श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
षट्चत्वारिंशोऽध्यायः


दैत्यपराजयः

वैशंपायन उवाच
एवमस्त्विति संहृष्टः शक्रस्त्रिदशवर्द्धनः ।
संदिदेशाग्रतः सोमं युद्धाय शिशिरायुधम् ॥ १ ॥
शक्र उवाच
गच्छ सोम सहायत्वं कुरु पाशधरस्य वै ।
असुराणां विनाशाय जयाय च दिवौकसाम् ॥ २ ॥
त्वमप्रतिमवीर्यश्च ज्योतिषां चेश्वरेश्वरः ।
त्वन्मयं सर्वलोकानां रसं रसविदो विदुः ॥ ३ ॥
क्षयवृद्धी तवाव्यक्ते सागरस्येव मण्डले ।
परिवर्तस्यहोरात्रं कालं जगति योजयन् ॥ ४ ॥
लोकच्छायामयं लक्ष्म तवाङ्‌के शशसंज्ञितम् ।
न विदुः सोमदेवापि ये च नक्षत्रयोगिनः ॥ ५ ॥
त्वमादित्यपथादूर्ध्वं ज्योतिषां चोपरि स्थितः ।
तमश्चोत्सार्य वपुषा भासयस्यखिलं जगत् ॥ ६ ॥
श्वेतभानुर्हिमतनुर्ज्योतिषामधिपः शशी ।
अब्दकृत् कालयोगात्मा ईज्यो यज्ञरसोऽव्ययः ॥ ७ ॥
ओषधीशः क्रियायोनिरम्भोयोनिरनुष्णभाक् ।
शीतांशुरमृताधारश्चपलः श्वेतवाहनः ॥ ८ ॥
त्वं कान्तिः कान्तवपुषां त्वं सोमः सोमवृत्तिनाम् ।
सौम्यस्त्वं सर्वभूतानां तिमिरघ्नस्त्वमृक्षराट् ॥ ९ ॥
तद्‌गच्छ त्वं सहानेन वरुणेन वरूथिना ।
शमयस्वासुरीं मायां यया दह्याम संगरे ॥ १० ॥
सोम उवाच
यन्मां वदसि युद्धार्थे देवराज जगत्पते ।
एष वर्षामि शिशिरं दैत्यमायापकर्षणम् ॥ ११ ॥
एतान्मच्छीतनिर्दग्धान् पश्य त्वं हिमवेष्टितान् ।
विमायान्विमदांश्चैव दानवांस्त्वं महामृधे ॥ १२ ॥
वैशंपायन उवाच
ततो हिमकरोत्सृष्टाः सबाष्पा हिमवृष्टयः ।
वेष्टयन्ति स्म तान् घोरान् दैत्यान् मेघगणा इव ॥ १३ ॥
तौ पाशशुक्लांशुधरौ वरुणेन्दू महारणे ।
जघ्नतुर्हिमपातैश्च पातघातैश्च दानवान् ॥ १४ ॥
द्वावम्बुनाथौ समरे तौ पाशहिमयोधिनौ ।
मृधे चेरतुरम्भोभिः क्षुब्धाविव महार्णवौ ॥ १५ ॥
ताभ्यामाप्लावितं सैन्यं तद्दानवमदृश्यत ।
जगत् संवर्तकाम्भोधैः प्रवृष्टैरिव संवृतम् ॥ १६ ॥
तावुद्यतांशुपाशौ द्वौ शशाङ्‌कवरुणौ रणे ।
शमयामासतुर्मायां देवौ दैतेयनिर्मिताम् ॥ १७ ॥
शीतांशुजलनिर्दग्धाः पाशैश्च प्रसिता रणे ।
न शेकुश्चलितुं दैत्या विशिरस्का इवाद्रयः॥ १८ ॥
शीतांशुनिहतास्ते तु पेतुर्दैत्या हिमार्दिताः ।
हिमप्रावृतसर्वाङ्‌गा निरूष्माण इवाग्नयः ॥ १९ ॥
तेषां तु दिवि दैत्यानां विपरीतप्रभाणि च ।
विमानानि विचित्राणि निपतन्त्युत्पतन्ति च ॥ २० ॥
तान् पाशहस्तग्रथिताञ्च्छादितान् हिमरश्मिना ।
