श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः


अंशावतरणम्

वैशंपायन उवाच
ते श्रुत्वा पृथिवीवाक्यं सर्व एव दिवौकसः ।
तदर्थकृत्यं संचिन्त्य पितामहमथाब्रुवन् ॥ १ ॥
भगवन्ह्रियतामस्या धरण्या भारसंततिः ।
शरीरकर्ता लोकानां त्वं हि लोकस्य चेश्वरः ॥ २ ॥
यत्कर्तव्यं महेन्द्रेण यमेन वरुणेन च ।
यद्वा कार्यं धनेशेन स्वयं नारायणेन वा ॥ ३ ॥
यद्वा चन्द्रमसा कार्यं भास्करेणानिलेन वा ।
आदित्यैर्वसुभिर्वापि रुद्रैर्वा लोकभावनैः ॥ ४ ॥
अश्विभ्यां देववैद्याभ्यां साध्यैर्वा त्रिदशालयैः ।
बृहस्पत्युशनोभ्यां वा कालेन कलिनापि वा ॥ ५ ॥
महेश्वरेण वा ब्रह्मन् विशाखेन गुहेन वा ।
यक्षराक्षसगन्धर्वैश्चारणैर्वा महोरगैः ॥ ६ ॥
पतङ्‌गैः पर्वतैश्चापि सागरैर्वा महोर्मिभिः ।
गङ्‌गामुखाभिर्दिव्याभिः सरिद्‌भिर्वा सुरेश्वर ॥ ७ ॥
शीघ्रमाज्ञापय विभो कथमंशः प्रयुज्यताम् ।
यदि ते पार्थिवं कार्यं कार्यं पार्थिवविग्रहे ॥ ८ ॥
कथमंशावतरणं कुर्मः सर्वे पितामह ।
अन्तरिक्षगता ये च पृथिव्यां पार्थिवाश्च ये ॥ ९ ॥
सदस्यानां च विप्राणां पर्थिवानां कुलेषु च ।
अयोनिजाश्चैव तनूः सृजामो जगतीतले ॥ १० ॥
सुराणामेककार्याणां श्रुत्वैतन्निश्चितं मतम् ।
देवैः परिवृतैः प्राह वाक्यं लोकपितामहः ॥ ११ ॥
रोचते मे सुरश्रेष्ठा युष्माकमपि निश्चयः ।
सृजध्वं स्वशरीरांशांस्तेजसाऽऽत्मसमान् भुवि ॥ १२ ॥
सर्व एव सुरश्रेष्ठास्तेजोभिरवरोहत ।
भावयन्तो भुवं देवीं लब्ध्वा त्रिभुवनश्रियम् ॥ १३ ॥
पार्थिवे भारते वंशे पूर्वमेव विजानता ।
पृथिव्यां सम्भ्रममिमं श्रूयतां यन्मया कृतम् ॥ १४ ॥
समुद्रेऽहं पुरा पूर्वे वेलामासाद्य पश्चिमाम् ।
आसे सार्धं तनूजेन कश्यपेन महात्मना ॥ १५ ॥
कथाभिः पूर्ववृत्ताभिर्लोकवेदानुगामिभिः ।
इतिवृत्तैश्च बहुभिः पुराणप्रभवैर्गुणैः ॥ १६ ॥
कुर्वतस्तु कथास्तास्ताः समुद्रः सह गङ्‌गया ।
समीपमाजगामाशु युक्तस्तोयदमारुतैः ॥ १७ ॥
स वीचिविषमां कुर्वन् गतिं वेगतरङ्‌गिणीम् ।
यादोगणविचित्रेण संछन्नस्तोयवाससा ॥ १८ ॥
शङ्खमुक्तामलतनुः प्रवालद्रुमभूषणः ।
युक्तचन्द्रमसा पूर्णः साभ्रगम्भीरनिःस्वनः ॥ १९ ॥
स मां परिभवन्नेव स्वां वेलां समतिक्रमन् ।
क्लेदयामास चपलैर्लावणैरम्बुविस्रवैः ॥ २० ॥
तं च देशं व्यवसितः समुद्रोऽद्‌भिर्विमर्दितुम् ।
उक्तः संरब्धया वाचा शान्तोऽसीति मया तदा ॥ २१ ॥
शान्तोऽसीत्युक्तमात्रस्तु तनुत्वं सागरो गतः ।
संहतोर्मितरङ्‌गौघः स्थितो राजश्रिया ज्वलन् ॥ २२ ॥
भूयश्चैव मया शप्तः समुद्रः सह गङ्‌गया ।
सकारणां मतिं कृत्वा युष्माकं हितकाम्यया ॥ २३ ॥
