श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
अष्टचत्वारिंशोऽध्यायः


कालनेमिवधः

वैशंपायन उवाच
पञ्च तं नाभ्यवर्तन्त विपरीतेन कर्मणा ।
वेदो धर्मः क्षमा सत्यं श्रीश्च नारायणाश्रया ॥ १॥
स तेषामनुपस्थानात् सक्रोधो दानवेशवरः ।
वैष्णवं पदमन्विच्छन् ययौ नारायणान्तिकम् ॥ २॥
स ददर्श सुपर्णस्थं शङ्खचक्रगदाधरम् ।
दानवानां विनाशाय भ्रामयन्तं गदां शुभाम् ॥ ३॥
सजलाम्भोदसदृशं विद्युत्सदृशवाससम् ।
स्वारूढं स्वर्णपत्राढ्यं शिखिनं काश्यपं खगम् ॥ ४॥
दृष्त्वा दैत्यविनाशाय रणे स्वस्थमवस्थितम् ।
दानवो विष्णुमक्षोभ्यं बभाषे क्षुब्धमानसः ॥ ५॥
अयं स रिपुरस्माकं पूर्वेषां दानवर्षिणाम् ।
अर्णवावासिनश्चैव मधोर्वै कैटभस्य च ॥ ६॥
अयं स विग्रहोऽस्माकमशाम्यः किल कथ्यते ।
येन नः संयुगेष्वाद्या बहवो दानवा हताः ॥ ७॥
अयं स निर्घृणो युद्धेऽस्त्री बालनिरपत्रपः ।
येन दानवनारीणां सीमन्तोद्धरणं कृतम् ॥ ८॥
अयं स विष्णुर्देवानां वैकुण्ठश्च दिवौकसाम् ।
अनन्तो भोगिनामप्सु स्वयंभूश्च स्वयम्भुवः ॥ ९॥
अयं स नाथो देवानामस्माकं विप्रिये स्थितः ।
अस्य क्रोधेन महता हिरण्यकशिपुर्हतः ॥ १०॥
अस्यच्छायां समासाद्य देवा मखमुखे स्थिताः ।
आज्यं महर्षिभिर्दत्तमश्नुवन्ति त्रिधा हुतम् ॥ ११॥
अयं स निधने हेतुः सर्वेषां देवविद्विषाम् ।
यस्य तेजःप्रविष्टानि कुलान्यस्माकमाहवे ॥ १२ ॥
अयं स किल युद्धेषु सुरार्थे त्यक्तजीवितः ।
सवितुस्तेजसा तुल्यं चक्रं क्षिपति शत्रुषु ॥ १३॥
अयं स कालो दैत्यानां कालभूते मयि स्थिते ।
अतिक्रान्तस्य कालस्य फलं प्राप्स्यति दुर्मतिः ॥ १४॥
दिष्ट्येदानीं समक्षं मे विष्णुरेष समागतः ।
अद्य मद्‌बाणनिष्पिष्टो मामेव प्रणमिष्यति ॥ १५॥
यास्याम्यपचितिं दिष्ट्या पूर्वेषामद्य संयुगे ।
इमं नारायणं हत्वा दानवानां भयावहम् ॥ १६॥
क्षिप्रमेव वधिष्यामि रणे नारायणाश्रितान् ।
जात्यन्तरगतोऽप्येष मृधे बाधति दानवान् ॥ १७॥
एषोऽनन्थः पुरा भूत्वा पद्मनाभ इति स्मॄतः ।
जघानैकार्णवे घोरे तावुभौ मधुकैटभौ ।
विनिवेश्य स्वके ऊरौ निहतौ दानवेश्वरौ ॥ १८॥
द्विधाभूतं वपुः कृत्वा सिंहार्धं नरसंस्थितम् ।
पितरं मे जघानैको हिरण्यकशिपुं पुरा ॥ १९॥
शुभं गर्भमधत्तेममदितिर्देवतारणिः ।
यज्ञकाले बलेर्यो वै कृत्वा वामनरूपताम् ।
त्रीँल्लोकानाजहारैकः क्रममाणस्त्रिभिः क्रमैः ॥ २०॥
भूयस्त्विदानीं समरे सम्प्राप्ते तारकामये ।
मया सह समागम्य सह देवैर्विनङ्‌क्ष्यति ॥ २१॥
स एवमुक्त्वा बहुधा क्षिपन्नारायणं रणे ।
वाग्भिरप्रतिरूपाभिर्युद्धमेवाभ्यरोचयत् ॥ २२॥
क्षिप्यमाणोऽसुरेन्द्रेण न चुकोप गदाधरः ।
क्षमाबलेन महता सस्मितं वाक्यमब्रवीत् ॥ २३॥
अल्पदर्पबलो दैत्य स्थितः क्रोधादसद्वदन् ।
