श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
चतुस्त्रिंशोऽध्यायः


वृष्णिवंशवर्णनम्

वैशम्पायन उवाच
गान्धारी चैव माद्री च क्रोष्टोर्भार्ये बभूवतुः ।
गान्धारी जनयामास अनमित्रं महाबलम् ॥ १ ॥
माद्री युधाजितं पुत्रं ततोऽन्यं देवमीढुषम् ।
तेषां वंशस्त्रिधा भूतो वृष्णीनां कुलवर्धनः ॥ २ ॥
माद्र्याः पुत्रस्य जज्ञाते सुतौ वृष्ण्यन्धकावुभौ ।
जज्ञाते तनयौ वृष्णेः श्वफल्कश्चित्रकस्तथा ॥ ३ ॥
श्वफल्कस्तु महाराज धर्मात्मा यत्र वर्तते ।
नास्ति व्याधिभयं तत्र नावर्षभयमप्युत ॥ ४ ॥
कदाचित्काशिराजस्य विभोर्भरतसत्तम ।
त्रीणि वर्षाणि विषये नावर्षत्पाकशासनः ॥ ५ ॥
स तत्र वासयामास श्वफल्कं परमार्चितम् ।
श्वफल्कपरिवर्ते च ववर्ष हरिवाहनः ॥ ६ ॥
श्वफल्कः काशिराजस्य सुतां भार्यामविन्दत ।
गान्दिनीं नाम सा गां तु ददौ विप्रेषु नित्यशः ॥ ७ ॥
सा मातुरुदरस्था तु बहून्वर्षगणान् किल ।
निवसन्ती न वै जज्ञे गर्भस्थां तां पिताब्रवीत् ॥ ८ ॥
जायस्व शीघ्रं भद्रं ते किमर्थमिह तिष्ठसि ।
प्रोवाच चैनं गर्भस्था कन्या गां च दिने दिने ॥ ९ ॥
यदि दद्यां ततोऽद्याहं जाययिष्यामि तां पिता ।
तथेत्युवाच तं चास्याः पिता काममपूरयत् ॥ १० ॥
दाता यज्वा च धीरश्च श्रुतवानतिथिप्रियः ।
अक्रूरः सुषुवे तस्माच्छ्वफल्काद् भूरिदक्षिणः ॥ ११ ॥
उपासङ्गस्तथा मद्रुर्मृदुरश्चारिमेजयः ।
अविक्षिपस्तथोपेक्षः शत्रुघ्नोऽथारिमर्दनः ॥ १२ ॥
धर्मधृग् यतिधर्मा च गृध्रो भोजोऽन्धकस्तथा ।
आवाहप्रतिवाहौ च सुन्दरी च वराङ्गना ॥ १३ ॥
अक्रूरेणोग्रसेनायां सुगात्र्यां कुरुनन्दन ।
प्रसेनश्चोपदेवश्च जज्ञाते देववर्चसौ ॥ १४ ॥
चित्रकस्याभवन् पुत्राः पृथुर्विपृथुरेव च ।
अश्वग्रीवोऽश्वबाहुश्च सुपार्श्वकगवेषणौ ॥ १५ ॥
अरिष्टनेमिरश्वश्च सुधर्मा धर्मभृत्तथा । ॥
सुबाहुर्बहुबाहुश्च श्रविष्ठाश्रवणे स्त्रियौ ॥ १६ ॥
अश्मक्यां जनयामास शूरं वै देवमीढुषः ।
महिष्यां जज्ञिरे शूराद् भोज्यायां पुरुषा दश ॥ १७ ॥
वसुदेवो महाबाहुः पूर्वमानकदुन्दुभिः ।
जज्ञे यस्य प्रसूतस्य दुन्दुभ्यः प्रणदन् दिवि ॥ १८ ॥
आनकानां च संह्रादः सुमहानभवद् दिवि ।
पपात पुष्पवर्षं च शूरस्य भवने महत् ॥ १९ ॥
मनुष्यलोके कृत्स्नेऽपि रूपे नास्ति समो भुवि ।
यस्यासीत् पुरुषाग्र्यस्य कान्तिश्चन्द्रमसो यथा ॥ २० ॥
देवभागस्ततो जज्ञे तथा देवश्रवाः पुनः ।
