श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व षोडशोऽध्यायः
शरद्वर्णनम्
वैशंपायन उवाच
गोपवृद्धस्य वचनं श्रुत्वा शक्रपरिग्रहे ।
प्रभावज्ञोऽपि शक्रस्य वाक्यं दामोदरोऽब्रवीत् ॥ १ ॥
वनं वनचरा गोपाः सदा गोधनजीविनः ।
गावोऽस्मद् दैवतं विद्धि गिरयश्च वनानि च ॥ २ ॥
कर्षुकाणां कृषिर्वृत्तिः पण्यं विपणिजीविनाम् ।
गावोऽस्माकं परा वृत्तिरेतत्त्रैविद्यमुच्यते ॥ ३ ॥
विद्यया यो यथा युक्तस्तस्य सा दैवतं परम् ।
सैव पूज्यार्चनीया च सैव तस्योपकारिणी ॥ ४ ॥
योऽन्यस्य फलमश्नानः करोत्यन्यस्य सत्क्रियाम्
द्वावनर्थौ स लभते प्रेत्य चेह च मानवः ॥ ५ ॥
कृष्यन्ता प्रथिता सीमा सीमान्तं श्रूयते वनम्
वनान्ता गिरयः सर्वे सा चास्माकं गतिर्ध्रुवा ॥ ६ ॥
श्रूयन्ते गिरयश्चापि वनेऽस्मिन्कामरूपिणः ।
प्रविश्य तास्तास्तनवो रमन्ते स्वेषु सानुषु ॥ ७ ॥
भूत्वा केसरिणः सिंहा व्याघ्राश्च नखिनां वराः ।
वनानि स्वानि रक्षन्ति त्रासयन्तो वनच्छिदः ॥ ८ ॥
यदा चैषां विकुर्वन्ति ते वनालयजीविनः ।
घ्नन्ति तानेव दुर्वृत्तान् पौरुषादेन कर्मणा ॥ ९ ॥
मन्त्रयज्ञपरा विप्राः सीतायज्ञाश्च कर्षुकाः ।
गिरियज्ञास्तथा गोपा इज्योऽस्माभिर्गिरिर्वने ॥ १० ॥
तन्मह्यं रोचते गोपा गिरियज्ञः प्रवर्तताम् ।
कर्म कृत्वा सुखस्थाने पादपेष्वथवा गिरौ ॥ ११ ॥
तत्र हत्वा पशून् मेध्यान् वितत्यायतने शुभे ।
सर्वघोषस्य संदोहः क्रियतां किं विचार्यते ॥ १२ ॥
तं शरत्कुसुमापीडाः परिवार्य प्रदक्षिणम् ।
गावो गिरिवरं सर्वास्ततो यान्तु पुनर्व्रजम् ॥ १३ ॥
प्राप्ता किलेयं हि गवां स्वादुतोयतृणा गुणैः ।
शरत् प्रमुदिता रम्या गतमेघजलाशया ॥ १४ ॥
प्रियकैः पुष्पितैर्गौरं श्यामं बाणसनैः क्वचित् ।
कठोरतृणमाभाति निर्मयूररुतं वनम् ॥ १५ ॥
विजला विमला व्योम्नि विबलाका विविद्युतः ।
विवर्धन्ते जलधरा विदन्ता इव कुञ्जराः ॥ १६ ॥
पटुना मेघनादेन नवतोयानुकर्षिणा ।
पर्णोत्करघनाः सर्वे प्रसादं यान्ति पादपाः ॥ १७ ॥
सितवर्णाम्बुदोष्णीषं हंसचामरवीजितम् ।
पूर्णचन्द्रामलच्छत्रं साभिषेकमिवाम्बरम् ॥ १८ ॥
हंसैः प्रहसितानीव समुत्कृष्टानि सारसैः ।
सर्वाणि तनुतां यान्ति जलानि जलदक्षये ॥ १९ ॥
चक्रवाकस्तनतटाः पुलिनश्रोणिमण्डलाः ।
हंसलक्षणहासिन्यः पतिं यान्ति समुद्रगाः ॥ २० ॥
कुमुदोत्फुल्लमुदकं ताराभिश्चित्रमम्बरम् ।
सममभ्युत्स्मयन्तीव शर्वरीष्वितरेतरम् ॥ २१ ॥
मत्तक्रौञ्चावघुष्टेषु कलमापक्वपाण्डुषु ।
निर्विष्टरमणीयेषु वनेषु रमते मनः ॥ २२ ॥
पुष्करिण्यस्तडागानि वाप्यश्च विकचोत्पलाः ।
केदाराः सरितश्चैव सरांसि च श्रियाज्वलन् ॥ २३ ॥
पङ्कजानि च ताम्राणि तथान्यानि सितान्यपि ।
उत्पलानि च नीलानि भेजिरे वारिजां श्रियम् ॥ २४ ॥
मदं जहुः सितापाङ्गा मन्दं ववृधिरेऽनिलाः ।
अभवद् व्यभ्रमाकाशमभूच्च निभृतोऽर्णवः ॥ २५ ॥
ऋतुपर्यायशिथिलैर्वृत्तनृत्यसमुज्झितैः ।