यस्मात् त्वं राजतुल्येन वपुषा समुपस्थितः ।
गच्छार्णव महीपालो राजैव त्वं भविष्यसि ॥ २४ ॥
तत्रापि सहजां लीलां धारयन् स्वेन तेजसा ।
भविष्यसि नृणां भर्ता भारतानां कुलोद्वहः ॥ २५ ॥
शान्तोऽसीति मयोक्तस्त्वं यच्चासि तनुतां गतः ।
सुतनुर्यशसा लोके शन्तनुस्त्वं भविष्यसि ॥ २६ ॥
इयमप्यायतापाङ्‌गी गङ्‌गा सर्वाङ्‌गशोभना ।
रूपिणी च सरिच्छ्रेष्ठा तत्र त्वामुपयास्यति ॥ २७ ॥
एवमुक्तस्तु मां क्षुब्धः सोऽभिवीक्ष्यार्णवोऽब्रवीत् ।
मां प्रभो देवदेवानां किमर्थं शप्तवानसि २८ ॥
अहं तव विधेयात्मा त्वत्कृतस्त्वत्परायणः ।
अशपोऽसदृशैर्वाक्यैरात्मजं मां किमात्मना ॥ २९ ॥
भगवंस्त्वत्प्रसादेन वेगात्पर्वणि वर्धितः ।
यद्यहं चलितो ब्रह्मन् कोऽत्र दोषो ममात्मनः ॥ ३० ॥
क्षिप्ताभिः पवनैरद्‌भिः स्पृष्टो यद्यसि पर्वणि ।
अत्र मे किं नु भगवन् विद्यते शापकारणम् ॥ ३१ ॥
उद्धतैश्च महावातैः प्रवृद्धैश्च बलाहकैः ।
पर्वणा चेन्दुयुक्तेन त्रिभिः क्षुब्धोऽस्मि कारणैः ॥ ३२ ॥
एवं यद्यपराद्धोऽहं कारणैस्त्वत्प्रकल्पितैः ।
क्षन्तुमर्हसि मे ब्रह्मञ्छापोऽयं विनिवर्त्यताम् ॥ ३३ ॥
एवं मयि निरालम्बे शापाच्छिथिलतां गते ।
कारुण्यं कुरु देवेश प्रमाणं यद्यवेक्षसे ॥ ३४ ॥
अस्यास्तु देवगङ्‌गाया गां गतायास्त्वदाज्ञया ।
मम दोषात् सदोषायाः प्रसादं कर्तुमर्हसि ॥ ३५ ॥
तमहं श्लक्ष्णया वाच महार्णवमथाब्रुवम् ।
अकारणज्ञं देवानां त्रस्तं शापानलेन तम् ॥ ३६ ॥
शान्तिं व्रज न भेतव्यं प्रसन्नोऽस्मि महोदधे ।
शापेऽस्मिन् सरितां नाथ भविष्यं शृणु कारणम् ॥ ३७ ॥
त्वं गच्छ भारते वंशे स्वं देहं स्वेन तेजसा ।
आधत्स्व सरितां नाथ त्यक्त्वेमां सागरीं तनुम् ॥ ३८ ॥
महोदधे महीपालस्तत्र राजश्रिया वृतः ।
पालयंश्चतुरो वर्णान्व्रंस्यसे सलिलेश्वर ॥ ३९ ॥
इयं च ते सरिच्छ्रेष्ठा बिभ्रती रूपमुत्तमम् ।
तत्कालं रमणीयाङ्‌गी गङ्‌गा परिचरिष्यति ॥ ४० ॥
अनया सह जाह्नव्या मोदमानो ममाज्ञया ।
इमं सलिलसंक्लेदं विस्मरिष्यसि सागर ॥ ४१ ॥
त्वरता चैव कर्तव्यं त्वयेदं मम शासनम् ।
प्राजापत्येन विधिना गङ्‌गया सह सागर ॥ ४२ ॥
वसवः प्रच्युताः स्वर्गात् प्रविष्टाश्च रसातलम् ।
तेषामुत्पादनार्थाय त्वं मया विनियोजितः ॥ ४३ ॥
अष्टौ ताञ्जाह्नवी गर्भानपत्यार्थं दधात्वियम् ।
विभावसोस्तुल्यगुणान्सुराणां प्रीतिवर्धनान् ॥ ४४ ॥
उत्पाद्य त्वं वसूञ्छीघ्रं कृत्वा कुरुकुलं महत् ।
प्रवेष्टासि तनुं त्यक्त्वा पुनः सागर सागरीम् ॥ ४५ ॥
एवमेतन्मया पूर्वं हितार्थं वः सुरोत्तमाः ।
भविष्यं पश्यतां भारं पृथिव्याः पार्थिवात्मकम् ॥ ४६ ॥
