श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
षष्ठोऽध्यायः


शकटभङ्‌‌‍गपूतनावधौ

वैशंपायन उवाच
तत्र तस्यासतः कालः सुमहानत्यवर्तत ।
गोव्रजे नन्दगोपस्य बल्लवत्वं प्रकुर्वतः ॥ १ ॥
दारकौ कृतनामानौ ववृधाते सुखं च तौ ।
ज्येष्ठः संकर्षणो नाम कनीयान् कृष्ण एव तु ॥ २ ॥
मेघकृष्णस्तु कृष्णोऽभूद् देहान्तरगतो हरिः ।
व्यवर्धत गवां मध्ये सागरस्य इवाम्बुदः ॥ ३ ॥
शकटस्य त्वधः सुप्तं कदाचित्पुत्रगृद्धिनी ।
यशोदा तं समुत्सृज्य जगाम यमुनां नदीम् ॥ ४ ॥
शिशुलीलां ततः कुर्वन् स हस्तचरणौ क्षिपन् ।
रुरोद मधुरं कृष्णः पादावूर्ध्वं प्रसारयन् ॥ ५ ॥
स तत्रैकेन पादेन शकटं पर्यवर्तयत् ।
न्युब्जं पयोधराकाङ्‌‌‍क्षी चकार च रुरोद च ॥ ६ ॥
एतस्मिन्नन्तरे प्राप्ता यशोदा भयविक्लवा ।
स्नाता प्रस्रवदिग्धाङ्‌‌‍गी बद्धावत्सेव सौरभी ॥ ७ ॥
सा ददर्श विपर्यस्तं शकटं वायुना विना ।
हाहेति कृत्वा त्वरिता दारकं जगृहे तदा ॥ ८ ॥
न सा बुबोध तत्त्वेन शकटं परिवर्तितम् ।
स्वस्ति ते दारकायेति प्रीता भीतापि साभवत् ॥ ९ ॥
किं तु वक्ष्यति ते पुत्र पिता परमकोपनः ।
त्वय्यधः शकटे सुप्ते अकस्माच्च विलोडिते ॥ १० ॥
किं मे स्नानेन दुःस्नानं किं च मे गमने नदीम् ।
पर्यस्ते शकटे पुत्र या त्वां पश्याम्यपावृतम् ॥ ११ ॥
एतस्मिन्नन्तरे गोभिराजगाम वनेचरः ।
काषायवाससी बिभ्रन् नन्दगोपो व्रजान्तिकम् ॥ १२ ॥
स ददर्श विपर्यस्तं भिन्नभाण्डघटीघटम् ।
अपास्तधूर्विभिन्नाक्षं शकटं चक्रमौलिनम् ॥ १३ ॥
भीतस्त्वरितमागत्य सहसा साश्रुलोचनः ।
अपि मे स्वस्ति पुत्रायेत्यसकृद् वचनं वदन् ॥ १४ ॥
पिबन्तं स्तनमालक्ष्य पुत्रं स्वस्थोऽब्रवीत् पुनः ।
वृषयुद्धं विना केन पर्यस्तं शकटं मम ॥ १५ ॥
प्रत्युवाच यशोदा तं भीता गद्‌गदभाषिणी ।
न विजानाम्यहं केन शकटं परिवर्तितम् ॥ १६ ॥
अहं नदीं गता सौम्य चैलप्रक्षालनार्थिनी ।
आगता च विपर्यस्तमपश्यं शकटं भुवि ॥ १७ ॥
तयोः कथयतोरेवमब्रुवंस्तत्र दारकाः ।
अनेन शिशुना यानमेतत्पादेन लोडितम् ॥ १८ ॥
