॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय पंधरावा ॥

देवकीला मथुरेत कृष्णाचे दर्शन,
राधाकृष्णसंवाद, गोपीवस्त्रहरण -


श्रीगणेशाय नमः ॥
जय जय वृंदावनविलासिया । निर्विकल्पवृक्षा करुणालया ।
अहंकारविषधर कालिया । पायांतळीं रगडिला ॥१॥
परम दुर्धर दुर्वासना । हेचि जीवें शोषिली तुवां पूतना ।
आपरसंसारभ्रममोचना । व्रजभूषणा सुखाब्धे ॥२॥
अघ बक केशीं शटकासर । हेचि काम क्रोध मद मत्सर ।
मर्दिले दैत्य दुर्धर । श्रीमनोहर विजयी तूं ॥३॥
नानाविकारभेदभंजना । अक्षया अपरिमिता निरंजना ।
गोपीजनमानसरंजना । सनातना प्रतापिया ॥४॥
कमलपत्राक्षा कमलनयना । निंदक दुर्जनवनभंजना ।
अभेद प्रेमळ भक्तरक्षणा । हरि निर्गुणा निरुपाधिका ॥५॥
मधुकैटभारि पुंडलीकवरदा । सत्यज्ञाना परमानंदा ।
प्रमाणरहिता अक्षयसुखदा । क्रीडसी मुकुंदा गोकुळीं ॥६॥
चतुर्दशाध्यायाचे अंतीं । गोवर्धनीं असतां श्रीपती ।
अग्नि लाविला कंसदूतीं । कृष्णें निश्चितीं गिळिला तो ॥७॥
यावरी एकदां श्रावणमासीं । पितृतिथि अमावास्येसी ।
माता पूजिती पुत्रांसी । वाणें देती आदरें ॥८॥
संकर्षणाची पूजा करोनी । ते दिनीं वाण देत रोहिणी ।
श्रीरंगासी नंदराणी । प्रीतीं अर्चूनि वाण देत ॥९॥
तों मथुरेंत बंदिशाळे । वसुदेव - देवकी ते वेळे ।
आठवूनि श्रीकृष्णरूप सांवळें । दुःख केलें अपार ॥१०॥
माय बोले ते क्षणीं । मी वांड सप्त पुत्र विऊनी ।
आठवा जाहला चक्रपाणी । तोही मज अंतरला ॥११॥
कंसें परम चांडाळें । अवघीं मारिलीं माझें बाळें ।
एकही नाहीं उरलें । आजी वाण द्यावया ॥१२॥
अहा डोळसा आठव्या हृषीकेशी । मज तुवां केलें परदेशी ।
आजी मी वाण देऊं कवणासी । बा वेगेंसीं धांवें कां ॥१३॥
अहा माझें पूर्वकर्म ओढवलें । घोर पाप कैसें फळासी आलें ।
अहा गाईवत्सासी विघडिलें । कीं मृगीचें तोडिले पाडस ॥१४॥
किंवा मोडिला हरिकीर्तनरंग । कीं ऋषींचा केला मानभंग ।
माता-पितासद्‌गुरुंसी व्यंग । शब्द बोलिलें मीं पूर्वीं ॥१५॥
धांव लवकरी वैकुंठनाथा । माझें बाळ भेटवीं मज आतां ।
हे बंदिशाळेची व्यथा । किती दिवस भोगविसी ॥१६॥
ऐसी देवकी धांवा करी । तों गोकुळीं खेळतां श्रीहरी ।
करुणाशब्द ते अवसरीं । हरिश्रवणीं पडियेला ॥१७॥
गडियांत खेळतां सावळा । मायेचा धांवा ऐकिला ।
सद्गदित कंठ झाला । तैसाचि चालिला गुप्तरूपें ॥१८॥
अनंत ब्रह्मांडींचा समाचार । सर्व जाणे श्रीहृत्पद्मभ्रमर ।
तो न लागतां क्षणमात्र । बंदिशाळे पावला ॥१९॥
पद्मिनीमित्रकुलभूषण । चतुर्दश वर्षें सेवूनि विपिन ।
निजमायेसी भेटे येऊन । तेवीं मनमोहन पावला ॥२०॥
तंव देवकी विस्तारूनि वाण । करीत श्रीकृष्णाचें चिंतन ।
म्हणे जेथें असेल बाळ सगुण । त्यासी वाण पावो हें ॥२१॥
तंव अकस्मात मातेचे पाठीशीं । उभा राहिला हृषीकेशी ।
जो पयःसागरहृदयविलासी । वेदशास्त्रांसी अगोचर ॥२२॥
मायेचें उचलून वाण । सहज बोले अतीत कोण ।
तों अकस्मात बोले जगन्मोहन । सर्वातीत मीच असें ॥२३॥
जीव-शिवांसी जो अतीत । पिंडब्रह्मांडाविरहित ।
तोचि मी झालों तुझा सुत । वाण निश्चित मज देईं ॥२४॥
देवकी जों परतोनि पाहे । तों सांवळी मूर्ति उभी आहे ।
विस्मयें परम तटस्थ होये । बोले काय देवकी ॥२५॥
कोणाचा रे तूं बाळा । दिसतोसी बरवा वेल्हाळा ।
माझाही कृष्ण सांवळा । तुजयेवढाचि असेल ॥२६॥
हांसोनि बोले जगज्जीवन । माते तोचि मी तुझा नंदन ।
माझेंचि नाम जाण कृष्ण । बरवी खूण ओळखीं ॥२७॥
ऐकतांचि ऐशिया वचना । स्तनीं तात्काळ फुटला पान्हा ।
पोटासीं धरिलें कमलनयना । तें सुख कोणा न वर्णवे ॥२८॥
स्फुंदस्फुंदोनि रडे माया । आडवें घेतलें यादवराया ।
हरिमुखीं स्तन घालूनियां । पयःपान करवीत ॥२९॥
