श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
त्रिंशोऽध्यायः


ययातिचरित्रकथनम्

वैशंपायन उवाच
उत्पन्नाः पितृकन्यायां विरजायां महौजसः ।
नहुषस्य तु दायादाः षडिन्द्रोपमतेजसः ॥ १ ॥
यतिर्ययातिः संयातिरायतिः पाञ्चिको भवः ।
सुयातिः षष्ठस्तेषां वै ययातिः पार्थिवोऽभवत् ।
यतिर्ज्येष्ठस्तु तेषां वै ययातिस्तु ततः परम् ॥ २ ॥
काकुत्स्थकन्यां गां नाम लेभे परमधार्मिकः ।
यतिस्तु मोक्षमास्थाय ब्रह्मभूतोऽभवन्मुनिः ॥ ३ ॥
तेषां ययातिः पञ्चानां विजित्य वसुधामिमाम् ।
देवयानीमुशनसः सुतां भार्यामवाप सः ।
शर्मिष्ठामासुरीं चैव तनयां वृषपर्वणः ॥ ४ ॥
यदुं च तुर्वसुं चैव देवयानी व्यजायत ।
द्रुह्युं चानुं च पूरुं च शर्मिष्ठा वार्षपर्वणी ॥ ५ ॥
तस्मै शक्रो ददौ प्रीतो रथं परमभास्वरम् ।
असङ्गं काञ्चनं दिव्यं दिव्यैः परमवाजिभिः ॥ ६ ॥
युक्तं मनोजवैः शुभ्रैर्येन भार्यामुवाह सः ।
स तेन रथमुख्येन षड्‌रात्रेनाजयन्महीम् ।
ययातिर्युधि दुर्धर्षस्तथा देवान् सवासवान् ॥ ७ ॥
स रथः पौरवाणां तु सर्वेषामभवत्तदा । ॥
यावत्तु वसुनाम्नो वै कौरवाज्जनमेजयः ॥ ८ ॥
कुरोः पुत्रस्य राजेन्द्र राज्ञः पारीक्षितस्य ह ।
जगाम स रथो नाशं शापाद् गार्ग्यस्य धीमतः ॥ ९ ॥
गर्ग्यस्य हि सुतं बालं स राजा जनमेजयः ।
वाक्छूरं हिंसयामास ब्रह्महत्यामवाप सः ॥ १० ॥
स लोहगन्धी राजर्षिः परिधावन्नितस्ततः ।
पौरजानपदैस्त्यक्तो न लेभे शर्म कर्हिचित् ॥ ११ ॥
ततः स दुःखसंतप्तो नालभत् संविदं क्वचित् ।
इन्द्रोतः शौनकं राजा शरणं प्रत्यपद्यत ॥ १२ ॥
याजयामास चेन्द्रोतं शौनको जनमेजयम् ।
अश्वमेधेन राजानं पावनार्थं द्विजोत्तमः ॥ १३ ॥
स लोहगन्धो व्यनशत् तस्यावभृथमेत्य ह ।
स च दिव्यो रथो राजन् वसोश्चेदिपतेस्तदा ।
दत्तः शक्रेण तुष्टेन लेभे तस्माद्बृहद्रथः ॥ १४ ॥
बृहद्रथात् क्रमेणैव गतो बार्हद्रथम् नृपम् ।
ततो हत्वा जरासंधं भीमस्तं रथमुत्तमम् ॥ १५ ॥
प्रददौ वासुदेवाय प्रीत्या कौरवनन्दनः ।
सप्तद्वीपां ययातिस्तु जित्वा पृथ्वीं ससागराम् ॥ १६ ॥
व्यभजत् पञ्चधा राजन् पुत्राणां नाहुषस्तदा ।
दिशि दक्षिणपूर्वस्यां तुर्वसुं मतिमान् नृपः ॥ १७ ॥
प्रतीच्यामुत्तरस्यां च द्रुह्युं चानुं च नाहुषः ।
दिशि पूर्वोत्तरस्यां वै यदुं ज्येष्ठं न्ययोजयत् ॥ १८ ॥
मध्ये पूरुं च राजानमभ्यषिञ्चत नाहुषः । ॥
तैरियं पृथिवी सर्वा सप्तद्वीपा सपत्तना ॥ १९ ॥
यथाप्रदेशमद्यापि धर्मेण प्रतिपाल्यते ।
प्रजास्तेषां पुरस्तात् तु वक्ष्यामि नृपसत्तम ॥ २० ॥
