श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
चतुःपञ्चाशत्तमोऽध्यायः


विष्णुं प्रति देवर्षेर्वाक्यम्

वैशंपायन उवाच
कृतकार्ये गते काले जगत्यां च यथानयम् ।
अंशावतरणे वृत्ते सुराणां भारते कुले ॥ १ ॥
भागेऽवतीर्णे धर्मस्य शक्रस्य पवनस्य च ।
अश्विनोर्देवभिषजोर्भागे वै भास्करस्य च ॥ २ ॥
पूर्वमेवावनिगते भागे देवपुरोधसः ।
वसूनामष्टमे भागे प्रागेव धरणीं गते ॥ ३ ॥
मृत्योर्भागे क्षितिगते कलेर्भागे तथैव च ।
भागे शुक्रस्य सोमस्य वरुणस्य च गां गते ॥ ४ ॥
शंकरस्य गते भागे मित्रस्य धनदस्य च ।
गन्धर्वोरगयक्षाणां भागांशेषु गतेषु च ॥ ५ ॥
भागेष्वेतेषु गगनादवतीर्णेषु मेदिनीम् ।
तिष्ठन्नारायणस्यांशे नारदः समदृश्यत ॥ ६ ॥
ज्वलिताग्निप्रतीकाशो बालार्कसदृशेक्षणः ।
सव्यापवृत्तं विपुलं जटामण्डलमुद्वहन् ॥ ७ ॥
चन्द्रांशुशुक्ले वसने वसानो रुक्मभूषितः ।
वीणां गृहीत्वा महतीं कक्षासक्तां सखीमिव ॥ ८ ॥
कृष्णाजिनोत्तरासङ्‌गो हेमयज्ञोपवीतवान् ।
दण्डी कमण्डलुधरः साक्षाच्छक्र इवापरः ॥ ९ ॥
भेत्ता जगति गुह्यानां विग्रहाणां ग्रहोपमः ।
गाता चतुर्णां वेदानामुद्‌गाता प्रथमर्त्विजाम् ।
महर्षिविग्रहरुचिर्विद्वान् गान्धर्वकोविदः ॥ १० ॥
वैरिकेलिकिलो विप्रो ब्राह्मः कलिरिवापरः ।
देवगन्धर्वलोकानामादिवक्ता महामुनिः ॥ ११ ॥
स नारदोऽथ ब्रह्मर्षिर्ब्रह्मलोकचरोऽव्ययः ।
स्थितो देवसभामध्ये संरब्धो विष्णुमब्रवीत् ॥ १२ ॥
अंशावतरणं विष्णोर्यदिदं त्रिदशैः कृतम् ।
क्षयार्थं पृथिवीन्द्राणां सर्वमेतदकारणम् ॥१-५४ १३ ॥
यदेतत्पार्थिवं क्षत्रं स्थितं त्वयि यदीश्वर ।
नृनारायणयुक्तोऽयं कार्यार्थः प्रतिभाति मे ॥ १४ ॥
न युक्तं जानता देव त्वया तत्वार्थदर्शिना ।
देवदेव पृथिव्यर्थे प्रयोक्तुं कार्यमीदृशम् ॥ १५ ॥
त्वं हि चक्षुष्मतां चक्षुः श्लाघ्यः प्रभवतां प्रभुः ।
श्रेष्ठो योगवतां योगी गतिर्गतिमतामपि ॥ १६ ॥
देवभागान् ‌गतान् दृष्ट्‍वा किं त्वं सर्वाश्रयो विभुः ।
वसुन्धरायाः साह्यार्थमंशं स्वं नानुयुञ्जसे ॥ १७ ॥
त्वया सनाथ देवांशास्त्वन्मयास्त्वत्परायणाः ।
जगत्यां सञ्चरिष्यन्ति कार्यात् कार्यान्तरं गताः ॥ १८ ॥
तदहं त्वरया विष्णो प्राप्तः सुरसभामिमाम् ।
तव संचोदनार्थं वै शृणु चाप्यत्र कारणम् ॥ १९ ॥
ये त्वया निहता दैत्याः संग्रामे तारकामये ।
तेषां शृणु गतिं विष्णो ये गताः पृथिवीतलम् ॥ २० ॥
पुरी पृथिव्यां मुदिता मथुरा नामतः श्रुता ।
निविष्टा यमुनातीरे स्फीता जनपदायुता ॥ २१ ॥
मधुर्नाम महानासीद् दानवो युधि दुर्जयः ।
त्रासनः सर्वभूतानां बलेन महतान्वितः ॥ २२ ॥
तस्य तत्र महच्चासीन्महापादपसंकुलम् ।
घोरं मधुवनं नाम यत्रासौ न्यवसत् पुरा ॥ २३ ॥
तस्य पुत्रो महानासील्लवणो नाम दानवः ।
त्रासनः सर्वभूतानां महाबलपराक्रमः ॥ २४ ॥
स तत्र दानवः क्रीडन् वर्षपूगाननेकशः ।
स दैवतगणाँल्लोकानुद्वासयति दर्पितः ॥ २५ ॥
अयोध्यायामयोध्यायां रामे दाशरथौ स्थिते ।
राजं शासति धर्मज्ञे राक्षसानां भयावहे ॥ २६ ॥
स दानवो बलश्लाघी घोरं वनमुपाश्रितः ।
प्रेषयामास रामाय दूतं परुषवादिनम् ॥ २७ ॥
विषयासन्नभूतोऽस्मि तव राम रिपुश्च ह ।
न च सामन्तमिच्छन्ति राजानो बलदर्पितम् ॥ २८ ॥
