श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व त्रयोदशोऽध्यायः
धेनुकवधः
वैशंपायन उवाच
दमिते सर्पराजे तु कृष्णेन यमुनाह्रदे ।
तमेव चेरतुर्देशं सहितौ रामकेशवौ ॥ १ ॥
आजग्मतुस्तौ सहितौ गोधनैः सह गामिनौ ।
गिरिं गोवर्धनं रम्यं वसुदेवसुतावुभौ ॥ २ ॥
गोवर्धनस्योत्तरतो यमुनातीरमाश्रितम् ।
ददृशाते च तौ वीरौ रम्यं तालवनं महत् ॥ ३ ॥
तौ तालपर्णप्रतते रम्ये तालवने रतौ ।
चेरतुः परमप्रीतौ वृषपोताविवोद्धतौ ॥ ४ ॥
स तु देशः सदा स्निग्धो लोष्ठपाषाणवर्जितः ।
दर्भप्रायस्थलीभूतः सुमाहान्कृष्णमृत्तिकः ॥ ५ ॥
तालैस्तैर्विपुलस्कन्धैरुच्छ्रितैः श्यामपर्वभिः ।
फलाग्रशाखिभिर्भाति नागहस्तैरिवोच्छ्रितैः ॥ ६ ॥
तत्र दामोदरो वाक्यमुवाच वदतां वरः ।
अहो तालफलैः पक्वैर्वासितेयं वनस्थली ॥ ७ ॥
स्वादून्यार्य सुगन्धीनि श्यामानि रसवन्ति च ।
पक्वतालानि सहितौ पातयामो लघुक्रमौ ॥ ८ ॥
यद्येषामीदृशो गन्धो माधुर्यघ्राणतर्पणः ।
रसेनामृतकल्पेन भवितव्यं च मे मतिः ॥ ९ ॥
दामोदरवचः श्रुत्वा रौहिणेयो हसन्निव ।
पातयन्पक्वतालानि चालयामास तांस्तरून् ॥ १० ॥
तत्तु तालवनं नॄणामसेव्यं दुरतिक्रमम् ।
निर्माणभूतमिरिणं पुरुषादालयोपमम् ॥ ११ ॥
दारुणो धेनुको नाम दैत्यो गर्दभरूपधृक् ।
खरयूथेन महता वृतः समनुसेवते ॥ १२ ॥
स तु तालवनं घोरं गर्दभः परिरक्षति ।
नृपक्षिश्वापदगनणांस्त्रासयानः सुदुर्मतिः ॥ १३ ॥
तालशब्दं स तं श्रुत्वा संघुष्टं फलपातनात् ।
नामर्षयत् स संक्रुद्धस्तालस्वनमिव द्विपः ॥ १४ ॥
शब्दानुकारी संक्रुद्धो दर्पाविद्धसटाननः ।
स्तब्धाक्षो ह्रेषितपटुः खुरैर्निर्दारयन्महीम् ॥ १५ ॥
आविद्धपुच्छो हृषितो व्यात्तानन इवान्तकः ।
आपतन्नेव ददृशे रौहिणेयमुपस्थितम् ॥ १६ ॥
तालानां तमधो दृष्ट्वा स ध्वजाकारमव्ययम् ।
रौहिणेयं खरो दुष्टः सोऽदशद् दशनायुधः ॥ १७ ॥
पद्भ्यामुभाभ्यां च पुनः पश्चिमाभ्यां पराङ्मुखः ।
जघानोरसि दैत्येन्द्रो रौहिणेयं निरायुधम् ॥ १८ ॥
ताभ्यांएव स जग्राह पद्भ्यां तं दैत्यगर्दभम् ।
आवर्जितमुखस्कन्धं प्रेरयंस्तालमूर्धनि ॥ १९ ॥
सम्भग्नोरुकटिग्रीवो भग्नपृष्ठो दुराकृतिः ।
खरस्तालफलैः सार्धं पपात धरणीतले ॥ २० ॥
तं गतासुं गतश्रीकं पतितं वीक्ष्य गर्दभम् ।
ज्ञातींस्तथापरांस्तस्य तृणराजनि सोऽक्षिपत् ॥ २१ ॥
सा भूर्गर्दभदेहैश्च तालैः पक्वैश्च पातितैः ।
बभासे छन्नजलदा द्यौरिवाव्यक्तशारदी ॥ २२ ॥
तस्मिन्गर्दभदैत्ये तु सानुगे विनिपातिते ।
