श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
अष्टत्रिंशोऽध्यायः


स्यमन्तकमणिकथावर्णनम्

वैशम्पायन उवाच
भजमानस्य पुत्रोऽथ रथमुख्यो विदूरथः ।
राजाधिदेवः शूरस्तु विदूरथसुतोऽभवत् ॥ १ ॥
राजाधिदेवस्य सुता जज्ञिरे वीर्यवत्तराः ।
दत्तातिदत्तबलिनौ शोणाश्वः श्वेतवाहनः ॥ २ ॥
शमी च दण्डशर्मा च दण्डशत्रुश्च शत्रुजित् ।
श्रवणा च श्रविष्ठा च स्वसारौ संबभूवतुः ॥ ३ ॥
शमीपुत्रः प्रतिक्षत्रः प्रतिक्षत्रस्य चात्मजः ।
स्वयंभोजः स्वयंभोजाद्धृदीकः संबभूव ह ॥ ४ ॥
तस्य पुत्रा बभूवुर्हि सर्वे भीमपराक्रमाः ।
कृतवर्माग्रजस्तेषां शतधन्वाथ मध्यमः ॥ ५ ॥
देवर्षेर्वचनात् तस्य भिषग् वैतरणश्च यः ।
सुदान्तश्च विदान्तश्च कामदा कामदन्तिका ॥ ६ ॥
देववांश्चाभवत् पुत्रो विद्वान् कम्बलबर्हिषः ।
असमौजास्तथा वीरो नासमौजाश्च तावुभौ ॥ ७ ॥
अजातपुत्राय सुतान् प्रददावसमौजसे ।
सुदंष्ट्रं चारुरूपं च कृष्णमित्यन्धकास्त्रयः ॥ ८ ॥
एते चान्ये च बहवो अन्धकाः कथितास्तव ।
अन्धकानामिमं वंशं धारयेद् यस्तु नित्यशः ॥ ९ ॥
आत्मनो विपुलं वंशं लभते नात्र संशयः ।
गान्धारी चैव माद्री च क्रोष्टुर्भार्ये बभूवतुः ॥ १० ॥
गान्धारी जनयामास अनमित्रं महाबलम् ।
माद्री युधाजितं पुत्रं ततो वै देवमीढुषम् ॥ ११ ॥
अनमित्रममित्राणां जेतारमपराजितम् ।
अनमित्रसुतौ निघ्नो निघ्नतो द्वौ बभूवतुः ॥ १२ ॥
प्रसेनश्चाथ सत्राजिच्छत्रुसेनाजितावुभौ ।
प्रसेनो द्वारवत्यां तु निवसन्त्यां महामणिम् ॥ १३ ॥
दिव्यं स्यमन्तकं नाम समुद्रादुपलब्धवान् ।
तस्य सत्राजितः सूर्यः सखा प्राणसमोऽभवत् ॥ १४ ॥
स कदाचिन्निशापाये रथेन रथिनां वरः ।
अब्धिकूलमुपस्प्रष्टुं उपस्थातुं ययौ रविम् ॥ १५ ॥
तस्योपतिष्ठतः सूर्यं विवस्वानग्रतः स्थितः ।
अस्पष्टमूर्तिर्भगवांस्तेजोमण्डलवान् प्रभुः ॥ १६ ॥
अथ राजा विवस्वन्तमुवाच स्थितमग्रतः ।
यथैवं व्योम्नि पश्यामि सदा त्वां ज्योतिषाम्पते ॥ १७ ॥
तेजोमण्डलिनं देवं तथैव पुरतः स्थितम् ।
को विशेषोऽस्ति मे त्वत्तः सख्येनोपगतस्य वै ॥ १८ ॥
एतच्छ्रुत्वा तु भगवान् मणिरत्नं स्यमन्तकम् ।
स्वकण्ठादवमुच्यैव एकान्ते न्यस्तवान् विभुः ।
ततो विग्रहवन्तं तं ददर्श नृपतिस्तदा ॥ १९ ॥
