॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय सव्विसावा ॥

श्रीकृष्णाचे इतर विवाह - सत्यभामा - नरकासुराख्यान - पारिजाताख्यान - द्वारकेतील वर्णन -


श्रीगणेशाय नमः ॥
जो देवाधिदेव पुरातन । जो पूर्णब्रह्म सनातन ।
जो मायाचक्रचाळक शुद्ध चैतन्य । तो श्रीकृष्णरूपें अवतरला ॥१॥
दानव बहुत माजले । तिंहीं भक्तजन गांजिले ।
यालागीं निर्गुण सगुणत्वा आलें । तेंचि अवतरलें कृष्णरूप ॥२॥
वार्ष्‍णेय गंधर्व उन्मत्त । तोचि धृतराष्ट्र झाला सत्य ।
गजायुतबल अद्‌भुत । कुरकुळीं जन्मला ॥३॥
दुष्ट कलीचें रूप सगळें । तें दुर्योधनरूपें जन्मलें ।
काम क्रोध मद मत्सर आगळे । हृदयीं जयाच्या नांदती ॥४॥
दुःशासनादि बंधु शतभरी । ते राक्षस प्रकटले अवनीवरी ।
जे पौलस्त्य लंकेमाझारी । तेचि हस्तिनापुरीं जन्मले ॥५॥
जय-विजयांश रावण-कुंभकर्ण । तेचि शिशुपाळवक्रदंत दोघेजण ।
जरासंधादि काळयवन । दैत्यांश सर्व जन्मले ॥६॥
एवं मागध चैद्य कौरव सकळ । भौमासुर बाणादि दुष्ट भूपाळ ।
हे दैत्यचि सबळ । द्वापारयुगीं जन्मले ॥७॥
वसुवीर्य गंगेच्या उदरीं । तो भीष्ममहाराज पृथ्वीवरी ।
जो प्रतापशूर ब्रह्मचारी । महायोद्धा जन्मला ॥८॥
जो का देवगुरू बृहस्पती । तोचि द्रोणाचार्य निश्चितीं ।
क्रृपाचार्य रूद्रगण क्षितीं । गौतमवीर्यें जन्मला ॥९॥
शिवहृदयींचा जो का क्रोध प्रबळ । तो अश्वत्थामा बळें सबळ ।
सूर्यांश तो कर्ण निर्मळ । कुंतीउदरीं अवतरला ॥१०॥
यम समीर शचीवर । अश्विनौदेव दोघे सुंदर ।
यांचे धर्म भीम अर्जुन वीर । नकुल सहदेव जन्मले ॥११॥
पंच सूर्य पृथ्वीवरी । अवतरले कुंतीच्या उदरीं ।
उजळली सकळ धरित्री । प्रतापतेजें ज्यांचिया ॥१२॥
दुर्वासमुखें मंत्रसमीरें । फुंकोनि कुंतीच्या कर्णद्वारें ।
पांचही दीप एकसरें । पाजळले ते धरेवरी ॥१३॥
पतंग ते कौरव निश्चितीं । या पंचदीपांवरी झेंपावती ।
परी पक्षांसहित भस्म होती । राज्यलोभें झुंजतां ॥१४॥
श्रीकृष्ण द्वारावतीची भवानी । पांच दिवटिया हातीं घेऊनी ।
ब्रह्मांडमंडपीं गोंधळ घालूनी । दैत्य सर्व रगडिले ॥१५॥
भूगोळदुर्गीं पांचही यंत्रें । स्वसत्ताऔषधीचीं पात्रें ।
भरोनियां स्मरारिमित्रें । भडकाविलीं दुष्टांवरी ॥१६॥
कीं यादव-पांडव लोहकुठार । स्वभुजाबळें धरूनि यादवेंद्र ।
दुष्टकानन समग्र । छेदूनि निर्मूळ केलें पैं ॥१७॥
शची मृडानी उभयांश मिळोनी । तेचि द्रौपदी याज्ञसेनी ।
तिचा कैवारी चक्रपाणी । होऊनि धरणी निर्वीर करी ॥१८॥
बाळपणीं गोकुळीं दैत्य मारिले । उरले ते मथुरेसी संहारिले ।
जरासंधादि दुष्ट पाडिले । भस्म केलें काळयवना ॥१९॥
द्वारकेसी येऊनी । चिच्छक्ति परिणिली रूक्मिणी ।
त्यावरी जांबुवंताशीं युद्ध करूनी । जांबुवंती वरियेली ॥२०॥
त्यावरी सत्यभामा पर्णूनी । शतधन्वा मारूनि घेतला मणी ।
पंचविसावा अध्याय संपतांक्षणीं । कथा इतुकी जाहली ॥२१॥
यावरी जें कथानुसंधान । ऐकोत पंडित विचक्षण ।
एके दिवशीं गजपुराहून । अर्जुन आला हरिदर्शना ॥२२॥
क्षेम देऊनि वनमाळी । क्षेमवार्ता सकळ पुसिली ।
तों मृगयेलागीं ते काळीं । पार्थ कृष्ण निघाले ॥२३॥
एके रथीं दोघेजण । आरूढले कृष्णार्जुन ।
सवें चतुरंग सैन्य । घेऊनि वना चालिले ॥२४॥
दारूक सारथी परम चतुर । रथ चालवी समीराहूनि सत्वर ।
क्रीडा क्रीडत श्रीकरधर । यमुनातीरीं पावला ॥२५॥
मध्यान्हा आला असे मित्र । तों कालिंदीतटीं वारिजनेत्र ।
स्थिरावला हो क्षणमात्र । वन विचित्र विलोकीतसे ॥२६॥
कालिंदीतटीं एक कामिनी । परम सुंदर पद्मनयनी ।
जीचिया अंगुष्ठावरूनी । देवांगना ओंवाळिजे ॥२७॥
सकळ लावण्य एकवटलें । कमलोद्‌भवें हें रूप रचिलें ।
असो श्रीकृष्णें तीस विलोकिलें । मग बोले किरीटीसी ॥२८॥
म्हणे पैल ते कोण ललना । कां तप करिते आणीं मना ।
कुळ वर्ण पुसोनि अर्जुना । झडकरी येईं मागुता ॥२९॥
शिरीं वंदूनि वचन । तिजजवळी आला अर्जुन ।
म्हणे कल्याणवती तूं कोण । तप किमर्थ करितेसी ॥३०॥
तंव ते बोले पद्मनयना । मी असें जाण सूर्यकन्या ।
तप करितें मनःकामना । पूर्ण व्हावयाकारणें ॥३१॥
तूं म्हणसी कामना कोण । तरी जो श्रीकृष्ण कालियामर्दन ।
तो पति व्हावयालागीं पूर्ण । तप करितें मी येथें ॥३२॥
संतोषला पार्थवीर । म्हणे तोचि येथें आला श्रीधर ।
द्वारकाधीश समरधीर । रथीं बैसोनि पातला ॥३३॥
धन्य तूं चंडकिरणकुमारी । तुझें तप फळा आलें ये अवसरीं ।
तरीच वैकुंठनाथ वनांतरीं । मृगयेलागीं पातला ॥३४॥
ऐसें ऐकतां लावण्यखाणी । ब्रह्मानंद पूर्ण जाहला मनीं ।
म्हणे धन्य धन्य तुझी वाणी । अमृताहूनि गोड वाटे ॥३५॥
तरी त्या क्षीरसागरविहारा । भेटी करीं मजलागीं सत्वरा ।
ऐसें ऐकतां अर्जुन माघारा । क्षणें आला हरीपासीं ॥३६॥
सांगितलें सर्व वर्तमान । ऐकतां हांसला जगज्जीवन ।
तैसाचि रथ लोटून । कालिंदीजवळी पातला ॥३७॥
कालिंदी विलोकी ते वेळां । तों किरीटकुंडलें वनमाळा ।
पीतांबरधर मेघसांवळा । चतुर्भुज देखिला श्रीरंग ॥३८॥
जैसा हृदयीं होती ध्यात । तैसाचि देखिला वैकुंठनाथ ।
दिव्य माळा घेऊनि त्वरित । हरीच्या गळां घातली ॥३९॥
चरणीं माथा ठेविला । कृष्णें आलिंगिली ते वेळां ।
रथीं बैसवूनि ते अबला । श्रीहरि आला द्वारकेसी ॥४०॥
लागला वाद्यांचा गजर । हरि प्रवेशला द्वारकापुर ।
मग मुहूर्त पाहूनि सुंदर । लग्न केलें यथाविधि ॥४१॥
चारी दिवस एकचि गजर । याचकजन सुखी केले समग्र ।
यापरी सूर्यकन्या सुकुमार । श्रीकरधरें वरियेली ॥४२॥
यावरि अवंतीचा नृपती । मित्रविंद नामें पुण्यकीर्ती ।
त्यासी वसुदेवभगिनी सात्वती । दिधली होती पूर्वींच ॥४३॥
त्याची कन्या मित्रविंदा । जिच्या स्वरूपासी नाहीं मर्यादा ।
तिनें हरिकीर्ति ऐकतां सदा । हृदयीं गोविंदा धरियेलें ॥४४॥
कोणी याचक येती घरा । त्यांसी म्हणे कृष्णकीर्तन करा ।
उपवर झाली ते सुंदरा । हृदयीं यदुवीरा न विसरे ॥४५॥
राजा कन्येसी वर पाहात । तो तीस कळला वृत्तांत ।
मग पितयासी विनवीत । वर कृष्णनाथ आणीं कां ॥४६॥
वर वरीन एक जगज्जीवन । इतर पुरुष तुजसमान ।
ऐसें ऐकोनि कन्येचें वचन । राजा मनीं आनंदला ॥४७॥
तंव तिचे चौघे बंधु सकळ । कृष्णद्वेषी महाखळ ।
तिंहीं वृत्तांत ऐकतां तत्काळ । क्रोधायमान जाहले ॥४८॥
म्हणती आम्ही कृष्णासी न देऊं भगिनी । म्हणोनि सकळ राजे बोलावूनी ।
सभे बैसविले ते क्षणीं । नाना उपचारें पूजोनियां ॥४९॥
कन्येचे हातीं दिधली माळ । म्हणती तुज जो आवडे भूपाळ ।
त्यासी घालीं तत्काळ माळ । म्हणोनियां उभी केली ॥५०॥
तों मित्रविंदा ते अवसरीं । म्हणे श्यामसुंदरा मुरारी ।
जरी न पावसी झडकरी । तरी हा देह ठेवीं ना ॥५१॥
सर्वांतरात्मा श्रीकृष्ण । जाणे सर्वांची अंतरखूण ।
तत्काळ रथारूढ होऊन । निजभारेंसीं पातला ॥५२॥
अवंतीनगरासमीप आला वैकुंठनगरींचा भूप ।
सभेसी बैसले जे नृप । भयभीत जाहले ते ।५३॥
आला ऐकतां मृगेंद्र । भयभीत होती वनचर ।
तैसे सभानायक समग्र । चिंतातुर जाहले ॥५४॥
सभेमाजी आला तमालनीळ । तों मित्रविंदा घेऊनि उभी माळ ।
हरि देखतांचि तत्काळ । गळां घातली निमिषार्धें ॥५५॥
तैसीच उचलूनि नोवरी । वेगें घातली स्यंदनावरी ।
निजभारेंसहित कंसारी । द्वारकेकडे परतला ॥५६॥
जाहला एकचि हाहाकार । धांविन्नले युद्धासी नृपवर ।
युद्ध जाहलें घोरांदर । सकळ राजे पराभविले ॥५७॥
नोवरीचे चौघे बंधु ते अवसरीं । युद्ध करूं धांवती झडकरी ।
त्यांसही कृष्णें बाणांवरी । त्रासूनियां पळविलें ॥५८॥
ऐसा करूनियां पुरुषार्थ । द्वारकेसी आला कृष्णनाथ ।