राज्ञा राज्यव्रतस्थेन प्रजानां हितकाम्यया ।
जेतव्या रिपवः सर्वे स्फीतं विषयमिच्छता ॥ २९ ॥
अभिषेकार्द्रकेशेन राज्ञा रञ्जनकाम्यया ।
जेतव्यानीन्द्रियाण्यादौ तज्जये हि ध्रुवो जयः ॥ ३० ॥
सम्यग् वर्तितुकाम्यस्य विशेषेण महीपतेः ।
नयानामुपदेशेन नास्ति लोकसमो गुरुः ॥ ३१ ॥
व्यसनेषु जघन्यस्य धर्ममध्यस्य धीमतः ।
फलज्येष्ठस्य नृपतेर्नास्ति सामन्तजं भयम् ॥ ३२ ॥
सहजैर्बाध्यते सर्वः प्रवृद्धैरिन्द्रियादिभिः ।
अमित्राणां प्रियकरैर्मोहैरधृतिरीश्वरः ॥ ३३ ॥
यत्त्वया स्त्रीकृते मोहात् सगणो रावणो हतः ।
नैतदौपयिकं मन्ये महद्वै कर्म कुत्सितम् ॥ ३४ ॥
वनवासप्रवृत्तेन यत् त्वया व्रतशालिना ।
प्रहृतं राक्षसानीके नैव दृष्टः सतां विधिः ॥ ३५ ॥
सतामक्रोधजो धर्मः शुभां नयति सद्‌गतिम् ।
यत्त्वया निहता मोहाद् दूषिताश्चाश्रमौकसः ॥ ३६ ॥
स एष रावणो धन्यो यस्त्वया व्रतचारिणा ।
स्त्रीनिमित्ते हतो युद्धे ग्राम्यान् धर्मानवेक्षता ॥ ३७ ॥
यदि ते निहतः संख्ये दुर्बुद्धिरजितेन्द्रियः ।
युद्ध्यस्वाद्य मया सार्धं मृधे यद्यसि वीर्यवान् ॥ ३८ ॥
तस्य दूतस्य तच्छ्रुत्वा भाषितं तत्त्ववादिनः ।
धैर्यादसम्भ्रान्तवपुः सस्मितं राघवोऽब्रवीत् ॥ ३९ ॥
असदेतत् त्वया दूत भाषितं तस्य गौरवात् ।
यन्मां क्षिपसि दोषेण वेदात्मानं च सुस्थिरम् ॥ ४० ॥
यद्यहं तत्पथे मूढो यदि वा रावणो हतः ।
यदि वा मे हृता भार्या का तत्र परिदेवना ॥ ४१ ॥
न वाङ्‌मात्रेण दुष्यन्ति साधवः सत्पथे स्थिताः ।
जागर्ति च यथा देवः सदा सत्स्वितरेषु च ॥ ४२ ॥
कृतं दूतेन यत्कार्यं गच्छ त्वं दूत मा चिरम् ।
नात्मश्लाघिषु नीचेषु प्रहरन्तीह मद्विधाः ॥ ४३ ॥
अयं ममानुजो भ्राता शत्रुघ्नः शत्रुतापनः ।
तस्य दैत्यस्य दुर्बुद्धेर्मृधे प्रतिकरिष्यति ॥ ४४ ॥
एवमुक्तः स दूतस्तु ययौ सौमित्रिणा सह ।
अनुज्ञातो नरेन्द्रेण राघवेण महात्मना ॥ ४५ ॥
स शीघ्रयानः संप्राप्तस्तद् दानवपुरं महत् ।
चक्रे निवेशं सौमित्रिर्वनान्ते युद्धलालसः ॥ ४६ ॥
ततो दूतस्य वचनात् स दैत्यः क्रोधमूर्च्छितः ।
पृष्ठतस्तद् वनं कृत्वा युद्धायाभिमुखः स्थितः ॥ ४७ ॥
तद् युद्धमभवद् घोरं सौमित्रेर्दानवस्य च ।
उभयोरेव बलिनोः शूरयो रणमूर्धनि ॥ ४८ ॥
तौ शरैः साधु निशितैरन्योन्यमभिजघ्नतुः ।
न च तौ युद्धवैमुख्यं श्रमं वाप्युपजग्मतुः ॥ ४९ ॥
अथ सौमित्रिणा बाणैः पीडितो दानवो युधि ।
ततः स शूलरहितः पर्यहीयत दानवः ॥ ५० ॥
स गृहीत्वाङ्‌कुशं चैव देवैर्दत्तवरं रणे ।
कर्षणं सर्वभूतानां लवणो विररास ह ॥ ५१ ॥
शिरोधरायां जग्राह सोऽङ्‌कुशेन चकर्ष ह ।
प्रवेशयितुमारब्धो लवणो राघवानुजम् ५२ ॥ ॥
स रुक्मत्सरुमुद्यम्य शत्रुघ्नः खड्गमुत्तमम् ।
शिरश्चिच्छेद खड्गेन लवणस्य महामृधे ॥ ५३ ॥
स हत्वा दानवं संख्ये सौमित्रिर्मित्रवत्सलः ।
तद्वनं तस्य दैत्यस्य चिच्छेदास्त्रेण बुद्धिमान् ॥ ५४ ॥
छित्त्वा वनं तत्सौमित्रिर्निवेशं सोऽभ्यरोचयत् ।
भवाय तस्य देशस्य पुर्याः परमधर्मवित् ॥ ५५ ॥
तस्मिन् मधुवनस्थाने मथुरा नाम सा पुरी ।
शत्रुघ्नेन पुरा सृष्टा हत्वा तं दानवं रणे ॥ ५६ ॥
सा पुरी परमोदारा साट्टप्राकारतोरणा ।
स्फीता राष्ट्रसमाकीर्णा समृद्धबलवाहना ॥ ५७ ॥
उद्यानवनसम्पन्ना सुसीमा सुप्रतिष्ठिता ।
