श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व चतुर्थोऽध्यायः
विष्णुवतारवर्णनम्
वैशंपायन उवाच
कृते गर्भविधाने तु देवकी देवतोपमा ।
जग्राह सप्त तान गर्भान् यथावत्समुदाहृतान् ॥ १ ॥
षड्गर्भान् निस्सृतान् कंसस्ताञ्जघान शिलातले ।
आपन्नं सप्तमं गर्भं सा निनायाथ रोहिणीम् ॥ २ ॥
अर्धरात्रे स्थितं गर्भं पातयन्ती रजस्वला ।
निद्रया सहसाविष्टा पपात धरणीतले ॥ ३ ॥
सा स्वप्नमिव तं दृष्ट्वा गर्भं निःसृतमात्मनः ।
अपश्यन्ती च तं गर्भं मुहूर्तं व्यथिताभवत् ॥ ४ ॥
तामाह निद्रा संविग्नां नैशे तमसि रोहिणीम् ।
रोहिणीमिव सोमस्य वसुदेवस्य धीमतः ॥ ५ ॥
कर्षणेनास्य गर्भस्य स्वगर्भे चाहितस्य वै ।
संकर्षणो नाम सुतः शुभे तव भविष्यति ॥ ६ ॥
सा तं पुत्रमवाप्यैवं हृष्टा किञ्चिदवाङ्मुखी ।
विवेश रोहिणी वेश्म सुप्रभा रोहिणी यथा ॥ ७ ॥
तस्य गर्भस्य मार्गेण गर्भमाधत्त देवकी ।
यदर्थं सप्त ते गर्भाः कंसेन विनिपातिताः ॥ ८ ॥
तं तु गर्भं प्रयत्नेन ररक्षुस्तस्य मन्त्रिणः ।
सोऽप्यत्र गर्भवसतौ वसत्यात्मेच्छया हरिः ॥ ९ ॥
यशोदापि समाधत्त गर्भं तदहरेव तु ।
विष्णोः शरीरजां निद्रां विष्णुनिर्देशकारिणीम् ॥ १० ॥
गर्भकाले त्वसंपूर्णे अष्टमे मासि ते स्त्रियौ ।
देवकी च यशोदा च सुषुवाते समं तदा ॥ ११ ॥
यामेव रजनीं कृष्णो जज्ञे वृष्णिकुलोद्वहः ।
तामेव रजनीं कन्यां यशोदापि व्यजायत ॥ १२ ॥
नन्दगोपस्य भार्यैका वसुदेवस्य चापरा ।
तुल्यकालं च गर्भिण्यौ यशोदा देवकी तथा ॥ १३ ॥
देवक्यजनयद् विष्णुं यशोदा तां तु दारिकाम् ।
मुहूर्तेऽभिजिति प्राप्ते सार्धरात्रे विभूषिते ॥ १४ ॥
सागराः समकम्पन्त चेलुश्च धरणीधराः ।
जज्वलुश्चाग्नयः शान्ता जायमाने जनार्दने ॥ १५ ॥
शिवाश्चप्रववुर्वाताः प्रशान्तमभवद् रजः ।
ज्योतींष्यतिव्यकाशन्त जायमाने जनार्दने ॥ १६ ॥
अभिजिन्नाम नक्षत्रं जयन्ती नाम शर्वरी
मुहूर्तो विजयो नाम यत्र जातो जनार्दनः ॥ १७ ॥
अव्यक्तः शाश्वतः सूक्ष्मो हरिर्नारायणः प्रभुः ।
जायमानो हि भगवान्नयनैर्मोहयन् प्रभुः ॥ १८ ॥
अनाहता दुन्दुभयो देवानां प्राणदन् दिवि ।
आकाशात् पुष्पवृष्टिं च ववर्ष त्रिदशेश्वरः ॥ १९ ॥
गीर्भिर्मङ्गलयुक्ताभिः स्तुवन्तो मधुसूदनम् ।
महर्षयः सगन्धर्वा उपतस्थुः सहाप्सराः ॥ २० ॥
जायमाने हृषीकेशे प्रहृष्टमभवज्जगत् ।
