| 
 
 श्रीहरिवंशपुराण  हरिवंश पर्व
 पञ्चपञ्चाशत्तमोऽध्यायः
 
 ब्रह्मवाक्यम् 
वैशंपायन उवाचनारदस्य वचः श्रुत्वा सस्मितं मधुसूदनः ।
 प्रत्युवाच शुभं वाक्यं वरेण्यः प्रभुरीश्वरः ॥ १ ॥
 त्रैलोक्यस्य हितार्थाय यन्मां वदसि नारद ।
 तस्य संयक्प्रवृत्तस्य श्रूयतामुत्तरं वचः॥ २ ॥
 विदिता देहिनो जाता मयैते भुवि दानवाः ।
 यां च यस्तनुमादाय दैत्यः पुष्यति विग्रहम् ॥ ३ ॥
 जानामि कंसं संभूतमुग्रसेनसुतं भुवि ।
 केशिनं चापि जानामि दैत्यं तुरगविग्रहम् ॥ ४ ॥
 नागं कुवलयापीडं मल्लौ चाणूरमुष्टिकौ ।
 अरिष्टं चापि जानामि दैत्यं वृषभरूपिणम् ॥ ५ ॥
 विदितो मे खरश्चैव प्रलम्बश्च महासुरः ।
 सा च मे विदिता विप्र पूतना दुहिता बलेः ॥ ६ ॥
 कालियं चापि जानामि यमुनाह्रदगोचरम् ।
 वैनतेयभयाद् यस्तु यमुनाह्रदमाविशत् ॥ ७ ॥
 विदितो मे जरासन्धः स्थितो मूर्ध्नि महीक्षिताम् ।
 प्राग्ज्योतिषपुरे वापि नरकं साधु तर्कये ॥ ८ ॥
 मानुषे पार्थिवे लोके मानुषत्वमुपागतम् ।
 बाणं च शोणितपुरे गुहप्रतिमतेजसम् ॥ ९ ॥
 दृप्तं बाहुसहस्रेण देवैरपि सुदुर्जयम् ।
 मय्यासक्तां च जानामि भारतीं महतीं धुरम् ॥ १० ॥
 सर्वं तच्च विजानामि यथा यास्यन्ति ते नृपाः ।
 क्षयो भुवि मया दृष्टः शक्रलोके च सत्क्रिया ।
 एषां पुरुषदेहानामपरावृत्तदेहिनाम् ॥ ११ ॥
 संप्रवेक्ष्याम्यहं योगमात्मनश्च परस्य च ।
 संप्राप्य पार्थिवं लोकं मानुषत्वमुपागतः ॥ १२ ॥
 कंसादींश्चापि तान् सर्वान् वधिष्यामि महासुरान् ।
 तेन तेन विधानेन येन यः शान्तिमेष्यति ॥ १३ ॥
 अनुप्रविश्य योगेन तास्ता हि गतयो मया ।
 अमीषां हि सुरेन्द्राणां हन्तव्या रिपवो युधि ॥ १४ ॥
 जगत्यर्थे कृतो योऽयमंशोत्सर्गो दिवौकसैः ।
 सुरदेवर्षिगन्धर्वैरितश्चानुमते मम ॥ १५ ॥
 विनिश्चयो हि प्रागेव नारदायं कृतो मया ।
 निवासं ननु मे ब्रह्मन् विदधातु पितामहः ॥ १६ ॥
 यत्र देशे यथा जातो येन वेषेण वा वसन् ।
 तानहं समरे हन्यां तन्मे ब्रूहि पितामह ॥ १७ ॥
 ब्रह्मोवाच
 नारायणेमं सिद्धार्थमुपायं शृणु मे विभो ।
 भुवि यस्ते जनयिता जननी च भविष्यति ॥ १८ ॥
 यत्र त्वं च महाबाहो जातः कुलकरो भुवि ।
 यादवानां महद् वंशमखिलं धारयिष्यसि ॥ १९ ॥
 तांश्चासुरान् समुत्पाट्य वंशं कृत्वाऽऽत्मनो महत् ।
 स्थापयिष्यसि मर्यादां नृणां तन्मे निशामय ॥ २० ॥
