श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व अष्टादशोऽध्यायः
पितृकल्पः - २
मार्कण्डेय उवाच
इत्युक्तोऽहं भगवता देवदेवेन भास्वता ।
सनत्कुमारेण पुनः पृष्टवान् देवमव्ययम् ॥ १ ॥
संदेहममरश्रेष्ठं भगवन्तमरिन्दमम् ।
निबोध तन्मे गाङ्गेय निखिलं सर्वमादितः ॥ २ ॥
कियन्तो वै पितृगणाः कस्मिँल्लोके प्रतिष्ठिताः ।
वर्तन्ते देवप्रवरा देवानां सोमवर्द्धनाः ॥ ३ ॥
सनत्कुमार उवाच
सप्तैते यजतां श्रेष्ठ स्वर्गे पितृगणाः स्मॄताः ।
चत्वारो मूर्तिमन्तश्च त्रयस्तेषाममूर्तयः ॥ ४ ॥
तेषां लोकं विसर्गं च किर्तयिष्यामि तच्छृणु ।
प्रभावं च महत्त्वं च विस्तरेण तपोधन ॥ ५ ॥
धर्ममूर्तिधरास्तेषां त्रयो ये परमा गणाः ।
तेषां नामानि लोकांश्च कथयिष्यामि तच्छृणु ॥ ६ ॥
लोकाः सनातना नाम यत्र तिष्ठन्ति भास्वराः ।
अमूर्तयः पितृगणास्ते वै पुत्राः प्रजापतेः ॥ ७ ॥
विराजस्य द्विजश्रेष्ठ वैराजा इति विश्रुताः ।
यजन्ति तान् देवगणाः विधिदृष्टेन कर्मणा ॥ ८ ॥
एते वै योगविभ्रष्टा लोकान् प्राप्य सनातनान् ।
पुनर्युगसहस्रान्ते जायन्ते ब्रह्मवादिनः ॥ ९ ॥
ते तु प्राप्य स्मृतिं भूयः साङ्ख्यं योगमनुत्तमम् ।
यान्ति योगगतिं सिद्धाः पुनरावृत्तिदुर्लभाम् ॥ १० ॥
एते स्युः पितरस्तात योगिनां योगवर्द्धनाः ।
आप्याययन्ति ये पूर्वं सोमं योगबलेन च ॥ ११ ॥
तस्माच्छ्राद्धानि देयानि योगिनां तु विशेषतः ।
एष वै प्रथमः सर्गः सोमपानां महात्मनाम् ॥ १२ ॥
एतेषां मानसी कन्या मेना नाम महागिरेः ।
पत्नी हिमवतः श्रेष्ठा यस्या मैनाक उच्यते ॥ १३ ॥
मैनाकस्य सुतः श्रीमान् क्रौञ्चो नाम महागिरिः ।
पर्वतप्रवरः पुत्रो नानारत्नसमन्वितः ॥ १४ ॥
तिस्रः कन्यास्तु मेनायां जनयामास शैलराट् ।
अपर्णामेकपर्णां च त्रितीयामेकपाटलाम् ॥ १५ ॥
तपश्चरन्त्यः सुमहद् दुश्चरं देवदानवैः ।
लोकान्सन्तापयामासुस्तास्तिस्रः स्थाणुजङ्गमान् ॥ १६ ॥
आहारमेकपर्णेन एकपर्णा समाचरत् ।
पाटलापुष्पमेकं च आदधावेकपाटला ॥ १७ ॥
एका तत्र निराहारा तां माता प्रत्यषेधयत् ।
'उ' 'मा' इति निषेधन्ती मातृस्नेहेन दुःखिता ॥ १८ ॥
सा तथोक्ता तया मात्रा देवी दुश्चरचारिणी।
उमेत्येवाभवत् ख्याता त्रिषु लोकेषु सुन्दरी ॥ १९ ॥
तथैव नाम्ना तेनेह विश्रुता योगधर्मिणी ।
एतत्तु त्रिकुमारीकं जगत्स्थास्यति भार्गव ॥ २० ॥
तपःशरीरास्ताः सर्वास्तिस्रो योगबलान्विताः ।
सर्वाश्च ब्रह्मवादिन्यः सर्वाश्चैवोर्ध्वरेतसः ॥ २१ ॥
उमा तासां वरिष्ठा च ज्येष्ठा च वरवर्णिनी ।
महायोगबलोपेता महादेवमुपस्थिता ॥ २२ ॥
असितस्यैकपर्णा तु देवलस्य महात्मनः ।
पत्नी दत्ता महाब्रह्मन् योगाचार्याय धीमते ॥ २३ ॥
जैगीषव्याय तु तथा विद्धि तामेकपातलाम् ।
एते चापि महाभागे योगाचार्यावुपस्थिते ॥ २४ ॥
लोकाः सोमपदा नाम मरीचेर्यत्र वै सुताः ।
पितरो यत्र वर्तन्ते देवास्तान् भावयन्त्युत ॥ २५ ॥
अग्निष्वात्ता इति ख्याताः सर्व एवामितौजसः ।
एतेषां मानसी कन्या अच्छोदा नाम निम्नगा ॥ २६ ॥