प्रांशुप्राकारवसना परिखाकुलमेखला ॥ ५८ ॥
चयाट्टालककेयूरा प्रासादवरकुण्डला ।
सुसंवृतद्वारमुखी चत्वरोद्‌गारहासिनी ॥ ५९ ॥
अरोगवीरपुरुषा हस्त्यश्वरथसंकुला ।
अर्धचन्द्रप्रतीकाशा यमुनातीरशोभिता ॥ ६० ॥
पुण्यापणवती दुर्गा रत्नसंचयगर्विता ।
क्षेत्राणि सस्यवन्त्यस्याः काले देवश्च वर्षति ॥ ६१ ॥
नरनारीप्रमुदिता सा पुरी स्म प्रकाशते ।
निविष्टविषयश्चैव शूरसेनस्ततोऽभवत् ॥ ६२ ॥
तस्यां पुर्यां महावीर्यो राजा भोजकुलोद्वहः ।
उग्रसेन इति ख्यातो महासेनपराक्रमः ॥ ६३ ॥
तस्य पुत्रत्वमापन्नो योऽसौ विष्णो त्वया हतः ।
कालनेमिर्महादैत्यः संग्रामे तारकामये ॥ ६४ ॥
कंसो नाम विशालाक्षो भोजवंशविवर्धनः ।
राजा पृथिव्यां विख्यातः सिंहविस्पष्टविक्रमः ॥ ६५ ॥
राज्ञां भयङ्‌करो घोरः शङ्‌कनीयो महीक्षिताम् ।
भयदः सर्वभूतानां सत्पथाद् बाह्यतां गतः ॥ ६६ ॥
दारुणाभिनिवेशेन दारुणेनान्तरात्मना ।
युक्तस्तेनैव दर्पेण प्रजानां रोमहर्षणः ॥ ६७ ॥
न राजधर्माभिरतो नात्मपक्षसुखावहः ।
नात्मराज्ये प्रियकरश्चण्डः कररुचिः सदा ॥ ६८ ॥
स कंसस्तत्र सम्भूतस्त्वया युद्धे पराजितः ।
क्रव्यादो बाधते लोकानासुरेणान्तरात्मना ॥ ६९ ॥
योऽप्यसौ हयविक्रान्तो हयग्रीव इति स्मृतः ।
केशी नाम हयो जातः स तस्यैव जघन्यजः ॥ ७० ॥
स दुष्टो हेषितपटुः केसरी निरवग्रहः ।
वृन्दावने वसत्येको नृणां मांसानि भक्षयन् ॥ ७१ ॥
अरिष्टो बलिपुत्रश्च ककुद्मी वृषरूपधृक् ।
गवामरित्वमापन्नः कामरूपी महासुरः ॥ ७२ ॥
रिष्टो नाम दितेः पुत्रो वरिष्ठो दानवेषु यः ।
स कुञ्जरत्वमापन्नो दैत्यः कंसस्य वाहनः ॥ ७३ ॥
लम्बो नामेति विख्यातो योऽसौ दैत्येषु दर्पितः ।
प्रलम्बो नाम दैत्योऽसौ वटं भाण्डीरमाश्रितः ॥ ७४ ॥
खर इत्युच्यते दैत्यो धेनुकः सोऽसुरोत्तमः ।
घोरं तालवनं दैत्यश्चरत्युद्वासयन् प्रजाः ॥ ७५ ॥
वाराहश्च किशोरश्च दानवौ यौ महाबलौ ।
मल्लौ रङ्‌गगतौ तौ तु जातौ चाणूरमुष्टिकौ ॥ ७६ ॥
यौ तौ मयश्च तारश्च दानवौ दानवान्तक ।
प्राग्ज्योतिषे तौ भौमस्य नरकस्य पुरे रतौ ॥ ७७ ॥
एते दैत्या विनिहतास्त्वया विष्णो निराकृताः ।
मानुषं वपुरास्थाय बाधन्ते भुवि मानुषान् ॥ ७८ ॥
त्वत्कथाद्वेषिणः सर्वे त्वद्‌भक्तान् घ्नन्ति मानुषान् ।
तव प्रसादात् तेषां वै दानवानां क्षयो भवेत् ॥ ७९ ॥
त्वत्तस्ते बिभ्यति दिवि त्वत्तो बिभ्यति सागरे ।
पृतिव्यां तव बिभ्यन्ति नान्यतस्तु कदाचन ॥ ८० ॥
दुर्वृत्तस्य हतस्यापि त्वया नान्येन श्रीधर ।
दिवश्च्युतस्य दैत्यस्य गतिर्भवति मेदिनी ॥ ८१ ॥
व्युत्थितस्य च मेदिन्यां हतस्य नृशरीरिणः ।
दुर्लभं स्वर्गगमनं त्वयि जाग्रति केशव ॥ ८२ ॥
तदागच्छ स्वयं विष्णो गच्छामः पृथिवीतलम् ।
दानवानां विनाशाय विसृजात्मानमात्मना ॥ ८३ ॥
मूर्तयो हि तवाव्यक्ता दृश्यादृश्याः सुरोत्तमैः ।
तासु सृष्टास्त्वया देवाः सम्भविष्यन्ति भूतले ॥ ८४ ॥
तवावतरणे विष्णो कंसः स विनशिष्यति ।
सेत्स्यते च स कार्यार्थो यस्यार्थे भूमिरागता ॥ ८५ ॥
त्वं भारते कार्यगुरुस्त्वं चक्षुस्त्वं परायणम् ।
तदागच्छ हृषीकेश क्षितौ ताञ्जहि दानवान् ॥ ८६ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
नारदवाक्ये चतुःपञ्चाशत्तमोऽध्यायः


