|
॥ श्रीहरिविजय ॥ ॥ अध्याय अठ्ठाविसावा ॥ उषा - अनिरुद्ध - बाणासुर - कथा -
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय श्रीरंगा उदारा । पीतवसना कौस्तुभधरा । अंबुदवर्णा कोमलशरीरा । गदाधरा सुपर्णवहना ॥१॥ मन्मथजनका मधुसूदना । मुरसंहारा मनमोहना । अनंगदहना आनंदसदना । अरविंदनयना आदिपुरुषा ॥२॥ कलियुगीं श्रेष्ठ साधन सुगम । श्रीहरि तुझें एक नाम । योग याग तप धर्म । सिद्धि नवजे साधितां ॥३॥ कृतयुगीं ध्यानें प्राप्ती । त्रेतायुगीं महामख करिती । द्वापारीं राजोपचारें पूजा करिती । तुज समर्पिती श्रीवल्लभा ॥४॥ कलियुगीं नामसंकीर्तन । परि तुज आवडे मनींहून । तुझ्या नामीं विश्वास ठेवून । भक्तजन वर्तती ॥५॥ क्रतु करावे विधियुक्त पूर्ण । तेथें उभें ठाके नसतें विघ्न । द्रव्याविरहित भक्तजन । तुझें नामधन रक्षिती ॥६॥ करावें जरी तप अनुष्ठान । तरी कलयुगीं अन्नगत प्राण । यालागीं भक्त निर्वाण । नामीं विश्वास ठेविती ॥७॥ करावें तीर्थाटन बहुत । शरीर अशक्त न चले पंथ । यालागीं भगवद्भक्त । नामअर्थ विचारिती ॥८॥ करावें जरी वेदशास्त्रपठण । तों अधिव्याधि पीडित दारुण । यालागीं सद्भक्त यामिनी-दिन । नामस्मरण करिताती ॥९॥ म्हणोनि सर्वांत तुझें नाम सार । हा विद्वज्जनीं केला निर्धार । तुझ्या नामीं जे विन्मुख नर । तेचि पामर आत्मघाती ॥१०॥ सत्ताविसावा अध्याय संपता तेथें । शंबर दैत्य वधूनि मन्मथें । रतिसहित आला द्वारकेतें । मग अनिरुद्ध जन्मला ॥११॥ तो श्रीकृष्णाचा पौत्र । जैसा शुक्लपक्षीं वाढे चंद्र । तैसा दिवसेंदिवस झाला थोर । उदार धीर शूर पैं ॥१२॥ यावरी शोणितपुरनगरीं । बाणासुर प्रतापें राज्य करी । तो शिववरें उर्वीवरी । कोणा समरीं नाटोपे ॥१३॥ पूर्वीं हिरण्यकश्यप दितिनंदन । त्याच्या उदरीं प्रल्हादरत्न । त्याचा पुत्र विरोचन । बळी त्यापासूनि जाहला ॥१४॥ बळीचा पुत्र बाणासुर । जो दैत्यांमाजी म्हणवी इंद्र । शिवप्रसादें भुजा सहस्र । पावला तो बलाढय पैं ॥१५॥ नित्य सहस्र कमळें आणूनी । शिवार्चन करी प्रीतीकरूनी । प्रतिदिनीं विमानारुढ होवोनी । शिवदर्शना जाय तो ॥१६॥ शिवें आपुला वरदपुत्र । म्हणविला तो सहस्रकर । जैसा पूर्वीं सहस्रार्जुन वीर । किंवा दिनकर दूसरा ॥१७॥ जैसा पूर्वीं प्रताणी रावण । तैसाचि द्वापारीं बलोन्मत्त बाण । त्याच्या पोटीं उखा निधान । दिव्य कन्या जाहली ॥१८॥ परम सुंदर चातुर्यखाणी । पद्मनेत्री सुवर्णवर्णी । चित्ररेखा तिची सांगातिणी । प्राणाहूनि आवडे ॥१९॥ चित्ररेखेसमवेत देखा । नित्य विमानीं बैसोनि उखा । पूजावयालागीं अंबिका । शिवलोकाप्रति जाय ॥२०॥ षोडशोपचारें पूजन । उखा करी स्वकरेंकरुन । करी जगदंबेचें स्तवन । मागुती येत स्वनगरा ॥२१॥ ऐसें असतां एके दिनीं । सारीपाट खेळतां शिवमृडानी । तों उखा आली तेचि क्षणीं । कर जोडूनि उभी पुढें ॥२२॥ मनामाजी उखा भावीत । भ्रताराविण जिणें व्यर्थ । सारीपाट भ्रतारासमवेत । खेळेन मी कधीं ऐसी ॥२३॥ म्हणोनि श्वासोच्छ्वास टाकीत । भवानीसी कळला वृत्तांत । म्हणे उखे तुज वर होईल प्राप्त । केवळ मन्मथ दुसरा ॥२४॥ वैशाख शुद्ध द्वादशीस । जो स्वप्नीं देखसी दिव्य पुरुष । तो तुझा वर विशेष । प्रतापी पूर्ण ओळखें ॥२५॥ ऐसा वर हिमनगनंदिनी । देती झाली उखेलागोनी । येरी मस्तक ठेवी चरणीं । आनंद मनीं न समाये ॥२६॥ मग तें बाणाचें हृदयरत्न । अपर्णेची पूजा करून । निघाली विमानीं बैसोन । आज्ञा घेऊनि दुर्गेची ॥२७॥ उखा पावली स्वमंदिर । तंव कैलासा गेला बाणासुर । प्रीतीनें पूजोनि मृडानीवर । स्तवन अपार करीतसे ॥२८॥ जय पंचवदना विरुपाक्षा । विश्वंभरा कर्माध्यक्षा । भक्तवल्लभा सर्वसाक्षा । मायाचक्रचालका ॥२९॥ गंगाधरा हिमनगजामाता । गजास्यजनका विश्वनाथा । विष्णुवल्लभा प्रतापवंता । त्रिपुरांतका त्रिलोचना ॥३०॥ विशाळभाळ कर्पूरगौरा । नीलग्रीवा सुहास्यवक्त्रा । दक्षमखदलना विश्वेश्वरा । गजांतका स्मरारे ॥३१॥ हे भव भवांतका भवानीवरा । भोगिभूषणा महाभयहरा । हे भर्ग भक्तजनप्रियकरा । अंधकसंहारा वृषभध्वजा ॥३२॥ ऐसी ऐकोनियां स्तुती । संतोषला कैलासपती । म्हणे बाणा माग निश्चितीं । वर अपेक्षित असेल जो ॥३३॥ मग वदे बाणासुर । मज भुजांचा वाटतो भार । त्यांचें सार्थक होय समग्र । ऐसा झुंजार देईं कां ॥३४॥ शिव म्हणे रे तामसा । काय वर मागितला ऐसा । कर्मानुसार बुद्धि सहसा । न टळेचि काळत्रयीं ॥३५॥ तुझ्या ध्वजस्तंभींचा शिखी पाहीं । उन्मळोनि पडेल महीं । महाझुंजार ते समयीं । तुजशीं युद्धा भिडेल ॥३६॥ नगरा परतोनि येत बाण । कुंभक प्रधान परम निपुण । त्यासी सांगे वर्तमान । शिवें वर दिधला जो ॥३७॥ प्रधान म्हणे अहा राया । काय वर मागितला वायां । जैसें आपुल्या सदना लवलाह्या । आपणचि अग्न लाविला ॥३८॥ पाषाण थोर बांधोनि पायीं । उडी टाकिली महाडोहीं । सर्प धरूनि लवलाहीं । दंश आपण करविला ॥३९॥ जाणत जाणतां विष । बळेंचि घेतला कसा ग्रास । मैंदाचिया गृहीं वास । हठेंचि केला जाऊनि ॥४०॥ असो इकडे उखा लावण्यराशी । चिंताक्रांत अहर्निशीं । तंव वैशाख शुद्ध द्वादशी । जवळी आली तेधवां ॥४१॥ उखेनें शृंगारिलें मंदिर । लेइलीं अलंकारवस्त्रें सुंदर । दिव्य मंचकीं ते सुकुमार । पहुडली साक्षेपें ॥४२॥ तंव स्वप्न देखिलें ते वेळां । एक पुरुष दिव्य आला । जैसा मन्मथाचा पुतळा । संभोग केला उखेसीं ॥४३॥ उखेसी न वाटे ऐसें । कीं हें स्वप्न देखतसें । गोष्टी अक्री रतिरसें । बोलतसें ओसणतां ॥४४॥ म्हणे प्राणेश्वरा गोष्टी ऐका । मज टाकूनि जाऊं नका । जवळी ऐके चित्ररेखा । जें जें उखा बोलतसे ॥४५॥ सवेंचि अरुणोदय होत । उखा जाहली जागृत । तंव शेजे नाहीं प्राणनाथ । घाबरी पाहे चहूंकडे ॥४६॥ म्हणे उभे उभे प्राणनाथा । मज सांडूनि कोठें जातां । म्हणोनि द्वाराजवळी तत्त्वतां । धांवत आली पाहावया ॥४७॥ तंव कोठेंचि न दिसे कांहीं । म्हणे चित्ररेखे करुं काई । हृदय पिटी ते समयीं । टाकीत महीं शरीर पैं ॥४८॥ चित्ररेखा म्हणे सुंदरी । काय जाहलें सांग झडकरी । म्हणोनि सांवरोनि पुढें धरी । अश्रु पुसिले नेत्रींचे ॥४९॥ उखा म्हणे चारी प्रहरा । शेजेवरी होता प्राणेश्वर । रुप आठतें मनोहर । तोचि सत्वर दावीं कां ॥५०॥ शोधितां गे चराचर । ऐसा पुरुष नाहीं सुंदर । परम चतुर सकुमार । जैसा रतिवर दूसरा ॥५१॥ जातात गे माझे प्राण । लौकरी दावीं त्याचें वदन । ऐसें बोलतां मूर्च्छा येऊन । निचेष्टित पडियेली ॥५२॥ मग शीतल उपचार ते अवसरीं । करुनि केली सावध ते सुंदरी । म्हणे मी चित्रें लिहितें भिंतीवरी । त्रिभुननींचीं प्रत्यक्ष ॥५३॥ त्यामाजी तुझा प्राणेश्वर । ओळखोनि सांगें सत्वर । तोचि आणीन क्षणमात्र । न लागतां तुजजवळी ॥५४॥ नारदाच्या दयेंकरुन । मज असे त्रिभुवनींचें ज्ञान । ऐसें उखेनें ऐकोन । धरी चरण तियेचे ॥५५॥ मग चित्रशाळा सुंदर सुरेख । सतेज मुक्तांचा करुनि पंक । भिंती लिंपोनियां देख । घोंटूनियां सुढाळ केलिया ॥५६॥ सप्त रंगांचीं भरूनि पात्रें । सिद्ध केलीं क्षणमात्रें । चित्ररेखा लिही चित्रें । अंतर्दृष्टीं विलोकूनि ॥५७॥ प्रथम लिहिला गजवदन । ब्रह्मतनया रेखिली पूर्ण । मग नारदाचें स्वरूप लिहून । केलें नमन तयासी ॥५८॥ वैकुंठलोक समस्त । रेखिला चित्रीं रमाकांत । कैलासगिरि अद्भुत । अपर्णेसहित शंकर ॥५९॥ ब्रह्मलोक लिहिला विचित्र । त्रिदशांसहित सहस्रनेत्र । गण गंधर्व यक्ष किन्नर । विद्याधर काढिले ॥६०॥ मरुद्गण पितृगण देख । एकादश रुद्र द्वादशार्क । अष्ट वसु पितृलोक देख । देव अर्यमादिक मुख्य ते ॥६१॥ अष्ट दिक्पाळ लोकसमवेक । ऋषिमंडळी लिहिली समस्त । सप्त पाताळें भोगींद्रासहित । रेखूनियां दावीतसे ॥६२॥ जितूकीं दाविलीं उखेप्रती । ते म्हणे यांत नाहीं प्राणपती । मग भूमंडळींचें नृपती । चित्रीं रेखीत चित्ररेखा ॥६३॥ नव खंडें सप्त द्वीपें । छप्पन्न देशींच्या रायांचीं स्वरूपें । संतमहंतांची सद्रूपें । रेखिलीं कवि-गुरु-व्यासादि ॥६४॥ रचना दाविली समस्त । उखा म्हणे न दिसे येथ । आतां मी प्राण देते गे सत्य । चित्ररेखे जाण पां ॥६५॥ म्हणोनि भूमीवरी अंग घाली । चित्ररेखेनें सांवरिली । म्हणे सखे द्वारका एक राहिली । चित्रीं लिहितें हें पहा ॥६६॥ मग ते द्वारावती रेखीत । सप्तदुर्गें गगनचुंबित । भोंवता समुद्र उचंबळत । गोमती वाहत समीप पैं ॥६७॥ वसुदेव देवकी उग्रसेन । उद्धव अक्रुर रेवतीरमण । छप्पन्न कोटी यादव लिहून । स्वरुपें संपूर्ण दाविलीं ॥६८॥ सोळा सहस्र अंतःपुरें । रत्नखचित दिव्य मंदिरें । उखा पाहत आदरें । स्वरुपें सर्व न्याहाळूनि ॥६९॥ मग रुक्मिणीसहित श्रीकृष्ण । चित्रीं लिहिला जगन्मोहन । चतुर्भुज सुहास्यवदन । किरीटकुंडलें मंडित ॥७०॥ चित्ररेखा म्हणे उखे । हा होय काय ओळखें । येरी म्हणे याच्या वंशींचा देखें । होय ऐसे वाटतें ॥७१॥ मग चित्रीं लिहिला प्रद्युम्न । श्यामसुंदर कृष्णनंदन । हा सासरा होय म्हणोन । उखा लज्जित जाहली ॥७२॥ मग म्हणे याच्याचि उदरीं देखें । अवतरला तो चित्ररेखे । म्हणे सखे हा तरी ओळखें । म्हणोनि अनिरुद्ध काढिला ॥७३॥ देखतांचि मदनकुमर । म्हणे हाचि प्राणेश्वर । आतां तो भेटवीं सत्वर । न धरवे धीर माझेनि ॥७४॥ चित्ररेखा म्हणे स्थिर माये । आतां तो आणितें लवलाहें । मग चित्ररेखा द्वारावतीये । निराळमार्गें चालिली ॥७५॥ अकरा सहस्र योजनें दूर । तेथुनि असे द्वारकापुर । यामिनी होतां दोन प्रहर । द्वारकेजवळी पातली ॥७६॥ द्वारका देखोनि नयनीं । आश्चर्य करी पूर्ण मनीं । तों अकस्मात नारदमुनी । अंतरिक्षें भेटला ॥७७॥ दृष्टीं देखिला गुरुनाथ । केला साष्टांग प्रणिपात । सांगितला सर्व वृत्तांत । नारदाप्रति तेधवां ॥७८॥ म्हणे द्वारकेभोंवतें सुदर्शन भोंवें । डोळ्यांचें पातें जंव लवे । तों एकवीस आवर्तनें स्वभावें । होती तेथें स्वामिया ॥७९॥ तेथें माझा प्रवेश नव्हे सर्वथा । अनिरुद्धही न ये हाता । जाणोनि पुढील भविष्यार्था । विरिंचिपुत्र बोलतसे ॥८०॥ माझें करीं तूं स्मरण । तुज वाट देईल सुदर्शन । मोहनमंत्र तयेलागून । नारद देता जाहला ॥८१॥ याचि मंत्रेंकरून । अनिरुद्धावरी घाली मोहन । मंचकासहित उचलोन । वेगीं नेईं शोणितपुरा ॥८२॥ चित्ररेखा निघाली आज्ञा घेऊन । तों पुढें भोंवतें सुदर्शन । म्हणे तुज नारदाची आण । मार्ग देईं मजलागीं ॥८३॥ मग सुदर्शन स्थिर राहत । चित्ररेखा प्रवेशे आंत । अनिरुद्धाच्या सदनांत । अकस्मात उतरली ॥८४॥ तों दिव्य मंदिरीं मदनकुमर । दिव्य तल्प मणिमय विचित्र । त्यावरी निजला महावीर । निमासुर वदन पैं ॥८५॥ देखोनि चित्ररेखा निवाली । म्हणे धन्य धन्य ते वेल्हाळी । ऐसा दिव्य पुत्र प्रसवली । प्रभा सदनीं न माये ॥८६॥ मग गुरुमंत्र जपोनि देखा । तत्काळ उचलिलें तल्पका । तळहातीं घेऊनि चित्ररेखा । अंतरिक्षें जात असे ॥८७॥ अकरा सहस्र योजनें मार्ग । क्रमूनि घटिकेंत सवेग । तों उखा मंदिरीं सुरंग । शृंगारूनि वाट पाहे ॥८८॥ तों अकस्मात मंचक घेऊनी । सखी आली देखे नयनीं । धांवोनि चित्ररेखेचे चरणीं । मिठी घाली उखा ते ॥८९॥ म्हणे तुज उतराई । काय होऊं ये समयीं । मग दोघींनीं मंचक लवलाहीं । मंदिरांत पैं नेला ॥९०॥ मग मोहन काढूनि त्वरित । सावध केला मन्मथसुत । येरु घाबरा चहूंकडे पाहत । तंव बोलत चित्ररेखा ॥९१॥ मग सर्व वृत्तांत ते वेळां । मदनपुत्रासी सांगीतला । म्हणे भवानीवर उखेसी जाहला । म्हणोनि आणिलें तुज येथें ॥९२॥ मग उखेनें दिव्य माळा । अनिरुद्धाच्या तत्काळ गळां । घालूनियां परम मंगळा । गांधर्वलग्न लाविलें ॥९३॥ धरूनि उखेचा हात । मंचकीं पहुडे मदनसुत । चारी मासपर्यंत । सुखसोहळा भोगिला ॥९४॥ कोणासी न कळे बाहेर । तों उखा जाहली गरोदर । सभेसी बैसला बाणासुर । तंव ध्वनि जाहली अंतरिक्षीं ॥९५॥ म्हणे बाणा आतां सावधान । आलें तुज महाविघ्न । तंव धवजस्तंभींचा मयूर उलथोन । भूमीवरी पडिला हो ॥९६॥ तंव रायासी सांगती परिचारिका । गरोदर झाली तुमची उखा । गुप्त एक पुरुष देखा । आणोनि ठेविला दामोदरीं ॥९७॥ ऐकतांचि ऐसें वचन। दैत्येंद्र कोपला जैसा प्रळयाग्न । पुढें उभा कुंभक प्रधान । म्हणे वेढा सदन उखेचें ॥९८॥ कोण असे वरता तस्कर । बांधोनि आणा तो सत्वर । धांवले महावीरांचे भार । वेढिलें मंदिर उखेचें ॥९९॥ उखा परम चिंताक्रांत । भयें चळचळां कांपत । कामसुताचे चरण धरीत । म्हणे घात थोर म्यां केला ॥१००॥
मी तुमची केवळ वैरिणी । संकटीं घातलें आणोनी ।
जैसा राजहंस नेऊनी । पंकगर्तेंत बुडविजे ॥१॥ अग्नींत घातलें दिव्य मुक्तफळ । कूपांत कोंडिला मृगेंद्र सबळ । सुधारस आणोनि निर्मळ । भस्मगर्तेंत ओतिला ॥२॥ ऐसी मी परम पापिणी । तुमचा घात केला आणूनी । आतां माझा वध आधीं करूनी । मग बाहेरी जाइंजे ॥३॥ मग बोले मीनकेतनपुत्र । उखे भय न घरीं आणुमात्र । आम्ही यादववीर अनिवार । श्रीकृष्णबळें पृथ्वीवरी ॥४॥ जेणें नखाग्रीं धरिला गोवर्धन । द्वादश गांवें गिळिला अग्न । अघ बक केशी विभांडून । मथुरापुर घेतलें ॥५॥ जरासंध सप्तदश वेळ । बांधोनि आणिला जेणें सबळ । रजनीमाजी मथुरा सकळ । द्वारकेसी आणिली ॥६॥ चैद्य-मागधांसी त्रासूनी । जेणें आणिली मन्मथजननी । नरक मर्दूनि नितंबिनी । सोळा सहस्र आणिल्या ॥७॥ ऐसा तो यदुकुळार्क । माझिया जनकाचा जनक । त्याच्या कृपनें सकळिक । दळें आटीन पाहें पां ॥८॥ ऐसें अनिरुद्ध बोलत । तों भोंवता पडिला सैन्याचा आवर्त । एक उखेचें कपाट मोडीत । आरोळ्या दैत्य फोडिती ॥९॥ उखे उघडीं गे द्वार । आंत घेऊनि बैसलीस चोर । ऐसें ऐकतां रतिपुत्र । प्रतापशूर उठावला ॥११०॥ जवळी शस्त्र नाहीं निश्चितीं । दारींची अर्गळा घेतली हातीं । उपरी चढला उखापती । सैन्य क्षितीं विलोकीतसे ॥११॥ उदयाचळावरी बालदिनकर । तैसे दिसे मदनकुमर । उडी घातली सत्वर । सैन्यसागरी तेधवां ॥१२॥ कीं देखोनियां दंदशूक । अकस्मात कोसळे खगपाळक । चंपळेऐसा तळपे देख । अर्गळा हातीं घेऊनियां ॥१३॥ अर्गळाघातेंकरून । वीरांचीं मस्तकें करी चूर्ण । अश्वांसहित वीरकंदन । एकसरें मांडिलें ॥१४॥ प्रतापार्क अनंगनंदन । गजकलेवरें केलीं चूर्ण । तीन कोटी वीर झोडून । प्रेतें करुन पाडिलीं ॥१५॥ केला बहुतांचा संहार । जाहला एकचि हाहाकार । वीर म्हणनी कोपला प्रळयरुद्र । तेणेंचि अवतार धरियेला ॥१६॥ एक म्हणती दिसतो बाळ । परी महायोद्धा प्रळयकाळ । बाणाचें दळ आटिलें सकळ । वीरांसी पळ सुटलासे ॥१७॥ ऐसें देखोनि बाणासुर । कोण कोठील न कळे वीर । रथारुढ होऊनि असुर । आला समोर वेगेंसीं ॥१८॥ बाण म्हणे हा क्षणप्रभेऐसा । तळपतो वीर सांपडे कैसा । मग पंचशत धनुष्यां । गुण चढविले क्षणार्धें ॥१९॥ बाणासुर सहस्रकर । सोडीतसे बाणांचा पूर । परी तो कामसुत चपळ थोर । एक शर लगों नेदी ॥१२०॥ क्षण न लागतां जात बाण । बाणाहूनि चपळ तो पूर्ण । कोणा दिशेसी उभा पंचबाणनंदन । लक्षा न येचि बाणातें ॥