मयो ददर्श मायावी दानवान्दिवि दानवः ॥ २१ ॥
स शिलाजालविततां गण्डशैलाट्टहासिनीम् ।
पादपोत्कटकूटाग्रां कन्दराकीर्णकाननाम् ॥ २२ ॥
सिंहव्याघ्रगजाकीर्णां नदन्तीमिव यूथपैः ।
ईहामृगगणाकीर्णां पवनाघूर्णितद्रुमाम् ॥ २३ ॥
निर्मितां स्वेन पुत्रेण क्रौञ्चेन दिवि कामगाम् ।
प्रसृतां पार्वतीं मायां ससृजे दानवोत्तमः ॥ २४ ॥
साश्मशब्दैः शिलावर्षैः संपतद्‌भिश्च पादपैः ।
निजघ्ने देवसङ्घांस्तान् दानवांश्चाप्यजीवयत् ॥ २५ ॥
नैशाकरी वारुणी च मायेन्तर्दधतस्ततः ।
अश्मभिश्चायसघनैः किर्णा देवगणा रणे ॥ २६ ॥
साश्मसङ्‌घातविषमा द्रुमपर्वतसङ्‌कटा ।
अभवद्घोरसञ्चारा पृथिवी पर्वतैरिव ॥ २७ ॥
नानाहतोऽश्मभिः कश्चिच्छिलाभिश्चाप्यताडितः ।
नानिरुद्धो द्रुमगणैर्देवोऽदृश्यत संयुगे ॥ २८ ॥
तदपभ्रष्टधनुषं भग्नप्रहरणाविलम् ।
निष्प्रयत्नं सुरानीकं वर्जयित्वा गदाधरम् ॥ २९ ॥
स हि युद्धगतः श्रीमानीशो न स्म व्यकम्पत ।
सहिष्णुत्वाज्जगत्स्वामी न चुक्रोध गदाधरः ॥ ३० ॥
कालज्ञः कालमेघाभः समैक्षत् कालमाहवे ।
देवासुरविमर्दं स द्रष्टुकामो जनार्दनः ॥ ३१ ॥
ततो भगवताऽऽदिष्टौ रणे पावकमारुतौ ।
शमनार्थं प्रवृद्धाया मायाया मयसृष्टया ॥ ३२ ॥
ततः प्रवृद्धावन्योन्यं प्रवृद्धौ ज्वालवाहिनौ ।
चोदितौ विष्णुवाक्येन तां मायां व्यपकर्षताम् ॥ ३३ ॥
ताभ्यामुद्‌भ्रान्तवेगाभ्यां प्रवृद्धाभ्यां महाहवे ।
दग्धा सा पार्वती माया भस्मीभूता ननाश ह ॥ ३४ ॥
सोऽनिलोऽनलसंयुक्तः सोऽनलश्चानिलाकुलः ।
दैत्यसेनां ददहतुर्युगान्तेष्विव मूर्च्छितौ ॥ ३५ ॥
वायुः प्रधावितस्तत्र पश्चादग्निश्च मारुतात् ।
चेरतुर्दानवानीके क्रीडन्तावनलानिलौ ॥ ३६ ॥
भस्मावयवभूतेषु प्रपतत्सूत्पतत्सु च ।
दानवेषु विनष्टेषु कृतकर्मणि पावके ॥ ३७ ॥
वातस्कन्धापविद्धेषु विमानेषु समन्ततः ।
मायाबन्धे विनिर्वृत्ते स्तूयमाने गदाधरे ॥ ३८ ॥
निष्प्रयत्नेषु दैत्येषु त्रैलोक्ये मुक्तबन्धने ।
संप्रहृष्टेषु देवेषु साधु साध्विति सर्वशः ॥ ३९ ॥
जये दशशताक्षस्य मयस्य च पराजये ।
दिक्षु सर्वासु शुद्धासु प्रवृत्ते धर्मसंस्तरे ॥ ४० ॥
अपावृत्ते चन्द्रपथे अयनस्थे दिवाकरे ।
प्रकृतिस्थेषु लोकेषु नृषु चारित्रबन्धुषु ॥ ४१ ॥
अभिन्नबन्धने मृत्यौ हूयमाने हुताशने ।
यज्ञभागिषु देवेषु स्वर्गार्थं दर्शयत्सु च ॥ ४२ ॥
लोकपालेषु सर्वेषु दिक्षु संयानवर्तिषु ।
भावे तपसि शुद्धानामभावे दुष्टकर्मिणाम् ॥ ४३ ॥