वसुदेव जवळीं येऊन । म्हणे कोणासी करविसी स्तनपान ।
देवकी म्हणे जी माझाचि कृष्ण । पावला हो मजलागीं ॥३०॥
गोकुळीं करितो नाना चरित्रें । तीं ऐकत होतों आपण श्रोत्रें ।
ती आजि राजीवनेत्रें । खरीं करूनि दाविलीं ॥३१॥
मग वसुदेवें आलिंगिलें मुरहरा । नयनीं वाहती विमलांबुधारा ।
बा रे माझिया श्यामसुंदरा । कैसा येथें आलासी ॥३२॥
हरि म्हणे अविद्यामय प्राणी । जे गेले देहबुद्धीनें वेष्टूनी ।
मी न दिसें तयांते नयनीं । भक्त ज्ञानी जाणती ॥३३॥
हरि म्हणे आतां शोक करुं नका । तुमची सत्वर होईल सुटका ।
ऐसें बोलोनि निजजनसखा । गोकुळा गेला सत्वर ॥३४॥
कंससभेसी आला ब्रह्मपुत्र । म्हणे तुज कळला कीं समाचार ।
कृष्ण येऊनि गेला सत्वर । मातापितयांसी भेटोनि ॥३५॥
ऐकोनियां कंस कोपला । दूत बोलाविले ते वेळां ।
वसुदेवदेवकी उभयतांला । धरोनि आणवी सभेसी ॥३६॥
उभीं असती दीनवदन । कंस म्हणे टाका शिरें छेदून ।
त्यांचे पाठीं उग्रसेन । तोही वधून टाकावा ॥३७॥
शस्त्रें घेऊनि लखलखित । भोंवते उभे ठाकले दूत ।
देवकी थरथरां कांपत । धांवा करीत हरीचा ॥३८॥
चाल चाल बा वेगें हरी । कंस आम्हांसी जिवें मारी ।
तुजविण ये अवसरीं । कोण आम्हां रक्षी पां ॥३९॥
आमुच्या ऐशा होती आपदा । काय पाहसी तूं मुकुंदा ।
भक्तकैवारिया गोविंदा । धांव धांव सत्वर ॥४०॥
ते करुणाशब्द ते वेळीं । कृष्णें ऐकिले गोकुळीं ।
खेळतांची बाळांचिये मेळीं । तो वनमाळी काय करी ॥४१॥
मुखांतूनि काढिलें सुदर्शन । मथुरेकडे अवलोकून ।
दिधलें तेव्हां भिरकावून । गुप्तपंथें सत्वर ॥४२॥
चक्र येवोनियां त्वरित । दोघांभोंवतें असे रक्षित ।
जों डोळियाचें पातें लवत । तों शतावर्तनें चक्र करी ॥४३॥
भोंवतें होतें दैत्यचक्र । त्याचा तत्क्षणीं केला संहार ।
झाला एकचि हाहाकार । राशी पडल्या शिरांच्या ॥४४॥
विस्मित पाहे कंसासुर । म्हणे कोण करितो संहार ।
अमर्याद पडले चरण-कर । तुटोनियां वीरांचे ॥४५॥
भयभीत कंस मानसीं । म्हणे ईश्वर रक्षितो यांसी ।
कंस म्हणे वसुदेवासी । बंदिशाळे तुम्हीं जावें ॥४६॥
तुम्हांसी मी कदा न मारीं । निर्भय असावें अंतरीं ।
वसुदेव देवकी झडकरी । जाति जाहलीं बंदिशाळे ॥४७॥
पाठीं असतां भगवंत । कृतांतही करुं न शके घात ।
अपाय तो उपाय होत । विघ्नें निरसती सर्वही ॥४८॥
असो ऐसी करणी करून । निजस्थाना गेलें सुदर्शन ।
भक्तकैवारी नारायण । ब्रीद साच केलें हो ॥४९॥
याउपरी एके दिनीं । हरि खेळतां वृंदावनीं ।
गोरस विकावया गौळणी । मथुराप्रति चालल्या ॥५०॥
तयां मध्यभागीं राधा । जिच्या स्वरूपासी नाहीं मर्यादा ।
जे अत्यंत प्रिय गोविंदा । ते आनंदकंदा न विसरे ॥५१॥
हावभाव राधा दावीत । पैंजण पायीं झणत्कारत ।
खंजरीटनयना विलोकीत । चहूंकडे चपलत्वें ॥५२॥
आकर्ण राधेचे नयन । सोगयाचें शोभे अंजन ।
वदनचंद्र शोभायमान । स्वरूपलावण्य न वर्णवे ॥५३॥
भोंवता गौळणींचा मेळा । त्यांत तळपे राधा चपळा ।
दुरोनि देखोनि सांवळा । वडजाप्रति बोलतसे ॥५४॥
या वृक्षावरी चढोनी । पाहें कोण जाताती गौळणी ।
वडजा तरुवरी ओळंघोनी । हरीप्रति बोलतसे ॥५५॥
मथुरेप्रति जाती नितंबिनी । परी त्यांत एक सुंदर कामिनी । जैसा उडुगणांमाजी निशामणी । तैसीच दुरोनि दिसताहे ॥५६॥
घडोघडी तुजकडे पाहे । तीस हरि तूं धरीं लवलाहें । दान तिजला मागें स्वयें । आतांचि देईं म्हणोनियां ॥५७॥
गडियांसमवेत धांवे वनमाळी । पदरीं राधा दृढ धरिली । नेत्रसंकेतें ती ते वेळीं । खूण जाणवीत हरीतें ॥५८॥
भलतें बोलूं नको आतां । हरि म्हणे आमुचें दान न देतां । कां गे शून्यमार्गें जातां । मज अनंता टाकूनि ॥५९॥
राधा म्हणे मनमोहना । मजसीं लावूं नको तनाना ।
तूं पुढें पुढें शहाणा । बहुत होसील वाटतसे ॥६०॥