रम्यं तालवनं तद्धि भूयो रम्यतरं बभौ ॥ २३ ॥
विप्रमुक्तमयं शुभ्रं विविक्ताकारदर्शनम् ।
चरन्ति स्म सुखं गावस्तत् तालवनमुत्तमम् ॥ २४ ॥
ततः प्रविष्टास्ते सर्वे गोपा वनविचारिणः ।
वीतशोकभयायासाश्चञ्चूर्यन्ते समन्ततः ॥ २५ ॥
ततः सुखं प्रकीर्णासु गोषु नागेन्द्रविक्रमौ ।
द्रुमपर्णासनं कृत्वा तौ यथार्हं निषीदतुः ॥ २६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेशु हरिवंशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां धेनुकवधे त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
धेनुकवध -
वैशंपायन सांगतात : - कृष्णाने यमुना डोहांत कालियाचें दमन केल्यानंतर, बलराम व तो असे उभयता जोडीने त्याच प्रदेशांत संचार करीत असत. कोणे एके समयी ते दोघे वसुदेवाचे पुत्र गोधनें चारीत चालले असतां, रमणीय अशा गोवर्धन पर्वतासमीप प्राप्त झाले. तेव्हां गोवर्धन पर्वताच्या उत्तरेस व यमुनेच्या कांठीं एक भले मोठे शोभिवंत तालवन त्या उभयतां वीरांच्या दृष्टीस पडलें. त्या वनांत जिकडे तिकडे तालवृक्षांचीं पाने पडलेली होतीं. तेथें नानाप्रकारचे खेळ खेळून, उच्छृंखल गोऱ्ह्यांप्रमाणे मुदितांत: करणाने ते वावरू लागले. तो प्रदेश थंड विस्तीर्ण व सपाट असून त्या ठिकाणी मातीची ढेकळे किंवा दगड वगैरे कांहीं एक नव्हतें. तेथील भूमि बहुतेक दर्भांनी व्यापलेली असून, त्यांतील माती काळीभोर होती. त्या ठिकाणचे तालवृक्ष उंच असून त्यांना पुष्कळच फांद्या होत्या. त्यांची पेरे काळी असून त्यांच्या फांद्यांच्या टोंकाला फलांचा बहर आलेला होता. त्यामुळे त्या तालवनामध्यें हत्तींनीं आपल्या सोंडाच उंच केल्या आहेत कीं काय असा भास होई. त्या प्रदेशांत वक्त्यांतील अग्रणी दामोदर आनंदाने " अहाहा, पिकलेल्या तालफलांच्या घमघमाटाने हा प्रदेश कितीतरी सुवासित झाला आहे ! दादा, आपण ही गोड, सुवासिक, काळी, रसाळ व पक्क झालेली फळें पाडू या ! मनांत विचार येतांच त्याप्रमाणें कृति करण्यास, आपल्याला मुळीच वेळ लागत नाहीं. यांच्या नुसत्या वासाने आपल्या घ्राणेंद्रियाची तृप्ति होत आहे. त्यापक्षीं यांतील रस अमृतासारखा असला पाहिजे असें मला वाटतें. " श्रीकृष्णाचे भाषण संपते न संपते तोच बलराम हसत हसत तीं झाडे हलवून फळें पाडू लागला. तें तालवन दुर्लघनीय असून माणसांची तेथें जाण्याची सोय नव्हती, वास्तविक ते अस्सल असूनहि प्रस्तुत एखाद्या मनुष्यभक्षकाच्या भवनासारखे शून्यवत् दिसत होते.