२१॥ मग सर्पास्त्र अनिवार । जपोनि बाण सोडीन सत्वर । नागपाशीं मदनकुमर । अकस्मात सांपडला ॥२२॥ तात्काळ केलें दृढ बंधन । भोंवतें मिळालें सकळ सैन्य । जवळी येऊनि पाहे बाण । म्हणे पुरुषार्थ पूर्ण केला येणें ॥२३॥ बाण वध करुं पहात । तंव कुंभक प्रधान बोलत । हा जाहला तुमचा जामात । याचा वध न करावा ॥२४॥ मग बंधन करुनि सुबद्ध । बंदिशाळे रक्षिला अनिरुद्ध । उखा करी परम खेद । म्हणे कां मुकुंद न पावेचि ॥२५॥ अहा द्वारकेसी जाऊनि त्वरित । कोण करील हरीसी श्रुत । असो कृष्णनगरीं वृत्तांत । वर्तला तो परिसिजे ॥२६॥ कोणें नेला मदनसुत । रति रुक्मिणी शोक करीत । तों नारदमुनि अकस्मात । कृष्णसभेंत पातला ॥२७॥ म्हणे काय पाहतां निवांत । बाणें बंदिशाळेआंत । बांधोनि घातला मदनसुत । सर्व वृत्तांत सांगितला ॥२८॥ ऐसें ऐकतां ते अवसरीं । यादव उठावले दळभारीं । ठोकिल्या युद्धसंकेतभेरी । वीर अश्वांवरी आरुढले ॥२९॥ त्वरा करा म्हणती वीर । पालथें घालूं शोणितपुर । उद्धव सात्यकी अक्रूर । कृष्णकुमर सिद्ध जाहलें ॥१३०॥ रतिवर रेवतीवर । स्यंदनारुढ होती सत्वर । सांब जांबुवंतीचा कुमर । निजभारेंसीं धांवती ॥३१॥ उघडलीं सर्वही द्वारें । सैन्यसमुद्र चालिला त्वरें । दाटी झाली एकसरें । पंथ न दिसें चालावया ॥३२॥ क्षीरसागरविलासी । खगेंद्रावरी बैसे वेगेंसीं । तीन प्रहर होतां निशी । शोणितपुरासी पावले ॥३३॥ छप्पन्न कोटी यादववीर । सुबद्ध वेढिलें शोणितपुर । मदनें टाकिलें अग्निअस्त्र । ग्रामावरी सक्रोध ॥३४॥ धडधडां जळत नगर । होती उल्हाटयंत्रांचे मार । दुर्गहुडे खचती समग्र । जैसे भूधर कोसळती ॥३५॥ नगरीं एकचि आकांत । लोकांसी पळावया नाहीं पंथ । भोंवता सैन्याचा आवर्त । तों आदित्य उगवला ॥३६॥ बाणें करुनियां स्नान । करीत बैसला शिवार्चन । तों पुढें कुंभक प्रधान । वर्तमान सांगतसे ॥३७॥ यादवदळेंसीं यादवेंद्र । वेढोनि जाळिलें शोणितपुर । व्यर्थ धरिला त्याचा कुमर । आतां तरी सोडावा ॥३८॥ जैसा प्रळयीं क्षोभे कृतांत । तैसा बळिसुत जाहला क्रोधयुक्त । दळभारेंसीं प्रतापवंत । बाहेर निघता जाहला ॥३९॥ पर्जन्यास्त्र घालोनी । अग्नि विझविला ते क्षणीं । चतुरंदगळें त्वरें सिद्ध करूनी । नगराबाहेर निघाला ॥१४०॥ उदय पावला सहस्रकर । तैसा रथारुढ जाहला बाणासुर । लोटका कल्पांतसमुद्र । तैसीं दळें मिळालीं ॥४१॥ मांडिलें एकचि घनचक्र । गजबजिला खालीं घराधर । अशुद्धनद्यांचे पूर । जाती सिंधुदर्शना ॥४२॥ घे घे म्हणती वीरांसी वीर । उसणें घाईं फेडिती सत्वर । दोन्ही दळें अनिवार । अलोट वीर एकएकां ॥४३॥ ऐसें देखोनि विष्णुसुतनंदन । गेला कैलासा धांवोन । शिवासी म्हणे यादववीरीं तुझा बाण । वेढिला पूर्ण संग्रामीं ॥४४॥ बाण तुझा वरदपुत्र । ये समयीं न घेसी कैवार । तरी तुझें ब्रीद समग्र । अपेशसमुद्रीं बुडालें ॥४५॥ आठ कोटि गणांसमवेत । वेगी धांवला कैलासनाथ । सवें गजास्य आणि अग्निगर्भस्थ । स्वामिकार्तिक निघाला ॥४६॥ शोणितपुरासी तात्काळ आले । बाणें शिवासी वंदिलें । शिवें नंदी वाहन लोटिलें । हांकारिलें गोविंदा ॥४७॥ स्वामिकार्तिक आणि मदन । युद्धा मिसळले दोघेजण । कुंभक आणि रेवतीरमण । युद्धकंदन करिताती ॥४८॥ इकडे श्रीकृष्णावरी बाण । सोडी अपर्णामनमोहन । शारंग चढवूनि गरुडवाहन । तोडी बाण शिवाचे ॥४९॥ नारद नाचे भूमंडळीं । गिरक्या घेत वेळोवेळीं । म्हणे भली माजली रणधुमाळी । वाजवी टाळी आनंदें ॥१५०॥ शिवें सोडिलें जातवेदास्त्र । जळों लागले यादवभार । ऐसें देखोनि श्रीकरधर । पर्जन्यास्त्र सोडीत तेथें ॥५१॥ पर्जंन्य माजला अद्भुत । बाणाचें कटक वाहात । शिवें सोडिला तत्काळ वात । तेणें जलद वितुळला ॥५२॥ सुटला झंझामारुत । यादवसैन्य उडों पाहात । कृष्णें घातलें पर्वत । वात अद्भुत कोंडिला ॥५३॥ शिवसैन्यावरी अचळ । कोसळले पाहतां तत्काळ । वज्र सोडिलें सबळ । उमावल्लभें तेधवां ॥५४॥ ब्रह्मास्त्र कृष्णें सोडोन । केलें वज्राचें प्राशन । षडास्यजनकें देखोन । ब्रह्मास्त्रचि प्रेरिलें ॥५५॥ दोन्ही ब्रह्मास्त्रें एके ठायीं । मिळत अदृश्य जाहलीं पाहीं । शिवें हिमज्वर लवलाहीं । यादवांवरी घातला ॥५६॥ हिमज्वरें यादव सकळ । शस्त्रें सोडूनि पडती विकळ । कृष्णें उष्णज्वर घालोनि तत्काळ । शीतज्वर पळविला ॥५७॥ मग कृष्णें आगळें केलें । निद्रास्त्र शिवावरी घातलें । तेणें शंकरासी आकर्षिलें । शयन केलें नंदीवरी ॥५८॥ अवघें कटक निद्रिस्थ । निद्राभरें जांभया देत । निजवहनीं वीर घोरत । शिवासहित अवघेही ॥५९॥ इकडे मदन आणि शिवकुमार । रणीं भिडती अनिवार । अस्त्रें घाली शिवपुत्र । तितुकीं मदन भस्म करी ॥१६०॥ कुमारें सर्पास्त्र घातलें वाड । कामें सोडिला त्यावरी गरुड । पापास्त्र परम प्रचंड । सोडिलें षडाननें ॥६१॥ मदनें हरिनामास्त्र परम । सोडूनि केलें पाप भस्म । महिषासुर अतिदुर्गम । स्वामिकार्तिकें सोडिला ॥