श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व चतुर्दशोऽध्यायः
प्रलम्बवधः
वैशंपायन उवाच
अथ तौ जातहर्शौ तु वसुदेवसुतावुभौ ।
तत्तालवनमुत्सृज्य भूयो भाण्डीरमागतौ ॥ १ ॥
चारयन्तौ विवृद्धानि गोधनानि शुभाणि च ।
स्फीतसस्यप्ररूढानि वीक्षमाणौ वनानि च ॥ २ ॥
क्ष्वेडयन्तौ प्रगायन्तौ प्रचिन्वन्तौ च पादपान् ।
नामभिर्व्याहरन्तौ च सवत्सा गाः परंतपौ ॥ ३ ॥
नियोगपाशैरासक्तैः स्कन्धाभ्यां शुभलक्षणौ ।
वनमालाकुलोरस्कौ बालशृङ्गाविवर्षभौ ॥ ४ ॥
सुवर्णाञ्जनचूर्णाभावन्योन्यसदृशाम्बरौ ।
महेन्द्रायुधसंसक्तौ शुक्लकृष्णाविवाम्बुदौ ॥ ५ ॥
कुशाग्रकुसुमानां च कर्णपूरौ मनोरमौ ।
वनमार्गेषु कुर्वाणौ वन्यवेषधरावुभौ ॥ ६ ॥
गोवर्धनस्यानुचरौ वने सानुचरौ तु तौ ।
चेरतुर्लोकसिद्धाभिः क्रीडाभिरपराजितौ ॥ ७ ॥
तावेव मानुषीं दीक्षां वहन्तौ सुरपूजितौ ।
तज्जातिगुणयुक्ताभिः क्रीडाभिश्चेरतुर्वनम् ॥ ८ ॥
तौ तु भाण्डिरमाश्रित्य बालक्रीडानुवर्तिनौ ।
प्राप्तौ परमशाखाढ्यं न्यग्रोधं शाखिनां वरम् ॥ ९ ॥
तत्र त्वान्दोलिकाभिश्च युद्धमार्गविशारदौ ।
अश्मभिः क्षेपणीयैश्च तौ व्यायममकुर्वताम् ॥ १० ॥
युद्धमार्गैश्च विविधैर्गोपालैः सहितावुभौ ।
मुदितौ सिंहविक्रान्तौ यथाकामं विचेरतुः ॥ ११ ॥
तयो रमयतोरेवं तल्लिप्सुरसुरोत्तमः ।
प्रलम्बोऽभ्यागमत् तत्र च्छिद्रान्वेषी तयोस्तदा ॥ १२ ॥
गोपालवेषमास्थाय वन्यपुष्पविभूषितः ।
लोभयानः स तौ वीरौ हास्यैः क्रीडनकैस्तथा ॥ १३ ॥
सोऽवगाहत निश्शङ्कस्तेषां मध्यममानुषः ।
मानुषं वपुरास्थाय प्रलम्बो दानवोत्तमः ॥ १४ ॥
प्रक्रीडिताश्च ते सर्वे सह तेनामरारिणा ।
गोपालवपुषं गोपामन्यमानाः स्वबान्धवम् ॥ १५ ॥
स तु च्छिद्रान्तरप्रेप्सुः प्रलम्बो गोपतां गतः ।
दृष्टिं प्रणिदधे कृष्णे रौहिणेये च दारुणाम् ॥ १६ ॥
अविषह्यं ततो मत्वा कृष्णमद्भुतविक्रमम् ।
रौहिणेयवधे यत्नमकरोद् दानवोत्तमः ॥ १७ ॥
हरिणाक्रीडनं नाम बालक्रीडनकं तातः ।
प्रक्रीडितास्तु ते सर्वे द्वौ द्वौ युगपदुत्पतन् ॥ १८ ॥
कृष्णः श्रीदामसहितः पुप्लुवे गोपसूनुना ॥
संकर्षणस्तु प्लुतवान् प्रलम्बेन सहानघ ॥ १९ ॥
गोपालास्त्वपरे द्वन्द्वं गोपालैरपरैः सह ।
प्रद्रुता लङ्घयन्तो वै तेऽन्योन्यं लघुविक्रमाः ॥ २० ॥
