श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
एकादशोऽध्यायः


यमुनावर्णनम्

वैशंपायन उवाच
कदाचित् तु तदा कृष्णो विना सङ्‌‌‍कर्षणेन वै ।
चचार तद्वनं रम्यं कामरूपी वराननः ॥ १ ॥
काकपक्षधरः श्रीमाञ्छ्यामः पद्मदलेक्षणः ।
श्रीवत्सेनोरसा युक्तः शशाङ्‌‌‍क इव लक्ष्मणा ॥ २ ॥
साङ्‌‌‍गदेनाग्रहस्तेन पङ्‌‌‍कजोद्भिन्नवक्षसा ।
सुकुमाराभितान्रेण क्रान्तविक्रान्तगामिना ॥ ३ ॥
पीते प्रीतिकरे नॄणां पद्मकिञ्जल्कसप्रभे ।
सूक्ष्मे वसानो वसने ससंध्य इव तोयदः ॥ ४ ॥
वत्सव्यापारयुक्ताभ्यां व्यघ्राभ्यां गण्डरज्जुभिः ।
भुजाभ्यां साधुवृत्ताभ्यां पूजिताभ्यां दिवौकसैः ॥ ५ ॥
सदृशं पुण्डरीकस्य गन्धेन कमलस्य च ।
रराज चास्य तद्बाल्ये रुचिरौष्ठपुटं मुखम् ॥ ६ ॥
शिखाभिस्तस्य मुक्ताभी रराज मुखपङ्‌‌‍कजम् ।
वृतं षट्पदपङ्‌‌‍क्तीभिर्यथा स्यात् पद्ममण्डलम् ॥ ७ ॥
तस्यार्जुनकदम्बाढ्या नीपकन्दलमालिनी ।
रराज माला शिरसि नक्षत्राणां यथ दिवि ॥ ८ ॥
स तया मालया वीरः शुशुभे कण्ठसक्तया ।
मेघमालाम्बुदश्यामो नभस्य इव मूर्तिमान् ॥ ९ ॥
एकेनामलपत्रेण कण्ठसूत्रावलम्बिना ।
रराज बर्हिपत्रेन मन्दमारुतकम्पिना ॥ १० ॥
क्वचिद्‌ गायन् क्वचित् क्रीडंश्चञ्चूर्यंश्च क्वचित् क्वचित् ।
पर्णवाद्यं श्रुतिसुखम् वादयंश्च क्वचिद् वने ॥ ११ ॥
गोपवेणुं सुमधुरं कामात् तमपि वादयन् ।
प्रह्लादनार्थम् च गवां क्वचिद् वनगतो युवा ॥ १२ ॥
गोकुलेऽम्बुधरश्यामश्चचार द्युतिमान् प्रभुः ।
रेमे च तत्र रम्यासु चित्रासु वनराजिषु ॥ १३ ॥
मयूररवघुष्टासु मदनोद्दीपनीषु च ।
मेघनादप्रतिव्यूहेर्नादितासु समन्ततः ॥ १४ ॥
शद्‌वलच्छन्नमार्गासु शिलीन्ध्राभरणासु च ।
कन्दलामलपत्रासु स्रवन्तीषु नवं जलम् ॥ १५ ॥
केसराणां नवैर्गन्धैर्मदनिःश्वसितोपमैः ।
अभीक्ष्णं निःश्वसन्तीषु कामिनीष्विव नित्यशः ॥ १६ ॥
सेव्यमानो नवैर्वातैर्द्रुमसङ्‌‌‍घातनिःसृतैः ।
तासु कृष्णो मुदं लेभे सौम्यासु वनराजिषु ॥ १७ ॥
स कदाचिद् वने तस्मिन् गोभिः सह परिभ्रमन् ।
ददर्श विपुलोदग्रं शाखिनं शाखिनां वरम् ॥ १८ ॥
स्थितं धरण्यां मेघाभं निबिडं दलसञ्चयैः ।
गगनार्धोच्छ्रिताकारं पर्वताभोगधारिणम् ॥ १९ ॥
नीलचित्राङ्‌‌‍गवर्णैश्च सेवितं बहुभिः खगैः ।
फलैः प्रवालैश्च घनैः सेन्द्रचापघनोपमम् ॥ २० ॥
भवनाकारविटपं लतापुष्पसुमण्डितम् ।
विशालमूलावनतं पवनाम्भोदधारिणम् ॥ २१ ॥
आधिपत्यमिवान्येषां तस्य देशस्य शाखिनाम् ।