हतस्त्वमात्मनो दोषैः क्षमां योऽतीत्य भाषसे ॥ २४ ॥
अधमस्त्वं मम मतो धिगेतत् तव वाग्बलम् ।
न तत्र पुरुषाः सन्ति यत्र गर्जन्ति योषितः ॥ २५॥
अहं त्वां दैत्य पश्यामि पूर्वेषां मार्गगामिनम् ।
प्रजापतिकृतं सेतुं को भित्त्वा स्वस्तिमान्भवेत् ॥ २६॥
अद्य त्वां नाशयिष्यामि देवव्यापारकारकम् ।
स्वेषु स्वेषु च स्थानेषु स्थापयिष्यामि देवताः ॥ २७॥
वैशंपायन उवाच
एवं ब्रुवति तद्वाक्यं मृधे श्रीवत्सधारिणि ।
जहास दानवः क्रोधाद्धस्तांश्चक्रे च सायुधान् ॥ २८॥
स बाहुशतमुद्यम्य सर्वास्त्रग्रहणं रणे ।
क्रोधाद् द्विगुणरक्ताक्षो विष्णुं वक्षस्यताडयत् ॥ २९॥
दानवाश्चापि समरे मयतारपुरोगमाः ।
उद्यतायुधनिस्त्रिंशा दृष्ट्‌वा विष्णुमथाद्रवन् ॥ ३०॥
स ताड्यमानोऽतिबलैर्दैत्यैः सर्वायुधोद्यतैः ।
न चचाल हरिर्युद्धेऽकम्प्यमान इवाचलः ॥ ३१॥
संसक्तश्च सुपर्णेन कालनेमी महासुरः ।
सर्वप्राणेन महतीं गदामुद्यम्य बाहुभिः ॥ ३२॥
मुमोच ज्वलितां घोरां संरब्धो गरुडोपरि ।
कर्मणा तेन दैत्यस्य विष्णुर्विस्मयमागतः ॥ ३३॥
यदा तस्य सुपर्णस्य पतिता मूर्ध्नि सा गदा ।
तदाऽऽगमत् पदा भूमिं पक्षी व्यथितविग्रहः ॥ ३४॥
सुपर्णं व्यथितं दृष्ट्‌वा क्षतं च वपुरात्मनः ।
क्रोधात् संरक्तनयनो वैकुण्ठश्चक्रमाददे ॥ ३५ ॥
व्यवर्धत च वेगेन सुपर्णेन समं प्रभुः ।
भुजाश्चास्य व्यवर्धन्त व्याप्नुवन्तो दिशो दश ॥ ३६॥
स दिशः प्रदिशश्चैव खं च गां चैव पूरयन् ।
ववृधे स पुनर्लोकान् क्रान्तुकाम इवौजसा ॥ ३७॥
तं जयाय सुरेन्द्राणां वर्धमानं नभस्तले ।
ऋषयः सह गन्धर्वैस्तुष्टुवुर्मधुसूदनम् ॥ ३८॥
स द्यां किरीटेन लिखन् साभ्रमम्बरमम्बरैः । ॥
पद्‌भ्यामाक्रम्य वसुधां दिशः प्रच्छाद्य बाहुभिः ॥ ३९॥
सूर्यस्य रश्मितुल्याभं सहस्रारमरीक्षयम् ।
दीप्ताग्निसदृशं घोरं दर्शनीयं सुदर्शनम् ॥ ४०॥
सुवर्णनेमिपर्यन्तं वज्रनाभं भयावहम् ।
मेदोमज्जास्थिरुधिरैर्दिग्धं दानवसंभवैः ॥ ४१॥
अद्वितीयं प्रहारेषु क्षुरपर्यन्तमण्डलम् ।
स्रग्दाममालविततं कामगं कामरूपिणम् ॥ ४२॥
स्वयं स्वयंभुवा सृष्टं भयदं सर्वविद्विषाम् ।
महर्षिरोषैराविष्टं नित्यमाहवदर्पितम् ॥ ४३॥
क्षेपणाद् यस्य मुह्यन्ति लोकाः सस्थाणुजङ्‌गमाः ।
क्रव्यादानि च भूतानि तृप्तिं यान्ति महाहवे ॥ ४४॥
तमप्रतिमकर्माणं समानं सूर्यवर्चसा ।
चक्रमुद्यम्य समरे क्रोधदीप्तो गदाधरः ॥ ४५ ॥
सम्मुष्णन्दानवं तेजः समरे स्वेन तेजसा ।
चिच्छेद बाहुं चक्रेण श्रीधरः कालनेमिनः ॥ ४६ ॥
तच्च वक्त्रशतं घोरं साग्निचूर्णाट्टहासिनम् ।
तस्य दैत्यस्य चक्रेण प्रममाथ बलाद्धरिः ॥ ४७॥
स च्छिन्नबाहुर्विशिरा न प्राकम्पत दानवः ।
कबन्धोऽवस्थितः संख्ये विशाख इव पादपः ॥ ४८॥
तं वितत्य महापक्षौ वायोः कृत्वा समं जवम् ।