अच्छोदं नाम विख्यातं सरो यस्याः समुत्थितम् ।
तया न दृष्टपूर्वास्ते पितरस्तु कदाचन ॥ २७ ॥
अप्यमूर्तानथ पितॄन् सा ददर्श शुचिस्मिता ।
संभूता मनसा तेषां पितॄन् स्वान्नाभिजानती ॥ २८ ॥
व्रीडिता तेन दुःखेन बभूव वरवर्णिनी ।
सा दृष्ट्वा पितरं वव्रे वसुं नामान्तरिक्षगम् ॥ २९ ॥
अमावसुरिति ख्यातमायोः पुत्रं यशस्विनम् ।
अद्रिकाऽप्सरसायुक्तं विमानेऽधिष्ठितं दिवि ॥ ३० ॥
सा तेन व्यभिचारेण मनसः कामरूपिणी ।
पितरं प्रार्थयित्वान्यं योगभ्रष्टा पपात ह ॥ ३१ ॥
त्रीण्यपश्यद्विमानानि पतमाना दिवश्च्युता ।
त्रसरेणुप्रमाणानि साऽपश्यत् तेषू तान् पितॄन् ॥ ३२ ॥
सुसूक्ष्मानपरिव्यक्तानग्नीनग्नीष्विवाहितान् ।
त्रायध्वमित्युवाचार्ता पतन्ती तानवाक्शिराः ॥ ३३ ॥
तैरुक्ता सा तु मा भैषीरिति व्योम्नि व्यवस्थिता ।
ततः प्रसादयामास तान् पितॄन् दीनया गिरा ॥ ३४ ॥
ऊचुस्ते पितरः कन्यां भ्रष्टैश्वर्यां व्यतिक्रमात् ।
भ्रष्टैश्वर्या स्वदोषेण पतसि त्वं शुचिस्मिते ॥ ३५ ॥
यैः क्रियन्ते हि कर्माणि शरीरैर्दिवि देवतैः ।
तैरेव तत्कर्मफलं प्राप्नुवन्तीह देवताः ॥ ३६ ॥
सद्यः फलन्ति कर्माणि देवत्वे प्रेत्य मानुषे ।
तस्मात्त्वं तपसः पुत्रि प्रेत्येदं प्राप्स्यसे फलम् ॥ ३७ ॥
इत्युक्ता पितृभिः सा तु पितॄन् प्रासादयत्स्वकान् ।
ध्यात्वा प्रसादं ते चक्रुस्तस्याः सर्वेऽनुकम्पया ॥ ३८ ॥
अवश्यं भाविनं ज्ञात्वा तेऽर्थमूचुस्ततस्तु ताम् ।
अस्य राज्ञो वसोः कन्या त्वमपत्यं भविष्यसि ॥ ३९ ॥
उत्पन्नस्य पृथिव्यां तु मानुषेषु महात्मनः ।
कन्या च भूत्वा लोकान् स्वान् पुनः प्राप्स्यसि दुर्लभान् ॥ ४० ॥
पराशरस्य दायादं त्वं पुत्रं जनयिष्यसि ।
स वेदमेकं ब्रह्मर्षीश्चतुर्धा विभजिष्यति ॥ ४१ ॥
महाभिषस्य पुत्रौ द्वौ शन्तनोः कीर्तिवर्द्धनौ ।
विचित्रवीर्यं धर्मज्ञं तथा चित्राङ्गदं शुभम् ॥ ४२ ॥
एतानुत्पाद्य पुत्रांस्त्वं पुनर्लोकानवाप्स्यसि ।
व्यतिक्रमात् पितॄणां च जन्म प्राप्स्यसि कुत्सितम् ॥ ४३ ॥
अस्यैव राज्ञः कन्या त्वमद्रिकायां भविष्यसि ।
अष्टाविंशे भवित्री त्वं द्वापरे मत्स्ययोनिजा ॥ ४४ ॥
एवमुक्त्वा तु दाशेयी जाता सत्यवती तदा ।
मत्स्ययोनौ समुत्पन्ना राज्ञस्तस्य वसोः सुता ॥ ४५ ॥
वैभ्राजा नाम ते लोका दिवि सन्ति सुदर्शनाः ।
यत्र बर्हिषदो नाम पितरो दिवि विश्रुताः ॥ ४६ ॥
तान् वै देवगणाः सर्वे यक्षगन्धर्वराक्षसाः ।
नागाः सर्पाः सुपर्णाश्च भावयन्त्यमितौजसः ॥ ४७ ॥
एते पुत्रा महात्मानः पुलस्त्यस्य प्रजापतेः ।
महात्मानो महाभागास्तेजोयुक्तास्तपस्विनः ॥ ४८ ॥
एतेषां मानसी कन्या पीवरी नाम विश्रुता ।
योगा च योगिपत्नी च योगिमाता तथैव च ॥ ४९ ॥
भवित्री द्वापरं प्राप्य युगं धर्मभृतां वरा
पराशरकुलोद्भूतः शुको नाम महातपाः ॥ ५० ॥
भविष्यति युगे तस्मिन्महायोगी द्विजर्षभः ।
व्यासादरण्यां संभूतो विधूमोऽग्निरिव ज्वलन् ॥ ५१ ॥
स तस्यां पितृकन्यायां पीवर्यां जनयिष्यति ।
कन्यां पुत्रांश्च चतुरो योगाचार्यान् महाबलान् ॥ ५२ ॥