चारी दिवसपर्यंत । यथाविधि लग्न केलें ॥५९॥
यावरी राजा यज्ञजित । त्याची कन्या उपवर होत ।
याज्ञजिती नाम सत्य । रूप विशेष सर्वांहूनि ॥६०॥
देखोनियां कन्या सुंदर । जे ते मागों येती नृपवर ।
राजा म्हणे पृथ्वीवरी जो बलाढय वीर । त्यासीच कन्या देईन ही ॥६१॥
अद्‌भुत पण करी नृपवर । सप्त वृषभ भयंकर ।
सातही आकळूनि जो वीर । वेसण घाली एकदांचि ॥६२॥
सात वृषभांचीं नासिकें । एक हस्तें आकळूनि देखें ।
एकदांचि टोंचील कौतुकें । त्यासींच कन्येचें पाणिग्रहण ॥६३॥
देशोदेशींचे नृपती । कर्णदुर्योधनादिक येती ।
परी पण भेदवेना निश्चितीं । मग बैसती मूकवत ॥६४॥
कोणी एक वृषभ बळें धरी । शिंगें झाडिती झडकरी ।
तों तेथें द्वारकापुरविहारी । निजभारेंसीं पातला ॥६५॥
पणाचा वृत्तांत कळला समस्त । मग दृढ कांस घाली रमानाथ ।
व्रजाचे वृषभ भासत । आकळी सर्वांदेखतां ॥६६॥
त्रिभुवनींच्या वीरां नाटोपे पण । तो सिद्धीसी नेला नलगतां क्षण ।
सातां वृषभांचीं नाकें टोंचून । वेसण घाली एकदांचि ॥६७॥
झाला एकचि जयजयकार । याज्ञजिती माळ घाली सत्वर ।
तों खवळले दुष्ट नृपवर । युद्धालागीं मिसळले ॥६८॥
सकळ राजे पराभवून । यथाविधि केलें पाणिग्रहण ।
रायें अपार दिधलें आंदण । मग नारायण बोळविला ॥६९॥
सवें घेऊनि याज्ञजिती । द्वारकेसी आला यदुपती ।
यावरी मद्ररायाची कन्या मद्रावती । तीस श्रीपति वरिता जाहला ॥७०॥
माता पिता बंधुजन । म्हणती पुरुषार्थी नवरा नारायण ।
त्यासी मद्रावती देऊन । षोडशोपचारें पूजावा ॥७१॥
मग बोलावूनि श्रीपती । यथाविधि दिधली मद्रावती ।
चारी दिवस सोहळा निश्चितीं । यथासांग जाहला ॥७२॥
देऊनि अपार आंदण । बोळविला यादवकुळभूषण ।
मद्रावती सवें घेऊन । गजरें पातला निजनगरा ॥७३॥
यावरी राजा लक्ष्मणसेन । त्याची कन्या लक्ष्मणा सुरत्‍न ।
तेणें केला दुर्धर पण । मत्स्ययंत्र तेधवां ॥७४॥
अखंड मत्स्ययंत्र फिरत । खालतें पाहोनि उदकांत ।
नळिकायंत्रें बाण त्वरित । अधोवदनें सोडावा ॥७५॥
भेदावया मत्स्याचा वाम नयन । मर्यादा केली तीन बाण ।
जो हें लक्ष्य भेदील सुजाण । त्यासी कन्या देईन हे ॥७६॥
मिळाले देशोदेशींचे नृपवर । दुर्योधनकर्णादि शाल्ववीर ।
निजभारें पार्थवीर सत्वर । तोही आला तेधवां ॥७७॥
तों धनुष्य देखिलें प्रचंड । शिवधनुष्याऐसें वितंड ।
नुचले आधीं कोणासी कोदंड । मग यंत्र भेदील कोण पैं ॥७८॥
कोणी धनुष्य उचलूनि पाहती । तों तें कोणा न ढळे निश्चितीं ।
उगेचि बैसती तटस्थ नृपती । कौतुक म्हणती पाहूं आतां ॥७९॥
मग उठिला वीर कर्ण । आपुलें संपूर्ण बळ वेंचून ।
धनुष्यासी चढविला गुण । नानाप्रकारें करूनियां ॥८०॥
खालीं भोंवे उदकाचा आवर्त । वरी चक्राकार मीन फिरत ।
नलिकाद्वारें न भेदवे निश्चित । म्हणोनि धनुष्य ठेविलें ॥८१॥
स्वस्थानीं बैसला कर्ण । मग उठिला पार्थ आपण ।
धनुष्या लावूनियां बाण । अधोवदनें सोडिला ॥८२॥
परी चुकलें तेंही संधान । मग धनुष्य खालीं ठेवी अर्जुन ।
बैसला स्वस्थानीं जाऊन । कोणा पण न भेदवे ॥८३॥
सभा राहिली तटस्थ पूर्ण । कन्या उभी माळ घेऊन ।
विलोकी श्रीरंगाचें वदन । प्रेमेंकरूनि सद्गदित ॥८४॥
जाणोनि तियेचें अंतर । सत्वर उठिला यादवेंद्र ।
धनुष्यबाण घेऊनि सत्वर । ठाण मांडिलें तेधवां ॥८५॥
पूर्वीं रामें केलें त्र्यंबकचापभंजन । त्याहूनि कठिण दिसे हा पण ।
लीलावतारी जगन्मोहन । न लागतां क्षण भेदिलें ॥८६॥
नलिकाद्वारें बाण गेला । मत्स्यनयन तेव्हां भेदिला ।
एकचि जयजयकार झाला । निर्जर पुष्पें वर्षती ॥८७॥
ते वेळीं त्या कालियामर्दना । माळ घाली लक्ष्मणा ।
मग प्रार्थूनि राहविलें जगज्जीवना । लग्न केलें विधिपूर्वक ॥८८॥
चारी दिवस सोहळा झाला अद्‌भुत । दोन लक्ष वाजी एक लक्ष रथ ।
एक अयुत गज जैसे पर्वत । आंदण दिधले तेधवां ॥८९॥
लक्ष्मणा घेऊनि सवेग । द्वारकेसी आला श्रीरंग ।
अष्टनायिका वरिल्या सांग । भक्तभवभंगें यापरी ॥९०॥
अष्टनायिकांसहित । नांदे द्वारकेसी वैकुंठनाथ ।
लीलावतारी रूक्मिणीकांत । प्रताप अद्‌भुत न वर्णवे ॥९१॥
रूक्मिणी जांबुवंती सत्यभामा सगुणा । कालिंदी मित्रविंदा याज्ञजिती सुजाणा ।
भद्रावती आणि आठवी लक्ष्मणा । नारायणें वरियेल्या ॥९२॥
ऐसा द्वारकेसी नांदे जगज्जीवन । तों अकस्मात कमलोद्‌भवनंदन ।
हातीं ब्रह्मवीणा घेऊन । ऊर्ध्वपंथें पातला ॥९३॥
सुधर्मासभेसी यादवेंद्र । यादवांसमवेत बैसला उदार ।
नारद देखितां रूक्मिणीवर । उठोनि उभा ठाकला ॥९४॥
जो व्यास-वाल्मीकांचा गुरू साचार । त्यासी षोडशोपचारें पूजी श्रीधर ।
ब्राह्मणदेव यदुवीर । परम प्रियकर भक्तांसी जो ॥९५॥
तों नारदें स्वर्गींहून । आणिलें पारिजातकसुमन ।
त्याच्या सुवासेंकरून । द्वारकानगर दुमदुमलें ॥९६॥
चतुर्दश रत्‍नांमाजी सुरेख । क्षीराब्धिमाजी निघाला पारिजातक ।
ज्याचें पालन शचीनायक । प्रीतीनें स्वर्गीं करीतसे ॥९७॥
जें पुष्प न सुके कदाकाळीं । परम दुर्लभ भूमंडळीं ।
तें पुष्प नारदें ते वेळीं । श्रीरंगासी दीधलें ॥९८॥
आश्चर्य करिती सभानायक । त्यापुढें सुवास नेणों आणिक ।
असो सभा विसर्जिलिया सकळिक । निजमंदिरीं प्रवेशती ॥९९॥
नारद गेला तेथूनी । रूक्मिणीच्या मंदिरीं चक्रपाणी ।
प्रवेशोनि तेचि क्षणीं । काय करिता जाहला ॥१००॥
गजदंताचिया डोल्हारियावरी । बैसोनियां मधुकैटभारी ।
रूक्मिणी बोलावूनि ते अवसरीं । पुष्प हातीं दीधलें ॥१॥
परम संतोषली जगन्माता । परी दूतीच्या मुखें हे वार्ता ।
सत्यभामेच्या कर्णीं तत्त्वतां । प्रवेशली आद्यंत ॥२॥
कीं पुष्प दिधलें रूक्मिणीसी । ऐकतां क्षोभली मानसीं ।
ताम्रवर्ण जाहला वदनशशी । अश्रू नेत्रांसी पैं आले ॥३॥
काढूनि टाकिले अलंकार । मोकळे रूळती कबरीभार ।
खेदें विव्हळ सुकुमार । स्वेदें शरीर आर्द्र जाहलें ॥४॥
दिव्य तल्पक सांडून । उर्वीवरी केलें शयन ।
हृदय गहिंवरलें पूर्ण । श्वासोच्छ्‌वास टाकीतसे ॥५॥
नयनीं सुटले पाझर । तेणें भिजले पयोधर ।
वर्जिले सकळ उपचार । विकळ शरीर पडियेलें ॥६॥
सख्यांसी म्हणे त्या चित्तचोरा । नका येऊं देऊं माझ्या मंदिरा ।
माझा प्राण गेलियाही शरीरा । स्पर्श त्याचा न करावा ॥७॥
हृदय त्याचें परम कठिण । बाळपणीं केलें विषप्राशन ।
द्वादश गांवें गिळिला अग्न । त्याचें वदन न पाहें मी ॥८॥
तेणें भोगिल्या बहुत युवती । महापतित त्यासी जपती ।
त्यासी माझिया सदनाप्रती । येऊं देऊं नका हो ॥९॥
परमनाटकी कपटी जार । माझिया सवतीचा प्रियकर ।
त्याचा स्पर्श अणुमात्र । मज सर्वथा सोसेना ॥११०॥
असो हें वर्तमान त्वरा । कळलें त्या भुवनसुंदरा ।
तत्काळ तिचिया मंदिरा । येता जाहला यादवेंद्र ॥११॥
तिचा परिसोनियां वृत्तांत । दासींप्रति दावी हस्तसंकेत ।
बोलूं नका कांहीं मात । उग्याचि असा क्षणभरी ॥१२॥
मौनेंचि येऊनि मोक्षदानी । सत्यभामेचें शिर उचलूनी ।
उसां आपुली मांडी देऊनी । चक्रपाणी बैसला ॥१३॥
मग बोले कंसारी । आमुची राणी आजि भूमीवरी ।
निजली असे निर्धारीं । कोण्या क्रोधें कळेना ॥१४॥
मुखचंद्र उतरला देख । भूमीवरी रूळती अलक ।
कपाळींचा मृगमद सुरेख । घर्मभरें वाहवला ॥१५॥
अंजनओघें पयोधर । कृष्णमुख जाहले समग्र ।
द्विजसमुदाय सकळ वर । विद्रूमाधर सूकले ॥१६॥
परमविशाळ नेत्र अंबुधर । आरक्त झाले झिरपे नीर ।
निचेष्टित पडले इंद्रियकर । कारभार टाकूनियां ॥१७॥
नयनकपाटें उघडूनी । आम्हांकडे न पाहेचि राणी ।
खेद तरी धरिला मनीं । कोणे गोष्टीचा न कळेचि ॥१८॥
