श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व दशमोऽध्यायः
प्रावृड्वर्णनम्
वैशंपायन उवाच
तौ तु वृन्दावनं प्राप्तौ वसुदेवसुतावुभौ ।
चेरतुर्वत्सयूथानि चारयन्तौ सुरूपिणौ ॥ १ ॥
पूर्णस्तु घर्मसमयस्तयोस्तत्र वने सुखम् ।
क्रीडतोः सह गोपालैर्यमुनां चावगाहतोः ॥ २ ॥
ततः प्रावृडनुप्राप्ता मनसः कामदीपिनी ।
प्रववर्षुर्महामेघाः शक्रचापाङ्कितोदराः ॥ ३ ॥
बभूवादर्शनः सूर्यो भूमिश्चादर्शना तृणैः ।
पतता मेघवातेन नवतोयानुकर्षिणा ॥ ४ ॥
संमार्जिततला भूमिर्यौवनस्थेव लक्ष्यते ॥ ५ ॥
न ववर्षावसिक्तानि शक्रगोपकुलानि च ।
नष्टदावाग्निधूमानि वनानि प्रचकाशिरे ॥ ६ ॥
नृत्यव्यापारकालश्च मयूराणां कलापिनाम् ।
मदरक्ताः प्रवृत्ताश्च केकाः पटुरवास्तथा ॥ ७ ॥
नवप्रावृषि कान्तानां षट्पदाहारदायिनाम् ।
यौवनस्थकदम्बानां नवाभ्रैर्भ्राजते वपुः ॥ ८ ॥
हासितं कुटजैर्वृक्षैः कदम्बैर्वासितं वनम् ।
नाशितं जलदैरुष्णं तोषिता वसुधा जलैः ॥ ९ ॥
संतप्ता भास्करकरैरभितप्ता दवाग्निभिः ।
जलैर्बलाहकोत्सृष्टैरुच्छ्वसन्तीव पर्वताः ॥ १० ॥
महावातसमुद्भूतं महामेघगणार्पितम् ।
महीमहाराजपुरैस्तुल्यमापद्यते नभः ॥ ११ ॥
क्वचित्कदम्बहासाढ्यं शिलीन्ध्राभरणं क्वचित् ।
संप्रदीप्तमिवाभाति फुल्लनीपद्रुमं वनम् ॥ १२ ॥
ऐन्द्रेण पयसा सिक्तं मारुतेन च विस्तृतम् ।
पार्थिवं गन्धमाघ्राय लोकः क्षुभितमानसः ॥ १३ ॥
दृप्तसारङ्गनादेन दर्दुरव्याहतेन च ।
नवैश्च शिखिविक्रुष्टैरवकीर्णा वसुन्धरा ॥ १४ ॥
भ्रमत्तूर्णमहावर्ता वर्षप्राप्तमहारयाः ।
हरन्त्यस्तीरजान्वृक्षान्विस्तारं यांति निम्नगाः ॥ १५ ॥
सन्ततासारनिर्यत्नाः क्लिन्नयत्नोत्तरच्छदाः ।
न त्यजन्ति नगाग्राणि श्रान्ता इव पतत्रिणः ॥ १६ ॥
तोयगम्भीरलम्बेषु स्रवत्सु च नदत्सु च ।
उदरेषु नवाभ्राणां मज्जतीव दिवाकरः ॥ १७ ॥
महीरुहैरुत्पतितैः सलिलोत्पीडसङ्कुला ।
अन्विष्यमार्गा वसुधा भाति शाद्वलमालिनी ॥ १८ ॥
वज्रेणेवावरुग्णानां नगानां नगशालिनाम् ।
स्रोतोभिः परिकृत्तानि पतन्ति शिखराण्यधः ॥ १९ ॥
पतता मेघवर्षेण यथा निम्नानुसारिणा ।
पल्वलोत्कीर्णमुक्तेन पूर्यन्ते वनराजयः ॥ २० ॥
हस्तोच्छ्रितमुखा वन्या मेघनादानुसारिणः ।
भ्रान्तातिवृष्ट्या मातङ्गा गां गता इव तोयदाः ॥ २१ ॥
प्रावृट्प्रवृत्तिं संदृश्य दृष्ट्वा चाम्बुधरान् घनान् ।
रौहिणेयो मिथः काले कृष्णं वचनमब्रवीत् ॥ २२ ॥
पश्य कृष्ण घनान् कृष्णान् बलाकोज्ज्वलभूषणान् ।
