| 
 
 श्रीहरिवंशपुराण  हरिवंश पर्व
 एकोनचत्वारिंशोऽध्यायः
 
 अक्रूरचरितम्  
वैशम्पायन उवाच यत् तत् सत्राजिते कृष्णो मणिरत्नं स्यमन्तकम् ।
 अदात् तद्धारयामास बभ्रुर्वै शतधन्वना ॥ १ ॥
 यदा हि प्रार्थयामास सत्यभामामनिन्दिताम् ।
 अक्रूरोऽन्तरमन्विच्छन् मणिं चैव स्यमन्तकम् ॥ २ ॥
 सत्राजितं ततो हत्वा शतधन्वा महाबलः ।
 रात्रौ तन्मणिमादाय ततोऽक्रूराय दत्तवान् ॥ ३ ॥
 अक्रूरस्तु ततो रत्नमादाय भरतर्षभ ।
 समयं कारयांचक्रे नावेद्योऽहं त्वयेत्युत ॥ ४ ॥
 वयमभ्युपयास्यामः कृष्णेन त्वामभिद्रुतम् ।
 ममाद्य द्वारका सर्वा वशे तिष्ठत्यसंशयम् ॥ ५ ॥
 हते पितरि दुःखार्ता सत्यभामा यशस्विनी ।
 प्रययौ रथमारुह्य नगरं वारणावतम् ॥ ६ ॥
 सत्यभामा तु तद्वृत्तं भोजस्य शतधन्वनः ।
 भर्तुर्निवेद्य दुःखार्ता पार्श्वस्थाश्रूण्यवर्तयत् ॥ ७ ॥
 पाण्डवानां तु दग्धानां हरिः कृत्वोदकक्रियाम् ।
 कुल्यार्थे चापि पाण्डूनां न्ययोजयत सात्यकिम् ॥ ८ ॥
 ततस्त्वरितमागत्य द्वारकां मधुसूदनः ।
 पूर्वजं हलिनं श्रीमानिदं वचनमब्रवीत् ॥ ९ ॥
 हतः प्रसेनः सिंहेन सत्राजिच्छतधन्वना ।
 स्यमन्तकः स मद्गामी तस्य प्रभुरहं विभो ॥ १० ॥
 तदारोह रथं शीघ्रं भोजं हत्वा महाबलम् ।
 स्यमन्तको महाबाहो ह्यस्माकं स भविष्यति ॥ ११ ॥
 ततः प्रववृते युद्धं तुमुलं भोजकृष्णयोः ।
 शतधन्वा ततोऽक्रूरमवैक्षत् सर्वतो दिशम् ॥ १२ ॥
 संरब्धौ तावुभौ दृष्ट्वा तत्र भोजजनार्दनौ ।
 शक्तोऽपि शाठ्याद्धार्दिक्यमक्रूरो नाभ्यपद्यत ॥ १३ ॥
 अपयाने ततो बुद्धिं भोजश्चक्रे भयार्दितः ।
 योजनानां शतं साग्रं हयया प्रत्यपद्यत ॥ १४ ॥
 विख्याता हृदया नाम शतयोजनगामिनी ।
 भोजस्य वडवा राजन् यया कृष्णमयोधयत् ॥ १५ ॥
 क्षीणां जवेन च हयामध्वनः शतयोजने ।
 दृष्ट्वा रथस्य तां वृद्धिं शतधन्वा समत्यजत् ॥ १६ ॥
 ततस्तस्या हयायास्तु श्रमात् खेदाच्च भारत ।
 खमुत्पेतुरथ प्राणाः कृष्णो राममथाब्रवीत् ॥ १७ ॥
 तिष्ठस्वेह महाबाहो दृष्टदोषा हया मया ।
 पद्भ्यां गत्वा हरिष्यामि मनीरत्नं स्यमन्तकम् ॥ १८ ॥
 पद्भ्यामेव ततो गत्वा शतधन्वानमच्युतः ।
 मिथिलामभितो राजन् जघान परमास्त्रवित् ॥ १९ ॥
 स्यमन्तकं स नापश्यद्धत्वा भोजं महाबलम् ।
 निवृत्तं चाब्रवीत् कृष्णं रत्नं देहीति लाङ्गली ॥ २० ॥
 नास्तीति कृष्णश्चोवाच ततो रामो रुषान्वितः ।
 धिक्छब्दमसकृत् कृत्वा प्रत्युवाच जनार्दनम् ॥ २१ ॥
 