प्रीतिमानथ तं दृष्ट्वा मुहूर्तं कृतवान् कथाम् ॥ २० ॥
तमपि प्रस्थितं भूयो विवस्वन्तं स सत्रजित् ।
लोकानुद्भासयस्येतान् येन त्वं सततं प्रभो ।
तदेतन्मणिरत्नं मे भगवन् दातुमर्हसि ॥ २१ ॥
ततः स्यमन्तकमणिं दत्तवांस्तस्य भास्करः ।
स तमाबध्य नगरीं प्रविवेश महीपतिः ॥ २२ ॥
तं जनाः पर्यधावन्त सूर्योऽयं गच्छतीति ह ।
पुरीं विस्मापयित्वा च राजा त्वन्तःपुरं ययौ ॥ २३ ॥
तत्प्रसेनजितं दिव्यं मणिरत्नं स्यमन्तकम् ।
ददौ भ्रात्रे नरपतिः प्रेम्णा सत्राजिदुत्तमम् ॥ २४ ॥
स मणिः स्यन्दते रुक्मं वृष्ण्यन्धकनिवेशने ।
कालवर्षी च पर्जन्यो न च व्याधिभयं ह्यभूत् ॥ २५ ॥
लिप्सां चक्रे प्रसेनात्तु मणिरत्ने स्यमन्तके ।
गोविन्दो न च तल्लेभे शक्तोऽपि न जहार सः ॥ २६ ॥
कदाचिन्मृगयां यातः प्रसेनस्तेन भूषितः ।
स्यमन्तककृते सिंहाद् वधं प्राप वनेचरात् ॥ २७ ॥
अथ सिंहं प्रधावन्तमृक्षराजो महाबलः ।
निहत्य मणिरत्नं तदादाय बिलमाविशत् ॥ २८ ॥
ततो वृष्ण्यन्धकाः कृष्णं प्रसेनवधकारणात् ।
प्रार्थनां तां मणेर्बुद्ध्वा सर्व एव शशङ्किरे ॥ २९ ॥
स शङ्क्यमानो धर्मात्मा नकारी तस्य कर्मणः ।
आहरिष्ये मणिमिति प्रतिज्ञाय वनं ययौ ॥ ३० ॥
यत्र प्रसेनो मृगयामाचरत् तत्र चाप्यथ ।
प्रसेनस्य पदं गृह्य पुरुषैराप्तकारिभिः ॥ ३१ ॥
ऋक्षवन्तं गिरिवरं विन्ध्यं च गिरिमुत्तमम् ।
आन्वेषयन् परिश्रान्तः स ददर्श महामनाः ॥ ३२ ॥
साश्वं हतं प्रसेनं वै नाविन्दच्चेच्छितं मणिम् ।
अथ सिंहः प्रसेनस्य शरीरस्याविदूरतः ॥ ३३ ॥
ऋक्षेण निहतो दृष्टः पादैर्ऋक्षश्च सूचितः ।
पादैरन्वेषयामास गुहामृक्षस्य माधवः ॥ ३४ ॥
महत्यृक्षबिले वाणीं शुश्राव प्रमदेरिताम् ।
धात्र्या कुमारमादाय सुतं जाम्बवतो नृप ।
क्रीडापयन्त्या मणिना मा रोदीरित्यथेरिताम् ॥ ३५ ॥
धात्र्युवाच
सिंहः प्रसेनमवधीत् सिंहो जाम्बवता हतः ।
सुकुमारक मा रोदीस्तव ह्येष स्यमन्तकः ॥ ३६ ॥
सुव्यक्तीकृतशब्दस्तु तूष्णीं बिलमथाविशत् ।
प्राविश्य चापि भगवांस्तमृक्षबिलमञ्जसा ॥ १- ३८-३७ ॥
स्थापयित्वा बिलद्वारि यदूँल्लाङ्गलिना सह ।
शार्ङ्गधन्वा बिलस्थं तु जाम्बवन्तं ददर्श ह ॥ ३८ ॥
युयुधे वासुदेवस्तु बिले जाम्बवता सह ।
बाहुभ्यामेव गोविन्दो दिवसानेकविंशतिम् ॥ ३९ ॥