नारदवाक्यवर्णन -

वैशंपायन सांगतात : - पुढें कोणती कामगिरी करावयाची याबद्दलचीं वाटघाट पुरी होऊन तो काळ जातांच सर्व देवांनीं आपआपल्या अधिकारानुरूप भारतकुलामध्यें अंशावतरण करून ( पांडवरूपानें ) धर्म, इंद्र, वायु, दोघे देववैद्य अश्विर्नौदेव व सूर्य हे प्रकट झाले. देवांचा पुरोहित बृहस्पति द्रोणाचार्यांच्या रूपानें पाण्डवांपूर्वीच प्रकट झाला. तसाच अष्टवसुंतील आठवा हा भीष्मरूपानें अगोदरच धरणीतलावर अवतीर्ण झाला होता. त्याचप्रमाणें विदुररूपानें मृत्यूचाअंश, दुर्योधन- रूपानें कलीचा अंश, भूरिश्रव्याच्या रूपानें शुक्राचा, अभिमन्युच्या रूपानें सोमाचा, श्रुतायुधाचे रूपानें वरुणाचा, अश्वत्थामाचे रूपानें शंकराचा, कणिकाच्या रूपानें मित्राचा, धृतराष्ट्राच्या रूपानें कुबेराचा व देवक, उग्रसेन, दुःशासन, इत्यादिकांच्या रूपांनीं गंधर्व, उरग, यक्ष यांचे अंश गगनांतून खालीं येऊन धरणीतलावर प्रकट झाले असतां नारायण परमात्म्याच्या अंशरूपानें सदैव असणारा नारदमुनि देवसभेंत प्राप्त झाला. या नारदमुनीची अंगकान्ति जळत्या अग्नीप्रमाणें जाज्वल्य असून त्याची दृष्टि बालसूर्याप्रमाणे तेजस्वी होती. मस्तकी डाव्या बाजूनें फिरविलेंलें असें विपुल जटांचें मंडळ होतें.