 पुरा हि कश्यपो विष्णो वरुणस्य महात्मनः ।
 जहार यज्ञिया गा वै पयोदास्तु महामखे ॥ २१ ॥
 अदितिः सुरभिश्चैते द्वे भार्ये कश्यपस्य तु ।
 प्रदीयमाना गास्तास्तु नैच्छतां वरुणस्य वै ॥ २२ ॥
 ततो मां वरुणोऽभ्येत्य प्रणम्य शिरसा ततः ।
 उवाच भगवन् गावो गुरुणा मे हृता इति ॥ २३ ॥
 कृतकार्यो हि गास्तास्तु नानुजानाति मे गुरुः ।
 अन्ववर्तत भार्ये द्वे अदितिं सुरभिं तथा ॥ २४ ॥
 मम ता ह्यक्षया गावो दिव्याः कामदुहः प्रभो ।
 चरन्ति सागरान् सर्वान् रक्षिताः स्वेन तेजसा ॥ २५ ॥
 कस्ता धर्षयितुं शक्तो मम गाः कश्यपादृते ।
 अक्षयं या क्षरन्त्यग्र्यं पयो देवामृतोपमम् ॥ २६ ॥
 
 
प्रभुर्वा व्युत्थितो ब्रह्मन् गुरुर्वा यदि वेतरः । त्वया नियम्याः सर्वे वै त्वं हि नः परमा गतिः ॥ २७ ॥
 यदि प्रभवतां दण्डो लोके कार्यमजानताम् ।
 न विद्यते लोकगुरो न स्युर्वै लोकसेतवः ॥ २८ ॥
 यथा वास्तु तथा वास्तु कर्तव्ये भगवन् प्रभुः ।
 मम गावः प्रदीयन्तां ततो गन्तास्मि सागरम् ॥ २९ ॥
 या आत्मदेवता गावो या गावः सत्त्वमव्ययम् ।
 लोकानां त्वत्प्रवृत्तानामेकं गोब्राह्मणं स्मृतम् ॥ ३० ॥
 त्रातव्याः प्रथमं गावस्त्रातास्त्रायन्ति ता द्विजान् ।
 गोब्राह्मणपरित्राणे परित्रातं जगद् भवेत् ॥ ३१ ॥
 इत्यम्बुपतिना प्रोक्तो वरुणेनाहमच्युत ।
 गवां करणतत्त्वज्ञः कश्यपे शापमुत्सृजम् ॥ ३२ ॥
 येनांशेन हृता गावः कश्यपेन महर्षिणा ।
 स तेनांशेन जगति गत्वा गोपत्वमेष्यति ॥ ३३ ॥
 या च सा सुरभिर्नाम अदितिश्च सुरारणिः ।
 तेऽप्युभे तस्य भार्ये वै तेनैव सह यास्यतः ॥ ३४ ॥
 ताभ्यां च सह गोपत्वे कश्यपो भुवि रंस्यते ।
 स तस्य कश्यपस्यांशस्तेजसा कश्यपोपमः ॥ ३५ ॥
 वसुदेव इति ख्यातो गोषु तिष्ठति भूतले ।
 गिरिर्गोवर्धनो नाम मथुरायास्त्वदूरतः ॥ ३६ ॥
 तत्रासौ गोषु निरतः कंसस्य करदायकः ।
 तस्य भार्याद्वयं जातमदितिः सुरभिश्च ते ॥ ३७ ॥
 देवकी रोहिणी चेमे वसुदेवस्य धीमतः ।
 सुरभी रोहिणी देवी चादितिर्देवकी त्वभूत् ॥ ३८ ॥
 तत्र त्वं शिशुरेवादौ गोपालकृतलक्षणः ।
 वर्धयस्व महाबाहो पुरा त्रैविक्रमे यथा ॥ ३९ ॥
 छादयित्वाऽऽत्मनात्मानं मायया योगरूपया ।
 तत्रावतर लोकानां भवाय मधुसूदन ॥ ४० ॥
 जयाशीर्वचनैस्त्वैते वर्धयन्ति दिवौकसः ।
 आत्मानमात्मना हि त्वमवतार्य महीतले ॥  ४१ ॥