धनुर्न्यस्य पृषत्कांश्च पञ्चभिः पुरुषर्षभैः ।
जरावानभवद् राजा भारमावेश्य बन्धुषु ।
निःक्षिप्तशस्त्रः पृथिवीं निरीक्ष्य पृथिवीपतिः ॥ २१ ॥
प्रीतिमानभवद् राजा ययातिरपराजितः ।
एवं विभज्य पृथिवीं ययातिर्यदुमब्रवीत् ॥ २२ ॥
जरां मे प्रतिगृह्णीष्व पुत्र कृत्यान्तरेण वै ।
तरुणस्तव रूपेण चरेयं पृथिवीमिमाम् ।
जरां त्वयि समाधाय तं यदुः प्रत्युवाच ह ॥ २३ ॥
अनिर्दिष्टा मया भिक्षा ब्राह्मणस्य प्रतिश्रुता ।
अनपाकृत्य तां राजन् न गृहीष्यामि ते जराम् ॥ २४ ॥
जरायां बहवो दोषाः पानभोजनकारिताः ।
तस्माज्जरां न ते राजन् ग्रहीतुमहमुत्सहे ॥ २५ ॥
सन्ति ते बहवः पुत्राः मत्तः प्रियतरा नृप ।
प्रतिग्रहीतुं धर्मज्ञ पुत्रमन्यं वृणीष्व वै ॥ २६ ॥
स एवमुक्तो यदुना राजा कोपसमन्वितः ।
उवाच वदतां श्रेष्ठो ययातिर्गर्हयन् सुतम् ॥ २७ ॥
क आश्रयस्तवान्योऽस्ति को वा धर्मो विधीयते ।
मामनादृत्य दुर्बुद्धे यदहं तव देशिकः ॥ २८ ॥
एवमुक्त्वा यदुं तात शशापैनं स मन्युमान् ।
अराज्या ते प्रजा मूढ भवित्रीति नराधम ॥ २९ ॥
स तुर्वसुं च द्रुह्युं चाप्यनुं च भरतर्षभ ।
एवमेवाब्रवीद् राजा प्रत्याख्यातश्च तैरपि ॥ ३० ॥
शशाप तानतिक्रुद्धो ययातिरपराजितः ।
यथा ते कथितं पूर्वं मया राजर्षिसत्तम ॥ ३१ ॥
एवं शप्त्वा सुतान् सर्वांश्चतुरः पूरुपूर्वजान् ।
तदेव वचनं राजा पूरुमप्याह भारत ॥ ३२ ॥
तरुणस्तव रूपेण चरेयं पृथिवीमिमाम् ।
जरां त्वयि समाधाय त्वं पूरो यदि मन्यसे ॥ ३३ ॥
स जरां प्रतिजग्राह पितुः पूरुः प्रतापवान् ।
ययातिरपि रूपेण पूरोः पर्यचरन्महीम् ॥ ३४ ॥
स मार्गमाणः कामानामन्तं भरतसत्तम ।
विश्वाच्या सहितो रेमे वने चैत्ररथे प्रभुः ॥ ३५ ॥
यदावितृष्णः कामानां भोगेषु स नराधिपः ।
तदा पूरोः सकाशाद् वै स्वां जरां प्रत्यपद्यत ॥ ३६ ॥
तत्र गाथा महाराज शृणु गीता ययातिना ।
याभिः प्रत्याहरेत् कामान् सर्वतोऽङ्गानि कूर्मवत् ॥ ३७ ॥
न जातु कामः कामानामुपभोगेन शाम्यति ।
हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ॥ ३८ ॥
यत् पृथिव्यां व्रीहियवं हिरण्यं पशवः स्त्रियः ।
नालमेकस्य तत् सर्वमिति पश्यन्न मुह्यति ॥ ३९ ॥
यदा भावं न कुरुते सर्वभूतेषु पापकम् ।
कर्मणा मनसा वाचा ब्रह्म संपद्यते तदा ॥ ४० ॥
यदान्येभ्यो न बिभ्येत यदा चास्मान्न बिभ्यति ।
यदा नेच्छति न द्वेष्टि ब्रह्म संपद्यते तदा ॥ ४१ ॥
या दुस्त्यजा दुर्मतिभिर्या न जीर्यति जीर्यतः ।
योऽसौ प्राणान्तिको रोगस्तां तृष्णां त्यजतः सुखम् ॥ ४२ ॥
जीर्यन्ति जीर्यतः केशा दन्ता जीर्यन्ति जीर्यतः ।
जीविताशा धनाशा च जीर्यतोऽपि न जीर्यति ॥ ४३ ॥
यच्च कामसुखं लोके यच्च दिव्यं महत्सुखम् ।
तृष्णाक्षयसुखस्यैते नार्हतः षोडशीं कलाम् ॥ ४४ ॥
एवमुक्त्वा स राजर्षिः सदारः प्राविशद् वनम् ।
कालेन महता वापि चचार विपुलं तपः ॥ ४५ ॥
भृगुतुङ्गे तपस्तप्त्वा तपसोऽन्ते महातपाः ।
अनश्नन् देहमुत्सृज्य सदारः स्वर्गमाप्तवान् ॥ ४६ ॥
तस्य वंशे महाराज पञ्च राजर्षिसत्तमाः ।
यैर्व्याप्ता पृथिवी सर्वा सूर्यस्येव गभस्तिभिः ॥ ४७ ॥
यदोस्तु शृणु राजर्षेर्वंशं राजर्षिसत्कृतम् ।
यत्र नारायणो जज्ञे हरिर्वृष्णिकुलोद्वहः ॥ ४८ ॥
धन्यः प्रजावानायुष्मान् कीर्तिमांश्च भवेन्नरः ।
ययातेश्चरितं पुण्यं पठञ्छृण्वन् नराधिप ॥ ४९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे ॥
हरिवंशपर्वणि ययातिचरिते त्रिंशोऽध्यायः


ययातिचरित्र -

वैशंपायन सांगतात - महातेजस्वी नहुष राजा यानें सुस्वधासंज्ञक पितरांच्या विरजा नामक कन्येचे ठिकाणी इंद्रासारखे तेजस्वी सहा पुत्र उत्पन्न केले. त्यांची नांवे - यति, ययाति, संयाति, आयाति, याति व सहावा सुयाति. यांपैकी ययाति हा राजा झाला. खरें पाहाता ययाति हा दुसरा, आणि यति हा ज्येष्ठ; परंतु, त्याचा धर्माकडे भर फार असल्यानें तो आत्मचिंतनांतच गढून असे. त्याला गौ नांवाची कुकुत्स्थकन्या स्त्री मिळाली होती. मोक्षाची वाट धरून अखेर तो यति ब्रह्मरूपच झाला. उरले पांच. त्यांपैकी ययातीनें सर्व पृथ्वी जिंकिली. त्याला शुक्राचार्यांची कन्या देवयानी ही भार्या मिळाली. तिजशिवाय वृषपर्वा नामक असुराची कन्या शर्मिष्ठा हीही याला भार्येचे ठिकाणींच होती. देवयानीनें यदु व तुर्वसु या दोघांस जन्म दिले. व वृषपर्व्याची कन्या जी शर्मिष्ठा हिनें द्रुद्यु, अनु व पुरु या तिघांस जन्म दिलें. या ययातीला इंद्रानें प्रसन्न होऊन केवळ मनोजवानें धावणारे असे एकजात शुभ्र स्वर्गीय अश्‍व ज्याला जोडिले आहेत, असला परम दैदीप्यमान व अस्खलितगति कांचनमय रथ दिला होता. या रथाच्या साह्यानें हा आपली युद्धाची कामगिरी करीत असे. या श्रेष्ठ रथाच्या साह्यानें त्या दुर्धर्ष वीरानें एका सहा रात्रींत सर्व भूमिजय केला. ययाति हा इंद्रासह सर्व देवांनाही अजिंक्य झाला. हा रथ पुढें बहुत कालपर्यंत पुरुकुलांतील राजांकडे होता. नंतर वसुनामक कौरवांपासून कुरुकुलाकडे गेला. अखेर बुद्धिवान गार्ग्याच्या शापामुळें परीक्षित राजाच्या हातून तो रथ नाहींसा