इन्द्रश्च त्रिदशैः सार्धं तुष्टाव मधुसूदनम् ॥ २१ ॥
वसुदेवश्च तं रात्रौ जातं पुत्रमधोक्षजम् ।
श्रीवत्सलक्षणं दृष्ट्वा युतं दिव्यैश्च लक्षणैः ।
उवाच वसुदेवस्तु रूपं संहर वै प्रभो ॥ २२ ॥
भीतोऽहं देव कंसस्य तस्मादेवं ब्रवीम्यहम् ।
मम पुत्रा हतास्तेन तव ज्येष्ठाम्बुजेक्षण ॥ २३ ॥
वैशम्पायन उवाच
वसुदेववचः श्रुत्वा रूपं चाहरदच्युतः ।
अनुज्ञाप्य पितृत्वेन नन्द गोपगृहं नय ॥ २४ ॥
वसुदेवस्तु संगृह्य दारकं क्षिप्रमेव च ।
यशोदाया गृहं रात्रौ विवेश सुतवत्सलः ॥ २५ ॥
यशोदायास्त्वविज्ञातस्तत्र निक्षिप्य दारकम् ।
प्रगृह्य दारिकां चैव देवकीशयनेऽन्यसत् ॥ २६ ॥
परिवर्ते कृते ताभ्यां गर्भाभ्यां भयविक्लवः ।
वसुदेवः कृतार्थो वै निर्जगाम निवेशनात् ॥ २७ ॥
उग्रसेनसुतायाथ कम्सायानकदुन्दुभिः ।
निवेदयामास तदा तां कन्यां वरवर्णिनीम् ॥ २८ ॥
तच्छ्रुत्वा त्वरितः कंसो रक्षिभिः सह वेगिभिः ।
आजगाम गृहद्वारं वसुदेवस्य वीर्यवान् ॥ २९ ॥
स तत्र त्वरितं द्वारि किं जातमिति चाब्रवीत्
दीयतां शीघ्रमित्येवं वाग्भिः समतर्जयत् ॥ ३० ॥
ततो हाहाकृताः सर्वा देवकीभवने स्त्रियः ।
उवाच देवकी दीना बाश्पगद्गदया गिरा ॥ ३१ ॥
दारिका तु प्रजातेति कंसं समभियाचती ।
श्रीमन्तो मे हताः सप्त पुत्रगर्भास्त्वया विभो ॥ ३२ ॥
दारिकेयं हतैवैषा पश्यस्व यदि मन्यसे ।
दृष्ट्वा कंसस्तु तां कन्यामाकृष्यत मुदा युतः ॥ ३३ ॥
हतैवैषा यदा कन्या जातेत्युक्त्वा वृथा मतिः ।
सा गर्भशयने क्लिष्टा गर्भाम्बुक्लिन्नमूर्धजा ॥ ३४
कंसस्य पुरतो न्यस्ता पृथिव्यां पृथिवीसमा ।
स चैनां गृह्य पुरुषः समाविध्यावधूय च ॥ ३५ ॥
उद्यच्छन्नेव सहसा शिलायां समपोथयत् ।
सावधूता शिलापृष्टेऽनिष्पिष्टा दिवमुत्पतत् ॥ ३६ ॥
हित्वा गर्भतनुं सा तु सहसा मुक्तमूर्धजा ।
जगाम कंसमादिश्य दिव्यस्रगनुलेपना ॥ ३७ ॥
हारशोभितसर्वाङ्गी मुकुटोज्ज्वलभूषिता ।
कन्यैव साभवन्नित्यं दिव्य देवैरभिष्टुता ॥ ३८ ॥
नीलपीताम्बरधरा गजकुम्भोपमस्तनी ।
रथ विस्तीर्ण जघना चन्द्रवक्त्रा चतुर्भुजा ॥ ३९ ॥
विद्युद्विस्पष्टवर्णाभा बालार्कसदृशेक्षणा ।
पयोधरस्तनवती संध्येव सपयोधरा ॥ ४० ॥
सा वै निशि तमोग्रस्ते बभौ भूतगणाकुले ।
नृत्यति हसति चैव विपरीतेन भास्वती ॥ ४१ ॥
विहायसी गता रौद्रा पपौ पानमनुत्तमम् ।
