श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व सप्तचत्वारिंशोऽध्यायः
कालनेमिपराक्रमः
वैशंपायन उवाच
दानवांश्चापि पिप्रीषुः कालनेमिर्महासुरः ।
व्यवर्धत महातेजास्तपान्ते जलदो यथा ॥ १॥
त्रैलोक्यान्तर्गतं तं तु दृष्ट्वा ते दानवेश्वराः ।
उत्तस्थुरपरिश्रान्ताः प्राप्येवामृतमुत्तमम् ॥ २॥
ते वीतभयसंत्रस्ता मयतारपुरोगमाः ।
तारकामयसंग्रामे सततं जयकाङ्क्षिणः ।
रेजुरायोधनगता दानवा युद्धकाङ्क्षिणः ॥ ३॥
अस्त्रमभ्यस्यतां तेषां व्यूहं च परिधावताम् ।
प्रेक्षतां चाभवत् प्रीतिर्दानवं कालनेमिनम् ॥ ४॥
ये तु तत्र मयस्यासन् मुख्या युद्धपुरःसराः ।
तेऽपि सर्वे भयं त्यक्त्वा हृष्टा योद्धुमुपस्थिताः ॥ ५॥
मयस्तारो वराहश्च हयग्रीवश्च वीर्यवान् ।
विप्रचित्तसुतः श्वेतः खरलम्बावुभावपि ॥ ६॥
अरिष्टो बलिपुत्रस्तु किशोरोष्ट्रौ तथैव च ।
स्वर्भानुश्चामरप्रख्यो वक्त्रयोधी महासुरः ॥ ७॥
एतेऽस्त्रविदुषः सर्वे सर्वे तपसि सुव्रताः ।
दानवाः कृतिनो जग्मुः कालनेमिनमुत्तमम् ॥ ८॥
ते गदाभिश्च गुर्वीभिश्चक्रैश्च सपरश्वधैः ।
अश्मभिश्चाद्रिसदृशैर्गण्डशैलैश्च दंशितैः ॥ ९॥
पट्टिशैर्भिन्दिपालैश्च परिघैश्चोत्तमायुधैः ।
घातनीभिश्च गुर्वीभिः शतघ्नीभिस्तथैव च ॥ १०॥
कालकल्पैश्च मुसलैः क्षेपणीयैश्च मुद्गरैः ।
युगैर्यन्त्रैश्च निर्मुक्तैरर्गलैश्चाग्रताडितैः ॥ ११॥
दोर्भिश्चायतपीनांसैः पाशैः प्रासैश्च मूर्च्छितैः ।
सर्पैर्लेलिह्यमानैश्च विसर्पद्भिश्च सायकैः ॥ १२॥
वज्रैः प्रहरणीयैश्च दीप्यमानैश्च तोमरैः ।
विकोशैश्चासिभिस्तीक्ष्णैः शूलैश्च शितनिर्मलैः ॥ १३॥
ते वै संदीप्तमनसः प्रगृहीतोत्तमायुधाः ।
कालनेमिं पुरस्कृत्य तस्थुः संग्राममूर्धनि ॥ १४॥
सा दीप्तशस्त्रप्रवरा दैत्यानां शुशुभे चमूः ।
द्यौर्निमीलितनक्षत्रा सघनेवाम्बुदागमे ॥ १५॥
देवतानामपि चमू रुरुचे शक्रपालिता ।
दीप्ता शीतोष्णतेजोभ्यां चन्द्रभास्करवर्चसा ॥ १६॥
वायुवेगवती सौम्या तारागणपताकिनी ।
तोयदाविद्धवसना ग्रहनक्षत्रहासिनी ॥ १७॥
यमेन्द्रधनदैर्गुप्ता वरुणेन च धीमता । ॥
सम्प्रदीप्ताग्निपवना नारायणपरायणा ॥ १८॥
सा समुद्रौघसदृशी दिव्या देवमहाचमूः ।
रराजास्त्रवती भीमा यक्षगन्धर्वशालिनी ॥ १९॥