कुर्वाणं शुभकर्माणं निरावर्षमनातपम् ॥ २२ ॥
न्यग्रोधं पर्वताग्राभं भाण्डीरं नाम नामतः ।
दृष्ट्‍वा तत्र मतिं चक्रे निवासाय ततः प्रभुः ॥ २३ ॥
स तत्र वयसा तुल्यैर्वत्सपालैः सहानघ ।
रेमे वै वासरं कृष्णः पुरा स्वर्गगतो यथा ॥ २४ ॥
तं क्रीडमानं गोपालाः कृष्णं भाण्डीरवासिनम् ।
रमयन्ति स्म बहवो वन्यैः क्रीडनकैस्तदा ॥ २५ ॥
अन्ये स्म परिगायन्ति गोपा मुदितमानसाः ।
गोपालाः कृष्णमेवान्ये गायन्ति स्म रतिप्रियाः ॥ २६ ॥
तेषां स गायतामेव वादयामास वीर्यवान् ।
पर्णवाद्यान्तरे वेणुं तुम्बीवीणां च तत्र ह ॥ २७ ॥
कदाचिच्चारयन्नेव गाः स गोवृषभेक्षणः ।
जगाम यमुनातीरं लतालङ्‌‌‍कृतपादपम् ॥ २८ ॥
तरङ्‌‌‍गापाङ्‌‌‍गकुटिलं वारिस्पर्शमुखानिलाम् ।
तां च पद्मोत्पलवतीं ददर्श यमुनां नदीम् ॥ २९ ॥
सुतीर्थां स्वादुसलिलां ह्रदिनीं वेगगामिनीम् ।
तोयवातोद्यतैर्वेगैरवनामितपादपाम् ॥ ३० ॥
हंसकारण्डवोघुद्ष्टां सारसैश्च विनादिताम् ।
अनर्घमिथुनैश्चैव सेवितां मिथुनेचरैः ॥ ३१ ॥
जलजैः प्राणिभिः कीर्णां जलजैर्भूषितां गुणैः ।
जलजैः कुसुमैश्चित्रां जलजैर्हरितोदकाम् ॥ ३२ ॥
प्रसृतस्रोतचरणां पुलिनश्रोणिमण्डलाम् ।
आवर्तनाभिगम्भीरां पद्मरोमाभिरञ्जिताम् ॥ ३३ ॥
तटच्छेदोदरां कान्तां त्रितरङ्‌‌‍गवलीधराम् ।
फेनप्रहृष्टवदनां प्रसन्नां हंसहासिनीम् ॥ ३४ ॥
रुचिरोत्पलरक्तोष्ठीं नतभ्रूं जलजेक्षणाम् ।
ह्रददीर्घललाटान्तां कान्तां शैवलमूर्धजाम् ॥ ३५ ॥
चक्रवाकस्तनतटीं तीरपार्श्वायताननाम् ।
दीर्घस्रोतायतभुजामाभोगश्रवणायताम् ॥ ३६ ॥
कारण्डवाकुण्डलिनीं श्रीमत्पङ्‌‌‍कजलोचनाम् ।
तटजाभरणोपेतां मीननिर्मलमेखलाम् ॥ ३७ ॥
वारिप्लवप्लवक्षौमां सारसारावनूपुराम् ।
काशचामीकरं वासो वसानां हंसलक्षणाम् ॥ ३८ ॥
भीमनक्रानुलिप्ताङ्‌‌‍गीं कूर्मलक्षणभूषिताम् ।
निपानश्वापदापीडां नृभिः पीनपयोधराम् ॥ ३९ ॥
श्वापदोच्छिष्टसलिलामाश्रमस्थानसङ्‌‌‍कुलाम् ।
तां समुद्रस्य महिषीमीक्षमाणः समन्ततः ॥ ४० ॥
चचार रुचिरं कृष्णो यमुनामुपशोभयन् ।
तां चरन् स नदीं श्रेष्ठां ददर्श ह्रदमुत्तमम् ॥ ४१ ॥
दीर्घं योजनविस्तारं दुस्तरं त्रिदशैरपि ।
गम्भीरमक्षोभ्यजलं निष्कम्पमिव सागरम् ॥ ४२ ॥
तोयजैः श्वापदैस्त्यक्तं शून्यं तोयचरैः खगैः ।
अगाधेनाम्भसा पूर्णं मेघपूर्णमिवाम्बरम् ॥ ४३ ॥
दुःखोपसर्प्यं तीरेषु ससर्पैर्विपुलैर्बिलैः ।
विषारणिभवस्याग्नेर्धूमेन परिवेष्टितम् ॥ ४४ ॥
