श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
चत्वारिंशोऽध्यायः


वराहोत्पत्तिवर्णनम्

जनमेजय उवाच
प्रादुर्भावान् पुराणेषु विष्णोरमिततेजसः ।
सतां कथयतामेव वराह इति नः श्रुतम् ॥ १ ॥
न जाने तस्य चरितं न विधिं नैव विस्तरम् । ॥
न कर्मगुणसंतानं न हेतुं न मनीषितम् ॥ २ ॥
किमात्मको वराहः स का मूर्तिः का च देवता ।
किमाचारः प्रभावो वा किं वा तेन पुरा कृतम् ॥ ३ ॥
यज्ञार्थं समवेतानां मिषतां च द्विजन्मनाम् ।
महावराहचरितं कृष्णद्वैपायनेरितम् ॥ ४ ॥
यथा नारायणो ब्रह्मन् वाराहं रूपमास्थितः ।
दंष्ट्रया गां समुद्रस्थामुज्जहारारिसूदनः ॥ ५ ॥
विस्तरेणैव कर्माणि सर्वाणि रिपुघातिनः ।
श्रोतुमिच्छाम्यशेषेण हरेः कृष्णस्य धीमतः ॥ ६ ॥
कर्मणामानुपूर्व्याच्च प्रादुर्भावाश्च ये विभोः ।
या चास्य प्रकृतिर्ब्रह्मंस्तां मे व्याख्यातुमर्हसि ॥ ७ ॥
कथं च भगवान् विष्णुः सुरशत्रुनिषूदनः ।
वसुदेवकुले धीमान् वासुदेवत्वमागतः ॥ ८ ॥
अमरैरावृतं पुण्यं पुण्यकृद्भिर्निषेवितम् ।
देवलोकं समुत्सृज्य मर्त्यलोकमिहागतः ॥ ९ ॥
देवमानुषयोर्नेता यो भुवः प्रभवो विभुः ।
किमर्थं दिव्यमात्मानं मानुष्ये संन्ययोजयत् ॥ १० ॥
यश्चक्रं वर्तयेत्येको मानुषाणामनामयम् ।
मानुष्ये स कथं बुद्धिं चक्रे चक्रभृतां वरः ॥ ११ ॥
गोपायनं यः कुरुते जगतः सार्वलौकिकम् ।
स कथं गां गतो देवो विष्णुर्गोपत्वमागतः ॥ १२ ॥
महाभूतानि भूतात्मा यो दधार चकार च ।
श्रीगर्भः स कथं गर्भे स्त्रिया भूचरया धृतः ॥ १३ ॥
येन लोकान् क्रमैर्जित्वा त्रिभिस्त्रींस्त्रिदशेप्सया ।
स्थापिता जगतो मार्गास्त्रिवर्गप्रभवास्त्रयः ॥ १४ ॥
योऽन्तकाले जगत् पीत्वा कृत्वा तोयमयं वपुः ।
लोकमेकार्णवं चक्रे दृश्यादृश्येन वर्त्मना ॥ १५ ॥
यः पुराणे पुराणात्मा वाराहं रूपमास्थितः ।
विषाणाग्रेण वसुधामुज्जहारारिसूदनः ॥ १६ ॥
यः पुरा पुरुहूतार्थे त्रैलोक्यमिदमव्ययः ।
ददौ जित्वासुरगणान् सुराणां सुरसत्तमः ॥ १७ ॥
येन सैंहं वपुः कृत्वा द्विधा कृत्वा च तत् पुनः ।
पूर्वं दैत्यो महावीर्यो हिरण्यकशिपुर्हतः ॥ १८ ॥
यः पुरा ह्यनलो भूत्वा और्वः संवर्तको विभुः ।
पातालस्थोऽर्णवगतं पपौ तोयमयं हविः ॥ १९ ॥
सहस्रशिरसं ब्रह्मन् सहस्रारं सहस्रदम् ।
सहस्रचरणं देवं यमाहुर्वै युगे युगे ॥ २० ॥
नाभ्यारण्यां समुत्पन्नं यस्य पैतामहं गृहम् ।
एकार्णवजलस्थस्य नष्टे स्थावरजङ्गमे ॥ २१ ॥
येन ते निहता दैत्याः संग्रामे तारकामये ।
सर्वदेवमयं कृत्वा सर्वायुधधरं वपुः ॥ २२ ॥
गरुदस्तेन चोत्सिक्तः कालनेमिर्निपातितः ।
निर्जितश्च मयो दैत्यस्तारकश्च महासुरः ॥ २३ ॥