देवपक्षे प्रमुदिते दैत्यपक्षे विषीदति ।
त्रिपादविग्रहे धर्मे अधर्मे पादविग्रहे ॥ ४४ ॥
अपावृते महाद्वारे वर्तमाने च सत्पथे ।
स्वधर्मस्थेषु वर्णेषु लोकेऽस्मिन्नाश्रमेषु च ॥ ४५ ॥
प्रजारक्षणयुक्तेषु भ्राजमानेषु राजसु ।
गीयमानासु गाथासु देवसंस्तवनादिषु ॥ ४६ ॥
प्रशान्तकलुषे लोके शान्ते तपसि दारुने ।
अग्निमारुतयोस्तस्मिन् वृत्ते संग्रामकर्मणि ।
तन्मया विमला लोकास्ताभ्यां जयकृतप्रियाः ॥ ४७ ॥
पूर्वदेवभयं श्रुत्वा मारुताग्निकृतं महत् ॥ ॥
कालनेमिरिति ख्यातो दानवः प्रत्यदृश्यत ॥ ४८ ॥
भास्कराकारमुकुटः शिञ्जिताभरणाङ्‌गदः ।
मन्दराचलसंकाशो महारजतसंवृतः ॥ ४९ ॥
शतप्रहरणोदग्रः शतबाहुः शताननः ।
शतशीर्षा स्थितः श्रीमाञ्चतशृङ्‌ग इवाचलः ॥ ५० ॥
कक्षे महति संवृद्धो हिमान्त इव पावकः ॥ ५१ ॥
धूम्रकेशो हरिच्छ्मश्रुर्दंष्ट्रालोष्टपुटाननः ।
त्रैलोक्यान्तरविस्तारो धारयन्विपुलं वपुः ॥ ५२ ॥
बाहुभिस्तुलयन् व्योम क्षिपन् पद्‌भ्यां महीधरान् ।
ईरयन्मुखनिःश्वासैर्वृष्टिमन्तो बलाहकाः ॥ ५३ ॥
तिर्यगायतरक्ताक्षं मन्दरोदग्रवर्चसम् ।
दिधक्षन्तमिवायान्तं सर्वान् देवगणान् मृधे ॥ ५४ ॥
तर्जयन्तं सुरगणांश्छादयन्तं दिशो दश ।
संवर्तकाले क्षुधितं दृप्तं मृत्युमिवोत्थितम् ॥ ५५ ॥
सुतलेनोच्छ्रितवता विपुलाङ्‌गुलिपर्वणा ।
माल्याभरणपूर्णेन किञ्चिच्चलितवर्मणा ॥ ५६ ॥
उच्छ्रितेनाग्रहस्तेन दक्षिणेन वपुष्मता ।
दानवान् देवनिहतानुत्तिष्ठध्वमिति ब्रुवन् ॥ ५७ ॥
तं कालनेमिं समरे द्विषतां कालसन्निभम् ।
वीक्षन्ति स्म सुराः सर्वे भयविक्लवमानसाः ॥ ५८ ॥
तं स्म वीक्षन्ति भूतानि क्रमन्तं कालनेमिनम् ।
त्रिविक्रमं विक्रमन्तं नारायणमिवापरम् ॥ ५९ ॥
सोच्छ्रयन् प्रथमं पादं मारुताघूर्णिताम्बरः ।
प्राक्रामदसुरो युद्धे त्रासयन् सर्वदेवताः ॥ ६० ॥
समयेनासुरेन्द्रेण परिष्वक्तः क्रमन् रणे ।
कलनेमिर्बभौ दैत्यः विष्णुनेव पुरन्दरः ॥ ६१ ॥
अथ विव्यथिरे देवाः सर्वे शक्रपुरोगमाः ।
दृष्ट्वा कालमिवायान्तं कालनेमिं भयावहम् ॥ ६२ ॥
इति श्रीमन्महाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
कालनेमिप्रक्रमणे षड्चत्वारिंशोऽध्यायः


देवांची सरशी -

