श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
नवमोऽध्यायः


वृन्दावनप्रवेशः

वैशंपायन उवाच
एवं वृकांश्च तान् दृष्ट्वा वर्धमानान् दुरासदान् ।
सस्त्रीपुमान् स घोषो वै समस्तोऽमन्त्रयत् तदा ॥ १ ॥
स्थाने नेह न नः कार्यं व्रजामोऽन्यन्महद्वनम् ।
यच्छिवं च सुखोष्यं च गवां चैव सुखावहम् ॥ २ ॥
अद्यैव किं चिरेण स्म व्रजामः सह गोधनैः ।
यावद् वृकैर्वधं घोरं न नः सर्वो व्रजो व्रजेत् ॥ ३ ॥
एशां धूम्रारुणाङ्‌‌‍गानां दंष्ट्रिणां नखकर्षिणाम् ।
वृकाणां कृष्णवक्त्राणां बिभीमो निशि गर्जताम् ॥ ४ ॥
मम पुत्रो मम भ्राता मम वत्सोऽथ गौर्मम ।
वृकैर्व्यापादिता ह्येवं क्रन्दन्ति स्म गृहे गृहे ॥ ५ ॥
तासां रुदितशब्देन गवां हंभारवेण च ।
व्रजस्योत्थापनं चक्रुर्घोषवृद्धाः समागताः ॥ ६ ॥
तेषां मतमथाज्ञाय गन्तुं वृन्दावनं प्रति ।
व्रजस्य विनिवेशाय गवां चैव हिताय च ॥ ७ ॥
वृन्दावननिवासाय ताञ्ज्ञात्वा कृतनिश्चयान् ।
नन्दगोपो बृहद्वाक्यं बृहस्पतिरिवाददे ॥ ८ ॥
अद्यैव निश्चयप्राप्तिर्यदि गन्तव्यमेव नः ।
शीघ्रमाज्ञाप्यतां घोषः सज्जीभवत मा चिरम् ॥ ९ ॥
ततोऽवघुष्यत तदा घोषे तत् प्राकृतैर्जनैः ।
शीघ्रं गावः प्रकल्प्यन्तां भाण्डं समभिरोप्यताम् ॥ १० ॥
वत्सयूथानि काल्यन्तां युज्यन्तां शकटानि च ।
वृन्दावनमितः स्थानान्निवेशाय च गम्यताम् ॥ ११ ॥
तच्छ्रुत्वा नन्दगोपस्य वचनं साधु भाषितम् ।
उदतिष्ठद् व्रजः सर्वः शीघ्रं गमनलालसः ॥ १२ ॥
प्रयाह्युत्तिष्ठ गच्छामः किं शेषे साधु योजय ।
उत्तिष्ठति व्रजे तस्मिन् गोपकोलाहलो ह्यभूत् ॥ १३ ॥
उत्तिष्ठमानः शुशुभे शकटीशकटस्तु सः ।
व्याघ्रघोषमहाघोषो घोषः सागरघोषवान् ॥ १४ ॥
गोपीनां गर्गरीभिश्च मूर्ध्नि चोत्तम्भितैर्घटैः ।
निष्पपात व्रजात् पङ्‌‌‍क्तिस्तारापङ्‌‌‍क्तिरिवांबरात् ॥ १५ ॥
नीलपीतारुणैस्तासां वस्त्रैरग्रस्तनोच्छ्रितैः ।
शक्रचापायते पङ्‌‌‍क्तिर्गोपीनां मार्गगामिनी ॥ १६ ॥
दामनी दामभारैश्च कैश्चित्कायावलम्बिभिः।
गोपा मार्गगता भान्ति सावरोहा इव द्रुमाः ॥ १७ ॥