उत्तरान्ते समुद्रस्य क्षीरोदस्यामृतोदधेः ।
तः शेते शाश्वतं योगमास्थाय तिमिरं महत् ॥ २४ ॥
सुरारणिर्गर्भमधत्त दिव्यं ॥
    तपः प्रकर्षाददितिः पुराणं ।
शक्रं च यो दैत्यगणावरुद्धं ॥
    गर्भावसाने निभृतं चकार ॥ २५ ॥
पदानि यो लोकमयानि कृत्वा ॥
    चकार दैत्यान् सलिलेशयांस्तान् ।
कृत्त्वा च देवांस्त्रिदिवस्य देवां- ॥
    श्चक्रे सुरेशं त्रिदशाधिपत्ये ॥ २६ ॥
पात्राणि दक्षिणा दीक्षा चमसोलूखलानि च ।
गार्हपत्येन विधिना अन्वाहार्येण कर्मणा ॥ १-४--२७ ॥
अग्निमाहवनीयं च वेदीं चैव कुशं स्रुवम् ।
प्रोक्षणीयं ध्रुवां चैव आवभृथ्यं तथैव च ॥ २८ ॥
सुधात्रीणि च यश्चक्रे हव्यकव्यप्रदान् द्विजान् ।
हव्यादांश्च सुरान् यज्ञे क्रव्यादांस्तु पितॄनपि ॥ २९ ॥
भागार्थे मन्त्रविधिना यश्चक्रे यज्ञकर्मणि ।
यूपान् समित् स्रुचं सोमं पवित्रान् परिधीनपि ॥ ३० ॥
यज्ञियानि च द्रव्याणि यज्ञांश्च सचयानलान् ।
सदस्यान् यजमानांश्च मेध्यादींश्च क्रतूत्तमान् ॥ ३१ ॥
विबभाज पुरा सर्वं पारमेष्ठ्येन कर्मणा ।
यागानुरूपान् यः कृत्वा लोकाननुपराक्रमत् ॥ ३२ ॥
क्षणा लवाश्च काष्ठाश्च कलास्त्रैकाल्यमेव च ।
मुहूर्तास्तिथयो मासाः पक्षाः संवत्सरास्तथा ॥ ३३ ॥
ऋतवः कालयोगाश्च प्रमाणं त्रिविधं त्रिषु ।
आयुः क्षेत्राण्युपचयो लक्षणं रूपसौष्ठवम् ॥ ३४ ॥
त्रयो वर्णास्त्रयो लोकास्त्रैविद्यं पावकास्त्रयः ।
त्रैकाल्यं त्रीणि कर्माणि त्रयोऽपायास्त्रयो गुणाः ॥ ३५ ॥
त्रयो लोकाः पुरा सृष्टा येनानन्त्येन कर्मणा ।
सर्वभूतगणस्रष्टा सर्वभूतगुणात्मकः ॥ ३६ ॥
नृणामिन्द्रियपूर्वेण योगेन रमते च यः ।
गतागताभ्यां यो नेता सर्वत्र जगदीश्वरः ॥ ३७ ॥
यो गतिर्धर्मयुक्तानामगतिः पापकर्मणाम् ।
चातुर्वर्ण्यस्य प्रभवः चातुर्होत्रस्य रक्षिता ॥ ३८ ॥
चातुर्विद्यस्य यो वेत्ता चातुराश्रम्यसंश्रयः ।
दिगन्तरो नभोभूतो वायुरापो विभावसुः ॥ ३९ ॥
यश्चन्द्रसूर्यर्ज्योतिर्योगीशः क्षणदान्तकः ।
यत् परं श्रूयते ज्योतिर्यत् परं श्रूयते तपः ॥ ४० ॥
यं परं प्राहुरपरं यः परः परमात्मवान् ।
नारायणपरा वेदा नारायणपराः क्रियाः ॥ ४१ ॥
नारायणपरो धर्मो नारायणपरा गतिः ।
नारायणपरं सत्यं नारायणपरं तपः ॥ ४२ ॥
नारायणपरो मोक्षो नारायणपरायणम् ।
आदित्यादिस्तु यो दिव्यो यश्च दैत्यान्तको विभुः ॥ ४३ ॥
युगान्तेष्वन्तको यश्च यश्च लोकान्तकान्तकः ।
सेतुर्यो लोकसेतूनां मेध्यो यो मेध्यकर्मणाम् ॥ ४४ ॥
वेद्यो यो वेदविदुषां प्रभुर्यः प्रभवात्मनाम् ।
सोमभूतस्तु सौम्यानामग्निभूतोऽग्निवर्साम् ॥ ४५ ॥
मनुष्याणां मनोभूतस्तपोभूतस्तपस्विनाम् ।