उगेचि मध्यें वाट पाडिसी । चाल वेगें रे चावडीसी ।
पुसों मग दिवाणासी । दान मागसीं कैसें तें ॥६१॥
हरि म्हणे नितंबिनी । चावडीची आवडी धरिसी मनीं ।
मी दान घेतल्यावांचूनी । तुजलागीं सोडीना ॥६२॥
राधा म्हणे आतां दान घेसी । हरि म्हणे नाचतचि देसी ।
नाहीं तरी चाल कुंजवनासी । आडमार्गासी सांडोनियां ॥६३॥
राधा म्हणे जगज्जीवना । बहु बरळे तुझी रसना ।
परी तुज ठकवूनि मनमोहना । जाईन आतां येथूनियां ॥६४॥
हरि म्हणे गळीं गुंतला मीन । तो जाईल मग कोठून ।
राधा म्हणे हें वर्तमान । कंसालागीं जरी कळे ॥६५॥
मग तुज नांदावया गोकुळीं । ठाव नुरेचि वनमाळी ।
तूं बहुत करितोसी कळी । परी हें बरवें नव्हेचि ॥६६॥
हरि म्हणे कंसालागून । क्षणमात्रें मीच मारीन ।
चाणूर मुष्टिक आपटीन । एक पळ न लागतां ॥६७॥
इतुकें आम्हीं केलियावरी । तूंच आमुची होय नोवरी ।
ऐसें बोलतां श्रीहरी । इतर सुंदरी हांसती ॥६८॥
राधा म्हणे तुझा पुरुषार्थ । मज ठाउका आहे समस्त ।
तुज बायकांनीं निश्चित । धरोनि बांधिला उखळासी ॥६९॥
तुवां कांखेसी घोंगडी घेऊनी । गाई चाराव्या वृंदावनीं।
पांवा वाजवीं मधुरध्वनी । हमामा घालीं गोवळ्यांसीं ॥७०॥
तुवां काय वधावा कंस । ऐकतां क्रोध आला पेंधियास ।
राधेसी म्हणे कृष्ण परमपुरुष । याचा महिमा नेणसी तूं ॥७१॥
हे शेषनारायण दोघेजण । अवतरले देवकार्यालागून ।
हें पूर्णब्रह्म सनातन । तुज महिमान नेणवे ॥७२॥
पूतना आणि शकट केशी । तृणावर्त-अघ-बकांसी ।
कालिया मर्दिला यमुनेसी । तो तुवां नेत्रीं देखिला ॥७३॥
द्वादश गांवें गिळिला अग्न । केलें गोवर्धनोद्धारण ।
चतुर्मुख सहस्रनयन । आले शरण श्रीरंगा ॥७४॥
नंद बुडाला यमुनाजळीं । घेऊनि आला वनमाळी ।
सर्पमुखींहूनि शक्तिस्थळीं । पिता सोडविला श्रीकृष्णें ॥७५॥
ऐसे अगाध हरीचे गुण । नेणे पंचास्य सहस्रवदन ।
त्या हरीस शब्ददूषण । मूर्खे गौळणी ठेविसी ॥७६॥
तों राधेची सखी चंद्रकळा । हरीसी बोले ते वेळां ।
म्हणे क्षमा करीं गोपाळा । अन्याय आमुचे समस्त ॥७७॥
चोरी करोनियां गोकुळीं । तुझें पोट न भरे वनमाळी ।
तरी मागोनि घेईं आम्हांजवळी । गोरस तुज भक्षावया ॥७८॥
परी आम्हां वाटेसी कां पीडिसी । नसतेंचि दान मागसी ।
सोड जाऊं दे राधेसी । म्हणोनि चरणासी लागली ॥७९॥
राधा म्हणे चंद्रकळे । हा ऐसाच पीडितो भलते वेळे ।
येणें संसारासी घातलें । पाणी माझ्या सर्वस्वें ॥८०॥
हा राखितो माझ्या गाई । त्यालागीं मी न बोलेंचि कांहीं ।
येर्‍हवीं याचे कान ये समयीं । पिळूनि देतें हातींच ॥८१॥
राधेसी म्हणे शेषशायी । म्यां तुझ्या बापाचें खादलें काई ।
आजिपासूनि तुझ्या गाई । न राखें मी सर्वथा ॥८२॥
ऐसें बोलतां गोविंदा । सद्गदित जाहली राधा ।
म्हणे पुराणपुरुषा आनंदकंदा । तुज शरण मी असें ॥८३॥
तूं परमात्मा जगदुद्धार । मायानियंता निर्विकार ।
तूं आमुचा करिसी उद्धार । अवतार धरोनियां ॥८४॥
तूं आमुचा निजप्राण । आम्ही तुझ्या वचनाधीन ।
तुजविण एक क्षण । न गमे आम्हां कदापि ॥८५॥
तूं जगन्मोहन वेधकमूर्ती । क्षण एक जरी न देखों यदुपती ।
तरी नेत्र उन्मळती । वियोगें तुझ्या दयाळा ॥८६॥
तुझें न करितां नामस्मरण । इतर जें प्रपंचभाषण ।
व्यर्थ काय जिह्वा श्रमवून । तुझे गुण न वर्णितां ॥८७॥
देखोनि राधेचा प्रेमा । कृपा आली पुरुषोत्तमा ।
म्हणे तुमचा भावगोरस आम्हां । नित्यकाळ समर्पणें ॥८८॥
मान्य करोनि हरिवचन । गोपी गेल्या मथुरेलागून ।
आठविती श्रीरंगाचे गुण । प्रपंचकारण करितांही ॥८९॥
राधेसमवेत गौळणी । मथुरेमाजी गोरस विकूनी ।
आल्या गोकुळा परतोनी । गात वदनीं हरिलीला ॥९०॥
याउपरी एकदां यमुनातीरीं । गाई चारितां मधुकैटभारी ।
