॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय पंचविसावा ॥

सत्राजित् आणि विलक्षण स्यमंतक मणि


श्रीगणेशाय नमः ॥
जो लावण्यामृतसागर । सगुणलीला विग्रही यदुवीर ।
मुकुटीं तेज झळके अपार । शशिमित्र झांकुळती ॥१॥
दिक्‌चक्राचिये वदनीं । तें तेज न माये गगनीं ।
मकराकार श्रवणीं । दिव्य कुंडलें तळपती ॥२॥
कीं ते अनंत विजांचे उमाळे । कीं प्रळयाग्नीनें उघडिले डोळे ।
कीं अनंत बालसूर्य उगवले । प्रकाशलें स्वरूप तैसें ॥३॥
मेरूपाठारीं सुंदर । वाहे सुवर्णनदीचा पूर ।
तैसा टिळक मनोहर । विशाळभाळीं झळकतसे ॥४॥
चंदनचर्चित श्यामकांती । सुवासें भरलीं द्वारावती ।
जनघ्राणदेवता नाचती । निजानंदेंकरूनियां ॥५॥
मुक्ताफळांच्या रूळती माळा । तेजें झांकती चंद्रकळा ।
कीं तीं अनंत ब्रह्मांडें गळां । मौक्तिकरूपें डोलती ॥६॥
ऐसा द्वारकेसी मुरहर । रूक्मिणीमनचकोरचंद्र ।
कीं तो स्वानंदामृतसागर । भक्तांलागीं अवतरला ॥७॥
चोविसावे अध्यायीं चरित्र । झालें रूक्मिणीचें स्वयंवर ।
विजयी होऊनि श्रीधर । द्वारावतीये पातला ॥८॥
यावरी यादव सत्राजित । परम अनुष्ठानी शुचिष्मंत ।
प्रसन्न केला तेणें आदित्य । बहुत तप करूनियां ॥९॥
मुख्य दैवत सूर्यनारायण । सूर्यानुष्ठानें श्रेष्ठ ब्राह्मण ।
वरकड दैवतें कल्पित पूर्ण । चंडकिरण प्रत्यक्ष ॥१०॥
सूर्यमंडळ विलोकून । नित्य न करिती जे कां नमन ।
ते अभागी परम अज्ञान । अल्पायुषी जाणावे ॥११॥
व्यासवाल्मीकादि ऋषी सकळ । वर्णिती अद्‌भुत सूर्यमंडळ ।
सूर्यउपासक सदा सुशीळ । यम काळ वंदी तया ॥१२॥
असो सत्राजितासी सूर्यनारायण । तपांतीं झाला वो प्रसन्न ।
म्हणे इच्छित माग वरदान । काय वचन बोले तो ॥१३॥
म्हणे दर्शनें पूर्ण मनोरथ । ऐकोनि संतोषला आदित्य ।
मग स्यमंतकमणि अद्‌भुत । प्रसाद देत सत्राजिता ॥१४॥
नित्य प्रसवे अष्टभार सुवर्ण । सूर्यासम प्रभा परिपूर्ण ।
व्याधि सर्प व्याघ्र अवर्षण । देशांतूनि दूरी जाय ॥१५॥
तो मणि घेऊनि त्वरित । नगरासी आला सत्राजित ।
गजरें महोत्साह करीत । स्वगृहातें प्रवेशला ॥१६॥
तों एके दिवशीं सत्राजित । गळां घालोनि स्यमंत ।
निजभारेंसीं त्वरित । द्वारावतीये पातला ॥१७॥
दुरूनि देखतां नृपवर । म्हणती उतरला दिनकर ।
दैत्यें गांजिलें म्हणोनि सत्वर । शरण आला हरीतें ॥१८॥
हरीसी सांगती सेवकजन । भेटीसी आला सहस्रकिरण ।
मग बोले वसुदेवनंदन । सत्राजित येत असे ॥१९॥
ऐसें बोलतां वैकुंठनाथ । तों अकस्मात आला सत्राजित ।
मान देऊनि बहुत । सभेमाजी बैसविला ॥२०॥
स्यमंतकमणि देखोन । तटस्थ झाले सभाजन ।
तों नारदमुनि उठोन । कृष्णकर्णीं लागला ॥२१॥
म्हणे हा स्यमंतकमणी । तुमचे कंठीं असावा चक्रपाणी ।
याचें तेज कौस्तुभाहूनी । विशेष मज वाटतसे ॥२२॥
हरि म्हणे कैसा येईल हाता । येरू म्हणे मी मागतों सत्राजिता ।
मग बोले पद्मजातपिता । मणि सर्वथा नेदी तो ॥२३॥
मग म्हणे नारदमुनी । तुमच्याचि घरा येईल मणी ।
यावरी ब्रह्मनंदन तेचि क्षणीं । सत्राजिताजवळी आला ॥२४॥
म्हणे धन्य धन्य तूं सत्राजित । तुज प्रसन्न जाहला आदित्य ।
या स्यमंतकमण्याचें तेज अमित । ऐसी वस्तु तुज दिधली ॥२५॥
ऐसा हा मणि सगुण । जरी करीसी कृष्णार्पण ।
तरी त्रिभुवनीं कीर्ति पूर्ण । तुझी राया ठसावेल ॥२६॥
ऐकतां ऐसें नारदवचन । सत्राजित जाहला क्रोधायमान ।
म्हणे तुमच्या सभे आजिपासून । न यों आम्ही सर्वथा ॥२७॥
कृष्ण असे गोरसचोर । महाकपटी अकर्मी जार ।
हाचि काय मणि लेणार । जाहला थोर अवघ्यांत ॥२८॥
ऐसें बोलोनि क्रोधें उठिला । स्वभारेंसीं नगरा गेला ।
मणि देऊनि देव्हारां ठेविला । मग पूजिला यथासांग ॥२९॥
तों रायाचा धाकुटा सहोदर । प्रसेन नामें महावीर ।
तेणें आपुल्या कंठीं मणि सुंदर । एके दिवशीं घातला ॥३०॥
सवें घेऊनि चतुरंग दळ । मृगयेसी प्रसेन निघे तत्काल ।
तों एक मृग देखिला चपळ । प्रसेन वेगें धांविन्नला ॥३१॥
दळभार दूरी राहिला । प्रसेन घोर कांतर प्रवेशला ।
परी स्यमंतक तेजागळा । गळां झळके धांवतां ॥३२॥
असंभाव्य तेज देखोन । गिरिदरींतूनि उठिला पंचानन ।
भयानक हांक देऊन । प्रसेनावरी पडियेला ॥३३॥
अश्वासहित प्रसेन मारून । सिंह चालिला मणि घेऊन ।
तों जांबुवंत हिंडत विपिन । त्याचि पंथें येतसे ॥३४॥
देखोनि मणियाचें तेज । वेगें धांविन्नला ऋक्षराज ।
एक्याचि मुष्टिघातें तेणें सहज । सिंह मारूनि टाकिला ॥३५॥
बाहात्तर कोटी रीस गणित । तयांचा नृप एक जांबुवंत ।
जेणें मेरूवरूनि उडी अकस्मात । पृथ्वीवरी घातली ॥३६॥
ते वेळीं सूर्यरथींचें चक्र । मांडीस झगटलें अणुमात्र ।
तो ब्रह्मयाचा अवतार । रामकार्या साह्य जाहला ॥३७॥
श्रीरामाचें परम प्रीतिपात्र । राघव घडिघडी पुसे त्यासी विचार ।
जो बहुकाळाचा वृद्ध साचार । परमचतुर पंडित जो ॥३८॥
पूर्वीं श्रीरामें रावण मारून । अयोध्येसी आला परतोन।
अकरा सहस्र वर्षें पूर्ण । राज्य केलें रघुवीरें ॥३९॥
एके दिवशीं अयोध्यानाथ । सभेसी बैसला असतां समर्थ ।
तो कर जोडूनि जांबुवंत । विनवीतसे श्रीरामातें ॥४०॥
रावण कुंभकर्ण तुम्हीं वधिले । बहुत राक्षस आम्हीं मर्दिलें ।
परी मजशीं मल्लयुद्धासी मिसळे । ऐसा वीर न देखों ॥४१॥
मग बोले जनकजावर । तुजशीं भिडे ऐसा वीर ।
कोणी दिसतो साचार । सांगें मज सर्वज्ञा ॥४२॥
जांबुवंत म्हणे कौसल्यात्मजा । तुजविण वीर न दिसे दुजा ।
तुजशीं झोंबी घ्यावी ऐसा माझा । मनोरथ पूर्ण असे पैं ॥४३॥
ऐकोनि हांसिन्नला श्रीराम । गोष्टी बोललासी उत्तम ।
परी कृष्णावतारीं हा नेम । पूर्ण करीन जाण पां ॥४४॥
स्यमंतकमण्याचे काजें । तुम्ही आम्ही भिडों सहजें ।
त्यावरी मग रघुराजें । अवातार आपुला संपविला ॥४५॥
मग पाताळविवरीं जांबुवंत । बहुत दिवस काळ क्रमीत ।
सहज बाहेर आला अकस्मात । तंव तो मणि सांपडला ॥४६॥
सिंहावलोकनेंकरून । पहा मागील अनुसंधान ।
जांबुवंतें मारूनि पंचानन । मणि घेऊनि गेला तो ॥४७॥