६२॥ शक्तिअस्त्र मदनें घातलें । महिषासुर सर्व मर्दिले । रोगास्त्र कुमारें सोडिलें । मदनें सोडिलें औषधास्त्र ॥६३॥ स्वामीनें सोडिलें सागरास्त्र । मदनें अगस्ति निर्मिला सत्वर । तेणें प्राशिला सागर । आश्चर्य सुरवर पाहती ॥६४॥ मदन क्रोधावला बहुत । म्हणे हा माझ्या शत्रुचा सूत । यासी पळवीन त्वरित । रणामधूनि पैं आतां ॥६५॥ घातलें स्त्रियास्त्र दारुण । सात सहस्र स्वर्गींहून । दिव्य स्त्रियांनीं उतरोन । रथ वेढिला स्वामीचा ॥६६॥ एक करिती गायन । एक देती आलिंगन । एक तया देती चुंबन । एक चंदन लाविती ॥६७॥ एक म्हणती घ्या जी विडा । स्वामिकार्तिक पाहे चहूंकडा । म्हणे हा अनर्थ मांडिला रोकडा । कोणापुढें सांगूं पां ॥६८॥ मी आजिपर्यंत ब्रह्मचारी । हा अनर्थ किमर्थ मजवरी । रथशस्त्रें टाकोनि झडकरी । स्वामिकार्तिक ऊठिला ॥६९॥ भस्माचा बटवा कांखेसी घेऊनि । स्वामी पळत तये क्षणीं । दक्षिणदिशेप्रति जाऊनी । कपाटामाजी दडला ॥१७०॥ स्त्रिया येतील धांवोनी । म्हणोनि शाप देत तेचि क्षणीं । म्हणे माझ्या दर्शना येतील कामिनी । त्या विधवा होतील सप्त जन्म ॥७१॥ ऐसा पळाला कुमार । गदगदां हांसती यादववीर । इकडे कुंभक प्रधान अनिवार । बळिभद्राशीं भिडतसे ॥७२॥ बळिभद्रें नांगर घातला । मुसळघायें चूर्ण केला । कुंभकाचा संसार संपला । मग बाण उठला हांक देत ॥७३॥ रथ प्रेरिला कृष्णावरी । शस्त्रास्त्रीं भिडती समोरी । बहुत युद्धकळाकुसरी । वाणासुर दावीतसे ॥७४॥ मग अंतरीं विचारी मुरहर । आतां कासया लावावा उशीर । बंदिशाळेंत मदनकुमार । श्रम थोर पावला ॥७५॥ सहस्रमित्रतुल्य प्रभा पूर्ण । हरीनें सोडिलें सुदर्शन । म्हणे दोन भुजा राखोन । वरकड छेदीं तत्काळ ॥७६॥ ऐसें बोले राजीवनयन । निमिष न लागतां गेलें सुदर्शन । जें धांवत्या वायुचें खंडन । क्षणमात्रें करणार ॥७७॥ भुजा छेदिल्या समस्त । दोन राखिल्या तयांत । बाणासुर विकळ पडत । पूर वाहत अशुद्धाचे ॥७८॥ सिंदुरें डवरिला पर्वत । कीं मधुमासी किंशुक फुलत । तैसा बाणाचा देह दिसत । अतिआरक्त दुरोनि ॥७९॥ तों सावध जाहला शूलपाणी । पाहे बाणाकडे विलोकूनी । तंव भुजा पडिल्या छेदोनि धरणीं । शिव मनीं विचारीत ॥१८०॥ हा साक्षात आदिनारायण । यापुढें कायसा बाण । खद्योत आणि चंडकिरण । समसमान कधीं न होती ॥८१॥ मग शिवें बाण सावध केला । श्रीकृष्णाजवळी आणिला । पायांवरी हरीच्या घातला । काय बोलिला सदाशिव ॥८२॥ प्रल्हादापासूनि बळीपर्यंत । याचे पूर्वज तुझे भक्त । याच्या माथां कृपाहस्त । ठेवीं आतां नारायण ॥८३॥ यावरी आतां कृपा करावी । आपल्या हातें हरी उठवीं । याच्या गर्वाची सरिता आघवी । आटोनि गेली गोविंदा ॥८४॥ करुणार्णव जगज्जीवन । कृपेनें उठविला बळिनंदन । हृदयीं तयासी धरून । अभयवचन दीधलें ॥८५॥ मग बोले बाणासुर । आतां नगरांत चला समग्र । सहित बळराम यादवेंद्र । पावन मंदिर करावें ॥८६॥ मग उमावर आणि रमावर । नगरांत आणि बाणासुर । अनिरुद्ध सोडोनि सत्वर । वस्त्रें भूषणें लेवविलीं ॥८७॥ ब्रह्मदेव येऊनि जाण । तत्काळ काढिलें उत्तम लग्न । मनीं परम हर्षला बाण । मंडप पूर्ण उभे केले ॥८८॥ वोहरें दोघें शृंगारिलीं । मंडपामाजी आणिलीं । कमलासनें ते वेळीं । लग्न लाविलें यथाविधि ॥८९॥ बाणें भांडार फोडोन । सुखी केले याचकजन । आपुल्या हस्तेंकरून । करी पूजन कृष्णाचें ॥१९०॥ शिव म्हणे बापा ऐकें वचन । बळीनें धुतलें हरीचे चरण । तुझें भाग्य परिपूर्ण । आला नारायण घरासी ॥९१॥ चारी दिवस जाहळा सोहळा । आंदण बहूत देत ते वेळां । तों दळभार सिद्ध जाहला । घोष लागला वाद्यांचा ॥९२॥ तेव्हां आज्ञा घेऊनि त्वरित । निघाला हिमनगजामात । वोहरें संगती घेऊनि कृष्णनाथ । द्वारावती येऊं निघाला ॥९३॥ दूर बोळवीत आला बाण । मग आज्ञा देत नारायण । शोणितपुरासी परतोन । बळिनंदन पावला ॥९४॥ द्वारके पावला श्रीपती । उखा अनिरुद्ध मिरवती । रति-रुक्मिणींसी वंदिती । आलिंगिती सप्रेम ॥९५॥ हरिविजयग्रंथ पूर्ण । हाचि कनकाद्रि शोभायमान । नाना दृष्टांतरत्नें जाण । तेणेंकरुन मंडित ॥९६॥ नाना इतिहास हेचि देव । यांच्या आश्रयें राहती सर्व । मुख्य वैकुंथपति रमाधव । तोचि येथें वसतसे ॥९७॥ ब्रह्मानंद द्वारकाधीशा । रुक्मिणीमानसराजहंसा । श्रीधरवरदा आदिपुरुषां । भीमातटवासा पांडुरंगा ॥९८॥ इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत । प्रेमळ परिसोत पंडित । अष्टविंशतितमाध्याय गोड हा ॥१९९॥ ॥ अध्याय अठ्ठाविसावा समाप्त ॥ओंव्या १९९॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
अनिरूद्ध फार सुंदर होता. तो जसजसा मोठा होऊ लागला तसतसा जास्त सुंदर दिसू लागला. तारुण्यात तर त्याचे सौंदर्य अनुपम दिसू लागले. त्यावेळी अशी एक घटना घडली की तीमुळे श्रीकृष्णाला प्रत्यक्ष शंकराशी लढावे लागले !