विनयो नयवृत्तीनां तेजस्तेजस्विनामपि ।
सर्गाणां सर्गकारश्च लोकहेतुरनुत्तमः ॥ ४६ ॥
विग्रहो विग्रहार्हाणां गतिर्गतिमतामपि ।
आकाशप्रभवो वायुर्वायुप्राणो हुताशनः ॥ ४७ ॥
देवा हुताशनप्राणाः प्राणोऽग्नेर्मधुसूदनः ।
रसाद् वै शोणितं जातं शोणितान्मांसमुच्यते ॥ ४८ ॥
मांसात्तु मेदसो जन्म मेदसोऽस्थीनि चैव हि ।
अस्थ्नो मज्जा समभवन्मज्जातः शुक्रमेव च ॥ ४९ ॥
शुक्राद् गर्भः समभवद् रसमूलेन कर्मणा ।
तत्रापां प्रथमो भागः स सौम्यो राशिरुच्यते ॥ ५० ॥
गर्भोष्मसंभवोऽग्निर्यो द्वितीयो राशिरुच्यते ।
शुक्रं सोमात्मकं विद्यादार्तवं विद्धि पावकम् ।
भागौ रसात्मकौ ह्येषां वीर्यं च शशिपावकौ ॥ ५१ ॥
कफवर्गे भवेच्छुक्रं पित्तवर्गे च शोणितम् ।
कफस्य हृदयं स्थानं नाभ्यां पित्तं प्रतिष्ठितम् ॥ ५२ ॥
देहस्य मध्ये हृदयं स्थानं तन्मनसः स्मृतम् ।
नाभिकोष्ठान्तरं यत्तु तत्र देवो हुताशनः ॥ ५३ ॥
मनः प्रजापतिर्ज्ञेयः कफः सोमो विभाव्यते ।
पित्तमग्निः स्मृतं ह्येतदग्नीषोमात्मकं जगत् ॥ ५४ ॥
एवं प्रवर्तिते गर्भे वर्धितेऽम्बुदसन्निभे ।
वायुः प्रवेशं संचक्रे संगतः परमात्मना ॥ ५५ ॥
ततोऽङ्गानि विसृजति बिभर्ति परिवर्धयन् ।
स पञ्चधा शरीरस्थो भिद्यते वर्धते पुनः ॥ ५६ ॥
प्राणोऽपानः समानश्च उदानो व्यान एव च ।
प्राणः स प्रथमं स्थानं वर्धयन् परिवर्तते ॥ ५७ ॥
अपानः पश्चिमं कायमुदानोर्ध्वं शरीरिणः ।
व्यानो व्यायच्छ्ते येन समानः सन्निवर्तयेत् ।
भूतावाप्तिस्ततस्तस्य जायतेन्द्रियगोचरात् ॥ ५८ ॥
पृथिवी वायुराकाशमापो ज्योतिश्च पञ्चमम् ।
तस्येन्द्रियाणि विष्टानिस्वं स्वं योगं प्रचक्रिरे ॥ ५९ ॥
पार्थिवं देहमाहुस्तं प्राणात्मानं च मारुतम् । ॥
छिद्राण्याकाशयोनीनि जलात् स्रावः प्रवर्तते ॥ ६० ॥
ज्योतिश्चक्षुश्च तेजात्मा तेषां यन्ता मनः स्मृतः ।
ग्रामाश्च विषयाश्चैव यस्य वीर्यात् प्रवर्तिताः ॥ ६१ ॥
इत्येवं पुरुषः सर्वान् सृजँल्लोकान् सनातनान् ।
कथं लोके नैधनेऽस्मिन् नरत्वं विष्णुरागतः ॥ ६२ ॥
एष मे संशयो ब्रह्मन्नेवं मे विस्मयो महान् ।
कथं गतिर्गतिमतामापन्नो मानुषीं तनुम् ॥ ६३ ॥
श्रुतो मे स्वस्य वंशस्य पूर्वेषां चैव संभवः ।
श्रोतुमिच्छामि विष्णोस्तु वृष्णीनां च यथाक्रमम् ॥ ६४ ॥
आश्चर्यं परमं विष्णुर्देवैर्दैत्यैश्च कथ्यते ।
विष्णोरुत्पत्तिमाश्चर्यं ममाचक्ष्व महामुने ॥ ६५ ॥
एतदाश्चर्यमाख्यानं कथयस्व सुखावहम् ।
प्रख्यातबलवीर्यस्य विष्णोरमिततेजसः ।
कर्म चाश्चर्यभूतस्य विष्णोस्तत्त्वमिहोच्यताम् ॥ ६६ ॥
इति श्रीमन्महाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