अनाधृष्टिः कनवको वत्साअवानथ गृञ्जिमः ॥ २१ ॥
श्यामः शमीको गण्डूषः पञ्च चास्य वराङ्गनाः ।
पृथुकीर्तिः पृथा चैव श्रुतदेवा श्रुतश्रवाः ॥ २२ ॥
राजाधिदेवी च तथा पञ्चैता वीरमातरः ।
पृथां दुहितरं वव्रे कुन्तिस्तां कुरुनन्दन ॥ २३ ॥
शूरः पुज्याय वृद्धाय कुन्तिभोजाय तां ददौ ॥ ॥
तस्मात् कुन्तीति विख्याता कुन्तिभोजात्मजा पृथा ॥ २४ ॥
अन्त्यस्य श्रुतदेवायां जगृहुः सुषुवे सुतः ।
श्रुतश्रवायां चैद्यस्य शिशुपालो महाबलः ॥ २५ ॥
हिरण्यकशिपुर्योऽसौ दैत्यराजोऽभवत् पुरा ।
पृथुकीर्त्यां तु तनयः संजज्ञे वृद्धशर्मणः ॥ २६ ॥
करूषाधिपतिर्वीरो दन्तवक्त्रो महाबलः ।
पृथां दुहितरं चक्रे कुन्तिस्तां पाण्डुरावहत् ॥ २७ ॥
यस्यां स धर्मविद् राजा धर्माज्जज्ञे युधिष्ठिरः ।
भीमसेनस्तथा वातादिन्द्राच्चैव धनञ्जयः ॥ २८ ॥
लोकेऽप्रतिरथो वीरः शक्रतुलयपराक्रमः ।
अनमित्राच्छिनिर्जज्ञे कनिष्ठाद् वृष्णिनन्दनात् ॥ २९ ॥
शैनेयः सत्यकस्तस्माद् युयुधानश्च सात्यकिः ।
असङ्गो युयुधानस्य भूमिस्तस्याभवत् सुतः ॥ ३० ॥
भूमेर्युगधरः पुत्र इति वंशः समाप्यते ।
उद्धवो देवभागस्य महाभागः सुतोऽभवत् ।
पण्डितानां परं प्राहुर्देवश्रवसमुद्भवम् ॥ ३१ ॥
अश्मक्यां प्राप्तवान् पुत्रमनाधृष्टिर्यशस्विनम् ।
निवृत्तशत्रुं शत्रुघ्नं देवश्रवा व्यजायत ॥ ३२ ॥
देवश्रवाः प्रजातस्तु नैषादिर्यः प्रतिश्रुतः ।
एकलव्यो महाराज निषादैः परिवर्धितः ॥ ३३ ॥
वत्सावते त्वपुत्राय वसुदेवः प्रतापवान् ।
अद्भिर्ददौ सुतं वीरं शौरिः कौशिकमौरसम् ॥ ३४ ॥
गण्डूषाय त्वपुत्राय विष्वक्सेनो ददौ सुतान् ।
चारुदेष्णं सुचारुं च पञ्चालं कृतलक्षणम् ॥ ३५ ॥
असंग्रामेण यो वीरो नावर्तत कदाचन ।
रौक्मिणेयो महाबाहुः कनीयान् पुरुषर्षभ ॥ ३६ ॥
वायसानां सहस्राणि यं यान्तं पृष्ठतोऽन्वयुः ।
चारुमांसानि भोक्ष्यामश्चारुदेष्णहतानि तु ॥ ३७ ॥
तन्द्रिजस्तन्द्रिपालश्च सुतौ कनवकस्य तु ।
वीरश्चाश्वहनश्चैव वीरौ तावावगृञ्जिमौ ॥ ३८ ॥
श्यामपुत्रः शमीकस्तु शमीको राज्यमावहत् ।
जुगुप्समानौ भोजत्वाद् राजसूयमवाप सः ।
अजातशत्रुः शत्रूणां जज्ञे तस्य विनाशनः ॥ ३९ ॥
वसुदेवसुतान् वीरान् कीर्तयिष्यामि ताञ्छृणु ॥ ४० ॥
वृष्णेस्त्रिविधमेतत् तु बहुशाखं महौजसम् ।
धारयन् विपुलं वंशं नानर्थैरिह युज्यते ॥ ४१ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
