श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व अष्टादशोऽध्यायः
गोवर्धनधारणम्
वैशंपायन उवाच
महे प्रतिहते शक्रः सक्रोधस्त्रिदशेश्वरः ।
सांवर्तकं नाम गणं तोयदानामथाब्रवीत् ॥ १ ॥
भो बलाहकमातङ्गाः श्रूयतां मम भाषितम् ।
यदि वो मत्प्रियं कार्यं राजभक्तिपुरस्कृतम् ॥ २ ॥
एते वृन्दावनगता दामोदरपरायणाः ।
नन्दगोपादयो गोपा विद्विषन्ति ममोत्सवम् ॥ ३ ॥
आजीवो यः परस्तेषां गोपत्वं च यतः स्मृतम् ।
ता गावः सप्तरात्रेण पीड्यन्तां वर्षमारुतैः ॥ ४ ॥
ऐरावतगतश्चाहं स्वयमेवाम्बुदारुणं ।
स्रक्ष्यामि वृष्टिं वातं च वज्राशनिसमप्रभम् ॥ ५ ॥
भवद्भिश्चण्डवर्षेण चरता मारुतेन च ।
हतास्ताः सव्रजा गावस्त्यक्ष्यन्ति भुवि जीवितम् ॥ ६ ॥
एवमाज्ञापयामास सर्वाञ्जलधरान् प्रभुः ।
प्रत्याहते वै कृष्णेन शासने पाकशासनः ॥ ७ ॥
ततस्ते जलदाः कृष्णा घोरनादा भयावहाः ।
आकाशं छादयामासुः सर्वतः पर्वतोपमाः ॥ ८ ॥
विद्युत्संपातजननाः शक्रचापविभूषिताः ।
तिमिरावृतमाकाशं चक्रुस्ते जलदास्तदा ॥ ९ ॥
गजा इवान्यसंयुक्ताः केचिन्मकरवर्चसः ।
नागा इवान्ये गगने चेरुर्जलदपुङ्गवाः ॥ १० ॥
तेऽन्योन्यं वपुषा बद्धा नागयूथायुतोपमाः ।
दुर्दिनं विपुलं चक्रुश्छादयन्तो नभस्तलम् ॥ ११ ॥
नृहस्तनागहस्ताभ्यां वेणूनां चैव सर्वतः ।
धाराभिस्तुल्यरूपाभिर्ववृषुस्ते बलाहकाः ॥ १२ ॥
समुद्रं मेनिरे तं हि खमारूढं नृचक्षुषः ।
दुर्विगाह्यमपर्यन्तमगाधं दुर्दिनं महत् ॥ १३ ॥
नैवापतन्वै खगमा दुद्रुवुर्मृगजातयः ।
पर्वताभेषु मेघेषु खे नदत्सु समन्ततः ॥ १४ ॥
नष्टसूर्येन्दुसदृशैर्मेघैर्नभसि दारुणैः।
अतिवृष्टेन लोकस्य विरूपमभवद् वपुः ॥ १५ ॥
मेघौघैर्निष्प्रभाकारमदृश्यग्रहतारकम् ।
चन्द्रसूर्यांशुरहितं खं बभूवातिनिष्प्रभम् ॥ १६ ॥
वारिणा मेघमुक्तेन मुच्यमानेन चासकृत् ।
आबभौ सर्वतस्तत्र भूमिस्तोयमयी यथा ॥ १७ ॥
विनेदुर्बर्हिणस्तत्र तोककल्परुताः खगाः ।
विवृद्धिं निम्नगा याताः प्लवगाः संप्लवं गताः ॥ १८ ॥
गर्जितेन च मेघानां पर्जन्यनिनदेन च ।
तर्जितानीव कम्पन्ते तृणानि तरुभिः सह ॥ १९ ॥
प्राप्तोऽन्तकालो लोकानां व्यक्तमेकार्णवा मही ।