ऐसे लौकिकविलास । दावी तेव्हां पुराणपुर्ष ।
आपुल्या पीतांबरें हृषीकेश । नेत्राअश्रू पुसी तेव्हां ॥१९॥
मग ते सद्गदित होऊन । स्फुंदस्फुंदोनि बोले वचन ।
जीस तुम्हीं दिधलें सुमन । तिचें समाधान करावें ॥१२०॥
मजवरी असतें तुमचें मन । तरी कां तीस देतां सुमन ।
ऐकतांचि ऐसें वचन । हांसें आलें रमारंगा ॥२१॥
हरि म्हणे नारदें आणिलें सुमन । तें देऊनि केलें तिचें समाधान ।
परी तुझे द्वारीं आणून । वृक्षचि लावीन अवघाचि ॥२२॥
ऐसें बोलोनि उठविली । आलिंगन देऊनि अंकीं बैसविली ।
नूतन अलंकार ते वेळीं । स्वहस्तें वनमाळी लेववीत ॥२३॥
शीसफूल चंद्र जडोनी । आपुल्या हातें घातली वेणी ।
वेणीचे नग चक्रपाणी । ठायीं ठायीं गुंफीत ॥२४॥
मुख धुवोनि स्वहस्तें । कुंकुम रेखिलें रमानाथें ।
अंगप्रत्यंगीं भूषणें समस्तें । दिव्य नूतनें लेवविलीं ॥२५॥
ऐसें करीत समाधान । तों तेचि वेळीं पाकशासन ।
आला गार्‍हाणें घेऊन । हरिलागीं सांगावया ॥२६॥
करूनि साष्टांग नमस्कार । उभा राहिला वज्रधर ।
भ्रूसंकेतें क्षीराब्धिजावर । वर्तमान पुसे इंद्रातें ॥२७॥
तंव तो म्हणे यादवराया । नरकासुर येऊनियां ।
आमचा मुख्य मुकुट हिरोनियां । घेऊनि गेला निजबळें ॥२८॥
आमुची जे कां अदिति माता । तिचीं कुंडलें नेलीं जगन्नाथा ।
ज्या कुंडलांची प्रभा पाहतां । शशिसूर्य झांकोळती ॥२९॥
भूमिपुत्र नरकासुर । असंख्य त्याजवळी दैत्यभार ।
देवांचीं पदें समग्र । हिरोनि घ्यावया इच्छीतसे ॥१३०॥
आम्हीं कोणासी जावें शरण । तूं देवाधिदेव सनातन ।
बाळकें खेद पावतां धांवोन । पितयाच्या गळां पडती पैं ॥३१॥
माता जरी परतें लोटी । परी तिच्या पायीं घालिती मिठी ।
आम्ही शरण जगजेठी । याचि रीतीं तुज आलों ॥३२॥
कैवारिया यादवेंद्रा । धांवणें करीं प्रतापरूद्रा ।
दीनबंधु करूणासमुद्रा । ब्रीदें सांभाळीं आपुलीं ॥३३॥
ऐसें ऐकोनि सत्यभामापती । सैन्य सिद्ध करवी शीघ्रगती ।
यादवभार सिद्ध होती । चतुरंगदळासहित पैं ॥३४॥
त्राहाटिल्या संग्रामसंकेतभेरी । तेणें मंगळजननी थरारी ।
तों सत्यभामा म्हणे जी कंसारी । मीही येईन समागमें ॥३५॥
ऐकतें तुमच्या संग्रामगोष्टी । परी मीही पाहीन आजि दृष्टीं ।
गरूडावरी तुमच्या पृष्ठीं । मागें लपोनि राहीन मी ॥३६॥
हरि म्हणे ऐक मृगनयनी । संग्रामाच्या गोष्टी ऐकिजे कानीं ।
महावीर रण देखोनी । मूर्च्छा येऊनि पडती धरे ॥३७॥
तुज सोसेना अनिल शीतळ । तेथें येती बाणांचे कल्लोळ ।
तें नव्हे गायन मंजुळ । आरडती सकळ वीर तेथें ॥३८॥
तो नव्हे मृदंग मधुर । होती उल्हाटयंत्राचे भडिमार ।
तुज उष्ण न सोसे अणुमात्र । शस्त्रसंभार वर्षती तेथें ॥३९॥
सत्यभामा म्हणे प्रतापशूरा । तुम्ही जवळी असतां यादवेंद्रा ।
मज न लागे भयवारा । तुमच्या कृपेंकरूनियां ॥१४०॥
मनीं विचारिंलें जगन्नाथें । जरी समागमें न न्यावें ईतें ।
तरी ही पुन्हां रूसेल मग मातें । सांकडें हाईल दुसरें ॥४१॥
स्त्रियेशीं युद्ध केल्याविण । भौमासुरा नाहीं मरण ।
पुढील भविष्यार्थ जाणोन । सत्यभामा सवें घेतली ॥४२॥
गरूडारूढ जाहला जगजेठी । सत्यभामा बैसविली पाठीं ।
दळभारेंसीं उठाउठी । दैत्यपुरीसमीप आला ॥४३॥
तों सात दुर्गें तया नगरा । भेदीत गेलीं हो अंबरा ।
सात परिघ अवधारा । जेथींच्या नीरा अंत न लागे ॥४४॥
महाप्रतापी नरकासुर । भूमंडळींच्या कन्या नागर ।
एकशत सोळा सहस्र । सांचवूनि ठेविल्या ॥४५॥
तितुक्यांशीं लग्न लावूनियां । करूं इच्छी आपुल्या स्त्रिया ।
ज्यांच्या स्वरूपावरूनियां । रंभा मेनका ओंवाळिजे ॥४६॥
ऐशा त्या सुंदरा कोंडूनी । नरकासुरें ठेविल्या निजसदनीं ।
सैन्यासहित चक्रपाणी । वेढा घाली नगरातें ॥४७॥
कळला नरकासुरासी समाचार । कीं इंद्राचा कैवारी यादवेंद्र ।
युद्धालागीं आला बाहेर । दैत्य थोर कोपला ॥४८॥
आज्ञा देतां ते अवसरीं । सेनासिंधु लोटला बाहेरी ।
रणवाद्यें महागजरीं । वाजों लागलीं तेधवां ॥४९॥
एकाहूनि एक उंच दुर्गें । उल्हाटयंत्रें भडकती वेगें ।
इंद्रादिक निराळमार्गें । विमानीं बैसोनि पाहती ॥१५०॥
पायदळावरी पायदळ । एकवटलें परमतुंबळ ।
एकचि झाला रणकल्लोळ । देखतां काळ भय पावे ॥५१॥
तुरंगांवरी तुरंग लोटती । वीरांशीं वीर झगटती ।
असिलता करीं लखलखती । क्षणप्रभेसारिख्या ॥५२॥
रथांशीं रथ मिळाले । अश्व दोंपायीं उभे ठाकले ।
दोन्ही मकरतोंडांशीं घर्षण झालें । कल्पांत मांडला ते वेळे ॥५३॥
सारथ्यांशी सारथी हाणिती । रथियांसी रथी ओढिती ।
देहआशा टाकोनि भीडती । स्वामिकार्याकारणें ॥५४॥
परमकुशल सारथी । रथ ओढूनि माघारे करिती ।
पवनवेगें रथ फिरविती । कावे देती सव्य अपसव्य ॥५५॥
कीं त्या रणसागरावरी सहजें । रथ तेचि थोर जहाजें ।
वरी ध्वज सतेज विराजे । पवनवेगें धांवती ॥५६॥
रणसागरीं मीन चंचळ । तेंचि पायदळ हिंडे चपळ ।
गज धांवती सबळ । तेचि नाडेसावजें पैं ॥५७॥
रक्तगंगेमाजी शुंडा तुटोन । वाहती ते चपळ विरोले जाण ।
छत्रें नीळवर्ण पडती तुटोन । तेचि कूर्म वर्तुळाकार ॥५८॥
असो यादववीरांचा मार थोर । क्षणें काचावले दैत्यभार ।
हें देखोनि नरकासुर । चंडबळेंसीं धांविन्नला ॥५९॥
जैसी पर्जन्यवृष्टि निरंतर । तैसे बाण वर्षे उर्वीपुत्र ।
यादव त्रासिले थोर । मार अनिवार तयाचा ॥१६०॥
ऐसें देखोनियां श्रीरंगें । शारंग चढविलें अति वेगें ।
सुपर्णवहनें भक्तभवभंगें । बाण हातीं घेतला ॥६१॥
तों सत्यभामा म्हणे ते अवसरीं । मजपाशीं धनुष्य द्या पूतनारी ।
मी युद्ध करीन क्षणभरी । नरकासुराशीं आजि पैं ॥६२॥
आकर्ण ओढी ओढून । सोडी बाणांपाठीं बाण ।
वरि आश्चर्य करिती पूर्ण । म्हणती नवल वर्तलें ॥६४॥
कोण्या वीराची पत्‍नी । युद्ध करी समरांगणीं ।
परवीरांसी खोंची बाणीं । वर्में लक्षूनि सवेग ॥६५॥
नेणे कधीं बाहेरील समीर । उभी रणांगणीं धरूनि धीर ।
जिचें बोलणें अतिसुकुमार । हांकें अंबर गाजवीतसे ॥६६॥
सोडी शरांपाठीं शर । आश्चर्य करी भूमिपुत्र ।
म्हणे स्त्रियेवरी मी शस्त्र । महावीर कैसा धरूं ॥६७॥
मग रथ पदें लोटिला सत्वर । हरीसी म्हणे मोठा तूं रणधीर ।
युद्धासी स्त्री केली समोर । लाज अणुमात्र नाहीं तुज ॥६८॥
स्त्रीसमवेत तुज गोवळा । भस्म करीन ये वेळां ।
म्हणोनि अग्निअस्त्रमंत्र जपला । बाण सोडिला तैसाचि ॥६९॥
ऐस देखोनि हृषीकेशी । सत्यभामा घाली पाठीसी ।
धनुष्य ओढूनि वेगेंसीं । पर्जन्यास्त्र सोडिलें ॥१७०॥
अग्नीसी ग्रासूनि पर्जन्यें । शीतल केलीं सकळ सैन्यें ।
जैसें सत्संगतीयोगानें । मोहभ्रम वितळती ॥७१॥
चंडधारा मेघ वर्षत । तेणें नरकासुराची चमू वाहत ।
मग नरकासुरें वातास्त्र त्वरित । प्रेरितां मेघ वितळला ॥७२॥
वात वाढला प्रबळ । तेणें उडों पाहे यादवदळ ।
हें देखोनि तमालनीळ । पर्वतास्त्र योजिलें ॥७३॥
तेणें कोंडिला सकळ वात । पर्वत भौमसैन्यावरी पडत ।
सवेंचि वज्रास्त्र नरक जपत । तेणें पर्वत पिष्ट केले ॥७४॥
ऐसें देखोनि वैकुंठपाळ । म्हणे अकं आतां लावावा वेळ ।
सकळशास्त्रांचा नृप तात्काळ । सुदर्शन हातीं घेतलें ॥७५॥
जैसे उगवले सहस्र मार्तंड । तेजें लखलखिलें ब्रह्मांड ।
निमिष न लागतां प्रचंड । यादवरायें सोडिलें ॥७६॥
नरकासुराचें शिर । छेदिलें न लागतां क्षणमात्र ।
मागुती परतोनि सत्वर । हरिहस्तकीं वसिन्नलें ॥७७॥
आश्विनमास वद्य चतुर्दशी । तीन प्रहर जाहलिया निशी ।
चंद्रोदयीं नरकसुरासी । मुक्ति दिधली श्रीरंगें ॥७८॥
हरीनें नरकासुरासी दिधला वर । ये समयीं मंगलस्नान न करी जो नर ।
तो परमदरिद्री दुराचार । जन्मवरी जाणिजे ॥७९॥