उरसा पातयामास गरुडः कालनेमिनम् ॥ ४९॥
स तस्य देहो विमुखो विशाखः खात्परिभ्रमन् ।
निपपात दिवं त्यक्त्वा शोभयन् धरणीतलम् ॥ ५०॥
तस्मिन्निपतिते दैत्ये देवाः सर्षिगणास्तदा ।
साधुसाध्विति वैकुण्ठं समेताः प्रत्यपूजयन् ॥ ५१॥
अपरे ये तु दैत्या वै युद्धे दुष्टपराक्रमाः ।
ते सर्वे बाहुभिर्व्याप्ता न शेकुश्चलितुं रणे ॥ ५२॥
कांश्चित्केशेषु जग्राह कांश्चित्कण्ठेऽभ्यपीडयत् ।
पाटयत्कस्यचिद् वक्त्रं मध्ये कांश्चिदथाग्रहीत् ॥ ५३॥
ते गदाचक्रनिर्दग्धा गतसत्त्वा गतासवः ।
गगनाद्‌ भ्रष्टसर्वाङ्‌गा निपेतुर्धरणीतले ॥ ५४॥
तेषु सर्वेषु दैत्येषु हतेषु पुरुषोत्तमः ।
तस्थौ शक्रप्रियं कृत्वा कृतकर्मा गदाधरः ॥ ५५ ॥
तस्मिन्विमर्दे निर्वृत्ते संग्रामे तारकामये ।
तं देशमाजगामाशु ब्रह्मा लोकपितामहः ॥ ५६॥
सर्वैर्ब्रह्मर्भिः सार्धं गन्धर्वैः साप्सरोगणैः ।
देवदेवो हरिं देवं पूजयन् वाक्यमब्रवीत् ॥ ५७॥
ब्रह्मोवाच
कृतं देव महत्कर्म सुराणां शल्यमुद्धृतम् ।
वधेनानेन दैत्यानां वयं हि परितोषिताः ॥ ५८॥
योऽयं हतस्त्वया विष्णो कालनेमी महासुरः ।
त्वमेकोऽस्य मृधे हन्ता नान्यः कश्चन विद्यते ॥ ५९॥
एष देवान् परिभवँल्लोकाश्च सचराचरान् ।
ऋषीणां कदनं कृत्वा मामपि प्रतिगर्जति ॥ ६०॥
तदनेन तवोग्रेण परितुष्टोऽस्मि कर्मणा ।
यदयं कालतुल्याभः कालनेमी निपातितः ॥ ६१ ॥
तदागच्छस्व भद्रं ते गच्छाम दिवमुत्तमम् ।
ब्रह्मर्षयस्त्वां तत्रस्थाः प्रतीक्षन्ते सदोगताः ॥ ६२॥
अहं महर्षयश्चैव तत्र त्वां वदतां वर ।
विधिवच्चार्चयिष्यामो गीर्भिर्दिव्याभिरच्युत ॥ ६३॥
किं चाहं तव दास्यामि वरं वरभृतां वर ।
सुरेष्वपि सदैत्येषु वराणां वरदो भवान् ॥ ६४॥
निर्यातयैतत् त्रैलोक्यं स्फीतं निहतकण्टकम् ।
अस्मिन्नेव मृधे विष्णो शक्राय सुमहात्मने ॥ ६५ ॥
एवमुक्तो भगवता ब्रह्मणा हरिरव्ययः ।
देवाञ्छक्रमुखान् सर्वानुवाच शुभया गिरा ॥ ६६॥
विष्णुरुवाच
श्रूयतां त्रिदशाः सर्वे यावन्तोऽत्र समागताः ।
श्रवणावहितैर्देहैः पुरस्क्रित्य पुरन्दरम् ॥ ६७॥
अस्मिन्नः समरे सर्वे कालनेमिमुखा हताः ।
दानवा विक्रमोपेताः शक्रादपि महत्तराः ॥ ६८॥
तस्मिन् महति संक्रन्दे द्वावेव तु विनिस्सृतौ ।
वैरोचनश्च दैत्येन्द्रः स्वर्भानुश्च महाग्रहः ॥ ६९॥
तदिष्टां भजतां शक्रो दिशं वरुण एव च ।
याम्यां यमः पालयतामुत्तरां च धनाधिपः ॥ ७०॥
ऋक्षैः सह यथायोगं काले चरतु चन्द्रमाः ।
अब्दं चतुर्मुखं सूर्यो भजतामयनैः सह ॥ ७१॥
आज्यभागाः प्रवर्तन्तां सदस्यैरभिपूजिताः ।
हूयन्तामग्नयो विप्रैर्वेददृष्टेन कर्मणा ॥ ७२॥
देवाश्च बलिहोमेन स्वाध्यायेन महर्षयः ।
श्राद्धेन पितरश्चैव तृतिं यान्तु यथा पुरा ॥ ७३॥
वायुश्चरतु मार्गस्थस्त्रिधा दीप्यतु पावकः ।