 देवकीं रोहिणीं चैव गर्भाभ्यां परितोषय ।
 गोपकन्यासहस्राणि रमयंश्चर मेदिनीम् ॥ ४२ ॥
 गाश्च ते रक्षतो विष्णो वनानि परिधावतः ।
 वनमालापरिक्षिप्तं धन्या द्रक्ष्यन्ति ते वपुः ॥ ४३ ॥
 विष्णौ पद्मपलाशाक्षे गोपालवसतिं गते ।
 बाले त्वयि महाबाहो लोको बालत्वमेष्यति ॥ ४४ ॥
 त्वद्भक्ताः पुण्डरीकाक्ष तव चित्तवशानुगाः ।
 गोषु गोपा भविष्यन्ति सहायाः सततं तव ॥ ४५ ॥
 वने चारयतो गाश्च गोष्ठेषु परिधावतः ।
 मज्जतो यमुनायां च रतिं प्राप्स्यन्ति ते त्वयि ॥ ४६ ॥
 जीवितं वसुदेवस्य भविष्यति सुजीवितम्  ॥
 यस्त्वया तात इत्युक्तः स पुत्र इति वक्ष्यति ॥ ४७ ॥
 अथ वा कस्य पुत्रत्वं गच्छेथाः कश्यपादृते  ॥
 का च धारयितुं शक्ता त्वां विष्णो अदितिं विना ॥ ४८ ॥
 योगेनात्मसमुत्थेन गच्छ त्वं विजयाय वै ।
 वयमप्यालयान् स्वान् स्वान् गच्छामो मधुसूदन ॥ ४९ ॥
 वैशंपायन उवाच
 स देवानभ्यनुज्ञाय विविक्ते त्रिदिवालये ।
 जगाम विष्णुः स्वं देशं क्षीरोदस्योत्तरां दिशम् ॥ ५० ॥
 तत्र वै पार्वती नाम गुहा मेरोः सुदुर्गमा ।
 त्रिभिस्तस्यैव विक्रान्तैर्नित्यं पर्वसु पूजिता ॥ ५१ ॥
 पुराणं तत्र विन्यस्य देहं हरिरुदारधीः ।
 आत्मानं योजयामास वसुदेवगृहे प्रभुः ॥ ५२ ॥
 इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
 पितामहवाक्ये पञ्चपञ्चाशत्तमोऽध्यायः
 हरिवंशे हरिवंशपर्व समाप्तम्
 
 
 
 ब्रह्मवाक्यवर्णन  - 
वैशंपायन सांगतात : - नारदाची ही वकिली ऐकून मधुसूदनाला हंसूं आलें. मग संसारी व मुमुक्ष या उभयांसही सारखाच प्रिय वाटणारा तो समर्थ परमेश्वर नारदाला शुभ वाणीनें म्हणाला, " हे नारदा, तू त्रैलोक्याच्या हितासाठीं म्हणून जी मला विनंती केलीस ती फार समर्पक आहे. आतां तिचें उत्तर काय तें ऐक. मला ही गोष्ट माहीतच आहे कीं, मी पूर्वी मारिलेले दानव सांप्रत भूलोकीं देहधारी झाले आहेत. त्याचप्रमाणें कोण दैत्य कोणतें रूप घेऊन वैर माजवीत आहे तेंही मी जाणून आहें. कंस हा भूलोकीं उग्रसेनाचा पुत्र झाला आहे, हें मी जाणतों. तसेंच केशी दैत्यानें घोड्याचें रूप घेतलें आहे हेंही मी समजतों. हल्लींचा कुवलयापीड हत्ती हा कोण, तसेच चाणुर-मुष्टिक जेठी कोण, हेंही मला अवगत आहे. अरिष्टानें वृषभाचें रूप घेतलें आहे ही मला खबर आहे. त्याचप्रमाणे खर व प्रलंब महासुर यांनाही मी ओळखितों आहें आणि, हे