असो नरकासुराचें नगर । त्या नांव प्राग्ज्योतिषपुर ।
त्यामाजी प्रवेशला श्रीकरधर । तंव अपूर्व देखिलें ॥१८०॥
तेजागळा मणिपूरपर्वत । त्यावरी मंदिरें रत्‍नखचित ।
त्यांत सोळाहस्त्र एकशत । गोपी सुंदर देखिल्या ॥८१॥
परमसुंदर लावण्यखाणी । तिंहीं दृष्टीं देखिला चक्रपाणी ।
म्हणती कोटि काम यावरूनी । ओंवाळूनी टाकावे ॥८२॥
ऐसा जरी आम्हांसी होईल वर । तरी मग पुण्यासी नाहीं पार ।
द्वारकनाथ हा यादवेंद्र । आजि दृष्टीं देखिला ॥८३॥
समीप देखिला क्षीराब्धिजावर । गोपी सद्गद जाहल्या समग्र ।
करिती हरीसी नमस्कार । आमुचा उद्धार करीं आतां ॥८४॥
आम्ही अपर्णिता कर्णकुमारी । आमुचा बंध मुक्त करीं ।
आम्ही षोडश सहस्र नारी । कंसांतका तुजचि वरूं ॥८५॥
मग कृपाळु यदुवीर । तयांसी दिधला नाभीकर ।
म्हणे तुमचा मनोभाव समग्र । पुरवीन चिंता न कीजे ॥८६॥
सोळासहस्र एकशत । आणवी श्रीकृष्ण दिव्य रथ ।
गोपिका बैसवूनि समस्त । द्वारकेलागीं पाठविल्या ॥८७॥
सवें दिधलें समस्त सैन्य । अक्रूर उद्धव रेवतीरमण ।
जयवाद्यें वाजवून । द्वारकापंथें परतले ॥८८॥
वाटे जातां गोपी भाविती । आम्हांसी वर जोडला श्रीपती ।
नरकासुरानें उपकार निश्चितीं । आम्हांवरी बहु केला ॥८९॥
तो केवळ आमुचा पिता । तेणें दाखविलें वैकुंठनाथा ।
असो यावरी कमलोद्‌भवजनिता । काय करिता जाहला ॥१९०॥
प्राग्ज्योतिषपुरीं हरि राहिला । तों नरकासुराची स्त्री ते वेळां ।
पुत्र हातीं घेऊनि तमालनीळा । शरण येती जाहली ॥९१॥
मुकुटकुंडलें ते वेळीं । हरीपुढें आणूनि ठेविलीं ।
म्हणती आम्ही शरण वनमाळी । कृपा करीं दीनबंधु ॥९२॥
तो नरकपुत्र भगदत्त । हरीसी नमस्कार घालीत ।
कृपेनें द्रवला रमानाथ । छत्र धरवी तयावरी ॥९३॥
तयासी राज्यीं स्थापून । मुकुटकुंडलें घेऊन ।
सत्यभामेसहित जगन्मोहन । द्विजेंद्रावरी आरूढला ॥९४॥
क्षण न लागतां इंद्रपदासी । आला क्षीरसिंधुविलासी ।
मुकुटकुंडलें सहस्रनेत्रासी । देऊनियां तोषविलें ॥९५॥
मग नानारत्‍नें अलंकारीं । इंद्रें पूजिला मधु-कैटभारी ।
आज्ञा घेऊनि ते अवसरीं । द्वारकेसी हरि निघाला ॥९६॥
तों इंद्राचें नंदनवन । परम सुरेख शोभायमान ।
तेथें पारिजातक दिव्य रत्‍न । दृष्टीं देखिलें श्रीकृष्णें ॥९७॥
कमळपत्राक्षें ते वेळां । वृक्ष समूळ उपटिला ।
गरूडावरी पुढें घेतला । तों कोल्हाळ केला वनरक्षकीं ॥९८॥
वनरक्षक सांगती इंद्रातें । कीं वृक्ष नेला द्वारकानाथें ।
आखंडल ऐकतां क्रोधें बहुतें । युद्धालागीं धांविन्नला ॥९९॥
परम अज्ञानें वेष्टिला इंद्र । नेणवेचि हरिप्रताप अपार ।
म्हणे उभा रे उभा तूं तस्कर । वृक्ष नेसी चोरूनियां ॥२००॥
ऐकोनि मुरडला श्रीरंग । शारंग चढविलें सवेग ।
तंव वाचस्पति म्हणे श्रीपति अभंग । यासीं युद्धा न पुरसी तूं ॥१॥
हा पुराणपुरूश नारायण । क्षणांत ब्रह्मांड टाकील जाळून ।
इंद्र पाहे विचारून । नमस्कार घातला ॥२॥
इंद्र गेला परतोन । द्वारकेसी आला नारायण ।
सत्यभामेच्या द्वारीं नेऊन । पारिजातक लाविला ॥३॥
मणि बापाचा आंदण घरीं । पारिजातक वृक्ष द्वारीं ।
त्या गर्वें सत्राजितकुमारी । कोणासी न मानीच ॥४॥
असो ऐसा करूनि पुरूषार्थ । हरि रूक्मिणीच्या गृहा येत ।
षोडशोपचारें पूजा करीत । परमपुरूषाची प्रीतीनें ॥५॥
रूक्मिणी म्हणे श्रीहरी । पारिजातक लाविला तिचें द्वारीं ।
एक पुष्प आम्हां घरीं । आणूनियां दीधलें ॥६॥
कृष्ण म्हणे वृक्ष कासया निश्चित । तुझें द्वारीं पुष्पें अपरिमित ।
स्वर्गींहूनि अकस्मात । अंगणांत पडतील ॥७॥
ऐसा वर देऊनी । मग काय करी मोक्षदानी ।
सोळा सहस्र मंदिरें तेचि क्षणीं । उभविलीं हेममयें ॥८॥
त्या मंदिरांची रचना पाहूनी । तटस्थ होती सुधापानी ।
विश्वकर्मा स्वकरेंकरूनि । निर्मीत हरिआज्ञेनें ॥९॥
नारी षोडश सहस्र एकशत । सुलग्न पाहूनि कमलोद्‌भवतात ।
एकेचि घटिकेंत तितुक्यांस वरीत । कर्तव्य अद्‌भुत हरीचें ॥२१०॥
सोळा सहस्र एकशत नारी । तितुकीं रूपें धरी कंसारी ।
सोळा सहस्र मंदिरीं । मंडप दिव्य उभविले ॥११॥
सोळा सहस्रां घरीं । भिन्नभिन्न वसुदेव देवकी सुंदरी ।
बळिभद्र उग्रसेन सुभद्रा नारी । सर्वां घरीं सारिख्या ॥१२॥
सकळ यादवांचे भार । ऋषींच्या मांद्या समग्र ।
रूक्मिणीचीं रूपें अपार । सर्वां घरीं सारिखीं ॥१३॥
इतुकीं रूपें आपण । नटला पूतनाप्राणहरण ।
पूर्णावतार श्रीकृष्ण । अतिअद्‌भुत लीला त्याची ॥१४॥
वैकुंठींची अवघी संपत्ती । आणविली द्वारकेप्रती ।
शंखचक्रादि आयुधें हातीं । श्रीवत्सलांछन दाविलें ॥१५॥
वैकुंठींचे दिव्य रथ । द्वारकेसी आणवी कृष्णनाथ ।
सुपर्ण कर जोडूनि तिष्ठत । कर्तव्य अद्‌भुत हरीचें ॥१६॥
सनक सनंदन सनत्कुमार । नारद विरिंचि रूद्र शचीवर ।
द्वारकेसी येती वारंवार । हरिदर्शन घ्यावया ॥१७॥
वरकड हरीचे अंशावतार । पृथ्वीवरी दाविलें चरित्र ।
वैकुंठपति इंदिरावर । तैसाचि असे संचला ॥१८॥
कृष्णावतारीं आपण । स्वयें अवतरला आदिनारायण ।
वैकुंठींचीं कपाटें देऊन । राहिला जाण द्वारके ॥१९॥
इंद्रादिदेवांचीं गार्‍हाणीं । द्वारकेसी येती क्षणक्षणीं ।
यालागीं पूर्णावतार चक्रपाणी । भक्तजनीं जाणिजे ॥२२०॥
म्हणोनि सोळा सहस्र घरीं । तितुकीं रूपें हरीच धरी ।
षोडश सहस्र नारी । एक्याचि लग्नीं वरियेल्या ॥२१॥
रत्‍नजडित बोहलीं । सर्वां घरीं घातलीं ।
हळदी उटणें वनमाळी । सर्वां घरीं खेळत ॥२२॥
उग्रसेन उद्धव अक्रूर । घरोघरीं सारिखेचि समग्र ।
भांडारें फोडूनि अपार । द्रव्य याचकां वांटिती ॥२३॥
ऐसा चारी दिवस सोहळा पूर्ण । वर्णितां भागे सहस्रवदन ।
सकळ देव येऊन । कामें करिती घरोघरीं ॥२४॥
इंद्र अग्नि यम निर्ऋति । रसनायक समीर धनपति ।
सत्यलोकवासी अपर्णापति । घरोघरीं सारिखेचि ॥२५॥
सर्व याचकांसी देकार । घरोघरीं देत कुबेर ।
सकळ वर्‍हाडियां नीर । रसनायक पुरवीतसे ॥२६॥
सभेवरी मलयाद्रीचा सुवास । घेऊनि येत प्राणाधीश ।
जातवेद धरूनि हर्ष । पाकनिष्पत्ति स्वयें करी ॥२७॥
असो यावरी सर्वां सदनीं । राबताती सुधारसपानी ।
अष्टनायिका येऊनी । सर्वां घरीं नृत्य करिती ॥२८॥
ऐसे चारी दिवस संपादूनी । अवघ्यांसी दिधली पाठवणी ।
अलंकारवस्त्राभरणीं । चारी वर्ण तोषविले ॥२९॥
अहो त्या सोळा सहस्र वेदश्रूति । निर्गुणाची न वर्णवे कीर्ति ।
म्हणोनि आल्या द्वारकेप्रति । हरिरूपीं जडावया ॥२३०॥
किं हरिकल्पवृक्षावरी देखा । सोळा सहस्र चढिल्या कनकलतिका ।
सर्वही सुफळसुखदायका । वैकुंठनायका भोगिती ॥३१॥
श्रीकृष्ण मेघसांवळा । सोळा सहस्र तळपती चपळा ।
दाहकत्व सांडूनि सकळा । हरिरूपीं जडल्या हो ॥३२॥
कीं षोडश सहस्र राजहंसी । हरिपदीं मुक्तता हे मुक्तराशी ।
मिळाल्या सकळ भोगूं द्वारकेसी । तपें बहुत आचरोनियां ॥३३॥
सर्वां घरीं समसमान । एकचि असे जगज्जीवन ।
परी मुख्य स्वरूप रूक्मिणीवांचून । सहसा नसे कोठेंही ॥३४॥
एकपत्‍नीव्रती श्रीकृष्ण । रूक्मिणीवेगळा नव्हे एक क्षण ।
इच्छारूपें धरून । सोळा सहस्र घरीं वसे ॥३५॥
हा हरिविजयग्रंथ । परमसुंदर मलयपर्वत ।
तेथींचा समीरसुवास अद्‌भुत । निजभक्त सेविती ॥३६॥
ब्रह्मानंदा पंढरीनाथा । श्रीधरवरदा परमसमर्था ।
निजभक्तांचिया मनोरथा । तुजविण पुरविता कोण असे ॥३७॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
सदा परिसोत प्रेमळ भक्त । षड्‌विंशतितमोऽअध्या गोड हा ॥२३८॥
॥ अध्याय सव्विसावा समाप्त ॥ ओव्या २३८॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