वृष्णिवंशकीर्तनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः


वृष्णिवंशवर्णन -

वैशंपायन सांगतात - क्रोष्टूला दोन स्त्रिया होत्या. पैकीं पहिलीचे नांव गांधारी व दुसरीचें माद्री. यांतून गांधारीनें अनमित्र नामक महाबलाढय पुत्रास जन्म दिला. माद्रीनें एक युधाजित व दुसरा देवमीढुष अशा दोन पुत्रांस जन्म दिलें; या तिघांपासून वृष्णिकुलाची वृद्धि करणारा असा तिहेरी वंश झाला. माद्रीचा पुत्र जो युधाजित त्याला वृष्णि व अंधक असे दोन पुत्र झाले; पैकीं वृष्णीला पुढें श्वफल्क व चित्रक हे दोन पुत्र झाले. यांतील श्वफल्क हा मोठा धर्मात्मा होता; तो ज्या ठिकाणीं असेल तेथें कधींही व्याधीचें भय नसे किंवा अवर्षणही होत नसे. हे भरतश्रेष्ठा, एक वेळीं असें झालें कीं, काशीराजाच्या मुलखांत इंद्रानें वृष्टि केली नाहीं; त्या वेळीं त्यानें अत्यंत पूज्य अशा या श्वफल्काला नेऊन आपल्या राज्यांत बसविलें. तो येतांच इंद्रानें वृष्टि सुरू केली; मग त्या काशीराजानें (हें त्याचें कृत्य स्मरून) आपली गांदिनी नांवाची कन्या त्या श्वफल्काला भार्यार्थ दिली. या कन्येला गांदिनी हें नांव पडण्याचें कारण असें होतें कीं, ती दिनादिनाचे ठायीं म्हणजे दररोज ब्राह्मणाला गाय दान देत असे. ही पूर्वी गर्भस्थितींत आपल्या आईच्या पोटांत असतांना बहुत वर्षेपर्यंत बाहेरच येईना. तें पाहून तिचा पिता म्हणाला, "बाळे, तूं गर्भांतच थांबून कां राहिली आहेस, बाहेर ये; देव तुझें कल्याण करील." तें ऐकून कन्येने गर्भांतूनच उत्तर केलें, 'मी जन्मास आल्यापासून प्रतिदिनीं मजकडून जर तुम्हीं गोदान करवाल तर मी बाहेर येईन.' त्यावर तिच्या पित्यानें "ठीक आहे, करवीन" असें आश्वासन दिलें, तेव्हां ती जन्मास आली. जन्मास आल्यावर पित्यानेंही तिची इच्छा पूर्ण केली. असो; असल्या गांदिनीला श्वफल्कापासून जो पुत्र झाला त्याचें नांव अक्रूर. हा मोठा दानशूर, यज्ञकर्ता, शहाणा, सुशिक्षित, अतिथिप्रिय व ब्राह्मणांस बहुत दक्षणा देणारा असा होता. या अक्रूराशिवाय या जोडप्याला उपासंग, मद्गु, मृदुर, अरिमेजय, अरिक्षिप, उपेक्ष, शत्रुघ्न, अरिमर्दन, धर्मधृक, यतिधर्मा, गृध्रमोजा, अंधक, आबाहु आणि प्रतिबाहु, नांवांचे पुत्र होतें; व अतिशय रूपवती सुंदरी नांवाची एक कन्या होती.

हे कुरुनंदना, या अक्रूराला उग्रसेना नामक सुंदर स्त्रीचे ठिकाणीं देवतुल्य तेजस्वी असे प्रसेन व उपदेव नामक दोन पुत्र झाले. आतां श्वफल्काचा बंधु जो, चित्रक त्याची संतति - पृथु, विपृथु, अश्वग्रीव, अश्वबाहु, सुपार्श्वक, गवेषण, अरिष्टनेमी, अश्व, सुधर्मा, धर्मभृत, सुबाहु व बहुबाहु; हे पुत्र. यांशिवाय दोन कन्याही होत्या; त्यांची नांवें - श्रविष्ठा, व श्रवणा. क्रोष्टूचा तिसरा पुत्र जो देवमीढुष त्यानें आपल्या अश्मकी नामक स्त्रीचे ठायीं शूर नामक पुत्र उत्पन्न केला. या शूरानें आपली पट्टराणी जी भोज्या तिचे ठायीं दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांची नांवें - या दहांपैकीं महाबाहु जो (कृष्णपिता) वसुदेव तो प्रथम झाला. यालाच आनक आनकदुंदुभि असेंही म्हणत. असें नांव पडण्याचें कारण, असें झालें कीं, याचा जन्म होतांच स्वर्गामध्यें आनक म्हणजे पडघम व दुंदुभि म्हणजे नगारे यांचा अति मोठा ध्वनी माजून राहिला. याशिवाय वसुदेवपिता जो शूर त्याच्या मंदिरावर वसुदेवाच्या जन्मदिवशीं स्वर्गांतून अति मोठी पुष्पवृष्टिही झाली. हा वसुदेव सर्व पुरुषांत श्रेष्ठ होता. याच्या अंगकांतीला तर केवळ चंद्रिकेचीच उपमा; व एकंदर रूपानेंही याच्या वेळीं याच्या तोडीचा एकही पुरुष या सगळ्या भूलोकावर नव्हता. या वसुदेवामागून त्याचा बंधु देवभाग हा जन्मला. त्यानंतर पुन्हा देवश्रवा, अनाधृष्टि, कनबक, वत्सावान, अवगृंजिम, श्याम, शमीक व गंडूष इतके जन्मले. याशिवाय त्या शूर राजाला सुंदरशा पांच कन्या झाल्या. त्यांचीं नांवें - पृथुकीर्ति, पृथा, श्रुतदेवा, श्रुतश्रवा व पांचवी राजाधिदेवी. या पांचही जणी वीरांच्या माता झाल्या. हे कुरुनंदना, यांपैकीं पृथा नामक जी कन्या होती, तिला कुंति किंवा कुंतिभोज नामक जो राजा होता, त्यानें "ही आपली कन्या" असें म्हटल्यावरून, शूर राजानें आपल्या त्या पूज्य व वृद्ध मित्राला ती कन्या दत्तक दिली. त्या दिवसापासून पृथा ही कुंतिभोज राजाची कन्या होऊन स्वतःच कुंति या नांवानें प्रसिद्ध झाली. या पृथेची बहीण जी श्रुतदेवा तिला अंत्य नामक पुरुषापासून जगृहु नामक पुत्र झाला. तिसरी बहीण जी श्रुतश्रवा तिचे पोटीं चेदिपति जो दमघोष त्याजपासून महाबलाढय शिशुपाल हा जन्मास आला. हा शिशुपाल म्हणजे पूर्वी जो हिरण्यकशिपु नामें प्रसिद्ध दैत्यराज होऊन गेला तोच. चवथी बहीण पृथुकीर्ति, तिचे ठिकाणीं वृद्धशर्म्यापासून करूष देशाचा राजा महाबलाढय वीर दंतवक्र (वक्रदंत) तो जन्मला. स्वतः पृथा ही कुंति भोजाची कन्या झाल्यावर पांडुराजानें तिजशीं लग्न लाविलें. हिला मोठा धर्मवेत्ता जो राजा युधिष्ठिर, तो यमधर्मापासून झाला; नंतर भीमसेन हा वायुदेवापासून झाला; व धनंजय किंवा अर्जुन जो पराक्रमानें प्रतिइंद्र असून लोकांत मोठा गाजलेला वीर होता; तो इंद्रापासून