प्रवेशला विवराभीतरी । मणि बांधिला पाळण्यावरी ।
जांबुवंती नामें कुमरी । बहु आवडे पितयातें ॥४८॥
इतुका वृत्तांत वर्तला । परी आळ श्रीहरीवरी आला ।
म्हणती प्रसेन कृष्णें मारिला । मणि नेला चोरोनियां ॥४९॥
लोकापवाद बोलती जनीं । लागती एक एकाचे कर्णीं ।
कृष्णें ऐसी करूं नये करणी । मणियासाठीं सर्वथा ॥५०॥
सत्राजित पाठवीत सांगून । मणि नेला आमुचा बंधु मारून ।
कृष्णासी सांगती सेवकजन । वर्तमान जें जाहलें ॥५१॥
मग म्हणे वनमाळी । हा डाग लागला यादवकुळीं ।
धुवोनियां तत्काळीं । शुद्ध करावा लागेल ॥५२॥
सवें घेऊनि यादवभार । चतुरंग दळ समग्र ।
शोधावया रूक्मिणीवर । अरण्यामाजी चालिला ॥५३॥
जो वैकुंठपुरींचा सुकुमार । तो शोधीत बहु कांतार ।
तों देखिलें प्रसेनाचें कलेवर । विदारोनि पाडिलें ॥५४॥
माग पाहिला गोपाळें । तों उमटलीं सिंहाचीं पाउलें ।
मग तैसेचि लोक चालिले । तों सिंहाचें देखिलें प्रेत वाटें ॥५५॥
तेथूनि उमटलीं रिसाची पाउलें । मग तैसेचि पुढे चालिले ।
तों घोर विवर देखिलें । लोक थोपले तेथेंचि ॥५६॥
विवर दिसे भयानक । सकळांसी म्हणे द्वारकानायक ।
तुम्ही द्वारकेसी जावें सकळिक । सैन्य घेऊनि माघारें ॥५७॥
मणियाविण अवधारा । मी सर्वथा न यें द्वारकापुरा ।
अठ्ठाविसावे दिवशीं माघारा । येईन सत्य जाणिजे ॥५८॥
द्वारकेसी लोक आले समस्त । अवघें नगर चिंताक्रांत ।
सत्राजितासी शापित । आळा घातला म्हणोनियां ॥५९॥
रूक्मिणी होऊनि व्रतस्थ । देवीचें आराधन करी नित्य ।
क्षेमें यावा द्वारकनाथ । याचि स्वार्थेंकरूनियां ॥६०॥
असो इकडे विवरांत । प्रवेशला कमलोद्‌भवतात।
कृष्णप्रभेनें विवर उजळत । अंधार तेथें कैंचा हो ॥६१॥
विवर क्रमिलें गोपाळें । तो ऋषीपतीचें नगर देखिलें ।
पर्वताकार रीस बैसले । महाद्वार रक्षीत ॥६२॥
हातीं धरूनि जपमाळ । अवघे रामउपासक निर्मळ ।
रामस्मरण सदाकाळ । करिती नेत्र लावूनियां ॥६३॥
नगराभोंवतीं मर्गज पोंवळी । त्याहीवरी लिहिल्या रामनामावळी ।
असो तो नाटकी वनमाळी । गुप्तरूपें आंत गेला ॥६४॥
जांबुवंताचें निजमंदिरीं । कमलदलाक्ष तो कंसारी ।
प्रवेशला तों पालखावरी । मणि बांधिला देखतसे ॥६५॥
तंव त्या जांबुवंताच्या अंगना । दृष्टीं देखती जगन्मोहना ।
म्हणती याचिया सुंदरपणा । मदन उणा वाटतसे ॥६६॥
दिव्य मुकुट कर्णीं कुंडलें । आकर्णपर्यंत नेत्रोत्पलें ।
सगुण रूप सांवळें । वदन सुहास्य उदार ॥६७॥
चतुर्भुज तमालनील । गळां वैजयंती देत डोल ।
पीतवसन वेल्हाळ । कटीं मेखळां शोभतसे ॥६८॥
मदनमनोहर सांवळा । अकस्मात कोठूनि आला ।
एक लाज सांडूनि ते वेळां । श्रीरंगाशीं बोलत ॥६९॥
त्रैलोक्यसुंदरा मनमोहना । कोमलांगा राजीवनयना ।
तुज विलोकितां आमुच्या नयनां । समाधान जाहलें ॥७०॥
जिचे कुशी हे मूर्ति निपजली । धन्य धन्य ते तुझी माउली ।
जे तुझे पाठीं बैसली । किती तपली तप न कळे ॥७१॥
निद्रिस्थ आहे जांबुवंत । तों तूं येथूनि जाय त्वरित ।
हा जागा झालिया निश्चित । तुज ग्रासील सगळाचि ॥७२॥
जा तुज दिधलें जीवदाना । वेगीं जाय आपुल्या स्थाना ।
वाट पाहत असेल तुझी ललना । कंठीं प्राण धरूनियां ॥७३॥
मग बोले द्वारकाविहारी । मी जन्मापासूनि ब्रह्मचारी ।
राणी मजसी प्रीति धरी । परी मी उदास सर्वथा ॥७४॥
मी सर्वांचा आदिकर्ता । मज नाहीं माता-पिता ।
मी मायाचक्रापरता । सगुण झालों भक्तांलागीं ॥७५॥
पालखावरी बांधिला मणि । तो मज द्याल जरी सोडूनी ।
तरी मी उगाचि जाईन येथूनी । न करीं करणी विपरीत ॥७६॥
मग म्हणती रे चतुर । ह्या गोष्टी तोंवरीच सुकुमारा ।
जों चेव आला नाहीं महावीरा । जांबुवंतासी जाण पां ॥७७॥
मग हसोनियां जगजेठी । दृढ घातली माळगांठी ।
पीतांबराचे पदर पोटीं । खोवीं उचलूनी माघारे ॥७८॥
मग बोले भुजा पिटोन । याचा बळगर्व सर्व हरीन ।
म्हणूनि वांकीसहित चरण । धरणीवरी आपटी पैं ॥७९॥
तों जागा जाहला जांबुवंत । नेत्र उघडूनि क्रोधें पाहत ।
तों वीर देखिला अद्‌भुत । मग पुसत तयासी ॥८०॥
तूं कोणाचा रे कोण । हरि म्हणे मणि आणिला चोरून ।
तुज शिक्षा करावया पूर्ण । विवरामाजी उतरलों ॥८१॥
जांबुवंत म्हणे तुज शिक्षा करीन । हरि म्हणे व्यर्थ काय बोलून ।
ऐसें ऐकतांचि वचन । महावीर लोटला ॥८२॥
बाप भक्तवत्सल भगवंत । निजभक्ताशीं झोंबी घेत ।
जांबुवंताचे मनोरथ । पूर्ण करावया पातला ॥८३॥
पिळिती एकमेकांचे हात । हृदयावरी हृदय आदळत ।
सवेंचि देती मुष्टिघात । वर्मकळा लक्षूनियां ॥८४॥
एकमेकांसी चरणीं धरूनी । दूरी भिरकाविती भवंडूनी ।
जैसे मेरू-मांदार दोन्ही । एके ठायीं मिळाले ॥८५॥
कीं विष्णु आणि शंकर । कीं रोहिणीवर आणि मित्र ।
कीं राम आणि भार्गववीर । तैसे दोघे दीसती ॥८६॥
कीं सूर्यसुत आणि शक्रकुमार । पूर्वीं मल्लयुद्ध केलें थोर ।
तैसे जांबुवंत आणि यदुवीर । परस्परें युद्ध करिती पैं ॥८७॥
अठ्ठावीस दिवस अहोरात्र । दोघे युद्ध करिती महावीर ।
जांबुवंताचें शरीर । जाहलें चूर युद्ध करितां ॥८८॥
सत्वहीन देह होऊनी । मूर्च्छागत पडिला धरणीं ।
कृष्णें वक्षःस्थळीं बैसोनी । म्हणे मणि देईं वेगें ॥८९॥
जांबुवंत म्हणे हा कोण वीर । प्रचंद पुरूषार्थी दिसे थोर ।
म्हणवूनि उघडूनि पाहे नेत्र । विलोकीत कृष्णमुख ॥९०॥
तों स्वेदबिंदु थबथबले भाळा । तेणें कस्तूरीमळवट भिजला ।
अंगींचा चंदन पुसला । तुळसीवनमाळा सुकुल्या हो ॥९१॥
जांबुवंत करी रामस्मरण । म्हणे देहांत आला कीं मजलागून ।
आठविलें रघुपतीचें ध्यान । धनुष्यबाणांसमवेत ॥९२॥
कृष्ण विचारी मानसीं । रामरूप धरावें या समयासी ।
ऐसें इच्छितां तेजोराशी । राम जाहला श्रीकृष्ण ॥९३॥
सुहास्यवदन राजीवनयन । हातीं विराजे चापबाण ।
जांबुवंतें तें देखोन । सावध होऊन चरण धरिले ॥९४॥
नयनीं देखतां सीतापती । तत्काळ शरीरीं भरली शक्ती ।
सवेंचि अवलोकूनि पाहे मूर्ती । वारंवार सप्रेम ॥९५॥
श्रीरामरूप देखतां दृष्टी । ब्रह्मानंदें भरली सृष्टी ।