 
भ्रातृत्वान्मर्षयाम्येष स्वस्ति तेऽस्तु व्रजाम्यहम् । कृत्यं न मे द्वारकया न त्वया न च वृष्णिभिः ॥ २२ ॥
 प्रविवेश ततो रामो मिथिलामरिमर्दनः ।
 सर्वकामैरुपचितैर्मैथिलेनाभिपूजितः ॥ २३ ॥
 एतस्मिन्नेव काले तु बभ्रुर्मतिमतां वरः ।
 नानारूपान् क्रतून् सर्वानाजहार निरर्गलान् ॥ २४ ॥
 दीक्षामयं स कवचं रक्षार्थं प्रविवेश ह ।
 स्यमन्तककृते प्राज्ञो गान्दीपुत्रो महायशाः ॥ २५ ॥
 अथ रत्नानि चाग्र्याणि द्रव्याणि विविधानि च ।
 षष्टिं वर्षाणि धर्मात्मा यज्ञेषु विनियोजयत् ॥ २६ ॥
 अक्रूरयज्ञा इति ते ख्यातास्तस्य महात्मनः ।
 बह्वन्नदक्षिणाः सर्वे सर्वकामप्रदायिनः ॥ २७ ॥
 अथ दुर्योधनो राजा गत्वा तु मिथिलां प्रभुः ।
 गदाशिक्षां ततो दिव्यां बलभद्रादवाप्तवान् ॥ २८ ॥
 प्रसाद्य तु ततो रामो वृष्ण्यन्धकमहारथैः ।
 आनीतो द्वारकामेव कृष्णेन च महात्मना ॥ २९ ॥
 अक्रूरस्त्वन्धकैः सार्धमपायाद् भरतर्षभ ।
 हत्वा सत्राजितं युद्धे सहबन्धुं महाबलम् ॥ ३० ॥
 ज्ञातिभेदभयात् कृष्णस्तमुपेक्षितवानथ ।
 अपयाते तथाक्रूरे नावर्षत् पाकशासनः ॥ ३१ ॥
 अनावृष्ट्या यदा राज्यमभवद् बहुधा कृशम् ।
 ततः प्रसादयामासुरक्रूरं कुकुरान्धकाः ॥ ३२ ॥
 पुनर्द्वारवतीं प्राप्ते तस्मिन् दानपतौ ततः । ॥
 प्रववर्षे सहस्राक्षः कच्छे जलनिधेस्तदा ॥ ३३ ॥
 कन्यां च वासुदेवाया स्वसारं शीलसम्मताम् ।
 अक्रूरः प्रददौ धीमान् प्रीत्यर्थं कुरुनन्दन ॥ ३४ ॥
 अथ विज्ञाय योगेन कृष्णो बभ्रुगतं मणिम् ।
 सभामध्ये गतं प्राह तमक्रूरं जनार्दनः ॥ ३५ ॥
 यत् तद् रत्नं मणिवरं तव हस्तगतं विभो ।
 तत्प्रयच्छस्व मानार्हं मयि मानार्यकं कृथाः ॥ ३६ ॥
 षष्टिवर्षे गते काले यद्रोषोऽभून्ममानघ ।
 स संरूढोऽसकृत्प्राप्तस्ततः कालात्ययो महान् ॥ ३७ ॥
 ततः कृष्णस्य वचनात् सर्वसात्त्वतसंसदि ।
 प्रददौ तं मणिं बभ्रुरक्लेशेन महामतिः ॥ ३८ ॥
 ततस्तमार्जवप्राप्तं बभ्रोर्हस्तादरिंदमः ।
 ददौ हृष्टमनाः कॄष्णस्तं मणिं बभ्रवे पुनः ॥ ३९ ॥
 स कृष्णहस्तात् संप्राप्तं मणिरत्नं स्यमन्तकम् ।
 आबध्य गान्धिनीपुत्रो विरराजांशुमानिव ॥ ४० ॥
 यस्त्वेवं शृणुयान्नित्यं शुचिर्भूत्वा समाहितः ।
 सुखानां सकलानां च फलभागीह जायते ॥ ४१ ॥
 आब्रह्मभुवनाच्चापि यशः ख्यातिर्न संशयः ।
 भविष्यति नृपश्रेष्ठ सत्यमेतद् ब्रवीमि ते ॥ ४२ ॥
 इति श्रीमन्महाभारते खिलेषु हरिवंशे
 हरिवंशपर्वण्येकोनचत्वारिंशोऽध्यायः
 