प्रविष्ते तु बिलं कृष्णे बलदेवपुरःसराः ।
पुरीं द्वारवतीमेत्य हतं कृष्णं न्यवेदयन् ॥ ४० ॥
वासुदेवस्तु निर्जित्य जांबवन्तं महाबलम् ।
भेजे जांबवतीं कन्यामृक्षराजस्य संमताम् ।
मणिं स्यमन्तकं चैव जग्राहात्मविशुद्धये ॥ ४१ ॥
अनुनीयर्क्षराजानं निर्ययौ च तदा बिलात् ।
द्वारकामगमत् कृष्णः श्रिया परमया युतः ॥ ४२ ॥
एवं स मणिमाहृत्य विशोद्ध्यात्मनमच्युतः ।
ददौ सत्राजिते तं वै सर्वसात्त्वतसंसदि ॥ ४३ ॥
एवं मिथ्याभिशप्तेन कॄष्णेनामित्रघातिना ।
आत्मा विशोधितः पापाद् विनिर्जित्य स्यमन्तकम् ॥ ४४ ॥
सत्राजितो दश त्वासन्भार्यास्तासां शतं सुताः ।
ख्यातिमन्तस्त्रयस्तेषां भङ्गकारस्तु पूर्वजः ॥ ४५ ॥
वीरो वातपतिश्चैव उपस्वावांश्च ते त्रयः ।
कुमार्यश्चापि तिस्रो वै दिक्षु ख्याता नराधिप ॥ ४६ ॥
सत्यभामोत्तमा स्त्रीणां व्रतिनी च दृढव्रता ।
तथा प्रस्वापिनी चैव भार्यां कृष्णाय तां ददौ ॥ ४७ ॥
समाक्षो भङ्गकारिस्तु नारेयश्च नरोत्तमौ ।
जज्ञाते गुणसंपन्नौ विश्रुतौ रूपसंपदा ॥ ४८ ॥
माद्रीपुत्रस्य जज्ञेऽथ पृश्निः पुत्रो युधाजितः ।
जज्ञाते तनयौ पृश्नेः श्वफल्कश्चित्रकस्तथा ॥ ४९ ॥
श्वफल्कः काशिराजस्य सुतां भार्यामविन्दत ।
गांदिनीं नाम तस्याश्च सदा गाः प्रददौ पिता ॥ ५० ॥
तस्यां जज्ञे महाबाहुः श्रुतवानिति विश्रुतः ।
अक्रूरोऽथ महाभागो यज्वा विपुलदक्षिणः ॥ ५१ ॥
उपासङ्गस्तथा मद्‌गुर्मृदुरश्चारिमेजयः ।
अविक्षिपस्तथोपेक्षः शत्रुहा चारिमर्दनः ॥ ५२ ॥
धर्मधृग् यतिधर्मा च गृध्रभोजोऽन्धकस्तथा ।
आवाहप्रतिवाहौ च सुन्दरी च वराङ्गना ॥ ५३ ॥
विश्रुता सांबमहिषी कन्या चास्य वसुन्धरा ।
रूपयौवनसंपन्ना सर्वसत्त्वमनोहरा ॥ ५४ ॥
अक्रूरेणोग्रसेन्यां तु सुतौ द्वौ कुरुनन्दन ।
प्रसेनश्चोपदेवश्च जज्ञाते देववर्चसौ ॥ ५५ ॥
चित्रकस्याभवन् पुत्राः पृथुर्विपृथुरेव च। ॥
अश्वग्रीवोऽश्वबाहुश्च सुपार्श्वकगवेषणौ ॥ ५६ ॥
अरिष्टनेमेरश्वश्च सुधर्मा धर्मभृत् तथा । ॥
सुबाहुर्बहुबाहुश्च श्रविष्ठाश्रवणे स्त्रियौ ॥ ५७ ॥
इमां मिथ्याभिशस्तिं यः कृष्णस्य समुदाहृताम् ।
वेद मिथ्याभिशापास्तं न स्पृशन्ति कदाचन ॥ ५८ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
हरिवंशपर्वणि अष्टत्रिंशोऽध्यायः


