श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
द्वात्रिंशोऽध्यायः


पुरुवंशानुकीर्तनम्

वैशम्पायन उवाच
अनाधृष्यस्तु राजर्षिर्ऋचेयुश्चैकराट् स्मृतः ।
ऋचेयोर्ज्वलना नाम भार्या वै तक्षकात्मजा ॥ १ ॥
तस्यां स देव्यां राजर्षिर्मतिनारो महीपतिः ।
मतिनारसुताश्चासंस्त्रयः परमधार्मिकाः ॥ २ ॥
तंसुराद्यः प्रतिरथः सुबाहुश्चैव धार्मिकः ।
गौरी कन्या च विख्याता मान्धातृजननी शुभा ॥ ३ ॥
सर्वे वेदविदस्तत्र ब्रह्मण्याः सत्यवादिनः ।
सर्वे कृतास्त्रा बलिनः सर्वे युद्धविशारदाः ॥ ४ ॥
पुत्रः प्रतिरथस्यासीत्कण्वः समभवन्नृपः ।
मेधातिथिः सुतस्तस्य यस्मात्काण्वायना द्विजाः ॥ ५ ॥
ईलिनी भूप यस्यासीत् कन्या वै जनमेजय ।
ब्रह्मवादिन्यधि स्त्रीं च तंसुस्तामभ्यगच्छत ॥ ६ ॥
तंसोः सुरोधो राजर्षिर्धर्मनेत्रो महायशाः ।
ब्रह्मवादी पराक्रान्तस्तस्य भार्योपदानवी ॥ ७ ॥
उपदानवी सुताँल्लेभे चतुरस्त्वैलिकात्मजान् ।
दुष्यन्तमथ सुष्मन्तं प्रवीरमनघं तथा ॥ ८ ॥
दुष्यन्तस्य तु दायादो भरतो नाम वीर्यवान् ।
स सर्वदमनो नाम नागायुतबलो महान् ॥ ९ ॥
चक्रवर्ती सुतो जज्ञे दुष्यन्तस्य महात्मनः ।
शकुन्तलायां भरतो यस्य नाम्ना स्थ भारताः ॥ १० ॥
दुष्यन्तं प्रति राजानं वागुवाचाशरीरिणी ।
माता भस्त्रा पितुः पुत्रो येन जातः स एव सः ॥ ११ ॥
भरस्व पुत्रं दुष्यन्त मावमंस्थाः शकुन्तलाम् ।
रेतोधाः पुत्र उन्नयति नरदेव यमक्षयात् ॥ १२ ॥
त्वं चास्य धाता गर्भस्य सत्यमाह शकुन्तला ।
भरतस्य विनष्टेषु तनयेषु महीपतेः ॥ १३ ॥
मातॄणां तात कोपेन मया ते कतिथं पुरा ।
बृहस्पतेराङ्गिरसः पुत्रो राजन् महामुनिः ।
संक्रामितो भरद्वाजो मरुद्भिः ऋतुभिर्विभुः ॥ १४ ॥
अत्रैवोदाहरन्तीमं भरद्वाजस्य धीमतः ।
धर्मसंक्रमणं चापि मरुद्भिर्भरताय वै ॥ १५ ॥
अयोजयद् भरद्वाजो मरुद्भिः क्रतुभिर्हि तम् ।
पूर्वं तु वितथे तस्य कृते वै पुत्रजन्मनि ॥ १६ ॥
ततोऽथ वितथो नाम भरद्वाजसुतोऽभवत् ।
ततोऽथ वितथे जाते भरतस्तु दिवं ययौ ॥ १७ ॥
वितथं चाभिषिच्याथ भरद्वाजो वनं ययौ ।
स राजा वितथः पुत्राञ्जनयामास पञ्च वै ॥ १८ ॥
सुहोत्रं च सुहोतारं गयं गर्गं तथैव च ।
कपिलं च महात्मानं सुहोत्रस्य सुतद्वयम् ॥ १९ ॥
काशिकश्च महासत्त्वस्तथा गृत्समतिर्नृपः ।
तथा गृत्समतेः पुत्रा ब्राह्मणाः क्षत्रिया विशः ॥ २० ॥
काशिकस्य तु काशेयः पुत्रो दीर्घतपास्तथा ।
अजमीढोऽपरो वंशः श्रूयतां पुरुषर्षभः ॥ २१ ॥
Edit remaining shlokas as per book


पुरुवंशानुकथन -

हे राजा, तुझा पूर्वज ऋचेयु याचा त्याकाळीं पराक्रमानें युद्धांत हात धरणारा कोणीही नसल्यामुळें तो एकच राजा आहे, असें म्हणत. या ऋचेयूला तक्षकाची कन्या ज्वलना ही दिली होती. या ज्वलनेचे ठिकाणीं त्यानें मतिनार नांवाचा पुत्र उत्पन्न केला. या मतिनाराला मोठे धार्मिक असे तीन पुत्र होते. त्यांतील पहिला तंसु, दुसरा प्रतिरथ व तिसरा सुबाहु. यांशिवाय मांधाता नामक प्रसिद्ध राजर्षीची माता जी गौरी ती याची कन्या होती. हे तिघेही बंधु मोठे वेदवेत्ते, ब्रह्मज्ञ, सत्यवादी, बलाढ्य, अस्त्रनिपुण व युद्धविशारद असे होते. यांपैकीं प्रतिरथाला कण्व नामक पुत्र झाला, हाच पुढें राजा झाला. कण्वाचा पुढें मेधातिथि. या मेधातिथीपासून काण्वायन नांवानें प्रसिद्ध असणारें द्विजकुल निर्माण झालें. हे राजा जनमेजया, मोठया ब्राह्मणांनाही भारी असा कोणी एक राजर्षि होता, त्याची ईलिनी नामक कन्या होती. तिच्याशी तंसूनें लग्न लाविलें. त्यापासून तंसूला पुढें सुरोध नामक पुत्र झाला. हा सुरोध राजर्षि, मोठा धर्मप्रवर्तक, यशस्वी, ब्रह्मवादी व पराक्रमी होता; व उपदानवी ही त्याची भार्या होती. हिला सुरोधापासून चार पुत्र झाले. त्यांची नांवें - दुष्यंत, सुष्मंत, प्रवीर व अनघ.

त्यांपैकीं दुष्यंताला भरत नांवाचा वीर्यशाली पुत्र झाला; याला, अयुत हत्तींचें बळ असे; व याच्या पराक्रमामुळें त्याला सर्वदमन म्हणत. हा शकुंतलेच्या पोटीं आला. हा पुढें मोठा चक्रवर्ती झाला; व हे जनमेजया, तुमच्या कुळाला जें आजकाल भारत हे नांव प्राप्त झालें आहे, तें याचे योगानेंच. याला भरत हें नांव पडण्याचे कारण असें आहे कीं, शकुंतलेने हा तुझा म्हणून पुढें आणून ठेविलेल्या पुत्राचा दुष्यंत जेव्हां स्वीकार करीना तेव्हां आकाशवाणी झाली कीं "बाबारे, पुत्र म्हटला म्हणजे पित्याचा माल. किंबहुना पिताच तो. माता ही केवळ निमित्त आहे. ती कांहीं कालपर्यंत (गर्भावस्थेत असतांना) पुत्र सांठविण्याची एक चर्ममय पिशवी आहे. यापलीकडे तिचा अधिकार नाहीं. सारांश, पुत्र हा बापाचा. याकरितां, हे दुष्यंता, (साध्वी) शकुंतलेची अशी हेटाळणी करूं नको. तिनें आणलेला हा पुत्र तुझा आहे. हा घे आणि याचे भरण-पोषण कर. बाबारे, स्ववीर्यापासून उत्पन्न होणारा पुत्र ही एक दुर्मिळ चीज आहे. कारण, असला पुत्र हा आपल्या बापाला यमसदनांतून बाहेर ओढून काढितो. (नरकांत पडू देत नाही). हे राजा, शकुंतला बोलली तेंच खरें आहे. हा गर्भ तूंच तिचे ठिकाणीं स्थापिलेला आहेस." हे जनमेजया, मी तुला पूर्वीं आदिपर्व सांगतांना सांगितलेंच आहे कीं मातृकोपामुळें भरतकुलाचा उच्छेद झाला होता. तेव्हां आंगिरसकुलोत्पन्न बृहस्पतीचा पुत्र जो समर्थ महामुनी भरद्वाज त्याला मरुत नामक यज्ञदेवतांनीं भरतवंशांत पुत्रत्वानें संक्रमित केलें. या कामीं मरुतांनीं बुद्धिवान भरद्वाजाला धर्मबुद्धीनें भरतकुलात नेऊन घातलें, आणि भरद्वाजानेही मोठे क्रतु करून उलट मरुतांचें कल्याण केलें. ही गोष्ट लोकांच्या तोंडी आहे. मातृशापानें भरतवंशात पुत्रोत्पत्ति बंद पडली होती; तथापि, भरद्वाज जेव्हां त्या वंशांत आला तेव्हां ती पुन्हा चालू झाली. त्या कुळांत आल्यावर त्याला वितथ नामक पुत्र झाला. नातू दृष्टीस पडला, तेव्हां आपला खंडित वंश आतां सुरू झाला, अशी मनाला खातरी होऊन मग भरत राजा स्वर्गाला गेला. इकडे तपोनिष्ठ भरद्वाजही आपला पुत्र वितथ याला राज्यावर बसवून तपोवनांत गेला. पुढें या वितथाला पांच पुत्र झाले. त्यांचीं नांवें - सुहोत्र, सुहोता, गय, गर्ग व महात्मा कपिल. सुहोत्राला पुढें दोन मुलगे झाले. एक महासत्ववान् काशिक, व दुसरा, राजा गृत्समति. गृत्समतीला ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या तिन्ही जातींत संतति झाली. काशिकाला काशेय आणि दीर्घतप हे पुत्र झाले. दीर्घतपाला धन्वंतरी नामक पुत्र झाला. धन्वंतरीचा पुत्र केतुमान, केतुमानाचा राजा वीर भीमरथ. भीमरथाचा पुत्र राजा दिवोदास. ह्या दिवोदासानें सर्व राक्षसांचा नाश केला, अशी प्रसिद्धी आहे. दिवोदासाचे वेळींच निकुंभानें सहस्त्र वर्षेपर्यंत तूं ओस पडशील असा वाराणशीला शाप दिल्याप्रमाणें तीं ओस पडली; व पुढें तीं क्षेमकानें पूर्ववत वसविली. वाराणशीला शाप होतांच दिवोदासानें तिच्याच सिंवेवर गोमतीचे कांठीं नवी राजधानी वसविली. ही वाराणशी नगरी पूर्वी यदुवंशांत उत्पन्न झालेला जो तपोनिष्ठ राजा भद्रश्रेण्य त्याची राजधानी होती. पुढें या भद्रश्रेण्याला मोठे शूर शंभर पुत्र झाले. परंतु यांचा निःपात करून राजा दिवोदासानें आपली वसति त्या नगरांत केली. दिवोदासाला राजा प्रतर्दन हा पुत्र झाला. प्रतर्दनाला पुढें दोन पुत्र झाले. पैकीं एकाचें नांव वत्स व दुसर्‍याचें भार्ग. या वत्साला अलर्क हा पुत्र झाला. अलर्काला पुढें सन्नतिमान हा पुत्र झाला. भद्रश्रेण्याचा पुत्र दुर्दम याला हैहयानें दत्तक घेतलें. हा दुर्दम बाल असें समजून (त्याचे इतर बंधु मारितांना) दिवोदासानें दयेस्तव राखिला होता. परंतु, यानेंच दिवोदासानें बळकाविलेलें आपल्या वडिलांचे राज्य परत हिसकावून घेतलें. मागें जो केतुमान राजा सांगितला, त्याचा पुत्र जो भीमरथ किंवा दिवोदास याला अष्टारथ नांवाचा पुत्र झाला. याला प्रतर्दन असेंही म्हणत. यानें वैराचें बीज नाहींसें व्हावे म्हणून दुर्दमाचे पुत्र बाल आहेत असें पाहून त्यांचा चुराडा केला. काशीचा अधिपति अलर्क राजा हा मोठा ब्रह्मज्ञ व सत्यप्रतिज्ञ होता. लोपामुद्रेच्या कृपेनें हा सदैव तरुण असून याचे रूप कधींच उतरलें नाहीं. त्याचें राज्यही मोठें विशाल होतें. अशा रूपयौवनाच्या भरांत त्यानें तें राज्य साठ हजार सहाशें वर्षेपर्यंत भोगलें. इतकें विपुल आयुष्य त्याला प्राप्त होण्याला कारण तरी लोपामुद्रेचाच प्रसाद. इतकें दीर्घकाल राज्य करून अखेर त्यानें क्षेमक नामक राक्षसाचा वध करून वाराणशी नामक जी नगरी ओस पडली होती, ती पुन्हा वसविली. या अलर्काला सुनीथ नांवाचा पुत्र होता. सुनीथाचा क्षेम्य. क्षेम्यापासून केतुमान झाला; केतुमानापासून वर्षकेतु; वर्षकेतूचा पुढें विभु; विभूचा आनर्त; आनर्ताचा सुकुमार; सुकुमाराचा महारथी सत्यकेतु; सत्यकेतूपासून मोठा धार्मिक व तेजस्वी असा वत्स राजा झाला; वत्साच्या पुत्राला वत्सभूमी म्हणत; व भार्गवाच्या पुत्राला भार्गभूमी असें म्हणत. हें सर्वही भार्गववंशांत उत्पन्न झालेले अंगिरसाचे पुत्र होते. यांत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारही जाती होत्या.

वितथाचा पुत्र जो सुहोत्र त्याचा पुत्र बृहत हा झाला. बृहताला पुढें अजमीढ, द्विमीढ व पुरुभीढ असे तीन पुत्र झाले. अजमीढाला मोठया यशस्विनी अशा तीन स्त्रिया होत्या. रूपलक्षणांनीं या सर्वही फार उंची प्रतीच्या स्त्रिया होत्या. यांची नांवें - नलिनी, केशिनी व धूमिनी. पैकीं केशिनीपासून अजमीढाला प्रतापशाली जन्हु हा पुत्र झाला. यानें सर्वमेध नांवाचा बहुत दिवस चालणारा महायज्ञ केला. त्याचे रूपाला भुलून गंगा अति नम्र होऊन एखाद्या अभिसारिकेसारखी त्याकडे आली. परंतु, तो तिचा स्वीकार करीना. तेव्हां तिनें रागावून त्याची ती सर्व यज्ञशाला जलांत बुडवून टाकिली. तें तिचें कृत्य पाहून, हे भरतश्रेष्ठा, जन्हु गंगेला म्हणाला, 'तूं फार माजली आहेस, पण तुझा नखरा मी आतांच उतरतों. तिन्ही लोकांत तुझें आहे नाहीं तें सर्व उदक आतांच पिऊन टाकितों. म्हणजे तुझ्या उर्मटपणाबद्दल तुला चांगलेंच शासन होईल.' असें म्हणून त्या गाजीनें गंगेचें आचमन करून टाकिलें. तें कृत्य पाहून महर्षींना मोठी फिकीर पडली, व त्यांनीं त्याची विनवणी केली, तेव्हां त्यानें ती मोकळी सोडिली. ती जन्हूच्या पोटांतून आली असें पाहून त्यांनीं तिला जान्हवी म्हणजे जन्हूची कन्या अशी संज्ञा दिली. (तिचेकडे कन्यात्व आल्यामुळें तिचे जन्हूविषयींचें विषयप्रेम अर्थांतच लटकें पडलें.) मग जन्हूनें युवनाश्वाची मुलगी कावेरी हिच्याशीं लग्न लाविलें. ह्या कावेरीला गंगेचा शाप झाल्यामुळें पुढें तिचें देहार्ध नदीरूप बनलें. जन्हूला पुढें अजक नांवाचा पुत्र झाला. हा बापाचा मोठा लाडका असून मोठा प्रतापी होता. या अजकाला पुढें बलाकाश्व हा पुत्र झाला. याला शिकारीचा फार नाद असे. त्याचा पुत्र कुशिक, हा पल्हव नामक रानटी लोकांनीं सदा वेढलेला असे. पुढें या कुशिकानें इंद्राप्रमाणें पराक्रमी पुत्र व्हावा, म्हणून तीव्र तप आरंभिलें. तेव्हां इंद्राला धास्ती पडून तोच पुत्रत्वानें त्याचे पोटीं आला. हाच तो गाधी नांवाचा राजा झाला. अर्थात गाधी म्हणजे खुद्द इंद्रच. या गाधीला पुढें विश्वामित्र झाला.

याशिवाय विश्वरथ, विश्वकृत विश्वजित असे आणखी तीन पुत्र त्याला झाले, व या चौघांही भावांहून धाकटी सत्यवती नांवाची कन्या झाली. ही सत्यवती ऋचीकाची स्त्री झाली, व तिजपासून (प्रसिद्ध) जमदग्नि झाला. विश्वामित्राला त्रैलोक्यांत प्रसिद्ध असे बहुत पुत्र झाले. त्यांचीं नांवें - देवश्रवा, कति, (याजपासूनच कात्यायन हे झाले.) शालावती नामक स्त्रीपासून हिरण्याक्ष झाला. रेणूपासून रेणुमान झाला. याशिवाय सांकृत्य, गालव व मौद्ग‍ल्य असेही पुत्र होते. या सर्व कुशिककुलोत्पन्न पुरुषांची गोत्रे मोठी प्रख्यात आहेत. पणी, बभ्रु, ध्यानजप्य, देवरात, शालंकायन, सौश्रव, लौहित्य, यामदूत, कारीत, सौश्रुत व तसेच आणखी सैंधवायन हे सर्वही कुशिककुलाचेच फांटे आहेत. यांतील पुष्कळ प्रवरभेदानें आपआपसांत विवाह करूं शकतात. हे महाराजा, पुरुकुलोत्पन्न राजे, व कुशिककुलोत्पन्न ऋषि, यांचे आपसांत संबंध झाले आहेत. अर्थात ब्राह्मण व क्षत्रिय यांची मिसळ येथें झाली आहे. विश्वामित्राच्या पुत्रांत शुनःशेफ हा वडील होता. हा मुनिश्रेष्ठ मूळचा भार्गव असून पुढें कौशिककुलास मिळाला. याशिवाय देवरात वगैरे विश्वामित्राला आणखी पुत्र होते. विश्वामित्राची दृषद्वती नामक जी एक स्त्री होती, तिजपासून झालेल्या पुत्रांचे नांव अष्टक असें होतें. या अष्टकाला पुढें लौहि हा पुत्र झाला. येथवर जन्हूचा वंश मी सांगितला.

आतां हे पुरुषश्रेष्ठा, अजमीढाचा वंश सांगतो, ऐक. अजमीढाला नीलिनी नामक स्त्रीपासून सुशांति नामक पुत्र झाला. सुशांतीचा पुरुजाति, पुरुजातीचा बाह्याश्व. बाह्याश्वाला देवतुल्य पांच पुत्र होते. त्यांचीं नांवें - मुद्गल, सृंजय, बृहदिषु, पराक्रमी यवीनर व पांचवा कृमिलाश्व. या पांचांचे ताब्यांत पांच देश होते. हे सर्वही देश भरवस्तीचे असून भरभराटीचे होते. असल्या पांच देशांचे संरक्षण करण्यास हे पंच म्हणजे पांचही बंधु अलम म्हणजे समर्थ होते, म्हणून त्यांना पंचाल असें नांव पडलें होतें आणि यांच्या देशालाही तेंच नांव दिलें होतें. यांपैकी मुद्गलाचे पोटीं मोठा यशस्वी मौद्गल्यनामक पुत्र झाला. हे सर्वही मोठे थोर असून क्षत्रधर्माचा आश्रय करणारे ब्राह्मण होते. कण्व आणि मुद्गल यांनी अंगिरस पक्षाचा आश्रय केला. या मोद्गलाचा वडील मुलगा मोठा कीर्तिमान इंद्रसेन नांवाचा होता. त्याला पुढें बध्न्यश्व हा पुत्र झाला. यानें मेनकेचे ठिकाणीं एक मुलगा व एक मुलगी अशी एक जोडी उत्पन्न केली. मुलाचें नांव दिवोदास, व मुलीचें नांव अहल्या. ही अहल्या शरद्वत गौतमाला दिली होती. हिजपासून ऋषिश्रेष्ठ शतानंद हा झाला. शतानंदापासून मोठा कीर्तिमान असा सत्यधृति नामक पुत्र झाला. हा धनुर्वेदांत मोठा निपुण होता. हा सत्यधृति तप करीत असतां त्याच्या तपाला विघ्न आणण्यासाठीं जालपदी नांवाची अप्सरा आली. तिला पुढें पाहून हा मोहित झाला, व तिला कवटाळून धरीत असतां ती निसटली. मग तिजमागून तसाच धांवत जात असतां त्याचें रेत शर नामक गवताच्या बेटांत गळलें. त्या वीर्यांपासून तेथेंच एक मुलगा व एक मुलगी असें जोडपे उत्पन्न झालें. शंतनु राजा मृगयेला गेला असतां त्यानें तीं अर्भकें पाहून कृपेनें त्यांचें ग्रहण करून संगोपन केलें; व याच कारणानें त्या मुलाला कृप, व मुलीला कृपी किंवा गौतमी असें म्हणत. शरद्वतनामक यांच्या पूर्वजांवरून त्यांना कोणी शारद्वत किंवा गौतम असेंही म्हणतात.

आतां दिवोदासाची संतति सांगतों. दिवोदासाला राजा मित्रयु नांवाचा पुत्र होता. त्याच्यापासूनच मैत्रायणी शाखा उत्पन्न झाली, व हिजवरूनच मैत्रेय असें नांव कित्येक कुळांना पडलें. हे सर्व भृगुकुलोत्पन्न पुरुष क्षत्रियपक्षाचा आश्रय करून होते. महात्मा सृंजयाला पंचजन नामक पुत्र होता. पंचजनाचा पुत्र सोमदत्त राजा. सोमदत्ताचा सहदेव. या यशस्वी सहदेवाचा पुत्र सोमक राजा. हा वंशक्षय झाला असतां सहदेवाचे पोटीं पुन्हा आला. या सोमकाला जंतु नामक पुत्र झाला. त्याला पुढें शंभर पुत्र होते. या सर्वांत कनिष्ठाचें नांव पृषत. हाच समर्थ पृषतराजा द्रुपदाचा बाप. द्रुपदाला पुढें धृष्टद्युम्न झाला. धृष्टद्युम्नाला धृष्टकेतु. येथवर हे अजमीढाचे प्रसिद्ध वंशज सांगितले. यांनाच सोमक असेंही म्हणत. कारण, अजमीढाचा पुत्र सोमक यावरून हें नांव पडलें. (अजमीढाच्या नीलिनी नामक स्त्रीची संतति वर सांगितली.) आतां अजमीढाची तिसरी स्त्री जी धूमिनी तिची संतति सांगतो. हे राजा, ही धूमिनी हीच तुझ्या पूर्वजांची माता. ही पुत्रासाठी हपापली असल्यामुळें हिनें स्त्रीजनांला परम दुश्चर असें अयुतवर्षेपर्यंत पुत्रप्राप्त्यर्थ म्हणून तीव्र तप केले. ती व्रतस्थ राहून यथाविधी अग्नीला होम देत असे; व नंतर पवित्र अन्नाचे मित भोजन करी, व अग्निहोत्रार्थ आणिलेल्या कुशांचेच आस्तरण करून त्याजवरच निजे. असें तप केल्यावर अजमीढानें धूमिनीशीं संगम केला. त्या संगमापासून दिसण्यांत सुंदर पण वर्णानें धुरकट असा ऋक्ष नांवाचा पुत्र झाला. या ऋक्षापासून संवर्ण झाला. संवर्णाला पुढें कुरु. हा कुरु म्हणजे प्रयाग सोडून पलीकडे गेलें असतां लागणारे जें प्रसिद्ध कुरुक्षेत्र तें ज्यांने निर्माण केलें तोच. हे क्षेत्र निर्माण करण्याचें कामीं त्या महाभाग कुरूला बहुत वर्षे तप करावें लागलें. तपांतीं इंद्रानें त्याला वर दिला. त्या वरापासून कुरूने हे पवित्र लोक जेथें वसति करून राहातात, असलें पावन व रमणीय क्षेत्र निर्माण केलें. या कुरूचा पुढील वंश फारच प्रबळ झाला. हे राजा, तुम्ही जे आज कौरव म्हटले जातां ते या पुरुषामुळेंच. या कुरूला चार पुत्र होते. त्यांचीं नांवें - सुधन्वा, सुधनु, महाबाहु, परीक्षित व अरिकंपन असा प्रवर. यांपैकीं सुधन्व्याला सुहोत्र नामक बुद्धिमान पुत्र झाला. ह्या सुहोत्राला धर्मार्थ-वेत्ता असा चावन हा पुत्र झाला. चावनापासून कृतयज्ञ. या धर्मज्ञ कृतयज्ञानें अनेक यज्ञ करून सर्वत्र विख्यात असा इंद्रतुल्य पुत्र निर्माण केला. या पुत्राचें नांव वसु असें होतें. हा वर अंतरिक्षांत संचार करण्याला समर्थ असल्यामुळें याला उपरिचर वसु असें म्हणत. चेदी वंशाच्या संबंधानें याला चैद्य असेंही म्हणत. या उपरिचरापासून गिरिका नामक स्त्रीला सात अपत्यें झाली. त्यांची नांवें - मगधदेशाचा प्रसिद्ध राजा महारथ किंवा ज्याची बृहद्रथ नांवानें प्रसिद्धी आहे तो. दुसरा प्रत्यग्रह, तिसरा कुश, ज्याला मणिवाहन असेंही म्हणत. यानंतर मारुत, यदु व मत्स्य हीं तीन. हे सहा पुत्र व कालीनामक एक कन्या. यांपैकीं पहिला बृहद्रथ याला कुशाग्र नामक पुत्र झाला. कुशाग्राला पुढें वीर्यशाली वृषभ. या वृषभाला पुष्पवान नांवाचा धार्मिक पुत्र झाला. पुष्पवानाला पराक्रमी सत्यहित हा पुत्र झाला. सत्यहिताला ऊर्ज नांवाचा धर्माला पुत्र झाला. या ऊर्जाला जो बलाढ्य पुत्र झाला, तो दोन शकलांचे रूपानें जन्मास आला. हीं शकलें जरानामक एका राक्षसीने सांधलीं व यामुळें याला पुढें जरासंध असें नांव पडलें. हा मोठाच पराक्रमी निघाला. यानें सर्व क्षत्रियमंडळ पादाक्रांत केलें. जरासंधाला सहदेव नामक पराक्रमी पुत्र झाला. सहदेवाला पुढें श्रीमंत व यशस्वी असा उदायु पुत्र झाला. श्री उदायूनें पुढें श्रुतधर्मा नांवाचा परम धार्मिक पुत्र निर्माण केला. या श्रुतधर्म्यानेंच मगध देशांत वसति केली. कुरूचा द्वितीय पुत्र जो परीक्षिती त्याला जनमेजय पुत्र झाला. जनमेजयाला तीन पुत्र होते. हे सर्वही मोठे बलाढय, पराक्रमी व महारथी होते. यांचीं नांवें - श्रुतसेन, उग्रसेन व भीमसेन. यांशिवाय मणिमती नामक स्त्रीपासून जनमेजयाला सुरथ व मतिमान असे दोन पुत्र झाले. पैंकीं सुरथाला विदूरथ नामक पराक्रमी पुत्र झाला. ऋक्ष जो प्रसिद्ध महारथी तो या विदूरथाचाच पुत्र. हे जनमेजया, कुरुपितामह जो ऋक्ष नामक तुझा पूर्वज होऊन गेला, त्याचाच नामधारी हा दुसरा ऋक्ष झाला; व हाही तसाच पराक्रमी होता. एकूण तुझ्या कुळांत दोन ऋक्ष, दोन परीक्षिति, तीन भीमसेन व दोन जनमेजय झाले. यांपैकीं दुसर्‍या ऋक्षाला भीमसेन हा पुत्र झाला. भीमसेनाला प्रतीप, व प्रतीपाला शंतनु, देवापि आणि बाल्हिक असे तीन महारथी पुत्र झाले.

हे राजा, तूं ज्या शाखेंत उत्पन्न झाला आहेस, ती ही शंतनूची शाखा. बाल्हिकाचें जें राज्य होतें, तें ज्ञान, विज्ञान, धर्म, बल, काम उपायसंग्रह व शरीरभोग, यांत कमी होतें. बाल्हिकाला सोमदत्त नांवाचा यशस्वी पुत्र झाला. सोमदत्ताला भूरि, भूरिश्रवा व शल, असे तीन पुत्र झाले. तिसरा जो देवापि हा केवळ ऋषि असून देवांचा उपाध्याय होता. हा च्यवनाचा मोठा प्रिय असून त्यानें याला आपला पुत्र म्हटलें होतें. कौरवांत धुरंधर शंतनु हा राजा झाला. हे राजा, तूं शंतनूच्याच कुळीं जन्मला आहेस; याकरितां मी शंतनूचा वंश सांगतो ऐक. समर्थ शंतनूने गंगेचे ठिकाणीं देवव्रत नामक पुत्र उत्पन्न केला. हा भीष्म नांवानें विख्यात असलेला पांडवांचा जो आजोबा तोच. शंतनूलाच काली अथवा सत्यवति या दुसर्‍या स्त्रीपासून विचित्रवीर्य नामक पुत्र झाला. हा मोठा धार्मिक व निष्पाप असून शंतनूचा मोठा लाडका होता. कृष्णद्वैपायन व्यास यांनी विचित्रवीर्याच्या क्षेत्रांत म्हणजे स्त्रियांचे ठिकाणीं धृतराष्ट्र, पांडु व विदुर हे निर्माण केले. पुढें धृतराष्ट्रानें गांधारी स्त्रीचें ठायीं शंभर पुत्र निर्माण केले. या शंभरांपैकी दुर्योधन वडील होता, व तोच सर्वांचा राजा झाला. पांडूला धनंजय अथवा अर्जुन हा झाला. अर्जुनाला अभिमन्यु व अभिमन्यूला परीक्षित. म्हणजे हे लोकपाला तुझा पिता. (अर्थात् पुढें तूं,) या प्रकारें तूं ज्या पौरव वंशांत निर्माण झालास, त्या वंशाची हकीकत संपली. आतां पुरूचे बंधु तुर्वसु, द्रुह्यु, अनु व यदु, यांचे वंश सांगतो. तुर्वसूचा पुत्र वन्ही होता. वन्हीचा गोभानु, गोभानूचा अजिंक्य पुत्र त्रैभानु; त्याचा पुत्र करंधम; करंधमाचा पुत्र मरुत्त. हे राजा, मी तुला याशिवाय दुसरा एक मरुत्त सांगितला आहे, पण तो अविक्षिताचा पुत्र, प्रस्तुतचा मरुत्त हा अनपत्य होता, म्हणून त्यानें विपुल दक्षणा देऊन यज्ञ केले. तेव्हां त्याला संमता नांवाची एक कन्या झाली. ती त्यानें यज्ञदक्षणा म्हणून आपला ऋत्विज संवर्त्त याला दिली; संवर्त्तानें ती दुष्यंताचा पिता जो सुघोर त्याला दिली; तेथें तिला दुष्यंत हा निर्मल पुत्र झाला, व तो मरुत्तानें (पुत्रिका-पुत्र म्हणून) आपला पुत्र म्हटला व या योगानें तुर्वसूचा वंश पौरवांतच सामील झाला, व असें होईल म्हणून तुर्वसु जेव्हां ययातीची जरा घेण्यास तयार होईना, त्या वेळीं ययातीनें शाप देऊन सांगितलेंच होतें, तें खरें झालें. या दुष्यंताला पुढें राजा करुत्थाम हा पुत्र झाला; करुत्थामाला पुढें आक्रीड; आक्रीडाला पुढें चार पुत्र झाले. त्यांचीं नांवें - पांडय, केरल, चोल व कोल. यांपैकीं पांडय, चोल, केरल हे आपल्याच नांवानें प्रसिद्ध असलेल्या समृद्ध राज्यांचे मालक झाले. आतां द्रुह्यूची संतति. द्रुह्यूला दोन पुत्र. बभ्रु व सेतु. या सेतूचा पुत्र अंगार सेतु. हा मरुत्तांचा नाईक म्हटला जातो. हा मोठा बलाढ्य होता. याचें व यौवनाश्वाचें चौदा महिनेपर्यंत सारखें युद्ध झालें. अखेर यौवनाश्वानें याचा वध केला; पण तो महामुष्किलीनें. या अंगाराचा पुत्र गांधार नामक होता, याच्याच नांवानें एका मोठया देशाला गांधार असें म्हणतात. या देशचे घोडे फार नामांकित असतात. असो; अनूला धर्म हा पुत्र झाला. धर्माचा घृत झाला. घृतापासून दुदूह झाला. दुदूहाचा मुलगा प्रचेता. प्रचेताचा सुचेता. याप्रमाणें मीं अनूचा वंश सांगितला. आतां अत्यंत तेजस्वी व सर्वांत ज्येष्ठ जो यदु त्याचा वंश मी यथाक्रम सविस्तर सांगतों, तों ऐक.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
कुक्षेयुवंशानुकीर्तनं नाम द्वात्रिंशोऽध्यायः ॥ ३२ ॥
अध्याय बत्तिसावा समाप्त

GO TOP