शोणितपुर म्हणून एक मोठे नगर होते. तेथे बाणासुर नांवाचा राजा होता. तो शिवभक्त होता. प्रल्हादाचा पुत्र विरोचन याचा बाणासुर हा नातू ! बलीचा मुलगा ! शिवाने प्रसन्न होऊन त्याला सहस्र बाहू दिले होते, कारण बाणाने शिवभक्तीच तशी केली होती ! रोज एक सहस्र कमलपुष्ये तो कैलासावर जाऊन शंकराला अर्पण करीत असे. त्यावेळी तो कैलासापर्यंत विमानाने जात असे. शिवभक्त रावण व सहस्रार्जुन यांसारखाच बाणासुरही शिवाचा प्रिय असा भक्त होता. त्याची कन्या उषा फार सुंदर होती. चित्रलेखा नांवाच्या आपल्या सखीबरोबर ती नित्याप्रमाणे कैलासावर भवानीच्या पूजेसाठी गेलेली असताना तिला शंकर व भवानी सारीपाट खेळताना दिसले. तिच्या मनात आले- " आपणही आपल्या पतीबरोबर असेच सारीपाट केव्हा खेळू ? मलाही चांगला पती कधी मिळेल ?" उषेच्या मनातील इच्छा पार्वतीला कळली. ती म्हणाली- "मुली ! तुझी मनोकामना पूर्ण होईल, चिंता करू नकोस. येत्या वैशाख शूद्ध द्वादशीला एक सुंदर तेजस्वी तरुण तुझ्या स्वप्नात येईल. तोच तुला पती म्हणून लाभेल." उषेने मोठ्या आनंदाने पार्वतीची पूजा केली. तिच्या पूजेने संतुष्ट होऊन पार्वतीने 'तुझी इष्टकामना पूर्ण होईल ' असा वर दिला. चित्रलेखेसह उषा परत आली. बाणासुर जेव्हा शिवपूजेसाठी कैलासावर गेला तेव्हा त्याने शंकराला विनंती केली- "हे महादेवा, मला तू सहस्र बाहू दिलेस, पण त्या हातांनी काय करुउं ? त्यांच्या सहाय्याने युद्ध करावे तर तुल्यबल योद्धाही समोर नाही. असा वीर असता तर माझ्या हातांचे सार्थक झाले असते." " आपण याला हजार हात दिले पण याच्या मनात नुसती ईर्ष्याच निर्माण झाली ! याला चांगला धडा शिकवावा" असे शंकराच्या मनात आले. ईश्वराला भक्ताचा गर्व आवडत नाही. तो म्हणाला- "बाणा ! अरे, राक्षसी वृत्तीने तू भलते बोलून गेलास. तुझ्या हातांचा तुला भार वाटतो का ? मग तो भार हलका करणारा वीर तुला नक्की भेटेल ! तुझ्या ध्वजावरील मयुरचिन्ह अचानक गळून पडेल तेव्हाच ती येळ येईल ! लक्षात ठेव." बाणासुराला मनोमन धक्का बसला. कुंभक नांवाचा त्याचा मुख्य मंत्री होता. त्याला त्याने हा वृत्तांत सांगितला. त्यानेही बाणासुराला ठपकाच दिला. पार्वतीने दिलेल्या आश्वासनाने उषा हर्षित झाली होती. वैशाख शुद्ध द्वादशीच्या रात्री तिच्या स्वप्नात खरोखरच एक तेजस्वी सुंदर पुरुष आला. स्वप्नांतच तिचा त्याच्याशी संग घडला. त्यावेळी ती स्वप्नात प्रेमालाप करीत होती. चित्रलेखा जागी होती. ती बडबड तिने ऐकली. उषा जागी झाली ती बडबडतच. "अहो प्रियकरा ! थांबा, जाऊ नका !" असे म्हणत ती उठून द्वारापर्यंत धावत सुद्धा गेली. तो काय ? कुठला तरूण आणि कुठला त्याचा बेभान करणारा सहवास ! "चित्रलेखे !" ती रडत रडत म्हणाली- "चित्रलेखे, तो तरूण गेला ! हाय ! मला वेडी करून गेला" असे म्हणता म्हणता तिला पुन्हा मूर्च्छा आली. चित्रलेखेने तिला सावध केले, आणि खोदखोदून विचारले- "तो तरूण कोण होता ? तुझ्या ओळखीचा होता का ? मला वर्णन करून सांगशील का ?" उषेला काही पूर्ण वर्णन करून सांगता आले नाही. चित्रलेखेला दोन विद्या अवगत होत्या. तिला दिव्यदृष्टी होती आणि चित्रकलाही येत होती. ती म्हणाली, "मी निरनिराळ्या देवांची, राजांची वगैरे चित्रे काढते. त्यावरून तू कोण ते ओळख." मग चित्रलेखेने ब्रह्मदेवापासून गंधर्वांपर्यंत सर्व देवांची चित्रे काढून दाखविली, पण चित्रलेखेला उषा "हा नको, हा नव्हे" असेच म्हणत राहिली. मग तिने राजे, ऋषी, संत, कवी यांचीही चित्रे काढली तरी उषा 'हाच' असे म्हणेना. यावेळेपर्यंत उषा त्या स्वप्नसुंदराच्या आठवणीनी व्याकुळ झाली होती. ती दुःखी झाली, निराश झाली, तोच चित्रलेखेने उग्रसेन, वसुदेव, श्रीकृष्ण यांची चित्रे काढली. कृष्णाचे चित्र पाहून उषा आनंदित झाली आणि म्हणाली- "याच्याशी थोडे साम्य आहे." मग तिने प्रद्युम्नाचे चित्र काढले. तेव्हा उषेला जास्त आनंद वाटला, पण "हा तो नाही" असे ती म्हणाली. तेव्हा चित्रलेखेने प्रद्युम्नाचा पुत्र अनिरुद्ध याचे चित्र काढले. ते पहातांच उषा हर्ष व व्याकुलता यांनी मन भरून चित्रलेखेला मिठी मारून म्हणाली- "सखी ! हाच तो प्राणप्रिय ! काय याचे नांव ? कुठे रहातो हा ! याच्याविरहित मी राहूच शकत नाही, तू याची व माझी पुनर्भेट घडवून आणशील का ?" चित्रलेखेने त्यावेळी उषेला आश्वासन दिले. ती म्हणाली- "द्वारकेतील श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न याचा मुलगा जो अनिरुद्ध आहे त्याचेच हे चित्र आहे. तोच तुझ्या स्वप्नात आला असावा. मी त्याला माझ्या सिद्धींच्या बळावर इकडे घेऊन येते, तुझी व त्याची भेट घडविते." चित्रलेखा उषेचा निरोप घेऊन गुप्तपणे निघाली. आकाशांतून द्वारकेजवळ आली. तिला तेथे नारदमुनी भेटले. ते म्हणाले- 'द्वारकेभोवती सुदर्शन चक्र अंतराळात फिरत आहे ! तू शिरण्याचा प्रयत्न केलास तर मरशील. एका निमिषात त्या चक्राचे एकवीस फेरे होतात ! तू