एकदा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी अर्जुन आला होता. कृष्णाचा तो आतेभाऊ, पांडयांतील तिसरा, जगात अजिंक्य म्हणून मानला गेलेला वीर, कृष्णाचा भक्त व सखा ! त्यांची भेट म्हणजे प्रेमाला भक्तीची मिठीच. त्यांनी प्रेमाने बोलणी केल्यावर मृगयेला जाण्याचे ठरविले. एकाच रथात बसून व बरोबर काही सैनिक घेऊन ते अरण्यात गेले. द्वारकेहून ते फार दूरवर पोहोचले. साक्षात् नरनारायणच होते ते ! जाता जाता ते यमुनेच्या तीरी गेले ! तेथेच कृष्ण लहानपणी खेळला होता. यमुनेच्या काठावर एक सुंदर तरुणी बसलेली कृष्णाला दिसली. ती ध्यान करीत होती. कृष्णाने अर्जुनाला म्हटले- " धनंजया, माझे एक काम कर. ती तरुणी ध्यानस्थ बसली आहे पहा. ती तप करते की काय ? कोणासाठी ? तिचे नाव काय ? तू जरा विचारून ये बरे." तेव्हा अर्जुन तिच्या जवळ जाऊन उभा राहिला. तिचे ध्यान भंग पावले. तिने वर पाहिले. अर्जुनाने आपला परिचय करून दिला आणि तिला सर्व माहिती विचारली. ती म्हणाली- "माझे नाव कालिंदी. मी सूर्याची मुलगी. श्रीकृष्ण हाच मला पती लाभावा म्हणून मी तपश्चर्या करीत आहे."