अस्माभिः संपतद्‌भिश्च दृष्टमेतद् यदृच्छया ।
नन्दगोपस्तु तच्छ्रुत्वा विस्मयं परमं ययौ ॥ १९ ॥
प्रहृष्टश्चैव भीतश्च किमेतदिति चिन्तयन् ।
न च ते श्रद्धधुर्गोपाः सर्वे मानुषबुद्धयः ॥ २० ॥
आश्चर्यमिति ते सर्वे विस्मयोत्फुल्ललोचनाः ।
स्वे स्थाने शकटं प्राप्य चक्रबन्धमकारयन् ॥ २१ ॥
वैशंपायन उवाच
कस्यचित्त्वथ कालस्य शकुनी वेषधारिणी ।
धात्री कंसस्य भोजस्य पूतनेति परिश्रुता ॥ २२ ॥
पूतना नाम शकुनी घोरा प्राणिंभयङ्‌‌‍करी ।
आजगामार्धरात्रे वै पक्षौ क्रोधाद् विधुन्वती ॥ २३ ॥
ततोऽर्धरात्रसमये पूतना प्रत्यदृश्यत ।
व्याघ्रगंभीरनिर्घोषं व्याहरन्ती पुनः पुनः ॥ २४ ॥
निलिल्ये शकटस्याक्षे प्रस्रवोत्पीडवर्षिणी ।
ददौ स्तनं च कृष्णाय तस्मिन् सुप्ते जने निशि ॥ २५ ॥
तस्याः स्तनं पपौ कृष्णः प्राणैः सह विनद्य च ।
छिन्नस्तनी तु सहसा पपात शकुनी भुवि ॥ २६ ॥
तेन शब्देन वित्रस्तास्ततो बुबुधिरे भयात् ।
स नन्दगोपो गोपा वै यशोदा च सुविक्लवा ॥ २७ ॥
ते तामपश्यन् पतितां विसंज्ञां विपयोधराम् ।
पूतनां पतितां भूमौ व्रजेणेव विदारिताम् ॥ २८ ॥
इदं किं त्विति संत्रस्ताः कस्येदं कर्म चेत्यपि ।
नन्दगोपं पुरस्कृत्य गोपास्ते पर्यवारयन् ॥ २९ ॥
नाध्यगच्छन्त च तदा हेतुं तत्र कदाचन ।
आश्चर्यमाश्चर्यमिति ब्रुवन्तोऽनुययुर्गृहान् ॥ ३० ॥
गतेषु तेषु गोपेषु विस्मितेषु यथागृहम् ।
यशोदां नन्दगोपस्तु पप्रच्छ गतसंभ्रमः ॥ ३१ ॥
कोऽयं विधिर्न जानामि विस्मयो मे महानयम् ।
पुत्रस्य मे भयं तीव्रं भीरुत्वं समुपागतम् ॥ ३२ ॥
यशोदा त्वब्रवीद् भीता नार्य जानामि किं त्विदम् ।
दारकेण सहानेन सुप्ता शब्देन बोधिता ॥ ३३ ॥
यशोदायामजानन्त्यां नन्दगोपः सबान्धवः ।
कंसाद् भयं चकारोग्रं विस्मयं च जगाम ह ॥ ३४ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवांशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां शकटभङ्‌‌‍गपूतनावधे षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥


श्रीकृष्णाची बाललीला व पूतनेचा वध -

वैशंपायन सांगतातः- याप्रमाणें त्या व्रजनगरीमध्ये गुप्तपणे गवळ्याचा धंदा करून नंद राहिला असतां बराच काळ लोटला. तेथें त्याचे घरांत नामकरण विधी होऊन तीं उभयतां बालके सुखाने नांदत होतीं ज्येष्ठ पुत्राचे नांव संकर्षण असें ठेविले होतें. आणि धाकट्याला श्रीकृष्ण असें ह्मणत. श्रीविष्णूनेंच मेघासारखा श्यामवर्ण धारण करून कृष्णरूपानें हा दुसरा अवतार घेतला होता. सागराच्या जलाने जसा मेघ वृद्धिंगत होतो, त्याप्रमाणें गोरस भक्षण करून गोकुलामध्ये कृष्णपरमात्मा वाढत होता.

एके दिवशीं कृष्ण शकटाखालीं निजला असतां त्याला तसाच टाकून प्रातःस्‍नानासाठी उत्कंठित झालेली यशोदा यमुना नदीवर गेली. इकडे बाललीला करण्याच्या मिषानें हातपाय आपटून कृष्णानें मधुर स्वराने रडण्यास आरंभ केला. पुढें पाय वर करून एका पायानें त्यानें तो शकट उलटविला. नंतर स्तनपानासाठी टाहो फोडून तो तेथेंच पालथा पडून रडूं लागला.

इतक्यांत स्‍नान आटोपून यशोदा परत आली. तिला पुत्राचे आरडणें ऐकून फार भय वाटलें. एखाद्या पान्हवलेल्या व दुभत्या गाईचे वासरू आटोपून बांधले असतां तिची जशी स्थिति होते त्याप्रमाणें यशोदेचे सर्व अंग दुग्धाच्या धारांनी माखून गेलें. सोसाट्याचा वारा सुटला नसतांना राकट उलथून पडला आहे हें अवलोकन करतांच मोठा हाहाःकार करून तिनें आधीं लगबगीने पुत्राला उचलन घेतलें. गाडा उलटण्याचे खरें कारण तिच्या लक्षांत आलें नाहीं. तथापि, आपल्या लाडक्याला त्यापासून कांहीं इजा झाली नाहीं हें पाहून तिला फार आनंद झाला, व लागलीच भीतिही वाटली. तेव्हां पुत्राला संबोधून यशोदा म्हणाली, " बाळा तान्हुल्या, तूं गाड्याखाली निजला असतांना अकस्मात् तो गाडा उलटला ही वार्ता कानी पडताच तुझा अति रागीट पिता मला काय बरें म्हणेल ? नदीवर जाऊन आतांच स्‍नान करायचे माझे काय अडले होते ! या स्‍नानाला जाण्यापायीं हा गाडा उलटून, हे वत्सा, त्याच्या खालीं संकटावह स्थितींत तुला उपडा पडलेला पाहण्याचे माझ्या नशिबीं आलें त्या अर्थी खरोखर हें माझे स्‍नान अपशकुनी होय. " ( यशोदा याप्रमाणे बोलत आहे ) तोच काषायवस्‍त्रे परिधान केलेला नंद गांईसह वर्तमान रानांतून घरीं परत आला.

तेव्हां गाड्याचा आस, जूं , मोडून त्यांतील भांडी, गाडगीं, लोटकीं फुटून गेली असून, तो उलटल्यामुळें त्याची चाके वर झाली आहेत, असें त्याच्या दृष्टीस पडलें. हा प्रकार पाहण्याबरोबर तो एकदम भयभीत झाला व त्याचे नेत्र पाण्यानें भरून आले. आणि त्वरेने यशोदेसन्निध येऊन, " कां गे, माझ्या बच्चाला कांहीं इजा झाली नाहीना ? " हा प्रश्न तो तिला पुन : पुनः विचारूं लागला. इतक्यांत आपला पुत्र स्तनपान करीत आहे इकडे त्याचें लक्ष गेलें व तो स्वस्थचित्त झाला. मग त्यानें पुनः विचारले कीं, " बैलांची झोंबी वगैरे कांहीं एक कारण घडले नसतां हा माझा गाडा कोणी उलटला ? " नंदाचा प्रश्न ऐकून भयभीत झालेल्या यशोदेने सद्गदित होऊन अडखळत उत्तर दिलें. "गाडा कोणी उलटला हें मला माहीत नाहीं. महाराज, वस्‍त्रे धुण्याच्या हेतूनें मी नदीवर गेलें होतें, आणि परत येऊन पहातें तो हा गाडा जमिनीवर उलटलेला माझ्या नजरेस पडला."

याप्रमाणे त्या दोघांची परस्पर प्रश्नोत्तरे चालली आहेत इतक्यांत तेथें उभी असलेलीं बालके म्हणू लागली कीं, आम्ही सगळे जमून इकडे येत होतो, तो या तुमच्या मुलानें पायाचा धक्का देऊन हा गाडा उलटल्याचे सहज आमच्या दृष्टीस पडलें. बालकांचें भाषण ऐकून नंदाला अत्यंत आश्चर्य वाटलें व आनंदही झाला. त्या बरोबरच हा काय चमत्कार असावा म्हणून तो मनाशीं विचार करीत असतां त्याला थोडे भयही वाटल्यावांचून राहिलें नाहीं.