श्रीदाममजयत् कृष्णः प्रलम्बं रोहिणीसुतः
गोपालैः कृष्णपक्षीयैर्गोपालास्त्वपरे जिताः ॥ २१ ॥
ते वाहयन्तस्त्वन्योन्यं संहर्षात् सहसा द्रुताः ।
भाण्डीरस्कन्धमुद्दिश्य मर्यादां पुनरागमन् ॥ २२ ॥
सङ्कर्षणं तु स्कन्धेन शीघ्रमुत्क्षिप्य दानवः ।
द्रुतं जगाम विमुखः सचन्द्र इव तोयदः ॥ २३ ॥
स भारमसहंस्तस्य रौहिणेयस्य धीमतः ।
ववृधे सुमहाकायः शक्राकान्त इवाम्बुदः ॥ २४ ॥
स भाण्डीरवटप्रख्यं दग्धाञ्जनगिरिप्रभम् ।
स्वं वपुर्दर्शयामास प्रलम्बो दानवोत्तमः ॥ २५ ॥
पञ्चस्तबकलम्बेन मुकुटेनार्कवर्चसा ।
दीप्यमानाननो दैत्यः सूर्याक्रान्त इवाम्बुदः॥ २६ ॥
महाननो महाग्रीवः सुमहानन्तकोपमः ।
रौद्रः शकटचक्राक्षो नमयंश्चरणैर्महीम् ॥ २७ ॥
स्रग्दामलम्बाभरणः प्रलम्बाम्बरभूषणः ।
वीरः प्रलम्बः प्रययौ लम्बतोय इवाम्बुदः ॥ २८ ॥
स जहाराथ वेगेन रौहिणेयं महासुरः ।
सागरोपप्लवगतं कृत्स्नं लोकमिवान्तकः ॥ २९ ॥
ह्रियमाणः प्रलम्बेन स तु सङ्कर्षणो बभौ ।
उह्यमान इवाकाशे कालमेघेन चन्द्रमाः ॥ ३० ॥
स संदिग्धमिवात्मानं मेने सङ्कर्षणस्तदा ।
दैत्यस्कन्धगतः श्रीमान् कृष्णं चेदमुवाच ह ॥ ३१ ॥
ह्रियेऽहं कृष्ण दैत्येन पर्वतोदग्रवर्ष्मणा ।
प्रदर्शयित्वा महतीं मायां मानुषरूपिणीम् ॥ ३२ ॥
कथमस्य मया कार्यं शासनं दुष्टचेतसः ।
प्रलम्बस्य प्रवृद्धस्य दर्पाद् द्विगुणवर्चसः ॥ ३३ ॥
तमाह सस्मितं कृष्णः साम्ना हर्षाकुलेन वै ।
अभिज्ञो रौहिणेयस्य वृत्तस्य च बलस्य च ॥ ३४ ॥
अहोऽयं मानुषो भावो व्यक्तमेवानुपाल्यते ।
यस्त्वं जगन्मयं देवं गुह्याद्गुह्यतरं गतः ॥ ३५ ॥
स्मर नारायणात्मानं लोकानां त्वं विपर्यये ।
अवगच्छात्मनात्मानं समुद्राणां समागमे ॥ ३६ ॥
पुरातनानां देवानां ब्रह्मणः सलिलस्य च ।
आत्मवृत्तप्रभावाणां संस्मराद्यं च वै वपुः ॥ ३७ ॥
शिरः खं ते जलं मूर्त्तिः क्षमा भूर्दहनो मुखम् ।
वायुर्लोकायुरुछ्वासो मनःस्रष्टा ह्यभूत्तव ॥ ३८ ॥
सहस्रास्यः सहस्राङ्गः सहस्रचरणेक्षणः ।
सहस्रपद्मनाभस्त्वं सहस्रांशुधरोऽरिहा ॥ ३९ ॥
यत्त्वया दर्शितं लोके तत् पश्यन्ति दिवौकसः ।
यत्त्वया नोक्तपूर्वं हि कस्तदन्वेष्टुमर्हति ॥ ४० ॥
यद्वेदितव्यं लोकेऽस्मिंस्तत्त्वया समुदाहृतम् ।
विदितं यत्तवैकस्य देवा अपि न तद्विदुः ॥ ४१ ॥