तयोश्चम्वोस्तदा तत्र बभूव स समागमः ।
द्यावापृथिव्योः संयोगो यथा स्याद्युगपर्यये ॥ २० ॥
तद्युद्धमभवद्घोरं देवदानवसङ्कुलम् ।
क्षमापराक्रममयं दर्पस्य विनयस्य च ॥ २१॥
निश्चक्रमुर्बलाभ्यां तु ताभ्यां भिमाः सुरासुराः ।
पूर्वापराभ्यां संरब्धाः सागराभ्यामिवाम्बुदाः ॥ २२॥
ताभ्यां बलाभ्यां संहृष्टाश्चेरुस्ते देवदानवाः ।
वनाभ्यां पर्वतीयाभ्यां पुष्पिताभ्यां यथा गजाः ॥ २३॥
समाजग्मुस्ततो भेरीः शङ्खान् दध्मुश्च नैकशः ।
स शब्दो द्यां भुवं चैव दिशश्च समपूरयत् ॥ २४॥
ज्याघाततलनिर्घोषो धनुषां कूजितानि च ।
दुन्दुभीनां निनदतां दैत्यानां निर्दधुः स्वनान् ॥ २५॥
तेऽन्योन्यमभिसम्पेतुः पातयन्तः परस्परम् ।
बभञ्जुर्बाहुभिर्बाहून् द्वन्द्वमन्ये युयुत्सवः ॥ २६॥
देवतास्त्वशनीर्घोराः परिघांश्चोत्तमायसान् ।
ससर्जुराजौ निस्त्रिंशान् गदा गुर्वींश्च दानवाः ॥ २७॥
गदानिपातैर्भग्नाङ्गा बाणैश्च शकलीकृताः ।
परिपेतुर्भृशं केचिन्न्युब्जाः केचित्ससर्जिरे ॥ २८॥
ततो रथैः सतुरगैर्विमानैश्चाशुगामिभिः ।
समीयुस्ते तु संरब्धा रोषादन्योन्यमाहवे ॥ २९॥
संवर्तमानाः समरे विवर्तन्तस्तथापरे ।
रथा रथैर्निरुध्यन्ते पदाताश्च पदातिभिः ॥ ३०॥
तेषां रथानां तुमुलः स शब्दः शब्दवाहिनाम् ।
बभूवाथ प्रसक्तानां नभसीव पयोमुचाम् ॥ ३१॥
बभञ्जिरे रथान् केचित् केचित् संमृदिता रथैः ।
संबाधमेके सम्प्राप्य न शेकुश्चलितुं रथाः ॥ ३२॥
अन्योन्यस्याभिसमरे दोर्भ्यामुत्क्षिप्य दर्पिताः ।
संह्रादमानाभरणा जघ्नुस्तत्रासिचर्मिणः ॥ ३३॥
अस्त्रैरन्ये विनिर्भिन्ना रक्तं वेमुर्हता युधि ।
क्षरज्जलानां सदृशा जलदानां समागमे ॥ ३४॥
तदस्त्रशस्त्रग्रथितं क्षिप्तोत्क्षिप्तगदाविलम् ।
देवदानवसंक्षुब्धं सकुलं युद्धमाबभौ ॥ ३५॥
तद्दानवमहामेघं देवायुधतडित्प्रभम् ।
अन्योन्यबाणवर्षं तद् युद्धं दुर्दिनमाबभौ ॥ ३६॥
एतस्मिन्नन्तरे क्रुद्धः कालनेमिर्महासुरः ।
व्यवर्धत समुद्रौघैः पूर्यमाण इवाम्बुदः ॥ ३७॥
तस्य विद्युच्चलापीडाः प्रदीप्ताशनिवर्षिणः ।
गात्रे नगशिरःप्रख्या विनिष्पेषुर्बलाहकाः ॥ ३८॥
क्रोधान्निःश्वसतस्तस्य भ्रूभेदस्वेदवर्षिणः ।
साग्निनिष्पेषपवना मुखान्निश्चेरुरर्चिषः ॥ ३९॥
तिर्यगूर्ध्वं च गगने ववृधुस्तस्य बाहवः ।