गगने तव गात्रस्य वर्णचोरान् समुच्छ्रितान् ॥ २३ ॥
तव निद्राकरः कालस्तव गात्रोपमं नभः ।
त्वमिवाज्ञातवसतिं चन्द्रो वसति वार्षिकीम् ॥ २४ ॥
एतन्नीलाम्बुदश्यामं नीलोत्पलदलप्रभम् ।
संप्राप्ते दुर्दिने काले दुर्दिनं भाति वै नभः ॥ २५ ॥
पश्य कृष्ण जलोदग्रैः कृष्णैरुद्ग्रथितैर्घनैः ।
गोवर्धनो यथा रम्यो भाति गोवर्धनो गिरिः ॥ २६ ॥
पतितेनाम्भसा ह्येते समन्तान्मददर्पिताः ।
भ्राजन्ते कृष्णसारङ्गाः काननेषु मुदान्विताः ॥ २७ ॥
एतान्यम्बुप्रहृष्टानि हरितानि मृदूनि च ।
तृणानि शतपत्राक्ष पत्रैर्गूहन्ति मेदिनीम् ॥ २८ ॥
क्षरज्जलानां शैलानां वनानां जलदागमे ।
ससस्यानां च सीमानां न लक्ष्मीर्व्यतिरिच्यते ॥ २९ ॥
शीघ्रवातसमुद्भूताः प्रोषितौत्सुक्यकारिणः ।
दामोदरोद्दामरवाः प्रागल्भ्यं यान्ति तोयदाः ॥ ३० ॥
हरे हर्यश्वचापेन त्रिवर्णेन त्रिविक्रम ।
विबाणज्येन रचितं तवेदं मध्यमं पदम् ॥ ३१ ॥
नभस्येष नभश्चक्षुर्न भात्येव चरन्नभः ।
मेघैः शीतातपकरो विरश्मिरिव रश्मिवान् ॥ ३२ ॥
द्यावापृथिव्योः संसर्गः सततं विततैः कृतः ।
अव्यवच्छिन्नधारौघैः समुद्रौघसमैर्घनैः ॥ ३३ ॥
नीपार्जुनकदम्बानां पृथिव्यां चातिवृष्टिभिः ।
गन्धैः कोलाहला वान्ति वाता मदनदीपनाः ॥ ३४ ॥
संप्रवृत्तमहावर्षं लम्बमानमहांबुदम् ।
भात्यगाधमपर्यन्तं ससागरमिवाम्बरम् ॥ ३५ ॥
धारानिर्मलनाराचं विद्युत्कवचवर्मिणम् ।
शक्रचापायुधधरं युद्धसज्जमिवाम्बरम् ॥ ३६ ॥
शैलानां च वनानां च द्रुमाणां च वराननम् ।
प्रतिच्छन्नानि भासन्ते शिखराणि घनैर्घनैः ॥ ३७ ॥
गजानीकैरिवाकीर्णं सलिलोद्गारिभिर्घनैः ।
वर्णसारूप्यतां याति गगनं सागरस्य च ॥ ३८ ॥
समुद्रोद्धूतजनिता लोलशाद्वलकम्पिनः ।
शीताः सपृषतोद्दामाः कर्कशा वान्ति मारुताः ॥ ३९ ॥
निशासु सुप्तचन्द्रासु मुक्ततोयासु तोयदैः ।
मग्नसूर्यस्य नभसो न विभान्ति दिशो दश ॥ ४० ॥
चेतनं पुष्करं कोशैः क्षुधाध्मातैः समन्ततः ।
न घृणीनां न रम्याणां विवेकं यान्ति कृष्टयः ॥ ४१ ॥
घर्मदोषपरित्यक्तं मेघतोयविभूषितम् ।
पश्य वृन्दावनं कृष्ण वनं चैत्ररथं यथा ॥ ४२ ॥
एवं प्रावृड्गुणान्सर्वाञ्छ्रीमान् कृष्णस्य पूर्वजः ।
कथयन्नेव बलवान् व्रजमेव जगाम ह ॥ ४३ ॥
अन्योन्यं रममाणौ तु कृष्णसङ्कर्षणावुभौ ।
तत्कालज्ञातिभिः सार्द्धं चेरतुस्तद् वनं महत् ॥ ४४ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवांशे
विष्णुपर्वणि प्रावृड्वर्णने दशमोऽध्यायः ॥ १० ॥
प्रावृड्वर्णन -
