श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
सप्तदशोऽध्यायः


गोवर्धनमहोत्सवः

वैशंपायन उवाच
दामोदरवचः श्रुत्वा हृष्टास्ते गोषु जीविनः ।
तद्वागमृतमासाद्य प्रत्यूचुरविशङ्‌‌‍कया ॥ १ ॥
तवैषा बाल महती गोपाणां हितवर्धिनी ।
प्रीणयत्येव नः सर्वान् बुद्धिर्वृद्धिकरी गवाम् ॥ २ ॥
त्वं गतिस्त्वं रतिश्चैव त्वं वेत्ता त्वं परायणम् ।
भयेष्वभयदस्त्वं नस्त्वमेव सुहृदां सुहृत् ॥ ३ ॥
त्वत्कृते कृष्ण घोषोऽयं क्षेमी मुदितगोकुलः ।
कृत्स्नो वसति शान्तारिर्यथा स्वर्गं गतस्तथा ॥ ४ ॥
जन्मप्रभृति कर्मैतद् देवैरसुकरं भुवि ।
बोद्धव्याच्चाभिमानाच्च विस्मितानि मनांसि नः ॥ ५ ॥
बलेन च परार्ध्येन यशसा विक्रमेणा च ।
उत्तमस्त्वं मनुष्येषु देवेष्विव पुरन्दरः ॥ ६ ॥
प्रतापेन च तीक्ष्णेन दीप्त्या पूर्णतयापि च ।
उत्तमस्त्वं च मर्त्येषु देवेष्विव दिवाकरः ॥ ७ ॥
कान्त्या लक्ष्म्या प्रसादेन वदनेन स्मितेन च ।
उत्तमस्त्वं च मर्त्येषु देवेष्विव निशाकरः ॥ ८ ॥
बलेन वपुषा चैव बाल्येन चरितेन च ।
स्यात् ते शक्तिधरस्तुल्यो न तु कश्चन मानुषः ॥ ९ ॥
यत् त्वयाभिहितं वाक्यं गिरियज्ञं प्रति प्रभो ।
कस्तल्लङ्‌‌‍घयितुं शक्तो वेलामिव महोदधिः ॥ १० ॥
स्थितः शक्रमहस्तात श्रीमान्गिरिमहस्त्वयम् ।
त्वत्प्रणीतोऽद्य गोपानां गवां हेतोः प्रवर्त्यताम् ॥ ११ ॥
भाजनान्युपकल्प्यन्तां पयसः पेशलानि च ।
कुम्भाश्च विनिवेश्यन्तामुदपानेषु शोभनाः ॥ १२ ॥
पूर्यन्तां पयसा नद्यो द्रोण्यश्च विपुलायताः ।
भक्ष्यं भोज्यं च पेयं च तत्सर्वमुपनीयताम् ॥ १३ ॥
भाजनानि च मांसस्य न्यस्यन्तामोदनस्य च ।
त्रिरात्रं चैव संदोहः सर्वघोषस्य गृह्यताम् ॥ १४ ॥
विशस्यन्तां च पशवो भोज्या ये महिषादयः ।
प्रवर्त्यतां च यज्ञोऽयं सर्वगोपसुसंकुलः ॥ १५ ॥
आनन्दजननो घोषो महान्मुदितगोकुलः ।
तूर्यप्रणादघोषैश्च वृषभाणां च गर्जितैः ॥ १६ ॥
हम्भारवैश्च वत्सानां गोपानां हर्षवर्धनः ।
दध्नो ह्रदो घृतावर्तः पयः कुल्यासमाकुलः ॥ १७ ॥
मांसराशिः प्रभूताढ्यः प्रकाशौदनपर्वतः ।
संप्रावर्तत यज्ञोऽस्य गिरेर्गोभिः समाकुलः ॥ १८ ॥
तुष्टगोपजनाकीर्णो गोपनारीमनोहरः ।
भक्ष्याणां राशयस्तत्र शतशश्चोपकल्पिताः ।
गन्धमाल्यैश्च विविधैर्धूपैरुच्चावचैस्तथा ॥ १९ ॥
अथाधिशृतपर्यन्ते संप्राप्ते यज्ञसंविधौ ।