स्यमंतकमणि -

वैशंपायन सांगतात - भजमानाला विदूरथ नांवाचा पुत्र झाला, हा रथींमध्यें श्रेष्ठ होता. याला पुढें राजाधिदेव नांवाचा एक शूर पुत्र झाला. या राजाधिदेवाला एकाहून एक असे चढते पराक्रमी पुत्र झाले. त्यांचीं नांवें - दत्त, अतिदत्त, शोणाश्व, श्वेतवाहन, शमी, दंडशर्मा, दंडशत्रु व शत्रुजित. यांना श्रवणी व श्रविष्ठा अशा दोन बहिणी होत्या. शमीला प्रतिक्षत्र नामक पुत्र झाला. प्रतिक्षत्राचा स्वयंभोज, स्वयंभोजापासून हृदीक झाला. हृदीकाचे सर्वच पुत्र मोठे पराक्रमी झाले. यांत कृतवर्मा हा वडील होता व शतधन्वा, हा मध्यम. या शतधन्व्याला देवर्षि च्यवन याच्या आशीर्वादानें चार पुत्र झाले, त्यांचीं नांवें - भिषक, वैतरण, सुदांत व विदांत. यांशिवाय कामदा व कामदंतिका अशा दोन कन्या झाल्या. कंबलबर्हि नामक जो मरुत्तपुत्र सांगितला त्याला देववान नामक पुत्र झाला. देववानाला असमौजा, वीर आणि नासमौजा. यांपैकीं असमौजाला पुढें संतति न झाल्यामुळें अंधकानें आपले तीन पुत्र सुदंष्ट्र, चारुरूप व कृष्ण हे असमौजाला दिले. हे राजा, हे व यांशिवाय दुसरे अनेक अंधकवंशीय राजे मीं तुला सांगितले. या अंधकाच्या वंशाचें जो नित्य मनन करील त्याला स्वतःला विपुल वंशप्राप्ति होईल.

क्रोष्टूला गांधारी व माद्री या स्त्रिया होत्या. (हें मागें सांगितलेंच आहे.) यांतील गांधारीला महाबलाढय अनमित्र नांवाचा पुत्र झाला. माद्रीला युधाजित आणि देवमीढुष. अनमित्र हा शत्रूंना जिंकणारा आणि स्वत: पराभव न पावणारा असा होता. या अनमित्राला निघ्ननामक पुत्र झाला. निघ्नाला प्रसेन व सत्राजित असे दोन पुत्र झाले. हे दोघेही शत्रुसेनेला जिंकणारे होते. यांपैकीं प्रसेन हा द्वारावतींत रहात असतां त्याला समुद्रांतून निघालेला स्यमंतक नांवाचा दिव्य महामणी प्राप्त झाला. त्याची कथा अशी -

