्या गौरवा जी गोपीबाळा । आपुली पूर्व ओळखी सांभाळा । केला सोहळा जो बाळपणीं ॥ ८७ ॥ ऐकतां रुक्मिणीच्या वचना । हांसों आलें जगन्मोहना । सत्यभामादि सोळा सहस्र ललना । हांसती तेव्हां आनंदें ॥ ८८ ॥ नंदय-शोदेचें पूजन । आपण करीत श्रीकृष्ण । बहुत अलंकार धन । नंद-यशोदेसी समर्पिलें ॥ ८९ ॥ कृष्णनायिका समग्र । यशोदेसी देती वस्त्रें अलंकार । श्रीकृष्णाचे पुत्र-पौत्र । यशोदेसी भेटले ॥ ९० ॥ देवकी म्हणे यशोदेलागून । त्वां देखिलें हरीचें बाळपण । कृष्णासी करविलें स्तनपान । तूंचि धन्य त्रिभुवनीं ॥ ९१ ॥ कंसें आपटिलीं सहा बाळें । कृष्णाऐसीं सुंदर सांवळें । सांगतां देवकीसी रुदन आलें । दुःख आठवलें बंदिशाळेचें ॥ ९२ ॥ देवकि म्हणे यदुवीरा । तुवां गुरुपुत्र आणिला माघारा । तुजहुनि ज्येष्ठ सुकुमारा । कंसें पूर्वीं मारिलीं ॥ ९३ ॥ तीं माझीं मज आणूनी । सत्वर भेटवीं चक्रपाणी । मग बोले कैवल्यदानी । देवकीप्रति तेधवां ॥ ९४ ॥ माते आतांचि पाहें नवल । तुज भेटवितों साही बाळ । यमासी आज्ञा करी घननीळ । तेणें तत्काळ आणिलीं ॥ ९५ ॥ साही बाळें आणूनी । देवकीपुढें देत मोक्षदानी । आश्चर्य करिती दोघीजणी । देवकी आणि यशोदा ॥ ९६ ॥ साही बाळें ते वेळीं । देवकीनें हृदयीं धरिलीं । जन आश्चर्य करिती सकळी । अद्भुत करणी केली हो ॥ ९७ ॥ पंक्तीं घेऊनि गोकुळींचे जन । श्रीकृष्णें सारिलें भोजन । पांच रात्रीं तेथें क्रमून । सुख दिधलें समस्तां ॥ ९८ ॥ याउपरी श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन । नंद यशोदा गौळीजन । गोकुळासी गेले परतोन । श्रीकृष्णासी आठवीत ॥ ९९ ॥ सकळ दळभारेंसीं मधुसूदन । द्वारकेसी आला परतोन । ग्रहणयात्रा जाहली संपूर्ण । ब्रह्मानंदे करूनियां ॥ १०० ॥ यावरी एके दिनीं कृष्णसुत । वनक्रीडेसी गेले समस्त । कंदुक खेळत खेळत । अरण्यांत धांवती ॥ १ ॥ कंदुक खेळतां उसळला । महाकूपामाजी पडिला । सकळ यादव ते वेळां । कूपाआंत विलोकिती ॥ २ ॥ आंत किंचित नसे नीर । माजी सरड पडिला पर्वताकार । महाविशाळ भयंकर । उघडूनि नेत्र विलोकित ॥ ३ ॥ यादव म्हणती जन्मवरी पाहीं । एवढा सरड देखिला नाहीं । एक धांवूनि लवलाहीं । कृष्णासी सांगती नवल हें ॥ ४ ॥ बळसहित कमलावर । तेथें पहावया आले सत्वर । कूपामाजी कौस्तुभधर । पाहे सादर विलोकूनि ॥ ५ ॥ कृष्णदृष्टी पडतां साचार । तत्काळ जाहला त्याचा ऊद्धार । पावोनियां दिव्य शरीर । कूपाबाहेर पातला ॥ ६ ॥ जो ब्रह्मादिकां वंद्य पूर्ण । क्षीराब्धिवासी नारायण । त्याचे धरिले दृढ चरण । प्रेमेंकरून तयानें ॥ ७ ॥ उभा ठाकला जोडूनि कर । मग तयासी पुसे श्रीधर । तूं कोण येथें सांग वीर । काय प्रत्युत्तर बोले तो ॥ ८ ॥ म्हणे माझें नांव नृग नृपवर । पुण्यपंथें वर्ततां साचार । मध्यें एक अपाय घडला थोर । जाहला कहर मजवरी ॥ ९ ॥ एक्या महापर्वकाळीं । ब्राह्मण बोलावूनि सकळी । तयांसी सहस्र गोदानें अर्पिलीं । सवत्स विधिप्रकारें ॥ ११० ॥ पूजामान पावोनि ब्राह्मण । गेले आश्रमासी गाई घेऊन । त्यांत एक्या ऋषीची गाय पळोन । आली कळपांत आमुच्या ॥ ११ ॥ तों दुसरे दिवशीं करूनि स्नान । आणिक एक ब्राह्मणालागून । तेचि गाय दिधली नेणोन । मग तो ब्राह्मण आला पहावया ॥ १२ ॥ तेणें येऊनि ती गाय धरिली । म्हणे हे माझी पळोनि आली । ब्राह्मण म्हणे मज आतां दिधली । मी न सोडीं सर्वथा ॥ १३ ॥ एकासीं एक भांडती ब्राह्मण । म्यां धरिले दोघांचे चरण । पहिल्या ब्राह्मणासी सहस्रगोदान । द्यावया सिद्ध जाहलों ॥ १४ ॥ तो म्हणे मी न घेईं सर्वथा । माझीच मज देईं आतां । तों दुसर्या ब्राह्मणासी प्रार्थितां । तोही सर्वथा नायके ॥ १५ ॥ दोघेही विप्र भांडतां । न राहतीच राहवितां । दोघे क्षोभोनि कृष्णनाथा । मज शापशस्त्रें ताडिलें ॥ १६ ॥ म्हणती महासरड होऊन । कृपामाजी पडें बहुत दिन । म्यां धरिले त्यांचे चरण । मागुती वचन बोलिले ॥ १७ ॥ पुढें अवतरेल श्रीकृष्ण । जो पूर्णब्रह्म सनातन । त्याची दृष्टी पडतां उद्धरोन । जासील तेव्हां स्वर्गातें ॥ १८ ॥ यादवांसी म्हणे कृष्णनाथ । पाहा अन्याय तरी किंचित । केवढा जाहला अनर्थ । पुण्यपुरुषा रायातें ॥ १९ ॥ यालागीं ब्राह्मणांसी भिऊन । वर्ता तुम्ही सावधान । हें असो तत्काळ विमान । रायाकारणें पातलें ॥ १२० ॥ नमस्कारूनि हरीचे चरण । नृगराजा गेला उद्धरोन । हरिपदप्रसादेकरून । इंद्रभुवनीं राहिला ॥ २१ ॥ द्वारकेंत प्रवेशला कृष्णनाथ । तों भेटीसी आला वीर पार्थ । चतुर रणपंडित सुभद्राकांत । आवडे बहुत श्रीकृष्णा ॥ २२ ॥ श्रीकृष्णें आवडी करून । हृदयीं आलिंगिला अर्जुन । परम प्रीति दोघांलागून । पंक्तीसी भोजन शेजारीं ॥ २३ ॥ एका आसनीं दोघांसी बैसणें । एके तल्पकीं निद्रा करणें । गुह्य गोष्टी बोलणें । दोघांजणीं एकांतीं ॥ २४ ॥ तों द्वारकेमाजी एक ब्राह्मण । त्याचीं आठ बाळें सटवोन । मागुती स्त्री प्रसूत होऊन । नववा पुत्र जाहला ॥ २५ ॥ ब्राह्मण श्रीरंगाजवळी आला । बाळांचा वृत्तांत सांगितला । हरि जे पांचवे दिवसीं पुत्र जातात याला । उपाय मजला सांगा कांहीं ॥ २६ ॥ आतां स्त्री जाहली प्रसूत । एवढा तरि राखें सुत । तों गर्वें बोले वीर पार्थ । मी रक्षीन बाळ तुझें ॥ २७ ॥ ब्राह्मणाच्या घरासी आला अर्जुन । म्हणे मी बाळकाचा रक्षीन प्राण । यम काळ उभे चिरीन । निजसामर्थ्येंकरुनियां ॥ २८ ॥
मी असतां सामर्थ्यवंत । काय करितील यमदूत ।
कैसा सटवेल विप्राचा सुत । तो आजि सत्य पाहेन ॥ २९ ॥ जरी या बाळाचा जाईल प्राण । तरी मीही अग्निकाष्ठें भक्षीन । ऐसा करुनियां पण । रक्षी अर्जुन सभोंवतें ॥ १३० ॥ विप्राच्या गृहावरूनि थोर । दृढ रचिलें बाणांचें मंदिर । दिव्य मंत्र जपोनि सत्वर । दिग्बंधन पार्थ करी ॥ ३१ ॥ धनुष्यासी लावूनि बाण । द्वारीं रक्षीत अर्जुन । तों प्रवर्तला पांचवा दिन । गेला प्राण बाळकाचा ॥ ३२ ॥ जननी पिटी वक्षःस्थळ । अहा रे अर्जुना सटवलें बाळ । पार्थ क्षोभला प्रबळ । गेला तत्काळ यमपुरीं ॥ ३३ ॥ यमासी पुसे वृत्तांत । तो म्हणे नवही बाळें येथ । म्यां आणिलीं नाहीं सत्य । जाण यथार्थ कपिध्वजा ॥ ३४ ॥ बाळकाकारणें ते वळे । स्वर्ग मृत्यु पाताळ शोधिले । चौदा लोकांत झाडे घेतले । परी बाळें न सांपडती ॥ ३५ ॥ आला द्वारकेसी परतोन । मग चेतविला महाअग्न । प्राण द्यावयासी अर्जुन । सिद्ध जाहला ते काळीं ॥ ३६ ॥ वृत्तांत ऐकोनि सर्वेश्वर । पार्थाजवळी आला सत्वर । कपिध्वजें वृत्तांत समग्र । श्रीरंगासी सांगितला ॥ ३७ ॥ मग दिव्य रथ सजवूनि परिकर। श्रीकृष्णें आणविला सत्वर । त्यावर कमलावर सुभद्रावर । बैसोनियां चालिले ॥ ३८ ॥ पवनवेगें रथ जात । पृथ्वीमंडळ उल्लंघी त्वरित । सप्तसमुद्र अद्भुत । क्रमूनि मागें टाकिले ॥ ३९ ॥ सप्तावरणें भेदून । जेथें वसे आदिनारायण । तेथें जाऊनि अर्जुन । उभा केला श्रीकृष्णें ॥ १४० ॥ कोटि सूर्याची प्रभा जाय लपोन । ऐसा शेषशायी नारायण । त्याचि पदअंगुष्ठावरुन । ब्रह्मांडचि ओंवाळिजे ॥ ४१ ॥ तें स्वरुपतेज अपार । नेत्रीं पाहूं न शके मित्र । त्याचें स्वपदीं वसुदेवपुत्र । मिळोनि गेला एकत्वें ॥ ४२ ॥ परम घाबरा जाहला अर्जुन । पाहे तंव जवळी नाहीं श्रीकृष्ण । अद्भुत तेज न लक्षवे पूर्ण । झांकी नयन भयें तेव्हां ॥ ४३ ॥ नयन झांकूनि पंडुसुत । श्रीकृष्णा नामें हांक देत । म्हणे कैवारिया धांव त्वरित । कां मज येथें सांडिलें ॥ ४४ ॥ मंगळधामा राजीवनेत्रा । पुराणपुरुषा स्मरारिमित्रा । मन्मथजनका देवकीपुत्रा । धांव सत्वर मजलागीं ॥ ४५ ॥ जलजोद्भवजनका मधुसूदना । पांडवरक्षका भक्तजनरंजना । समरधीरा दानवभंजना । काढीं मज येथूनि ॥ ४६ ॥ कासावीस जाहला पार्थ । मग प्रकटला कृष्णनाथ । दिव्य चक्षु तयासी देत । म्हणे पाहें अद्भुत तेज माझें ॥ ४७ ॥ मग पार्थें उघडिलीं नेत्रकमलें । दिव्य स्वरूप न्याहाळिलें । तंव तेथें नवही बाळें । ब्राह्मणाचीं खेळती ॥ ४८ ॥ मग स्तवूनि आदिनारायण । नवही बाळें घेतलीं मागोन । रथीं बैसोनि कृष्ण अर्जुन । आले परतोन द्वारकेसी ॥ ४९ ॥ अर्जुनाजवळी नवही बाळें । श्रीकृष्णें दिधलीं तये वेळे । मग ब्राह्मणासी बोलाविलें । स्त्रीसहित तेधवां ॥ १५० ॥ उभयतांसी पूजूनि पार्थ । समर्पिले नवही सुत । ब्राह्मण आनंदें बहुत । यश वर्णीत पार्थाचें ॥ ५१ ॥ ब्राह्मण गेला गृहासी । मग अर्जुन म्हणे हृषीकेशी । तुझी लीला ब्रह्मादिकांसी । पाकशासनासी अगम्य ॥ ५२ ॥ श्रीकृष्ण म्हणे पार्था । सर्व स्वरुपें मीच धरिता । येथें दुजयाची नाहीं वार्ता । कर्ता हर्ता मीच पैं ॥ ५३ ॥ असो आज्ञा घेऊनि अर्जुन । इंद्रप्रस्थासी गेला परतोन । सकळ अभिमान गळून । कृष्णस्मरणीं वर्ततसे ॥ ५४ ॥ श्रीधर श्रोतयां विनवीत । संपत आला हरिविजयग्रंथ । परी एक अनुसंधानीं संमत । पद्मपुराणींचें सुचलें ॥ ५५ ॥ पद्मपुराणीं पांडुरंगमाहात्म्य । तेथें ही कथा आहे उत्तम । श्रोतीं परिसिजे सप्रेम । अत्यादरेंकरुनियां ॥ ५६ ॥ शची शक्राची अंगना । ती एकदां गेली विष्णुभुवना । तों देखिला वैकुंठराणा । लक्ष्मीसहित ते वेळां ॥ ५७ ॥ करूनियां हरीसी नमन । उभी ठाकली कर जोडून । परी शचीचें इच्छी मन । अर्धांगीं बैसेन हरीच्या ॥ ५८ ॥ हा परमात्मा आदिनारायण । जरी मी याच्या अर्धांगीं बैसेन । तरी भाग्य परिपूर्ण । मग जगज्जीवन बोलत ॥ ५९ ॥ हरि म्हणें ते अवसरीं । शची तुवां जें इच्छिलें अंतरीं । साठी सहस्र वर्षें तप करीं । हिमगिरिपाठारीं मजलागीं ॥ १६० ॥ पुढें मी धरीन कृष्णावतार । गोकुळीं करीन लीलाचरित्र । तूं राधा होऊनि सत्वर । प्रकटें मग व्रजातें ॥ ६१ ॥ तेथें मी तुज वरीन । मग मी कंसवधासी जाईन । ते वेळे तूं गुप्त होऊन । द्वारके येईं वेगेंसी ॥ ६२ ॥ ऐसा वर पावोनि ते अवसरीं । इंद्राणी निर्धारें तप करी । प्रकटली गोकुळा भीतरी । भोगिला मुरारी कुंजवनीं ॥ ६३ ॥ मग मथुरेसी जातां हृषीकेशी । वियोग न साहवे राधेसी । गुप्त होऊनि हिमाचळासी । मागुती तपासी ते गेली ॥ ६४ ॥ मग ते दिव्य तप करूनी । तेचि आली द्वारकेलागूनीं । श्रीकृष्णें राधेसी देखोनी । आलिंगूनि अंकीं बैसविली ॥ ६५ ॥ अद्यापि द्वारकेसी जाण । श्रोतीं पहावें जाऊन । होतें राधाकृष्णपूजन । सर्व जन देखती तें ॥ ६६ ॥ असो अर्धांगी राधा घेऊनी । बैसला असतां चक्रपाणी । तेथें आली रुक्मिणी । हरिचरण पहावया ॥ ६७ ॥ जरी सोळा सहस्र गोपिका असती । सत्यभामादि सकळ युवती । परी त्याही येतां रुक्मिणी सती । न बैसती हरिअंकीं ॥ ६८ ॥ रुक्मिणी येतांचि सकळा । उभ्या राहती गोपबाळा । सर्वांदेखतां चित्कळा । हरिअर्धांगीं बैसत ॥ ६९ ॥ सर्वांदेखतां बैसे रुक्मिणी । परी तिजदेखत न बैसे कोणी । हे ज्ञानकळा पट्टराणी । इची सरी कोणी न पावत ॥ १७० ॥ असो रुक्मिणी आली जों एकदां । तों हरीचे अर्धांगीं बैसली राधा । न धरी रुक्मिणीची मर्यादा । चढली क्रोधा भीमकी ॥ ७१ ॥ पुढील भविष्य जाणूनी । तात्काळ रुक्मिणी गेली रुसोनी । दक्षिणदिंडीरवनीं येऊनी । तप करीत बैसली ॥ ७२ ॥ दिंडीरवन तेचि पंढरी । भीमातीरीं भीमकी तप करी । मज येथें पहावया येईल मुरारी । द्वारकेहूनि आपणचि ॥ ७३ ॥ मग दिंडीरवनांत । भीमककन्या तप करीत । तों द्वारकेसी कृष्णनाथ । काय करिता जाहला ॥ ७४ ॥ रुक्मिणी जातां द्वारकेहूनी । कळाहीन सकळ कामिनी । ते सर्व सौभाग्यखाणी । गेली रुसोनी भीमतटा ॥ ७५ ॥ मग रुक्मिणीकारणें कृष्णनाथ । सर्व उर्वीमंडळ शोधीत । तों गोकुळासी आला त्वरित । बाळवेष धरी तेव्हां ॥ ७६ ॥ सवें गाईगोपाळ घेऊनी । दक्षिण दिशे आला चक्रपाणी । शोधीत वनीं उपवनीं । ते रुक्मिणी चित्कळा ॥ ७७ ॥ गोरक्षणाचा वेत्र करीं । तोचि दंड धरी पूतनारी । शंख तो कमंडलु निर्धारीं । संन्यासी हरि जाहला असे ॥ ७८ ॥ श्रीवत्सांकित मनोहर । मुकुट कुंडलें मकराकार । नीलजीभूतवर्ण श्रीधर । बाळ दिगंबर जाहला ॥ ७९ ॥ शोधीत शोधीत हृषीकेशी । आला लोहदंडक्षेत्रासी । दिंडीरवन म्हणती त्यासी । तेथें द्वारकावासी प्रवेशला ॥ १८० ॥ मागें टाकूनि गाईगोपाळ । त्या वनांत प्रवेशे घननीळ । तो तेथें बैसली वेल्हाळ । तप करीत एकांतीं ॥ ८१ ॥ अंकांतरीं धऒऒनि वेत । दोन्ही कटीं ठेवूनि हस्त । रुक्मिणीचें वदन विलोकीत । उभा राहिला तेथेंचि ॥ ८२ ॥ म्हणे पद्मनेत्रे कामिनी । कां बैसलीस येथें येऊनी। मज न गमे तुजवांचूनी । म्हणोनि धांवूनि येथें आलों ॥ ८३ ॥ म्हणे प्रिये तुजवांचून । मज युगासमान वाटे क्षण । मग रुक्मिणी बोले वचन । तूं कोण आहेसी सांग पां ॥ ८४ ॥ चोरटियासारखा अकस्मात । उभा ठाकलासी या वनांत । परांगनेसीं बोलावया मात । काय कारण तुज असे ॥ ८५ ॥ परनारीसी प्रिया म्हणसी । मज ऐसें वाटतें मानसीं । बहुतक परद्वारी आहेसी । बाळपणापासूनि ॥ ८६ ॥ ऐकोनि भीमकीचें वचन । हास्य करीत मधुसूदन । मग हृदयीं दृढ आलिंगून । केलें समाधान तियेचें ॥ ८७ ॥ तों पुढें पुंडलीक भक्त । मातापितयांची सेवा करीत । तेणें तोषला जगन्नाथ । जाऊनि तेथें उभा ठाके ॥ ८८ ॥ हरि म्हणे धन्य धन्य पुंडलीका । वर मागें भक्तटिळका । येरें वीट टाकिली वैकुंठनायका । बैसावयाकारणें ॥ ८९ ॥ त्या विटेवरी पद जोडूनी । दोन्ही कर कटीं ठेवूनी । उभा राहिला मोक्षदानी । पुंडलिकासी न्याहाळीत ॥ १९० ॥ मातापितयांची सेवा करूनी । हरीसमीप आला पुंडलीक मुनी । प्रेमें लागला दृढ चरणीं । मग मोक्षदानी बोलत ॥ ९१ ॥ पुंडलिका वर मागें येचि क्षणीं । येरु म्हणे जैसा आहेसी चक्रपाणी । तैसा चिरकाळ ये स्थानीं । उभा राहें भगवंता ॥ ९२ ॥ जे तुझ्या दर्शनासी येती । ज्ञानहीन मूढमती । त्यांसी दर्शनें व्हावी मुक्ती । हेचि विनंति माझी असे ॥ ९३ ॥ आणि या क्षेत्राचें नाम पंढरीनगर । दक्षिणद्वारका नाम साचार । रुक्मिणीसहित तूं सर्वेश्वर । राहे स्थिर येथेंचि ॥ ९४ ॥ विठ्ठलनाम अभिधान । चालवावें आतां येथून । मज कोठें न जावें सोडून । कृपाळुवा सर्वेशा ॥ ९५ ॥ म्हणून दक्षिणद्वारका पंढरीं । जे विख्यात भूमंडळावरी । सकळ द्वारकेची संपदा मुरारी । आणीत तेव्हां पंढरीये ॥ ९६ ॥ हा भीमातीरविहारी दिगंबर । आदिपुरुष परात्पर । आनंदसांप्रदाय थोर । तेथूनिया वाढला ॥ ९७ ॥ मूळ गुरु आदिनारायण । प्रथम शिष्य चतुरानन । आपुलें जें गुह्य ज्ञान । ठेविलें पूर्ण त्यापासीं ॥ ९८ ॥ तेंचि ब्रह्मवंद्य निजज्ञान । अत्रीसी दिधलें प्रीतीकरुन । त्याचें पोटीं परब्रह्म पूर्ण । दत्तात्रेय अवतरला ॥ ९९ ॥ अवतार उदंड होऊनि गेले । परी दत्तात्रेयरुप आहे संचलें । अत्रीनें ज्ञान ठेविलें । दत्तात्रेयीं सर्व ते वेळां ॥ २०० ॥ त्या दत्तात्रेयापासून। सदानंदीं बिंबलें ज्ञान । तेंचि रामानंदी ठसावोन । परिपूर्ण पसरलें ॥ १ ॥ तेथूनि अमळानंद यतीश्वर । जो गंभीरपणें जैसा सागर । तेथूनि ज्ञानसमग्र । ब्रह्मानंद अवतरले ॥ २ ॥ तेथूनि सहजानंदमुनी । ज्याची समाधि आहे कल्याणीं । तेथूनि पूर्णानंद पूर्णपणीं अवतरला यतिराज ॥ ३ ॥ तेथूनि दत्तानंद तत्त्वतां । जो श्रीधराचे पितयाचा पिता । तो दत्तात्रेयमुनि मागुता । अवतरला सहजस्थितीं ॥ ४ ॥ तेथुनि ब्रह्मानंद सद्गुरु । जो ज्ञानाचा महामेरु । श्रीधरवरद निर्विकारु । भीमातीरविलासी जो ॥ ५ ॥ शालिवाहन शके सोळाशेंचोवीस । चित्रभानु नाम संवत्सरास । शुद्ध द्वितीया मार्गशीर्षमास । ते दिवसीं ग्रंथ संपला ॥ ६ ॥ श्रीपांडुरंगवरेंकरून । पंढरीसी ग्रंथ जाहला निर्माण । एकदां श्रवण करितां परिपूर्ण । पापें दारुण भस्म होती ॥ ७ ॥ तीन आवर्तनें वाचिताम् पवित्र । कुळीं होय दिव्य पुत्र । तो भक्तराज महाचतुर । होईल ऐसें जाणिजे ॥ ८ ॥ एक आवर्तन करितां । हरे घोर संकटचिंता । शत्रुपराजय तत्त्वतां । श्रवण करितां हरिविजय ॥ ९ ॥ काम क्रोध मद मत्सर । हेचि शत्रु अनिवार । यांचा पराजय होईल साचार । श्रवण करितां भावार्थें ॥ २१० ॥ हरिविजय करितां श्रवण । हरेल सकळ ऋण अथवा रोग दारुण । आपण प्रकटोनि श्रीकृष्ण । संकटें त्यांचीं निरसील ॥ ११ ॥ छत्तीस अध्याय ग्रंथ तत्त्वतां । प्रीतीं पावो पंढरीनाथा । या ग्रंथासी मूळकर्ता । पंढरीनाथ जाणिजे ॥ १२ ॥ जें जें विठ्ठलें कर्णीं सांगितलें । तें तें येथें पत्रीं लिहिलें । न्यून अथवा आगळें । त्याचें तोचि जाणे पैं ॥ १३ ॥ दशम आणि हरिवंश । पद्मपुराणींच्या कथा विशेष । त्याचि हरिविजयीं सुरस । श्रोतीं सावकाश परिसाव्या ॥ १४ ॥ छत्तीस अध्याय हरिविजय । पांडुरंगासी परम प्रिय । हा ग्रंथ संग्रहितां तें घर निर्भय । सदा विजय होइजे ॥ १५ ॥ हरिविजयग्रंथ भांडार । छत्तीस कोठड्यांचें परिकर । माजी रत्नें भरलीं नानाप्रकार । जोहरी संत परीक्षक ॥ १६ ॥ छत्तीस तत्त्वें हीं साचार । कीं छत्तीस खणांचें दामोदर । कीं छत्तीस गंगा मिळोनि समग्र । हरिविजयसमुद्र भरलासे ॥ १७ ॥ कीं छत्तीस कोहळीं धन । दिधलें ब्रह्मानंद दावून । कीं छत्तीस खणांचें वृंदावन । निजभक्त संपूर्ण तुळसी वरी ॥ १८ ॥ कीं हरिविजयग्रंथ राजेंद्र । हे छत्तीस जाणा त्याचे महावीर । करिती सकळ पापांचा संहार । प्रतापधीर महायुद्धीं ॥ १९ ॥ हरिविजय हेंचि आकाश । तेथें हे छत्तीस चंडांश । ब्रह्मांड भेदूनि प्रकाश । पलीकडे जाय पैं ॥ २२० ॥ कीं छत्तीस वृक्षांचें वन । कीं छत्तीस क्षेत्रें पिकलीं पूर्ण । कीं हें पदक देदीप्यमान । छत्तीस रत्नांचें जडियेलें ॥ २१ ॥ कीं हा प्रयागराज थोर । भावमास अतिपवित्र । स्नान करी पुण्यवंत नर । अर्थीं बुडी देऊनियां ॥ २२ ॥ कीं हा भवरोगावरी दिव्य रस । बुद्धिमंदासी होय मतिप्रकाश । शुक सांगे परीक्षितीस । वारंवार गौरवूनि ॥ २३ ॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेश-सरस्वती-संतवर्णन । गुरुमहिमा सांगोन । प्रथमाध्याय संपविला ॥ २४ ॥ दैत्य पृथ्वीवरी माजले । म्हणोनि देव क्षीरसागरासी गेले । स्तवन करूनि सुरवर परतले । ऐसें हें कथिलें द्वितीयाध्यायीं ॥ २५ ॥ देवकीवसुदेवांचें लग्न । अवतरले शेषनारायण । गोकुळासी गेले जगज्जीवन । हें निरुपण तिसर्यांत ॥ २६ ॥ गर्गें वर्णिलें जातक । पाळणां निजविला वैकुंठनायक । पूतना शोषिली निःशंक । चौथ्यांत हें कथिलें असे ॥ २७ ॥ पांचव्यांत तृणावर्त येऊन । श्रीकृष्णासी नेलें उचलोन । नाना क्रीडारस दावून । मोहिलें मन सर्वांचें ॥ २८ ॥ सहाव्यांत वनमाळी । चोरीकर्मे केलीं गोकुळीं । गोपींनीं गार्हाणीं सांगीतलीं । कौतुकें करुनि यशोदेसी ॥ २९ ॥ सातव्यांत हें कथन । दशावतारलीला पूर्ण । गोपींसी दावी श्रीकृष्ण । सांगती पूर्ण यशोदेसी ॥ २३० ॥ आठव्यामाजी कथन । पद्मपुराणींचें संमत पूर्ण । राधेनें कृष्ण घरासी नेऊन । खेळविला बहुसाल ॥ ३१ ॥ नवव्यांत हेचि कथेची प्रौढी । कृष्णें केल्या बहुत खोडी । माया उखळीं बांधी तांतडी । यमलार्जुन उद्धरिले ॥ ३२ ॥ दहाव्यांत गोपाळकाला करून । वनक्रीडा करी नारायण । कमलोद्भवें केलें वत्सहरण । करी स्तवन प्रीतीनें ॥ ३३ ॥ अकराव्यांत कालियामर्दन । बाराव्यांत गोवर्धनोद्धारण । तेराव्यांत कंसदूत मर्दून । गोरक्षण केलें पैं ॥ ३४ ॥ चौदाव्यांत अघासुरमर्दन । नंद यमुनेंत गेला बुडोन । तो माघारा आणितसे नारायण । वरुणापाशीं जाऊनियां ॥ ३५ ॥ पंधराव्यांत हेंचि कथन । कृष्णें घेतलें देवकीचें वाण । वनांत मागे राधेसी हरि दान । तेंचि वर्णन बहुत असे ॥ ३६ ॥ सोळाव्यांत यज्ञपत्न्यांनीं येऊन । हरीसी समर्पिलें अन्न । रासक्रीडासंपूर्ण । सत्राव्यांत कथियेली ॥ ३७ ॥ अठराव्यांत निरुपण । अक्रूर कृष्णासी गेला घेऊन । एकोनविंशति अध्यायीं कंस वधून । राज्य दिधलें उग्रसेना ॥ ३८ ॥ विसावा अध्याय अतिसुरस । श्रीकृष्ण शरण सांदीपनास । अद्भुत कथिला ज्ञानरस । गुरुशिष्यलक्षणें ॥ ३९ ॥ एकविसाव्यांत उद्धवें येऊन । गोपींसीं कथिलें ब्रह्मज्ञान । बाविसाव्यांत जरासंध पराभवून । काळयवन भस्म केला ॥ २४० ॥ तेविसावा चोविसावा सार । येथें कथिलें रुक्मिणीस्वयंवर । पंचविसाव्यांत सर्वेश्वर । जांबुवंती पर्णूनि आणीत ॥ ४१ ॥ सव्विसाव्यांत कृष्णनायिका । आणिल्या षोडशसहस्र गोपिका । सत्ताविसाव्यांत रुक्मिणी विनोद देखा । आणि प्रद्युम्न उपजला ॥ ४२ ॥ अठ्ठाविसाव्यां उखाहरण । भुजा छेदूनि त्रासिला बाण । एकुण तिसाव्यात दरिद्रहरण । सुदामयाचें पैं केलें ॥ ४३ ॥ तिसाव्यांत सत्यभामेचा विनोद । नारदासी दान दिधला गोविंद । एकतिसाव्यांत गरुडाचा गर्वमद । हनुमंताहातीं हरियेला ॥ ४४ ॥ बत्तिसाव्यांत सुभद्राहरण । नारदासी घरोघरीं कृष्णदर्शन । तेहतिसाव्यांत राजसूययज्ञ । जरासंधा मारविलें ॥ ४५ ॥ चौतिसाव्यांत कथा निश्चितीं । वाढीत असतां दौपती सती । बिरडें सुटतां श्रीपती । चतुर्भुज करी तेव्हां ॥ ४६ ॥ पस्तिसावा अध्याय मयसभावर्णन । शिशुपाळ वक्रदंत वधून । विजयी जाहला मधुसूदन । हेंचि कथा असंभाव्य ॥ ४७ ॥ छत्तिसाव्यांत ग्रहणयात्रा करून । भेटले गोकुळींचे जन । याउपरी पंढरीसी आला श्रीकृष्ण । हेंचि निरुपण शेवटीं ॥ ४८ ॥ ऐसा छत्तीस अध्याय हा ग्रंथ । हरिविजय यथार्थ । सदा अवलोकोत भक्तसंत । विवेकदृष्टीकरुनियां ॥ ४९ ॥ पंढरीहून चार योजनें दूर । पश्चिमेसी नाझरें नाम नगर । तेथील देशलेखक साचार । ब्रह्मानंद पूर्वाश्रमीं ॥ २५० ॥ पुढें पंढरीसी जाऊन । मग केलें संन्यासग्रहण । त्यावरी भीमातीरींच संपूर्ण । समाधिस्त निजसुखें ॥ ५१ ॥ तो ब्रह्मानंदमहाराज पिता । सावित्री नामें माझी माता । श्रीधरें वंदूनीं उभयतां । हरिविजय संपविला ॥ ५२ ॥ सकळ श्रोतीयांसी आदरें । साष्टांग नमूनि श्रीधरें । ब्रह्मानंदेंकरूनि निर्धारें । हरिविजय विलोकिजे ॥ ५३ ॥ इति श्रीहरिविजय ग्रंथ । संमत हरिवंशभागवत । सदा परिसोत प्रेमळ पंडित । षट्त्रिंशत्तमाध्याय शेवटींचा ॥ २५४ ॥ ॥ छत्तिसावा अध्याय समाप्त ॥ ॥ इति श्रीहरिविजय समाप्तः ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
कृष्ण द्वारकेत बलरामासह रहात होता. काही काळाने त्याने गोकुळातील लोकांना भेटण्यासाठी बलरामाला तिकडे पाठविले. बलरामाने गोकुळात जाऊन यशोदेची व नंदाची भेट घेतली. गोपांना प्रेमाने भेटून त्यांचे क्षेमकुशल त्याने विचारले. कृष्णाचेही कुशल त्याना सांगितले. कृष्णाने कोणकोणते पराक्रम केले त्यांचे वर्णन केले. त्याचे मुख्य आठ विवाह, सोळा हजार एकशे स्त्रियांशी त्याने केलेला विवाह, द्वारकेची निर्मिती, शिशुपाल, वक्रदंत, जरासंध, कालयवन यांच्या वधाचा वृत्तांत त्याने सांगितला. गोकुळातल्या बालपणींच्या गोष्टीही निघाल्या. कृष्णाची व आपली पुन्हा भेट कधी होईल अशी उत्कंठा गोपाळांना लागून राहिली.