 
 
 अक्रूरवृत्त - 
वैशंपायन सांगतात - कृष्णांनी जो स्यमंतक मणी सत्राजिताचे स्वाधीन केला म्हणून सांगितलें तो पुनः अक्रूरानें शतधन्वा नामक यादवाचे द्वारें हस्तगत करून घेतला. याचें कारण असें कीं, अक्रूरानें सुंदर सत्यभामा आपणास मिळावी म्हणून सत्राजिताजवळ मागणी घातली होती व त्या वेळेपासूनच सत्यभामेबरोबरच स्वर्णादिक विणारा तो स्यमंतक मणी आपणास मिळावा असा त्याचा हेतु होता. (परंतु सत्यभामा जेव्हां श्रीकृष्णाला मिळाली तेव्हां तो तिजबद्दल निराश झाला. तथापि, स्यमंतक मिळविण्याची मात्र त्यानें शतधन्वा नामक एका यादवाचे द्वारें खटपट चालविली.) त्यामुळें शतधन्वानामक बलाढय यादवानें रात्रीं सत्राजितावर छापा घालून त्याला ठार मारून तो मणि हिरावून आणिला आणि अक्रूराला दिला. त्या वेळीं, हे राजा, अक्रूरानें शतधन्व्यापासून तें रत्न घेऊन करार केला कीं, हें रत्न माझे (अक्रूराचे) हातीं लागलें आहे असें तूं कोणास सांगू नको. कृष्ण कदाचित् तुझा पाठलाग करूं लागलाच तर आम्ही सर्व यादव तुझ्या पाठोपाठ उभे आहों, असें समज. कारण, आजकाल उभी द्वारका नगरी माझ्या अर्ध्यावचनांत आहे, ही गोष्ट निखालस आहे. आपला बाप सत्राजित मारिलेला पाहून यशस्विनी सत्यभामा अत्यंत दुःखी झाली, व त्या दुःखावेगानें रथांत बसून हस्तिपुराला गेली. तेथें तिनें तें भोजकुलोत्पन्न शतधन्व्याचें दुष्कर्म आपला पति श्रीकृष्ण याचे कानीं घातलें; आपण दुःखानें विव्हल होत्साती अश्रु ढाळीत पतीच्या पार्श्वभागीं उभी राहिली. त्या वेळीं दुर्योधनानें कपटानें लाक्षागृहांत जाळलेल्या पांडव-बंधूंना स्वतः निवापांजली देऊन व त्यांची बाकीची और्ध्वदेहिक क्रिया करण्याकडे सात्यकीची योजना करून श्रीकृष्ण लगबगीनें द्वारकेस गेला.  
 द्वारकेंत येतांच मधुदैत्याला मारणारा श्रीकृष्ण आपला वडील बंधु जो हलधर बलराम त्याला म्हणाला, 'प्रसेनाला सिंहानें मारिलें व सत्राजिताला शतधन्व्यानें मारिलें. अशा स्थितींत स्यमंतक मणी सत्राजिताला दिला असल्यामुळें त्यावर माझी मालकी उघडच आहे. याकरितां हे महाबाहो, आपण सत्वर रथांत बसून व त्या बलाढय भोजाला ठार करून मणी आपलासा केला पाहिजे." (असें बोलून कृष्ण व बलराम यांनी शतधन्व्याला गांठलें.) नंतर हृदीकाचा पुत्र तो शतधन्वा भोज याचें व श्रीकृष्णाचें तुंबळ युद्ध जुंपलें. त्या वेळीं आपणास संकेताप्रमाणें अक्रूर साह्यार्थ येईल या आशेनें शतधन्वा चोहोंकडे अक्रूराला पाहूं लागला. परंतु, अक्रूरानें जेव्हां पाहिलें कीं, शतधन्व्याची आणि कृष्णाची झोंबी केवळ निकराची चालली आहे, तेव्हां अक्रूराचे अंगांत साह्याचें सामर्थ्य असतांही त्यानें कपट केलें, व त्याला साहाय्य दिलें नाही. आपणास कोणी साहाय्यकर्ता नाहीं असें शतधन्व्याला आढळतांच भयानें गांगरून जाऊन त्यानें पळून जाण्याचा निश्चय केला. त्या वेळीं त्या शतधन्व्याजवळ विज्ञातहृदया नांवाची एक अति चलाख घोडी होती. ही रोज शंभर योजनें चालत असे; व हिच्या साह्यानेंच शतधन्वा श्रीकृष्णाशीं लढत होता. तिजवर बसून त्यानें पळ काढिला तो एका दमांत शंभर योजनें रस्ता टाकून गेला. इतकी मजल मारिल्यावर ती घोडी अतिवेगामुळें फारच थकून गेली. शिवाय रामकृष्णांचा रथ पाठोपाठ चढ करून येत आहे असें शतधन्व्याला दिसलें, तेव्हां त्यानें ती घोडी तेथेंच सोडली. थोडक्यांतच अतिश्रमानें व दुःखानें त्या घोडीचे प्राण स्वर्गस्थ झाले. ती गोष्ट पाहून कृष्ण बलरामाला म्हणाला कीं, "हे महाबाहो, आतां आपला रथ येथेंच थांबवा. कारण, शतधन्व्याच्या घोडीचे बहुतेक बारा वाजले असें माझ्या लक्षांत येत आहे, याकरितां आतां रथाचें कांहीं कारण नाही. मी आतां पायींपायींच चालत जाऊन तो स्यमंतक मणी हिसकावून आणितों. असें म्हणून श्रीकृष्ण पायींच शतधन्व्याचा पाठलाग करूं लागला; व जातां जातां अखेर मिथिला नगरीच्या समीपभागीं त्या अस्त्रनिपुण कृष्णानें शतधन्व्याला गांठून ठार केलें. परंतु, त्या महाबल भोजाला मारून फायदा कांहींच झाला नाहीं. कारण, मणी त्याजपाशीं आढळला नाहीं. तेथून कृष्ण परत येतांच बलरामानें 'मणी कोठें आहे तो दे' म्हणून म्हटलें. त्यावर कृष्णानें उत्तर केलें कीं, मणी नाहीं. तें ऐकतांच दादांचें माथें फिरलें. व 'धिःकार असो, धिःकार असो !' असें वारंवार म्हणूं लागले. शेवटीं ते म्हणाले, 'तूं भाऊ आहेस. एवढयाच खातर गय केली आहे. असो; देव तुझें कल्याण करो. मी आतां चाललों. मला त्या द्वारकेचें कारण नाहीं, तुझेंही नाहीं आणि यादवांचेंही नाहीं.' असें सांगून बलराम निघाला तो मिथिला नगरीस गेलो. तेथें मिथिलेश्वरानें त्या शत्रुमर्दन रामाची अनेक इष्ट उपहार देऊन पूजा केली.
 