झाला. वृष्णीचा कनिष्ठ पुत्र जो अनमित्र त्यापासून शिनि हा जन्मला. शिनीपासून सत्यक. सत्यकाला पुढें युयुधान आणि सात्यकि असे दोन पुत्र झाले. पैकीं युयुधानाला असंग व असंगाला भूमि हा पुत्र झाला. या भूमीपासून युगंधर हा पुत्र झाला, आणि तेथें हा वंश खुंटला. प्रसिद्ध जो भक्त उद्धव तो वसुदेवाचा बंधु जो देवभाग त्याचे पोटीं आला. हा उद्धव सर्व पंडितांत अतिश्रेष्ठ गणला असून याची देववत कीर्ति होती. अनाधृष्टि यानें अश्मकी नामक स्त्रीचें ठिकाणीं निवृत्तशत्रु नामक एक यशस्वी पुत्र निर्माण केला. त्याचप्रमाणें देवश्रवा यानें (स्वस्त्रीचे ठायीं) शत्रुघ्न नामक पुत्र उत्पन्न केला. या देवश्रव्यापासून पुढें एकलव्य हा झाला. हा निषादांनी वाढविला असल्यामुळें याला नैषादि हेंच नांव वहिवाटींत पडलें. वसुदेवाचा जो वत्सावान् म्हणून भाऊ सांगितला त्याचे पोटीं पुत्रसंतति नसल्यामुळें शूरपुत्र वसुदेव यानें आपला औरस पुत्र, जो मोठा वीर्यशाली असून ज्याला कौशिक असें म्हणत, त्याचें वत्सावताच्या हातावर उदक सोडिले. (दत्तक दिला). वसुदेवाचा दुसरा भाऊ जो गंडूष यालाही पुत्रसंतान नव्हतें. त्यामुळें श्रीकृष्णानें आपल्या पुत्रांपैकीं चारुदेष्ण, सुचारु, पंचाल व कृतलक्षण हे चौघे गंडूषाला दिले. यांपैकी चारुदेष्ण नांवाचा जो पुत्र सांगितला हा रुक्मिणीच्या पुत्रांतील धाकटा. हा मोठा शूर असून याची अशी ख्याति होती कीं, हा बाहेर पडला म्हणजे संग्राम केल्यावांचून परत यावयाचाच नाहीं; व हा आतां युद्धांत अनेक पुरुष मारून आपणास चारु म्हणजे सुंदर किंवा मिष्ट अशा मांसाची मेजवानी देईल, अशा विश्वासानें काक वगैरे हजारों पक्षी त्याचे मागें धांवत जात. यामुळें त्याला चारुदेष्णा असें नांव पडलें. कनबक नांवाचा जो आणखी एक वसुदेवाचा भाऊ होता, त्याला तंद्रिज आणि तंद्रिपाल असे दोन पुत्र झाले; व अवगृंजिमाला वीर व अश्वहनु असे दोन पुत्र झाले. हे दोघेही योद्धे होते. वसुदेवाचा भ्राता जो श्याम त्याचा जो धाकटा भाऊ शमीक त्यालाच श्यामानें आपला पुत्र म्हटलें होतें. ह्या शमीकाला आपण एकच प्रांताचे राजे असणें ही गोष्ट निंद्य वाटल्यामुळें त्यानें सर्व राजे पादाक्रांत करण्याचा राजसूय नामक यज्ञ आरंभिला. या दिग्विजयांत त्यानें अजातशत्रु जो पांडव युधिष्ठिर त्याचें साह्य संपादून सर्व शत्रूंचा नाश करून सार्वभौमत्व संपादिले.

हे राजा, आतां मी वसुदेवाच्या शूर पुत्रांचे वर्णन करितो तें ऐक. याप्रमाणें अत्यंत तेजस्वी व अनेक शाखांनी युक्त अशा या वृष्णीच्या विस्तीर्ण त्रिविध वंशाचें जो चित्तांत धारण करील, त्याला इहलोकीं अनर्थप्राप्ति होणार नाहीं.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
वृष्णिवंशकीर्तनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥ ३४ ॥
अध्याय चौतिसावा समाप्त

GO TOP