श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
सप्तविंशोऽध्यायः


अमावसुवंशकीर्तनम्

वैशंपायन उवाच
ऐलपुत्रा बभूवुस्ते सर्वे देवसुतोपमाः ।
दिवि जाता महात्मान आयुर्धीमानमावसुः ॥ १ ॥
विश्वायुश्चैव धर्मात्मा श्रुतायुश्च तथापरः ।
धृढायुश्च वनायुश्च शतायुश्चोर्वशीसुताः ।
अमावसोश्च दायादो भीमो राजाथ नग्नजित् ॥ २ ॥
श्रीमान् भीमस्य दायादो राजासीत्काञ्चनप्रभः ।
विद्वांस्तु काञ्चनस्यापि सुहोत्रोऽभून्महाबलः ॥ ३ ॥
सौहोत्रिरभवज्जह्नुः केशिन्या गर्भसंभवः ।
आजह्रे यो महत्सत्रं सर्वमेधमहामखम् ॥ ४ ॥
पतिलोभेन यं गङ्गा पतित्वेऽभिससार ह ।
नेच्छतः प्लावयामास तस्य गङ्गा च तत्सदः ।
स तया प्लावितं दृष्ट्वा यज्ञवाटं समन्ततः ॥ ५ ॥
सौहित्रिरब्रवीद्गङ्गां क्रुद्धो भरतसत्तम ॥ ६ ॥
एष ते विफलं यत्नं पिबन्नम्भः करोम्यहम् ।
अस्य गङ्गेऽवलेपस्य सद्यः फलमवाप्नुहि ॥ ७ ॥
राजर्षिणा ततः पीतां गङ्गां दृष्ट्वा महर्षयः ।
उपनिन्युर्महाभागां दुहितृत्वेन जाह्नवीम् ॥ ८ ॥
युवनाश्वस्य पुत्रीं तु कावेरीं जह्नुरावहत् ।
युअवनाश्वस्य शापेन गङ्गाऽर्धेन विनिर्ममे ॥ ९ ॥
कावेरीं सरितां श्रेष्ठां जह्नोर्भार्यामनिन्दिताम् ।
जह्नुस्तु दयितं पुत्रं सुनहं नाम धार्मिकम् ।
कावेर्यां जनयामास अजकस्तस्य चात्मजः ॥ १० ॥
अजकस्य तु दायादो बलाकाश्वो महीपतिः ।
बभूव मृगयाशीलः कुशस्तस्यात्मजोऽभवत् ॥ ११ ॥
कुशपुत्रा बभूवुर्हि चत्वारो देववर्चसः ।
कुशिकः कुशनाभश्च कुशाम्बो मूर्तिमांस्तथा ॥ १२ ॥
पह्लवैः सह संवृद्धिं राजा वनचरैस्तदा ।
कुशिकस्तु तपस्तेपे पुत्रमिन्द्रसमप्रभम् ।
लभेयमिति तं शक्रस्त्रासादभ्येत्य जज्ञिवान् ॥ १३ ॥
पूर्णे वर्षसहस्रे वै तं तु शक्रो ह्यपश्यत ॥
अत्युग्रतपसं दृष्ट्वा सहस्राक्षः पुरंदरः ॥ १४ ॥
समर्थः पुत्रजनने स्वमेवांशमवासयत् ।
पुत्रत्वे कल्पयामास स देवेन्द्रः सुरोत्तमः ॥ १५ ॥
स गाधिरभवद् राजा मघवान् कौशिकः स्वयम् ।
पौरुकुत्स्यभवद्भार्या गाधिस्तस्यामजायत ॥ १६ ॥
गाधेः कन्या महाभागा नाम्ना सत्यवती शुभा ।
तां गाधिर्भृगुपुत्राय ऋचीकाय ददौ प्रभुः ॥ १७ ॥
तस्याः प्रीतोऽभवद् भर्ता भार्गवो भृगुननदनः ।
पुत्रार्थं कारयामास चरुं गाधेस्तथैव च ॥ १८ ॥
उवाचाहूय तां भर्ता ऋचीको भार्गवस्तदा ।
उपयोज्यश्चरुरयं त्वया मात्रा त्वयं तव ॥ १९ ॥
तस्यां जनिष्यते पुत्रो दीप्तिमान् क्षत्रियर्षभः ।
अजेयः क्षत्रियैर्लोके क्षत्रियर्षभसूदनः ॥ २० ॥
तवापि पुत्रं कल्याणि धृतिमन्तं तपोनिधिम् ।
शमात्मकं द्विजश्रेष्ठं चरुरेष विधास्यति ॥ २१ ॥
एवमुक्त्वा तु तां भार्यामृचीको भृगुनन्दनः ।