वैशंपायन सांगतात - वरुणाची ही शिफारस ऐकून देवांचा उत्कर्ष चिंतणार्‍या इंद्राला फार आनंद झाला आणि "ठीक आहे" असें वरुणाला आश्वासन देऊन अगोदर हिमायुध जो सोम त्याला युद्धास जाण्याविषयी त्यानें आज्ञा केली. इंद्र म्हणाला, 'हे सोमा, तू जा; आणि दैत्यांचा विनाश करून देवांचा विजय करण्याचे कामी या पाशधर वरुणाला साहाय्य कर. तुझे सामर्थ्य बिनतोड आहे, तू आकाशस्थ ज्योतींत श्रेष्ठांत श्रेष्ठ आहेस. जे कोणी रसवेत्ते आहेत ते लोकांतील सर्व रस त्वद्रूपच आहेत असें जाणतात. तुझ्या मंडलांत ज्याप्रमाणें क्षयवृद्धिं दिसून येईल त्याच धोरणाने सागरांत पाण्याची भरतीओहोटी चालते ( इतका तुझा जलावर अंमल आहे). जगताला कालाची सोय लावून देऊन तू त्यांतील अहोरात्राचे चक्र फिरवितोस. हे सोमा, तुझ्या अंगावर जें हें शश-संज्ञक चिन्ह तूं धारण करितोस तें चिन्ह म्हणजे पृथ्वीची अंतराळी तुजवर पडलेली छायाच होय. परंतु ही गोष्ट नक्षत्रांचे ज्यांस ज्ञान आहे असे देवही जाणत नाहींत. तू सूर्यमार्गाच्या वर असून इतर सर्व ज्योंतीच्याही शिरोभागी आहेस. तू आपल्या तेजाने तम दूर घालवून सर्व जगताला प्रकाशित करितोस. तुझे किरण शुभ्र असून तुझें शरीर हिममय आहे. तूं ज्योतींचा पालक असून तुला शशि अशी संज्ञा आहे. तूंच मेघांचा कर्ता असून कालाचा प्राणही तूंच आहेस. तूं यज्ञांत पूज्य असून यज्ञांत लागणारा सोमरसही प्रवाहरूपाने तूच आहेस. तू ओषधींचा स्वामी असून क्रियांचे उत्पत्तिस्थान तूच आहेस. तुझी उत्पत्ति जलापासून असून तुझ्या ठिकाणी उष्णता कशी ती नसल्यामळें तुला शीतांशु असें म्हणतात. तूं अमृताचा आधार आहेस. तूं मोठा चंचल असून तुझें वाहन शुभ्र आहे. लोकांत जे कोणी दिसण्यांत कांतिमान किंवा सुंदर आहेत त्या सर्वांची कान्ति तूंच आहेस; व सोमरसावर निर्वाह करणाऱ्या सोमदेवांचा सोम तूंच आहेस. सर्व भूतमात्रांत तुझ्या इतकें शांत तेज कोणाचेच नाही. तू नक्षत्रांचा अधिपति असून अंधकाराचा शत्रू तूच आहेस. याकरिता हा वरुण सैन्यासह जात आहे त्याबरोबर तू युद्धास जा; आणि ज्या आसुरी मायेच्या योगाने आपण युद्धांत भाजून निघतो आहो ती माया थंड करून टाक."

सोम म्हणाला, "हे जगत्पते, हे देवेंद्रा, ज्या अर्थी मला आपण युद्धार्थ आज्ञा करितां त्या अर्थीं मी असा कांहीं थंडीचा तडाका पाडितों कीं, त्या योगाने त्या दैत्यांची अग्निमय माया नाहीशीच होईल. तुम्ही आता गंमतच पहा कीं, युद्धभूमीवर हे सर्वही दानव बर्फात गुरफटले जाऊन माझ्या अतिशय शीतलत्वाने पोळून निघतील व असें झालें म्हणजे त्याची मायाही लटकी पडेल व धुंदीही उतरेल."