मयूराङ्गरुहैर्भूमिर्बहुनेत्रेव लक्ष्यते ॥ २६ ॥
स्वपङ्कमलिनैस्तीरैः काशपुष्पलताकुलैः ।
हंससारसविन्यासैर्यमुना भाति शोभना ॥ २७ ॥
कलमापाकरम्येषु केदारेषु जनेषु च ।
सस्यादा जलजादाश्च मत्ता विरुरुवुः खगाः ॥ २८ ॥
सिषिचुर्यानि जलदा जलेन जलदागमे ।
तानि सस्यानि बालानि कठिनत्वं गतानि वै ॥ २९ ॥
त्यक्त्वा मेघमयं वासः शरद्गुणविदीपितः ।
एष वै विमले व्योम्नि हृष्टो वसति चन्द्रमाः ॥ ३० ॥
क्षीरिण्यो द्विगुणं गावः प्रमत्ता द्विगुणं वृषाः ।
वनानां द्विगुणा लक्ष्मीः सस्यैर्गुणवती मही ॥ ३१ ॥
ज्योतींषि घनमुक्तानि पद्मवन्ति जलानि च ।
मनांसि च मनुष्याणां प्रसादमुपयान्ति वै ॥ ३२ ॥
असृजत् सविता व्योम्नि निर्मुक्तो जलदैर्भृशम् ।
शरत्प्रज्वलितं तेजस्तीक्ष्णरश्मिर्विशोषयन् ॥ ३३ ॥
नीराजयित्वा सैन्यानि प्रयान्ति विजिगीषवः ।
अन्योन्यराष्ट्राभिमुखाः पार्थिवाः पृथिवीक्षितः ॥ ३४ ॥
बन्धुजीवाभिताम्रासु बद्धपङ्कवतीषु च ।
मनस्तिष्ठति कान्तासु चित्रासु वनराजिषु ॥ ३५ ॥
वनेषु च विराजन्ते पादपा वनशोभिनः ।
असनाः सप्तपर्णाश्च कोविदाराश्च पुष्पिताः ॥ ३६ ॥
इषुसाह्वा निकुम्भाश्च प्रियकाः स्वर्णकास्तथा ।
सृमराः पेचुकाश्चैव केतक्यश्च समन्ततः ॥ ३७ ॥
व्रजेषु च विशेषेण गर्गरोद्गारहासिषु ।
शरत्प्रकाशयोषेव गोष्ठेष्वटति रूपिणी ॥ ३८ ॥
नूनं त्रिदशभूयिष्ठं मेघकालसुखोषितम् ।
पतत्रिकेतनं देवं बोधयन्ति दिवौकसः ॥ ३९ ॥
शरद्येवं सुसस्यायां प्राप्तायां प्रावृषः क्षये ।
नीलचन्द्रार्कवर्णैश्च रचितं बहुभिर्द्विजैः ॥ ४० ॥
फलैः प्रवालैश्च घनमिन्द्रचापघनोपमम् ।
भवनाकारविटपं लतापरममण्डितम् ॥ ४१ ॥
विशालमूलावनतं पवनाभोगमण्डितम् ।
अर्चयामो गिरिं देवं गाश्चैव च विशेषतः ॥ ४२ ॥
सावतंसैर्विषाणैश्च बर्हापीडैश्च दंशितैः ।
घण्टाभिश्च प्रलम्बाभिः पुष्पैः शारदिकैस्तथा ॥ ४३ ॥
शिवाय गावः पूज्यन्तां गिरियज्ञः प्रवर्त्यताम् ।
पूज्यतां त्रिदशैः शक्रो गिरिरस्माभिरिज्यताम् ॥ ४४ ॥
कारयिष्यामि गोयज्ञं बलादपि न संशयः ।
यद्यस्ति मयि वः प्रीतिर्यदि वा सुहृदो वयम् ।
गावो हि पूज्याः सततं सर्वेषां नात्र संशयः ॥ ४५ ॥
यदि साम्ना भवेत् प्रीतिर्भवतां वैभवाय च ।
एतन्मम वचस्तथ्यं क्रियतामविचारितम् ॥ ४६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि शरद्वर्णने षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
शरद्वर्णन -
वैशंपायन सांगतात : - श्रीकृष्णाला इंद्राचे सामर्थ्य पूर्णपणे माहीत होतें. तरी वृद्ध गोपाने इंद्राच्या प्रीत्यर्थ उत्सव करण्याचें कारण सांगितलेले ऐकून घेतल्यावर, त्याने समजून उमजून पुढीलप्रमाणे उत्तरपक्ष केला. " आपण अरण्यांत वास्तव्य करणारे गोपाल आहोंत, गाईच्या जीवावर नेहमी आपण आपला निर्वाह करतो. त्यापक्षीं पर्वत, वने व गाई हीच आपली दैवते होत, असें आपण समजले पाहिजे. कृषिकर्म हें शेतकऱ्यांच्या निर्वाहाचें साधन