बलराम काही काळ गोकुळातच राहिला. वृंदावनात तो नेहमी जात असे व बालक्रीडांचे स्मरण करी. गोपगोपींसह बलराम कुंजवनात जाई. तेथे आनंदाने विहार करी. त्याला यमुनेत जलविहार करण्याची एकदा इच्छा झाली. त्याने यमुनेला आज्ञा केली- "यमुने, तू वळून जवळ ये." पण यमुना नदीचे पात्र बदलले नाही. तेव्हा बलरामाला आपल्या मूळ स्वरूपाचे व शक्तीचे स्मरण झाले. त्याने आपला नांगर उचलला आणि नांगराने खेचून यमुनेचे पात्रच त्याने वृंदावनाजवळ आणले. मग त्याने यथेच्छ जलविहार केला ! त्याचा पराक्रम पाहून देवतांनाही भीतियुक्त आश्चर्य वाटले. बलराम चार महिने गोकुळात राहिला. पूर्वी उद्धव चार महिने असाच गोकुळात राहिला होता. बलराम परत गेला व कृष्णाला त्याने सर्व वृत्तांत निवेदन केला. सूर्यग्रहणाची पर्वणी आली. कृष्ण यादवांसह गंगातीरीं गेला. त्याच्याबरोबर त्याच्या स्त्रियाही होत्या. कृष्ण द्वारकेहून इतका जवळ आल्याचे वर्तमान कळताच पांडव, अन्य देशींचे राजे, आणि गोकुळातील सर्व लोकही गंगातीरीं जमले. गोपाळांनी कृष्णाला भेट म्हणून अनेक दुधादह्याचे पदार्थ आणले होते. कृष्णाने मोठ्या प्रेमाने त्यांचा स्वीकार केला. नंद, यशोदा व आपले बालपणींचे सोबती यांची रुक्मिणीशीं आणि इतर प्रमुख स्त्रियांशी ओळख करून दिली. उद्धव, इतर यादव, वसुदेव, अक्रूर- सारेजण नंदाला भेटले. गोपाळांनी राजभूषणांनी युक्त असा श्रीकृष्ण प्रथमच पाहिला ! त्यांना प्रेमाचे भरते आले. त्यांनी कृष्णाच्या चरणी लोटांगणे घातली. आसवांनी त्या चरणांना स्नान घातले ! आपल्या जवळच्या खाद्य पदार्थांचा कृष्णाने ज्या प्रेमाने स्वीकार केला ते पाहून गोपगोपींना धन्य धन्य वाटले. अजूनही कृष्ण त्यांचाच होता ! गोपिका आनंदाने "कृष्णा, कृष्णा !" म्हणत तल्लीन होऊन गाणी गाऊ लागल्या, प्रेमाने रडू लागल्या ! त्यांची भावस्थिती पाहून रुक्मिणी स्तब्ध झाली. प्रद्युम्न व अनिरूद्ध त्या महाभावात वाहून गेले. बालमित्र कृष्णाभोवती येऊन बसले, जुन्या आठवणी काढून बोलू लागले. कृष्ण प्रत्येकाला आपला वाटत होता. कृष्ण त्यांच्या गप्पागोष्टीत इतका रमून गेला की बाकी सर्वजण तिथे असूनही त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. प्रत्येक गोपाळाला तो हसून जुन्या आठवणी काढीत सांगत होता, ऐकत होता. कृष्णाचे आतांचे वैभव आणि त्याचे गोकुळातले गांवढळ गवळ्यांतले जीवन यांची तुलना करून गवळी कृष्णाला चिडवीत होते, त्याची कौतुकही करीत होते. गोपींची भावावस्था पहाण्यास देवांची गगनात दाटी झाली ! यशोदेच्या व कृष्णाच्या भेटीचे, त्यांच्या संभाषणाचे वर्णन करणे कवीच्या शक्तीबाहेरचे आहे ! मूर्तिमंत माया परब्रह्माची माता झाली तरच तिला व त्याला अशी स्थिती आकलन होईल. देवकी व यशोदा यांच्या भेटीत यशोदेने केलेल्या कृष्णाच्या संगोपनाबद्दल फारच धन्यवाद दिले ! देवकीचे सहा पुत्र, जन्मतांच कंसाने मारले होते. कृष्णाने योगशक्तीने त्यांना परलोकातून आणून त्यांची व देवकीची भेट घडविली ! आईची इच्छा पूर्ण केली ! पाच रात्री गंगातीरीं राहून द्वारकेकडे यादवांनी प्रयाण केले आणि गोपाळही गोकुळात परत गेले. त्या पाच रात्री पुण्यपावन होत्या ! पुढे एकदा कृष्ण आपल्या परिवारासह द्वारकेतून निघून एका वनांत गेला होता. काही मुलगे चेंडू खेळू लागले. त्यांचा चेंडू उडून दूर जाऊन एका ओसाड विहिरीत पडला ! चेंडू पहायला मुलगे विहिरीत डोकावले. त्याना आत एक प्रचंड सरडा पडलेला दिसला. गोपाळांनी कृष्णाला बोलावले, तो सरडा पहायला आला. पण कृष्णाचे दर्शन होतांच तो अदृश्य होऊन विहिरीच्या काठावर एक तेजस्वी राजा उभा आहे असे दृश्य दिसले. त्याने आदराने कृष्णाला नमस्कार केला व म्हटले- 'भगवन् ! आपल्या दर्शनाने मी शापमुक्त झालो ?' कृष्णाने विचारल्यावरून त्याने आपला इतिहास सांगितला- ' मी नृग नांवाचा एक राजा असून हजारो वर्षे एका शापामुळे या विहिरीत सरडा होऊन पडलो होतो. एकदा पर्वकाळात मी एका ब्राह्मणाला एक सहस्र गाई दान दिल्या. त्या घेऊन ब्राह्मण गेला. रात्री मी निजलो असताना त्या ब्राह्मणाच्या त्या दान दिलेल्या गाईतून एक गाय पळून परत माझ्या गाईंच्या कळपात आली. दुसरा दिवस उजाडला. आणखी एका ब्राह्मणाला मी आणखी एक हजार गाई दान दिल्या. पण ही पळून आलेली गायही त्यांबरोबर गेली. त्या गाई जात असतांनाच पहिला ब्राह्मण तिथे आला व त्याने ती विशिष्ट गाय ओळखली. ती मुळात त्याला दान दिलेली गाय तो परत मागू लागला. पण दुसरा ब्राह्मण ती गाय देत नव्हता. मी पहिल्या ब्राह्मणाला म्हटले- "महाराज, चूक