अर्जुन म्हणाला- "तू ज्याच्या प्राप्तीसाठी इथे तप करीत बसली आहेस तोच श्रीकृष्ण जवळच आला आहे. मी व तो मिळून मृगया करण्यासाठी म्हणून दूरवर आलो आहोत. मोठ्या वेगवान रथांत तो पहा कृष्ण तिकडे बसला आहे."

कालिंदी म्हणाली- 'हा मोठा योगायोगच ! अहाहा ! मला त्याची प्रत्यक्ष भेट घडेल का ? आपण तेवढी कृपा कराल का ? "

अर्जुनाने तिला होय म्हणून सांगितले. तो कृष्णाजबळ आला आणि म्हणाला- "कृष्णा ! ती कालिंदी नावाची सूर्यकन्या असून ती तुझ्याशीच विवाह व्हावा या हेतूने तप करीत आहे."

दारूका, रथ तीराजवळ घेऊन चल." कृष्णाने दारूकाला हसत हसतच म्हटले. कालिंदीसमोर रथ नेऊन कृष्ण रथाखाली उतरला आणि कालिंदीने जसे ध्यान केले होते तशाच रूपात तिला दर्शन दिले. कालिंदीने वनपुष्पांची माळ करून कृष्णाला अर्पण केली. तो तिला घेऊन द्वारकेस गेला. तेथे मग मोठ्या थाटाने दोघांचा विवाह सोहळा साजरा झाला ! कालिंदी म्हणजेच यमुना नदीने धारण केलेले स्त्रीरूप होय.

