श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
अष्टाविंशोऽध्यायः


आयुवंशकथनम्

वैशंपायन उवाच ॥
आयोः पुत्रास्तथा पञ्च सर्वे वीरा महारथाः ।
स्वर्भानुतनयायां च प्रभायां जज्ञिरे नृप ॥ १ ॥
नहुषः प्रथमं जज्ञे वृद्धशर्मा ततः परम् ।
रम्भोरजिरनेनाश्च त्रिषु लोकेषु विश्रुताः ॥ २ ॥
रजिः पुत्रशतानीह जनयामास पञ्च वै ।
राजेयमिति विख्यातं क्षत्रमिन्द्रभयावहम् ॥ ३ ॥
यत्र देवासुरे युद्धे समुत्पन्ने सुदारुणे ।
देवाश्चैवासुराश्चैव पितामहमथाब्रुवन् ॥ ४ ॥
आवयोर्भगवन् युद्धे को विजेता भविष्यति ।
ब्रूहि नः सर्वभूतेश श्रोतुमिच्छामि ते वचः ॥ ५ ॥
ब्रह्मोवाच
येषामर्थाय संग्रामे रजिरात्तायुधः प्रभुः ।
योत्स्यते ते जयिष्यन्ति त्रीँल्लोकान्नात्र संशयः ॥ ६ ॥
यतो रजिर्धृतिस्तत्र श्रीश्च तत्र यतो धृतिः ।
यतो धृतिश्च श्रीश्चैव धर्मस्तत्र जयस्तथा ॥ ७ ॥
ते देवदानवाः प्रीता देवेनोक्ता रजेर्जये ।
अभ्ययुर्जयमिच्छन्तो वृण्वाना भरतर्षभम् ॥ ८ ॥
स हि स्वर्भानुदौहित्रः प्रभायां समपद्यत ।
राजा परमतेजस्वी सोमवंशप्रवर्धनः ॥ ९ ॥
ते हृष्टमनसः सर्वे रजिं देवाश्च दानवाः ।
ऊचुरस्मज्जयाय त्वं गृहाण वरकार्मुकम् ॥ १० ॥
अथोवाच रजिस्तत्र तयोर्वै देवदैत्ययोः ।
स्वार्थज्ञः स्वार्थमुद्दिश्य यशः स्वं च प्रकाशयन् ॥ ११ ॥
रजिरुवाच
यदि दैत्यगणान्सर्वाञ्जित्वा शक्रपुरोगमाः ।
इन्द्रो भवामि धर्मेण ततो योत्स्यामि संयुगे ॥ १२ ॥
देवाः प्रथमतो भूयः प्रत्यूचुर्हृष्टमानसाः ।
एवं यथेष्टं नृपते कामः संपद्यतां तव ॥ १३ ॥
श्रुत्वा सुरगणानां तु वाक्यं राजा रजिस्तत्दा ।
पप्रच्छासुरमुख्यांस्तु यथा देवानपृच्छत ॥ १४ ॥
दानवा दर्पपूर्णास्तु स्वार्थमेवानुगम्य ह ।
प्रत्यूचुस्ते नृपवरं साभिमानमिदं वचः ॥ १५ ॥
अस्माकमिन्द्रः प्रह्रादो यस्यार्थे विजयामहे ।
अस्मिंस्तु समये राजंस्तिष्ठेथा राजसत्तम ॥ १६ ॥
स तथेति ब्रुवन्नेव देवैरप्यभिचोदितः ।
भविष्यसीन्द्रो जित्वैवं देवैरुक्तस्तु पार्थिवः ।
जघान दानवान् सर्वान् ये वध्या वज्रपाणिनः ॥ १७ ॥
स विप्रनष्टां देवानां परमश्रीः श्रियं वशी ।
निहत्य दानवान् सर्वानाजहार रजिः प्रभुः ॥ १८ ॥
ततो रजिं महावीर्यं देवैः सह शतक्रतुः ।