यज्ञं गिरेस्तिथौ सौम्ये चक्रुर्गोपा द्विजैः सह ॥ २० ॥
यजनान्ते तदन्नं तु तत् पयो दधि चोत्तमम् ।
मांसं च मायया कृष्णो गिरिर्भूत्वा समश्नुते ॥ २१ ॥
तर्पिताश्चापि विप्राग्र्यास्तुष्टाः संपूर्णमानसाः ।
उत्तस्थूः प्रीतमनसः स्वस्ति वाच्यं यथासुखम् ॥ २२ ॥
भुक्त्वा चावभृते कृष्णः पयः पीत्वा च कामतः ।
संतृप्तोऽस्मीति दिव्येन रूपेण प्रजहास वै ॥ २३ ॥
तं गोपाः पर्वताकारं दिव्यस्रगनुलेपनम् ।
गिरिमूर्ध्नि स्थितं दृष्ट्‍वा कृष्णं जग्मुः प्रधानतः ॥ २४ ॥
भगवानपि तेनैव रूपेणाच्छादितः प्रभुः ।
सहितैः प्रणतो गोपैर्ववन्दात्मानमात्मना ॥ २५ ॥
तमूचुर्विस्मिता गोपा देवं गिरिवरे स्थितम् ।
भगवंस्त्वद्वशे युक्ता दासाः किं कुर्म किङ्‌‌‍कराः ॥ २६ ॥
स उवाच ततो गोपान् गिरिप्रभवया गिरा ।
अद्यप्र्भृति चेज्योऽहं गोषु यद्यस्तु वो दया ॥ २७ ॥
अहं वः प्रथमो देवः सर्वकामकरः शुभः ।
मम प्रभावाच्च गवामयुतान्येव भोक्ष्यथ ॥ २८ ॥
शिवश्च वो भविष्यामि मद्‌भक्तानां वने वने ।
रंस्ये च सह युष्माभिर्यथा दिविगतस्तथा ॥ २९ ॥
ये चेमे प्रथिता गोपा नन्दगोपपुरोगमाः ।
एषां प्रीतः प्रयच्छामि गोपानां विपुलं धनम् ॥ ३० ॥
पर्याप्नुवन्तु क्षिप्रं मां गावो वत्ससमाकुलाः ।
एवं मम परा प्रीतिर्भविष्यति न संशयः ॥ ३१ ॥
ततो नीराजनार्थं हि वृन्दशो गोकुलानि तम् ।
परिवव्रुर्गिरिवरं सवृषाणि समन्ततः ॥ ३२ ॥
ता गावः प्रद्रुता हृष्टाः सापीडस्तबकाङ्‌‌‍गदाः ।
सस्रजापीडशृङ्‌‌‍गाग्राः शतशोऽथ सहस्रशः ॥ ३३ ॥
अनुजग्मुश्च गोपालाः कालयन्तो धनानि च ।
भक्तिच्छेदानुलिप्ताङ्‌‌‍गा रक्तपीतसिताम्बराः ॥ ३४ ॥
मयूरचित्राङ्‌‌‍गदिनो भुजैः प्रहरणावृतैः ।
मयूरपत्रवृन्तानां केशबन्धैः सुयोजितैः ॥ ३५ ॥
बभ्राजुरधिकं गोपाः समवाये तदाद्भुते ।
अन्ये वृषानारुरुहुर्नृत्यन्ति स्म परे मुदा ॥ ३६ ॥
गोपालास्त्वपरे गाश्च जगृहुर्वेगगामिनः ।
तस्मिन् पर्यायनिर्वृत्ते गवां नीराजनोत्सवे ॥ ३७ ॥
अन्तर्धानं जगामाशु तेन देहेन सोऽचलः ।
कृष्णोऽपि गोपसहितो विवेश व्रजमेव ह ॥ ३८ ॥
गिरियज्ञप्रवृत्तेन तेनाश्चर्येण विस्मिताः ।
गोपाः सबालवृद्धा वै तुष्टुवुर्मधुसूदनम् ॥ ३९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
गिरियज्ञप्रवर्तने सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥


गिरियज्ञप्रवर्तन -

वैशंपायन सांगतात : - दामोदराचें वरील भाषण श्रवण करून गाईंवर उपजीविका करणाऱ्या गोपांना फार आनंद झाला. श्रीकृष्णाचे वचनामृताचा लाभ घेतल्यानंतर त्यांनी निःशंकपणें पुढीलप्रमाणे प्रत्युत्तर केलें. " बाळा, ही तुझी सर्व गोपांच्या हिताची बुद्धि ऐकून आम्हांला अत्यंत संतोष होत आहे.

या तुझ्या मोठ्यी युक्तीने आपल्या गोधनांची चांगली वाढ होईल. आमची गति व प्रीतिस्थान तूंच आहेस. तुला सर्व कांहीं कळत आहे. तूंच सर्वांचे श्रेष्ठ शरणस्थान आहेस. तूच आमचा सहृच्छ्रेष्ठ असून संकटसमयी आम्हांला अभय देतोस. हे कृष्णा, तुझ्यामुळे हा घोष सुरक्षित असून तुझ्या दर्शनाने गाईंना देखील आनंद होतो. येथील लोकांना कसलेही भय उरलेले नाहीं. आपण जणू स्वर्गात जाऊन राहिलो आहो असें त्यांना वाटतें. देवांना देखील कठीण अशीं कृत्ये तू जन्मापासून करीत आला आहेस. " मी तुम्हांकडून बलाने गोयज्ञ व गिरियज्ञ करवीन " इत्यादि तुझी प्रशंसनीय गर्वोक्ति ऐकून आमची मने आश्चर्याने फारच गुंग झाली आहेत. श्रेष्ठ प्रकारचे सामर्थ्य, यश व पराक्रम इत्यादि गुणांच्या योगाने तू देवांत जसा पुरंदर तसा आम्हां मानवांत सर्वश्रेष्ठ आहेस असें आम्हांस वाटतें. तेजोगोलांमध्ये जसा दिवाकर तसा सर्व मर्त्य मनुष्यांमध्ये तू आपल्या प्रखर प्रतापानें, तेजाने व सर्वांगपरिपूर्णतेने वरिष्ठ आहेस. उपग्रहात ज्याप्रमाणें चंद्र, त्याप्रमाणें तूं कांति, शोभा, प्रसन्नता व स्मितवदनत्व इत्यादि गुणांनी सर्व लोकांत वैशिष्ट्यानें चमकत आहेस. बळ, शरीर व अभ्दुत बाललीला या बाबतींत, एक कार्तिकस्वामीशींच तुझी तुलना करितां येईल. कोणत्याही मनुष्याच्याने तुझी बरोबरी करवणार नाहीं. हे प्रभो, महासागराच्याने ज्याप्रमाणें आपल्या तीराचे उल्लंघन होणें नाहीं त्याप्रमाणें गिरियज्ञाविषयी तूं जी आज्ञा आम्हाला केली आहेस, तिचे उल्लंघन करण्याची कोणाची छाती आहे ? बाबारे, शक्रोत्सव तहकूब करून आतां त्या ऐवजी तुझ्या आज्ञेप्रमाणें, गाई व गोप यांच्या कल्याणाकरितां, श्रीमान् गिरिमह आम्ही चालू करतो. लोकहो, आपण भोजनाकरितां सुंदर सुंदर दुधाचीं पक्वान्नें तयार करूं या. जलप्राशन करण्याच्या ठिकाणी मंगलकारक कुंभ नेऊन ( भरून ) ठेव. मोठमोठ्या टाक्या व कांहीं लांबरुंद डोण्या ( दगड्या ) दुधाने भरून भक्ष्य, भोज्य व पेय पदार्थांचा चांगला साठा करूं. मांसाची व भाताची तपेलीं बरोबर घेऊन सर्व घोषांतील तीन दिवसांचे दही-दूध जमा करूं. टोणगे वगैरे ज्या पशूंचें मांस आपण खातो, तसले पशू मारून सर्वजण मिळून गिरियज्ञ करण्याच्या तयारीला लागूं. तदनंतर गोधनें संतुष्ट होऊन त्या घोषांत सर्वत्र आनंदी आनंद झाला. तूर्य, प्रणाद इत्यादि मंगलवाद्यांच्या घोषाने व गाई, बैल आणि वांसरें यांच्या हंबरण्यानें सर्व गोपाळांना अत्यंत हर्ष वाटला. त्या घोषांत लौकरच जिकडे तिकडे दह्याचे डोह, त्यांत तुपाचे भोंवरे, व भोवती दुधाचे कालवे, मसालेदार मांसाच्या मोठाल्या राशी आणि भाताचे पर्वतप्राय ढीग नजरेस पडूं लागले. सारांश, गाईंसहवर्तमान, सर्व गवळ्यांचा गिरियज्ञ सुरू झाला. त्या यज्ञाचे ठिकाणी संतुष्ट चित्त अशा गोपाळांची गर्दी झाली असून गौळणींच्या सान्निध्याने त्या यज्ञाला फारच शोभा आलेली होती. तेथें भक्ष्य पदार्थांच्या राशीच्या राशी पडल्या असून शिवाय नानाप्रकारचे धूप व गंधमाल्यादि पूजासामुग्री यांचीही रेलचेल होती. भाताची भांडी चुलीवर ठेवण्यापर्यंत गिरियज्ञाची सर्व तयारी होतांच, सुमुहूर्त पाहून गौळ्यांनी ब्राह्मणांसह उद्दिष्ट यज्ञ करण्यास आरंभ केला. यज्ञ समाप्त झाल्यावर कृष्णाने आपल्या मायेने पर्वताचे रूप घेऊन यज्ञामध्यें अर्पण केलेले सर्वोत्कृष्ट अन्न, दूध, दही व मांस भक्षण करण्यास सुरुवात केली. यज्ञाकरितां आलेले ब्राह्मणश्रेष्ठहि जेऊन अत्यंत तृप्त झाले. त्यांच्या मनकामना पूर्ण होऊन त्यांच्या अंतःकरणाला परम संतोष झाला व स्वस्ति वाचन करून ते मोठ्या समाधानाने पानावरून उठले. अवभृथस्नान करण्याच्या वेळीं, मी इष्ट अन्न भक्षण करून व आतृप्तिपर्यंत दुग्ध प्राशन करून " अत्यंत तृप्त झालो आहें " असें दिव्यरूपानें कृष्णाने म्हटलें व तत्सूचक मधुर हास्य केलें. नंतर पर्वताएवढे विशाल रूप धारण करून, कृष्ण पर्वताच्या शिखरावर बसलेला गोपांच्या दृष्टीस पडला. त्याच्या गळ्यांत दिव्य पुष्पमाळा असून त्याच्या अंगाला उटी लावलेली होती. पर्वताला वंदन करण्याकरितां निघालेले गोपाळ विशेषेंकरून पर्वतशिखरावर दिसत असलेल्या कृष्णाकडे जाऊं लागले; तेव्हां समर्थ भगवान् कृष्णाने गोपरूपांत आपलें खरें स्वरूप लीन करून सर्व गोपाळांच्या बरोबर स्वतःसच ( पर्वतरूपी ) प्रणामपूर्वक वंदन केलें. श्रीकृष्ण गिरिशिखरावर बसला आहे हें अवलोकन करून गोपाळांना अत्यंत आश्चर्य वाटलें व ते पर्वतारूढ भगवंताला उद्देशून म्हणाले, " देवा, आम्ही तुझे दास असून, सर्वस्वी तुझ्याअधीन आहो. आम्ही पामरांनीं काय करावे तें सांग."

यावर भगवंताने पर्वताकडून शब्द काढवून गोपांना प्रत्युत्तर दिलें. " गोपहो, गाईंवर जर खरोखर तुमची ममता असेल तर आजपासून तुम्ही नेहमी माझाच यज्ञ करा. मींच तुमचा मुख्य देव असून तुमच्या मनकामना पूर्ण करतो. तुमचें कल्याण करणाराही मींच. माझ्याच प्रभावाने तुम्ही सहस्रावधि गाईंचा उपभोग घ्याल. तुम्ही माझे भक्त असल्याकारणानें मी वनांमध्यें तुमचे कल्याण करीन व स्वर्गांत ज्याप्रमाणें मी रहातो, त्याप्रमाणें येथें तुमच्याबरोबर रममाण होईन. नंदादिक प्रसिद्ध गोपांवर संतुष्ट होऊन मी त्यांना विपुल धन प्राप्त करून देईन. आतां एकदा वांसरांसह सर्व गाईंकडून मला प्रदक्षिणा करवा म्हणजे मला अत्यंत संतोष होईल, यांत संशय नाहीं."

तदनंतर, त्या पर्वताची अर्चा करण्याकरितां सर्व गाई व बैल मिळून कळपा- कळपांनीं त्या गिरिश्रेष्ठाभोंवतीं झपाट्याने प्रदक्षिणा करूं लागली. त्यांच्या शिंगांवर माळा व तुरे लावले होते. मस्तकांवर व पुढच्या पायांवर अशींच उचित भूषणें घालून सर्व गाईंबैलांना सजविलेले होते. याप्रमाणे आनंदाने, शेकडो हजारों गाई पर्वताभोवती चालल्या होत्या; त्यांचे मागून, त्यांना हाकीत गुराखी चालले होते; त्यांनीं आपल्या विविध अवयवांना वेगवेगळे रंग लावले होते. तांबडी, पांढरी व पिवळी अशीं वस्‍त्रे त्यांनीं परिधान केली होतीं. मोराच्या पिसाऱ्याचीं बाहुभूषणे घालून त्यांनीं हातांत ( गाईंस वळण्याकरितां ) काठ्या घेतल्या होत्या; तसेंच आपल्या केंसामध्ये त्यांनीं मोराच्या पिसाऱ्यांतील काड्या मोठ्या युक्तीने खोवल्या होत्या. अशा प्रकारे ते गोपाल फारच शोभिवंत दिसत होते. त्यांतही कित्येकजण बैलांवर बसले होते; कित्येक नाचत होते; कांहीं अतिशय पळत असलेल्या गाईंस आवरीत होते.

याप्रमाणे, तो प्रदक्षिणाविधि पूर्ण झाल्यावर त्या पर्वताचे कृष्णस्वरूप अंतर्धान पावले. इकडे कृष्णही सर्व गोपांसहवर्तमान व्रजामध्ये परत आला. गिरियज्ञाचे वेळीं घडलेल्या प्रकारामुळे सर्व आबालवृद्ध गोप फार आश्चर्यभरित झाले व जो तो मधुसूदनाची स्तुति करूं लागला.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
गोवर्धनमहोत्सवः नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
अध्याय सतरावा समाप्त

GO TOP