या प्रसेनाचा बंधु सत्राजित याचा आणि सूर्याचा जिवश्च कंठश्च स्नेह होता. एके वेळीं तो रथिश्रेष्ठ सत्राजित रात्र सरून प्रातःकाल होण्याच्या समयीं स्नान व सूर्योपस्थान करण्यासाठीं रथांत बसून समुद्रतीरीं आला. तेथें सूर्योपस्थान करीत असतां भगवान् सूर्यनारायण नाक, डोळे वगैरेंचा आकार स्पष्ट न होतां केवळ तेजोमंडलरूपानें त्याचे पुढें येऊन उभा राहिला. त्याला पाहून सत्राजित म्हणाला, 'हे ज्योतिष्पते, तूं इतका मजसन्निध येऊन मला अधिक फायदा तो काय ? कारण, तूं आकाशांत असतां ज्याप्रमाणें केवळ तेजोमंडलरूपानें माझ्या दृष्टीस पडतोस त्याच रूपानें जर आतांही दृष्टीस पडणार तर मग तुझी माझी एवढी दाटी पडून मला विशेष लाभ कोणता ?' हे त्याचे शब्द ऐकतांच भगवान सूर्यनारायणानें आपल्या कंठांतील स्यमंतक नांवाचें मणिरत्न सोडून एकीकडे पृथ्वीवर ठेविलें. तो तेजस्वी मणी दूर होतांच सूर्याचे नाकडोळे सत्राजिताच्या स्पष्ट दृष्टीस पडूं लागले. तेव्हां त्याचें तें रमणीय रूप पाहून प्रसन्न होऊन राजानें त्याशीं घटकाभर इकडल्या तिकडल्या गोष्टी केल्या. मग भगवान् सूर्य जावयास निघाला. तेव्हां सत्राजित त्याला म्हणाला, "हे भगवन, हे प्रभो, आपण या मणिरत्नाच्या तेजानें सर्व लोकांना हा नित्य प्रकाश देत असतां (हें मला आतां समजले). तर एवढें रत्न आपण मला द्यावें. कारण आपण माझे जिवश्च स्नेही म्हणविता." हें ऐकून भास्करानें तो मणी सत्राजिताला दिला. तो गळ्यांत बांधून सत्राजित आपल्या राज्यांत फिरूं लागला. तेव्हां प्रत्यक्ष सूर्यच धरणीवर आला असा भ्रम होऊन नगरांतले लोक त्याचे मागें धांवत सुटले. याप्रमाणें नागरिकांना थक्क करून सोडून सत्राजित त्या मण्यासह अंतःपुरात गेला. अखेरीस त्यानें तो मणी आपला प्रियबंधु प्रसेन याला दिला. हा मणी वृष्णि व अंधक यांच्या घरीं असतां नित्य सुवर्ण वीत असे. हा मणी तेथें असतां पर्जन्य यथाकाल पडे; व रोगराईची भीति मुळींच नसे. असला हा मणी प्रसेनापासून आपणास मिळावा अशी श्रीकृष्णानें इच्छा केली. परंतु, तो त्यास प्राप्त झाला नाही. प्रसेनापासून तो जबरीनें हिसकावून घेण्याइतकी शक्ति कृष्णाचे अंगांत नव्हती असें नाहीं, पण त्यानें त्या उपायानें हरण केलें नाहीं.