ब्राह्मणा, ही जी पूतना ही बलीची कन्या आहे, याचीही मला याद आहे. याच प्रकारें गरुडाच्या भयानें यमुनेच्या डोहांत लपून असलेला जो कालिय सर्प त्यालाही मी विसरलों नाही राजांचा शिरोवर्ति राजा जरासंध व प्राग्ज्योतिषपुरांत रहाणारा नरकासुर यांवरही माझी पक्की नजर आहे. कार्तिकस्वामितुल्य जो बाण तो सांप्रत मनुष्यलोकीं मनुष्यरूप घेऊन व शोणितपुरांत रहात असतो व त्याला आपल्या सहस्त्र बाहूंचा मोठा गर्व वाटत असून तो तू देवांनाही भारी आहे. याचा मला पत्ता आहे, याखेरीज, हे नारदा, या भरतभूमीच्या भाराचें जूं माझ्याच मानेवर ठेविलें आहे, याचीही मला शुद्ध आहे. याचप्रमाणें आजकाल पृथ्वीवर वाढलेले राजे भूलोकीं क्षय पावून शक्रलोकीं आदरास कसे पात्र होतील तेंही मला पुरें ठाऊक आहे, व सांप्रत मनुष्यरूप घेऊन जे हे असुर भूलोकी संचरले आहेत, यांचे प्राण पुनः या लोकीं न येतील असें करण्यासाठीं मी स्वत: योगाचा आश्रय करून व इतर देवांकडून करवून या मनुष्यलोकांत स्वत: भौतिक देह घेऊन या कंसादिक महासुरांपैकीं ज्याला ज्या युक्तीने शाश्वत शान्ति प्राप्त होईल त्या युक्तीनें त्याचा वध करीन. कारण, या देवेंद्राचे जे कोणी असे शत्रु आहेत त्यांना माझ्या योगबलाने अंतर्धानादि अनेक युक्त्या योजून मला मारिलेंच पाहिजे. हे नारदा, देव, देवर्षि, गंधर्व, इत्यादि स्वर्गवासी जनांनी हा जो आपला अंशावतार धरणीवर केला आहे तो माझ्याच संमतीनें केला असल्यामुळें आपण स्वत: जाऊन त्यांच्या कृतीचें साफल्य करावें, असा निश्चय मला जागे करण्यापूर्वीच मीं आपल्या मनाशीं करून ठेविला आहे. हे ब्रह्मर्षे, आतां पितामहानें मजसाठी भूलोकी एक वसतिस्थान निर्माण करावें, आणि कोणत्या देशांत, कोणत्या वेषानें, कसें राहिलें असतां या सर्व असुरांना मला युद्धांत सोईनें मारितां येईल हें मला पितामहानेंच सांगावे." 
 तें ऐकून ब्रह्मदेव म्हणाला, " हे नारायणा, हे विभो, कोणत्या उपायानें आपला हेतु सिद्धीस जाईल? हे महाबाहो, भूलोकीं आपली आईबापें कोण होतील व कोणत्या वंशांत न उत्पन्न झाल्यानें आपण कुलवृध्दी करून यावत् यादववंशाचें धारण कराल आणि त्या सर्व असुरांचें उन्मूलन करून व आपल्या वंशास महतीस चढवून प्रजाजनांना वर्तनाची मर्यादा घालून द्याल, त्या सर्व गोष्टी मी आपणास सांगतो, त्या मजकडून ऐकाव्या.