कृष्णं गौरं प्रभुं शंभुं कृत्वीं कन्यां तथैव च ।
ब्रह्मदत्तस्य जननीं महिषीं त्वणुहस्य च ॥ ५३ ॥
एतानुत्पाद्य धर्मात्मा योगाचार्यान् महाव्रतान् ।
श्रुत्वा स्वजनकाद् धर्मान् व्यासादमितबुद्धिमान् ॥ ५४ ॥
महायोगी ततो गन्ता पुनरावर्तिनीं गतिं ।
यत्तत्पदमनुद्विग्नमव्ययं ब्रह्म शाश्वतम् ॥ ५५ ॥
अमूर्तिमन्तः पितरो धर्ममूर्तिधरा मुने ।
कथा यत्रेयमुत्पन्ना वृष्ण्यन्धककुलान्वया ॥ ५६ ॥
सुकाला नाम पितरो वसिष्ठस्य प्रजापतेः ।
निरता दिवि लोकेषु ज्योतिर्भासिषु भासुराः ।
सर्वकामसमृद्धेषु द्विजास्तान्भावयन्त्युत ॥ ५७ ॥
तेषां वै मानसी कन्या गौर्नाम्ना दिवि विश्रुता ।
तवैव वंशे या दत्ता शुकस्य महिषी प्रिया ।
एकशृङ्गेति विख्याता साध्यानां किर्तिवर्द्धिनी ॥ ५८ ॥
मरीचिगर्भांस्ताँल्लोकान् समाश्रित्य व्यवस्थिताः ।
ये त्वथाङ्गिरसः पुत्राः साध्यैः संवर्द्धिताः पुरा ॥ ५९ ॥
तान् क्षत्रियगणांस्तात भावयन्ति फलार्थिनः ।
तेषां तु मानसी कन्या यशोदा नाम विश्रुता ॥ ६० ॥
पत्नी सा विश्वमहतः स्नुषा वै वृद्धशर्मणः ।
राजर्षेर्जननी चापि दिलीपस्य महात्मनः ॥ ६१ ॥
तस्य यज्ञे पुरा गीता गाथाः प्रीतैर्महर्षिभिः ।
तदा देवयुगे तात वाजिमेधे महामखे ॥ ६२ ॥
अग्नेर्जन्म तथा श्रुत्वा शांडिल्यस्य महात्मनः ।
दिलीपं यजमानं ये पश्यन्ति सुसमाहिताः ।
सत्यवन्तं महात्मानं तेऽपि स्वर्गजितो नराः ॥ ६३ ॥
सुस्वधा नाम पितरः कर्दमस्य प्रजापतेः ।
समुत्पन्नास्तु पुलहान्महात्मानो द्विजर्षभाः ॥ ६४ ॥
लोकेषु दिवि वर्तन्ते कामगेषु विहङ्गमाः ।
तांश्च वैश्यगणांस्तात भावयन्ति फलार्थिनः ॥ ६५ ॥
तेषां वै मानसी कन्या विरजा नाम विश्रुता ।
ययातेर्जननी ब्रह्मन्महिषी नहुषस्य च ॥ ६६ ॥
त्रय एते गणाः प्रोक्ताश्चतुर्थं तु निबोध मे ।
उत्पन्ना ये स्वधायां ते सोमपा वै कवेः सुताः ।
हिरण्यगर्भस्य सुताः शूद्रास्तान्भावयन्त्युत ॥ ६७ ॥
मानसा नाम ते लोका यत्र तिष्ठन्ति ते दिवि ।
तेषां वै मानसी कन्या नर्मदा सरितां वरा ॥ ६८ ॥
या भावयति भूतानि दक्षिणापथगामिनी ।
पुरुकुत्सस्य या पत्नी त्रसद्दस्योर्जनन्यपि ॥ ६९ ॥
तेषामथाभ्युपगमान्मनुस्तात युगे युगे ।
प्रवर्तयति श्राद्धानि नष्टे धर्मे प्रजापतिः ॥ ७० ॥
पितॄणामादिसर्गेण सर्वेषां द्विजसत्तम ।
तस्मादेनं स्वधर्मेण श्राद्धदेवं वदन्ति वै ॥ ७१ ॥
सर्वेषां राजतं पात्रमथ वा रजतान्वितम् ।
दत्तं स्वधां पुरोधाय श्राद्धं प्रीणाति वै पितॄन् ॥ ७२ ॥
सोमस्याप्यायनं कृत्वा अग्नेर्वैवस्वतस्य च ।
उदगायनमप्यग्नावग्न्यभावेऽप्सु वा पुनः ॥ ७३ ॥
पितृन् प्रीणाति यो भक्त्या पितरः प्रीणयन्ति तम् ।
यच्छन्ति पितरः पुष्टिं प्रजाश्च विपुलास्तथा ॥ ७४ ॥
स्वर्गमारोग्यमेवाथ यदन्यदपि चेप्सितम् ।
देवकार्यादपि मुने पितृकार्यं विशिष्यते ॥ ७५ ॥
देवतानां हि पितरः पूर्वमाप्यायनं स्मृतम् ।
शीघ्रप्रसादा ह्यक्रोधा लोकस्याप्यायनं परम् ॥ ७६ ॥
स्थिरप्रसादाश्च सदा तान् नमस्यस्व भार्गव ।