जहास च महाहासं कंसं च रुषिताब्रवीत् ॥ ४२ ॥
कंस कंसात्मनाशाय यदहं घातिता त्वया ।
सहसा च समुत्क्षिप्य शिलायामभिपोथिता ॥ ४३ ॥
तस्मात् तवान्तकालेऽहं कृष्यमाणस्य शत्रुणा ।
पाटयित्वा करैर्देहमुष्णं पास्यामि शोणितम् ॥ ४४ ॥
एवमुक्त्वा वचो घोरं सा यथेष्टेन वर्त्मना ।
खं सा देवालयं देवी सगणा विचचार ह ॥ ४५ ॥
सा कन्या ववृधे तत्र वृष्णीसङ्घसुपूजिता ।
पुत्रवत् पाल्यमाना सा वसुदेवाज्ञया तदा ॥ ४६ ॥
विद्धि चैनामथोत्पन्नामंशाद् देवीं प्रजापतेः ।
एकानंशां योगकन्यां रक्षार्थं केशवस्य तु ॥ ४७ ॥
तां वै सर्वे सुमनसः पूजयन्ति स्म यादवाः ।
देववद् दिव्यवपुषा कृष्णः संरक्षितो यया ॥ ४८ ॥
तस्यां गतायां कंसस्तु तां मेने मृत्युमात्मनः ।
विविक्ते देवकीं चैव व्रीडितः समभाषत ॥ ४९ ॥
कंस उवाच
मृत्योः स्वसुः कृतो यत्नस्तव गर्भा मया हताः ।
अन्य एवान्यता देवि मम मृत्युरुपस्थितः ॥ ५० ॥
नैराश्येन कृतो यत्नः स्वजने प्रहृतं मया ।
दैवं पुरुषकारेण न चातिक्रान्तवानहम् ॥ ५१ ॥
त्यज गर्भकृतां चिन्तां संतापं पुत्रजं त्यज ।
हेतुभूतस्त्वहं तेषां सति कालविपर्यये ॥ ५२ ॥
काल एव नृणां शत्रुः कालश्च परिणामकः ।
कालो नयति सर्वं वै हेतुभूतस्तु मद्विधः ॥ ५३ ॥
आगमिष्यन्ति वै देवि यथाभागमुपद्रवाः ।
इदं तु कष्टं यज्जन्तुः कर्ताहमिति मन्यते ॥ ५४ ॥
मा कार्षीः पुत्रजां चिन्तां विलापं शोकजं त्यज ।
एवं प्रायो नृणां योनिर्नास्ति कालस्य संस्थितिः ॥ ५५ ॥
एष ते पादयोर्मूर्ध्ना पुत्रवत्तव देवकि ।
मद्गतस्त्यज्यतां रोषो जानाम्यपकृतं त्वयि ॥ ५६ ॥
इत्युक्तवन्तं कंसं सा देवकी वाक्यमब्रवीत् ।
साश्रुपूर्णमुखा दीना भर्तारमुपवीक्षती ।
उत्तिष्ठोत्तिष्ठ वत्सेति कंसं मातेव जल्पती ॥ ५७ ॥
देवक्युवाच
ममाग्रतो हता गर्भा ये त्वया कामरूपिणा ।
कारणं त्वं न वै पुत्र कृतान्तोऽप्यत्र कारणम् ॥ ५८ ॥
गर्भकर्तनमेतन्मे सहनीयं त्वया कृतम् ।
पादयोः पतता मूर्ध्ना स्वं च कर्म जुगुप्सता ॥ ५९ ॥
गर्भे तु नियतो मृत्युर्बाल्येऽपि न निवर्तते ।
युवापि मृत्योर्वशगः स्थविरो मृत एव तु ॥ ६० ॥
कालपक्वमिदं सर्वं हेतुभूतस्तु तद्विधः ।
अजाते दर्शनं नास्ति यथा वायुस्तथैव च ॥ ६१ ॥
जातोऽप्यजाततां याति विधात्रा यत्र नीयते ।
तद् गच्छ पुत्र मा ते भून्मद्गतं मृत्युकारणम् ॥ ६२ ॥