त्रयो वर्णाश्च लोकांस्त्रीन् वर्धयन्त्वात्मजैर्गुणैः ॥ ७४॥
क्रतवः सम्प्रवर्तन्तां दीक्षणीयैर्द्विजातिभिः ।
दक्षिणाश्चोपवर्तन्तां यथार्हं सर्वसत्रिणाम् ॥ ७५॥
गाश्च सूर्यो रसान् सोमो वायुः प्राणांश्च प्राणिषु ।
तर्पयन्तः प्रवर्तन्तां शिवैः सौम्यैश्च कर्मभिः ॥ ७६॥
यथावदानुपूर्व्येण महेन्द्रसलिलोद्‌भवाः ।
त्रैलोक्यमातरः सर्वाः सागरं यान्तु निम्नगाः ॥ ७७॥
दैत्येभ्यस्त्यज्यतां भीश्च शान्तिं व्रजत देवताः ।
स्वस्ति वोऽस्तु गमिष्यामि ब्रह्मलोकं सनातनम् ॥ ७८॥
स्वगृहे सर्वलोके वा संग्रामे वा विशेषतः ।
विश्रम्भो वो न मन्तव्यो नित्यं क्षुद्रा हि दानवाः ॥ ७९॥
छिद्रेषु प्रहरन्त्येते न चैषां संस्थितिर्ध्रुवा ।
सौम्यानामृजुभावानां भवतां चार्जवे मतिः ॥ ८०॥
अहं तु दुष्टभावानां युष्मासु सुदुरात्मनाम् ।
असम्यग्वर्तमानानां मोहं दास्यामि देवताः ॥ ८१॥
यदा च सुदुराधर्षं दानवेभ्यो भयं भवेत् ।
तदा समुपगम्याशु विधास्ये वस्ततोऽभयम् ॥ ८२॥
वैशंपायन उवाच
एवमुक्त्वा सुरगणान् विष्णुः सत्यपराक्रमः ।
जगाम ब्रह्मणा सार्धं ब्रह्मलोकं महायशाः ॥ ८३॥
एतदाश्चर्यमभवत् संग्रामे तारकामये ।
दानवानां च विष्णोश्च यन्मां त्वं परिपृच्छसि ॥ ८४॥
इति श्रीमन्महाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
कालनेमिवधेऽष्टचत्वारिंशोऽध्यायः


कालनेमी व विष्णू यांचें युध्द -

वैशंपायन सांगतात--याप्रमाणे कालनेमीने सर्व त्रैलोक्य आपलेसे केलें तथापि त्या दानवांच्या विपरीत आचरणामुळे वेद, धर्म, क्षमा, सत्य व नारायणाचा आश्रय धरून रहाणारी देवी-लक्ष्मी-या पांच गोष्टी मात्र त्याला अनुकूल होतना. त्या जेव्हां हातीं येत ना तेव्हां तो दैत्येंद्र रागास चढून विष्णूचेंच स्थान हिरावून घेण्याच्या हेतूने थेट नारायणाजवळ येऊन ठेपला. तो हातीं शंख, चक्र, गदा घेऊन सुवर्णपंखानी युक्त व मस्तकावर तुरा धारण करणाऱ्या कश्यपपुत्र गरुडावर सुखांत बसलेला सजल मेघाप्रमाणे नील कान्तीचा व विद्युल्लतेप्रमाणें तेजस्वी पीतवस्त्र नेसलेला भगवान्‌ नारायण दानवाच्या नाशाकरितां हातांत गरगर गदा फिरवीत असतां त्याचे दृष्टीस पडला. तो कधींही क्षुब्ध न होणारा विष्णु धिमेपणे दैत्यनाशार्थ रणात उभा राहिलेला पाहून कालनेमी अतिक्षुब्ध होऊन म्हणाला, '' अरे, हाच आमचा पूर्वीच्या मोठमोठ्या दानवांचा व विशेषतः समद्रवासी मधु व कैटभ यांचा शत्रु. यानेच युद्धात जुने जुने बहुत दानव मारिले असून हा युद्धांत पडला असतां आम्हां दैत्य मंडळीकडून याची कंडू कधींही जिरत नाहीं, असा लौकिक आहे. हा अस्त्र घेऊन युद्धांत शिरला म्हणजे फारच निर्दयपणाने वागतो व हा निर्लज्ज तर इतका आहे कीं, त्याला लहान पोराचीच उपमा.