आत्मजं ते वपुर्व्योम्नि न पश्यन्त्यात्मसंभवम् ।
यत्तु ते कृत्रिमं रूपं तदर्चन्ति दिवौकसः ॥ ४२ ॥
देवैर्न दृष्टश्चान्तस्ते तेनानन्त इति स्मृतः।
त्वं हि सूक्ष्मो महानेकः सूक्ष्मैरपि दुरासदः ॥ ४३ ॥
त्वय्येव जगतः स्तम्भे शाश्वती जगती स्थिता ।
अचला प्राणिनां योनिर्धारयत्यखिलं जगत् ॥ ४४ ॥
चतुःसागरभोगस्त्वं चातुर्वर्ण्यविभागवित् ।
चतुर्युगेषु लोकानां चातुर्होत्रफलाशनः ॥ ४५ ॥
यथाहमपि लोकानां तथा त्वं तच्च मे मतम् ।
उभावेकशरीरौ स्वो जगदर्थे द्विधाकृतौ ॥ ४६ ॥
अहं वा शाश्वतः कृष्णस्त्वं वा शेषः पुरातनः ।
लोकानां शाश्वतो देवस्त्वंहि शेषः सनातनः ।
आवयोर्देहमात्रेण द्विधेदं धार्यते जगत् ॥ ४७ ॥
अहं यः स भवानेव यस्त्वं सोऽहं सनातनः ।
द्वावेव विहितौ ह्यावामेकदेहौ महाबलौ ॥ ४८ ॥
तदास्से मूढवत्त्वं किं प्राणेन जहि दानवम् ।
मूर्ध्नि देवरिपुं देव वज्रकल्पेन मुष्टिना ॥ ४९ ॥
वैशम्पायन उवाच
संस्मारितस्तु कृष्णेन रौहिणेयः पुरातनम् ।
बलेनापूर्यत तदा त्रैलोक्यान्तरचारिणा ॥ ५० ॥
ततः प्रलम्बं दुर्वृत्तं स बद्धेन महाभुजः ।
मुष्टिना वज्रकल्पेन मूर्ध्नि चैनं समाहनत् ॥ ५१ ॥
तस्योत्तमाङ्गं स्वे काये विकपालं विवेश ह ।
जानुभ्यां चाहतः शेते गतासुर्दानवोत्तमः ॥ ५२ ॥
जगत्यां विप्रकीर्णस्य तस्य रूपमभूत्तदा ।
प्रलम्बस्याम्बरस्थस्य मेघस्येव विदीर्यतः ॥ ५३ ॥
तस्य भग्नोत्तमाङ्गस्य देहात्सुस्राव शोणितम् ।
बहुगैरिकसंयुक्तं शैलशृङ्गादिवोदकम् ॥ ५४ ॥
तं निहत्य प्रलम्बं तु संहृत्य बलमात्मनः ।
पर्यष्वजत वै कृष्णं रौहिणेयः प्रतापवान् ॥ ५५ ॥
तं तु कृष्णश्च गोपाश्च दिविस्थाश्च दिवौकसः ।
तुष्टुवुर्निहते दैत्ये जयाशीर्भिर्महाबलम् ॥ ५६ ॥
बलेनायं हतो दैत्यो बालेनाक्लिष्टकर्मणा ।
विवदन्त्यशरीरिण्यो वाचः सुरसमीरिताः ॥ ५७ ॥
बलदेवेति नामास्य देवैरुक्तं दिवि स्थितैः ।
बलन्तु बलदेवस्य तदा भुवि जना विदुः ॥ ५८ ॥
कर्मजं निहते दैत्ये देवैरपि दुरासदे ॥ ५९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां प्रलम्बवधे चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
प्रलम्बवध -