मग राम म्हणे एक गोष्टी । जांबुवंता ऐक पां ॥९६॥
रामअवतारीं युद्धवरदान । तें पावलें कीं तुजलागून ।
ऐसें बोलोनि जगज्जीवन । जांबुवंतासी भेटला ॥९७॥
सद्गदित जाहला जांबुवंत । म्हणे पुरले मनोरथ ।
जो राम तोचि कृष्णनाथ । अभेदरूप संचरलें ॥९८॥
मग श्रीकृष्णासी आसनीं बैसवून । षोडशोपचारें पूजा करून ।
कृष्णें सांगितलें वर्तमान । स्यमंतकमणियाचें ॥९९॥
जांबुवंत म्हणे यदुनायका । माझी कन्या जांबुवंती सुरेखा ।
हे अंगींकारीं कंसांतका । वरी मणि आंदण देईन मी ॥१००॥
कार्य जाणोनि हृषीकेश । अवश्य म्हणे जांबुवंतास ।
तंव तो अत्यंत उत्तम दिवस । लग्न तत्काळ धरियेलें ॥१॥
जांबुवंतें आपुले वनचर । वर्‍हाडी मेळविले अपार ।
देखोनि कोटिकामसुंदर । वनचरें तटस्थ पैं होती ॥२॥
लग्नघटिका जवळी आली । धांवती वर्‍हाडिणी आस्वली ।
नवरीस हळदी लाविली । कृष्णासी चर्चिली उरली ते ॥३॥
आस्वल वर्‍हाडी मोठे मोठे । भ्यासुर वदनें विशाळ पोटें ।
अंतःपट धरिती नेटें । मंगलाष्टकें पैं म्हणती ॥४॥
ॐपुण्याहं म्हणवून । दोघां लाविलें ऐक्यलग्न ।
तों नारदमुनि तेथें येऊन । अकस्मात उभा ठाकला ॥५॥
हांसें आलें नारदासी । म्हणे उत्तम केलें हृषीकेशी ।
नवरी देखतां मानसीं । संतोष मज वाटला ॥६॥
तूं मदन मनोहर तमालनीळ । नोवरीपाशीं केश पुष्कळ ।
ऐसी हे पुढें घेऊनि वेल्हाळ । कैसा निजसी सांग पां ॥७॥
हिचें स्वरूप देखोनी । मज उणी वाटे रूक्मिणी ।
द्वारकेचे लोक पाहूनी । बहुत संतोषी होतील ॥८॥
बरें आतां क्षणभरी । तुमचें हळदीउटणें पाहूनि निर्धारीं ।
मग जाईन द्वारकापुरीं । लोकांलागीं सांगावया ॥९॥
तों हळदी लावूनि वनमाळी । काढी नवरीच्या आंगींचीं मळी ।
तुझी सासू हरि म्यां नाहीं देखिली । ऐसें प्रसवली कन्यारत्‍न ॥११०॥
मग हांसे चक्रपाणी । म्हणे बैसा क्षणभरी नारदमुनी ।
कृष्णें तेव्हां हातीं धरूनी । आपणाजवळी बैसविला ॥११॥
हरि म्हणे कांहीं गायन । करावें आजि असे सुदिन ।
मंगळदायक परम-कल्याण । गाऊन श्रवण तृप्त करीं ॥१२॥
नेदी हरिवचनासी मान । नारदासी चढला अभिमान ।
म्हणे कोणापुढें करूं गायन । कोण सुजाण येथें असती ॥१३॥
अभिमान जाणोनि माधव । झाडावया नारदाचा गर्व ।
कौतुक दाविलें अपूर्व । एका रिसा बोलाविलें ॥१४॥
चिमणाच आस्वल येऊन । हरीपुढें बैसे आसन घालून ।
मग त्यासी पुसे भगवान । कांहीं गायन येतें कीं ॥१५॥
तो म्हणे हरि तुझें दयेंकरून । करीन मी आतांचि गायन ।
म्हणे वीणा नारदाचा एक क्षण । मजपाशीं देइंजे ॥१६॥
नारद म्हणे दोन्ही तंत । तोंडूनि टाकील अकस्मात।
हरि म्हणे तो समस्त । कळा जाणत गायनाच्या ॥१७॥
मग वीणा त्याचे हातीं दिधला । तेणें स्वरांचा थाट बैसविला ।
तेणें नारदाचा गर्व हरला । म्हणे नवलकळा येथें असे ॥१८॥
तेणें साही राग छत्तीस भार्या । चौसष्टी मूर्च्छना दावूनियां ।
अनेक उपरागांच्या क्रिया । गाइल्या तेव्हां रिसानें ॥१९॥
गीतप्रबंध नृत्यकळा । दावूनि तोषविलें गोपाळा ।
मग साबडी नामें ते वेळां । हरीची लीला आरंभिली ॥१२०॥
साबडें सप्रेम गायन । तेथें लुब्धला मनमोहन ।
हरि डोले आनंदेंकरून । धांवोनि अलिंगन देत तया ॥२१॥
मग नारदेंही उठोन । वंदिले आस्वलाचे चरण ।
विरोनि गेले पाषाण । त्याचें कीर्तन ऐकतां ॥२२॥
हरि म्हणे रे गुणवंता । भागलासी पुरे करीं आतां ।
तेणें टाळ वीणा तत्काल ठेविला खालता । तों शिळा गोठल्या सर्वही ॥२३॥
वीणा टाळ ते वेळां । शिळेमाजी पैं गुंतला ।
नारद काढावया गेला । तंव तो सर्वथा न निघेचि ॥२४॥
आश्चर्य जाहलें सकळां । म्हणती गायन ऐकतां विरल्या शिळा ।
मग नारदें गायनाच्या कळा । नाना रीतीं दाविल्या ॥२५॥
परी शिळा कदा न विरती । मग म्हणे जय जय श्रीपती ।
तुझी अद्‌भुत कर्तव्यगती । ब्रह्मादिकां नेणवे ॥२६॥
मग आणीक एक रीस बोलावून । त्याच्या मुखें करविलें गायन ।
तत्काळ शिळा गेल्या विरोन । वीणा टाळ काढिला ॥२७॥
मग आणीक एक केलें अद्‌भुत । जैसें रंभेचें रूप विराजित ।
त्याहूनि विशेष जांबुवंती दिसत । नारद विस्मित पाहतसे ॥२८॥
असो चारी दिवस जाहला सोहळा । मणि मग आंदण दीधला ।
कृष्ण जांबुवंती घेऊनि निघाला । वेगें परतला द्वारकेसी ॥२९॥
आणिक अश्व गज रथ । जांबुवंत आंदण देत ।
जांबुवंतीसहित कृष्णनाथ । मिरवत आला द्वारकेसी ॥१३०॥
सभेसी आणिला मणी । दाविला समस्तांलागूनी ।
मग सत्राजितासी बोलावूनी । स्यमंतक हातीं दीधला ॥३१॥
परम लज्जित सत्राजित । अधोवदनें खालीं पाहत ।
म्हणे हा रूसला कीं कृष्णनाथ । म्यां नसता आळ घातला ॥३२॥
मजवरी रूसला हृषीकेश । मग मज कालत्रयीं नाहीं यश ।
काय करूं ऐसियास । जगन्निवास समजे कैसा ॥३३॥
म्हणे सत्यभामा आणि हा मणी । देऊनि समजावूं चक्रपाणी ।
मग कृष्णापुढें हात जोडूनी । करी विनवणी सत्राजित ॥३४॥
माझी सत्यभामा सुंदर कन्या । हे अंगीकारीं जगज्जीवना ।
कृष्णें मान्य केलें वचना । लग्न धरिलें तत्काळ ॥३५॥
परम उत्साहें लावूनि लग्न । सत्यभामा केली कृष्णार्पण ।
वरी मणि दिधला आंदण । आणि बहु धन गज रथ ॥३६॥
कृष्ण म्हणे सत्राजिता । तुम्हीं खेद न करिजे आतां ।
आम्हीं वरदचतुर्थीचा चंद्र अवचितां । देखिला होता गोकुळीं ॥३७॥
गाई घेऊनि येतां देख । गोखुरीं सांचलें उदक ।
त्यांत बिंबला होता मृगांक । तो म्यां दृष्टीं देखिला ॥३८॥
म्हणोनि आला हा आळ । मग बोले सत्राजित भूपाळ ।
गणेशचतुर्थीसी चंद्रमंडळ । कायनिमित्त न पहावें ॥३९॥
श्रीकृष्ण म्हणे कैलासी । प्रदोषकाळीं शिवदर्शनासीं ।
आपुलाले वाहनीं बैसोनि वेगेंसीं । सुरांचे भार चालिले ॥१४०॥
इंद्र चंद्र वरूण कुबेर । अष्टवसु गंधर्व किन्नर ।
मूषकारूढ शिवपुत्र । गजवदन चालिला ॥४१॥
शिवगिरी चढतां झाली दाटणी । गणेश पडिला मूषकावरूनी ।
मागुती बैसला सांवरोनी । तों चंद्र गगनीं हांसला ॥४२॥
तें गजवदनें जाणोन । शाप दिधला दारूण ।
जो तुझें करील मुखावलोकन । त्यावरी येती अपजाळ ॥४३॥
ऐसें चंद्रें ऐकिलें । मुख आपुलें आच्छादिलें ।