तों गौळियांच्या कुमारी । पूजिती गौरी स्वानंदें ॥९१॥
कृष्णसंग इच्छूनि मनीं । पूजिती देवी कात्यायनी ।
जे सौभाग्यदायक मंगलखाणी । ज्ञानकळा हरीची जे ॥९२॥
ज्ञानकळेसी न भजतां । हरिप्राप्ति नव्हेचि तत्त्वतां ।
यालागीं सुंदरी समस्ता । आचरती व्रत आदरें ॥९३॥
तंव तो काळ हेमंतऋतु । मार्गशीर्ष मास विख्यातु ।
जो आपुलें स्वरूप जगन्नाथु । द्वादश मासांत म्हणवी पैं ॥९४॥
अलंकारांत मुकुट सुंदर । कीं नवग्रहांमाजी दिनकर ।
तैसा मासांमाजी मार्गशिर । हरिस्वरूप जाणिजे ॥९५॥
कीं भोगियांमाजी भूधर । कीं अंडजांमाजी खगेंद्र ।
तैसा मासांमाजी मार्गशिर । हरिस्वरूप जाणिजे ॥९६॥
वृंदारकांमाजी शचीवर । कीं धनाढयांमाजी कुबेर ।
तैसा मासांमाजी मार्गशिर । हरिस्वरूप जाणिजे ॥९७॥
कवींमाजी सत्यवतीकुमर । कीं मानवांत श्रेष्ठ नृपवर ।
तैसा मासांमाजी मार्गशीर । हरिस्वरूप जाणिजे ॥९८॥
या मासांत करितां दान । गो-भू-हिरण्य ब्राह्मणपूजन ।
हरिकीर्तन अन्नसंतर्पण । तेणें नारायण संतोषें ॥९९॥
असो गोपी हविष्यान्न भक्षिती । गोमयलिप्त भूमीसी निजती ।
बहुत नेम चालविती । हरिसुख प्राप्त व्हावया ॥१००॥
अरुणोदयीं स्नान करूनी । सवेंचि उगवतां वासरमणी ।
मग पूजिती कात्यायनी । सिकतामूर्ति करूनियां ॥१०१॥
मनीं धरूनि राजीवनेत्र । जपती देवीपुढें मंत्र ।
तों गोपांमाजी स्मरारिमित्र । खेळत असे स्वानंदें ॥१०२॥
त्यांच्या व्रताचें फळ । पूर्ण करावया घननीळ ।
एकलाचि निघोनि व्रजपाळ । तयांपासीं पातला ॥१०३॥
अवघ्या वस्त्रें ठेवूनि तीरीं । पोहती कृतांत भगिनीनीरीं ।
तों सकळांचीं वस्त्रें पूतनारी । घेऊनि तरूवरी चढियेला ॥१०४॥
कदंबावरी हरि चढतां । एकीनें देखिला अवचितां ।
मग सांगे समस्तां । वस्त्रें नेलीं कीं आमुची हो ॥१०५॥
मग लाजोनियां सकळीं । आकंठ लपती यमुनाजळीं ।
म्हणती कमलपत्राक्षा वनमाळी । लाज घेतली सर्वांची ॥१०६॥
एक गोपी कांपे थरथरां । म्हणे वस्त्रें देईं भुवनसुंदरा ।
तुवां साधिला डाव खरा । एकांत बरा पाहोनि ॥१०७॥
बहुत भला तूं कृष्णनाथा । आमुचीं वस्त्रें देईं आतां ।
बहुत शीत वाजतें अनंता । दांतखिळ्या बैसल्या ॥१०८॥
ऐशा ऊर्ध्ववदनें गोपिका । विनविती सरसिजोद्‌भवजनका ।
हांसतसे निजभक्तसखा । तयांकडे पाहोनियां ॥१०९॥
हरि म्हणे हे सूर्यकन्या । परमपवित्र सर्वमान्या ।
तुम्ही नग्न होऊनि ललना । कैशा आंत संचरलां ॥११०॥
तुम्हीं मंदिरा जावें याउपरी । वस्त्रे आणूनि देईन झडकरी ।
तुमच्या वडिलांसी निर्धारीं । गति तुमच्या सांगेन मी ॥१११॥
त्या एकीकडे एक पाहती । हाव भाव दावूनि हांसती ।
म्हणती येणें तों निश्चिती । निर्वाण मांडिलें साच पैं ॥११२॥
एक म्हणती आम्ही दीन । तूं उदार करीं वस्त्रदान ।
एक म्हणती देऊं प्राण । तुजवरी जाण श्रीरंगा ॥११३॥
पाषाण उचलोन गोपी एक । म्हणे याजवरी फोडीन मस्तक ।
कदंबावरी जगन्नायक । हांसे शब्द ऐकूनियां ॥११४॥
एक बोलती साकांक्षा । वस्त्रें देई वारिजदलाक्षा ।
आत्मयारामा सर्वसाक्षा । कालियाशिक्षाकारका ॥११५॥
एक म्हणती येऊं बाहेरी । चढूं आतां कदंबावरी ।
तुज धरोनि पूतनारी । शिक्षा बरी लावूं पैं ॥११६॥
वस्त्रें जरी न देसी टाकून । तरी तुज नंदयशोदेंची आण ।
एक म्हणती चोरें नागविलें पूर्ण । सांगों चला चावडिये ॥११७॥
एक म्हणती हरि पाहीं । तुज बहुत देऊं दूध दहीं ।
आमुचीं वस्त्रें आतां देईं । भुवनसुंदरा श्रीहरे ॥११८॥
एक म्हणती सुंदरी । गोकुळांत करिसी चोरी ।
गाई चारितां वनांतरीं । येथेंही मुरारी नाडिसी ॥११९॥
तूं वत्सावांचोनि गाई । वनीं दुहितोसी सर्वही ।
तुझा हस्त लागतां पाहीं । पान्हा फुटे तयांतें ॥१२०॥
तुझा हस्त लागतां नारायणा । वांझ्या गाईस फुटे पान्हा ।
