श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
षड्विंशोऽध्यायः


ऐलोत्पत्तिः

वैशम्पायन उवाच
बुधस्य तु महाराज विद्वान् पुत्रः पुरूरवाः ।
तेजस्वी दानशीलश्च यज्वा विपुलदक्षिणः ॥ १ ॥
ब्रह्मवादी पराक्रान्तः शत्रुभिर्युधि दुर्जयः ।
अहर्ता चाग्निहोत्रस्य यज्ञानां च महीपतिः ॥ २ ॥
सत्यवादी पुण्यमतिः काम्यः संवृतमैथुनः ।
अतीव त्रिषु लोकेषु यशसाप्रतिमः सदा ॥ ३ ॥
तं ब्रह्मवादिनं क्षान्तं धर्मज्ञं सत्यवादिनम् ।
उर्वशी वरयामास हित्वा मानं यशस्विनी ॥ ४ ॥
तया सहावसद् राजा वर्षाणि दश पञ्च च ।
पञ्च षट् सप्त चाष्टौ च दश चाष्टौ च भारत ॥ ५ ॥
वने चैत्ररथे रम्ये तथा मन्दाकिनीतटे ।
अलकायां विशालायां नन्दने च वनोत्तमे ॥ ६ ॥
उत्तरान् स कुरून् प्राप्य मनोरथफलद्रुमान् ।
गन्धमादनपादेषु मेरुपृष्ठे तथोत्तरे ॥ ७ ॥
एतेषु वनमुख्येषु सुरैराचरितेषु च ।
उर्वश्या सहितो राजा रेमे परमया मुदा ॥ ८ ॥
देशे पुण्यतमे चैव महर्षिभिरभिष्टुते ।
राज्यं च कारयामास प्रयागे पृथिवीपतिः ॥ ९ ॥
तस्य पुत्रा बभूवुस्ते सप्त देवसुतोपमाः ।
दिवि जाता महात्मान आयुर्धीमानमावसुः ॥ १० ॥
विश्वायुश्चैव धर्मात्मा श्रुतायुश्च तथापरः ।
दृढायुश्च वनायुश्च शतायुश्चोर्वशीसुताः ॥ ११ ॥
जनमेजय उवाच
गान्धर्वी चोर्वशी देवी राजानं मानुषं कथम् ।
देवानुत्सृज्य संप्राप्ता तन्नो ब्रूहि बहुश्रुत ॥ १२ ॥
वैशम्पायन उवाच
ब्रह्मशापाभिभूता सा मानुषं समपद्यत ।
ऐलं तु सा वरारोहा समयात्समुपस्थिता ॥ १३ ॥
आत्मनः शापमोक्षार्थं समयं सा चकार ह ।
अनग्नदर्शनं चैव सकामायां च मैथुनम् ॥ १४ ॥
द्वौ मेषौ शयनाभ्याशे सदा बद्धौ च तिष्ठतः ।
घृतमात्रो तथाऽऽहारः कालमेकं तु पार्थिव ॥ १५ ॥
यद्येष समयो राजन् यावत्कालं च ते दृढः ।
तावत्कालं तु वत्स्यामि त्वत्तः समय एष नः ॥ १६ ॥
तस्यास्तं समयं सर्वं स राजा समपालयत् ।
एवं सा वसते तत्र पुरूरवसि भामिनी ॥ १७ ॥
वर्षाण्येकोनषष्टिस्तु तत्सक्ता शापमोहिता ।
उर्वश्यां मानुषस्थायां गन्धर्वाश्चिन्तयान्विताः ॥ १८ ॥
गन्धर्वा ऊचुः
चिन्तयध्वं महाभागा यथा सा तु वराङ्गना ।
समागच्छेत् पुनर्देवानुर्वशी स्वर्गभूषणम् ॥ १९ ॥
ततो विश्वावसुर्नाम तत्राह वदतां वरः ।
मया तु समयस्ताभ्यां क्रियमाणः श्रुतः पुरा ॥ २० ॥
व्युत्क्रान्तसमयं सा वै राजानं त्यक्ष्यते यथा ।
तदहं वेद्म्यशेषेण यथा भेत्स्यत्यसौ नृपः ॥ २१ ॥
ससहायो गमिष्यामि युष्माकं कार्यसिद्धये ।
एवमुक्त्वा गतस्तत्र प्रतिष्ठानं महायशाः ॥ २२ ॥
निशायामथ चागम्य मेषमेकं जहार सः ।
मातृवद्वर्तते सा तु मेषयोश्चारुहासिनी ॥ १-२६ २३ ॥
गन्धर्वागमनं श्रुत्वा शापान्तं च यशस्विनी ।
राजानमब्रवित् तत्र पुत्रो मेऽह्रियतेति सा ॥ २४ ॥
एवमुक्तो विनिश्चित्य नग्नो नैवोदतिष्ठत ।