मग सकळ देवी प्रार्थिलें । गजवदनासी ते वेळे ॥४४॥
केलें देवीं बहुत स्तवन । तेणें गणेश झाला प्रसन्न ।
देव म्हणती चंद्राचें शापमोचन । करावें जी कृपाळुवा ॥४५॥
मग चंद्र आणूनि ते अवसरीं । घातला गणपतीचे पायांवरी ।
म्हणे माझे वरदचतुर्थीसी निर्धारीं । वदन याचें न पहावें ॥४६॥
वरकड दिवस अवघे मुक्त । परी वरदचतुर्थीस न पहावा सत्य ।
सत्राजितासी म्हणे कृष्णनाथ । पूर्ववृत्तांत ऐसा असे ॥४७॥
तो चंद्र गोकुळीं पाहिला । यालागीं वृथा आळ आला ।
मग हरि म्हणे भूपाळा । गोष्ट एक ऐकिंजे ॥४८॥
आम्हांसी सत्यभामेऐसें दिधलें रत्‍न । इतुकेनि आमुचें समाधान ।
हा मणि तुम्ही जा घेऊन । आग्रहें श्रीकृष्णें दीधला ॥४९॥
मणि घेऊन सत्राजित । आपुल्या ग्रामासीं पातला त्वरित ।
दिवस लोटले बहुत । तों एक अनर्थ जाहला ॥१५०॥
शतधन्वा नामें यादव जाण । त्यासी सत्यभामा द्यावी लग्न करून ।
हा पूर्वी नेम होता तो सांडून । कन्या दिधली श्रीकृष्णातें ॥५१॥
सत्यभामा माझी ललना । ते कैसी दिधलीं श्रीकृष्णा ।
तो द्वेष मनीं धरूनि जाणा । शतधन्वा पातला ॥५२॥
विश्वासोनि आला घरांत । तों निजला होता सत्राजित ।
त्याचा शिरच्छेद करूनि त्वरित । मणि घेऊनि पळाला ॥५३॥
द्वारकेमाजी असे तो गुप्त । ते सत्यभामेसी जाहलें श्रुत ।
कीं सत्राजिताचा करूनि घात । मणि नेला शतधन्व्यानें ॥५४॥
ते वेळां पांडवांच्या समाचारा । राम कृष्ण गेले होते हस्तिनापुरा ।
मागें वृत्तांत जाहला तो सत्वरा । सत्यभामेसी कळला पैं ॥५५॥
शरीर टाकिलें धरणीं । पितयाचे गुण आठवूनी ।
म्हणे सत्राजिता तुज कोणे स्थानीं । येऊनियां भेटो आतां ॥५६॥
बुडालें माझें माहेर । रूक्मिणीसी कळला समाचार ।
सत्यभामेच्या मंदिरा सत्वर । जगन्माता पातली ॥५७॥
देवकी वसुदेव उग्रसेन । करिती बहु समाधान ।
मग ते सुखासनीं बैसोन । हस्तिनापुरा चालिली ॥५८॥
वेगें घेतली बहुत सेना । येऊनि भेटली जगन्मोहना ।
सांगोनि सकळ वर्तमना । शोक करी अद्‌भुत ॥५९॥
शतधन्व्यानें मारिला सत्राजित । ऐकोनि राम हरि जाहले संतप्त ।
आले द्वारकेसी सत्यभामेसहित । झालें श्रूत शतधन्व्यातें ॥१६०॥
परम भयभीत जाहला मनीं । अक्रूराचे येथें ठेविला मणि ।
म्हणे स्यमंतक केवळ तरणी । न लपे कोठें सर्वथा ॥६१॥
अूरा तूं परम विश्वासी । म्हणोनि मणि ठेवितों तुजपाशीं ।
येरू म्हणे हे गोष्टी हृषीकेशीं । कळल्या अनर्थ होईल ॥६२॥
द्वारकेबाहेर शतधन्वा पळत । तों तुरंगीं राम कृष्ण बैसत ।
पूर्वसमुद्रापर्यंत । पळाला तेव्हां शतधन्वा ॥६३॥
मग श्रीरंगें सुदर्शन टाकिलें । शतधन्व्याचें शिर उडविलें ।
कलेवर समुद्रतीरीं पडिलें । परी मणि नाहीं त्याजवळी ॥६४॥
परतोनि आले द्वारकापुरा । नगरीं पिटिला डांगोरा ।
कोणें चोरासी दिधला थारा । मणि सत्वर आणिंजे ॥६५॥
अक्रूरें ऐकोनी । भयभीत जाहला मनीं ।
मणि आपुल्या संगें घेऊनीं । गेला पळोनि वाराणसी ॥६६॥
हेर सांगती चक्रपाणी । अक्रूर घेऊनि गेला मणि ।
परी निरपराधी भक्तशिरोमणि । भयेंकरोनि बाहेर गेला ॥६७॥
मग बोले यादवेंद्र । अन्याय नसतां अणुमात्र ।
माझा प्राणसखा अक्रूर । गेला न कळे कोणीकडे ॥६८॥
अक्रूरासरिखें निधान । जो सात्त्विक आणि प्रेमळ पूर्ण ।
मज न गमे त्या सखयाविण । जगज्जीवन बहु कष्ट ॥६९॥
अक्रूराकारणें श्रीहरी । रात्रंदिवस चिंता करी ।
तों द्वादशवर्षें द्वारकेवरी । अवर्षण पडियेलें ॥१७०॥
बहुत केले प्रयत्‍न । परी कदा न वर्षे धन ।
तों अंबरीं देववाणी वदे वचन । समस्त जन ऐकती ॥७१॥
अक्रूर आहे वाराणसीनगरीं । तो आणाल द्वारकापुरीं ।
तरी जलद वर्षेल निर्धारीं । निश्चय हा जाणिजे ॥७२॥
तों दूतमुखीं वार्ता आली समग्र । कीं आनंदवनीं आहे अक्रूर ।
मणि सुवर्ण प्रसवे अष्टभार । धर्म अपार करीतसे ॥७३॥
भागीरथीचे जे कां घाट । अक्रूरें बांधिले असती सदट ।
अद्यापि जन देखती स्पष्ट । अक्रूरघाट नाम त्यांचें ॥७४॥
मग श्रीकृष्णें उद्धवासी । वेगें धाडिलें वाराणसी ।
तों अक्रूर जाहला तापसी । कृष्णस्मरणीं रत सदा ॥७५॥
मग उद्धवें वर्तमान सांगोन । आणिला रथावरी बैसवून ।
भेटले अक्रूर आणि कृष्ण । प्रेमेंकरून तेधवां ॥७६॥
अक्रूरें हरीपुढें मणि ठेवून । सांगितलें सकळ वर्तमान ।
हरि म्हणे मणि नव्हे हा अग्न । घेतले प्राण बहुतांचे ॥७७॥
दोन वेळां हा मणि । आंदण आला आम्हांलागूनी ।
प्रसेनसत्राजितांसी मारूनी । आमुचें सदनीं प्रवेशला ॥७८॥
जेथ वसे थोर वस्त । तेथें न प्रार्थितां येती अनर्थ ।
यालागीं मुनि उपाधिरहित । अरण्यांत वसती हो ॥७९॥
जवळी असतां उपाधी । नसत्याचि जडती आधिव्याधी ।
यालागीं विरक्त त्रिशुद्धी । हिंडती उदास होऊनियां ॥१८०॥
असो कृष्णें सत्यभामेसी बोलावूनी । तिचें बहुत समाधान करूनीं ।
प्रीतीनें हस्तीं दिधला मणि । ठेवीं सदनीं म्हणोनियां ॥८१॥
असो पर्जन्य ते अवसरीं । अद्‌भुत वर्षला द्वारकेवरी ।
भक्तमहिमा कंसारी । नानापरी वाढवीत ॥८२॥
हे स्यमंतकहरणकथा । गातां अथवा श्रवण करितां ।
हरे सकळ संकट चिंता । आवडीं धरितां सप्रेम ॥८३॥
हरिविजयग्रंथनृपवर । नाना इतिहास त्यांचा द्ळभार ।
एक एक प्रचंड वीर । पापसंहार क्षणें करिती ॥८४॥
ऐसा हा हरिविजयभूप सुरेख । श्रवणार्थीं भाविक याचक ।
ते संतुष्ट होती सकळिक । श्रवण मनन करितां हो ॥८५॥
केलें जें सकळ श्रवण । तें मननेंविण व्यर्थ जाण ।
जैसें जोडिलें बहु धन । परी तें जतन न केलें ॥८६॥
मननाविण श्रवण करी । जैसी कां पालथी घागरी ।
पर्जन्यांत ठेविली जन्मवरी । परी अंतरीं बिंदु न जाये ॥८७॥
श्रीधरवरद ब्रह्मानंद । जरी कृपा करी तो वेदवंद्य ।
तरीच हृदयीं ठसावे बोध । भेदाभेद निरसूनियां ॥८८॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
सदा परिसोत संतभक्त । पंचविंशतितमाध्याय गोड हा ॥१८९॥
॥अध्याय पंचविसावा समाप्त ॥ ओंव्या ॥१८९॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