अंगावर चंद्रकिरणाप्रमाणें शुभ्र वस्त्रें असून सुवर्णाचीं भूषणें होतीं. एखाद्या प्रिय सखीसारखी बगलेला चिकटून वीणा घेतली होती. उत्तरीयाला जोडून एक कृष्णाजिन होतें व एक सुवर्णाचें यज्ञोपवीत होतें. हातीं दंडकमंडलु असून अधिकारानें तो केवळ इंद्राप्रमाणें दिसत होता. कोणाची कोठेंही आणि कितीही गुप्त गोष्ट असो, ती फोडण्यांत स्वारीचा हातखंडा असे; व ज्याप्रमाणें आकाशांत धूमकेतु दिसला म्हणजे कांहीतरी अनर्थ होणार असें अनुमान काढितात त्याचप्रमाणें या मुनींची मूर्ति कोठेंही गेली कीं, तेथें लवकरच कांहीं कलागत होणार असें समजलें जात असे. तो चारही वेदांचा पाठ करीत असून आद्य ऋत्विजांपैकी उद्गाता होता. त्याची महर्षीत गणना असून तो मोठा ज्ञाता व गायनकलेंत निपुण होता. त्या ब्राह्मणाला भांडणाची फार आवड; पक्का कण्या टाकून कोंबडी झुजविणारा. कोणाही दोन पक्षांत वैमनस्य येऊन झोंबी सुरू झाली कीं, या बहाद्दराला मौज वाटावयाची. किंबहुना हा ब्रह्मदेवाचा पुत्र दुसरा मूर्तिमान्‌ कलीच होता. देव आणि गंधर्व मंडळींतील हाच महामुनी आदिवक्ता. असा हा ब्रह्मर्षि नारद अक्षय ब्रह्मलोकांत फिरत असतां या वेळीं देवसभेंत येऊन व्याकुलतेनें विष्णूस म्हणाला,' हे विष्णो, पृथ्वीवरील राजांचा संहार करण्याच्या उद्देशानें देवांनीं आपआपलें अंशावतरण भूल्रोकी केलें आहें; परंतु, माझ्या समजुतीने तें सर्व व्यर्थ आहे. कारण, मला असें वाटतें कीं, पृथ्वीवरील हें सर्व क्षत्रियमंडळ तुझ्या आधारावर उभें आहे; आणि याकरितां याचा संहार करणें ही कामगिरी तुम्हां नरनारायणांनाच योग्य असें मला दिसतें. हे देवाधिदेवा, तुला प्रत्येक गोष्टींतलें खरें तत्त्व कोणतें हें बरोबर दिसत असतें. हें जर खरें आहे तर, हे देवा, तुझ्यासारख्या जाणत्यानें बिचाऱ्या पृथ्वीची असली महत्वाची कामगिरी इतरेजनांवर परस्पर टोलवून द्यावी हें योग्य नाहीं. कारण, हे देवा, सर्व डोळसांचा डोळा तूं, समर्थांचें श्र्लाघ्य सामर्थ्य तूं. योगयुक्तांत श्रेष्ठयोगी तूं व गतिमंतांची गति तूं. अरे, तूं मोठा समर्थ व सर्वांचा आधार, असें असतां इतर देवमंडळींनीं पृथ्वीकरितां आपआपले अंश खालीं पाठविलेले तूं पाहात असतांही तिचे साह्यार्थ तूं आपला अंश पाठवीत नाहीस हें कसें? अरे, तुझे पाठबळ असेल तर त्या देवांशांना जोर येईल. कारण, त्या देवांशांचे सर्वस्व काय तें तूंच आहेस. तूं प्रेरक पाठीशीं असलास म्हणजे हे देवांश धरणीतलावर एक कामगिरी संपवून दुसरी, दुसरी संपवून तिसरी, अशा रीतीनें तूं म्हणशील तितकी कामगिरी करितील, ( परंतू पाठीशी तूं पाहिजेस ) व ही गोष्ट ध्यानी आणूनच, हे विष्णो, तुझी उठावणी करण्याकरितां मी इतक्या लगबगीनें देवसभेत आलों आहें. शिवाय माझ्या येण्यांत दुसरा एक मुद्दा आहे. तूं मागें तारकायुद्धांत जे जे दैन्य मारिलेस त्यांपैकी जे कोणी पुनः पृथ्वीवर गेले त्यांची हकीकत काय झाली ती तुला सांगतों, ऐक.

पृथ्वीवर यमुनानदीचे तीरीं वसलेली मोठी संपन्न व दाट वसतीची अशी मथुरा नांवानें प्रसिद्ध आनंददायक नगरी आहे. ( ही मधुवनांत असून शत्रूघ्नानें वसविली आहे. ) या नगरीचे ठिकाणीं पूर्वी मधुवन नांवाचें घोर अरण्य होतें. या अरण्यांत मोठमोठाल्या जुनाट वृक्षांची अतिशय गर्दी असून तेथें मधु नांवाचा एक मोठा दुजिंक्य दानव रहात असे. हा मोठा बलाढ्य असून प्राणिमात्राला त्रास देणारा होता. या मधुला लवण नांवाचा पुत्र होता. हाही सर्वपरी बापाचीच प्रतिमा होता. हा दानव त्या मधुवनांत अनेक वर्षे खेळ खेळत होता. त्यानें आपल्या अंगमस्तीनें कित्येक दैवतांना आणि लोकांना उठवून लाविलें. या दानवाच्या वेळीं अजिंक्य अशा अयोध्या नगरींत राक्षसांना कंप देणारा असा दशरथपुत्र धर्मज्ञ रामराजा राज्य करीत होता. लवणाला आपल्या बलाची फारच घमेंड चढली होती. तेव्हां त्यानें आपल्या वसतीच्या त्या घोर मधुवनांतून रामाकडे चरचरीत निरोप सांगणारा असा एक दूत पाठविला, व त्या दूताबरोबर असा निरोप दिला कीं, हे रामा, मी तुझा वैरी असून तुझ्या प्रांताला अगदीं लागून आहें. खरे राजे आहेत ते आपल्या आसपास असला मजसारखा शक्तीची घमेंड करणारा शत्रू टिकूं देत नाहींत. तूं आपणास राजा म्हणवीत असून राज्य करण्याचें कंकण बांधिलें आहेस.