तपस्याभिरतो नित्यमरण्यं प्रविवेश ह ॥ २२ ॥
गाधिः सदारस्तु तदा ऋचीकावासमभ्यगात् ।
तीर्थयात्राप्रसङ्गेन सुतां द्रष्टुं जनेश्वरः ॥ २३ ॥
चरुद्वयं गृहीत्वा तदृषेः सत्यवती तदा ।
चरुमादाय यत्नेन सा तु मात्रे न्यवेदयत् ॥ २४ ॥
माता व्यत्यस्य दैवेन दुहित्रे स्वं चरुं ददौ ।
तस्याश्चरुमथाज्ञानादात्मसंस्थं चकार ह ॥ २५ ॥
अथ सत्यवती गर्भं क्षत्रियान्तकरं तदा ॥
धारयामास दीप्तेन वपुषा घोरदर्शनम् ॥ २६ ॥
तामृचीकस्ततो दृष्ट्वा योगेनाभ्यनुसृत्य च ।
तामब्रवीद् द्विजश्रेष्ठः स्वां भार्यां वरवर्णिनीम् ॥ २७ ॥
मात्रासि वञ्चिता भद्रे चरुव्यत्यासहेतुना ।
जनिष्यति हि पुत्रस्ते क्रूरकर्मातिदारुणः ॥ २८ ॥
भ्राता जनिष्यते चापि ब्रह्मभूतस्तपोधनः ।
विश्वं हि ब्रह्मतपसा मया तस्मिन् समर्पितम् ॥ २९ ॥
एवमुक्ता महाभागा भर्त्रा सत्यवती तदा ।
प्रसादयामास पतिं पुत्रो मे नेदृशो भवेत् ।
ब्राह्मणापसदस्तत्र इत्युक्तो मुनिरब्रवीत् ॥ ३० ॥
नैष संकल्पितः कामो मया भद्रे तथास्त्विति ।
उग्रकर्मा भवेत्पुत्रः पितुर्मातुश्च कारणात् ।
पुनः सत्यवती वाक्यमेवमुक्ताब्रवीदिदम् ॥ ३१ ॥
इच्छँल्लोकानपि मुने सृजेथाः किं पुनः सुतम् ।
शमात्मकमृजुं त्वं मे पुत्रं दातुमिहार्हसि ॥ ३२ ॥
काममेवंविधः पौत्रो मम स्यात्तव च प्रभो ।
यद्यन्यथा न शक्यं वै कर्तुमेतद् द्विजोत्तम ॥ ३३ ॥
ततः प्रसादमकरोत्स तस्यास्तपसो बलात् ।
भद्रे नास्ति विशेषो मे पौत्रे च वरवणिनि ।
त्वया यथोक्तं वचनं तथा भद्रं भविष्यति ॥ ३४ ॥
ततः सत्यवती पुत्रं जनयामास भार्गवम् ।
तपस्याभिरतं दान्तं जमदग्निं शमात्मकम् ॥ ३५ ॥
भृगोश्चरुविपर्यासे रौद्रवैष्णवयोः पुरा ।
यजनाद् वैष्णवेऽथांशे जमदग्निरजायत ॥ ३६ ॥
सा हि सत्यवती पुण्या सत्यधर्मपरायणा ।
कौशिकीति समाख्याता प्रवृत्तेयं महानदी ॥ ३७ ॥
इक्ष्वाकुवंशप्रभवो रेणुर्नाम नराधिपः ।
तस्य कन्या महाभागा कामली नाम रेणुका ॥ ३८ ॥
रेणुकायां तु कामल्यां तपोविद्यासमन्वितः ।
आर्चिको जनयामास जामदग्न्यं सुदारुणम् ॥ ३९ ॥
सर्वविद्यानुगं श्रेष्ठं धनुर्वेदस्य पारगम् ।
रामं क्षत्रियहन्तारं प्रदीप्तमिव पावकम् ॥ ४० ॥
और्वस्यैवमृचीकस्य सत्यवत्यां महायशाः ।
जमदग्निस्तपोवीर्याज्जज्ञे ब्रह्मविदां वरः ॥ ४१ ॥
मध्यमश्च शुनःशेपः शुनःपुच्छः कनिष्ठकः ।
विश्वामित्रं तु दायादं गाधिः कुशिकनन्दनः ॥ ४२ ॥
जनयामास पुत्रं तु तपोविद्याशमात्मकम् ।
प्राप्य ब्रह्मर्षिसमतां योऽयं सप्तर्षितां गतः ॥ ४३ ॥
विश्वामित्रस्तु धर्मात्मा नाम्ना विश्वरथः स्मृतः ।
जज्ञे भृगुप्रसादेन कौशिकाद्वंशवर्धनः ॥ ४४ ॥