पुढें एकदा तो प्रसेन त्या स्यमंतकमण्यानें आपलें शरीर भूषित करून मृगयेला गेला, व तेथें त्या मण्यामुळें वनचारी सिंहाचे हातून मरण पावला. पुढें तें मणिरत्न घेऊन तो सिंह पळत असतां एक बलाढय अस्वलांचा राजा (जांबवान) त्यावर तुटून पडला, व त्या सिंहाला मारून व त्याचें तें मणिरत्न घेऊन आपल्या गुहेंत शिरला. (या प्रकारें प्रसेनाचा वध होऊन मणी अस्वलाच्या गुहेंत जाऊन पडला. परंतु) पूर्वीं कृष्णानें प्रसेनापासून तो मणी आपणास मिळावा अशी इच्छा केली असल्यामुळें वृष्णि व अंधक कुळांतील मंडळी या प्रसेनाला कृष्णानेंच मारिलें अशी शंका घेऊं लागले. तो आरोप जेव्हां धर्मात्मा श्रीकृष्ण याचे कानीं आला, तेव्हां त्यानें चकचकीत सांगितलें कीं, मी तर हें कर्म केलें नाहींच व शिवाय हा मणी मी असेल तेथून मिळवून आणून देतों. अशी प्रतिज्ञा करून प्रसेन ज्या अरण्यांत शिकारीला गेला होता त्या अरण्यांत बरोबर कांहीं विश्वासू नोकर घेऊन कृष्ण गेला. तेथें त्यांच्या साहाय्यानें प्रसेनाच्या पावलांचा मार्ग काढीत गिरिश्रेष्ठ ऋक्षवान आणि विंध्य हे त्यानें पालथे घातले. अखेर तो थकून गेला. इतक्यांत प्रसेन व प्रसेनाचा घोडा हे दोघेही मरून पडलेले त्याला आढळले. परंतु, स्यमंतकमणी तेथें दृष्टीस पडेना. पुढें पाहातां पाहातां प्रसेनापासून थोडयाशाच अंतरावर अस्वलानें मारून टाकिलेला सिंहही दृष्टीस पडला. सिंहाला अस्वलानेंच मारिलें, ही गोष्ट अस्वलाचीं जीं धुळींत पदचिन्हें उमटलीं होतीं त्यावरून ध्यानांत आली. मग त्या पावलांचा माग धरीत धरीत, तो अस्वल धांवत धांवत ज्या मार्गानें गेला होता, त्या मार्गानें श्रीकृष्ण त्या अस्वलाच्या गुहेच्या तोंडाशीं पोंचला. तो त्या अस्वलाच्या त्या विशाल गुहेंतून एका तरुण स्त्रीची वाणी त्याचें कानीं पडली. हे राजा, ही स्त्री म्हणजे त्या जांबवान् अस्वलाच्या मुलाला खेळविणारी दाई होय. ती दाई तो स्यमंतक मणी त्या मुलापुढें खेळण्याकरितां ठेवून त्याला म्हणाली, "बाळ, रडूं नको. हा मणी घे. हा तुझाच आहे. कारण, हा मणी ज्याजवळ होता, त्या प्रसेनाला सिंहानें मारिलें व त्या सिंहाला तुझा बाप जो जांबवान त्यानें मारून हा जिंकून आणिला आहे. यासाठीं माझे शहाणे बाळा, तूं रडूं नको."

दाईचे हें बोलणे श्रीकृष्णाच्या कानी अत्यंत स्पष्ट रीतीनें पडलें. (तें ऐकून आपण केलेला तर्क खरा अशी त्याची खात्री झाली.) मग बलरामासह आपल्या बरोबरच्या सर्व यादवांस गुहेच्या बाहेरच ठेवून शार्ङ्गधनुष्य धारण करणारा भगवान कृष्ण त्या मण्याच्या उजडानें त्या अस्वलाच्या गुहेंत शिरला; तेथें जांबवान त्याच्या दृष्टीस पडला. मग त्या बिळांत एकवीस दिवसपर्यंत वासुदेवाचें व जांबवंताचें बाहुयुद्ध झालें. श्रीकृष्ण बहुत दिवस जेव्हां बिळांतून परतेना त्या वेळीं बलराम व इतर यादव हे कृष्ण बहुधा मारला गेला असावा असा तर्क करून द्वारकेला परत आले, व तेथें कृष्ण मेला, अशी बातमी त्यांनीं दिली.

इकडे कृष्णानें त्या महाबलाढयही जांबवंताला जेव्हां हार खावयास लाविलें, तेव्हां त्या जांबवंतानेंच प्रसन्न होऊन आपल्या मतीनें आपली जांबवती नामक सुंदर कन्या श्रीकृष्णाला अर्पण केली; त्याशिवाय, श्रीकृष्णानें आपणावर आलेला आळ दूर होऊन आपले वर्तनाची साफी व्हावी म्हणन तो स्यमंतक मणीही त्याजपासून घेतला. मग त्या जांबवानाला चार समजुतीच्या गोष्टी सांगून व आपण केलेल्या युद्धाबद्दलचा खेद दूर करून श्रीकृष्ण त्याच्या गुहेंतून बाहेर पडला, व अत्यंत शोभेनें युक्त अशा स्थितीत द्वारकेंत शिरला. याप्रमाणें हरवलेला स्यमंतकमणी संपादन करून व आपलें वर्तन मुळापासूनच चोख होतें अशी सर्वांची खात्री पटवून श्रीकृष्णानें सर्व सात्वत मंडळींची सभा भरवून तींत तो स्यमंतक मणी उघड रीतीनें सत्राजिताला अर्पण केला. एतावता, शत्रुमर्दक श्रीकृष्णानें आपल्यावर खोटाच आळ आला असतांही (आळ घेणारांना शिव्या देत न बसता) स्यमंतक मणी (म्हणजे मुद्देमाल) हुडकून आणून आपले वर्तनाची सफाई केली.