तर प्रजेचें हित होऊन आपणास समृद्ध असें राज्य असावें अशी तुला ज्या अर्थी इच्छा आहे त्या अर्थीं तूं प्रथम मजसारखे रिपु जिंकून टाकावेस. प्रजेकडून अभिषेक करवून घेऊन राजा म्हणवून घेण्याची हौस वाटते, तर अशानें परत प्रजेलाही खूष ठेविलें पाहिजे, आणि असें करणें तर आपले अभिषेकाचे केंस पुरे वाळले नाहीं तोच आपली इंद्रियें ताब्यांत घेण्याचा अभ्यास केला पाहिजे. कारण, आधीं इंद्रियजय करावा तेव्हां मग खात्रीनें शत्रूवर जय मिळतो. ज्या कोणाला लोकांत आपण नीट वर्ताव करावा असें वाटत असेल अशा प्रत्येकानें, आणि त्यातूनही विशेषत: राजानें कर्तव्य कोणतें, अकर्तव्य कोणतें हें पुस्तकांतून शिकत बसण्यापेक्षां दुनियेंतच ठेंचा खाऊन शहाणें व्हावें. कारण, असल्या गोष्टी पक्क्या शिकविण्याला जनतेसारखा दुसरा उंची गुरू नाहीं. ज्या राजाची सैन्यासंबंधी बळकटी पहिल्या प्रतीची असून त्याचे खालोखाल धर्माची बळकटी आहे, व द्यूतादि व्यसनाविषयीं ज्याला सर्वीत कमी आदर वाटतो अशा बुद्धिमान्‌ राजाला आसपासच्या शत्रूंपासून भय बाळगण्याचें कारण नाही. ज्या राजाचे ठिकाणी आपलें मन ताब्यांत ठेवण्याचें धारिष्ट नाहीं अशा प्रत्येक राजाला ( बाह्य शत्रूंपेक्षां ) जन्मत: प्रत्येकाच्या बरोबर जन्मलेले, जे मनाला मोह घालणारे आणि अम्यासानें फाजील लाडावलेले इंद्रियरूप शत्रु हेच खरे घातक असतात. हे त्याचें अहित करून त्याच्या शत्रूंचें कल्याण करीत असतात. हे रामा, तूं व्रतस्थ असूनही तुझी बायको रावणानें नेताच तुला भूल पडून तूं आपलें व्रत विसरून यःकश्चित् स्त्रीसाठीं सपरिवार रावणाचा वध केलास. हें तु्झें करणें माझे मतें राजनीतीला धरून नव्हे. छे, हें कितीही मोठ्या शीर्याचें असलें तरी केवळ निंद्यच हें. तूं वनवासांत असून व्रतस्थ असतांही राक्षससैन्यावर हत्यार धरिलेंस खरें; पण जे खरे सज्जन आहेत ते असें आचरण करितांना आढळत नाहींत. खऱ्या सज्जनांचा धर्म म्हणजे क्रोधराहित्य किंवा शान्ति हाच होय, व यानेच ते सद्गतीला जातात. परंतु, तूं स्त्रीमोहास्तव खरा धर्म विसरून हत्त्या केलीस आणि आपल्या उदाहरणानें त्या बिचाऱ्या आश्रमवासी तपस्व्यांनाही कलंक लाविलास. खरोखरच एखाद्या प्राकृताप्रमाणें विषयलंपट होऊन, केवळ स्त्रीसाठीं तिला हरण करून नेणाऱ्या रावणाला, तूं व्रतस्थ असतां त्या कालांत मारिलेंस ( याने तुझा कमीपणा झाला ); परंतु, रावण धन्य झाला असें मी समजतों. बाकी तूं युद्धांत रावणाला मारिलेंस म्हणून तुला शूरत्वाची घमेंड नको; कारण, रावण हा दुष्टबुध्दी व अजितेंद्रिय असल्यामुळे वस्तुतः तो आपल्या मरणानेंच मेला. तुझे अंगीं खरेंच सामर्थ्य असेल तर आज माझ्याशी रणांत गांठ घाल म्हणजे पाहूं."

याप्रमाणे त्या दूताच्या मुखांतून तें कठोर पांडित्य ऐकूनही रामाचें मन सहन धैर्यामुळें न गडबडतां त्यानें हसतच उत्तर केलें कीं, " हे दूता, तूं आपण निर्भय आहों असें समजून आपल्या धन्याची थोरवी गाण्याकरितां मला दोष देण्यास कबूल झालास हें मात्र तूं खोटें काम केलेंस. क्षनें माझी बायको उपटली व ( तूं म्हणतोस त्याप्रमाणें ) तिच्या मोहानें मी भल्यांचा मार्ग सोडून रावणाला ठार केलें. हें जरी खरें असलें तरी त्याबद्दल तुला येवढी ऊर बडवून घेण्याची पाळी कां आली? जे खरे खरे सदाचणी आहेत असले सज्जन वृथा वाणीनें देखील दुसऱ्याला दुखवीत नाहींत. कारण, ते असें समजतात कीं, देव जो आहे तो सज्जनांच्या प्रमाणेंच इतरांच्याही हृदयांत आहे. असो, हे दूता, तुझी कामगिरी तूं केलीस. आतां तूं परत जा. विलंब लावूं नको. ( तुझा धनी मला युद्धार्थ बोलावितो खरा परंतु, ) तुझ्या धन्यासारखे आपली आपणच स्तुति करणारे जे आहेत अशांवर मजसारखे शस्त्र धरीत नसतात. हा माझा धाकटा भाऊ शत्रुघ्न आहे. हाही शत्रूला त्राहि त्राहि करून सोडणाराच आहे. हा तुझ्या त्या दुष्टबुद्धि दैत्याचें संग्रामांत गांठून उट्टें काढील. याला घेऊन जा."

