श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकोनत्रिंशोऽध्यायः


काश्यपवर्णनम्

वैशंपायन उवाच
रम्भोऽनपत्यस्तत्रासीद् वंशं वक्ष्याम्यनेनसः ।
अनेनसः सुतो राजा प्रतिक्षत्रो महायशाः ॥ १ ॥
प्रतिक्षत्रसुतश्चापि सृञ्जयो नाम विश्रुतः ।
सृञ्जयस्य जयः पुत्रो विजयस्तस्य चात्मजः ॥ २ ॥
विजयस्य कृतिः पुत्रस्तस्य हर्यश्वतः सुतः ।
हर्यश्वतसुतो राजा सहदेवः प्रतापवान् ॥ ३ ॥
सहदेवस्य धर्मात्मा नदीन इति विश्रुतः ।
नदीनस्य जयत्सेनो जयत्सेनस्य संकृतिः ॥ ४ ॥
संकृतेरपि धर्मात्मा क्षत्रधर्मा महायशाः ।
अनेनसः समाख्याताः क्षत्रवृद्धस्य मे शृणु ॥ ५ ॥
क्षत्रवृद्धात्मजस्तत्र सुनहोत्रो महायशाः ।
सुनहोत्रस्य दायादास्त्रयः परमधार्मिकाः ॥ ६ ॥
काशः शलश्च द्वावेतौ तथा गृत्समदः प्रभुः ।
पुत्रो गृत्समदस्यापि शुनको यस्य शौनकः ॥ ७ ॥
ब्राह्मणाः क्षत्रियाश्चैवं वैश्याः शूद्रास्तथैव च ।
शलात्मजश्चार्ष्टिषेणस्तनयस्तस्य काशकः ॥ ८ ॥
काशस्य काशयो राजन् पुत्रो दीर्घतपास्तथा ।
धन्वस्तु दीर्घतपसो विद्वान् धन्वन्तरिस्ततः ॥ ९ ॥
तपसोऽन्ते सुमहतो जातो वृद्धस्य धीमतः ।
पुनर्धन्वन्तरिर्देवो मानुषेष्विह जज्ञिवान् ॥ १० ॥
जनमेजय उवाच
कथं धन्वन्तरिर्देवो मानुषेष्विह जज्ञिवान् ।
एतद् वेदितुमिच्छामि तन्मे ब्रूहि यथातथम् ॥ ११ ॥
वैशंपायन उवाच
धन्वन्तरेः सम्भवोऽयं श्रूयतां भरतर्षभ ।
जातः स हि समुद्रात्तु मथ्यमाने पुरामृते ॥ १२ ॥
उत्पन्नः कलशात् पूर्वं सर्वतश्च श्रिया वृतः ।
अभ्यसन् सिद्धिकार्ये हि विष्णुं दृष्ट्वा हि तस्थिवान् ॥ १३ ॥
अब्जस्त्वमिति होवाच तस्मादब्जस्तु स स्मृतः ।
अब्जः प्रोवाच विष्णुं वै तव पुत्रोऽस्मि वै प्रभो ॥ १४ ॥
विधत्स्व भागं स्थानं च मम लोके सुरेश्वर ।
एवमुक्तः स दृष्ट्वा वै तथ्यं प्रोवाच तं प्रभुः ॥ १५ ॥
कृतो यज्ञविभागो हि यज्ञियैर्हि सुरैः पुरा ।
देवेषु विनुयुक्तं हि विद्धि होत्रं महर्षिभिः ॥ १६ ॥
न शक्यमुपहोमा वै तुभ्यं कर्तुं कदाचन ।
अर्वाग्भूतोऽसि देवानां पुत्र त्वं तु न हीश्वरः ॥ १७ ॥
द्वितीयायां तु संभूत्यां लोके ख्यातिं गमिष्यसि ।
अणिमादिश्च ते सिद्धिर्गर्भस्थस्य भविष्यति ॥ १८ ॥
तेनैव त्वं शरीरेण देवत्वं प्राप्स्यसे प्रभो ।
चरुमन्त्रैर्व्रतैर्जाप्यैर्यक्ष्यन्ति त्वां द्विजातयः ॥ १९ ॥
अष्टधा त्वं पुनश्चैवमायुर्वेदं विधास्यसि ।
अवश्यभावी ह्यर्थोऽयं प्राग्दृष्टस्त्वब्जयोनिना ॥ २० ॥
द्वितीयं द्वापरं प्राप्य भविता त्वं न संशयः ।
इमं तस्मै वरं दत्त्वा विष्णुरन्तर्दधे पुनः ॥ २१ ॥
द्वितीये द्वापरं प्राप्ते सौनहोत्रिः स काशिराट् ।
पुत्रकामस्तपस्तेपे धिन्वन्दीर्घतपास्तदा ॥ २२ ॥
प्रपद्ये देवतां तां तु या मे पुत्रं प्रदास्यति ।
अब्जं देवं सुतार्थाय तदाऽऽराधितवान् नृपः ॥ २३ ॥
ततस्तुष्टः स भगवानब्जः प्रोवाच तं नृपम् ।
यदिच्छसि वरं ब्रूहि तत् ते दास्यामि सुव्रत ॥ २४ ॥
नृप उवाच
भगवन् यदि तुष्टस्त्वं पुत्रो मे ख्यातिमान् भव ।
तथेति समनुज्ञाय तत्रैवान्तरधीयत ॥ २५ ॥
तस्य गेहे समुत्पन्नो देवो धन्वन्तरिस्तदा ।
काशिराजो महाराज सर्वरोगप्रणाशनः ॥ २६ ॥
आयुर्वेदं भरद्वाजात् प्राप्येह भिषजां क्रियाम् ।
तमष्टधा पुनर्व्यस्य शिष्येभ्यः प्रत्यपादयत् ॥ २७ ॥
धन्वन्तरेस्तु तनयः केतुमानिति विश्रुतः ।