पञ्चास्याः कृष्णवपुषो लेलिहाना इवोरगाः ॥ ४०॥
सोऽस्त्रजालैर्बहुविधैर्धनुर्भिः परिघैरपि ।
दिव्यैराकाशमावव्रे पर्वतैरुच्छ्रितैरिव ॥ ४१॥
सोऽनिलोद्भूतवसनस्तस्थौ संग्राममूर्धनि ।
सन्ध्यातपग्रस्तशिखः सार्चिर्मेरुरिवापरः ॥ ४२॥
ऊरुवेगप्रतिक्षिप्तैः शैलशृङ्गाग्रपादपैः ।
अपातयद् देवगणान् वज्रेणेव महागिरीन् ॥ ४३॥
बाहुभिः शस्त्रनिस्त्रिंशैश्छिन्नभिन्नशिरोरसः ।
न शेकुश्चलितुं देवाः कालनेमिहता युधि ॥ ४४॥
मुष्टिभिर्निहताः केचित् केचिच्च विदलीकृताः ।
यक्षगन्धर्वपतयः पेतुः सह महोरगैः ॥ ४५॥
तेन वित्रासिता देवाः समरे कालनेमिना ॥
न शेकुर्यत्नवन्तोऽपि प्रतिकर्तुं विचेतसः ॥ ४६॥
तेन शक्रः सहस्राक्षः स्तम्भितः शरबन्धनैः ।
ऐरावतगतः संख्ये चलितुं न शशाक ह । ४७॥
निर्जलम्भोदसदृशो निर्जलार्णवसप्रभः ।
निर्व्यापारः कृतस्तेन विपाशो वरुणो मृधे ॥ ४८॥
रणे वैश्रवणस्तेन परिघैः कालरूपिभिः ।
व्यलभल्लोकपालेशस्त्याजितो धनदक्रियाम् ॥ ४९॥
यमः सर्वहरस्तेन दण्डप्रहरणो रणे ।
याम्यामवस्थां समरे नीतः स्वां दिशमाविशत् ॥ ५०॥
स लोकपालानुत्साद्य कृत्वा तेषां च कर्म तत् ।
दिक्षु सर्वासु देहं स्वं चतुर्धा विदधे तदा ॥ ५१॥
स नक्षत्रपथं गत्वा दिव्यं स्वर्भानुदर्शितम् ।
जहार लक्ष्मीं सोमस्य तं चास्य विषयं महत् ॥ ५२॥
चालयामास शीतांशुं स्वर्गद्वारात् स भास्करम् ।
सायनं चास्य विषयं जहार दिनकर्म च ॥ ५३॥
सोऽग्निं देवमुखे दृष्ट्वा चकारात्ममुखे स्वयम् ।
वायुं च तरसा जित्वा चकारात्मवशानुगम् ॥ ५४॥
ससमुद्राः समानीय सर्वाश्च सरितो बलात् ।
चकारात्मवशे वीर्याद् देहभूताश्च सिन्धवः ॥ ५५॥
अपः स्ववशगाः कृत्वा दिविजा याश्च भूमिजाः ।
स्थापयामास जगतीं सुगुप्तां धरणीधरैः ॥ ५६ ॥
स स्वयंभूरिवाभाति महाभूतपतिर्महान् ।
सर्वलोकमयो दैत्यः सर्वलोकभयावहः ॥ ५७॥
स लोकपालैकवपुश्चन्द्रसूर्यग्रहात्मवान् ।
पावकानिलसंघातो रराज युधि दानवः ॥ ५८॥
पारमेष्ठ्ये स्थितः स्थाने लोकानां प्रभवात्यये ।
तुष्टुवुस्तं दैत्यगणा देवा इव पितामहम् ॥ ५९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
आश्चर्यतारकामये सप्तचत्वारिंशोऽध्यायः
कालनेमीचा पराक्रम -