श्रीकृष्णाने मित्रविंदा नांवाच्या राजकन्येशीही विवाह केला. अवंतीचा राजा मित्रविंद याची ती मुलगी. तिला श्रीकृष्ण हाच वर पसंत होता, पण तिचे चारही बंधू तिच्याविरुद्ध होते. त्यांनी तिचे स्वयंवर करावयाचे ठरविले. त्यासाठी त्यानी अनेक राजांना व राजपुत्रांना निमंत्रणे पाठविली. त्यांत कृष्णाला मात्र निमंत्रण दिले नाही. कोणत्या तरी राजाला तिने वरावे असा आग्रह तिच्या बंधूनी धरला. ती कृष्णाचे स्मरण करून मनोमन त्याला बोलावू लागली. कृष्णाला तिच्या स्वयंवराचे वृत्त कळले आणि ती आपल्यासाठी तळमळत आहे हेही त्याला कळले. तो अचानक स्वयंवराच्या जागी गेला. त्याला बघताच सारी सभा चकित झाली, राजे मनातून भयभीत झाले. तेवढ्यात मित्रविंदा त्वरेने कृष्णाजवळ गेली आणि तिने आपल्या हातातील वरमाला कृष्णाच्या गळ्यात घातली ! कृष्णाने तत्काळ तिला सभेबाहेर नेले व रथात बसवून दारुकाला रथ भरधाव सोडण्यास सांगितले. तोच मित्रविंदेचे बंधू कृष्णाला अडवण्यासाठी धावले. कृष्णाने त्यांना शरयुद्धात पराभूत केले ! नंतर तो तिला घेऊन द्वारकेत आला. तिच्याशीही त्याने यथाविधी विवाह केला. रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती व कालिंदी यांच्या इतकाच तिलाही कृष्णाने मान दिला.

कृष्णाचा सहावा विवाह याज्ञजित् राजाची मुलगी याज्ञजिती हिच्याशी झाला. स्वयंयरासाठी राजाने असा एक पण ठेवला होता की त्याच्याजवळ असलेल्या सात उन्मत्त बैलांना एकदम बांधून जो वठणीवर आणील त्या बलशाली तरुणालाच याज्ञजिती माळ घालील. अनेक तरुणांनी व बलाढ्य राजपुत्रांनी तसा प्रयत्‍न केला होता, पण त्यांची फजिती झाली होती. कृष्ण स्वयंवराला गेला. त्याने त्या साती वृषभराजांना एकदम बांधून दाखविले इतकेच नव्हे तर त्या बैलांचा माजही उतरला ! याज्ञजितीने कृष्णाला माळ घातली. ते पाहून निराश झालेले व चिडलेले अनेक तरुण वीर कृष्णाशी युद्ध करायला आले, पण कृष्णाने त्यांचा धुव्वा उडविला. त्याने याज्ञजितीला द्वारकेत नेले आणि तिच्याशी यथाविधि विवाह केला.

त्यानंतर मद्र देशाच्या राजाने आपली मुलगी कृष्णाला भार्या म्हणून दिली. त्याने स्वतःच्या देशात कृष्णाला निमंत्रण दिले, आणि मोठ्या थाटाने लग्न करून दिले.

लक्ष्मणा ही कृष्णाची आणखी एक पत्‍नी. तिच्या पित्याने तिचे जेव्हा स्वयंवर मांडले तेव्हा असा पण केला की जो कोणी जास्तीत जास्त तीन बाण मारून वर टांगलेल्या कृत्रिम मस्त्याचा डोळा फोडील त्याला लक्ष्मणा देईन. ते मत्ययंत्र सतत फिरते ठेवलेले होते. त्यासाठी जे धनुष्य ठेवलेले होते ते फार अजस्त्र आणि अवजड होते. जमिनीवर ठेवलेल्या पात्रातील पाण्यात मत्स्यनेत्र पाहून भेद करावयाचा होता. कृष्ण स्वयंवराच्या वेळी उपस्थित होता. कोणालाही तो पण जिंकता आला नाही. परंतु श्रीकृष्णाने मात्र त्या माशाचा डोळा पहिल्याच बाणाने विरद केला. तेव्हा लक्ष्मणाने सर्व पराभूत राजांसमोर कृष्णाच्या गळ्यात वरमाला घातली.

अशा प्रकारे रुक्मिणी, जांबुवंती, सत्यभामा, कालिंदी, मित्रविंदा, याज्ञजिती, मद्रा आणि लक्ष्मणा अशा आठ स्त्रिया म्हणजेच अष्टनायिका ! या आठही स्त्रियांबरोबर कृष्ण संसार करू लागला. एकदा काय झाले, यादवांच्या सभेत नारदमुनी आले. त्यानी स्वर्गात असलेल्या पारिजात वृक्षाचे फारच चांगले वर्णन केले, आणि एक पारिजातकाचे फूल त्यानी कृष्णाला दिले. त्याचा सुगंथ दरवळला. सर्वांची मने मुग्ध झाली.

नारद गेल्यावर व सभा संपल्यावर कृष्ण रुक्मिणीच्या भवनात गेला. रुक्मिणीने त्याचे स्वागत केले. तो झोपाळ्यावर बसला. त्याने पारिजातकाचे ते फूल तिला दिले. तिला मोठे आश्चर्य वाटले. त्या फुलाचा सुगंध घेऊन ती मोहून गेली. तिने विचारले तेव्हा कृष्णाने सांगितले- "स्वर्गात इंद्राच्या नंदनवनात पारिजात वृक्ष आहे. त्याचे फूल आहे हे. नारदांनी प्रेमाने हे मला अर्पण केले, तेच मी तुला दिले."

तिकडे सत्यभामेला हा पुष्पवृत्तांत कळला. तिला मत्सर वाटला. कृष्णाने ते फूल आपल्याला दिले नाही, रुक्मिणीला दिले, याचा तिला फार राग आला. तिने आपली भूषणे काढून ठेवली, साज उतरून ठेवला. दासींना तिने सांगितले- "माझ्या सदनात कृष्ण आला तर त्याला आत सोडू नका. मला त्याचे मुखही पहायचे नाही." ती एकटीच रडत, धुसफुसत बसली. कृष्णाला कल्पना होतीच की सत्यभामा आपल्यावर रागावणार. तो रुक्मिणीचा निरोप घेऊन तिच्या सदनात गेला. त्याने दासींचे म्हणणे ऐकले. गुप्तपणे तो आत गेला. सत्यभामेजवळ लाडीगोडीने पुष्कळ बोलणी केली. तिला आपल्या जवळ घेतले, तिची समजूत काढू लागला. तेव्हा ती मुसमुसून रडत म्हणाली- "इथे लाडीगोडी लावतां आणि एखादी दुर्मिळ वस्तु मिळाली तर ती मात्र रुक्मिणीला देतां. त्यावेळी माझी आठवण नाही येत ? ते स्वर्गातले सुगंधी सुमन सवतीच्या शृंगारासाठी सोपवितांना सत्यभामेचा सोयीस्कर विसर कसा सहज पडला ! तुमचे नुसते मधुर शब्दच आमच्या वाट्याला यायचे ?" कृष्ण म्हणाला- "लाडके, तू सत्यभामा आहेस, माझी चूक सत्य आहे हे दाखवून दिलेस. पण मी घाईघाईने गेलो नि तिला फुल दिले ! एका फुलासाठी कशाला रुसतेस ? मी तो वृक्षच तुझ्यासाठी आणून देतो, मग तर झाले ना ? आता रडू नको." वृक्ष आणण्याची गोष्ट करताच सत्यभामा म्हणाली- "बोलता तसे खरे करून दाखवा म्हणजे झाले ?" तिची समजूत पटली. मग कृष्णाने तिला पुन्हा सर्व भूषणे स्वतःच्या हातांनी घातली, तिची कळी खुलली.

इंद्राचे त्यावेळी द्वारकेत आगमन झाले. कृष्ण सत्यभामेच्या सदनात आहे असे कळताच इंद्र तिकडे गेला. कृष्णाने त्याचे स्वागत केले. "यावे देवराज ! आज स्वर्गापेक्षा द्वारका नगरी विशेष प्रिय झालेली दिसते. विशेष प्रयोजन असल्याशिवाय येणे होणार नाही ! इंद्र म्हणाला- "कृष्णा, दुष्ट असुरांचा नाश करण्यासाठी तू आला आहेस. नरकासुर फारच बलिष्ट झाला आहे. आता तर त्याने देवांचा मुकुट पळविला. अदितिमातेची कुंडलेही त्याने हिरावून नेली. नरकासुराचे सैन्य फार मोठे आहे, आणि स्वर्गातून देवांना तो हाकलून देईल अशी भीती वाटते. त्या नरकासुराला शासन करून तूच माझे व सर्व देवाचे रक्षण करशील ?"