वराहोत्पत्तिवर्णने चत्वारिंशोऽध्यायः


वराहोत्पत्तिवर्णन -

(स्यमंतक मण्याचे आख्यान ऐकत असतां अक्रूरानें वास्तविक अक्षम्य अपराध केला असून व श्रीकृष्ण परमात्मा त्याचें पारिपत्य करण्यास समर्थ असूनही लोकांस त्रास न व्हावा, ज्ञातींत विरोध न वाढावा, इत्यादि उंची गोष्टी मनांत आणून परमात्म्यानें त्याला क्षमा केली. इतकेंच नाहीं, तर तो अमूल्य मणी पुन्हा अक्रूराला स्वहस्तें अर्पण केला. इत्यादि गोष्टी ऐकून जनमेजयाला परमात्म्याच्या क्षमा, औदार्य वगैरे अनेक गुणांबद्दल प्रबल भक्ति उत्पन्न होऊन अशा परमात्म्याचें चरित्र अधिकच ऐकावें अशी बुद्धि होऊन त्यानें वैशंपायनास प्रश्न केला.)

जनमेनय विचारितो - हे वैशंपायना, अमित तेजस्वी जो परमात्मा विष्णु याचे पुराण अवतारांच्या कथा थोर थोर ज्ञात्यांच्या तोंडून ऐकत असतां त्या अवतारांत वाराह म्हणून एक अवतार होता एवढें आम्हीं ऐकिलें. परंतु, या यज्ञवराहाचें चरित्र, त्याचा विधि, त्याचा विस्तर, त्याचें कर्म, त्याचे गुण, त्याचा देशकाल, त्याचा अधिकार व त्याचें मनीषित हीं मला कांहीं समजत नाहींत. त्या वराहाचें अंतःस्वरूप काय, बाह्याकार कसा त्याची देवता कोणती, त्याची इतिकर्तव्यता काय, त्याचें सामर्थ्य कोणतें व त्यानें पूर्वी काय काय केलें, तें मला माहीत नाहीं. पूर्वी कृष्णद्वैपायनानें यज्ञासाठीं मोठमोठे ब्राह्मण जमले असतां त्यांच्या समक्ष या महावराहाचें चरित्र सांगितलें होतें. तर, हे वैशंपायना, भगवान नारायणानें हें वराहरूप कोणत्या कारणानें घेतलें ? व ही भूमी समुद्रांत निमग्न झाली असतां आपल्या दाढेनें वर कशी काढिली, इत्यादि त्या बुद्धिवान व अरिमर्दन श्रीकृष्णाचीं अशेष कर्मे यथाक्रम सविस्तर ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणें त्याचीं इतर अवतारांतील चरित्रे व त्याची मूल प्रकृति यांचेंही वर्णन आपण सांगावे. तो देवशत्रूंचा घात करणारा बुद्धिमान भगवान विष्णु देवगणांनी व्याप्त व पुण्यवान लोकांनीं सेवित असा पवित्र स्वर्गलोक सोडून या मृत्युलोकीं येऊन वसुदेवाच्या कुलांत जन्म घेऊन वासुदेव संज्ञा पावला, हें सर्व कां ? त्याचप्रमाणें या सर्व सृष्टीचा उगम, देव व मनुष्य यांचा नायक आणि सर्वव्यापी असा परमात्मा आपल्या दिव्य आत्म्याला मनुष्यदेहाशीं कां संयुक्त करिता झाला ? जो श्रेष्ठ चक्रधर हें मनुष्यांचे संसारचक्र निर्दोषपणें स्वतः चालवितो त्याला त्याच चक्रांत येऊन पडण्याची बुद्धि कशी झाली ? जो देव विष्णु स्वर्गांत राहून जगतांतील सर्व लोकांचें गोपन म्हणजे रक्षण करितो