श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
पञ्चमोऽध्यायः


नन्दव्रजगमनम्

वैशंपायन उवाच
प्रागेव वसुदेवस्तु व्रजे शुश्राव रोहिणीम् ।
प्रजातां पुत्रमेवाग्रे चन्द्रात्कान्ततराननम् ॥ १ ॥
स नन्दगोपं त्वरितः प्रोवाच शुभया गिरा ।
गच्छानया सहैव त्वं व्रजमेव यशोदया ॥ २ ॥
तत्र तौ दारकौ गत्वा जातकर्मादिभिर्गुणैः ।
योजयित्वा व्रजे तात संवर्धय यथासुखम् ॥ ३ ॥
रौहिणेयं च पुत्रं मे परिरक्ष शिशुं व्रजे ।
अहं वाच्यो भविष्यामि पितृपक्षेषु पुत्रिणाम् ॥ ४ ॥
योऽहमेकस्य पुत्रस्य न पश्यामि शिशोर्मुखम् ।
ह्रियते हि बलात् प्रज्ञा प्राज्ञस्यापि ततो मम ॥ ५ ॥
अस्माद्धि मे भयं कंसान्निर्घृणाद् वै शिशोर्वधे ।
तद्यथा रौहिणेयं त्वं नन्दगोपं ममात्मजम् ॥ ६ ॥
गोपायसि यथा तात तत्त्वान्वेषी तथा कुरु ।
विघ्ना हि बहवो लोके बालानुत्त्रासयन्ति हि ॥ ७ ॥
स च पुत्रो मम ज्यायान् कनीयांश्च तवाप्ययम् ।
उभावपि समं नाम्ना निरीक्षस्व यथासुखम् ॥ ८ ॥
वर्धमानावुभावेतौ समानवयसौ यथा ।
शोभेतां गोव्रजे तस्मिन् नन्दगोप तथा कुरु ॥ ९ ॥
बाल्ये केलिकिलः सर्वो बाल्ये मुह्यति मानवः ।
बाल्ये चण्डतमः सर्वस्तत्र यत्‍नपरो भव ॥ १० ॥
न च वृन्दावने कार्यो गवां घोषः कथंचन ।
भेतव्यं तत्र वसतः केशिनः पापदर्शिनः ॥ ११ ॥
सरीसृपेभ्यः कीटेभ्यः शकुनिभ्यस्तथैव च ।
गोष्ठेषु गोभ्यो वत्सेभ्यो रक्ष्यौ ते द्वाविमौ शिशू ॥ १२ ॥
नन्दगोप गता रात्रिः शीघ्रयानो व्रजाशुगः ।
इमे त्वां व्याहरन्तीव पक्षिणः सव्यदक्षिणाः ॥ १३ ॥
रहस्यं वसुदेवेन सोऽनुज्ञातो महात्मना ।
यानं यशोदया सार्धमारुरोह मुदान्वितः ॥ १४ ॥
कुमारस्कन्धवाह्यायां शिबिकायां समाहितः ।
संवेशयामास शिशुं शयनीयं महामतिः ॥ १५ ॥
जगाम च विविक्तेन शीतलानिलसर्पिणा ।
बहूदकेन मार्गेण यमुनातीरगामिना ॥ १६ ॥