अभोग्यं तत् पशूनां हि अपेयं च जलार्थिनाम् ।
उपभोगैः परित्यक्तं सुरैस्त्रिषवणार्थिभिः ॥ ४५ ॥
आकाशादप्यसंचार्यं खगैराकाशगोचरैः ।
तृणेष्वपि पतत्स्वप्सु ज्वलन्तमिव तेजसा ॥ ४६ ॥
समन्ताद् योजनं साग्रं देवैरपि दुरासदम् ।
विषानलेन घोरेण ज्वालाप्रज्वलितद्रुमम् ॥ ४७ ॥
व्रजस्योत्तरतस्तस्य क्रोशमात्रे निरामये ।
तं दृष्ट्‍वा चिन्तयामास कृष्णो वै विपुलं ह्रदम् ॥ ४८ ॥
अगाधं द्योतमानं च कस्यायं महतो ह्रदः ।
अस्मिन्स कालियो नाम कालाञ्जनचयोपमः ॥ ४९ ॥
उरगाधिपतिः साक्षाद्ध्रदे वसति दारुणः ।
उत्सृज्य सागरावासं यो मया विदितः पुरा ॥ ५० ॥
भयात् पतगराजस्य सुपर्णस्योरगाशिनः ।
तेनेयं दूषिता सर्वा यमुना सागरङ्‌‌‍गमा ॥ ५१ ॥
भयात् तस्योरगपतेर्नायं देशो निषेव्यते ।
तदिदं दारुणाकारमरण्यं रूढशाद्वलम् ॥ ५२ ॥
सावरोहद्रुमं घोरं कीर्णं नानालताद्रुमैः ।
रक्षितं सर्पराजस्य सचिवैराप्तकारिभिः ॥ ५३ ॥
वनं निर्विषयाकारं विषान्नमिव दुःस्पृशम् ।
तैराप्तकारिभिर्नित्यं सर्वतः परिरक्षितम् ॥ ५४ ॥
शैवालनलिनैश्चापि वृक्षैः क्षुद्रलताकुलैः ।
कर्तव्यमार्गौ भ्राजेते ह्रदस्यास्य तटावुभौ ॥ ५५ ॥
तदस्य सर्पराजस्य कर्तव्यो निग्रहो मया ।
यथेयं सरिदम्भोदा भवेच्छिवजलाशया ॥ ५६ ॥
व्रजोपभोग्या च यथा नागे च दमिते मया ।
सर्वत्र सुखसञ्चारा सर्वतीर्थसुखाश्रया ॥ ५७ ॥
एतदर्थं च वासोऽयं व्रजेऽस्मिन् गोपजन्म च ।
अमीषामुत्पथस्थानां निग्रहार्थं दुरात्मनाम् ॥ ५८ ॥
एनं कदम्बमारुह्य तदेव शिशुलीलया ।
विनिपत्य ह्रदे घोरे दमयिष्यामि कालियम् ॥ ५९ ॥
एवं कृते बाहुवीर्यं लोके ख्यातिं गमिष्यति ॥ ६० ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
यमुनावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥


यमुनावर्णन -

वैशंपायन सांगतात:- एके समयी, रमणीय वदनाचा, कामरूपी श्रीकृष्ण, संकर्षणाला बरोबर घेतल्यावांचून, एकटाच, त्या मनोहर वनामध्यें हिंडत होता. तो श्यामवर्ण कृष्ण काकपक्षांचे योगाने फार रमणीय दिसत होता. त्याचे नेत्र कमलाच्या पाकळ्यांप्रमाणे होते. चंद्राला असें शशलांछन शोभा देतें तद्वत् श्री वत्सचिन्ह त्याचे वक्षःस्थलाला शोभवीत होतें. त्याच्या अग्रहस्तामध्ये बाहुभूषणें असून त्याची कांती फुललेल्या कमळासारखी होती. त्याचे तुरतुर चालणारे पाय सुकुमार असून ताम्रवर्ण होते. त्यानें पद्मकेसरासारखी तेजस्वी