मृत्युनाऽपहृते पूर्वं शेषो हेतुः प्रवर्तते ।
विधिना पूर्वदृष्टेन प्रजासर्गेण तत्त्वतः ॥ ६३ ॥
मातापित्रोस्तु कार्येण जन्मतस्तूपपद्यते ।
वैशंपायन उवाच
निशम्य देवकीवाक्यं स कंसः स्वं निवेशनम् ॥ ६४ ॥
प्रविवेश स संरब्धो दह्यमानेन चेतसा ।
कृत्ये प्रतिहते दीनो जगाम विमना भृशम् ॥ ६५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि श्रीकृष्णजन्मनि चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
श्रीकृष्णजन्मवर्णन -
वैशंपायन सांगतात: - याप्रमाणें योगनिद्रा आणि परमात्मा श्रीविष्णू यांनी देवकीचे ठिकाणी गर्भयोजना कसकशी करणें याबद्दल संकेत केल्यावर लौकरच देवतेतुल्य सुन्दर जी देवकी ती त्या संकेतानुरूप एकामागून एक असे सात गर्भ धारण करिती झाली. त्यांपैकीं पहिले सहा गर्भ तिचे उदरांतून बाहेर येतांच कंसाने शिलातलावर आपटले. पुढें तिला सातवा गर्भ राहिला त्या वेळीं त्या योगमायेनें तो गर्भ देवकीचे उदरांतून काढून रोहिणीचे उदरांत नेला. इकडे रोहिणीला त्या वेळीं एकाएकीं गाढ निद्रा येऊन ती धरणीवर पडली असतां तिला असें स्वप्न पडलें कीं, आपणास विटाळ आला असून आपल्या पोटांतून गर्भ धरणीवर पडला, व त्याचे ठिकाणी आपले गर्भाशयांत दुसरा गर्भ स्थापित झाला. जागी झाल्यावर पूर्वी स्वप्नांत तिने आपले उदरांतून जो गर्भ खोली पडला म्हणून पाहिले होते तो गर्भ जागृतींत तिला धरणीवर कोठे दिसेना व यामुळें ती कांहीं वेळ फार खिन्न झाली. त्या वेळीं तिला खिन्न पाहून त्या रात्रीच्या काळोखातच योगनिद्रा तिला म्हणाली कीं, हे रोहिणि, तूं खिन्न होऊं नको, तूं या बुद्धिमान् वसुदेवाची रोहिणी म्हणजे वंशवृद्धिकतर्त्री असून चन्द्राची ज्याप्रमाणें रोहिणी ( तारा ) त्याप्रमाणें आवडती आहेस. आणि तूं जो गर्भपाताचा प्रकार पाहिलास त्याचें खरें स्वरूप उलट आहे. तें असें की, हा गर्भ मी देवकीचे उदरांतून आकर्षण करून तुझे उदरांत आणून स्थापिला. याकरिता आतां तुला लौकरच पुत्ररत्न होईल. व अन्य गर्भातून कर्षण करून हा तुझे ठिकाणी शिरल्यामुळे याला संकर्षण असें नांव पडेल. आपणास पुत्रगर्भाचा संभव झाला हें ध्यानी येतांच रोहिणीला पोटांत फार आनंद झाला व लज्जेने किंचित् खालीं मान घालून ती आनंदाने रोहिणीचे तारकेसारखी चमकत आपल्या मन्दिरात शिरली.