परंतु वरील गोष्टीवर, इतर गोपांचा विश्वास बसेना. त्यांच्या बुद्धीची धाव मानवी बुद्धीच्या विवक्षित मर्यादेपलीकडे जाणें शक्य नव्हतें. तथापि हा आश्चर्यकारक प्रकार पाहून त्यांचे नेत्र विस्मयानें विस्तृत झाले. त्या सर्वांनी मिळून गाडा पुन : होता तसाच केल्यावर त्याची चाकें बांधून काढली.

वैशंपायन सांगतात : - या गोष्टीलाही आणखी कांहीं काल लोटल्यावर, भोज कंसाची धात्री म्हणून लोकांना माहीत असलेली पूतना नांवाची घोर व दुसऱ्याचे प्राण हरण करणारी राक्षसी, पक्षिणीचें रूप धारण करून मध्यरात्रीचे सुमारास रागानें आपले पंख फडफडवीत गोकुलामध्ये प्राप्त झाली. तेव्हां व्याघाप्रमाणें वारंवार गंभीर गर्जना करीत असतांना तेवढ्या रात्रीं लोकानी तिला पाहिली. तिच्या स्तनांतून दुग्धस्‍त्राव होत होता व त्यामुळें तिला फार वेदना होत होती. अशा स्थितींत उपरोक्त शकटाच्या कण्यावर ती पडून राहिली आणि लोकांची निजानीज झाल्यावर तिने आपला स्तन कृष्णाचे मुखांत दिला. श्रीकृष्णानें मोठी गर्जना करून, तिचे स्तन व त्याबरोबर प्राणही शोषून घेतले. तात्काळ त्या पक्षिणीचे स्तन तुटून पडले व ती धाडकन् जमिनीवर आदळली. तेव्हां मोठा आवाज झाला. तेणेंकरून भयभीत होऊन सर्व लोक जागृत झाले. तों गतप्राण होऊन भूमीवर पडलेली स्तनरहित पूतना, नंदादिक गोप व विशेषेंकरून व्याकुल झालेली यशोदा या सर्वांच्या दृष्टीस पडली. वज्रासारख्या शस्‍त्राच्या आघातानें पूतनेची अशी स्थिति झाली असावी असें त्यांना वाटलें. हा विचित्र प्रकार अवलोकनांत आल्यामुळे सर्व लोक गोंधळून गेले. आणि हे कोणाचे कृत्य असावें बरें असा विचार करीत, नंदाला पुढें करून त्याचे पाठीमागें व पूतनेच्या सभोंवतीं ते सर्व गोप उभे राहिले. वरील प्रकाराचें सत्य स्वरूप व त्यांतील हेतु कोणाच्याच लक्षांत येईना. तेव्हां " हें मोठे आश्चर्य आहे बोवा, " असें म्हणत ते घरोघर निघून गेले. आश्चर्यभरित झालेले गोप आपआपल्या घरीं गेल्यानंतर, नंद किंचित् भयरहित होऊन यशोदेस म्हणाला, " हा काय प्रकार असावा याची मला कल्पनाही होत नाही. मी अगदीं आश्चर्यमूढ झालो आहें. माझ्या पुत्रावर हें मोठे अरिष्ट कोसळले आहे असें मला वाटतें." भयभीत झालेल्या यशोदेने उत्तर केले, " महाराज मलाही पण यांतील कांहीं ठाऊक नाहीं. मी पुत्राला सन्निध घेऊन निजले होतें आणि आवाज ऐकतांच दचकून उठले एवढे मला माहीत आहे. यशोदेलाही कांहीं ठाऊक नाहीं असें पाहून विस्मित झालेले नंद व त्याचे बांधव हे हें कंसाचे घोर कर्म असावें असा तर्क करून त्याला थरक भिऊ लागले.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
शकटभङ्‌‌‍गपूतनावधौ नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
अध्याय सहावा समाप्त

GO TOP