तो या भूलोकीं येऊन स्वतःच गोपत्व धरिता कां झाला ? जो भूतात्मा या पंचमहाभूतांचा कर्ता व धारणकर्ता असून ज्याचे उदरांत श्री नांदते असा तो या भूमीवर फिरणार्‍या यःकश्चित स्त्रीच्या गर्भांत कसा मावला ? ज्यानें देवमंडळींच्या इच्छेवरून (वामनावतारीं) तीन पावलांनीं तिन्ही लोक जिंकून क्रमानें स्वर्ग, मृत्यु व अधोलोक यांची प्राप्ति करून देणारे जे धर्म, अर्थ व कामरूपी तीन पुरुषार्थ त्यांचे मार्ग कायम केले; जो प्रलयकालीं स्वतः जलरूप धारण करून आणि हें सर्व पंचभूतात्मक जगत् सकारण गट्ट करून या सर्व लोकांना त्यांतील जडचेतन अंशासह एकचएक जलनिधीचें रूप देऊन टाकितो; जो स्वतः फार जुनाट असून ज्याने पुरातन काली वराहरूप धरून आपल्या दंताग्रानें या वसुधेला समुद्रांतून वर काढिले; ज्या अविनाशी सुरश्रेष्ठानें पूर्वी इंद्राखातर सर्व असुरांना जिंकून हें त्रैलोक्य देवांना अर्पण केलें; ज्यानें पूर्वीं सिंहाचें रूप घेऊन व पुन्हा त्यांत नर व सिंह अशी द्विधा करून नरसिंहरूपानें हिरण्यकशिपु नांवाचा महाबलाढय दैत्य मारिला; जो सर्व शक्तिमान परमात्मा पूर्वी प्रलयकालीं संवर्तक नांवाचें वडवाग्नीचें रूप घेऊन पाताल-समुद्रांतील सर्व जल हवि म्हणून पान करिता झाला; हे ब्रह्मन, ज्याला युगायुगाचे ठायीं अनंत मस्तकांचा, अनंत नेत्रांचा व अनेक चरणांचा देव असें म्हणत आले; सर्व स्थावरजंगम सृष्टि नष्ट होऊन व तिचे ठिकाणीं एकच एक जलसमुद्र होऊन राहिला असतां जो त्यांत शयन करितो व अशा वेळीं ज्याच्या मंथनदंडतुल्य नाभिनालांतून ब्रह्मदेवाचें वसतिस्थान जें कमल तें निर्माण झालें; ज्यानें तारकासुराशीं युद्ध करीत असतां सर्वदेवमय व सर्वशस्त्रमय असें आपलें शरीर करून सर्व दैत्य मारिले; ज्यानें गरुडावर बसून मस्तींत आलेला कालनेमी दैत्य लोळविला; मय नामक दैत्य जिंकिला; व तारक नामक महासुर मारला; ज्यापासून अमृत उत्पन्न झालें, असल्या क्षीरसमुद्राच्या उत्तर तीरासमीप जो योगमायेचा आश्रय करून शाश्वत योगाभ्यासांत पडून राहिला आहे; ज्या दिव्य पुराण पुरुषाला अत्यंत तपःसंचयाच्या प्रभावानें देवमाता आदिति ही वामनरूपानें गर्भांत धरिती झाली व गर्भांतून बाहेर पडतांच ज्यानें दैत्य मंडळीनें कोंडून टाकिलेल्या इंद्राचे मनोरथ पूर्ण करून त्याचा संतोष केला; तसेंच ज्यानें तीन लोकांत तीन पाउलें देऊन सर्व दैत्यांना जळांत लपून बसावयास लाविलें, व स्वर्गांतील देवांस पुन्हा निर्भयपणें क्रीडादिक करण्यास लाविलें; आणि इंद्राला, देवांच्या राज्यावर बसविलें, ज्यानें यज्ञासंबंधी