घडली एवढे खरे. पण आतां आणखी एक हजार गाई मी तुम्हाला देतो. तीच गाय मागण्यापेक्षा हे दान जास्त नाही का ?" दोन्ही ब्राह्मणांना मी विनवण्या केल्या, पण दोघेही ऐकेनात. दोघेही माझ्यावर रागावले. दोघांनी मला शाप दिला- ' राजा ! तू हजारो वर्षे सरडा होऊन विहिरीत पडून राहशील !' मी केविलवाणा होऊन उःशाप मागितला. तेव्हा ते म्हणाले- "विष्णूचा श्रीकृष्ण म्हणून जेव्हा अवतार होईल तेव्हा त्याचे तुला दर्शन घडेल आणि तू पुन्हा मानव होशील !" कृष्णा ! तो सुदिन आज उगवला. आता तर तुझ्या दर्शनाने माझे पूर्वकर्मही संपले. आता मी स्वर्गात जाईन. दानात थोडीशी चूक झाली तरी त्याचे दुष्परिणाम केवढे होतात पहा !" कृष्णाने मुलांना पुन्हा दान कसे द्यावे यासंबंधी उपदेश केला. नृग राजा तेथेच अदृश्य झाला- स्वर्गात त्याला घेऊन जाण्यासाठी दिव्य विमान आले होते ! अर्जुन हा काही काळाने द्वारकेत रहायला आला असतां एक विप्र रडत रडत कृष्णाकडे आला व म्हणाला- 'देवा ! माझी आठ मुले झाली व मेली. मी फार दुःखी आहे. माझ्या स्त्रीला आता पुनः संतान होणार आहे ! पण यम जणू माझ्या मुलांना नेण्यासाठी टपलेला आहे ! हे नववे अपत्य जगावे असे काहीतरी करा. आपण तर देवकीमातेचे पुत्र आणून दिलेत ? सांदीपनीचा मृत पुत्र जिवंत करून यमाकडून मागून आणला ?' कृष्ण यावर काही बोलणार होता. पण अर्जुन अधीरपणे म्हणाला- "विप्रवर्य ! तुम्ही भिऊं नका. मी तुमच्या अपत्याचे मृत्यूपासून रक्षण करीन." विप्र म्हणाला- "हे कसे शक्य होईल ? मला भय व शंका वाटते." अर्जुन म्हणाला- "तुम्ही चिंता करू नका. प्रत्यक्ष कृतांताचाही पराभव करून मी तुमचा बाळ वाचवीन, नाहीतर स्वतःला जाळून घेईन !" कृष्णासमक्ष अर्जुनाने ही भयंकर प्रतिज्ञा केली होती. त्याला गर्व होता आपल्या धनुर्विद्येचा ! कृष्ण नुसता हसला. अर्जुनाचे वचन ऐकून विप्र निश्चिंत झाला. अर्जुनाला घेऊन तो स्वतःच्या घरी गेला. अर्जुनाने त्याच्या घराभोवती आपल्या बाणांचे अभेद्य कवच तयार केले. विप्रस्त्री प्रसूत झाली. पुत्र जन्माला आला. पाच दिवसपयंत तो जिवंत होता. सहाव्या दिवशी त्याचा प्राणान्त झाला. अर्जुन संतापला. त्याने आपल्या योगबलाने सप्तस्वर्ग व सप्त पाताळे त्या बालकाच्या जीवाच्या शोधार्थ धुंडाळली. पण व्यर्थ ! बालकाचा जीव कोठेही आढळला नाही. अर्जुन एवढा सर्व शोध घेऊन घटकाभरात विप्रासमोर आला. त्याने अग्निप्रवेश करण्यासाठी चिता पेटविली. आपल्या उतावळ्या अर्जुनाच्या अविचारी उत्साहाचा अनिष्ट असा परिणाम पडणार हे पाहून कृष्णाने त्याला थांबविले व म्हटले- "पार्था, पराक्रमाचा पोकळ गर्व गळ्याशी कसा येतो पहा ! पण धीर सोडू नकोस. मजबरोबर चल." कृष्णाने संकल्पाने एक दिव्य रथ उत्पन्न केला. त्यात दोघे बसले. त्यात बसून ते आदिनारायणाच्या स्थानी गेले. कृष्णाने अर्जुनाला दिव्यचक्षू दिले तेव्हाच तो नारायणाचे दर्शन घेऊ शकला. नारायणाजवळ ब्राह्मणाचे पहिले आठ पुत्र व नववाही पुत्र, दिव्य बालक-स्वरूपात बसलेले होते. कृष्णाने त्या बालकांना आपल्या बरोबर घेतले. रथात त्याना बसविले. रथ घेऊन कृष्णार्जुन दिव्य मार्गाने काही क्षणातच द्वारकेत अवतीर्ण झाले. कृष्णार्जुनांनी ब्राह्मणाच्या घरासमोर रथ उभा केला. ब्राह्मण शोक करीत होता तोच त्याचा नववा पुत्र जिवंत झाला ! अनंदाने नाचतच तो बाहेर आला तो त्याला असे दिसले की वेगवेगळ्या वयाचे आठ पुत्र समोर उभे राहून आपल्याला वंदन करीत आहेत." ब्राह्मणावर अत्यंत कृपा करून कृष्णाने त्याचे नऊही पुत्र परत आणून दिले आणि अर्जुनाला अग्निप्रवेशापासून वाचविले. आपला सर्व गर्व सोडून पार्थ कृष्णाला प्रेमाने वंदन करून नंतर इंदप्रस्थास परत गेला. पद्मपुराणात एक मोठी रहस्याची गोष्ट आहे. ती मी इथे सांगणार आहे. इंद्राची पत्नी शची ही एकदा विष्णूचे सौंदर्य पाहून त्याच्यावर भाळली. प्रत्यक्ष विष्णूशी आपला अंगसंग व्हावा अशी कामना तिच्या मनात निर्माण झाली. पण ती गोष्ट 'शची' म्हणून, इंद्राची पत्नी असतांना ते शक्य नव्हते. विष्णूने तिची इच्छा ओळखली. कृष्णावतारांत अनेक ऋषी व देवता विविध कार्यासाठी जन्म घेऊन यावयाच्या होत्या, यक्ष, गंधर्व यायचे होते, भक्त यायचे होते, लक्ष्मी, शेष हेही यायचे होते. विष्णूने शचीला गोकुळात राधा म्हणून एका गोपीचा जन्म घेण्यास सांगितले आणि स्वतः बालरूपांत कृष्ण म्हणून येऊन, फक्त तिच्यासाठी प्रौढ रूप धारण करून