॥ श्रीधरस्वामीकृत ॥

॥ श्रीहरिविजय ॥

॥ अध्याय चवरावा ॥

अघ, बक, धेनुक केशी, शंखचूड इत्यादींचा वध -


श्रीगणेशाय नमः ॥ जय जय वृंदावनविलासिनी । आदिमाये तूं कुलस्वामिनी ।
सनकादिकांच्या हृदयभुवनीं । तूं भवानी राहसी ॥१॥
काम क्रोध अनिवार । हेचि शुंभ निशुंभ दुष्ट असुर ।
अहंकार हा महिषासुर । करीं संहार तयांचा ॥२॥
ब्रह्मा विष्णु आणि रुद्र । शेष वाचस्पति पुरंदर ।
पुराणें शास्त्रें वेद समग्र । तुझें गोंधळी नाचती ॥३॥
व्यास वाल्मीक वामदेव शुक । प्रह्लाद नारद बली भीष्मादिक ।
हेचि दिवटे प्रकाशक । जनांसी मार्ग दाखविती ॥४॥
तूं कैवल्यपदकनकलतिका । आनंदसरोवरमराळिका ।
ब्रह्मानंदपददायका । निजभक्तांसी सुख देसी तूं ॥५॥
मनमोहने गोकुळवासिनी । दुष्टदैत्यसंहारिणी ।
सांवळे मुरलीधरे जगन्मोहिनी । नंदसदनीं खेळसी तूं ॥६॥
संगें घेऊनि गोपाळ । निरंजनीं घालिसी गोंधळ ।
कंस दैत्य हे बस्त सबळ । बळी घेसी तयांसी ॥७॥
तेचि तूं अंबे भीमातीरीं । समपद समकर समनेत्रीं ।
वाट पाहसी अहोरात्रीं । निजभक्तांची पंढरीये ॥८॥
तेरावा अध्याय संपतां तेथें । रामरूप धरिलें कृष्णनाथें ।
असुरासुर प्रभंजनसुतें । येवोनियां संहारिला ॥९॥
कंस अत्यंत भयेंकरूनी । जें जें पाहों जाय नयनीं ।
पंचभूतें चराचर प्राणी । कृष्णरूप दिसती तया ॥१०॥
हडपी देती विडिये करूनी । कंस पाहे विडा उकलोनी ।
त्यामाजी दिसे चक्रपाणी । हांक फोडोनि विडा टाकी ॥११॥
म्हणे तांबूलांत मेळवूनि कृष्ण । मज दिधला तुवां आणून ।
घेऊं पाहतोसी माझा प्राण । शत्रु पूर्ण जाहलासी ॥१२॥
असो इकडे गोकुळीं । वनासी चालिला वनमाळी ।
भोंवतीं गोपाळांची मंडळीं । नाना वाद्यें वाजविती ॥१३॥
लागतां मुखवायूचें बळ । पांवे वाजती अति रसाळ ।
घुमरी मोहरी मृदंग टाळ । गाती गोपाळ स्वानंदें ॥१४॥
पूर्वीं तप आचरला बहुवस । धन्य धन्य तोचि वंश ।
स्वअधरीं रमाविलास । धरूनि वाजवी सर्वदा ॥१५॥
कमळेहूनि तप मोठें । वेणु आचरला बहुत वाटे ।
तरीच अधरीं धरिला वैकुंठपीठें । सदा तयातें न विसंबे ॥१६॥
हरीच्या गळ्याची वनमाळा । आपादलंबिनी मकरंद आगळा ।
सदासर्वदा पडली गळां । द्वेष उपजला कमलेसी ॥१७॥
म्हणे मी चरणींच राहिलें । इनें आपाद हरीस आवरीलें ।
हें न चुकेचि कदाकाळें । भक्तिबळें बळावली ॥१८॥
हरि धरी नाना अवतार । हे गळ्याची नव्हे दूर ।
इचा किती करावा मत्सर । जाहली प्रियकर कृष्णातें ॥१९॥
पडिली हे न सुटे गळां । मग तिसीं स्नेह वाढवी कमळा ।
गुणगंभीर सांवळां । दोघी सेविती प्रीतीनें ॥२०॥
धन्य तो हातींचा वेत्र । घेवोन हिंडे राजीवनेत्र ।
धन्य ते शिखी साचार । पिच्छें श्रीधर शिरीं वाहे ॥२१॥
असो ऐका मथुरेचें वर्तमान । कंस चिंताक्रांत रात्रंदिन ।
तों अघासुर बोले वचन । म्हणे मी गिळीन शत्रु तुझा ॥२२॥
कंसें गौरविला दुराचार । कानानाप्रति येत अघासुर ।
होऊनि विशाळ अजगर । असंभाव्य पसरला ॥२३॥
शत योजनें लंबायमान । पर्वताकार दिसे दुरून ।
द्वादश गांवें मुख पसरोन । पडिला असे उरग तो ॥२४॥
जैसीं नगशृंगे तीक्ष्ण बहुत । तैसे ओळीनें भ्यासुर दंत ।
गो-गोप आंत प्रवेशत । पर्वतदरी म्हणोनियां ॥२५॥
मागें दुरावला श्रीधर । पुढें गेली गाईंची मोहर ।
नव लक्ष गोपाळ समग्र । मुखामाजी संचरले ॥२६॥
दूरी राहिला गोपाळ । पुढें विघ्न ओढवलें सबळ ।
भक्तवत्सल घननीळ । जाणोनि आंत प्रवेशला ॥२७॥
पूर्वीं कालिया मर्दिला थोर । त्याहूनि विशाळ हा अजगर ।
गोगोपाळांसहित मुरहर । मुखीं त्याच्या प्रवेशला ॥२८॥
प्रवेशले जाणोनि समग्र । जाभाडें मिळवी अघासुर ।
आक्रंदती गाईंचे भार । प्रळय थोर मांडला ॥२९॥
गडी म्हणती नारायणा । आतां रक्षीं आमुच्या प्राणां ।
तुवां पूर्वीं उचलूनि गोवर्धना । भक्तजनां रक्षिलें ॥३०॥
द्वादश गांवें दावाग्न । तुवां गिळिला न लगतां क्षण ।
येथेंही तूंचि रक्षिसि पूर्ण । भरंवसा आहे आम्हांतें ॥३१॥
सिंह सखा जाहला पुरता । मग भय काय काननीं हिंडतां ।
घरीं येवोनि बैसला सविता । कायसी चिंता दीपाची ॥३२॥
ऐसें बोलतां गोपाळ । भक्तवत्सल तो तमाळनीळ ।
कृपेनें द्रवला दयाळ । जाहला विशाळ ते समयीं ॥३३॥
द्वादश-योजनें त्याचें मुख । त्याहून उंच जाहला रमानायक ।
उभाचि अजगर देख । चिरिला तेव्हां गोविंदें ॥३४॥
जैसा शुष्क वेणु कुठारें । एकाचि घायीं उभा चिरे ।
कीं पट फाडितां निकरें । वेळ कांहीं न लगेचि ॥३५॥
तैसा उभाचि फाडिला अघासुर । सोडविले गो-गोपांचें भार ।
गगनांतूनि पुष्पवृष्टी सुरवर । वारंवार करिताती ॥३६॥
अस्तास जातां चंडांश । गोकुळा परतला परमपुरुष ।
नंदादि गौळियां यशोदेस । समाचार कळला हा ॥३७॥
आश्चर्य वाटे सकळांते । म्हणती मनुष्य कोण म्हणे यातें ।
समाचार कळला कंसातें । अघासुर निमाला ॥३८॥
मग पाठविला धेनुकासुर । महाक्रोधी दुराचार ।
ताडवनांत असुर । वृषभ होऊनि बैसला ॥३९॥
तें जाणोनि गोविंद । तिकडे चालविला गोवृंद ।
ताडवनांत मुकुंद । नानाविध खेळ खेळे ॥४०॥
ताड लागले दात बहुत । माजीं धेनुकासुर गर्जत ।
गोप जाहले भयभीत । हरिमुख तेव्हां विलोकिती ॥४१॥
दैत्याचा उत्कर्ष अद्‌भुत । शृंगें उंच जेवीं महापर्वत ।
हांकें निराळ गाजत । मग कृष्णनाथ काय करी ॥४२॥
प्रतापदिनकर घननीळें । धेनुकासुरास पाचारिलें ।
तंव तो शृंगें उभारोनि बळें । हरीवरी धांविन्नला ॥४३॥
महिषासुर आरडत । शक्तीवरी जैसा धांवत ।
कीं हिरण्यकश्यप बळें बहुत । नरहरीवरी कोसळे ॥४४॥
तैसा धेनुकासुर धांविन्नला । श्रीहरीअंगीं मिसळला ।
दोन्ही शृंगें ते वेळां । रमानाथें धरियेलीं ॥४५॥
उलथोनि भूमीवरी पाडिला । सवेंचि सरसावूनि धांवला ।
मग श्रीकृष्णें चरणीं धरिला । भोवंडिला गरगरां ॥४६॥
आफळिला सबळ बळें । गतप्राण जाहला ते वेळे ।
दिव्य सुमनें वर्षले । वृंदारक तेधवां ॥४७॥
ऐसा अद्‌भुत करूनि पुरुषार्थ । गोपांसहित परतला वैकुंठनाथ ।
कंसासी कळला वृत्तांत । धेनुकासूर निमाला ॥४८॥
मग परम प्रतापी केशी असुर । उभा राहिला कंसासमोर ।
म्हणे गोकुळाचा संहार । क्षणमात्रें करीन मी ॥४९॥
माझिया प्रतापापुढें । देव पळती होऊनि बापुडे ।
श्रीकृष्ण-बळिराम केव्हडे । मारावया अशक्य ॥५०॥
मी कोपतां वीर केशी । पळती दिनमणि आणि शशी ।
ऐकतां कंस मानसीं । परम संतोष पावला ॥५१॥
वस्त्रें भूषणें दिधलीं तयासी । गोकुळा चालिला दैत्य केशी ।
अश्वरूप धरूनि वेगेंसीं । घोषप्रदेशीं पातला ॥५२॥
तळवे वाजती तेव्हां सबळ । दणाणिलें उर्वीमंडळ ।
देवीं विमानें सकळ । पळविलीं हो तेधवां ॥५३॥
पर्वताकार सबळ बळी । गोकुळाभोंवते कावे घाली ।
ऐसा कोणी नाहीं बळी । जो दृष्टीं न्याहळी तयातें ॥५४॥
गोकुळीं जाहला हलकल्लोळ । कपाटें लोक देती सकळ ।
म्हणती आतां नुरे गोकुळ । प्रळयकाळ पातला ॥५५॥