वैशंपायन सांगतातः- सोमाचे असें बोलणे होतांच त्याच्या प्रेरणेने दैत्यांच्या भोंवतीं बाष्पासह हिमाची वृष्टि इतकी दाट झाली कीं, तिने ते दैत्य मेघगणांत सापडल्याप्रमाणें गुरफटून गेले. मग त्या महारणांत तो पाशधर वरुण व शुभ्रांशुधर चंद्र हे अनुक्रमें पाशघात व हिमपात यांच्या योगाने दानवांचा संहार करीत चालले. पाशधर वरुण व जलधर चंद्र हे दोघेही जलाधिपच. हे खवळेलेल्या महासागराप्रमाणे जलवर्षाव करीत युद्धभूमीवर संचार करूं लागले. त्या दोघांनी तें दैत्यसैन्य पाण्याच्या पुरात बुडविले असतां तें युगांतींच्या मेघांनी केलेल्या जलप्रलयांत सापडले कीं काय असें दिसत होतें. ते दोघे देव म्हणजे चंद्र व वरुण हे अनुक्रमे आपले पाश व किरण यांच्या योगाने दैत्यांनी निर्माण केलेल्या मायेचा पाडाव करिते झाले चंद्राच्या शीतजलानें पोळल्यामुळे ( गारठून गेल्यामुळें) व वरुणाच्या पाशाने जखडल्यामुळें ते दैत्य शिखर उडलेल्या पर्वताप्रमाणें त्या रणात अचळ बसले. शीत किरणांच्या तडाक्यामुळें थंडीने मेहरून जाऊन आणि सर्वांग हिमाने व्याप्त होऊन ते विझलेल्या निखाऱ्यांप्रमाणें निरुपयोगी पडून राहिले. त्या वेळी दैत्यांची निस्तेज झालेलीं विचित्र विमाने आकाशांत खालींवर खालींवर करूं लागली. इतक्यांत मायावी दानव जो मयासुर त्यानें आपली दैत्यमंडळी पाशधरानें जखडली असून चंद्राने हिमांत बुडवून टाकिली आहे असें पाहिले; आणि त्या दानवश्रेष्ठ मयाने आपला पुत्र जो क्रौंच त्यानें निर्माण केलेली जी अति विस्तृत पर्वतरूपिणी माया ती देवमंडळीवर सोडली. ही माया पर्वतमय असल्यामुळें तिचे ठिकाणी सर्वत्र शिलासमूह असून गंड शीलांचे योगाने ती हसतेच आहे की काय असें भासत होतें. तिचीं शिखरे वृक्षानी भरून गेली होती आणि तिजवरील गुहांत झाडी वाढली होती. त्याचप्रमाणे तीत सिंह, व्याघ्र व हत्ती, यांची गर्दी होऊन राहिली होती; व सिंहव्याघ्रगजादिकांच्या कळपांचे नायकांमुळे ती मोठी प्रसन्न दिसत होती. शिकारीचे हरण तीत विपुल असून तिजवरील वृक्ष वायूने गदगद हालत होते. अशा त्या पर्वतरूपी मायेचा प्रयोग करिताच तिज मधून शिलांचा वर्षाव होऊन त्यापासून बारीक बारीक धोंडे देवमंडळीच्या अंगांवर तडातड बसू लागले. तसे मोठमोठे वृक्ष तुटून अंगावर कोसळू लागले. या प्रकारें त्या मयानें त्या देवमंडळीला सडकून काढून आपली दावनमंडळी सजीव केली. त्या वेळीं या पार्वतीमायेपुढे पूर्वी चंद्र व वरुण यांनी निर्माण केलेल्या दोन्हीही माया लोप पावल्या. लोखंडासारख्या कठीण अशा दगडींचा त्या रणात देवमंडळीवर वर्षाव सुरू राहिल्याने पृथ्वी तिजवर सर्वभर पर्वत उभे राहिल्याप्रमाणें दगडांच्या राशींनी जाण्यायेण्यास बिकट व वृक्ष आणि पर्वत यांनी भरून गेलेली अशी दिसू लागली. मग त्या देवमंडळींत ज्याला दगडाचे तडाके बसले नाहींत किंवा ज्याच्या अंगावर एखादी शिळा कोसळली नाहीं, किंवा वृक्ष आडवा आल्याने जो अडला नाहीं, असा एकही देव शिल्लक राहिला नाहीं. अखेर एक गदा धारणकर्ता विष्णू खेरीज बाकीचे सर्वही देवसैन्य धनष्यें तुटून जाऊन व आयुधे मोडून पडून सर्वथा निष्प्रयत्न होऊन बसले. मात्र तो समर्थ श्रीपति गदाधारी श्रीविष्णू युद्धाच्या रगाड्यांत असताही लवमात्र भय पावला नाहीं; व त्या जगत्‌स्वामीची सहनशक्ति अलौकिक असल्यामुळे ( तो दैत्यांचे चेष्टेने) रागावलाही नाहीं. तो मेघश्याम-कान्ति जनार्दन याला प्रत्येक गोष्टींचे कालज्ञान असल्यामुळें, व देव व असूर यांची कुस्ती कशी काय होते हें पाहावयाचा हेतु असल्यामुळे तो आपल्या कर्तबगारीची योग्य वेळ येई तोपर्यंत थांबला होता.