वैशंपायन सांगतात:- वृंदावनात रहावयास आल्यावर, ते दोघे वसुदेवाचे सुस्वरूप पुत्र वनामध्यें वासरांचे कळप चरावयास घेऊन जात असत. वनांत जाऊन गोपालांसह ते यमुनानदीमध्यें स्नानादिक क्रीडा करीत. याप्रकारें सुखानें त्यांचा ग्रीष्मकाळ त्या ठिकाणी लोटला. नंतर लोकांच्या मनकामना उल्हसित करणारा पर्जन्यकाळ प्राप्त झाला, तेव्हां ज्यांवर इंद्रधनुष्य पडलें आहे असे मोठे मेघ अतिशय वृष्टि करूं लागले. सूर्याचे दर्शन होईनासे झालें. तृणांकुर उगवल्यामुळें भूमिहि आच्छादित झाली. नूतन उदकाचा वर्षाव करणाऱ्या मेघवायूने भूमितलाचे संमार्जन केल्या कारणानें पृथ्वी युवतीप्रमाणे तजेलदार दिसूं लागली. मेघांनी ऊष्मा पार नाहीसा केला. जलवृष्टीनें वसुंधरा संतुष्ट झाली. इंद्रगोपनामक किड्यांचे थवे नूतन पर्जन्यानें भिजून गेले. वनातील वणव्याचा धूर नष्ट होऊन तीं फार शोभायमान दिसू लागली. पिसाऱ्यानें युक्त असलेल्या मोरांचा हाच नुत्यकाल असल्यामुळें, मदाने शोभणाऱ्या व कर्णमधुर अशा केका जिकडे तिकडे ऐकू येऊ लागल्या. पावसाळ्याला नुकताच आरंभ झाला असल्याकारणानें; भ्रमरांना खाद्य पुरविणारे सुंदर व तरुण कदंब वृक्ष, नूतन मेघपटलांमध्ये अत्यंत मनोहर दिसत होते. कुटज वृक्षांना फुलांचा बहर आला होता त्यामुळें तें वन हंसत आहे कीं काय असा भास होई. जिकडे तिकडे कदंब वृक्षांच्या पुष्पांचा परिमळ सुटला होता, त्यायोगे तें वन सुगंधित झालें होतें. सूर्याच्या प्रखर किरणानी व वणव्यांनीं तापून गेलेल्या पर्वतांवर जेव्हां मेघवृष्टि झाली तेव्हां ते जणूं काय ( आनंदाने ) बाष्प बाहेर टाकीत आहेत असें वाटलें. पावसाळचे झंझावात पताकांप्रमाणें फडकत होते; आणि मोठाले मेघ हे प्रासादांसारखे शोभत होते; त्यामुळे आकाश एखाद्या राजाच्या नगराप्रमाणे दिसत होतें. कोठे कोठे कदंबपुष्पे विकसित झालेलीं दृग्गोचर होत होतीं. क्वचित् स्थळी छत्र्यांनी तें वन अलंकृत झालें होतें. चोहोकडे नीप वृक्ष फुलल्यामुळे अग्निच प्रदीप्त झाला आहे असा भास होई. इंद्राच्या जलवृष्टीने आर्द्र झालेल्या व वायूने दाही दिशा पसरलेल्या मातीच्या वासामुळे लोकांच्या मनांत कामवासना उत्पन्न झाली. मत्त भ्रमरांच्या गुणगुणण्याने, बेडकांच्या डराव डरावाने आणि मोरांच्या नूतन टाहोने पृथ्वी दुमदुमून गेली. पावसामुळे नद्यांमध्ये मोठाले भोवरे उत्पन्न झाले. त्यांचा वेगही मोठा झाला. नद्यांची पात्रे विस्तृत होऊन, तीरावरील वृक्ष देखील त्या आपल्या प्रवाहाबरोबर घेऊन चालल्या. पावसाच्या