सत्राजिताला दहा बायका होत्या, त्यांपासून शंभर मुलगे झाले होते. या शंभरांपैकीं तिघे फार प्रसिद्ध होते. यांतील ज्येष्ठाचें नांव भंगकार असें होतें. दुसर्‍याचें वातपति; हा वीर होता. तिसर्‍याचें नांव वियतस्नात. या तीन पुत्रांप्रमाणेंच सत्राजिताला सर्वत्र प्रख्यात अशा तीन कन्या होत्या. त्यांचीं नांवें - सत्यभामा; ही सर्व स्त्रियांत वरिष्ठ होती. दुसरी व्रतिनी; हिचें व्रतपालन मोठें कडक असे; व तिसरी प्रस्वापिनी. यांपैकीं सत्यभामा त्यानें श्रीकृष्णाला दिली. भंगकाराला दोन पुत्र होते, त्यांचीं नांवें - समाक्ष आणि नारेय. हे दोघेही मोठे गुणी निघाले असून शिवाय सद्वर्तन व रूपसंपत्ति यांविषयीं त्यांचा लौकिक असे.

मागें क्रोष्टूची जी कनिष्ठ स्त्री माद्री म्हणून सांगितली तिचा पुत्र जो युधाजित त्याला वृष्णि नांवाचा पुत्र होता. या वृष्णीला श्वफल्क आणि चित्रक असे दोन पुत्र होते. यांपैकीं श्वफल्काला, जिच्याबद्दल तिचा पिता प्रतिदिनीं गोदान करीत असल्यामुळें जिला गांदिनी असें नांव पडलें होतें, ती काशीराजाची कन्या भार्या मिळाली होती. या गांदिनीचे ठिकाणीं अक्रूर हा जन्मला. हा अक्रूर मोठा बलाढय, भाग्यवान, यज्ञकर्ता व विपुल दक्षणा देणारा असा होता. या अक्रूराशिवाय उपासांग, मंगु, मृदूर, अरिमेजय, गिरिक्षिप, उपेक्ष, शत्रुहा, अरिमर्दन, धर्मभृत, यतिधर्मा, गृध्र, भोज, अंधक, सुबाहु व प्रतिबाहु हे पुत्र; व सुंदरी नांवाची रूपवती कन्या. इतकीं अपत्यें श्वफल्काला होतीं. यांतील रूपयौवनसंपन्न व प्राणिमात्राचें मनोहरण करणारी जी सुंदर कन्या सुंदरी ही विश्रुताश्वाची पट्टराणी झाली. अक्रूराला उग्रसेनी नामक स्त्रीचे ठिकाणीं सुदेव व उपदेव या नांवांचे देवतुल्य तेजस्वी दोन पुत्र झाले. श्वफल्काचा भाऊ जो चित्रक सांगितला त्याला विपृथु, अश्वग्रीव, अश्वबाहु, सुपार्श्वक, गवेषण, अरिष्टनेमी, अश्व, सुधर्मा, धर्मभृत, सुबाहु व बहुबाहु, इतके पुत्र व श्रविष्ठा व श्रवणा या दोन मुली होत्या.

हे राजा, या अध्यायांत सांगितलेलें श्रीकृष्णावरील मिथ्या आरोपाचें वृत्त जो कोणी समजून घेईल, त्यावर खोटे आळ कधींही येणार नाहींत.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
स्यमन्तकमणिकथावर्णनं नाम अष्टत्रिंशोऽध्यायः ॥ ३८ ॥
अध्याय अडतिसावा समाप्त

GO TOP