तदेष शन्तनोर्वंशः पृथिव्यां रोपितो मया ।
वसवो ये च गङ्‌गायामुत्पन्नास्त्रिदिवौकसः ॥ ४७ ॥
अद्यापि भुवि गाङ्‌गेयस्तत्रैव वसुरष्टमः ।
सप्तेमे वसवः प्राप्ताः स एकः परिलम्बते ॥ ४८ ॥
द्वितीयायां स सृष्टायां द्वितीया शन्तनोस्तनुः ।
विचित्रवीर्यो द्युतिमानासीद् राजा प्रतापवान् ॥ ४९ ॥
वैचित्र्यवीर्यौ द्वावेव पार्थिवौ भुवि साम्प्रतम् ।
धृतराष्ट्रश्च पाण्डुश्च विख्यातौ पुरुषर्षभौ ॥ ५० ॥
तत्र पाण्डोः श्रिया जुष्टे द्वे भार्ये सम्बभूवतुः ।
शुभे कुन्ती च माद्री च देवयोषोपमे तु ते ॥ ५१ ॥
धृतराष्ट्रस्य राज्ञस्तु भार्यैका तुल्यचारिणी ।
गान्धारी भुवि विख्याता भर्तुर्नित्यं व्रते स्थिता ॥ ५२ ॥
तत्र वंशा विभज्यन्तां विपक्षाः पक्ष एव च ।
पुत्राणां हि तयो राज्ञोर्भविता विग्रहो महान् ॥ ५३ ॥
तेषां विमर्दे दायाद्ये नृपाणां भविता क्षयः ।
युगान्तप्रतिमं चैव भविष्यति महद्‌भयम् ॥ ५४ ॥
सबलेषु नरेन्द्रेषु शान्तयस्त्वितरेतरम् ।
विविक्तपुरराष्ट्रौघा क्षितिः शैथिल्यमेष्यति ॥ ५५ ॥
द्वापरस्य युगस्यान्ते मया दृष्टं पुरातनम् ।
क्षयं यास्यन्ति शस्त्रेण मानवैः सह पार्थिवाः ॥ ५६ ॥
तत्रावशिष्टान् मनुजान् सुप्तान् निशि विचेतसः ।
धक्ष्यते शङ्‌करस्यांशः पावकेनास्त्रतेजसा ॥ ५७ ॥
अन्तकप्रतिमे तस्मिन् निवृत्ते क्रूरकर्मणि ।
समाप्तमिदमाख्यास्ये त्रितीयं द्वापरं युगम् ॥ ५८ ॥
महेश्वरांशेऽपसृते ततो माहेश्वरं युगम् ।
शिष्यं प्रवर्तते पश्चाद् युगं दारुणदर्शनम् ॥ ५९ ॥
अधर्मप्रायपुरुषं स्वल्पधर्मप्रतिग्रहम् ।
उत्सन्नसत्यसंयोगं वर्धितानृतसंचयम् ॥ ६० ॥
महेश्वरं कुमारं च द्वौ च देवौ समाश्रिताः ।
भविष्यन्ति नराः सर्वे लोके न स्थविरायुषः ॥ ६१ ॥
तदेष निर्णयः श्रेष्ठः पृथिव्यां पार्थिवान्तकः ।
अंशावतरणं सर्वे सुराः कुरुत मा चिरम् ॥ ६२ ॥
धर्मस्यांशस्तु कुन्त्यां वै माद्र्यां च विनियुज्यताम् ।
विग्रहस्य कलिर्मूलं गान्धार्यां विनियुज्यताम् ॥ ६३ ॥
एतौ पक्षौ भविष्यन्ति राजानः कालचोदिताः ।
जातरागाः पृथिव्यर्थे सर्वे संग्रामलालसाः ॥ ६४ ॥
नागायुतबलाः केचित्केचिदोघबलान्विताः ।
गच्छत्वियं वसुमती स्वां योनिं लोकधारिणी ।
सृष्टोऽयं नैष्ठिको राज्ञामुपायो लोकविश्रुतः ॥ ६५ ॥
श्रुत्वा पितामहवचः सा जगाम यथागतम् ।
पृथिवी सह कालेन वधाय पृथिवीक्षिताम् ॥ ६६ ॥
देवानचोदयद् ब्रह्मा निग्रहार्थे सुरद्विषाम् ।
नरं चैव पुराणर्षिं शेषं च धरणीधरम् ॥ ६७ ॥
सनत्कुमारं साध्यांश्च सुरांश्चाग्निपुरोगमान् ।
वरुणं च यमं चैव सूर्याचन्द्रमसौ तदा ॥ ६८ ॥
गन्धर्वाप्सरसश्चैव रुद्रादित्यांस्तथाश्विनौ ।