अथ केतुमतः पुत्रो वीरो भीमरथः स्मृतः ॥ २८ ॥
सुतो भीमरथस्यापि दिवोदासः प्रजेश्वरः ।
दिवोदासस्तु धर्मात्मा वाराणस्यधिपोऽभवत् ॥ २९ ॥
एतस्मिन्नेव काले तु पुरीं वाराणसीं नृप ।
शून्यां निवासयामास क्षेमको नाम राक्षसः ॥ ३० ॥
शप्ता हि सा मतिमता निकुंभेन महात्मना ।
शून्या वर्षसहस्रं वै भवित्री नात्र संशयः ॥ ३१ ॥
तस्यां तु शप्तमात्रायां दिवोदासः प्रजेश्वरः ।
विषयान्ते पुरीं रम्यां गोमत्यां संन्यवेशयत् ॥ ३२ ॥
भद्रश्रेण्यस्य पूर्वं तु पुरी वाराणसीत्यभूत् ।
भद्रश्रेण्यस्य पुत्राणां शतमुत्तमधन्विनाम् ॥ ३३ ॥
हत्वा निवेशयामास दिवोदासो नरर्षभः ।
भद्रश्रेण्यस्य तद् राज्यं हृतं तेन बलीयसा ॥ ३४ ॥
जनमेजय उवाच
वाराणसीं निकुम्भस्तु किमर्थं शप्तवान् प्रभुः ।
निकुम्भकश्च धर्मात्मा सिद्धिक्षेत्रं शशाप यः ॥ ३५ ॥
वैशंपायन उवाच
दिवोदासस्तु राजर्षिर्नगरीं प्राप्य पार्थिवः ।
वसति स्म महातेजाः स्फीतायां तु नराधिपः ॥ ३६ ॥
एतस्मिन्नेव काले तु कृतदारो महेश्वरः ।
देव्याः स प्रियकामस्तु न्यवसच्छ्वशुरान्तिके ॥ ३७ ॥
देवाज्ञया पार्षदा ये त्वधिरूपास्तपोधनाः ।
पूर्वोक्तैरुपदेशैश्च तोषयन्ति स्म पार्वतीम् ॥ ३८ ॥
हृष्यते वै महादेवी मेना नैव प्रहृष्यति ।
जुगुप्सत्यसकृत् तां वै देवीं देवं तथैव सा ॥ ३९ ॥
सपार्षदस्त्वनाचारस्तव भर्ता महेश्वरः ।
दरिद्रः सर्वदैवासौ शीलं तस्य न वर्तते ॥ ४० ॥
मात्रा तथोक्ता वरदा स्त्रीस्वभावाच्च चुक्रुधे ।
स्मितं कृत्वा च वरदा भवपार्श्वमथागमत् ॥ ४१ ॥
विवर्णवदना देवी महादेवमभाषत ।
नेह वत्स्याम्यहं देव नय मां स्वं निकेतनम् ॥ ४२ ॥
तथा कर्तुं महादेवः सर्वलोकानवैक्षत ।
वासार्थं रोचयामास पृथिव्यां कुरुनन्दन ॥ ४३ ॥
वाराणसी महातेजाः सिद्धिक्षेत्रं महेश्वरः ।
दिवोदासेन तां ज्ञात्वा निविष्टां नगरीं भवः ॥ १-२०-४४ ॥
पार्श्वे तिष्ठन्तमाहूय निकुम्भमिदमब्रवीत् ।
गणेश्वर पुरीं गत्वा शून्यां वाराणसीं कुरु ॥ ४५ ॥
मृदुनैवाभ्युपायेन ह्यतिवीर्यः स पार्थिवः ।
ततो गत्वा निकुम्भस्तु पूरीं वाराणसीं तदा ॥ ४६ ॥
स्वप्ने निदर्शयामास कण्डुकं नाम नापितम् ।
श्रेयस्तेऽहं करिष्यामि स्थानं मे रोचयानघ ॥ ४७ ॥
मद्‌रूपां प्रतिमां कृत्वा नगर्यन्ते तथैव च ।
ततः स्वप्ने यथोद्दिष्टं सर्वं कारितवान् नृप ॥ ४८ ॥
पुरीद्वारे तु विज्ञाप्य राजानं च यथाविधि ।
पूजां तु महतीं तस्य नित्यमेव प्रयोजयत् ॥ ४९ ॥
गन्धैश्च धूपमाल्यैश्च प्रोक्षणीयैस्तथैव च ।
अन्नपानप्रयोगैश्च अत्यद्भुतमिवाभवत् ॥ ५० ॥
एवं संपूज्यते तत्र नित्यमेव गणेश्वरः ।
ततो वरसहस्रं तु नागराणां प्रयच्छति ।
पुत्रान् हिरण्यमायुश्च सर्वान् कामांस्तथैव च ॥ ५१ ॥
राज्ञस्तु महिषी श्रेष्ठा सुयशा नाम विश्रुता ।
पुत्रार्थमागता देवी साध्वी राज्ञा प्रचोदिता ॥ ५२ ॥
पूजां तु विपुलां कृत्वा देवी पुत्रमयाचत ।
पुनः पुनरथागम्य बहुशः पुत्रकारणात् ॥ ५३ ॥
न प्रयच्छति पुत्रं हि निकुंभः कारणेन हि ।
राजा तु यदि नः कुप्येत् कार्यसिद्धिस्ततो भवेत् ॥ ५४ ॥
अथ दीर्घेण कालेन क्रोधो राजानमाविशत् ।
भूत एष महान् द्वारि नागराणां प्रयच्छति ॥ ५५ ॥
प्रीतो वरान्वै शतशो मम किं न प्रयच्छति ।
मामकैः पूज्यते नित्यं नगर्यां मे सदैव हि ॥ ५६ ॥
विज्ञापितो मयात्यर्थं देव्या मे पुत्रकारणात् । ॥
न ददाति च पुत्रं मे कृतघ्नः केन हेतुना ॥ ५७ ॥
ततो नार्हति सत्कारं मत्सकाशाद् विशेषतः ।
तस्मात् तु नाशयिष्यामि स्थानमस्य दुरात्मनः ॥ ५८ ॥
एवं स तु विनिश्चित्य दुरात्मा राजकिल्बिषी ।
स्थानं गणपतेस्तस्य नाशयामास दुर्मतिः ॥ ५९ ॥
भग्नमायतनं दृष्ट्वा राजानमशपत् प्रभुः ।
यस्मादनपराधस्य त्वया स्थानं विनाशितम् ।
पुर्यकस्मादियं शून्या तव नूनं भविष्यति ॥ ६० ॥
ततस्तेन तु शापेन शून्या वाराणसी तदा ।
शप्त्वा पुरीं निकुंभस्तु महादेवमथागमत् ॥ ६१ ॥
अकस्मात् तु पुरी सा तु विद्रुता सर्वतोदिशम् ।
तस्यां पुर्यां ततो देवो निर्ममे पदमात्मनः ॥ ६२ ॥
रमते तत्र वै देवो रममाणो गिरेः सुताम् ।
न रतिं तत्र वै देवी लभते गृहविस्मयात् ।
वसाम्यत्र न पुर्यां तु देवी देवमथाब्रवीत् ॥ ६३ ॥
देव उवाच
नाहं वेश्मनि वत्स्यामि अविमुक्तं हि मे गृहम् ।
नाहं तत्र गमिष्यामि गच्छ देवि गृहं प्रति ॥ ६४ ॥
हसन्नुवाच भगवांस्त्र्यम्बकस्त्रिपुरान्तकः ।
तस्मात् तदविमुक्तं हि प्रोक्तं देवेन वै स्वयम् ॥ ६५ ॥
एवं वाराणसी शप्ता अविमुक्तं च कीर्तितम् ॥ ६६ ॥
यस्मिन् वसति वै देवः सर्वदेवनमस्कृतः ।
युगेषु त्रिषु धर्मात्मा सह देव्या महेश्वरः ॥६७ ॥
अन्तर्धानं कलौ याति तत्पुरं हि महात्मनः ।
अन्तर्हिते पुरे तस्मिन् पुरी सा वसते पुनः ।
एवं वाराणसी शप्ता निवेशं पुनरागता ॥ ६८ ॥
भद्रश्रेण्यस्य पुत्रो वै दुर्दमो नाम विश्रुतः ।
दिवोदासेन बालेति घृणया स विवर्जितः ॥ ६९ ॥
हैहयस्य तु दायाद्यं कृतवान् वै महीपतिः ।
आजह्रे पितृदायाद्यं दिवोदासहृतं बलात् ॥ ७० ॥
भद्रश्रेण्यस्य पुत्रेण दुर्दमेन महात्मना ।
वैरस्यान्तं महाराज क्षत्रियेण विधित्सता ॥ ७१ ॥
दिवोदासाद् दृषद्वत्यां वीरो जज्ञे प्रतर्दनः ।
तेन पुत्रेण बालेन प्रहृतं तस्य वै पुनः ॥ ७२ ॥
प्रतर्दनस्य पुत्रौ द्वौ वत्सभार्गौ बभूवतुः ।
वत्सपुत्रो ह्यलर्कस्तु सन्नतिस्तस्य चात्मजः ॥ ७३ ॥
अलर्कः काशिराजस्तु ब्रह्मण्यः सत्यसङ्गरः ।
अलर्कं प्रति राजर्षिं श्लोको गीतः पुरातनैः ॥ ७४ ॥
षष्टिवर्षसहस्राणि षष्टिं वर्षशतानि च ।
युवा रूपेण संपन्न आसीत् काशिकुलोद्वहः ॥ ७५ ॥
लोपामुद्राप्रसादेन परमायुरवाप सः ।
तस्यासीत्सुमहद्राज्यं रूपयौवनशालिनः ॥ ७६ ॥
शापस्यान्ते महाबाहुर्हत्वा क्षेमकराक्षसम् । ॥
रम्यां निवेशयामास पुरीं वाराणसीं पुनः ॥ ७७ ॥
सन्नतेरपि दायादः सुनीथो नाम धार्मिकः । ॥
सुनीथस्य तु दायादः क्षेम्यो नाम महायशाः ॥ ७८ ॥
क्षेम्यस्य केतुमान् पुत्रः सुकेतुस्तस्य चात्मजः । ॥
सुकेतोस्तनयश्चापि धर्मकेतुरिति स्मृतः ॥ ७९ ॥
धर्मकेतोस्तु दायादः सत्यकेतुर्महारथः । ॥
सत्यकेतुसुतश्चापि विभुर्नाम प्रजेश्वरः ॥ ८० ॥
आनर्तस्तु विभोः पुत्रः सुकुमारस्तु तत्सुतः । ॥
सुकुमारस्य पुत्रस्तु धृष्टकेतुः सुधार्मिकः ।
धृष्टकेतोस्तु दायादो वेणुहोत्रः प्रजेश्वरः ॥ ८१ ॥
वेणुहोत्रसुतश्चापि भर्गो नाम प्रजेश्वरः ।
वत्सस्य वत्स्भूमिस्तु भृगुभूमिस्तु भार्गवात् ॥ ८२ ॥
एते त्वङ्गिरसः पुत्रा जाता वंशेऽथ भार्गवे ।
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्यास्तयोः पुत्राः सहस्रशः ।
इत्येते काशयः प्रोक्ता नहुषस्य निबोध मे ॥ ८३ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
काश्यपवर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः


काश्यपवर्णन -

वैशंपायन सांगतात - "हे राजा, (रजीचा वंश सांगितला, आतां रंभाचा सांगावयाचा परंतु) रंभाला अपत्यच नव्हतें, म्हणून आतां मी अनेनाचा वंश सांगतों. या अनेनाला मोठा विख्यात असा प्रतिक्षत्र हा पुत्र झाला. प्रतिक्षत्राचा पुत्र सृंजय नांवानें प्रसिद्ध झाला. सृंजयाचा पुढें जय; आणि जयाचा पुढें विजय. विजयाला कृति हा पुत्र झाला; व कृतीला हर्यश्व झाला. या हर्यश्वाच्या पोटीं प्रतापी राजा सहदेव जन्मला. सहदेवाला पुढें नदीन नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला. या नदीनापासून जयत्सेन व जयत्सेनापासून संकृति. संकृतीला मोठा यशस्वी व धर्मनिष्ठ असा क्षत्रधर्मा हा पुत्र झाला. याप्रमाणें हा अनेनाचा वंश झाला. आतां ज्याला कधीं कधीं वृद्धशर्मा असेंही म्हणत, त्या क्षत्रवृद्धाचा वंश ऐक. या क्षत्रवृद्धाला सुनेत्र नांवाचा मोठा लौकिकवान् पुत्र झाला. सुनेत्राला पुढें मोठे धार्मिक असे तीन पुत्र झाले. काल व शल हे दोघे, आणि तिसरा राजा गृत्समद.

गृत्समदाला पुढें शुनक झाला. या शुनकाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारी वर्णांची संतति झाली. ती सर्वही शौनक या नांवानेंच मोडत होती. असो; या गृत्समदाचा जो शल नामक बंधु सांगितला त्याचे पोटीं आर्ष्टिषेण हा आला. आर्ष्टिषेणाचा पुत्र कासक. काशकाचा काशय आणि दीर्घतप. पैकीं दीर्घतपाला धन्व नामक पुत्र झाला; व हाच पुढें धन्वंतरी नांवानें विख्यात झाला. याचा इतिहास असा आहे कीं, हा धन्वंतरी प्रथम समुद्रमंथनाचे वेळीं देवयोनींत निर्माण झाला होता; परंतु, पुढें या दीर्घतप राजानें बहुत कालपर्यंत बुद्धिपुरःसर पुत्रप्राप्त्यर्थ जेव्हां मोठेंच तप केलें, तेव्हां तोच धन्वंतरी मनुष्यरूपानें त्या दीर्घतपाचे पोटीं आला. जनमेजय विचारितो - "धन्वंतरी हा देव असून या मर्त्यलोकीं मनुष्ययोनींत जन्मास कां आला हें ऐकण्याची माझी इच्छा आहे. याकरितां, हे वैशंपायना, मला त्याचें जन्मवृत्त जसेंच्या तसेंच सांगा."

वैशंपायन सांगतात - "हे भरतश्रेष्ठा, ऐक. मी धन्वंतरीची उत्पत्ति तुला सांगतो. पूर्वीं ज्या वेळीं अमृतप्राप्तीसाठीं (देवासुरांनी) समुद्रमंथन केलें त्या वेळीं धन्वंतरी हा समद्रांतून उत्पन्न झाला. तो जों समुद्राबाहेर आला, तोच श्रीविष्णु त्याचे दृष्टीस पडल्यामुळें कांहीं इष्टकार्य सिद्ध व्हावें, हा हेतु मनांत धरून विष्णूचें ध्यान करीत उभा राहिला. तो जन्मतःच सर्वांगसुंदर असून त्याचे भोंवतीं एक तर्‍हेची शोभा पसरली होती. हा समुद्राच्या जलांतून उत्पन्न झाला, ही गोष्ट ध्यानांत आणून श्रीविष्णूंनी त्याला तूं अब्ज (अप म्हणजे पाणी त्यापासून ज म्हणजे जन्मलेला) आहेस, असें म्हटलें; व तेव्हांपासून त्याचें अब्ज हेंच नांव पडलें. मग तो अब्ज श्रीविष्णूला म्हणाला, "हे प्रभो, मी आपला पुत्र आहें. याकरितां कृपा करून मला यज्ञांत हविर्भाग व देवमंडळींत बसण्याला जागा, ही आपण द्यावी. कारण आपण देवांचे मालकच आहां." याप्रमाणें धन्वंतरीनें प्रार्थना करितांच विष्णूनें खरी स्थिति काय होती, ती मनाशीं तपासून पाहून त्याला उत्तर केलें कीं, "हे पुत्रा, तूं म्हणतोस खरें, परंतु फार प्राचीन काळींच यज्ञामध्यें भाग घेण्यांचा ज्यांचा हक्क पुरत होता, त्या त्या देवांनीं आपले विभाग आपआपसांत ठरवून ही गोष्ट संपवून टाकिली आहे; व त्यांच्या त्या ठरावाप्रमाणेंच मोठमोठाल्या ऋषींनींही आपआपल्या यज्ञांत देवांना हिस्सेरशीनें भाग दिले आहेत. बाबारे, तूं कालचा पोर. तूं देवांच्या पंक्तीस कसा बसणार ? तेव्हां मुख्य यज्ञीयांत तुझा प्रवेश होणें शक्यच नाही. बरें; बारीक सारीक होमांत तुझा भाग ठरवावा तर तुझ्या थोरवीला रुचणार नाहीं याकरितां मी सांगतो तें ऐक. पुढल्या जन्मीं लोकांत तुझी अतिशय कीर्ति होईल व तूं आईचे गर्भांत आहेस तोंच अणिमादि अष्टसिद्धि तुला माळ घालतील; व मग त्याच शरीरानें तुला देवत्व प्राप्त होऊन ब्राह्मणगण तुझ्या उद्देशानें चरु, मंत्र, व्रत व जाप्यही करितील. तूंही लोकहितार्थ अष्टांगांनी युक्त असा आयुर्वेद निर्माण करशील. मी जी गोष्ट तुला सांगतो ती अशी झालीच पाहिजे. कारण, ब्रह्मदेवानें ही योजना पूर्वींच करून ठेविली आहे. याकरितां जेव्हां पुढले द्वापर युग येईल तेव्हां तूं निखालस मी सांगतो आहें त्याप्रमाणें जन्मास जाशील. याप्रमाणें धन्वंतरीला वर देऊन श्रीविष्णु तेथेंच अंतर्धान पावले.

दुसरे द्वापरयुग जेव्हां आलें त्या वेळीं काशीचा राजा सुनहोत्राचा पुत्र दीर्घतपा हा पुत्रप्राप्तीच्या इच्छेनें तप करूं लागला. त्या तपांत त्यानें असा उद्देश ठेविला कीं, जी देवता आपल्याला पुत्र देईल तिचीच आराधना करावयाची. अशी देवता अब्ज म्हणजे धन्वंतरी आहे, असें त्याला वाटून त्यानें पुत्रप्राप्त्यर्थ त्याचीच आराधना केली. त्या वेळीं तो भगवान अब्ज संतुष्ट होऊन त्या राजाला म्हणाला, "हे सुव्रता, तुझी इच्छा असेल तर वर माग. तो मी तुला देईन."

राजा म्हणाला - "हे भगवन्, आपण खरोखरच मजवर प्रसन्न असाल तर आपणच माझे कीर्तिमान पुत्र व्हा.' राजाची ती मागणी कबूल करून धन्वंतरी तेथेंच अंतर्धान पावले; व कांहीं काळानें त्या राजाच्या घरांत देव धन्वंतरी पुत्ररूपानें उत्पन्न झाले. या जन्मीं या धन्वंतरींना काशीराजा ही पदवी होती. कोणताही रोग नाहींसा करण्याचें सामर्थ्य त्याचें अंगी होते. कारण, वैद्यांची विद्या म्हणजे आयुर्वेद व वैद्यक्रिया ही त्यांनीं भरद्वाज मुनीपासून संपादिलीं होती. पुढें त्यांनीं या आयुर्वेदाचे आठ भाग, वेगळे करून आपल्या शिष्यांना पढविले. असो; या धन्वंतरीचा पुत्र केतुमान म्हणून झाला. केतुमानाला पुढें भीमरथ नांवाचा वीर पुत्र झाला. याचा पुत्र राजा दिवोदास. हा मोठा धर्मात्मा असून वाराणशीचा मालक होता. याच्या कारकिर्दींत वाराणशी नगरी ही ओस पडली. पुढें बहुत कालानें क्षेमकनामक राक्षसानें - हा रुद्राचा सेवक होता. ती पुन्हा वसविली. ही ओस पडण्याचें कारण, रुद्रानुचर निकुंभ यानें त्या नगरीला 'तूं एक सहस्त्र वर्षेपर्यंत ओस पडशील,' असा शाप दिला होता - त्याचा हा शाप दिवोदासाचे कानीं येतांच त्यानें आपल्या मूळ प्रांताच्या सीमेला लागूनच गोमती नदीचे तीरीं दुसरी नवीन एक टुमदार राजधानी वसविली. नाहींतरी वाराणशी ही मूळची दिवोदासाची नव्हती. ती भद्रश्रेण्यराजाची नगरी होती. पुढें ती भद्रश्रेण्याचे शंभर पुत्रांचे ताब्यांत गेली. ते सर्वही मोठे धनुर्धारी होते. तथापि, त्या सर्वांना मारून त्या बलाढय दिवोदासानें भद्रश्रेण्याची ती राजधानी आपण बळकाविली. जनमेजय विचारितो - हे वैशंपायना, रुद्रगण निकुंभ हा मोठा धर्मनिष्ठ होता, असें असून त्यानें वाराणशीसारख्या सिद्धक्षेत्राला शाप दिला हें काय ?

वैशंपायन सांगतात - राजर्षि दिवोदास याचे हातीं ती वाराणशीसारखी समृद्ध नगरी लागल्यावर तो तेथें मोठया थाटमाटानें राहूं लागला. इकडे अशी गोष्ट झाली की; महेश्वर शंकर यांनी नुकतेंच लग्न केलें होतें; व आपल्या नव्या लाडक्या बायकोची हौस पुरविण्यासाठीं ते आपल्या सासर्‍याचे जवळ रहात होते. त्या वेळीं खुद्द शंकरांच्या आज्ञेवरून व त्यांच्या पूर्वीच्या उपदेशावरून शंकरांचे तपोनिष्ठ व विशेष सुरूप जे पार्षद नामक गण ते पार्वतीची खुषामत करीत असत. त्या योगानें पार्वतीला मोठी मौज वाटे व आनंदही होई.

परंतु, (आपल्या तरण्या पोरीच्या भोंवतीं हे टोळभैरव जमून त्यांनीं तिची थट्टामस्करी करावी) हा प्रकार तिची आई मेना हिला गोड वाटेना. ती आपल्या पोरीची व तिच्या नवर्‍याचीही वारंवार निर्भर्त्सना करूं लागली. ती म्हणाली, "इश्श; कोण ग बाई तुझ्या नवर्‍याचे लक्षण हें ! तो व त्याचे पार्षदगण सगळेच मेले भ्रष्टये. मोठा आपल्याला महेश्वर म्हणवितो; पण पहावें तों सदा अठरा विश्वे दरिद्र खिळलेलें आहे ! आणि शील तें त्याला कसें तें नाहीच." याप्रमाणें आईनें केलेली आपल्या नवर्‍याची निंदा ऐकून स्त्रीस्वभावाप्रमाणें तिला सहजच फार राग आला. पण आईपुढें तो हंशावर नेऊन ती तशीच आपल्या नवर्‍याजवळ आली. महादेव पाहातात, तों तिचा नूर अगदीं उतरून गेला आहे, तेव्हां त्यांनीं विचारिलें, 'कां ?' ती म्हणाली, 'गडे, आतां मला येथें राहावयाचें नाहीं. मला आतां आपल्या सत्तेच्या घरांत घेऊन चला.' स्त्रीचें तें वचन ऐकून आतां आवडीजोगी कोणती जागा निवडावी, या विचारांत महेश्वरानें आपल्या मनाशीं सर्व लोक न्याहाळून पाहिले. शेवटीं त्याला, हे कुरुनंदना, या भूतलावरील सिद्धिक्षेत्र जी वाराणशी ती आवडली. परंतु, त्या नगरींत दिवोदासाची वस्ती आहे, हें ध्यानी येतांच आपल्या पाठीशी निकुंभ नांवाचा जो गण उभा होता त्याला हाक मारून तो महातेजस्वी शंकर म्हणाला, 'हे गणश्रेष्ठा; तूं वाराणशीला जाऊन ती नगरी खालीं कर. मात्र संभाळून आणि गोडीगुलाबीच्या उपायांनी. कारण, तो दिवोदास राजा, फारच बलाढय आहे. (त्यापुढें दंडेली चालणार नाही.)

शिवाज्ञेप्रमाणें तो निकुंभ वाराणशीपुरीला जाऊन तेथील कंडुक नामक एका नापिकाच्या स्वप्नांत जाऊन त्याला म्हणाला कीं, भल्या माणसा, मी तुझें कोटकल्याण करीन, पण एक कर; तूं मला येथें जागा दे. म्हणजे हुबेहुब मजसारखा एक माझा पुतळा करून या तुझ्या गांववेशीजवळ बसव." असें सांगून गेल्यावर त्या न्हाव्याने स्वप्नांत सांगितल्याप्रमाणें त्याची मूर्ति तयार करवून व राजाची आज्ञा मिळवून ती नगरवेशीजवळ स्थापित केली. मग त्यानें गंध, धूप, माल्य, अन्न, पान व बलिप्रदान, वगैरे सर्व प्रकारे त्याची मोठया समारंभानें पूजा चालविली. पुढें त्या शहरांत तो एक चमत्कारच होऊन राहिला. जो तो नागरीक त्याची पूजा करूं लागला, व तो गणेश्वरही ज्याला जो इष्ट वाटेल तो वर देऊं लागला. असे वर त्यानें हजारोंना दिले. कोणाला पुत्र, तर कोणाला हिरण्य, तर कोणाला आयुष्य, याप्रमाणें त्यानें सर्व कांहीं इच्छा पुरविल्या. असें चाललें असतां दिवोदासाची पतिव्रता स्त्री राणी सुयशा ही राजाच्या आज्ञेवरूनच पुत्र मागण्यासाठी तेथें आली. तिने गणेश्वराची फारच उंची पूजा केली, आणि पुत्र द्यावा, अशी याचना केली. त्या पुत्रासाठीं पुन्हा पुन्हा कितीतरी वेळां येऊन तिनें पूजा केली. परंतु निकुंभ कांहीं केल्या तिला पुत्र देईना. त्याला असें करण्याचें कारणच होतें. तो म्हणाला, 'राजा मजवर रागावला म्हणजे माझे काम झालें.' दीर्घकाळ लोटूनही जेव्हां निकुंभ राणीला पावेना, तेव्हां राजाला क्रोध येऊन तो म्हणाला, 'हा काय चमत्कार आहे ? हा नगरवेशीजवळ बसलेला पिशाच्च माझ्या, नगरजनांना मोठया प्रेमानें शेंकडों हजारों वर देत आहे, आणि खुद्द माझ्या नगरींत राहून, रोजच्या रोज माझ्या माणसांकडून पूजा घेऊन शिवाय पुत्रानिमित्त मी व माझ्या देवीनें वारंवार याचना केली असतांही मला पुत्र देत नाहीं किंवा एकही वर देत नाहीं, इतका हा कृतघ्न कशानें झाला ? बस्स. असें आहे तर याची पूजाबीजा कांहीं उपयोगी नाहीं. निदान मजकडून तरी होणार नाही. मी तर या दुष्टाचें मंदिर मोडून टाकणार.' असा निश्चय करून त्या दुष्ट, पापी, दुर्बुद्धि राजानें त्या गणेश्वराचें मंदिर मोडून टाकिलें. आपलें स्थान मोडलेलें पाहून गणेश्वरानें राजाला शाप दिला कीं, ज्या अर्थी मी तुझा कांहीं अपराध न करितां तूं माझा स्थाननाश केला आहेस, त्या अर्थीं तुझी ही नगरी अकस्मात ओस पडेल, हें समजून ठेव.

या शापावरून ती वाराणशी पुरी ओस पडली. इकडे निकुंभ हा शाप देऊन महादेवाकडे गेला. त्याचे मागें वाराणशींतील लोक एकाएकीं दाही दिशा पळून गेले. याप्रमाणें जेव्हां ती नगरी खालीं झाली, तेव्हां महादेव शंकर यानें आपली गादी तेथें स्थापिली; व तेथें त्या दिवसापासून देव श्रीशंकर हा गिरिकन्या दुर्गा हिशीं रममाण होऊन आनंदानें राहू लागला. परंतु, देवी दुर्गा हिला तेथें वस्ती रुचेना. तेव्हां दुर्गादेवी शंकराला म्हणाली, "मी नाहीं या वाराणशी नगरींत राहात. तुम्ही कोठें तरी दुसर्‍या ठिकाणीं एखाद्या घरांत चला.' यावर, देवानें उत्तर केलें कीं, मी मुळीं कधींच घरांत (शरीरांत) रहात नाहीं. कारण; अविमुक्त (म्हणजे जें त्रिकालींही सोडलें जात नाहीं, असें जें आत्मस्वरूप तेंच) हेंच माझें घर आहे. म्हणून तूं म्हणतेस तसल्या घरांत (संसारांत किंवा शरीरांत) मी येत नाहीं. तुला वाटेल तर तूं जा. याप्रमाणें त्रिपुराचा अंत करणारा (स्थूल, सुक्ष्म व कारण या तीन शरिरांचा नाश करणारा) भगवान् त्रिनेत्र (श्रवण, मनन व निदिध्यासन हेच तीन नेत्र) हंसत हंसतच म्हणाला. याप्रमाणें देवानें या वाराणशीरूप मुक्तिक्षेत्राला अविमुक्त असें स्वतःच नांव दिले. परंतु, लौकिकदृष्ट्या मुक्तिपुरीला अविमुक्त म्हणणें हा एकपरी तिला शाप देण्यासारखेंच झालें. असो; सर्व देवांनीं नमस्कृत असा जो धर्मात्मा महेश्वर तो देवीसह या पुरींत कृत, त्रेत व द्वापर या तीन युगांत वस्ती करून असतो. परंतु कलियुग चालू झालें म्हणजे तेथून तो गुप्त होतो, व तो गुप्त झाला म्हणजे पुनरपि मनुष्यांची वस्ती तेथें होऊं लागते. याप्रमाणें वाराणशीच्या शापाचा व पुनर्वस्तीचा हा इतिहास झाला.

भद्रश्रेण्याचा पुत्र दुर्दम नांवानें प्रसिद्ध होता. हा बाल असें समजून केवळ दयेस्तव दिवोदासानें (त्याचे बाकीचे नव्याण्णव भाऊ मारिले त्या वेळीं) वगळिला. या दुर्दमानें हैहयाचें पुत्रत्व स्वीकारिलें व शिवाय बहुत दिवस चालत आलेलें वैर मिटवावें, या हेतूनें त्या भद्रश्रेण्यपुत्र क्षत्रियश्रेष्ठ दुर्दमानें त्याच्या बापाचें जें राज्य दिवोदासानें हिसकाविलें होतें तें परत घेतलें. परंतु, दिवोदासाला वृषद्वति या स्त्रीपासून प्रतर्दन नांवाचा एक पुत्र झाला होता. त्यानें तेंच राज्य अल्प वयांतच दुर्दमाचे हातून पुन्हा बळकाविलें. या. प्रतर्दनाला वत्स व भार्ग असे दोन पुत्र होते. पैकीं वत्साला पुढें अलर्क हा पुत्र झाला. अलर्काचा पुढें सन्नति. हा अलर्क राजा काशींत राज्य करीत होता, हा ब्राह्मणांचा मोठा सत्कर्ता असून अत्यंत सत्यप्रतिज्ञ होता. या अलर्क राजऋषीला पुरातन ऋषींनी श्लोकरूपानें असा आशिर्वाद दिला कीं, "हा काशीकुलधुरीण अलर्क राजा रूप व यौवन यांनीं संपन्न राहून सासष्ट हजार वर्षेपर्यंत नांदेल." लोपामुद्रेच्या प्रसादानें याला हें इतकें दीर्घ आयुष्य प्राप्त झाले व त्याचप्रमाणें रूप व यौवन यांसह त्यानें अति विस्तीर्ण राज्याचाही उपभोग घेतला. पूर्वीं सांगितलेल्या गणेश्वर निकुंभानें वाराणशीपुरीला दिलेला शाप संपावयाची जेव्हां वेळ आली, त्या वेळीं या अलर्कानें क्षेमक राक्षसाला मारून पुनरपि ही रम्य वाराणशीपुरी वसविली. अलर्कपुत्र जो सन्नति याला सुनीथनामक धार्मिक पुत्र होता. सुनीथाला पुढें महायशस्वी क्षेम्य झाला. क्षेम्याला केतुमान, केतुमानाला सुकेतु, सुकेतूचा धर्मकेतु, धर्मकेतूचा दाईज महारथी सत्यकेतु. सत्यकेतूचा पुत्र राजा विभु. विभूचा आनर्त्त; आनर्त्ताचा सुकुमार. सुकुमाराचा धृष्टकेतु. हा मोठा धार्मिक होता. धृष्टकेतूचा राजा वेणुहोत्र. वेणुहोत्राचा राजा भर्ग. अलर्कपिता जो वत्स त्याला त्यापासून वत्सभूमी म्हणून एक पुत्र झाला व त्याचा बंधु जो भार्ग त्याला भृगुभूमी झाला.

भृगुवंशांत उत्पन्न झालेले हे गालवांगिरसाचे वंशज सांगितले. यांजपासून पुढें ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिन्ही जातींची हजारों संतति झाली. हे जनमेजया, याप्रमाणें काशवंशीय राजांची हकीकत झाली. आतां नहुषाचा वंश ऐकून घे.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
काश्यपवर्णनं नाम एकोनत्रिंशोऽध्यायः ॥ २९ ॥
अध्याय एकोणतिसावा समाप्त

GO TOP