स व्रजो व्रजता भाति शकटौघेन भास्वता ।
पोतैः पवनविक्षिप्तैर्निष्पतद्भिरिवार्णवः ॥ १८ ॥
क्षणेन तद् व्रजस्थानमीरिणं समपद्यत ।
द्रव्यावयवनिर्धूतं कीर्णं वायसमण्डलैः ॥ १९ ॥
ततः क्रमेण घोषः स प्राप्तो वृन्दावनं वनम् ।
निवेशं विपुलं चक्रे गवां चैव हिताय च ॥ २० ॥
शकटावर्तपर्यन्तं चन्द्रार्धाकारसंस्थितम् ।
मध्ये योजनविस्तीर्णं तावद्‌द्विगुणमायतम् ॥ २१ ॥
कण्टकीभिः प्रवृद्धाभिस्तथा कण्टकितद्रुमैः ।
निखातोच्छ्रितशाखाग्रैरभिगुप्तं समन्ततः ॥ २२ ॥
मन्थैरारोप्यमाणैश्च मन्थबन्धानुकर्षणैः ।
अद्भिः प्रक्षाल्यमानाभिर्गर्गरीभिरितस्ततः ॥ २३ ॥
कीलैरारोप्यमाणैश्च दामनीपाशपाशितैः ।
स्तम्भनीभिर्धृताभिश्च शकटैः परिवर्तितैः ॥ २४ ॥
नियोगपाशैरासक्तैर्गर्गरीस्तम्भमूर्धसु ।
छादनार्थं प्रकीर्णैश्च कटकैस्तृणसंकटैः ॥ २५ ॥
शाखाविटङ्‌‌‍कैर्वृक्षाणां क्रियमाणैरितस्ततः ।
शोध्यमानैर्गवां स्थानैः स्थाप्यमानैरुलूखलैः ॥ २६ ॥
प्राङ्‌‌‍मुखैः सिच्यमानैश्च संदीप्यद्‌भिश्च पावकैः ।
सवत्सचर्मास्तरणैः पर्यङ्‌‌‍कैश्चावरोपितैः ॥ २७ ॥
तोयमुत्तारयन्तीभिः प्रेक्षन्तीभिश्च तद्वनम् ।
शाखाश्चाकर्षमाणाभिर्गोपीभिश्च समन्ततः ॥ २८ ॥
युवभिः स्थविरैश्चैव गोपैर्व्यग्रकरैर्भृशम् ।
विशसद्भिः कुठारैश्च काष्ठान्यपि तरूनपि ॥ २९ ॥
तद् व्रजस्थानमधिकं शुशुभे काननावृतम् ।
रम्यं वननिवेशं वै स्वादुमूलफलोदकम् ॥ ३० ॥
तास्तु कामदुघा गावः सर्वपक्षिरुतं वनम् ।
वृन्दावनमनुप्राप्ता नन्दनोपमकाननम् ॥ ३१ ॥
पूर्वमेव तु कृष्णेन गवां वै हितकारिणा ।
शिवेन मनसा दृष्टं तद्वनं वनचारिणा ॥ ३२ ॥
पश्चिमे तु ततो रूक्षे धर्मे मासे निरामये ।
वर्षतीवामृतं देवे तृणं तत्र व्यवर्धत ॥ ३३ ॥
न तत्र वत्साः सीदन्ति न गावो नेतरे जनाः ।
यत्र तिष्ठति लोकाणां भवाय मधुसूदनः ॥ ३४ ॥
ताश्च गावः स घोषस्तु स च सङ्‌‌‍कर्षणो युवा ।
कृष्णेन विहितं वासं तमध्यासत निर्वृताः ॥ ३५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि वृन्दावनप्रवेशे नवमोऽध्यायः ॥ ९ ॥


वृंदावनप्रवेश -

वैशंपायन सांगतातः- त्या अनिवार ( झालेल्या ) वृकांची संख्या वाढतच आहे असें पाहून गोकुलांतील सर्व स्‍त्रीपुरुषांनी एके ठिकाणी जमून त्या संकटनाशनाचा विचार सुरू केला. ते म्हणाले, " आपणांस या ठिकाणीच राहिलें पाहिजे असे नाहीं. करितां आपण दुसऱ्या एकाद्या मोठ्या वनामध्यें रहावयास जाऊं. आपल्याला व गाईंना रहाण्यास अत्यंत सुखावह व कल्याणकारक असें स्थान आतां पाहिले पाहिजे. मग या गोष्टीला उशीर तरी कशाला ? आपल्या सर्व गांवाचा लाडग्यांनीं फडशा उडवला नाहीं तो आजच आपली गोधनें घेऊन आपण मार्गाला लागूं कसे. या विक्राळ दाढांच्या व धूम्र आणि अरुण वर्णाच्या नखयुक्त काळतोंड्या लांडग्यांची रात्रीं हुल्लड सुरू झाली म्हणजे आम्हांला फार भीति वाटते. कोणी म्हणतो माझा पुत्र लांडग्यानी मारला तर कोणी म्हणतो माझ्या भावाची तीच गति झाली. कोणी म्हणतो माझे वासरूं लांडग्यांनी नेलें तर कोणी म्हणतो माझी गाय वृकांनी भक्षण केली. याप्रमाणे घरोघर कांहींना कांहीं हाहाःकार चाललेला आपण ऐकत आहोंत. लोकांची रडारड चालली आहे व गाई हंबारत आहेत या गोष्टी लक्षांत घेऊन, एकत्र जमलेल्या वृद्ध गृहस्थानी स्थानत्याग करण्याचा उपाय सुचविला. व्रजवासी लोकांचे प्राणरक्षण व्हावें व गाई वाचाव्यात म्हणून वृंदावनांत रहाण्याकरितां जावयाचें असें त्यांचें मत असून त्यांनीं त्याप्रमाणें वृंदावनी जाण्याचा ठाम निश्चय केला आहे असें पाहून नंदाने बृहस्पतीप्रमाणें गंभीर भाषण केलें. " जर आपण आजच जावयाचा निश्चय केला असेल तर उशीर न करतां निघण्याची तयारी करून सज्ज होण्याबद्दल त्वरित सर्व लोकांना आज्ञा द्या. " हे ऐकून लोकांनी, " ताबडतोब गाई व वासरे जुळवा, गाड्या जोडा व हांडींभांडी त्यांत घालून, हे जनहो, येथून वृंदावनांत राहण्यास जाण्यासाठी निघण्याची तयारी करा" अशी दवंडी पिटली. नंदाचें वरील हितकर भाषण ऐकतांच, सर्व व्रजवासी लोक गमनोत्सुक होऊन तातडीनें उठले. त्याबरोबरच तेथें " चला उठा, जाऊ या, निजतां काय ? गाड्या जुंपा, आटपा, इत्यादि शब्दांचा एकच कल्होळ उठला. गाडे वगैरे घेऊन तो सर्व गौळवाडा जेव्हां व्रज सोडून निघाला त्या वेळीं अवर्णनीय शोभा दिसत होती. वाघाच्या व सागराच्या गर्जनेप्रमाणें मोठा कल्होळ त्या ठिकाणी उत्पन्न झाला होता. आकाशांतून तारका उदयास येतांना जशी शोभा दिसते त्याप्रमाणें, डोकीवर रव्या व ताकाची मडकी घेउन गोपी जेव्हां गोकुलांतून बाहेर पडल्या तेव्हां मोठी मौज दिसली. स्तनाग्रांवर उचलून दिसणारीं नील पीत आणि रक्त वर्णाची वस्‍त्रे परिधान केलेल्या गोपींची रांग रस्त्याने चालली होती तेव्हां इंद्रष्याची शोभा दृष्टीस पडत होती. दावणी व दावी यांचे भार मस्तकावर धारण करून गोप निघाले तेव्हां हे मोठे जटाधारी वृक्ष चालले आहेत कीं काय असा भास होत होता. समुद्रामध्ये वायूंच्या जोराने नौका चालत असतात तेव्हा असतात तेव्हा जसा देखावा दृष्टीस पडतो, त्याप्रमाणें गोकुलातील चमकदार गाडे वृंदावनाच्या दिशेनें निघाले तेव्हां मौजेचा देखावा दृग्गोचर होत होता. याप्रमाणे एका क्षणांत तें व्रजनगर उध्वस्त अरण्यासारखे दिसूं लागलें. द्रव्याचा अल्पांश देखील तेथें राहिला नाही. त्या नगरांत वायस मात्र शिल्लक राहिले.

जाता जातां व्रजवासी जन वृंदावनी येऊन पोचले. मनुष्यांना तशीच गौरींना रहाण्यासाठी त्यांनीं विपुल जागा पाहून सर्व सोयी केल्या. त्यांच्या वसतिस्थानाभोंवतीं अर्धचंद्राकार शकट त्यांनीं उभे केले. त्याचा परिघ दोन योजनें असून, व्यास एक योजन होता. जुनाट बाभळीं व इतर काटेरी झाडे आणि भूमींत खोलवर गेलेली पाळेमुळे व उंच वाढलेली फांदाडे यांचें जाळे सभोंवर पसरलें असल्यामुळें त्या नूतन घोषाचे आयतेच उत्तम रितीने संरक्षण झाले होतें. कोणी ताक करण्यासाठीं खांब रोवू लागले. कोणी माथ्यांना दोऱ्या लावून ते फिरवून पाहूं लागले. कोणी आपल्या माथण्या पाण्यानें धुवून काढू लागले. कित्येक गुरांना बांधण्यासाठी मेखा पुरू लागले. कित्येक त्या मेखांना दावणीनें घट्ट बांधू लागले. कोणी खांब धरून उभे राहिले.

कित्येकजण गाड्यांच्या व्यवस्थेला लागले. कोणी ताक करण्यासाठीं पुरलेल्या खांबांना दोऱ्या लावू लागले. डेरे ठेवण्यासाठी व झाकण्यासाठीं केलेली गवताची निवणीं व झाकणे जिकडे तिकडे पसरलेली दिसत होतीं. कोणी झाडांवर पक्ष्यांसाठी घरटी तयार करण्यास सुरवात केली. कित्येक गाईंना बांधण्यासाठी सोईस्कर जागा शोधण्याच्या मार्गाला लागले. कित्येकांनीं उखळें पुरण्याचा उद्योग आरंभिला. कोणी पूर्वाभिमुख होऊन सडासारवण घालूं लागले. कोणी विस्तव पेटविण्याच्या उद्योगाला लागले. कोणी वस्‍त्रे व चर्मे पर्यकावर घालण्याचें काम हातीं घेतलें. गोपींपैकी काहीजणी पाणी ओढावयास लागल्या. कांहीं वनशोभा अवलोकीत बसल्या. काहीजणी झाडांच्या फांद्या ओढू ( मोडूं ) लागल्या. लहानथोर सर्व गोपाळ कोणत्यानाकोणत्या तरी कामांत अत्यंत पूर झालेले होते. कोणी कुऱ्हाडीनी झाडे व लाकडे तोडीत होते. त्या नूतन घोषासभोवतीं अरण्याचे वेष्टण असल्याकारणाने तो गौळवाडा फारच शोभिवंत दिसत होता. वृंदावनामध्यें वस्तीसाठी त्यांनीं पसंत केलेले हें स्थान रमणीय असन त्यांत मधुर फले, कंदमुले व उदक यांची समृद्धि होती. त्यांच्या गाई कामधेनूसारख्या होत्या. सर्व तऱ्हेच्या पक्षांच्या किलबिलाटानें तें वन नादित झालें होतें. फार काय सांगावे, या गोपनिवासाने त्या वृंदावनाला नंदनवनाची शोभा प्राप्त झाली. वनामध्यें हिंडत असतां श्रीकृष्णाने पूर्वीच गोधनांच्या कल्याणासाठीं वरील स्थल आपल्या मंगलकारक अंतर्दृष्टीने पाहून ठेवले होतें. पुढें रूक्ष परंतु आरोग्यकारक ग्रीष्म ऋतूच्या शेवटच्या महिन्यांत देवाने तेथें अमृतासारखा तासारखा पाऊस पाडला. त्यामुळें तेथें तृणादिकांना अंकुर फुटून ती विशेषेंकरून वाढू लागली. गाई, वासरे किंवा मनुष्ये यांपैकी कोणालाही तेथें त्रास झाला नाहीं. कारण, त्या ठिकाणी जगताच्या कल्याणासाठीं प्रत्यक्ष मधुसूदन राहिलेला होता. गाई, सर्व गोपाळ व गोपी आणि तरुण संकर्षण हे त्या श्रीकृष्णानें योजलेल्या स्थळी कोणत्याही प्रकारचा त्रास न होतां सुखाने कालक्रमणा करूं लागले.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
वृन्दावनप्रवेशः नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
अध्याय नववा समाप्त

GO TOP