वैशंपायन सांगतात : - नंतर कांहीं वेळाने त्या आनंदित झालेल्या वसुदेवपुत्रांनीं तें तालवन सोडून दिलें व पुनः ते भाण्डीर वृक्षापाशी आले. वाटेने ते बहुगुणित झालेलीं शुभ गोधनें चारीत होते व जिकडे तिकडे विपुल तृणांकुर उगवलेल्या वनाची शोभा अवलोकन करीत होते. तसेंच, वाटेने जातां जातां, ते दंड थोपटीत होते; गाणी म्हणत होते; मधून मधून झाडांच्या मागें लपत होते; केव्हां केव्हां ते शत्रूला जेर करणारे वीर गाईंची व वासरांची नावे घेऊन आरोळ्या देत होते. शुभ चिन्हांनी युक्त असलेल्या त्या बालकांच्या खांद्यांवर अन्नाची शिंकी होतीं. त्यांच्या वक्ष:स्थळावर वनमाला विराजत होत्या; ते लहान लहान शिंगे आलेल्या खोंडांसारखे दिसत होते. सुवर्ण व अंजन यांच्यासारखी त्यांची कांति असून त्यांनीं एकासारखी एक अशी वस्त्रे परिधान केली होतीं. त्या कारणानें इंद्रधनुष्यांनीं युक्त असलेल्या शुक्ल व कृष्ण वर्णाच्या मेघांप्रमाणें ते शोभिवंत दिसत होते. ते उभयता वनांतून चालले असतां वन्यवेष धारण करीत. त्याप्रमाणें त्यांनीं कुशाग्रे व पुष्पे हीच मनोहर कर्णभूषणें कानांत धारण केली होतीं. कधींही पराभूत न होणारी ती जोडी आपल्या अनुचरांसह गोवर्धन पर्वताच्या आसपास लौकिक खेळ खेळत असे. देव देखील त्यांची पूजा करीत; तथापि त्यांनीं मनुष्यरूप धारण केलें असल्यामुळें, आपल्या मनुष्यत्वाला साजतील अशा गोपक्रीडा करीत ते तेथील वनांत हिंडत असत.
प्रसंगवशात् भाण्डीरवृक्षासमीप बाललीला करीत करीत ते वृक्षश्रेष्ठ न्यग्रोधापाशी येऊन पोचले. त्या वृक्षाला विपुल शाखा होत्या. तेथेंच युद्धकृत्यांमध्यें निपुण असलेल्या त्या दोघांनी गोपाळांसहवर्तमान झाडांच्या फांद्या धरून झोके घेण्याचे, दगड फेकण्याचे, इत्यादिक विविध खेळ खेळून व्यायाम करण्यास आरंभ केला. याप्रमाणे सिंहासारख्या त्या पराक्रमी बालकांनी आनंदाने तेथें हुतुतू घातला असतांना, त्यांना हस्तगत करून घेण्यासाठी योग्य संधीची वाट पहात बसलेला असुरश्रेष्ठ प्रलंब त्या ठिकाणी प्राप्त झाला. वन्यपुष्पांनीं आपलें शरीर अलंकृत करून त्यानें गोपवेष धारण केला होता. हास्यादिक क्रीडा करून त्यानें रामकृष्णांना भूल पाडण्याचा यत्न चालविला. तो दानवश्रेष्ठ प्रलंब राक्षस मनुष्यरूप घेऊन निःशंकपणे त्यांच्यांत जाऊन मिसळला. तो देवशत्रु