 
 पूर्वकालीं, हे विष्णो, कश्यपाने महात्म्या वरुणाच्या फार दूध देणाऱ्या अशा यज्ञीय धेनु, त्याचा यज्ञ चालू असतां आणिल्या. घरीं आणिल्यावर कश्यपाच्या अदिति आणि सुरभी अशा ज्या दोन स्त्रिया होत्या त्या पुनः त्या गाई वरुणास देऊं देतना. त्या वेळीं वरुण मजकडे येऊन शिरःप्रणामपूर्वक म्हणाला कीं, हे भगवन, गुरु कश्यपानें माझ्या गाई नेल्या. आतां त्याचा कार्यभाग उरकला असतांही तो आपल्या अदिति व सुरभी या दोघी स्त्रियांच्या नादीं भरून माझ्या गाई मला परत आणू देत नाहीं. हे प्रभो, माझ्या या गाई सर्वकाल आपणास वाटेल तितकें दूध देणाऱ्या असून सर्व सागरभर फिरतात; तथापि, त्यांना कोणी गुराखी लागत नाहीं. कारण, त्या स्वतेजानेंच आपलें रक्षण करितात; अशा त्या दिव्य आहेत. त्यांचें दूध फारच अव्वल प्रतींचें, केवळ देवांच्या अमृताच्या तोडीचें असून पुनः, त्याला कधींही. खंड नाहीं. असल्या या माझ्या दिव्य गाई दाबून ठेविण्याचें सामर्थ्य कश्यपा वाचून इतर कोणालाही नाहीं. हे भगवन्, प्रभो असो, गुरु असो किंवा इतर कोणी असो, तो जर आपली मर्यादा सोडून वागेल तर  त्याला तूंच अटकाव केला पाहिजेस. कारण, आमचें अखेर दाद लाविण्याचें ठिकाण तूच आहेस. हे लोकगुरो, आपली मर्यादा न ओळखून लोकांत वागणारे जे कोणी दांडगे लोक आहेत अशांना जर दंड न होईल तर सर्वत्र बेबंदी माजेल. बाकी तें कसेही असो, आपण सर्व कांहीं करण्यास समर्थ आहां. करितां माझ्या गाई मला देववाव्या म्हणजे मी समुद्रांत जातों. या गाई म्हणजे माझ्या देवताच आहेत; या माझें अविनाशी सत्त्वच आहेत. हे विभो, तूं निर्माण केलेल्या लोकांचे गाई आणि ब्राह्मण हे प्राण आहेत. यांपैकी गाईंचें रक्षण प्रथम करावें म्हणजे त्या ब्राह्मणांचें रक्षण करितात, आणि याप्रमाणें गाई व ब्राह्मण या उभतांचें रक्षण झालें म्हणजे त्याचे पोटीं सर्व जगताचे रक्षण होतें.
 
 हे विष्णो, याप्रमाणें जलाधिपति वरुणानें मजकडे फिर्याद दिल्यावर गाईंच्या बाबतींत कश्यपाच्या हातून काय कारण घडले होतें तें ध्यानांत आणून मीं त्याला शाप दिला. तो असा : - कश्यप महर्षीच्या ज्या अंशानें वरुणाच्या गायी नेल्या त्या अंशानें तो भूतली नंद नामक गौळी होईल. बाकीच्या अंशाने यदुकुलांत वसुदेव रूपानें जन्मेल, आणि कश्यपाच्या ज्या सुरभी आणि देवमाता अदिति अशा दोन भार्या आहेत, त्यांपैकी अदिति ही दोन अंशांनी यशोदा व देवकी अशीं दोन रूपे घेऊन आणि सुरभी रोहिणीचे रूप घेऊन, नंदरूपाची यशोदा व वसुदेवरूपाची देवकी व रोहिणी अशा स्त्रिया होऊन, कश्यप त्यांशीं रममाण होईल यांपैकी कश्यपाचा जो वसुदेव-नामक अंश सांगितला, तो तेजानें प्रति कश्यप होऊन मथुरेच्या जवळच जो गोवर्धन नामक पर्वत आहे तेथें कंसाचा