श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व पञ्चत्रिंशोऽध्यायः
कृष्णवंशवर्णनम्
वैशम्पायन उवाच
याः पत्न्यो वसुदेवस्य चतुर्दश वराङ्गनाः ।
पौरवी रोहिणी नाम इन्दिरा च तथा वरा ॥ १ ॥
वैशाखी च तथा भद्रा सुनाम्नी चैव पञ्चमी ।
सहदेवा शान्तिदेवा श्रीदेवा देवरक्षिता ॥ २ ॥
वृकदेव्युपदेवी च देवकी चैव सप्तमी ।
सुतनुर्बडवा चैव द्वे एते परिचारिके ॥ ३ ॥
पौरवी रोहिणी नाम बाह्लिकस्यात्मजाभवत् ।
ज्येष्ठा पत्नी महाराज दयिताऽऽनकदुन्दुभेः ॥ ४ ॥
लेभे ज्येष्ठं सुतं रामं सारणं शठमेव च ।
दुर्दमं दमनं श्वभ्रं पिण्डारकमुशीनरम् ॥ ५ ॥
चित्रां नाम कुमारीं च रोहिणी तनया दश ।
चित्रा सुभद्रेति पुनर्विख्याता कुरुनन्दन ॥ ६ ॥
वसुदेवाच्च देवक्यां जज्ञे शौरिर्महायशाः ।
रामाच्च निशठो जज्ञे रेवत्यां दयितः सुतः ॥ ७ ॥
सुभद्रायां रथी पार्थादभिमन्युरजायत ।
अक्रूरात्काशिकन्यायां सत्यकेतुरजायत ॥ ८ ॥
वसुदेवस्य भार्यासु महाभागासु सप्तसु ।
ये पुत्रा जज्ञिरे शूरा नामतस्तान्निबोध मे ॥ ९ ॥
भोजश्च विजयश्चैव शान्तिदेवासुतावुभौ ।
वृकदेवः सुनामायां गदश्चास्तां सुतावुभौ ॥ १० ॥
उपासङ्गवरं लेभे तनयं देवरक्षिता ।
अगावहं महात्मानं वृकदेवी व्यजायत ॥ ११ ॥
कन्या त्रिगर्तराजस्य भर्ता वै शैशिरायणः ।
जिज्ञासां पौरुषे चक्रे न चस्कन्देऽथ पौरुषम् ॥ १२ ॥
कृष्णायससमप्रख्यो वर्षे द्वादशमे तथा ।
मिथ्याभिशप्तो गार्ग्यस्तु मन्युनाभिसमीरितः ॥ १३ ॥
गोपकन्यामुपादाय मैथुनायोपचक्रमे ।
गोपाली त्वप्सरास्तस्य गोपस्त्रीवेषधारिणी ॥ १४ ॥
धारयामास गार्ग्यस्य गर्भं दुर्धरमच्युतम् ।
मानुष्यां गार्ग्यभार्यायां नियोगाच्छूलपाणिनः ॥ १५ ॥
स कालयवनो नाम जज्ञे राजा महाबलः ।
वृषपूर्वार्धकायास्तमवहन् वाजिनो रणे ॥ १६ ॥
अपुत्रस्य स राज्ञस्तु ववृधेऽन्तःपुरे शिशुः ।
यवनस्य महाराज स कालयवनोऽभवत् ॥ १७ ॥
स युद्धकामी नृपतिः पर्यपृच्छद् द्विजोत्तमान् ।
वॄष्णन्धककुलं तस्य नारदोऽकथयद् विभुः ॥ १८ ॥
अक्षौहिण्या तु सैन्यस्य मथुरामभ्ययात् तदा ।
दूतं सम्प्रेषयामास वृष्ण्यन्धकनिवेशनम् ॥ १९ ॥
ततो वॄष्ण्यन्धकाः कृष्णं पुरस्कृत्य महामतिम् ।
समेता मन्त्रयामासुर्यवनस्य भयात् तदा ॥ २० ॥
कृत्वा च निश्चयं सर्वे पलायनपरायणाः ।