सिंहनाद जेंव्हा करी । थरथरे सकळ धरित्री ।
ऐसा कोण आहे क्षेत्री । जो जाऊनि धरी तयातें ॥५६॥
एक हांक झाली गोकुळीं । ऐसें देखोनि वनमाळी ।
अभय दिधलें ते वेळीं । म्हणे चिंता करुं नका ॥५७॥
ऐसें बोलोनि राजीवनयन । मातंगावरी धांवे पंचानन ।
कीं उरगांवरी विष्णुवहन । न सांवरत झेंपावें ॥५८॥
कीं राक्षसांवरी निराळोद्‌भवसुत । धांवे जैसा अकस्मात ।
त्याचि प्रकारें दीननाथ । केशियावरी धांविन्नला ॥५९॥
केशीनें देखिला श्यामसुंदर । कोमलांग नवपंकजनेत्र ।
म्हणे हाचि मुख्य शत्रु साचार । दैत्यसंहार केला यानें ॥६०॥
कृष्णें धांवूनि ते वेळां । अकस्मात चरणीं धरियेला ।
भोंवंडूनि भिरकाविला । येरू सरसावला सवेंचि ॥६१॥
विशाळ मुख पसरिलें । हरीस म्हणे गिळीन सगळें ।
चरणीं धरोनि ते वेळे । पुढती कृष्णें टाकिला ॥६२॥
पर्वताकार सबळ घोडा । क्रोधें कडकडां खाय दाढा ।
अद्‌भुत हरीचा पवाडा । त्रिदश नेत्रीं विलोकिती ॥६३॥
मागुती सरसावूनि धांविन्नला । हरीनें रगडूनि मुंगा पिळिला ।
सव्य हस्त ते वेळां । मुखीं घातला यदुवीरें ॥६४॥
कुक्षीपर्यंत हात । घाली तेव्हां जगन्नाथ ।
जैसा लोहगोळा अतितप्त । तैसा जाळीत अंतरीं ॥६५॥
जिव्हा तयाची पिळोनी । बाहेर काढिली उपटोनी ।
दैत्यें नेत्र वटारुनी । त्यजिला प्राण तेथेंचि ॥६६॥
मुखींहूनि अशुद्धाचा पूर । भडभडां वाहे अनिवार ।
विमानीं आनंदले सुरवर । सुमनें अपार वर्षती ॥६७॥
कळला कंसासी समाचार । प्राणासी मुकला केशी वीर ।
मग धरणीवरी शरीर । कंसें घातलें तेधवां ॥६८॥
जैसा पडलिया घटश्रोत्र । अत्यंत शोक करी दशवक्त्र ।
तैसा व्याकुळ कंसासुर । केशीदैत्याकारणें ॥६९॥
याउपरी एके दिवशीं । गाई चारीत हृषीकेशी ।
कंसें पाठविलें प्रलंबासी । कपटवेषें दुरात्मया ॥७०॥
वृषभवेष धरूनी । गाईंमाजी चरे वनीं ।
परम द्वेषें जळे मनीं । हरीकडे पाहोनियां ॥७१॥
शृंगें उभारुनि ते वेळां । श्रीकृष्णावरी धांविन्नला ।
दैत्य कपटवेषी कळला । श्रीरंगासी तेधवां ॥७२॥
धरूनि दोन्ही शृंगें । भवंडोनि आपटिला श्रीरंगें ।
जैसें पक्व फळ चूर होय वेगें । उर्वीवरी आपटितां ॥७३॥
तैसें चूर जाहलें शरीर । प्राणास मुकला असुर ।
कळला कंसास समाचार । प्रलंब परत्र पावला ॥७४॥
याउपरी एके दिनीं । निरभ्र चांदणें यामिनी ।
बळिराम आणि चक्रपाणी । वसंतवनीं खेळती ॥७५॥
गोपाललनांसमवेत । कालियामर्दन वनीं खेळत ।
तों शंखचूडदैत्य तेथ । आला दुष्ट तेधवां ॥७६॥
महानिर्दय यक्ष पापखाणी । गोवेष धरिला दोघांजणीं ।
गाईंऐशी ध्वनीं । दुरूनि वनीं करिती ते ॥७७॥
ते कुबेराचे सेवक । महाकपटी दुष्ट देख ।
क्षणक्षणां फोडिती हांक । व्रजनायक ऐकतसे ॥७८॥
बळिभद्रासीं म्हणे मुरहर । गाई धरोनि नेतो व्याघ्र ।
तरीच बाहती वारंवार । करुणास्वरें करूनियां ॥७९॥
ऐसें बोलोनि कमलानायकें । गोब्राह्मणप्रतिपाळकें ।
परमपुरुषें भक्ततारकें । ताडवृक्ष उपडिला ॥८०॥
पाठिराखा भूधरअवतार । तेणें उपडिला प्रचंड तरुवर ।
त्वरें धांवले महावीर । गोरक्षणाकारणें ॥८१॥
तों ते दोघे कपटवेषी । पळते जाहले वेगेंसीं ।
राम आणि हृषीकेशी । मनोवेगेंसीं धांवले ॥८२॥
तों ते गोवेष टाकिती । व्याघ्र होवोनि वेगें पळती ।
शेष हरि न सोडिती । पाठलाग तयांचा ॥८३॥
मावकर दोघे जण । व्याघ्रवेषही टाकून ।
महाभ्यासुर रूप धरोन । उभे परतोन ठाकले ॥८४॥
नगमस्तकीं पडे व्रज । तैसे दोघे मावकर ।
तरुघातें केले चूर । क्षणमात्र न लागतां ॥८५॥
दोघांचीं शिरें खुडूनी । घेऊनि चालिले ते क्षणीं ।
विजयी होऊनि राम-चक्रपाणी । पूर्वस्थळा पावले ॥८६॥
त्यावरी आली एकादशी । जे परम प्रियकर भक्तांसी ।
रुक्मांगद सत्त्वराशी । पूर्वी उद्धरला जिचेनी ॥८७॥
हरिस्वरूप एकादशी । नंद व्रतस्थ ते दिवशीं ।
जागरण जाहलें सर्वांसी । सरली निशा सत्वर ॥८८॥
मग दुसरे दिवशीं पाहीं । नंद उठिला अरुणोदयीं ।
यमुनातीरीं ते समयीं । स्नानालागीं पातला ॥८९॥
तो जलपति मुख्य वरुण । त्याचे दूत रक्षिती अनुदिन ।
अकाळीं जळीं रिघती जे जन । त्यांसी धरून नेती ते ॥९०॥
आणि मनांत चिंती वरुण । श्रीकृष्ण हा आदिनारायण ।
कीं अंशरूपें जाहला सगुण । पाहों लीला तयाची ॥९१॥
हरीचा पहावया अंत । रसाधिपति होता टपत ।
तों अरुणोदयीं नंद अकस्मात । यमुनास्नाना पातला ॥९२॥
नंद करितां अघमर्षण । वरुणहेरीं नेला ओढून ।
गेले पाताळास घेऊन । वरुणापाशीं तेधवां ॥९३॥
यावरी गोकुळी काय झाली करणी । उदयाद्रीवरी आला वासरमणी ।
यशोदा वाट पाहे सदनीं । म्हणे गृहधनी न येती कां ॥९४॥
तों हांक गांवांत झाली । नंद बुडाला यमुनाजळीं ।
चोहोंकडोन धांवले गौळी । यशोदा आली लवलाहें ॥९५॥
यमुनातीरीं येऊनी । वक्षःस्थळ पिटी नंदराणी ।
मूर्च्छागत पडली धरणीं । शोकेंकरूनि विव्हळ ॥९६॥
गौळी संचरले जळीं । एक परिसती आंत जळीं ।
एक बुडिया देतीं जळीं । शोध घेती नंदाचा ॥९७॥
यशोदा शोकें देत हांका । म्हणे नंदजी व्रजपालका ।
प्राणप्रिया सुखदायका । कोठें आतां पाहों तुम्हां ॥९८॥
काल अष्टप्रहर एकादशी । नंदजी तुम्हीं निर्वाण उपवासी ।
आजि पारणें करावयासी । कोठें गेलां न कळे तें ॥९९॥
ऐसी माया करितां शोक । जवळी आला वैकुंठपालक ।
जो भक्तवत्सल शोकहारक । मातेप्रति बोलतसे ॥१००॥
शोक न करावा तत्त्वतां । येचि क्षणीं आणीन पिता ।
कृतांतासी शिक्षा लावीन आतां । करणी करितां विपरीत ॥१०१॥
ऐसें बोलोनि तांतडी । यमुनाजीवनीं घातली उडी ।
चतुर्दश लोकांचा कडोविकडी । झाडा घेतला श्रीरंगें ॥१०२॥
पूर्वीं केलें गोवर्धनोद्धारण । द्वादश गांवें गिळला अग्न ।
तो पुरुषार्थ संपूर्ण । मायेनें मनीं आठविला ॥१०३॥
आलिया महासर्प अघासुर । केशिया मारिला कृष्णें साचार ।
नंदासी आणील हा दृढ विचार । मनीं वाटे मायेतें ॥१०४॥
सकळ गोकुळींचे जन येती । कालिंदीतीरीं तटस्थ बैसती ।
कृष्णमायेभोंवत्या मिळती । नितंबिनी गोकुळींच्या ॥१०५॥
म्हणती यमुनेनें घेतली आहुती । लोक कृतांत भगिनी इजप्रती ।
जे म्हणती ते साच वदती । ऐसें बोलती व्रजजन ॥१०६॥
असो इकडे वरुणलोकाप्रती । सत्वर गेला क्षीराब्धिजापती ।
दूत सांगाती रसाधिपती । श्रीकृष्ण पूर्ण कोपला ॥१०७॥
जो पूर्णब्रह्मानंद अखंड । काळाचा हा महाकाळ प्रचंड ।
यासी करील कोण दंड । सर्वात्मया हरीतें ॥१०८॥
क्षणें जाळील ब्रह्मांड । श्रीकृष्ण प्रतापसूर्य प्रचंड ।
जो पूर्णब्रह्मानंद अखंड । करी दंड काळातें ॥१०९॥
भयभीत जाहला वरुण । बाहेर आला धांवोन ।
घातलें श्रीकृष्णासी लोटांगण । म्हणे शरण अनन्य मी ॥११०॥
तूं पूर्णब्रह्म दीननाथ । म्यां नेणोनि पाहिला अंत ।
तूं कृपाळु लक्ष्मीकांत । क्षमा करीं अन्याय हा ॥१११॥
पुराणपुरुषोत्तमा भुवनचालका । तूं अगोचर ब्रह्मादिकां ।