पितृभक्तोऽसि विप्रर्षे मद्भक्तश्च विशेषतः ॥ ७७ ॥
श्रेयस्तेऽद्य विधास्यामि प्रत्यक्षं कुरु तत्स्वयम् ।
दिव्यं चक्षुः सविज्ञानं प्रदिशामि च तेऽनघ ॥ ७८ ॥
गतिमेतामप्रमत्तो मार्कण्डेय निशामय ।
न हि योगगतिर्दिव्या पितृणां च परा गतिः ॥ ७९ ॥
त्वद्विधेनापि सिद्धेन दृश्यते मांसचक्षुषा ।
स एवमुक्त्वा देवेशो मामुपस्थितमग्रतः ॥ ८० ॥
चक्षुर्दत्त्वा सविज्ञानं देवानामपि दुर्लभम् ।
जगाम गतिमिष्टां वै द्वितीयोऽग्निरिव ज्वलन् ॥ ८१ ॥
तन्निबोध कुरुश्रेष्ठ यन्मयासीन्निशामितम् ।
प्रसादात् तस्य देवस्य दुर्ज्ञेयं भुवि मानुषैः ॥ ८२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
पितृकल्पे अष्टादशोऽध्यायः
श्राद्धफलकथन -
मार्कंडेय म्हणतात - हे भीष्मा, अत्यंत तेजस्वी, केवळ देवांचाही देव शोभेल अशा सनत्कुमाराने आतां सांगितल्याप्रमाणें पितरांचा इतिहास मला समजाविला असतां मला पुनरपि कांहीं शंका आल्या त्या मीं अरिनिहंत्या चिरंजीवी भगवान सनत्कुमारापासून पुनरपि उलगडून घेतल्या; त्यांची हकीकत, हे गंगापुत्रा, मी तुला मुळापासून सर्व सांगतो, ती समजून घे.
मी त्या सनत्कुमारास विचारले की, आपण मला देव हेच पितर व पितर हेच देव होत व ते पितर सोमाला पुष्टि देतात, इत्यादि सांगितलें; पण असे हे जे पितृगण त्यांची संख्या किती आहे व ते कोणते लोकांत राहातात तें मला सांगावे. या प्रश्नावर, सनत्कुमारानीं उत्तर केलें कीं, 'हे याजकश्रेष्ठा, स्वर्गात राहाणार्या या पितरांचे गण आहेत; त्यांपैकीं चौघे मूर्तिमान म्हणजे शरीरी आहेत व तीन अमूर्तिमान म्हणजे अशरीरी आहेत. हे तपोधना, त्यांचें वसतिस्थान, त्यांची उत्पत्ति, पराक्रम व महत्व ही सविस्तर सांगतो तीं ऐक. या सातांपैकीं जे अमूर्त म्हणून पितृगण सांगितले त्यांचे वसतिस्थानाला सनातनलोक असें म्हणतात. हे पितृगण मोठे दैदीप्यमान असून ते सर्व प्रजापतीचे पुत्र होत. या गणांतील वैराज नांवाचे जे पितृगण आहेत ते विराज प्रजापतीचे पुत्र म्हणून प्रख्यात आहेत. यांचें देवगण शास्त्रविहित कर्माने आराधन करीत असतात. हे पितर म्हणजे प्रथम योगभ्रष्ट तपस्वी असतात. योगाची पूर्णता न झाल्यामुळे हे मुक्तीस न जातां केवळ सनातन ब्रह्मलोकास मात्र जातात. तेथें एक सहस्त्र युगेपर्यंत प्रजाप्रतीसह वास करून पुढील कल्पाचे आरंभी सनकादिक रूपाने ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न होतात. मग यांस पूर्वजन्मातील स्मृति प्राप्त होऊन पूर्वजन्मी अपूर्ण स्थितींत राहिलेल्या अप्रतिम सांख्य योगाच्या अभ्यासाला ते लागतात, व अखेरीस त्यांचा योग पूर्णतेस जाऊन ते सिद्ध ब्रह्मज्ञानी होतात व नंतर जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा शाश्वत पदाला पोचतात. हें मार्कंडेया, हे पितृगण इहलोकी जे कोणी नवीन उमेदवार योगाभ्यासाविषयीं यत्न करीत असतात त्यांच्या योगसिद्धीला हे साहाय्य करितात, व हेच आपल्या योगबलानें प्रथम सोमाला पुष्टि आणीत असतात. याकरितां हे