वैशंपायन सांगतात:- आपले ज्ञातिबंधु जे दानव त्यांना आनंदित करण्याकरितां महातेजस्वी जो कालनेमी असुर तो ग्रीष्म ऋतूच्या अंती ज्याप्रमाणें मेघसमूह वाढत जातो त्या प्रमाणें त्रैलोक्यभर वाढू लागला. याप्रमाणे कालनेमी हा जेव्हां सर्वत्र त्रैलोक्यभर पसरला असें आढळून आलें, तेव्हां त्या दानवमंडळींतील जे मुख्य मुख्य होते ते अत्युत्तम अमृत तोंडी लागलें असतां जसे ( मेलेले मनुष्यही ) उठून ऊभे राहातात, त्याप्रमाणें यापूर्वी जरी थकून भागून व निराश होऊन मटकन् खालीं बसलेले होते, तरी आतां, ते सर्व श्रम विसरून हुषारीने टप्दिशी ऊठून् युद्धार्थ उभे राहिले; आणि या तारकामय संग्रामांत आपलाच जय व्हावा अशी सतत ज्यांची इच्छा होती ते मयासुर आण तारासुरप्रभृति दानव जे हा वेळपर्यत भेदरून जाऊन मट्ट बसले होते ते निर्धास्तपणे युद्धभूमीवर उभे राहून युद्धोत्कंठेने चमकू लागले; व कालनेमीला पाहून त्यांना अंतर्यामी इतकें प्रेम वाटले की, त्या प्रेमभरात ते निःशंकपणें वारंवार अस्त्रे सोडीत व व्यूहांतून इकडे तिकडे धांवत. त्याचप्रमाणें मयासुराचे हाताखाली जे कोणी म्होरके वीर होते तेही सर्व शंका सोडून युद्धार्थ उभे राहिले. याप्रमाणें मय, तार, वराह, शूर हयग्रीव, विप्रचित्तीचा पुत्र श्वेत, खर व लंब हे दोघे, बलीचा पुत्र अरिष्ट, तसेंच किशोर व उष्ट्र हे दोघे, देवतुल्य स्वर्भानु व वक्रयोधि नांवाचा महासुर; हे सर्वही मोठे अस्त्रवेत्ते, तपोनिष्ठ वु कार्यकुशल असे असुर जमून सर्वश्रेष्ठ जो कालनेमी त्याला साथ करण्यास गेले. त्याच्या साह्यार्थ ते हातीं जंगी जंगी गदा, चक्रे, फरश, पर्वतप्राय शिळा, पर्वताचे तुटके कडे, पट्टे, गोफणी, भाले, तोफा, सोटे, बड्या बड्या तोफा, कालदंडासारखीं मुसळे, फेंकण्याजोगे मोगरे, युगे, यंत्रे, मोकळ्या व तोंडे शेवटलेल्या अर्गळा, पाश, प्राश, जिभळ्या चाटणारे साप, धांवणारे बाण, वज्रें, पहारा, झगझगीत तोमर, नंग्या तरवारी, पाजळून झक्क केलेले तीव्र शूल, इत्यादि आयुधे घेऊन मोठ्या हुरूपाने आपल्या लंब, विस्तीर्ण व पुष्ट अशा बाहूंच्या बलासह सज्ज झाले. याप्रमाणे झगझगीत अस्त्ररूपी विजा जींत चमकून राहिल्या आहेत अशी ती दैत्यचमु वर्षाकाली नक्षत्र लुप्त झालेल्या आणि मेघांनी आच्छादिलेल्या द्यौ (आकाशा) प्रमाणें शोभू लागली.