या निर्दयाने आम्हां दानवांच्या स्त्रियांचे केश कीहो उतरिले ! अदितीच्या पुत्रात याला विष्णु अशी संज्ञा आहे. एकंदर देवमंडळींत याला वैकुंठ असें म्हणतात. नागांमध्ये शेषही हाच आहे. ब्रह्मदेवाला स्वयंभू म्हणतात, पण त्याच्याही पूर्वींचा स्वयंभू हाच आहे. हा एकंदर देवांचा पालक असून आमच्या वाइटावर सदा उठलेला आहे. याच्या रागाच्या तडाक्यांत यानेच हिरण्यकशिपु मारला. याच्या आश्रयाच्या जोरावरच देवमंडळीला यज्ञांत अग्रस्थान मिळाले असून मोठमोठाल्या ऋषींनी अंग, प्रधान व प्रायश्चित्त अशा तिन्ही होमांत दिलेले तूप देवांना खावयास सापडते. देवांचे जेवढे म्हणून द्वेष्टे आहेत तेवढ्यांच्या मरणाला कारण हाच. युद्धामध्यें आम्हां दानवांची कुळेंच्या कुळे धारातीर्थी पडून याच्याच विराट तेजांत लीन झाली. देवांकरितां लढाईची वेळ आली म्हणजे हा आपल्या जिवाकडेही पाहात नाहीं; आणि तेजाने केवळ सूर्याप्रमाणे असें आपलें सुदर्शन चक्र सोडतो. आजपर्यंत हा दैत्यांचा म्हणजे काळच ठरून गेला होता. परंत, त्या दुष्ट्बुद्धीला म्हणावे कीं, आज मी तुझा काळाचाही काळ उभा राहिलो आहें. आतां तुझ्या मागील एकूण अपराधांचे उट्टे काढितो. योग फार चांगला आला कीं, असल्या या विष्णूची आज माझी प्रत्यक्षच गांठ पडली. आज म्हणावे, माझ्या बाणांच्या तडाक्यानें मऊ होऊन माझ्याच पाया पडशील. हा नारायण दानवांना एक मोठा बागुलबोवाच होऊन बसला आहे. अशाला आज मीं युद्धांत संपविला म्हणजे माझी पूर्वजमंडळी खरोखरच माझ्यावर फुले टाकितील. हें धेंड एकदा खालीं आणलें म्हणजे याच्या आश्रितांना तर मीं हां हां म्हणतां नाहींसे करीन. हा विष्णू मोठा लोचट आहे. हा जन्मोजन्मी राक्षसांना युद्धांत त्रास देतो. वास्तविक हा मूर्तिरहित. तथापि, पूर्वी जेव्हां एकार्णवमय सृष्टि झाली त्या वेळीं याने पद्मनाभरूप घेऊन त्या घोर समुद्रांत ते मधु व कैटभ नांवांचे प्रचंड दानव आपल्या मांडीवर उचलून ठार केले. पुढें अर्धसिंह व अर्धनर असें द्वित्तरूप घेऊन या एकट्यानेच माझा बाप हिरण्यकशिपु मारिला. देवतांची माता म्हणून गाजलेली जी अदिति तिच्या पोटीं हा शुभलक्षणी बाब्या जन्मास आला. बलीच्या यज्ञांत या बेट्याने खुजा पोराचे रूप घेऊन तीन पावले टाकून त्रिभुवन आटले. इतकें करूनही याचे संपलें नाहीं. आज हा तारकसंग्राम निघताच हा पुन्हा पुढें आलाच; पण येथें आतां माझ्याशी गांठ आहे. तेव्हां याच्या देवमंडळीसह याची मी चटणी उडवितो.

याप्रमाणे तोंडास येईल तसें अगडतगड व बेताल बोलून नारायणाची निर्भर्त्सना करून त्यानें आपल्याशी युद्धाला उठावे अशी तो इच्छा करूं लागला. तो श्रेष्ठ असुर इतकें टाकून बोलला तरी गदाधर कसा तो रागावला नाहीं. कारण, त्याचे अंगांत क्षमेचे अलौकिक बल होतें. तो केवळ हसून म्हणाला, "हे दैत्या, अरे तुझी शक्ति किती आणि तुझा दर्प किती, हें न पाहाता उगाच रागास चढून तू जर मर्यादा सोडून भलतेच अयोग्य बोलतोस तर तूं आपल्याच दोषांनी मेला आहेस; तुला निराळें मारायचे तें काय ? अरे, मी तुला तुच्छ समजतो. तू मोठा शिरा ताणून बोललास म्ह्णून कोण डरतो ? रांडा थोड्या का गरजतात ? त्यांतलाच तूं, अरे, अशा ठिकाणी मज सारखे पुरुष उभेही राहात नाहींत. हे दैत्या, थांब, तू काळजी करूं नको. तुला येथें मज समक्षच तुझ्या पूर्वीच्या वाडवडिलांच्या वाट्याला पाठवितो. अरे, मूळ सृष्टिकर्त्याने जी धर्ममर्यादा घालून दिली आहे, ती उल्लंघिल्यावर कुशल कोण राहील ? तूं आपली मर्यादा विसरून देवांचे अधिकार चालवू लागलास, त्या अर्थीं आज तुला नाहीसा करून देवता पूर्वींप्रमाणे मी आपआपल्या स्थानावर स्थापीत करीन."

वैशंपायन सांगतात : - श्रीवत्सलांच्छन धारण करणारा परमात्मा रणभूमीवर अशीं वाक्यें बोलला असतां त्या दानवाने त्याची थट्टा करून क्रोधाने आपले सास्त्र शतबाहु त्यावर उगारिले. हातीं नानाप्रकारचीं आयुधे घेऊन व क्रोधाने डोळे पहिल्यापेक्षा दुप्पट लाल करून त्यानें श्रीविष्णूच्या छातीवर ताडन केले. त्याचा घाव पडताच मय, तारप्रभूति जे इतर दानव होते तेही पट्टे, तरवारी, वगैरे हत्यारे उचलून विष्णूवरच धावून पडले. याप्रमाणें मोठमोठे बलाढ्य दैत्य सर्व प्रकारच्या आयुधांनीं श्रीविष्णूला ताडन करीत असताही तो रणात तिळभर न चळता एखाद्या पर्वताप्रमाणें अकंप राहिला. मग त्या महासुर कालनेमीने गरुडाशी गांठ घातली. त्यानें जीवाचे त्राण करून आपल्या सर्व बाहूंनी एक भली थोरली भयंकर जळती गदा उचलून गरुडाच्या कपाळावर घातली. दैत्याच्या या कृतीचें विष्णूला फारच नवल वाटलें. डोक्यांत गदा बसताच तो पक्षी घायाळ होऊन मट्टदिशी पायांवर भूतळीं पडला. त्या वेळीं श्रीगोपालविष्णूला त्या घोर रणात त्या दैत्यगणांनीं मातीची ढेकळे, शिळा, भाले, वज्रे, इत्यादि आयुधांनी मारण्याचा सपाटा चालविला. त्या वेळी श्रीविष्णूचे माथे फिरून त्याचे डोळ्यापुढें अंधेरी आली. तेव्हां देवांनी त्याची स्तुति आरंभिली. ती अशी - "हे महाबाहो, हे मधुकैटभनाशना आपण आपल्या फाळासारख्या नखांनी हिरण्यकशिपूची छाती फोडिली, याचे स्मरण ठेवा आणि उठा. आपला जयजयकार असो." इत्यादि प्रकारे, देवांनी स्तुति केल्यावर रणात श्रीविष्णू उठून उभा राहिला. इकडे तो पूर्वी मूर्च्छित झाला होता त्याच वेळी तो संपला असें मानून त्या दानवाने आपला शंख फुंकला, व त्यामागून इतर असुरही लहानु मोठे तीन प्रकारचे मृदंग वाजवून त्या तालावर नाचू लागले. एकंदरीत त्यानें तेथें एक मोठा उत्सवच मांडिला. विष्णू शुद्धीवर येतांच आपला गरुड घायाळ झाला व आपलें स्वतःचेही शरीर खराब झालें असें त्याचे दृष्टीस पडलें. त्याबरोबर क्रोधाने डोळे लाल करून त्यानें आपलें सुदर्शन चक्र सरसाविलें. मग त्याचा वाहक गरुड व स्वतः तो या दोघांसही फार चेव चढला, व श्रीविष्णूचे बाहू इतके वाढले कीं, त्यांच्या योगाने दाही दिशा व्यापून गेल्या; आणि केवळ आपल्या तेजाने चतुर्दश लोकांना आक्रांत करण्याचा हेतु मनांत धरून तो परमात्मा असा बेसुमार वाढला कीं, त्यानें धरणी आकाश व दशदिशाही भरून टाकिल्या. याप्रमाणे देवांना जय मिळवून देण्याच्या हेतूने परमात्मा असा वाढलेला पाहून आकाशांत ऋषिगणांनी गंधर्वासह त्या मधुसूदनाचे स्तोत्र गाइले. परमात्म्याचें ते विराट स्वरूप इतकें विशाळ होतें कीं, त्याच्या किरीटानें आकाश खरडले जात होतें. त्याचें वस्त्र मेघ मंडळाला घासत होतें. त्याच्या बाहूंनी दश दिशा खवळल्या होत्या व पावलांनी धरणी आच्छादिली होती. असलें जगड्‌वाळ रूप घेऊन त्यानें आपल्या हातीं जें सुदर्शन चक्र घेतलें त्याला सहस्त्र अऱ्या असून त्याचें तेज सहस्रकिरण सूर्याप्रमाणे फांकले होतें. तें चक्र म्हणजे शत्रूंचा प्रत्यक्ष काळच होतें; व तें असें भयप्रद असूनही आकारांत इतकें सुबक होतें कीं, त्याला सुदर्शन (दिसण्यांत सुंदर) असें तर नांवच पडलें होतें. त्या चक्राला सोन्याची धांव बसविली असून त्याचा तुंबा हिऱ्याचा होता. आजपर्यंत मारिलेल्या असंख्य दैत्यांच्या मेद, मज्जा, अस्थि व रक्त यांनी लडबडून गेल्यामुळे तें भ्यासूर दिसत होतें. त्याच्या धांवेला सभोवार तीक्ष्ण सुऱ्या बसविल्या असल्यामु्ळे त्याचा तडाका बिनतोड बसे. सुऱ्या असून त्यावर फुलांच्या माळाही गुफंल्या होत्या; व तें एकवार हातून सोडिलें म्हणजे सोडणाऱ्याच्या मनांत असेल तेथें तेथें त्याच्या इच्छेप्रमाणे रूपे घेऊन जात असे. असलें तें अद्भूत चक्र स्वत: स्वयंभूने अंगींच घडविले होतें. त्याजकडे दृष्टि जातांच दुष्टांचा सहजच थरार होई. तशांत मोठ मोठ्या ऋषींनी आपल्या सर्व क्रोधाची त्यावर भारणी टाकिली होती. त्यामुळें त्याला नेहमी युद्ध करण्याविषयी उसळी आलेली असे. तें फेकताच स्थावरजंगम जीवांना मूर्च्छा येत असे. युद्धकालीं त्याच्या कृपेने मांस खाणारे पशुपक्षी फार संतुष्ट होत. असलें तें सूर्यसम तेजस्वी व अप्रतिम कर्म करणारे चक्र उगारून क्रोधाने लाल झालेला तो लक्ष्मीपति गदाधर आपल्या तेजाने दानवांचे सर्व तेज नाहीसे करून त्या चक्राने त्या कालनेमीचे सर्व बाहू तोडिता झाला. तेव्हां त्या राक्षसाची तीं विक्राळवाणी शंभर तोंडे तोफेप्रमाणें गर्जून हसू लागली. तेव्हां हरीने आपल्या सामर्थ्याने व सुदर्शनाचे साह्याने तीं तोंडेही कापून काढिलीं. याप्रमाणें, बाहु व मस्तकेंही तुटून पडली. तथापि, तो दानव डगला नाहीं. फांद्या-पल्लव कापून जाऊन एखादा थोटा वृक्ष ज्याप्रमाणें उभा असतो, त्याप्रमाणें तो मुंडकी तुटून उरलेल्या धडानेंच युद्धभूमीवर ठाम उभा होता. तेव्हां गरुडाने आपले मोठाले पंख पसरून व वायू प्रमाणें भरारी घेऊन आपल्या छातीच्या धडाक्याने त्या कालनेमीला आकाशातून खाली पाडिलें. बाहू व मुख छाटिलेला त्याचा तो देह जेव्हां आकाशांतून धरणीवर पडला, त्या वेळीं धरणीतलालाही एक प्रकारची शोभा आली.