जे योगी पितृगण यांचे उद्देशाने विशेषेंकरून श्राद्धे केली पाहिजेत. सोमाची वृद्धि करणारे जे महात्मे त्यांची ही पहिली पिढी होय. यांना मेना नांवाची एक मानस-कन्या झाली. ही गिरिश्रेष्ठ जो हिमालय त्याची पत्नी. हिला हिमवानापासून झालेल्या पुत्रास मैनाक असें म्हणतात. त्या मैनाकाचा पुत्र मोठा शोभिवंत व नानारत्नांनीं युक्त असा क्रौंच नांवाचा महापर्वत होय. मैनाक पुत्राशिवाय शैलराजा जो हिमालय त्यानें आपल्या मैना स्त्रीचे ठिकाणी अपर्णा, एकपर्णा व एकपाटला या नांवांच्या तीन कन्या उत्पन्न केल्या. या तिन्ही कन्यांनीं देव व दानव यांनाही दुश्चर असें घोर तप करून त्रैलोक्यातील स्थावरजंगम सृष्टीस त्राही त्राही करून सोडिलें. यांपैकी एकपर्णा नांवाची जी कन्या होती ती वनस्पतीचे एकच पर्ण भक्षण करून रहात असे. दुसरी एकपाटला ही पाटल वृक्षाचे एक पुष्प खाऊन राही. तिसरी जी अपर्णा ती मात्र कधींही खात नसे. तो तिचा तीव्र नियम पाहून तिची आई, जी मेना तिचे मातृप्रेमामुळे आतडे पिळे व ती आपल्या घोर तप करणार्या मुलीला 'उ मा' म्हणजे अगे असें करूं नको म्हणून वारंवार निवृत्त करण्याविषयीं यत्न करी. पुढें आईच्या 'उमा' 'उमा' अशा वारंवार शब्दोच्चारामुळे त्या सुंदर मुलीला त्रैलोक्यांत उमा असेंच म्हणूं लागले व हिची योगनिष्ठेविषयींही सर्वत्र फार ख्याति झाली. हे भार्गवा, या जगतांत या तीन कुमारी सदैव राहावयाच्याच. या सर्वही बहिणी आपलें शरीर सर्वदा तपश्चर्येच्या कामी लावणार्या, योगबलानें युक्त व ब्रह्मवेत्त्या असून सर्वही ऊर्ध्वरेत्या आहेत. या तीन बहिणीपैकी वयाने वडील, योग्यतेनें श्रेष्ठ, रूपकांतीनें अप्रतिम, व योगबलानें वरिष्ठ अशी जी उमा ती देवाधिदेव जो शंकर त्याचे पदरी पडली. दुसरी जी एकपर्णा ती बुद्धिमान महात्मा, योगाचार्य, जो असितकुलोत्पन्न देवल त्याला दिली, व एकपाटला ही जैगीषव्याला दिली. उमेच्या या दोघीही बहिणी तिचेप्रमाणेच महाभाग्यवान असून योगनिष्ठांच्याच पदरी पडल्या. मरीचि प्रजापतीचे पुत्र जे अग्निष्वात्त नांवाचे पितर आहेत ते सोमपद या नांवानें प्रसिद्ध असलेल्या लोकांत राहातात. हे सर्वही अपार तेजस्वी आहेत. देवही यांचें संतर्पण करित. यांना अच्छोदा नदी ही मानसकन्या होती. हिजपासूनच अच्छोद नांवाचे जे परम रमणीय विख्यात सरोवर आहे तें निर्माण झाले. हिने आपले पितर पूर्वी कधींही पाहिले नव्हते आणि यामुळे पुढें जेव्हा ते अमूर्त स्थितीत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां आपण ज्यांच्या मनोबलाने उत्पन्न झालो तेच म्हणजे हे आपले पितर, हें त्या शुचिस्मितेच्या लक्षांत आलें नाहीं व यामुळे ती सुंदरी खुद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञानामुळे त्यांना परपुरुषाप्रमाणें लाजली, व अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमानात बसून स्वर्गलोकांत फिरत असणार्या अमावसु नांवाच्या आयूच्या यशस्वी पुत्राला पाहून मोहित झाली.