इति गोपगणा वाक्यं व्याहरन्ति भयार्दिताः ॥ २० ॥
तेनोत्पाताम्बुवर्षेण गावो विप्रहता भृशम् ।
हम्भारवैः क्रन्दमाना न चेलुः स्तम्भितोपमाः ॥ २१ ॥
निष्कम्पसक्थिचरणा निष्प्रयत्नखुराननाः ।
हृष्टरोमार्द्रतनवः क्षामकुक्षिपयोधराः ॥ २२ ॥
काश्चित् प्राणाञ्जहुः श्रान्ता निपेतुः काश्चिदातुराः ।
काश्चित्सवत्साः पतिता गावः शीकरवेजिताः ॥ २३ ॥
काश्चिदाक्रम्य क्रोडेन वत्सांस्तिष्ठन्ति मातरः ।
विमुखाः श्रान्तसक्थ्यश्च निराहाराः कृशोदराः ॥ २४ ॥
पेतुरार्ता वेपमाना गावो वर्षपराजिताः ।
वत्साश्चोन्मुखका बाला दामोदरमुखाः स्थिताः ।
त्राहीति वदनैर्दीनैः कृष्णमूचुरिवार्दिताः ॥ २५ ॥
गवां तत् कदनं दृष्ट्वा दुर्दिनागमजं महत् ।
गोपांश्चासन्ननिधनान्कृष्णः कोपं समादधे ॥ २६ ॥
स चिन्तयित्वा संरब्धो दृष्टो योगो मयेति च ।
आत्मानमात्मना वाक्यमिदमूचे प्रियंवदः ॥ २७ ॥
अद्याहमिममुत्पाट्य सकाननवनं गिरिम् ।
कल्पयेयं गवां स्थानं वर्षत्राणाय दुर्धरम् ॥ २८ ॥
अयं धृतो मया शैलः पृथ्वीगृहनिभोपमः ।
त्रास्यते सव्रजा गा वै मद्वश्यश्च भविष्यति ॥ २९ ॥
एवं स चिन्तयित्वा तु कृष्णः सत्यपराक्रमः ।
बाह्वोर्बलं दर्शयिष्यन्समीपं तं महीधरम् ।
दोर्भ्यामुत्पाटयामास कृष्णो गिरिमिवापरः ॥ ३० ॥
स धृतः सङ्गतो मेघैर्गिरिः सव्येन पाणिना ।
गृहभावं गतस्तत्र गृहाकारेण वर्चसा ॥ ३१ ॥
भूमेरुत्पाट्यमानस्य तस्य शैलस्य सानुषु ।
शिलाः प्रशिथिलाश्चेलुर्विनिष्पेतुश्च पादपाः ॥ ३२ ॥
शिखरैर्घूर्णमानैश्च सीदमानैश्च पादपैः ।
विधूतैश्चोच्छ्रितैः शृङ्गैरगमः खगमोऽभवत् ॥ ३३ ॥
चलत्प्रस्रवणैः पार्श्वैर्मेघौघैरेकतां गतैः ।
भिद्यमानाश्मनिचयश्चचाल धरणीधरः ॥ ३४ ॥
न मेघानां प्रवृष्टानां न शैलस्याश्मवर्षिणः ।
विविदुस्ते जना रूपं वायोस्तस्य च गर्जतः ॥ ३५ ॥
मेघैः सशैलसंस्थानैर्नीलैः प्रस्रवणार्पितैः ।
मिश्रीकृत इवाभाति गिरिरुद्दामबर्हवान् ॥ ३६ ॥
आप्लुतोऽयं गिरिः पक्षैरिति विद्याधरोरगाः ।
गन्धर्वाप्सरसश्चैव वाचो मुञ्चन्ति सर्वशः ॥ ३७ ॥
सहस्ततलविन्यस्तोमुक्तमूलः क्षितेस्तलात् ।
रीतीर्निर्वर्तयामास काञ्चनाञ्जनराजतीः ॥ ३८ ॥