याप्रमाणे महात्म्या रामराजानें निरोप देतांच शत्रुघ्नाला बरोबर घेऊन तो दूत परतला. बरोबरील वाहन चपल असल्यामुळें तो अल्पकालांतच त्या दानवाच्या विस्तीर्ण मधुवनांत जाऊन पोहोंचला. तेथें जाताच युध्देच्छेनें शत्रुघ्नानें त्या वनाच्या सरहद्दीवरच तळ दिला. इतक्यांत त्या दूतानें वार्ता कळवितांच तो दैत्य अंगांत क्रोध मावेनासा होऊन युद्धार्थ चालून आला, आणि सर्व वन पाठीशीं घालून त्या स्थळीं युद्धाला उभा राहिला. मग शत्रुघ्न आणी तो लवण या उभयतां शूर आणि बलाढ्य वीरांचे त्या रणभूमीवर मोठेंच युद्ध झालें. ते उभयतांही एकमेकांना अति तीक्ष्ण अशा बाणांनी सारखे प्रहार करीत होते. परंतु, त्यांतून एकही युद्धांतून तोंड फिरवीना किंवा दमेना. शेवटीं शत्रु्घ्नाच्या बाणांपुढे जर्जर होऊन तो दानव त्यावेळीं त्याचा आवडता शूल हातीं नसल्यामूळे हरण्याच्या बेतांत आला. पण इतक्यांत त्यानें त्याला देवांनी वरदानपूर्वक दिलेला सर्व प्राण्यांचे आकर्षण करणारा असा आपला अंकुश हाती घेऊन प्रचंड आरोळी ठोकिली. आणि त्या अंकुशाचा आंकडा शत्रूघ्नाच्या मानेला घालून त्याला ओढूं लागला व तो अंकुश शत्रूघ्नाच्या मानेंत घुसवून त्याला तो खालीं पाडणार इतक्यांत शत्रुघ्नानें सोन्याची मूठ बसविलेला असा एक उत्तम खड्‌ग घेऊन त्यानें लवणाची मान उडविली. नंतर त्या मित्रवत्सल शत्रुघ्नानें आपल्या अस्त्रानें त्या दैत्याचे वसतीचें तें सर्व वन तोडून टाकून तेथें वसाहत करण्याचें मनांत आणिलें आणि त्या देशाचा उदय होण्यासाठीं त्या धर्मवेत्त्या सुमित्रा पुत्रानें त्या मधुवनांत मथुरा नांवाची एक राजधानी निर्माण केली.

याप्रमाणें शत्रुघ्नानें लवण दानवाला मारून निर्माण केलेली ही मथुरा नगरी फारच शोभिवंत होती. तिला सभोवार उंच तटबंदी असून मोठमोठ्या नगरवेशी होत्या. तिच्या पोटांत लहान लहान अनेक खेडीं असून ती एकंदरींत मोठी विस्तीर्ण व बल आणि वाहनें यांनीं संपन्न होतीं. त्या नगरीची मांडणी फार रेखलेली असून तिच्या चतु: सीमाही स्पष्ट आंखलेल्या होत्या. वनोपवनांनीं ती संपन्न असून तिजभोंवतील तटबंदी हेंच कोणी वस्त्र तिनें वेढिलें होतें, व त्या तटबंदीभोंवतालची जी परिखा ( खंदक) तोच त्या वस्त्रावरून कमर पट्ट्याचा वेढा होता. विटेबंदी, उंच उंच मांड्या, हींच तिचीं बाहु-भूषणें व राजमंदिरें हींच तिचीं कुंडलें. तिच्या गांववेशी मोठ्या बंदोबस्ताच्या असून तिजमधील ठिकठिकाणचे रस्त्यांतील चौक इतके प्रशस्त होते कीं, त्यांचे रूपानें ती हसतेच कीं काय असें वाटे. युद्धोपयोगी हत्ती, घोडे, रथ यांची तिच्यांत गर्दी असून तीमधील शिपायांना दुखणें कधीं माहीत नसे.

ती यमुनेचे कांठीं अर्धचंद्राकार वसली असून यमुनेचे सान्निध्यानें तिला फारच शोभा आली होती. शत्रूचा तिच्यांत रिघाव होत नसे. असा तेथील बंदोबस्त कडेकोट असल्यामुळें तिच्यांत व्यापारउदीमही फार जोरानें चालत असून तेथील सराफ्यांत व लोकांजवळ रत्नें तर इतकीं असत कीं, त्या बद्दल त्यांना गर्वच वाटे. अशी संपत्ति असून तिच्या परिघांत पुण्यस्थानेंही बरींच होतीं. पर्जन्यही वेळचे वेळीं पडत असल्यानें तीमधील नरनारी सर्वदा आनंदांत असून ती नगरी जशी चमकून राहिली होती.