इकडे देवकीचे पोट जिरले कीं गर्भपात झाला इत्यादि चौकशी कंसाचे लोक करीत असतां ज्याच्या कारणानें कंसाने देवकीचे सात गर्भ आपटून टाकिले तो ( आठवा ) गर्भ देवकीचे उदरांत पुनरपि संभूत झाला, आणि या वेळीं तर कंसाचे मसलतगार त्या गर्भाच्या अतिशयच जपणीस लागले; आणि परमात्मा हरिहि या गर्भात आपखुषीनें येऊन राहिला होता. ज्या दिवशीं देवकीला हा आठवा गर्भ राहिला त्याच दिवशीं तिकडे नन्दपत्नी जी यशोदा तिलाही गर्भ राहिला; मात्र हा गर्भ विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झालेली व त्याचे आज्ञेबरोवर चालणारी अशी जी योगनिद्रा तिचा होता. देवकी व यशोदा याप्रमाणे गर्भवती होऊन त्यो गर्भाच्या पूर्णतेचा काल म्हणजे नऊ महिने होण्याचे अगोदरच, आठवे महिन्यांत सारख्याच प्रसूत झाल्या. वृष्णिकुलधुरंधर श्रीकृष्ण ज्या रात्रीं जन्मला त्याच रात्रीं यशोदेनेंही आपल्या कन्यागर्भास जन्म दिला. यशोदा आणि देवकी ज्या सारख्याच वेळ गर्भारपणांत होत्या त्यांपैकीं पहिली नन्दगोपाची भार्या व दुसरी वसुदेवाची. यांपैकी देवकी बरोबर मध्यरात्री ( अष्टमीच्या ) अभिजित् मुहूर्तावर ( कृष्णरूपानें ) विष्णूस प्रसवती झाली आणि यशोदा त्या कृष्णाला वसदेवाचे घरून काढून नन्दाचे घरीं आणून पोंचवितां क्षणीच म्हणजे पहाटेची अर्धप्रहर रात्र शिलक आहे तोच वर सांगितलेल्या कन्येला प्रसवती झाली.
कृष्णजन्म होतांच समुद्र हेलकावू लागले, शेषादि धरणीधर मान डोलवू लागले, थंड पडलेले अग्नि धडकले, मंगल वारे वाहू लागले, धूळ शांत झाली, आकाशांतील ज्योती फारच चमकू लागल्या. या प्रमाणें तो अव्यक्त,शाश्वत, सूक्ष्म, व जगाचें दुःख हरणकर्ता प्रभुनारायण जन्मास येतांच स्वर्गात देवांच्या दुंदुभी न वाजविताच शब्द करूं लागल्या. इन्द्र आकाशांतून पुष्पवृष्टि करूं लागला. महर्षि हे गंधर्व अप्सरांसह मंगलवाणीनें त्या मधुसूदनाचे स्तोत्र गात राहिले. सारांश, तो हृषीकेश जन्मास येतांच निखिल जगताला आनंद झाला. व त्यानें उपजतांच जगताकडे दृष्टि फेंकिली, तिजबरोबर सर्व जगताला मोह पडला. असा तो प्रभु ज्या नक्षत्रावर जन्मला त्या नक्षत्राचे नांव अभिजित्, त्या रात्रीचे नांव जयंती, व त्या मुहूर्ताचे नांव विजय. ( याप्रमाणे सर्वच विजयकारक होतें. ) जन्मताच देवगणासह इंद्रही त्याची स्तुति करूं लागला. इकडे वसुदेव त्या रात्रीं आपले पोटीं श्रीवत्सादि दिव्य लक्षणांनीं युक्त असा भगवान् अधोक्षज आलेला पाहून म्हणाला, " हे प्रभो, आपलें दिव्यरूप आवरून घ्या. मी असें सांगतो याचा हेतु, हे देवा, या कंसाचे मला भय वाटतें. कारण, हे कमलाक्षा, या कंसाने माझे ( सात ) पुत्र म्हणजे तुझेच सर्व वडील भाऊ मारिले आहेत. वैशंपायन सांगतात:- वसुदेवाचें तें वचन ऐकून अच्युताने तें आपलें चतुर्भुजात्मक