विश्वव्यापका मुरमर्दना । जनार्दना वस्त्रें देईं ॥१२१॥
ऐशा नानापरी विनविती । मग काय बोले जगत्पती ।
बाहेर येवोनि शीघ्रगती । यमपितयासी नमावें ॥१२२॥
यमुनेमाजी समस्त । जलक्रीडा तुम्हीं केल्या सत्य ।
त्याचेंचि प्रायश्चित हें त्वरित । तमांतका नमस्कारा ॥१२३॥
लज्जा सांडोनियां निश्चित । सर्वी करावे ऊर्ध्वहस्त ।
तरीच वस्त्रें त्वरित । हाता येतील तुमच्या पैं ॥१२४॥
कदंबातळीं क्षणभरी । नाचा पाहीन डोळेभरी ।
मग हांसती व्रजसुंदरी । कैसी परी करावी ॥१२५॥
एक म्हणे याची गोष्टी । न ऐकतां करील कष्टी ।
ऐशा हांसत ऊर्ध्वदृष्टी । गोपी पाहती हरीकडे ॥१२६॥
मग वृक्षातळीं येऊनि रामा । म्हणती वस्त्रें देईं मेघश्यामा ।
अनंगदहनमनविश्रामा । पूर्णकामासर्वेशा ॥१२७॥
हरी म्हणे ऊर्ध्व हस्त करोनी । आधीं नमस्कारावा वासरमणी ।
मग एक हस्त ठेविती कामनिकेतनीं । नमस्कारिती एक हस्तें ॥१२८॥
हरि म्हणे एका हस्तें । जे नमस्कारिती सद्‌गुरु-देव-संतांतें ।
त्यांचा हस्त छेदावा तेथें । शास्त्राज्ञा ऐसी असे ही ॥१२९॥
एका हस्तें करितां नमस्कार । पुढें पहावे जन्मांतर ।
नचुके सहसा येरझार । हें निर्धार जाणिजे ॥१३०॥
एक हस्त कामसदनीं । एका हस्तें नमितां दिनमणी ।
प्रपंचाकडे चित्त ठेवोनी । लटिका परमार्थ दाविला ॥१३१॥
कामावरी ठेविलें चित्त । तरी दुरी गेला भगवंत ।
यालागीं जोडोनि दोन्ही हस्त । श्रीआदित्य नमस्कारा ॥१३२॥
मग हांसती खंजरीटनयना । हस्तद्वय जोडोनियां जाणा ।
नमस्कारितां सूर्यनारायणा । तोषला राणा वैकुंठींचा ॥१३३॥
मय तयांचीं समस्त वस्त्रें । दिधली नवपंकजनेत्रें ।
भक्तपालकें स्कंदतातमित्रें । नवलीला दाविली ॥१३४॥
गोपी समस्त नेसल्या चीरा । म्हणती जलदवर्णा पीतचीरा ।
आमुचा काम भुवनसुंदरा । संगें तुझ्या शांत करों ॥१३५॥
तुझा होतांचि समागम । हरि आम्ही होऊं निष्काम ।
मग काय बोले आत्माराम । सकळकामातीत जो ॥१३६॥
हरि म्हणे हो शरदृतु । चांदणी यामिनी शोभिवंतु ।
होतां वृंदावनीं मुरलीसंकेतु । यावें तुम्हीं समस्त तेथें ॥१३७॥
होईल तुमच्या व्रताचें फळ । मग कामना पुरती सकळ ।
ऐसें बोलतां वैकुंठपाळ । गोपी गेल्या घरासी ॥१३८॥
हरिविजय दक्षिणसागर । श्रीकृष्ण तेथें रामेश्वर ।
येथींचे यात्रे भाविक नर । अत्यादरें धांवती ॥१३९॥
करूनि आवडीच्या कावडी । या रामेश्वरीं येतीं भाविक कापडी ।
क्षणिक आयुष्य जाणोनि तांतडी । आडाआडी पावले ॥१४०॥
प्रेम हेंचि जाह्नवीनीर । प्रीतीं अभिषेकिला रामेश्वर ।
ते तरले संसारसागर । सत्य साचार जाणिजे ॥१४१॥
ब्रह्मानंदस्वामी यतीश्वर । त्याच्या पायींच्या पादुकाधर ।
आवडीं जाहलों म्हणे श्रीधर । तरलों साचार तेणेंचि ॥१४२॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
चतुर परिसोत भक्तसंत । पंचदशोऽध्याय गोड हा ॥१४३॥
श्रीकृष्णार्पणमस्तु॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वृंदावनबिहारा, दयासागरा ! तुझ्याच कृपेने मी हे वर्णन करीत आहे. तू निरंजन आहेस. तू अमोज आहेस, तूच सगुणरूप होऊन भक्तांना आनंद देतोस, तूच मला शक्ती दे ! देवकीने पिठोरी अमावास्येचे व्रत केले. माता त्या व्रताचे वाण पुत्राला देत असते. यशोदेने व रोहिणीनेही व्रत केले व कृष्ण-बलरामाला वाणे दिली. पण देवकीचा एकही पुत्र वाण घ्यायला नव्हता. देवकीला व वसुदेवाला वाईट वाटत होते. देवकी श्रीहरीचे नांव घेऊन त्याला हाका मारू लागली. आपण कोणते पाप केले म्हणून आपला बाळ आपल्याला अंतरला असे म्हणू लागली. मी गाईवासरांची ताटातूट केली की हरिकीर्तनात विघ्न आणले, की ऋषींचा अपमान केला ? गुरूंचा किंवा आईवडिलांचा अपमान केला की काय ? असे कळवळून विचारू लागली !