येणें व्याजें गोकुलपालका । दर्शन मज दीधलें ॥११२॥
अर्पूनि सोळाही उपचार । आवडीं पूजिला श्रीकरधर ।
नमस्कार घाली वारंवार । मग यदुवीर बोलत ॥११३॥
अविद्यायोगें भुलोनी । गेलासीं निजस्वरूप विसरोनी ।
आतां देहाभिमान टाकोनी । सदा स्मरणीं राहिजे ॥११४॥
आज्ञा वंदूनि ते वेळां । नंद हरीस आणूनि दिधला ।
वेगें श्रीरंग परतला । येता जाहला गोकुळा ॥११५॥
निशी संपतां उगवे चंडांश । तैसा यमुनाजळांतूनि परमपुरुष ।
नंदासमवेत आला हर्ष । परम जाहला व्रजातें ॥११६॥
परम वेगें धांवली माया । म्हणे हरि प्राणसखया ।
श्रीरंगा माझिया विसांविया । काय होऊं उतराई ॥११७॥
हरि हें शरीर ओंवाळूनी । कुरवंडी करीन तुजवरोनी ।
बहुतां संकटीं रक्षिलें चक्रपाणी । काय म्हणोनि आठवूं ॥११८॥
असो नंदासी भेटले गौळी । प्रेमें आलिंगिला वनमाळी ।
वाद्यें वाजूं लागलीं ते वेळीं । वेगें आले मंदिरा ॥११९॥
नंदें उत्साह केला थोर । भूसुरां दिधलीं वस्त्रें अलंकार ।
आनंदलें गोकुळ समग्र । रमावरप्रसादें ॥१२०॥
सांगातें घेऊनि जगदानंदकंद । भोजनविधि सारी नंद ।
ते समयींचा ब्रह्म नंद । कवण वर्णूं शके पैं ॥१२१॥
याउपरी एके दिवसीं । नंद निघे शक्तिवनासी ।
देवीची यात्रा ते दिवसीं । सर्व व्रजवासी निघाले ॥१२२॥
यशोदेसहित गौळणी । दहीं दूध घृत लोणी ।
यांचे गाडे भरोनी । तेच क्षणीं निघाले ॥१२३॥
षड्रस अन्नें सुंदर । त्यांचेही शकट भरल समग्र ।
यात्रा चालली अपार । वाद्यगजर होतसे ॥१२४॥
मनोहर शक्तिवन । जेथें विश्राम पावे शक्राचें मन ।
वृक्ष भेदीत गेले गगन । न दिसे किरण सूर्याचें ॥१२५॥
आम्र कदंब औदुंबर । केळी नारळी अंजिर ।
पोफळी डाळिंबी कृष्णागर । मलयागर चंदन ॥१२६॥
चांफे मोगरे कंचन । जाई जुई रातांजन ।
बकुळ शतपत्रकमलें पूर्ण । विकासलीं साजिरीं ॥१२७॥
असो ऐशा वनीं शक्ती । सकळ जन तेव्हां पूजिती ।
लोकीं ते दिवसीं केली वस्ती । तेचि स्थळीं प्रीतीनें ॥१२८॥
रजनी दोन प्रहर जाहली । निद्रार्णवीं अवघीं बुडालीं ।
तों महासर्प ते वेळीं । नंदाजवळी पातला ॥१२९॥
कमलापति ते वेळां । यशोदेपुढें पहुडला ।
तंव तो अजगर धांविन्नला । गिळों लागला नंदातें ॥१३०॥
नंद आक्रोशें हांका फोडीत । म्हणे धांवा धांवा रे समस्त ।
सर्पें गिळिलें कंठपर्यंत । कृष्णनाथ दावा मज ॥१३१॥
अट्टहासें नंद आरडत । कैवारिया हरि धांवें म्हणत ।
तों गौळी धांवले समस्त । जळत भितळे घेवोनियां ॥१३२॥
धबधबां घालिती उचलोन । परी न सोडीच सर्प दारुण ।
मग नंद बोले वचन । कृष्णवदन दावा मज ॥१३३॥
माझे जाताती प्राण । अंतकाळीं दावा मनमोहन ।
ऐसें जाणोनि रमाजीवन । न लागतां क्षण धांविन्नला ॥१३४॥
नंदें देखिला कैंवल्यदानी । म्हणे सोडवीं या काळापासोनी ।
हरि पदघातें हाणीं ते क्षणीं । परी न सोडीच सर्प तो ॥१३५॥
मग उभाचि सर्प चिरिला । पिता तत्काळ सोडविला ।
कृपाकटाक्षें अवलोकिला । शुद्ध जाहला सर्वांगें ॥१३६॥
ज्याचें नाम घेतां पतित । भवसर्पाचें विष उतरत ।
त्याच्या कृपावलोकनें तेथ । सर्पविष तें केवढें ॥१३७॥
असो सर्पदेहामधूनी । दिव्य पुरुष तेचि क्षणीं ।
निघाला श्रीरंगाचे चरणीं । अनन्यभावें लागला ॥१३८॥
उभा राहिला जोडोनि कर । म्हणे मी सुदर्शन नामें विद्याधर ।
मी गर्वें माजलों अपार । याहीं आपपर ओळखिले ॥१३९॥
स्त्रियांशीं मी जलक्रीडा खेळत । परम विषयांध उन्मत्त ।
तों ऋषींचीं मांदी अकस्मात । त्याचि पंथें पातली ॥१४०॥
त्यांसी केला नाहीं नमस्कार । स्वमुखें निंदिले समग्र ।
मग ते कोपले ऋषीश्वर । शाप दिधला तेधवां ॥१४१॥
म्हणती दुष्टा तूं उन्मत्त । सर्प होवोनि पडें वनांत ।
मग मी झालों भयभीत । केला प्रणिपात सर्वांतें ॥१४२॥
उभा ठाकलों बद्धांजली । मज उश्श्याप दीजे सकळीं ।
मग तिंहीं कृपा केली । अमृतवचन बोलिले ॥१४३॥
तिंहीं सांगितलें मजलागोनी । श्रीकृष्ण येईल शक्तिवनीं ।
त्याच्या चरणस्पर्शेंकरूनी । मुक्त होसील तत्काळ ॥१४४॥
तें आजिच्या दिनीं सत्य जाहलें । माझें पूर्वपुण्य फळासी आलें ।
म्हणोनि श्रीपतीचीं पाउलें । प्रेमें धरिलीं विद्याधरें ॥१४५॥
वंदोनि पूतनाप्राणहरणा । सुदर्शन गेला निजस्थाना ।
गौळी वाजविती वाद्यें नाना । निजसदना परतले ॥१४६॥
हरि आला निजसदनीं । निंबलोण करी जननी ।
नंद धांविन्नला तेच क्षणीं । म्हणे लागेन चरणीं कृष्णाच्या ॥१४७॥
माया म्हणे तूं आमुचा देव । पडलीं संकटें हरिसी सर्व ।
तूं पूर्णब्रह्म स्वयमेव । आम्हांस आतां समजलें ॥१४८॥
ऐसें बोलतां माता ते । लोळणी घातली कृपानाथें ।
गडबडां लोळत तेथें । रडे सर्वथा समजेना ॥१४९॥
मातापितयांसी म्हणे ऐका । मज सर्वथा देव म्हणों नका ।
म्हणोनि प्रेमळांचा सखा । स्फुंदस्फुंदोनि रडतसे ॥१५०॥
माता म्हणे न म्हणों तुज देव । म्हणोनि आलिंगिला माधव ।
धन्य यशोदेचा भाव । असंभाव्य पुण्य तियेचें ॥१५१॥
हा क्षीरसागरविलासी । लीला दावी निजभक्तांसी ।
न दावी आपल्या थोरवीसी । अपार कर्तृत्व करोनियां ॥१५२॥
अद्‌भुत करून चरित्रांतें । खेळे गोवळ्यासांगातें ।
श्रेष्ठपण ठेविलें परतें । मानवी वेषा धरूनियां ॥१५३॥
यावरी मथुरापुरींत जाण । काय जाहलें वर्तमान ।
अकस्मात ब्रह्मनंदन । कंससभेसी प्रकटला ॥१५४॥
कंसें नारदासी पूजिलें । सकल वर्तमान निवेदिलें ।
येरू म्हणे तुज नाहीं समजलें । वर्तमान पैं एक ॥१५५॥
दोघे पुत्र आणि रोहिणी । वसुदेवें गोकुळीं ठेविलीं चोरूनी ।
ते थोर जाहले नंदसदनीं । कृष्ण आणि बळिभद्र ॥१५६॥
तुझे दैत्य दुर्धर । त्रिदशांत जे अनिवार ।
त्यांचा केला संहार । कृष्णें आणि बळिरामें ॥१५७॥
ऐकतां हें वर्तमान । कंस क्रोधें फिरवी नयन ।
म्हणे वसुदेव-देवकींस मारीन । शस्त्र घेवोनि धांविन्नला ॥१५८॥
आला बंदिशाळेजवळी । मग नारद म्हणे ते वेळीं ।
हीं वृद्धें जरि तुवां वधिलीं । तरी अपकीर्ति लोकांत ॥१५९॥
शोधूनि मारीं राम-कृष्णांसी । हीं दोघें कासया वधिसी ।
ऐसें बोलोनि कंसासी । नारदें त्यासी परतविलें ॥१६०॥
जैसा मंदिरा लावूनि अग्न । आपणचि विझवी धांवून ।
कीं पूरीं दिधलें लोटून । तें आपणचि काढिलें ॥१६१॥
जेणें विष पाजिलें दुर्धर । तोचि करुं धांवे उतार ।
आपणचि पाठविले तस्कर । धावणें काढिलें आपणचि ॥१६२॥
तैसी नारदें लावूनि कळी । सवेंचि दोघें सोडविलीं ।
कंस सभेसी तत्काळीं । येऊनिया बैसला ॥१६३॥
कंस क्रोधें व्याप्त पूर्ण । म्हणे उग्रसेन आणा धरोन ।
चुलता देवक आणून । शृंखळा घाला दोघांतें ॥१६४॥
म्हणे यादव तितुके जीवें मारा । विष्णुभक्तां आधीं धरा ।
गाई ब्राह्मण संहारा । शोधूनियां सत्वर ॥१६५॥
टाका अवघे यज्ञ मोडून । कोणास करुं न द्यावें अनुष्ठान ।
आणा अवघे ऋषी धरून । मी संहारीन निजहस्तें ॥१६६॥
माझे सखे जरासंधादिक । काळयवन माझा आवश्यक ।