रूप लपविले व पिता या नात्याने वमुदेवाला विनंती केली कीं, " मला आपण ( आतांचे आतां गुप्तपणे ) नन्दनामक गवळ्याचे घरीं नेऊन पोचवा. " ते त्याचे शब्द ऐकतांच तो पोरवेडा वसुदेव त्या मुलाला बंदोबस्तानें गुरफाटून घेऊन क्षणाचा विलंब न करितां रातोरात यशोदेच्या घरीं घेऊन गेला. व यशोदेला नकळत त्या मुलाला तेथें ठेवून तिची नुकतीच झालेली पोरगी बरोबर घेऊन परतला आणि तिला देवकीच्या बिछान्यावर ठेवून देता झाला. याप्रमाणे त्या गर्भाची आदलाबदल केल्यावर एका अर्थी आपण कृतार्थ झालो असें वाटून तो त्या सूतिकागृहांतून बाहेर आला. आणि नंतर मनांत भयविव्हले होऊन त्यानें उग्रसेनपुत्र जो कंस त्याला सांगितलें कीं, आपणांस ( वसुदेवास ) अति सुंदर कन्या झाली. ती वार्ता कानी येतांच कंसाला धीर निघेना. तत्काल बरोबर चलाख रक्षक घेऊन तो बलाढ्य कंस वसुदेवाचे दाराशी येऊन ठेपला. आणि दारी येतांच " काय झालें ? काय झालें ? तें बरे बोलाने आतांचे आतां मजपाशीं घेऊन या " असें म्हणून धमकी देताच बोलूं लागला. ते शब्द कानी येतांच देवकीच्या गृहांतील सर्व स्त्रिया हाहा:कार करूं लागल्या, व स्वतः देवकी दीन होऊन बाष्पगद्गदवाणीनें कंसाला विनवून म्हण लागली " बाबारे ही घे, या खेपेला पोरगीच झाली. तूं शक्तिमान् पडलास तेव्हां मला एकासारखे एक सुंदर सात पुत्र झाले होते, ते सर्वही तूं मारिलेस. या वेळीं मला मुळींच पोरगी झाली व तीही मेल्यासारखीच आहे. तथापि, तुला वाटत असेल तर ही आपली पाहून घे. " याप्रमाणे देवकी बोलतांच त्या मूर्ख कंसाला तसली पोरगी पाहूनही आनंद झाला. आणि मग गर्भाशयांत क्लेश पावल्याने निश्चेष्ट होऊन केवळ पृथ्वीप्रमाणे जड झालेली व गर्भोदकाने जिचे केश ओले झाले आहेत अशी ती कन्या देवकीने त्याचे पुढें भुईवर ठेविली असतां तिला घेऊन गर्गर फिरवून व तिचे हालहाल करून त्यानें अखेरीस शिळेवर ताडकन् आपटून फेकून दिली. याप्रमाणे अवहेलना करून त्यानें आपलेकडून जरी तिला दगडावर आपटून दिली तरी तिचा चुराडा न होतां ती तशीच आकाशांत उडून गेली. जातांना तिने गर्भातून बाहेर आलेले मर्त्य शरीर येथेंच टाकून दिले. आणि दुसरें दिव्य स्वरूप घेतलें. या रूपांत तिने डोकीवर केश मोकळे सोडिले होते, दिव्य पुष्पांच्या माळा घातल्या होत्या व उट्या लाविल्या होत्या, कंठस्थित रत्नहारांनीं तिचे सर्व अंगाला शोभा आली होती, मस्तकी मुकुट झळकत होता, तिच्या नेसूं नीलवस्त्र व अंगावर पीतवस्त्र होतें, तिचे स्तन गजगंडाप्रमाणें पीनोन्नत असून तिचे नितंब रथचक्राप्रमाणे विस्तीर्ण होते. तिचे मुख केवळ चंद्राप्रमाणे आल्हादक असून तिला चार भुजा होत्या. तिचा वर्ण विद्द्युल्लतेप्रमाणें झळाळत असून तिचे नेत्र बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होते.
