श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
पञ्चदशोऽध्यायः


कृष्णं प्रति गोपवाक्यम्

वैशंपायन उवाच
तयोः प्रवृत्तयोरेवं कृष्णस्य च बलस्य च ।
वने विचरतोर्मासौ व्यतियातौ स्म वार्षिकौ ॥ १ ॥
व्रजमाजग्मतुस्तौ तु व्रजे शुश्रुवतुस्तदा ।
प्राप्तं शक्रमहं वीरौ गोपांश्चोत्सवलालसान् ॥ २ ॥
कौतुहलादिदं वाक्यं कृष्णः प्रोवाच तत्र तान् ।
कोऽयं शक्रमहो नाम येन वो हर्ष आगतः ॥ ३ ॥
तत्र वृद्धतमस्त्वेको गोपो वाक्यमुवाच ह ।
श्रूयतां तात शक्रस्य यदर्थं ध्वज इज्यते ॥ ४ ॥
देवानामीश्वरः शक्रो मेघानां चारिसूदन ।
तस्य चायं महः कृष्ण लोकनाथस्य शाश्वतः ॥ ५ ॥
तेन संचोदिता मेघास्तस्य चायुधभूषिताः ।
तस्यैवाज्ञाकराः सस्यं जनयन्ति नवाम्बुभिः ॥ ६ ॥
मेघस्य पयसो दाता पुरुहूतः पुरन्दरः ।
संप्रहृष्टस्य भगवान्प्रीणायत्यखिलं जगत् ॥ ७ ॥
तेन संपादितं सस्यं वयमन्ये च मानवाः ।
वर्तयामोपयुञ्जानास्तर्पयामश्च देवताः ॥ ८ ॥
देवे वर्षति लोकेऽस्मिंस्ततः सस्यंप्रवर्धते ।
पृथिव्यां तर्पितायां तु सामृतं लक्ष्यते जगत् ॥ ९ ॥
क्षीरवत्यस्त्विमा गावो वत्सवत्यश्च निर्वृताः ।
तेन संवर्धितैस्तात तृणैः पुष्टाः सपुङ्‌‌‍गवाः ॥ १० ॥
नासस्या नातृणा भूमिर्न बुभुक्षार्दितो जनः ।
दृश्यते यत्र दृश्यन्ते वृष्टिमन्तो बलाहकाः ॥ ११ ॥
दुदोह सवितुर्गा वै शक्रो दिव्याः पयस्विनीः।
ताः क्षरन्ति नवं क्षीरं मेध्यं मेघौघधारितम् ॥ १२ ॥
वाय्वीरितं तु मेघेषु करोति निनदं महत् ।
जवेनावर्तितं चैव गर्जतीति जना विदुः ॥ १३ ॥
तस्य चैवोह्यमानस्य वायुयुक्तैर्बलाहकैः ।
वज्राशनिसमाः शब्दाः श्रूयन्ते नगभेदिनः ॥ १४ ॥
तज्जलं वज्रनिष्पेषैर्विमुञ्चति नभोगतैः ।
बहुभिः कामगैर्मेघैः शक्रो भृत्यैरिवेश्वरः ॥ १५ ॥
क्वचिद्दुर्दिनसङ्‌‌‍काशैः क्वचिच्छिन्नाभ्रसंनिभैः ।
क्वचिद्भिन्नाञ्जनाकारैः क्वचिच्छीकरवार्षिभिः ॥ १६ ॥
मण्डयतीव देवेन्द्रो विश्वमेवं नभो घनैः
क्वचिच्छीकरमुक्ताभं कुरुते गगनं घनः ॥ १७ ॥
एवमेतत्पयो दुग्धं गोभिः सूर्यस्य वारिदः।
पर्जन्यः सर्वभूतानां भवाय भुवि वर्षति ॥ १८ ॥
यस्मात् प्रावृडियं कृष्ण शक्रस्य भुवि भाविनी ।
तस्मात् प्रावृषि राजानः सर्वे शक्रं मुदा युताः ।
महैः सुरेशमर्चन्ति वयमन्ये च माणवाः ॥ १९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
शिशुचर्यायां गोपवाक्ये पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥


शक्रोत्सव -

वैशंपायन सांगतात : - याप्रकारे वनांत संचार करून, कृष्ण व राम यांचा दिनक्रम चाललेला असतां, वर्षाऋतूचे दोन महिने निघून गेले. नंतर ते उभयतां व्रजामध्ये परत आले. तेव्हां, इंद्रोत्सव जवळ आलेला असून, त्याकरितां, उत्सवप्रिय गोपाल उत्सुक झाले आहेत, असें त्यांना समजले. मग मोठी जिज्ञासा दाखवून कृष्णाने त्यांना प्रश्न केला. " ज्यामुळे तुम्हांला इतका हर्ष झालेला आहे, त्या इंद्राच्या महोत्सवाची कथा काय आहे ती मला सांगा. " त्यावर एका अतिवृद्ध गोपानें उत्तर केलें. ' बाबारे, इंद्राच्या ध्वजाची आम्ही कां पूजा करितो, त्याचें कारण ( मी ) सांगतो, तें ऐक. हे अरिसूदना, इंद्र हा सर्व देवांचा व मेघांचा स्वामी आहे. हे कृष्णा, त्या जगदीशाच्या प्रीत्यर्थ हा यज्ञ आम्ही कुलाचाराप्रमाणे करीत असतो. तोच मेघांना प्रेरणा देतो. त्याच्या आयुधाने मेघ अलंकृत झालेले आपण पहातो. त्याच इंद्राच्या आज्ञेने, मेघ हे नूतन जलाची वृष्टि करून तृण-धान्यादिक वाढवितात. पुरुहूत पुरंदर जो इंद्र तोच मेघांचे ठिकाणी जलाची उत्पत्ति करतो. स्वतः ( यज्ञयागादिकांनीं ) संतुष्ट झाला, म्हणजे सर्व जगाला, तो भगवान् संतोष देतो. त्यानें उत्पन्न केलेल्या तृण-धान्यावर आम्ही किंबहुना सर्व मानव आपला निर्वाह करित. व म्हणूनच आम्ही असले उत्सव करून देवतांना संतुष्ट करतो. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडला तरच धान्याला अंकुर येतात; जलाने भिजलेली पृथ्वी अमृताने युक्त झाल्यासारखी दिसते; व या गाई विऊन पुष्कळ दूध देऊं लागतात. त्यांना सुख लागतें. पावसाळ्यांत वाढलेले हिरवे गवत खाऊन, गाई-बैल पुष्ट होतात.

ज्या ठिकाणी वृष्टि करणारे मेघ आपल्या दृष्टीस पडतात, तेथील भूमि तृणधान्याशिवाय आढळून यावयाची नाही. त्या जागच्या लोकांना दुष्काळाची भीति नसते. ( तेथें क्षुधेने व्याकुळ झालेले लोक आढळून यावयाचे नाहींत. ) इंद्र हा सूर्याच्या किरणरूपी दिव्य व दुभत्या गाईंचे दोहन करतो व त्या ढगांमध्ये साठवलेले पवित्र व नूतन ( जलरूपी ) क्षीर देतात. वायूच्या प्रेरणेने मेघ एकमेकांवर आदळून, मोठ्या जोराने फिरावयास लागून, प्रचंड ध्वनि होतो, त्याला मेघगर्जना असें लोक म्हणत असतात. इंद्राच्या मेघराशी वायूच्या सपाट्यात सापडल्या, म्हणजे, पर्वतांना भेदून टाकणारे वज्राघातासारखे आवाज होत असतात. एखादा धनी ज्याप्रमाणें आपल्या सेवकांकडून पाहिजे तीं कामे करून घेतो, त्याप्रमाणें इंद्र हा आकाशस्थ मेघांना इच्छेप्रमाणें नाचवून त्यांजकडून पाऊस पाडवितो. त्या वेळीं केव्हा केव्हा विजा चमकून मोठा गडगडाट होतो. कांहीं मेघ दुर्दिनसूचक असतात; कांहीं विदीर्ण झालेल्या अभ्रपटलासारखे असतात; कांहीं अंजनासारखे असतात; व कांहींतून जलबिंदूंचा वर्षाव होत असतो. आकाशांतील अशा प्रकारच्या भिन्नस्वरूप मेघांच्या योगाने, देवेंद्र वर्षाकालामध्यें या विश्वाला जणू काय अलंकृतच करतो आहे असा भास होतो. केव्हां केव्हां आकाशभर मेघातील जलबिंदु पसरलेले असतात, त्या समयी आकाशाला मोत्यें लटकली आहेत असें वाटतें. सूर्याच्या किरणांचे द्वाराने शोषून घेतलेले उदक, जलदाता पर्जन्य, जगताच्या कल्याणाकरिता पुनः पृथ्वीवर पावसाचे रूपानें परत करितो. बा कृष्णा बीजापासून धान्यादिकांची उत्पत्ति करणारा पाऊस हा इंद्राच्या कृपेने पृथ्वीवर पडतो, या कारणाकरिता राजेलोक, आम्ही गोप, किंबहुना सर्व मनुष्यप्राणी, पावसाळ्यामध्यें मोठ्या आनंदाने एकत्र जमून उत्सवादिकांनीं देवेंद्राची आराधना करीत असतो.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
कृष्णं प्रति गोपवाक्यं नाम पञ्चदशोऽध्यायः ॥ १५ ॥
अध्याय पंधरावा समाप्त

GO TOP