विश्वामित्रस्य च सुता देवरातादयः स्मृताः ।
प्रख्यातास्त्रिषु लोकेषु तेषां नामानि मे शृणु ॥ ४५ ॥
देवश्रवाः कतिश्चैव यस्मात्कात्यायनाः स्मृताः ।
शालावत्यां हिरण्याक्षो रेणोर्जज्ञेऽथ रेणुमान् ॥ ४६ ॥
सांकृतिर्गालवश्चैव मुद्गलश्चेति विश्रुताः ।
मधुच्छन्दो जयश्चैव देवलश्च तथाष्टकः ॥ ४७ ॥
कच्छपो हारितश्चैव विश्वामित्रस्य वै सुताः ।
तेषां ख्यातानि गोत्राणि कौशिकानां महात्मनाम् ॥ ४८ ॥
पाणिनो बभ्रवश्चैव ध्यानजप्यास्तथैव च ।
पार्थिवा देवराताश्च शालङ्कायनबाष्कलाः ॥ ४९ ॥
लोहिता यमदूताश्च तथा कारीषवः स्मृताः ।
सौश्रुताः कौशिका राजंस्तथान्ये सैन्धवायनाः ॥ ५० ॥
देवला रेणवश्चैव याज्ञ्यवल्क्याघमर्षणाः ।
औदुंबरा ह्यभिष्णातास्तारकायनचुञ्चुलाः ॥ ५१ ॥
शालावत्या हिरण्याक्षाः सांकृत्या गालवास्तथा ।
बादरायणिनश्चान्ये विश्वामित्रस्य धीमतः ॥ ५२ ॥
ऋष्यन्तरविवाह्याश्च कौशिका बहवः स्मृताः ।
पौरवस्य महाराज ब्रह्मर्षिः कौशिकस्य च ।
संबन्धोऽप्यस्य वंशेऽस्मिन्ब्रह्मक्षत्रस्य विश्रुतः ॥ ५३ ॥
विश्वामित्रात्मजानां तु शुनःशेपोऽग्रजः स्मृतः ।
भार्गवः कौशिकत्वं हि प्राप्तः स मुनिसत्तमः ॥ ५४ ॥
विश्वामित्रस्य पुत्रस्तु शुनःशेपोऽभवत्किल ।
हरिदश्वस्य यज्ञे तु पशुत्वे विनियोजितः ॥ ५५ ॥
देवैर्दत्तः शुनःशेपो विश्वामित्राय वै पुनः ।
देवैर्दत्तः स वै यस्माद् देवरातस्ततोऽभवत् ॥ ५६ ॥
देवरातादयः सप्त विश्वामित्रस्य वै सुताः ।
दृषद्वतीसुतश्चापि विश्वामित्रात् तथाष्टकः ॥ ५७ ॥
अष्टकस्य सुतो लौहिः प्रोक्तो जह्रुगणो मया ।
अथ ऊर्ध्वं प्रवक्ष्यामि वंशमायोर्महात्मनः ॥ ५८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
अमावसुवंशकीर्तनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥


अमावसुवंशवर्णन -

वैशंपायन सांगतात - उर्वशीपासून ऐल म्हणजे पुरूरवा याला जे पुत्र झाले ते सर्वच स्वर्गलोकांत जन्मांत येणार्‍या देवपुत्रांप्रमाणें मोठे उदार व दिव्यस्वरूप होते. त्याची नांवे - आयु, बुद्धिमान, अमावसु, धर्मात्मा, विश्वायु, श्रुतायु, तसाच आणखी दृढायु, वनायु व शतायु. अमावसूला भीम आणि राजा नग्नजित असे दोन मुलगे होते. पैकी राजा भीम याला कांचनप्रभ नांवाचा मोठा देखणा मुलगा होता. कांचनाला मोठा विद्वान् व बलिष्ठ असा सुहोत्र नांवाचा पुत्र होता. या सुहोत्रानें केशिनीच्या पोटीं जन्हु नामक पुत्र उत्पन्न केला. या जन्हूनें सर्वमेध नांवाचा फार मोठा यज्ञ केला. या समयीं याला गंगा मोहित होऊन माझा पति हो म्हणून प्रार्थना करीत आपण होऊन त्याजकडे आली. परंतु तो तिच्या इच्छेला अनुसरेना. तेव्हां त्या गंगेने त्याचा तो सर्व यज्ञमंडप जळांत बुडवून टाकिला. सर्व यज्ञभूमी गंगेने याप्रमाणें बुडवून टाकलेली पाहातांच जन्हु संतापून गंगेला म्हणाला कीं, "हें गंगे, तूं हे व्यर्थ श्रम कशाला करितेस ? तूं आपल्याकडून एवढा जरी जलप्रलय केला आहेस तरी मला त्याचें कांहीं नाही. मी हें सर्व पाणी पिऊन टाकून तुझा यत्न फुकट घालवीन. मात्र तूं जी ही दांडगाई केलीस तिचें प्रायश्चित्त तुला या हातींच देतों बघ. असें म्हणून जन्हूनें तत्काळ सर्व गंगा पिऊन टाकिली. पुढें महर्षींनी गंगेची अशी स्थिती झालेली पाहून जन्हूची प्रार्थना केली. तेव्हा त्यानें तिला सोडून दिली. परंतु, ती जन्हूच्या पोटांतून आली ही कल्पना घेऊन ऋषीगण त्या दिवसांपासून तिला जान्हवी म्हणजे जन्हूची कन्या असें म्हणू लागले. गंगेला जन्हूची कन्या ठरविल्यावर त्याला पति करण्याचा तिचा संकल्प सहजच फिका पडला. तथापि, अंतर्यामी तिची ती वासना नष्ट झाली नव्हती; व तिने ती वासना अन्य रूपानें पूर्ण करून घेतली. तो प्रकार असा.

युवनाश्वानें पूर्वी काहीं कारणानें गंगेला तूं मनुष्ययोनी पावशील म्हणून शाप दिला होता. त्या शापबलानें गंगा ही आपल्या अर्धभागानें युवनाश्वाचेच पोटीं येऊन तेथें सरिच्छ्रेष्ठ कावेरी असें नांव पावली; व ही युवनाश्वकन्या कावेरी हिशीं जन्हूनें लग्न लाविले. (अर्थातच जन्हूला पति करण्याचा गंगेचा हेतु कावेरी रूपानें सिद्ध झाला.) कावेरीरूपानें जन्हूच्या घरांत आल्यावर तिचें (गंगेचे) वर्तन अनिंदित होते. असो; कावेरीचे ठिकाणी जन्हूनें सुनह नामक पुत्र उत्पन्न केला. हा बापाचा फार लाडका असून फार धार्मिक होता. या सुनहाला पुढें अजक हा मुलगा झाला. अजकाचे पोटीं राजा बलाकाश्व हा आला. या राजाला शिकारीचा फार नाद असे. याला कुश नांवाचा पुत्र झाला. कुशाला पुढें देवांसारखे तेजस्वी असे चार पुत्र झाले. त्यांची नांवे - कुशिक, कुशनाभ, कुशांब आणि मूर्तिमान. हा कुशिक राजा पल्हव नांवाचे जे रानटी लोक आहेत त्यांच्या सोबतीनें असे. एकदां या कुशिकाचे मनांत असें आलें कीं, आपणास इंद्राच्या तोडीचा तेजस्वी असा पुत्र व्हावा. ही गोष्ट मनांत आल्यावर त्यानें तिच्या सिध्यर्थ अत्युग्र तप आरंभिलें, व तें तप त्यानें सतत एक सहस्त्र वर्षेपर्यंत चालविले. सहस्त्र वर्षें पूर्ण झाली, तेव्हां सहस्त्राक्ष जो पुरंदर इंद्र त्याचे लक्षांत असें आलें कीं, हा कुशिक आपल्या तोडीचा पुत्र निर्माण करण्यास खचितच समर्थ आहे. पण याने असला पुत्र निर्माण केल्यास आपलें महत्व कमी पडेल, याकरिता आपणच याच्या पोटीं जावे; असा संकल्प करून देवश्रेष्ठ इंद्र यानें आपल्या तेजाचा अंश कुशिकाच्या वीर्यांत मिसळून दिला; व त्या वीर्यापासून कुशिकाला पुढें गाधी नांवाचा पुत्र झाला. हा कुशिकपुत्र म्हणजे प्रत्यक्ष इंद्रच, हें निराळें सांगावयास नको. हा गाधी कुशिकाच्या ज्या स्त्रीचे पोटीं जन्मला, ती पुरुकुत्स नांवाच्या राजाची कन्या होती व तिला पौरुकुत्सी असें म्हणत. या गाधीला सत्यवती नांवाची मोठी थोर व शुभलक्षणी कन्या झाली. ही कन्या गाधी राजाने भृगुपुत्र जो ऋचीक त्यास दिली. ऋचीकाचें हिच्यावर फारच प्रेम बसलें. तेव्हां हिला पुत्र द्यावा व हिच्या बापालाही द्यावा म्हणून ऋचीकानें तिजकडून तिजकरितां एक व तिचे आईकरितां एक चरू तयार करविला, व तिला म्हणाला कीं, हे प्रिये, हा चरू तूं खा; आणि हा जो दुसरा आहे तो तुझ्या आईने खावा. हा खाल्ल्यानें तुझ्या आईला, बडया बडया क्षत्रियांना चीत करणारा, क्षत्रिय मंडळांत केवळ अजिंक्य असा एक मोठा दीप्तिमान अस्सल क्षत्रियपुत्र होईल; व तुलाही, हे कल्याणि, मोठा शहाणा, शमशील व तपोनिष्ठ असा अस्सल ब्राह्मणपुत्र या चरूच्या प्रभावानें होईल. याप्रमाणें स्वस्त्रीला चरूंची व्यवस्था सांगून भृगुपुत्र ऋचीक याचा सदैव तपाकडे ओढा असल्यामुळें स्वस्त्रीला घेऊन तपश्चर्येसाठीं अरण्यांतच गेला. इकडे त्याचा सासरा गाधिराजा हा सहकुटुंब तीर्थयात्रेला निघाला होता.

तो आपल्या मुलीला भेटावें म्हणून ऋचीक जेथें वनांत होता तेथें आला. तेव्हां आईला पाहून सत्यवतीला चरूची आठवण झाली. तिनें ते दोन्ही चरू ऋचीकापासून मागून घेऊन आपल्या आईपुढें ठेविले, व या चरूंचे सामर्थ्य असें असें आहे म्हणून तिनें आपल्या आईला भरवून सांगितले. पुढें आईनें दुदैवबळानें भूल पडून अशी चूक केली कीं, आपला चरू मुलीला दिला व तिचा होता तो आपण खाल्ला. या चुकीचा परिणाम असा झाला कीं, सत्यवतीचे ठिकाणीं दिसण्यांत मोठा उग्र, कांतीने जाज्वल्य व क्षत्रियांचा केवळ काळ असा गर्भ राहिला व ऋचीक ऋषि ध्यानस्थ असतां ही गोष्ट त्यांच्या ध्यानांत आली; आणि ते स्वस्त्रीला म्हणाले, 'हे कल्याणि, हे सुंदरि, तुझ्या आईनें चरूंची उलट पालट करून मोठी फसगत केली ! कारण, तुझ्या पोटीं (शांत असा ब्राह्मण न येतां) अति दारूण व क्रूरकर्मी असा क्षत्रिय निपजेल, व जो भाऊ होईल तो मोठा तपोधन व प्रत्यक्ष वेदमूर्तीच होईल. कारण, तुला काय सांगू ? माझें तपोबल खर्चून अखिल वेद त्या चरूचे ठिकाणीं ओतला होता.' तें ऐकून सत्यवती आपल्या पतीची मनधरणी करून म्हणाली, "असला क्रूर ब्राह्मणाधम पुत्र मला न व्हावा."

