श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
सप्तमोऽध्यायः


यमलार्जुनभङ्‌‌‍गः

वैशंपायन उवाच
काले गच्छति तौ सौम्यौ दारकौ कृतनामकौ ।
कृष्णसङ्‌‌‍कर्षणौ चोभौ रिङ्‌‌‍गिणौ समपद्यताम् ॥ १ ॥
तावन्योन्यगतौ बालौ बाल्यादेवैकतां गतौ ।
एकमूर्तिधरौ कान्तौ बालचन्द्रार्कवर्चसौ ॥ २ ॥
एकनिर्माणनिर्मुक्तावेकशय्यासनाशनौ ।
एकवेषधरावेकं पुष्यमानौ शिशुव्रतम् ॥ ३ ॥
एककार्यान्तरगतावेकदेहौ द्विधाकृतौ ।
एकचर्यौ महावीर्यावेकस्य शिशुतां गतौ ॥ ४ ॥
एकप्रमाणौ लोकानां देववृत्तान्तमानुषौ ।
कृत्स्नस्य जगतो गोपा संवृत्तौ गोपदारकौ ॥ ५ ॥
अन्योन्यव्यतिषक्ताभिः क्रीडाभिरभिशोभितौ ।
अन्योन्यकिरणग्रस्तौ चन्द्रसूर्याविवांबरे ॥ ६ ॥
विसर्पन्तौ तु सर्वत्र सर्पभोगभुजावुभौ ।
रेजतुः पांसुदिग्धाङ्‌‌‍गौ दॄप्तौ कलभकाविव ॥ ७ ॥
क्वचिद् भस्मप्रदीप्ताङ्‌‌‍गौ करीषप्रोक्षितौ क्वचित् ।
तौ तत्र पर्यधावेतां कुमाराविव पावकी ॥ ८ ॥
क्वचिज्जानुभिरुद्घृष्टैः सर्पमानौ विरेजतुः ।
क्रीडन्तौ वत्सशालासु शकृद्दिग्धाङ्‌‌‍गमूर्धजौ ॥ ९ ॥
शुशुभाते श्रिया जुष्टावानन्दजननौ पितुः ।
जनं च विप्रकुर्वाणौ विहसन्तौ क्वचित् क्वचित् ॥ १० ॥
तौ तत्र कौतूहलिनौ मूर्धजव्याकुलेक्षणौ ।
रेजतुश्चन्द्रवदनौ दारकौ सुकुमारकौ ॥ ११ ॥
अतिप्रसक्तौ तौ दृष्ट्‍वा सर्वव्रजविचारिणौ
नाशकत्तौ वारयितुं नन्दगोपः सुदुर्मदौ ॥ १२ ॥
ततो यशोदा सङ्‌‌‍क्रुद्धा कृष्णं कमललोचनम् ।
आनाय्य शकटीमूले भर्त्सयन्ती पुनः पुनः ॥ १३ ॥
दाम्ना चैवोदरे बद्ध्वा प्रत्यबन्धदुलूखले ।
यदि शक्तोऽसि गच्छेति तमुक्त्वा कर्म साकरोत् ॥ १४ ॥
व्यग्रायां तु यशोदायां निर्जगाम ततोऽङ्‌‌‍गणात् ।
शिशुलीलां ततः कुर्वन् कृष्णो विस्मापयन् व्रजम् ॥ १५ ॥
सोऽङ्‌‌‍गणान्निस्सृतः कृष्णः कर्षमाण उलूखलम् ।
यमलाभ्यां प्रवृद्धाभ्यामर्जुनाभ्यां चरन् वने ।
मध्यान्निश्चक्राम तयोः कर्षमाण उलूखलम् ॥ १६ ॥
तत् तस्य कर्षतो बद्धं तिर्यग्गतमुलूखलम्
लग्नं ताभ्यां सुमूलाभ्यामर्जुनाभ्यां चकर्ष च ॥ १७ ॥
तावर्जुनौ कृष्यमाणौ तेन बालेन रंहसा ।
समूलविटपौ भग्नौ स तु मध्ये जहास वै ॥ १८ ॥
निदर्शनार्थं गोपानां दिव्यं स्वबलमास्थितः ।
तद्दाम तस्य बालस्य प्रभावादभवद् दृढम् ॥ १९ ॥
यमुनातीरमार्गस्था गोप्यस्तं ददृशुः शिशुम् ।
क्रन्दन्त्यो विस्मयन्त्यश्च यशोदां ययुरङ्‌‌‍गनाः ॥ २० ॥
तास्तु संभ्रान्तवदना यशोदामूचुरङ्‌‌‍गनाः ।
एह्यागच्छ यशोदे त्वं संभ्रमात् किं विलम्बसे ॥ २१ ॥
यौ तावर्जुनवृक्षौ तु व्रजे सत्योपयाचनौ ।
पुत्रस्योपरि तावेतौ पतितौ ते महीरुहौ ॥ २२ ॥
दृढेन दाम्ना तत्रैव बद्धो वत्स इवोदरे ।
जहास वृक्षयोर्मध्ये तव पुत्रः स बालकः ॥ २३ ॥
उत्तिष्ठ गच्छ दुर्मेधे मूढे पण्डितमानिनि ।
पुत्रमानय जीवन्तं मुक्तं मृत्युमुखादिव ॥ २४ ॥
सा भीता सहसोत्थाय हाहाकारं प्रकुर्वती ।
तं देशमगमद् यत्र पातितौ तावुभौ द्रुमौ ॥ २५ ॥
सा ददर्श तयोर्मध्ये द्रुमयोरात्मजं शिशुम् ।
दाम्ना निबद्धमुदरे कर्षमाणमुलूखलम् ॥ २६ ॥
सगोपीगोपवृद्धश्च समुवाच व्रजस्तदा ।
पर्यागच्छन्त ते द्रष्टुं गोपेषु महदद्भुतम् ॥ २७ ॥
जजल्पुस्ते यथाकामं गोपा वनविचारिणः ।
केनेमौ पातितौ वृक्षौ घोषस्यायतनोपमौ ॥ २८ ॥
विना वातं विना वर्षं विद्युत्प्रपतनं विना ।
विना हस्तिकृतं दोषं केनेमौ पातितौ द्रुमौ ॥ २९ ॥
अहो बत न शोभेतां विमूलावर्जुनाविमौ ।
भूमौ निपतितौ वृक्षौ वितोयौ जलदाविव ॥ ३० ॥
यदीमौ घोषरचितौ घोषकल्याणकारिणौ ।
नन्दगोप प्रसन्नौ ते द्रुमावेवं गतावपि ।
यच्च ते दारको मुक्तो विपुलाभ्यामपि क्षितौ ॥ ३१ ॥
औत्पातिकमिदं घोषे तृतीयं वर्तते त्विह ।
पूतनाया विनाशश्च द्रुमयोः शकटस्य च ॥ ३२ ॥
अस्मिन्स्थाने च वासोऽयं घोषस्यास्य न युज्यते ।
उत्पाता ह्यत्र दृश्यन्ते कथयन्तो न शोभनम् ॥ ३३ ॥
नन्दगोपस्तु सहसा मुक्त्वा कृष्णमुलूखलात् ।
निवेश्य चाङ्‍के सुचिरं मृतं पुनरिवागतम् ॥ ३४ ॥
नातृप्यत्प्रेक्षमाणो वै कृष्णं कमललोचनम् ।
ततो यशोदां गर्हन् वै नन्दगोपो विवेश ह ॥ ३५ ॥
स च गोपजनः सर्वो व्रजमेव जगाम ह ।
स च तेनैव नाम्ना तु कृष्णो वै दामबन्धनात् ।
गोह्Sठे दामोदर इति गोपीभिः परिगीयते ॥ ३६ ॥
एतदाश्चर्यभूतं हि बालस्यासीद् विचेष्टितम् ।
कृष्णस्य भरतश्रेष्ठ घोषे निवसतस्तदा ॥ ३७ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवांशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां यमलार्जुनभङ्‌‌‍गे नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥


यमलार्जुनभंग -

वैशंपायन सांगतात: - दिवसेंदिवस संकर्षण व कृष्ण ही नांवें धारण करणारे ते दोघेही सुंदर पुत्र मोठे होत चालले व रांगूं लागले. ते परस्परांचे अंश होते यामुळे बालपणपासूनच ते एकमेक मिळून वागूं लागले. वस्तुतः ते एक मूर्तीचे भिन्न अंश होते. त्यांची कांति बालचंद्र व सूर्य यांच्याप्रमाणें तेजःपुंज होती. ते अभिन्न असून जन्मातीत होते. त्यांची निद्रा, बसणेंउठणें व भोजनविधि ही एकत्र व एकच प्रकारची होतीं. ते सारखाच पोषाख घालीत व एकच स्वरूपाचें व्रताचरण पाळीत. एकच कार्य घडवून आणण्यासाठी त्यांचा अवतार होता. एकाच देहाचे ते दोन भाग होते. त्यांची वागणूक एकसारखी असून ते फार पराक्रमी होते. त्यांनीं एकाच मातापितरांच्या पोटीं जन्म घेतला होता. त्यांचे अवयवांतील प्रमाण देखील सारखे होतें. पापी लोकांचे निर्दलन करून यज्ञयागादिकांचा अबाधित प्रचार करणें हा जो देवांचा सिद्धांत तो पुरा करण्यासाठीं ते मनुष्यरूपानें या जगांत अवतीर्ण होऊन आले होते. अखिल जगताचे गोप ( पालक ) गोपकुलांमध्यें जन्मास आले होते. उभयतांच्या क्रीडा देखील एकमेकांत मिळूनमिसळून असल्यामुळें ते फार शोभिवंत दिसत. आकाशामध्ये पौर्णिमेच्या दिवशीं सूर्य व चंद्र यांचे अस्तोदय एकमेकांत मिसळून घडतात.