द्वारकेत अनेक श्रेष्ट यादव रहात होते. त्यात सत्राजित् नावाचा एक यादव होता. तो नित्य सूर्योपासना करीत असे. काही वर्षांनी सूर्य त्याला प्रसन्न झाला व त्याने प्रत्यक्ष दर्शन देऊन एक विलक्षण तेजस्वी स्यमंतक नावाचा मणी दिला. त्या मण्याचे वैशिष्ट असे होते की त्याचे जेथे अस्तित्व असेल तेथे वेळेवर पाऊस पडत असे, त्याचप्रमाणे रोगराईचे व हिंस्र श्वापदांचे भयही रहात नसे. रोज त्या मण्यातून सुवर्ण निघत असे. ते आठ भार वजनाचे असे. तो मणि कंठात धारण करून सत्राजित् मोठया ऐटीत चालत असे. असाच एक दिवस तो यादवांच्या सभेत आला होता. त्यावेळी त्या मण्याची प्रभा सर्वत्र फाकत होती. त्या सभेत त्या दिवशी नारद उपस्थित होते. त्यानी 'नारायण नारायण' असा नामघोष करून सहज म्हटले- हा स्यमंतक मणी सर्वांगसुंदर अशा श्रीकृष्णाला किती शोभून दिसेल नाही का ? कृष्ण म्हणाला- "नारदा सत्राजित् एवढा गुणी व सुवर्ण देणारा मणी देऊन टाकणार नाही. " नारद म्हणाले- "कृष्णा, मी सत्राजिताला स्वतः विचारतो." कृष्ण म्हणाला- "नारदा, तुला चैन कां पडत नाही ? उगीच नसते प्रश्न उकरून कशाला काढतोस ? " पण नारदांनी सत्राजिताजवळ जाऊन प्रेमळ शब्दात तो मणी कृष्णासाठी मागितला. सत्राजित् चकित झाला. तो मोठा गर्विष्ठ होता. तो धिक्काराने म्हणाला- 'कृष्णाला ? त्या गोकुळच्या चोराला ? आणि पृथ्वीमोलाचा मणी देऊन टाकू ? नारदमुनी ! मी तो मणी देणे कधीही शक्य नाही." असे म्हणून, "कोणीतरी आता मणी हिसकावून नेईल" अशा भीतीने तो मुळी त्या सभेतून लगबगीने बाहेर पडला. आपल्या प्रासादात गेला आणि देवघरात त्याने तो मणी सुरक्षित ठेवून दिला.