नग्नां मां द्रक्ष्यते देवी समयो वितथो भवेत् ॥ २५ ॥
ततो भूयस्तु गन्धर्वा द्वितीयं मेषमाददुः ।
द्वितीये तु हृते मेषे ऐलं देव्यब्रवीदिदम् ॥ २६ ॥
पुत्रो मेऽपहृतो राजन्ननाथाया इव प्रभो ।
एवमुक्तस्तथोत्थाय नग्नो राजा प्रधावितः ॥ २७ ॥
मेषयोः पदमन्विच्छन् गन्धर्वैर्विद्युदप्यथ ।
उत्पादिता सुमहती ययौ तद्भवनं महत् ॥ २८ ॥
प्रकाशितं वै सहसा ततो नग्नमवैक्षत ।
नग्नं दृष्ट्वा तिरोभूता साप्सरा कामरूपिणी ॥ २९ ॥
उत्सृष्टावुरणौ दृष्ट्वा राजा गृह्यागतो गृहे ।
अपश्यन्नुर्वशीं तत्र विललाप सुदुःखितः ॥ ३० ॥
चचार पृथिवीं सर्वां मार्गमाण इतस्ततः ।
अथापश्यत्स तां राजा कुरुक्षेत्रे महाबलः ॥ ३१ ॥
प्लक्षतीर्थे पुष्करिण्यां हैमवत्यां समाप्लुताम् ।
क्रीडन्तीमप्सरोभिश्च पञ्चभिः सह शोभनाम् ॥ ३२ ॥
तां क्रीडन्तीं ततो दृष्ट्वा विललाप स दुःखितः ।
सा चापि तत्र तं दृष्ट्वा राजानमविदूरतः ॥ ३३ ॥
उर्वशी ताः सखीः प्राह स एष पुरुषोत्तमः ।
यस्मिन्नहमवात्सं वै दर्शयामास तं नृपम् ॥ ३४ ॥
समाविग्नास्तु ताः सर्वाः पुनरेव नराधिप ।
जाये ह तिष्ठ मनसा घोरे वचसि तिष्ठ ह ॥ ३५ ॥
एवमादीनि सूक्तानि परस्परमभाषत ।
उर्वशी चाब्रवीदैलं सगर्भाहं त्वया प्रभो ॥ ३६ ॥
संवत्सरात् कुमारास्ते भविष्यन्ति न संशयः ।
निशामेकां च नृपते निवत्स्यसि मया सह ॥ ३७ ॥
हृष्टो जगाम राजाथ स्वपुरं तु महायशाः ।
गते संवत्सरे भूय उर्वशी पुनरागमत् ॥ ३८ ॥
उषितश्च तया सार्धमेकरात्रं महायशाः ।
उर्वश्यथाब्रवीदैलं गन्धर्वा वरदास्तव ॥ ३९ ॥
तान् वृणीष्व महाराज ब्रूहि चैनांस्त्वमेव हि ।
वृणीष्व समतां राजन् गन्धर्वाणां महात्मनाम् ॥ ४० ॥
तथेत्युक्त्वा वरं वव्रे गन्धर्वाश्च तथास्त्विति ।
पूरयित्वाग्निना स्थालीं गन्धर्वाश्च तमब्रुवन् ॥ ४१ ॥
अनेनेष्ट्वा च लोकान्नः प्राप्स्यसि त्वं नराधिप ।
तानादाय कुमारांस्तु नगरायोपचक्रमे ॥ ४२ ॥
निक्षिप्याग्निमरण्ये तु सपुत्रस्तु गृहं ययौ ।
स त्रेताग्निं तु नापश्यदश्वत्थं तत्र दृष्टवान् ॥ ४३ ॥
शमीजातं तु तं दृष्ट्वा अश्वत्थं विस्मितस्तदा ।
गन्धर्वेभ्यस्तदाशंसदग्निनाशं ततस्तु सः ॥ ४४ ॥
श्रुत्वा तमर्थमखिलमरणीं तु समादिशत् ।
अश्वत्थादरणीं कृत्वा मथित्वाग्निं यथाविधि ॥ ४५ ॥
मथित्वाग्निं त्रिधा कृत्वा अयजत् स नराधिपः ।
इष्ट्वा यज्ञैर्बहुविधैर्गतस्तेषां सलोकताम् ॥ ४६ ॥
गन्धर्वेभ्यो वरं लब्ध्वा त्रेताग्निं समकारयत् ।
एकोऽग्निः पूर्वमेवासीदैलस्त्रेतामकारयत् ॥ ४७ ॥
एवंप्रभावो राजासीदैलस्तु नरसत्तम ।
देशे पुण्यतमे चैव महर्षिभिरभिष्टुते ॥ ४८ ॥
राज्यं स कारयामास प्रयागे पृथिवीपतिः ।
उत्तरे जाह्नवीतीरे प्रतिष्ठाने महायशाः ॥ ४९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
ऐलोत्पत्तिर्नाम षड्विंशोऽध्यायः ॥