होय. वैश्यवृत्तीच्या लोकाचे व्यापार हें पोट होय. आणि आपल्या उपजीविकेचें परम निधान म्हणजे या गाई होत. वर्णधर्म असाच असून तो याप्रमाणे तीन प्रकारचा आहे. पूर्वकर्मानुसार ज्याला जो वर्ण प्राप्त झाला असेल, तोच त्यानें आपला मूल्यवान् ठेवा असें मानले पाहिजे. ज्याचा त्याचा स्वधर्म ( वर्णधर्म ) हाच ज्याला त्याला पूज्य, अर्चनीय व उपकारी असला पाहिजे. जो स्वधर्म सोडून,अन्य वर्णाला नियुक्त केलेली कर्मे आचरण करतो व तज्जन्य फलाचा उपभोग घेतो, त्या मनुष्याला इहपरलोकी दोन अनर्थ भोगावे लागतात. शेते असतील तेथपर्यंत गांवाची सीमा असते. गांवाची मर्यादा संपली कीं, वनाला सुरवात होते. पर्वत लागले म्हणजे अरण्याची गति खुंटते. म्हणून पर्वतांना आपण श्रेष्ठ दैवत समजले पाहिजे, असें माझें म्हणणें आहे. या अरण्यातील पर्वत वाटेल तीं रूपे धारण करून, भिन्न भिन्न रूपांच्या द्वाराने, आपआपल्या शिखरांवर क्रीडा करतात, असेही आपल्या ऐकण्यांत आहे. नखे हीच ज्यांची आयुधे आहेत, अशा व्याघ्रसिंहादिक पशूंची रूपे घेऊन, पर्वत हे आपल्या वनांचा उच्छेद करणाऱ्या लोकांस त्रास देतात, आणि त्या योगाने वनांचे सहज रक्षण होते. या उपर जेव्हां वनांत वास्तव्य करणारे किंवा अरण्यातील कंदमूलांदिकांवर निर्वाह करणारे लोक तेथें नासधूस करितात, तेव्हां हिंस्र कर्मे करून अशा दुर्जनांचा ते चांगला फडशा उडवतात. ब्राह्मण मंत्रयज्ञ करतात; कृषीवल हे सीतयज्ञ करतात; व आपण गोपाल गिरियज्ञ करतो. तात्पर्य, वनातील पर्वताचेंच आपण पूजन केलें पाहिजे. गोपहो, आपण पर्वताप्रीत्यर्थ उत्सव करण्यास सुरवात केली पाहिजे असें मला वाटतें. झाडांखाली अथवा पर्वतावर छानदार ठिकाण पाहून तेथें स्वस्तिवाचनादिक क्रिया करण्यास आरंभ करा. तसेंच यज्ञीय पशूंचा त्या जागेवर बळी देऊन कुंडमंडपादिकांची तेथें स्थापना करा. इतकें झाल्यावर, घोषांतील सर्व लोक मिळून उत्सव करण्यास लागा. विचार कसला करतां ? शरदऋतृत फुलणाऱ्या पुष्पांच्या माला घालून, सर्व गाईंकडून या पर्वतश्रेष्ठाभोवती प्रदक्षिणा करवून पुनः त्यांस व्रजामध्ये परत आणा. गाईंना मधुर तृण व जल देणारा रमणीय व प्रमुदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे. हा ऋतु लागला म्हणजे मेघ कमी होत जाऊन जलाशयातील पाणी आटू लागतें. प्रस्तुत हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुष्पांनी गौरवर्ण दिसत आहे. परंतु त्यांत कोठे कोठे बाणासनाच्या पुष्पांमुळे कृष्ण वर्णाची छटा दिसत आहे. आतां या वनातील गवत जून झालें असून, मोरांचा शब्द देखील कोठे ऐकू येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशेषच दिसत आहे. भग्नदंत कुंजरांप्रमाणें, आकाशांतील जलधर, विद्द्युद्रहित व जलशून्य झाल्याने स्वच्छ दिसत आहेत; व नवीन उदक आकर्षण करून घेणारे मेघ गडगडत आहेत. सर्व वृक्षांना नवी व घनदाट पालवी