पुढे थोड्याच दिवसानी असे झाले की सत्राजिताचा धाकटा भाऊ प्रसेन नावाचा होता. त्याने भावाजवळून तो मणी घेतला आणि हौसेने तो आपल्या गळ्यात धारण करून तो तसाच मृगयेला गेला. त्या मण्याच्या प्रभावाने हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नसे म्हणूनच त्याने तो मागून घेतला होता. तो एका मृगाचा पाठलाग करू लागला. पण त्यावर एका सिंहाने अचानक मागाहून हल्ला केला ! मण्याचा प्रभाव त्याच्यावर काहीच पडला नाही ! सिंहाने एकच थपेड्यात प्रसेनाला ठार मारले ! त्याने तो मणी आपल्या तोडात धरला. प्रसेन तर मरून पडला होता आणि सिंहही पुढे प्रचंड शरीर असलेल्या जांबुवंत नावाच्या अस्वलाच्या मार्‍याने त्रस्त होऊन मरण पावला. जांबुवंताने तो दिव्य मणी हिसकावून घेतला होता. त्याने आपल्या गुहेत जाऊन तो मणी आपल्या लहान मुलीच्या पाळण्या्वर खेळणे म्हणून बांधला.

हा जांबुवंत ऋक्ष म्हणजेच रामावतारातील नल, नील यांच्याबरोबरचा जांबुवंत होय. त्याला आपल्या बळाचा गर्व होता. प्रत्यक्ष रामाशी मल्लयुद्ध करण्याची त्याला ईर्ष्या होती. त्याने रामाजवळ तशी इच्छा बोलून दाखविली. पण रामाने त्याला म्हटले- "पुढे मी श्रीकृष्ण म्हणून अवतार घेणार आहे त्यावेळी तुझी ही इच्छा पूर्ण करीन." तो जांबुवंतच आता एका गुहेत रहात होता. त्याचा परिवार मोठा होता. जांबुवंती नावाची त्याची उपवर झालेली कन्या होती. ती मानवदेहधारी होती व अत्यंत सुंदर होती. गुहा पुष्कळ विस्तीर्ण होती. तीत जांबुवंताची लहान अपत्ये, पत्‍नी, पुष्कळ दासदासी होत्या.

स्यमंतक मणी घेऊन प्रसेन मृगयेला बाहेर पडला तो पुष्कळ वेळ झाला तरी परत आला नाही म्हणून सत्राजिताला चिंता वाटू लागली. त्याला आठवले की तो मणी नारदांनी कृष्णासाठी मागितला होता आणि आपण त्याचा धिक्कार केला व मणी न देता सभेतून बाहेर पडलो. हे आठवताच त्याला कृष्णाचा संशय आला. तो संशय त्याने बोलून दाखविला. लोकही तसेच बोलू लागले. कृष्णाच्या कानापर्यंत ही वार्ता गेली आणि आपल्यावर चोरीचा आळ घेतला जात आहे हेही त्याला कळले !