स ददर्श शुभे देशे गोवर्धनसमीपगे ।
यमुनातीरसंबद्धं शीतमारुतसेवितम् ॥ १७ ॥
विरुतश्वापदै रम्यं लतावल्लीमहाद्रुमम् ।
गोभिस्तृणविलग्नाभिः स्यन्दन्तीभिरलङ्‌‌‍कृतम् ॥ १८ ॥
समप्रचारं च गवां समतीर्थजलाशयम् ।
वृषाणां स्कन्धघातैश्च विषाणोद्घृष्टपादपम् ॥ १९ ॥
भासामिषादानुसृतैः श्येनैश्चामिषगृध्नुभिः ।
सृगालमृगसिंहैश्च वसामेदाशिभिर्वृतम् ॥ २० ॥
शार्दूलशब्दाभिरुतं नानापक्षिसमाकुलम् ।
स्वादुवृक्षफलं रम्यं पर्याप्ततृणवीरुधम् ॥ २१ ॥
गोव्रजं गोरुतं रम्यं गोपनारीभिरावृतम् ।
हम्भारवैश्च वत्सानां सर्वतः कृतनिःस्वनम् ॥ २२ ॥
शकटावर्तविपुलं कण्टकीवाटसङ्‌‌‍कुलम् ।
पर्यन्तेष्वावृतं वन्यैर्बृहद्भिः पतितैर्द्रुमैः ॥ २३ ॥
वत्सानां रोपितः कीलैर्दामभिश्च विभूषितम् ।
करीषाकीर्णवसुधं कटच्छन्नकुटीमठम् ॥ २४ ॥
क्षेम्यप्रचारबहुलं हृष्टपुष्टजनावृतम् ।
दामनीपाशबहुलं गर्गरोद्‌गारनिःस्वनम् ॥ २५ ॥
तक्रानिःस्रावबहुलं दधिमण्डार्द्रमृत्तिकम् ।
मन्थानवलयोद्‌गारैर्गोपीनां जनितस्वनम् ॥ २६ ॥
काकपक्षधरैर्बालैर्गोपालक्रीडनाकुलम् ।
सार्गलद्वारगोवाटं मध्ये गोस्थानसंकुलम् ॥ २७ ॥
सर्पिषा पच्यमानेन सुरभीकृतमारुतम् ।
नीलपीताम्बराभिश्च तरुणीभिरलङ्‌‌‍कृतम् ॥ २८ ॥
वन्यपुष्पावतंसाभिर्गोपकन्याभिरावृतम् ।
शिरोभिर्घृकुम्भभिर्बद्धैरग्रस्तनाम्बरैः ॥ २९ ॥
यमुनातीरमार्गेण जलहारीभिरावृतम् ।
स तत्र प्रविशन् हृष्टो गोव्रजं गोपनादितम् ॥ ३० ॥
प्रत्युद्‌गतो गोपवृद्धैः स्त्रीभिर्वृद्धाभिरेव च ।
निवेशं रोचयामास परिवर्ते सुखाश्रये ॥ ३१ ॥
सा यत्र रोहिणी देवी वसुदेवसुखावहा ।
तत्र तं बालसूर्याभं कृष्णं गूढं न्यवेशयत् ॥ ३२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
गोव्रजगमनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥


नंदाचे व्रजनगरीप्रत गमन -

वैशंपायन सांगतात:- गोकुलामध्ये पाठविलेल्या रोहिणीचे पोटीं चंद्रापेक्षा अधिक रमणीय तोंडवळ्याचा पुत्र जन्मास आल्याचें वर्तमान देवकी प्रसूत होण्यापूर्वीच वसुदेवाला समजले होतें. म्हणून करदानार्थ मथुरेस आलेल्या नंदाला विलंब न करतां गांठन वसुदेव मधुर वाणीने म्हणाला; 'बा नंदा या यशोदेसहवर्तमान तूं गोकुळांतच जा; व तेथें गेल्यानंतर, दोघांहि पुत्रांचे जातकर्मादिक संस्कार करून, त्यांचें मोठ्या काळजीने संगोपन कर. गोकुळामध्ये रोहिणीच्या पोटीं आलेल्या माझ्या लाडक्या बालकाचे लालनपोषण कर. ( खरोखर) पितृपक्षाकडील पुत्रवान् लोकांच्या मी निंदेला पात्र होणार. कारण, दोहोंतून एकाही तान्ह्या मूलाचे मुख अवलोकन करण्याचें ( सुख ) माझ्या नशीबीं नाहीं. मी अक्कलवंत असूनही, माझी अक्कल ( दुर्दैवाच्या ) जोराने नसल्यासारखी होते. ( ती अशी ) माझ्या बालकाचा हा निर्दय कंस वध करील कीं काय अशी मला भीति वाटते. म्हणन, बाबा नंदगोपा, माझ्या रौहिणेय पुत्राला, मारण्याकरितां टपलेल्या कंसादिकांचें खरें स्वरूप ओलखून वाग व त्याचें संरक्षण कर. शिवाय लहानपणी मुलाना पुष्कळ प्रकारच्या विघ्नांपासून त्रास होतो असा या संसारांतील नित्याचा अनुभव आहे. माझा पुत्र वडील आहे व तुझा हा कनिष्ठ आहे. पण, दोघांच्या नांवांतीले यौगिक अर्थ एकच आहे. तो. ओळखून, विषम भाव मनांत न आणतां, उभयतांचे संगोपन कर समवयस्क अशीं ही बालकें क्रमानें मोठी होत जाऊन, गोकुलाला शोभा आणतील अशा रीतीनें, हे नंदा, त्यांस पाळ. बाल्यावस्थेत प्रत्येक मनुष्य नाना प्रकारच्या मोहांना बळी पडून, स्वेच्छाचारी व रागीट बनण्याचा संभव असतो. म्हणून आतांच तुला फार जपले पाहिजे. वृंदावनामध्ये तूं कधीही गुरांचा वाडा बांधू नकोस. कारण, तेथें वास्तव्य करून राहिलेल्या पापदृष्टि केशी दैत्याचे त्या ठिकाणी फार भय आहे. सरपटणारे प्राणी, कीड, मुंग्या, पक्षी, गोठ्यातील गाई व वासरे इत्यादिकांपासून या उभयता बालकाचे संरक्षण कर. बा नंदा, रात्र बहुतेक संपत आली आहे. करितां एकाद्या जलद चालणार्‍या वाहनांत बसून तूं आतां येथून जा. हे पहा तुझ्या उजवीकडचे व डावीकडचे पक्षी किलबिल करून तुला जणू काय हांका मारीत आहेत.

याप्रमाणें, महात्म्या वसुदेवानें गुप्तपणानें नंदाला जाण्याची आज्ञा दिल्यावर, तो हर्षभरित होऊन यशोदेसहवर्तमान वाहनारूढ झाला. स्कंधावर ( भोयांनीं ) वाहून न्यावयाच्या शिबिकेतील मृदु शय्येवर त्या सुबुद्ध नंदानें कुमार श्रीकृष्णाला निजवले, आणि तो यमुना नदीच्या तीरातीरानें जाणाऱ्या मार्गाने उद्दिष्ट स्थळाकडे जावयास निघाला. तो मार्ग निर्जन व जलमय असून, त्यावरून थंडगार वारा वहात होता.

जातां जातां गोवर्धन पर्वताच्या संन्निध रम्य जागीं यमुनेच्या कांठीं वसलेले असें गोकुल त्याच्या दृष्टीस पडलें. तेथें शीतल वायूचा यथेच्छ संचार चालू होता; विविध प्रकारचे शब्द करणाऱ्या श्वापदांनी त्या व्रजास शोभा आलेली होती. तसेंच नांना तऱ्हेच्या लता, वेली व मोठमोठे वृक्ष त्या ठिकाणी दृग्गोचर होत होते. ठिकठिकाणी तृणाच्या आश्रयाने बसलेल्या दुभत्या गाईच्या कळपांमुळे तें स्थान रमणीय दिसत होतें. तेथील, गाईंचे जाण्याचे व जलाशयांत उतरण्याचे मार्गात खांचखळगे वगैरे कांहीं एक नव्हते. बैलांच्या खांद्याच्या व शिंगांच्या तडाक्यांनीं तेथील वृक्षांच्या साली निघाल्या होत्या. गृध्रादि मांसभक्षक प्राणी आणि त्यांच्या मागें लागलेले ससाणे, वनमार्जारादिक हिंस्त्र पशु, त्याप्रमाणेंच वसा व मेद इत्यादिक भक्षण करून राहणारे कोल्हे, वाघ आणि सिंह यांचेंही तेथें वैपुल्य होतें; व्याघ्रादिकांच्या गर्जनेचे ध्वनि त्या ठिकाणी कानीं पडत होते. नाना प्रकारचे पक्षी तेथें वास्तव्य करून राहिले होते. तेथील वृक्षांना मधुर फळें आलेली होती त्यामुळे तें अधिकच खुलत होतें. तृण व वेली या तेथें विपुल होत्या. त्या रमणीय व्रजांत गाईंचें हंबरणें ऐकू येत होतें.