गोपवेषानें दिसल्यामुळे हा आपल्या जातीपैकींच एक गोप आहें असें त्यांना वाटून ते गोपाल त्याबरोबर खेळू लागले. परंतु वस्तुतः प्रलंबानें आपणास कांहीं फट मिळावी म्हणून तो गोपवेष घेतलेला होता. खेळतां खेळतां त्यानें आपली भयंकर दृष्टि रामकृष्णांकडे लावली. अभ्दुत कृत्ये करणारा कृष्ण कांहीं आपल्याला आटोपावयाचा नाहीं, असें पाहून त्या दैत्यश्रेष्ठानें बलरामाला ठार करण्याचा यत्न सुरू केला. ' हरिणाक्रीडन ' नामक एक मुलांचा खेळ ते सर्वजण खेळू लागले. त्यांत दोघादोघांनी हरिणासारखी एकदम उडी मारावयाची असते. कृष्णाने श्रीदाम नांवाचा एक गोपकुमार आपल्या जोडीला घेतला, व हे अनघा, बलरामाने प्रलंब हा गडी घेतला. बाकीच्या गोपालांनी असाच एक एक गडी निवडून ते सर्व चपल गोपाल एकमेकांच्या वरून उड्या मारू लागले. कृष्णाने श्रीदामाला जिंकलें, बलरामाने प्रलंबावर वरचढ केली. कृष्णाच्या बाजूच्या सर्व गड्यांनी विरुद्धपक्षाचा पराजय केला. ते परस्परांना आनंदाने पाठीवरून भाण्डीर वृक्षाच्या खोडापर्यंत, पळत पळत वाहून नेत व पुनः तेथून निघाल्या ठिकाणी परत येत. याप्रमाणे चालले असतां, प्रलंबानें एकाएकीं बलरामाला उचलून खांद्यावर घेतलें आणि मेघ जसा चंद्राला घेऊन जातो त्याप्रमाणें त्याला घेऊन उलट दिशेनें तो राक्षस झपाट्यानें निघून जाऊं लागला. परंतु सुबुद्ध रामाचा भार त्याला सहन न झाल्याकारणाने, त्या अक्राळविक्राळ राक्षसाने इंद्राचे अधिष्ठान असलेल्या मेघाप्रमाणें आपलें शरीर फुगवण्यास सुरवात केली. तेव्हां त्या दानवोत्तम प्रलंबाचें खरें स्वरूप प्रगट झालें. त्याचें शरीर भाण्डीर वृक्षाएवढें मोठे असून, त्याचा वर्ण दग्ध झालेल्या अंजनाच्या पर्वताप्रमाणे ( काळाकुट्ट ) होता. सूर्याप्रमाणें चमकणारा व पांच स्तबकांनी युक्त असलेला असा मुकुट त्यानें धारण केला असल्यामुळे त्या दैत्याचे मुख देदीप्यमान् दिसत होतें, व सूर्ययुक्त मेघासारखा तो शोभत होता. त्या भयंकर राक्षसाचें तोंड व मान ही फार मोठी असून, त्याचे नेत्र गाड्याच्या चाकासारखे होते. त्याच्या पायाच्या भाराने पृथ्वी देखील वाकत होती. त्या शूर प्रलंबाने गळ्यामध्यें पुष्पांच्या लांब लांब माळा व इतर तसलीच आभरणें धारण केली होतीं.
