श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकत्रिंशोऽध्यायः


कक्षेयुवंशवर्णनम्

जनमेजय उवाच
पूरोर्वंशमहं ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि तत्त्वतः ।
द्रुह्योश्चानोर्यदोश्चैव तुर्वसोश्च पृथक्पृथक् ॥ १ ॥
वृष्णिवंशप्रसङ्गेन स्वं वंशं पूर्वमेव तु ।
विस्तरेणानुपूर्व्या च तद् भवान् वक्तुमर्हति ॥ २ ॥
वैशम्पायन उवाच
शृणु पूरोर्महाराज वंशमुत्तमपौरुषम् ।
विस्तरेणानुपूर्व्या च यत्र जातोऽसि पार्थिव ॥ ३ ॥
हन्त ते कीर्तयिष्यामि पूरोर्वंशमनुत्तमम् ।
द्रुह्योश्चानोर्यदोश्चैव तुर्वसोश्च नराधिप ॥ ४ ॥
पूरोः पुत्रो महावीर्यो राजाऽऽसीज्जनमेयः ।
प्रचिन्वांस्तु सुतस्तस्य यः प्राचीमजयद् दिशम् ॥ ५ ॥
प्रचिन्वतः प्रवीरोऽभून्मनस्युस्तस्य चात्मजः ।
राजा चाभयदो नाम मनस्योरभवत् सुतः ॥ ६ ॥
तथैवाभयदस्यासीत् सुधन्वा तु महीपतिः ।
सुधन्वनो बहुगवः शंयातिस्तस्य चात्मजः ॥ ७ ॥
शंयातेस्तु रहस्याती रौद्रश्वस्तस्य चात्मजः ।
रौद्राश्वस्य घृताच्यां वै दशाप्सरसि सूनवः ॥ ८ ॥
ऋचेयुः प्रथमस्तेषां कृकणेयुस्तथैव च ।
कक्षेयुः स्थण्डिलेयुश्च सन्नतेयुस्तथैव च ॥ ९ ॥
दशार्णेयुर्जलेयुश्च स्थलेयुश्च महायशाः ।
धनेयुश्च वनेयुश्च पुत्रिकाश्च दश स्त्रियः ॥ १० ॥
रुद्रा शूद्रा च भद्रा च मलदा मलहा तथा ।
खलदा चैव राजेन्द्र नलदा सुरसापि च ।
तथा गोचपला तु स्त्रीरत्नकूटाश्च ता दश ॥ ११ ॥
ऋषिर्जातोऽत्रिवंशे तु तासां भर्ता प्रभाकरः ।
रुद्रायां जनयामास सुतं सोमं यशस्विनम् ॥ १२ ॥
स्वर्भानुना हते सूर्ये पतमाने दिवो महीम् ।
तमोऽभिभूते लोके च प्रभा येन प्रवर्तिता ॥ १३ ॥
स्वस्ति तेऽस्त्विति चोक्तो वै पतमानो दिवाकरः ।
वचनात् तस्य विप्रर्षेर्न पपात दिवो महीम् ॥ १४ ॥
अत्रिश्रेष्ठानि गोत्राणि यश्चकार महातपाः ।
यज्ञेष्वत्रेर्धनं चैव सुरैर्यस्य प्रवर्तितम् ॥ १५ ॥
स तासु जनयामास पुत्रिकासु सनामकान् ।
दश पुत्रान् महात्मा स तपस्युग्रे रतान् सदा ॥ १६ ॥
ते तु गोत्रकरा राजन्नृषयो वेदपारगाः ।
स्वस्त्यात्रेया इति ख्याताः किं त्वत्रिधनवर्जिताः ॥ १७ ॥
कक्षेयोस्तनयाश्चासंस्त्रय एव महारथाः ।
सभानरश्चाक्षुषश्च परमन्युस्तथैव च ॥ १८ ॥
सभानरस्य पुत्रस्तु विद्वान् कालानलो नृपः ।
कालानलस्य धर्मज्ञः सृञ्जयो नाम वै सुतः ॥ १९ ॥
सृञ्जयस्याभवत् पुत्रो वीरो राजा पुरञ्जयः ।
जनमेजयो महाराज पुरञ्जयसुतोऽभवत् ॥ २० ॥