झाला. - त्याचा इतिहास असा : - गार्ग्यांला एक अल्पवयी पुत्र होता. तो तोंडाचा होता फटकळ. त्याला त्या परीक्षितानें - त्याच्या निष्ठुर भाषणाबद्दल ठार मारिलें. त्यापासून त्याला ब्रह्महत्या लागली. मग त्या पापाच्या योगानें त्याच्या अंगाला अतिशूद्राप्रमाणें वसवस घाण येऊ लागली. त्याचे ग्राम व पुरवासी प्रजाजनही त्याची उपेक्षा करूं लागले, त्यामुळें त्याला कोठेंही सुखास पडेना; व तो सैरावैरा इतस्ततः भटकूं लागला. शेवटीं दुःखाने होरपळून जाऊन जेव्हां कोणीकडूनही त्याला सुटकेचा मार्ग कळेना, तेव्हां तो इंद्रोत नामक शौनक कुलांतील एका ब्राह्मणाला शरण गेला. मग त्या इंद्रोतानें पापशुद्धयर्थ त्या जनमेजयाकडून अश्वमेध नांवाचा यज्ञ करविला. त्या यज्ञाच्या प्रभावानें त्या यज्ञांतींचें अवभृथस्नान होतांच त्याच्या आंगचा तो सर्व दुर्गंध नाहींसा झाला. परंतु, तो दिव्य रथ इंद्रानें परीक्षितापासून काढून चेदिपति जो वसु त्याला दिला. वसूपासून बृहद्रथाला मिळाला. बृहद्रथापासून मग तो क्रमानेंच बृहद्रथाचा पुत्र जो जरासंध त्याकडे आला. पुढे भीमानें ज्या वेळीं जरासंघाला मारिलें, त्या वेळीं त्यानें तो रथ घेऊन मोठया प्रेमानें श्रीकृष्णाला नजर केला. असो.

ययाति राजानें ही सप्तद्वीप पृथ्वी समुद्रासह जिंकल्यावर तिचे पांच वांटे करून आपल्या पांच पुत्रांना दिले. आग्नेयीचा भाग त्यानें तुर्वसूला दिला. पश्चिमेचा द्रुह्यूला दिला. उत्तरेचा अनूला. सर्वांत ज्येष्ठ जो यदु त्याची योजना ईशान्य दिशेला केली; व पुरूला मध्यप्रांताच्या गादीवर बसविलें. ययातीनें घालून दिलेल्या मर्यादेप्रमाणें त्याचे पांचही पुत्रांचे वंशज ह्या सप्तद्वीप पृथ्वीचें तींतील नगरग्रामांसह आपआपल्या मुलखांनीं यथान्याय पालन करीत आहेत. हे राजा, आतां या पांचजणांची पुढील प्रजा मी तुला पुढें सांगेन. (तूर्त तुला ययातीचीच एक थोडी गोष्ट सांगतो.) ययातीनें राज्याची विभागणी करून आपले धनुर्बाणही आपल्या पराक्रमी पुत्रांच्या स्वाधीन करून आपल्या माथ्यावरील संसाराचा सर्व भार मुलांवर टाकिल्यावर त्याला जरा प्राप्त झाली. त्या अजिंक्य ययाति राजानें हातचें शस्त्र ठेविल्यावर एकवार पृथ्वीकडे अवलोकन केलें. तेव्हां त्याला अतिशय समाधान झालें. याप्रमाणें विभागणी करून राज्याची व्यवस्था लाविल्यावर एक दिवस ययाति राजा आपल्या यदु नामक पुत्राला म्हणाला, 'हे वत्सा, कांहीं तरी युक्तीनें माझी ही जरा घेऊन आपलें तारुण्य मला दे; म्हणजे मी माझी जरा तुझे ठिकाणीं ठेवून व तुझें तारुण्य घेऊन या पृथ्वींत संचार करीन.' यावर यदूनें उत्तर केलें, 'मी एका ब्राह्मणाला तुला इष्ट ती भिक्षा देईन असें मोघम शब्दानें कबूल केलें. परंतु, ती भिक्षा कोणती व काय याचा अजून निर्णय ठरला नाहीं, व जरा प्राप्त झाली असतां पानभोजनाच्या कामीं मोठी खटखट पडते; याकरितां (त्या ब्राह्मणाच्या ऋणांतून मुक्त होईपर्यंत) हे राजा, मला तुमची जरा घेण्याचें धैर्य होत नाहीं. आपणाला मजहूनही आवडते असे दुसरे बहुत पुत्र आहेत. ते आपल्या इच्छेप्रमाणें करितील. याकरितां या कामीं त्यांपैकी कोणाची तरी निवड करावी.' असें जेव्हां यदूनें चकचकीत उत्तर दिलें तेव्हां अतिशय क्रोध येऊन तो वाक्पटु ययाति राजा आपल्या पुत्राची निर्भर्त्सना करीत म्हणाला, 'हे दुष्टबुद्धे, मी तुझा ज्ञानदाता गुरु, माझा अनादर करून तूं कोणाच्या आधारावर उभा राहाणार; आणि बापाचा अवमान करून अतिथीचा सत्कार केल्यास तुला धर्म कसा घडेल ?' असें म्हणून त्या रागाच्या झटक्यांतच त्यानें यदूला शाप दिला कीं, हे मूढा, तुझी प्रजा राज्यहीन होईल. नंतर त्यानें यदूप्रमाणेंच तुर्वसु, द्रुद्यु व अनु यांस आज्ञा केली; पण त्यांनींही यदूप्रमाणेंच त्याला मोडून काढिलें. मग त्या अजिंक्य ययातीनें त्या तिघांनाही शाप दिले. कसकसे ते मीं तुला आदिपर्व प्रसंगींच सांगितले आहेत. याप्रमाणें पुरूच्या वरचे चारही पुत्रांस शाप दिल्यावर राजा ययाति पुरूला म्हणाला, 'हे पुरू, तुला जर संमत असेल तर माझी ही जरा तुझे ठिकाणीं ठेवून आणि तुझें तारुण्य घेऊन त्या रूपानें ही पृथ्वी फिरावी असा माझा हेतु आहे.' पित्याच्या वचनाबरोबर प्रतापी पुरूनें त्याची जरा घेतली, व ययाति पुरूच्या तरण्याबांड रूपानें लोकांत वागूं लागला. कामवासनेची एकदां पक्की तृप्तीच करून टाकावी, अशी मनांत इच्छा धरून तो बलवान ययाति चैत्ररथ नामक वनांत या जन्मीं गौ या नांवानें प्रसिद्ध असलेली जी पूर्वींची विश्वाची नामक अप्सरा तिच्याशीं रासरंग खेळत राहिला. इतकें करूनही कामभोगाची वासना पुरी होतच नाहीं असें जेव्हां त्यानें पाहिलें तेव्हां तो पुरूकडे परत आला व पुरूनें आपली जरा ययातीपासून माघारी घेतली. हे जनमेजया, ती जरा परत घेतेवेळीं त्या अनुभवी ययातीनें जे कांहीं श्लोक म्हटले त्यांचा मतलब ध्यानांत घे. कारण, तो ध्यानांत घेतल्यानें कूर्म (कासव) ज्याप्रमाणें आपलीं अंगें सर्व बाजूंनीं आंवरून घेतो, त्याप्रमाणें प्रत्येक मनुष्य आपल्या कामवासना आंवरून धरील. त्या श्लोकांचा मतलब हा : - १ काम्य वस्तूंच्या उपभोगानें हा काम कधींही शांत होत नाही, उलट तूप घातल्यानें जसा अग्नि अधिकच भडकतो, त्याप्रमाणें भोगानें हा अधिकच भडकतो. २. जीवांची भोगतृष्णा इतकी अफाट आहे कीं, या पृथ्वींत जेवढे म्हणून धान्य, हिरण्य, पशु व स्त्रियादि पदार्थ आहेत ते सर्व एकटयाला दिले तरी देखील त्याची तृप्ति म्हणून नाहीं. याकरितां शहाण्यानें हा प्रकार पाहून निर्मोह होण्यास शिकावें. ३. ज्या वेळेस आपल्या ठिकाणीं कोणाही प्राण्याला कर्म, मन किंवा वाणि यांपैकीं कशानेंही अपकार करण्याची बुद्धि उरत नाहीं तेव्हां ब्रह्मप्राप्ति होते. ४. ज्या वेळीं याला (जीवाला) इतर कोणापासूनही भय वाटत नाहीं, तसेंच इतर कोणालाही यापासून वाटत नाही, व जेंव्हा हा कशाची इच्छा करीत नाहीं किंवा द्वेषही करीत नाहीं, त्यावेळीं हा ब्रह्मरूप होतो. ५. हे लोकहो, कुबुद्धीच्या लोकांना जिचा त्याग करणें अतिशय व कठीण पडतें व आपण जरठ झालों तरीही जिला जरा म्हणून कशी ती येतच नाहीं, असली जी ही तृष्णा, हा एक प्राणांतिक रोगच आहे; हिला जो फांटा देईल त्यालाच सुख होईल. ६. मनुष्य जरठ झाला म्हणजे त्याचे केंश जीर्ण होतात, व दंत जीर्ण होतात; पण हा जरठाहूनही जरठ झाला तरी जीविताशा व धनाशा या मात्र कधींही जीर्ण होत नाहींत. ७. या लोकांत कामसुख म्हणजे सर्व सुखांत अति मोठें असें समजतात. परलोकांत स्वर्गांतील सुख हें अति मोठें समजतात. परंतु, (मला वाटतें) तृष्णेचा क्षय झाल्यानें होणार्‍या सुखाच्या सोळाव्या हिश्श्यानेंही कामसुखाला किंवा दिव्यसुखाला लज्जत नाहीं.

याप्रमाणे लोकांना सांगून तो राजर्षि ययाति आपले स्त्रीसह तपोवनांत गेला. तेथें त्यानें उंच पर्वताच्या कडयावर बहुत कालपर्यंत पुष्कळसें तप केलें. तपाच्या अखेर अखेर त्यानें अन्नव्यवहार सोडिला. शेवटीं मरणोत्तर स्त्रीसह तो स्वर्गास गेला. हे राजा, या ययातीच्या वंशांत पांच मोठे राजर्षि झाले. सूर्याचे किरणांनी जशी ही पृथ्वी व्यापली जाते त्याप्रमाणें त्यांचे प्रभावानें ही भरून गेली होती. हे राजर्षे जनमेजया, वृष्णिकुलांतील धुरीण जो परमात्मा श्रीकृष्ण तो ज्या वंशांत आला तो यदूचा राजर्षिमान्य वंश मी आतां तुला सांगतो तो ऐक. ययाति राजाचें पुण्यचरित्र श्रवण किंवा पठण करील तो धनवान, प्रजावान, आयुष्मान व कीर्तिमान होईल.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
ययातिचरिते त्रिंशोऽध्यायः ॥ ३० ॥
अध्याय तिसावा समाप्त

GO TOP