पीतवर्णाचीं व लोकांच्या मनास आल्हाद देणारी दोन सूक्ष्म वस्‍त्रे परिधान केली असल्याकारणानें, तो संध्याकाळच्या मेघाप्रमाणें शोभत होता. वासरांची व्यवस्था करण्यांत गुंतलेल्या आपल्या हातांमध्ये त्यानें दंड व रज्जू घेतले होते, त्याच्या भुजा सरळ असून, देवादिक त्याच्या भुजांचे पूजन करीत. त्याचे ओठ अति मनोहर होते, त्याचें तें बालपणचें मुख पुंडरीक कमलाप्रमाणें सुगंधित असून अत्यंत शोभत होतें. भ्रमरांनी युक्त पद्ममंडल ज्याप्रमाणे दिसावे त्याप्रमाणे त्याचे मुखकमल, मोकळे सुटून तोंडावर आलेल्या केंसांमुळे विराजमान दिसत होतें. आकाशांतील नक्षत्रांच्या पंक्तीप्रमाणे त्याचे मस्तकावर, अर्जुन, कदंब, नीप इत्यादि वृक्षांच्या पुष्पांची व पल्लवांची माला अत्यंत रमणीय दिसत होती. कंठांतील त्या माळेच्या योगानें तो वीर मेघराजीनें युक्त असलेल्या मूर्तिमंत श्यामवर्ण भाद्रपद मासासारखा दिसत होता. त्याच्या कंठसूत्रांत बांधलेले एकच निर्मल मोराच्या पिसाऱ्यांतील पान जेव्हां मंद वायूनें हाले तेव्हा ती शोभा मोठी रमणीय दिसे. वनांत गेला असतां कांहीं वेळ तो गायन करी; नंतर धांवे. केव्हां केव्हां तो नानाप्रकारचे खेळ करी. लहर लागली तर कर्णमधुर पर्णवाद्य ( पिपाणी ) वाजवीत बसे. अथवा गाईंना उल्हास वाटावा म्हणून वनांत गेल्यावर तो बालक अत्यंत गोड लागणारी गोपवेणु ( पांवा )वाजवूं लागे. गोकुलांत संचार करणारा, देदीप्यमान व घननीळ प्रभु गोपाल कृष्ण, त्या रम्य व चित्रित असलेल्या वनराजीमध्यें रममाण होऊन जाई. त्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या वनागध्यें मोर टाहो फोडीत होते. मेघगर्जनांच्या प्रतिध्वनीनें तें दुमदुमून गेलें होतें. त्यांतील मार्ग तृणांकुरांनीं आच्छादित झाले होते. भ्रमर हे त्या वनराजींना अलंकाराप्रमाणे शोभवीत होते. त्यांतील पालवी व पाने स्वच्छ दिसत होतीं. त्यांतून नव्या पाण्याचे प्रवाह चालले होते. जिकडे तिकडे परागांचा सुवास सुटलेला होता. केसरांच्या परिमळाला मदनाच्या श्वासांची उपमा देत असतात; म्हणून प्रियविरहामुळें व एकसारख्या निःश्वास सोडणाऱ्या कामिनी स्‍त्रियांप्रमाणें त्या वनराजी दिसत होत्या. गर्द वृक्षांवरून येणाऱ्या नव्या वायूच्या झुळुकी जेव्हां श्रीकृष्णाच्या शरीराला लागल्या तेव्हां वरील गुणांनीं युक्त असलेल्या त्या वनराजींमध्यें त्याला अत्यानंदाचा लाभ झाला.