त्याप्रमाणें ते एकमेकांच्या तेजांत गुरफाटले असत. त्याच्या भुजा सर्पाच्या देहाप्रमाणे ( लांब ) होत्या. त्यांचीं शरीरें जेव्हां धुळीनें मलिन होत त्या वेळीं मत्त झालेल्या हत्तीच्या छाव्यांप्रमाणें ते शोभायमान दिसत. त्यांच्या देहावर कधीं भस्माचे पट्टे असत, तर कधीं गोमयानें त्यांची शरीरें माखून जात. गोकलामध्ये ते जेव्हां संचार करतांना दृष्टीस पडत तेव्हां अग्नीचे पुत्र कार्तिकस्वामी यांची आठवण झाल्यावांचून रहात नसे. केव्हां केव्हां ते गुडघ्यांवर सरपटत त्या वेळीं मोठी मौज दिसे. वासरें बांधावयाच्या गोठ्यांत त्यांची क्रीडा सुरू झाली ह्मणजे तेथील शेण अंगावर उडून त्यांचे मस्तकावरील केंसही माखून जात. तेव्हां ते सौंदर्यलक्ष्मीनें युक्त असल्याकारणानें फार मनोहर दिसत. त्यांच्या लीला पाहून पित्याला फार आनंद होई. नवनीत वगैरे पदार्थांची चोरी करून ते लोकांना त्रास देत. केव्हां त्यांचे चेहेऱ्यावर मधुर हास्याची, तर कधी जिज्ञासेची छटा दृग्गोचर होई. त्यांचे मस्तकावरील केंस डोळ्यांवर आले ह्मणजे ते अत्यंत घाबरून जात. त्यांचीं वदनें चंद्रासारखी मनोहर असल्यामुळें, ते सुकुमार पुत्र अत्यंत रमणीय दिसत. खोडकरपणा करण्याची त्यांना फार हौस होती. सर्व गोकुळभर त्यांचा धिंगाणा चालत असे. नंदाला त्यांना आवर घालता आला नाहीं. किंबहुना खोडकरपणापासून त्यांचें निवारण करणे अशक्यच होतें.

एकदांअसें झालें कीं, यांच्या खोडकरपणामुळें यशोदेला फार राग आला. तेव्हां तिनें कमललोचन श्रीकृष्णाला शकडीपाशीं खेंचून आणून वारंवार त्याची निर्भर्त्सना केली, व पोटाला दावें लावून त्याला उखळीशीं बांधून टाकलें. मग ती त्याला म्हणाली, " तुझी शक्ति असली तर येथून निसटून जा पाहूं. " इतकें बोलून ती आपल्या कामाला लागली.

यशोदा आपल्या गृहकृत्यांत चूर झाली आहेअसें पाहून कृष्ण अंगणांतून ( उखळी सकट ) निघाला. त्याची लीला चालूच होती. हा प्रकार पाहून व्रजवासी जनांना फार विस्मय वाटला. कृष्ण जो उखळी ओढीत अंगणांतून निघाला तो थेट वनांत गेला. तेथें यमलार्जुन नांवांचे दोन जुनाट वृक्ष होते. त्यांच्या मधून तो उखळी ओढीत निघून जाऊं लागला. असें करतांना त्याला बांधलेली उखळी त्या जुळे वृक्षांत अडकली. तेव्हां उखळीबरोबर तो ते दोन्ही वृक्ष मुळासकट ओढू लागला. त्या बालकानें मोठ्या जोरानें उखळी ओढताक्षणी ते अर्जुन वृक्ष मुळासकट तुटून पडले. इतकें झालें तरी हा आपला त्या दोन वृक्षांचे दरम्यान हंसतोच आहें.

