श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व चतुर्विंशोऽध्यायः
पितृकल्पः
मार्कण्डेय उवाच
ब्रह्मदत्तस्य तनयः स विभ्राजस्त्वजायत ।
योगात्मा तपसा युक्तो विष्वक्सेन इति श्रुतः ॥ १ ॥
कदाचिद् ब्रह्मदत्तस्तु भार्यया सहितो वने ।
विजहार प्रहृष्टात्मा यथा शच्या शचीपतिः ॥ २ ॥
ततः पिपीलिकरुतं स शुश्राव नराधिपः ।
कामिनीं कामिनस्तस्य याचतः क्रोशतो भृशम् ॥ ३ ॥
श्रुत्वा तु याच्यमानां तां क्रुद्धां सूक्ष्मां पिपीलिकाम् ।
ब्रह्मदत्तो महाहासमकस्मादेव चाहसत् ॥ ४ ॥
ततः सा संनतिर्दीना व्रीडितेवाभवत् तदा ।
निराहारा बहुतिथं बभूव वरवर्णिनी ॥ ५ ॥
प्रसाद्यमाना भर्त्रा सा तमुवाच शुचिस्मिता ।
त्वया च हसिता राजन्नाहं जीवितुमुत्सहे ॥ ६ ॥
स तत्कारणमाचख्यौ न च सा श्रद्दधाति तत् ।
उवाच चैनं कुपिता नैष भावोऽस्ति मानुषे ॥ ७ ॥
को वै पिपीलिकरुतं मानुषो वेत्तुमर्हति ।
ऋते देवप्रसादाद् वा पूर्वजातिकृतेन वा ॥ ८ ॥
तपोबलेन वा राजन् विद्यया वा नराधिप ।
यद्येष वै प्रभावस्ते सर्वसत्त्वरुतज्ञता ॥ ९ ॥
यथाहमेतज्जानीयां तथा प्रत्याययस्व माम् ।
प्राणान् वापि परित्यक्ष्ये राजन् सत्येन ते शपे ॥ १० ॥
तत् तस्या वचनं श्रुत्वा महिष्याः परुषाक्षरम् ।
स राजा परमापन्नो देवश्रेष्ठमगात् ततः ॥ ११ ॥
शरण्यं सर्वभूतेशं भक्त्या नारायणं हरिम् ।
समाहितो निराहारः षड्रात्रेण महायशाः ॥ १२ ॥
ददर्श दर्शने राजा देवं नारायणं प्रभुम् ।
उवाच चैनं भगवान् सर्वभूतानुकम्पकः ॥ १३ ॥
ब्रह्मदत्त प्रभाते त्वं कल्याणं समवाप्स्यसि ।
इत्युक्त्वा भगवान् देवस्तत्रैवान्तरधीयत ॥ १४ ॥
चतुर्णां तु पिता योऽसौ ब्राह्मणानां महात्मनाम् ।
श्लोकं सोऽधीत्य पुत्रेभ्यः कृतकृत्य इवाभवत् ॥ १५ ॥
स राजानमथान्विच्छन्सहमन्त्रिणमच्युतम् ।
न ददर्शान्तरं किञ्चिच्छ्लोकं श्रावयितुं तदा ॥ १६ ॥
अथ राजा सरःस्नातो लब्ध्वा नारायणाद्वरम् ।
प्रविवेश पुरीं प्रीतो रथमारुह्य काञ्चनम् ।
तस्य रश्मीन्प्रत्यगृह्णात् कण्डरीको द्विजर्षभः ॥ १७ ॥
चामरं व्यजनं चापि बाभ्रव्यः समवाक्षिपत् ॥ १८ ॥
इदमन्तरमित्येव ततः स ब्राह्मणस्तदा ।
श्रावयामास राजानं श्लोकं तं सचिवौ च तौ ॥ १९ ॥
सप्त व्याधा दशार्णेषु मृगाः कालञ्जरे गिरौ ।
चक्रवाकाः शरद्वीपे हंसाः सरसि मानसे ॥ २० ॥
तेऽभिजाताः कुरुक्षेत्रे ब्राह्मणा वेदपारगाः ।
प्रस्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ ॥ २१ ॥
तच्छ्रुत्वा मोहमगमद्ब्रह्मदत्तो नराधिपः ।
सचिवश्चास्य पाञ्चाल्यः कण्डरीकश्च भारत ॥ २२ ॥
स्रस्तरश्मिप्रतोदौ तौ पतितव्यजनावुभौ ।
दृष्ट्वा बभूवुरस्वस्थाः पौराश्च सुहृदस्तथा ॥ २३ ॥
मुहुर्तमेव राजा स सह ताभ्यां रथे स्थितः ।
प्रतिलभ्य ततः संज्ञां प्रत्यागच्छदरिन्दमः ॥ २४ ॥
ततस्ते तत्सरः स्मृत्वा योगं तमुपलभ्य च ।
ब्राह्मणं विपुलैरर्थैर्भोगैश्च समयोजयन् ॥ २५ ॥
अभिषिच्य स्वराज्ये तु विष्वक्सेनमरिन्दमम् ।
जगाम ब्रह्मदत्तोऽथ सदारो वनमेव ह ॥ २६ ॥
अथैनं सन्नतिर्धीरा देवलस्य सुता तदा ।
उवाच परमप्रीता योगाद् वनगतं नृपम् ॥ २७ ॥
जानन्त्या ते महाराज पिपीलिकरुतज्ञताम् । ॥
चोदितः क्रोधमुद्दिश्य सक्तः कामेषु वै मया ॥ २८ ॥
इतो वयं गमिष्यामो गतिमिष्टामनुत्तमाम् ।
तव चान्तर्हितो योगस्ततः संस्मारितो मया ॥ २९ ॥
स राजा परमप्रीतः पत्न्याः श्रुत्वा वचस्तदा ।
प्राप्य योगं बलादेव गत्ं प्राप सुदुर्लभाम् ॥ ३० ॥
कण्डरीकोऽपि धर्मात्मा साङ्ख्ययोगमनुत्तमम् ।
प्राप्य योगगतिः सिद्धो विशुद्धस्तेन कर्मणा ॥ ३१ ॥
क्रमं प्रणीय पाञ्चाल्यः शिक्षां चोत्पाद्य केवलाम् ।
योगाचार्यगतिं प्राप यशश्चाग्र्यं महातपाः ॥ ३२ ॥
एवमेतत्पुरावृत्तं मम प्रत्यक्षमच्युत ।
तद्धारयस्व गाङ्गेय श्रेयसा योक्ष्यसे ततः ॥ ३३ ॥
ये चान्ये धारयिष्यन्ति तेषां चरितमुत्तमम् ।
तिर्यग्योनिषु ते जातु न गमिष्यन्ति कर्हिचित् ॥ ३४ ॥
श्रुत्वा चेदमुपाख्यानं महार्थं महतां गतिम् ।
योगधर्मो हृदि सदा परिवर्तति भारत ॥ ३५ ॥
स तेनैवानुबन्धेन कदाचिल्लभते शमम् ।
ततो योगगतिं याति शुद्धां तां भुवि दुर्लभाम् ॥ ३६ ॥
वैशम्पायन उवाच ॥
एवमेतत्पुरा गीतं मार्कण्डेयेन धीमता ।
श्राद्धस्य फलमुद्दिश्य सोमस्याप्यायनाय वै ॥ ३७ ॥
सोमो हि भगवान् देवो लोकस्याप्यायनं परम् ।
वृष्णिवंशप्रसङ्गेन तस्य वंशं निबोध मे ॥ ३८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
पितृकल्पसमाप्तिर्नाम चतुर्विंशोऽध्यायः
ब्रह्मदत्ताचा वृत्तांत -
मार्कंडेय सांगतात - मागें वैभ्राज राजा त्या सात हंसांपैकीं एकाचे उदरी यावें म्हणजे आपणास अनायांसे योगसिद्धि होईल, अशा संकल्पानें तप करून देह ठेविता झाला म्हणून सांगितलें. त्या संकल्पानुरूप तो तपस्वी व योगनिष्ठ वैभ्राज विष्वक्सेन या नांवानें जन्मास आला. पुढें एके दिवशीं ब्रह्मदत्त हा आपली भार्या सन्नति हिला बरोबर घेऊन मोठया आनंदाने इंद्राणीसहित रमणार्या इंद्राप्रमाणें वनांत विहार करीत होता, आणि विहार करीत असतां एक मुंगळा कामवश होऊन आपल्या प्रियेची कामदानाविषयीं काकुळती येऊन याचना करीत होता, तें त्यांने ऐकिलें, व तो मुंगळा प्रार्थना करीत असतां ती इवलिशी मुंगी त्याच्या चारगटपणानें त्याचेवर संतापली आहे, असें त्यानें पाहिले. त्याला त्यांची भाषा समजत होतीच; त्यामुळें तो प्रकार ध्यानी येतांच ब्रह्मदत्त एकाएकीं खदखदा हसला. जवळ त्यांची स्त्री सन्नति होती, तिला पति कां हसला, याचे कारण बरोबर न कळल्यामुळे हा आपणासच हसला असा संशय येऊन ती लाजल्यासारखी झाली व तिचा नूर अगदीं उतरून गेला. त्या सुंदरीच्या हृदयाला ती गोष्ट इतकी लागली कीं, तिने बहुत दिवस अन्नपाणी सोडले. नवरा जेव्हा तिची विनवणी करून, "प्रसन्न हो, रुसलीस कां ?" म्हणून म्हणूं लागला, तेव्हां ती मनोहर हास्य करून म्हणाली, "तुम्हीच माझा उपहास करून मला कारण विचारितां ? मला मुळींच आतां अशा जगण्याचा कंटाळा आला आहे." तें ऐकून त्यानें हसण्याचे खरें कारण काय होतें तें तिला सांगितलें, पण तिचा विश्वास बसेना. ती घुश्श्यांतच त्याला म्हणाली कीं, तुम्ही म्हणतां पण ही गोष्ट माणसांचे अंगीं वसत नाहीं. हे राजा, एक तर देवाची कृपा किंवा पूर्वजन्मींचे तपोबल, किंवा योगबल यांच्या साहाय्याशिवाय मुंग्यांची भाषा समजेल असा कोण मनुष्य आहे बरें ? तें कशाला, आपणच सर्व प्राण्यांची भाषा जाणता ना ? तर जेणेकरून ही गोष्ट माझे समजुतीत येईल त्या प्रकारे माझी समजूत करा, नाही तर मी प्राणत्याग करीन. हें माझें बोलणे थट्टेचे नव्हे; खरेखुरे आहे.
राणीच हे कठोर भाषण ऐकून राजा मोठया विचारांत पडला, व संकटनिवारणार्थ आहार वर्ज करून सर्व भूतपति व शरणागतांचा पालक जो परमात्मा नारायण त्याला अनन्यभावानें व एकाग्रचित्ताने शरण गेला. त्यावेळीं सहाव्या रात्रीं भूतमात्राविषयी दयार्द्र असणारा भगवान् नारायण प्रभु त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन म्हणाला, "उदईक तूं सुखी होशील" असें म्हणून देव तेथेंच दिसेनासा झाला.
इकडे मागें त्या चार ब्राह्मणांचा जो दरिद्री पिता सांगितला तो आपल्या मुलांपासून ते श्लोक शिकून घेऊन आपण कृतकृत्य झालों असें मानूं लागला. तथापि, त्याला ते श्लोक मंत्र्यांसह राजाला गाठून त्याचे कानी घालण्याला अवसर सापडेना, म्हणून तो विवंचनेत होता. इतक्यांत राजा ब्रह्मदत्तच नारायणाचा वर प्राप्त झाल्यामुळें हर्षित होऊन सरोवरांत स्नान करून मोठया आनंदाने आपल्या कांचनमय रथांत बसून नगराकडे चालला. त्या वेळीं त्याचा स्नेही द्विजश्रेष्ठ कण्डरीक यानें रथाच्या पागा धरिल्या होत्या; व दुसरा स्नेही पांचाल हा चवरी व व्यजन ढाळीत होता. आपले श्लोक कानी घालण्याला हीच संधी योग्य आहे असें मनांत आणून त्या ब्राह्मणानें तो राजा व त्याचे ते दोघे सचिव यांचे कानी ते दोन्ही श्लोक घातले. ते श्लोक असे -
"सप्तव्याधादशार्णेषु मृगाः कालिंजरे गिरौ ॥
चक्रवाका शरद्वीपे हंसा: सरसि मानसे ॥ १ ॥
तेभिजाता कुरुक्षेत्रे ब्राह्मणा: वेदपारगाः ॥
प्रस्थिता दीर्घमध्वानं यूयं किमवसीदथ ॥ २ ॥"
याचा अर्थ दशार्ण देशांत सातजण व्याध होते. पुढें कालिंजर गिरीवर ते मृग झाले. नंतर शरद्वीपांत चक्रवाक झाले व मानससरोवरांत हंस झाले. अखेरीस त्यांपैकी आम्हीं चौघे कुरुक्षेत्रांत वेदपारंगत असे ब्राह्मण होऊन मोक्षमार्गाला गेलों आणि मग तुम्हींच तेवढे कां फसून पडलां ?
याप्रमाणें हे श्लोक कानी पडताच राजा ब्रह्मदत्त मूर्च्छा येऊन पडला; व त्याचे सचिव पांचाल्य व कण्डरीक यांच्या हातून रथाच्या पागा व चाबूक आणि चामर-व्यजन ही गळून पडली. हा प्रकार पाहून राजाचे मित्र व नागरीक गडबडून गेले. राजा आपले सचिवांसह तसा रथांतच मूर्च्छित पडला होता. नंतर शुद्धीवर येऊन ते सर्व नगरास परत आले.
परत आल्यापासून त्यांचे डोळ्यांपुढें तें सरोवर सारखे दिसू लागलें व त्यांनीं पूर्वजन्मी जो योगाभ्यास अर्धवट सोडला होता त्याची त्यांना उपस्थिति झाली. नंतर राजाने ब्राह्मणांना विपुल द्रव्य व भोग्य वस्तु देऊन आपल्या राज्यावर आपल्या पराक्रमी पुत्रास - विश्वक्सेनास बसविले व आपण स्वस्त्रीसह वनाची वाट धरिली. त्या वेळीं त्याची स्त्री म्हणजे देवलाची शहाणी कन्या सन्नति ही आपला नवरा योगाभ्यासार्थ वनांत चालला हें पाहून बहुत खुष होऊन त्याला म्हणाली कीं, महाराज, आपणास मुंग्यांची भाषा कळते हें मला माहीत नव्हतें असें नाहीं; परंतु, आपण योगाभ्यास सोडून कामासक्त झाला हें पाहून तुम्हांस पुन्हा योगाकडे प्रवृत्त करावे व तुमचे मन विषयांतून उडवावे म्हणूनच मीं मुद्दाम तुमच्यावर कोप केला. आतां तुम्ही शुद्धीवर आला, आतां जिच्याहून दुसरी वरिष्ठ गति नाहीं व जी प्राणिमात्राचे अंतिम इष्ट आहे, त्या गतीला आपण जाऊं. तुम्ही पूवींचेच योगाभ्यासी आहांत, पण, योगायोगानें तो क्रम मध्ये बंद पडला होता म्हणून मीं तुम्हाला या युक्तीनें जागे केलें. पत्नीचे तें बोलणे ऐकून राजाला आपल्या स्त्रीविषयीं फारच प्रेम उत्पन्न झाले; व मग ती दोघें वनांत जाऊन त्यानें मोठया नेटाने योगाभ्यास आरंभिला व अत्यंत दुर्लभ अशा गतीला तो गेला. कण्डरीकही योगाभ्यासाला लागला, व त्यानें सांख्ययोगसाधन करून व त्या बलानें पापरहित होऊन सिद्धस्थिति कमविली. पांचाल्यानें तर दोघांहूनही अधिक मोठी कर्तबगारी केली. त्याने तीव्र तपश्चर्या तर केलीच, पण त्याशिवाय वेदाचा क्रम लावून देऊन शिक्षा नामक ग्रंथ निर्माण करून योगाचार्य ही पदवी मिळविली. हे गंगापुत्रा, या सर्व गोष्टी पूर्वी माझ्या डोळ्यांदेखत झाल्या. यावरून श्राद्ध करण्याचें माहात्म्य केवढे आहे, हें तुझ्या लक्षांत आलेंच असेल. तर आतां हें नीट मनांत वागीव, व त्याप्रमाणें चाल म्हणजे तुझेंही कल्याण होईल. तुजशिवाय इतरही जे कोणी या सप्त बंधूंचे उत्तम चरित्र ध्यानांत वागवतील त्यांनाही पश्वादि नीच योनी कधीं प्राप्त होणार नाहींत. हे भारता, ह्या उपाख्यानांत फार खोल अर्थ भरला आहे, यासाठीं हें ज्याच्या मनांत घोळत राहील त्याचे ठिकाणी आपोआपच योगप्रवृत्ति होऊन तो थोरांच्या मार्गाला लागेल. याच आख्यानाच्या नादांत जो राहील त्याला त्या नादानादाने शांति प्राप्त होऊन अखेर भूलोकांत दुर्लभ अशीं शुद्ध योगगति प्राप्त होईल.
वैशंपायन सांगतात - हे जनमेजया, बुद्धिवान् मार्कंडेय ऋषि यांनी श्रद्धाचे फलासंबंधाने पूर्वी हा असा इतिहास सांगितला. हा सांगण्यांत त्यांचा उद्देश सोमाचें आप्यायन व्हावें, असा होता. सोमाचे आप्यायन इच्छिण्याचें कारण, सोमाच्या योगाने पितरांची व लोकांची तृप्ति होते. कारण, भगवान् सोम हा दिव्य औषधिद्वारा भूमिस्थानचें संतपर्ण करितो व सोमापासूनच पितरांचीही तृप्ति होते, इतकें सोमाचें माहात्म्य आहे. याजसाठीं ह्या वृष्णिवंशकथनाचे ओघांतच मी तुला सोमाचे वंशाचेंही वर्णन सांगतों, तें ऐक.
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पितृकल्पे चतुर्विंशोऽध्यायः ॥ २४ ॥
अध्याय चोविसावा समाप्त
GO TOP
|