जिकडे तिकडे गवळीणी दृष्टीस पडत होत्या, व वासरांच्या हंबरण्याचे ध्वनि चोहोकडे ऐकूं येत होते. तेथें गाडे पुष्कळ असून, रस्त्यांवर काटेरी वया घातल्या होत्या; गांवाच्या शीवेवर मोठमोठे वन्य वृक्ष तुटून पडलेले दिसत होते. वासरांसाठीं भूमीत रोवलेले खुंट व गुरांची दावी यांचे योगाने तें गोकुळ फार शोभिवंत दिसत होतें. तेथें जमिनीवर जिकडे तिकडे वाळलेल्या गोमयाचा चूर पडलेला. होता. प्रत्येक झोपडीत व मठीत चटया हांतरलेल्या दिसत होत्या. सुलक्षण गोपवीरांच्या उद्योगीपणामुळें तें भरभराटींत होतें. त्यांतील रहिवाशी सुखी व सदृढ होते. गुरांच्या दावणीच्या रज्जूंनीं तें लांबच लांब दिसत होतें. ताक घुसळीत असतांना डेच्यांतून उठणारे ध्वनींनीं गजबजून गेलें होतें. ताकाचे थेंब भूमीवर सांडल्यामुळें ठिकठिकाणची जागा मलिन झालेली होती. दह्यावरील निवळ फेकलेल्या ठिकाणची मृत्तिका आर्द्र झालेली होती. ताक करण्याचे माथे व गोपींच्या हातांतील बांगड्या वाजत त्यांच्या नादानें सर्व गांव दुमदुमून गेलें होते. झुलुपें धारण करणाऱ्या लहान बालकांच्या गोपालक्रीडा चोहींकडे चालू होत्या. तेथील गोठ्यांना अडसराची दारे होतीं; गुरांनी भरलेल्या गोठ्यानी तें सर्व नगर व्यापून राहिलें होतें. जागजागी तूप कढत होतें, त्या योगाने तेथील वायूला सुगंध प्राप्त झाला होता; नील व पीत वर्णाची वस्‍त्रें परिधान केलेल्या तरुणींच्या संचाराने त्या गोकुलाला अपूर्व शोभा आलेली होती. गोपकन्यांनीं वन्य पुष्पांचे तुरे कानांत खोंवले होते; आंवळ कांचोळ्या घालून व मस्तकावर घडे ठेवून यमुना नदीच्या तीरातीरानें गवळीणींचे थवे पाणी आणण्याकरितां निघालेले दृष्टीस पडत होते, त्या योगाने तें व्रजनगर फार मनोहर दिसत होते.

अशा त्या गोपांनीं गजबजलेल्या गोव्रज नगरामध्ये प्रवेश करतांना नंदाला अत्यानंद झाला. वृद्ध वृद्ध गोप व गोपस्‍त्रिया त्याला सामोऱ्या आल्या होत्या. त्या सुखदायक स्थली रहाणे नंदास मनापासून फार आवडले. ज्या ठिकाणी वसुदेवाला सुखविणारी रोहिणी राहिलेली होती तेथेंच नंदाने बालसूर्याप्रमाणे चमकणाऱ्या श्रीकृष्णास गुप्तपणे ठेऊन दिले.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
नन्दव्रजगमनं नाम पञ्चमोऽध्यायः ॥ ५ ॥
अध्याय पाचवा समाप्त

GO TOP