आपल्यावरील आळ खोटा आहे हे सिद्ध करून देणे त्याला भाग होते. त्याने काही यादवांना बरोबर घेतले. प्रसेनाचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला. काही अंतर शोध घेतल्यावर प्रसेनाचे कुजत चाललेले प्रेत त्यांना दिसले. स्यमंतक मणी मात्र नव्हता. पण जवळच सिंहाची पावले उमटलेली दिसली. त्यांचा माग काढीत यादव पुढे पुढे जाऊ लागले. पुष्कळ पुढे गेल्यावर त्यांना दुर्गंधी येत असलेले सिंहाचेही प्रेत आढळले ! आणि तिथेच झटापट झाल्याच्या खुणा होत्या. आणि अस्वलाच्या पावलांचे ठसे तिथून अरण्यात आणखी दूर गेलेले होते. कृष्ण म्हणाला- "कोणीतरी अस्वल इधून दूर गेलेला असावा. त्याने कदाचित स्यमंतक मणी नेलेला असणार ! तो मणी चकचकीत असल्यामुळे त्याचे त्याला आकर्षण वाटले असेल."

अस्वलाच्या पायलांचे ठसे एका पर्वताच्या गुहेपर्यंत जाऊन संपले होते. अस्वल गुहेतील अंधारात लपलेला असेल. आत जाणे धोक्याचे होते. बाहेर आणखीही अस्वलांच्या पावलांचे ठसे होते ! कृष्ण म्हणाला- "गुहेत मी एकटा जातो. अस्वलांचा प्रतिकार तुम्ही करू शकणार नाही, व्यर्थ मराल. आत जर मणी असला तर मी अस्वलाशी युद्धही करून तो मिळवीन. तुम्ही परत जा आणि माझी वाट पहा, पण काळजी करू नका. "

यादव परत गेले. कृष्ण गुहेत शिरला. त्याला पहाताच अनेक अस्वलिणी त्याचे रूप पाहून मुग्ध झाल्या. त्याकडे बघतच राहिल्या. परमेश्वराची ती बंधशक्ती होती. तिथे कृष्णाला एक पाळणा बांधलेला दिसला. त्यात एक बालऋक्ष होता. त्या पाळण्यावर स्यमंतक मणी टांगून ठेवला होता. त्याचा प्रकाश गुहेत पसरला होता. कृष्ण म्हणाला- "सत्राजित् नांवाच्या एका यादवाचा हा मणी आहे. तो त्याला परत नेऊन द्यायचा आहे. मजवर व्यर्थ चोरीचा आळ आला आहे तो दूर करायचा आहे. म्हणून हा मणी मला द्या म्हणजे मी परत जाईन"

अस्वलिणी म्हणाल्या- "सुंदर मनुष्या ! तू इथे थांबू नकोस. जांबुवंत हा महाबलाढ्य ऋक्ष येथे राहतो. तो जर तुला पाहील तर मारून टाकील. तेव्हा तू इथून लवकरात लवकर निघून जा."

कृष्ण म्हणाला- "मी मणी घेतल्याशिवाय परत जाणारच नाही. कोण जांबुवंत आहे त्याचा मी समाचार घेतो. " त्याने जमिनीवर पाय आणून गर्जना केली, आव्हान दिले. तेव्हा काय गडबड आहे ती पहावी म्हणून महाकाय असा जांबुवंत धावतच आला. कृष्णाला पहाताच तो थबकला. कृष्णाने मणी मागितला व आपल्यावर कसा आळ आला आहे तेही सांगितले. जांबुवंत म्हणाला- "तुला हा मणी माझ्याशी मल्लयुद्ध करून व माझा पराभव करूनच मिळवावा लागेल."

कृष्णाने त्याच्या आव्हानाचा स्वीकार केला. त्याने जांबुवंताशी मुष्टियुद्ध व मल्लयुद्ध केले. पुष्कळ वेळ जांबुवंताने टिकाव धरला. पण शेबटी तो खाली पडला. कृष्ण त्याला दरडावून विचारीत होता "मुकाट्याने मणी दे नाहीतर तुझा जीवच घेतो !" जांबुवंताला त्यावेळी कृष्ण हा दाशरथी रामच आहे असे दिसले ! त्याने तत्काळ हात जोडले. कृष्ण म्हणाला- "जांबुवंता, रामावतारात तुला मी जे वचन दिले ते आज पूर्ण केले आहे. तुझी इच्छा पूर्ण झाली ना ? ऊठ !"

जांबुवंताला पूर्वीचा प्रसंग आठवला. तो कृष्णाच्या पाया पडला. त्याने मणी काढून कृष्णाला अर्पण केला. आपली कन्या जांबुवंती त्याला भार्या म्हणून अर्पण केली. कृष्णाचा व जांबुवंतीचा विवाह तेथेच झाला. नारदमुनी नेमके त्यावेळी तेथे आले. "स्यमंतक मणी मिळाला का ? चला, गोकुळच्या चोरावरचा चोरीचा आळ आता दूर होईल. कृष्णा, पण ही अस्वलाची कन्या तुला कशी काय आवडली ? भक्त जे जे काही देतात ते ते तू स्वीकारतोस ?' ते कृष्णाला म्हणाले. कृष्णाने त्यांचे बोलणे हसण्यावारी नेले. नंतर तो म्हणाला- "प्रिय भक्ता, माझ्या या विवाहसमयी तुझे सुस्वर गायन झाले पाहिजे. " नारद म्हणाले- "इथे संगीताचे ज्ञानी तुझ्याशियाय कोणी नाहीत. या ऋक्षांसमोर काय गाणार ?

कृष्ण म्हणाला- "तुमची वीणा द्या. ती मी या अस्वलाच्या पिल्लाला देतो. तो कशी वीणा वाजवतो ती ऐका." नारदांनी भीतभीतच वीणा कृष्णाजवळ दिली. त्याने अस्वलाच्या पिल्लाला ती दिली. त्या पिल्लाने वीणावादन सुरू केले व गोड आवाजात गायनही केले ! त्यामुळे तेथील पाषाण द्रवरूप झाले !

मग कृष्ण म्हणाला- "नारदा, गर्व करू नको. आता पहा." अस्वलाने वीणा व टाळ त्या द्रवरूप पाषाणावर ठेवले तो ते आत अडकले व तेवढ्यात पाषाण पुन्हा घट्ट झाले. "आता तुमची वीणा तुम्ही काढून घेतलीत- गाण्याच्या प्रभावाने जर पुन्हा पाषाण विरघळले तर तुम्ही खरे गायक" कृष्ण नारदांना म्हणाला. नारदांनी पुष्कळ राग आळविले, पण काहीही उपयोग झाला नाही. नारद लज्जित झाले. ईश्वरी माया काही अघटितच ! मग अस्वलाने वीणा पुन्हा सोडविली व नारदांना परत दिली.

कृष्णाने नारदांना जांबुवंती अस्वलिणीच्या स्वरूपातच दिसावी अशी आधी योजना केली होती. त्यामुळेच त्यांनी कृष्णाची थट्टा केली होती. आता कृष्णाने नारदांना म्हटले- "जांबुवंतीकडे तुम्ही एकदा पहा तरी ?"