शिशुपाळ वक्रदंत देख । बाणासुर भौमासुर ॥१६७॥
गर्जोनि कंस हांक फोडी । म्हणे यादवां करा देशधडी ।
कंसें शस्त्र घेवोनि तांतडीं । उर्वीवरी आपटिलें ॥१६८॥
यादव मथुरा सोडूनी । राहिले गिरिकंदरीं लपोनी ।
ऋषी पळती आश्रम टाकूनी । म्हणती अवनी ठाव देईं ॥१६९॥
वनोवनीं हिंडती कंसदूत । गोब्राह्मणांचा करिती घात ।
असो नारदमुनि त्वरित । गोकुळासी पातला ॥१७०॥
केलें श्रीकृष्णासी नमन । म्हणे लौकरी टाकीं कंस वधून ।
गांजिले गाई आणि ब्राह्मण । करीं सोडवण विश्वेशा ॥१७१॥
दुर्धर दैत्य मारिला केशी । आतां सत्वर वधीं कंसासी ।
ऐसें बोलोनि नारदऋषी । उर्ध्वपंथें पैं गेला ॥१७२॥
असो वनीं खेळतां लक्ष्मीवर । कंसे पाठविला वत्सासुर ।
वत्सवेष धरूनि साचार । गाईंमध्यें चरतसे ॥१७३॥
गाई विलोकितां सर्वेश्वर । त्यांमाजी चरे वत्सासुर ।
पायीं धरोनि सत्वर । आपटोनियां मारिला ॥१७४॥
तांदुळांमाजी हरळ । डोळस निवडी तत्काळ ।
कीं सुवर्णामाजी पितळ । निवडे जैसें वेगळें ॥१७५॥
कीं रत्‍नांमाजी गार । कीं पंडितांमाजी पामर ।
कीं विप्रांमाजी महार । आपोआप निवडे पैं ॥१७६॥
कीं साधूंमाजी निंदक कुटिल । की चंदनामाजी बाभुळ ।
कीं कर्पूरामाजी ढेंकुळ । आपणचि निवडे पैं ॥१७७॥
तैसें चतुरें श्रीकरधरें । दैत्य निवडूनि मारिला स्वकरे ।
जैसा सुरपंक्तींत राहु त्वरें । निवडोनि वधी मोहिनी ॥१७८॥
असो एके दिवसीं घननीळ । गवळी मिळाले सकळ ।
त्यांसी म्हणे गोकुळ । ओस करा पैं आतां ॥१७९॥
कंस बहुत विघ्नें करी । दैत्य धाडितो गोकुळावरी ।
वृंदावनीं सहपरिवारीं जाऊनियां रहावें ।१८०॥
मनांत इच्छी श्रीवर । वृंदावनी दैत्य दुर्धर ।
येणें मिषें समग्र । वधोनियां टाकावे ॥१८१॥
यालागीं गौळियां सांगे श्रीपती । परी गौळी कदा न निघती ।
न सुटे गृहाची गृहगती । मग यदुपति काय करी ॥१८२॥
बळिराम आणि जगज्जीवन । बोलती स्वर्गींचें गीर्वाण ।
भोंवते ऐकती गौळीजन । परी कोणा न कळे तें ॥१८३॥
संकर्षंणासी म्हणे हरी । कौतुक दावावें क्षणभरी ।
धाक लाविल्याविण निर्धारीं । गोकुळ ओस न करिती ॥१८४॥
गोकुळाबाहेर गेले दोघे जण । संगें बहुत मुलें घेऊन ।
शेष आणि मधुसूदन । कास विंदान मांडिलें ॥१८५॥
आपल्या शिरींचे केंश कुरळ । दोघे हातें तोडिती तत्काळ ।
काननांत विखुरले सकळ । करणी न कळे ब्रह्मादिकां ॥१८६॥
एकैक केंसापासूनि देख । शतांचीं शतें निघाले वृक ।
मुलांसहित यदुनायक । आला गोकुळांत पळोनी ॥१८७॥
म्हणती असंख्य आले वृक । गोकुळ ओस करा सकळिक ।
बिदोबिदीं पळती लोक । एक द्वारें झांकिती ॥१८८॥
कृष्ण बळिराम घरा आले । नंदासी म्हणती विघ्न ओढवलें ।
वृक मागुती कानना गेले । कृष्णइच्छेंकरूनियां ॥१८९॥
मग नंदादि गौळी मिळोनी । निघते जाहले तेचि क्षणीं ।
गोकुळ ओस टाकूनी । वृंदावनीं राहती सुखें ॥१९०॥
बाडे घालूनि अरण्यांत । परिवारेंसीं राहिले समस्त ।
यमुनातीरीं राम-कृष्णनाथ । गोपांसमवेत खेळती ॥१९१॥
कंसें प्रलंब दैत्य पाठविला । तेणें गोपाळवेष धरिला ।
कृष्णदासांमाजी मिसळला । कापट्य कोणा न कळेचि ॥१९२॥
पूर्वीं समीरात्मजा वधावयालागून । काळनेमि विप्रवेष धरून ।
बैसला त्या प्रकारेंकरून । प्रलंब झाला गोपाळ ॥१९३॥
राम-कृष्ण जाहले भिडती । गडी समान दों ठायीं वांटिती ।
तों डाव परतला निश्चितीं । प्रलंबावरी तेधवां ॥१९४॥
त्यावरी बैसला संकर्षण । चालिला अरण्यांत घेऊन ।
गोप आणि जगज्जीवन । दूर राहिले ते वेळां ॥१९५॥
बळिभद्र पुसे तयासी । अरे तूं कोठें मज नेतोसी ।
तंव तो कांहींच वचनासी । न बोलेचि सर्वथा ॥१९६॥
नीट चालिला मथुरापंथें । तों वोळखिला रोहिणीसुतें ।
मस्तक त्याचा मुष्टिघातें । बळिभद्रें त्वरेनें फोडिला ॥१९७॥
तंव तो होऊनि विशाळ दैत्य । गतप्राण झाला पडिलें प्रेत ।
हरीपासीं बळिराम येत । झाला वृत्तांत सांगितला ॥१९८॥
कंसासी कळला वृत्तांत । प्रलंब दैत्य पावला मृत्य ।
मनामाजी भयभीत । परम होत तो दुरात्मा ॥१९९॥
दुःखें विव्हळ जाहला थोर । तंव तो बोलिला बकासुर ।
म्हणे मी मारीन साचार । राया शत्रु तुझे पैं ॥२००॥
ऐसें ऐकोनि बकासुर । पाठविला परम नष्ट अनिवार ।
तो बक होऊनि पर्वताकार । मित्रजातीरीं बैसला ॥२०१॥
बकें धरिलें बकध्यान। इच्छित कृष्णाचें आगमन ।
रात्रंदिवस चिंतन । हरीवांचून तया नाहीं ॥२०२॥
जलप्राशना आले गोपाळ । तों पर्वताकार बैसला सबळ ।
गोप भ्याले तत्काळ । गेले हरीस सांगावया ॥२०३॥
कृष्णासी सांगती ते वेळीं । एक पक्षी आला महाबळी ।
आम्ही देखोनि तत्काळीं । भिवोनियां पळालों ॥२०४॥
गडियांसहित सांवळा । बक पहावया धांविन्नला ।
तंव तो बैसलासे बगळा । वाटे न जाय कोणाच्या ॥२०५॥
जैसा वैरियाचा आदर । वरिवरीच अवघा उपचार ।
तैसी क्षमा धरूनि असुर । उगाच तीरीं बैसला ॥२०६॥
कृष्ण जवळी येतांचि दुष्टें । असंभाव्य पसरिलीं चंचुपुटें ।
उचलोनि कृष्ण गिळिला नेटें । क्षणमात्र न लागतां ॥२०७॥
बकें गिळिला घननीळ । भोंवतें आकांत करिती गोपाळ ।
एक पिटिती वक्षःस्थळ । प्रळयकाळ ओढवला ॥२०८॥
म्हणती विसांविया हृषीकेशी । काय सांगावें तुझे मातेसी ।
कां उपेक्षिलें आम्हांसी । परम वेधका गोंविंदा ॥२०९॥
बकासुरें गिळिला सांवळा । परीं अंतरीं जाळी ते वेळां ।
जैशा प्रळयाग्नीच्या ज्वाळा । पोळे गळा त्याच रीतीं ॥२१०॥
जैसा लोहगोळा तप्त आरक्त । जिकडे तिकडे जाळीत ।
तैसें बकासुरासी होत । उगळोनि टाकीत कृष्णातें ॥२११॥
बाहेर येतांचि मुरारी । आपुलें सामर्थ्य प्रकट करी ।
दोनी चंचुपटें ते अवसरीं । धरी स्वकरीं कमलावर ॥२१२॥
परम बळी यादवेंद्र । उभाच चिरिला बकासुर ।
त्रिविष्टप वर्षती सुमनभार । विजयी श्रीधर सर्वदा ॥२१३॥
कंसासी समाचार कळला । सवेंचि अरिष्टासुर पाठविला ।
तो शक्तिरूपें धांवला । विशाळ मुख पसरूनियां ॥२१४॥
भयभीत गोपाळ होती । हरीस म्हणती आली महाशक्ती ।
गोप चळचळां कांपती । मग यदुपति काय करी ॥२१५॥
अवलोकितां ऊर्ध्वपंथे । महाशक्ति प्रकटली तेथें ।
ती योगमाया जगन्नाथें । आपुलें अंगींची प्रकटविली ॥२१६॥
जे ब्रह्मादिकां न ये ठाया । पूर्वीं कंस गेला आपटावया ।
तंव ते गेली निसटोनियां । हे योगमाया हरीची ॥२१७॥
त्या महामायेनें तेंचि क्षणीं । कपटशक्ति गिळिली मुख पसरोनी ।
मागुती गुप्त झाली गगनीं । कृष्णइच्छेंकरूनियां ॥२१८॥
गडी कौतुक पहाती । म्हणती अगाध माया तुझी श्रीपती ।
तूं पाठिराखा निश्चितीं । भय कल्पांतीं नाहीं आम्हां ॥२१९॥
कागासुर म्हणे कंसातें । मज मृत्यु वीरभद्राचे हस्तें ।
तो कासया येईल येथें । मी कृष्णातें मारीन ॥२२०॥
कागासुर निघाला वेगें । दुरूनियां देखिला श्रीरंगें ।
कोण त्याचा मृत्यु भक्तभवभंगें । अंतरीं तेव्हां अवलोकिला ॥२२१॥
करितां वीरभद्राचें स्मरण । अकस्मात प्रकटला येऊन ।