संतत धारेमुळे पक्ष्यांचे पंख जड होऊन त्यांचा अगदीं निरुपाय झाला. पक्षी वृक्षाग्रांवर बसून राहिले होते ते एखाद्या दमलेल्या प्राण्याप्रमाणें आपली स्थाने सोडीनात. वर्षाव करणाऱ्या, व गडगडणाऱ्या वारिपूर्ण नूतन मेघांच्या पोटांत सूर्याने जणु काय बुडी मारली आहे असें वाटलें. वृक्ष उन्मळून पडल्यामुळे व पृथ्वीवर जिकडे तिकडे पूर आल्यामुळें, मार्ग शोधून काढणे जरुर झाले. जिकडे तिकडे हिरवे गार गवत उगवल्यामुळे पृथ्वीला फार अवर्णनीय शोभा प्राप्त झाली होती. वृक्षांनी युक्त असलेल्या पर्वतांची शिखरे पूरामळे वज्राने तोडल्याप्रमाणें खालीं पडू लागली. उताराचे धोरणाने वाहत जाणाऱ्या पडत्या पावसाच्या पाण्यानें व डबकी भरून उरलेल्या पाण्यानें वनातील भूमि भरून गेली. वन्य हस्तींनी सोंडेसह आपलीं तोंडे वर केली होतीं. अतिवृष्टिमुळें गोंधळून जाऊन, ढगांच्या गडगडाटाच्या अनुरोधाने ते पळु लागले तेव्हां पृथ्वीवर हे मेघच संचार करीत आहेत कीं काय असा भास झाला. पावसाळ्याची ही शोभा पाहून, जलपूर्ण मेघांकडे दृष्टि फेकीत, रोहिणीपुत्र बलराम श्रीकृष्णाला एकीकडे म्हणाला, " कृष्णा, ते पहा, आकाशांतील काळेकुट्ट मेघ. बगळ्यांच्या योगाने ते शोभिवंत दिसत आहेत; जणू काय तुझ्या शरीराचा वर्ण चोरून ते आकाशांत जाऊन बसले आहेत, असें मला वाटतें. हा तुझा निद्रा घेण्याचा काल आहे. आकाश तुझ्या शरीरासारखे दिसत आहे. तू ज्याप्रमाणें प्रतिवर्षी या वेळीं अज्ञातवासांत राहतोस, त्याप्रमाणें चंद्राने सांप्रतकाळी अज्ञातवास स्वीकारला आहे असें वाटतें. पावसाळ्यामुळे आकाश मेघाच्छादित झाल्याकारणानें नीलमेघाप्रमाणें ते काळे दिसत आहे. त्याची प्रभा नील कमलाच्या पाकळीसारखी झाली आहे. हे कृष्णा, शिखरावरील जलपूर्ण असलेल्या या कृष्णवर्ण मेघांनी गोधनांची वृद्धि करणारा हा गोवर्धन पर्वत किती रमणीय दिसत आहे पहा. सभोवार पाऊस पडल्यामुळे, मदयुक्त वू आनंदित झालेले कृष्णसारंग ( काळवीट ) वनामध्यें फार रमणीय दिसत आहेत. हे कमलनेत्रा, पावसानें उगवलेल्या या हरित व मृदु तृणाने पृथ्वी झाकून टाकिली आहे .