कोणे एके वेळीं गाईंसहवर्तमान त्या वनामध्यें हिंडत असतां सर्व झाडामध्यें श्रेष्ठ असलेल्या एका वटवृक्षाकडे श्रीकृष्णाची दृष्टि गेली. त्याचा विस्तार फार मोठा होता. त्यावरील पाने अति दाट असल्याकारणाने, तो वृक्ष म्हणजे आकाशांतील एखादा मेघ पृथ्वीवर आला आहे असें वाटे. त्याचा विस्तार पर्वताप्रमाणे प्रचंड असून, तो अर्ध्या गगनांपर्यत जाऊन भिडला होता. नीलादि बहुविध वर्णांचे अनेक पक्षी त्या वृक्षावर बसले होते. त्यावर पुष्कळ फले व दाट पालवी असल्याकारणानें तो इंद्रधनुष्ययुक्त मेघासारखा दिसत होता. त्याच्या फांद्या भल्या मोठ्या घरासारख्या होत्या. फुलें व वेली यांचे योगानें तो शोभिवंत झालेला होता. वायु व मेघ यांना त्याने आधार दिलेला होता. त्या प्रदेशांतील सर्व वृक्षांचा तो राजा होता. तो पुण्यवान् वृक्ष पाऊस व ऊन यांपासून लोकांचे रक्षण करी. तो पर्वताच्या शिखराप्रमाणें दिसत होता. त्याची मुळें खोल गेली असून भाराने तो फार वाकला होता. त्या वृक्षाचे नाव भांडीर असे होतें.

त्या वृक्षाचे स्वरूप अवलोकन करून प्रभूनें तेथें वास करण्याचा निश्चय केला. हे अनघा, त्या वृक्षाच्या समीप, आपल्या बरोबरीच्या गोपाळांसह एक दिवसभर, श्रीकृष्णानें तेथें क्रीडा केली. पूर्वी स्वर्गलोकी असतांना त्यानें अशीच क्रीडा केली होती. त्याच्या सोबत्यांनीं नाना प्रकारचे वनांत खेळावयाचे खेळ काढून, भाण्डीर वृक्षावर वास करून क्रीडा करणाऱ्या श्रीकृष्णाचें मनोरंजन केलें. कांहीं गुरख्यांच्या मुलांनीं मुदित अंतःकरणाने गाणी म्हणण्यास प्रारंभ केला. कित्येक खेळाडू मुले कृष्णाचीच गाणीं गाऊं लागले. त्यांचें गायन चालू असतां पराक्रमी श्रीकृष्ण पर्णवाद्यांतच वेणु व तुंबीवीणा वाजवूं लागला.