धेनुक नामक भयंकर दैत्य गर्दभाचें रूप धारण करून त्या वनामध्ये रहात होता. त्याचे बराबर एक भला मोठा गर्दभांचा कळप होता. तो दुष्टबुद्धि गर्दभरूपी दैत्य त्या तालवनाचे रक्षण करून मनुष्य, पक्षी व श्वापदें यांच्या समूहांना त्रास देई. फले पाडतांना उत्पन्न झालेला तो तालशब्द कानी पडताच त्याला फार क्रोध आला व हत्तीला जसा तालशब्द सहन होत नसतो तसाच त्यालाही सहन झाला नाहीं. तेव्हां अत्यंत क्रोधायमान झालेला तो राक्षस त्या शब्दाच्या अनुरोधानें धांवून गेला; तो तेथें रोहिणीचा तनय त्याच्या दृष्टीस पडला. मदामुळें त्या गर्दभाचे केस विखरून त्याच्या तोंडावर आले होते. त्याचे नेत्र स्तब्ध झाले होते. मोठ्याने आरोळी देत व खुरांनीं पृथ्वी विदारीत चालला असतां, तो आ पसरलेल्या कृतांताप्रमाणें दिसत होता. त्यानें आपलें पुच्छ वर केलें असून भक्ष्य सापडणार या आशेनें त्याला मोठा आनंद झाला होता. दंत हेंच त्याचें आयुध होतें. तालवृक्षांच्या खालीं त्या ध्वजाकार व अव्यय बलरामाला पाहून त्या दुष्ट खरानें त्याला दंश केला. नंतर उलट वळून त्या दैत्येंद्रानें आपल्या पाठीमागच्या तंगड्यांच्या दुगाण्या शस्त्ररहित असलेल्या बलरामाचे उरावर झाडल्या. परत बलरामाने त्याच तंगड्या धरून, त्याचें मुख व स्कंध फिरविले आणि त्या गर्दभरूपी दैत्याला, तालवृक्षाच्या अग्रावर झुगारून दिलें. त्यामुळे, त्याची पाठ, मांड्या, कंबर व मान ही सर्व मोडून जाऊन, तो दुरात्मा तालफलांसहवर्तमान भूतलावर धाडदिशी आपटला. तो गर्दभ वैभवहीन होऊन, मरून पडला आहे असें पहाताच बलरामाने त्याच्या इतर अनुचरांनाही फेकून देण्याची सुरुवात केली. गर्दभांचीं शरीरें व तालफलें यांनी भरून गेलेली तेथील जागा, शरदृतूंतील मेघाच्छादित आकाशाप्रमाणें दिसत होती. त्या गर्दभरूपी दैत्याचा सपरिवार नाश झाल्यामुळे, आधींच रम्य असलेल्या त्या तालवनाची शोभा द्विगुणित झाली. आतां त्या तकतकीत व उत्तम तालवनांतील भीति नाहीशी झाल्याकारणानें गाई तेथें सुखाने नांदू लागल्या व तें विशिष्ट आकाराचे वन फार शोभिवंत दिस लागलें. नंतर वनचर गोपाल त्या वनांत निःशंकपणे शिरून, दुःख व त्रासरहित होत्साते तेथें यथेच्छ विहार करूं लागले. मग गाई निर्वेधपणे चरूं लागल्या असें पाहून, त्या हत्तीप्रमाणे पराक्रमी बालकानी, झाडांच्या पानांचे आसन तयार केलें व त्यावर ते सुखाने विश्रांति घेत बसले.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि धेनुकवधः नाम त्रयोदशोऽध्यायः ॥ १३ ॥
अध्याय तेरावा समाप्त
GO TOP
|