 या सुमारासच बुद्धिमंतांत श्रेष्ठ जो अक्रूर यानें नानातर्हेचे सर्व कांहीं मनसोक्त क्रतु केले; आणि साठ वर्षेपर्यंत त्यानें हें यज्ञसत्र चालू ठेवून त्यांत शेलकीं शेलकी रत्नें, नानातर्हेचीं द्रव्यें, विपुल अन्नशांति, प्रचुर दक्षणा व सर्व तर्हेचीं इच्छित दानें चालू ठेविलीं होतीं. हे यज्ञ इतके प्रसिद्ध झाले कीं, त्यांचें अक्रूरयज्ञ असें स्वतंत्र नांवच पडलें. हे यज्ञ करण्यांत अक्रूराची मोठी चतुराई होती. कारण, त्याजपाशीं स्यमंतक मणी होता, तो हिरावून घेण्यासाठीं कोणी परचक्र येइल, या भयास्तव त्यानें हें यज्ञदीक्षारूपी कवच धारण केलें; व या योगानें त्यानें स्वतःचा बचाव केला; व स्यमंतक मण्यापासून आयतीच प्राप्त होणारी विपुल संपत्ति यज्ञनिमित्तानें लोकांस वांटून स्वतःचें कल्याण व लोकांचेंही आराधन केलें.
 