आतां वेळ येताच ती मयासुराने सोडिलेली अतिदीर्घ पार्वती माया दूर करण्यासाठीं त्या भगवंताने अग्नि व वायु यास आज्ञा केली. भगवंताच्या शब्दाने प्रेरणा होतांच ते अग्नि व वायु परस्परसाहाय्याने अतिशय वाढून त्या पार्वती मायेला दूर सारते झाले. कारण, ते उभयही त्या रणामध्ये अतिशय वाढून शत्रूंना ज्या वेळीं भोवऱ्यात घालू लागले त्या वेळीं त्या पार्वती मायेची जळून राख झाली; आणि अशा रीतीनें ती माया नाश पावली. कुठे वायूचे साहाय्याला अग्नि आणि कुठे अग्नीच्या साहाय्याला वायु, याप्रमाणे प्रकार होऊन त्यांनीं प्रळयकालीं कोपलेल्या अग्नि-वायू-प्रमाणें ती दैत्यसेना केव्हांच भाजून टाकली. त्या दानव-सैन्यांत त्या अनलअनिलांच्या (अग्निवायूंच्या) जोडीने मोठी मौज मांडिली. कोठेही वायु गेला कीं, त्याच्या पाठोपाठ अग्नि धांवत जाई. कांहीं दानव होरपळून खालीं पडूं लागले, कांहीं वर उसळू लागले, व अखेरीस भस्म होऊन सर्व नाहींसे झाले; आणि याप्रमाणे अग्नीने आपली कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे वायूने सर्वभर वावटळ उठवून दैत्यांची विमाने उलथीं पालथी करून टाकलीं, व या प्रकारे त्या दानवी मायेचा अंमल सर्वथा दूर केला. त्या वेळीं गदाधर श्रीविष्णूची स्तुती होऊं लागली. जिकडून तिकडून "शाबास शाबास ! दैत्यांना लटके पाडून त्रैलोक्याला बंधांतून सोडून आपण आनंद दिलात त्या अर्थीं, हे विष्णो, आपली शाबास आहे, शाबास आहे," असा ध्वनी कानी येऊ लागला.

याप्रमाणे सहस्राक्ष इंद्राचा जय व मयासुराचा पराजय होतांच सर्व दिशा प्रसन्न झाल्या, धर्मकार्ये प्रसार पावू लागली, चंद्राचा मार्ग खुला झाला, सूर्यही क्रान्तिवृत्तावर आला, प्रजाजन आपआपल्या पूर्वस्थितीवर आले, व लोक सुरळीतपणे सदाचाराने वागू लागले, मृत्यू आपली मर्यादा उल्लंघीनासा झाला (अकालमृत्यु दूर गेला), अग्नीला आहुती मिळू लागली, देवांना यज्ञांत हविर्भाग मिळू लागून ते यजमानांना स्वर्गप्राप्तीची खूण दाखवू लागले; सर्वही दिक्पाल आपआपल्या दिशांचे ठिकाणी राहून निर्भयपणे लोकांचे पालन करूं लागले; तपोनिष्ठ शुद्धवृत्तीचे जे लोक होते त्यांचा उत्कर्ष होऊन दुष्टकर्मी लोकांचा नायनाट झाला. देवपक्ष आनंदीत होऊन दैत्यपक्ष खेद करीत खालीं बसला, धर्माला जोर येऊन तो तीन पायांवर चालू लागला व अधर्म लुला पडून एकच पायावर खरडत बसला, मोक्षा्चे महाद्वार खुले झा्ले, व नीतीचे मार्ग स्थापित होऊन जगांतील लोक आपआपले धर्माप्रमाणें वर्णाश्रमाचें पालन करूं लागले, राजेलोक मोठे तेजस्वी होऊन प्रजेचे यथान्याय रक्षण करूं लागले, देवादिकांची लोक स्तोत्रे गाऊं लागले, लोकातील पापप्रवृत्ति कमी होऊन दारुण अज्ञानरूपी अंधकार नष्ट झाला. याप्रमाण त्या अग्नि आणि वायूच्या युद्धाचा परिणाम लोकांना सुखकर झाला, त्यांच्या जयाच्या योगाने लोकांवरची संकटे दर झाली, व लोकही प्रेमाने त्या उभयतांचा जयजयकार वर्णू लागले.