या प्रकारे हें दैत्याचे धेंड जेव्हां धरणीवर आदळले तेव्हां ऋषिमंडळीसहित सर्व देव " फार नामी, फार नामी " असें म्हणत विष्णूपाशी जमून त्याची पूजा करूं लागले. कालनेमीची ही अवस्था झाल्यावर ज्यांचा मिळून त्या युद्धांत कांहीं पराक्रम दृष्टीस पडला होता त्यांची अवस्था अशी झाली कीं, ते परमात्म्याचे सर्वव्यापी बाहूंचे कचाट्यात सापडून त्यांची हालचालच बंद झाली. परमात्म्यानें त्यापैकीं कित्येकांच्या शेंड्या आवळिल्या; कित्येकांच्या नरड्या दाबिल्या; कित्येकांची मुस्कटें फोडिलीं; व कांहींना कमरेत गच्च आवळले. शिवाय परमात्म्याच्या गदाचक्रांच्या तेजाने भाजून गेल्याने कित्येक निःसत्त्व व निष्प्राण होऊन सर्वही अंगें लुली पडून गगनांतून धरणीतलावर कोसळले. याप्रमाणें सर्वही दैत्य मारिले गेले तेव्हां इंद्राला इष्ट ती गोष्ट आपल्या हातून पूर्ण झाली, हें पाहून तो गदाधर आपण कृतकार्य झालो असें जाणून स्वस्थ बसला. इतक्यांत तो तारकानिमित्त आरंभिलेला घनघोर संग्राम उरकला असें पाहून गंधर्व, अप्सरा व ब्रह्मर्षि यांसह पितामह ब्रह्मदेव त्या स्थळी येऊन त्या श्रीहरीची पूजा करून म्हणाला, "हे देवा, आपण आज या दैत्यांना मारून एक फारच मोठी कामगिरी उरकली.

देवांना आतां काटा म्हणून कसा तो ठेवला नाहीं. आपल्या या कृतीने खरेंच आम्हा सर्वांचा फार फार संतोष झाला आहे. हे विष्णो, तू जो हा प्रचंड कालनेमी असुर मारिलास हें कर्म तूंच एकटा करूं जाणस. तुजवाचून याला रणात पालथा घालणारा दुसरा कोणीच नाही. हा किती माजला होता म्हणून सांगू ? याने सचराचर लोक व सर्व देवगण हे पादाक्रांत करून बिचाऱ्या ऋषींचेही कांडात काढिले. इतकेंच नव्हे, तर मलाही गुरकावण्या दाखवू लागला, म्हणून मी म्हणतो कीं, तू हा कालतुल्य कालनेमी पाडण्याचे जें अत्युग्र कर्म केलेस त्यानें मी फार संतुष्ट झालो. तुझे बरे असो. आपण आतां चला स्वर्गास जाऊं. तेथें सर्व ब्रह्मर्षि सभा भरून तुझी वाट पाहात आहेत. हे वाचस्पते, तेथें मी व महर्षि मिळून तुझें यथाविधि पूजन करून दिव्य वाणीने तुझे स्तोत्र गाणार आहो. मी जर खरें पुसशील तर तुजवर इतका खू्ष झालो आहे कीं, तुला एखादा वर द्यावा असे माझे मनांत येतें; परंतु, यावद्दैत्यांना, त्याचप्रमाणे देवांनाही तूंच वर देणारा तेव्हां अशा वरदश्रेष्ठाला मीं काय वर द्यावा ? आतां मी इतकेंच सुचवितो कीं, आपण त्रैलोक्यातील सर्व कांटे काढून टाकिले आहेत, तेव्हां आतां हें त्रैलोक्याचे समृद्ध राज्य पुनरपि स्वहस्ते इंद्राच्या पदरांत घालावे."