इकडे इंद्राच्या हाताखालची देवांची सेनाही चंद्र आणि सूर्य यांच्या शीतोष्ण तेजांनी शोभत होती. प्रत्यक्ष वायूच तिच्या वेगस्थानीं होता. सोमामुळे ती सौम्य होतीच. तारांगणांच्या पताका फडकत होत्या; मेघरूपी वस्त्र तिला गुरफटले होतें; ग्रह व नक्षत्ररूपाने ती हास्य करीत होती; यम, इंद्र, कुबेर आणि बुद्धिमान वरुण हे तिचे रखवालदार होते, व यक्षगंधर्व हेही तीत पुष्कळ होते. तिच्यांत अग्नि आणि वायु हे चेतून राहिले होते. परमात्मा नारायण तिचा सर्वस्वी आधार होता. शिवाय तिच्यांत अस्त्रांचीही रेलचेल होती. यामुळे व तिच्या अफाटपणामुळे ती दिव्य देवसेना समुद्राप्रमाणें भयंकर दिसत होती. अशा या दोन अवाढव्य सेनांचा जेव्हां युद्धार्थ संयोग झाला, तेव्हां युगांतीं होणाऱ्या द्यावा-पृथ्वीच्या संयोगाचा भास होऊं लागला. देव व दानव यांची ज्यात एकच गर्दी उसळून गेली आहे, असें तें युद्ध फारच घनघोर झाले.
एका पक्षाला विनय आणि क्षमा, आण दुसऱ्या पक्षाला पराक्रम व दर्प ही दिसून येत होतीं. तीं जंगी सैन्ये घेऊन जेव्हां ते भयंकर देव व दैत्य एकमेकांवर चढ करून जावयास निघाले, त्या वेळीं पूर्व-पश्चिम समुद्राच्या योगाने खवळलेल्या मेघांप्रमाणें ते दिसू लागले. पर्वतावरील वनांत फुलें फुलली असतां हत्ती जसे त्या वनांतून मौजेने हिंडत असतात, त्याप्रमाणें त्या चित्रविचित्र सैन्यातून ते देव व दानव मोठ्या आनंदाने फिरत होते. मग उभयतांनी नगारे बडविले व अनेक शंख फुंकले. त्यांचा शब्द एवढा तुमुल झाला कीं, त्यामुळें आकाश, पृथ्वी व दशदिशाही भरून गेल्या.
धनुष्यांच्या दोऱ्यांचे हातावर होणारे फट् - फट् आवाज, शिवाय धनुष्यांच्या कांबिटांचे लवतांना होणारे कुय्कुंय् आवाज आणि दुंदुभींचे स्वर यांच्या कल्होळांत दैत्यांच्या आरोळ्या लपून गेल्या. मग उभयपक्षांकडील वीर युद्धोत्कण्ठेनें उतावीळ होऊन एकमेकांवर तुटून पडले; व द्वंद्वयुद्धांत शिरून कोणी कोणाला खालीं पाडिलें, कोणी कोणाचे हात मोडले. देवांनी त्या वेळीं भयंकर वज्रे व उत्तम पोलादी परीघ व तीस तीस अंगुळें लांबीच्या तरवारी शत्रूवर फेंकिल्या; दानवांनी भल्या भल्या गदा फेकिल्या, गदेच्या आघाताने अंगें चुरडून व बाणांनी छिन्नभिन्न होऊन कोणी सर्वभर उलथेपालथे पडले, व कोणी तशांतच अस्त्रप्रयोग करीत होते. नंतर ते दोघेही रागाच्या आवेशांत आपली शीघ्रगामी विमाने यांसह एकमेकांशी भिडले. कोणी समोरासमोर तोंड देऊं लागले, कोणी तोंड फिरवून माघार घेऊं लागले, रथी रथ्यांना अडवू लागले, व पायदळ लोक पायदळाला अडवू लागले. त्या रट्ट्यांत रथांचा जो घडघड शब्द उठला, तो आकाशांत परस्परांवर आदळणाऱ्या मेघांच्या शब्दाप्रमाणे भासला. कोणी रथांचा चुराडा केला, कोणी रथाखालीं चुरडून गेले, काहींचे रथ अशा चेंचाटीत सापडले कीं, त्यांना फिरावयास वाव मिळेना. ते मस्तीत आलेले उभयपक्षीय वीर उंच उंच हात उडवून ढालतरवारींनीं एकमेकांशी भिडू लागले. त्या वेळीं त्यांच्या अंगदादि भूषणांचे खडाखड आवाज होऊं लागले. कांहींजण