त्याप्रमाणेंच त्यानें एक लांबच लांब वस्त्र परिधान केलें होतें. अशा रीतीनें तो चालला असतांना ओथंबलेल्या मेघासारखा शोभत हाता. प्रलयकाल ज्याप्रमाणें जलप्रलयांत सापडलेल्या सर्व लोकांचे प्राण हरण करून नेतो, त्याप्रमाणें तो भयंकर राक्षस बलरामाला झपाट्यानें घेऊन चालला होता. आकाशामध्यें प्रलयकाळचा मेघ जसा चंद्राला घेऊन जातो, तद्वत्च प्रलंब संकर्षणाला घेऊन चालला आहे असा भास झाला. त्या दैत्याच्या खांद्यावर बसलेल्या श्रीमान् संकर्षणाला असें वाटून चुकले कीं, आतां आपली धडगत नाहीं. तेव्हां कृष्णाला उद्देशून तो म्हणाला. " कृष्णा, ह्या पर्वतप्राय शरीराच्या दैत्याने, मोठ्या मायावीपणाने मनुष्यरूप दाखवून, मला हरण करून चालविले आहे. या दुष्टबुद्धि व फुगलेल्या प्रलंबाची शक्ति गर्वाने द्विगुणित झालेली आहे, तर मी याचे शासन कसें करूं तें मला सांग.' रौहिणेयाचे पूर्ववृत्त व खरें बल कृष्णाला माहीत असल्यामुळें, त्यानें किंचित् स्मित करून शांतपणाने व काहीसे आनंदाने उत्तर केलें " बा रामा, मानवी रूपाची बतावणी चांगली चालवली आहेस ! ( कारण ) तू गुह्याहून गुह्य जो जगद्व्यापी परमेश्वर त्याचे पदाप्रत पोचला आहेस. विश्वप्रलयाच्या वेळीं तू नारायणरूप घेतोस तें लक्षांत आण. समुद्राशी तादात्म्य पावून सृष्टीचा तूं संहार करतोस, तो तुझा प्रभाव ध्यानांत घे. आपल्यापासून उत्पन्न होऊन पराक्रम करणाऱ्या पुरातन देवांची, ब्रह्मदेवाची व जलाची आद्यसृष्टि कशी झाली त्याची आठवण कर. आकाश हें तुझें मस्तक आहे. जल हीच तुझी मूर्ति आहे. पृथ्वी ही तुझ्या क्षमेच्या ठिकाणी आहे. अग्नि हा तुझ्या मुखाच्या स्थानी व लोकांचा आयुर्दायरूपी वायु हा उच्छ्वासाचे ठिकाणी आहे. तुझ्या मनाने ही सृष्टी उत्पन्न केली आहे.
तुला सहस्त्र मुखे, सहस्त्र अंगें, सहस्त्र नेत्र, सहस्त्र चरण, सहस्त्र नाभीकमलें व सहस्त्र किरण आहेत. तूं सर्व शत्रूंचा नाश करण्यास समर्थ आहेस. तूं जेवढे जगतामध्ये उत्पन्न करून ठेवले आहेस, तेवढेच देवांना दिसते. तू जें अद्याप सांगितले नाहीस त्याचा शोध लावण्यास कोण समर्थ आहे ? या जगांत जेवढे कांहीं ज्ञात होण्यासारखे आहे तें सर्व तं प्रतिपादन करून ठेवले आहेस. परंतु, तुला एकट्यालाच जें ठाऊक आहे तें मात्र देवांना देखील विदित नाही. आकाशांत आत्म्यापासून निर्माण झालेली तुझी काया त्यांना अगोचर आहे. तुझ्या कृत्रिमरूपाची देव पूजा करितात. देवांना देखील तुझा अंत लागत नाहीं, म्हणून तुला अनंत असें म्हणतात. तूं महान् आहेस. तसाच सूक्ष्मही आहेस. सूक्ष्म वस्तूस देखील कळावयासारखा नाहीस. ( शेषरूपाने ) तुझा आधार आहे म्हणूनच हें शाश्वत