नारदांनी पाहिले तो काय ! सौंदर्याची पुतळीच दिसली त्यांना, त्यांचा भ्रमनिरास झाला. ' कृष्णा ! क्षमा कर मला' असे म्हणून ते पुढे होऊन कृष्णचरणी नम्र झाले. अस्वलांचा मुख्य जांबुवंत व तो गायक बालऋक्ष यांसह सर्वांचा निरोप घेऊन मग नारद 'नारायण नारायण' गात गात अन्यत्र निघून गेले.

श्रीकृष्ण जांबुवंताला क्षेमालिंगन देऊन निघाला. त्याने मणी घेतला. जांबुवंतीला बरोबर घेतले. तो द्वारकेत परत आला. सत्राजिताला भेटला. सभेत बोलावून त्याला समारंभपूर्वक तो मणी परत केला. आपण आततायीपणाने कृष्णावर आळ घेतला याबद्दल सत्राजिताला पश्चात्ताप झाला. त्याची मुलगी सत्यभामा मोठी तेजस्विनी व सुंदर होती. ती प्रज्ञावंत होती. तिचे मन कृष्णावर होते. सत्राजिताने तिचा श्रीकृष्णाशी विवाह करून दिला. रुक्मिणी इतकीच तीही कृष्णाची आवडती होती. सत्यभामा युद्धशास्त्रही जाणत होती. सत्राजिताने तर स्यमंतक मणीही कृष्णाला देऊ केला. तेव्हा कृष्ण म्हणाला- सत्राजित् ! तो मणी मला नको आहे. नारदांनी उगीच कळ लावली होती ! मजवर खोटा आळ आला त्याला कारण दैवी आहे. मी चतुर्थीच्या दिवशी चंद्र अदर्शनीय असूनही पाहिला होता- तेही पाण्यातील प्रतिबिंब ! त्यामुळे असे झाले. तुम्ही मनाला लावून घेऊ नका."

सत्राजिताने चंद्राचे दर्शन चतुर्थीला कां घेऊ नये ते विचारले. तेव्हा कृष्णाने पूर्वीची कथा सांगितली-

"एकदा सर्व देव शंकराच्या दर्शनासाठी कैलासावर आपापल्या वाहनांवर बसून चालले असता पर्वताच्या चढणीवर गणेश उंदरावरून खाली घसरून पडला. तेव्हा चंद्र हसला. त्यावर गणेश क्रुद्ध झाला. त्याने चंद्राला शाप दिला- "तुझे मुख जो कोणी पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल." चंदाने घाबरून आपले तोंड कोणाला दिसू नये म्हणून लपविले. त्यामुळे देवता व तारांगण निस्तेज झाले. मग देवांनी चंद्राला गणेशास नमस्कार करायला सांगून उःशाप मागण्यास सुचविले. गणेशाने उःशाप असा दिला- "जो कोणी भाद्रपद शुद्ध 'वरद' चतुर्थीला चंद्राचे मुख पाहील त्यांवरच चोरीचा आळ येईल. अन्य कोणत्याही वेळी हा शाप बाधणार नाही." तेव्हापासून चंद्राला हा शाप आहे.

मी गोकुळात असताना वरदचतुर्थीस पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब पाहिले होते. त्यामुळेच माझ्यावर स्यमंतक चोरल्याचा आळ आला. सत्राजित् ! मणी तुम्हीच ठेवा. सत्यभामेसारखे स्त्रीरत्‍न मला दिलेत यात मला आनंद आहे."

सत्राजिताने प्रथम सत्यभामा ही शतधन्वा नावाच्या यादवाला देण्याचे ठरविले होते. ती त्याने कृष्णाला दिली. त्यामुळे शतधन्वा मनातून संतप्त होता. पण त्याने वरकरणी स्नेह ठेवला होता. तो सत्राजिताकडे नेहमी येत असे. मणी आपण पळवावा असे त्याच्या मनात आले. त्याने एका रात्री सत्राजिताकडे वस्तीला राहून त्याला झोपेतच ठार मारले व तो मणी घेऊन निघून गेला.

त्यावेळी बलराम व कृष्ण हस्तिनापुरास गेले होते. पित्याचा असा भयंकर विश्वासघाताने मृत्यू झाला तेव्हा सत्यभामेला फारच शोक झाला. देवकीने, वसुदेवाने तिचे पुष्कळ सांत्वन केले. पण ती फारच दुःखमग्न झाली होती. वसुदेवाने रामकृष्णांना हस्तिनापुराहून परत बोलावून आणले. कृष्णाला जेव्हा हा दुःखद प्रकार कळला तेव्हा कृष्ण शतधन्वाचा शोध घेण्यास निघाला. पूर्वसागराच्या तीराजवळ शतधन्वा सापडला. कृष्णाने त्याला पकडले आणि त्याचा वध केला. पण स्यमंतक मणी सापडला नाही ! तेव्हा कृष्ण परत आला. शतधन्वाने गुप्तपणे तो मणी अक्रूराजवळ ठेवायला दिला होता पण कृष्णाला किंवा दुसर्‍या कोणासही ही गोष्ट माहीत नव्हती.

कृष्णाने द्वारकेत सभेमध्ये घोषणा केली- 'सत्राजिताकडील स्यमंतक मणी ज्याच्याजवळ असेल त्याने तो सभेत आणून द्यावा ?' अक्रूराजवळ मणी होता. त्यालाही त्या मण्याबद्दल लोभ उत्पन्न झाला. त्याने मणी घेऊन काशीस प्रयाण केले. तो श्रीमंत झाला. काशी येथे त्याने गंगेवर अनेक ठिकाणी घाट बांधले. अक्रूर जेथे असेल तेथे पाऊस पडेल असे त्याला वरदान होते. स्यमंतकाचाही तसाच प्रभाव होता. द्वारकेत व भरतखंडातही पुष्कळ मोठा दुष्काळ पडला पण काशीस मात्र पुरेसा पाऊस पडत असे. उद्धवाने काशीस जाऊन अक्रूराचा शोध केला. त्याला 'भिऊ नको' असे सांगून त्याने द्वारकेत परत आणले. लगेच पावसाने कृपा केली !

अक्रूराने द्वारकेत आल्यावर कृष्णाची भेट घेतली. तो मणी त्याने जेव्हा कृष्णाला दिला तेव्हा कृष्ण त्याला म्हणाला- 'प्रिय सख्या, अरे ह्या मण्यामुळे प्रसेन व सत्राजित् आणि शतधन्वा या तिघांचे प्राण गेले ! असा घातकी मणी तू द्रव्यलोभाने स्वतःजवळ कशाला ठेवलास ? जांबुवंत व सत्राजित् यांनी तो मला देऊ केला तरी मी घेतला नाही. यावरून तू बोध कां घेतला नाहीस ? "

अक्रूराने क्षमा मागितली. कृष्णाने तो मणी सत्यभामेजवळ हिला. पित्याची आठवण वारंवार येऊन सत्यभामा दुःख करू लागली. कृष्णाने तिचे सांत्वन केले.

अक्रूरावर कृष्णाची कृपा होती म्हणूनच त्याला स्यमंतक मण्यापासून प्राप्त झालेल्या द्रव्यातून काशी येथे घाट बांधण्याची सद्‌बुद्धी झाली होती !
॥ अध्याय पंचविसावा समाप्त ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP