श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व पञ्चविंशोऽध्यायः
सोमोत्पत्तिवर्णनम्
वैशम्पायन उवाच
पिता सोमस्य वै राजन् जज्ञेऽत्रिर्भगवानृषिः ।
ब्रह्मणो मानसात्पूर्वं प्रजासर्गं विधित्सतः ॥ १ ॥
तत्रात्रिः सर्वभूतानां तस्थौ स्वतनयैर्युतः ।
कर्मणा मनसा वाचा शुभान्येव चचार सः ॥ २ ॥
अहिंस्रः सर्वभूतेषु धर्मात्मा संशितव्रतः ।
काष्ठकुड्यशिलाभूत ऊर्ध्वबाहुर्महाद्युतिः ॥ ३ ॥
अनुत्तरं नाम तपो येन तप्तं महत्पुरा ।
त्रीणि वर्षसहस्राणि दिव्यानीति हि नः श्रुतम् ॥ ४ ॥
तत्रोर्ध्वरेतसस्तस्य स्थितस्यानिमिषस्य ह ।
सोमत्वं तनुरापेदे महासत्त्वस्य भारत ॥ ५ ॥
ऊर्ध्वमाचक्रमे तस्य सोमत्वं भावितात्मनः ।
नेत्राभ्यां वारि सुस्राव दशधा द्योतयद् दिशः ॥ ६ ॥
तं गर्भं विधिना हृष्टा दश देव्यो दधुस्तदा ।
समेत्य धारयामासुर्न च ताः समशक्नुवन् ॥ ७ ॥
स ताभ्यः सहसैवाथ दिग्भ्यो गर्भः प्रभान्वितः ।
पपात भासयँल्लोकाञ्छीतांशुः सर्वभावनः ॥ ८ ॥
यदा न धारणे शक्तास्तस्य गर्भस्य ता दिशः ।
ततस्ताभिः सहैवाशु निपपात वसुन्धराम् ॥ ९ ॥
पतितं सोममालोक्य ब्रह्मा लोकपितामहः ।
रथमारोपयामास लोकानां हितकाम्यया ॥ १० ॥
स हि वेदमयस्तात धर्मात्मा सत्यसंग्रहः ।
युक्तो वाजिसहस्रेण सितेनेति हि नः श्रुतम् ॥ ११ ॥
तस्मिन्निपतिते देवाः पुत्रेऽत्रेः परमात्मनि ।
तुष्टुवुर्ब्रह्मणः पुत्रा मानसाः सप्त ये श्रुताः ॥ १२ ॥
तथैवाङ्गिरसस्तत्र भृगुरेवात्मजैः सह ।
ऋग्भिर्यजुर्भिर्बहुलैरथर्वाङ्गिरसैरपि ॥ १३ ॥
तस्य संस्तूयमानस्य तेजः सोमस्य भास्वतः ।
आप्यायमानं लोकांस्त्रीन् भासयामास सर्वशः ॥ १४ ॥
स तेन रथमुख्येन सागरान्तां वसुन्धराम् ।
त्रिःसप्तकृत्वोऽतियशाश्चकाराभिप्रदक्षिणम् ॥ १५ ॥
तस्य यच्च्यावितं तेजः पृथिवीमन्वपद्यत ।
ओषध्यस्ताः समुद्भूतास्तेजसा प्रज्वलन्त्युत ॥ १६ ॥
ताभिर्धार्यास्त्रयो लोकाः प्रजाश्चैव चतुर्विधाः ।
पोष्टा हि भगवान् सोमो जगतो जगतीपते ॥ १७ ॥
स लब्धतेजा भगवान् संस्तवैस्तैश्च कर्मभिः । ॥
तपस्तेपे महाभाग पद्मानां दशतीर्दश ॥ १८ ॥
हिरण्यवर्णां या देव्यो धारयन्त्यात्मना जगत् ।
निधिस्तासामभूद्देवः प्रख्यातः स्वेन कर्मणा ॥ १९ ॥
ततस्तस्मै ददौ राज्यं ब्रह्मा ब्रह्मविदां वरः ।
बीजौषधीनां विप्राणामपां च जनमेजय ॥ २० ॥
सोऽभिषिक्तो महाराज राजराज्येन राजराट् ।
लोकांस्त्रीन्भासयामास स्वभासा भास्वतां वरः ॥ २१ ॥
सप्तविंशतिमिन्दोस्तु दाक्षायण्यो महाव्रताः ।
ददौ प्राचेतसो दक्षो नक्षत्राणीति या विदुः ॥ २२ ॥
स तत्प्राप्य महद्राज्यं सोमः सोमवतां वरः ।
समाजह्रे राजसूयं सहस्रशतदक्षिणम् ॥ २३ ॥
होताऽस्य भगवानत्रिरध्वर्युर्भगवान् भृगुः ।
हिरण्यगर्भश्चोद्गाता ब्रह्मा ब्रह्मत्वमेयिवान् ॥ २४ ॥
सदस्यस्तत्र भगवान् हरिर्नारायणः स्वयम् ।
सनत्कुमारप्रमुखैराद्यैर्ब्रह्मर्षिभिर्वृतः ॥ २५ ॥
दक्षिणामददात् सोमस्त्रीँल्लोकानिति नः श्रुतम् ।
तेभ्यो ब्रह्मर्षिमुख्येभ्यः सदस्येभ्यश्च भारत ॥ २६ ॥
तं सिनिश्च कुहूश्चैव द्युतिः पुष्टिः प्रभा वसुः ॥
कीर्तिर्धृतिश्च लक्ष्मीश्च नव देव्यः सिषेविरे ॥ २७ ॥
प्राप्यावभृथमव्यग्रः सर्वदेवर्षिपूजितः ।
विरराजाधिराजेन्द्रो दशधा भासयन् दिशः ॥ २८ ॥
तस्य तत् प्राप्य दुष्प्राप्यमैश्वर्यं मुनिसत्कृतम् ।
विबभ्राम मतिस्तात विनयादनयाऽऽहता ॥ २९ ॥
बृहस्पतेः स वै भार्यां तारां नाम यशस्विनीम् ।
जहार तरसा सर्वानवमत्याङ्गिरःसुतान् ॥ ३० ॥
स याच्यमानो देवैश्च यथा देवर्षिभिः सह ।
नैव व्यसर्जयत् तारां तस्मा आङ्गिरसे तदा ।
स संरब्धस्ततस्तस्मिन् देवाचार्यो बृहस्पतिः ॥ ३१ ॥
उशना तस्य जग्राह पार्ष्णिमाङ्गिरसस्तदा ।
स हि शिष्यो महातेजाः पितुः पूर्वो बृहस्पतेः ॥ ३२ ॥
तेन स्नेहेन भगवान् रुद्रस्तस्य बृहस्पतेः ।
पार्ष्णिग्राहोऽभवद् देवः प्रगृह्याजगवं धनुः ॥ ३३ ॥
तेन ब्रह्मशिरो नाम परमास्त्रं महात्मना ।
उद्दिश्य दैत्यानुत्सृष्टं येनैषां नाशितं यशः ॥ ३४ ॥
तत्र तद्युद्धमभवत्प्रख्यातं तारकामयम् ।
देवानां दानवानां च लोकक्षयकरं महत् ॥ ३५ ॥
तत्र शिष्टास्तु ये देवास्तुषिताश्चैव भारत ।
ब्रह्माणं शरणं जग्मुरादिदेवं सनातनम् ॥ ३६ ॥
ततो निवार्योशनसं रुद्रं ज्येष्ठं च शङ्करम् ।
ददावङ्गिरसे तारां स्वयमेव पितामहः ॥ ३७ ॥
तामन्तःप्रसवां दृष्ट्वा तारां प्राह बृहस्पतिः।
मदीयायां न ते योनौ गर्भो धार्यः कथञ्चन ॥ ३८ ॥
अयोनावुत्सृजत् तं सा कुमारं दस्युहन्तमम् ।
इषीकास्तम्बमासाद्य ज्वलन्तमिव पावकम् ॥ ३९ ॥
जातमात्रः स भगवान् देवानामक्षिपद् वपुः ।
ततः संशयमापन्ना इमामकथयन् सुराः ॥ ४० ॥
सत्यं ब्रुहि सुतः कस्य सोमस्याथ बृहस्पतेः ।
पृच्छ्यमाना यदा देवैर्नाह सा साध्वसाधु वा ॥ ४१ ॥
तदा तां शप्तुमारब्धः कुमारो दस्युहन्तमः ।
तं निवार्य ततो ब्रह्मा तारां पप्रच्छ संशयम् ॥ ४२ ॥
यदत्र तथ्यं तद् ब्रूहि तारे कस्य सुतस्त्वयम् ।
सा प्राञ्जलिरुवाचेदं ब्रह्माणं वरदं प्रभुम् ॥ ४३ ॥
सोमस्येति महात्मानं कुमारं दस्युहन्तमम् ।
ततस्तं मूर्ध्न्युपाघ्राय सोमो धाता प्रजापतिः ॥ ४४ ॥
बुध इत्यकरोन्नाम तस्य पुत्रस्य धीमतः ।
प्रतिकूलं च गगने समभ्युत्तिष्ठते बुधः ॥ ४५ ॥
उत्पादयामास ततः पुत्रं वै राजपुत्रिका ।
तस्यापत्यं महाराजो बभूवैलः पुरूरवाः ॥ ४६ ॥
ऊर्वश्यां जज्ञिरे यस्य पुत्राः सप्त महात्मनः ।
प्रसह्य धर्षितस्तत्र सोमो वै राजयक्ष्मणा ॥ ४७ ॥
ततो यक्ष्माभिभूतस्तु सोमः प्रक्षीणमण्डलः ।
जगाम शरणार्थाय पितरं सोऽत्रिमेव तु ॥ ४८ ॥
तस्य तत्तापशमनं चकारात्रिर्महातपाः ।
स राजयक्ष्मणा मुक्तः श्रिया जज्वाल सर्वतः ॥ ४९ ॥
एवं सोमस्य वै जन्म कीर्तितं कीर्तिवर्धनम् ।
वंशमस्य महाराज कीर्त्यमानं च मे शृणु ॥ ५० ॥
धन्यमारोग्यमायुष्यं पुण्यं संकल्पसाधनम् ।
सोमस्य जन्म श्रुत्वैव पापेभ्यो विप्रमुच्यते ॥ ५१ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
सोमोत्पत्तिकथने पञ्चविंशोऽध्यायः
सोमोत्पत्तिवर्णन -
वैशंपायन सांगतात - पूर्वकाली ब्रह्मदेवाने प्रजा निर्माण करण्याचा जेव्हां संकल्प केला, त्या वेळीं त्याच्या मानसापासून भगवान अत्रि ऋषि हे उत्पन्न झाले. हेच सोमाचे जनक. त्या काळीं अत्रिऋषींनींही प्रजावृद्धि करावयाची, असा ब्रह्मदेवाप्रमाणेंच दृढ निश्चय केल्यामुळें आपल्या पुत्रांसह कर्म, मन आणि वाणी यांही जगतकल्याणाचेंच आचरण चालविलें. धर्मनिष्ठा, तीव्र नियम, भूतमात्राविषयीं अहिंसा, काष्ठ, भिति किंवा शिला यांप्रमाणे निश्चल स्थिति व ऊर्ध्वबाहुत्व यांचा अंगीकार करून त्या महातेजस्वी अत्रिऋषीनीं तीन सहस्त्र दिव्यवर्षेंपर्यंत "अनुत्तर" नामाचें अत्यंत तीव्र असें तप केलें, असें आमचे ऐकिवांत आहे. त्या तपकालांत अत्रिऋषि अनिमेष व ऊर्ध्वरेत अशा स्थितींत सदैव राहित्यानें त्यांच्या हृदयांत शुद्धसत्त्वगुणाची अत्यंत वृद्धि होऊन त्यांचें सर्व शरीरच अंतर्बाह्य शांत व शुद्ध सत्त्वमय बनलें असल्यामुळें ते सात्त्विक तेज अखेरीस त्यांच्या उभय नेत्रांच्या वाटे जलाचे रूपानें बाहेर पडलें. त्यांचें तेज इतकें अलौकिक होतें कीं, त्याचे योगानें दाही दिशा चमकूं लागल्या व दशदिशांच्या ज्या अभिमानिनी देवता त्यांना त्या तेजाविषयीं लोभ उत्पन्न होऊन सर्वजणींनीं मिळून आपल्या गर्भाचे ठिकाणीं तें तेज मोठया आनंदानें धारण केलें. परंतु, तें त्यांना सहन होईना; व शेवटीं त्या दिशांच्या उदरांतून एकाएकीं मोठा दैदीप्यमान गर्भाचा गोळा पटकन खालीं पडला. पडतां पडतां त्यानें सर्व लोक प्रकाशानें भरून टाकिले. हा जो पडलेला गर्भ तोच शीत किरणांचा सोम किंवा चंद्र होय. हा सोम औषधिद्वारा जीवमात्रांना पुष्टि देणारा आहे. ज्या वेळीं त्या दिशांना तो अति तेजस्वी गर्भ सहन होईना त्या वेळीं तो त्यांसकटच धरणीवर पडला. त्या वेळीं लोकांचा पितामह जो ब्रह्मदेव यानें सोम हा धरणीवर पडला असें पाहून लोकांचे हितासाठी त्याला उचलून पटकन् रथावर बसविले. हा रथ धर्मस्वरूप असून चार वेद हे त्या रथाची पिंजरी होती. सत्यरूप त्याच्या दोर्या (पागा) होत्या, व एकजात शुभ्र असे मंत्रात्मक सहस्त्र अश्व त्याला जोडले होते. हा अत्रिपुत्र परमात्मस्वरूपी सोम धरणीतलावर आलासें पाहून ब्रह्मदेवाचे जे सात मानसपुत्र त्यांना अतिशय आनंद झाला, व अंगिरसकुलोत्पन्न भृगुऋषि यांनीं आपल्या पुत्रांसह ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद व आंगिरस, इत्यादि मंत्रांनी स्तुति केली; त्या वेळीं त्या तेजस्वी सोमाचें तेज तिन्ही लोकांना पुष्टि देऊन शिवाय सर्वत्र फांकून राहिलें. मग ब्रह्मदेवानें त्या सोमाला तसल्या वेदरूप श्रेष्ठ रथावर बसविल्यावर समुद्रवलयांकित पृथ्वीच्या एकवीस प्रदक्षिणा केल्या. त्या वेळीं रथाच्या वेगानें धक्के बसून त्या सोमापैकीं जें तेज उसळून इकडे तिकडे धरणीवर पडलें त्यापासून औषधी वनस्पति उत्पन्न झाल्या व त्या अद्यापिही तेजानें चमकत असतात. हे राजा, या दिव्यौषधींची कामगिरी देव, भूत व पितर हे तीन लोक व मनुष्य, पशु, पक्षी व सर्पादि ही चतुर्विध प्राणिसृष्टि, यांचें पोषण करणें ही आहे, आणि या औषधींना भगवान् सोम यानें पुष्टि द्यावी अशी योजना आहे. ऋषींनी केलेल्या त्या मंत्ररूप स्तवांनी व संस्कारांनीं अधिकच तेजास चढून सोमानें दहा शेंकडे म्हणजे सहस्त्र वर्षेपर्यंत तप केलें; व या तपाचे योगानें त्याची कीर्ति झाली. तेव्हां हिरण्यवर्ण ज्या जलरूपि देवता त्यांचा तो निधि बनला, व ब्रह्मवेत्त्यांत वरिष्ठ जो पितामह ब्रह्मदेव त्यानें, हे जनमेजया, त्या सोमाला बीजें, औषधी, ब्राह्मण व जल यांचें प्रभुत्व दिलें.
हे राजा, ब्रह्मदेवानें साम्राज्यविधीने सोमाला राज्यावर बसविल्यापासून तो आधींच अत्यंत तेजस्वी असल्यानें तत्काल तिन्ही लोकांना आपल्या तेजानें प्रकाशमान करूं लागला. प्रचेतस प्रजापतीचा पुत्र जो दक्षप्रजापति याला मोठया व्रतशील अशा सत्तावीस मुली होत्या. त्या त्यानें या सोमाला दिल्या.
या सत्तावीस कन्या म्हणजे अश्विनीभरणीप्रभृति जी सत्तावीस नक्षत्रे तींच होत. याप्रमाणें राज्य मिळालें, सुंदर स्त्रिया मिळाल्या, तेव्हां, पितरांचा पालक जो सोमराजा त्यानें राजसूय यज्ञ आरंभिला. त्या यज्ञांत त्यानें सहस्त्र शेंकडे गाई दक्षिणार्थ दिल्या. त्या यज्ञांत भगवान् अत्रिऋषि यांनी त्याचें होतृत्व पत्करिलें होतें. भगवान् भृगु हे अध्वर्यु झाले; भगवान् अंगिरा यांनी उद्गातृत्व स्वीकारिलें; स्वतः ब्रह्मदेव हे ब्रह्मा झाले; आणि भगवान् नारायण हरि हे सदस्य झाले. याशिवाय सनत्कुमार प्रभृति जे आद्य ब्रह्मर्षि हेही त्याचे भोंवतीं जमलेच होते. अशा थाटांत यज्ञ चालला असतां आम्ही असें ऐकितों कीं, त्या सोमराजानें तिन्ही लोकांत जे जे निवडक ब्राह्मण होते त्यांना त्यांना, ब्रह्मर्षींना व सदस्यांनाही यथेच्छ दक्षिणा दिली. त्या समयीं सिनि, कुहू, द्युति, पुष्टि, प्रभा, वसु, कीर्ति, धृति व लक्ष्मी, या नऊ देवी त्याच्या सेवेंत तत्पर होत्या. सर्व यज्ञ निर्विघ्न पार पडून सोमानें शेवटीं स्वस्थ चित्तानें अवभृथ म्हणजे यज्ञांतीचें स्नानही उरकिलें. या त्याच्या महत्कृत्याबद्दल सर्व देव व ऋषि यांनींही त्याचा फार गौरव केला. मग तो राजाधिराज होऊन दाही दिशा प्रकाशवूं लागला. (पण, हे राजा, ऐश्वर्य ही वस्तु मोठी मादक आहे.) कोणालाही न मिळणारें असें असामान्य ऐश्वर्य व ऋषिजनांसारख्यांकडून सत्कार, ही जेव्हां त्या सोमाला प्राप्त झालीं, तेव्हां त्याचे मतीला भ्रम पडला. पहिलें तें त्याचें मर्यादशील व नम्रवर्तन सुटलें, व त्याच्या मनाला अन्यायाचे चाळे सुचूं लागले. त्यानें देवगुरु जो बृहस्पति त्याची यशस्विनी भार्या जी तारा तिला बृहस्पतीला न जुमानितां बलात्कारानें हिरावून आणिली. या कामीं देव व मोठमोठे देवर्षि यांनी पुष्कळ रदबदली केली. परंतु, तो ज्याचे नांव तें ऐकेना व बृहस्पतीला तारा परत देईना. हें पाहून देवाचार्य बृहस्पति सोमावर फार खवळला व रथांत बसून त्याबरोबर युद्ध करण्यास निघाला. त्या वेळीं त्या युद्धांत दैत्यगुरु शुक्राचार्य हे चंद्राच्या बाजूला झाले, व बृहस्पतीचा पिता जो अंगिरस ऋषि त्याचा महातेजस्वी शिष्य जो भगवान रुद्र तो गुरु पुत्राच्या स्नेहास्तव आपलें आजगव नांवाचें धनुष्य घेऊन बृहस्पतीच्या बाजूला झाला, व त्यानें दैत्यांवर रोंख धरून ब्रह्मशिर नांवाचें परमास्त्र सोडिलें. त्या योगेकरून दैत्यांची अब्रू खलास झाली.
असो; तारेच्या निमित्तानें जें हें देव व असुर यांचें युद्ध झालें तें फारच तुंबळ झालें. त्यामध्यें लोकांचा फारच फन्ना उडाला. हा अनर्थ टळावा म्हणून बृहस्पतीच्या बाजूला असणारे सर्वही सात्त्विक देवगण, तसेच गुरुस्त्री हरण करणार्या पापी सोमाची साथ करणारे तुषितसंज्ञक देवगणही सनातन आदिदेव जो ब्रह्मा त्याकडे आश्रयार्थ गेले. त्या वेळीं ब्रह्मदेवानें एकादश रुद्रांतील ज्येष्ठ जो शंकर त्याला व शुक्राचार्यालाही युद्धापासून विनिवृत्त करून आपल्या हातीं देवी तारा बृहस्पतीच्या स्वाधीन केली. परंतु, बृहस्पति पाहातो तों तारेला सोमापासून गर्भ राहिला असून ती प्रसूतीच्या रंगांत आली होती. तें पाहून बृहस्पति म्हणाला कीं, वास्तविक पाहातां ही तुझी योनि माझे मालकीची असून तूं हिचे ठिकाणीं अन्यापासून गर्भ धारण केलास, यासाठीं तूं माझे घरांत येऊन प्रसूत होऊं नको. तेव्हां ती बिचारी तारा भलत्याच ठिकाणी प्रसूत झाली. तें ठिकाण म्हणजे कसाड नांवाचें जें उंच गवत असतें त्याचें बेट, त्यांत ती प्रसूत झाली. तिला जो पुत्र झाला तो अग्नीसारखा दैदीप्यमान असून चोरटयांचा केवळ काळ होता. तो उपजतांच इतका तेजस्वी होता कीं, त्यानें आपल्या तेजानें देवसुद्धा झांकून टाकिले. असला हा तेजस्वी पुत्र असावा तरी कोणाच्या पोटचा ? ही शंका येऊन देव तिला पुसूं लागले. ते म्हणाले, 'हे तारे, खरें सांग. हा कोणाच्या पोटचा ? सोमाच्या कीं बृहस्पतीच्या ?' याप्रमाणें देवांनी प्रश्न केला. पण ती लाजेमुळें एक बोलेना नी दोन बोलेना. तेव्हां, तिचा झालेला पुत्र तिला शाप देऊं लागला. परंतु ब्रह्मदेवानें त्याचें निवारण करून स्वतः तारेला प्रश्न केला. ते म्हणाले, 'तारे, तूं लाजूं नको, भिऊं नको (आम्ही जाणत आहो. कसेंही असलें तरी तुझा अबलेचा त्यांत कांहीं उपाय नाहीं); करितां खरें खरें असेल तें स्वच्छ सांग. हा मुलगा कोणाचा ?' याप्रमाणें वरदात्या प्रभु ब्रह्मदेवानेंच जेव्हां विचारिलें तेव्हां ती नम्रपणें हात जोडून म्हणाली, "महाराज, हा सोमाचा." ते शब्द ऐकून सोमानें त्या पराक्रमी कुमाराला पुढें घेऊन त्याची टाळू हुंगली, व त्याची चलाख बुद्धि पाहून त्याला बुध असें नांव ठेविले. हा बुध आकाशांत नेहमी सूर्यसान्निध्यामुळें लुप्तच असतो, कदाचित् व्यक्त दिसलांच तर कांहीं तरी उत्पात वगैरे जनांला प्रतिकूल गोष्टी उत्पन्न करितो. या बुधापासून वैराज मनूची कन्या जी इला, हिनें ऐल किंवा पुरूरवा हा पुत्र उत्पन्न करविला. पुढें या पुरूरव्याला उर्वशीचे ठिकाणी सात पुत्र झाले. इकडे सोमानें दांडगाईनें गुरुस्त्री भ्रष्ट केली होती, या त्याच्या पापाबद्दल त्याला राजयक्ष्मा नांवाचा रोग जडला. त्या रोगापासून सोम क्षीण होऊं लागला. तेव्हा तो आपला पिता अत्रि ऋषि यांसच शरण गेला. त्या वेळीं महातपस्वी अत्रि ऋषींनी त्याचें तें दुःख दूर केलें. मग सोम हा राजयक्ष्मा व्याधीपासून मुक्त होऊन पूर्ववत तेजाने तपूं लागला.
हे महाराजा, याप्रमाणें यश वाढविणारें असें हें सोमाचें जन्म मीं तुला सांगितले. या जन्माच्या श्रवणानें धनधान्य, आरोग्य, आयुष्य, पुण्य, पापमुक्ति व सुविचारपूर्ती ही प्राप्त होतात. आतां या सोमाच्या पुढील वंशाचे वृत्त तुला सांगतो.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि सोमोत्पत्तिकथने पञ्चविंशोऽध्यायः ॥ २५ ॥
अध्याय पंचविसावा समाप्त
GO TOP
|