एलोत्पत्तिवर्णन -

वैशंपायन सांगतात - हे जनमेनया, बुधाला जो पुरूरवा म्हणून पुत्र झाला म्हणून सांगितलें, तो मोठा विद्वान्, तेजस्वी, दानशील, याग करून विपुल दक्षिणा देणारा, ब्रह्मवादी, पराक्रमी, युद्धांत शत्रूंना अजिंक्य, अग्निहोत्र ठेवणारा, यज्ञकर्ता, सत्यवादी, पवित्र बुद्धीचा, स्त्रियांना मोह पडेल इतका सुंदर असून एकांतांत पडद्याआडच कामचेष्टा करणारा असा होता. फार काय सांगावे ? त्या काळीं तिन्ही लोकांत यशानें त्याची बरोबरी करणारा असा कोणी नव्हता. असा तो ब्रह्मवादी, क्षमाशील, धर्मज्ञ व सत्यनिष्ठ पाहून मोठी नांवाजलेली जी उर्वशी नांवाची अप्सरा, ती आपले दिव्यपणाचा गर्व बाजूला ठेवून त्याला वरती झाली. हे राजा, मग तो पुरूरवा त्या दिव्य सुंदरीसह चैत्ररथ नामक रमणीय वनांत दहा वर्षे, मंदाकिनीच्या तीरीं पांच वर्षें, अलकानगरींत पाच वर्षें, बदरिकारण्यांत सहा वर्षें, नंदन नामक सर्वोत्कृष्ट वनांत सात वर्षें, वाटेल त्या वेळीं जेथे वृक्ष फल देतात, अशा उत्तर कुरूंत आठ वर्षें, गंधमादन पर्वताच्या पायथ्याशीं दहा वर्षें आणि उत्तर मेरूच्या पृष्ठभागावर आठ वर्षें, याप्रमाणें प्रत्यक्ष देवही जेथें विहारासाठीं येतात असल्या या उंची उंची वनांत मोठया चैनीत व रासरंगांत राहिला. त्यानें राजा या नात्याने, मोठमोठाल्या ऋषींनी ज्याची प्रशंसा केली आहे, अशा प्रयाग प्रांतावर राज्य केलें. उर्वशीपासून त्याला सात मुलगे झाले. ते सर्वही स्वर्गात जन्म पावलेल्या देवकुमारांप्रमाणे उदार व सुंदर होते. त्याची नांवे - आयु, अमावसु, विश्वायु, श्रुतायु, दृढायु, वनायु व शतायु.

जनमजेय विचारतो - हे वैशंपायना, आपण बहुश्रुत आहां तेव्हां मला हें सांगा कीं, उर्वशी ही अप्सरा म्हणजे स्वर्गात रहाणारी व गंधर्वादि देवांनी उपभोग्य असें असतां ती देवांस सोडून पुरूरव्यासारख्या मानवी राजास कशी भाळली ?

वैशंपायन सांगतात - तुझ्या शंकेचे समाधान असें आहे कीं, या उर्वशीला ब्रह्मदेवाचा शाप झाला होता, त्यामुळें ती मनुष्याचे हातीं लागली; व तो शाप नियमित कालपर्यंतचा असल्यानें तिनें त्या शापांतून मुक्त होण्यासाठी पुरूरव्याला अंगीकारितांना त्याच्या जवळ कांहीं करार केले; व मग ती त्याच्या स्वाधीन झाली. ते करार असे. ती सुंदरी म्हणाली, 'हे राजा, मी तुला वश होतें; परंतु तूं केव्हांही माझ्या दृष्टीस नग्न पडता कामा नये. शिवाय तुझी लहर लागेल तेव्हां मीं तुला भोग देणार नाहीं, तर जेव्हां मला कामचेतना होईल तेव्हांच तूं मैथुन करावे. शिवाय दिवसभर तूं थोडेसे तूप खाऊनच रहावे, दुसरें कांहीं खाऊ नये; व आपल्या निजावयाचे बिछान्याजवळ दोन मस्त मेंढे सदासर्वदा बांधून ठेविलेले पाहिजेत. हे राजा, हा करार जर तुला कबूल असेल तर मी तुझी होतें. ती तरी तूं जोपर्यंत हा करार अक्षरशः पाळशील तोपर्यंतच मी राहीन. त्यांत काडीमात्र ढिलाई झाली कीं, मी चालती होईन. तेव्हां काय तें बोल. माझ्या सर्व शर्ती तुला पटल्या ?'

राजा म्हणाला - "पटल्या, पटल्या. मी त्या सर्व नीट पाळीन;" हे जनमेजया, पुरूरव्याला त्या तबियतखोर उर्वशीनें इतकें जखडून घेतलें तेव्हां कुठे ती त्याच्याजवळ राहिली. ती तरी शापप्रभावामुळें थोडीशी मूढबुद्धि बनली होती म्हणून टिकली. तिने त्या राजाजवळ एकंदर एकूणसाठ वर्षें काढिली.

इकडे उर्वशी ही स्वर्गातली वस्तु होऊन मनुष्याच्या हातीं लागली, ही गोष्ट गंधर्वांना चैन पडूं देईना. ते परस्परांत खलबतें करूं लागले. ते म्हणाले कीं, उर्वशीसारखी निवडक स्त्री जी केवळ स्वर्गालाही भूषण आहे ती माणसाच्या हातीं रहावी हें कांहीं ठीक नव्हे. तर गडेहो, जिकडून ती पुनरपि देवांच्या हातीं येईल असली कोणी तरी शक्कल योजा. त्या वेळीं त्या बैठकींत विश्वावसु नांवाचा एक मोठा बोलका गंधर्व होता. तो पुढें होऊन म्हणाला, 'उर्वशी व पुरूरवा यांचे ज्या वेळीं पूर्वी करारमदार ठरले त्यावेळीं मीं ते ऐकले आहेत. त्यांचा सारांश असा आहे कीं, तिनें दिलेल्या शर्ती पाळण्यांत काडीमात्रही चूक राजाने केली कीं तिने त्याला रामराम ठोकलाच. अशी हडसून खडसून बोली झालेली आहे; आणि राजाच्या हातून करार कसा मोडला जाईल त्याची हिकमत मला पुरी माहीत आहे. याकरितां हे गंधर्वहो, तुमच्या कार्यसिद्धीसाठीं मीच जातों, मात्र माझे मदतीला कांहीं मंडळी पाहिजेत; असें म्हणून तो यशस्वी विश्वावसु प्रयाग नगरीला गेला. तेथें त्यानें राजाच्या शय्यागारांत शिरून त्या दोन मेंढयांपैकीं एक मेंढा चोरून नेला. गंधर्व येऊन गेला व आपला शाप संपण्याचीही वेळ भरली, हें मनांत आणून ती चारुहासिनी (गोडगोड हसणारी) राजाला म्हणाली कीं, माझ्या मुलांपैकीं एक आज येथें दिसत नाहीं. तो कोणी नेला याचा शोध करा. (मला चैन पडत नाहीं.) कारण, या मेंढ्यांवर मी आईप्रमाणें जीवप्राण करते हें तुम्ही नित्य पाहातांच. उर्वशीनें याप्रमाणे राजाला ज्या वेळीं हटकलें त्या वेळीं तो नग्न स्थितींत असल्यानें तो उत्तर द्यायला पुढें होईना. कारण, त्याच्या पोटांत उभे राहिले कीं, आपण उर्वशीच्या दृष्टीस नागवे पडलों कीं, करार मोडला असें होईल. या कारणास्तव तो जागच्याजागींच पडून राहिला. इतक्यांत गंधर्व मंडळींनी दुसराही मेंढा लांबविला. त्या वेळीं देवी उर्वशी राजाला म्हणाली कीं, "अहो, हें काय, हें काय; तुम्ही प्रभु म्हणवीत असतां माझा दुसराही पोरगा हातोहात कोणी येथून उठविला ? आणि मी बापडी अनाथासारखी बसले आहें. याची कांहीं तरी शंका बाळगा.' इतकें जेव्हां खोचून उर्वशी बोलली, तेव्हां त्या झटक्यांत आपण नग्न आहोंत ही शंका मनांत न ठेवितां राजा त्या एडक्यांचा माग काढीत धांवूं लागला. गंधर्व वाटच पहात होते. त्यांनीं तत्काळ अशी कांहीं विद्युल्लता तेथें उत्पन्न केली कीं, तिच्या तेजाने त्या सर्व अंतःपुरात लखलखाटच होऊन राहिला. राजेसाहेब दिगंबरच होते, ते उर्वशीच्या तसेच नजरेस पडले. तिला तेंच हवें होतें. मूळची अप्सरा ती ! वाटेल तसलें रूप घेण्याची विद्या तिला अवगतच होती, तेव्हां ती तेथल्या तेथेंच दिसेनाशी झाली.

इतक्यांत राजा उधळलेले मेंढे गांठून घेऊन परत घरांत आला, आणि पहातो ती उर्वशी नाहीं. तेव्हां हंबरडा फोडून रडूं लागला; नंतर वेडा होऊन तिला धुंडाळण्यांत इकडे तिकडे भटकून त्यानें सर्व पृथ्वी पालथी घातली. शेवटीं कुरुक्षेत्रांत प्लक्षतीर्थावर सुवर्णकमलांनी युक्त अशी एक पुष्करणी होती, तींत ती सुंदरी, दुसर्‍या पांच अप्सरांसह क्रीडत बसलेली त्याच्या दृष्टीस पडली. एवढा बलाढय राजा, पण उर्वशीला पाहातांच त्यानें मोठाच गळा काढिला. उर्वशीनेंही राजा जवळ येऊन ठेपला असें पाहून आपल्या संवगडीनींना म्हटलें कीं, मी ज्याजवळ राहिलें होतें तोच हा राजा; असें म्हणून तिनें राजाकडे बोट दाखविले. तेव्हां ही आतां पुन्हा या राजाबरोबर निघून जाते किंवा काय अशी शंका येऊन तिच्या सख्या गोंधळून गेल्या. इतक्यांत राजा उर्वशीला मिनतवारीनें म्हणूं लागला, "हे सुंदरी, तुला वाटेल तर मन मानेल तसें मला तडातड टाकून बोल, कठोरपणाने वागव; परंतु, आतांपर्यंत तूं माझी जाया (जिचे ठिकाणीं पुत्ररूपानें पति जन्म घेतो अशी स्त्री) या नात्यानें मजपाशीं वागत होतीस, तेंच नाते कायम मनांत वागवून मजपाशीं राहा, दुसरें माझें कांहीं म्हणणें नाहीं." याप्रमाणे तिच्याशी गुळचट गोष्टी करीत राजा बसला. उर्वशीनेंही त्याला त्या वेळीं गोडसेंच उत्तर दिलें. ती म्हणाली, 'हे प्रभो, माझ्या जायात्वाप्रमाणें तुजपासूनच माझे ठिकाणी गर्भ राहिला आहे.

यांकरिता तूर्त मी तुजकडे येत नाहीं. आजपासून एक संवत्सरानें मी प्रसूत होईन, आणि तुला पुत्रच होतील. ही गोष्ट झाल्यावर एकदां एक रात्र तुला मजबरोबर राहावयास मिळेल, जास्ती कांहीं नाहीं.' उर्वशीचे हे शब्द ऐकून तेवढयानेंच राजाला किती तरी आनंद झाला; आणि त्या आनंदांतच तो आपल्या नगरीला परत गेला. मग एक संवत्सर भरतांच उर्वशी संकेताप्रमाणें त्याकडे आली. राजानेंही तिजबरोबर ठरल्याप्रमाणें एक रात्र घालविली. नंतर उर्वशी पुरूरव्याला म्हणाली, "हे राजा, हे माझे गंधर्वगण तुला वर देण्याला तयार आहेत. याकरितां तूंच होऊन त्यांजपासून वाटेल तो वर मागून घे. मुख्यतः आपण गंधर्वतुल्यच व्हावें हें तूं माग." राजा म्हणाला, "फार बरें." व त्यानें त्याप्रमाणें गंधर्वांपाशीं वर मागितला व त्यांनीं तुझ्या इच्छेप्रमाणें होईल म्हणून वर दिला, व अग्नीनें भरलेली एक स्थाली त्याच्या स्वाधीन करून गंधर्व त्याला म्हणाले कीं, हे राजा, हा अग्नि घेऊन तूं यज्ञ कर म्हणजे आमच्या लोकाला येशील. मग तो अग्नि व उर्वशीनें दिलेले आपले पुत्र बरोबर घेऊन राजा नगराकडे जावयास निघाला. जातांना त्यानें तो अग्नि वाटेंत अरण्यांतच टाकिला, व केवळ पुत्रांसह नगरप्रवेश केला. नगरांत शिरतांना त्यानें पूर्वी प्रवासाचे वेळीं वेशीबाहेर स्थापित केलेला अग्नि त्याला आढळला नाहीं. परंतु, त्या अग्नीच्या ऐवजी शमीच्या झाडांत उत्पन्न झालेला अश्वत्थ दृष्टीस पडला. त्या वेळीं त्यानें अग्नि नाहींसा झाला, ही गोष्ट गंधर्वांना सांगितली. गंधर्वांनी त्याची ती तक्रार ऐकून त्याला सांगितलें कीं, या अश्वत्थ वृक्षाचीं दोन काष्ठें घेऊन त्यांपासून मंथा व अरणी करून मंथून अग्नि निर्माण करावा. मग राजानें त्याप्रमाणें अश्वत्थकाष्ठाचा अरणि करून यथाविधि मंथन करून अग्नि काढिला; व त्याच अग्नीचे दक्षिण, आहवनीय व गार्हपत्य असे तीन विभाग करून अनेक यज्ञ केले. त्यापूर्वीं एकच अग्नि होता. पण पुरूरव्यानें हे तीन वर्ग केले. असला तो समर्थ राजा होता. यज्ञाच्या पुण्यानें त्याला गंधर्वांचें सालोक्यही मिळाले.

हे राजा, याप्रमाणे गंगा नदीच्या उत्तरतीरावर असणार्‍या अत्यंत पवित्र व महर्षींनी प्रशंसा केलेल्या प्रयाग नामक प्रांतांत असला हा महायशस्वी राजा राज्य करून गेला.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
ऐलोत्पत्तिर्नाम षड्विंशोऽध्यायः ॥ २६ ॥
अध्याय सव्विसावा समाप्त

GO TOP