खरें पाहाता हा वसु किंवा अमावसु आकाशगामी पितरांपैकी एक असतां हिनें त्यावर लोलुप होऊन त्याजविषयी कामवासना धरिली; व या पातकामुळे म्हणजे भलत्याचीच कामार्थ प्रार्थना केल्यामुळें ती योगापासून भ्रष्ट होऊन स्वर्गातून पतन पावली. खालीं पडता पडता वाटेत तिला परमाणूहूनही सूक्ष्म आकाराची अशीं तीन विमाने दिसली; व त्यांत अग्नीत असलेल्या विस्तवाचे ठिणगीप्रमाणें अव्यक्त व अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाचे तिचे खरे पितर तिच्या दृष्टीस पडले. तेव्हां लज्जेने खाली मान घालून दुःखित होत्साती 'मला तारा, मला तारा' असें म्हणू लागली. त्यावेळीं तूं 'भिऊ नको, भिऊ नको' अशा शब्दानी तिला आश्वासन दिल्यामुळें ती तशीच आकाशांत थबकून राहिली. नंतर मोठया दीनवाणीने तिने पितरांची प्रार्थना करून त्यांना प्रसन्न करून घेतलें, तेव्हां ते मर्यादोल्लंघन केल्यामुळें ऐश्वयार्पासून भ्रष्ट झालेल्या स्वकन्येला म्हणाले, "हे शुचिस्मिते, तूं ज्याअर्थी स्वदोषामुळे ऐश्वर्यभ्रष्ट झाली आहेस त्या अर्थी तुला मृत्युलोकीं गेलेंच पाहिजे. कारण असा नियम आहे कीं, स्वर्गात राहाणारे जे देव त्यांचे कर्माची फळें त्यांना तत्काल व त्याच शरीरांत म्हणजे ज्या शरीरांकडून तीं कर्मे केली गेली असतील त्या शरीरांतच मिळतात. परंतु, मनुष्यलोकांतील नियम वेगळा आहे. त्या लोकांत केलेल्या कर्माची फळें मरणोत्तर प्राप्त होतात. यासाठी, हे कन्ये, तूं आतां मृत्युलोकी जाऊन तेथें तपश्चर्या करून नंतर मरण पावशील. तेव्हां पुन्हा येथें येऊन तुला तपाचें फल भोगावयास मिळेल. करितां तूं संतोषानें मृत्युलोकीं जा. याप्रमाणे पितरांनी सांगितलेली गोष्ट ऐकून तिने संतोष पावून त्यांची कृपा संपादिली. तेव्हां ते सर्व दयार्द्र होऊन त्यांनीं ध्यानस्थितीत पुढें अवश्य होणारी गोष्ट कोणती ती ध्यानी घेऊन मोठया प्रसन्न चित्ताने तिला म्हणाले कीं, हे मुली, तुझें ज्यावर मन गेले होते तो महात्मा अमावसु पृथ्वीवर मनुष्ययोनींत राजकुलांत उत्पन्न झाला आहे. त्याची तू कन्या होशील व तो जन्म पुरा झाला म्हणजे पुन्हा या दुर्लभ लोकाला प्राप्त होशील. मृत्युलोकांत असतां तूं पराशर मुनींचा वारस असा एक पुत्र प्रसवशील.
तो मोठा ब्रह्मर्षी होईल व आजकाल जो एकच एक अखंड वेद आहे त्याचे तो भाग करून चार वेद करील. पराशराला अशा लक्षणांचा पुत्र देऊन नंतर तूं पूर्वजन्मीचा जो महाभिष नांवाचा राजा तो सांप्रत मृत्युलोकी, शंतनु नांवाचा राजा झाला आहे. त्याची तूं स्त्री होऊन त्याला विचित्रवीर्य नांवाचा एक धर्मनिष्ठ पुत्र व चित्रांगद नांवाचा आणखी एक सुलक्षणी पुत्र, असे दोन पुत्र देऊन नंतर तूं पुन्हा या लोकास येशील. तूं पितरांची अमर्यादा केलीस यास्तव तुला वाईट जन्म प्राप्त होईल. तूं असावसूचीच कन्या होशील व तीही अद्रिका नामक जी अप्सरा त्याजबरोबर होती, तिच्याच पोटी येशील; व तूं अठठाविसाव्या चौकडीत जें द्वापरयुग त्या युगांत एका मत्स्याच्या उदरांतून बाहेर येशील. पितरांनीं याप्रमाणे तिला सांगितल्यावर ती अच्छोदा मत्स्यीच्या पोटीं येऊन धीवरकुलांत प्रगट झाल्याने ती लोकांत धीवरकन्या म्हटली गेली; व पुढें त्या धीवराने ती वसुराजाला नजर केल्यामुळें ती त्याही राजाची कन्या मानली गेली.