करूनि श्रीहरीसी नमन । दैत्यावरी धांविन्नला ॥२२२॥
कागासुराचें शिरकमळ । वीरभद्रें छेदिलें तत्काळ ।
कृष्णासी स्तवोनि निराळ- । मार्गें गेला तेधवां ।२२३॥
खरासुर खररूप धरूनी । भुंकत हिंडे काननीं ।
कृष्णें तो पायीं धरोनी । आपटिला क्षणार्धें ॥२२४॥
तोही झाला गतप्राण । तों खगासुर आला धांवोन ।
जैसा पतंग देखोनि अग्न । उडी घाली प्राणांतीं ॥२२५॥
पसरोनियां विशाळ मुख । धांवे जगन्नाथासन्मुख ।
कृष्णें आपटोनि तो निःशंक । मृत्युपुरासी पाठविला ॥२२६॥
विठ्यासुर त्यापाठीं । धांवत आला उठाउठीं ।
मायालाघवी जगजेठी । धांवे पुढें तेधवां ॥२२७॥
उभा चिरिला विठ्यासुर । तोही पाहूं गेला मृत्युनगर ।
केला सर्व दैत्यांचा संहार । कंसासुर चडफडी ॥२२८॥
स्वहस्तें पिती वक्षःस्थळ । म्हणे राज्य बुडालें सकळ ।
भरंवशाचे वीर सबळ । गेले टाकूनि मजलागीं ॥२२९॥
म्हणे माझे दृष्टी पडता वैरी । तरी मी त्यासी वधितों क्षणाभीतरी ।
मग बुद्धि एक अंतरीं । आठविली असुरेंद्रें ॥२३०॥
घागरी आणि कोहळे । कंसें गोकुळा पाठविले ।
घटांमाजी कूष्मांड सगळे । घालोनियां पाठवावे ॥२३१॥
आणि सिकतेचे वेंट वळूनि हातें । तेही पाठवा त्याचे सांगातें ।
हें जरी कोडें नुगवे तुम्हांतें । तरी रामकृष्णांतें धाडिजे ॥२३२॥
नाहीं तरी गोकुळ सकळ । निर्दाळीन मी कंस काळ ।
म्हणोनि दोघे दैत्य सबळ । पाठविले व्रजातें ॥२३३॥
दूत धांविन्नले त्वरित । नंदाजवळी आले अकस्मात ।
म्हणती तुम्हांवरी कोपलासे मथुरानाथ । कोडें समस्त उगवा हें ॥२३४॥
तुम्हांस न उगवे जरी ये वेळीं । तरी पाठवावे राम-वनमाळी ।
नाहीं तरी मराल सकळी । कंसहस्तेंकरूनियां ॥२३५॥
तुम्ही गोरस पिऊनि जाहलेती मस्त । परी तुम्हांसी जवळी आला मृत्य ।
गौळी भ्याले समस्त । म्हणती अनर्थ ओढवला ॥२३६॥
गौळी वृंदावनीं राहिले होते । ते पुढती आले गोकुळातें ।
तों हें विघ्न अवचितें । पुढें वाढूनि ठेविलें ॥२३७॥
कंसदूत राहविले ते वेळीं । एकांतीं बैसले सकळ गौळी ।
एक म्हणती लपवा वनमाळी । कोठेंतरी नेऊनियां ॥२३८॥
एक म्हणती राम-कृष्ण बरवे । परराज्यामाजी पळवावे ।
नंदादि गौळी आघवे । चिंताग्नीनें आहाळले ॥२३९॥
वनासी गेले होते राम-वनमाळी । ते परतोनि आले सायंकाळीं ।
तों अधोवदन सकळ गौळी । चिंतार्णवीं बुडाले ॥२४०॥
चिंता आणि चिता । दोन्ही समानचि पाहतां ।
असो ऐसें हरीनें देखतां । नंदाप्रति बोलतसे ॥२४१॥
काय जाहला समाचार । कां चिंताग्रस्त समग्र ।
नंद म्हणे कंस दुराचार । अपाय चिंतितो तुम्हांसी ॥२४२॥
सांगितलें सकळ वर्तमान । गदगदां हांसे जगज्जीवन ।
म्हणे हें कोडें आतांचि उगवीन । उठा भोजन करा तुम्ही ॥२४३॥
मग बोले बळिभद्र । पडल्या आकाशा देऊं धीर ।
तेथें मशक काय कंसासुर । करुं संहार क्षणमात्रें ॥२४४॥
कौतुक केलें गोपाळें । जवळी घेतले घट कोहळे ।
क्षणामात्रें सूक्ष्म केले । घटीं घातले तेचि क्षणीं ॥२४५॥
मागुती आंत जाहले स्थूल । भृधरें वाळू आणिली तत्काळ ।
चपलत्वें वेंटी सबळ । वळोनियां टाकिल्या ॥२४६॥
वाळूचे दोर जे वळिले । घटांभोंवते ते गुंडाळिले ।
नंदादि गौळी तटस्थ जाहले । नवल दाविलें अद्‌भुत ॥२४७॥
तो अघटित घडवी हरी । उदकावरी धरिली धरित्री ।
पंचभूतांसी मैत्री । परस्परें चालवी जो ॥२४८॥
असो कंसदूतांसी नंद बोले । म्हणे कोडें तुमचें उगवलें ।
घेऊनि जा रे वहिलें । कंसालागीं दाखवावया ॥२४९॥
दूत म्हणती तुम्हांतें । बोलाविलें मथुरानाथें ।
तों कोप आला बळिभद्रातें । म्हणे दूतांतें मारीन मी ॥२५०॥
दूत भयभीत जाहले । नंदासी काकुळती आले ।
आम्हांसी सोडवीं ये वेळे । जातों वहिले मथुरेसी ॥२५१॥
कोडें घेवोनियां दूत । गेले मथुरेसी पळत ।
नंदें बळिभद्र केला शांत । म्हणे यांतें न मारावें ॥२५२॥
मोठें अरिष्ट टळलें । व्रजवासी सर्व आनंदले ।
कंसाजवळी दूत आले । कोडें निवडलें सांगती ॥२५३॥
कृष्णें कोहळे घातले घटीं । बळिभद्रें वळिल्या वेंटी ।
ऐकतां कंसाचें पोटीं । भय बहुत संचरलें ॥२५४॥
असो याउपरी एके दिवशीं । उष्णकाळीं हृषीकेशी ।
चंडांश आला माध्यान्हांसी । तृणें वाळलीं समस्त ॥२५५॥
गोवर्धनपर्वताचे शिरीं । गाई चारीत मुरारी ।
कंसें जाणोनि ते अवसरीं । दूत धाडिले सवेग ॥२५६॥
चहूंकडे एकेचि वेळां । पेटविल्या अग्निज्वाळा ।
नव लक्ष गोपाळमेळा । सांपडला हरीसहित पैं ॥२५७॥
नाना द्विजांचिया जाती । आहाळोनि अग्नीमाजी पडती ।
गोपाळ चहूंकडोनि धांवती । मिळाले श्रीपतीभोंवतें ॥२५८॥
अनिवार देखोनि ज्वाळा । गाई धांवती हरीजवळा ।
गोप आक्रंदती ते वेळा । बहु वर्तला प्रलयकाल ॥२५९॥
गोप धांवोनि हरीवरी पडती । निजांगाखालीं कृष्ण झांकिती ।
गाई वरी माना टाकिती । आहाळेल यदुपति म्हणवोनियां ॥२६०॥
आमचे देह जावोत जळोनी । परी वांचो हा चक्रपाणी ।
जवळी जाळीत आला अग्नी । करुणार्णव पाहातसे ॥२६१॥
गोपाळ आक्रोशें रडती । आहा सांपडला कीं श्रीपती ।
मनमोहन वेधकमूर्ती । पुन्हां दृष्टीं पडेना ॥२६२॥
निर्वाणींचे जे कां भक्त । जाणोनियां इंदिराकांत ।
नाभी नाभीं ऐसें म्हणत । नेत्र समस्त झांका रे ॥२६३॥
ऐकतांचि हरीचें वचन । समस्तीं झांकिले तेव्हां नयन ।
विशाळ मुख पसरून । गिळिला अग्नि ते वेळां ॥२६४॥
गोपाळ उघडिती नेत्र । तों जातवेद न दिसे आणुमात्र ।
ब्रह्मानंद झाला थोर । नाचती निर्भर सवंगडे ॥२६५॥
मोहरी पांवे घुमरी । मृदंग वाजती कुसरी ।
गोपाळ गाती नानापरी । हरिलीला अपार ॥२६६॥
वृंदारक सुमनांचा भार । हरीवरी वर्षती अपार ।
झाला एकचि जयजयकार । सुख थोर न वणर्व ॥२६७॥
दव करिती मनीं असोशी । कधीं हरि वधील कंसासी ।
सुखी होतील समस्त ऋषी । चिंता सर्व टाकोनियां ॥२६८॥
असो गोकुळी आला गोपाळ । हर्षभरित गोपी सकळ ।
आरत्या घेऊनि घननीळ । पाहों येती सामोर्‍या ॥२६९॥
श्रीकृष्ण केवळ वासरमणी । देखतां गोपी विकासल्या कमळिणी ।
श्रीकृष्णशशांक देखोनी । गोपी चकोरी जाहल्या ॥२७०॥
कीं घननीळ मेघ केवळ । गोपी चातकी सकळ ।
कीं श्रीकृष्ण सुवास नीलोत्पल । गोपी भ्रमरी वेधल्या ॥२७१॥
हरिविजयग्रंथ क्षेत्र । साहित्यरसें पिकलें अपार ।
नाना दृष्टांत नागर । कणसें हींच सधन पैं ॥२७२॥
हें पीक समस्त लागे हाता । ऐसा उपाय काय आतां ।
तरी आवडीच्या ढोळियां समस्तां । सावध सर्वही बैसावें ॥२७३॥
भक्तीचा पांगोरा वाजवूनी । कुतर्क पांखरें टाका उडवोनी ।
तरीच धान्य समूळींहूनी । हाता लागेल सर्वही ॥२७४॥
ब्रह्मानंद यतिराज । जो ज्ञानार्क तेजःपुंज ।
श्रीधर तयाचें चरणरज । सेवितां सहज संतुष्ट पैं ॥२७५॥
इति श्रीहरिविजयग्रंथ । संमत हरिवंशभागवत ।
संतजन परिसोत पंडित । चतुर्दशोऽध्याय गोड हा ॥२७६॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥


[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतेजनहो, कंसाला कृष्णाची भयंकर भीती वाटू लागली. त्याने एकामागून एक दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठविले. त्यांना कृष्णाने कशी मुक्ती दिली ? मन लावून ऐका बरे ! हे राक्षस, हे दैत्य म्हणजे मनुष्याच्या मनातील दुष्ट विचारच !

कंसाचा अघासुर नावाचा एक मित्र होता. तो कृष्णाला मारण्यासाठी वृंदावनात आला. त्याने एका आडजागी मोठ्या अजगराचे रूप घेऊन आपला जबडा पसरून ठेवला. गाईंना व गोपाळांना ती पर्वताची गुहा आहे असे वाटले. ते सर्वजण आत शिरले. त्यांच्या मागोमाग कृष्णही आत शिरला. तोच अजगराने आपला जबडा मिटून घेतला. सगळे आत कोंडले गेले. गोप गोंधळले व ओरडू लागले. गाई हंबरू लागल्या. कृष्णाला धरून त्या अंधारात घुसमटलेले सारे रडू लागले. अघासुराचे हे कृत्य आहे हे ओळखून कृष्ण एकदम उंच होऊ लागला. त्याने अजगराचे शरीर फाटले. त्याने गाई वासरांना व गोपाळांना बाहेर काढले. अजगर नाहीसा झाला व तेथे अघासुर मरून पडलेला दिसू लागला. सर्व सुखरूप बाहेर पडल्यावर कृष्णाची व बलरामाची स्तुती करू लागले.