आपले अंगची दिव्य शक्ति गोपांचे निदर्शनास आणून देण्याकरितां, श्रीकृष्ण वरील अभ्‍दुत कर्म करून तेथेंच राहिला. त्याच्याच प्रभावामुळे त्याला बांधलेले दावे मात्र भक्कम झालें. यमुनाकांठच्या रस्त्यानें कांहीं गोपस्‍त्रिया चालल्या होत्या, त्यांनीं जेव्हां ही ( कृष्णाची ) स्थिति पाहिली तेव्हां त्या आश्चर्यचकित होत्सात्या आरडत यशोदेपाशीं आल्या. त्या अगदीं गोंधळून गेल्या होत्या. त्या यशोदेला म्हणूं लागल्या. " यशोदे, अग लवकर चल. पाऊल उचल. ऊठ. गोंधळल्यासारखें करून वेळ काय लावतेस ? अग ते कल्पतरू अर्जुनवृक्ष आहेतना ते दोन्ही तुझ्या मुलाचे अंगावर पडले आहेत आणि वांसराप्रमाणें तूं दाव्यानें उखळीला बांधलेला तुझा मलगा त्या दोन्ही वृक्षांच्या मध्ये हसत बसला आहे. अग वेडे, ऊठ, खुळे तुला आपल्या शहाणपणाची मोठी घमेंड आहे नाहीं का, चल आणि काळाच्या जाबड्यांतून सुटून जिवंत राहिलेल्या आपल्या मुलाला घेऊन ये कशी. " गोपीचे हें भाषण ऐकून भयभीत झालेली यशोदा, लगबगीने उठली व हाहाकार करून ओरडत ज्या ठिकाणी ते प्रचंड वृक्ष मोडून पडले होते तथे येऊन पहाते तो, आपला दाव्याने उखळीला बांधलेला पुत्र उपरोक्त अर्जुनवृक्षांच्या मध्ये उखळीला ओढीत आहे असें तिच्या दृष्टीस पडलें. ( इतक्यांत ती बातमी गांवभर पसरून ) सर्व गोपस्‍त्रिया, व लहानथोर पुरुष तो आश्चर्यकारक प्रकार पहावयासाठीं त्या जागी गोळा झाले. नेहमी रानावनात भटकणारे गोप आपआपसांत वरील प्रकाराबद्दल वाटतील ते तर्कवितर्क करूं लागले. " सर्व गौळवाड्याला देवासारखे पूज्य असलेले हे वृक्ष कोणी बरें मोडले ? वादळ झालें नाही, पाऊस पडला नाहीं, वीज कडाडली नाहीं किंवा हत्ती माजलेला नाही. मग हे वृक्ष मोडले कसे ? खरोखर हे मुळावेगळे झालेले वृक्ष विशोभित दिसतात. जमीनदोस्त झालेले हे द्रुम जलरहित मेघांप्रमाणे निस्तेज झाले आहेत. आपल्या गौळवाड्यातच हे वृक्ष वाढलेले असून यांचेपासन आपल्या गांवाचे नेहमी कल्याण झालें आहे. हे नंदा, जरी या वृक्षांचीअशी वाताहत झाली आहे, तरी यांची तुझ्यावर कृपा असल्याचें दिसतआहे. कारण, ते प्रचंड वृक्ष जमीनीवर मोडून पडले आहेत तरी त्यांनीं तुझ्या बालकाला कांहीं एक इजा केलेली नाहीं. या आपल्या गांवीं हा तिसरा उत्पात आहे. गाडा उलटणें, पूतनेचा मृत्यु हे दोन व या प्रचंड वृक्षांचा नाश, हा तिसरा. आतां आपला गौळवाडा ह्या ठिकाणी ठेवणे योग्य नाहीं. कारण, अशुभसूचक उत्पात येथें घडत आहेत."

गोकुलवासी लोकांची याप्रमाणें भाषणें चाललीं असतां नंदाने कृष्णाची उखळीपासून सुटका करून पुनर्जन्म झालेल्या आपल्या पुत्राला पुष्कळ वेळ मांडीवर घेतलें. कमलनयन श्रीकृष्णाच्या मुखाकडे तो एकसारखा पहात होता, तरी त्याची तृप्ति झाली नाहीं. त्यानें यशोदेला पुष्कळ दोष दिला. नंतर सर्व गोप व नंद आपआपल्या घरी गेले. गोठ्यामध्ये कृष्णाला दाव्याने बांधन ठेवले होतें या गोष्टीवरून दामोदर या नांवानें गोपी त्याला संबोधू लागल्या. हे भरतश्रेष्ठा, गोकुलात असताना कृष्णाने लहानपणी आश्चर्यकारक लीला करून दाखविली.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
यमलार्जुनभङ्‌‌‍गः नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
अध्याय सातवा समाप्त

GO TOP