 असो; बलराम दादा रुसून मिथिलेला गेले हें सांगितलेंच आहे. ते तेथें असतां राजा दुर्योधन त्यांजकडे गेला, व त्यांजपासून त्यानें गदायुद्धाचें अलौकिक कौशल्य संपादिलें. (ही बातमी द्वारकेंत येतांच) वृष्णि व अंधक कुलांतील महारथी व स्वतः महात्मा कृष्ण यांनीं दादांची समजूत घालून त्यांस द्वारकेंत परत आणिलें; तेव्हांच अंधक मंडळीबरोबर अक्रूर द्वारकेंतून निघून गेला. वास्तविक पाहातां युद्धांत महापराक्रमी अशा सत्राजिताला म्हणजे कृष्णाच्या प्रत्यक्ष सासर्याला (स्यमंतक मण्यासाठीं) अक्रूरानें मारिलें होतें (त्या अर्थीं कृष्णानें त्याचें पारिपत्य करणें न्याय्य होतें). परंतु, आपले स्वजातींत दुफळी उत्पन्न न व्हावी म्हणून त्यानें त्याची उपेक्षा केली. अक्रूर द्वारकेंतून गेल्यावर असा चमत्कार झाला कीं, इंद्र तेथें पर्जन्य पाडीना व त्यामुळें अनावृष्टि होऊन अन्नावांचून सर्व राज्य रोडले. तें पाहून कुकुर आणि अंधक या मंडळींनीं जाऊन अक्रूराची समजूत घालून त्याला पुन्हा द्वारकेस आणिलें. तो दानशूर अक्रूर द्वारकेंत येतांच त्या समुद्रतीरच्या प्रांतांत इंद्रानें पर्जन्याची रेलचेल करून सोडिली. अक्रूर हा मोठा बुद्धिमान होता, हें मागें सांगितलेंच आहे. त्यानें द्वारकेंत आल्यावर कृष्णाचा रोष घालविण्यासाठीं अशी खुबी केली कीं, आपली सुशील बहिणच कृष्णाला देऊन टाकिली. कृष्णही कांहीं कमी बुद्धिमान नव्हता; त्यानें अक्रूराच्या दानधर्मावरून व इतर थाटावरून अक्रूराजवळच स्यमंतक असला पाहिजे असें ताडिलें; आणि अक्रूर एकदां सभेंत आहे असें पाहून त्याला म्हटलें, "महाराज, तें स्यमंतक मणिरत्न निःसंशय आपले हातीं लागलें आहे; तरी तें माझें मला परत करा. आपण संभावित आहां, याकरितां मजपाशीं हलकटपणा करूं नका. या रत्नाप्रीत्यर्थ आपल्यावर माझा रोष होऊन आज साठ वर्षे लोटली; व इतक्या दीर्घकालांत तो अनेक वेळां धुमधुमसून अतिशय वाढला आहे. करितां हें ध्यानांत धरून काय करणें तें करा." कृष्णाचें तें नरमगरम वचन ऐकून त्या शहाण्या अक्रूरानें आपणास तो मणी परत करण्यांत कोणताही क्लेश वाटत नाहीं, असें दाखवून सर्व सात्वतांच्या सभेंत तो स्यमंतक कृष्णाच्या हवालीं केला. शत्रूला नरम आणणार्या कृष्णानें अक्रूरानें आढेवेढे न घेतां आपला मणी परत केला, हें पाहून आपली प्रसन्नता दाखवून तो मणी पुनरपि आपण  होऊनच अक्रूराला दिला. कृष्णाच्या हातून आपणास तें मणिरत्न राजरोस मिळालें असें पाहातांच त्या गांदिनीच्या पुत्रानें म्हणजे अक्रूरानें उघडपणें तें आपल्या गळ्यांत लटकाविलें. तेव्हां त्या मण्याच्या तेजानें तो सूर्यासारखा शोभूं लागला.
 
 जो कोणी शुचिर्भूत होऊन एकाग्र चित्तानें हें स्यमंतकोपाख्यान नित्य श्रवण करील तो सर्व प्रकारच्या सुखांचा फलभोक्ता होईल. शिवाय, हे राजा, अशा मनुष्याची कीर्ति निःसंशय ब्रह्मलोकापर्यंत जाईल. हें मी तुला कांहीं तरी सांगत नाहीं.
 
 
 
 इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि अक्रूरचरितं एकोनचत्वारिंशोऽध्यायः ॥ ३९ ॥
 अध्याय एकोणचाळिसावा समाप्त
 GO TOP 
 
 |