ततोंऽशानवनिं देवाः सर्व एवावतारयन् ॥ ६९ ॥
यथा ते कथितं पूर्वमंशावतरणं मया ।
अयोनिजा योनिजाश्च ते देवाः पृथिवीतले ॥ ७० ॥
दैत्यदानवहन्तारः संभूताः पुरुषेश्वराः ।
क्षीरिकावृक्षसंकाशा वज्रसंहननास्तथा ॥ ७१ ॥
नागायुतबलाः केचित् केचिदोघबलान्विताः ।
गदापरिघशक्तीनां सहाः परिघबाहवः ॥ ७२ ॥
गिरिशृङ्‌गप्रहर्तारः सर्वे परिघयोधिनः ।
वृष्णिवंशसमुत्पन्नाः शतशोऽथ सहस्रशः ॥ ७३ ॥
कुरुवंशे च ते देवाः पञ्चालेषु च पार्थिवाः ।
याज्ञिकानां समृद्धानां ब्राह्मणानां च योनिषु ॥ ७४ ॥
सर्वास्त्रज्ञा महेष्वासा वेदव्रतपरायणाः ।
सर्वर्धिगुणसम्पन्ना यज्वानः पुण्यकर्मिणः ॥ ७५ ॥
आचालयेयुर्ये शैलान् क्रुद्धा भिन्द्युर्महीतलम् ।
उत्पतेयुरथाकाशं क्षोभयेयुर्महोदधिम् ॥ ७६ ॥
एवमादिश्य तान् सर्वान् भूतभव्यभवत्प्रभुः ।
नारायणे समावेश्य लोकाञ्छान्तिमुपागमत् ॥ ७७ ॥
भूयः शृणु यथा विष्णुरवतीर्णो महीतले ।
प्रजानां वै हितार्थाय प्रभुः प्राणिहितेश्वरः ॥ ७८ ॥
ययातिवंशजस्याथ वसुदेवस्य धीमतः ।
कुले पूज्ये यशस्कर्मा जज्ञे नारायणः प्रभुः ॥ ७९ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
देवानामंशावतरणे त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः


देवतांचे अंशावतार -

वैशंपायन सांगतात : - ती सर्वही देवमंडळी धरणीचे तें वाक्य ऐकून तिचा इष्ट हेतु सिद्धीस जाण्याकरितां काय केलें पाहिजे हें ठरविण्यासाठी पितामहाला बोलले : - हे भगवन्‌, तुम्हीच सर्व लोकांना शरीर देणारे व तुम्हीच सर्व लोकांचे स्वामी आहां. याकरितां या धरणीला झालेला अतिशय भार तुम्हींच दूर करावा हें न्याय्य आहे. तर ही गोष्ट म्हणजे पृथ्वीचें कल्याण करण्याकरितां राजे लोकांत झगडा सुरू करणें हें जर आपल्याला आम्हांप्रमाणेंच संमत असेल तर त्या कार्याचे सिध्द्‍यर्थ आम्हांपैकीं कोणी कोणत्या रूपानें आपल्या तेजाचें अंशावतरण पृथ्वीवर करावे तें आपणच आम्हां सर्वांना सांगावें. आमचेपैकीं महेंद्रानें काय करावें, त्याचप्रमाणें यमानें, वरुणानें, कुबेरानें, स्वतः नारायणानें, चंद्राने, सूर्यानें, बारा आदित्यांनीं, आठ वसूंनीं, एकादश रुद्रांनीं, देववैद्य अश्विनीकुमारांनी, स्वर्गस्थ साध्यांनी, बृहस्पतीनें, शुक्रानें, कालानें, कलीनें, महेश्वरानें, कार्तिकस्वामीनें, यक्षांनीं, राक्षसांनीं, गंधर्वांनीं, चारणांनीं, महा उरगानीं, पक्ष्यांनी, पर्वतांनी, तरंगयुक्त सागरांनीं किंवी गंगाप्रभृति दिव्य नद्यांनीं, कोणत्या रीतीनें आपले तेजाचा अंश धरणीवर पाठवून कोणती कामगिरी करावी हें आपणच त्वरित सांगा.