कृष्ण म्हणाला- "इंद्रा, तू चिंता करू नकोस." मग इंद्राला पुढे पाठवून कृष्णाने यादवसेना एकत्र करण्याची सूचना केली. सत्यभामा म्हणाली- "नाथ, तुम्ही नरकासुराशी युद्ध करण्यासाठी निघालेले असाल तर मीही येते. तुमचा पराक्रम स्वतः पहावा अशी माझी इच्छा आहे. गरुडावर बसून येईन."

कृष्ण म्हणाला- " भामे ! तू आता आणखी दुसरा हट्ट कशाला करतेस ? मोठमोठे वीरपुरुषही युद्धात मरतात, तेथे तुझा काय पाड लागणार ? बाणांचा वर्षाव होतो तिथे ! वीरांच्या गर्जना ऐकूनच तू घाबरून जाशील." तरीही सत्यभामेने हट्ट धरला. 'तुम्ही जवळ असलात की मला कसले भय वाटणार ? तुम्ही तर कंसाला सुद्धा मारलेत ?'

नरकासुराला स्त्रीशी युद्ध करूनच मरण येणार असे रहस्य होते ते कृष्णाला माहीत होते. कृष्ण सत्यभामेला नेण्यास तयार झाला. कृष्ण तिला घेऊन गरूडावर बसला. नरकासुराचे राज्य प्राग्ज्योतिषपुरात होते. यादवसेनेला घेऊन कृष्णाने त्या नगरीला वेढा घालण्यासाठी प्रयाण केले. त्या पुरीला रक्षणासाठी सात खंदक होते व सात दुर्गही होते. सोळा हजार एकशे आठ सुंदर उपवर कन्या त्या नरकासुराने एका वेगळ्या पर्वतावर बंदी करून ठेवलेल्या होत्या. नरकासुराला कळले- "इंद्राच्या बाजूने लढण्यासाठी यादवांची सेना घेऊन कृष्ण आला आहे." त्याने आपल्या नगराच्या बाहेर पडून युद्धाला प्रारंभ केला. त्याच्या तोफांनी यादवांचे सैन्य मरून पडू लागले. महाभयंकर युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूचे रथीमहारथी गतप्राण होऊ लागले. रक्ताचे पाट वाहू लागले. कृष्ण प्रखर बाणांचा मारा करीत होता, पण नरकासुरावर त्यांचा काहीही परिणाम होत नव्हता. सत्यभामेला युद्धाचे स्फुरण चढले. ती म्हणाली- 'यदुनाथ ! मला द्या धनुष्य, मला द्या बाण ! भाता पण द्या ! मी त्या नरकासुराचा प्राण घेते."

कृष्णाने तिला धनुष्यबाण दिले. भाता दिला. ती सपासप बाण सोडू लागली. स्त्रीला पुढे करून कृष्ण लढतो म्हणून नरकासुराने कृष्णाची निंदा केली. त्याने अग्निअस्त्र मंत्रून बाण मारला. तेव्हा कृष्णाने पर्जन्यास्त्र सोडून तो अग्नी शांत केला. नरकासुराने जी जी अस्त्रे फेकली ती ती कृष्णाने परतवून लावली आणि अचानक सुदर्शन चक्र हाती घेऊन ते त्या नरकासुरावर सोडले. नरकासुराची मान तुटली. त्याचे डोके दूर उडाले ! तो दिवस आश्विन वद्य चतुर्दशीचा होता. चंद्रोदय झाला होता. पहाटेची वेळ होती. ती वेळ फार महत्त्वाची ठरली. त्या दिवशी त्या वेळी अभ्यंग स्नान करण्याची प्रथा पुढे चालू झाली. कृष्णाने असे वचन दिले की त्या वेळी स्नान करणे पुण्यप्रद होईल, पण स्नान न केल्यास पाप लागेल.

नरकासुराच्या कैदेत सोळा हजार एकशे आठ कन्या होत्या. त्यांची कृष्णाने मुक्तता केली. त्यांच्या घरचे लोक त्यांना पुन्हा घरी घेण्यास तयार झाले नसते. त्यांनी कृष्णालाच आपले रक्षण करण्याची, आपल्याला आश्रय देण्याची आणि पती म्हणून स्वीकार करण्याची विनंती केली. कृष्णापुढे दुसरा पर्याय नव्हता. त्याने यादवांबरोबर त्या सर्व कुमारिकांना द्वारकेस पाठवून दिले. कृष्ण हाच आपला पती असे मानणार्‍या त्या स्त्रियांना नरकासुराचे आपल्यावर उपकारच झाले असे वाटू लागले, कारण कृष्णाची प्राप्ती होण्यास तोही कारणीभूत ठरला होता.

भगदत्त हा नरकासुरचा पुत्र. नरकासुराप्रमाणेच तोही पराक्रमी होता. त्याला कृष्णाने प्राग्ज्योतिषपुराच्या राज्यावर बसविले.

कृष्णाने देवांचे कार्य केले होते. इंद्राने त्याला स्वर्गात बोलावले, त्याचे स्वागत केले, पूजन केले, त्याच्या पूजेचा स्वीकार करून कृष्ण द्वारकेस परत येण्यास निघाला. नंदनवनात त्याला पारिजातक वृक्ष दिसला. सत्यभामेचा हट्ट त्याला आठवला. त्याने तो वृक्ष उपटून गरुडावर ठेवला. तेव्हा नंदनवनाच्या रक्षकांनी इंद्राला ते कळविले. इंद्र कृष्णाला विरोध करू लागला. तेव्हा बृहस्पतीने त्याला सांगितले- "इंद्रा, कृष्ण हाच नारायण आहे. त्याला तू विरोध करणार ? " तेव्हा इंद्राला विरोध सोडून द्यावा लागला. कृष्णाने गरुडावर बसून द्वारकेस प्रयाण केले.

पारिजात वृक्ष कृष्णाने सत्यभामेच्या अंगणात लावला. त्याने स्यमंतक मणी आधी तिला दिलाच होता. हा देववृक्ष मिळाल्यावर सत्यभामा फार आनंदित झाली. पण रुक्मिणी रागावली. ती म्हणाली- "नारदाने दिलेले एक फुल तेवढे तुम्ही मला दिलेत, पण तिला सगळा वृक्ष आणून दिलात ! तुमचे खरे प्रेम सत्यभामेवरच आहे." असे म्हणून ती कृष्णाजवळ बोलेनाशी झाली. कृष्णाने तिची समजूत काढली. तो म्हणाला- "प्रिये ! सत्यभामेला वृक्ष दिला. पण स्वर्गात नंदनवन आहे तेथे जे अन्य पारिजात वृक्ष आहेत त्यांची फुले स्वर्गातून इथे पडतील, ती तुझ्या अंगणात !' आणि झालेही तसेच. कृष्णाच्या आज्ञेने नंदनवनातून पारिजात वृक्षाची फुले रुक्मिणीच्या अंगणात पडू लागली ! सत्यभामेचा अभिमान आणि आनंद फारसा टिकला नाही !

नरकासुराकडून मुक्त केलेल्या सर्व कुमारिकांचा श्रीकृष्णाने स्वीकार केला. त्याने त्या सर्वांशी एकाच मुहूर्तावर स्वतः तितकी रूपे घेऊन विवाह केला, त्यासाठी तेवढी भवने त्याने बांधून घेतली. तो स्वतःच्या मूळ शरीराने रुक्मिणीच्या सदनात रहात होता, पण प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळे रूप त्याने धारण केले ! सोळा हजार एकशे आठ सदनांत तेवढ्याच रूपानी त्याने त्या स्त्रियांशी संसार केला.

कृष्णरूपाने विष्णूचा पूर्णावतार झाला आहे हे विदित असलेले ऋषि व सनकादिक मुनी द्वारकेतच येऊन कृष्णाला भेटू लागले.
अध्याय २६ समाप्त. ॥
॥ श्रीकृष्णार्यणमस्तु ॥


GO TOP