पात्रें, दक्षणा, दीक्षा, चमस, उलूखल, वेदी, कुश, स्रुन, प्रोक्षणी, ध्रुवा, अवभृथाचें साहित्य, तसेंच आहवनीय अग्नि, गार्हपत्याग्नि तत्संबंधीं विधि व अन्वाहार्य कर्में, त्याचप्रमाणें तीन तर्‍हेच्या सुधा केल्या; ज्यानें हव्यकव्य करणारे द्विज निर्माण केले, व यज्ञसमयीं मंत्रविधिपूर्वक देवांना हव्य भाग घेण्याचा अधिकार दिला; व पितरांना कव्याचे भागीदार केलें; त्याचप्रमाणें ज्यानें यूप, समिधा, स्रुच, सोम, पवित्र असे परिधी, इत्यादि यज्ञीय द्रव्यें निर्माण केली, त्याचप्रमाणें अग्नि व तत्स्थापनार्थ भिन्न स्थानें निर्माण करून सदस्य, यजमान, मेध्यप्रभृति उत्तम उत्तम क्रतु निर्माण केले; ज्यानें ब्रह्मदेवानें घातलेल्या प्रवृत्तीप्रमाणें यज्ञाचे निरनिराळे विभाग लोकांमध्यें चालू करून आपलें सामर्थ्य प्रकट केलें; ज्यानें क्षण, लव, काष्ठा, कला, प्रात:, मध्यान्ह व सायं हे तीन काल, व मुहूर्त, तिथी, मास, पक्ष, संवत्सर, ऋतु याप्रमाणें कालभाग निर्माण करून, नित्य, नैमित्तिक व काम्य या त्रिविध कर्मांकडे या कालविभागाचा उपयोग कसकसा करावयाचा याबद्दल श्रुति, स्मृति व शिष्टाचार या प्रकारचीं तीन प्रमाणें ठरवून दिली, त्याचप्रमाणें ज्यानें स्थावरजंगमात्मक क्षेत्रें म्हणजे शरीरें निर्माण करून त्यांचे ठिकाणीं आयुष्य म्हणजे कालमर्यादा, वृद्धि (म्हणजे लहानाचें मोठें होणें किंवा एकाचें अनेक होणें), द्विपाद, चतुष्पाद इत्यादि लक्षणभेद व सौंदर्यादि धर्म निर्माण केले; त्याचप्रमाणें ज्यानें ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य असे यज्ञोपयोगी तीन वर्ण; स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तीन लोक; ऋक, यजुः, साम हे तीन वेद; दक्षिण, आहवनीय, गार्हपत्य हे तीन अग्नि; भूत, भविष्य व वर्तमान हे तीन काल; सात्विक, राजस, तामस ही तीन कर्में; पुत्रैषणा, वित्तैषणा व लोकैषणा या प्रकारचीं तीन व्यसनें; सत्व, रज व तम हे तीन गुण व भूः, भुवर व स्वर हे तीन लोक; इत्यादि अनेक गोष्टी ज्यानें आपल्या अपार सामर्थ्यानें सृष्टीच्या आरंभी निर्माण केल्या; तो सर्व भूतांचा व गुणांचा स्रष्टा असून स्वतःही जो भूतात्मक व गुणात्मक आहे; जो जीवांना जन्ममृत्यूच्या रूपानें ब्रह्मांडांत सर्वत्र फिरवितो, व जो जीवरूप असतां इंद्रियें व विषय यांच्या संयोगानें प्राप्त होणार्‍या सुखांत रमतो; जो सर्वनियामक आहे, ज्याचे पदाचा मार्ग धर्मिष्ठांना सदा खुला आहे, परंतु, पाप्यांना मात्र जेथें रीघ नाहीं; ब्राह्मणादि चतुर्वर्ण ज्यापासून झाले; होता, उद्गाता इत्यादि चतुर्विध ऋत्विजांचा