रजेः पुत्रोऽहमित्युक्त्वा पुनरेवाब्रवीद् वचः ॥ १९ ॥
इन्द्रोऽसि तात देवानां सर्वेषां नात्र संशयः ।
यस्याहमिन्द्रः पुत्रस्ते ख्यातिं यास्यामि कर्मभिः ॥ २० ॥
स तु शक्रवचः श्रुत्वा वञ्चितस्तेन मायया ।
तथेत्येवाब्रवीद् राजा प्रीयमाणः शतक्रतुम् ॥ २१ ॥
तस्मिंस्तु देवसदृशे दिवं प्राप्ते महीपतौ ।
दायाद्यमिन्द्रादाजह्रुराचारात्तनया रजेः ॥ २२ ॥
पञ्चपुत्रशतान्यस्य तद्वै स्थानं शतक्रतोः ।
समाक्रमन्त बहुधा स्वर्गलोकं त्रिविष्टपम् ॥ २३ ॥
ततो बहुतिथे काले समतीते महाबलः ।
हृतराज्योऽब्रवीच्छक्रो हृतभागो बृहस्पतिम् ॥ २४ ॥
इन्द्र उवाच
बदरीफलमात्रं वै पुरोडाशं विधत्स्व मे ।
ब्रह्मर्षे येन तिष्ठेयं तेजसाऽऽप्यायितः सदा ॥ २५ ॥
ब्रह्मन् कृशोऽहं विमना हृतराज्यो हृताशनः ।
हतौजा दुर्बलो मूढो रजिपुत्रैः कृतः प्रभो ॥ २६ ॥
बृहस्पतिरुवाच
यद्येवं चोदितः शक्र त्वयास्यां पूर्वमेव हि ।
नाभविष्यत्त्वत्प्रियार्थमकर्तव्यं ममानघ ॥ २७ ॥
प्रयतिष्यामि देवेन्द्र त्वत्प्रियार्थं न संशयः ।
यथा भागं च राज्यं च न चिरात् प्रतिलप्स्यसे ॥ २८ ॥
तथा तात करिष्यामि मा भूत् ते विक्लवं मनः ।
ततः कर्म चकारास्य तेजसो वर्धनं तदा ॥ २९ ॥
तेषां च बुद्धिसंमोहमकरोद् द्विजसत्तमः ।
नास्तिवादार्थशास्त्रं हि धर्मविद्वेषणम् परम् ॥ ३० ॥
परमं तर्कशास्त्राणामसतां तन्मनोऽनुगम् ।
न हि धर्मप्रधानानां रोचते तत्कथान्तरे ॥ ३१ ॥
ते तद् बृहस्पतिकृतं शास्त्रं श्रुत्वाल्पचेतसः ।
पूर्वोक्तधर्मशास्त्राणामभवन् द्वेषिणः सदा ॥ ३२ ॥
प्रवक्तुर्न्यायरहितं तन्मतं बहु मेनिरे ।
तेनाधर्मेण ते पापाः सर्व एव क्षयं गताः ॥ ३३ ॥
त्रैलोक्यराज्यं शक्रस्तु प्राप्य दुष्प्रापमेव च ।
बृहस्पतिप्रसादाद्धि परां निर्वृतिमभ्ययात् ॥ ३४ ॥
ते यदा तु सुसंमूढा रागोन्मत्ता विधर्मिणः ।
ब्रह्मद्विषश्च संवृत्ता हतवीर्यपराक्रमाः ॥ ३५ ॥
ततो लेभे सुरैश्वर्यमिन्द्रः स्थानं तथोत्तमम् ।
हत्वा रजिसुतान् सर्वान् कामक्रोधपरायणान् ॥ ३६ ॥
य इदं च्यावनं स्थानात् प्रतिष्ठां च शतक्रतोः ।
शृणुयाद् धारयेद्वापि न स दौरात्म्यमाप्नुयात् ॥ ३७ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
आयोर्वंशकीर्तनं नाम अष्टाविंशोऽध्यायः


आयुवंशकथन -

वैशंपायन सांगतात - "महात्म्या आयूचे पुत्र पांच होते. हे सर्वही मोठे शूर असून महारथी होते. स्वर्भानु जो राहु त्याची कन्या प्रभा तिजपासून हे झाले. हे राजा, यांपैकीं नहुष प्रथम जन्मला. नंतर वृद्धशर्मा, रंभ, रजि व अनेना. हे सर्वही त्रैलोक्यांत विख्यात होते. यांपैकी रजीनें पाचशें पुत्र उत्पन्न केले. हे सर्वही राजेय या नांवानें विख्यात असून त्यांचें प्रत्यक्ष इंद्रालाही भय पाडणारें असें एक विख्यात क्षत्रियंमंडळच बनले. पुढें एकदा देव व दानव यांमध्ये एक भयंकर लढाई उत्पन्न झाली. त्या वेळीं देव व असुर हे दोघेही ब्रह्मदेवाकडे येऊन म्हणाले, 'हे भगवन, आम्हां दोघांपैकी या युद्धांत विजयी कोण होईल तें ऐकण्याची आमची इच्छा आहे. आपण सर्व देवांत श्रेष्ठ असें समजून आम्ही आपणास प्रश्न करीत आहो, तरी आपला अभिप्राय काय तो सांगावा."

ब्रह्मदेव म्हणाले - "बाबाहो, खरी गोष्ट अशी आहे कीं, आयुःपुत्र रजि हा तुम्हां दोघांपैकी ज्यांच्या बाजूनें शस्त्र घेऊन युद्धास उभा राहील त्यांची बाजू त्रिभुवनांत विजयी होईल यांत संदेह नाहीं. तुम्ही हें खास समजा कीं, जेथे रजि तेथेंच धैर्य, व जेथे धैर्य तेथेंच संपत्ति, व जेथे धैर्य आणि संपत्ति तेथेंच धर्म; आणि धर्म तेथेंच जय हें उघडच आहे.

ब्रह्मदेवांचें हें भाषण ऐकून देव व दानव या दोघांनाही मोठा आनंद झाला, व आपल्या पक्षाचा जय व्हावा, अशी दोघांचीही इच्छा असल्यामुळें दोघेही आपल्या पक्षाचे सेनानायकत्व रजीनें पत्करावें म्हणून रजीची प्रार्थना करण्याकरितां त्याकडे आले. दोघांनाही आपला त्याजवर हक्क आहे असें वाटत होतें. कारण, हा परम तेजस्वी रजि हा एका बाजूनें सोमवंशीय होता, तर मातृपक्षानें तो असुरपक्षीयच होता. कारण, राहूची कन्या जी प्रभा तिचा तो मुलगा, व म्हणून राहूचा नातु; यामुळें देव व दानव हे दोघेही मोठया उत्सुकतेनें रजीकडे गेले, व दोघेही आपआपल्यापरी "आमच्या पक्षाचा जय व्हावा म्हणून तूं आपलें श्रेष्ठ धनुष्य घेऊन आमचे बाजूनें उभा रहा," असें त्याला म्हणूं लागले. रजीनें पाहिलें कीं, हे देव व दैत्य हे दोघेही आपआपल्या मतलबासाठी भांडत आहेत. तर आपणही कां कमी करा ? आपणही या वेळीं युद्ध करणेंच तर लौकिक संपादून शिवाय आपला मतलबही साधून घ्यावा. असें मनांत आणून तो प्रथम इंद्रप्रभृति देवांना म्हणाला, "हे देवहो, मी तुम्हांस साहाय्य करावें असें असेल तर मीं तुमच्या बाजूस उभा राहून युद्धांत सर्व दैत्यगणास जिंकिले असतां तुम्हीं मला हक्कानें इंद्राचें पद दिलें पाहिजे. ही गोष्ट कबूल असेल तर मी तुमचा." देवांच्या हे शब्द प्रथम कानीं पडतांच त्यांना फार आनंद होऊन ते त्या भरांत रजीला म्हणाले, "हे राजा, फार ठीक आहे; तुझ्या मनांत जशी इच्छा असेल तशी ती पुरी होऊं दे. आमची तयारी आहे."

याप्रमाणें देवांचे उत्तर मिळाल्यावर रजीनें जो देवांना प्रश्न केला होता, तोच तेथें आलेल्या मुख्य असुरांना केला. परंतु, असुर पडलें गर्विष्ठ, त्यांना केवळ स्वार्थापुरतें पहाणे. (रजीला इंद्रत्व देणें हें त्यांना कोठून खपणार ?). म्हणून ते कुर्र्‍यांतच त्याला म्हणाले, "हें कसें घडावे; आमचा इंद्र प्रर्‍हाद हा ठरलेलाच आहे; व त्याला व विजय मिळवून देण्यासाठीं तर ही सारी आमची खटपट आहे. तेव्हां तुझें म्हणणें आम्हांला मान्य नाहीं. तूं आपला खुशाल देवांचा करार पत्करून त्यांनाच साह्य हो. आम्हांला भलत्याच अटीवर तुझी गरज नाहीं." रजीनें म्हटलें, 'फार बरें.' त्याबरोबर देव पुन्हा पुढे सरून म्हणाले, "हे राजा, तुझ्या इच्छेप्रमाणें आम्ही तुला इंद्र करितों. तूं आतां आमच्या बाजूनें उभा रहा." या प्रमाणें देवांनी नेमणूक करितांच रजीनें तडाका लाविला; व वज्रपाणि इंद्रालाही जे दानव अजिंक्य झाले होते, त्या सर्वांचा फडशा पाडला. त्या मोठया पाणीदार व जितेंद्रिय अशा समर्थ योद्ध्यानें देवांची जी सर्व संपत्ति विनष्ट झाली होती ती दैत्यांना ठार करून सगळीच्या सगळी परत आणिली. याप्रमाणें रजी अंगीकारिलेली कामगिरी पुरी केलीसें पाहून इंद्रासहित देव त्याचा गौरव करण्यासाठीं पुढें आले; व इंद्र त्याला म्हणाला, हे बाबा रजिराजा, येथें असलेल्या आम्हां सर्व देवांचा तूं इंद्र झालास, ही गोष्ट निर्विवाद आहे. मला तर यांत मोठाच आनंद झाला आहे. कारण मी आजपासून तुला माझा पिता समजून मी आपल्याला तुझा पुत्र म्हणविणार. कारण, असें केल्यानें मी जास्तीच अब्रूला चढेन, असा माझा भरवंसा आहे.' इंद्राचें हें वचन खरें पहाता लबाडीचें होतें. व तें रजीला रुचावयास नको होतें; पण इंद्रानें तशीच माया पसरल्यामुळें असल्या वस्ताद राजाला देखील भूल पडली, व इंद्राचें कपट ध्यानीं न येतां तो मोठया प्रसन्न मनानें इंद्राला म्हणाला कीं, ठीक आहे. तूं माझें पुत्रत्व कबूल केलेंस यांत सर्व आलें. (आणखी इंद्राची निराळी गादीच मला काय करावयाची आहे ?) याप्रमाणें रजीची समजूत पडून जिकडच्या तिकडे झाले.

पुढें कालगतीनें तो देवतुल्य रजीराजा इहलोक सोडून स्वर्गीं गेला. त्याच्या पश्चात त्याचे सर्वही पांचशें पुत्र हे इंद्राकडे म्हणजे स्वर्गलोकांत आले, व त्याला म्हणाले की, तूं आमच्या बापाचा जर पुत्र म्हणवितोस तर आमचा भाऊ झालास. तेव्हां, तूंच एकटा हें स्वर्गाचें राज्य भोगणार कोण ? आमचे हिस्से टाक. असें म्हणून त्यांनीं इंद्रावर मोठी गर्दी केली. तेव्हां इंद्रानें निरुपायास्तव त्यांना वांटे दिले. याप्रमाणें रजीपुत्रांनीं आपआपले हिस्से बळकावून इंद्र हा राज्याला व यज्ञांतील हविर्भागाला बहुतेक मुकल्यासारखा होऊन बराच वेळ झाल्यावर गुरु बृहस्पतीकडे जाऊन त्याला म्हणाला, 'गुरो, हे ब्रह्मर्षे, हे प्रभो, पहा बरें माझी कोण दशा झाली आहे ? या रजीपुत्रांनीं माझें सर्व राज्य घेऊन मला कसें निस्तेज, दुर्बळ व मूढ करून सोडलें आहे ? मला पुरेसें पोटाला देखील मिळत नाहीं व त्यामुळें हीं माझी हाडें निघाली आहेत, ही आपण पाहातच आहां. काय सांगू ? मी मनांत अगदीं खिन्न झालों आहें. आतां आपणच कांहीं कृपा कराल तर बरें.'

इंद्राचे हें वचन ऐकून बृहस्पति म्हणाला, "हे इंद्रा, तूं जर अशी गोष्ट मला पूर्वीं कळवितास तर तुझ्या कल्याणासाठीं मला जी एक भलतीच गोष्ट करावी लागली ती करावी लागतीना. तथापि, तूं मजकडे आलाच आहेस, त्या अर्थीं, हे देवेंद्रा, जेणेंकरून तुझें राज्य व हविर्भाग तुला त्वरित परत मिळेल तसला यत्न मी करीन; यांत संशय मानूं नको. हे बेटा, तूं कांहीं खेद करूं नको, आणि कष्टी, होऊं नको. मी बोललों आहें असें करीन, जा.'

याप्रमाणें इंद्राला आश्वासन दिल्यावर बृहस्पतींनीं इंद्राचें जेणेंकरून तेज वाढेल असलें कांहींएक कृत्य केलें; व त्याचे उलट त्या रजिपुत्रांच्या बुद्धीला मोह पडेल अशीही एक युक्ति केली. ती युक्ति हीच कीं, धर्माला अत्यंत विरुद्ध, तर्कटांत (तर्कशास्त्रांत) पहिली प्रत, व खोटया लोकांना अनुकूल, अशा तर्‍हेचें एक नास्तिक शास्त्र (ज्यांत धर्म नाहीं, ईश्वर नाहीं, असें प्रतिपादन केलें आहे) बृहस्पतीसारख्या सतब्राह्मणानें रचिलें. हे शास्त्र कानीं पडतांच जे विशेष धार्मिकबुद्धीचे लोक आहेंत त्यांच्या कपाळाची शीरच उठते. त्यांना तें ऐकावेंसेंही वाटत नाहीं. परंतु, रजीचे ते पांचशें पुत्र बेटे ते अल्पमतीच होते, त्यांना हें बृहस्पतीचें नवीन शास्त्र पटलें. वास्तविक पाहातां त्या शास्त्रांतील सिद्धांत न्यायाला सोडून होते, पण त्यांचा कर्ता बृहस्पति, त्याची बोलण्याची सफाई त्याची त्यालाच. त्यानें ते सिद्धांत असे कांहीं सजवून मांडले होते कीं, त्यांची त्या मूर्खांवर तेव्हांच छाप बसली, व तेच सिद्धांत प्रमाण मानून ते चालत आलेल्या सनातन धर्मशास्त्राचे द्वेष्टे बनले, व त्यामुळें हातून अधर्म घडून ते सर्वही पातकी क्षयाच्या पंथाला लागले. या नव्या मतानें त्यांच्या बुद्धीला पक्कीच भूल पडली. ते ब्राह्मणांचा द्वेष करूं लागले, विषयासक्त होऊन उन्मत्त झाले; व काम आणि क्रोध यांच्या तडाक्यांत सांपडून धर्मभ्रष्ट झाले; अखेर निर्वीर्य व पराक्रमहीन झाले. त्यांची अशी दशा झाली, तेव्हां इंद्रानें संधी साधून त्यांना पुट्‌दिशी मारून टाकिलें व पुनरपि आपली देवमुख्याची गादी मिळविली. याप्रमाणें एकवार त्याला जें राज्य दुष्प्राप्य वाटत होतें तें पुन्हा प्राप्त होऊन देवेंद्र अति सुखी झाला.

जे कोणी इंद्राचें हें स्वस्थानापासून भ्रंश पावणें व पुन्हा स्थानारूढ होणें श्रवण करतील किंवा मनन करितील, त्यांना कधींही दुष्टांपासून त्रास होणार नाहीं.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
आयोर्वंशकीर्तनं नाम अष्टाविंशोऽध्यायः ॥ २८ ॥
अध्याय अठ्ठाविसावा समाप्त

GO TOP