इकडे दैत्यांना अग्निवायूपासून मोठे अरिष्ट प्राप्त झालेलें ऐकून त्यांच्या रक्षणार्थ सुप्रसिद्ध कालनेमी नांवाचा दानव रणभूमीवर प्रकट झाला. त्याच्या मस्तकावरील मुकुट सूर्याप्रमाणें देदीप्यमान होता, त्याच्या अंगावरील अलंकार व बाहुभूषणे शब्द करीत होतीं. तो मंदराचलाप्रमाणें धिप्पाड असून रुप्याने खचला होता. त्याला शंभर मस्तकें, शंभर तोंडे व शंभर बाहू असून शंभरही हातांत घेतलेली आयुधे घेऊन तो उभा राहिला होता. त्या वेळीं तो एखाद्या शंभर शिखरांच्या पर्वताप्रमाणे शोभत होता. तो ऊष्णकाली वनांत भडकत चाललेल्या अग्नीप्रमाणे जाज्वल्य दिसत होता; त्याचे डोईचे केश धुरकट रंगाचे असून त्याची दाढी हिरवट होती; व त्याच्या तोंडातील खालचा जबडा लांब लांब दांताडांनीं खचून गेला होता. त्याचें शरीर अति विशाळ असून त्रैलोक्यामधील अंतर भरून काढण्याइतके वाढण्याजोगे होतें. तो आकाशाची मंडपी हातावर सहज तोलून धरण्याइतका समर्थ होता; व मोठमोठाले पर्वत लाथेने उडवून देण्याइतकी त्याची अचाट शक्ति होती. पर्जन्यासकट मोठमोठाले मेघ तो सहज फुंकराने उडवून देत असे; त्याचे डोळे अतिदीर्घ, तिरळे आणि लालगुंज असे असत. त्याचें तेज केवळ इंद्राप्रमाणें होतें; तो रणभूमीवर आला तो देवांना धमकावीत आणि जाळू पाहातच आला. त्यानें दाही दिशा झाकून टाकिल्या. प्रलयकाली खाण्यासाठीं हापापलेल्या गुर्मीदार मुत्यूप्रमाणे तो भयंकर दिसत होता; त्या धिप्पाड राक्षसाने आपला पुष्पालंकार घातलेला व लांब सडक बोटांचा व ज्यांतील हातमोजा किंचित उचलला गेला आहे व ज्याचा तल अतिसुंदर आहे असा उजवा हात उगारून देवांनी मारून टाकिलेल्या दानवांना ''उठा, उठा'' म्हणून इषारा दिला. शत्रूंना केवळ काळासारखा अशा त्या कालनेमीला रणभूमीवर पाहाताच देवांची भयाने गाळणच उडाली. तो कालनेमी जेव्हां त्या समरांत लांबलांब ढेंगा टाकूं लागला तेव्हां वामनावतारीं तीन पावलांत भूमी आटणारा हा परमात्मा त्रिविक्रमच चालला आहे कीं काय असें वाटून लोक त्याच्याकडे साश्चर्य पाहू लागले. त्यानें आपलें पहिले पाऊल उचलिताच उसळणाऱ्या वाऱ्याने आकाश भरून गेलें, आणि सर्व देवतांना भयभीत करीत तो युद्धभूमीवर फिरू लागला.

मयासुराला बरोबर घेऊन तो कालनेमी रणात फिरत असतां विष्णुसहित चालणाऱ्या इंद्राचा भास झाला व कालाप्रमाणे भयंकर तो कालनेमी आपणावर चाल करून येतोसे पाहून इंद्रप्रभृति सर्वही देवगण भयाने विव्हल झाले.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
दैत्यपराजयः नाम षड्चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४६ ॥
अध्याय सेहेचाळिसावा समाप्त

GO TOP