आमचें मत विचाराल तर असें आहे कीं, जे कोणी अंतरिक्षांत किंवा पृथ्वीवर राजे आहेत आणि त्याचप्रमाणें सदस्य ब्राह्मण आणि इतर उंची कुळें आहेत अशांत योनिसंबंधावांचून आम्ही आपले देह प्रकट करून पृथ्वीवर संचार करूं. याप्रमाणें सर्व देवमंडळीचा एकोप्यानें झालेला निश्चय श्रवण करून देवमंडळांत बसलेला ब्रह्मदेव म्हणाला कीं, हे देवश्रेष्ठहो, फार नामी. तुमचाच निश्चय मला संमत आहे. तुम्ही आपल्या तेजाचा अंश पृथ्वीवर पाठवून तेथें हुबेहूब येथल्याप्रमाणे शरीरें उभी करा; आणि सर्व त्रैलोक्यांतील सौभाग्य गोळा करून आणून या धरणी देवीला शोभिवंत करा. आतां या बाबतींत मीं काय केले आहे तें, ऐका.

पृथ्वीला आजचे हे संकट प्राप्त होणार हें मला पूर्वीच कळून चुकले होतें. यामुळे पृथ्वीवरील भारतवंशांत मीं पुढील उद्दिष्ट कार्यसाधनांचा बीजारोप करून ठेविला आहे. कसा तो ऐका. पूर्वी मी पूर्वसमुद्राच्या पश्चिम तीरावर माझा पुत्र महात्मा कश्यप याजबरोबर जुन्यापान्या कथा व लोकांत आणि वेदांत घडलेले इतिहास व पुराणांतून सांगितलेल्या चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत बसलों होतों, अशा वेळीं मेघकारक वायूला बरोबर घेऊन गंगेसह मूर्तिमान्‌ समुद्र मजपाशीं आला. त्या वेळीं त्या समुद्राची गति जोरानें उसळणाऱ्या लाटांनी विषम झाली होती. जलजंतुंच्या योगानें चित्रविचित्र झालेलें असें जलरूपी वस्त्रानें त्याचें शरीर झांकलें असून त्याच्या त्या निर्मल शरीरावर शंख, मौक्तिकें आणि प्रवालवल्ली यांचीं भूषणें होतीं. बरोबर पूर्णचंद्र होता. अशा थाटांत सजलमेघाप्रमाणें गर्जना करीत आपल्या ठरीव मर्यादेला ओलांडून व आपल्या खारट आणि चंचल अशा जलौघानें मला भिजवून अर्थात्, माझी एकप्रकारें अमर्यदा करून मी बसलों होतों, त्या स्थलाला बुडवून टाकण्याच्या इच्छेनें तो तेथे आला. त्या वेळीं त्याला जरा झटक्यानेंच दटावून म्हटलें कीं, ' शांत हो. ' देव हो, काय सांगावे माझे 'शांत हो' हे शब्द कानी पडतांच तो वाढलेला समुद्र झट्‌दिशी संकोच पावला, आणि आपले वाढलेले ओघ व तरंग एकत्र आवरून राजतेजानें चमकतच माझे पुढें उभा राहिला. त्या वेळीं, हे देव हो, तुमचें हित मनांत आणून मतलबी दृष्टीनें मी त्या समदाला गंगेसह शाप देऊन म्हटले कीं, हे समुद्रा, ज्या अर्थी तूं राजकीय थाटाने येऊन मजपुढें उभा राहला आहेस त्या अर्थी ( तुला राजत्व आवडतेंसें दिसतें; तर ) तूं भारतांच्या कुळामध्यें जा म्हणजे तेथें तुझ्या स्वतेजानें व सहज लीलेनें तूं लोकांचा पोषणकर्ता आणि भरतकुलांत अग्रयायी असा राजा होशील. ज्या अर्थी मी तुला शांत हो असें म्हणतांच तू तनुत्वाला ( संकोचाला ) प्राप्त झालास, त्या अर्थीं तूं भारत कुलांत शंतनु या नांवानें प्रसिद्ध होशील; आणि तुजबरोबर असलेली ही सर्वांग सुंदरी व दीर्घापांगी सरिच्छ्रेष्ठा रुपवती गंगा तुझे सोबतीस येईल.