कानिचिच्छिथिलानीव संच्छिन्नार्धानि कनिचित् ।
गिरेर्मेघप्रवृष्टानि तस्य शृङ्गणि चाभवन् ॥ ३९ ॥
गिरिणा कम्पमानेन कम्पिताणनां तु शाखिनाम् ।
पुष्पमुच्चावचं भूमौ व्यशीर्यत समन्ततः ॥ ४० ॥
निःसृताः पृथुमूर्धानः स्वस्तिकार्धविभूषिताः ।
द्विजिह्वपतयः क्रुद्धाः खेचराः खे समन्ततः ॥ ४१ ॥
आर्तिं जग्मुः खगगणा वर्षेण च भयेन च ।
उत्पत्त्योत्पत्त्य गगनात् पुनः पेतुरवाङ्मुखाः ॥ ४२ ॥
रेसुरारोषिताः सिंहाः सजला इव तोयदाः ।
गर्गरा इव मथ्यन्तो नेदुः शार्दूलपुङ्गवाः ॥ ४३ ॥
विषमैश्च समीभूतैः समैश्चात्यन्तदुर्गमैः ।
व्यावृत्तदेहः स गिरिरन्य एवोपलक्ष्यते ॥ ४४ ॥
अतिवृष्टस्य तैर्मेघैस्तस्य रूपं बभूव ह ।
स्तम्भितस्येव रुद्रेण त्रिपुरस्य विहायसि ॥ ४५ ॥
बाहुदण्डेन कृष्णास्य विधृतं सुमहत्तदा ।
नीलाभ्रपटलच्छन्नं तद्गिरिच्छत्रमाबभौ ॥ ४६ ॥
स्वप्नायमानो जलदैर्निमीलितगुहामुखः ।
बाहूपधाने कृष्णास्य प्रसुप्त इव खे गिरिः ॥ ४७ ॥
निर्विहङ्गरुतैर्वृक्षैर्निर्मयूररुतैर्वनैः ।
निरालम्ब इवाभाति गिरिः स्वशिखरैर्वृतः ॥ ४८ ॥
पर्यस्तैर्घूर्णमानैश्चप्रचलद्भिश्च सानुभिः ।
सज्वराणीव शैलस्य वनानि शिखराणि च ॥ ४९ ॥
उत्तमाङ्गगतास्तस्य मेघाः पवनवाहनाः ।
त्वर्यमाणा महेन्द्रेण तोयं मुमुचुरक्षयम् ॥ ५० ॥
स लम्बमानः कृष्णस्य भुजाग्रे सघनो गिरिः ।
चक्रारूढ इवाभाति देशो नृपतिपीडितः ॥ ५१ ॥
स मेघनिचयस्तस्थौ गिरिं तं परिवार्य ह ।
पुरं पुरस्कृत्य यथा स्फीतो जनपदो महान् ॥ ५२ ॥
निवेश्य तं करे शैलं तोलयित्वा च सस्मितम् ।
प्रोवाच गोप्ता गोपानां प्रजापतिरिव स्थितः ॥ ५३ ॥
एतद् देवैरसंभाव्यं दिव्येन विधिना मया ।
कृतं गिरिगृहं गोपा निर्वातं शरणं गवाम् ॥ ५४ ॥
क्षिप्रं विशन्तु यूथानि गवामिह हि शान्तये ।
निर्वातेषु च देशेषु निवसन्तु यथासुखम् ॥ ५५ ॥
यथाश्रेष्ठं यथायूथं यथासारं यथासुखम् ।
विभज्यतामयं देशः कृतं वर्षनिवारणम् ॥ ५६ ॥
शैलोत्पाटनभूरेषा महती निर्मिता मया ।
पञ्चक्रोशप्रमाणेन क्रोशैकविस्तरो महान् ।
त्रैलोक्यमप्युत्सहते रक्षितुं किं पुनर्व्रजम् ॥ ५७ ॥
ततः किलकिलाशब्दो गवां हम्भारवैः सह ।
गोपानां तुमुलो जज्ञे मेघनादश्च बाह्यतः ॥ ५८ ॥
प्राविशन्त ततो गावो गोपैयूथप्रकल्पिताः ।
तस्य शैलस्य विपुलं प्रदरं गह्वरोदरम् ॥ ५९ ॥
कृष्णोऽपि मूले शैलस्यशैलस्तम्भ इवोच्छ्रितः ।
दधारैकेन हस्तेन शैलं प्रियमिवातिथिम् ॥ ६० ॥
ततो व्रजस्य भाण्डानि युक्तानि शकटानि च ।
विविशुर्वर्षभीतानि तद् गृहं गिरिनिर्मितम् ॥ ६१ ॥
अतिदैवं तु कृष्णस्य दृष्ट्वा तत्कर्म वज्रभृत् ।
मिथ्याप्रतिज्ञो जलदान् वारयामास वै विभुः ॥ ६२ ॥
सप्तरात्रे तु निर्वृत्ते धरण्यां विगतोत्सवः ।
जगाम संवृतो मेघैर्वृत्रहा स्वर्गमुत्तमम् ॥ ६३ ॥
निवृत्ते सप्तरात्रे तु निष्प्रयत्ने शतक्रतौ ।
गताभ्रे विमले व्योम्नि दिवसे दीप्तभास्करे ॥ ६४ ॥
गावस्तेनैव मार्गेणा परिजग्मुर्यथागतम् ।
स्वं च स्थानं ततो घोषः प्रत्ययात् पुनरेव सः ॥ ६५ ॥
कृष्णोऽपि तं गिरिश्रेष्ठं स्वस्थाने स्थावरात्मवान् ।
प्रीतो निवेशयामास शिवाय वरदो विभुः ॥ ६६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि गोवर्धनोद्धरणे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
गोवर्धनोद्धरण -
वैशंपायन सांगतात : - आपल्या प्रीत्यर्थ होणाऱ्या उत्सवांमध्ये विघ्न आलें असें पहाताच सुरेश्वर इंद्राला अत्यंत क्रोध आला व त्यानें सांवर्त्तक नांवाच्या मेघसमूहांस आज्ञा केली, कीं " हे मेघश्रेष्ठ हो, माझे मनांत असलेली गोष्ट, राजनिष्ठेच्या भावनेने, करण्याची तुमची इच्छा असेल, तर मी सांगतो तें ऐका. श्रीकृष्णाची भक्ति करणारे वृंदावनातील नंदादिक गोप माझ्या उत्सवाच्या विरुद्ध झाले आहेत. यांचा गाईंवरच मुख्यत्वेकरून निर्वाह चालतो; ह्मणून तुम्ही सात अहोरात्रपर्यंत एकसारखा पाऊस पाडून व सोसाटाचा वायु उत्पन्न करून यांच्या गाईंना पीडा करा व मी स्वतःही ऐरावतावर आरूढ होऊन वज्राघातासारखी धो धो वृष्टि करतो आणि प्रलयकालाप्रमाणें सोसाट्याचा वारा निर्माण करून पावसाचा भयंकर वर्षाव करतो. ह्मणजे तुमच्या प्रखर वृष्टीमुळे व वाऱ्याच्या सोसाट्यानें, दे माय धरणी ठाय असें होऊन, सर्व व्रजवासी लोक व गाई पटापट प्राण सोडतील."
श्रीकृष्णाने आपली व्यवस्था मोडून टाकली असें पहाताच क्रोधवश झालेल्या देवेंद्राने सर्व मेघांना वरीलप्रमाणें आज्ञा केली. त्याबरोबर, काळेकुट्ट, भयंकर व पर्वतप्राय मेघ, चोहोबाजूंनी आकाशांत जमून मोठमोठ्यानें गडगडू लागले. क्षणार्धात त्यांनीं सर्व नभोमंडल व्यापून टाकले. विजा चमकूं लागल्या. ( आकाशांत ) इंद्रधनुष्यें दिसूं लागली आणि आकाश अंधकाराने गुडुप झालें. कित्येक ढग दुसऱ्यांवर तुटून पडण्यास उद्द्युक्त झालेल्या हत्तींप्रमाणें नभोमंडळांत चमकत होते, तर कित्येकांची आकृति मकरासारखी होती. कांहीं नागांच्या आकाराचे दिसत होते. याप्रकारचे जलधर वीर आकाशामध्यें ( इंद्राची आज्ञा होताक्षणीच ) इकडून तिकडे संचार करूं लागले. सर्व ढग एकमेकांशी संलग्न झाल्यामुळे हत्तींच्या दाट समुदायाप्रमाणे दिसत होते. सर्व नभोमंडल मेघांच्या योगाने व्यापून गेल्यामुळें काळोख पडून अकाली दुर्दिनाची अवस्था प्राप्त झाली. लौकरच माणसाच्या हाताप्रमाणें, हत्तीच्या सोंडेप्रमाणें व बांबूच्या दांड्याप्रमाणे, पावसाची मोठी मुसळधार कोसळू लागली. काळेभोर झालेलें आकाश अगाध, अनंत व दुस्तर दिसत असल्यामुळें, समुद्राने गगनांत उडी मारली आहे कीं काय असा त्या वेळीं लोकांच्या दृष्टीला क्षणभर भास झाला. पर्वतासारखे मोठाले मेघ गडगडाट करून आकाशांत थैमान करूं लागल्याकारणानें पक्षी उडेनासे झाले. हरिणांचे पाय चालेनात. प्रलयकालीन मेघांप्रमाणें भयंकर मेघांची प्रचंड वृष्टि झाल्यामुळे लोकांची शरीरे विद्रूप झाली. पावसाच्या धुमश्चक्रीमुळे आकाश अत्यंत निस्तेज झालें. ग्रह व नक्षत्रे ही अदृश्य झाली. चंद्रसूर्यांचे किरण आहेत कीं नाहींत याचा संशय पडू लागला. सारांश, आकाशाची प्रभा पूर्णपणे लोपून गेली. मेघांतून एकसारखी उदकाची वृष्टि चालू झाल्यामुळे पृथ्वी जिकडे तिकडे जलमय दिसू लागली. मोर मोठमोठ्यानें टाहो फोडू लागले व पक्षी केविलवाणीने आरडूं लागले. उलटपक्षी नद्यांना पूर येऊन त्यांच्या तीरावरील वृक्ष उन्मळून पाण्याच्या ओघाबरोबर वाहू लागले. ढगांच्या गडगडाटाने व पावसाच्या धोधाट्यानें तृणे व झाडे कांपावयास लागली. सर्व पृथ्वी एकच जळमय झाल्याचे स्पष्ट दिसत असून " जगताचा प्रलयकाल समीप आला आहे " असें भीतीनें गांगरून जाऊन व्रजवासी लोक आपआपसांत बोलू लागले. त्या उत्पातसूचक जलवृष्टीमुळे, गाई अत्यंत व्याकुल होऊन दीनवाणीने हंबरू लागल्या व जखडून बांधल्याप्रमाणें त्यांच्यानें एक पाऊलही पुढें मागें टाकवेना. त्यांचे पाय व मांड्या ही ताठून गेली. खुरांनी व तोंडांनी त्यांना कांहीं करवेना. त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. त्यांची शरीरे नखशिखांत भिजून गेली आणि त्यांच्या ओट्या व आंचळ ही आवळून गेली. कित्येक गाईंनी दमून जाऊन प्राण सोडले, कित्येक मृतप्राय निचेत पडल्या, कांहीं जलबिंदूंच्या तडाक्यानें व्याकुल होऊन वत्सांसह खालीं बसल्या. कित्येकींनीं आपली वासरे पोटाखाली घेतली. काहींनीं तोंडे फिरविली. त्यांच्या मांड्यांमध्यें जोम राहिला नाहीं व पोटांत कांहीं नसल्यामुळे पोटे खपाटीला गेली.
पावसाच्या वर्षावाने त्रस्त होऊन कित्येक गाई अत्यंत विव्हल झाल्या. त्यांची शरीरें थरथर कापू लागली. गाईंची लहान लहान वासरे वर मान करून कृष्णाकडे पहात होतीं. जणू काय, त्रस्त झालेल्या आमचे तूं रक्षण कर असें आपल्या दीनवदनांनीं तीं कृष्णाला सांगत होतीं. अकालपर्जन्यामुळें गाईंची दाणादाण झालेली पाहून व सर्व गोपाल देखील मरणोन्मुख पडलेले अवलोकन करून, शेवटीं कृष्णाला अत्यंत कोप आला व प्रक्षुब्ध स्थितींतच विचार केल्यानंतर पुढीलप्रमाणें तो प्रियभाषी कृष्ण आपल्याशीच बोलला : - "मला या आपत्तीचा नाश करण्याचा उपाय तर सुचला. आता या दुर्धर पर्वताला त्याच्यावरील रानांवनांसह उपटून त्याच्याखालीं पर्जन्याचा त्रास चुकविण्यासाठी गाईना रहाता येईल असें स्थान मी तयार करतो. मीं हा पर्वत वर उचलून धरला म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या घराप्रमाणे हा व्रजवासी गाईंचे व गोपांचें रक्षण करील आणि पूर्णपणे माझ्या ताब्यांत राहील."
याप्रमाणे स्वगत विचार करून आपले बाहुबल दाखविण्याकरितां सत्यपराक्रमी कृष्ण त्या पर्वताजवळ गेला. आणि पर्वताएवढें रूप धारण करून त्यानें आपल्या हातांनी तो पर्वत उपटला व लटकलेल्या ढगांसह उजव्या हातांत घेऊन वर उचलला. त्याबरोबर तो घराच्या छपराप्रमाणें शोभू लागला. शिखरांसह त्या पर्वताला कृष्णाने भूमींतून जेव्हां उपटून काढलें तेव्हां त्यावरील शिला शिथिल होऊन हालू लागल्या व वृक्ष उन्मळून पडले. जेव्हां त्या पर्वताची शिखरे गरगर फिरू लागली, वृक्ष कोसळू लागले व सुळके हलू लागले, त्या वेळी तो मूळचा अचल पर्वत एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशांत संचार करतो आहे असा भास होत होता. त्या पर्वताच्या दोन्ही अंगांनी पाण्याचे प्रवाह चालले होते, त्यांतच एकत्र झालेल्या मेघांतून पडणारे पाणी मिळून गेलें होतें. या पाण्याच्या माराने, पर्वतावरील दगडांचा चुरा होत होता व पर्वतही एकसारखा डळमळत होता. पर्वतासारख्या अवाढव्य छपराखालीं आश्रय मिळाला असल्यामुळें वर चाललेली मेघांची वृष्टि, वायूचा सोसाटा व पर्वतावरून दगडांचा होत असलेला वर्षाव यांपैकी कोणतीही गोष्ट व्रजवासी लोकांचे समजण्यांत येत नव्हती. निळे मेघ पर्वतावरील पाणलोटापर्यंत येऊन थडकल्यायुळें तो उन्मत्त मयूरांनी युक्त पर्वत मेघांत मिसळूनच गेलासा दिसत होता. तेव्हां "अहो ! या पर्वताला मेघरूपी पंख फुटून तो आकाशांत पक्ष्याप्रमाणे संचार करीत आहे." अशीं वाक्यें विद्याधर, उरग, गंधर्व व अप्सरा यांच्या मुखावाटे चोहोकडून निघू लागली. जमिनीवरून उपटून कृष्णाने तळहातावर घेतलेल्या त्या पर्वतापासून पिवळ्या, काळ्या, पांढऱ्या धातूंचा वर्षाव होऊं लागला. पावसाची मुसळधार लागल्यामुळे त्या पर्वताची कित्येक शिखरे खिळखिळी झाली व काहीचे दोन तुकडे झाले. इंद्राने क्रोधामुळे सुरू केलेल्या पर्जन्यवृष्टीच्या तडाक्यानें पर्वत गदगदा हालू लागला, त्याबरोबर त्यावरील वृक्ष देखील डळमळून नानाप्रकारचीं उच्चनीच पुष्पे भूमीवर गळून पडली व जिकडे तिकडे फुलेंच फुलें झाली. मोठमोठ्या फणांचे व मस्तकावर स्वस्तिकचिह धारण करणारे नाग खवळून जाऊन आपआपल्या विवरातून बाहेर पडले व आकाशांत इतस्ततः फिरू लागले. भयंकर वृष्टीमुळें भिऊन जाऊन पक्ष्यांची तर अत्यंत दीनवाणी स्थिति झाली. ते पुनः पुनः आकाशांत उडी मारीत; परंतु उपाय न चालून धाडदिशी कांहीं वेळाने खालीं पडत. चिडून गेलेले सिंह पाण्यानें ओथंबलेल्या मेघांप्रमाणे मोठमोठ्याने गर्जना करूं लागले. ताक करीत असतांना डेर्यातून जसा नाद होतो त्याप्रमाणें वाघ ओरडू लागले. त्या पर्वतावर वृष्टीपूर्वी जे विषम भाग होते ते पाऊस पडल्यानंतर सम झाले; व आधीं सम होते त्यांवरून जाण्याची आतां सोय उरली नाहीं.
अशा रीतीनें त्या पर्वताचा मूळचा आकार पार बदलून गेल्यामुळे, हा ओळखेनासा होऊन दुसराच एखादा पर्वत असावा अशी शंका येऊ लागली. फार पाऊस पडल्यामुळें त्या पर्वताचे रूप आकाशांत रुद्राने जखडून ठेवलेल्या त्रिपुरासारखें दिसू लागलें. कृष्णानें आपल्या हाताने त्या पर्वताला झेलून धरले असल्यामुळें निळ्या ढगांनी व्यापलेल्या छत्रीप्रमाणें तो गोवर्धन शोभिवंत दिसत होता.
गोवर्धन पर्वताची ही स्थिति पाहून तो पर्वत विवररूपी आपलें विशाल वदन मिटून कृष्णाच्या बाहुरूपी उशीवर निजला आहे व त्यांत त्याला मेघरूपी स्वप्ने पडत आहेत असा भास होत होता. अत्यंत पाऊस पडल्यामळें त्या पर्वतावरच्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईनासा झाला. तसेंच, तेथील वनांत मोरांचा टाहो बंद पडला. त्या कारणानें शिखरांसकट त्या पर्वतावर कोणतेही प्राणी वास्तव्य करीत नाहींत अशी शंका येई. त्याची शिखरे अस्ताव्यस्त होऊन गरगर घुमत होतीं, त्यामुळें गोवर्धनाला व त्यावरील अरण्यांना ज्वरच आला आहे असें वाटलें. वाऱ्याच्या सपाट्यानें मेघ त्या पर्वताच्या माथ्यावर आले व महेंद्राने निकडीची आज्ञा केल्यावरून त्यांनीं त्या पर्वतावर पावसाचा न खळणारा एकसारखा झोत सुरू केला. राजाने पीडा दिल्यामुळे जेथील प्रजाजन विपत्तीच्या भोवऱ्यात सापडला आहे तो जसा दिसतो, त्याप्रमाणें कृष्णाच्या हातावर लोंबकळणारा तो अरण्ययुक्त पर्वत गिरक्या घेतांना दिसत होता. एखाद्या मोठ्या नगराच्या आश्रयाने सभोवर जशी लहान लहान गावे वसतात, त्याप्रमाणें त्या गोवर्धनपर्वताभोंवतीं मेघ लटकून बसले होते. याप्रमाणे एका हातावर पर्वत तोलून धरून प्रजापतीप्रमाणें गोपाळांचे रक्षण करणारा प्रभु कृष्ण स्मित करून गोपाळांस ह्मणाला " गोपहो, देवांना देखील करतां येणार नाहीं असें हे पर्वतांचे घर मी आपल्या अलौकिक प्रभावाने निर्माण केलें आहें. या ठिकाणी थंडीवाऱ्याचा उपद्रव न होतां गाईंना सुखाने रहाता येईल. पर्जन्याचा त्रास चुकविण्याकरितां सर्व गाईंचे कळप या गृहांत त्वरित घेऊन चला. ह्मणजे वायूपासून पीडा न होतां या ठिकाणी त्यांना सुखाने वास करतां येईल. गोधनांची संख्या व सामर्थ्य यांचे मानानें येथें जागेची वाटणी करून घ्या ह्मणजे पावापासून तुमचे रक्षण झालेंच. गोवर्धन पर्वत उपटून काढून मी येथें पांच कोस लांब व एक कोस रुंद इतकी मोठीथोरली जागा निर्माण केली आहे. येथे तीन्ही लोकांचा देखील समावेश होईल. मग आपल्या व्रजाची कथा काय ? "
कृष्णाने भाषण करतांच, गाई मोठ्यानें हंबरल्या व गोपाळांनीही मोठी आरोळी दिली. इकडे बाहेर मेघगर्जना चालूच होती. तदनंतर गोपाळांनीं गाईंचे कळप करून एकामागून एक सर्व गाई त्या पर्वताच्या विशाल गुहेमध्ये नेऊन घातल्या. कृष्ण मात्र पर्वताच्या मुळाशीच उभा होता व त्यानें आपला एक हात प्रिय असलेल्या अतिथीसारख्या त्या पर्वताला दिला होता. [ ( ह्मणजे ) एका हाताने पर्वत उचलून धरला होता. ] पावसाला भ्यालेल्या गोपांनी जलदीजलदीने त्या पर्वताच्या छपराखालीं निर्मिलेल्या घरांत, आपली गाड्या, भांडीकुडी, वगैरे चटसारें वाहून नेले. तदनंतर, देवांनाही अशक्य अशी कृष्णाची ही कृति अवलोकन करून, आपली प्रतिज्ञा विफल झाली व याच्यापुढे आपलें कांहीं चालावयाचे नाहीं अशी वज्रायुध इंद्राची खात्री झाली आणि त्यानें लागलीच वृष्टि बंद करण्याविषयीं मेघांना आज्ञा दिली. सात अहोरात्रपर्यंत पृथ्वीवर भयंकर वृष्टि करूनही आपलें कांहीं चालत नाहीं असें पाहून ज्याचा उत्सव बंद झाला आहे अशा वृत्रारि इंद्राने मेघांसह स्वर्गलोकी गमन केलें.
याप्रमाणे सात दिवस झाल्यानंतर इंद्राचा निरुपाय झाला; आभाळ नाहीसे होऊन आकाश स्वच्छ झालें आणि भगवान् सूर्य आपल्या प्रखर तेजानें नभोमंडळांत चमकू लागला. तेव्हां पुनः आल्या मार्गाने गाई व गोप ही आपल्या नेहमीच्या राहण्याच्या ठिकाणी परत गेली व वरदात्या प्रभु गोपालकृष्णानेंही संतष्ट होऊन त्या अचल पर्वताची पुनः जागच्याजागी लोकांच्या कल्याणासाठी स्थापना केली.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि गोवर्धनधारणं नाम अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
अध्याय अठरावा समाप्त
GO TOP
|