तिचा स्वर मेघाप्रमाणें गंभीर व मांसल असून ती मेघयुक्त संध्येप्रमाणें शोभत होती. ती सदा कन्याच म्हणजे ब्रह्मचारिणी असून देवही तिची स्तुति करीत असत. त्या अंधारे रात्रीं तिचे भोंवतीं पिशच्चगण जमून त्याबरोबर ती नाचत हसत होती व सभोंवर मधून मधून घेरे घेत असल्यानें फारच खुलत होती. अशा थाटांत ती भयंकर कन्या आकाशांत जाऊन व तेथें अति उंची मद्य पिऊन खदखदा मोठ्याने हसू लागली. आणि रागाने लाल होऊन कंसाला दडपून बोलूं लागली कीं, " हे कंसा, तूं एकाएकीं मला तंगडी धरून भिरकावून शिळेवर आपटून ( आपलेकडून ) मला ठार केलीस परंतु, ही करणी तूं केवळ आत्मघाताची केलीस. ( कारण, माझी तर कांहीं हानी झाली नाही पण ) आतां ज्या वेळीं शत्रु तुला फरफर ओढून रणांगणीं ठार करण्याच्या बेतांत येईल त्या वेळीं मी तुझा देह हातानी ( नखांनी ) विदारून त्यांतील ऊन्ह ऊन्ह रक्त पिईन."
याप्रमाणे भयंकर शब्द बोलून ती देवी आपल्या भूतगणांसह त्या देवभुवनांत म्हणजे आकाशांत यथेच्छ मार्गाने संचारूं लागली. वृष्णिकुलानें पूज्य अशी ती कन्या स्वर्गातच वाढत चालली. देवाचे आज्ञेवरून तिचे देवलोकीं पुत्रवत् पालन चालू होते. ही देवी प्रजापतीचे अंशापासून पूर्वी योगबलाने निर्माण झाली असून ती केशवाच्या रक्षणार्थ पुनरपि भूलोकीं अवतीर्ण झाली होती; व पुनः स्वर्गात जाऊन देवांप्रमाणें दिव्य शरीर धारण करून ती कृष्णाचे संरक्षण करीत होती व यामुळे यादवरूपाने अवतीर्ण झालेले सर्व देव तिची पूजा करीत असत.
ती स्वर्गात उठून जातांच कंसाला वाटलें कीं, आतां आपला मृत्यु खास आला ( आणि आपण केलेले सर्व यत्न विफल झाले. ) असे पाहून आणि लाजून एकांतांत तो देवकीला बोलला. हे भगिनि, मी तुझे गर्भ मारून आपल्याकडून स्वतःचा मृत्यु दूर व्हावा म्हणून यत्न केले. परंतु, माझे सगळे यत्न विफळ होऊन मला भलतेचकडून मृत्यु उपस्थित झाला. मी. आपल्याच आत्मसंबंध्यांचा घात केला. ( ही गोष्ट मी खास वाईट केली खरी ) पण मी हें निराशेच्या भरात केलें; पण ( खेदाची गोष्ट ही कीं ) मीं आपलेकडून इतका भगीरथ प्रयत्न केला तरी माझ्या कर्तबगारीची कमान दैवावर चढली नाहीं ( दैवानें करायचे तें केलेंच ). असो; हे भगिनि, आतां तूं गर्भाबद्दल चिंता आणि पुत्रहानीबद्दल होणारा मनस्ताप सोडून दे. ( व मजवरही रागावूं नको. कारण ) खरें पाहातां काल उफराटा आला आहे व ही सर्व वस्तुतः कालाची करणी असून मी तेथें निमित्तमात्र झालों आहें.