मांडलीक होऊन गाईगोधनांतच राहील. अशा या वसुदेवाच्या घरांत, हे महाबाहो, तूं प्रथम शिशुरूपानें जन्मून आणी गोपाळाचा वेष घेऊन रहा. हे मधुसूदूना, तूं लोककल्याणार्थ आपल्या योगमायेनें आपलें खरें स्वरूप गुप्त राखून यदुकुलांत याप्रमाणे प्रथम प्रकट हो, आणि मग वामनावताराप्रमाणें वाढ. शिवाय, स्वर्गवासी जन तुझा उत्कर्ष होण्यासाठीं तुला जयवाद आणि आशिर्वाद देतीलच. याकरितां तू भूतली आपला आपणच अवतार करून देवकी आणि रोहिणी या दोघींनाही त्यांचे गर्भात राहून  संतुष्ट कर, आणि तेथें गवळ्यांच्या हजारों पोरी निर्माण होतील त्यांशीं मौजा मारीत भूलोकी रहा. हे विष्णो, तूं गोपवेषानें वनांमध्यें गाई राखीत इकडून तिकडे फिरत असतां ज्या गाई तुझे वनमालांनीं व्यापलेलें शरीर अवलोकन करितील, त्या खरोखरचं धन्य होत. हे कमलदलाक्षा विष्णो, तूं बाल होऊन गोपालांच्या वसतींत गेला असतां तेथील सर्वच लोक तुझ्या नादाने बाल होतील, आणि, हे पुंडरीकाक्षा, तुझ्याच तंत्रानें चालणारे जे तुझे भक्त आहेत ते गोपाळ होऊन गाई राखण्याचे कामीं तुला सदा साह्य करितील. तुझें रानांत गाई चारणें, गाईंमागून गोठ्यांतून इकडे तिकडे धांवणें, आणि यमुनाडोहांत बुड्या मारणें, या चेष्टांनीं तु्जवर त्यांचें फारच प्रेम जडेल. वसुदेवाला तूं "बाबा" म्हणून हाका मारिशील आणि तो तुला " बाळ " म्हणून हांक मारील आणि असा दिवस आला म्हणजे त्या वसुदेवाचें जीवित खरोखरच धन्य होईल. बाकी कश्यपा ( वसुदेवा ) वांचून इतर कोणाचें पुत्रत्व तुझ्यासारख्यानें स्वीकारावें? आणि हे विष्णो, कश्यपस्त्री अदिति तिजवांचून दुसरी कोणती स्त्री तुझें गर्भांत धारण करूं शकेल  ?  ( तेव्हां तूं वसुदेवदेवकीच्या [ अदिती ] पोटीं येणें हेंच न्याय्य आहे. ) याकरितां तू आपल्या स्वयंभू योगबलानें विजय मिळविण्यासाठीं भूलोकीं जा, आणि, हे मधुसूदना, आम्हीही आपआपल्या घरीं जातो."
 
 वैशंपायन सांगतात : - याप्रमाणें ब्रह्मदेवाची विनंती कानीं येतांच देवमंडळीला तेथून जाण्याची अनुज्ञा देऊन श्रीविष्णु क्षरिसमुद्राच्या उत्तर प्रांताला जें स्वतःचें वसतिस्थान होतें तेथें गेले. तेथें मेरूचे पोटांत पार्वती नांवाची एक अत्यंत दुर्गम अशी गुहा आहे. या गुहेत श्रीविष्णूचीं तीन पाउले उमटलेलीं असून त्याकरितां संक्रान्तीचे दिवशीं लोक तिची नेहमीं पूजा करितात. असल्या या पवित्र गुहेंत आपलें जुनें शरीर ठेवुन तो उदारधी परमात्मा हरि स्वतःला वसुदेवाच्या घरीं जन्मास घालण्याचे खटपटीस लागला.
 
 
 इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि ब्रह्मवाक्यं नाम पञ्चपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५५ ॥
 अध्याय पंचावन्नावा समाप्त
 GO TOP 
 
 |