तिची इच्छा पूर्ण केली होती. कृष्ण मथुरेस गेला तेव्हा राधा अदृश्य झाली ती हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेली. द्वारकेत येऊन कृष्ण अष्टनायिकांबरोबर संसार करू लागला तेव्हा ती पुन्हा द्वारकेत आली. कृष्णाच्या बरोबर रुक्मिणीसारखी तीही राहूं लागली. राधा व कृष्ण यांना सारखेच पूज्य मानण्यात येते. ही राधा विशेष अधिकारिणी असून ती कृष्णाच्या मांडीवरही बसत असते. कृष्ण सर्व स्त्रियांपेक्षा रुक्मिणीला फार मान देत असे, पण तिच्यापेक्षाही राधेचा मान मोठा होता. रुक्मिणी आली तर कृष्णाजवळ बसणारी इतर कोणतीही कृष्णपत्नी उठून तिचा आदर ठेवी. पण राधा तिथे असली तर ती मात्र उठत नसे. राधेचा आपल्यापेक्षा मान जास्त होतो हे रुक्मिणीला आवडेनासे झाले. ती रागावून द्वारका नगरातून बाहेर पडली. दक्षिण दिशेला दिण्डीरवनात गेली. कृष्णाने आपला सर्वश्रेष्ठ मान राखावा म्हणून ती हट्टाने तपश्चर्या करीत राहिली. तिकडे द्वारकेत रुक्मिणी नाही म्हणून इतर स्त्रियांना फार शून्य शून्य वाटू लागले. त्यांना कंटाळा आला. कृष्णाला सुद्धा चैन पडेना. तोही एक दिवस द्वारकेतून रुक्मिणीच्या शोधासाठी निघाला. हातात शंखाऐवजी कमंडलू गदेऐवजी वेताची काठी, आणि वेष संन्याशासारखा ! असा तो कृष्ण देशोदेशी हिंडत हिंडत दक्षिणेत भीमेच्या कांठी आला. तिथे रुक्मिणी तप करीत आहे असे त्याला दिसले. ती ध्यानस्थ होती. वस्त्रे तापसीची, मुद्रा गंभीर, शांत, डोळे मिटलेले, पद्मासन घातलेले ! कृष्ण थबकला. कमंडलू खाली ठेवला. वेताची काठी आपल्या दोन्ही मांड्यांत धरून व कटीवर दोन्ही हात ठेवून तो रुक्मिणीकडे पहात उभा राहिला. जरा वेळाने त्याने गोड शब्दात तिला हाका मारल्या. "तू इथे येऊन रुसून का बसलीस ? मला द्वारकेत मुळीच करमत नाही; सारे सुनेसुनेसे वाटते." रुक्मिणी म्हणाली- " असा चोरासारखा येणारा तू कोण आहेस, मी जाणत नाही. परस्त्रीजवळ असे गोड गोड बोलून आपली बेचैनी सांगण्याचे तुला कुणी सांगितले ? अरे परपुरूषा ! तुला दुसर्यांच्या मागे मागे जायची अशीच सवय आहे की काय ?" कृष्णाला एकदम हसायला आले. तो पुढे झाला. रुक्मिणीचा रुसवा त्याने घालविला. तिच्या मनाची समजूत घातली. "मी द्वारका सोडून इथे आलो तो आता परत जातच नाही. आपण इथेच राहूं या." असे म्हणून कृष्णाने तेथेच रहायचे ठरविले. पुंडलीक नावाचा एक सच्छील तरुण भक्त आपल्या आईवडिलांची सेवा करीत रहात असे. त्याच्या मातृभक्तीने प्रसन्न होऊन श्रीकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी त्याच्या द्वारी गेला. द्वारात उभा राहून तो म्हणाला- "पुंडलीका ! तुझ्या मातापितरांच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तुला वरदान देतो. काय हवे ते माग." पुंडलीक त्यावेळी आईचे व पित्याचे पाय चेपीत होता. कृष्णासाठी त्याने एक वीट दाराकडे फेकली व म्हटले- " देवा, जरा मी ही सेवा करतो, तोपर्यंत तू थांब, मी येतोच. विटेवर उभा रहा." कमरेवर हात ठेवून श्रीकृष्ण त्या विटेवर उभा राहिला. घटकाभराने पुंडलीक मागे थकून द्वाराशी आला, त्याने हरिदर्शन घेतले ? हरिचरण घट्ट धरले. कृष्ण म्हणाला "पुंडलीका, वर माग." पुंडलीक म्हणाला- "मला स्वतःला काही नको. तू जसा या विटेवर उभा आहेस तसाच कायम उभा राहून भक्तांना दर्शन देऊन मुक्त कर. पंढरपुर असे या स्थानाचे नांव प्रसिद्ध होवो. रुक्मिणीसह तू येथेच रहा. पंढरपुर हीच दक्षिणेकडची दुसरी द्वारका होवो. वीट स्थल म्हणून विठ्ठल असे नांव तू धारण करून रहा. असा वर तू मला दे." पुंडलिकाचा हट्ट श्रीकृष्णाने पुरविला. पुंडलिकाने जगाचे हित व्हावे असा वर मागितला. कृष्ण पांडुरंगरूपाने पंढरपुरात रहात आहे. त्या अठ्ठावीस युगे विटेवर उभा असलेल्या त्या भक्तवत्सल श्रीकृष्णाचे, पांडुरंगाचे, विठ्ठलाचे हे हरिविजयरूपी चरित्र आहे. पंढरपूर येथे हा ग्रंथ शके १६२० मध्ये मार्गशीर्ष शु. द्वितीयेस रचून पूर्ण झाला. ब्रह्मानंद गुरूंची श्रीधर कवीवर ही कृपाच झाली आहे. या गद्यग्रंथाची फलश्रुति हा गद्य ग्रंथ मनोभावे वाचणार्याची बुद्धी हरिभक्तीकडे वळेल, तो कृष्णाचा सात्त्विक भक्त होईल व श्रीकृष्ण त्याचा संकटातून उद्धार करील, त्याचे इहपरलोकी कल्याण होईल. श्रीकृष्णभक्तांना ही वाङ्मयीन सेवा लाभो हीच प्रार्थना ! अध्याय ३६ समाप्त. श्रीहरिविजय कथासार ग्रंथ समाप्त ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |