श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
अष्टमोऽध्यायः


वृकवर्णनम्

वैशंपायन उवाच
एवं तौ बाल्यमुत्तीर्णौ कृष्णसंकर्षणावुभौ ।
तस्मिन्नेव व्रजस्थाने सप्तवर्षौ बभूवतुः ॥ १ ॥
नीलपीताम्बरधरौ पीतश्वेतानुलेपनौ ।
बभूवतुर्वत्सपालौ काकपक्षधरावुभौ ॥ २ ॥
पर्णवाद्यं श्रुतिसुखं वादयन्तौ वराननौ ।
शुशुभाते वनगतौ त्रिशीर्षाविव पन्नगौ ॥ ३ ॥
मयूराङ्‌‌‍गदकर्णौ तु पल्लवापीडधारिणौ ।
वनमालाकुलोरस्कौ द्रुमपोताविवोद्‌गतौ ॥ ४ ॥
अरविन्दकृतापीडौ रज्जुयज्ञोपवीतिनौ ।
सशिक्यतुम्बकरकौ गोपवेणुप्रवादकौ ॥ ५ ॥
क्वचिद्वसन्तावन्योन्यं क्रीडमानौ क्वचित् क्वचित् ।
पर्णशय्यासु संसुप्तौ क्वचिन्निद्रान्तरेक्षणौ ॥ ६ ॥
एवं वत्सान् पालयन्तौ शोभयन्तौ महावनम् ।
चञ्चूर्यन्तौ रमन्तौ स्म किशोराविव चञ्चलौ ॥ ७ ॥
अथ दामोदरः श्रीमान् सङ्‌‌‍कर्षणमुवाच ह ।
आर्य नास्मिन् वने शक्यं गोपालैः सह क्रीडितुम् ॥ ८ ॥
अवगीतमिदं सर्वमावाभ्यां भुक्तकाननम् ।
प्रक्षीणतृणकाष्ठं च गोपैर्मथितपादपम् ॥ ९ ॥
घनीभूतानि यान्यासन् काननानि वनानि च ।
तान्याकाशनिकाशानि दृश्यन्तेऽद्य यथासुखम् ॥ १० ॥
गोवाटेष्वपि ये वृक्षाः परिवृत्तार्गलेषु च ।
सर्वे गोष्ठाग्निषु गताः क्षयमक्षयवर्चसः ॥ ११ ॥
संनिकृष्टानि यान्यासन् काष्ठानि च तृणानि च ।
तानि दूरावकृष्टासु मार्गितव्यानि भूमिषु ॥ १२ ॥
अरण्यमिदमल्पोदमल्पकक्षं निराश्रयम् ।
अन्वेषितव्यविश्रामं दारुणं विरलद्रुमम् ॥ १३ ॥
अकर्मण्येषु वृक्षेषु स्थितविप्रस्थितद्विजम् ।
संवासस्यास्य महतो जनेनोत्सादितद्रुमम् ॥ १४ ॥
निरानन्दं निरास्वादं निष्प्रयोजनमारुतम् ।
निर्विहङ्‌‌‍गमिदं शून्यं निर्व्यञ्जनमिवाशनम् ॥ १५ ॥
विक्रीयमाणैः काष्ठैश्च शाकैश्च वनसंभवैः ।
उच्छिन्नसञ्चयतृणैर्घोषोऽयं नगरायते ॥ १६ ॥
शैलानां भूषणं घोषो घोषाणां भूषणं वनम् ।
वनानां भूषणं गावस्ताश्चास्माकं परा गतिः ॥ १७ ॥
तस्मादन्यद् वनं यामः प्रत्यग्रयवसेन्धनम् ।
इच्छन्त्यनुपभुक्तानि गावो भोक्तुं तृणानि च ॥ १८ ॥
तस्माद्वनं नवतृणं गच्छन्तु धनिनो व्रजाः ।
न द्वारबन्धावरणा न गृहक्षेत्रिणस्तथा ।
प्रशस्ता वै व्रजा लोके यथा वै चक्रचारिणः ॥ १९ ॥
शकृन्मूत्रेषु तेष्वेव जातक्षाररसायनम् ।
न तृणं भुञ्जते गावो नापि तत् पयसे हितम् ॥ २० ॥
स्थलीप्रायासु रथ्यासु नवासु वनराजिषु ।
चरावः सहितौ गोभिः क्षिप्रं संवाह्यतां व्रजः ॥ २१ ॥
श्रूयते हि वनं रम्यं पर्याप्तं तृणसंस्तरम् ।
नाम्ना वृन्दावनं नाम स्वादुवृक्षफलोदकम् ॥ २२ ॥
अझिल्लिकण्टकवनं सर्वैर्वनगुणैर्युतम् ।
कदम्बपादपप्रायं यमुनातीरसंश्रितम् ॥ २३ ॥
स्निग्धशीतानिलवनं सर्वर्तुनिलयं शुभम् ।
गोपीनां सुखसञ्चारं चारुचित्रवनान्तरम् ॥ २४ ॥
तत्र गोवर्धनो नाम नातिदूरे गिरिर्महान् ।
भ्राजते दीर्घशिखरो नन्दनस्येव मन्दरः ॥ २५ ॥
मध्ये चास्य महाशाखो न्यग्रोधो योजनोच्छ्रितः ।
भाण्डीरो नाम शुशुभे नीलमेघ इवाम्बरे ॥ २६ ॥
मध्येन चास्य कालिन्दी सीमन्तमिव कुर्वती ।
प्रयाता नन्दनस्येव नलिनी सरितां वरा ॥ २७ ॥
तत्र गोवर्धनं चैव भाण्डीरं च वनस्पतिम् ।
कालिन्दीं च नदीं रम्यां द्रक्ष्यावश्चरतः सुखम् ॥ २८ ॥
तत्रायं कल्प्यतां घोषस्त्यज्यतां निर्गुणं वनम् ।
संत्रासयावो भद्रं ते किञ्चिदुत्पाद्य कारणम् ॥ २९ ॥
एवं कथयतस्तस्य वासुदेवस्य धीमतः ।
प्रादुर्बभूवुः शतशो रक्तमांसवसाशनाः ॥ ३० ॥
घोराश्चिन्तयतस्तस्य स्वतनूरुहजास्तदा ।
विनिष्पेतुर्भयकराः सर्वशः शतशो वृकाः ॥ ३१ ॥
निष्पतन्ति स्म बहवो व्रजस्योत्सादनाय वै ।
वृकान् निष्पतितान् दृष्ट्वा गोषु वत्सेष्वथो नृषु ॥ ३२ ॥
गोपीषु च यथाकामं व्रजे त्रासोऽभवन्महान् ।
ते वृकाः पञ्चबद्धाश्च दशबद्धास्तथ परे ॥ ३३ ॥
त्रिंशद्विंशतिबद्धाश्च शतबद्धास्तथा परे ।
निश्चेरुस्तस्य गात्रेभ्यः श्रीवत्सकृतलक्षणाः ॥ ३४ ॥
कृष्णस्य कृष्णवदना गोपानां भयवर्धनाः ।
भक्षयद्भिश्च तैर्वत्सांस्त्रासयद्भिश्च गोव्रजान् ॥ ३५ ॥
निशि बालान् हरद्भिश्च वृकैरुत्साद्यते व्रजः ।
न वने शक्यते गन्तुं न गाश्च परिरक्षितुम् ॥ ३६ ॥
न वनात् किञ्चिदाहर्तुं न च वा तरितुं नदीम् ।
त्रस्ता ह्युद्विग्नमनसोऽगतास्तस्मिन् वनेऽवसन् ॥ ३७ ॥
एवं वृकैरुदीर्णैस्तु व्याघ्रतुल्यपराक्रमैः ।
व्रजो निष्पन्दचेष्टः स एकस्थानचरः कृतः ॥ ३८ ॥
इति श्रीमहभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां वृकदर्शनेऽष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥


वृकदर्शन -

वैशंपायन सांगतातः- याप्रमाणें उभयता कृष्णसंकर्षणांची बाल्यदशा परिपूर्ण होऊन गोकुळांतच ते सात वर्षांचे झाले. ते अनुक्रमें पीत व नील वस्‍त्रे परिधान करीत; आणि पीत व श्वेत वर्णाच्या उड्या लावीत. त्या उभयतांना झुलपे ठेवलेली होतीं. ते वासरें राखावयास रानांत जाऊं लागले. त्यांचे तोंडवळे अत्यंत सुंदर होते. वनामध्यें जाऊन कानाला फार मधुर लागणारी वेणू ते वाजवूं लागले म्हणजे तीन फण्यांच्या नागासारखे ते अति मनोहर दिसत,. केव्हा केव्हा ते मोराची पिसें कानावर धारण करीत, पल्लवांचा गुच्छ मस्तकावर ठेवीत व वनमालांनीं आपलें वक्ष:स्थल अलंकृत करीत तेव्हां ते नूतनोत्पन्न बालवृक्षाप्रमाणें दिसत. कधीं कधीं ते कमलें मस्तकावर धारण करून, रज्जूचीं यज्ञोपवीतें घालीत आणि कमंडलूसारखे शिंक्यासकट तुंबे हातांत घेत व वेणूवादन करीत. क्वचित् ते परस्परांशीं खेळून आपल्याशींच हसत. कधीं पर्णशय्येवर पडून निद्रासुखाचा अनुभव घेत.

या प्रकारे गुराख्याचे काम करून ते त्या महावनाला शोभा देत. खरोखर पहाता चंचल शिंगराप्रमाणें सगळ्या रानभर हुतुतू घालून ते आपली क्रीडा करीत. ( असे होतां होतां ) एके दिवशीं सौंदर्यलक्ष्मीनें युक्त असलेल्या दामोदरानें संकर्षणाला उद्देशून भाषण केलें, " दादा, आतां यापुढें या वनांत गोपालांसह क्रीडा करणें शक्य नाही; इतके दिवस आपण येथें क्रीडा केल्यामुळें या अरण्याची शोभा आतां नाहींशी झाली आहे. गोपांनी या वनातील सर्व वृक्ष तोडून नेल्यामुळें एकही लाकूड अथवा गवताची काडी या ठिकाणी राहिलेली नाहीं. जें रान ( थोडे दिवसांपूर्वी ) अत्यंत गर्द दिसत असे तें आतां अगदीं उजाड झालें असून या टोंकापासन त्या टोंकापर्यत आकाशासारखे शून्याकार झालें आहे. गोठ्यामध्ये जे वृक्ष होते त्यांना सभोवार भिंतींचे व अडसरांच्या दरवाजांचे कुंपण होतें, परंतु अक्षय टिकण्यासारखे तेही वृक्ष गोठ्यांत आग लागून नष्ट झाले आहेत. पूर्वी येथें लाकूडफाटे व गवतकाडी अगदीं सन्निध मिळत असे, पण सांप्रत दूरवर जाऊन शोधून आणण्याचा प्रसंग आला. या वनांत हल्ली पाणी फार थोडे आहे, गवत देखील तोट्याचे झालें आहे; कोठेही आश्रय राहिलेला नाहीं; एखादे विश्रांतिस्थान पाहिजे असल्यास महत्प्रयासाने तें शोधावे लागतें. या रानांत वृक्ष आतां तुरळक राहिले असल्यामुळें तें फार भयंकर दिसते. यांतील वृक्ष द्विजकर्मे करण्याचे सोईचे राहिले नाहीत या कारणानें ब्राह्मणांनीं हें स्थान सोडून दिलें आहे. या मोठ्या गांवचे सर्व वृक्ष, लोकांनी तोडून नाहींसे केले आहेत. या ठिकाणी कसल्याही प्रकारचा आनंद उरलेला नाहीं. येथील सगळी मौज नाहीशी झाली आहे. येथील वायूपासून पूर्वीप्रमाणे आल्हाद वाटत नाहीं. पक्ष्यांनी देखील ही जागा टाकून दिली आहे. तोंडीं लावण्यावांचून अन्न जसें बेचव लागतें, त्याप्रमाणें पक्ष्यांवाचून हें रान ओस झालें आहे. रानांत उत्पन्न होणारे भाजीपाले व लाकडे यांचा लोक आतां विक्रय करूं लागले आहेत; तसेंच ते गवताचा देखील संचय करतात, त्यामुळें या गौळवाड्याला नगराची स्थिति प्राप्त झाली आहे. गौळवाडे हे पर्वताची भूषणें होत. प्रत्येक गौळवाड्याला लागून वन असणें त्या वाड्याला शोभादायकआहे. बरें, गाई असतील तर त्या वनाला तरी शोभा आणि गाई म्हणजे आपली श्रेष्ठ दैवतें होत. वरील कारणांकरितां ज्या रानांत नवे गवत व जळण सापडेल अशा रानांत आपण आपलें वसतिस्थान नेले पाहिजे. पूर्वी ज्या गवताला दुसऱ्या कोणाचे तोंड लागलें नाहीं असें गवत खाण्याची आपल्या गाई इच्छा करीत आहेत. त्यासाठीं धनिक गोपाळांनी आतां हें स्थान सोडून जेथे चांगले व विपुल गवत मिळेल अशा एखाद्या नव्या ठिकाणची वाट धरावी. ज्यांना घरादाराची व शेताभाताची आडकाठी असेल म्हणजे जे लोक घरेदारे व शेतवाडी करून स्थायिक झाले असतील त्यांनीं मात्र स्थानत्याग करूं नये. हंसादि पश्यांप्रमाणे ज्यांचे बिर्‍हाडवाजले पाठीवर असेल, त्या गवळ्यांनींच हा अन्य स्थानी जाण्याचा पक्ष स्वीकारावा. गवतावर गोमय किंवा गोमूत्र पडले म्हणजे त्यावर एक प्रकारचा अपकारी क्षार उत्पन्न होतो. तशा प्रकारचे गवत गाई भक्षण करीत नाहींत व तें दुधालाही चांगले नाही. मैदानासारख्या सपाट अशा वनामध्यें आपण आपल्या गाईसहवर्तमान संचार करूं. हा सगळा गौळवाडा येथून लवकर तिकडेच घेऊन चला. वृंदावन नांवाचे फारच रम्य वन आहे असें माझ्या ऐकण्यांत आहे. तेथें विपुल गवत असून मधुर वृक्षफले व उदक यांची समृद्धि आहे. त्यांत जीवजंतु किंवा काटेकुटे काहीएक नाहींत. उत्तम वनाला अवश्य असणारे सर्व गुण त्या वनाचे ठिकाणी आहेत. त्यामध्ये बहुतेक कदंबाचींच झाडे असून तें यमुनेच्या कांठींच वसलेले आहे. ते वन अत्यंत मनोवेधक असून तेथें शीतल वायु सुटलेला असतो. तें सर्व ऋतूंचे मंगलकारक माहेरघरच आहे. गोपींना वास्तव्य करण्याला तें अत्यंत सोईचे आहे, किंबहुना तें दुसरे चित्रवनच आहे असें म्हटलें तरी चालेल. त्या वनापासून जवळच गोवर्धन नामक मोठा पर्वत आहे. त्याची शिखरे उंच असून नंदनवनांतील मंदर पर्वताप्रमाणे त्यानें वृंदावनाला शोभा आणली आहे. त्या पर्वताच्या मध्यभागी भांडीर नामक वटवृक्ष आहे, तो आकाशांतील नील मेघासारखा तेथें अत्यंत रमणीय दिसत आहे. न्यग्रोध वृक्षाच्या फांद्या मोठ्या असून तो एकंदर एक योजन उंच आहे. नंदनवनांतून ज्याप्रमाणें नलिनी नदी गेलेली आहे, त्याप्रमाणें वृंदावनामधून मधोमध कालींदी नदीचा प्रवाह चाललेला आहे. त्यामुळें, ती नदी वृंदावनाला स्‍त्रीचे मस्तकावरील भांगाप्रमाणें शोभा देत आहे कीं काय, असा भास होतो. त्या वनामध्यें आपण आनंदाने राहू लागलो म्हणजे गोवर्धन पर्वत, भांडीर वृक्ष व रमणीय कालिंदी नदी या तिहींचे ( पुण्यकारक ) दर्शन आपल्याला नेहमी घडेल, म्हणून हा वाडा तेथें नेला पाहिजे व ह्या गुणहीन वनाचा त्याग केला पाहिजे. तुझें कल्याण असो. आतां कांहीं तरी निमित्त उत्पन्न करून लोकांना आपण त्रासवून सोडू. " याप्रमाणे त्रिकालज्ञ वासुदेव संकर्षणाला म्हणतो आहे तोच त्या ( जगताची) चिंता वाहणाऱ्या श्रीकृष्णाचे शरीराच्या केसांतून रक्त, मांस व वसा भक्षण करणारे भयंकर आणि घोर असे शेकडो लांडगे चोहोबाजूंनी बाहेर पडले, व व्रजाचा विध्वंस करण्याकरितां ते सैरावैरा धावू लागले. गाई, वासरे, गोप व गोपी या सर्वांचे अंगावर जेव्हां नि:शंकपणें लांडगे धांवून येतांना दृष्टीस पडू लागले, तेव्हां गोकुलामध्ये मोठा हाहाकार उडाला. श्रीवत्सलक्षणानें युक्त असलेले ते लांडगे श्रीकृष्णाच्या अवयवांपासून, पांच पांच, दहा दहा, वीस वीस, तीस तीस, किंबहुना शंभर शंभर असे एकदम एकसंख्येनें प्रकट होऊं लागले. कृष्णाच्या शरीरापासून उत्पन्न झालेले तें लांडगे काळ्या तोंडाचे होते; त्यांच्यापासून गोपालांना फार भय प्राप्त झालें. ते वासरे खाऊन टाकू लागले, गोठ्यांना उपद्रव देऊं लागलें आणि रात्रीं लहान मुले देखील ओढून नेऊ लागले; त्यामुळें गोकुळ नगर अगदीं जेरीस आले. कोणाला रानांत जाण्याची, गाई राखण्याची, रानांतून कांहीं आणण्याची किंवा नदीतून पोहून जाण्याची कशाचीही सोय राहिली नाहीं. गोकुलवासी लोक फार त्रासून गेले; त्याची मने अत्यंत उद्विग्न झाली; कोणाला शरण जावे हे त्यांस कळेना, तथापि अशा स्थितीतही ते तेथेंच राहिले होते, कारण दुसरी कांहीं तोड नव्हती. याप्रमाणे वाघासारख्या त्या पराक्रमी लांडग्यांच्या त्रासाने सर्व व्रजांतील व्यापार बंद पडून जो तो आपआपले ठिकाण धरून राहिला.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
वृकवर्णनं नाम अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
अध्याय आठवा समाप्त

GO TOP