विहाय मथुरां रम्यां मानयन्तः पिनाकिनम् ॥ २१ ॥
कुशस्थलीं द्वारवतीं निवेशयितुमीप्सवः ।
इति कृष्णस्य जन्मेदं यः शुचिर्नियतेन्द्रियः ।
पर्वसु श्रावयेद् विद्वाननृणः स सुखी भवेत् ॥ २२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
श्रीकृष्णजन्मानुकीर्तनं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः
कृष्णवंशवर्णन -
वैशंपायन सांगतात - रूपानें एकीहून एक अधिक सरस अशा चौदा सुंदरी वसुदेवाच्या पत्न्या होत्या - त्यांचीं नांवें क्रमशः ऐक. पहिली रोहिणी, दुसरी इंदिरा; ही रोहिणीपेक्षांही रूपानें सरस होती. तिसरी वैशाखी, चौथी भद्रा, पांचवी सुनाम्नी. या पांचही पुरुकुलांतील होत्या. सहावी सहदेवा, सातवी शांतिदेवा, आठवी श्रीदेवा, नववी देवरक्षिता, दहावी वृकदेवी, अकरावी उपदेवी व (आपल्या बहिणींत सातवी वसुदेवाच्या स्त्रियांत) बारावी देवकी. या शेवटल्या साती जणी देवकाच्या कन्या होत्या. यांशिवाय सुतनु व वडवा या दोन परिचारिका, म्हणजे केवळ भोगांगना होत्या. एकूण चौदा. यांपैकीं पुरुकुलोत्पन्न जी रोहिणी ती बाल्हिकाची मुलगी होती. ही वसुदेवाची ज्येष्ठ स्त्री असून मोठी लाडकी होती; हिजपासून त्याला पहिला पुत्र झाला तो राम. त्यापुढें सारण, शठ, दुर्दम, दमन, श्वभ्र, पिंडारक व उशीनर, हे पुत्र व चित्रा नामक एक कन्या. (अशीं नऊ अपत्यें होऊन त्यांतील) चित्रा ही कन्या उपजतांच मेल्यामुळें तिची वासना राहून ती पुन्हां त्याच आईच्या पोटीं जन्मास येऊन सुभद्रा हें नांव पावली. एकूण रोहिणीचीं दहा अपत्यें झालीं. देवकी नामक जी वसुदेवाची (बारावी) स्त्री सांगितली तिचे ठिकाणीं महातपस्वी श्रीकृष्ण जन्मला. रोहिणीपुत्र जो राम (बलराम) त्याला रेवती नामक स्त्रीपासून निशठ नांवाचा मोठा लाडका पुत्र झाला. अर्जुनापासून सुभद्रेला अभिमन्यु नांवाचा रथी पुत्र झाला; व काशिराजकन्येचे ठायीं अक्रूराला सत्यकेतु हा पुत्र झाला.
आतां वसुदेवाच्या सात बायकांपासून त्याला जे जे शूर पुत्र झाले, त्यांचीं नांवें मजपासून ऐक. त्याच्या शांतिदेवा नामक स्त्रीला भोज आणि विजय असे दोन पुत्र झाले. सुनामा स्त्रीला वृकदेव व गद हे पुत्र झाले. देवरक्षितेला उपासंगवर हा पुत्र झाला. त्रिगर्त राजाची कन्या वृकदेवी तिला अगावह नांवाचा महात्मा पुत्र झाला.
या वृकदेवीचा बाप जो त्रिगर्त राजा त्याचा पुरोहित शैशिरायण गार्ग्य हा पुरुष आहे कीं नपुंसक आहे, ही परीक्षा करण्याकरितां (सर्व यादव मंडळीसमक्ष) यादवांचा पुरोहित जो शाल त्यानें गर्गाचें शिस्न हातांत धरून पाहिलें. परंतु, गार्ग्य हा मोठा दृढव्रती असल्यामुळें त्याचें शिस्न मुळींच उत्थान पावलें नाहीं. अर्थात्, वीर्यस्खलनही झालें नाहीं, त्यावरून हा नपुंसक आहे असें शालानें पिकविलें व सर्व यादवमंडळी खो खो हंसूं लागली (परंतु, या हंशाचा परिणाम गार्ग्यावर फार वेगळा झाला). गार्ग्याची अशी नाहक विटंबना केल्यामुळें त्याला जो संताप चढला त्या संतापानें त्याचें रक्तही लोखंडासारखे काळें झालें, व मनही पोलादासारखे घट्ट होऊन तो सतत बारा वर्षें तसाच घुश्शांतच राहिला. बारा वर्षानंतर त्याचा कोप शांत झाला, तेव्हां (आपलें पौरुष सिद्ध करण्याकरितां) त्यानें एक गवळ्याची मुलगी जवळ घेऊन तिजशीं मैथुन आरंभिलें. या गोपकन्येला गोपाली असें म्हणत. खरें पाहातां ही गोपस्त्रीचा वेष घेतलेली अप्सरा होती. गार्ग्याचें वीर्य असें तसें नव्हतें; तें मोठें तीव्र व अमोघ. यामुळें त्या गोपालीला जो गर्भ राहिला तो राहिलाच. तो कांहीं ढळेना व तिला तर सोसण्यास फार जड जाऊं लागला. आतां या मनुष्यवेष धारण करणार्या स्त्रीचे ठायीं गार्ग्यानें हा जो गर्भ स्थापन केला र तो शंकराच्या आज्ञेवरून केला होता. हा गर्भ जन्मास येतांच त्या कालीं कोणी एक अपुत्रिक यवन राजा होता त्याच्या अंतःपुरांतील स्त्रियांनी त्याला वाढविलें. हा वर्णानें भुंग्यासारखा काळा असून यवनमंदिरांत वाढल्यामुळें याला कालयवन असें नांव पडलें. हा कालयवन पुढें फारच बलाढय निघाला. याला लढाईची मोठी खुमखुम असे. (व ती पुरी करण्यासाठीं तो नेहमीं योद्ध्यांच्या चौकशींत असे.) एकदां त्यानें ब्राह्मण मंडळींत योद्ध्यांची चौकशी चालविली असतां (कळलाव्या) नारदांनीं त्याला वृष्णि व अंधक या कुलांची नांवें सांगितली. ती वार्ता ऐकतांच कालयवन एक अक्षौहिणी सेना घेऊन मथुरेवर आला. नंतर त्यानें (रीतीप्रमाणें युद्धाचा निरोप घेऊन) वृष्णि व अंधक यांच्या वसतींत दूत पाठविला. ती युद्धवार्ता ऐकतांच वृष्णि व अंधक यांना त्या कालयवनाचें अतिशय भय पडून त्यासमयीं त्यांनीं आपल्या पक्षांतील मोठा अक्कलवाला जो श्रीकृष्ण त्याचा सल्ला घेतला. तेव्हां त्यानें (कालयवन हा श्रीशंकराच्या कृपेचें फळ आहें हें ध्यानीं घेऊन) शंकराचा मान राखण्यासाठीं आपण मथुरानगरी सोडून पळून जावें असा सल्ला दिला. त्यामुळें सर्वही यादव मथुरा सोडून कुशस्थली उर्फ द्वारका या ठिकाणीं वसती करण्याच्या हेतूनें मथुरेंतून एक निश्चय करून पळाले.
या अध्यायांत सांगितलेलें हें कृष्णाचें जन्म जो ज्ञाता मनुष्य पवित्र राहून व इंद्रिय दमन करून अमावास्या व पौर्णिमा इत्यादि पर्वांचे ठिकाणीं कोणाला ऐकवील तो अनृणी व सुखी होईल.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि श्रीकृष्णजन्मानुकीर्तनं नाम पञ्चत्रिंशोऽध्यायः ॥ ३५ ॥
अध्याय पस्तिसावा समाप्त
GO TOP
|