जनमेजयस्य राजर्षेर्महाशालोऽभवत् सुतः ।
देवेषु स परिज्ञातः प्रतिष्ठितयशा भुवि ॥ २१ ॥
महामना नाम सुतो महाशालस्य धार्मिकः ।
जज्ञे वीरः सुरगणैः पूजितः सुमहायशाः ॥ २२ ॥
महामनास्तु पुत्रौ द्वौ जनयामास भारत ।
उशीनरं च धर्मज्ञं तितिक्षुं च महाबलम् ॥ २३ ॥
ऊशीनरस्य पत्न्यस्तु पञ्च राजर्षिवंशजाः ।
नृगा कृमी नवा दर्वा पञ्चमी च दॄषद्वती ॥ २४ ॥
उशीनरस्य पुत्रास्तु पञ्च तासु कुलोद्वहाः ।
तपसा वै सुमहता जाता वृद्धस्य भारत ॥ २५ ॥
नृगायास्तु नृगः पुत्रः कृम्यां कृमिरजायत ।
नवायास्तु नवः पुत्रो दर्वायाः सुव्रतोऽभवत् ॥ २६ ॥
दृषद्वत्यास्तु सञ्जज्ञे शिबिरौशीनरो नृपः ।
शिबेस्तु शिबयस्तात योधेयास्तु नृगस्य ह ॥ २७ ॥
नवस्य नवराष्ट्रं तु कृमेस्तु कृमिला पुरी ।
सुव्रतस्य तथाम्बष्ठा शिबिपुत्रान्निबोध मे ॥ २८ ॥
शिबेश्च पुत्राश्चत्वारो वीरास्त्रैलोक्यविश्रुताः ।
वृषदर्भः सुवीरश्च मद्रकः कैकयस्तथा ॥ २९ ॥
तेषां जनपदाः स्फीताः केकया मद्रकास्तथा ।
वृषदर्भाः सुवीराश्च तितिक्षोस्तु प्रजाः शृणु ॥ ३० ॥
तैतिक्षवोऽभवद् राजा पूर्वस्यां दिशि भारत ।
उषद्रथो महाबाहुस्तस्य फेनः सुतोऽभवत् ॥ ३१ ॥
फेनात् तु सुतपा जज्ञे सुतः सुतपसो बलिः ।
जातो मानुषयोनौ तु स राजा काञ्चनेषुधीः ॥ ३२ ॥
महायोगी स तु बलिर्बभूव नृपतिः पुरा ।
पुत्रानुत्पादयामास पञ्च वंशकरान् भुवि ॥ ३३ ॥
अङ्गः प्रथमतो जज्ञे वङ्गः सुह्मस्तथैव च ।
पुण्ड्रः कलिङ्गश्च तथा बालेयं क्षत्रमुच्यते ॥ ३४ ॥
बालेया ब्राह्मणाश्चैव तस्य वंशकरा भुवि ।
बलेस्तु ब्रह्मणा दत्ता वराः प्रीतेन भारत ॥ ३५ ॥
महायोगित्वमायुश्च कल्पस्य परिमाणतः ।
सङ्ग्रामे वाप्यजेयत्वं धर्मं चैव प्रधानता ॥ ३६ ॥
त्रैलोक्यदर्शनं चैव प्राधान्यं प्रसवे तथा ।
बले चाप्रतिमत्वं वै धर्मतत्त्वार्थदर्शनम् ॥ ३७ ॥
चतुरो नियतान् वर्णांस्त्वं च स्थापयिता भुवि ।
इत्युक्तो विभुना राजा बलिः शान्तिं परां ययौ ॥ ३८ ॥
तस्य ते तनयाः सर्वे क्षेत्रजा मुनिपुङ्गवात् ।
संभूता दीर्घतपसो सुदेक्ष्णायां महौजसः ॥ ३९ ॥
बलिस्तानभिषिच्येह पञ्च पुत्रानकल्मषान् ।
कृतार्थः सोऽपि योगात्मा योगमाश्रित्य स प्रभुः ॥ ४० ॥
अधृष्यः सर्वभूतानां कालापेक्षी चरन्नपि ।
कालेन महता राजन् स्वं च स्थानमुपागमत् ॥ ४१ ॥
तेषां जनपदाः पञ्च अङ्गा वङ्गाः ससुह्मकाः ।
कलिङ्गाः पुण्ड्रकाश्चैव प्रजास्त्वङ्गस्य मे शृणु ॥ ४२ ॥
अङ्गपुत्रो महानासीद् राजेन्द्रो दधिवाहनः ।
दधिवाहनपुत्रस्तु राजा दिविरथोऽभवत् ॥ ४३ ॥
पुत्रो दिविरथस्यासीच्छक्रतुल्यपराक्रमः ।
विद्वान् धर्मरथो नाम तस्य चित्ररथः सुतः ॥ ४४ ॥
तेन चित्ररथेनाथ तदा विष्णुपदे गिरौ ।
यजता सह शक्रेण सोमः पीतो महात्मना ॥ ४५ ॥
अथ चित्ररथस्यापि पुत्रो दशरथोऽभवत् ।
लोमपाद इति ख्यातो यस्य शान्ता सुताभवत् ॥ ४६ ॥
तस्य दाशरथिर्वीरश्चतुरङ्गो महायशाः ।
ऋश्यशृङ्गप्रसादेन जज्ञे कुलविवर्धनः ॥ ४७ ॥
चतुरङ्गस्य पुत्रस्तु पृथुलाक्ष इति स्मृतः ।
पृथुलाक्षसुतो राजा चम्पो नामा महायशाः ॥ ४८ ॥
चम्पस्य तु पुरी चम्पा या मालिन्यभवत् पुरा ।
पूर्णभद्रप्रसादेन हर्यङ्गोऽस्य सुतोऽभवत् ॥ ४९ ॥
ततो वैभाण्डकिस्तस्य वारणं शक्रवारणम् ।
अवतारयामास महीं मन्त्रैर्वाहनमुत्तमम् ॥ ५० ॥
हर्यङ्गस्य तु दायादो राजा भद्ररथः स्मृतः ।
पुत्रो भद्ररथस्यासीद्बृहत्कर्मा प्रजेश्वरः ॥ ५१ ॥
बृहद्‌दर्भः सुतस्तस्य तस्माज्जज्ञे बृहन्मनाः ।
बृहन्मनास्तु राजेन्द्र जनयामास वै सुतम् ॥ ५२ ॥
नाम्ना जयद्रथं नाम यस्माद् दृढरथो नृपः ।
आसीद् दृढरथस्यापि विश्वजिज्जनमेजय ।
दायादस्तस्य कर्णस्तु विकर्णस्तस्य चात्मजः ॥ ५३ ॥
तस्य पुत्रशतं त्वासीदङ्गानां कुलवर्धनम् ।
बृहद्‌दर्भसुतो यस्तु राजा नाम्ना बृहन्मनाः ॥ ५४ ॥
तस्य पत्नीद्वयं चासीच्चैद्यस्यैते सुते शुभे ।
यशोदेवी च सत्या च ताभ्यां वंशस्तु भिद्यते ॥ ५५ ॥
जयद्रथस्तु राजेन्द्र यशोदेव्यां व्यजायत ।
ब्रह्मक्षत्रोत्तरः सत्यां विजयो नाम विश्रुतः ॥ ५६ ॥
विजयस्य धृतिः पुत्रस्तस्य पुत्रो धृतव्रतः ।
धृतव्रतस्य पुत्रस्तु सत्यकर्मा महायशाः ॥ ५७ ॥
सत्यकर्मसुतश्चापि सूतस्त्वधिरथस्तु वै ।
यः कर्णं प्रति जग्राह ततः कर्णस्तु सूतजः ॥ ५८ ॥
एतद् ते कथितं सर्वं कर्णं प्रति महाबलम् ।
कर्णस्य वृषसेनस्तु वृषस्तस्यात्मजः स्मृतः ॥ ५९ ॥
एतेऽङ्गवंशजाः सर्वे राजानः कीर्तिता मया ।
सत्यव्रता महात्मानः प्रजावन्तो महारथाः ॥ ६० ॥
ऋचेयोस्तु महाराज रौद्राश्वतनयस्य ह ।
शृणु वंशमनुप्रोक्तं यत्र जातोऽसि पार्थिव ॥ ६१ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
कुक्षेयुवंशानुकीर्तनं नाम एकत्रिंशोऽध्यायः


कुक्षेयुवंशवर्णन -

जनमेजय म्हणतो - हे ब्रह्मन, मला पुरुवंशाची खरी खरी हकीकत ऐकण्याची इच्छा आहे. तसेच द्रुह्यु, अनु, यदु व तुर्वसु यांचेंही पृथक पृथक वंशवर्णन मला पाहिजेच आहे. तथापि, पुरुवंशाबद्दलच मीं प्रथम इच्छा दर्शविली. याला कारण, त्यांतच वृष्णिवंशाचा संबंध येत असून तो माझाही वंश आहे. तर या वंशाचे वर्णन सर्वांआधी व सविस्तर मला सांगावे.

वैशंपायन सांगतात - हे जनमेजया, फार चांगली गोष्ट आहे. पुरुवंश हा सर्वोत्तमच आहे, त्याचें पौरुषही अत्युत्कृष्ट आहे; व त्यांतच तुझा जन्मही आहे. याकरितां तुझ्या इच्छेप्रमाणे सर्वांआधी व विस्तारानें तो मी तुला सांगतो. त्याच्यामागून क्रमानें द्रुह्यु, अनु, यदु व तुर्वसु यांचेही वंश सांगेन.

हे जनमेजया, पुरूचा पुत्र हा मोठा वीर्यवान् होता. त्याला पुढें प्रचिन्वान नामक पुत्र झाला. त्यानें पूर्व दिशा जिंकिली. प्रचिन्वानाला पुढें प्रवीर झाला. प्रवीराला मनस्यू. मनस्यूला अभयद. अभयदाचे पोटीं राजा सुधन्वा हा जन्मला. सुधन्व्याला पुढें बहुगव झाला. बहुगवाला शम्याति. शम्यातीला रहस्याति. रहस्यातीला रौद्राश्व. रौद्राश्वाला घृताची नामक रंभेपासून दहा पुत्र झाले. या दहांपैकी ऋचेयु हा पहिला होता, पुढें कृकणेयु, कक्षेयु, स्थंडिलेयु, सन्नतेयु, दशार्णेयु, जरेयु, स्थलेयु, धनेयु व वनेयु. याचप्रमाणें त्याला दहा मुलीही होत्या. त्यांची नांवे - रुद्रा, शूद्रा, भद्रा, मलदा, मलहा, खलदा, नलदा, सुरसा, गोचपला व स्त्रीरत्‍नकूटा. अत्रिवंशांत जन्मलेला प्रभाकर ऋषि हा या दाही बहिणींचा भर्ता होता. त्यानें पहिली जी रुद्रा, हिचे ठायीं सोम नावांचा यशस्वी पुत्र निर्माण केला. या ऋषीला प्रभाकर नांव पडण्याचे कारण, एकदां राहूच्या आघातानें सूर्य हा आकाशांतून धरणीवर पडून सर्व लोक तमोमय झाला असतां यानें प्रभा पाडली. याशिवाय सूर्य खालीं येत असतां 'स्वस्ति असो, स्वस्ति असो,' असें त्याला उद्देशून या ब्राह्मणानें म्हटल्यामुळें सूर्य पृथ्वीवर न पडतां तसाच आकाशांत थबकून राहिला. या महातपस्वी ऋषीच्या प्रभावानें अत्रिवंशाला अतिशयच महत्व आले. तें इतकें कीं, जेवढे मिळून गोत्रप्रवर्तक झाले त्यांत अत्रीचाच मान श्रेष्ठ आहे. यज्ञांतही आत्रेय ब्राह्मणाला स्वतंत्र दक्षणा दिली पाहिजे अशी आज्ञा आहे. हा कायदा प्रत्यक्ष देवांनीच घालून दिला आहे. असो; अशा त्या प्रख्यात प्रभाकर ऋषीनें, त्याला (रौद्राश्वानें) पुत्रिका विधीनें दिलेल्या ज्या रुद्रादि दहाजणी होत्या त्यांचे ठिकाणीं तपोनिष्ठ असे दहा पुत्र निर्माण केले. हे सर्वही मोठे वेदपारंगत ऋषि होऊन गोत्रकर्ते ऋषि झाले. यांना स्वस्त्यात्रेय असें नांव पडलें. मात्र बापाची मालमत्ता कांहींही यांच्या हातीं लागली नाहीं. असो; कक्षेयूला तीन महारथी पुत्र होते. त्यांची नांवे - सभानर, चाक्षुष, परमंथु. या सभानराचा पुत्र कालानल नामक होता. हा मोठा विद्वान होता. त्या कालानलाला सृंजय नांवाचा एक धर्मज्ञ पुत्र होता. सृंजयाला पुरंजय नांवाचा मोठा वीर पुत्र झाला. या पुरंजयाचे पोटीं राजा जनमेजय हा जन्मला; आणि राजर्षि जनमेजयाचा महाशाल हा पुत्र होता. हा वेदांमध्यें निपुण असून याची सर्व पृथ्वीवर मोठी कीर्ति होती. या महाशालाला महामना नांवाचा मोठा धार्मिक व वीर पुत्र झाला. यानें मोठाच लौकिक कमविला. देवगण देखील याला मान देत. या महामनानें दोन पुत्र निर्माण केले. पहिला उशीनर, हा मोठा धर्मज्ञ होता; व दुसरा तितिक्षु, हा मोठा बलाढ्य होता. उशीनराला पांच स्त्रिया होत्या. या सर्वही राजर्षींच्या कुळातल्या होत्या. यांचीं नांवे - नृगा, कृमी, नवा, दर्वा व पांचवी दृषद्वती. या पांचींच्या ठिकाणीं पांच पुत्र त्या उशीनराला झाले. ते मोठ्या तपश्चर्येने झाले व उतारवयांत झाले. तथापि, ते कुलभूषण निपजले. नृगेला नृग झाला, कृमीला कृमि झाला, नवेला नव झाला, दर्वेला सुव्रत झाला; व दृषद्वतीला राजा शिबी झाला. शिबीच्या संततीला शिबीच म्हणत. नृगाच्या संततीला योधेय म्हणत. नवाच्या राजधानीला नवराष्ट्र म्हणत; कृमीच्या राजधानीला कृमिलापुरी म्हणत, व सुव्रताच्या राजधानीला अंबष्ठा असें म्हणत; आतां शिबीचे पुत्र ऐक. हे चार होते. हे मोठे त्रैलोक्यांत प्रख्यात असे वीर होते. यांचीं नांवें - वृषदर्भ, सुवीर, भद्रक व कैकेय. यांचीं राज्यें मोठीं समृद्ध होतीं व त्यांना त्यांच्या राजकर्त्यांवरून वृषदर्भ, सुवीर, भद्रक व कैकेय अशींच नांवें पडलीं. आतां तितिक्षूची प्रजा ऐक. तितिक्षूला उषद्रथ नांवाचा मुलगा झाला. हा मोठा बलाढ्य असून याने पूर्व दिशेला आपलें राज्य स्थापिलें. उषद्रथाला पुढें फेन नांवाचा पुत्र झाला. फेनापासून सुतप. सुतपापासून राजा बलि. हा बलिराजा पूर्वजन्मीं दानवयोनींत असून फार मोठा योगी होता. तो या जन्मीं मनुष्ययोनींत येऊन राजा झाला. याचा भाता सोन्याचा असे. या बलीनें आपला वंश चालविणारे असे पांच पुत्र इहलोकीं निर्माण केले. त्यांत अंग हा प्रथम झाला. पुढे वंग व सुस हे झाले. शेवटीं पुंड्र व कलिंग झाले. एवढी प्रजा त्याला क्षत्रिय स्त्रीपासून झाली. याखेरीज ब्राह्मण जातींतही त्याचा वंश चालू झाला. हे जनमेजया, या बलीला ब्रह्मदेवानें प्रसन्न होऊन मोठमोठाले वर दिले होते, ते हे, "तूं महायोगी होशील. तुला कल्पपर्यंत आयुष्य राहील. युद्धांत तूं अजिंक्य रहाशील. धर्मविचारांत तुझ्या मताला वरिष्ठ मान मिळेल. त्रैलोक्यांत काय काय घडत आहे, तें तुला कळत जाईल. तुझ्या अर्ध्या वचनांत लोक राहातील. शक्तींत तुझी बरोबरी कोणीच करणार नाहीं. धर्मांचीं जी अंतरंग रहस्यें त्यांचा तुला अपरोक्ष साक्षात्कार राहील. तूं या भूतलावर ब्राह्मण क्षत्रियादि चतुर्वर्णांची आपआपल्या मर्यादेनें स्थापना करशील." याप्रमाणें ब्रह्मदेवानें दिलेले वर ऐकून बलिराजा परम शांतीला प्राप्त झाला. बलि हा जात्या ऊर्ध्वरेता असल्यानें त्याची जी ही ब्राह्मणक्षत्रियादि संतति सांगितली ती त्याच्या पोटची नसून त्याचें क्षेत्र म्हणजे स्त्री जी सुदेष्णा तिचे ठायीं महातेजस्वी जो दीर्घतप नामक ऋषि त्याजपासून झालेली होती व म्हणूनच तिला क्षेत्रज म्हणत. बलीनें वर सांगितलेल्या आपल्या पांचही निष्पाप पुत्रांस राज्याभिषेक करून आपली संसारातील कर्तबगारी संपली, असें समजून योगाचा मार्ग धरिला. तो मूळचाच समर्थ योगी होता. तो सहजच प्राणिमात्राला अजिंक्य झाला; व शेवटीं कृतकृत्य होऊन केवळ आयुष्याची नेमलेली कल्पपर्यंतची मर्यादा संपे तों वाट पाहात राहिला; व ठरल्याप्रमाणें कल्पाचा दीर्घकाल संपतांच देह ठेवून आपल्या पूर्वस्थानाला गेला. असो; बलीचे जे वर पांच पुत्र सांगितले ते राजे झाल्यावर त्यांच्या राज्यांना त्यांच्याच नांवावरून अंगदेश, वंगदेश, सुह्यदेश, पुण्ड्रक व कलिंग अशीं नावे पडली. आतां बलीपुत्र जो अंग त्याची संतति ऐक. अंगाला राजेंद्र दधिवाहन नामक मोठा प्रतापी पुत्र झाला. या दधिवाहनाचा पुत्र दिविरथ नामक झाला. हा पराक्रमानें केवळ इंद्रतुल्य होता. या दिविरथाला पुढें विद्वान् धर्मरथ हा पुत्र झाला. धर्मरथाला पुढें चित्ररथ झाला. या चित्ररथानें विष्णुपद नामक पर्वतावर यज्ञ करून त्या यज्ञांत इंद्राचे बरोबर बसून सोमपान केलें. या चित्ररथाला दशरथ नामक पुत्र झाला. यालाच लोमपाद असें म्हणत असत. याला शांता नामक कन्या होती. (ही ऋष्यशृंग नामक ऋषीला दिली होती.) ऋष्यशृंगाच्या प्रसादानें या दशरथाला महायशस्वी चतुरंग नांवाचा पुत्र झाला. या चतुरंगाला पुढें पृथुलाक्ष नामक पुत्र झाला. या पृथुलाक्षाला चंप नामक पुत्र झाला. यानें आपल्या राजधानीस चंपा असें नांव ठेविले. हिला पूर्वी मालिनी असें नांव होते. पूर्णभद्र मुनीच्या प्रसादानें याला हर्यंग नांवाचा पुत्र झाला. या हर्यंगाकरितां विभांडकपुत्र जो ऋष्यशृंग ऋषि यानें आपल्या मंत्रसामर्थ्यानें सागरोद्भव जो इंद्राचा ऐरावत नामक हत्ती तो स्वर्गलोकाहून खालीं आणला, व याच वाहनावर हा राजा फिरत असे.

या राजाला भद्ररथ नामक पुत्र झाला. भद्ररथाला पुढे बृहत्कर्मा पुत्र झाला. त्या बृहत्कर्म्याला पुढें बृहद्दर्भ हा झाला. बृहद्दर्भाला बृहन्मन झाला. या बृहन्मनानें पुढें जयद्रथनामक पुत्र निर्माण केला. जयद्रथाला पुढें राजा दृढरथ हा झाला. दृढरथाला पुढें व विश्वजित हा झाला. व विश्वजिताचा कर्ण, आणि कर्णाचा विकर्ण. विकर्णाला अंगवंशाची वृद्धि करणारे असे शंभर पुत्र झाले. मघां जो बृहद्दर्भाचा पुत्र बृहन्मन राजा सांगितला त्याला दोन स्त्रिया होत्या. एकीचें नांव यशोदेची व दुसरीचें नांव सत्या. या दोघीही सुलक्षणी स्त्रिया चैद्याच्या मुली होत्या. या सवतींपासून या वंशाचे दोन फांटे झाले. यशोदेवीचे पोटीं वर सांगितलेला जयद्रथ आला, व सत्येच्या पोटीं विजय हा आला. हा विजय शांत्यादिक गुणांनीं कोणाही बाह्मणापेक्षां व शौर्यादि गुणांनी कोणाही क्षत्रियापेक्षां श्रेष्ठ होता. या विजयाला धृतिनामक पुत्र झाला. धृतीचा पुढें धृतव्रत. धृतव्रताचा पुत्र महायशस्वी सत्यकर्मा. सत्यकर्माला अधिरथनामक सूतपुत्र झाला. या अधिरथ सूतानें कुंतीपुत्र कर्ण याला आपलासें म्हटलें होतें, व त्यामुळेंच कर्णाला पुढें सूतपुत्र असें म्हणत. याप्रमाणें महाबल कर्णापर्यंत तुला वंशवर्णन सांगितलें. या कर्णाचा पुत्र वृषसेन व वृषसेनाचा पुढें वृष.

हे महाराजा, याप्रमाणें मीं तुला अंग-वंशाचे सर्व राजे सांगितले. हे सर्वही मोठे सत्यनिष्ठ, महारथी, महात्मे व प्रजावान असे होते. आतां, हे राजा, रौद्राश्वाचा पुत्र जो ऋचेयु त्याचा वंश म्हणजे ज्या वंशांत तूं स्वतः उत्पन्न झालास, तो तुला सांगतों ऐक.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
कुक्षेयुवंशानुकीर्तनं नाम एकत्रिंशोऽध्यायः ॥ ३१ ॥
अध्याय एकतिसावा समाप्त

GO TOP