आलेली असल्यामुळें ते प्रसन्न दिसत आहेत. शुभ्रवर्ण मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामरे व पूर्णचंद्ररूपी निर्मळ छत्र, यांनी हें अंबर सुशोभित झालेले असल्याकारणानें, ते नूतन अभिषिक्त राजाप्रमाणें शोभत आहे. पाऊसकाळ संपत आला असल्यामुळे, त्याबरोबर तळी वगैरे जलाशय देखील रोडावत चालले आहेत असें वाटतें. हे कृश होत चाललेले जलाशय पाहून हंस व सारस हे देखील नाके मुरडीत आहेत. चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडल व हंसरूपी हास्य यांनी युक्त असलेल्या नद्या आपल्या समुद्ररूपी पतीच्या भेटीस चालल्या आहेत असा भास होत आहे. सांप्रत जलाशयामध्ये कुमुदपुष्पे फुलली आहेतआणि आकाश हें नक्षत्रांमुळे मनोहर दिसत आहे. त्यामुळें रात्रींच्या वेळीं जलाशय व आकाश या उभयतांची चढाओढ लागून राहिली आहे कीं काय, असा भास होतो. या वनामध्यें, मत्त झालेले क्रौंचपक्षी गात आहेत व धान्याचीं कणसे पिकावयाला आली आहेत. त्या कारणानें हें वन नुकताच विवाह झालेल्या दंपत्याप्रमाणें शोभत असून त्याचे ठिकाणी मन अत्यंत रममाण झाल्यावांचून रहात नाहीं. तडागांमध्यें पुष्कर कमलें फुलली आहेत. विहिरींमध्ये उत्पलें विकसित होत आहेत.
उदकपूर्ण क्षेत्रे, नद्या व सरोवरे ही अत्यंत सुंदर दिसत आहेत. तांबड्या, निळ्या, पांढऱ्या वगैरे रंगांच्या कमलांना पर्जन्याचे जलापासून एक प्रकारे विशिष्ट टवटवी आली आहे. मयूरांचा मद उतरलेला आहे. वायूंचा जोर कमी होऊन ते मंदमंद वाहू लागले आहेत. आकाशांत अभ्रे येईनाशी झाली आहेत. आणि समुद्र मात्र तुडुंब भरलेले दिसत आहेत. ऋतु बदलल्यामुळे साहजिक मोरांचा उत्साह शिथिल पडून त्यांनीं नर्तन करण्याचें सोडून दिलें आहे व त्यांचे पिसाऱ्यांतील डोळे पृथ्वीवर जिकडे तिकडे गळून पडले असल्याकारणाने भूमि ही असंख्य नेत्रांनी युक्त झाल्यासारखी भासत आहे. यमुना नदीच्या चिखलांनी भरलेल्या तीरांवर काशादिक फुलें व वेली ही रगडून पडली असून तेथें हंस व सारस पक्षी बसले आहेत, त्यामुळें आधींच रम्य असलेल्या यमुनेला विशेष शोभा आलेली आहे. धान्यें पिकावयाच्या सुमारास आली असल्याकारणानें शेते व वने ही फार रमणीय दिसत आहेत. धान्ये खाणारे व जलांत उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना गट्ट करणारे पक्षी मत्त होऊन गुंजारव करीत आहेत. पावसाळ्याच्या आरंभी ज्यांना मेघांनी पाणी घातले, तीं धान्ये आतां मोठी होऊन जून झाली आहेत. मेघांचे आवरण टाकून देऊन, शरद्दतुच्या प्रभावाने चमकणारा चंद्र निरभ्र आकाशामध्यें आनंदित होऊन राहिला आहे. गाई द्विगुणित दुग्ध देऊं लागल्या आहेत. वृषांचें बळ दुप्पट वाढून ते मस्त झाले आहेत. वनशोभा देखील द्विगुणित झाली असून, पृथ्वी धान्यादिकांनीं सुंदर ( गुणवती ) दिसत आहे. नक्षत्रे मेघांच्या कचाट्यातून सुटली आहेत. जलाशयांमध्यें कमले उगवलेली आहेत.
आणि ही शोभा अवलोकन करून मनुष्यांची अंत:करणें सुप्रसन्न दिसत आहेत. फारा दिवसांनी मेघांच्या तडाक्यांतून सुटलेला सूर्य शरदृतूच्या आगमनाने प्रज्वलित झालेलें आपलें तेज आकाशामध्यें प्रकट करून, प्रखर किरणांनीं सर्व रसात्मक सृष्टि आपल्या ठिकाणी शोषून घेत आहे. द्विग्विजय करण्यासाठीं हापापलेले पृथ्वीपति राजे आपआपल्या सैन्यांचा नीराजन-विधि करून, परस्परांच्या राष्ट्रांच्या दिशेने निघाले आहेत. या चित्रविचित्र वनराजींमध्यें सर्वत्र चिखल पडला असून त्या लालभडक पुष्पांमुळे फार सुंदर दिसत आहेत. त्यांचेकडे लक्ष गेलें असतां मन त्यांचे ठिकाणी मोहून जातें. वनाला शोभा देणारे, असन, सप्तपर्ण, कोविदार, बाणासन, निकुंभ, प्रियक व स्वर्णक इत्यादि वृक्षांना फुलांचा बहर आलेला असून त्यामुळें या वनाला अत्यंत शोभा आली आहे. त्याचप्रमाणें, या अरण्याचे सभोवती, सृमर जातीचे हरिण व घुबड यांची गडबड दृष्टीस पडत आहे. व जिकडे तिकडे केतकीची बने लागून गेली आहेत. घरोघर डेऱ्यांतून उत्पन्न होणाऱ्या नादाच्या मिषाने मूर्तिमंत शारदी शोभा हास्य करीत गौळवाड्यांतून वावरत आहे कीं काय असें वाटतें. खरोखर, देवाधिदेव गरुडध्वज विष्णूने मेघकालामध्यें सुखाने शयन केलें आहे, त्याला देव हे जागृत करूं पहात आहेत. पावसाळा संपून शरत्काल प्राप्त झाला आहे. जिकडे तिकडे उत्तम प्रकारची धान्ये उगवली आहेत. या समोरील गोवर्धन पर्वतावर, नीलवर्णाचे व चंद्रसूर्याच्या रंगाचे नानाविध पक्षी विहार करीत बसले असल्याकारणानें त्याला मनोहर वैचित्र्य प्राप्त झालें आहे. विविध प्रकारची फले व पल्लव यानीं हा पर्वत फुलून गेला असून इंद्रधनुष्याने युक्त असलेल्या मेघाप्रमाणे हा शोभत आहे. घराएवढे वृक्ष व मोठमोठ्या लता यांनी हा गोवर्धन अत्यंत रमणीय दिसत आहे. विशाल मूलांच्या योगाने हा वाकलेला असून वायूच्या तांडवाने याला फारच रमणीयता आलेली आहे. अशा या गोवर्धन पर्वताचे व विशेषेंकरून गाईंचे आपण पूजन करू. शिंगांवर तुरे व मोराची पिसे अडकवून गळ्यांत लोंबत्या घंटा बांधून सर्वांच्या कल्याणाकरितां शरद्दतूंत फुलणाऱ्या पुष्पांच्या योगाने गाईंचे पूजन करा व गिरियज्ञ सुरू करा. देव पाहिजे तर इंद्रयज्ञ करतील. आपण गिरियज्ञच करूं. बऱ्याबोलाने तुम्ही असें न केल्यास बलात्कारानें मीं हें तुमच्याकडून निःसंशय करवीन. जर तुमचे मजवर प्रेम असेल व परस्परांमध्यें मित्रभाव असेल तर शंका न आणता आपण गाईंचेच पूजन केलें पाहिजे. आपल्या हिताकरिता, बऱ्या बोलाने, मीं सांगतो याप्रमाणें, आणखी काहीएक विचार न करतां, करा. मी सांगत आहें तें सत्य आहे.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि शरद्वर्णनं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
अध्याय सोळावा समाप्त
GO TOP
|