माझ्या नांवाची त्या चक्राला शपथ घाल. म्हणजे ते वाट देईल. आणि मी सांगतो तो मोहिनी मंत्र म्हण, म्हणजे कोणीही द्वारकानिवासी जागा होणार नाही, आणि तू अनिरूद्धाला नेऊ शकशील !' "पण मुनिवर्य ! आपण मला एवढी मदत कां करतां ?" चित्रलेखेने विचारले. ते म्हणाले- "मी श्रीहरीच्या व देवांच्या कार्यासाठीच हे करत असतो." त्यांनी तिला मोहिनी मंत्र शिकविला. चित्रलेखेला शिकवून नारद निघून गेले. तिने सुदर्शनचक्राला नारदांची शपथ घालून मार्ग मिळविला. तिला जरी सिद्धी होत्या तरी सुदर्शन चक्रापुढे काहीच चालणार नव्हते. द्वारकेच्या वर आकाशांत येऊन तिने मोहिनी मंत्र म्हटला. सारी द्वारका निजली होती. तिने अनिरूद्धाचा प्रासाद गाठला. अनिरूद्धाला निद्रिस्त स्थितीतच, मंचकासकट उचलले आणि गगनमार्गे एकदम शोणितपुरास आणून उषेच्या सदनात प्रविष्ट केले ! तिला पहाताच आणि मंचकावरील अनिरुद्धाला पाहून उषा फारच आनंदित झाली. तिने चित्रलेखेला घट्ट आलिंगन दिले आणि म्हणाली- "सखे ग ! मजसाठी केवढे धाडस केलेस हे ! मी तुझे उपकार कसे फेडू तेच कळत नाही ?" मंचकावर अनिरूद्ध झोपेतच होता. चित्रलेखेने मोहिनी मंत्राचा प्रभाव काढून घेतला तेव्हा तो जागा झाला ! त्याने नेत्र उघडले. आपण कुठे आहोत हेच त्याला कळेना. तो चकित झाला, द्वारकेपासून दूर कुठेतरी आलो आहोत एवढे त्याला उमगले. त्याची दृष्टी अचानक उषेवर आणि चित्रलेखेवर पडली. चित्रलेखा त्याला सर्व सांगून म्हणाली- "अनिरुद्धा ! तू आम्हाला ओळखत नाहीस. पण मी तुला ओळखते. ही उषा ! बाणासुराची ही मुलगी. बाणासुर मोठा शिवभक्त आहे. ही सुद्धा भवानीची भक्त आहे. भवानीनेच तुला हिचा पति म्हणून योजिला आहे. तुला मी द्वारकेतून आणले, त्यासाठी नारदांनी मला सहाय्य केले ! तुझी व उषेची भेट मी घडवून आणली. तिने तुला वरमाला घालावी आणि तू व ती गुप्तपणे येथेच रहावे." उषेचे अनिरुद्धालाही स्वप्न पडले होते. त्याला ती फार आवडली होती. त्याने तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला ! तो अंतःपुरातच लपून राहिला. द्वारकेत परत गेलाच नाही. असाच चार महिन्यांचा अवधी गेला, तरी कोणालाही अनिरुद्धाच्या तेथे रहाण्याचा थांगपत्ता लागला नाही. एक दिवस मात्र गौप्यस्फोट झाला ! बाणासुर सभेत बसला असताना त्याच्या ध्यजावरील मोराचे चिन्ह अवचित खाली पडले ! आणि त्याचवेळी आकाशवाणी झाली- "बाणासुरा ! तू सावध हो ! तुझ्या ध्वजावरील मोराचे चिन्ह खाली पडले आहे ! तुझ्या सहस्र बाहूंचे सार्थक होण्याची वेळ आता दूर नाहीं ?" तेवढ्यात तिथे दासी आल्या- "महाराज ! अंतःपुरात कोणीतरी परकी तरुण आहे. तो राजकन्या उषा हिच्याबरोबर रहात आहे. बहुधा पुष्कळ दिवस तो रहात असणार ! आणि महाराज "..... असे म्हणून दासी बोलेनात. तेव्हा बाणासुराने विचारले- "आणि काय ?" तरी दासी गप्प. बाणासुराने गुप्त दालनात दासीला बोलावून बातमी काढून घेतली- "राजकन्या उषा गरोदर आहे." झाले ! बाणासुराला भयंकर क्रोध आला. आपले हजार हात हलवीत तो ओरडला- "उषेच्या प्रासादाला चारी बाजूंनी वेढून टाका आणि आत कोणीही असला तरी त्याला खेचून बाहेर काढा ?" त्याची आज्ञा ऐकताच बाणासुराच्या सैनिकांनी उषेच्या सदनाला वेढा घातला. आपल्याला कोंडले आहे हे कळताच उषा भयभीत झाली. ती अनिरुद्धाच्या पाया पडून रडू लागली, करूणा भाकू लागली ! ती म्हणाली- "नाथ ! मजमुळे तुमच्यावर केवढा प्रसंग ओढवला ! आतां काय करू मी ! नाथ ! माझे प्राण आधी घ्या आणि मगच युद्ध करायला बाहेर पडा ?" पण अनिरुद्ध म्हणाला- "उषे ! मुळीच घाबरू नकोस. मी या सैन्याला अजेय आहे. श्रीकृष्ण पितामहांचीच कृपा ! मी कोणासही हार जाणार नाही." पण त्यावेळेपर्यंत सैनिकांनी द्वार तोडून आत प्रवेश केला ! अनिरुद्धाने दाराच्या अडसराचेच हत्यार केले ! आणि जो सैनिक पुढे येईल त्याचे डोके फोडण्यास सुरूवात केली ! शेकडो वीर यमसदनास गेले. त्याच्यासमोर प्रेतांचा खच पडला. अनिरुद्ध अंतःपुराबाहेर पडला. तोच बाणासुर युद्ध करण्यासाठी आला. त्याने बाणांचा मारा केला. पण अनिरुद्धाने त्याला दाद दिली नाही. त्यामुळे बाणासुराला आश्चर्य वाटले. त्याने मग पाश फेकून अनिरुद्धाला बांधून टाकले. तो खड्गाने अनिरूद्धाचा शिरच्छेद करणार होता पण कुंभक प्रदानाने त्याला अडविले !' महाराज ! थांबा ! हा वीर उषेने पती मानला आहे. तिच्या संतानाचा पिता आहे. याला ठार मारून उषा विधवा होईल ! त्यापेक्षा याला बंदीत टाका ! याचे कुल, वंश, इत्यादींची चौकशी करा." बाणासुराने अनिरुद्धाला बंदीत टाकले. उषा रडू लागली. चित्रलेखा तिचे सांत्वन करू लागली. दोघीजणी श्रीकृष्णाची आठवण काढू लागल्या. द्वारकेत अनिरूद्ध हरवल्याची वार्ता पसरल्यानंतर लोकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला. चार महिने झाले, शोध लागला नाही. नारद द्वारकेत गेले. त्यांना