कंसाने पाठविलेला धेनुकासुर नावाचा दैत्य मोठ्या बैलाचे रूप घेऊन कृष्णावर वृंदावनात धावून आला. तालवनात गोपाळांबरोबर कृष्ण खेळ खेळत होता. तो रानटी बैल येताच गाई बिथरल्या, वासरे पळाली, गोप भ्यायले, पण कृष्णाने त्या बैलाला चिडवून आव्हान दिले. त्याची दोन्ही शिंगे हातात धरून मान पिरगाळली. पटकन् मागे जाऊन दोन्ही हातात त्याचे दोन्ही पाय धरले व आकाशात भिरकावून दिले. तो कोसळला तो उठलाच नाही. या असुराने देवांना पूर्वी त्रास दिला होता. त्यामुळे तो मरताच देवांनी कृष्णावर सुमनवृष्टी केली.

केशी नांवाचा कंसाचा हस्तक घोड्याचे रूप घेऊन गोकुळात घुसला. गोकुळात त्याने खूप धुमाकूळ घातला. कित्येकांना लाथा मारल्या. त्याच्या तडाख्याने वासरे घायाळ झाली. लोकांनी दारे बंद केली तेव्हा कृष्ण बाहेर पडला. त्या घोड्याच्या अंगावर धावत जाऊन अत्यंत चपळाईने कृष्णाने त्याचे पाय पकडले. त्याला दूर फेकून दिले. पण तो घोडा पुन्हा धावून आला. तेव्हा त्याला पुन्हा फेकले. खिंकाळत घोडा आ वासून कृष्णावर धावून आला तेव्हा कृष्णाने आपला हात घोड्याच्या तोडात घातला आणि पोटापर्यंत आत नेला. त्याचा हात एकदम मोठा व कठीण झाला. घोडा गुदमरला, हातपाय झाडू लागला. कृष्णाने त्याची जीभ ओढून धरली. घोड्याच्या तोंडाला फेस आला. जमिनीवर तो गडबडा लोळू लागला. तरी कृष्णाने त्याच्या घशातील हात काढला नाही. शेवटी घोडा तडफडत मरण पावला, तेव्हा दारे उघडून गोप धावत आले. कृष्णाने आपला हात पुन्हा लहान केला. गोपांनी कृष्णाला डोक्यावर घेऊन नाचविले.

केशीचा वध झाला हे कळल्यावर कंस अत्यंत चिडला. त्याने प्रलंब नावाच्या असुराला कृष्णावर पाठविले. त्यानेही बैलाचे रूप घेतले होते. आणि तो गुरावासरात मिसळून कृष्णाच्याजवळ आला. त्याने कृष्णावर एकदम हल्ला केला. पण कृष्ण तयारच होता. कृष्णाने त्याला शिंगे धरून एकदम उचलले आणि अतिशय वेगाने त्याला भूमीयर आदळले. प्रलंबासुरही मरण पावला.

गोपाळांना आता अशा संकटांची सवयच झाली होती. त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले. कुबेराचे दोन सेवक दुष्ट बुद्धीचे होते. ते गोपाळांना त्रास देण्यासाठी गाईंची रूपे घेऊन आले. वाघाच्या तावडीत गाय सापडली की ज्याप्रमाणे ओरडते त्याप्रमाणे त्यांनी हंबरडे फोडले. कृष्णाने तो आवाज ऐकला. बलरामानेही ऐकला. वाघ आला असेल तर त्याला मारावे म्हणून कृष्णाने ताडाचे झाड उखडून हातात घेतले. त्या गाईपर्यंत ते धावत आले. तोच तेथे त्या यक्षांनी वाघाची रूपे घेतली. रामकृष्णांनी त्यांचा पाठलाग केला. तेव्हा त्यांनी राक्षसांची रूपे घेतली. तोच रामकृष्णांनी त्यांच्या डोक्यात ताडाची झाडे मारून त्यांचा कपाळमोक्ष केला.

आणखी काही दिवसांनी नंद यमुनेत शिरला होता. पुष्कळ वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही. सर्वांना चिंता पडली. यशोदा रडू लागली. नंद बुडून मेला असावा असे सर्वांना वाटले. सारे जण कृष्णाला विनवू लागले, "नंदबाबांचा शोध तूच लावरे !" तेव्हा कृष्ण यमुनानदीत उतरला. तेथून तो पाताल लोकात गेला. तेथे वरुणाचे राज्य होते. वरुणाने नंदाला आग्रहाने स्वतःच्या प्रासादात नेले होते. त्याचा आदर सत्कार केला होता. कृष्ण वरुणाला भेटला. वरुणाने त्याचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. "नंदबाबांना असे अचानक का आणलेस ?" असे कृष्णाने वरुणाला विचारले. वरुण म्हणाला, 'देवाधिदेवा, श्रीकृष्ण अवतारातील मनोहर अशा गोपवेषात तुझे दर्शन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती. म्हणून मी कोणालाही न सांगता नंदबाबांना इकडे आणले आहे. त्यांच्या मागोमाग तू येशील असेच मला वाटले होते. मला तुझे दर्शन झाले. माझ्या मनासारखे झाले. माझे समाधान झाले ?' कृष्ण म्हणाला, "अरे तेवढ्यासाठी तू इतरांना एवढा त्रास का बरे दिलास ? तू माझे ध्यान केले असतेस तरी मी तुला इष्ट रूपात दर्शन दिले असते !" कृष्ण वरुणावर रागावला नव्हता, पण वरुणाला आपली चूक कळून आली. त्याने कृष्णाची क्षमा मागितली. कृष्णाने त्याला क्षमा केली. नंदाला घेऊन तो यमुनेतून वर आला. त्यावेळी गोपांना जो आनंद झाला त्याचे वर्णन काय करावे ? यशोदेने तर कृष्णाला जवळ घेऊन म्हटले- "कृष्णा, हे तुझे उपकार मी कसे फेडू ?"

पुढे एकदा देवीची यात्रा होती. सर्व गवळी शक्तिवनात जाण्यास निघाले. गोरस, लोणी आणि पूजासामग्री बरोबर घेतली. मुलाबाळांना बरोबर घेतले. देवीची पूजा इत्यादि केली. रात्री वनातच सर्वजण झोपले. तेव्हा तेथे एक मोठा अजगर आला. त्याने नंदाला गिळण्यास सुरुवात केली. नंद ओरडू लागला. गवळी जागे झाले. अजगर नंदाला गिळंकृत करणार हे पाहून सारे एकदम रडू लागले. नंद सतत कृष्णा ! कृष्णा ! मेलो, मेलो ! असे ओरडत होता. कृष्ण जागा झाला. त्याने अजगराचे तोंड दोन्ही हातात धरले आणि त्याला चिरून टाकले. अजगराच्या जबड्यातून नंदाची सुटका केली. तो सर्प निष्प्राण झाला, पण गवळ्यांना त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर पडताना दिसला. त्याने हात जोडून श्रीकृष्णाचे स्तवन केले.

गवळी नंदाच्या सुटकेने आनंदित झाले, पण हे दृश्य पाहून थक्क झाले. तो सुदर्शन नावाचा एक देव होता. यक्ष, किन्नर, विद्याधर, अशा देवयोनी आहेत. तो विद्याधर होता. एकदा तो जलविहार करीत होता. त्यावेळी तेथे एक ऋषि आले, पण सुदर्शनाने त्यांचा सन्मान केला नाही. तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला- 'तू जडमूढ अजगर होऊन पडशील. सुदर्शन फार घाबरला, काकुळतीस आला. त्याने ऋषींची क्षमा मागितली. ऋषी म्हणाले- "पुष्कळ काळाने शक्तिवनात विष्णु गोपालरूपे येईल. तो तुला मुक्त करील." त्याप्रमाणे कृष्णाने आता त्याला मुक्ति दिली. त्या सुदर्शनाने आपली ही पूर्वकथा गवळ्यांना सांगितली. कृष्ण व नंद यांना वंदन केले व तो स्वस्थानी गेला. कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे याची ओळख पटून नंदासह सर्व गवळी त्याची स्तुती करू लागले, पण कृष्णाने सर्वांच्या मनावर पुन्हा मोहिनी घातली. तो आईला म्हणाला- "आई, तू मला तुझा कान्हाच म्हण, मी दुसरा कोणी नाही." तो भगवान विष्णू स्वतःला यशोदेचा पुत्र म्हणवून घेण्यातच धन्यता मानीत होता !