बर्हिषद नांवाने स्वर्गात प्रसिद्ध असलेले पितृगण स्वर्गाच्या ज्या रमणीय प्रदेशांत राहातात त्या प्रदेशाला वैभ्राज असें नांव आहे. हे पितृगणही अमित तेजस्वी आहेत. हे मोठे तपस्वी, महाभाग व महात्मे पुलस्त्य नामक प्रजापतीचे पुत्र आहेत. सर्व देव, यक्ष, गंधर्व, राक्षस, नाग, सर्प व सुपर्ण हेही यांचा फार मान राखतात. यांची जी मानसकन्या ती पीवरी नांवानें विख्यात आहे. ती स्वतः योगनिष्ठ असून योग्याची स्त्री व योग्याचीच माता होणार आहे. ही गोष्ट येत्या द्वापरयुगांत होणार. हे धर्मनिष्ठा, त्या काळीं पराशराच्या कुलांत शुक नांवाचा महातपस्वी योगी उत्पन्न होईल. तो व्यासमुनीपासून अरणीचे ठिकाणी उत्पन्न होईल, व तो तेजाने निर्धूम अग्नीप्रमाणे जाज्वल्य असेल. हा शुकमुनि वर सांगितलेली पीवरी नांवाची जी बर्हिषद नांवाची कन्या तिचे ठिकाणी मोठे बलिष्ठ व योगाचे केवळ आचार्य असे चार पुत्र व एक कन्या निर्माण करील. या पुत्रांची नावें - कृष्ण, गौर, प्रभु व शंभू ही असतील व कन्येचें नांव कृत्वी. ही अणुह राजाची राणी होऊन ब्रह्मदत्ताची जननी होईल. याप्रमाणे असले योगनिष्ठ व महाव्रत पुत्र निर्माण करून व आपला पिता जो व्यास यापासून धर्माची विविध स्वरूपे ऐकून घेऊन तो धर्मनिष्ठ महायोगी शुक जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा पदाला जाईल. हें पद म्हणजे दुःखशोकरहित अव्यय व शाश्वत असें ब्रह्मच होय.
आतां जे अमूर्त पितर सांगितले त्यांपैकीं सुकालसंज्ञक पितर वसिष्ठ प्रजापतीपासून उत्पन्न झाले असून ते मोठे तेजस्वी व मूर्तिमान धर्म असे आहेत. ते ज्योतींनी भासमान असणार्या स्वर्गाच्या भागांत आवडीने राहातात. हा भाग सर्व इच्छित वस्तूंनी सुसंपन्न असा आहे. यांचेपासूनच वृष्णि व अंधक वंशासंबंधी कथेला उद्भव होतो. हेही पितर महामान्य असून ब्राह्मण त्यांचें तर्पण करीत असतात. यांची जी मानसकन्या आहे ती गौ या नांवानें स्वर्गात प्रसिद्ध आहे. हे मार्कंडेया, ही तुझ्याच वंशांत दिली जाऊन शुकाची प्रिय राणी होईल. या गौ नामक कन्येलाच एकश्रृंगा असें वहिवाटींत म्हणतात. ही गौ साध्यनामक जे देवगण त्यांचें भूषणस्थान आहे.
सूर्यमंडलांत मरीचिगर्भ नांवाचे लोक आहेत, तेथें अंगिरसाचे पुत्र (जे हविष्मंत नांवाचे पितर) ते राहतात. यांना साध्यनामक देवांनी पूर्वी वाढविले, अशी कथा आहे. ज्या क्षत्रियांना स्वर्गादिक फलाची इच्छा असेल ते या पितरांचे पूजन करितात. या पितरांची यशोदा नामक कन्या विश्रुत आहे. ही विश्वमहताची स्त्री, वृद्धशर्म्याची सून व राजर्षि महात्मा दिलीप याची आई. हा दिलीप मोठाच कीर्तिशाली झाला. हे मार्कंडेया, त्यानें देवांच्या युगांत एक सुप्रसिद्ध असा अश्वमेध नांवाचा महायज्ञ केला. त्या यज्ञांत शांडिल्यनामक सुप्रसिद्ध वंशांत जन्म घेणारा अग्नि प्रकट झाला. त्या वेळीं यज्ञार्थ तेथें आलेल्या अनेक महर्षीनी दिलीपाचें तें सामर्थ्य पाहून प्रेमाचे भरांत अनेक गाथा गाइल्या. त्यांचा सारांश हा कीं, जे कोणी एकाग्रचित्ताने सत्यनिष्ठ व महोदार अशा दिलीपराजाचे यज्ञसमयीं अवलोकन करितील त्या प्रेक्षकांनाही स्वर्ग प्राप्त होईल.
पुलह महर्षीपासून सुस्वधा नामक द्विजश्रेष्ठ उत्पन्न झाले. हे कर्दम प्रजापतीचे पितर होत. हे स्वर्गातील कामगसंज्ञक लोकांत रहातात; व आकाशांत यांना अनियंत्रित गति असल्यामुळें हे पक्षीरूपानें संचार करितात. हे मार्कंडेया, यांची उपासना फलार्थी वैश्यगण करितात. यांच्या मानसकन्येचें नांव विरजा हें आहे. हे ऋषे, ही ययातीची आई व नहुषाची पट्टराणी. याप्रमाणे मीं तुला हे तीन पितृगण सांगितले; आतां हा चौथा समजून घे. या चौथ्या गणांतील पितरांना 'सोमप' अशी संज्ञा आहे. हे कवीची कन्या जी स्वधा तिचे ठिकाणी हिरण्यगर्भ जो अग्नि त्यापासून उत्पन्न झाले. शूद्र लोक यांची पूजा करितात. स्वर्गातील ज्या लोकांत ते रहातात त्यांस 'मानस' अशी संज्ञा आहे. नर्मदा नांवाची जी सुप्रसिद्ध श्रेष्ठ नदी ती यांची मानसकन्या. ही नदी उगमापुढें कांहीं अंतरापर्यंत दक्षिणमार्गानें वाहात जात असून आपल्या स्पर्शाने प्राणिमात्राला पावन करिते. ही पुरुकुच्छाची स्त्री व त्रसद्दस्यूची आई. याप्रमाणे ही सात पितरांची हकीकत झाली. हें मार्कंडेया, युगायुगाचे ठायीं जेव्हां जेव्हां धर्माचा र्हास होतो त्या त्या वेळीं प्रजापालक जो मनु तो या सप्तपितरांची ज्यात विशेष पूजा केली जाते अशा प्रकारची श्राद्धे लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विजश्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृपति अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच "श्राद्धदेव" असेही म्हणतात.
हे मार्कंडेया, आता श्राद्धाचे विधान सांगतो तें ऐक. सर्व पितृश्राद्धांत पात्रे रुप्याची किंवा निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावीत. कारण रुपे हें पितरांना फार प्रिय आहे. असल्या रजत पात्रांत वाढलेले श्राद्धान्न स्वधाशब्दपूर्वक अर्पण केल्याने पितर फार संतुष्ट होतात.
श्राद्धकाली प्रथम सोम, अग्नि व यम यांचे अग्नीत आहुती देऊन संतर्पण करावे. अग्नि नसल्यास जलांत देणे. याप्रकारे जो भक्तिपूर्वक पितरांचा संतोष करितो, त्याला पितरही संतुष्ट करितात. पितर त्याला शरीर, पुष्टि व विपुल संतति देतात. त्याचप्रमाणे स्वर्ग देतात, आरोग्य देतात. फार काय सांगावे तो जे कांहीं इतर इच्छील तेही सर्व देतात. हे मुने, पितृकार्याचे महत्व देवकार्यापेक्षांही विशिष्ट आहे. कारण, देव हे मोठे चेंगट व प्रसन्न होण्याला कठीण. पितर बिचारे अक्रोध म्हणजे शांत व त्वरित कृपा करणारे असे आहेत. म्हणून स्मृत्यादिकांत देवांपेक्षांही पितरांचा संतोष प्रथम करण्याकडे विशेष कटाक्ष आहे. पितरांपासून लोकांचे फारच श्रेष्ठ कल्याण होते. शिवाय पितरांचा प्रसाद सदा स्थिर आहे म्हणजे त्यांची पूजा केली आणि ते अमुक वेळीं प्रसन्न झालें नाहीत, असें कधीं घडतच नाहीं. यास्तव, हे भृगुकुलोत्पन्ना मार्कंडेया, अशा पितरांना तूं नमस्कार कर. ही गोष्ट तुला विशेष आग्रहाने सांगण्याचे कारण असें आहे कीं, तूं मोठा पितृभक्त आहेस व त्यातूनही, हे ब्राह्मणा, तुझी मजवर विशेषच भक्ती आहे. आज मी तुझे कल्याण करणार आहे व तें कसें तें तुला प्रत्यक्ष पाहाता यावे म्हणून मी तुला दिव्य दृष्टि व अनुभवाचें सामर्थ्य, ही दोन्हीही देतो. हे निष्पापा मार्कंडेया, मी जो मार्ग सांगतो, तो फार सावधचित्ताने ध्यानांत घे. वास्तविक पहाता तू कांहीं सामान्य पुरुष नव्हेस. तूं मोठा सिद्ध आहेस. तथापि देवांची योगगति व पितरांची श्राद्धफलरूपी परागति चर्मचक्षूनें तुला दिसणार नाहीं. असें बोलून तो देवश्रेष्ठ त्याच्या जवळच बसलेल्या मला देवांनाही दुर्लभ अशी विज्ञान सहित दिव्यदृष्टि देऊन त्याला इष्ट त्या मार्गाला गेला. जातांना तो जळत्या आहवनीय अग्नीसारखा झळकत होता.
हे कुरुश्रेष्ठा, त्या सनत्कुमार देवाच्या प्रसादाने मला जें ज्ञान प्राप्त झालें तें या मृत्युलोकांत मनुष्यांना प्राप्त होणें फार कठीण आहे. याकरिता तूं तें नीट समजून घे.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पितृकल्पे अष्टादशोऽध्यायः ॥ १८ ॥
अध्याय अठरावा समाप्त
GO TOP
|