एके वेळीं तो वृषभनेत्र कृष्ण गाई चारता चारता, यमुनेच्या कांठीं येऊन पोचला. त्या ठिकाणचे वृक्षांना वेलींनी अलंकृत केलें होतें. तेथून पद्म नामक कमलांनीं युक्त असलेली यमुना नदी त्याचे दृष्टीस पडली. तरंगरूपी कटाक्षांनीं ती वाकडी झालेली होती. तिच्या प्रवाहावरून वहाणारा वायु जलस्पर्शानें युक्त झालेला असल्यामुळें त्यापासून अत्यंत आल्हाद होत होता. त्या नदीला उत्तम घाट बांधला असून वि उदक फार मधुर होतें. तिजमध्ये बरेच डोह असून ती जोराने वहात होती. जलबिंदूंनी आर्द्र झालेल्या वायूच्या जोराने जवळपासचे वृक्ष वांकून गेले होते. यमुनातीरावर हंस, कारंड व सारस हे पक्षी आपले स्वर काढीत होते. नेहमी जोडप्याने असणारे चक्रवाकादि पक्षी तिच्या तीराचा आश्रय करून राहिलेले दृष्टीस पडत होते. जलामध्यें वास करणाऱ्या मत्स्यादि प्राण्यांनी ती युक्त होती. जलामध्यें दृष्टीस पडणाऱ्या शीतलत्वादि गुणांनी यमुनेला भूषविले होतें. पाण्यामध्ये उत्पन्न होणारी पुष्पे यमुनेंतही असल्यामुळे ती चित्रित झाली होती. शेवाळ आल्याकारणानें तिचे उदक क्वचित् हिरवे दिसत होतें.

यमुना नदी ही सर्व अवयवांनीं युक्त असलेली समुद्राची जणुं राज्ञीच होती. कारण, प्रसृत झालेले प्रवाह हे तिचे चरणांचे ठिकाणीं होते. पुलिनरूपी श्रोणिमंडळानें ती युक्त होती. आवर्तरूपी गंभीर नाभी, पद्मरूपी रोम, तटच्छेदरूपी उदर व तरंगरूपी त्रिवली, इत्यादि आरोपित मानवी चिन्हांनीं ती अलंकृत झालेली असून फार सुंदर दिसत होती. फेस हेच त्या प्रसन्न यमुनेचे हंसतमुखाचे ठिकाणी होते. हंसरूपी हास्य, रक्तकमलरूपी ओष्ठ, कमलरूपी, वाकलेल्या भुवयांनी युक्त असलेले नेत्र डोहरूप विशाल ललाट, शैवलरूपी केश, चक्रवाकरूपी स्तन, तीराचा पार्श्वभाग हेंच मुख, दीर्घ जलौघरूपी लांब लांब भुजा तीराच्या पाळी हेच कर्ण, कारंडवरूपी कुंडले, सुंदर कमलें हेच लोचन, तीरावर उगवलेले वृक्षादिक ही आभरणें, मीनरूपी निर्मल मेखला, कमलिनीच्या पांकळ्या ही रेशमी वस्‍त्रे, सुस्वर काढणारे सारसपक्षी हेच नूपुर, काशपुष्परूपी वस्‍त्र, कूर्म व हंस हीच लक्षणें, आणि मनुष्यरूपी पुष्ट स्तन इत्यादि आरोपित मानवी अवयवांनीं व गुणधर्मांनी ती सुंदर यमुनानदी युक्त होती. तिच्यामध्यें भयंकर नक्र रहात असून पाणी पिण्याचे ठिकाणीं येणाऱ्या श्वापदांनीं तिला फार शोभा आलेली होती; पशूंनी तिचे उदक उष्टविलें होतें; तिच्या तीरावर अनेक आश्रम बांधलेले होते. त्या समुद्रपत्‍नी यमुनानदीकडे चोहोंबाजूंनीं नेत्रकटाक्ष फेकीत, श्रीकृष्ण तिच्या तीरातीरानें हिंडू लागला; त्याच्या संचारानें त्या मनोहर ला अधिकच शोभा आली. त्या श्रेष्ठ नदीच्या बाजूने हिंडता हिंडता एक उत्तम डोह त्याच्या नजरेस पडला.

तो डोह एक योजन लांब असून, देवांनाही दुर्लघ्य होता. तो फार खोल होता; त्याचें पाणी केव्हांही क्षुब्ध होत नसे; तो समुद्राप्रमाणें संथ होता. जलचर पशुपक्षी यांची त्या डोहांत मुळींच वसति नव्हती; मेघांनीं भरून टाकलेल्या आकाशाप्रमाणें तो डोह पाण्यानें तुडुंब भरला होता. त्या जलाचा थांग लागणें शक्य नव्हतें; त्याच्या तीरावर सर्पांची मोठमोठी बिळें होतीं, त्यामुळें तेथे फिरकणेंही मुष्किलीचे होतें. सर्पांच्या फूत्कारापासून उत्पन्न झालेल्या अग्नीच्या धुराचे त्या डोहाभोवती वेष्टण पडलेले होतें. त्यांतील जलाचा पशु किंवा इतर तान्हेलेले प्राणी यांना काहीएक उपयोग नव्हता. त्रिकाल स्‍नान करण्याची इच्छा करणाऱ्या देवांनीही तो डोह वर्ज्य केला होता. आकाशमार्गानें संचार करणाऱ्या पक्ष्यांना देखील त्या डोहावरून उंच फिरकण्याची सोय नव्हती. तृण जरी त्या डोहाच्या पाण्यांत पडलें तरी त्याच्या भयंकर आगीने हे त्वरित जळून खाक होई. तो डोह औरस- चौरस एक योजन असून देवांनाही दुर्गम होता; त्यांतील भयंकर विषरूपी अग्नीने तेथील वृक्ष जळत होते. व्रजाच्या उत्तरेस एका कोसावरच तो डोह होता; तो लांबरुंद, अगाध व झगझगीत डोह पाहून कृष्णाच्या मनांत असा विचार आला.

" हा कोणाचा बरें डोह असावा ? यांतच महाभयंकर व अंजनराशीसारखा काळाकुट्ट कालीय नामक सर्पराज राहतो, असे मला वाटते. सर्पाचा नाश करणाऱ्या पक्षिराज गरुडाच्या भयानें समद सोडून तो येथें येऊन राहिल्याचे मला ठाऊक आहे. त्यानेंच या सागराला मिळणाऱ्या यमुना नदीचे पाणी दूषित करून टाकले आहे. या सर्पश्रेष्ठाच्या भीतीनें येथील प्रदेशांत कोणी फिरकत नाहीं. त्यामुळें हें अरण्य जास्तच भयंकर दिसत असून यांत जिकडे तिकडे गवत वाढलें आहे. वटादि नाना प्रकारच्या वृक्षवेलींनी हें घोर वन भरलेलें असून या कालियाचे हितकारी सचिव त्या वनाचे रक्षण करतात. हें अरण्य निर्जन असून, विषान्नाप्रमाणें अस्पृश्य आहे, व कालियाचे संबंधी नित्य त्याचें रक्षण करीत आहेत. या डोहाचे उभय तट, शेवाल, कमलें, झाडेंझुडुपें व वेली यांनीं युक्त असल्यामुळे, त्यांतून जाण्यासाठीं मार्ग अजून करावयाचे आहेत असें वाटतें. या सर्पराजाची मस्ती जिरवून या नदीचे पाणी कल्याणदायक होईल असें मला करणें आहे. कालियाचा निग्रह केल्यावर हा डोह या व्रजाला उपयोगी होऊन, निष्कंटक रीतीनें सर्वांना येथें संचार करण्यास हरकत पडणार नाहीं. या डोहाचे घाटांवर वाटेल त्याला बिनदिक्कत जातां येईल.

कालियासारख्या कुमार्गगामी दुरात्म्यांचे निर्दलन करण्याकरितां मी गोपकुलांत अवतार घेतला असून या ठिकाणीं वास्तव्य करीत आहे. तर आतां या कदंब वृक्षावर चढून, बाललीलेने या भयंकर डोहांत मी उडी मारतो आणि कालियाचें दमन करितो. असें केलें म्हणजे माझा पराक्रम जगतांत प्रसिद्ध होईल.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
यमुनावर्णनं नाम एकादशोऽध्यायः ॥ ११ ॥
अध्याय अकरावा समाप्त

GO TOP