वास्तविकपणें काल हाच मनुष्यांचा शत्रु आहे. तोच त्यांचा परिणाम करितो; व वस्तुमात्राला कालच नाहींसा करितो; आणि अशा कामांत माझ्यासारखा एखादा गोमाजी अपयशापुरता नामधारी मात्र असतो. हे देवि, मनुष्याच्या कर्मानुसार त्याला दुःखें ही अवश्य येतातच. खेदाची गोष्ट ही कीं, मनुष्य त्यांशीं आपला कारणसंबंध लावितो. याकरिता तं आतां पुत्रांची चिंता सोड व त्यांसंबंधीं दुःख करून विलाप करण्याचें सोडून दे. बहुधा मनुष्यांचा जन्म हा असाच; आणि कालाला स्थैर्य हें माहीतच नाहीं. हे देवकि, हा मी पुत्राप्रमाणे तुझे चरणांवर मस्तक ठेवितो. मी जाणतों आहे की, मी तुझा अपकार केला आहे, तथापि, ( मी शरण आहें हें पाहून) मजवरील रोष सोड.
याप्रमाणे कंस बोलला असतां देवकी डोळ्यांत अश्रु आणून दीनमुद्रेने वसुदेवाकडे पहातच " वत्सा ऊठ ऊठ " असें मातेप्रमाणें कंसाला म्हणत, बोलली, " हे कंसा, तूं कांहीं विशिष्ट इच्छेने माझे समक्ष माझे गर्भ मारिलेस. पण हे वत्सा, या कृतीचें खरे कारण तूं नसून कृतांतच आहे. शिवाय, ज्याअर्थी तूं आपल्या अपकृत्याबद्दल आपली स्वतःची इतकी निर्भत्सना करून माझे पायावर माथेंही ठेवितो आहेस, त्या अर्थीं माझा झालेला गर्भनाश मला शांतपणे सहन केला पाहिजे. तूं म्हणतोस तेही केवळ खोटे नव्हे. जीव गर्भात प्रविष्ट झाला कीं, मृत्यु त्याजपाशीं खेटून उभा असतोच. तो त्याची बाल्यांतही कींव करीत नाहीं, तारुण्याकडेही पहात नाहीं, आणि वार्धक्यांत तर त्याचा जसा काय हक्कच. एतावता कोणत्याही अवस्थेंत मृत्यु येणें हें केवल कालाचेंच चेष्टित आहे. त्यांत तुझेसारखा एखादा निमित्ताला मात्र सांपडतो. जो गर्भ जन्मासच आला नाहीं, तो वायुसारखा अदृश्यच असतो. ( म्हणून आपलें चित्त तेथें गुंतत नाहीं. ) बरें, जन्मास आलेला गर्भही ( विधीचे मनांत आल्यास ) जन्मून न जन्मल्यासारखा होतो ( मरतो ) आणि विधि नेईल तिकडे जातो. असा खरा प्रकार आहे. याकरितां हे वत्सा, तूं स्वस्थ परत जा; व माझे पुत्रांचे नाशाबद्दल मला होणाऱ्या खेदाचा विटाळ तुला होऊं देऊं नको. मृत्यु प्रथम अकस्मात प्राण्याला घेऊन जातो आणि मग मनुष्यें त्याच्या मरणाला कोणी तरी हेतु मागून शोधून काढीत असतात. खरें पहाता मातेच्या गर्भकालीं होणारे शास्त्रविधि, पूर्वजन्मींचे कर्म, कालधर्म, स्तेयादि लौकिकी अपकृत्ये, आईबापांचे अनाचार, व जातीदोष, इत्यादि अनेक कारणसंघातानें प्राण्याचा मृत्यु होत्त असतो. याप्रमाणे तें देवकीचे वाक्य ऐकून कंस अंतर्यामी एकाअर्थी क्रुद्ध होऊन जळू लागला. तथापि, दुसऱ्या बाजूने, आपण केलेला सर्व यत्न विफल गेला हें पाहून तो उदास व दीन होऊन आपल्या सदनास गेला.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि विष्णुवतारवर्णनं नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
अध्याय चवथा समाप्त
GO TOP
|