तिकडे देवकीची हाक वृंदावनात कृष्णाला मनोमन ऐकू आली. तो सूक्ष्म रूपाने मथुरेत देवकीच्या मागे जाऊन उभा राहिला. देवकी म्हणत होती- "जिथे माझा पुत्र असेल तिथे त्याला हे वाण मिळो" तिने समोरच वाण ठेवले होते. ती म्हणाली- "कोणी अतिथी आला आहे का ?" तेव्हा कृष्णाने मागे प्रकटरूप धारण करून म्हटले- "मी अतिथी आलो आहे, जो जीवशिव, पिंडब्रह्मांड यांच्या पलीकडचा, तोच मी आलो आहे ?"

देवकीने मागे पाहिले. तिला सावळा आठ वर्षे वयाचा मुरलीधर मोरपिसांचा मुकुट घातलेला गोपवेषातील मुलगा दिसला. तो दृष्टीस पडताच देवकीला फार आनंद झाला. ती पहातच राहिली. मग भानावर येऊन तिने विचारले- "तू कोणाचा पुत्र आहेस ? माझा बाळ तुझ्या एवढाच असेल."

कृष्ण म्हणाला- " आई ? मी तुझाच मुलगा आहे. तू ओळखून घे." असे म्हणून तिला कृष्णाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान करून दिले. तिला वात्सल्याने पान्हा फुटला. पटकन तिने त्याला जवळ घेतले व स्तन्य दिले ! हे वाण वेगळेच ! शेषशायी नारायण आता मातेच्या अंकावर स्तन्य सेवीत होता. क्षीरसागरातील दुधाला मातेच्या दुधाची गोडी कशी येणार ?

वसुदेव तेवढ्यात तिथे आला. देवकीला त्याने विचारले- "देवकी ! आज हे काय घडले ? हा मोठा मुलगा कोण ? याला तू पदराखाली कां घेतला आहेस ?" देवकीने कृष्णाची ओळख करून दिली. "गोकुळातले ज्याचे पराक्रम व बाललीला आपण ऐकतो तोच हा कृष्ण ?" वसुदेवाला प्रेमाचे भरते आले. दोघांनी आनंदाश्रूंनी त्याला जणू स्नान घातले. वसुदेवाने विचारले- "कृष्णा, तू एकदम इथे कसा काय आलास ?" कृष्ण म्हणाला- "मला अज्ञानी लोकांनी पाहिले नाही, ओळखले नाही. ज्ञानी भक्तांनाच मी दिसतो. आता यापुढे तुम्ही दुःख करू नका. मी लवकरच तुम्हाला बंदिवासातून मुक्त करीन." त्यांना आश्वासन दिले, संतोष दिला व कृष्ण गुप्त झाला.