जो रक्षणकर्ता; जो चतुर्विध विद्येचा (आन्विक्षिकी इ.) ज्ञाता, व ब्रह्मचर्यादि चार आश्रमांचा आधार; दशदिशा ज्याच्या उदरांत राहातात, असा जो आकाशरूप; त्याचप्रमाणें जो वायुरूप, जलरूप, व अग्नि, चंद्र व सूर्य इत्यादि ज्योतिरूप; जो निर्विकल्प, जो चक्षुःस्वरूप, जो रात्रिरूप अंधकाराचा नाशकर्ता, जो सर्व ज्योतींतील श्रेष्ठ ज्योति व सर्व तपांतील श्रेष्ठ तप असें श्रुतींत म्हटलें आहे; सूत्रात्मरूपानें ज्याला पर म्हणतात; विराटरूपानें ज्याला अपर म्हणतात, व ज्याला आत्मरूपानें परात्परही म्हणतात; ज्याच्या नारायण स्वरूपांत सर्व वेद, सर्व क्रिया व सर्व धर्म हे राहातात; सत्य, तप व गति आणि मोक्ष हीं सर्व ज्याच्या नारायणरूपाच्या आश्रयानें राहातात; जो सर्वांचे परमोच्च आश्रयस्थान आहे; जो आदित्याचाही आदि आहे; जो स्वतः दिव्य, सर्वव्यापी व दैत्यांतक आहे; युगांतकालीं जो अंतकाची कामगिरी बजावीत असून जो यमाचाही अंतक आहे; मन्वादिक जे लोकाचारनियंते त्यांचाही जो नियंता; जो सर्व पवित्रांत पवित्र, जो वेदवेत्त्यांनाही परमवेद्य, जो मरीच्यादिकांचा प्रभु, जो सर्व सुंदर वस्तूंत सुंदर व तेजस्वींत तेजस्वी; जो मनुष्यांचे मन, तपस्व्यांचे तप, विनयशीलांचा विनय, तेजस्व्यांचे तेज, सर्व सृष्ट पदार्थांचा स्रष्टा व सर्व लोकांचा आदिकारण; जो देहधारकांचा देह, गतिमंतांची गति, जो आकाशांत निर्माण झालेला वायु, व वायूनें चेतन होणारा हुताशन; अग्नि हा देवांचा प्राण, व मधुसूदन नारायण त्या अग्नीचाही प्राण; जठराग्नीच्या सामर्थ्यानें अन्नाचा परिपाक होऊन अन्नरस उत्पन्न होतो, मग त्या अन्नरसापासून रक्त बनतें; रक्तापासून मांस, मांसापासून मेद, मेदापासून अस्थि, अस्थीपासून मज्जा, मज्जेपासून शुक्र, व शुक्रापासून गर्भसंभव ही सर्व परंपरा एका रसव्यापारापासून निर्माण होते. आतां हा जो गर्भरूप पिण्ड याला हेतुभूत जें रेत तो उदकाचा भाग आहे; व हा शुभ्रवर्ण असल्यामुळें सोमरूप आहे. पुढें जठराग्नीच्या योगानें उत्पन्न होणारा जो उष्मा हा अग्निस्वरूप होय. त्याचप्रमाणें पुरुषाचें शुक्र हें सोमरूप आहें, व स्त्रीचें आर्तव हें अग्निरूप आहे. एतावता शुक्र व आर्तव हे दोन्हीही भाग रसरूप असून चंद्र व अग्नि हे त्यांचे पोषक आहेत. कफापासून शुक्र होतें, पित्तापासून शोणित होतें, हृदयांत कफ असतो व नाभीचे ठिकाणीं पित्त असतें; देहामध्यें हृदय राहातें, तेंच मनाचेंही स्थान होय. मन हाच प्रजापति होय; आणि कफ हा सोम समजला जातो; व पित्त हा अग्नि असून तो जठराग्नि संज्ञेनें नाभी व कोष्ठ यांमधील प्रदेशांत राहातो; एतावता हें सर्व जगत (पिण्ड) अग्नीषोमात्मक आहे. याप्रमाणें शुक्रशोणितसंयोगानें गर्भ स्थापित होऊन तो मेघाप्रमाणें वाढीस लागला असतां त्यांत जीव हा परमेश्वरासहित प्रवेश करितो; प्रवेशानंतर तो शिरःप्रभृति अवयव निर्माण करून त्याचें पोषण करितो. तो शरीरस्थ प्राणरूप होऊन प्राण, अपान, समान, उदान व व्यान असे आपले पांच भाग करितो. यांपैकीं प्राण हा हृदयाचे ठिकाणीं राहून त्या भागास वाढवितो; अपान हा देहाचें पश्चिमार्ध म्हणजे जघनापासून चरणापर्यंतचा भाग यास वाढवितो; उदान वायु हा शरीराचा छातीपासून वरचा भाग वाढवितो; व्यान हा सर्व शरीरसंधींचे ठिकाणीं राहून शरीराला बळकटी आणितो व म्हणूनच याला व्यान असें म्हणतात; आणि समान हा नाभीदेशीं राहून अन्नपानादिक यथास्थान पोचवितो.

या प्रकारें पंचप्राणांची वांटणी झाल्यावर त्या जीवाला इंद्रियद्वारा विषयरूपानें पृथ्वी, आप, तेज इत्यादि पंचमहाभूतांचा साक्षात्कार होऊं लागतो. याचें कारण, त्याचीं जीं इंद्रियें तीं पृथिव्यादि पंचमहाभूतांचीच विशिष्ट रूपें असल्यामुळें तीं स्वभावतःच आपआपल्या विषयांशी संगत होऊं लागतात. या शरीरांपैकीं देह हा पृथ्वीचा भाग, प्राण हा वायूचा, कर्णादिकांची रंध्रें हा आकाशाचा, लालामूत्रादि स्राव हा जलाचा; व नेत्रांतील ज्योति हा भाग तेजाचा; व या सर्वांचा नियामक, तें मन; व या मनाच्याच सामर्थ्यानें ग्रामनगरादि प्रदेश हे निर्माण झाले. याप्रमाणें ही अनादिसिद्ध सृष्टि त्या परमात्म्यानेंच निर्माण केली असतां तीमधील या मर्त्य लोकांत तोच परमात्मा मनुष्यरूप धारण करून येण्यास कसा राजी झाला ? याबद्दल मला मोठें आश्चर्य वाटतें व संशयही येतो. मनुष्ययोनींतील जीव अखेर ज्याकडे जावें म्हणून धांव घेतात, तोच उलट मनुष्यांत येऊन मिसळतो याला काय म्हणावे ? हे वैशंपायना, मी माझे एकंदर पूर्वज व त्यांतून विशेषतः माझी शाखा याबद्दलचा इतिहास तुमचे मुखांतून ऐकला. आतां श्रीविष्णु व एकंदर वृष्णिकुल, यांचा वृत्तांत क्रमशः ऐकण्याची इच्छा आहे. देव तसेच दैत्यही विष्णु हा अतिशय आश्चर्यकारक आहे असें म्हणतात. याकरितां असल्या त्या विष्णूची उत्पत्ति व त्याचें तें आश्चर्यकारक चरित्र मला सांगा. बलवीर्यानें प्रख्यात व तेजानें अपरिमित व स्वकर्मानें जीवमात्राला चकित करून सोडणारा अशा त्या विष्णूचें चमत्कारपूर्ण चरित्र मला खचितच सुखावह होईल, याकरितां तुम्ही तें मला सांगा.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
वराहोत्पत्तिवर्णने चत्वारिंशोऽध्यायः ॥ ४० ॥
अध्याय चाळिसावा समाप्त

GO TOP