कंसाकडे नारद मुनी गेले. त्यांनी त्याला उघडच सांगितले- 'कंसा, कृष्ण व बलराम हे कोण आहेत ? बलराम हा वसुदेव आणि रोहिणी यांचाच मुलगा. तो शेषाचा अवतार आहे. कृष्ण हा देवकीचा आठवा पुत्र ! तोच तुझा वैरी आहे. तुझ्या दुष्कर्मांचा व पापांचा भार नष्ट करील तर तोच ! तो तुझा काळ आहे काळ ! बालपणांतच तुझ्या किती हस्तकांना त्याने मारले ! पण तू अजून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी काहीच कसे करीत नाहीस ? अरे, जागा हो'

कंस म्हणाला- "त्या देवकीला, वसुदेवाला आणि देवक यालाही मी मारून टाकतो ?"

नारद म्हणाले- "आता त्यांना मारून काय उपयोग ? तुझे नाव मात्र खराब होईल. आणि म्हातार्‍यांना मारण्यात काय पुरुषार्थ ? कृष्ण आणि बलराम लहान आहेत- त्यांचेच भय मनात धर ! आताच त्यांना मारण्याचा उपाय कर."

कंसाला खूप राग आला. कृष्णाने आपले किती दैत्य मारले त्यांचे स्मरण करून त्याने यादवांना त्रास देण्यास सुरुवात केली. नारद अशी कळ लावून गेले की कंसाचे पाप वाढेल आणि कृष्ण त्याचा नाश लवकर करील. कंसाने यज्ञयाग बंद पाडले, ऋषींचे आश्रम उध्वस्त केले. त्यांचे धर्माचरणच बुडविले. तेव्हा मथुरेचे राज्य सोडून यादव दूर जाऊ लागले. गाईंचा व ब्राह्मणांचा छळ होऊ लागला. जरासंध भौमासुर, शिशुपाल, दंतवक्र अशा दुष्ट राजांनी कंसाप्रमाणेच सर्वत्र ब्राह्मण, ऋषी, अबला व सज्जन यांचा छळ आरंभिला. सर्वत्र भीतीचे साम्राज्य पसरले. जरासंधाने नरमेधच चालविला. कित्येक राजे त्याने बंदीत टाकले. मगधाचे साम्राज्य वाढविले. भौमासुराने कित्येक राजकन्या व इतर सुंदर कन्यांना बंदीत ठेवले. सर्व प्रजांचे हाल हाल होऊ लागले.

नारद कृष्णाला भेटायला आले- गुप्तपणे, एकांतात, यमुनेच्या तीरी ! भक्ताने भगवंताला काय सांगितले ? "देवा ! नारायणा ! आता कंसाचा वध करावा. इतर दुष्टांचाही नाश करावा. त्यांचे पापांचे घडे भरत आले आहेत." कृष्णाने त्यांना आश्वासन दिले.

कंसाने वत्सासुर नावाच्या दैन्याला वृंदावनात पाठविले. वत्सासुराने वासराचे रूप घेतले होते. पण त्याचे कपट ओळखून कृष्णाने त्याला मारले.

कृष्ण व बलराम यांनी पुढे विचार केला की गाई चारायला आपण वनात गेलो की जी संकटे येतात त्यामुळे नंदादिकांना फारच चिंता वाटते. त्यापेक्षा आपण गोकुळात न रहाता सर्वांनी वृंदावन व गोवर्धन पर्वत यांच्या आसपासच रहावे. पण त्यांचा हा विचार गवळ्यांना रुचला नाही. त्यांना गोकुळ सोडून जावेसे वाटेना. तेव्हा कृष्णाने त्यांना भीती वाटावी यासाठी एकदा काय केले- गोकुळात हजारो लांडगे फिरत आहेत असे गवळ्यांना दिसले. कृष्णाने ते सारे आपल्या मायेने निर्माण केले होते. लांडग्यांच्या भयाने गवळी बाहेरच पडेनात ! पुष्कळांनी गोठ्यातील गाईंच्या रक्षणासाठी पहारा केला. गवळ्यांनी मग ठरविले- "कृष्णाचे ऐकावे. वृंदावनात रहायला जावे."

कृष्णाने, बलरामाने व नंदाने नंतर व्रजभूमीतील सारी वस्ती उठविली. वृंदावनात त्यांनी वाडे बांधले, गोठे बांधले. नवी वस्ती केली. गाई चारायला आता दूर जायला नको होते. गोकुळातील लांडगे एक दिवस अचानक दिसेनासे झाले. वृंदावनात संकटांची परंपरा चालूच होती.

कंसाने प्रलंब नावाचा एक दैत्य पाठविला. त्याने मायेने गोपाचे रूप घेतले. पण बलरामाने त्याला ओळखले होते. खेळ खेळताना जो गोप हरेल त्याने जिंकणार्‍या गोपाला पाठीवर वाहून ठराविक ठिकाणी न्यायचे असे ठरले होते. तो दैत्य मुद्दाम बलरामाजवळ खेळू लागला आणि हरला. बलरामाला त्याने पाठीवर घेतले आणि झपाट्याने मथुरेच्या मार्गाला नेले. बलरामाने त्याला जरा अंतरापर्यंत जाऊ दिले आणि मग एकच बुक्का असा मारला की त्या दैत्याचे डोके फुटले ! तो स्वतःचे रूप धारण करून मेला !

बक नांवाचा दैत्यही त्याच्या मागोमाग आला. यमुनेच्या तीरी एका मोठ्या बगळ्याचे रूप घेऊन तो एका पायावर उभा राहिला. गोपांना आश्चर्य वाटले. 'कान्हा, कान्हा ! एक मोठा बगळा आलाय बघ' असे म्हणत त्यांनी कृष्णाला तिथे नेले. पण कृष्ण जवळ जाताच बगळ्याने मोठी चोच उघडून कृष्णाला गिळून टाकले. त्यावेळी कृष्णाने अग्नीसारखे दाहक रूप घेतले. बगळ्याने हरीला बाहेर टाकले. बाहेर पडताच कृष्णाने स्वतः प्रचंड रूप घेऊन त्या बगळ्याची चोच पकडून त्याचे दोन तुकडे केले ! बकासुराचाही अंत झाला.

पुढे कावळ्याचे रूप घेऊन एक असुर आला. त्याचा मृत्यू शिवाचा मुख्य गण जो वीरभद्र त्याच्या हातून व्हायचा होता. त्यामुळे कृष्णाने त्याला आवाहन केले व वीरभद्राने त्या कागासुराला ठार मारले. त्या मागोमाग गर्दभाचे रूप घेऊन एक दैत्य आला आणि गोपांना लाथा मारीत उपद्रव देऊ लागला. कृष्णाने त्याला आपडून मारले. विविध पशूंची भयानक रूपे घेऊन येणार्‍या सर्व दैत्यांना कृष्ण बलरामांनी निजधामास पाठविले !

कंसाने आता एक राजकारणी डाव टाकला. नंदाकडे त्याने एक कूट प्रश्न म्हणून काही घागरी व काही कोहळे पाठविले. "हे कोहळे या घागरीत अख्खे घालून घागरी परत पाठवा, आणि ते जर जमत नसेल तर बलराम व कृष्ण यांना मथुरेत पाठवा. त्याप्रमाणे केले नाही तर आम्ही गोकुळाचा व वृंदावनाचा विध्वंस करूं."

कंसाकडून आलेली ही धमकी ! सर्व भयभीत झाले. असे प्रश्न कृष्णच सोडवील असा गोपांचा विश्वास होता. कृष्णाने कोहळे प्रथम लघिमा सिद्धीने लहान केले, आणि घागरीत घातले; मग ते पुन्हा होते तसे मोठे केले. आता आपणही दुसरे कोडे पाठवावे असा विचार करून बलरामाने वाळू आणली व स्वतःच्या मायेने वाळूची दोरी वळली ! अशा दोर्‍या त्याने घागरींभोवती घट्ट आवळून बांधल्या.

दूतांना कृष्णाने घागरीत घातलेले कोहळे घेऊन कंसाकडे पाठविले. घागरींना वाळूच्या दोर्‍या बांधल्या होत्या. जाण्यापूर्वी दूत म्हणाला- "कृष्ण-बलरामांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे" तेव्हा बलराम त्या दूताला मारणारच होता पण कृष्णाने त्याला आवरले.

तो दूत मथुरेत गेला. कृष्णाचा निरोप होता- "आम्ही तुमचे कोडे सोडविले आहे. आता वाळूच्या दोर्‍या सोडवून घ्या." कंसाने अनेकांना दोर्‍या सोडवायला सांगितले, पण ते कोणालाही जमले नाही. कंस संतापला. त्याने गोपांसह कृष्णाला जाळून टाकावे या हेतूने गोवर्धन पर्वताचा परिसर व वृंदावनाभोवतीचे अरण्य याला सगळीकडून आग लावली. पण कृष्णाने कंसाचा दुष्टावा ओळखून सर्व गोपांना डोळे मिटण्यास सांगितले. आणि योगशक्तीने तो भयंकर वणवा पिऊन टाकला; इतकेच नव्हे तर जळलेले वन पुन्हा जसे होते तसे केले. तेव्हा गोपांना फार आनंद झाला. त्यांनी मोठमोठ्याने वाद्ये वाजवून सोहळाच साजरा केला. देवांनी त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला.
अध्याय १४ समाप्त.
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥


GO TOP