याप्रमाणें, माझी शापवाणी ऐकून समुद्र क्षुब्ध होऊन मला म्हणाला, ‘हे देवाधिदेवा प्रभो, मला आपण कां बरें शाप द्यावा? मी तर आपला आज्ञावर्ती, आपलाच किंकर, आपणच निर्माण केलेला व आपणालाच अत्यंत मानणारा, असें असतां आपल्या पुत्राला-मला अयोग्य वाक्यांनी आपण शाप दिला यांत हेतु काय? आपण म्हणाल, 'मी उसळून आपल्या आंगावर आलों.' तर पर्वकाली माझा वेग वाढून मी चलन पावावें ही आपलीच कृपा आहे. तेव्हां माझा वेग वाढत असतां वाऱ्याच्या थपडींनीं माझे पाणी उसळून पर्वकालीं आपणास स्पर्श झाला. यांत आपण मला शाप द्यावा इतका अपराध कोणता? मी काय करूं? एक तर चोहोंकडून फार मोठें वारें उसळलें, मेघानींही गर्दी केली आणि तशात पौर्णिमेच्या पूर्णचंद्राचें मजवर आकर्षण पोंचलें, अशा या तीन कारणांनी मीं उसळलो. यांत जरी मज कडून तुझा अपराध झाला असला तरीही तो तूं निर्माण केलेल्या कारणांनींच झाला हें ध्यानीं घेऊन, ब्रम्ह्नन्‌, मला क्षमा करून आपला शाप परत घ्यावा. मला तर आपणावांचून आधार नाहीं; आणि शिवाय मी आपल्या शापामुळे अगदींच लटका पडून गेलों आहें. याकरितां, हे देवेशा आपण न्यायमर्यादा पाळीत असाल तर मजवर करुणा करा. विशेषतः या देव गंगेला तरी आपल्या आज्ञेनुसार धरणीवर जाणें माझ्या दोषांनी संपृक्त झाल्यामुळेंच येणार आहे. तर. हिजवर तरी आपण कृपादृष्टि करावी. ' याप्रमाणे शापाग्नीनें त्रासून गेलेल्या त्या महार्णवाची विनंती ऐकून मी फार कोमल वाणींने त्याला बोललों कीं, हे महोदधे, मी तुजवर प्रसन्न आहें, भिऊं नको, शांत हो. तुला हें माहीत नाहीं. परंतु, हे सरित्पते, तुला मीं जो शाप दिला यांत माझा देवांची कांहीं पुढील कामगिरी साधण्याचा हेतु आहे. तर तूं आतां हे आपलें समुद्ररूप सोडून भारतवंशांत जा आणि तेथें आपल्या तेजानें आपल्याला मनुष्यदेह निर्माण कर. म्हणजे, हे जलपते, तूं त्या, भारतवंशांतील राजा होऊन राजकीय वैभवाने युक्त होत्साता चारी वर्णांचें यथान्याय पालन करीत मोठ्या सुखानें राहाशी्ल. तुजबरोबरच ही सर्वांगसुंदरी सरिद्वरा गंगा उत्कृष्ट रूप घेऊन तूझ्या सेवेंत तत्पर राहील; आणि, हे सागरा, माझे आज्ञेवरून याप्रमाणे राजसुखांत या सुंदरी जान्हवी सह दंग झालास म्हणजे ती तुली शाप दिल्याबद्दल आज जें वाईट वाटत आहे तें सर्व तूं विसरून जाशील. याकारितां, हे सरित्पते, आतां तूं माझे आज्ञेप्रमाणे वागण्यास विलंब लावूं नको, त्वरा कर; आणि भारतवंशी प्रकट होऊन या गंगेवरोबर शास्त्रोक्त प्राजापत्य विधीनें लग्न कर. स्वर्गातून तुमच्या पूर्वीच आठही वसु भूतली जाऊन बसले आहेत. त्यांस मनुष्योनींत येणें अवश्य आहे. त्यांची सोय लागावी म्हणूनच मी तुला या विवाहाची आज्ञा केली आहे. हे सर्वही वसु देवांचे मोठे आवडते आणि अग्नितुल्य तेजस्वी आहेत. करिता या आठहीजणांना या तुझ्या स्त्रीने म्हणजे गंगेने आपले उदरीं अपत्यरूपानें जन्म द्यावा. एवढी कामगिरी तुम्ही दांपत्यांनी झटपट करून कुरुकुलाची वृद्धि केली म्हणजे तत्काल तो मानवदेह सोडून, हे सागरा, तूं आपल्या पुर्वरूपास प्राप्त होशील. हे देवश्रेष्ठहो, या पृथ्वीला राजमंडळाचा भार होऊन संकट प्राप्त होणार हें भविष्य मला आगोदरच कळलें असल्यामुळें मीं आता सांगितल्याप्रमाणें समुद्राला आज्ञा देऊन तुमच्या हितार्थाची अशी आगाऊ योजना करून ठेविली होती; व या योजनेप्रमाणें आजकाल पृथ्वीवर जो शंतनूचा म्हणून वंश चालू आहे त्याची ही मी रुजत घातली. या गंगेचे पोटीं जे देव व अष्टवसु जन्मले त्यांतील सात पूर्ववत्‌ देवरूप होऊन आपणांत मिसळले. तथापि, यापैकी आठवा ज्याला गांगेय किंवा भीष्म म्हणतात तो अजून धरणीवर मागे थांबला आहे. शंतनुनें या गंगेशिवाय सत्यवती नांवाची दुसरी एक स्त्री केली होती. तिचे ठिकाणी त्यानें आपलेंच प्रतिशरीर असा विचित्रवीर्य नावाचा मोठा तेजस्वी पुत्र उत्पन्न केला. हा मोठा प्रतापशाली राजाही झाला. या विचित्रवीर्याचे दोनच पुत्र सांप्रत धरणीवर विद्यमान्‌ आहेत. या विख्यात पुरूषश्रेष्ठांचीं नांवें : - धृतराष्ट्र आणि पाण्डु. यांपैकी पाण्डुला सौभाग्य संपन्न अशा सुलक्षणी दोनच स्त्रिया असून एकीचे नांव कुंती व दुसरीचे नांव माद्री. या दोघीही देवांगनेतुल्य रमणीय आहेत. धृतराष्ट्र राजाला गांधारी नांवानें प्रसिद्ध अशी एकच स्त्री आहे. ही मोठी पतिव्रता असून सर्वदा आपल्या पतीच्या इच्छेप्रमाणें तंतोतंत वागत असते.

हे जे पाण्डु आणि धृतराष्ट्र म्हणून दोघे राजे सांगितले, यांच्या पुत्रांचा मोठा भयंकर संग्राम होणार आहे व त्या संग्रामार्थ उभयतांत पक्ष विपक्ष अशा फळ्या पडणार आहेत आणि मग या उभय भाऊबंधांत वडिलार्जित राज्याच्या विभागासंबंधें झगडा सुरू झाला म्हणजे त्या झगड्यांत बहुतेक सर्व राजांचा संहार होणार आहे. हा प्रकार सरू होईल त्यावेळीं प्रत्यक्ष कल्पान्तसमय येऊन ठेपल्याप्रमाणे सर्व प्रजेला मोठेच भय उद्भवेल. एकापेक्षां एक बलाढ्य राजे आपआपल्या सैन्यासह परस्परांची मस्ती जिरविण्याच्या भरीं भरले म्हणजे त्या नादांत या पृथ्वीवरील आजकाल मनुष्यसंख्येने गजबजून गेलेलीं पुरेंच्या पुरें आणि राष्ट्रेच्या राष्ट्रें रिती पडून या धरित्रीला सांप्रत' झालेला भार हलका पडेल. मीं केव्हांच पाहून ठेविलें आहे कीं, द्वापरयुगाचे अंतीं शस्त्रघातानें राजेलोक आपल्या प्रजेसह नाश पावतील. रणांगणी शस्त्राचे घायांतून थोडे बहुत जे कोणी उरतील, त्यांस ते रात्रीं शिबिरात गाफिल होऊन निद्रिस्त पडले असता शस्त्रतेजोरूपी अग्नीनें, शंकराचा अशावतार जो अश्वत्थामा तो जाळील. याप्रमाणें केवळ यमालाच शोभणारें असलें हें मनुष्यवधाचें क्रूर कृत्य पुरते् झालें म्हणजे मी तिसरें म्हणजे द्वापरयुग समाप्त झालें असें म्हणेन. शंकराचा अंशावतार जो अश्वत्थामा तो युद्धांतून एका बाजूला सरला म्हणजे मग शंकराचे युगाला म्हणजे शेवटल्या कलियुगाला प्रारंभ होईल. हे युग फारच दारुण होणार आहे. कारण, या युगांत मनुष्यमात्राची प्रवृत्ति अधर्माकडे विशेष व सद्धर्माकडे फार अल्प राहील. सत्याची ओळख बहुतेक बुजाल्यासारखी होऊन असत्याचा साठा मात्र फार वाढेल. बहुतेक सर्व लोक शंकर किंवा कार्तिकस्वामी या दोन देवांचे उपासक होतील, व कोणालाही म्हातारे लोक फार आढळणार नाहींत. असा प्रकार होणार आहे. हे देवहो, एतावता माझ्या समजुतीनें आपण आतां ज्या उपायाविषयी बोललो हाच उपाय पृथ्वीवरील राजांचा क्षय करण्यास फार उत्तम आहे, व म्हणून हा सिद्धीस जाण्याकरितां त्वरा करून तुम्ही आपआपल्या तेजाच्या अंशाने अवतीर्ण व्हा. त्यांतले त्यांत योजना अशी कीं, धर्माचा जो अंश आहे तो कुंती आणि माद्री यांचे ठिकाणीं योजावा; आणि भावी संग्रामाला ह्रेतुमूत होणारा असा जो कलीचा अंश तो गांधारीचे ठिकाणी योजावा. असें केलें असतां एकीकडे धर्म आणि एकीकडे कलि असे दोन जंगी पक्ष होऊन कालप्रेरणेमुळें सर्वही राजांना पृथ्वीबद्दल लोभ उत्पन्न होऊन युद्ध करण्याविषयीं मोठी उत्कंठा होईल. एकंदरींत या सर्व राजांचे बळी पडण्याचा हा सुप्रसिद्ध उपाय योजिला आहे. तर आतां या लोकधारिणी पृथ्वीने निश्चिंतपणें आपल्या पूर्वस्थानी जावे. ब्रह्मदेवाचे हें वाक्य ऐकतांच पृथ्वी ज्याप्रमाणें कालाला पुढें करून ब्रह्मदेवाकडे आली होती त्याचप्रमाणें ती राजांच्या संहारार्थ त्याच कालाला पुढें करून आपल्या पूर्व स्थलीं गेली.

इकडे ब्रह्मदेवानें देवद्वेष्टयांचा निग्रह करण्याविषयी देवमंडळीला आज्ञा केली, आणि त्याचप्रमाणे पुराणऋषि जो नर, तसाच धरणी-धर्ता शेष, सनत्कुमार,साध्य, अग्निप्रभृति देव, वरुण, यम, सूर्य, चंद्रमा,गंधर्व, अप्सरा, रुद्र,आदित्य व अश्विनौ देव या सर्वासही आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे सर्वही देवांनी आपले अंश धरणीवर पाठविले. मीं पूर्वी सांगितल्याप्रमाणे देवांनी पृथ्वीतलावर काहीं योनिसंभव व कांहीं अयोनिसंभव अशीं रूपें घऊन दैत्यदानवांचे निःपातकर्ते पुरुष निर्माण केले. या पुरुषांत कांहीं राजणीच्या वृक्षाप्रमाणें विस्तीर्ण शरीराचे होते. काहींचीं शरीरे वज्रा सारखी घट्ट होतीं. कांहींना दहा सह्स्त्र हत्तीचें बळ असून कांहींच्या अंगांत एखाद्या प्रवाहाप्रमाणें रग होती. कांहींकांचे भुज परिघाप्रमाणे दीर्घ व मांसल असून मोठमोठाल्या गदा, परीघ व शक्ति आपल्या हातानी सहज फिरवूं शकत. गदेचा खेळ तर सर्वांनाच साधला होता, आणि त्यामुळे ते मोठाल्या पर्वतशिखरांचा तेव्हांच चुराडा करून टाकीत. या प्रकारचे शेकडो हजारों पुरुष वृष्णिवंशांत उत्पन्न झाले. त्याच मासल्याचे कुरु व पंचाल राजवंशांत झाले. कांहीं देव समृद्ध आणि यज्ञकर्त्या अशा ब्राह्मणांच्या कुळांत निपजले. ब्राह्मण कुळात येऊनही ते मोठे धनुर्धर व शस्त्रास्त्रांचे पूर्ण माहितगार होते. शिवाय ब्राह्मण या नात्यानें वेदाचें पारायण करणें, यज्ञयागादि पुण्यकर्मे करणें, हेंही त्यांच्या अंगीं असून त्यांस सर्व प्रकारची अनुकूलता होती. त्यांचे सामर्थ्य इतकें होतें कीं, ते रागावले असतां पर्वतांना हालवून सोडितील, धरणी फाडून टाकितील; आकाशांत उड्डाण करितील किंवा महासमुद्राला हालवितील.

याप्रमाणे त्या देवमंडळीच्या अवतार- स्वरूपांचें वर्णन करून व त्याप्रमाणें देवांस आज्ञा देऊन तो भूतभविष्यवर्तमानाचा स्वामी ब्रह्मदेव सर्व लोकांची व्यवस्था भगवान्‌ नारायणाचे स्वाधीन करून आपण शान्तीचा आश्रय करिता झाला.

हे जनमेजया, यापुढें प्राणिमात्रांचा हितकर्ता प्रभु नारायण प्रजेच्या कल्याणासाठीं भुतली ययातिवंशातील वसुदेवाच्या पूज्य कुलांत निर्माण होऊन कसकसें यश संपादन करता झाला, तें सांगतो ऐक.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
अंशावतरणं नाम त्रिपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५३ ॥
अध्याय त्रेपन्नावा समाप्त

GO TOP