अशा या शत्रुघ्नाने स्थापिलेल्या मथुरा नगरींत एके काली उग्रसेन नांवाचा एक भोजवंशीय राजा राज्य करीत होता. हा मोठा वीर्यवान् असून पराक्रमानें कार्तिकेयाप्रमाणें होता; आणि त्याची सेनाही मोठी शूर होती. हे विष्णो, तूं पूर्वी तारकायुद्धांत कालनेमी नांवाचा महादैत्य मारिलास तोच सांप्रत भोजवंशाची वृद्धि करण्याकरितां या उग्रसेनाचे पोटीं येऊन कंस या नांवानें प्रसिद्ध झाला आहे. याचे नेत्र विशाल असून याचा पराक्रम सिंहाप्रमाणें प्रसिद्ध आहे. राजांना हा मोठा भयंकर वाटत असून ते त्याला सर्वदा चपापून असतात. तो एकंदरींत सर्व प्राण्यांनाच भय देणारा असून बऱ्या मार्गापासून फारच दूर झुकला आहे. त्याचा निश्चय मोठा कडक असून तो मनाचा फार निर्दय आहे, व या आपल्या गुणांबद्दल त्याला मोठा गर्व वाटत असतो. त्याला पाहून त्याच्या प्रजेच्या अंगावर तर थरारून कांटा उभा रहातो. राजधर्म तो कधींच पाळीत नाहीं व स्वत: त्याच्या राजधानींत त्याच्या पक्षाच्या लोकांना देखील त्यापासून सुख होत नाही. तो सदान्‌कदा कोपास चढला असून तंटे उकरून काढीत असतो. असा हा तूं पुर्वी कालनेमि-रूपानें पराजित केलेला व मांसभक्षक राक्षस कंसरूपानें प्रकट झाला असून आपल्या राक्षसी वृत्तीनें लोकांना पीडा देत आहे. त्याचप्रमाणें पूर्वजन्मीं अश्वाप्रमाणें बळकट जो हयग्रीव नांवाचा दैत्य होता तो याच कंसाचा केशि नामक धाकटा भाऊ झाला आहे. हा दुष्ट केशी अश्वाचें रूप घेऊन वृंदावनांत वसती धरून आहे. त्याची आयाळ मोठी भरदार असून तो अक्षयीं खिंकाळत असतो व त्याला कोणी नियंता नसल्यानें तो येत्याजात्या माणसांच्या मांसाचे लचके तोडीत असतो. तिसरा, बलीचा पुत्र अरिष्ट. हा महासुर वाटेल तें रूप घेऊं शकतो. सांप्रत याने मोठ्या सांडाचें रूप घेतलें असून त्याचें वशिंड फारच मोठें आहे व हा इतका मस्त आहे कीं, हा गाईंना एक काळच होऊन राहिला आहे. दानवांत श्रेष्ठ असा जो दितीचा रिष्ट नांवाचा पुत्र त्यानें हत्तीचें रूप घेतलें असून तो हल्ली कंसाच्या स्वारीला असतो. पूर्वजन्मीचा मोठा गुर्मीदार जो लंब नामक दैत्य तो या जन्मीं प्रलंब नांवानें प्रसिद्ध होऊन भांडीर नामक वटाखालीं असतो.

पूर्वीचा जो खर तो या जन्मीं धेनकासुर झाला असून मोठ्या तालवनांत असतो व प्रजेला फार उत्साह देतो. पूर्वींचे वाराह व किशोर-नामक जे महाबलाढ्य दानव ते चाणुर व मुष्टिक नांवांचे मल्ल झाले असून सदा आखाड्यांत पडून असतात. याशिवाय, हे दानवांतका, मय व तार नांवांचे दोघे दानव ते सांप्रत भूमिपुत्र जो नरकासुर त्याच्या प्राग्जोतिष नामक पुरांत दडून असतात.

हे विष्णो, तूं पूर्वी एकदा मारून नाहीसे केलेले हे सर्व दैत्य सांप्रत मनुष्यरूप घेऊन या प्रकारें भूमीवर मनुष्यांना त्रास देत आहेत. सर्वांनाही तुझ्या नांवाची मोठी चीड असून कोणीही तुझे भक्त आढळले कीं, अशा मनुष्यांना ते ठार मारितात. तेव्हां अशा य दानवांचा क्षय पुन: तरी तुझ्याच हातून झाला पाहिजे. कारण, स्वर्गात, धरणीवर किंवा समुद्रांत-कोठें झालें तरी ते तुला तेवढे भितात; इतर कोणालाही भीक घालीत नाहीत. हे श्रीधरा, कोणीही जीव कितीही दुर्वृत्त असो, त्याला जर एकवार तूं स्वहस्तें मारून स्वर्गांतून धरणीवर लाविलें आहेस, तर त्याची पुनरपीही व्यवस्था लावणें ती तुजवाचून या धरणीवर अन्य कोणी लावूं शकत नाहीं. कारण, हे केशवा, तू प्रत्येक गोष्ट दक्षतेनें पाहात असल्यामुळें तुझे हातून जो कोणी प्राणी एकवार वध पावून या भूलोकी मनुष्य- शरीर घेऊन उठला, त्याला तुजवांचून पुन-रपि स्वर्गास जातां येणार नाहीं. याकरिता हे विष्णो, चल. आपण भूतलीं जाऊं, आणि दानवांचा संहार करण्याकारितां तूं आपणाला निर्माण कर. शिवाय, देवांनाही कांहीं दृश्य व कांहीं अदृश्य अशीं तुझी रूपें आहेत. अशा तुझ्या रूपांत तूंच या देवांचा प्रवेश करून दिलास म्हणजे त्या त्या रूपानें ते प्रकट होतील. एवंच, हे विष्णो, तूं अवतीर्ण झालास म्हणजे कंसाचा नाश होईल आणि जो हेतु मनांत धरून पृथ्वी तुजकडे आली होती तोही सिद्धीस जाईल. या भारतवर्षांत असली कोणतीही अवचट कामगिरी करणें झालें म्हणजे ती करणारा तूंच एक आहेस. तूंच सर्वांचा डोळा असून सर्वांचा आश्रयही तूच आहेस याकरितां, हे हृषीकेशा, मजबरोवर धरणीवर चल व दानवांचा संहार कर."


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
विष्णुं प्रति देवर्षेर्वाक्यं नाम चतुःपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५४ ॥
अध्याय चोपन्नावा समाप्त

GO TOP