पावसामुळे पर्वत व वने यांतून जलस्राव होत आहे. नांगरून टाकलेल्या भूमींतून धान्यांकुर वर आलें आहेत. या तिहींची शोभा उणी-अधिक दिसत नाहीं. सोसाट्याच्या वाऱ्यांनी मेघ हे इकडून तिकडे जातात. मेघ आकाशांत दिसूं लागतांच प्रवासी जनांना घरीं परत जाण्याची उत्कंठा होतें. तुझ्यासारखे गंभीर ध्वनि करणारे हे ढग हलके हलके प्रगल्भ होतील. हे हरे, हे त्रिविक्रमा, बाण व ज्या यांनी रहित असलेल्या तीन रंगांच्या इंद्रधनुष्यानें तुझे हें मध्यमपद ( अंतरिक्ष ) अलंकृत झालें आहे. हा नभस् मास असून यांतच नभश्चक्षु ( सूर्य ) नभस्तलीं जणु प्रकाशतच नाहीं ! मेघांमुळें चंद्रकिरणांना निस्तेजपणा आल्याकारणानें चंद्राचे किरणं असून नसल्यासारखे वाटतात. समुद्राच्या ओघासारख्या व दूरवर पसरलेल्या मेघांतून एकसारखी वृष्टि होत असल्याच्या योगाने, पृथ्वी व आकाश यांचा नित्यसंबंध या मेघांनी घडवून आणला आहे. फार पाऊस पडल्याकारणानें नीप, कदंब, व अर्जुनवृक्षांच्या फुलांच्या परिमळानें सुगंधित झाल्याने कामोद्दीपनकारक वायु पृथ्वीवर जोराने वहात आहेत. आकाशामध्यें मोठा पर्जन्याचा वर्षाव सुरू असून तें सर्व विस्तीर्ण मेघांनी व्याप्त झालें आहे; या योगाने असें वाटतें कीं, आकाशांत एक समुद्रच उत्पन्न झालेला आहे. तसेंच आकाशाने विद्द्युद्द्युक्त मेघांचे कवच धारण करून इंद्रधनुष्यांतून पर्जन्यधारारूपी निर्मल बाणांचा वर्षाव सुरू केला आहे त्या अर्थीं हें युद्धाकरितां सज्ज उभे राहिलें आहे अशी कल्पना मनांत येते. हे सुंदरमुखा, पर्वत, वन व वृक्ष यांची शिखरे दाट मेघांनी आच्छादून टाकल्यासारखीं दिसतात. गजसमूहाप्रमाणें जलाचा वर्षाव करणाऱ्या या मेघांनी युक्त असलेल्या गगनाला सागराचें स्वरूप प्राप्त झालें आहे. समुद्रांतून उत्पन्न झालेले तृणाला हालवून सोडणारे, चंचल, शीतल, आर्द्र, तुषारयुक्त, दांडगे व कठोर असे वायु वहात आहेत. सूर्यास्त झालेला असल्याकारणाने, रात्रीं यथेच्छ मेघवर्षाव सुरू झाला म्हणजे चंद्र नष्टप्राय होऊन, दाही दिशा ओळखू येत नाहींत. वायुपूर्ण मेघांनी व्याप्त झालेलें आकाश सचेतन आहे असा भास होतो. इतकें आहे तरी लोकांना रात्र झाली कीं दिवस आहे हें कळत नाहीं असें मात्र नाहीं. हे कृष्णा, ग्रीष्मऋतूचे अपकारापासून सुटून आतां पर्जन्यानें शोभणारे हें वृंदावन चित्ररथ गंधर्वाच्या वनाप्रमाणें दिसत आहे, ते अवलोकन कर."
याप्रकारे वर्षाकाळाचे गुण श्रीकृष्णाला सांगत सांगत, ज्येष्ठ भ्राता बलवान् संकर्षण व्रजामध्ये परत गेला. या प्रकारे असें एकमेकांचे मनोरंजन करीत कृष्ण व संकर्षण हे उभयता आपल्या ज्ञाति-बांधवांसह त्या महावनामध्यें काल क्रमीत असत.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि प्रावृड्वर्णनं नाम दशमोऽध्यायः ॥ १० ॥
अध्याय दहावा समाप्त
GO TOP
|