पण कृष्ण बंदिवासातील वसुदेव-देवकीला गुप्तपणे भेटून गेला हे वृत्त नारदांनी कंसाला कळविले. कळ लावेच ते, झाले ! कंस चिडला. सेवकांना ओरडला- "त्या देवकीला आणा ! वसुदेवाला आणा ! त्यांचा शिरच्छेद करून टाकतो." सेवक धावले. पण आपल्या आईवडीलांचे रक्षण करण्यासाठी कृष्णाने आपले सुदर्शन त्यांच्या भोवती गरगर फिरत ठेवले. सेवकांना काहीच कत्पना नव्हती. ते वसुदेवाला पकडायला धावले तोच सुदर्शनाने त्यांची डोकी उडाली. त्यांच्या समवेत जे जे आले त्यांच्या ते पाठीस लागले आणि त्यांचेही हात पाय माना चिरल्या गेल्या. कंसाची खात्री झाली की वसुदेवाचे व देवकीचे रक्षण परमेश्वरच करीत आहे. त्याने आपला क्रूर बेत रहित केला. त्या दांपत्याला त्याने पुन्हा बंदिवास दिला. गोकुळात कृष्ण आपल्या लीला आणि पराक्रम करीतच होता.

एकदा राधा सख्यांसह मथुरेला चालली होती. पेंद्याने झाडावर चढून ते पाहिले, कृष्णाला सांगितले. राधेला अडवण्यासाठी कृष्ण पुढे झाला. त्याने रायेचा पदर ओढून तिला थांबविले. राधा थांबली खरी पण तिने रागाने कृष्णाकडे पाहिले. गुप्त गोष्टी इथे बोलू नकोस असाच त्याचा अर्थ होता. पण कृष्ण कसला ऐकतो ? तो म्हणाला- " आमचे दान आम्हाला देऊन मग तू मथुरेला जा ! राधा बघेना. "तुझे रे कसले दान ?" तिने विचारले. कृष्ण म्हणाला- 'गोरस ! तो न देता लपून छपून का जाता ?' राधा म्हणाली- "कृष्णा, फार फाजील झाला आहेस ! शहाणाच आहेस. बळजोरीने गोरस मागतोस-- ते कसले दान ? तुला कोतवालाकडे नेते चल. तो तुझा चांगला समाचार घेईल."

कृष्ण म्हणाला- 'मला लोकांशी काय करायचे आहे. हा तुझा माझा प्रश्न आहे. तू स्त्री आहेस. चावडीवर जाऊन काय सांगशील ? तुलाच लोक हसतील.' राधा म्हणाली- 'अगदी याच क्षणी तुला दान हवे का ?' देणे मग दिले तर नाही का चालायचे ?' तेव्हा कृष्ण म्हणाला- "आढेवेढे घेऊ नकोस. मला दान तू तर आनंदाने देशील. इथे देणार नाहीस ? मग माझ्याबरोबर कुंजवनात चल. (भक्तिभावाने हदयकमलात प्रभूला आत्मसमर्पण कर असेच तर कृष्ण सांगत होता) राधा म्हणाली- "फार वल्गना करू नकोस. मी तुला चुकवून जाईन बघ." कृष्ण म्हणाला- "राधे, मासा गळाला लागला की तो सुटतो का ?"

राधा म्हणाली- 'कंसाकडे तुझे गार्‍हाणे नेले तर तो तुला गोकुळात राहूच देणार नाही. तू फार खोड्या काढतोस.' तिचे बोलणे मोठे गूढ होते. कृष्ण म्हणाला- 'हॅ कंस ? त्याला मी एका फटक्यात मारीन. आणि तुला माझी नवरी करीन.'

राधा म्हणाली- "उखळीशी तुला बांधला तेव्हा तुझा पराक्रम कुठे गेला होता ? तू घोंगडी घे, बासरी वाजव आणि गाई वळव ! गवळ्यांजवळ हुतुतू खेळ."

पेंद्याला हे संवाद-अज्ञ राधेने भगवंताशी केलेले मूर्खपणाचे बोलणे वाटले. त्याने राधेला म्हटले- 'राधे कृष्णाला तू गोपाळ समजलीस ? अग तोच भगवान् विष्णू आहे. बलराम हा तर शेषाचा अवतार आहे, तुला ठाऊक नाही ? अग, कृष्णाने किती दैत्यांना मारून टाकले. शंकर, ब्रह्मदेव, इंद्र सर्व देव त्याला शरण आहेत. तू त्याला बोल लावू नकोस. तो तर शब्दांपलीकडचा आहे."

पेंद्याचे हे बोलणे ऐकून राधेची एक सखी चंद्रकला, कृष्णाला म्हणाली- 'जाऊ दे हो कृष्णा ! तुला एवढ्या चोर्‍या करूनही कायमची भूक असेल, तू आमच्या जवळ सरळ माग ना । भूक लागल्ये म्हणून सांग. वाटेवर अडवून धिटाई कशाला करतोस ?"

राधा म्हणाली- चंद्रकले, ह्याला अशीच सवय आहे बघ ! भलत्या वेळी छळतो. माझ्या गाई चारायला नेतो म्हणून त्याच्या खोड्या मी चालवून घेते, पण माझा संसारच याने नीरस केलाय ! याला खरी शिक्षाच करायला हवी !"

कृष्ण म्हणाला- "उपकार नकोत मला. तुझ्या गाई मी आता चारणार नाही ?" त्याचा राग पाहून राधा एकदम त्याच्या पाया पडली. तूच आमचा जीव की प्राण ! तूच मला तारून नेणारा ! यापुढे मी तुझा शब्द मुळीच मोडणार नाही," असे म्हणाली. कृष्ण म्हणाला- ' राधे ! मला गोरस नको, तुमच्या भक्तिभावाचा, प्रेमाचा मी भुकेला आहे. तोच खरा गोरस ?'

कृष्णाने त्यांना जाऊ दिले. राधा, चंद्रकला आणि इतर सख्या मथुरेच्या बाजाराला दूध दही विकायला निघून गेल्या !

श्रोतेहो ! हा संवाद गूढ आहे. जीव आणि भगवंत यांचे नाते त्यात आहे. ज्याला ह्याचे रहस्य कळेल तो हरिमय होऊन जाईल !

पुढे एकदा गोपकुमारींनी कात्यायनीचे व्रत सुरू केले. कृष्ण हाच आपला पती असावा असा त्यांचा हेतू होता. सारवलेल्या भूमीवर निजावे, पवित्र अन्न तेवढेच भक्षण करावे, वाळूची कात्यायनी देवीची मूर्ती करावी, सकाळी तिची पूजा करावी. मंत्रजप करावा, पहाटे उठून यमुना नदीत स्नान करावे - वस्त्रे काढून ठेवून स्नान करावे - असे त्या करीत होत्या. कृष्णाला याचा सुगावा लागला. एक दिवस तो पहाटे उठून यमुनेच्या तीरावर गेला. गोपींची वस्त्रे घेऊन उंच झाडावर जाऊन बसला. गोपकुमारी विवस्त्र स्नान करीत होत्या, पाण्यात डुंबत होत्या. त्यांचे तिकडे लक्षच नव्हते, पण एका मुलीच्या ते लक्षात येऊन तिने इतर जणींशी कानगोष्ट केली. आता कसे काय ! सर्वजणी पाण्यातच राहिल्या. बाहेर येण्याची त्यांना लाज वाटली. कृष्णाकडे पहायच्या नि एकमेकींकडे पहायच्या ! लाजून लाल होत होत्या. थंडीने कुडकुडत होत्या. कृष्णाच्या विनवण्या करू लागल्या - 'कान्हा ! तू आमची वस्त्रे दे ना ! दया कर ?' धाक दाखवून, इतर गोष्टींचे आमिष दाखवून त्याचे मन वळवू लागल्या. पण त्याने म्हटले- 'तुम्ही यमुना नदी अपवित्र केली आहे. हात जोडून सूर्याची क्षमा मागा ! यमुना ही सूर्याची कन्या आहे. गोपींनी गळ्यापर्यंत खोल पाण्यात उभे राहून डोक्यावर हात जोडले आणि सूर्यदेवाची क्षमा मागितली. कृष्ण म्हणाला- "बाहेर येऊन दोन्ही हात जोडा ?' तोपर्यंत सूर्य उगवू लागला होता.

गोपी एका हाताने लज्जा झाकीत बाहेर आल्या. वाळूवर उभ्या राहिल्या. एका हातानेच सूर्याला नमस्कार करू लागल्या. कृष्ण म्हणाला- 'गोपींनो, अर्धे लक्ष देवाकडे आणि अर्थे लक्ष देहाकडे, असे करून कसे चालेल ! लज्जा ही भक्तीत मोठीच अडचण असते ?' गोपींना खरा बोध होऊन त्यांनी दोन्ही हात जोडून सूर्याची प्रार्थना केली, क्षमा मागितली. त्यांची मने पूर्ण निरागस झाली ! त्यांची वस्त्रे कृष्णाने त्यांना दिली व म्हटले- "गोपींनो, निःसंग झाल्यानेच भगवंत प्रसन्न होतो !' गोपी म्हणाल्या- "कृष्णा, आमचे कात्यायनी व्रत..." कृष्ण म्हणाला- "तुमचा इष्ट हेतू मला कळलेलाच आहे. तुमची संसारवासनाच नाहीशी होईल अशा प्रकारे मी तुम्हाबरोबर क्रीडा करीन. पण त्या गोष्टीला अजून अवकाश आहे. गोपी आतुरतेने म्हणाल्या- ' देवा ! केव्हा बरे आमची इच्छा पूर्ण होईल ? "

कृष्ण म्हणाला- शरद् ऋतू येऊं दे. पौर्णिमेची रात्रही येऊ दे. चांदणे किती छान पडलेले असेल ! त्यावेळी मी मुरली वाजवून वृंदावनात तुम्हाला बोलावीन. तुम्ही लगेच आले पाहिजे. देवांनाही हेवा वाटावा असा सुखाचा ठेवा तेव्हा तुम्ही लुटाल. आपण महा रासक्रीडा करू. त्यावेळी तुमच्या सर्व संसार-चिंता व कामना यांतून तुम्ही मुक्त व्हाल ! "आता लवकर घरोघरी जा. घरची माणसे तुमची वाट पहात असतील."

गोपी आनंदाने हृदय उचंबळत असतानाच घरी गेल्या. यमुनाकाठी ठरलेला बेत त्यांनी कित्येक दिवस मनात वागविला.
अध्याय १५ समाप्त-
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP