श्रीहरिवंशपुराण विष्णुपर्व एकोनविंशोऽध्यायः
गोविन्दाभिषेकः
धृतं गोवर्धनं दृष्ट्वा परित्रातं च गोकुलम् ।
कृष्णस्य दर्शनम् शक्रो रोचयामास विस्मितः ॥ १ ॥
स निर्जलाम्बुदाकारं मत्तं मदजलोक्षितम् ।
आरुह्यैरावतं नागमाजगाम महीतलम् ॥ २ ॥
स ददर्शोपविष्टं वै गोवर्धनशिलातले ।
कृष्णमक्लिष्टकर्माणं पुरुहूतः पुरंदरः ॥ ३ ॥
तं वीक्ष्य बालं महता तेजसा दीप्तमव्ययम् ।
गोपवेषधरं विष्णुं प्रीतिं लेभे पुरन्दरः ॥ ४ ॥
तं सोऽम्बुजदलश्यामं कृष्णं श्रीवत्सलक्षणम् ।
पर्याप्तनयनः शक्रः सर्वैर्नेर्त्रैरुदैक्षत ॥ ५ ॥
दृष्ट्वा चैनं श्रिया जुष्टं मर्त्यलोकेऽमरोपमम् ।
सूपविष्टं शिलापृष्ठे शक्रः स व्रीडितोऽभवत् ॥ ६ ॥
तस्योपविष्टास्य मुखं पक्षाभ्यां पक्षिपुङ्गवः ।
अन्तर्द्धानं गतश्छायां चकारोरगभोजनः ॥ ७ ॥
तं विविक्ते वनगतं लोकवृत्तान्ततत्परम् ।
उपतस्थे गजं हित्वा कृष्णं बलनिषूदनः ॥ ८ ॥
स समीपगतस्तस्य दिव्यस्रगनुलेपनः ।
रराज देवराजो वै वज्रपूर्णकरः प्रभुः ॥ ९ ॥
किरीटेनार्कतुल्येन विद्युदुद्योतकारिणा ।
कुण्डलाभ्यां स दिव्याभ्यां सततं शोभिताननः ॥ १० ॥
पञ्चस्तबकलम्बेन हारिणोरसि भूषितः ।
सहस्रपत्रकान्तेन देहभूषणकारिणा ।
ईक्षमाणः सहस्रेण नेत्राणां कामरूपिणाम् ॥ ११ ॥
त्रिदशाज्ञापनार्थेन मेघनिर्घोषकारिणा ।
अथ दिव्येन मधुरं व्याजहार स्वरेणा तम् ॥ १२ ॥
इन्द्र उवाच
कृष्ण कृष्ण महाबहो ज्ञातीनां नन्दिवर्द्धन ।
अतिदिव्यं कृतं कर्म त्वया प्रीतिमता गवाम् ॥ १३ ॥
मयोत्सृष्टेषु मेघेषु युगान्तावर्तकारिषु ।
यत्त्वया रक्षिता गावस्तेनास्मि परितोषितः ॥ १४ ॥
स्वायंभुवेन योगेन यश्चायं पर्वतोत्तमः ।
धृतो वेश्मवदाकाशे को ह्येतेन न विस्मयेत् ॥ १५ ॥
प्रतिषिद्धे मम महे मयेयं रुषितेन वै ।
अतिवृष्टिः कृता कृष्ण गवां वै साप्तरात्रिकी ॥ १६ ॥
सा त्वया प्रतिषिद्धेयं मेघवृष्टिर्दुरासदा ।
देवैः सदा नवगणैर्दुर्निवार्या मयि स्थिते ॥ १७ ॥
अहो मे सुप्रियं कृष्ण यत्त्वं मानुषदेहवान् ।
समग्रं वैष्णवं तेजो विनिगूहसि रोषितः ॥ १८ ॥
साधितं देवतानां हि मन्येऽहं कार्यमव्ययम् ।
त्वयि मानुष्यमापन्ने युक्ते चैव स्वतेजसा ॥ १९ ॥
सेत्स्यते सर्वकार्यार्थो न किंचित् परिहास्यते ।
देवानां यद्भवान् नेता सर्वकार्यपुरोगमः ॥ २० ॥
एकस्त्वमसि देवानां लोकानां च सनातनः ।
द्वितीयं नात्र पश्यामि यस्तेषां च धुरं वहेत् ॥ २१ ॥
यथा हि पुङ्गवः श्रेष्ठो ह्यग्रे धुरि नियोज्यते ।
एवं त्वमसि देवानां मग्नानां द्विजवाहनः ॥ २२ ॥
त्वच्छरीरगतं कृष्ण जगत्प्रकरणं त्विदम् ।
ब्रह्मणा साधु निर्दिष्टं धातुभ्य इव काञ्चनम् ॥ २३ ॥
स्वयं स्वयंभूर्भगवान् बुद्ध्याथ वयसापि वा ।
न त्वानुगन्तुं शक्नोति पङ्गुर्द्रुतगतिं यथा ॥ २४ ॥
स्थाणुभ्यो हिमवाञ्छ्रेष्ठो ह्रदानां वरुणालयः ।
गरुत्मान् पक्षिणां श्रेष्ठो देवानां च भवान् वरः ॥ २५ ॥
अपामधस्ताल्लोको वै तस्योपरि महीधराः ।
नागानामुपरिष्टाद् भूः पृथिव्युपरि मानुषाः ॥ २६ ॥
मनुष्यलोकादूर्ध्वं तु खगाणां गतिरुच्यते ।
आकाशस्योपरि रविर्द्वारं स्वर्गस्य भानुमान् ॥ २७ ॥
देवलोकः परस्तस्माद् विमानगमनो महान् ।
यत्राहं कृष्ण देवानामैन्द्रे विनिहितः पदे ॥ २८ ॥
स्वर्गादूर्ध्वं ब्रह्मलोको ब्रह्मर्षिगणसेवितः ।
तत्र सोमगतिश्चैव ज्योतिषां च महात्मनाम् ॥ २९ ॥
तस्योपरि गवां लोकः साध्यास्तं पालयन्ति हि ।
स हि सर्वगतः कृष्ण महाकाशगतो महान् ॥ ३० ॥
उपर्युपरि तत्रापि गतिस्तव तपोमयी ।
यां न विद्मो वयं सर्वे पृच्छन्तोऽपि पितामहम् ॥ ३१ ॥
लोकस्त्वधो दुष्कृतिनां नागलोकस्तु दारुणः ।
पृथिवी कर्मशीलानां क्षेत्रं सर्वस्य कर्मणः ॥ ३२ ॥
खमस्थिराणां विषयो वायुना तुल्यवृत्तिनाम् ।
गतिः शमदमाढ्यानां स्वर्गः सुकृतकर्मणाम् ॥ ३३ ॥
ब्राह्मे तपसि युक्तानां ब्रह्मलोकः परा गतिः ।
गवामेव तु गोलोको दुरारोहा हि सा गतिः ॥ ३४ ॥
स तु लोकस्त्वया कृष्ण सीदमानः कृतात्मना ।
धृतो धृतिमता वीर निघ्नतोपद्रवान् गवाम् ॥ ३५ ॥
तदहं समनुप्राप्तो गवां वाक्येन चोदितः ।
ब्रह्मणश्च महाभाग गौरवात्तव चागतः ॥ ३६ ॥
अहं भूतपतिः कृष्ण देवराजः पुरंदरः ।
अदितेर्गर्भपर्याये पूर्वजस्ते पुराकृतः ॥ ३७ ॥
स्वतेजस्तेजसा चैव यत्ते दर्शितवानहम् ।
देवरूपेण तत् सर्वं क्षन्तुमर्हसि मे विभो ॥ ३८ ॥
एवं क्षान्तमनाः कृष्ण स्वेन सौम्येन तेजसा ।
ब्रह्मणः शृणु मे वाक्यं गवां च गजविक्रम ॥ ३९ ॥
आह त्वां भगवान् ब्रह्मा गावश्चाकाशगा दिवि ।
कर्मभिस्तोषिता दिव्यैस्तव संरक्षणादिभिः ॥ ४० ॥
भवता रक्षिता गावो गोलोकश्च महानयम् ।
यद् वयं पुङ्गवैः सार्धं वर्द्धामः प्रसवैस्तथा ॥ ४१ ॥
कर्षुकान्पुङ्गवैर्बाह्यैर्मेध्येन हविषा सुरान् ।
श्रियं शकृत्प्रवृत्तेन तर्पयिष्याम कामगाः ॥ ४२ ॥
तदस्माकं गुरुस्त्वं हि प्राणदश्च महाबलः ।
अद्य प्रभृति नो राजा त्वमिन्द्रो वै भव प्रभो ॥ ४३ ॥
तस्मात् त्वं काञ्चनैः पूर्णैर्दिव्यस्य पयसो घटैः ।
एभिरद्याभिषिञ्चस्व मया हस्तावनामितैः ॥ ४४ ॥
अहं किलेन्द्रो देवानां त्वं गवामिन्द्रतां गतः ।
गोविन्द इति लोकास्त्वां स्तोष्यन्ति भुवि शाश्वतम् ॥ ४५ ॥
ममोपरि यथेन्द्रस्त्वं स्थापितो गोभिरीश्वरः ।
उपेन्द्र इति कृष्ण त्वां गास्यन्ति दिवि देवताः ॥ ४६ ॥
ये चेमे वार्षिका मासाश्चत्वारो विहिता मम ।
एषामर्धं प्रयच्छामि शरत्कालं तु पश्चिमम् ॥ ४७ ॥
अद्य प्रभृति मासौ द्वौ ज्ञास्यन्ति मम मानवाः ।
वर्षार्द्धे च ध्वजो मह्यं ततः पूजामवाप्स्यसि ।
ममाम्बुप्रभवं दर्पं तदा त्यक्ष्यन्ति बर्हिणः ॥ ४८ ॥
अल्पवाचो गतमदा ये चान्ये मेघनादिनः ।
शान्तिं सर्वे गमिष्यन्ति मम कालविचारिणः ॥ ४९ ॥
त्रिशङ्क्वगस्त्यचरितामाशां च प्रचरिष्यति ।
सहस्ररश्मिरादित्यस्तापयन् स्वेन तेजसा ॥ ५० ॥
ततः शरदि युक्तायां मौनकामेशु बर्हिषु ।
याचमाने खगे तोयं विप्लुतेषु प्लवेषु च ॥ ५१ ॥
हंससारसपूर्णेषु नदीनां पुलिनेषु च ।
मत्तक्रौञ्चप्रणादेषु प्रमत्तवृषभेषु च ॥ ५२ ॥
गोषु चैव प्रहृष्टासु क्षरन्तीषु पयो बहु ।
निवृत्तेषु च मेघेषु निर्यात्य जगतो जलम् ॥ ५३ ॥
आकाशे शस्त्रसंकाशे हंसेषु च चरत्सु च ।
जातपद्मेषु तोयेशु वापीषु च सरत्सु च ॥ ५४ ॥
तडागेषु च कान्तेषु तोयेषु विमलेषु च ।
कलमावनताग्रासु कृष्णकेदारपङ्क्तिषु ॥ ५५ ॥
मध्यस्थं सलिलारम्भं कुर्वन्तीषु नदीषु च ।
सुसस्यायां च सीमायां मनोहर्यां मुनेरपि ॥ ५६ ॥
पृथिव्यां पृथुराष्ट्रायां रम्यायां वर्षसंक्षये ।
श्रीमत्सु पङ्क्तिमार्गेषु फलवत्सु तृणेषु च ।
इक्षुमत्सु च देशेषु प्रवृत्तेषु मखेषु च ॥ ५७ ॥
ततः प्रवर्त्स्यते पुण्या शरत् सुप्तोत्थिते त्वयि ।
लोकेऽस्मिन् कृष्ण निखिले यथैव त्रिदिवे तथा ॥ ५८ ॥
नरास्त्वां चैव मां चैव ध्वजाकारासु यष्टिषु ।
महेन्द्रं चाप्युपेन्द्रं च महयन्ति महीतले ॥ ५९ ॥
ये चावयोः स्थिरे वृत्ते महेन्द्रोपेन्द्रसंज्ञिते ।
मानवाः प्रणमिष्यन्ति तेषां नास्त्यनयागमः ॥ ६० ॥
ततः शक्रस्तु तान् गृह्य घटान् दिव्यपयोधरान् ।
अभिषेकेण गोविन्दं योजयामास योगवित् ॥ ६१ ॥
दृष्ट्वा तमभिषिक्तं तु गावस्ताः सह यूथपैः ।
स्तनैः प्रस्रवयुक्तैश्च सिषिचुः कृष्णमव्ययम् ॥ ६२ ॥
मेघाश्च दिवि युक्ताभिः सामृताभिः समन्ततः ।
सिषिचुस्तोयधाराभिरभिषिच्य तमव्ययम् ॥ ६३ ॥
वनस्पतीनां सर्वेषां सुस्रावेन्दुनिभं पयः ।
ववर्षुः पुष्पवर्षं च नेदुस्तूर्याणि चाम्बरे ॥ ६४ ॥
अस्तुवन् मुनयः सर्वे वाग्भिर्मन्त्रपरायणाः ।
एकार्णवे विविक्तं च दधार वसुधा वपुः ॥ ६५ ॥
प्रसादं सागरा जग्मुर्ववुर्वाता जगद्धिताः ।
मार्गस्थोऽपि बभौ भानुश्चन्द्रो नक्षत्रसंयुतः ॥ ६६ ॥
ईतयः प्रशमं जग्मुर्निर्वैररचना नृपाः ।
प्रवालपत्रशबलाः पुष्पवन्तश्र पादपाः ॥ ६७ ॥
मदं प्रसुस्रुवुर्नागा यातास्तोषं वने मृगाः ।
अलंकृता गात्ररुहैर्धातुभिर्भान्ति पर्वताः ॥ ६८ ॥
देवलोकोपमो लोकस्तृप्तोऽमृतरसैरिव ।
आसीत्कृष्णाभिषेको हि दिव्यस्वर्गरसोक्षितः ॥ ६९ ॥
अभिषिक्तं तु तं गोभिः शक्रो गोविन्दमव्ययम् ।
दिव्यमाल्याम्बरधरं देवदेवोऽब्रवीदिदम् ॥ ७० ॥
एष ते प्रथमः कृष्ण नियोगो गोषु यः कृतः ।
श्रूयतामपरं कृष्ण ममागमनकारणम् ॥ ७१ ॥
क्षिप्रं प्रसाध्यतां कंसः केशी च तुरगाधमः ।
अरिष्टश्च मदाविष्टो राजराज्यं ततः कुरु ॥ ७२ ॥
पितृष्वसरि जातस्ते ममांशोऽहमिव स्थितः ।
स ते रक्ष्यश्च मान्यश्च सख्ये च विनियुज्यताम् ॥ ७३ ॥
त्वया ह्यनुगृहीतस्य तव वृत्तानुवर्तकः ।
त्वद्वशे वर्तमानश्च प्राप्स्यते विपुलं यशः ॥ ७४ ॥
भारतस्य च वंशस्य स वरिष्ठो धनुर्धरः ।
भविष्यत्यनुरूपश्च त्वदृते न च रंस्यते ॥ ७५ ॥
भारतं त्वयि चायत्तं तस्मिंश्च पुरुषोत्तमे ।
उभाभ्यामपि संयोगे यास्यन्ति निधनं नृपाः ॥ ७६ ॥
प्रतिज्ञातं मया कृष्ण ऋषिमध्ये सुरेषु च ।
मया पुत्रोऽर्जुनो नाम सृष्टः कुन्त्यां कुलोद्वहः ॥ ७७ ॥
सोऽस्त्राणां पारतत्त्वज्ञः श्रेष्ठश्चापाविकर्षणे ।
तं प्रवेक्ष्यन्ति वै सर्वे राजानः शस्त्रयोधिनः ॥ ७८ ॥
अक्षौहिणीस्तु शूराणां राज्ञां संग्रामशालिनाम् ।
स एकः क्षत्रधर्मेण योजयिष्यति मृत्युना ॥ ७९ ॥
तस्यास्त्रचरितं मार्गं धनुषो लाघवेन च ।
नानुयास्यन्ति राजानो देवा वा त्वां विना प्रभो ॥ ८० ॥
स ते बन्धुः सहायश्च संग्रामेषु भविष्यति ।
तस्य योगो विधातव्यस्त्वया गोविन्द मत्कृते ॥ ८१ ॥
द्रष्टव्यश्च यथाहं वै त्वया मान्यश्च नित्यशः ।
ज्ञाता त्वमेव लोकानामर्जुनस्य च नित्यशः ॥ ८२ ॥
त्वया च नित्यं संरक्ष्य आहवेषु महत्सु सः ।
रक्षितस्य त्वया तस्य न मृत्युः प्रभविष्यति ॥ ८३ ॥
अर्जुनं विद्धि मां कृष्ण मां चैवात्मानमात्मना ।
आत्मा तेऽहं यथा शश्वत् तथैव तव सोऽर्जुनः ॥ ८४ ॥
त्वया लोकानिमाञ्जित्वा बलेर्हस्तात् त्रिभिः क्रमैः ।
देवतानां कृतो राजा पुरा ज्येष्ठक्रमादहम् ॥ ८५ ॥
त्वां च सत्यमयं ज्ञात्वा सत्येष्टं सत्यविक्रमम् ।
सत्येनोपेत्य देवा वै योजयन्ति रिपुक्षये ॥ ८६ ॥
सोऽर्जुनो नाम मे पुत्रः पितुस्ते भगिनीसुतः ।
इह सौहार्दमायातु भूत्वा सहचरस्तव ॥ ८७ ॥
तस्य ते युद्ध्यतः कृष्ण स्वस्थानेऽपि गृहेऽपि वा ।
वोढव्या पुङ्गवेनेव धूः सदा रणमूर्धनि ॥ ८८ ॥
कंसे विनिहते कृष्ण त्वया भाव्यर्थदर्शिना ।
अभितस्तन्महद् युद्धं भविष्यति महीक्षिताम् ॥ ८९ ॥
तत्र तेषां नृवीराणामतिमानुषकर्मणाम् ।
विजयस्यार्जुनो भोक्ता यशसा त्वं च योक्ष्यसे ॥ ९० ॥
एतन्मे कृष्ण कार्त्स्न्येन कर्तुमर्हसि भाषितम् ।
यद्यहं ते सुराश्चैव सत्यं च प्रियमच्युत ॥ ९१ ॥
शक्रस्य वचनं श्रुत्वा कृष्णो गोविन्दतां गतः ।
प्रीतेन मनसा युक्तः प्रतिवाक्यं जगाद ह ॥ ९२ ॥
प्रीतोऽस्मि दर्शनाद् देव तव शक्र शचीपते ।
यत्त्वयाभिहितं चेदं न किंचित् परिहास्यते ॥ ९३ ॥
जानामि भवतो भावां जानाम्यर्जुनसंभवम् ।
जाने पितृष्वसारं च पाण्डोर्दत्तां महात्मनः ॥ ९४ ॥
युधिष्ठिरं च जानामि कुमारं धर्मनिर्मितम् ।
भीमसेनं च जानामि वायोः संतानजं सुतम् ॥ ९५ ॥
अश्विभ्यां साधु जानामि सृष्टं पुत्रद्वयं शुभम् ।
नकुलं सहदेवं च माद्रीकुक्षिगतावुभौ ॥ ९६ ॥
कानीनं चापि जानामि सवितुः प्रथमं सुतं ।
पितृष्वसरि कर्णं वै प्रसूतं सूततां गतम् ॥ ९७ ॥
धार्तराष्ट्राश्च मे सर्वे विदिता युद्धकाङ्क्षिणः ।
पाण्डोरुपरमं चैव शापाशनिनिपातजम् ॥ ९८ ॥
तद् गच्छ त्रिदिवं शक्र सुखाय त्रिदिवौकसाम् ।
नार्जुनस्य रिपुः कश्चिन्ममाग्रे प्रभविष्यति ॥ ९९ ॥
अर्जुनार्थे च तान् सर्वान् पाण्डवानक्षतान् युधि ।
कुन्त्या निर्यातयिष्यामि निवृत्ते भारते मृधे ॥ १०० ॥
यच्च वक्ष्यति मां शक्र तनूजस्तव सोऽर्जुनः ।
भृत्यवत् तत् करिष्यामि तव स्नेहेन यन्त्रितः ॥ १०१ ॥
सत्यसन्धस्य तच्छ्रुत्वा प्रियं प्रीतस्य भाषितम् ।
कृष्णस्य साक्षात् त्रिदिवं जगाम त्रिदशेश्वरः ॥ १०२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे विष्णुपर्वणि
गोविन्दाभिषेके एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
गोविंदाभिषेक -
वैशंपायन सांगतात : - गोवर्धन पर्वत उचलून धरून कृष्णाने गोकुळाचे संरक्षण केलें असें पाहून इंद्राला फार विस्मय वाटला व श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची त्याला फार इच्छा उत्पन्न झाली. लागलीच ऐरावतावर आरोहण करून तो भूलोकी आला. त्या ऐरावताचा आकार जलशून्य मेघासारखा असून मदाच्या स्त्रावाने त्याचे सर्व शरीर भिजून गेलें होतें. पृथ्वीवर उतरताच, अलौकिक कृत्ये करणारा कृष्ण गोवर्धन पर्वतावरील एका शिळेवर बसलेला आहे असें पुरुहूत पुरंदर जो इंद्र त्याच्या दृष्टीस पडलें. ते समयी तो बालक अत्यंत तेजःपुंज दिसत होता. अव्यय विष्णूने घेतलेलें ते गोपाळाचे रूप पाहून इंद्राला फार संतोष वाटला. श्रीवत्स लक्षणाने युक्त असलेल्या कृष्णाचे दर्शन झाल्याकारणानें इंद्राच्या नेत्रांचे साफल्य झाले. कमलाच्या पाकळीसारख्या श्यामसुंदर कृष्णाकडे त्यानें आपल्या सहस्त्र नेत्रांनी सारखी टक लावली. कृष्णाचें रूप अत्यंत सुंदर असून भूलोकावर हा कोणी देवच आला आहे असें वाटे. अशा प्रकारच्या कृष्णाला सुंदर शिलातलावर बसलेला पाहून इंद्र अत्यंत लज्जित झाला. पक्षिराज सर्पारि गरुडाने प्रकट न होतां आपल्या पंखांनीं त्या शिलातलावर बसलेल्या कृष्णाच्या मुखावर सावली धरली होती. अशा वेळीं, इंद्र ऐरावतावरून खालीं उतरून वनामध्यें एकांती बसलेल्या आणि लौकिक व्यवहार करण्यांत दक्ष असलेल्या कृष्णाजवळ आला. सुरपति इंद्राने अंगाला गंध चर्चिले असून गळ्यांत दिव्य माळा धारण केल्या होत्या व हातांत वज्र घेतलें होतें. इंद्र प्रभु कृष्णाजवळ जाऊन उभा राहिला त्या वेळीं तर तो फारच शोभिवंत दिसूं लागला. मस्तकावरील सूर्यासारखा तेजस्वी व विजेप्रमाणे लकाकणारा किरीट आणि कानातील दिव्य कुंडले यांचे योगाने त्याच्या मुखाला अत्यंत रमणीयता आली होती. पाचगुच्छांच्या हाराने त्याचें वक्षःस्थळ सुशोभित झाले होतें; तसेंच, त्याला सहस्त्रपत्र कमलाप्रमाणे सुंदर व देहाला भूषविणारे असे इच्छित आकार घेणारे हजार डोळे होते. ज्या मेघगर्जनेप्रमाणे मधुर वाणीने तो देवेंद्र देवांना आज्ञा करी, त्याच दिव्य स्वराने त्यानें कृष्णाला उद्देशून म्हटलें, " कृष्णा, बा महाबाहो कृष्णा, गाईंवरील ममतेमुळे व ज्ञातिबांधवांना सुखविण्याच्या इच्छेने तूं अलौकिक कृत्य केलेस, यांत शंका नाहीं. प्रलयकाळच्या सारखा मुसळधार पाऊस मीं सुरू केला असतांना तूं गाईंचे रक्षण केलेस यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहें. आपल्या अंगच्या प्रभावानें तू हा गोवर्धन पर्वत अंतरिक्षांत घराच्या छपराप्रमाणे उचलून धरलास, हे पाहून कोणाला बरें विस्मय वाटणार नाहीं ? माझ्या प्रीत्यर्थ होणारा उत्सव तू बंद पाडल्यामुळें रागावून जाऊन मीं सात दिवसपर्यंत, हे कृष्णा, भयंकर वृष्टि केली. परंतु माझ्यादेखत माझ्या अनिवार्य पर्जन्यवृष्टीचे तूं उलट निवारण केलेस. खरोखर मी केलेल्या वृष्टीचे निवारण करण्याची देवदैत्यांचीही छाती नव्हती. खरोखर कृष्णा, तू मानुष देहाने अवतार घेतला आहेस, हें मला फार आवडले. व्रजासाठी तुला राग आला असताही तूं आपली सर्व शक्ति प्रकट केली नाहीस ही गोष्ट तुझा मोठेपणा व्यक्त करीत आहे. ज्या अर्थीं तू आपलें सामर्थ्य बरोबर घेऊन मनुष्यरूप स्वीकारलें आहेस, त्या अर्थीं तुला देवांचे काही तरी कायमचे कार्य साधावयाचे आहे असें मला वाटतें. तूं देवांचा नेता व सर्व कामांतील अग्रणी आहेस. तुझ्या कार्यात तुला पूर्ण यश येईल. काहीएक न्यून पडणार नाहीं. त्रैलोक्याची चिंता वाहणारा तूच एक सनानत आहेस. तुझ्याशिवाय त्यांचा पुढाकार घेईल असा मला तर कोणी दिसत नाहीं. हे गरुडवाहना, ज्याप्रमाणें, धष्टपुष्ट बैल सर्वात पुढच्या गाड्याला जोडीत असतात, त्याप्रमाणें संकटांत बुडालेल्या देवांचे रक्षण करण्यासाठी तुलाच सर्व लोक पुढे करतात. बा कृष्णा, अन्य धातूंपासून जशी सोन्याची उत्पत्ति आहे, तद्वत् तुझ्या शरीरापासून सर्व जगत् निर्माण झाले आहे असें जें ब्रह्मदेवाचे म्हणणें आहे तें खरें आहे. ज्याप्रमाणें पंगू मनुष्याच्यानें जलद पळणाऱ्या माणसाची पाठ झिपटावयची नाहीं त्याप्रमाणें स्वतः ब्रह्मदेवाला देखील बुद्धीनें किंवा वयाने तुझी बरोबरी करितां यावयाची नाहीं. जसा स्थावरामध्ये पर्वतांमध्यें हिमालय श्रेष्ठ आहे, किंवा जलाशयांत सागर श्रेष्ठ आहे अथवा गरुड सर्व पक्ष्यांत वरिष्ठ आहे, तसा तू सर्व देवांमध्यें अत्यंत थोर आहेस. जलाच्या खालीं पाताल लोक आहे. त्यावर पर्वत आहेत. पर्वतांवर पृथ्वी असून तिच्यावर माणसे रहातात. त्यांच्याही पुढें अंतरिक्षांत पक्ष्यांची गति चालते. त्यांच्याही टप्प्याच्या पलीकडे सूर्य असून त्यालाच स्वर्गद्वार म्हणतात. सूर्यलोकापलीकडे देवलोक असून तेथें फक्त विमानांत बसून जातां येतें. त्याच देवलोकांत, हे कृष्णा, इंद्रपदावर माझी योजना झालेली आहे. माझ्या स्वर्गलोकाच्या पुढें ब्रह्मलोक असून तेथें ब्रह्मर्षीचा समुदाय रहातो. त्या प्रदेशांत, चंद्र व तारका यांचा प्रवेश होतो. त्यानंतर गोलोकाची शीव लागते. साध्य त्या ठिकाणाचे संरक्षणकरतात. तो लोक महाकाशांत पसरलेला आहे. बा कृष्णा, या सर्व लोकांच्या पलीकडे दूरवर, तुझ्या तपोमय सामर्थ्याचा अंमल चालतो. परंतु त्या विषयीं आम्हांला मात्र मुळीच माहिती नाहीं. ब्रह्मदेवाला याविषयी आम्ही विचारले त्यावरून त्याला देखील कांहीं ठाऊक असेल असें दिसत नाही. सर्वांच्या खालीं भयंकर नागलोक असून, अत्यंत पापी लोकांना तेथें जावे लागतें. कर्मशील मनुष्यांची वसती पृथ्वीवर असते व म्हणूनच तिला कर्मभूमि अशी संज्ञा आहे. वायूप्रमाणें चंचल वृत्तीचे लोकांना आकाशांत संचार करावा लागतो आणि शमदमादि गुणांनी युक्त असलेल्या सज्जन माणसांना स्वर्ग प्राप्त होतो. तपाचरण करणारांना ब्रह्मलोक मिळतो आणि गाईंच्या भक्तांना गोलोकामध्यें ठाव लाभतो. गोलोक दुसऱ्या कोणालाहि मिळत नाहीं.
हे पराक्रमी कृष्णा, तोच गोलोक सांप्रत तूं पृथ्वीवर आणलेला असून गाईंना अतिवृष्टीचा मजकडून उपद्रव झाला असतां, त्यापासून तूं त्यांचें रक्षण केलेस. महाभागा, ब्रह्मदेव व गाई यांच्या आज्ञेने व तुझ्याविषयीच्या आदराने प्रेरित होऊन मी येथें आलों आहें. कृष्णा, मी सर्व भूतांचा व देवांचा स्वामी इंद्र आहें. अदितीच्या पोटीं प्रथम मी जन्मास आलों. प्रभो, पर्जन्यवृष्टि करून मीं आपलें सामर्थ्य तुझ्या समोर दाखविले त्याबद्दल मला कृपेने क्षमा कर. माझें तेज मला तुजपासूनच मिळालेले आहे. शांतस्वरूप धारण करून मन स्थिर कर, आणि हे गजविक्रमा, ब्रह्मदेव व गाई यांचा निरोप मी तुला सांगतो, तो ऐक. भगवान् ब्रह्मदेव व आकाशसंचारी गाई यांनी तुला उद्देशून मला असें सांगितलें आहे कीं, " देवा, अलौकिक रीतीनें तं आमचे रक्षण केलेस यामुळे आम्ही अत्यंत संतुष्ट झाल आहो. गाई व हा अखिल गोलोक यांचें तू संरक्षण केलेस, त्यामुळें वत्सांची बुद्धि होऊन वृषभांसहवर्तमान आम्ही आतां सुखानें नांदत आहो. आम्हांला वाटेल तिकडे संचार करतां येतो. वृषभांच्या योगाने आम्ही शेतकऱ्यांची मनकामना तृप्त करूं. यज्ञामध्ये अर्पण होणाऱ्या पवित्र हवीच्या द्वारा देवांना संतुष्ट करूं आणि गोमयाने लक्ष्मीदेवीला आनंदवू. तू आपल्या अतुल सामर्थ्यांने आमचे प्राण वाचविले आहेस. यास्तव तूच आमचा गुरु आहेस. हे प्रभो, आजपासून तू आमचा राजा व इंद्र हो. हे सुवर्णकलश मीं आपल्या हाताने मंदाकिनीच्या दिव्य जलाने भरून आणले आहेत; त्यांचे योगाने तू आपल्याला अभिषेक करून घे. मी देवांचा इंद्र आहें व तुला गोलोकाच्या इंद्रपदाची प्राप्ति झाली आहे, यापुढें, भूलोकी लोक तुझी ' गोविंद ' या नांवानें नेहमी स्तुति करतील. तसेंच ज्यापेक्षां गाईंनी तुला मजहून श्रेष्ठ अशा इंद्रपदावर नियुक्त केलें आहे, त्यापेक्षा स्वर्गीय देवता तुझे उपेंद्र या अभिधानाने गायन करितील. एकंदर पावसाळ्याचे असे माझे चार महिने आहेत, त्यांतील शेवटचे शरदृतृचे दोन महिने मी तला अर्पण करतो. इतउत्तर वर्षाकालाचे पहिले दोनच महिने माझे असें लोक मानू लागतील. अर्धा पावसाळा झाल्यानंतर माझी कालमर्यादा व पूजा समाप्त करून तुझी पूजा लोक करूं लागतील. त्या वेळीं माझ्या भागांतील पावसामुळें उत्पन्न झालेला मोरांचा मद नाहीसा होईल. माझ्या दुमाही कारकीदींत संचार करणारे व पावसाळा सुरू होतांच शब्द करूं लागणारे जे कोणी इतर प्राणी असतील, त्यांचीही वाचा बंद पडून त्यांचा मदोन्मत्तपणा कमी होईल व ते शांतिसुखाचा अनुभव घेतील. [ त्रिशंकु व अगस्त्य हे तारे उगवतात त्या दिशेनें ( दक्षिण ) ] भगवान् सहस्ररश्मि सूर्य आपल्या तेजाने चमकू लागेल. शरदृतु लागण्याचा काल प्राप्त झाला म्हणजे मोर मदरहित होऊन मौन स्वीकारतील व पक्षिगण हे उदकाची मार्गप्रतीक्षा करूं लागतील. नद्यांचे पूर ओसरल्यामुळे नावांची गरज उरणार नाहीं; नद्यांच्या पुलिनांवर हंस व सारस इत्यादि पक्ष्यांची गर्दी दिसूं लागेल; मत्त क्रौंच पक्ष्यांचा प्रणाद सुरू होईल; वृषभांना मस्ती येईल; गाईंची मने उल्हसित होऊन त्या पुष्कळ दूध देऊं लागतील; जगतातील शोषून घेतलेले जल पुनरपि जगताला पावसाच्या रूपाने परत दिल्यानंतर मेघ नाहींसे होतील; आकाश शस्त्रधारेसारखे निर्मल होऊन त्यांत हंसांचा संचार सुरू होईल; सरोवरे, विहिरी इत्यादि जलाशयांमध्यें कमलेंच कमले फुललेली दृष्टीस पडतील; तडागांना विशेष शोभा प्राप्त होईल; जल निर्मल दिसू लागेल; कृष्णवर्ण शेतांमध्यें धान्यें पिकून कणसांमुळें खालीं वांकलेली दृष्टीस पडतील; पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्या आपल्या मर्यादेने मधोमध वाहतांना दिसू लागतील; जिकडे तिकडे सुंदर सुंदर धान्येच धान्ये लागून गेल्यामुळें ऋषींना देखील संतोष वाटेल. याप्रमाणे वर्षाकाल संपण्याचे वेळीं पृथ्वीवरील सर्व विस्तीर्ण राष्ट्रांना मोठी रमणीयता प्राप्त होऊन, रस्त्याने जातांना अत्यंत मनोहर शोभा जाणारांचे नेत्रांना सुख देईल; तृणांना फळें येण्याचा बहर प्राप्त होऊन, जिकडे तिकडे ऊसच ऊस दिसूं लागतील; तसेंच, लोक यज्ञ करण्यास प्रवृत्त होऊन तुझी शयनोत्तर जागृत होण्याची वेळ झाली म्हणजे पुण्यकारक शरत्काल सुरू होईल. हे कृष्णा, ध्वजाकार यष्टी उभ्या करून स्वर्गलोकींप्रमाणे या भूलोकांतही अखिल लोक तुझें व माझें महेंद्र व उपेंद्र या नांवांनी पूजन करतील. जे जन आपल्या उभयतांच्या शाश्वत कृतीला मान देऊन आपलें महेंद्र व उपेंद्र या नांवानें स्तवन करतील, त्यांना कोणतेही संकट प्राप्त होणार नाहीं.
इतकें ह्मणून, इंद्राने दिव्य उदकाने भरलेले घट योगवेत्त्या श्रीकृष्णाचे शरीरावर ओतून त्याला अभिषेक केला. इंद्राने गोविंदाला अभिषेक घातलेला पाहून स्वर्गातील गाईंनी देखील आपल्या गोपालांसहवर्तमान आचळांतून गळणाऱ्या दुग्धाने अव्यय कृष्णाला स्नान घातले. लागलीच आकाशांतील मेघांनींही त्या अव्यय परमात्म्याला आपल्या अमृतयुक्त पावसाच्या वृष्टीने अभिषेक करून सर्व पृथ्वी भिजवून टाकली. तत्क्षणीं सर्व प्रकारच्या वनस्पतीपासून चंद्राप्रमाणे अमृत जलाचा स्राव होऊं लागला. देव पुष्पवृष्टि करूं लागले. नभोमंडळांत तूर्यादिक वाद्ये वाजू लागली. मंत्रपरायण मुनि आपल्या पवित्र वाणीने त्याचें स्तोत्र गाऊं लागले. फार काय सांगावे, पृथ्वीला क्षीरसागराचें रूप प्राप्त झालें. सागर प्रसन्न होऊन जगताला संतोष देणारे वायू वाहू लागले; नित्याप्रमाणेच मार्गक्रमण करीत असलेला सूर्य या वेळीं विशेष शोभू लागला. चंद्रहि आपल्या नक्षत्रांसह विशेष चमकू लागला. अतिवृष्टि इत्यादिक उत्पात बंद पडून राजे लोकांना कोणाचीही भीति राहिली नाहीं. ते निष्कंटकपणानें राज्य करूं लागले. वृक्षांना पालवी फुटून फुलाचा बहर येण्याची सुरवात झाली. हत्तींच्या गंडस्थळांतून मद गळू लागला. वनामध्यें हरिण अत्यंत संतष्ट झाले. पर्वतांचे पृष्ठभाग वृक्षदिकांनीं अलंकृत होऊन शिवाय धातू चमकू लागल्यामुळें त्यांना अवर्णनीय शोभा आली. सारांश, जिकडे तिकडे अमृतरसाची वृष्टीच वृष्टि झाल्यामुळें, या लोकाला देवलोकाची रमणीयता प्राप्त झाली. स्वर्गातून अमृताचा वर्षाव होऊन, याप्रमाणे कृष्णाचा अभिषेक समारंभ संपूर्ण झाला.
गाईंचा अभिषेक पुरा झाल्यावर दिव्यमाल्यांबरधारी अव्यय देवाधिदेवाला उद्देशून इंद्राने पुढीलप्रमाणे भाषण केलें. " बा कृष्णा, तुला सांगण्याकरितां गाईंनी जो निरोप मला सांगितला होता, तो मीं तुला सांगितला. आतां माझ्या आगमनाचा दुसरा हेतु तुला सांगतो, ऐक. कंस, तुरगाधम केशी व मदोन्मत्त झालेला अरिष्ट या त्रिवर्ग राक्षसांचे तूं त्वरित निर्दळण कर; नंतर राज्यसुखाचा अनुभव घे. तुझ्या आतेच्या पोटीं मी अवतार घेतला आहे. त्या माझ्या अंशाचे रक्षण करणे तुजकडेसच आहे. त्याचा सन्मान करून तूं त्याच्यावर मित्रासारखा लोभ ठेव. तुझा त्याजवर अनुग्रह झाला म्हणजे तुझ्या सांगण्याप्रमाणें वागून तो तुझ्या आज्ञेत राहील. मग मोठाले पराक्रम करून तुझ्या कृपेने त्याची दिगंत कीर्ति होईल. सगळ्या भरतवंशांत तो अत्यंत श्रेष्ठ असा धनुर्धर होईल. तुला साजेल असेंच त्याचें वर्तन राहील. तुजवाचून मात्र त्याला करमणार नाहीं. भारतीय युद्ध तुम्हा दोघां पुरुषश्रेष्ठांवर अवलंबून असल्याकारणानें, तुम्हा दोघांचा संगम होतांच सर्व राजे मरण पावतील. हे कृष्णा, ऋषि व देव यांचे समोर मीं अशी प्रतिज्ञा केली आहे कीं, कुतीचे पोटीं माझ्यापासून अर्जुन नामक जो पुत्र जन्मास आला आहे तो मोठा कुलदीपक होईल. अस्त्रविद्येमध्ये व धनुर्विद्येमध्ये मोठे नैपुण्य संपादन करून, सर्व शस्त्रधर राजांना तो मागें सारील. रणामध्यें संग्रामशील शूर राजांच्या अक्षौहिणीच्या अक्षौहिणी, ती एकटा यमसदनास पाठवील.
हे प्रभो, तुजवांचून त्याच्या अस्त्रचातुर्याचें व धनुर्विद्येचे अनुकरण करील असा कोणीही राजा मला या पृथ्वीतलावर दिसत नाहीं. रणांगणामध्ये तो तुझें बंधुत्व व सहायत्व करील.
हे गोविंदा, माझ्यासाठी तू त्याला अध्यात्म विद्येचे ज्ञान करून दे. सर्व विश्वाला व अर्जुनाला तू यथार्थत्वानें ओळखीत आहेस. जसा तू मला मानतोस, तसाच अर्जुनालाही मान. नेहमीं मोठमोठ्या लढायांमध्ये तू त्याचें संरक्षण कर. तुझें संरक्षणछत्र त्याच्यावर असलें म्हणजे मृत्यूचे त्याच्यावर कांहीं चालावयाचें नाहीं. बा कृष्णा, अर्जुन म्हणजे मींच आहे असें समज. मी म्हणजे अर्थात् तुझ्याहून अन्य कोणी नाहीं याची तुला ओळख आहेच. मी ज्याप्रमाणें तुझ्या आत्म्याचेच ठिकाणी आहे, त्याप्रमाणेच अर्जुनही आहे. पूर्वी वामनरूपानें त्रिपाद भूमि मागून व नंतर तीन पावलांनी सर्व विश्व आक्रमून या सर्व लोकांना तूं बळीच्या कचाट्यांतून सोडविलेंस, त्याच वेळीं ज्येष्ठ बंधू म्हणून तूं माझी देवांचे राज्यपदावर स्थापना केली आहेस. तूं सत्यमय आहेस. सत्य हेंच तुला इष्ट असून सत्य हाच तुझा पराक्रम होय. सत्यानेच तुला प्रसन्न करून घेऊन देव हे तुजकडून शत्रूंचा नाश करवितात. अर्जुन नामक माझा पुत्र म्हणजे तुझ्या पित्याच्या भगिनीचा पुत्र होय. पूर्वी तो तुझा सखा होतांच, तसाच या अवतारामध्यें त्याला तुझ्या सख्याची प्राप्ति होवो असें मी इच्छितो. हे कृष्णा, जसा वृषभ गाड्याच्या धुरेचा भार वहातो, तसा तू रणांगणामध्यें, घरीं, दारी, सर्व ठिकाणी त्याची नेहमी काळजी वहा. प्रभो, तुला सर्व भविष्य कळतच आहे. कंसाला तू मारल्यानंतर राजेलोकांमध्यें मोठे भारतीय युद्ध होईल. अलौकिक सामर्थ्याच्या नरवीरांच्या या युद्धांत अर्जुनाला विजयश्री माळ घालील आणि तुझी अजरामर कीर्ति होईल. हे अच्युता, मी, देव व सत्य इत्यादिकांचा जर तूं खरा वाली असशील तर मीं सांगितल्याप्रमाणें सर्व तुला केलें पाहिजे. " ' गोविंद ' पदाची प्राप्ति झालेल्या कृष्णाला इंद्राचे भाषण श्रवण करून मोठा संतोष झाला व त्यानें प्रत्युत्तर केलें. " शचीपते, तुझ्या दर्शनाने मी संतुष्ट झालो आहें. तूं एवढा वेळपर्यंत जें जें सांगितलेस त्यांत किमपिही न्यून पडणार नाहीं. तुझा आशय माझे ध्यानांत आला आहे; तूं अर्जुनरूपाने अवतार घेतल्याचें मला समजले आहे; महात्म्या पंडूला दिलेली, माझ्या पित्याची भगिनी मला ठाऊक आहे; तसेंच यमधर्मापासून उत्पन्न झालेल्या कुमार धर्मराजाला पण मीं जाणतो; वायूचा पुत्र भीमसेन मला ठाऊक आहे. अश्विनीकुमारांपासून माद्रीच्या पोटीं जन्मास आलेल्या नकुलसहदेवांनाही मीं चांगले ओळखतो. एवढेच नव्हे. तर सूर्यापासून कौमार्यावस्थेत कुंतीला झालेल्या कर्णाची देखील मला माहिती असून तो सांप्रत सूताच्या घरीं वाढत आहे, हें पण मला समजले आहे. युद्धासाठी हपापलेल्या सगळ्या धृतराष्ट्रपुत्रांना मीं ओळखतो. शापरूपी अशनिपातामुळें पंडूला कसें मरण आलें हाही वृत्तांत मला विदित आहे. हे इंद्रा, देवांच्या कल्याणाकरितां तू सुखानें स्वर्गलोकी परत जा; मी असतांना अर्जुनाला हात लावण्याची कोणत्याही शत्रूची प्राज्ञा नाहीं. भारतीय युद्ध संपूर्ण झाल्यावर अर्जुनाकरितां सर्व पांडव मी कुंतीच्या स्वाधीन करीन. युद्धामध्ये त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाहीं. हे शक्रा, तुझा पुत्र अर्जुन जें जें मला सांगेल तें ते सर्व तुझ्याविषयींच्या प्रेमानें बद्ध झाल्यामुळे चाकराप्रमाणें मी ऐकेन". सत्यभाषी साक्षात् श्रीकृष्णाचें संतोषवृत्तीचे हें मधुर भाषण श्रवण केल्यानंतर, अमरनाथ स्वर्ग लोकी निघून गेला.
इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि गोविन्दाभिषेकः नाम एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
अध्याय एकोणिसावा समाप्त
GO TOP
|