या प्रकारे ब्रह्मदेवाने सुचविताच सनातन परमात्मा इंद्रप्रभृति देवास मंगल वाणीने म्हणाला, "हे देवहो, तुम्ही जितके कोणी आज येथें जमला असाल ते सर्व पुरंदराला पुढें करून आपली सर्वेद्रिंये माझें वाक्य ऐकण्याविषयीं सादर करून मी काय म्हणतो तें ध्यानांत घ्या. आपण जो हा नुकताच संग्राम संपविला त्यांत इंद्रालाही भारी असे कालनेमिप्रमुख सर्वही असुर नाहींसे केले. मात्र या रट्ट्यांतून दोघेच काय ते निसटले. एक देत्यश्रेष्ठ वैरोचन (बलि) व दुसरा महाग्रह स्वर्भानु. ( तथापि, त्यांची विशेष भीति नको ). आतां तुम्ही पूर्ववत् आपआपल्या दिशांच्या ठिकाणी अधिकारावर जावे. म्हणजे इंद्राने पूर्वेस, वरुणाने पश्चिमेस, यमाने दक्षिणेस व कुबेराने उत्तरेस. चंद्रमानें आपली सर्व नक्षत्रे घेऊन यथाकाल, यथायोग त्यांच्यांत संचार करावा. सूर्याने दक्षिणोत्तर अयने, संवत्सर व ऋतु यांची मालकी आपणाकडे घ्यावी. यज्ञांत सदस्यांनी पूजन वगैरे करून आज्यभाग सुरू करावेत. विप्रांनीं वेदांत सांगितलेल्या रीतीनें अग्नींना आव्हान करावे. लोकांनी पूर्ववत बलिहोम देऊन देवांचे, वेदाध्ययन करून महर्षींचे व श्राद्ध करून पितरांचे तर्पण करावे. वायुने आपल्या मार्गाने वहावे, व गार्हपत्य, आहवनीय व दक्षिण या तिन्ही रूपांनी अग्नीने प्रदीप्त व्हावें. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी आपआपल्या अंगच्या विशिष्ट गुणांनीं त्रैलोक्याची समृद्धि करावी. दीक्षा देण्यास योग्य असे जे ब्राह्मण असतील त्याजकडून क्रतु आरंभवावे; व सत्रांत जे कोणी गुंतले असतील त्यांस त्यांच्या त्यांच्या योगतेप्रमाणे दक्षिणा द्याव्या. सूर्याने जनदृष्टीला आनंदवावें, सोमाने ओषधींच्या ठिकाणी रसपरिपोष करावा व वायूने प्राण्यांचे ठिकाणी प्राणप्रवृत्ति करावी. एकंदर सर्वांनी सौम्य व कल्याणकारक असें आचरण करून लोकांचा संतोष करावा. पर्जन्याच्या जलापासून उत्पन्न होणाऱ्या त्रैलोक्याच्या अन्नदात्या ज्या लहानमोठ्या नद्या त्यांनीं पूर्वींप्रमाणेंच आपआपल्या मानाप्रमाणेच क्रमाने सागराकडे जावे. सर्व देवांनी आतां दैत्यांपासून कशी ती भीति उरली नाहीं असें समजून स्वस्थपणे असावें. असो; तुम्हां सर्वांचे कल्याण होवो; मी आतां माझ्या सनातन ब्रह्मलोकालाच जातों. जातां जातां एवढे सुचवून ठेवतो कीं, दानव किती झाले तरी मोठे हलकट व कपटी आहेत; तेव्हां एकांतांत, लोकांतांत, आणि संग्रामांत तर विशेषतःच त्यांचा विश्वास म्हणून कसा तो मानूच नये.

तुम्ही देवमंडळी पडला सरळ व सौम्य मनाचे. तुम्हाला सदा उजू तो रस्ता दिसत असतो. पण, या दैत्यांचा निश्चय म्हणून कांहीं नाहीं. ते सदा छिद्र शोधीत असतात आणि सापडताच टोला हाणतात. याकरिता सदा सावध असा. मीही आपल्याकडून तुमचे विषयीं जे सदा वैरबुध्दी बाळगितात असे जे दुष्ट दुराचारी असुर त्यांच्या बुद्धीला, हे देवहो, भूल घालून अधर्म हाच धर्म असें भासवीन. (अर्थात् या योगाने ते बहुधा सहजच नाश पावतील.) इतक्यांतूनही तुम्हांला अनावर असेंच भय दानवांपासून जर कधी उत्पन्न झाले तर मी स्वतः अंगीं येऊन तुम्हाला त्यापासून निर्भय करीन. ( काळजी करूं नका.)"

वैशंपायन सांगतात : - याप्रमाणें देवमंडळीला सांगून सत्यपराकमी व महायशस्वी विष्णु ब्रह्मदेवासह ब्रह्मलोकास गेले. हे जनमेजया, तू मला तारकासुराच्या युद्धांत दानव व विष्णू यामध्ये काय काय मौजा झाल्या म्हणून विचारले होतेस त्याचा हा वृत्तांत मीं तुला सांगितला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
कालनेमिवधोर्नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४८ ॥
अध्याय अठ्ठेचाळिसावा समाप्त

GO TOP