अस्त्रांनीं छिन्नभिन्न होऊन वर्षाकालीं जल स्त्रवणाऱ्या मेघा प्रमाणें रुधिर स्त्रवूं लागले. ती देवदानवांची मारामारी फारच घनघोर झाली. खालींवर फेकलेल्या गदांनी व एकमेकांवर आदळणाऱ्या शस्त्रांनीं तें अगदीं रणमैदान भरून गेलें होतें. तें युद्ध म्हणजे एक तऱ्हेचे दुर्दिनच होय. कारण त्यांत ते धिप्पाड दैत्य हेंच मोठमोठाले ढग उसळले होते; देवांची तेजस्वी आयुधे याच विजा लवून राहिल्या होत्या; व उभय सैन्यांची बाणवृष्टी हाच पर्जन्य पडत होता.
अशांत महादानव जो कालनेमी तो रागावून एकाएकीं समुद्राच्या ओघामुळें पुष्ट झालेल्या मेघाप्रमाणे वाढला. तो इतका कीं, विद्युद्रुपी ज्यांच्या गळ्यांत पुष्पमाळा हालत आहेत व प्रदीप्त अश अशनींचा ज्यांचेपासून वर्षाव होत आहे, व जे पर्वतश्रृंगांप्रमाणें धिप्पाड आहेत, अशा मेघांचा त्यांच्या शरीरस्पर्शाने चुराडा झाला. तो कालनेमी ज्या वेळीं क्रोधाने फूं फूं करूं लागला त्या वेळीं रागाने मोडलेल्या त्याच्या भृकुटींतून घर्माच्या धारा लागून मुखांतून निश्वासरूपानें अग्नीच्या ठिणग्या घेऊन निघणाऱ्या ज्याळा बाहेर पडूं लागल्या. अंशांत त्याचे ते असंख्य बाहू अंतरिक्षांत उभे, आडवे, तिरपे असे सर्वभर पसरले. तें पाहून आ पसरून जिभाळ्या चाटणारे हे काळेकुळकुळीत सापच फिरतात कीं काय असें वाटलें. त्यानें आपल्या अनेक हातांत धनुष्ये, गदा व अनेक दिव्य अस्त्रे घेऊन आकाश भरून टाकिलें असतां, तें पर्वतांच्या तुंग शिखरांनी व्याप्त झालें कीं काय असें दिसू लागलें. अंगावरील वस्त्र वायु फडकवीत आहे, अशा स्थितीत तो रणभूमीवर उभा असतां सायंकाळच्या सूर्यप्रकाशानें ज्याचे शिखर व्याप्त झालें आहे अशा दिव्य मेरुपर्वताप्रमाणे दिसू लागला. इंद्र ज्याप्रमाणें आपल्या व वज्राने महान् पर्वत छेदून खालीं पाडतो, त्याप्रमाणें त्या कालनेमीने आपल्या मांड्यांच्या धसक्याने पर्वतांची श्रृंगे व मोठमोठाले वृक्ष उपटून घेऊन त्याच्या साहाय्याने देव मंडळी हाणून पाडिली. आयुधाची गोष्ट वेगळीच, पण त्या असुराने शस्त्राप्रमाणें कर्कश अशा आपल्या केवळ बाहूंनी देवमंडळीची मस्तके व वक्षस्थळे इतकी छिन्न-भिन्न केली कीं, देवांना जागचे हालवेना. या शिवाय यक्ष, गंधर्व व उरग यांतील मुख्यांना त्यानें नुसत्या बुक्क्यांनी बुकलून व्याकूळ केलें, व त्यांची फळी फोडून टाकिली. देव कांहीं कमी खटपटी नव्हते; तथापि, त्या कालनेमीची दहशत त्यांच्या मनांत इतकी बसली कीं, तेथें त्यांना काय करावे तें सुचेनासे झालें. ऐरावतावर बसलेला एवढा सहस्रनेत्र इंद्र पण तोही कालनेमीनें आपल्या शरजालांनीं असा जखडून टाकिला कीं त्याचें पाऊल पुढें पडेना. मोठा पाशधारी वरुण, पण त्याचेही त्यानें पाश हिसकावून घेऊन त्याला निर्जल समुद्राप्रमाणे कोरडा पाडून किंवा निर्जल मेघाप्रमाणे फिका पाडून रणात मट्ट् बसविले. देवांचा खजिनदार जो लोकपाल कुबेर त्याला त्या असुराने कालस्वरूपी बडग्यांच्या माराने द्रव्य वांटण्याचें थांबविलें, व त्यामुळें तो कुबेर रडू लागला.
यम म्हणजे सर्वांचे प्राण हरण करणारा व दंडाने ज्याला त्याला मारणारा पण अशालाही त्या कालनेमीनें मृतप्राय करून सोडून दक्षिण दिशेला पळवून लाविलें. याप्रमाणे या चारही दिशांच्या इंद्रप्रभृति पालकांना उखडून लावून त्यानें त्या चौघांची कामगिरी आपलेकडे घेतली व आपल्या एका देहाचे चार देह करून ते चतुर्दिशेला स्थापित केले. नंतर स्वर्भानूने दाखविलेल्या मार्गानें नक्षत्रमार्गात जाऊन त्यानें चंद्राचें तेज व त्याचा प्रांतही हरण केला. ( तो एवढेच करून राहिला नाहीं, त्यानें खुद्द चंद्रालाही स्वर्गद्वारातून हाकून लाविलें व सूर्यालाही त्याचा अयनमार्ग, त्याचा एकूण प्रांत व त्याचें दिनकर्तृत्व हिरावून घेऊन स्वर्गातून काढून दिलें. अग्नि हा देवांच्या मुखी आहे असें दृष्टीस पडताच तो त्यानें आपल्या मुखांत आ्णून ठेवला. वायूला तर त्याने तडाक्यासरसा जिंकून आपला ताबेदार करून सोडिले. नद्यांवर त्यानें अशी कांहीं जबरदस्ती केली कीं, त्यांना समुद्राच्या मुखापासून ओढून आणून दांडगाईने देहधारी करवून आपल्या आज्ञेत ठेविलें.
याचप्रमाणे आकाशांतील व भूमीवरील सर्व जल आपल्या बसांत आणून त्यानें पर्वतांचे सर्वत्र पहारे ठेवून पृथ्वीचे पालन चालविले. एवंच, तो दैत्य सर्व लोकांना व्यापून टाकून व सर्व, लोकांना भयावह होऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेवाप्रमाणें स्वतःच सर्व-भूतपति होऊन बसला. सर्व लोकपाल व चंद्र, सूर्य, ग्रह, त्याप्रमाणेंच अग्नि व वायु या सर्वांच्या जागी आपण एकटाच होऊन त्या युद्धभूमीवर शोधू लागला. याप्रमाणे लोकांचे उद्भव व लय जेथे होतात अशा परमेष्ठीच्या ( ब्रह्मदेवाच्या) जागी जाऊन जेव्हां हा कालनेमी बसला, तेव्हां देव ज्याप्रमाणें ब्रह्मदेवाची स्तुति करितात, त्याचप्रमाणानें दैत्य मंडळीने त्याची स्तुति आरंभिली.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि कालनेमिपराक्रमः नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४७ ॥
अध्याय सत्तेचाळिसावा समाप्त
GO TOP
|