तेव्हां ऋचीक म्हणाला, 'हे कल्याणि, असला क्रूर पुत्र व्हावा म्हणून माझाही कोठें संकल्प होता; (मी जर ब्राह्मण आहें तर क्रूरकर्मी पुत्राची इच्छा कां करूं ?) पोटीं उग्र पुत्र होणें हें आईबापांच्या वृत्तीचें फळ असतें. यावर सत्यवती पुन्हा म्हणाली, 'हें उत्तर कोणाला सांगावे ? आपण मनांत आणाल तर नवी सृष्टि निर्माण कराल; मग माझ्या मनाजोगा पुत्र द्याल यांत संशय काय ? तर मला सरळ बुद्धीचा व शमशील असा पुत्र आपण दिलाच पाहिजे. तथापि, हे द्विजश्रेष्ठा, जर झाली गोष्ट अन्यथा करतां येतच नाहीं असें असेल तर मी ज्या लक्षणांचा पुत्र मागतें आहें त्या लक्षणांचा मला व आपणाला निदान पुत्र म्हणजे नातु तरी व्हावा.' हे सत्यवतीचे शब्द ऐकून ऋचीक प्रसन्न होऊन म्हणाला, "हे सुंदरि, हे कल्याणि, देणेंच झालें तर मला पौत्र देणे आणि पुत्र देणे यांत कांहीं अंतर नाहीं. मी माझ्या तपोबलानें कोणताही देऊं शकेन. आणि तुला जर असल्या पुत्राचीच हौस आहे तर तुझ्या मनाप्रमाणेंच होईल जा." ह्या आशीवार्दानंतर अल्पकालानेंच सत्यवतीला जमदग्नि नांवाचा मोठा शांत, दांत व तपोनिरत असा पुत्र झाला. ऋचीकानें चरूसंबंधे केलेल्या मूळच्या योजनेंत विपर्यास झाल्यामुळें त्या चरूचे ठिकाणीं स्थापलेल्या रुद्र व विष्णु यांच्या अंशांची अदलाबदल झाली होती. तथापि, ऋचीकानें देवताराधन केल्यामुळें जमदग्नि हा विष्णूच्या शांत अंशानेंच जन्मास आला. असो; ती सत्यधर्मपरायण व पुण्यशील अशी ऋचीकपत्नी जी सत्यवती तीच पुढें हल्ली कौशिका या नांवानें लोकांत प्रसिद्ध असलेली महानदी झाली.

इक्ष्वाकु वंशांत रेणु नांवाचा कोणी राजा होता. याला कामली नांवाची एक कन्या होती. हिला कामली रेणुका असेही म्हणत. या रेणुकेचे ठिकाणीं ऋचीकपुत्र जमदग्नि यानें सर्व विद्यांत निपुण, धनुर्वेदांत पारंगत, क्षत्रियांचा काळ व तेजानें केवळ चेतलेला अग्नि अशा प्रकारचा अत्यंत दारुण पुत्र उत्पन्न केला. याला जामदग्न्यराम असें म्हणतात. याप्रमाणें और्व ऋषीचा पुत्र ऋचीक याच्या तपोवीर्यानें ब्रह्मवेत्त्यांत वरिष्ठ व मोठा यशस्वी, असा जमदग्नि हा पुत्र सत्यवतीच्या पोटीं आला. त्याचा मधला भाऊ शुनःशेप हा झाला, व शुनःपुच्छ हा कनिष्ठ; असे हे तिघे भाऊ. इकडे कुशिकपुत्र गाधि यानें तप, विद्या व शम यांनीं युक्त असा विश्वामित्र हा पुत्र उत्पन्न केला. हा मोठाच पराक्रमी झाला. यानें (क्षत्रिय असून) ब्रह्मर्षींचें साम्य संपादून सप्तर्षींच्या मालिकेंत जागा पटकाविली. या धर्मनिष्ठ विश्वामित्राला कोणी विश्वरथही म्हणत. हा कौशिकाचें वंशवर्धन करणारा पुत्र कौशिकाला भृगूच्याच (ऋचीकाच्या) प्रसादानें झाला. या विश्वामित्राला तिन्ही लोकांत विख्यात असे देवरात-प्रभृति बरेच पुत्र झाले. हे राजा, मी त्यांची नांवे सांगत तीं ऐक. शालावतीनामक स्त्रीचे ठिकाणी त्यानें हिरण्याक्ष, देवश्रवा व ज्याचे संततीला पुढें कात्यायन असें नांव पडलें तो कति, असे हे तीन पुत्र उत्पन्न केले. रेणुसंज्ञक स्त्रीचे ठिकाणीं रेणुमान, सांकृति, गालव, मुद्गल, मधुच्छंद, जय व देवल; व अष्टक, कच्छप आणि हारित असे तिघे दृषद्वतीचे ठिकाणीं. हे सारेही विश्वामित्राचे पुत्र. हे सर्वच कुशिककुलांत मोठे विख्यात पुरुष जन्मले. यांची पुढील संततिही मोठी इतिहास प्रसिद्धच आहे. पाणीन, बभ्रूव, करजप्य, देवरात, शालंकायन बाष्कल, लोहित, यामदूत, कारीषव, सौश्रुत, कौशिक, तसेच आणखी सैंधवायन - अशीं हीं बारा कुळें देवराताच्या वंशांत उदयास आली. देवल व रेणव हीं रेणूच्या वंशांत; याज्ञवल्क्य, अघमर्षण, औदुंबर, अभिष्णात, तारकायन व चुंचुल, हे सहा शालावतीचे पौत्र व हिरण्याक्षाचे पुत्र. सांकृत्य, गालव, बादरायणी हेही यांशिवाय विश्वामित्राचीच संतति होत. शिवाय प्रवरभेदानें ज्यांचा इतरांशी विवाह होऊं शकतो असे या कौशिक कुलांत किति तरी पुरुष उत्पन्न झाले. हे इतके प्रतिष्ठित होते कीं, यांचा एकीकडे पौरवकुलाशीं व एकीकडे वसिष्ठ ब्रह्मर्षीच्या कुळाशी - याप्रमाणें ब्राह्मण व क्षत्रियांचा मिसळीचा संबंध झाला, ही गोष्ट सर्वश्रुतच आहे. विश्वामित्राच्या सर्व मुलांत शुनःशेप हाच वडील समजला जातो. हा वास्तविक पाहातां जमदग्नीचा कनिष्ठ भ्राता, या नात्याने भृगुकुलांत असतां पुढें तो कौशिक कुलांत आला. हा शुनःशेप हरिदश्वाच्या यज्ञांत पशूच्या ऐवजी योजिला जाणार होता. परंतु देवांनीं त्याला उचलून विश्वामित्राच्या हवालीं केला. तेव्हां देवांनी दिला, अशा समजुतीनें त्याला इतउत्तर देवरात असें म्हणूं लागले. असो; हे देवरातप्रभृति सात बंधु विश्वामित्राचे पुत्र असून त्यांशिवाय विश्वामित्राला दृषद्वतीपासून अष्टक नांवाचा एक आठवाही पुत्र होता. या अष्टकाला लौहि नांवाचा पुत्र झाला.

याप्रमाणें येथवर मीं तुला जन्हूचा वंश सांगितला. आतां यापुढें आयूचा वंश सांगतो.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
अमावसुवंशकीर्तनं नाम सप्तविंशोऽध्यायः ॥ २७ ॥
अध्याय सत्ताविसावा समाप्त

GO TOP