यादवांनी विचारले. ते म्हणाले- "शोणितपुरात अनिरुद्ध बाणासुराच्या कैदेत आहे. बाणाची कन्या उषा ही त्याची पत्नी असून ती गरोदर आहे. बाणासुराचा मंत्री कुंभक यामुळेच अनिरूद्धाचा जीव वाचला आहे. चित्रलेखा नांवाच्या उषेच्या सखीने द्वारकेतून अनिरुद्धाला योगसिद्धीच्या बळावर उचलून नेले होते ?" श्रीकृष्ण म्हणाला- " आणि सुदर्शनाला तुमची शपथ चित्रलेखेने कशी घातली ते कळलेच आता मला ! नारदा ! खरोखर धन्य आहेस ?' नारद म्हणाले- " भगवंता, पार्वतीने ठरविले त्याप्रमाणे घडवून आणायला हवे ना ! बाणासुराला सुद्धा शंकराने जो शापरूपी वर दिला आहे तो तूच पूर्ण करायचा आहे ?" "पुरे पुरे ! नारदा, अधिक बोलू नये ! आता यादव वीरांना घेऊन शोणितपुरावर हल्ला करून अनिरुद्धाला सोडविले पाहिजे." कृष्ण म्हणाला. नारद त्यानंतर निघून गेले. नंतर यादवसेना सज्ज करून प्रद्युम्नासह कृष्ण शोणितपुरावर चाल करून गेला. प्रद्युम्नाने आधी अचानक बाणासुराच्या सेनेला आव्हान देऊन अग्नीचे अस्त्र टाकले. भर रात्री शोणितपुर धडधडा पेटू लागले ! हलकल्लोळ उडाला. नगराला वेढा घालून यादवसेना गर्जना करू लागली. "महाराज !"- कुंभक बाणासुराला म्हणाला- "कृष्ण स्वतः तुमच्यावर चाल करून आला आहे. तुम्ही अनिरूद्धाला तत्काळ मुक्त करावे. नाहीतर असंख्य लोक प्राणास मुकतील." पण बाणासुर म्हणाला- "नाही ! मी शरण जाणार नाही. अनिरूद्धाला सोडून देणार नाही ! सकाळ होताच युद्ध पेटवीन ! त्या कृष्णाला माझ्या बलाचा परिचय देईन !" आणि त्याने सकाळीच प्रचंड वेगाने यादवसेनेवर हल्ला चढविला. पर्जन्यास्त्र सोडून त्याने अग्निअस्त्राचा प्रतिकार केला. पण यादयवीरांनी त्याला घेरून शरवर्षावांनी त्राहि त्राहि करून सोडले. नारद त्यावेळी कैलासावर गेले. त्यांनी शंकराला म्हटले- "कैलासनाथ, बाणासुर तुमचा भक्त ना ! त्याचे रक्षण करा ! यादवांनी त्याची अगदी दुर्दशा करून टाकली आहे ! तुमच्या भक्तरक्षणाच्या ब्रीदाला कलंक लागेल ! शोणितपुर शोणिताच्या पुरात वाहून जाऊ लागेल ?" शंकराने गणेशाला व कार्तिकेयाला बरोबर घेतले. साठ कोटी गणांचे भयंकर सैन्य शोणितपुराकडे अंतरिक्षातून उतरले. यादव ५-६ कोटी होते. बाणासुराचे सैन्यही कोट्यवधी होते. महा भयंकर युद्ध झाले. आणि कृष्णाला साक्षात् शंकराशी युद्ध करण्याची वेळ आली ! नारदांनी गगनातून ते दृश्य पाहून आनंदाने टाळ्या पिटल्या ! कलहप्रिय नारदांना विष्णु व शिव यांचा असा झगडा कधी पहायला मिळणार ? शिवाने भक्ताचा कैवार घेतला होता. तर कृष्णाने नातवाचा कैवार घेतला होता ! कृष्णाने मोहनास्त्राचा प्रयोग करून शंकराला मोहनिद्रा आणली. मदन (प्रद्युम्न) व कार्तिकेय यांची लढाई विलक्षण झाली. कार्तिकेय हा ब्रह्मचारी ! प्रद्युम्नाने त्यावर स्त्रीअस्त्र सोडले ! स्त्रियांचे समुदाय त्याच्याभोवती जमले ! कार्तिकेय पळून गेला, तो दक्षिणेस जाऊन, गूढ अशा गुहेत जाऊन लपून बसला. त्याने स्त्रीजातीला शाप दिला- "माझे दर्शन घेतल्यास स्त्रियांना सात जन्म विधवा व्हावे लागेल ?" बाणासुर आणि श्रीकृष्ण यांचे युद्ध चालले होते. त्यावेळी बाणासुराच्या सहस्र हातांपैकी दोन हात शिल्लक ठेवून बाकीचे हात कृष्णाने सुदर्शन चक्राने तोडून टाकले ! बाणासुर चकित, दुःखित, लज्जित व मूर्च्छित झाला ! त्याचे बाहुबल व बलगर्व गळून गेला होता ! तितक्यात शंकर मोहनास्त्रातून मुक्त झाला. त्याने बाणासुराला सावध केले, आणि म्हणाला- "माझ्या प्रिय भक्ता, श्रीकृष्ण हा नारायणाचा पूर्णावतार आहे. तू त्याच्याशी आता युद्ध करू नको. तुझ्या बळाचा गर्व हरण करणारा तो हाच. त्याला शरण जा." बाणासुराने आपल्या दोन हातानी कृष्णाचे पाय घरले. असुरवधासाठीच अवतार घेतलेल्या कृष्णाने त्याचा वध करण्याचे ठरविले होते, पण शंकराने "माझ्या भक्ताला अभय दे" असे सांगून बाणासुराचे प्राण वाचविले. बळी व प्रल्हाद हे बाणाचे पूर्वज ! त्यांच्या भक्तीसाठीच विष्णूने वामनावतार व नृसिंहावतार धारण केले होते ! त्यांचा वंशज बाणासुर आज शिवकृपेने वाचला होता ! आणि अनिरुद्ध हा कृष्णाचा नातू त्याचा जावई झाल्यामुळे तो बाणासुर कृष्णाचा व्याही झाला ! उषा व अनिरुद्ध यांचा विवाह मोठ्या वाटाने करून देऊन बाणासुराने चार दिवस सर्व यदूंचा सन्मान केला ! बलरामाने कुंभकाचा वध केला होता ! अनिरुद्धाचे प्राण वाचविणार्या व बाणाला चांगला सल्ला देणार्या प्रधानाचा स्वामीसेवेत देह सार्थकी लागला होता ! मोठ्या वैभवाने यदुसेना घेऊन कृष्ण, बलराम, प्रद्युम्न, अनिरूद्ध व उषा यांसह द्वारकेस जाण्यास निघाला. शंकरही गणेशासह कैलासास जाण्यास निघाला ! फक्त दोनच हातांनी बाणासुराने कृष्णाला व शंकराला वंदन केले ! त्यावेळी गगनांत नारदही "नारायण नारायण' असा घोष करू लागले ! ॥ अध्याय अठ्ठाविसावा समाप्त ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ |