श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
त्रयोविंशोऽध्यायः


पितृकल्पः - ७

मार्कण्डेय उवाच
ते योगधर्मनिरताः सप्त मानसचारिणः ।
पद्मगर्भोऽरविन्दाक्षः क्षीरगर्भः सुलोचनः ॥ १ ॥
उरुबिन्दुः सुबिन्दुश्च हैमगर्भस्तु सप्तमः ।
वाय्वम्बुभक्षाः सततं शरीराण्युपशोषयन् ॥ २ ॥
राजा विभ्राजमानस्तु वपुषा तद्वनं तदा ।
चचारान्तःपुरवृतो नन्दनं मघवानिव ॥ ३ ॥
स तानपश्यत्खचरान् योगधर्मात्मकान् नृप ।
निर्वेदाच्च तमेवार्थमनुध्यायन् पुरं ययौ ॥ ४ ॥
अणुहो नाम तस्याऽऽसीत्पुत्रः परमधार्मिकः ।
अणुर्धर्मरतिर्नित्यमणुं सोऽध्यगमत्पदम् ॥ ५ ॥
प्रादात्कन्यां शुकस्तस्मै कृत्वीं पूजितलक्षणाम् ।
सत्यशीलगुणोपेतां योगधर्मरतां सदा ॥ ६ ॥
सा ह्युद्दिष्टा पुरा भीष्म पितृकन्या मनीषिणी ।
सनत्कुमारेण तदा सन्निधौ मम शोभना ॥ ७ ॥
सत्यधर्मभृतां श्रेष्ठा दुर्विज्ञेया कृतात्मभिः ।
योगा च योगपत्नी च योगमाता तथैव च ॥ ८ ॥
यथा ते कतिथं पूर्वं पितृकल्पेषु वै मया ।
विभ्राजस्त्वणुहं राज्ये स्थापयित्वा नरेश्वरः ॥ ९ ॥
आमन्त्र्य पौरान् प्रीतात्मा ब्राह्मणान् स्वति वाच्य च ।
प्रायात् सरस्तपश्चर्तुं यत्र ते सहचारिणः ॥ १० ॥
स वै तत्र निराहारो वायुभक्षो महातपाः ।
त्यक्त्वा कामांस्तपस्तेपे सरसस्तस्य पार्श्वतः ॥ ११ ॥
तस्य संकल्प आसीच्च तेषामेकतरस्य वै ।
पुत्रत्वं प्राप्य योगेन युज्येयमिति भारत ॥ १२ ॥
कृत्वाभिसन्धिं तपसा महता स समन्वितः ।
महातपाः स विभ्राजो विरराजांशुमानिव ॥ १३ ॥
ततो विभ्राजितं तेन वैभ्राजं नाम तद्वनम् ।
सरस्तच्च कुरुश्रेष्ठ वैभ्राजमिति संज्ञितम् ॥ १४ ॥
यत्र ते शकुना राजंश्चत्वारो योगधर्मिणः ।
योगभ्रष्टास्त्रयश्चैव देहन्यासकृतोऽभवन् ॥ १५ ॥
काम्पिल्ये नगरे ते तु ब्रह्मदत्तपुरोगमाः ।
जाताः सप्त महात्मानः सर्वे विगतकल्मषाः ॥ १६ ॥
ज्ञानध्यानतपःपुजावेदवेदाङ्गपारगाः ।
स्मृतिमन्तोऽत्र चत्वारस्त्रयस्तु परिमोहिताः ॥ १७ ॥
स्वतन्त्रस्त्वणुहाज्जज्ञे ब्रह्मदत्तो महायशाः ।
यथा ह्यासीत्पक्षिभावे संकल्पः पूर्वचिन्तितः ।
ज्ञानध्यानतपःपूतो वेदवेदाङ्गपारगः ॥ १८ ॥
छिद्रदर्शी सुनेत्रश्च तथा बाभ्रव्यवत्सयोः ।
जातौ श्रोत्रियदायादौ वेदवेदाङ्गपारगौ ॥ १९ ॥
सहायौ ब्रह्मदत्तस्य पूर्वजातिसहोषितौ ।
पाञ्चालः पाञ्चिकश्चैव कण्डरीकस्तथापरः ॥ २० ॥
पाञ्चालो बह्वृचस्त्वासीदाचार्यत्वं चकार ह ।
द्विवेदः कण्डरीकस्तु छन्दोगोऽध्वर्युरेव च ॥ २१ ॥
सर्वसत्त्वरुतज्ञस्तु राजाऽऽसीदणुहात्मजः ।
पाञ्चालकण्डरीकाभ्यां तस्य सख्यमभूत् तदा ॥ २२ ॥
ते ग्राम्यधर्माभिरताः कामस्य वशवर्तिनः ।
पूर्वजातिकृतेनासन् धर्मकामार्थकोविदाः ॥ २३ ॥
अणुहस्तु नृपश्रेष्ठो ब्रह्मदत्तमकल्मषम् ।
राज्येऽभिषिच्य योगात्मा परां गतिमवाप्तवान् ॥ २४ ॥
ब्रह्मदत्तस्य भार्या तु देवलस्यात्मजाभवत् ।
असितस्य हि दुर्धर्षा सन्नतिर्नाम नामतः ॥ २५ ॥
तामेकभावसंपन्नां लेभे कन्यामनुत्तमाम् ।
सन्नतिं सन्नतिमतीं देवलाद् योगधर्मिणीम् ॥ २६ ॥
पञ्चमः पाञ्चिकस्तत्र सप्तजातिषु भारत ।
षष्ठस्तु कण्डरीकोऽभूद् ब्रह्मदत्तस्तु सप्तमः ॥ २७ ॥
शेषा विहङ्गमा ये वै काम्पिल्ये सहचारिणः ।
ते जाताः श्रोत्रियकुले सुदरिद्रे सहोदराः ॥ २८ ॥
धृतिमान् सुमना विद्वांस्तत्त्वदर्शी च नामतः ।
वेदाध्ययनसंपन्नाश्चत्वारश्छिद्रदर्शिनः ॥ २९ ॥
तेषां संवित्तथोत्पन्ना पूर्वजातिकृता तदा ।
ये योगनिरताः सिद्धाः प्रस्थिताः सर्व एव हि ॥ ३० ॥
आमन्त्र्य पितरं तात पिता तानब्रवीत्तदा ।
अधर्म एष युष्माकं यन्मां त्यक्त्वा गमिष्यथ ॥ ३१ ॥
दारिद्र्यमनपाकृत्य पुत्रार्थांश्चैव पुष्कलान् ।
शुश्रूषामप्रयुज्यैव कथं वै गन्तुमर्हथ ॥ ३२ ॥
ते तमूचुर्द्विजाः सर्वे पितरं पुनरेव च ।
करिष्यामो विधानं ते येन त्वं वर्तयिष्यसि ॥ ३३ ॥
इमं श्लोकं महार्थं त्वं राजानं सहमन्त्रिणम् ।
श्रावयेथाः समागम्य ब्रह्मदत्तमकल्मषम् ॥ ३४ ॥
प्रीतात्मा दास्यति स ते ग्रामान् भोगांश्च पुष्कलान् ।
यथेप्सितांश्च सर्वार्थान् गच्छ तात यथेप्सितम् ॥ ३५ ॥
एतावदुक्त्वा ते सर्वे पूजयित्वा च तं गुरुम् ।
योगधर्ममनुप्राप्य परां निर्वृतिमाययुः ॥ ३६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि ॥
पितृकल्पे त्रयोविंशोऽध्यायः


हंसवर्णन -

मार्कंडेय सांगतातः - ते मानससरोवराचे तीरी विहार करणारे पद्मगर्भ, अरविंदाक्ष, क्षीरगर्भ, सुलोचन, उरुबिंदू, सुबिंदु व हेमगर्भ, अशीं नांवे असलेले सातही हंस, जल आणि वायु भक्षण करून योगाभ्यासानें आपलें शरीर शुष्क करीत होते. राजा बिभ्राज याची स्थिति थेट उलट होती. तो शरीराने गलेलठठ असून कामुक होता, व आपल्या स्त्रिया व भोगांगना बरोबर घेऊन इंद्र जसा नंदनवनांत शिरतो, त्याप्रमाणें मानससरोवरावरील वनांत शिरला, व तेथें हे पक्षी योगाभ्यास करण्यांत गुंतले आहेत असें त्यानें पाहिले. हे पक्षी होऊन जर योगाभ्यास करितात, तर मी मनुष्य होऊन विषयासक्त राहाणे हे मोठेंच लज्जाकर आहे, असे वाटून हीच गोष्ट मनांत घोळीत घोळीत तो आपल्या नगरास परत फिरला. त्याला अणुह नांवाचा एक धार्मिक पुत्र होता. याला अणुह नांव पडण्याचे कारण अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म असेही धर्माचार साधण्याविषयीं तो परम तत्पर असे, हें होय. याला जी स्त्री मिळाली होती तीही मोठी योगनिष्ठ, सद्‍गुणी, सत्यशील व सर्वथा पूज्यलक्षणांनीं युक्त अशी होती. ही स्त्री म्हणजे शुक्राचार्यांची कन्या जी कृत्वी ती. हे भीष्मा, ही कृत्वी म्हणजे बर्हिषद पितरांची कन्या जी पीवरी म्हणून पूर्वी सनत्कुमारांनी जी मला सांगितली होतो तीच; व त्या वेळीही ही मोठी सत्यपरायण, अजितेंद्रियांना अगम्य व स्वतः योगनिष्ठ असून योगनिष्ठाचीच माता व योगनिष्ठाचीच पत्नी होईल म्हणून मी सनत्कुमारांच्या तोंडची पितृकल्पाची हकीकत सांगत असतां बोललोच आहें; व त्याप्रमाणेंच ती झाली. असो; बिभ्राज राजा घरीं येतांच त्यानें आपले प्रजाजन व ब्राह्मण यांस बोलावून स्वस्तिवाचन वगैरे करवून मोठ्या आनंदाने आपला पुत्र अणुह यांस राज्यावर बसविले; व स्वतः ते सहचारी हंसपक्षी मानससरोवराचे कांठीं जेथे आढळले होते तेथेंच तपश्चर्येसाठी गमन केलें. तेथे गेल्यावर त्या सरोवराचे शेजारीच मोठी तीव्र तपश्चर्या आरंभिली. त्यानें सर्व विषयवासना सोडून दिल्या, व अन्नपाणीही सोडून केवळ वायुभक्षण चालू ठेविले. ही तीव्र तपश्चर्या करण्यांत त्याचा गूढ हेतु असा होता कीं, आपण या जन्मी दृढ संकल्प करून त्याचे बळावर पुढील जन्मी हे जे योगनिष्णात हंसबंधु आहेत यांपैकी एकाच्या उदरी येऊ. म्हणजे आपणांस अनायासेंच योगप्राप्ति होईल. ही गोष्ट मनांत घेऊन त्यानें मोठया नेटाने तपश्चर्या आरंभिली, व आपलें तपस्तेज इतकें वाढविले कीं, पाहाणाराला तो सूर्यासारखा दैदीप्यमान दिसूं लागला; व त्यानें प्रकाशित केल्यामुळें त्या वनाला व त्या सरोवरालाही तेव्हांपासून बैभ्राज असेंच नांव पडलें. इकडे त्या सात पक्ष्यांपैकी जे अखंड योगनिष्ठ होते ते चार, व जे पूर्वी सांगितल्याप्रमाणें योगभ्रष्ट होते ते तीन हे सर्वही तपानें निष्पाप होऊन कांपिल्यनगरीत जन्मांस आले.

यांपैकी ब्रह्मदत्त हा धुरीण होता. यांपैकी जे चौघे पूर्वजन्मी अखंड योगनिष्ठ होते ते या जन्मी ज्ञान, ध्यान, तप, पूजा, वेद, वेदांग, यांत निष्णात असून पूर्वजन्मींचे त्यांना स्मरण होतेंच; आणि बाकीचे जे तीन त्यांना मात्र भूल पडली. यांपैकीं पूर्वींचा जो स्वतंत्र तो ब्रह्मदत्त नांवानें अणुहाचे पोटीं उत्पन्न झाला. कारण, पूर्वी पक्षियोनीत असतां असाच जन्म आपणांस व्हावा असा त्याचा संकल्पच होता. हा ब्रह्मदत्तही या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप, इत्यादिकांनीं पवित्र असून मोठा यशस्वी व वेदवेदांगनिपुण होता. छिद्रदर्शी व सुनेत्र हे जे उरलेले दोघे बंधु ते या जन्मी वत्स व बाभ्रव्य वंशांत उत्पन्न झाले. हेही मोठे कर्मनिष्ठ व वेदवेदांगप्रवीण होते; व पूर्वजन्मापासून एकत्र राहिले असल्यामुळें या जन्मी ब्रह्मदत्ताचे सोबती झाले. या जन्मी त्यांना पांचाल व कण्डरीक अशीं नावे होतीं. पैकी पांचाल हा ऋग्वेदामध्ये प्रवीण होता, व यामुळे त्यानें आचार्यत्व स्वीकारले. कण्डरीक हा सामवेद व यजुर्वेद यांत निष्णात असल्यानें त्यानें छंदोगत्व व अध्वर्युत्व पत्करिलें. राजा ब्रह्मदत्त हा सर्व प्राण्यांचे शब्द समजण्यांत निपुण होता.

त्याची ह्या पांचालकण्डरीकांशीं मोठी गट्टी जमली. हे तिघेही पूर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे कामलोलुप होऊन मैथुनादि कर्मात जरी आसक्त होते तरी पूर्वसंस्कारामुळें त्यांना धर्म, अर्थ, काम या तिन्ही शास्त्रांची माहिती पुरापूर होती. असो; निर्मळ ब्रह्मदत्ताला राज्यावर बसवून अणुह जो तपश्चर्येला गेला तो पूर्ण योगनिष्ठ होऊन परमगतीला पोचला. ब्रह्मदत्ताला जी बायको मिळाली ती असितकुलोत्पन्न जो देवलऋषि त्याची मुलगी होती. हिचे नांव सन्नति असें होतें. हिच्या नांवाप्रमाणेच ही सन्नतिमान म्हणजे सज्जनांशी नम्रपणे वागणारी किंवा सत् म्हणजे जें ब्रह्म त्याचे ठिकाणी जिची मति लीन आहे अशी होती. सौंदर्यानेंही फार उत्तमच होती. हिचे तेज मोठे उग्र असे व हिला योगाचा नाद असल्यामुळें ब्रह्मदत्ताच्या व हिच्या समजुतीचा एकमेळ होता; व हें पाहूनच ब्रह्मदत्तानें तिला देवलापासून भार्यात्वासाठी मागून घेतली.

हे राजा, पूर्वजन्मीचा जो पांचिक तो या सातव्या जन्मीही पांचवाच होता. सहावा जो खसृम तो कण्डरीक झाला, व सातवा तो ब्रह्मदत्त झाला, हें मागें सांगितलेंच आहे. उरले जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरींतच एका वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे भाऊ झाले. त्याची नांवे - धृतिमान, सुमना, विद्वान् व सत्यदर्शी अशीं होतीं. हे चौघेही वेदाध्ययनांत मोठे निपुण असून त्यांचें मुक्तिमार्गाकडे सदैव लक्ष असे. कारण, पूर्व संस्कारामुळें त्यांचे ठिकाणी तसलेंच ज्ञान उत्पन्न झालें होतें; यामुळें ते याही जन्मीं सदैव योगनिरत राहून आपण आतां सिद्ध झालों असें त्यांना वाटताच ते हा लोक सोडून जाण्याच्या खटपटीस लागले. जातांना आम्ही येतो म्हणून त्यांनीं आपल्या बापाचा निरोप विचारिला. तेव्हां तो म्हणाला कीं, बाबांनो, तुम्ही पुत्रांनी अशा स्थितींत मला सोडून जाणें हा निव्वळ अधर्म आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माझें दरिद्र तुम्हीं विच्छिन्न केलें नाहीं, किंवा संतति करून वंशवृद्धि केली नाही. माझे पश्चात राहून माझें गयावर्जनादि करणें हें तर लांबच राहिलें, पण, माझी या वृद्ध वयांत सेवाचाकरीही केली नाहीं असें असून मला तुम्ही सोडून चालला, हें तुम्हांला शोभत नाहीं.

हें बापाचे भाषण श्रवण करून ते सर्व ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मोद्धारार्थ संततीची गरज नाहीं. आम्ही ब्रह्मवेत्ते असल्यामुळें तुमचा उद्धार झालेलाच आहे; आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड तुम्हाला सांगतो. आपला ब्रह्मदत्त राजा हा मोठा पुण्यवान आहे, तो आपल्या मंत्र्यांसह बसला असेल अशी वेळ साधून त्याकडे जा आणि "सप्तव्याधा" हे श्लोक त्याचे पुढें म्हणा. या श्लोकांत फार गूढार्थ आहे, तो जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील तसले भोग्य पदार्थ देईल, फार काय तुमची जी इच्छा असेल ती तृप्त करील. करितां तुम्ही निश्चिंत असा.

याप्रमाणे पित्याला सांगून व त्याची पूजा करून, ते पुन्हा योगधारणा धरून परम शांतीला पोंचले.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पितृकल्पे त्रयोविंशोऽध्यायः ॥ २३ ॥
अध्याय तेविसावा समाप्त

GO TOP