जगत् चालले आहे; व सर्व प्राण्यांचे उत्पत्तिस्थान अशी ही अचल पृथ्वी या अखिल विश्वाला संभाळून धरीत आहे. तू ( स्वशरीरानें ) चारी समुद्र व्यापून टाकले आहेस. चातुर्वर्ण्याचा जनक तूंच आहेस. चारी युगे तूच निर्मिली असून चारी प्रकारच्या यज्ञांतील हविर्भाग तूंच ग्रहण करतोस. मी या अखिल जगताला ज्या ठिकाणी आहें त्याच ठिकाणी तूही आहेस असें मी समजतो ( तुझ्यामाझ्यांत कांहीं भेद नाहीं. ) वस्तुतः आपला देह देखील एकच आहे; पण जगताच्या कल्याणाकरितां आपण दोन भिन्न रूपे घेतली आहेत. मी शश्वात कृष्ण आहें, तर तूं पुरातन शेष आहेस. अखिल विश्वांचा नित्य देव तूच सनातन शेष आहेस. आपल्या या दोन भिन्न रूपानी हें विश्व चालले आहे. मीं ह्मणजे तूंच व तू ह्मणजे सनातन असलेला मीच. तुझ्यामाझ्यांत काहीही भेदभाव नाहीं. आपण उभयता एकशरीरी व महापराक्रमी आहो. तर मग मोह पावलेल्या मनुष्याप्रमाणे स्वस्थ काय बसला आहेस ? हे देवा, वज्रासारख्या तुझ्या मुष्टीचा त्या दानवाचे मस्तकावर प्रहार करून त्याचा प्राण घे."
वैशंपायन सांगतात : - कृष्णाने याप्रमाणे बलरामाला पूर्ववृत्ताची व आपल्या अवतारकार्याची आठवण देताक्षणीच, त्रैलोक्याचे सर्व बल त्याच्या ठिकाणी एकवटले, आणि लागलीच त्या महाभुजानें, त्या दुष्ट प्रलंबाच्या मस्तकावर, आपल्या मिटलेल्या वज्रप्राय मुष्टीचा प्रहार केला. त्याबरोबर त्याचा कपाळमोक्ष होऊन त्याचें मस्तक त्याच्या शरीरांत शिरले. बलरामाने पुनः त्याला गुडघ्याची ठोकर मारताच तो दैत्यश्रेष्ठ गतप्राण होऊन भूमीवर पडला. आकाशांतील विदीर्ण झालेल्या मेघाप्रमाणें त्या पृथ्वीवर पडलेल्या प्रलंबाचा देह दिसूं लागला. त्याच्या मस्तकाच्या ठिकऱ्या उडून सर्व शरीरांतून रक्ताच्या धारा वाहू लागल्या; तेव्हां पर्वताच्या शिखरावरून गेरूनें युक्त असलेल्या उदकाचा प्रवाह चालला आहे असें वाटलें. प्रलंबाला ठार मारल्यावर, आपले सामर्थ्याचा प्रतापशाली बलरामाने संकोच केला आणि कृष्णाला कडकडून आलिंगन दिलें. त्या घोर दैत्याचा निःपात झालेला अवलोकन करून, स्वर्गस्थ देव, गोप व श्रीकृष्ण या सर्वांनी त्या महापराक्रमी बलरामाचा आशीर्वचनपूर्वक जयजयकार केला.
" सरळवृत्तीच्या सुकुमार बलरामाने प्रलंबाचा वध केला " अशा प्रकारच्या आकाशवाणी सर्व देवांच्या तोंडून निघू लागल्या. आकाशस्थ देवांनी त्याला ' बलदेव ' हें नामाभिधान दिलें. देवांना देखील अनावर झालेल्या प्रलंबाचा नाश जेव्हा बलरामानें केला, तेव्हां त्याचें सामर्थ्य लोकांना कळून आलें.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि प्रलम्बवधः नाम चतुर्दशोऽध्यायः ॥ १४ ॥
अध्याय चवदावा समाप्त
GO TOP
|